रतनवाडी...सांदण दरी...कोकणकडा
हा ट्रेक नव्हता...ती होती निव्वळ सहल. एक दिवसाचा एन्जॉय! कमीत कमी खर्चात, पिकनिक बाजांच्या प्रचंड गराड्यात महाराष्ट्रातले अलौकीक भौगोलिक आश्चर्य...सांदणदरी, रिव्हर्स-नेकलेस-अम्बरेला वॉटरफॉल...प्रवरेच्या उगमावरचे अमृतेश्वर शिवमंदिर!
''आपली तहान असते ओंजळभर आणि मिळते हंडाभर''...त्या सह्याद्रीने आजवर असे भरभरून देण्यापलिकडे केले तरी काय? त्याच्या या अलौकीक औदार्या समोर नतमस्तक होता आले तर? आज मी त्यासाठीच कोकणकड्यावर उभा आहे...मनात उगाचच विचार आला, आपल्याजवळचा एक टपोरा मोती या कोकणकड्यात टाकावा...लोक नदीत ज्या पद्धतीने नाणे फेकतात तसे आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी! अचाट पराक्रमी बालके लव आणि कुशचा पाळणा हलला त्या विशाल आजोबा डोंगराच्या साक्षीने...
माझ्या डाव्या बाजुला आहे सौंदर्याचे अमिट लेणं लाभलेला रतनगड, उजव्या बाजुला डोंगरभटक्यांत प्रसिद्ध असलेला पाथरा घाट..त्याच्या उजवीकडे ऐटीत मान वर करून उभा असलेला शिपनूरचा डोंगर आणि मागच्या बाजुला महाराष्ट्राची डोंगर यात्रा ज्यांच्या शिवाय पूर्णच होऊ शकत नाही असे कुरंग-मदन-अलंगचे किल्ले...महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसुबाई त्या बाजुला किलकिला होऊन दिसत आहे. त्याच्या आजु बाजुला असलेल्या किरडा-साकिर्डा, त्याच्या साक्षीने मी हा मोती टाकण्यासाठी सज्ज झालो आहे.
'धन्यवाद हे पर्वतराजा...या जन्मी मला तुझ्याकडून सारे काही मिळाले आहे. ज्यांच्या पावलांनी तुझे डोंगर पावन केले अशा अचाट विरांच्या स्मृतींना वंदन करण्याचे भाग्यमला मिळाले आहे...माझ्या राजाला तर तु अंगाखांद्यावर खेळू बागडू दिले...त्याच्या स्वराज्य संकल्पनेला तुझेच आशिर्वाद! त्या राजासाठी आज ही कृतज्ञता...तुझ्या शेकडो शिखरांवरच्या देवी देवतांसमोर कित्येकदा अमिट शांतीची अनूभूती मला मिळाली...त्यासाठी ही पुजा समज...
तुझ्या कुशीतल्या गार गार वार्याने माझे कित्येक क्षण पुलकित केलेत, त्या गारव्या बद्दल थोडे उतराऊ होऊ दे!
तुझ्या तळी-टाक्यातील पाण्याने जन्मोजन्मीची तहान भागविली, त्याबद्दलचे हे आभार...
कधी हिरवकंच रूप, तर कधी पिवळे सोनेरी दर्शन प्रत्येक ऋतूत, प्रत्येक वेळी तुझ्या नित्य नुतन सौंदर्याने आयुष्यात मला सौंदर्याची कधीकमी पडू दिली नाही, त्या सुंदर दर्शनाबद्दल.
ज्या ऐतिहासिक राजवटीचा अभिमान आजवर मिरवता आला, त्याची पदचिन्हे दगड-विटांचे गड, कोट, दरवाजे, लेण्यांच्या मार्फत मला बघण्यासाठी अल्प स्वल्प शिल्लक ठेवली त्या अनमोल ठेव्याबद्दल...
ज्याच्या सोबत आमचा दिवस सरू होतो आणि ज्याच्याच सोबतीने संपतो त्या सूर्याचे दरवेळेस अनोखे दर्शन घडविल्याबद्दल...
तुझ्यावरच्या वृक्ष, वेली, फुले, गवत नी प्राणी अशा मनभावी सह्यासृष्टीबद्दल...
ज्या सवंगड्यांची साथ सोबत नसती तर तुझे हे दर्शन दुर्मिळ झाले असते त्या सवंगड्याच्या साठी...आज हा मोती तु स्विकार कर!
मोत्यांची बरसात:
हात उगीचच खिसा चाचपडू लागले...मोती शोधण्यासाठी...आता तो दरीत टाकण्याची वेळ आली होती...रविवारचा सुटीचा दिवस असल्याने माझ्या आजूबाजुला अनेक जण अस्फुटपणे किंचाळत, दरीतला नजारा पाहुन, आहा! हा! काय सूंदर!! अशी उत्सफुर्त प्रतिक्रीया व्यक्त करत होते...पुढच्या क्षणाला काय घडले ते समजले नाही...मला वाटले मी दरीत अनेक रंगछटा बिखेरणारा दुधाळ मोठा मोती टाकलाय! माझी पुजा तो स्विकारेल? या विचारांनी मी दरीत डोकावतो आहे...आणि अचानक...अचानक अनेक मोती मला तरंगताना दिसले...वार्याच्या हलक्याशा झोतामुळे दरीतून ते वर येत आहेत...वार्यानेच त्यांचा भार हलका केला आहे. असे कित्येक मोती क्षण दोन क्षण थांबत हवेत तरंगताना दिसले आणि पुढच्याच क्षणी त्यांची आमच्यावर उधळण झाली. तड तड करीत सगळे मोती आमच्या अंगावर.
आता आजुबाजुचे मला काहीच दिसत नव्हते...थोडे थांबून दरीच्या खालून मोतीच मोती वर येत...क्षण दोन क्षण थांबत आणि पुन्हा तड...तड...तड...त्यांचा अंगावर अक्षरशा पाऊस पडे...आता तर एक वेगळाच चमत्कार घडतोय...दरीच्या खालून थोड्या थोड्या वेळाने वर येणारे मोती आता एक एका रांगेत वर येत आहे...एक एक माळ गुंफत मोत्यांचा एक पडदा उभा राहिला आहे...प्रत्येक क्षणासोबत तो हळूवारपणे वर येत आहे...उंच उंच होत आहे...क्षण दोन क्षण असाच थांबून, जणू काही त्यांची हालचाल थोडावेळ गोठवून टाकण्यासाठी काळ थोडा थांबलाय. मग तो संपूर्ण पडदाच आमच्यावर येऊन पडतोय...आमचे अंग अंग रोमांचित होऊन उठतेय या खास अशा मोती स्नानेने...
