- पावसाळी भटकंती वृत्तांत
निसर्गात जायचे तर निसर्गाशी एकरूप होऊन,
तेव्हा तिथल्या हिरवाईचा खरा अर्थ उमगतो.
गावात रोजच गाड्यांचे नी गाण्यांचे आवाज ऐकायला मिळतात,
निसर्गातले विविध आवाज तर ऐकुन बघा! तिथली पाने, फुले,
गवत, दव नी आकाशात हरवून तर बघा...हाच विचार घेऊन
दर्दी भटके गर्दीपासून दूर एकांतातल्या निसर्गरम्य ठिकाणांना
भेट देऊन आपले निवांत क्षण सत्कारणी लावताना दिसतात.
आम्ही मात्र ठिकाणच असे निवडले की,
जिथे वर्षभर रंगीबेरंगी पर्यटकांचा राबता असतो...माथेरान.
- ढग नी धुक्यात सतत गुरफटलेल्या माथेरानच्या वाटा आम्हाला उलगडता आल्या का?
- माथेरानमध्ये आम्ही का भिजलो नाही?
- ऐन पावसाळ्यात आम्हाला भिजण्यापासून कोणी थांबवलं?
- ३० जुन, १ जुलै २०१८चा माथेरानचा गारबेटच्या मार्गाने केलेल्या भटकंतीचा वृत्तांत...
रस्त्यावर एकही मोटरवाहन नसलेले आधुनिक गिरीस्थान, प्रत्यक्षात एखाद्या प्राचीन नगराची अनूभूती देते. आजवर आम्ही माथेरान गाठले ते सहल म्हणूनच! यंदा आमचा मनसुबा काही साधासरळ नव्हता. पायथ्याच्या गावातून माथेरान गाठायचे. इथला पाऊस लोकप्रिय आहेच, तेव्हा अनेक झरे ओलांडायचे. अनेक ओहळींची खळखळ ऐकायची, जमेल तितक्या धबधब्यांमध्ये भिजायचे. एकीकडे लोक पावसाळी पर्यटनाला जातात, आपण पावसाळी भटकंती अशा आडवाटेने साजरी करायची...
'पावसाळ्यात उगवणार्या भूछत्र्यांप्रमाणे आपलेही पर्यटन कलंकीत, तकलादू असू नये', याची ट्रेकर मंडळी कसोशिने काळजी घेत असतात. खरे तर त्यांना पाऊसच काय, कुठल्याही ऋतुत डोंगर, जंगल, गड-किल्ल्यांच्या सफरींचा आनंद घेता येतो, मग ते भाजून काढणारे उन असो की, गारठवून टाकणारी थंडी, की पाऊस. अर्थात पावसाळ्यात डोंगरकडे निसरडे बनतात, अनेक ठिकाणी नद्या, नाले तुडुंब भरून वाहतात, तेव्हा ट्रेकर्सच्या पावसाळी मोहिमी जरा मोजुन मापूनच होतात. आम्हीही तेच केले.
ट्रेकसोल्स समुहाच्या लाडक्या होमोबाच्या अर्थात डॉक्टर हेमंत बोरसेंच्या पोतडीतून 'गारबेटच्या मार्गाने माथेरान', अशी पावसाळी भटकंती मोहिम घोषित झाली होती. तसं बघितलं तर नाशिककर मंडळी श्रावणात ब्रम्हगिरी प्रदक्षिणाच्या निमीत्ताने पावसाळी भटकंतीचा आनंद युगेन यूगे घेत आली आहे. पूर्वी याच ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणा मार्गावर अनेकांना ब्रम्हप्राप्ती झाल्याच्या कथा प्रसिद्द आहेत. अनेक थोर संतांची पावले ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणा मार्गावर उमटलेली दिसतात. आज हीच प्रदक्षिणा त्र्यंबकेश्वरच्या डोंगररांगांचे निरलस निसर्ग सौंदर्य साठविण्यासाठी अनेकांची पावले येथे वळतात, परंतू पर्यटकांचे मोठे ओझे सहन करणार्या माथेरानची आडवाटेची चढाई म्हणजे एक वेगळा अनूभव नक्कीच ठरणार होती.
'ही भूतं आली कुठून':
तसं बघितलं तर महाबळेश्वर हेही आता पर्यटकांचे मोठे ओझे सहन करणारे पर्यटनकेंद्र बनले आहे, त्या महाबळेश्वरच्या जंगलातही आम्ही काही वर्षांपूर्वी कांगोरी, महादेवाचा मुर्हा, ढवळ्या घाट, अत्यंत देखणा आणि जावळीच्या मोर्यांची राजधानी असलेला चंद्रगड आणि भटकंतीचा स्वर्गीय अनूभव देणारा बहिरीच्या घुमटीचा मुक्काम करून मढी महाल मार्गे महाबळेश्वर गाठले होते. अनेक पर्यटक महाबळेश्वरच्या कड्याला ठोकलेल्या लोखंडी कठड्यांना खेटून निसर्गसौंदर्याचा आनंद घेत आहेत आणि आम्ही अशाच एका कड्यावरून महाबळेश्वर चढून वर येतोय. 'ही भूतं आली कुठून'? असा प्रश्न पडण्याच्या आत आम्ही पर्यटकांच्या गराड्यातून निघून जातोय! तसाच काहीसा प्रकार माथेरानमध्येही घडणार होता.
शनिवार ३० जुन:
सायंकाळी ६-००च्या सुमारास नाशिकच्या मुंबईनाक्यावरून १६ जणांचा एक छोटा चमु शहापूरच्या दिशेने निघाला. नाशिकमध्ये यंदा पावसाचा आरंभ कुर्मगतीचाच. आकाशात ढग तर आहेत, पण ते पावसाचे नाहीत घोटी येईपर्यंत वेगवेगळ्या बाकांच्या गप्पा टप्पांचे विषय रंगात येऊ लागले होते. घोटी पार केलं आणि आम्हाला आमच्या गप्पा थांबवाव्या लागल्या. त्या थांबवाव्याच लागणार होत्या. अहो! आम्ही महाराष्ट्राचे चेरापुंजी इगतपूरीत दाखल होत होतो.
इथे पाऊस तुमच्या स्वागताला नाही म्हणजे काही तरी चुकतयं हे ओळखावं. पाऊस नसला तरी ढग नी धुके येथे भेटतातच. धुक्याचे तर इगतपुरीवर अलोट प्रेम, तेव्हा हिवाळ्यात धुक्यात हरवलेले इगतपूरी बघण्याचा रम्य अनूभव घेण्याजोगा असतो. आज मात्र ताड ताड पावसाने आमचा इगतपूरी प्रवेश साकार केला. 'आता माथेरानपर्यंत तो आपल्याला जन्मोजन्मीचे भिजवून सोडणार', अशा रम्य कल्पना रंगवत आमच्या गाडीने कसारा घाटात प्रवेश केला तो संधीप्रकाशातच. त्या अंधुक प्रकाशातही कसारा घाटाचे पावसाळी सौंदर्य नजरेत भरत होते. घाट उतरला आणि कोणीतरी चहाची टूम काढली. आपल्याकडे गेल्या काही पिढ्यांनी पाऊस आणि चहा हे नातं जपलं आहे, तेव्हा आम्हालाही ते थोडच चुकतं?
