माहुली: गुप्त राजधानी
ब्लॉगमध्ये वाचा...
- माहुलीची रविवारीय भटकंती
- शहाजींचे युद्ध
- शिवाजींचे युद्ध
आपल्या माथ्यावर सुळक्यांची मालिका बाळगणारा सह्याद्रीतला लक्षवेधी डोंगर म्हणजे माहुली, त्यामुळेच महाराष्ट्राच्या गिर्यारोहकांचे तो एक आवडीचे ठिकाण आहे. या किल्ल्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची दुर्गमता. निसर्गत: अतिशय दुर्घट अशा वाटांमुळे स्वराज्य संकल्पक शहाजी राजांचा तो आवडता किल्ला होता. जिजाबाई आणि बाल शिवाजींसह त्यांनी न केवळ या किल्ल्यावर वास्तव्य केले, काही काळ या किल्ल्याचा वापर गुप्त राजधानी म्हणून केला.काही अभ्यासकांच्या मते हा किल्ला मुघलांनी बांधला तर काहींच्या मते तो निझामशहीत बांधला गेला. किल्ल्याच्या बांधकामांवर मात्र हिन्दू पद्धतीचे शिल्प कोरलेले आढळतात. इथल्या बांधकामाच्या खुणा शिलाहार राजवटीतल्या असल्याची काही पुरातत्व अभ्यसकांची धारणा आहे. भटकंतीसाठी माहुली आजही तितकाच दुर्घट आहे. 'कल्याण, सोपारा बंदरावरील मालाची वाहतूक दक्षिण व उत्तर भारत, तसेच मध्य आशिया पर्यंत खुष्कीच्या मार्गाने करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय व्यापार, उदीमास चालना देणार्या सातवाहन, शीलाहारांच्या राजवटीत मोक्याच्या व्यापार मार्गावर निसर्गत: बळकट संरक्षण लाभलेल्या माहुलीवर किल्ला बांधला जाणे स्वाभाविक गोष्ट ठरते', याबाबतचे पुरावे नसले तरी संकेतांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, शेवटी काळाच्या उदरात गडप झालेले पुरावे शोधले तर ते सापडतील, ते शोधणे हेच आपले कर्तव्य आहे. या किल्ल्यावर भटकंतीचा सर्वोत्तम हंगाम पावसाळ्यातलk. आम्हाला योग आला तो मार्च महिन्याच्या रखरखीत उन्हाळ्यात. किल्ले माहुलीवर केलेल्या रविवारीय भटकंतीचा वृत्तांत...
प्रत्यक्षात शहाजीराजे आणि शिवाजी महाराजांना जबर पराभवाचे तोंड दाखविणारा माहुली किल्ला सोळाव्या शतकात राजकीय उलथापालथींचे महत्वाचे ठिकाण ठरला होता.
या ब्लॉगमध्ये माहुलीच्या वाटेचे भौतिक वर्णन आणि दुसर्या भागात या परिसरात घडलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहाजी व शिवाजी महाराजांच्या काळातल्या राजकीय घडामोडींचा वेध घेण्यात आला आहे. त्यासाठी काही ऐतिहासिक साहित्य, लेख, व्याख्याने व दूरचित्रवाणी मालिकांचा आधार घेण्यात आला आहे. पर्यावरणच्या अंगाने माहुली जंगलपरिसरातील घडोमोडीचा वेध घेण्यात आला आहे...
३ मार्च २०१९
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर जवळचा माहुलीचा डोंगर लक्षवेधी ठरतो तो त्याच्या सुळक्यांमुळे. पावसाळ्यात या डोंगराला ढगांचा सतत वेढा असतो, महामार्गावरून जाता येता हा नजारा कधीच चुकू नये असे वाटते. ढगांनी वेढलेली माहुलीची शिखरे नी त्यातून उंच मान करून डोकावणारे सुळके म्हणजे मोठे मनोहारी दृष्य असते.
जानेवारीचा महिना सरला की थंडीचा जोर ओसरू लागतो, ऊन्हाचे चटके उत्तरोत्तर वाढू लागतात. सह्याद्रीत भटकंती करण्यासाठी सगळ्यात जिकीरीचा हंगाम तोंडावर येण्याचा हा सुमार. मार्च महिन्याचा पूर्वार्ध म्हणजे उन्हाचा प्रकोप वाढण्याच्या आत जमेल तितकी सह्या भटकंती करून घ्यावी, 'मनामध्ये अपूरे राहिलेले बेत' उरकण्यचा हा काळ, त्यास अनुसरून सद्या अनेक ठिकाणी डोंगर भटकंतीच्या आणि दुर्गभेटीच्या योजना शिगेला पोहोचल्या असताना, '३ एप्रिल रविवारचा दिवस आहे, माहुलीला जायचे का?', हिमालयातील रूपीन पास ट्रेकसाठी सह्याद्रीत सरावाचे ट्रेक करणार्या नाशिकच्या ट्रेकसोल्स संस्थेच्या डॉ. पारस पणेरने आमंत्रण दिले. वेळेच्या दृष्टीने हा परवडणारा सौदा होता. आजवर आमच्यासाठी माहुली हे प्रकरण अक्षम्यपणे दुर्लक्षित राहिले होते. शहाजी राजांना हा गड इतका सुरक्षित का वाटायचा, या प्रश्नाचे ढग त्याला भेट दिल्या नंतर काहीसे दूर होऊ शकतील असा विचार करून माहुलीवर लगेच शिक्कामोर्तब करण्यात आले.
माहूलीच्या भटकंतीसाठी निघण्याच्या आदल्या रात्री अचानक आमच्या दोन्ही कन्या गार्गी व मैत्रेयी यांनी ट्रेकला येण्यात रस दाखवला. मैत्रेयीची नववीची वार्षिक परिक्षा अगदी तोंडावर असताना आणि गार्गीची अकरावीची रितसर सुरू असतानाही सौभाग्यवती नम्रताने दोघींनाही ट्रेकची परवानगी दिली? हे मात्र माझ्यासाठी एक कोडेच आहे. पहाटे ४-०० वाजता प्रस्थान करायचे आहे, तेव्हा दुपारच्या जेवणासाठीची भाजी-पोळी रात्रीच बनवून देतेस का? अशी नम्रताला विचारणा केली. तिने वांगे-बटाट्याची सुकी भाजी, पोळ्या, हिरव्या मिरचीचा ठेचा रात्री दिड वाजता बनवून ठेवला. इलेक्ट्रॉल पावडरची तीन पाकिटे, गुळ शेंगदाण्याच्या चिक्क्या, प्रत्येकी ३ लिटर पाणी, बाटल्या असा जामानिमा प्रत्येकाच्या पाठपिशव्यात भरून आम्ही, किल्ले माहुलीसाठी सज्ज झालो. गार्गी, मैत्रेयी सोबत सद्या आमच्याकडेच शिक्षणासाठी राहणारी नम्रताची भाची रिमा ही तिच्या ऑप्थेलमोच्या सवंगड्यांना घेऊन ट्रेकमध्ये सामिल झाली. यातील एक मुलगी आणि तिन मुले असे चार जण प्रथमच भटकंतीवर येत होते.
पहाटे अडीच वाजता मोबाईल फोनच्या घंटीने जाग आणली. सगळ्यांना उठवून यथावकाश तयारी करत आमचे आणखी एक सवंगडी डॉ. संजय गुंजाळ यांना घेऊन पारस पणेरांचे घर गाठले. सव्वा चारच्या सुमारास आमचे शहापूरकडे प्रस्थान झाले. गार्गी-मैत्रेयी-रिमा व त्यांचे सवंगडी एका कारने मागून निघाले तर तिकडे मुंबईवरून शैलेश राव, भागवत उगले, डॉ. प्रसन्ना महाजन व त्यांचा मुलगा मलय हे आम्हाला शहापूर जवळ येऊन भेटणार होते.
नाशिक ते आसनगाव व तिथून माहुलीचा पायथा म्हणजे साधारण सव्वाशे किलो मिटरचा प्रवास. त्यासाठी घोटीजवळ १२० रूपये पथकर बसला. पथकर आकारणीमुळे हा महामार्ग वाहनाने प्रवास करण्याच्या दृष्टीने फारच सोयीचा झाला आहे, अन्यथा वीस बावीस वर्षांपूर्वीचे दिवस आठवतात. तेव्हा मुंबईच्या दिशेचा असो की आग्र्याच्या दिशेचा, प्रवासाचा प्रत्येक मिटर जणू खड्यांनी भरलेला असायचा, वाहन चालकांची मोठी कसोटी त्यावर लागे. तसे काही आता घडत नाही, तरी देखिल नविन गाडी खरेदी करतेवेळी भरमसाठ रस्ता कर आकारला जातोच, असे असतानाही प्रत्येक प्रवासाच्या वेळी वेगळा पथकर म्हणजे एक न उलगडणारे कोडेच आहे. त्यातही तुमच्या शहर किंवा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातली भटकंती असेल तर पथकराची खिशाला मोठी चाट बसते. जवळच्या अंतरासाठी कमी पथकराचा एखादा पर्याय असायला हवा होता.
माहुली गावात जाण्यासाठी महामार्ग नेमका कोणत्या ठिकाणहून सोडायचा हे बघण्यासाठी आमची एक गाडी आसनगाव जवळ रस्त्याखालून जाणार्या मार्गाजवळ उभी ठाकली. मिट्ट काळोखात हे वळण चटकन लक्षात येण्यासारखे नाही. नाशिक आणि मुंबई अशा दोन्ही बाजूंनी एक एक वाहन आमच्यात सामिल होणार असल्याने त्या गाड्यांची वाट बघण्यात अर्धा तास गेला पण त्याने, 'गाड्यांची चुकामुक होणार नाही', हे निश्चीत झाले.
नाशिकहून येताना आम्हाला आसनगावहून माहुलीकडे जाण्यासाठी उजवूकडून वळण घ्यावे लागते. महामागार्वरची भर्धाव वाहने समोरून येतात त्यामुळे हे वळण अडचणीचे व खासे धोकादायक ठरते. त्या ऐवजी आसनगाव पुलाच्या पुढे डावीकडे वळण घेऊन महामार्गा खालच्या भूमिगत रस्त्याने जाणे सोपे व सुरक्षित ठरते, पुढे नेलेल्या गाडी मुळे ते साध्य झाले.