किती वेळ हा चमत्कार बघत होतो...माझे मलाच भान उरले नव्हते...अगदी आईने हाक दिली, 'चल! अजून घाटन देवीचे दर्शन घ्याचे आहे...अंधार दाटण्याच्या आत घरी परतायला हवे! अजून डोंगरघाटांचा मोठा प्रवास करून जावे लागणार आहे...माझी तंद्री भंगली...मी ताळ्यावर आलो.
बालपणापासून दूरून दिसणारा निसर्गाचा हा चमत्कार प्रत्यक्षात जवळून असा दिसत होता. सह्याद्रीच्या डोंगरावर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याला वार्यासोबत स्पर्धा करावी लागते...खट्याळ वारा त्यांना मागे ढकलतो...पुन्हे ते पूर्ण ताकदीने पुढे सरसावतात...वारा त्यांना तसाच्या तसा मागे फेकून देतो...जमिनीवर पडूच देत नाही...याला म्हणता गुरूत्वशक्ती विरोधी चमत्कार...उलटा धबधबा...रिव्हर्स वॉटरफॉल. साम्रदच्या कोकणकड्यावरचा धबधबा असाच जमिनीला स्पर्ष न करता माघारी फिरतो...पुन्हा नव्या जोमाने तो जमिनीकडे झेपेवतो...वारा त्याला पुर्णच्या पूर्ण मागे ढकलतो...आसमंतात पाऊस सुरू असतो...त्याच्या अनेक ओहळी पाण्याचे लोट होऊन दरीच्या दिशेने झेपावतात...वारा किती वेळ आपला भार सहन करणार? तेही मोठे होत जातात...शेवटी वारा म्हणतो, गड्यांनो तुमची जागा हवेत नाहीच...तुम्हाला तर नदी बनून जायचेय...त्या भेटीला...निघा पुढे बापुड्यांनो! मग पुढच्या ओहळींना वारा असाच खेळवतो.
आजवर माझा समज होता की, दरीत तयार होणारा जोरकस वारा जेव्हा एखाद्या धबधब्याला मागे फेकतो तेव्हा धबधब्याचे पाणी जसेच्या तसे मागे पडत असावे...फार फार तर पुन्हा पाऊस बनून किंवा त्या भल्या थोरल्या धबधब्याचे वाफेसारखे ढग होऊन पुन्हा डोंगरावर परतत असावेत. दूर अंतरावरून दिसणारे हे नेहमीचेच दृष्य. आज जवळून पाहताना पाण्याला मोत्यांचे आकार मिळताना दिसत होते. अक्षरश: मोठ्या आकाराच्या मोत्या सारखे अनेक मोतीच जणू तयार होत. शिवाय थोडा अधिक उजेड मागून आला तर हे गोलाकार थेंब मोत्या प्रमाणे लकाकतात सुद्धा.
मोठमोठ्या धारांचे असंख्य लाखो मोती थोड्या थोड्या अंतराने बनताना बघायला मिळत.
साम्रदच्या कोकणकड्यावर उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर पाण्याचे तुषार उडतात...काही थोडे सह्याद्रीशी एकरूप होतात त्यांना हे मोत्यांचे खास दर्शन घडते...आजवर फक्त ऐकले होते, साम्रदचा रिव्हर्स वॉटर फॉल...आजवर अनेकदा आमच्या परिसरातल्या अंजनेरी, मार्कंडेय आदी अनेक डोंगरावर पाण्याचा व वार्याचाहा खेळ दुरवरून बघितला होता. प्रत्यक्षात जवळून सह्यद्रीतला भौतिक चमत्कार आज प्रथमच बघायला मिळाला...निमीत्त होते एका ट्रिपचे. होय! ट्रिप!
आमच्या कार्याशाळेत काम करणार्या आकाशकंदिल कारागिरांचा जत्था घेऊन दरवर्षी मला अशा प्रकारची पावसाळी भटकंती आयोजित करावी लागते. ठिकाण फारसे आव्हानात्मक नको...कुणालाही सहज येता यावे...पाऊस पाणी...वारे पण फार नको...काही महिला या साडीतच येणार, पायात त्यांच्या चपलास असणार. लहान मुलांनाही येता येऊ शकेल, असे ठिकाण निवडताना मात्र मोठीच कसरत होऊन जाते.
'ही पावसाळी पिकनिक एक दिवसांचीच हवी आणि ठिकाणही नेहमीचेच नको', या स्वरूपाच्या अनेक सूचना येतात...माझ्यावर जबाबदारी असते ती ठिकाण सूचविण्याची आणि सोबत येण्याची...बाकी सगळे नियोजन, 'आमचे आम्हीच करणार', असा गृहमंत्रायाचा सज्जड दमही असतो त्यामुळे अर्धेमुर्धे मन मारून माझा हा दिवस वाया जाणार कसा नाही, याचे माझ्या समोर आव्हान असते...
''अंजनेरी गडावर जाऊ, तिथे उलटे धबधबे फार मजा देतील'', हा माझा डाव तात्काळ उधळण्यात आला तेव्हा, पेगलवाडीचे राममंदिर...भिलमाळेचे अतिशय लहान खळखळणारे धबधबे आणि अत्यंत सुरक्षित अशी ओहोळ म्हणजे एक खुले वॉटर पार्कच! अशी जोड दिल्याने त्याला पसंती मिळाली. पण आम्हाला दूरवर प्रवास करायचा आहे, ठिकाण नवे असायला हवे, अंजनेरी बर्याचदा झालेय, पेगलवाडी, भिलमाळ कित्येकदा ब्रम्हगिरी प्रदक्षिणेच्या वेळी होतेच की!
साम्रदचा उलटा धबधबा छान असेल...भंडारदरा जलाशयाचा परिसर म्हणजे पावसाळ्यातला स्वर्ग...तिथे असंख्ये झरे, ओहळी, अमिट अशी हिरवाई आणि जोडीला रतनवाडीचे अमृतेश्वर आणि घाटघरची घाटनदेवी! हा नवा प्रस्ताव सार्यांना आवडला.
स्वस्तातली ट्रिप:
आता पुढची जिम्मेदारी होती ती ट्रिप अतिशय स्वस्तात बसवायची. प्रति माणशी खर्च हा तीन साडेतीनशेच्या वर जायला नको. साहसी पर्यटनात अनेक वर्षांपासून असलेलच्या एका मित्राकडून घोटीच्या एका काळी पिवळी जीपवाल्याचा मोबाईल नंबर मिळाला. नाशिकला येऊन नाशिक पर्यंत सोडण्याचे तो सांदण दरी करिता अडीच हजार घेतो, अशी त्याने माहिती दिली. १२ जणांसाठी हा सौदा फायद्याचा ठरणार होता, पण आमचे १७ जण होत होते. सतरा सिटर टेम्पो ट्रॅव्हलरने आमचे बजेट कोलमडणार होते. आणखी काही सदस्य सहज वाढवता येतील या हिशेबाने आम्ही त्या जीपवाल्याच्या दोन जिप मिळतात का? असे विचारले.