आता ट्रेकर मंडळी भारी चुझी असतात, चहा कसाही चालेल, ठिकाण हक्काचं हवं. कसार्याचा परिसर म्हटल्यावर डोळखांब फाट्याहून चांगले ठिकाण कुठे सापडणार? आता हे जरा अतीच होत होतं, रात्रीच्या अंधारात डोळखांबकडे जाणारा घाट दुरूनही दिसणार नव्हता, परंतू या वाटेने केलेल्या आजोबा, माळशेज, हरिश्चंद्रगड आदी भटकंतीच्या आठवणींना जागूनच डोळखांब फाट्यावरच्या फाटक्या ढाब्यावर चहाचा पहिला थांबा. चहा अर्थातच साधारणसा, परंतू कसारा घाटातला पाऊस काय चीज असतो हे ढाब्या खालच्या पत्रात बसून समजत होते. पाच दहा मिनीटेत, पण नवरात्रीतल्या टिपर्यांचे आवाज मंद वाटावे इतके त्याचे प्रचंड आवाजात ताड ताड संगीत होते. आमच्या कानांना त्याने जी तुप्ती मिळाली ती आमचे कानच जाणोत.
आता पुढचा टप्पा म्हणजे शहापूर. तिथल्या जंगलातून जाणार्या टार रस्त्याच्या वाटाही नजरेला तोंडपाठ. अंधारातही त्यांचे चीरपरिचीत चित्र ओळखू येत होते. मुरबाडच्या अगोदर एका निवांत ढाब्यावर रात्रीच्या शाकाहारी भोजनाचा अवकाश घेतला तेव्हा आकाशातून दर मिनीटालाच असावे बहूतेक, पण अनेक विमाने ये-जा करताना दिसत होती. तिथून मुरबाड मार्गे आम्ही पोहोचलो डिकसळला.
- डिकसळच्या तातोबा मंदिराची टेकडी...जिथे आम्हाला रात्री पाठ टेकता आली! |
पाठ टेकण्याची जागा:
गावात रात्रीपूरती पाठ टेकण्याची जागा आहे का? अशी दोन एक ठिकाणी विचारणा केली, परंतू सकारात्मक उत्तर मिळाले नाही. अम्हीच डिकसळमध्ये मंदिर, खुली शाळा अशा स्वरूपाचा निवारा शोधू लागलो. वर टेकडीवर एका मंदिरात दिव्याचा उजेड दिसत होता. हेमोबाने ते ठिकाण पाहूत येते म्हणून सतरा आसनी टेंपोच वर नेला. एका लहानशा टेकडीवर लहानसा घाटरस्ता तयार झाला आहे. मंदिराचे बांधकाम कच्च्या स्वरूपाचे सिमेंट कॉंक्रिटमध्ये करण्यात आले आहे. अजून ते पूर्ण होण्यास वेळ लागेल, परंतू आमची आजची रात्र इथेच हा निणर्य लगेच झाला. भगव्या वस्त्रातले एक साधूगृहस्थ मंदिरात झोपले होते, त्यांच्याशी बोलल्यावर, रहा इथे असे उत्तर मिळाले. काही मिनीटात आमच्या पथार्या पसरल्या गेल्या आणि मच्छर नामक इवल्याशा जिवाशी झुंजत सार्यांनी रात्र पार केली. सुदैवाने माझ्याकडे घडीचा एक लहान तंबु होता, त्यामुळे मला तो त्रास झाला नाही. यावरून, डोंगरावर उघड्यावर मुक्कम नसला तरी घडीचे तंबु मच्छरदाणी म्हणूनही वापरले जाऊ शकतात याचा वस्तूपाठच सवंगड्यांना मिळाला.
- वरेडी, वरची वसाहत पाली येथे रविवारच्या सुटीचा आनंद घेताना... |
भिमाशंकरच्या डोंगररांगांवरून सूर्य नावाचा चमत्कार घडत असताना आमची सकाळची लगबग सुरू होती. माथेरान म्हटले की, नुसता पाऊस. आज मात्र त्याचा थांगपत्ताही दिसत नव्हता. रात्रीही तो आला की नाही, काहीच कळत नव्हते. सकाळी उठल्यावर कळले की हे तातोबा मंदिराचा कच्चे सिमेंट कॉंक्रिटचे बांधकाम आहे. मुळ मंदिर बाजुलाच असून सिमेंट व विटांनी बांधले आहे. त्याच्या छपराखाली काही भांडी लाऊन पावसाचे पाणी गोळा करण्यात आले होते.
मंदिर परिसरात पाण्याची व्यवस्था नाही, परंतू आम्हाला वापरण्यापूरते अशा प्रकारे रेनवॉटर हार्वेस्टिंगचे पाणी उपलब्ध झाले. सोबतच्या ४ किलो वजनी गॅस शेगडीवर गरमागरम चहाचे आधाण चढले. चहा रिचवून लगतच्या डोंगरावर डब्बापार्टीसाठी पायपीट केली, तेव्हा अवघा डोंगरच अडीच तीन इंचाच्या हिरव्या गावताने आच्छादलेला दिसला. नजर जाईल तिथे हा हिरवा गालिचा. मध्ये एकही काळा ठिपका नाही. हे कोणते भाग्य म्हणावे? जगात डब्ब्यासाठी इतकी सुरेख जागा असू शकते का?
हे कोणते भाग्य म्हणावे? जगात डब्ब्यासाठी इतकी सुरेख जागा असू शकते का? |
डिकसळच्या टेकडीवर तातोबाचे मंदिर लवकरच उभे राहील, तेव्हा भटक्यांसाठी एक उत्तम निवारा तयार होऊ शकेल. पायथ्याच्या एका बंगला मालकाने मात्र हा खासगी रस्ता असून वर गाडी नेण्याची आम्ही परवानगी देत नाही, असे सांगितले. ही टेकडी गावची की खासगी मालकीची या फंद्यात न पडता आम्ही टेकडीच्या तळाला दाखल झालो. आम्हाला ६-००च्या सुमारास गारबेटच्या दिशेने कुच करायची होती, प्रत्याक्षात ७-०० वाजले. तिथे आमचा पुण्याचा मित्र डॉ. श्रीराम इनामदार हा आमच्यात सामील झाला. पठ्ठ्या दवाखान्याच्या सगळ्या वेळा जुळवून आणण्यात आणि वाट्टेल तिथे भटकंतीसाठी सामिल होण्यात पटाईत. कोळेश्वरच्या वेळी तो असाच निर्जन जंगल तुडवत रात्रीच्या अंधारात आम्हाला शोधत शोधत वरच्या धनगरवाड्यात दाखल झाला होता.
डिकसळ म्हणजे प्रसिद्ध रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातले उमरोली ग्रामपंचायतीत मोडणारे एक वस्ती वजा गाव. अगदी यालाच जोडून नविन पाली वसाहत स्थापन झाली आहे. तिथे एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. तिथे आम्ही आमच्या रिकाम्या बाटल्यात गरजेपूरते पिण्याचे पाणी भरून घेतले आणि खर्या अर्थाने आमच्या पायी प्रवासाला सुरूवात झाली. इथला पाली-भुतिवली बंधारा म्हणजे एक मोठ्या धरणाची अनूभूती देणारा.
