Friday, December 25, 2009

""रान मोकळे मोकळे, बघे भरून नभास त्याचा हिरवा हिरवा, आज प्रवास प्रवास''



- कमी पावसामुळे बळीराजा धास्तावलाय, शहरी माणसाला चिंता पाणी वर्षभर पुरेल की नाही याची. या चिंता विसरायच्या तर त्या पावसाच्या, त्या नभाच्या भेटीला जाणेच इष्ट. वरुणराजाने किमान डोंगरांच्या कडेकपारी हिरव्या करून सोडल्यात आणि माणसाला निसर्गाचा समतोल बिघडू देऊ नका, नाही तर तुमचाच तोल बिघडेल, असा इशारा दिला आहे.

त्र्यंबकेश्‍वरची इतिहासप्रसिद्ध ब्रह्मगिरी प्रदक्षिणा


श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्‍वर येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून लाखो भाविक ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी येतात. गेल्या काही वर्षांत भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, अवघे दोन किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या त्र्यंबकनगरीत इतक्‍या मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या भाविकांची व्यवस्था करताना प्रशासनाची तारांबळ उडते. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही साडेतीन लाख भाविकांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे...
.

Nashik, 8 August 2009 :
नाशिकपासून 28 किलोमीटरवर असलेले त्र्यंबकेश्‍वर कितीतरी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. अवघे दोन किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या, तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या या इवल्याशा नगरात आध्यात्मिक, ऐतिहासिक व धार्मिक क्षेत्रात इतक्‍या गोष्टी घडून गेल्या आहेत, की त्यांची नोंद ठेवणेदेखील मुश्‍कील.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्‍वर. मूळ गंगा-गोदावरीचे जन्मस्थान. बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा जगप्रसिद्ध आहे. ज्ञानेश्‍वर माऊलींच्या गुरुबंधूंना नाथ संप्रदायाची दीक्षा गहिनीनाथांकडून येथेच प्राप्त झाली. पुढे वारकरी संप्रदायाचा पाया याच ठिकाणी रचला गेला. नाथांनी येथे संजीवन समाधी घेतली. त्यामुळे महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या आनंदाला येथे वर्षातून दोनदा निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा व उटीच्या वारीच्या निमित्ताने उधाण येते.
गौतम ऋषींनी न्यायशास्त्र या सांख्य दर्शनावरील अलौकिक ग्रंथाची रचना येथे केली. गीतेत कृष्णाने कथन केलेल्या सांख्य दर्शनाचे प्रणेते कपिल महामुनींचा आश्रम या नगराच्या सीमेवर आजही आहे.
इथल्या बोहाड्याने भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना चित्रपट निर्मितीची प्रेरणा दिली. अशाप्रकारे त्र्यंबकेश्‍वर नगरात भारतीय चित्रपटसृष्टीचा श्रीगणेशा झाला. अशा कितीतरी गोष्टी त्र्यंबकनगरीत घडल्या आहेत.
ब्रह्मगिरी पर्वतावरील पाच शिखरे तत्पुरुष-अघोर-इशान-वामदेव-सद्योजात म्हणजे पाच नद्यांचे उगम स्थान. त्यात गोदावरी व वैतरणा या प्रमुख नद्या. या नद्यांचे उगमस्थान तितकेच अद्‌भुतरम्य. हिरवाईने नटलेले डोंगर, त्यातून वाहणारे असंख्य झरे, धबधबे बघून मन हरखून जाते.
सृष्टीचा हा ठेवा मनात साठविण्यासाठी, निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई या भावंडांनी ज्या वाटेवरून शिवशंकराला साद घातली त्या मार्गाची अनुभूती घेण्यासाठी, जेथून गोदेने पृथ्वीवर प्रवेश केला ते ठिकाण बघण्यासाठी या श्रावणातल्या तिसऱ्या रविवारी व सोमवारी लाखो भाविकांचे स्वागत करण्यासाठी त्र्यंबकनगरी सज्ज झाली आहे.
गेल्या काही वर्षांत प्रदक्षिणेत हुल्लडबाजांचे प्रस्थ माजल्याने प्रदक्षिणेच्या बदलत्या स्वरूपावर अलीकडे टीका होऊ लागली आहे. प्रदक्षिणेच्या काळात भांग, चरस, गांजा आदी अमली पदार्थांचा वापर "भोले'चा प्रसाद या नावाखाली वाढल्याने त्याबद्दल टीका होऊ लागली आहे. त्यामुळे काही घरंदाज मंडळी तिसऱ्या सोमवारची गर्दी टाळण्यासाठी श्रावणातील इतर सोमवार निवडू लागले आहेत. त्यामुळेच म्हणून की काय दुसऱ्या सोमवारी दीड ते पावणेदोन लाख भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली. तरीही तिसऱ्या रविवारी अडीच ते तीन लाख भाविकांच्या उपस्थितीचा प्रशासनाचा अंदाज आहे.
20 मैल प्रदक्षिणेबरोबरच 40 मैलाच्या प्रदक्षिणेला मोठी गर्दी लोटण्याची शक्‍यता असून, प्रशासनाने भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने प्रदक्षिणा करण्याचे आवाहन केले आहे. खासगी वाहने नेण्यास बंदी करण्यात आली असून, तळवाडे, तळेगाव, अंबोली, पहिने बारी येथे पार्किंगची खास सुविधा करण्यात आली आहे. या ठिकाणाहून "एसटी'च्या विशेष फेऱ्या भाविकांची ने-आण करण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. सिंहस्थाच्या धर्तीवर छोटेखानी व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता गृहीत धरून पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तरुणांनी अमली पदार्थांचे सेवन करू नये. महिला, मुले व वृद्धांना धक्काबुक्‍की होणार नाही, प्रवासात त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्र्यंबकेश्‍वरमधील विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
अनेक भाविक रविवारी रात्री प्रदक्षिणेला सुरवात करतात. त्यामुळे वाटेत आदिवासी बांधवांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अनेक जण काटेरी कुंपण तोडून अंधारात भरकटतात. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. काही मंडळांतर्फे भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येते; परंतु प्लास्टिकचे द्रोण, ग्लास व पाण्याच्या बाटल्यांचे खच इतस्तत: पसरून प्रदूषण वाढण्याची शक्‍यता असल्याने भाविकांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी, असे आवाहन निसर्गप्रेमींतर्फे करण्यात आले आहे.