'तुमचा कार्यक्रम कसा असेल'?
- आम्हाला सांदण दरीचा रिव्हर्स वॉटर फॉल बघायचाय, तिथून घाटघरची घाटनदेवी आणि परतीच्या वाटेवर रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर.
'प्रती जीप साडेपाच हजार होतील, वरचा खर्च तुमचा!'
- हा सौदा तर बराच महाग ठरत होता, मी अनिरुद्धला हा प्रकार सांगितला तर त्याने हिशेब मांडला. अडीच हजारात त्यांना एक जीप देणे परवडत नाही. सांदण दरीसाठी ट्रेक नेतो तेव्हा साम्रदमध्ये चार तास लागतात, तितक्या वेळात तो परिसरात सिट भरून एक घोटीची ट्रिप मारून येतो...असेही नाशिकला भल्या सकाळी घ्यायला येण्यासाठी त्याला आदल्या रात्रीच यावे लागते. अडीच हजारात तुम्हाला दिवसभरासाठी गाडी देणे त्याला परवडणारा नाही!
आमची ट्रिपच अल्पाईन पद्धतीची होती, त्यासाठी सौभाग्यवतींनी नामी शक्कल लढवली. बरेच जण मारूती व्हॅन घेऊन जातात, एका व्हॅनमध्ये सात जण बसतात. एक जण दोन हजारात तयार झाला. त्याच्या दोन व्हॅन बुक केल्या आणि आम्ही रतनवाडी, अमृतेश्वरा आणि साम्रदचा उलटा धबधबा बघण्यासाठी तयार झालो. दिवस अर्थातच रविवारचा.
'रविवार म्हटल्यावर भंडारदरा जलाशयाच्या परिसरात केवढी जत्रा भरते', हे माझ्या मनावर ठासले गेलेय! मुळात शनिवारी दुपार पासून ते सायंकाळ पर्यंत आमचा सगळा वेळ हा गाडी ठरवणे आणि जादाच्या सदस्यांची नावे निश्चीत करताना व यांना ट्रिेपची माहिती देणे यात गेला. त्यामुळे ट्रीपची तयार करायला काहीच वेळ मिळाला नाही.
हॉटेलिंगला फाटा:
अगोदर आम्ही ट्रेकवर नेहमी सोबत असणारी दोन किलोची गॅस शेगडी नेऊन ताजा स्वयंपाक व चहा करण्याचे बेत ठरवला होता. परंतू त्याऐवजी घरूनच चहा, नाश्ता व जेवणाचे डबे घेण्याचे निश्चीत करण्यात आला. थोडाबहूत बाजारहाट केला, रात्री घरी आलो तर जादाच्या सदस्यांपैकी अनूभवी ट्रेकर असलीली एक सहकारी व तिची दोन्ही मुले कॅन्सल झाली. आमच्या कारागिरी मंडळीतून चार जणांना अखेरच्या क्षणी माघार घ्यावी लागली. ट्रिपवर अनिश्चीततेचे ढग होते. पर हेड कॉन्ट्रीब्यूशन वाढणार होते, परंतू सौभागयवती हटाने हटून राहिल्या...नाही जाऊच!
रात्री दहा जणांना पुरतील इतक्या पोळ्या व कुकरमध्ये बटाटे शिजवून ठेवले. ही तयारी करता करता रात्रीचा दिड वाजून गेला. त्यानंतर कुणाला झोपा येईना. झोपायला रात्रीचे अडीच वाजले. पहाटे ५-००ला उठण्याचे नियोजन होते. त्याप्रमाणे पहाटे पाच पासून माझे हाकारे सुरू झाले. ५-२० पर्यंत सगळे उठले. आमच्या गाड्या ६-०० वाजता येणार असल्यामुळे आमची आवरासावर करताना मोठी कसरत होत होती. सव्वा सहा वाजूनही गाड्या काही येईना. त्यांच्या मोबाईल फोनवर, 'संपर्क क्षेत्राच्या बाहेर', अशी नकारघंटा सुरू होती. ही मंडळी काही वेळेवर येत नाही. नाशिकते साम्रद ९० किलो मिटरचा प्रवास, त्यात रस्त्याची स्थिती घोटीपासून पुढे फारशी चांगली नाही, त्यामुळे आजचे नियोजन सुरूवातीलच कोलमडू लागली. आमचा प्लॅन बी तयार होता तो म्हणजे अंजनेरी, पेगलवाडी, भिलमाळ.
'ताशी पन्नासचा वेग पकडलातरी तुम्हाला ९० किलो मिटरचे अंतर उशिरात उशिरा साडे दहा पर्यंत नेतो...रात्री उशिरा यावे लागल्यामुळे उठायलाच थोडा उशिर झाला', ही गाडीवाल्या सोमनाथची सबब स्विकारून ७-२० वाजता आम्ही पंचवटीतून आडगावनाका मार्गे नव्या उडाणपुलावरून घोटीच्या दिशेने गाडी दामटली. माझ्या व्हॅनचा ड्रायव्हर गाडी चालविण्यात चांगला तरबेज वाटला. त्याच्या सवयी व लकबी न्याहाळल्यानंतर हा गडी सुरक्षितपणे घेऊन येईल याची खात्री पटली. आता चिंता होती ती मागच्या गाडीची. आम्हाला घोटीत त्यांची २० मिनीटे वाट बघावी लागली...कारण समजले? महामार्गावर सुद्धा सेल्फीचा मोह!
माझा चौफेर सेल्फीवर घणाघात असतो, आज मात्र माझे कोणतेच तत्व, ट्रेक नीति चालणार नव्हते. तशा अटींवरच मला फक्त देखरेखीसाठी बोलावण्यात आले होते, मी मुक प्रेक्षक बनलो. गाडीतूनच ढगात वेढलेले रायगड, बहुला, घरगड, कावनई, मोरधन किल्ले बघून साम्रद परिसरात भरपूर पाऊस लागणार अशी आमची अटकळ होती, प्रत्यक्षात आम्हाला उन सावलीचा खेळ दिसत होता.
कळसुबाई डोंगराच्या छत्रछायेतील एका रानात आम्हा सोबत आणलेला पोह्यांचा नाष्ता केला तेव्हा सकाळचे दहा वाजत आले होते. हॉटेल खर्च करायचा नाही, त्यामुळे घरून बनवून आणलेले पोहे आणि थर्मासमध्ये आणलेले गरमागरम मसाल्याचा चहा अशी पोटपुजा आटोपून आम्ही दहा वाजता भंडारदर्यात पोहोचलो. भंडारदर्यात थांबण्याचे कोणतेच प्रयोजन नव्हते, पण करणार काय?