तंबु लावाल त जेल:
माथेरानच्या तळाला अनेक डोंगरधारांना कवेत घेणार्या या बंधार्याचे सौंदर्य बघण्याजोगे. हे ठिकाण पार्टीबाजांच्या आवडीचे असावे म्हणूनच या बंधार्याचे फोटो घेण्यास मज्जाव करण्यात आल्याचा व परिसरात तंबु टाकून रात्रीच्या मुक्कामास बंदी असल्याचा सार्वजनिक बांधकाम खात्याचा फलक दृष्टीस पडला. कापडी तंबु लावणार्यांच्या विरोधात तर थेट फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. हा फलक दृष्टीस पडण्याच्या अगोदरच आमचे बंधार्याचे छानसे फोटो काढून झाले होते. तंबु ठोकणे, पार्टी करण्यास मज्जाव वगैरे समजण्यासारखे आहे, परंतू फोटा मनाईचा मुद्दा मनाला जिबात न पटणारा होता.
पाली-भुतिवली बंधारा...येथे तंबु लावाल त जेल! |
गारबेटखालच्या पठारावरून मोठी उसळी घेऊन येणार्या धबधब्यांच्या लहान बंधार्यांची खळखळ |
थोडा अधिक पाऊस झाला तर हा प्रवाह ओलांडताना मोठीस कसरत होणार! |
भुतिवलीहून एक वाटाड्या आम्ही सोबत घेतला होता, तो सुरूवातीच्या चमु सोबत पुढे निघाला, आम्ही मागच्या चमुत राहून मस्त फोटोग्राफी करण्याच्या व्यस्त होतो. त्याला कारणही तसेच होते. सकाळचे लख्ख उन पडले होते. अवघा परिसर हिरवाईने नटलेला. झरे, ओहळी, धबधबे एव्हाना सुरू झालेले. अशा सुंदर प्रकाशात प्रकाशचित्र घ्याची नाही तर केव्हा? शिवाय हा उजेड फार काळ थोडाच टिकणार होता. माथेरानचा पाऊस सुरू झाल्यावर प्रकाशचित्रण अंमळ कठिण होणार होते. या ठिकाणी ठाण्याचा एक नवख्या भटक्यांचा चमू आम्हाला वाटेत भेटला. साधाणपणे तासाभरात आम्ही डोंगर चढणीला लागलो.
गारबेट पठाराकडे जाताना पहिला विश्राम...विशाल आम्र वृक्ष |
दिड तासात आम्ही गारबेट मार्गावरच्या पहिल्या विश्रामाच्या वृक्षाजवळ येऊन पोहोचलो. इथवरची पहिली चढण छातीची हवा खेचण्याची क्षमता तपासणारी होती. या विशाल आंब्याखाली पाच मिनीटांची छोटी विश्रांती घेताना आम्ही गारबेट खालच्या पठाराचा अंदाज बांधू लागलो. जस जसे वर जात होतो, तस तशी तळाची शेतं, वाडी-वस्त्या नी आसपासच्या डोंगरातून फेसाळणारे प्रपात विहंगम वाटत होते.
विश्रामाचा वृक्ष गाठणारे पहिले ट्रेकसोल्स डॉक्टरद्वयी... |
कडकडीत उन पावसाळ्यातले:
जीव सारखा पाणी पाणी करत होता. पावसाचा अजून पत्ता नव्हता. उलट कडकडीत उन्हात अंग भाजून निघत होते. ही पावसाळी भटकंती आहे की, उन्हाळी? सोबतचे एक लिटर पाणी संपले तेव्हा वस्तीच्या वेशीवरच्या झर्यावर एक मोठी चिरेबंदी विहीर दिसली. विहीर अलिकडचीच असावी, पण त्यातले पाणी इतके स्वच्छ की तळ दिसावा. मनसोक्त पाणी पिऊन थोडी पोटपुजा आटोपली.
मोठे वृक्ष येथे नावापूरतेच |
या वस्तीच्या वर एक खडीचढण दिसत होती व त्यावर आमच्या चमुतले अग्रभागी वीर दिसत होते. सावकाश पावलांनी आम्ही चढण चढत असताना काही भटके मागुन येताना दिसले. जवळ आल्यावर समजले की, की सगळी ज्येष्ठ मंडळी बोरीवली परिसरातील. पुरूषांच्या अंगात शर्ट, पॅन्ट वा टिशर्ट तर महिलांनी पंजाबी ड्रेस सारखा पेहेराव परिधान केलेला. त्यांच्या चालण्यातला टेच पाहुन स्पष्ट होत होते की, हे नेहमी व्यायाम सराव करणारे. अन्यथा त्याच्या वयाच्या इतर अनेकांना इतक्या खड्या चढणीवर असे सर सर चढता आले नसते.
एव्हाना उकाडा चांगला वाढला होता. स्वच्छ सूर्यप्रकाश फोटोग्राफीसाठी सारखे थांबवत होता. परिसरात निसर्गाचा साजही असा की, किती फोटो घ्यावेत अंन किती नाही. शरीरात तहान व भुकेची स्पर्धा सुरू होती. सोबतचे सगळे पाणी संपले होते. आता वरच्या झर्याचा शोध सुरू झाला. एका नैसर्गिक गुहेजवळ वाहते पाणी दिसले. पाण्याची चव अप्रतिम होती. शिवाय माथेरानच्या पर्यटक प्रचूर डोंगरावरूनचे ते नव्हते, त्यामळे पिण्यासाठी सुरक्षित. तिथे आमच्यापैकी अनेकांनी आपल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.
निसर्गाचे निरागस रूप |
तडा तडा चालत कठिण चढण पार करणारे बोरिवलीचे भलेतंदुरूस्त आरोग्य व निसर्गप्रेमी... |
हे ढग फसवेच...दिवसभर बरसतील तर नाव कसले? |
गारबेटच्या पठारावरची पंचतारांकीत पोटपुजा... |
तिव्रतेने जाणवणारा उकाडा, तहान, भुक या सार्यांचे निरसन या पठारावर झाले. ज्याने त्याने आप आपल्या परिने नानाविविध पदार्थ आणले होते. फळे होती, सुका मेवा होता. कोथिंबीरीचे मुटकुळे होते. धीरडी, धपाटे तर कित्येक चविचे. कोणीतरी दोन रंगातल्या ओल्या खजूर आणल्या होत्या. एकाची चुरलेल्या उडदाच्या पापडाची चटणी. लोणचे, गुळआंबा.
अनोळखी पर्यटकांची सोबत करत डोंगरांच्या माथ्यापर्यंत सोडायला येणारे गावातले पाळीव श्वान हे सह्याद्रीतले नेहमीचेच चित्र... |
इतक्या उंचीवर...इतक्या दुर्गम ठिकाणी असे वैविध्यपूर्ण जेवण म्हणजे आम्ही आम्हाला सर्वात भाग्यवान समजू लागलो. आमच्या बहुतांशी भटकंतीचे चित्र हे असेच असते, परंतू गारबेटच्या पठाराच्या सौदर्याने आजच्या जेवणाला वेगळे वलय प्राप्त करून दिले.