नाशिकची गाडी आम्हाला येऊन मिळाली तेव्हा तांबडं फुटलं होतं. औद्योगिक कारखान्यातून जाणार्या रस्त्यावर ठिकठिकाणी मानस मंदिराच्या पाट्या दिसतात. मानस मंदिराकडे जाणारा रस्ता उजवीकडे ठेऊन समोरची वाट माहुलीत घेऊन जाते. इथून आपण दाट झाडी झाडोर्याच्या ठिकाणात जात असल्याची चाहुल लागते. माहूलीत पोहेचेपर्यंत मुंबईकर भटकेही येऊन दाखल झाले. आज आमचा वाटाड्या होता कृष्णा आगिवले यांचा मुलगा रघुनाथ.
महामार्गावर इतक्या सकाळी चांगला नाष्ता मिळण्याची शक्यता नाही, त्यापेक्षा स्थानिकांकडे ताजा नाष्ता मिळेल असा विचार करून आम्ही आसनगाव जवळ थांबलो असतानाच आगिवलेंनाच चहा नाष्ता बनवण्यासाठी फोनवरून कळविले, त्यांनी आम्ही पोहोचे पर्यंत पोहे बनवून ठेवले. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकलेले गरमागरम पोहे मनसोक्त मिळाल्याने अंगात तरतरी आली.
सकाळी ७-३६:
वनखात्याच्या तपासणी कार्यालयाजवळ पोहोचलो. तिथेच आमच्या गाड्या उभ्या करण्यास जागा मिळाली. प्रत्येकी २० रूपये या दराने आम्ही तिकीट घेतले. प्रथमच ट्रेकवर येत असलेल्या आमच्यातल्या एकाने पुढे होऊन तिकीटे घेतली. '१३ जणांचे २६०/- रूपये होतात खरे, तुम्ही अडीचशेच द्या', असे त्याला सांगण्यात आले. पावती घेऊन अजिबात न घुटमळता आम्ही गडाच्या वाटेला लागलो. या ठिकाणी वनविभागाने एक स्वच्छता गृह बनवले आहे, त्याला उजवीकडे ठेऊन गडाकडे जाणारी वाट आहे.
थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला पावती दोनशेचीच मिळाली हे लक्षात आले. काश्मीरात पुलवामा येथे ४० भारतीय जवानांची दहशतवाद्यांनी हत्या केल्याने प्रतिउत्तरादाखल भारतीय सैन्यदलाने थेट पाकिस्तानात घुसून अतिरेकी तळ उधवस्त केले. या घटनेला पंधरवडा उलटत आला होता, तेव्हा पासून भारतात राष्ट्रभावना अधिकच तिव्र बनली. त्यावरून संपूर्ण देशात सद्या देशसेवेचे वारे वाहत आहेत. 'तुम्ही बहुतांशी जण सीमेवर लढायला जाऊ शकत नाही, तथापी इमानदारीने वागा, कायद्याचा सन्मान करा, फार काय, नुसता कचरा जरी इस्तता पसरवला नाही तरी ती देशसेवाच ठरेल', काश्मीरात पाकिस्तान व दहशतवाद विरोधी कारवाई दरम्यान हेलिकॉप्टर विमानाच्या अपघातात वीरमरण आलेल्या नाशिकच्या विजय मांडवगणे यांच्या पत्नी विजेता यांची प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली प्रतिक्रीया आणि एकुणच देशभरात राष्ट्रभावनचे विचार बळकट होत असताना चिरीमिरीचा प्रकार बघून 'त्या खाकी वर्दीची' किव वाटली.
भारंगीचे उगम
माहुली किल्ल्यावर भारंगी नदीचा उगम होतो. ही नदी पूर्व दिशेला वाहते, भातसई नदीची ती उपनदी आहे. भातसई नदी ही ठाणे जिल्ह्यातील महत्वाची नदी आहे. हिला भातसा असेही म्हणतात. या नदीचा उगम कसारा घाटात घाटनदेवी, उंटदरी येथे होतो. भातसा नदीला चोरणा नदी, भारंगी नदी भुमरी नदी आणि कुंभेरी नदी या उपनद्या येऊन मिळतात. त्यांतल्या चोरणा आणि भातसा या नद्यांच्या संगमावर बांधलेल्या धरणाला भातसा धरण म्हणतात. ह्या धरणातून मुंबईला पाणी पुरवठा होतो आणि वीज निर्मितीही होते. पुढे ही नदी आंबिवली येथे काळू नदीला येऊन मिळते.
भारंगी नदीवर पूर्व बाजूला माहुलीचा प्रसिद्ध धबधबा आहे. पावसाळ्यात पर्यटकांना माहुली परिसराची भूरळ पडते. अनेकजण या धबधब्याला भेट देतात. गेल्या काही वर्षात या धबधब्यावर अनेक जण बुडून मरण पावलेत, त्यामुळे पावसाळ्यात माहुली धबधब्याकडे जाण्याच्या वाटा जिल्हा प्रशासनाच्या वतिने बंद करण्यात येतात. या धबधब्यात मृत्यू पावलेल्या माणसांचा आकडे पन्नासाच्या घरात पोहोचल्याची माहिती स्थानिकांसोबत केलेल्या चर्चोतून मिळाली.
आजच्या भटकंतीत काही नवोदित मंडळी सहभागी झाली होती, त्यामुळे डॉ. प्रसन्ना महाजन यांनी त्यांना भटकंतीचे मुलभूत तत्व समजावून, संघभावना, एकमेकांस मदत, जंगलातल्या वृक्ष, वेली व तमाम वन्यजीव संपदेला कुठलीच बाधा पोहोचणार नाही या विषयी काळजी घेण्याच्या सूचना केल्या. या जंगलात चुकामुक होऊ शकते, त्यामुळे जास्त मागे राहू नका, पाने फुले तोडू नका, सोबत आणलेल्या कुठल्याच वस्तू किंवा खाण्याच्या पदार्थांची वेष्टने, रिकामी पाकिटे कुठेही न टाकता सोबतच्या पिशवितच टाका, अधून मधून थोडे थोडे पाणी पीत रहा, अशा काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या. ७:४३ वाजता आमची चढाई सुरू झाली.
तानसा अभयारण्य
हा सगळा परिसर तानसा अभयारण्याचा भाग आहे, त्यामुळे येथे झाडे उत्तम प्रकारे राखली गेली आहेत. मार्चची सुरूवात असली तरी डोंगर पायथ्याला झाडांच्या पानांची गळ झाल्याने अवघे जंगल वाळलेल्या पाला पोचोळ्याने आच्छादित झाले आहे. सागाची मोठमोठी पाने, त्यातून चालताना होणारा करऽऽ करऽऽ आवाज, सकाळची कोवळी उन्ह, झाडांमधून येणारी सूर्य किरणांची तिरीप, त्यात ही पानझड आपल्याला जंगलाच्या वेगळ्या दुनियेत घेऊन जाते.
जस जसे आपण वर जाऊ तसतसे पानांची प्रकार, आकार व रंग बदलतात. मधल्या टप्प्यावर हाताच्या पंजापेक्षा मोठ्या लांबीची पाने त्यांना फिकट निळसर व लालसर छटा. चालताना अपघ्यात त्यांच्याकडे लक्ष गेले तर चमकदार संमिश्र रंगांची जादू मोहून टाकते; त्यावरून परावर्तीत होणारा प्रकाश म्हणजे जिवंत नक्षीचा हा खेळ थांबून थांबून बघण्यात मन हरखून जाते. मग अचानक जाणीव होते, उन्ह वाढणार, सतत चढण आहे, थांबायचे नाही, पाय उचलत रहायचे...पाय उचलत रहायचे!
येथे गवतही उत्तम राखले गेले आहे. याचाच अर्थ किमान या टप्प्यात तरी चराईची जनावरे नाहीत, त्यामुळेच गवताच्या आश्रयाने उमलणार्या जीवसृष्टीचे अधून मधून दर्शन घडते.
आता आठ वाजले होते, पण उन्हाचा चटका स्पष्टपणे जाणवत होता. तोच समोरच्या नवरा, नवरी, भटोबा, करंगळी या सुळक्यांचे समोरासमोर दर्शन घडले. दाट झाडीतून थोडे बाहेर पडून समोरच्या डोंगरांचे आता स्पष्ट दर्शन होत होते. 'मध्यभागी आहे तो माहुलीचा किल्ला, त्याच्या डाव्या बाजुला भांडारदूर्ग आणि उजव्या बाजुला पळसगड, आगिवलेंनी माहिती दिली. 'म्हणजे सगळे सुळके हे भांडारदूर्गावर आहेत तर', या प्रश्नावर आगिवलेंनी सांगितले की, खरे तर तो भांडारदूर्गाचाच भाग गणला जातो पण तो आहे चंदेरीचा डोंगर. त्यावर जाण्यासाठी भांडारदूर्गावरून वाट नाही. त्याची वाट पूर्णपणे वेगळी आहे. चंदेरीवर कातळातील बांधकामे,पाण्याची पुरातन टाकी आहेत का? यावर रघुनाथने, असे कोणतेही अवशेष वर नाहीत', असे स्पष्ट केले. आजवर माझा असा समज होता की, माहुली हा तिन किल्ल्यांचा समुह आहे, या तिन किल्ल्यांचे डोंगरमाथे पुर्णपणे वेगळे आहेत आणि याला जोडूनच चौथा डोंगर तो चंदेरी...माहुलीचा किल्ला म्हणजे एक प्रकारे चार डोकीच!