अंब्रेला धबधब्वयाचे दान:
शेंडी सोडून आम्ही घाटाने खाली उतरत असताना भंडारदरा जलाशयातून खळाळत उठलेल्या महाकाय अम्ब्रेला वॉटरफॉलने आमचे लक्ष वेधून घेतले. मी अचानक अम्ब्रेला धबधबा बघू व नंतर पुढे जाऊ असा प्रस्ताव मांडला. नेकलेस वॉटरफॉल, अमृतेश्वर, साम्रदचा रिव्हर्स वॉटरफॉल आणि घाटघरची घाटनदेवी अशी चार ठिकाणे आमच्या आजच्या ट्रिपचे मुळ उद्दीष्ट होते, त्यात घोटीपासून रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे आम्हाला भंडारदर्याला पोहोचायला दिड तासांचा विलंब झाला होता. सौभाग्यवतिंनी याची जाणीव करून दिली.
अम्ब्रेला धबधब्याचे सौंदर्य अलौकीक आहे. कृत्रिमरित्या तयार केलेला असला तरी गोव्याच्या दुधसागर सारखा हा महाकाय आहे. हा कधीकधीच बघायल मिळतो, तेव्हा आमच्या ड्रायव्हर्सना भंडारदरा धरणाच्या बागेच्या पार्किंगजवळ यायला सांगुन आम्ही वरच्या बाजुने अम्ब्रेला धबधब्याच्या दिशेने निसरड्या वाटेवरून उतरायला सुरूवात केली.
पूर्ण भरात असलेला भंडारदरा जलाशयाचा अम्ब्रेला धबधबा...याठिकाणहून बघताना खाशी सावधानता बाळगावी... |
एका सद्गृहस्थाने माझ्या आईकडे बघून, 'इथून उतरू नका, खालच्या बाजुने सोपा रस्ता आहे', अशी महत्वाची सूचना केली. मी गेल्या अनेक वर्षांपासून सह्याद्रीत सर्व ऋतुत भटकंती करतोय. शिवाय आमच्या वैनतेय संस्थेचे डोंगरांवरच्या अपघात स्थितीसाठी मदत व बचाव दल आहे, त्यात नेहमी सक्रीय असतो. अशा वाटांवर आईला नेण्यासाठी मला पूरेसा अनूभव असल्यामुळे व तिव्र उतार, निसरड्या वाटेने कशा पद्धतीने चढ उतार करायची याची बराच अनूभव असल्याने वरच्या बाजुनेच उतरायला सुरूवात केली.
आईला सांगितले की, 'ज्या क्षणी तुला उतरणे त्रासदायक अथवा धोकादायक वाटेल, त्या क्षणी आपण माघारी जाऊ व आपली गाडी वर बोलावून त्याने खाली उतरू. सोबतच्या मंडळींना याची कल्पना दिली. पावसाळी वातावरणातही उत्तम प्रकारे पकड घेणारे माझे ट्रेकचे बुट या ठिकाणी कामी आले. शिवाय सोबत पर्वतारोहणाचा दोर होताच. कुठे अडचण आली असती तर त्याचा वापर करता आला असता.
अम्ब्रेला धबधब्याचा भला थोरला विस्तार आणि स्फटीकासारखे खळखळत जाणारे पांढरे शुभ्र पाणी बघून आई हरखून गेली. दोनच महिन्यांपूर्वी आईला धारेराव, कुमशेत, घोडीशेपच्या फॅमिली ट्रेकला नेले होत, त्यामुळे आईच्या मनात आत्मविश्वास होता व आई या भटकंतीतही रमत होती. आश्चर्य म्हणजे यंदाच्या गिरीमित्र संमेलनात ट्रेकर्स ब्लॉगर्स स्पर्धेत माझ्या ब्लॉगला संयुक्त तृतीय क्रमांक प्राप्त झाला त्यात, आई ट्रेकमध्ये रमतेय' या ब्लॉगला परिक्षकांची विशेष पसंती लाभली होती. आईनेही या निमीत्ताने प्रथमच ब्लॉग वाचन केले होते व तिलाही तो आवडला होता.
मोठ्या संख्येने पर्यटक अम्ब्रेला धबधब्याचे सौंदर्य न्याहाळताना दिसत होते. शे सव्वाशे फुटांच्या उंचीरून गोलाकार दगडावरून धरणाचे पाणी फेसाळत खाली कोसळते...हा दगड चांगला दिड एकशे फुट तरी अर्थगोलाकार रूंद असावा. त्यातुन तुडुंब भरलेल्या विशाल अशा भंडारदरा धरणाचा विसर्ग म्हणजे भान हरपून कितीही वेळ बघितले तरी कमीच, असे त्याचे सौंदर्य. येथे काही धोकादायक ठिकाणेही आहेत, त्यावर जपून व सार्यांना सूचना देऊन आम्ही जवळपास अर्धातास अम्ब्रेला नावाचे आख्यान डोळ्यात साठवत, असे सुंदर पर्यटन स्थळ विकसीत केल्याबद्दल साहेबांना मनातून धन्यवाद देऊन पुढे निघालो.
ड्रायव्हर उशिरा आल्यामुळे एक तास, रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे दिड तास आणि आता अंम्ब्रेला धबधब्यामुळे अर्धा तास...आमचे वेळापत्रक तिन तासांनी मागे पडले होते. त्यात भंडारदरा जलाशयाच्या स्पीलओव्हर जवळच्या रस्त्यावरची वाहतुक कोंडीची धाकधूक होती. पावसाळ्यात येथे अर्धा अर्धा तास वाहने अडकून पाडतात ती बेशिस्त व आततीयी पणाने वागणार्या पर्यटकांमुळे. आज असे काहीच घडणार नव्हते. फक्त एक गुजरात पासिंगच्या गाडीने भर रस्त्यात गाडी थांबवून व कोणतीही फिकीर न बाळगता आरामात गाडीतल्या मंडळींने बसवून आमच्या सकट वाहतूकीची थोडी अडचण केली इतकेच.
आम्ही धरणावरून उजविकडे वळसा घेत वनखात्याच्या चेक पोस्टवर दोन गाड्यांची प्रत्येकी १०० रूपये व चौदा जणांचे ३०० रूपये फी भरून धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात प्रवेश केला. पावसाळा सोडला तर या भागात कित्येकदा भटकंतीकरिता येणे झाले आहे. हिरव्या कंच स्थितीत हा परिसर प्रथमच बघताना मलाही वेगळेपणाची जाणिव होत होती. निसर्गाच्या कुशीतल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी एके ठिकाणी नेकलेस हिलव्हयू रिसोर्टची पाटी दिसली.