पाठमोरा माथेरानच्या गारबेटचा कडा |
भरपूर पायपीट...यथेच्छ पोटपुजा...मग विश्रांती...भटकंतीचा परमोच्च आनंद देणारी! |
खुल्या आकाशाखाली डोंगरकड्यावर अशी पाठ टेकली की त्या शक्तीशी थेट संपर्क होतो! |
आता ढग दाटून आले होते व सूर्य अधून मधूनच हजेरी लावल्यागत भासत होता. लवकरच पाऊस गाठणार. गारबेटच्या आव्हानात्मक खडकाचा टप्पा कसा तडीस जाणार? ही चिंता बाजुला टाकून या पठारावर आमचा पाऊण तास कसा गेला कळलेच नाही! वरही डोंगर आणि खालीही डोंगर अशा मधल्या टप्प्यावरच्या या पठारावर झाडे मात्र का नाहीत? हा प्रश्न सतावत होता. भविष्यात येथे मोठी तोड झाली असणार, त्यामुळेच हे पठार उजाड झाले असावे. पावसाळी सौंदर्याने त्याला असे काही खुलवले होते की त्यावरची रानआबादी नाही, असे बिलकुल जाणवू नये.
भरपूर विश्रांम झाला...आता निघायला हवे...बघू या तर काय प्रकरण आहे हा गारबेटचा कडा? |
आम्ही ट्रेकसोल्स... |
थेट आकाशाचे द्वार वाटावे असा गारबेटच्या पठारावरचा हा रस्ता भविष्यात काय वाढून ठेवणार कोण जाणे? |
कशी असेल? कशी नाही? गारबेटच्या खडकाळ टप्प्याची चढाई पार केल्यानंतर...एक छायाचित्रतर अगत्याचे! |
दमदार चाल...दमदार चढाई... |
''इतक्या कमी लोकसंख्येसाठी इतका मोठा घाटरस्ता म्हणजे आतबत्त्याचा व्यवहार वाटतो. त्या खर्चात तर या वस्तीच्या कैक पिढ्या सुखेनैव नांदू शकतील अशी वसाहत डोंगर तळाशीच उभी केली जाऊ शकते व पठारा वनराई तयार करून त्याच्या वनऊपजातून या वस्तीच्या आर्थिक गरजांना बळ दिले जाऊ शकते'', लोकांचा विकास आणि पर्यावरणाचा नाजूक समतोल राखण्यासाठी जर या घाटकामाचा निधी खर्च केला तर? शासनाने असे प्रयोग राबवायला काय हरकत आहे!
गारबेटच्या पठारावर दडलेली वस्ती... |
आपली चिंता आपल्या पाशीच ठेवीत गारबेट कड्याच्या शेवटच्या टप्प्या जवळ पोहोचलो, तोच बेभान हवा सुरू झाली. हवेचा जोर इतका की, तो आम्हाला हलवून सोडत होता. त्यात माझी टोपी उडून दरीत अवघड ठिकाणी पडली. खालच्या बाजुने एक पातळ पायवाट तिथवर जात होती, परंतू रस्ता खुपच अवघड होता. मी सावधपणे उतरीन असे सांगुन निघालो, तोच अनिरुद्दने मी आणून देतो, असे सांगितले. त्याला सावकाश जा असे म्हटले व त्याचे मी वरून चित्रण केले. अनिरुद्द जाधव हा नाशिकच्या पहिल्या पिढीतल्या गिर्यारोहकांतला. अनेक आरोहण मोहिमा त्याने केल्यात. त्यामुळे डोंगरावर त्याचे वावरणे हे सुरक्षित असणार याची खात्री होतीच.
अवघड दरीतुन टोपी सहिसलामत काढून आणताना अनिरुद्ध जाधव |
गारबेटच्या कड्यावर उत्साहाला आले उधाण! |
गारबेटवर आता गार खडे असे अगदी तोकडे |
ट्रेकर्स मंडळींना अंगवळणी असलेले असे निसरडे कडे...नेमके पर्यटकांचा घात करतात जेव्हा त्यांना त्यातल्या धोक्यांचा अंदाज येत नसतो तेव्हा... |
भुतिवलीच्या वाटाड्याने आम्हाला एक कडा दाखवला...मागच्या सप्ताहात उत्तर भारतातली एक महिला या कड्यावर सेल्फी फोटो घेण्याच्या नादात कोसळल्याचे तो सांगत होता. आपल्या कुटुंबियांच्या देखत ती महिला कड्यावरून कोसळली होती. तिचा मृतदेह लोणावळ्यातील गिर्यारोहकांच्या बचावदलाने अथक परिश्रमानंतर शोधून कुटुंबियांच्या सुपूर्द केला होता. अवघा महाराष्ट्र या घटनेने हेलावून गेला होता.
जिवाता घात करणारा तो एक क्षुल्लकसा फोटो. अमळ लहानशा चौकटीत आपला चेहरा बसवायचा...ओठांचा चंबु करायचा...मधली तिन बोटे दुमडून अंगठा नी करंगळी बाहेर काढत, जग जिंकल्यागत चेहर्याने आपलेच मुखकमल भलेमोठे असलेला फोटो काढायचा आणि तो फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप सारख्या डिजीटल माध्यमातून आप्त स्वकियांच्या पुढ्यात टाकायचा...त्यातले कित्येक मग, 'आवडला' असे बटण दाबणार...काही जण त्यावर, छानच!! भन्नाट!! वगैरे प्रतिक्रीया देणार आणि आपली छाती फुलणार. 'ही स्वछायाप्रतिमा आपली अखेरची ठरू शकते...सहल आनंदासाठी, पण तिचे पर्यावसन शोकान्तिकेत होणार...जगाला आपण पारखे होणार...कुटुंबावर दुखाचा डोंगरटाकून हे जगच सोडून जाणार', या गोष्टी अनेकांच्या गावीही नसतात. जातात बिचारे अनंताच्या प्रवासाला निघुन.
असे कडे आम्ही कैकदा चढलो नी उतरलेत याची मोजदाद नाही, तेव्हा आमच्यातील सगळ्यांनीच त्याकड्याच्या टोकावरून खालची दरी न्याहाळली. डोंगरावर वावरताना तुमच्यात अदब असायला हवी. निष्काळजीपणा इथे जराही कामाचा नाही. तो जिवावर बेतू शकतो हा विचार डोक्यात ठेऊनच अशा ठिकाणी वावरणे. तुमचे चप्पल, बुट या वाटांवरून घसरणार तर नाहीत ना? याचा अंदाज बाधणे. वर्तमानपत्रात सदरची घटना लुईसा कड्यावर घडल्याचे वाचण्यात आले होते, अशी शंका आमच्यातील काहींनी उपस्थित केली, पण वाटाड्या, 'हेच ते ठिकाण', असे ठामपणे सांगत होता. इधून दिसणारे समोरचे माथेरानच्या मुख्य बाजारपेठेलगतच्या वस्तीचे चित्र विचलीत करणारे होते.