वणवा: सह्याद्रीत सद्या उन्हाळ्यात सर्वत्र दिसणारे भयचित्र. |
माहुलच्या जंगलात वणव्याच्या आगीत बेचिराख झालेला वृक्ष... |
माहुलीच्या जंगलात अनेक रानकेळी आहेत...वणव्याने ती अक्षरश: होरपळून काढली... |
वणव्यात वृक्षांसोबत कित्येक किटक, पक्षी, त्यांची घरटी, अंडी, झाडे, वेली नष्ट झाली असतील याचा सुमार नाही... |
वणव्याच्या खुणा
वीस बावीस मिनीटांच्या चालीनंतर थोडी सपाटी लागते, इथून एक चिंचोळीवाट माहुलीच्या डोंगराला भिडते. या ठिकाणी सह्याद्रीतले काळीज चर्रर करणारे दृष्य बघायला मिळाले - वणवा! संरक्षित जंगलातही वणवा लावण्याची बुद्धी कुठला आसूरी आनंद मिळवून देत असावी? हे न कळे! उजव्या बाजुच्या जंगलात गवताचा सगळा पट्टा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे बघायला मिळाले. किल्ल्यावर जाणार्या लोकांची या वाटेवरून अखंड ये जा सूरू असते, त्यामुळे डावीकडचे गवत सुरक्षित ठेवण्यासाठी या वाटेनेच आगपट्ट्याचे काम केले. गवतासोबतच अनेक वृक्षांचा कोळसा झालेला बघायला मिळाला. यात पक्षांची घरटी, कित्येक किटक, त्यांची अंडी, झाडे व गवताच्या बिया जळून नष्ट झाल्या असतील त्याचा सुमार नाही.
उन्हाची काहिली जाणवू लागल्याने चाल तशी बेताचीच होती. पंधरा मिनीटे चालल्यानंतर पुन्हा सुटे दगड रचलेल्या पायर्या लागल्या. या सुट्ट्या दगडात काही घडवलेले जुने बांधकामाचे दगड दिसत होते. अर्थातच हे दगड पायर्यांचे नसुन, 'किल्ल्यावरच्याच कुठल्या तरी बांधकामाचे असावे', हे जाणवत होते.
८:२१
डोंगर दरीचे दृष्य बघण्यासाठी महामार्गावर किंवा पर्यटन स्थळी डोंगराच्या काठाला लोखंडी पाईपचे रेलिंग लाऊन एक प्रकारचे सुरक्षित क्षेत्र केले जाते तसा हा टप्पा. येथे पाण्याचा पहिला अवकाश घेतला. येथून पुढची वाट पुन्हा उजवीकडून वर नेते. माहुलीचा डोंगर अजूनही समोरच्या बाजुला दिसत होता, म्हणजे अजून बरीच पायपीट करावी लागणार होती. याठिकाणीही वणव्याच्या आणखी खुणा दिसत होत्या. रानकेळीचे बुंधेच्या बुंधे या वणव्याने जाळून टाकले होते. काही बुंध्यात अजूनही जीव असल्याने पावसाळ्यात ते पुन्हा जीव धरतील असा आशावाद रघुनाथने व्यक्त केला तेव्हा जरा हायसे वाटले.
मोबाईल फोनमध्ये ८:३३ वाजले होते आणि समोर एक मोठा आठवा खडक दिसत होता. त्याला डाव्या बाजुने वळसा घालून वर जायचे होते. इथून थोड्या उभ्या चढणीने वर गेल्यानंतर दक्षिण बाजुच्या दरीच्या दृष्याने स्तब्ध केले. लहान मोठ्या टेकड्या नी डोंगर सगळ्यांना धुक्याने वेढले होते व त्यातून त्यांचे माथे डोकावत होते. उन्हाची रखरख, निष्पर्ण झाडींचे जंगल तेव्हा वातावरणात धुंदपणा निर्माण करणारे धुके कुठून येणार? पण आज भर ऊन्हातही धुके दिसत होते, तेही फक्त आग्नेय बाजुच्या काही डोंगर टेकड्यांवर. या अनेक टेकड्यांच्या समुहाच्या पायथ्याला एकाच वेळी अनेक ठिकाणी शेतजमिन भाजण्यासाठी पाला, पाचोळा गवत तर जाळले नसेल ना? अशी शंका वाटली. पण हे धुकेच असावे, असे वाटले. महाशिवरात्रीला कडाक्यांची थंडी पडते. काही वेळेला सूर्य वर आल्यावर सुद्धा थंडीचा कडाका वाढल्याचे यापूर्वी अनेकदा अनूभवला आहे, तसाच हा प्रकार असावा, त्यामुळेच धुके तयार झाले असावे.
संरक्षक कठडे
डोंगराची धार आता काहीशी उभी होत होती व या ठिकाणी सुरक्षेसाठी लोखंडी कठडे बसविल्याचे बघायला मिळाले. या ठिकाणहून चंदेरीचे सुळके आणखी जवळ भासत होते. या वाटेवर रस्त्याच्या मधोमध उभे असलेल्या एका मोठ्या वृक्षाची कटाई करण्यात आल्याचे बघायला मिळाले. आता धार अधिक वर चढत जाऊन माहुलीच्या डोंगराला भिडते. दोन्ही बाजुला दरी आणि मधून निसरडी, चिंचोळी दगडावरची ही वाट फार बिकट नसली तरी चालून येणारा शत्रु थोपविण्यासाठी खाशी उपयोगाची. त्याच्या थोडं पुढे पुन्हा ही वाट माहुलीला भिडणार्या धारेच्या पोटातून डावीकडून सरकते. येथे दरीच्या बाजुचा उतार तिव्र होतो. उजवीकडे नव्वदच्या अंशात वळण घेऊन एका खुप लहानशा खिंडीतून ही वाट पश्चिमेकडे जाते, हे ठिकाणही युद्धाच्या प्रसंगात गडावर चालू येणार्यांसाठी मोठी तापदायक ठरणार हे नक्की. येथून पळसगड बरोबर उजवीकडे राहतो, त्याची दक्षिण बाजू ही नाखिंदा किंवा नागेश्वरच्या डोंगराच्या कातळाला जसा गवताच्या साज दिसतो त्या प्रभाणे भासते.
गलोलीच्या आकाराच्या या लहानशा खिंडीतून पूर्व बाजूला एक छोटी धार टेहाळणीसाठी खाशी उपयोगाची शिवाय त्याधारेच्या वरून खालच्या बाजुने चालून येणार्या गनिमांवर मारा करण्यासाठी अगदी योग्य. माहुलीच्या डोंगराला जोडणारी डोंगरधार आता खुपच चिंचोळी होते व तिच्या दोन्ही बाजुला तिव्र उताराच्या दरीने ती खुपच दुर्घट बनते. या ठिकाणी लोखंडी रेलींग बसविल्याने जणू पुलावरून चालल्याचा आभास होतो. दाट धुके आणि कमी दृष्यमानता असताना येथून जाणार्यांना सुरक्षा मिळावी यासाठी हा भाग सुरक्षित केला असावा.
आता समोर माहुलीची तटबंदी दृष्टीपथात आली. नागमोडी वळणाच्या या वाटेवर चार ठिकाणी कातळटप्पे आहेत. युद्दकाळात ते ओलांडून पुढे जाणे म्हणजे कर्मकठिण ठरत असावेत. हा भाग तोफांच्या मार्यात येऊ शकत नाही व येथे जवळ पास तोफा आणण्यासाठी जागा नाही, त्यामुळे फार कमी संख्या असलेले सैनिक या वाटा लढवून किल्ल्याचे रक्षण करू शकतात अशी निसर्गत: स्थिती.
९:४५
पावणे दोन तासांच्या पायपीटींनंतर एकदाचे आम्ही माहुली किल्ल्याच्या अंतिम टप्प्याजवळ येऊन दाखल झालो. एका झाडाखाली थोडी विश्रांती घेतल्यानंतर वरचा पंधरा एक फुटाचा कातळ टप्पा पार केला. याभागातला दगड अगदी भुसभूशीत असून चिंचोळ्या वाटा वालूकामय आहे. उन्हाळ्यात त्याने मोठा घसारा तयार होतो.
लोखंडी शिडी
दगडी तटबंदीला लोखंडी शिडी लावली आहे. हा कातळ टप्पा उभी चढणीचा, त्याच्या वरच्या भागात लोखंडी शिडी, ती नसती तरी हाता पायांनी काही सोपे आधार घेत वर जाणे फार अवघड नव्हते. अगदी सत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकालाही येथून वर चढता येऊ शकले असते. थोडक्यात काय तर शिडी लाऊन चढाईचे थोडे फार आव्हान सुद्धा शिल्लक ठेवण्यात आलेले नाही.
सह्याद्रीतल्या डोंगराचे गडपण दाखवतात ते कातळातल्या पायर्या, तटबंद्या नी दरवाजे. येथे भली मोठ तटबंदी, 'माहूलीवर तुमचे स्वागत आहे', असे सांगत होती. या तटबंदीच्या उजव्या भागाला एकावर एक ठेवावे असा भलामोठा कातळकडे पुढे आला आहे, जणू निसर्गाने गडाच्या रक्षणासाठी बांधलेला उभा बुरूजच. त्यावर भगवा झेंडा डौलाने फडकत होता. या तटावरून आणखी एक छोटी चढण पार केली, आता माहुलीच्या वरच्या सपाटीला लागलो. बारीक बुंध्यांच्या कमी उंचीच्या झाडांचे जंगल याठिकाणी भर उन्हात जणू आमच्या स्वागताला हिरवा साज चढवून सज्ज होते. इथून पूर्व बाजूली बघितल्यानंतर समजते माहुलीचा किल्ला इतका दुर्गम का होता ते. ठाणे जिल्ह्यातला सर्वाधिक उंचीचा हा डोंगर चहुबाजुंनी उभ्या कातळकड्यांनी निसर्गता संरक्षित आहे. अनेक चढ असलेली, तीन ठिकाणी वळण घेणारी, वरच्या बाजुला पातळ झालेली डोंगरधारेची वाट पूर्व बाजूने मुख्य डोंगराला जोडते. चाल करून येणार्या शत्रुला यथे थोपवले तरी गड राखला जाऊ शकतो.
माथ्यावर मुख्य सपाटीला लागल्यावर सर्वत्र खुरटे, लहान झाडांचे हरित जंगल लागते. हे जंगल म्हणजे एक भुलभलैय्या. त्याच्या पायवाटा खडबडीत दगडाच्या. पर्यटक वाट चूकू नये यासाठी काही ठिकाणी लहान गोलसर सुट्ट्या दगडांच्या रेघा तयार करण्यात आल्या आहेत, त्यामुळे मुळ वाट सोडून भरकटण्याची चिंता राहत नाही.