कोळटेंभ्याजवळचा मणिहार धबधबा...जवळ जाण्याचा मार्ग अवघड |
मित्रवर्य हेमंतने नेकलेस वॉटरफॉलचा उल्लेख केला होता. या वर्षारंभीच्या १ जानेवारीच्या आमच्या पहिल्या वहिल्या ट्रेकची सांगता मुड्यावरून कोळटेंभ्याला झाली होती. तिथेच हा प्रसिद्ध धबधबा. सुरूवातीला कोळटेंबा धबधबा आणित्यानंतर उंचपूरा न्हाली वॉटरफॉल. या न्हानी वॉटरफॉलच्या तळापर्यंत जाण्यासाठी वनखात्याने लहानसा लोखंडी पुल बनवला आहे. तिथे तीन एकशे पर्यटक पाण्यात हुंदडताना दिसले. काही जण पुल सोडून धबधब्याच्या निसरड्या खडकावर उतरले होते. आम्ही तो टाळून नेकलेस वॉटरफॉल कडे प्रस्थान केले. हा रस्त्यावरूनच मणिहारासरखा दिसतो.
दुरून नेकलेस साजरा:
त्याच्या जवळ जाण्याच्या निसरड्या वाटेने आम्ही बरेच पुढे गेलो. सौभाग्यवतिंनी रस्ता धोकादायक असल्याचे सांगितले. मी पुढे जाऊन रस्ता बघितला तेव्हा मोठमोठ्या शिळांवर शेवळ दिसले, त्यावर पाय घसरत होते. डोंगरकड्याचा भागही निसरडा होता, त्यामुळे मी सगळ्यांना माघारी फिरण्याचा इशारा गेला. या धबधब्याच्या खाली सवय असलेल्या मंडळींना जाता येऊ शकते. सर्वसामान्य पर्यटकांनी तो दुरूनच बघावा.
रतनगडच्या पुष्कर्णीतले पुरातन शिल्पौंदर्य |
रतनगडच्या पुष्कर्णीतले श्रीगणेश आणि शेषशायी विष्णू |
रतनगडच्या पुष्कर्णी लगतच्या झाडाखाली पुरातन ठेवा असा वर्षोनुवर्षे धुळखात पडून आहे...यांचा अभ्यास करून मंदिराजवळच वस्तुसंग्रहालयात त्यांना ठेवणे म्हणजेच पर्यटन विकास... |
रतनगडच्या पुष्कर्णी लगतच्या झाडाखाली पहुडलेले हे शेषशायी विष्णू कोणत्या बरं काळाचे नाते सांगतात? |
रतनगडच्या पुष्कर्णी लगतचा हा वेल खुपच जुना...त्यावर कित्येक पिढ्यांनी झोके घेतले तरी ती पक्की...माझे नाव ओळखा? असे ती खुणावते. |
त्या होडीने प्रवास करून आमचे रतनगडचे पाच ट्रेक झाले याचे आज अप्रुप वाटते, आजच्या पिढीला ते सु:ख मिळू शकणार नसले तरी या वाड्यांना जोडणारा रस्ता झाल्याने इथल्या लोकांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल झालेत. एकतर जगाशी त्यांचा संपर्क सहजसोपा झाला आहे. शिक्षण, वैद्यकीय आदी सोयी त्यांच्या पर्यंत पोहोचू लागल्या आहेत.
अशा दुर्गम ठिकाणी रस्त्या झाल्यामुळे तिथल्या निसर्गाला चोर, लुटारूंची बाधा पोहोचण्याचे प्रमाण वाढते, पर्यटकांचा गोंगाट अशा परिसराची शांतता भंग करणारा असला तरी या लोकांना थोडाफार रोजगार मिळू लागला आहे, अन्यथा शेतीतून येथे भाताशिवाय अन्य पिक घेणे दुरापास्त. त्यातही फळभाजा पिकविण्याचे प्रमाण खुपच कमी. असले तरी त्यातून फार अर्थार्जनाची शक्यता दुर्मिळ.
कातळातला रेखीव चमत्कार:
प्रवरा नदीच्या किनारी कोण्या अज्ञाताने अमृतेश्वर नावाने अतिशय देखणे असे कातळात सुंदर नक्षीकाम केलेले मंदिर बांधले आहे. काही इतिहासकार या मंदिराचे निर्माते म्हणून झंज राजांचा उल्लेख करतात, पण तो दुवा आजवर कोणी व्यवस्थतपणे जोडलेला नाही. प्रचंड पावसाचे प्रमाण असल्यामुळे या मंदिराचे खडक शेवाळलेला दिसाते. मंदिर यवनी आक्रमकांच्या नजरेतून दूर राहिले असावे याचे कारण या परिसराची दुर्गमता. रतनगडचा हा मुळ मार्ग नाही. तो उडदवण्याकडून असावा. इंग्रजांनी कमालीच्या दाट जंगलांच्या या प्रदेशात मोठी भ्रमंती केली. उडदवण्याहून एक वाट रतनगडापर्यंत ब्रिटिशांनी आणली, त्याचे काही मौलाचे दगड आजही दिसतात.
हल्ली रोग जडलेला सेल्फी नामक छायाचित्रे टिपण्याचा प्रकार तसा वाईटच...तरीपण असा जमिनीवर केला तर ठिक...दर्या खोर्यात मात्र याने अनेक अपघातांना आमंत्रणे दिलीत...तेव्हा जरा जपूनच... |
महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने या भागात काही विकास कामे केली आहेत, ज्यात मंदिरात प्रवश करण्यासाठी सिमेंट कॉंक्रिटची एक भली मोठी स्वागत कमान. या कमानीतून लोकांनी यावे, आत गाड्या लावाव्यात अशी त्यांची योजना. जमिनीवर मोठ्या प्रमाणावर पेव्हर ब्लॉक अंथरलेत, त्यांना सुद्धा ऑईलपेंटचे लाल, पिवळे रंग अमृतेश्वर मंदिराच्या पुरातन मंदिराशी कसा मेळ साधणार.
अमृतेश्वरची पुष्कर्णी केवढी देखणी. कातळात अनेक मंदिरे, मुर्त्या व शिखरांचे वैशिष्टपूर्ण बांधकाम. एका कोनाड्यात गणपती व एकात शेषशायी विष्णूची मुर्ती. बाजुलाच एका झाडाखाली गणपती, शेषशायी विष्णू आणि काही मोठ्या आकाराचे विरगळ आहेत. मारूतीच्या मंदिराला पेव्हर ब्लॉक्सचा वेढा असून संपुर्ण परिसराला मजबुत तारेचे कुंपण करण्यात आले आहे. बागबगिचात करतात तशा पद्धतीचा इथला पर्यटन विकास.