माथेरान नगरातून दरीत वाहणारे प्लास्टिक व कचर्याचे धबधबे |
हे न शोभे माथेरानात:
नितांत सुंदर...मोटरवाहन रहित...भरपूर झाडी-झाडोरा असलेल्या माथेरानच्या हॉटेल्समधून नी घरांमधून प्लास्टिकचा कचरा अफाट प्रमाणावर थेट दरीतच टाकला जातो? हा प्रकार जितका चित्तविचलीत करणारा तितकाच धक्कादायक! माथेरानमध्ये येऊन अशी बुद्धी होते? इतक्या संदर निसगार्त असे वागणे काय कामाचे? हा कडा उंच नी सरळसोट असल्याने अर्धा किलो मिटर तरी कचर्याच्या उभ्या रेषा उमटल्यात. किमान माथेरानात तरी हे चित्र न शोभणारे.आता महाराष्ट्र शासनाने आजवरची सर्वात कठिण अशी प्लास्टिक बंदी एका अधिसूचनेद्वारे घोषित केलीयं! पण त्याने माथेरान सारख्या गर्दीच्या पर्यटनस्थळांना कितपत दिलासा मिळणार. राज्य शासन म्हणते प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातली आहे. पाण्याच्या फक्त अर्धा लिटरच्या बाटल्यांना परवानगी. इथे तर एक लिटरच्या पाण्याच्या बाटल्या सहजपणे मिळत होत्या.
अशा पर्यटनस्थळांवर सर्वाधिक कचरा होतो तो खाद्यपदार्थांच्या वेष्टनांचा. काय मराठी...काय अमराठी, आपले लोक खाण्या पिण्याचे पदार्थ पोटात ढकलले की त्यांची वेष्टने उभ्या जागीच टाकून देतात. जणू आपल्या तिर्थस्वरूपांनी हा कचरा उचलण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलाय...आणि कोणी तरी तो नंतर साफ करायला येणार आहे का? हल्ली ताजे पदार्थही थाळीत दिले जात नाहीत. बहुतांशी ठिकाणी वर्तमानपत्राच्या कागदात ते बांधून देतात. त्या कागदावरची शाई म्हणजे घातक रसायने, ती पोटात उतरून माणसाची क्रय शक्ती बिघडवण्याचे काम करते. वर्तमानपत्र नसेल तर प्लास्टिकचे द्रोण अथवा पिशव्या.
कथित प्लास्टिक बंदीने फक्त फळे आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडच्या प्लास्टिक वापराला चाप बसला आहे. कारखान्यात तयार केले जाणारे बिस्कीट, ब्रेड, केक, बटर, गोळ्या, चॉकलेट, तळलेले वेफर्स, कांड्या, टमाटा सॉस आदी असंख्य प्रकार तर प्लास्टिकच्या वेष्टनातच विकण्याची परवानगी आहे. ही प्लास्टिकबंदी अंशत:.
घुसखोरी...रम्य...सुंदर...शांत:
काही झाडावर हिरवे मखमली शेवाळ, तर काहींवर पाने, वेली, फांद्यासकट परजिवी झाडे उगवलेली...एकमेकांच्या आधाराने बहरलेले हे जिवन माणसाला काही बोध देऊ शकते का? 'माझ्या जागेत याने अतिक्रमण केले आणि त्याच्या जागेत मी घुसखोरी केली', असे दैनंदिन जिवनात माणसामाणसातले वाद विकोपाला जातात तेव्हा, परस्पर सहकार्याने केवढे शांततामय नी सुंदर जगता येऊ शकते, यांच्याकडून हा धडा घेता आला तर? विचारांचे चक्र चालत असतानाही असे अखंड सुरू होते; म्हणजे चालता चालता निसर्गाचे अमिट रूप डोळ्यात साठवायचे, पायाखालची वाट जपून तुडवायची, मित्र मंडळींच्या प्रतिसादाला ओ द्यायचा, हीच तर खरी भटकंती!
मनुष्य रहित १२ क्रमांकाच्या रेल्वे फाटकावर आलो तेव्हा घड्याळात १३-३४ वाजले होते. गारबेट पासून इथवर एक तास बाविस मिनीटे पायपीट. डिकसळ पासून चालायला सुरूवात केली तेव्हा पासून रूसलेला पाऊस येथे आमच्या पाठीवर थाप देण्यासाठीच दाखल झाला. एक छपरीच्या आडोशात चहा, लिंबुपाणी अशा पंधरा मिनीटांच्या विश्रांतीत पावसाची दमदार हजेरी लागली. अखेर पाऊस आला. त्याने आम्हाला गाठले. आम्ही मात्र त्याच्यासाठी सज्ज नव्हतो. पावसात भिजून खराब होऊ नये अशा वस्तू आम्ही व्यवस्थित बांधून ठेवल्या तोच मेथेरानच्या प्रसिद्द वारसे रेल्वे इंजिनने शिट्टी फुंकली. बाजाराकडून अमन लॉजच्या दिशेने जाणारी रेल्वे इतक्या जवळून बघण्याचा हा योग जुळून आला. पाऊस मात्र आल्या पावली निघून गेला. आम्हाला न भिजवताच.
माथेरानची वारसा रेलगाडी...आता ती पुन्हा वाफेच्या इंजिनवर धावणार! |
या बाजार पट्ट्याच्या तर्हा बघाव्या तितक्या थोड्या. आम्हाला तो तात्काळ पार करून सूर्यास्ताच्या कड्याकडे जायचे होते. तिथून अर्थातच आम्ही सूर्यास्त बघणार नव्हतो. या सूर्यास्तकड्याला इंग्रजांन पॉर्क्युपाईन अर्थात साईंदळ कडा असे नाव दिले आहे ते पूर्वी या ठिकाणी भरपूर प्रमाणात आढळणार्या साईंदळांमुळे. १२ क्रमांकाचे मनुष्यरहित रेल्वे फाटक ते सूर्यास्तकडा ही पायपीटही एक तासाची ठरली. अर्थात बाजारा लगत चालणे फारच रेंगाळणारे होते. शिवाय येथे थोडे पाणी खरेदी करून घेतले कारण माथ्यावर नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत पिण्यायोग्य नाहीत.
रेल्वे रूळाच्या पश्चिम बाजुचा रस्ता हा चिखलमातीचा. म्हणजे माथेरान हे काही फक्त विनामोटर वाहन गाव नाही. येथे सिमेंट अथवा टारचे रस्ते सुद्धा नाहीत. मोटर गाड्याच नाहीत तर पक्क्या रस्त्यांची काय आवश्यकता?
गतकाळात सगळे रस्ते असेच असतील...चिखल, दगड, मातीचे... |
चिखल, मातीत टालेला जांभा दगड म्हणजे इथल्या रस्त्यांचा आत्मा. पूर्वीच्या काळी जवळपास सर्वच ठिकाणी अशा वाटा असतील! अशा वाटांवर चालण्याचा अनूभव हा जसा दुर्मिळ तसाच तो पायांना अजिबात न थकवणारा. विशेष म्हणजे घोड्यांच्या रपेटीसाठी असे रस्ते आदर्शवत.