माहुलीवर पाण्याचे दुभिक्ष आहे...वरच्या पठारावर हे एकमात्र कोतळखोदीव टाके स्वच्छ करून पिण्यायोग्य राखणे...त्यात जरा सुद्धा घाण होणार नाही याची काळजी घेण्या इतकी शूचिता आपल्या पर्यटकात केव्हा येईल... |
एका नागमोडी वळणानंतर थोड्या उतारावर डाव्यू बाजूला कातळात खोदलेले पाण्याचे टाके लागते, यातले पाणी खुपच गढूळ आहे. या टाक्यातला गाळ अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय काळजीपूर्वक रित्या काढून त्यात काही पुरातत्वीय अवशेष, बांगड्या, कौल, जुन्या विटशंचे अवशेष नष्ट होणार नाहीत या बेताने काढला आणि त्यावर शाकारणी केली तर गड भेटीसाठी येणार्यांना पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय होऊ शकेल. येथून पुढे वाय आकाराची वाट लागते, म्हणजे आपण पूर्व बाजूने येतो तेव्हा उजवी वाट महादरवाजाकडे घेऊन जाते तर डावी वाट ही भांडारदूर्गाकडे घेऊन जाते. आम्ही अगोदर डाव्या बाजूने पुढे निघालो म्हणजे शक्य तितकी गड फेरी करता येऊ शकते या विचाराने.
वरचा सगळा परिसर विस्तीर्ण असला तरी तिथे मोठी सपाटी कुठेच आढळली नाही. पाळीव प्राण्यांच्या खुणा आढळल्या नाहीत. याचा अर्थ डोंगर माथ्यावर पाळीव जनावर आणण्याकरिता सोयीच्या वाटा नाहीत, इतकी या डोंगराची दुर्गमता आहे. दक्षिण बाजुला वळसा घेणार्या वाटेवर दोन सतीशिळा दृष्टीस पडतात, त्या कोणाच्या आहेत या संबीधी माहिती मिळत नाही. त्याच्या थोडं पुढे दगडचा एक लहान चौथरा असून त्यावर एखाद्या स्तंभा सारखा मध्यम उंचीचा चौकोनी चिरा आहे. त्यावर चिन्ह किंवा अक्षरे कोरल्याचे दिसत नाही.
राजसदर: येथे शहाजी राजे, जिजाबाई, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी वास्तव्य केलेयं. |
राजसदर
सहा सात फुटाच्या दाटीवाटीच्या कारवीतून आपली वाट जाऊन पोहोचते ती थेट राजसदरेवर. तीस फुट लांब व रूंद अशा घडवलेल्या कातळ चिर्यांचे ऐसपैस उंचीचे जोते शिल्लक असून त्यावर दक्षिण बाजुला मंदिरा सारखे काही तरी रचून ठेवले आहे. मुळ इमारतीचा केवळ चौथराच शिल्लक असून त्याच्या भिंती, छत, दालनांचे कोणतेही दगड येथे दिसून आले नाही. एका फ्लेक्सच्या फलकावर, पुण्य राजसदर, शहाजी राजे, जिजाऊ, शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण', अशी अक्षरे त्यावर छापली आहेत. राजसदरेच्या पलिकडे आणखी काही जुन्या बांधकामाचे चौथरे दिसतेत. हा परिसर दाट झुडपांचा असून इथल्या पायवाटा चिंचोळ्या व दगड मातीच्या आहेत. गडावर पर्यटकांचा सतत राबता असल्याने त्या खाशा मळल्या आहेत.
राजसदरेपासून अवघ्य काही मिनीटावर भग्न दशेतले मंदिर आहे. या मंदिराच्या तीन भिंती काहीशा टिकून आहेत, समोरची बाजू पुर्ण मोकळी आहे. येथे शिवलिंग असून तेही भग्न स्थितीत आहे. इतर काही मुर्त्या व चिन्ह कोरलेली आहेत. एक चौकोनी शिळा ज्यावर धनुष्य व बाण कोरला असून ती वीरांच्या स्मरर्णार्थ तयार केल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या मधोमध एक मोठे झाड उगवले आहे व भिंतींना गिलावा दिलेला आहे. काही सतीशिळेचे अवशेष येथे ठेवण्यात आले आहेत, जे अर्थातच अन्य कुठून तरी उचलून येथे ठेवण्यात आल्याचे जाणवते. या मंदिराचा एकुण आब पाहता हीच गडाची प्रमुख देवता असावी असे दिसते. या देवास कोणत्या नावाने ओळखले जाते याची माहिती मिळू शकली नाही.
मंदिराच्या समोर भला मोठा तलाव आहे. तो मात्र दगड व गाळाने काठोकाठ भरला असून त्याच्या बाजुच्या भिंती चिर्यांनी घडवलेल्या असाव्यात असे वाटते. तलावात फार थोडे पाणी पावसाळ्यात शिल्लक राहत असावे.
हनुमान दरवाजा
तलावाच्या दक्षिण बाजेने पुढे गेल्यानंतर एक मातीची लहान टेकडी आहे. ती चढून गेल्यानंतर त्यावरून डोंगरमाथ्यावरचा मोठा परिसर दृष्टीस पडतो. आम्हाला येथुन हिरवेगर्द जंगल दिसत होते. मागून येणारी काही मंडळी वाट भरकटल्याचे दिसतात आम्ही त्यांना आवाज देऊन दिशादर्शन केले, तेव्हा कुठे ते आमच्या दिशेने येऊन पोहोचले.
हनूमान दरवाजावरची वैशिष्ट्यपूर्ण शिल्प |
इथून पूर्व बाजुला पाच दहा मिनीटाच्या चालीनंतर हनूमान दरवाजा लागतो. हनूमान दरवाजाच्या वरच्या बाजुला तटाचे भग्नावशेष असून हनुमान दरवाजा उतरण्याची वाट खुप निसरडी व धोकादायक आहे. या ठिकाणी फार काळजीपूर्वक उतरावे लागते. खालच्या बाजूला उजव्या कड्यावर हनूमान व त्याच्या शेजारी आणखी एक मुर्ती ठाशीवपणे कोरली आहे. हनूमानाच्या हातात छोटी तलवार असून हनूमानाला मिशी दाखविली आहे व गळ्यात एक पानाचे पदकही कोरले आहे. पायाच्या खाली राक्षस कोरला असून डाव्या बाजुला आणखी चार हात असलेला व वरहासारखे शिर असलेला प्राणी कोरला आहे. याच्या गळ्यातही हनूमानाच्या मुर्तीसारखेच पदक कोरण्यात आले आहे. येथे एक गणपती दगडात कोरण्यात आल्याचे माझ्या वाचनात आले होते, परंतू येथे गणपती काही दिसला नाही.
हनूमान दरवाजाचा पूर्ण विध्वंस करण्यात आला आहे. याच्या पायर्या व प्रवेशद्वार याच्या खुणा पुसटशा... |
समोरचा डोंगर भांडारदूर्ग... |
हनूमान दरवाजाच्या खालच्या बाजूला दोन लोखंडी शिड्या आहेत. या शिड्या आर्थातच आजच्या काळातल्या असून त्या उभ्या करून ठेवण्याचे प्रयाजेन काही कळू शकले नाही. पर्यटकांसाठी या शिड्यांनी वर येण्याची सोय केली असेल तर वरचा तिव्र घसारा पाहता ते धोकादायक आहे. नवख्या मंडळींसाठी तर अजिबात सुरक्षित नाही. येथे दरवाजाच्या कमानीचे कोणतेही अवशेष दिसत नाहीत. कातळ पायर्याही पूर्णपत: उधवस्त करण्यात आल्या असाव्यात, त्यांचे कोणते नामोनिशाण दिसत नाही. आल्या वाटेने परत जाऊन दक्षिण दिशेला लागायचे पंधरा मिनीटातच आपण माहिलीच्या दक्षिण टोकाला येऊन पोहोचतो.
भांडारदूर्ग
एक लहानशी खोगिरवाजा खिंड माहुली आणि भांडारदूर्ग या किल्ल्यांना वेगळी करते. उजव्या बाजूने एक सोप्या उताराची वाट खिंडीत घेऊन जाते. या खिंडीत येण्यासाठी दोन्ही बाजूंनी वाटा असाव्यात. कातळाच्या धारेतून चाळीस एक फुटांची सोपी चढण चढून गेल्यानंतर आपण भांडारदूर्गावर पोहोचतो. कातळात हात व पायांसाठी अनेक सोपे नैसर्गिक आधार आहेत तर वरच्या बाजुला कातळात पायर्या खोदल्या आहेत. कोणत्याही आरोहण साहित्याशिवाय हा टप्पा सहजपणा पार केला जाऊ शकत असे. येथेही लोखंडाच्या दोन शिड्या लावल्या आहेत. इथून दक्षिण दिशेकडे पाच मिनीटांच्या अंतरावर माहुली किल्ल्याचे सगळ्यांत सुंदर आकर्षण बघायल मिळते, कल्याण दरवाजा!
कल्याण दरवाजा
हा कल्याण दरवाजा म्हणजे माहुली किल्ल्याची दुर्गम, दुर्घट ओळख. सरळसोट उभ्या कातळात खोदलेल्या पायर्या व त्यावर कमानाकार कल्याण दरवाजा. या पायर्या अर्थात इंग्रजांनी गडांच्या आश्रयाने बळावत चाललेला भारतीय स्वातंत्र्यसंग्राम चिरडून टाकण्यासाठी सुरुंग, तोफा लाऊन उधवस्त केलेल्या या पायर्या वरच्या भागात खड्या चढणीच्या असून त्याच्या वर आणखी एक कमानी दरवाजा आहे. या कल्याण दरवाजातून वर येण्यासाठी पलिकडच्या वांद्रे वस्तीतून किंवा भोरांडे वस्तीतून जाता येते. हा परिसर भिवंडी तालूक्यात मोडतो. येथून वैतरणा धरणातून मुंबई व परिसरालापाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जाते.