रतनगडच्या शिवमंदिरांचे निर्माते कोण? दडलेली ही माहिती शोधण्यासाठी पुरातन वास्तू संशोधनाला चालना देणे म्हणजे पर्यटन विकास नी इतिहास संवर्धन... |
मौजे रतनवाडी ग्रामपरिस्थितीका समिती हा महाराष्ट्राच्या वनखात्याच्या उपक्रमाचा एक भाग. या समितीच्या मार्फत येथे पर्यटकांच्या गाड्यांचे पार्किंग शुल्क प्रती गाडी ३०/- रूपये प्रमाणे वसुल केले जाते. काही छोट्या हॉटेल सदृष्य ठेल्यांना येथे परवानगी देण्यात आली आहे, पण तिथे चहा, भजी, मक्याचे कणिस सोडल्यास फार वेगळे असे ताजे पदार्थ मिळत नाहीत. उत्तम प्रकारचे जेवणही मिळत नाही. पण मंदिराच्या पुढे एक हॉटेल असून तिथे जेवण व चहा, पोहे आदी पदार्थ यथा तथास्वरूपातच मिळतात. आणखी थोडे पुढे काही छोटी हॉटेल्स आहेत.
घरचे जेवळ लाजवाब...पर्यटन विकास साधायचा तर स्थानिकांजेवण तयार करण्याचे व ते स्वच्छ वातावरणात वाढण्याचे प्रशिक्षण म्हणजे पर्यटन विकास.. |
आम्ही सोबत आणलेले जेवण वनखात्याने तयार केलेल्या एका छत्रीच्या आश्रयाने घेतले. अशा दोन छत्र्या असाव्यात. भाजी, पोळी, लोणचं, पापड, गुळआंबा, काकडी, मेथीचे धपाटे असा बेत सगळ्यांनी मनसोक्त हाणला. जेवण आटोपून निघताना मला अचानक शिरपुंज्याचा नाथा दिसला. २०१५च्या सप्टेंबर महिन्यात रतनगड ते कलाडगड या आमच्या भटकंतीच्या वेळी नाथाने आम्हाला सोबत केली होती. त्याची ख्याली खुशाली विचारून आम्ही निघालो ८ किला मिटरवर असलेल्या म्रदच्या दिशेने.
डोळ्यावर आता तंद्री लागली होती. अचानक गाडीतून आवाज आला इथे बर्याच गाड्या उभ्या आहेत, आपल्याला इथे उतरायचे का? ते होते साम्रद. ८००च्या वर गाड्या उभ्या होत्या. त्यात अर्थातच कारची संख्या अधिक, पण काही बस व टेम्पो देखिल भरून आले होते. लोकांच्या रांगा दोन दिशेने जाताना दिसत होत्या, एक सांदणदरीच्या आणि दुसरी कोकणकड्याच्या दिशेने. सांदणदरी म्हणजे सह्याद्रीतल एक चमत्कार. हिला काही जण आशिया खंडातली दुसरी सर्वात लांबीची कातळातली भेग म्हणून संबोधतात की ज्यातून लोक जाऊ शकतात. काही ठिकाणी हिची उंची दोनशे फुट असावी व काही ठिकाणी ईतकी चिंचोळी की एका वेळेस तीनच माणसे त्यातून जाऊ शकतील. दिड किलो मिटरची ही चिंचोळीवाट म्हणजे सह्याद्रीतले आणखी एक भौगोलिक आश्चर्य. खाली सर्वत्र दगडांचे खच पडलेले. त्यातून उन्हाळ्यातच चालत जाणे आव्हानात्मक. पावसात तर अशक्यच. तरीही लोक ईतक्या मोठ्या संख्येने चालल्याचे बघून आश्चर्य वाटले.
गावाबाहेरच्या वाहनतळाजवळ माझी भेट साम्रदच्या रमेश बांडेसोबत झाली. त्याने दोन ठिकाणे दाखवून आणण्यासाठी ३००/- रूपये सांगितले. सांदण दरीत नेणार का? असे विचारले तर तो हो म्हणाला. सोबत आईला नेता येईल का? त्यालाही तो हो म्हणाला.
पावसाळ्यात सांदण दरी उतरू नये असा ट्रेकर्समध्ये प्रघात आहे तो सुरक्षिततेच्या दृष्टीने अगदी बरोबर आहे. मी तीन दशकांपासून सह्याद्रीत सर्वदूर भटकतोय. उन्हाळ्यात सांदणदरी बघितली आहे. पावसाळ्यात ती पाण्याने भरून जाते, हे ऐकुन होतो. आणि आज तर भर पावसात त्यात उतरण्याची संधी मिळणार होती. 'लोक कुठवर जातात, पाण्याची पातळी किती असते', बघावं तर काय प्रकरण आहे.
आमच्या नियोजनात नसताना अशा प्रकारे सह्याद्रीतले महत्वपूर्ण असे भौगोलिक दान आमच्या पदराद पडणार होतं.
आईला सावकाशपणे सांभाळत आम्ही दरीच्या मुखापाशी आलो...तिथे शंभर एक लोक गुडगेभा खळखळत्या पाण्याच मौजमस्ती करत होते. तर वरच्या बाजुला वनखान्याने बसविलेल्या झिपलाईनवरून लोक ईकडून तिकडे जाण्याचा आनंद लुटत होते. रमेश म्हटला, बस इथपर्यतच ठिक आहे, मी म्हटलं, आता या घडीला जोरदार पाऊस नसताना आत किती जाता येऊ शकते? तो म्हणाला अवघड आहे, पण तीन साडे तीनशे मिटर्स पर्यंत जाता येईल. आई, मांडोळे मावंशी, लहानग्या जान्हवी व शौर्या यांना आम्ही वर चहा वाल्याच्या झोपडी जवळ थांबवले. त्यांना आम्ही कुठवर जाणार याची माहिती दिली आणि आम्ही तोल सावरत सावकाळपणे शीळांची वाट उतरू लागलो.
पाऊस जोरदार असला आणि दोन एक दिवसांची संततधार असली की सांदणदरीत पाण्याचे रौद्र भिषण रूप असते ही महाकाय भेग पाण्याने भरून जाते, तेव्हा तिथे जाण्याचे मार्ग गांवकरी बंद करून टाकतात.