चंदेरी दर्शन:
साईंदळाचा कडा म्हणजे आसपासच्या डोंगरांचे चंदेरी दर्शन! सूर्यास्त बघण्याचे माथेरानमधले हे सर्वात उत्तम ठिकाण. आज आम्ही येथून सूर्यास्त बघणार नव्हतो. समोरच ईरसाल भटक्यांना खुणावणारा चंदेरी दुर्ग, त्याच्या बाजुला नाखिंद, श्रीमलंग तर पूर्वेकडे प्रबळगड, कलावंतिण दुर्ग, चंदेरीच्या उजव्या अंगाला विकटगड उर्फ पेबचा किल्ला आणि त्याच्या उजव्या बाजुला माथेरानचा सर्वात प्रसिद्द असा पॅनोरमा पॉईंट. या पॅनोरमा पॉईंटच्या उजव्या अंगावरून दोन बारीक धबधब्यांची लांबलचक खेचलेली रांग म्हणजे हिरव्या कड्यांवरून कोसळणारे प्रपाताचे नयनरम्य दृष्य. नजरा जमेल तितके डोंगर, गडदर्ग, गावे जलाशये शोधत होत्या.
येथे आठवण झाली ती चंदेरीवर २०१४च्या जुलै महिन्यात पर्यटकांवर बितलेल्या एका दुर्धर प्रसंगाची. मुंबई टाईम्स ऑफ इंडियाचा चाळीस जणांचा चमु चंदेरीवर पर्यटनासाठी आला होता. परतीच्या वाटेवर त्यांना जोरदार पावसाने गाठले त्यामुळे त्यांना निसरड्यावाटेवरून खाली उतरता येईना. जोरदार पावसाच्या अखंड धारा दोन अडीच तास सुरूच होत्या, तेव्हा त्यांनी खाली न उतरता गुहेकडे माघारी परतायचे व तिथे पावसापासूनबचाव करायचा निर्णय घेतला. खुल्यावर तुफान पावसात त्यांचा निभाव लागत नव्हता. आडोसा कुठेच नव्हता. गुहेच्या अलिकडच्या टप्प्यात वरून दगड कोसळून अभिजीत कदम या २५ वर्षीय कर्मचार्याचा मृत्यू झाला होता. अग्नीशम, स्थानिक मंडळी व सुसज्ज गिर्यारोहक दलास रात्रीच्या अंधारात बचाव कार्य थांबवावे लागले होते व काहींना दुसर्या दिवशी सकाळी खाली आणने शक्य झाले होते.
पावसाळ्यात चंदेरी, पेब, कलावंतिण, प्रबळगड आदी परिसर भटकंतीकरिता आव्हानात्कक. त्यातही डोंगरात चालण्याचा अनूभव, योग्य नेतृत्वाचा अभाव असेल तर मोठी आपत्ती ओढवू शकते, हे अधोरीखीत करणारी घटना. आश्चर्य म्हणजे ही घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्ष या परिसरात पावसाळी पर्यटकांचे अपघात होतच राहिले. यंदा तर पावसाच्या आरंभालाच कलावंतिण दुर्गावर लोटलेल्या जत्रेची छायाचित्र सामाजिक माध्यमांवर बघायला मिळाली.
साईंदळ कड्या लगतच्या टपरीवर आम्ही चहा-पोहे असा छोटेखानी कार्यक्रम उरकल्यानंतर प्रबळगडाच्या दिशेने उतरणार्या वाटेने आम्ही खाली उतरू लागलो. आमचे लक्ष होते तळाचे धोदाणी. तिथे आमचा टेंपो येऊन थांबणार होता. मुंबईचे तिघेजण या वाटेने वर आले, त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून धोदाणी पर्यंतच्या मार्गात मोठा जलप्रवाह किंवा इतर अडथळे तर नाहीत ना? याची हेमंतने माहिती करून घेतली.
दाट झाडीचा, नोगमोडी वळणांचा हा मार्ग उतारताना मोठे आनंददायक भासत होता. प्रबळगड, कलावंतिण, चंदेरी हे वेगळ्या कोनातून दिसत होते. वाटेच्या मध्यावर आम्हाला एक मंदिर दिसले, ते जुने आहे की नव्याने बांधले याचा उलगडा लागत नाही. या मंदिरा पासून पुढे मुंबईतील एक माहेश्वरी कुटुंब सावकाळपणे उतरनाना दिसले. त्यांचा उतरण्याचा वेग फारच मंद असल्याने त्यांना ओलांडून पुढे जाणे क्रमप्राप्त होते. तसा प्रयत्न केला, परंतू पुढे सरकण्याची वाट मिळेला. माझ्या पुढचे सवंगडी बरेच पुढे निघून गेले होते.
पंधरा एक मिनीटे मी पुढे निघण्याची वाट शोधत होतो, तोच एका खडकावर त्या माहेश्वरी कुटुंबातील महिलेचा पाय घसरला, तिने आपल्या श्रीमानजींचा हात थरला तर ते तोघेही घसरून खाली पडले. नशिब बलवत्तर म्हणून त्यांची डोकी दगडावर आपटली नाहीत आणि अवघड कडा नसल्याने ते दरीत कोसळले नाहीत, अन्यथा एक भिषण आपत्ती ओढवली असती. या महिलांच्या पायात चक्क प्लास्टिकचे बुट होते आणि पुरूषांच्या पायात फ्लोटर्सच्या चपला. शिवाय डोंगर उतरण्याच्या अनूभवाचाही अभाव होता.
सूर्यास्त कड्यावरून उतरनाना वाटेत लागणारे मंदिर... |
डॉ. हेमंत बोरसे - खंबीर नेतृत्व |
बरोबर ५-०० वाजता आम्हा सूर्यास्ताचा कडा उतरलो. पायथ्याची वस्ती होती पिंपळवाडी. तिथून धोदाणीचा परिसर नजरेच्या टप्प्यात दिसत होता, पण अंतर बरेच चालावे लागणार होते.
धोदाणीवरच्या पिंपळवाडी या दहा पाच घरांच्या या वस्तीपर्यंत कच्चा रस्ता आला आहे. भविष्यात याचा पक्का रस्ता होणार हे नक्की. आमच्या पावसाळी भटकंतीचा हा शेवटचा टप्पा सकाळी ७-०० पासून सायंकाळी ५-०० वाजे पर्यंत आम्ही जुलै महिन्यात माथेरान चढलो आणि उतरलो, पावसाचा अंगावर कुठेच साधा शिडकावा सुद्धा नाही. पाऊसच नाही तर भिजणार कोठून. पंधरा मिनीटेच तो दाखल झाला तेव्हा आम्ही सज्ज नव्हतो. वाटले होते की, केव्हा ना केव्हा तो भिजवेल. पण दु:ख मानण्याचे कारण नाही. तो नसल्याने आसपासची सह्यासृष्टी डोळ्यात नी डोक्यात उत्तमरित्या साठविता आली. उन कडक होते, त्यामुळे ढगांनी नटलेले हिरवेगार डोंगर फोटोत उत्तमरित्या उतरले. हे देखिल वेगळे सुख!