खालच्या ध्वस्त कातळ पायर्या व जिन्यातून वर आल्यानंतर पुन्हा उभ्या चढणीच्या पायर्या असून त्याच्या वरच्या टप्प्यात त्या ध्वस्त करण्यात आल्याने तिथेही आरोहण साहित्याची आवश्यकता भासते. तेथे सद्या एक मोठी बल्ली व दोर बांधण्यात आला असून पुरेसा आत्मविश्वास असेल तर त्यावरून वर येण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
हा वरचा दरवाजाही ध्वस्त स्थितीत आहे, तथापी थोडी जोखिम पत्कारून भांडारदूर्गावरून त्यात विनाआरोहण साहित्य जाता येते. कातळ चिर्यांच्या चौकोनी प्रवेश मार्गाने या दरवाजातून उतरता येते. वरच्या टप्प्यातला भाग उधवस्त करण्यात आला आहे व त्याच्या वर काही कातळातल्या पायर्या आहेत. येथे एक पुसटशा स्थितीतला देवनागरीतला शिलेलेख आहे तो मात्र आम्हाला बघायला मिळाला नाही. कल्याण दरवाजाचा सगळा भाग अतिशय उताराचा व घसार्याचा असल्याने कल्याण दरवाजा हे जपून बघण्याचे प्रकरण आहे.
खांबटाके
कल्याण दरवाजा पासून दहा बारा मिनीटांच्या अंतरावर कातळाच्या पोटात खांबटाके आहे. या टाक्यातले पाणी काहीसे खराब असले तरी मुक्काम करायचा झाल्यास ते गाळून व उकळून पिण्यायोग्य बनविले जाऊ शकते. या खांबटाक्यात मात्र येथे भेट देणार्यांनी खुपच घाण करून ठेवली आहे. हल्ली कुठल्याच गडावरच्या पाण्याच्या टाक्याचा रखरखाव ठेवला जात नाही, तशाच पद्धतीने हे खांबटाके देखिल दुर्लक्षित राहिले आहे.
खांबटाक्यापासून दहा मिनीटाच्या अंतरावर भांडारदुर्गाच्या टोका पर्यंत जाता येते. येथून माहुली किल्ल्याचे प्रमुख आकर्षण असलेले सुळखे अगदी जवळून बघण्याचा रोमांच अनूभवता येतो. त्यात सुदूर दक्षिण बाजुला वझिर सुळका तर घळीच्या मध्ये भला मोठा घेर असलेला नवरा व खालच्या बाजुला भटोबा हे सुळके दृष्टीस पडता. या सुळक्यांच्या डोंगरांचे स्वतंत्र अस्वित्व मानले गेले असून त्यास चंदेरीचा डोंगर असे म्हणतात. या चंदेरीवर ऐतिहसिक बांधकामाच्या कोणत्याच खुणा नसून पाण्याची कोणतीच सोय नसल्याची माहिती रघुनाथ आगिवले याने दिली. चंदेरीचे राकट सौंदर्य व त्याच्या आसपासचे नयनरम्य सुळके मनसोक्त बघून ज्या शिड्यांनी आपण भांडारदूर्ग चढलो, त्या पुन्हा उतरून माहुलीवर यायचे. माहुलीच्या पुर्व बाजुच्या कड्याने सुरू झालेला आपला परतीचा प्रवास आता दक्षिण बाजुच्या कड्याने सुरू होतो.
गुढ इमारतीचे...
अर्ध्या तासाच्या चाली नंतर आपल्याला कातळातल्या बांधकामाचे अवशेष दृष्टीस पडता. हा किल्ला बराच काळ मुसलमानी राजवटीत असल्याची साक्ष हे अवशेष देतात, यास नमाजगिरा असे म्हणतात. आदिलशाही, मोगलाईत येथे नमाजपठण केले जात असावे.
सकाळी भरपेट नाष्ता झाला होता, परंतू आता दुपारचे सव्वा वाजत आला होते. सगळ्यांना चांगली भूक लागली होती. काहींच्या कडचे पाणी संपले होते. आता लवकर पाणी मिळावे, जेवणाला बसावे अशी सगळ्यांचीच इच्छा होती.
या ठिकाणहून पळसगडाच्या जंगलात एक भल्या मोठ्या इमारतीचे अवशेष दृष्टीस पडतात. स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार हलक्या सिमेंटच्या चादरींचा वापर करून येथे वन खात्याने विश्रामगृहाची इमारत तयार करून घेतली, तथापी त्याचा कोणताच रखरखाव नसल्याने ती निर्मनुष्य आहे. ही इमारत कोणत्या कारणासाठी बांधली होती, याची माहिती मिळू शकली नाही. जर पर्यटकांसाठी बांधली असेल तर इतक्या दुर्गम ठिकाणी पर्यटकांना कोणत्या सुविधा देण्याची योजना होती? पर्यटक म्हटले की, त्यांना सोयी सुविधा, खानपान आले, काही प्रमाणात नोकरचाकरांची गरज भासते. इतक्या अवघड किल्ल्यावर इतक्या दुर्गम ठिकाणी अशा प्रकारचा खटाटोप खरोखरच धाडसाचे काम ठरते. वनखात्याने तो खरोखरच केला असेल? यावर विश्वास बसत नाही. एकवेळ ट्रेकर/भटके माहुलीवर मुक्काम करू शकतात, परंतू इतक्या अवघड वाटेने येऊन येथे पर्यटक येऊन मुक्काम करू शकतात? जर ही इमारत अन्य कुठल्या कामासाठी तयार गेली असेल तर मात्र त्याचा रखरखाव ठेवला असता तर बरे झाले असते.
पेयजल दुषित
नमाजगिर्याहून पाचच मिनीटात माहुलीच्या दाट झाडीत लपलेला उत्तर गडा दृष्टीपथात आला. खालच्या उतारावर पर्यटक/भटक्यांची बर्यापैकी संख्या दिसत होती. कातळातली मोठी बांधकामे येथून दिसत होती. खाली उतरण्याची वाट कच्ची आहे. सुरूवातीलाच एक दगडाच्या चिर्यात साकारलेले चौकोनी टाके दिसत होते, त्यात पाण्याचा जिवंतच झरा असल्याने ते भरून वाहत होते. 'माहुली किल्ल्यावर पिण्यासाठी आजमितीला हे एकमात्र सुरक्षित असे टाके आहे', अशी माहिती रघुनाथने दिली. आपले कर्म म्हणजे, बरेच जण दोन अडीच तासांची पायपीट करून माहुली गडावर येतात, त्यांना ठाऊक असते की, पिण्यायोग्य असे हे पाण्याचे टाके आहे, तरी पण तो स्वच्छ ठेवावे अशी कोणतीच भावना नसलेली मंडळी ते स्वच्छ राहील याची कोणतीच खबरदारी घेत नाहीत. या टाक्यात काही लहान मासे आहेत, पाणीही वाहते आहे, पण त्यात बरेच दगड पडले असून पाणी गढूळ दिसते. आम्ही त्यातून दोन तिन बाटल्या भरल्या तोच एका पर्यटकाना पलिकडच्या बाजुला ठेवलेली प्लास्टिकची बादली टाक्यात तशीच बुडवली. या बादलीच्या तळाला बरीच माती लागली होती. सगळे पाणी ढवळून निघाले, महाशय मात्र स्वच्छंदपणे आपले चेहेरा धुण्यात मग्न झाले, जणू काही झालेच नाही अशा बेतात. आमच्या कडे फार इलाज नव्हता.
आमच्यापैकी तिघांकडे घरून आणलेल्या पाण्यापैकी प्रत्येकी एक लिटर पाणी अजून शिल्लक होते, तेव्हा खाली देवडीत उतरून जेवण करू आणि टाक्यातले पाणी स्थिर झाल्यावर त्यातून बाटली भरून घेऊ असे ठरवून आम्ही कातळातल्या प्रशास्त पायर्या उतरून देवडीत दाखल झालो. या देवडीचीही कर्मकहाणी आहेच. बरेच जण देवड्यात, पहारेक्यांच्या खोल्यांमध्ये जेवण करतात. तिथे अन्नकण तसेच राहते, ते तसेच टाकून दिले तर त्यावर माशा भिनभिनायला लागतात. या देवड्यात इतक्या माशा होत्या की, आमच्यातली काही मंडळी त्यात गेली तेव्हा या माशा उठल्या. दुरून मधमाशां उठल्या सारखे वाटत होते. त्या बाहेर गेल्यानंतर थोड्याच वेळात परिस्थिती स्थिरस्थावर झाली.
भोजन सत्रानंतर अर्धा तास विश्रांती गरजेचे होती. देवड्यात स्वच्छ जागा नसल्याने वर जाऊन झाडाखाली विश्रांती घेण्याचे ठरविण्यात आले. देवड्या व पहारेकर्यांच्या खोल्यांचा तळ खडबडीत दगडाचा असून त्यावर बरीच माती आहे. तिचा वापर करणार्या पर्यटकांनी त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष न पुरवल्याने त्या जेवणास व विश्रांतीसाठी थांबण्याच्या योग्यतेच्या नाहीत.
महादरवाजा
महाजरवाजाचा परिसर बघून परतीला लागण्याचा निर्णय ट्रेक प्रमुखाने जाहीर केला. देवड्याच्या पुढेच महादरवाजा आहे. एक भली मोठी कमान, वरचा भाग उध्वस्त अवस्थेत असे हे महादरवाजाचे रूप माहुलीच्या वैभवाची साक्ष देते. डोंगरकड्याचे अखंड कातळ फोडून महाकाय आकाराच्या पायर्या आणि दरवाजा कोरण्याचे तंत्रज्ञान अचंभित करणारे आहे. त्याकाळी बांधकामाचे शास्त्र केवढे प्रगत होते याची अनूभूती शेकडो वर्षे मजबुतीने उभे राहिलेल्या या वस्तू देतात.
महादरवाजा सोबतच आजूबाजेची तटबंदी उध्वस्त स्थितीत असून त्यांचे सगळे दगड महादरवाजाच्या समोर पडले आहेत. दोन विशाल गोलाकार बुरूजातून महादरवाजाकडे जाणारी वाट वळण घेते, त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या थेट मार्या पासून महादरवाजाचे आपोआप रक्षण होते.
गवसले शरभ शिल्प
सह्याद्रीचे रखवालदार यासंस्थेने शुक्रवार दिनांक२१ एप्रिल २०१७ रोजी माहुली गडाच्या संवर्धनाची मोहीम आयोजित केली होती. १५ जणांच्या चमुने महादरवाजाच्या बुरुजाखालील मातीच्या ढिगातली घाण साफ करून काही दगड हलवले तेव्हा मातीत गाडले गेलेले शरभाचे शिल्प त्यांना सापडले.