लोकही किती बहाद्दर, सांदण दरी सेफ आहे याची बरोबर माहिती घेऊन, अतिशय खडतर असा प्रवास करून हा चमत्कार बघायला इतक्या मोठ्या संख्येने येत असल्याचे बघून मनोमन आश्चर्य वाटत होते. पावसाळी पर्यटन हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय, तो जितका गरजेचा तितकाच सुरक्षितही हवा. लोकही त्याचेच पालन करताना दिसत होते. काही थोडेच जण मद्यधुंद होऊन, वेडीवाकडी मस्ती करताना दिसत होते, पण बहुतांशी लोक काळजीपूर्वक या परिसरात वावरत होते, पावसाळी पर्यटनातील धोक्यांची लोकांना प्रसिद्दी माध्यमातून व सामाजिक माध्यमातून दिल्या जाणार्या माहितीचा हा परिणाम असावा. शिवाय प्रत्येकाला बरोवाईट समजते, आपल्या जीव सगळ्यांनाच प्यारा असतो.
एक भली मोठी शिळा पार करून आम्ही सांदणच्या महाकाय भेगेत उतरू लागलो. एका ठिकाणी निम्मे अधिक पाणी गोळा होऊन वळण घेते व खाली बारा पंधरा फुटावरून खळखळत झेपावते. त्यातुन उतरायचे होते. हा भन्नाट प्रकार होता. यंदाच्या पावसाळ्यात अनेकठिकाणांना भेटी देता आल्या, पण पाऊस थांबेला असताना इतका जोरादर प्रवाह बघण्याचा व त्यातून जाण्याचा हा आमच्या दृष्टीने दुर्मिळ असा योग होता.
पाण्याचा वेग इतका की त्याच्याशी आपण स्पर्धाच करू शकणार नाही. त्याचा मान राखूनच त्यातून जायचे होते. पलिकडे खडकांची नैसर्गिक कमान तयार झालेली, त्यातूनही मोठा प्रवाह धावत येत होता. हे फारच सुंदर दृष्य. या धबाबा कोसळणार्या पाण्याततुन चिंचोळ्या वाटेने खाली उतरायचे तर दगडावर डावीउजवीकडे पायांना व हातांना आधार शोधायचे व खाचेत पाय रोवून खाली उतरायचे, त्यातली एक निसरडी तर दुसरी दिड फुट खालच्या बाजुला. दोन्हींवर डावे उजवे पाय देऊन मी खाली तळ शोधू लागलो. तळ लागेना, तेव्हा पाण्यात सरळ झेपावलो तर चांगले छातीभर पाणी...वर चढून मग सोबतच्या सगळ्यांना एक एक करून खाली घेतली. सांदण दरी काय चीज आहे याची त्यांना एव्हाना कल्पना आली होती.
इथून पुढे धातीभर पाण्यातून दोन ठिकाणी जाऊन आम्ही महाकाय शिळांच्या राशीजवळ येऊन पोहोचलो. इथून पुढे जाणे धोकादायक, म्हणून सांदणदरीचा मनमूराद आनंद घेऊन आम्ही परतीचा निर्णय घेतला. रिव्हर्स वॉटर फॉल आणि घाटन देवी आता खुणावू लागले होते. परतताना त्या धबधब्यातून वर चढून जाणे म्हणजे एक दिव्यच, ते पार करताना आमच्यातले बहुतेकजण धबधब्याच्या मध्यावरून खाली कोसळले, पण खाली भरपूर पाणी असल्याने दुखापतीची शक्यता तशी कमीच होती. पुढे जोराचा प्रवाह नाही, खाली छातीभर पाणी, त्यामुळे हे कोसळणेही तितकेच मनोरंजक ठरत होते.
इथून आम्ही वर आलो तर आमची बच्चे कंपनी मुखाजवळच्या प्रवाहात मनसोक्त डुंबताना दिसली. तिथे एका स्थानिकाची चहा विक्री जोरात सुरू होती. तिथून आम्ही एका शॉर्टकटने रिव्हर्स वॉटरफॉलची दिशा पकडली. आमच्या मोतोश्रींना एक अवघड कातळटप्पा त्यासाठी पार करणे गरजेचे होते. मी रमेश बांडेकडे बघितले, त्याने 'जाऊ घेऊन आईंना', असा विश्वास भरला. आमच्या मातोश्रीं बालपणी मराठवाड्यात असताना खो-खो, कबड्डी खेळायच्या, आजही त्यांची दिनचर्चा भरपूर शारिरीक कामे करण्याची. पायी रोजच बाजार करून आणणार, त्यामुळे पंधरा फुटांचा हा कातळटप्पा त्यांनी लिलया पार केला, तेव्हा तिथून ये-जा करणार्यांनी आश्चर्य व्यक्त केले. एक मात्र नक्की आई रोज माझ्यापेक्षा तिप्पट अधिक चालते, त्याचा तिला त्रास कमी अनं फायदाच अधिक हे या निमीत्ताने जाणवले.
पर्यटन विकास: वनखात्याने वारेमाप खर्च करून खाद्यपदार्थ आदींचे स्टॉल्स उभारून दिलेत...आज प्रचंड गर्दी असूनही ते ओस पडले असून या तात्पुरत्या बांधकामाचा खर्च अक्षरश: वाया गेला आहे... |
अक्षरश: खिळवून ठेवणारा रिव्हर्स वॉटरफॉल बघितला. आता परतीच्या वाटेवर थोडी वाकडी वाट करून घाटघरच्या घाटनदेवीचे व तिथून कुरंग, मदन, अंलंगचे दर्शन घ्यायचे होते. धबधब्याचे डोळे दिपविणारे दिव्य बघून परतताना वाटेवरच ढग आले होते, त्यातून चालत जाणे म्हणजे स्वर्गीय सुखच. साम्रद पार्किंगमध्ये एक गोष्टीची कमी जाणवत होती, येथे येणारे बहुतांशी पर्यटक सांदण दरी असो की, रिव्हर्स वॉटर फॉल, हमखास भिजतात, त्यांना कपडे बदलण्यासाठी येथे कोणताच आडोसा नव्हता, त्यामुळे बहुतांशी पर्यटक ओल्या वस्त्रांनीच गाडीत बसून परतीच्या वाटेला लागत होते.
पाण्यात मनसोक्त हुंदडल्याने भूख लागणे स्वाभाविकच, पण येथे चहा, भजी आणि लेज, कुरकीर्यांची पाकिटे सोडल्यास अन्य पदार्थ नव्हते. काही ठिकाणी मक्याची कणसे भाजून मिळत होती, परंतू पर्यटन विकासाच्या नावाखाली येथे ना कपडे बदलण्यासाठी ना आडोसा, ना स्वच्छतागृह ना खाण्यापिण्याची चांगली सुविधा.