माथेरानवरून असंख्य लहान लहान जल प्रवाह वाहत होते. धबधब्यासाठी इतके खाली उतरण्यापेक्षा आमच्यातले काही जणांनी वाहत्या पाण्यावरच्या एका नैसर्गिक कुंडात बसकन मारली. तिथे सार्यांनी वाहत्या पाण्यात वीस एक मिनीटे निवांतपणा अनूभवला. मला त्या धबधब्याची ओढ लागली होती. तेव्हा गट प्रमुखाला सांगून मी खाली उतरलो. मोठे सुरेख अनूभव होता तो. आसपास कुणीच नव्हते तीस एक फुटाच्या कड्यावरून कोसळणार्या प्रपातात मनसोक्त भिजल्यानंतर मी वर आलो, तोच आठवण झाली, माझी टोपी खालीच राहिली होती. गारबेटच्या कड्यावर अनिरुद्धने ती काढून दिली होती, त्यामुळे तिचे मोल अधिकच, तिला अशी सोडून चालणार नव्हते.
धोदाणीला जोडणार्या पक्क्या सडकेपुढे कांबळेंच्या कृषी पर्यंटन केंद्रावर आमचा टेंपो येऊन थांबणार होता. अजुन नेमके किती अंतर चालायचे याचा अंदाज येत नव्हता. भाताची रोपे लावलेले अनेक खळे मागे पडत होते. एका खळ्यातल्या पाण्यावरचे बेडूक पाच-सहा फुटी धामणीने अगद उचलले व सळसळत आमच्या देखत ती पलिकडच्या बांधावरून दिसेनाशी झाली.
माथेरानवरचे जलप्रपात एव्हाना जोरदार वार्यामुळे उलट्या दिशेने डोंगरावर परतत होते, जणू गुरूत्व शक्तीला थोडे थांब! म्हणत. आमच्या भटकंतीचा समोराप जसजसा जवळ येऊ लागला, तसतसे चालणे नकासे वाटू लागले. पाय थकू लागले होते, पण मनाला अजिबात थकवा जाणवत नव्हता. आसपासचा निसर्गा असा भरभरून बहरलेला असेल तर मन कधीच थकु शकत नाही.
गेल्या दहा-पंधरा वर्षात महाराष्ट्रात पावसाळी पर्यटनाचे पेव फुटले आहे, तशा गर्दीची बाधा नसलेल्या वाटेवरची ही भटकंती मनोमन सुखावणारी ठरली. अन्यथा सह्याद्रीत अनेक धबधबे आणि डोंगरकडे लोकांच्या गर्दीने फुलू लागलेत. त्याठिकाणी काय बघायला मिळते, हुल्लडबाजी, नाचगाणे, प्रसंगी दारूकाम, प्लास्टिकचा कचरा. अशा गडबडबाज पर्यटकांच्या आवांजांमुळे निसर्गाची शांतता कुठेच शिल्लक राहत नाही. इतका गडबड गांधळ बघुन कुणाला अशा निसर्गात रमायला आवडेल? माथेरानच्या पठारावर थोडाकाळ हाही अनूभव आला, पण आम्ही तिथे थांबणार नव्हतो, त्यामुळे त्याचा तसा त्रास जाणवला नाही. नाही पाऊस, पण धबधब्यात तर भिजायला मिळाले. उन्हाचा कडाका चांगलाच जाणवला, अगदी उन्हाळ्यापेक्षाही जास्त कडक भासावा इतका, पण लख्ख प्रकाशात आसपासचा परिसर अधिक स्पष्टपणे बघता आला. ६-४५ मिनीटांनी आम्ही आमचा टेंपो गाठला त्यावेळी धोदाणीहून एक बस आम्हाला परतीच्या वाटेवर जाताना दिसली. दहा मिनीटात टेंपोच्या मागे सगळ्या सॅक बॅगा बसवल्या, कपडे बदलले आणि सगळे जण आपआपल्या जागांवर विसावले.
ट्रेक मात्र अजून संपलेला नव्हता. भटकंती एक दिवसाची, त्यात फार दमवणारी नाही, तेव्हा डोळ्यांना जडत्व येईपर्यंत लगेच आजचे कवित्व सुरू झाले. साडे आठच्या सुमारास पनवेलमध्ये अंगण येथे छानसे जेवण आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासाचा दुसरा अंक रंगला. विषय होता राजकीय, हळू हळू दोन गट झाले, एक समर्थक तर दुसरा विरोधी गटाचा. त्यात नोकरशाही, भ्रष्टाचार, सरकारची त्रासदायक धोरणे, चुकीचे निर्णय असे एक एक मुद्दे पुढे येत होते.
चर्चा राजकीय असली तरी त्याला कुठलाच जातीय आधार नव्हता ही आनंदाची बाब...ट्रेकर्स तसेही जातपात मानित नाहीत, परंतू एक समिकरण सर्रासपणे ऐकायला किंवा वाचायला मिळते ते म्हणजे, ब्राम्हण मंडळी भाजपाचे कडवे समर्थक...आणि इतर मार्गासवर्गीय विरोधक. आजच्या जमान्यातले हे दुर्दैवी चित्र उभा देशच जणू राजकारण, समाजकारण, आरक्षण अशा मुद्द्यावर दोन गटात विभागत असताना
इथे मोदींच्या निर्णयातील त्रुटींबद्दल उघड उघड टिका करणार्यात ब्राम्हण मंडळी पिछाडीवर नव्हती आणि समर्थन करणार्यात मागासवर्गीय म्हणवले जाणारे मागे नव्हते...चर्चा अर्थातच मुद्देसुद जातीय, धार्मिक रंगाने बरबटलेली नसल्याने ती उदबोधकही ठरत होती. नाही तरी ट्रेकवर फक्त ट्रेकच्याच गप्पा थोडीच असतात...आसूर्य कुठलाही विषय येथे वर्जित नसतो! दिड एक तासाच्या चर्चेतून काय बाहेर आले ते कळले नाही, पण त्याने झोप मात्र चांगली दिली ती कसारा घाटाच्या चढाजवळ चालकाने चहाची विश्रांती घेईपर्यंत ती टिकून राहीली.
माथेरान:
काही तरी नवं, जगावेगळं करण्याची साहेबांना मुळातच आवड. साहसीपणा अंगभूत, त्यामुळेच माथेरान सारख्या दुर्गम डोंगरावर गिरीस्थान वसविले. माथेरानवर भारतीय राजवटीच्या प्राचीन खुणा नाहीत. इंग्रजांनी येथे उन्हाळी पर्यटनाच्या निमीत्ताने वस्ती आणि वसाहत निर्माण करण्यापूर्वी डोंगरावर लोकांचा राबता असल्याच उल्लेख आढळत नाहीत. इथल्या निसर्गाला शहरीकरणाची बाधा होऊ नये, लोकांना येथे शांत, निवांत राहता यावे याकरिता माथेरानात स्वयंचलित वाहने टाळली, तसे पक्के रस्तेही टाळले. इतकेच काय, सायकलींनाही परवानगी नाही. माथेरानचे निसर्गसौंदर्य कसोशीने जपताना इंग्रजांनी माथेरान विषयी माहिती देणारे माथेरान जॉन्टींग्ज नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते. या माथेरान जॉन्टींग्जचे अंक वाचायला मिळाले तर काय बहर येईल. माथेरान महापालिकेने ते जरूर संग्रहीत करावेत.