सह्याद्रीत अनेक डोंगरांवरच्या बांधकामात शरभाचे शिल्प आढळते. सिंहाचा चेहेरा, पंख, गरूडासारखे रूप जे काही ठिकाणी चीनच्या ड्रॅगन प्रमाणे भासते, या शरभाचे कोडे मात्र अद्याप उलगडलले नाही.
नजिकच्या काळात माहुलीवर गड उत्साव साजरा केला असावा. त्यावेळी लावलेल्या भगव्या पताका जिर्णावस्थेत असून फुलांच्या कोमेजलेल्या माळा उधवस्त तटावर व महादरवाजाचवर तशाच लटकत आहेत. कोणी तरी देव समजून शरभावर हळद उधळून टाकली होती.
घाण दरवाजा
या महादरवाजात खालच्या बाजूने वर येण्यासाठी कातळकोरीव वाट असावी, परंतू ती पुर्णपणे उधवस्थ असल्याने हा मार्ग बंद आहे. पलिकडच्या बाजुला मोठी तटबंदी आहे. तीस चाळीस फुट खोल असलेल्या या परिसरात पर्यटकांनी मोठा कचरा टाकला आहे. हा कचरा अशा ठिकाणी साठला आहे जो दरीत उतरून काढून आणणे अवघड आहे. शिवाय पावसाच्या पाण्या सोबत तो झर्यातून वाहत जाऊन उगमालाच पाणी दुषित करणार.
सकाळी आठच्या सुमारास सुरू झालेली पायपीट दोन वाजेपर्यंत तळपत्या उन्हात सुरू असल्याने जेवणानंतर अर्धातास विश्रांती घेण्यासाठी आम्ही स्वच्छ जागा शोधू लागलो. महादरवाजा आणि किल्लेदाराच्या वाड्याच्या परिसराती ती नसल्याने मग वरच्या टापूवर एका मोठ्या झाडाच्या सावलीत विसावा घेऊन ३-०० वाजता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. पळसगड बघायचा राहिला. पुढच्या भेटीत कल्याण दरवाजाने चढाईकरून पळसगड बघायचा या निर्धाराने माहुलीचा निरोप घेण्यात आला.
दुर्ग संवर्धनाच्या वाटा
तसे बघितले तर महादरवाजाच्या वाटाने एखादी भेट घडली तर? हा विचार मात्र साकार होईल असे वाटत नाही. महाराष्ट्रात आजची दुर्गसंवर्धनाची स्थिती पाहता हे अशक्यच वाटते. माहूलीच काय, आजमितीला अनेक गडांवरच्या प्रमुख वाटांच्या ढिगार्यात इतिहासाची काही पाने दडली आहेत, परंतू या वाटा मोकळ्या करणार कोण? गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी झुंजणार्या संस्थांच्या आवाक्यातले ते काम नाही आणि सरकारात ती मानसिकता नाही, ह्याच नव्हे कुठल्याच सरकारने ती आजवर दाखविली नाही.
आता रविवारचा दिवस निम्मा सरला होता, लवकर गड उतरून पाचच्या आत घरी पोहोचण्याचे उद्दीष्ट गाठण्यासारखे होते. त्यामुळे कुटुंबियांसोबत उरल्या सुरल्या रविवारच्या सुटीचे काही क्षण घालवता येणार होते.
आमच्यातले काही नेहमीचे भटके भराभर पावले टाकत पुढे निघाले. मुंबईकरांचा प्रवास थोडा अधिक अंतराचा असल्याने ही मंडळी आता फार कुठे न रेंगाळता वेगाने गड उतरत होती. आमच्या सोबत प्रथमच सहभागी होत असलेल्या नवोदितांच्या अखंड गप्पा सुरू होत्या. मंडळी बरीच मागे राहत होती. ३-२२ वाजती माहुलीला जोडणार्या पूर्व धारेलगतच्या तटावर आल्यानंतर जाणवले की, इथून टप्पा आव्हानात्मक आहे, नवख्या मंडळींना सोडून फार पुढे जाण्यात अर्थ नाही. आमच्या सोबतचा पुढे निघालेला चमु आता नजरेच्या आड झाला होता आणि ही मंडळी मात्र मागेच रेंगाळत होती,
त्यामुळे मी चालण्याचा वेग कमी करून त्यांना सारखे पुढे पिटाळत होतो. नंतर जाणवले की, मागची मंडळी वाजवीपेक्षा खुप हळू उतरत आहे. इथल्या कातळ मार्गावर आणि घसार्यावर त्यांचा वेग कमी झाला होता. त्यांच्यातील एका मुलीला उतरण्यात अडचणी येत होत्या, त्यामुळे तिच्या सोबत आलेली मंडळी मागे मागे राहत होती. एका कातळटप्प्यावरून खालच्या वालूकामय घसार्यावर तिचा पाय घसरला, जोरदार आपटी खाल्ल्याने दोन्ही गुडघ्यांना थोडे खरचटले. भटकंतीतल्या काही मुलभूत गोष्टी डॉ. प्रसन्ना महाजन यांनी सुरूवातीलाच सांगितल्या होत्या, त्या लक्षात ठेऊन तिच्या सहकार्यांनी मानसिक धीर देत पायथ्यापर्यंत सहीसलामत उतरविले, गावात पोहचता पोहोचता साडे पाच वाजले. आमच्या अगोदरची मंडळी तासभर अगोदरच पोहोचली होती. मुंबईकर एव्हाना परतीच्या वाटेला लागले होते.
इतिहासात माहुली...
माहुली किल्ला कोणत्या राजवटीत बांधला गेला, या संबंधी इतिहासाच्या अभ्यासकात मतभेद आहेत. माहितीच्या महाजालावर काही उल्लेख खुपच गोंधळात टाकणारे आहेत, जसे की, 'हा किल्ला मुघलांनी निर्माण केला', '१४८५ मध्ये तो निझामशाहीत आला', या स्वरूपाचे उल्लेख ऐतिहासिक आधाराशिवाय वापरणार्या लेखकांनी मुघलशाहीचा भारतातला प्रारंभ, निझामशाही स्थापनेचा काळ जुळतो की नाही याची कोणतीच तपासणी केली नसल्याचे जाणवते.
जुन्नर जवळच्या नाणेघाटात सातवाहनांनी जीवधन किल्ला बांधुन व्यापारास चालना दिली. थळ घाटावर त्रिंगलवाडी सारखा महत्वाचा किल्ला बांधण्यात आला होता तेव्हा सातवाहनांच्या किंवा शिलाहारांच्या कालखंडात माहुलीवर एखादे ठाणे वसविले असावे का? कागदोपत्री तसे पुरावे मिळणे दुरापास्त आहे, तथापी दगड, धातूवरच्या वृत्तांताचा आधार आश्वासक ठरू शकतो पण तीही शक्यता फारच दुर्मिळ, तेव्हा माहुली परिसरात उत्खननातून काही वस्तुंचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न केल्यास त्याने जुन्या राजवटींचा काल ठरवायला मदत होऊ शकते.
माहुली किल्ल्यावर तीन ऐतिहासिक घटना अत्यंत महत्वाच्या ठरतात. त्यातली एक म्हणजे निझामशाहीत माहुली अल्पकाळ का असेना शहाजी महाराजांनी त्याचा गुप्त राजधानी म्हणून वापर केला. दुसरी महत्वाची घटना म्हणजे शहाजी राजांनी माहुली किल्ल्यात घेतलेला आश्रय आणि त्यांचा मुघल आणि आदिलशाह यांच्या संयुक्त फौजांकडून झालेला पराभव. त्यानंतरचा दुसरा मोठा पराभव शिवाजी महाराजांना त्याच्या कारकिर्दीतले यशदायी वर्ष १६७०मध्ये पचवावा लागला, ही या किल्लयावर घडलेली तिसरी महत्वाची ऐतिहासिक घटना. या युद्धात हजारच्या आसपास मावळे कामी आले. आपण येथे या तिन घटनांशी संबंधित ऐतिहासिक घडामोडींचा आढावा घेणार आहोत. त्यासाठी वेगवेगळी पुस्तके, व्याख्याने, दूरचिणवाणी मालिका आणि काही तज्ज्ञ मित्रांच्या सोबत केलेल्या चर्चेतून ही संकलन केलेली माहिती फक्त मी तुमच्या समोर मांडणार आहे.
१२९४ साली अल्लाउद्दीन खिलजीने दख्खनवर स्वारी करून देवगिरीचे साम्राज्य मांडलीक बनवले. १३४७च्या सुमाराला बहामनी साम्राज्य निर्माण झाले. १४००च्या सुमाराला पाच शाह्या या त्याच्या शकलांमधुन निर्माण झाल्या. देवगिरी, विजयनगर, वारंगळ आदी हिदू राजवटी खालसा केल्यानंतर वर्चस्वासाठी या शाह्यामध्ये एकमेकांसोबत लढाया सुरू झाल्या. तालिकोटच्या लढाईत (१५६५) विजयनगरचे गौरवशाली हिन्दू राज्य संपवल्यानंतर मुघल, आदिलशाहा यांनी आकारमानाने लहान असलेल्या निझामशाहीवर लक्ष केंद्रित केले. आपल्या राजकीय आकांशा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्थानिकांमधून मोठ्या प्रमाणावर लष्करात भर्ती केली. शेतकरी, आदिवासी लढवैय्यांचे घोडदळ इथल्या डोंगराळ प्रदेशात दैदिप्यमान कामगिरी बजावू लागले. महाराष्ट्रात जाधव व भोसले ही घराणी स्वतंत्रपणे उदयास आली.
सुमारे तीनशे वर्षे मुसलमानी सत्तांचा दबाव झेलणारा दक्षिण भारत एक प्रकारे सांस्कृतीक धक्क्यात वावरत असताना वेरूळचे सरदार शहाजी भोसले यांच्या मनात स्वराज्य संकल्पना रूंजी घालू लागल. या शाह्यांची सत्ता येथून जावी, स्थानिकांचे राज्य निर्माण व्हावे व रयतेला सुखाचे दिवस यावे असे त्यांना वाटायचे त्यासाठी योग्य संधीची वाट बघत कधी निझाम तर कधी आदिलशाहा तर कधी मुघल अशा आपल्या निष्ठा सतत बदलणारे शहाजीहे पहिले सरदार असावे ज्यांनी न केवळ स्वराज्याचे स्वप्न बघितले, त्या दिशेने त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपली पावले वळविली.