Wednesday, December 2, 2009

4 हजार कर्कश हॉर्न


कांडुन नष्ट करण्याचा निर्धार

Nashik, 2 Dec : परिवहन विभाग, शहर वाहतूक नियंत्रण विभाग यांनी शांतता नाशिकसाठी कर्कश वाजणारे 4 हजार हॉर्न जप्त केली असून ते सर्व हॉर्न उद्या ( ता. 3) जेसीबीच्या साहाय्याने कांडुन नष्ट करण्याचा निर्धार केला आहे. यावेळी पोलिस आयुक्त व्ही.डी. मिश्रा प्रादेशिक परिवहन अधिकारी अरुण येवला, लाच प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक हरीश बैजल उपस्थित राहणार आहे.
नाशिक शहर ध्वनी प्रदूषण मुक्त शहर अभियानाच्या त्यानिमित्ताने आज पर्यंत जप्त केले कर्कश हॉर्न सकाळी साडे दहा ते दुपारी साडे बार या दरम्यान ध्वनी प्रदूषण न करण्याची शपथ दिली जाणार आहे. चार हजार कर्कश , मल्टीटोन, प्रेशर हॉर्न्स जेसीबीच्या सहायकाने नष्ट केले जाणार आहेत. गोल्फ क्‍लब येथील इदगाह मैदानावर चारशे वाहन चालक व दीडशे बसेसच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. भारतात प्रथमच असा कार्यक्रम होत आहे.
नाशिक शहरात गेल्या 12 ऑगष्टला पोलिस आयुक्त व्हीडी मिश्रा यांनी अधिसूचना काढून 19 ठिकाणी सायलेन्स झोन जाहीर केले आहेत. प्रेशर हॉर्नद्वारे ध्वनी प्रदूषण करताना आढळल्यास दोषी चालकास एक लाख रुपये दंड व पाच वर्ष शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. आज पर्यंत आरटीओ कार्यालयाने 951 जणांवर कारवाई करून आठ लाख 47 हजार रुपये दंड केला आहे.