माथेरान शब्दाची उत्पत्ती कशी झाली. शब्दाची फोड केली तर माथे आणि रान हे दोन शब्द येतात. १८५०च्या सुमारास ठाण्याचा जिल्हाधिकारी असलेल्या ह्यु मिलेट याने माथेरान गिरीस्थान वसविण्यात पुढाकार घेतला. माथेरानवरचे पहिले घरही ह्यू मिलेटचे. सुरूवातीला ६१ इंग्रज, ११ धनिक पारशी, विनायक गंगाधर यांनी घरे बांधली. माथेरानवर पक्की सडक आणि मोटरगाड्यांना मंदी हा निर्णय इंग्रज आमदनीतला.
सर आदमजी पिरभॉय आणि अब्दुल हुसैन माथेरानच्या ट्रॉय ट्रेनचे जनक. १६ लाख रूपये खर्च करून त्यांनी नेरळ ते माथेरान हा २१ किलो मिटरचा रेल्वे मार्ग तयार करून घेतला व त्यावरून पहिली मिनी ट्रेन धावली. या कामगिरीबद्दल पिरभॉय कुटुंबियांना भारतात रेल्वेने कुठेही मोफत प्रवास करण्याची मुभा दिली आहे. परंतू माथेरानचा रेल्वे मार्ग काही असाच तयार झालेला नाही, त्याठिकाणी अफाट प्रमाणावर साप होते, इतके की एक साप मारून आणल्यास १ रूपया बक्षिस दिला जात असे.
साप...बाप रे बाप! |
खबर तर अशीही आहे की, माथेरानचे पर्यावरण जतन करण्यासाठी इथल्या रेल्वेचे डिझेंल इंजिनचा वापर बंद करण्यात येणार आहे. २०१८ पासून वाफेवर चालणारे इंजिन वापरण्याचा शासनाचा प्रस्ताव होता, तो कार्यान्वित होण्याची प्रतिक्षा आहे.
माथेरानचा परिसर पर्यावरण संवेदनशील (इको सेन्सीटिव्ह) क्षेत्र म्हणून घोषित झाला आहे. तथापी माथेरानातले खाद्यपदार्थ पुर्णपणे प्लॉस्टिक मुक्त नाहीत. माथेरानपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात तोरणमाळ, पन्हाळा, सप्तश्रृंगीगड आणि या सारख्या गिरीस्थानांना पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करून त्याठिकाणी मोटरवाहनांना बंदी घातल्यास अशी गिरीस्थानी जिवंतपणी स्वर्ग ठरतील आणि महाराष्ट्रातल्या जनतेला निसर्ग पर्यटनाचे एकापेक्षा अधिक पर्याय उपलब्ध होऊ शकतील.
माथेरानची सुरक्षा:
माथेरानात लहान मोठे अशी सुमारे ४० ठिकाणे आहेत, जिथून निसर्ग सौंदर्य न्याहाळता येतं. आता इतक्या विशाल क्षेत्रात ना गाडी, ना पक्का रस्ता, मग अंतर्गत सुरक्षा कशी ठेवतात. माथेरानात पोलिस नावाचा प्रकार आहे की नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, माथेरानात महाराष्ट्र सर्वत्र आढळतात तसेच पोलिस स्थानक आहे. इतकेच नव्हे, तात्पुरत्या अटकेसाठी पोलिस ठाण्यातले जेलही आहे. या जेलचे ठिकाण कदाचीत महाराष्ट्रातल्या सर्वात सुंदर ठिकाणात मोडणारे असावे, अर्थात कितीही सुंदर असले तरी त्यात जायला कुणाला आवडेल?
माथेरान पोलिस दलातले अश्व...दुर्दैवाने याला मणक्याचा त्रास असल्याने त्याची रपेट थांबली आहे. |
हेवा वाटावा असे हे चित्र...संपुर्ण नगरात अश्वयांचा राबता...हे जित्र आता जगात दुर्मिळ... |
कर्जत उपविभागात मोडणारे माथेरान पोलिसठाणे...इथले तुरुंग इतके देखणे आहे की, त्यातून सदोदित हिरवा निसर्ग दृष्टीस पडतो...त्यात कैदी मात्र अभावानेच असतात! |
संयुक्त राष्ट्र संघाने २००३ साली प्रत्येक ११ डिसेंबरला जागतिक पर्वत दिन साजरा करण्याची घोषणा केली आहे. या अनुषंगाने माथेरान नगरपालिकेने डिसेंबरच्या शेवटच्या सप्ताहात जागतिक पर्वत दिनानिमीत्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा ठराव २०१२ साली केला होता. माथेरानची जैवविविधता जपण्यासाठी मुख्य मार्गावर भित्तीचित्रांचे आयोजन, बर्ड रेस नावाच्या स्पर्धेच्या माध्यमातून २४ तासात पक्षांची छायाचित्रे टिपून वेगवेगळ्या प्रजातींची नोंद करणे. नॅशनल जियोग्राफिकच्या प्रसिद्द छायाचित्रकाराला पाचारण करून निसर्ग छायाचित्रे कशी टिपावीत या संबंधी माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करणे, पथनाट्याच्या माध्यमातून पर्यटकांमध्ये पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेच्या संबंधी जनजागृती करणे, वर्षाच्या शेवटच्या दिवशी दस्तूरी नाका ते पांडे मैदान ही १० किलो मिटर धावण्याची स्पर्धा आयोजित करणे अशा पर्यावरण संवर्धनाशी संबंधित विविध उपक्रमांचा आपल्या महत्वाच्या कामकाजात अंतर्भाव केला आहे.
माथेरान विषयी काही पुस्तके:
माथेरान हिल: इट्स पिपल अॅन्ड अॅनिलम्स - डॉ. जे.वाय. स्मिथ १८७१, द हिलस्टेशन ऑफ माथेरान - एलिन ऑलिव्हर, १९०५, Matheran,
भटकंती रायगड जिल्ह्याची - प्र.के. घाणेकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात माथेरान विषयीची माहिती उत्तमरित्या संकलित केली आहे. (स्नेहल प्रकाशनचे २००७चे पुस्तक)
माथेरान विषयीच्या काही ब्लॉग लिंक्स:
http://saugatabagchitravelogues.blogspot.com/2011/07/i-had-been-to-different-hill-stations.html
http://travellersappetite.in/2015/sojourn-matheran/
https://www.onacheaptrip.com/matheran-hill-station/
http://www.ghumakkar.com/matheran-magic/
http://siaphotography.in/blog/matheran-in-monsoon-a-heaven-near-mumbai/
https://www.travelblog.org/Asia/India/Maharashtra/Matheran/blogs-page-1.html
# सह्याद्री
# माथेरान
# गारबेट
# ट्रेकसोल्स
# पावसाळी भटकंती
# सह्याद्री ट्रेकर्स ब्लॉगर्स
प्रशांत, खूप अभ्यासपूर्वक आणि अस्खलित शब्दरचना साधून blog लिहिलास, पुन्हा एकदा ट्रेक डोळ्यासमोर जिवंत उभा राहिला...कौतुकास्पद
ReplyDeleteजितकं मनमोकळं करून लिहलंय तितकीच मनसोक्त फोटोंची उधळन!
ReplyDeleteमजा आली. !!!
सुरेख वर्णन, उत्तम माहिती आणि सुंदर फोटो
ReplyDelete