पिता मालोजीराजां प्रमाणेच शहाजी महाराज उत्तम सेनानी होते. त्यांच्यात नेतृत्वगुण होते. विशेष म्हणजे त्यांच्या तलवारीला विजयाची सतत सवय होती. ज्यांनी या भूमीचे स्वातंत्र्य हिरावले त्यांच्यात राहूनच त्यांना स्वराज्याचा डाव मांडायचा होता. प्रबळ मोगलाईत राहून त्याचा फार उपयोग होणार नाही हे त्यांना कळून चुकले असावे, त्यामुळे त्यांनी निझामशाहीकडे आपल्या निष्ठा वाहिल्या. तिथेही योग्य सन्मान होत नाही, असे बघून त्यांनी आदिलशाहीची (१६२५) वाट पकडली.
आदिलशाहा तर्फे त्यांनी महाराष्ट्रात काही लढायाही केल्या. इब्राहीम आदिलशाह जाऊन त्याच्याजागी महंमद आदिलशाह आला. महंमद आदिलशाहचा कल हा मुस्लीमांना अनुकुल व हिन्दूंच्या विरोधात होता. इथे राहून आपला काही फायदा होणार नाही हे शहाजी राजांच्या लक्षात आले त्यामुळे शहाजी राजे पुन्हा निझामशाहीकडे परतले.
दरम्यान १६३२च्या सुमारास देवगिरीच्या किल्ल्यात शहाजीराजांचे सासरे लखुजी जाधवराव व त्यांची मुले अचलोजी, रघोजी आणि यशवंतराव या चौघांचा भरदरबारात खुन झाला...त्यामुळे शहाजीराजांच्या मनात असुरक्षेची भावना निर्माण झाली. ते मोगलांकडे गेले. मोगल तोवर दक्षिणेत आलेच होते. मोगलांकडे असताना
त्यांच्या असे लक्षात आले की निझामशाहीमध्ये पुन्हा संधी मिळतेय. मलिक अंबर गेल्यानंतर फतेहखान सत्तेवर आला, त्याच्यात
दुरदृष्टी नव्हती, औदार्याचा अभाव होता, त्याच्यात उद्यामशीलता नव्हती, त्यामुळे निझामशाहीत वाव मिळतोय हे पाहून १६३३ ते निझामशाहीत पुन्हा परतले. तिथे कोणीच वाली नव्हता. तिथे हुसैन निझाम होता, त्याला फतेह खानाने मुगलांच्या हवाली केले. मुगलांनी त्याला ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैदेत ठेवले. हूसैन निझाम शाहाने दौलताबादचा किल्लाही मोगलांच्या ताब्यात दिला. निझामशाहीला पुन्हा कोणीही वाली राहिला नाही. अशा परिस्थितीत शहाजी राजांनी असं ठरवलं की, निझामशाही कुटुंबातला एक पुत्र मुर्तझा तिसरा याला सिंहासनावर बसवावं. बाल मुर्तझाला ते संगमनेर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर घेऊन गेले तिथून त्यांनी निझामशाहीचा कारभार चालवला. लहानगा मुर्तझा शहाजीराजांच्या मांडीवर बसायचा, त्याला घेऊन ते सिंहासनावर बसायचे.
शहाजींचा सुरतेवर हल्ला
पेमगिरी सुरक्षित नाही याचा अंदाज बांधून त्यांनी निझामशाहची राजधानी गुप्तपणे माहुली किल्ल्यावर हलवली. माहूलीवर जिजाबाई व बालशिवाजी यांना सुरक्षित ठेवणे शक्य होते.
जिजाबाईंना राज्यकारभार पाहण्याचा अनूभव होता, त्यामुळे त्याच सगळा राज्यकारभार सांभाळतील असे त्यांनी नियोजन केले. निझामशाहीची आर्थिक स्थिती खुप बनली होती, त्यासाठी शहाजींनी मुघलांचे आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या सुरतेवर हल्ला चढवून तिथल्या व्यापार्यांकडून जबर खंडणी वसूल केली.
या प्रकरणामुळे मुघालांच्या संतापात भर पडली. त्यांना निझामशाही जिंकून दक्षिणत हातपाय पसरायचे होते. अगोदर मलिक अंबर आणि आता शहाजी, यामुळे चाळीस वर्षे ते निझामशाही बुडवू शकले नव्हते. त्यामुळे शहाजहानने महाबतखानाला निझामशाहीवर पाठवला. खान दोरान, शाहीस्तेखान ही मंडळी त्यावेळी महाराष्ट्रात होती.
शहाजी हे प्रकरण आपल्याकडून आटोपत नाही, हे बघून स्वत: १६३५मध्ये स्वत: शहाजहान दक्षिणेत आला. शहाजीराजांचे बंड मोडण्यासाठी शहाजहानला येथे यावे लागले, तो त्यावेळी खडकीला आला. हे शहर मलिक अंबरने स्थापन केलं आहे त्यावेळी त्याचे औरंगाबाद हे नाव नव्हते.
शहाजहानने आपल्या सैन्याचे चार गट केले, शाहीस्तेखानाला त्याने संगमनेर, जुन्नर परिसरावर पाठवले, अलिवर्दीखानाला चांदवड परिसरातले किल्ले घेण्यासाठी पाठवले, १६३६चा तो सुमार, सातमाळा रांगेत सगळीकडे त्यासंबंधीचे शिलालेख सापडतात. खान दौरानला त्याने आदिलशाहीवर पाठवले कारण शहाजीराजांने अप्रत्यक्ष आदिलशाहीची मदत तीच. आदिलशाहीला माहित होते की, हे राज्य गेले तर पुढे आपल्यावरच मोगलांचा रोख राहणार होता.
माहुलीचा पराभव
आदिलशाहाच्या दरबारातला हबशी सरदार रणदुल्ला खान उर्फ रूस्तम जमान, पंडित मुरार जगदेव हे शहाजीराजांना मदत करत होती हे शहाजहानच्या लक्षात आले तेव्हा त्याने त्यांना कडक शब्दात पत्र पाठवले की, तु्म्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. आदिलशाहाने १६३६च्या सुमारास शरण येऊन मोगलांशी करार केला व शहाजी राजे एकटे पडले. मोगालांनी शाहीस्तेखानाला परत बोलावले व खान जमानला पाठवले त्यावेळे त्याने संगमनेर, जुन्नर हा परिसर जिंकून घेतला. मोगल एक एक करून पुढे सरकत होते. शहाजीराजे कुंभा घाटातून दंडाराजपूरीला गेले तिथे सिद्दींची त्यांना मदत मिळू शकली नाही, नाईलाजाने प्रबळगड, पनवेलहून ते माहुली किल्ल्यावर गेले.
शाहाजी रानांनी माहुलीचा तगडा बंदोबस्त केला तिथे मोगलांनी मोर्चे घातले, रणदुल्ला वेढ्यात सामील झाला, मदत कुठूनच मिळेना अखेर शहाजी राजांनी शरण जाण्याचा निर्णय घेतला. शेवटचा निझाम मुघलांच्या ताब्यात आला तिथून त्याची रवानगी ग्वाल्हेरच्या किल्ल्यात झाली. माहुली किल्ल्यावर मुघल आणि आदिलशाहा यांच्या संयुक्त फौजांकडून पराभव झाल्यानंतर शहाजींना मारण्यात आले नाही अन्यथा या सत्ताधिशांचा इतिहास सुडाचा, खुनाखूनीचा. शहाजींना दोघांकडे जाण्याची संधी होती. त्यांनी आदिलशाहीत जाणे पसंत केले. त्यांची जहागीर कायम ठेवण्यात आली.
इथवर माहुलीच इतिहासातले महत्व आपल्या लक्षात येते. हा काळ म्हणजे मुघल आणि पाच शाह्यांनी शहरांना मजबूत कोट बनवून बळकट भूईकोट किल्ले उभे केले आणि त्यातून राज्यकारभार चालविला. शहाजी राजांनी मातब्बर फौजांना तोंड देण्यासाठी डोंगरी किल्ल्याचे महत्व ओळखले. माहुलीच्या रूपाने त्यांना प्रबळ मुसलमानी सत्तांना टक्कर देऊ शकेल असे नवे युद्धक्षेत्र गवसले होते. बळकट कोंढाण्यानंतर माहुली नावारूपाले आले ते शहाजींमुळेच. त्यानंतर सुमारे पस्तीत वर्षे माहूलीवर म्हणावी तशी हालचाल झाली नाही ती झाली शिवशाहीत.
पुन्हा माहुली...
मुघल आणि आदिलशाहीचे लचके तोडत तोडत दक्षिणेत स्वत:चे राज्य निर्माण करणार्या शिवाजींच्या हिंदवी स्वराजाचा बिमोड करण्यासाठी मुघल बादशाह औरंगजेबने हर तर्हेचे प्रयत्न केले, परंतू त्यांस माफक असे यश मिळत गेले. पूर्ण विजय त्याच्या नशिबी आलाच नाही, अधिकतर पराभवच.
संपूर्ण भारतात मुघल सत्तेला आव्हान मिळत होते ते महाराष्ट्रातून. शिवाजी महाराजांनी प्रतापगड (१० नोव्हेंबर १६५९) आणि पन्हाळगडाच्या संघर्षात (१२ जुलै १६६०) विराट आदिलशाही मार्यासमोर मिळवलेल्या यशानी औरंगजेबचे डोळे विस्फारले. पुण्यात औरंगजेबचा मामा शास्ताखानला (५ एप्रिल १६६३) त्याच्या राहत्या घरातून पळून जाण्याची नामुष्की ओढवली, या घटनांनी चवताळलेल्या औरंगजेबने त्याचा कडवा सरदार जयपूरचा राजा मिर्जाराजे जयसिंगला (१९ जानेवारी १६६५) शिवाजींचे राज्य खालसा करण्याची मोहिम देऊन मोठी रसद घेऊन दक्षिणेवर पाठवले.