भूछत्र्यांप्रमाणे उगवणारे पावसाळी पर्यटन महाराष्ट्रात सार्वत्रिक टिकाचे विषय बनले आहे, ही काही चांगली गोष्ट नाही. आता लोक निसर्गरम्य ठिकाणी गोंगाट करणार असतील...बेशिस्तपणाने गाड्या चालविणार असतील...धिंगाणा घालणार असतील...शुद्ध हरपून किंवा सेल्फी फोट काढण्याच्या नादात जीव गमावणार असतील...कचराच कचरा टाकुन पर्यटनाला गालबोट लावणार असतील तर तो काही कौतुकाचा विषय थोडीच ठरतो. अशी ठिकाणे आणि अशी गर्दी टाळणार्यात मीही आहेच...पण लोकांनी फिरायलाच जाऊ नये, असे माझे अजिबात म्हणणे नाही. महाराष्ट्राच्या पर्यटनाची जी दूर्गती झाली त्यासाठी लोकांना जबाबदार धरण्यात तसा अर्थ नाही. या विशाल महाराष्ट्रात त्यांच्या भटकण्याच्या सोयी किती तोकड्या...अविकसीत. लोकांनी जायचे तरी कुठे?
हा सारा दोष अर्थातच शासनातील पर्यटन विभागाचा. सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि पर्यटन हा विषय अंगावर ओढून घेणार्या वनविभागाचा.
पर्यटनाचा विकास करताना या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेच कसे जाऊ शकते? हा प्रश्न मला आजवर नेहमीच सतावणारा, प्रशासनातल्या अधिकार्यांना त्याचे सोयरसूतक असेल?
पर्यटनाचा विकास म्हणजे फक्त लोखंडाचे रेलिंग लावणे, अवघड जागी घाट रस्ते बांधणे, परंतू मोक्याच्या रस्त्यांची चाळण होऊनही ते दुरूस्त न करणे हा प्रकार महाराष्ट्रात जितक्या मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतो तितका अन्य कुठेही नसावा. तुम्ही गोव्याचे उदाहरण घ्या, एक पर्यटन राज्य. तिथली खासियत म्हणजे रस्ते अफाटरित्या उत्तम दर्जाचे, तर सर्व प्रमुख ठिकाणी खानपानाच्या नीट नेटक्या सुविधा, स्वच्छतागृहे, दळणवळणाची साधने उत्तम स्थितीत.
भंडारदर्याच्या परिसराला खास पावसाळी पर्यटनाची अतिशय उत्तमरित्या जोड दिली जाऊ शकते. वन व सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यांना प्राप्त होणारा तोकडा निधी घाटरस्ते बांधण्यावर वाया न घालवता, रेलिंग नी पेव्हर ब्लॉक्सची कोडी न मांडता या पायाभूत सुविधांकडे लक्ष दिले, तर पर्यटकांचा या परिसरात सातत्याने ओढा राहील. त्यांना उत्तम सुविधा व स्वच्छतेची हमी देण्यासाठी स्थानिक मंडळींना गांभीर्याने प्रशिक्षण देण्याची नितांत गरज. शिवाय या मंडळींना पाककला, स्वच्छ परिसर, निसर्गाशी मेळ साधणारी बांधकामे अशा गोष्टी शिकविण्याची आवश्यकता.
हा सगळा परिसर पावसाळ्यात डोळ्याखालून घातला तर लक्षात येते की, निसर्गाने येथे मुक्तहातांनी उधळण केली आहे. पावसाचा या परिसरावर विशेष असा स्नेह, परंतू त्यासाठी साठ एक किलो मिटरच्या खडतर रस्त्यांवरून प्रवास करण्याची तयारी असायला हवी. फक्त फॉरेस्ट चेक पोस्टवर शंभर रूपये प्रति गाडी आणि प्रति पर्यटक ३० रूपये शुल्क आकारून येथे कुठलाही पर्यटन विकास तोवर होणार नाही, जोवर रस्ते, उत्तम दर्जाचे खानपान आदी सुविधांकडे लक्ष दिले जात नाही.
दुसर्या दिवशी घरी परतल्यावर आम्ही खर्चाचे गणित मांडले तेव्हा लक्षात आले की, ते थोडे बिघडले, पण त्याला नियोजन हे कारणीभूत नव्हते, तर ऐनवेळी सहा सदस्य रद्द झाल्यामुळे प्रति माणशी ५००/- रूपये खर्च आला. आमच्या अपेक्षेपेक्षा तो अधिक असला तरीही काटेकोरपणाने नियोजन केले तर सुमारे दोनशे किलो मिटरचा प्रवास आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च डोंगरांच्या छत्रछायेखालच्या या हिरवाईने नटलेल्या परिसराची एकदिवसाची भटकंती हा कमालीचा स्वस्त सौदा वाटला. अल्पाईन, अर्थात कमीत कमी खर्चात व कमीत कमी लोकांत स्वत: जर प्रवास, खानपानाचे नियोजन केले तर कमालीच्या स्वस्तात अशा ट्रिपा आयोजित केल्या जाऊ शकतात, अन्यथा खर्च करण्याला व सगळ्या सेवा विकत घ्यायल कोणत्याही मर्यादा नाहीत. आणि हो! हा ट्रेक नव्हे, ही ट्रिप असली आणि ट्रेकचे नियम बाजुला ठेवण्याचा विषय असला तरी आम्ही सुरक्षेचे सगळे नियम पाळू शकलो, कचरा कुठेच केला नाही, तो सोबतच आणला, प्लास्टिकचा वापर फार जबाबदारीने करण्यात आला, आमच्या पाऊलखुणांशिवाय मागे काहीही राहिले नाही आणि लूट मात्र जबरी केली...अफाट आनंदाच्या आठवणींची.
----------
टाईमलाईन:
सकाळी ७-२० वा नाशिकहून
८-१९ घोटी
९-५० बारीच्या पुढे न्याहारी
१०-३० भंडारदरा
१२-३० नेकलेस वॉटरफॉल
१२-५८ अमृतेश्वर
३-०० साम्रद
३-१९ सांदणदरी
४-२० कोकणकडा
४-४३ रिव्हर्स वॉटरफॉल
९-०० घोटी
९-३२ नाशिक शहरात प्रवेश
रात्री १०-१० वाजता पंचवटीत स्वगृही
Simillar Places
- Kali Gandaki Gorge 1450 km
- Boojir Valley & Canyon 2231 km
- Sorkhan (RED) Valley 2355 km
- Daredar Mountain 2503 km
- Shor Vally & Canyon 2886 km
- Marlik Vally & Conyon 3069 km
- Tarom (طارم) Vally 3118 km
- valley and canyon of the Ghizil Uzen River 3219 km
- Ghizil Uzen Rever (canyon) 3219 km
- Aladaghlar Mahneshan National Geopark (Rainbow mountains) 3227 km
Sahyadri Trekkers Bloggers
Sandhan Valley in Monsoon | Canyoning India - Episode 1
Ranvata - Sandhandari
No comments:
Post a Comment