स्वराज्यावरचे हे संकट भिषण होते. मिर्झाराजे नुसते गडावर डोळे ठेऊन नव्हते, त्यांनी गावच्या गावे लूटत रयतेला बेजार करून सोडले. निकराने हल्ला चढवून पुरंदरचा (१४ एप्रिल १६६५) किल्ला जिंकला. रयतेची अधिक फरपट होऊ नये, आपल्या सैन्याची आणखी प्राणहानी टाळण्यासाठी शिवाजी महाराजांनी शरणागती पत्कारली. ११ जुन १६६५ला पुरंधरच्या तहात मुघलांना २३ किल्ले, ४ लाख होन उत्पन्न असलेला मुलूख देऊन टाकला आणि औरंगजेबची चाकरी पत्कारीत असल्याचे दर्शविले. या तहात माहुलीचा किल्ला सुद्धा देण्यात आला.
नोकरी पत्कारलीच आहे, तेव्हा आयुष्यभर बादशाहच्या सेवेत राहण्यासाठी, त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी मिर्झाराजांनी शिवाजी महाराजांना संरक्षणाची पूर्ण हमी देऊन बादशाहाच्या वाढदिवसानिमीत्त आग्र्याला (५ मार्च १६६५) जाऊन भेट घेण्यासाठी मनवले. १२ मे १६६६च्या दरबारात शिवाजी महाराजांना अपमानास्पद वागळूक मिळाली. त्यानंतर त्यांना नजरकैद झाली, ही एक प्रकारे कैदच होती. 'आपला सर्वात प्रबळ शत्रू हाती आला म्हटल्यावर विश्वासघातकी औरंगजेब शब्द थोडीच पाळणार', उलट्या काळजाच्या औरंगजेबने मिर्झाराजांच्या शब्दाला किंमत दिली नाही, त्याची योजना शिवाजींना मारण्याचीच होती.
तीन महिने कैदेत राहिल्यानंतर शिवाजी महाराज ऑगस्ट ( तारीख १७, १९६६)च्या महिन्यात आग्रा येथून निसटले आणि अवघी मुघलशाही हेलावली. महाराज राजगड (२ सप्टेंबर १६६६) येथे परतले. स्वराज्याची घडी विस्कळीत झाली होती, त्यामुळे शिवाजींनी मुघलांशी संघर्षाची भूमिका न घेता नरमाईचे धारण स्विकारले. 'आपल्याला तातडीने परतावे लागले, पण आपण आपलेच नौकर आहोत', अशा आशयाचे पत्र त्यांनी औरंगजेबला पाठविले.
उणेपूरे चार वर्षे शिवाजी महाराजांनी संयमाची भूमिका घेतली. आपले बळ वाढवण्यावर, किल्ल्यांची मजबुती करून स्वराज्याची बिघडलेली घडी बसवण्यावर भर दिला. जेधे शकावली नुसार १६६९च्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात औरंगजेबने बनारसमध्ये हिन्दू देवळे पाडण्याचा सपाटा लावला. त्याने काशीचे देऊळ पाडले. इकडे खडकीत औरेंगजेबचा मुलगा शहजादा मुअज्जमच्या चाकरीत संभाजी राजांच्या सोबत प्रतापराव आणि आनंदराव होते. त्यांना कैद करण्याचे आदेश दिल्लीहून रवाना झाल्याची कुणकुण लागताच शिवाजींनी त्यांना तातडीने परत बोलावून घेतले. 'आता वेळ आली ती मुघलांना सपाटून मार देण्याची'. आजवर शिवजींचा भर हा आदिलशाही मुलूख ताब्यात घेण्यावर असायचा, मुघलांशी सरळ सरळ
सामना ते टाळत होते. आता मात्र मोगलाईला तडाखा देण्याची योजना होती.
१६७० हे साल शिवशाहीत अनेक महत्वपूर्ण घडामोडींनी भरलेले. याच वर्षी राजगडावर राजाराम महाराजांचा (१४ फेब्रुवारी १६७०) जन्म झाला. स्वराज्यासाठी हा पायगुण मोठे यश मिळवून देणारा ठरला. त्या अगोदर मुघलांच्या ताब्यातला अत्यंत बळकट असा कोंढाणा (४ फेब्रुवारी १६७०) जिंकून मुघलांविरूद्ध रणशिंग फुंकण्यात आले. कोंढाण्याच्या छापामार युद्धात शिवाजी महाराजांना अत्यंत जिव्हाळ्याचा सरदार तानाजी मालूसरे गमवावा लागला.
स्वराजात जिथे जिथे मुघल फौजा होता तिथे तिथे त्यांच्यावर हल्ले सुरू झाले. प्रतापराव गुर्जर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव भोसले अशा मातब्बर सरदारांसोबत स्वत: शिवाजीं महाराज मैदानात उतरले. पुरंदर, लोहगड, रोहीडा असे एक एक गड मुघलांकडून हस्तगत केले. महाराज स्वत: किल्ले शिवनेरीच्या रोखाने निघाले हा महाराजांच्या जन्माचा किल्ला. महाराजांनी शिवनेरीला वेढा घातला. कित्येक दिवस झुंज देऊनही शिवनेरी रिघ देईना, नाईलाजाने माघार घेऊन महाराज नाणेघाटाने कोकणाकडे वळले. तिकडे निळोपंतांनी पुरंधर (८ मार्च १९७०) घेतला.
जबर पराभव
महाराज कोकणात उतरले आणि त्यांनी माहुलीच्या किल्ल्यावर छापा टाकला. यावेळी येथे होता राजपूत किल्लेदार राजा मनोहरदास गौड. तो दक्षतेने गड सांभाळीत होता. महाराजांनी स्वत: गडावर छापा टाकला. जबर झटापट झाली. हजार मावळे गमवावे लागले, महाराजांना माघार घ्यावी लागली. महाराज आपल्या सैन्यानिशी टिटवाळ्यास आले. महागणपतीचे हे टिटवाळे. तळ पडला. पुढचे काय पाऊल टाकावे हा विचार त्यांच्या मनी होता. शहर बंदर कल्याण आणि तेथील किल्ले दुर्गाडी मोगलांच्या ताब्यात होता. महाराजांनी तेच लक्ष्य केले. त्यांनी सुभे कल्याणवर झडप घातली. मोगलांची अक्षरश: दाणादाण उडाली. जगाच्या अनेक भागातून येणार्या व्यापारी गलबतांची वर्दळ असलेले कल्याण फत्ते झाले. तिथून मराठी फौजांनी चांदवडवर चाल करून चांदवड साफ लूटले.
माहुलीचा किल्ला निकाराने झुंजविणार्या मनोहरदास गौंड याने (इ. १६७० , एप्रिल अखेर) सेनापती दाऊदखान कुरैशीला पत्र लिहून, हा किल्ला राखणे आता त्याच्या आवाक्यातली बाब नाही, किल्ल्यावर दारूगोळा आणि शिबंदी कमी असल्याचे कारण त्याने पुढे केली व आपली विनंती बादशापर्यंत पोहचण्यास सांगितले. तो बराच वृद्ध असावा, औरंजेबने त्याची विनंती मान्य केली आणि त्याच्या जागी अल्लावार्दीखानाची नेमणूक करण्यात आली.
मराठी फौजांची बेफाम मुसंडी सुरूच होती. खानदेशातून मोठी फौज घेऊन दाऊदखानने जुन्नरकडे मोर्चा वळवला. पारनेर, माहुली याभागातल्या फौजा हटवून मराठ्यांनी अहमदनगर, परिंडा याभागातील ५१ गावे लूटली. ह्या संधीची वाट साधून मोरोपंत पिंगळेंनी माहुलीवर हल्ला चढवला, त्यात अल्लावर्दीखान मारला गेला. १५ जुन १६७०मध्ये माहुली स्वराज्यात दाखल झाला.
शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजी महाराजांनी माहुलीवर वास्तव्य केले असण्याची शक्यता आहे. सद्या गडावर संवर्धन कार्य करणार्या संस्थांनी राजसदरेवर लावलेल्या फलकात संभाजी महाराजांनी वास्तव्य केल्याचे लिहीले आहे. संभाजी महाराजांचा या किल्ल्याशी कशा प्रकारे संबंध आला होता, हे पाहणे औत्सुक्याची ठरेल!
१८व्या शतकात माहुली इंग्रजांच्या ताब्यात आला. १८१८ साली त्यांनी सह्याद्रीतल्या बहुतांशी गडांप्रमाणेच माहुली किल्ल्याचा प्रचंड विध्वंस करण्यात आला. महादरवाजा, कल्याणदरवाजा, हनूमान दरवाजा आणि कित्येक तटांना सुरूंग आणि तोफा लाऊन उध्वस्त केले. त्यादगडांच्या ढिगार्याखाली दबलेला इतिहास बाहेर येऊ शकतो जर ते ढिगारे बाजूला सारले गेले तर.
'गड संवर्धन' या नावाखाली आज गडांचे कुठलेच संवर्धन होताना दिसत नाही, हा आवाक्यात नसलेला विषय वाटतो त्या ऐवजी उत्खनन कार्य केले तर इतिहासातल्या कितीतरी गोष्टी उजेडात येऊ शकतील. माहुलीवर तर उत्खनन जरूर करावे!
- संदर्भ:
- छत्रपती शिवाजी, सेतू माधवराव पगडी
- 'स्वराज्य संकल्पक शहाजी', गिरीष टकले
- श्रीमान योगी, रणजीत देसाई
- राजा शिवछत्रपती मालिका, नितीन देसाई
- माहितीच्या महाजालावरील लेख, स्फुट वाचन,
- विकीपेडीया.
- शहाजीपूत्र संभाजींचे लखुजी जाधवरावांना बाणेदार उत्तर
- देवगिरीच्या यादवरायांच्या थेट वंशजांचा देवगिरीच्या किल्ल्यातच खुन
- पेमगिरीवर मुर्तझाचे मंचकारोहण केले...सिंहासनावर शहाजी मुर्तझाला मांडीवर घेऊन बसलेत
- भाग १३: गुप्त राजधानी माहुलीस
प्रशांत, खूपच सखोल आणि अभ्यासपूर्वक विवेचन केले आहेस...हे फक्त तूच करू जाणे
ReplyDelete