Thursday, April 18, 2019

mohandar: satmaletla chowkidar



मोहनदर...सातमाळेतला चौकीदार
सह्याद्रीतल्या काही डोंगरांमध्ये आर पार पडलेले छिद्र दिसतात. सुईचे नेढे तसे 'डोंगरांचे नेढे' म्हणून यांना संबोधले जाते. डाईकची अश्मरचना आणि त्याच्या मधोमध चौकोनी आकाराचे नेढे म्हणजे मोहनदर उर्फ शिडका किल्ला. आजची रविवारीय भटकंती, 'सातमाळेतला चौकीदार', अशी ओळख असलेल्या मोहनदरी किल्ल्यावर आणि सोबत गिरणा काठच्या पूरातन देवळी कराड शिवमंदिराची भेट...
नाशिकचा कळवण तालूका प्रसिद्ध आहे तो नेढे आणि डाईकच्या अश्मरचना असलेल्या डोंगरांसाठी. मोहनदर, कण्हेरगड, पिंपळा उर्फ कंडाळ्या, जो सह्याद्रीतले सर्वात मोठे नेढे वागवून आहे, असे नेढे असलेले तीन डोंगरं कळवण तालूक्याचे भौगोलिक वैभव. धोडपचा किल्ला देखिल कळवण परिसरातलाच, त्यावर सुद्धा समोरासमोर दिसत नसले तरी आरपार जाणारे भले मोठे नेढे आहेच. या वैभवात भर टाकतात त्या डाईकच्या रचना असलेले डोंगर. धोडप, कण्हेरगड, मोहनदरी, पिंपळा, मोठी भिंत हे या परिसरातले काही प्रसिद्ध डाईकची रचना असलेले डोंगर. 
डाईकचा भला थोरला पसारा मोहनदर गावातून...
डाईक म्हणजे डोंगरांची पातळ पापड सारखा भासणारी लांबसोट भिंत. अर्थात या भिंती फक्त डोंगरमाथ्यावरच असतात असे नाही, त्या जमिनीवर देखिल आढळतात आणि डोंगरांच्या खिंडीतही. (नाशिक शहरात तर गोदावरीच्या मधोमधल भली थोरली डाईकची भिंत आहे). डोंगरमाथ्यावरच्या पातळ कातळ भिंती हा डाईकचा एक प्रकार आहे. दूर अंतरावरून त्या पापडा सारख्या भासत असल्या तरी त्या पुरेशा जाडच असतात. कुठे त्या पाच पंधरा मिटर जाडीच्या आहेत तर कुठे त्यांच्या धारा मिटरभरच आहेत. जुन्या शासकांनी या डाईकचा संरक्षण सिद्धतेसाठी, परिसरात टेहाळणी आदी करण्यासाठी त्यावर किल्ले, चौक्या बांधून काढल्या. 


विलास गावित...बालवयात त्याची समज व अंगातला चटपटीतपणा चकित करणारा...

मोहनदरच्या वाट्याला भौगोलिक, धार्मिक, ऐतिहासिक असे तिहेरी भाग्य लाभले आहे. नाशिकचे प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक तथा संशोधक गिरीष टकले यांनी सर्वात प्रथम मोहनदरवर किल्ला असल्याची बाब उजेडात आणली. नाशिककरांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची व भूषणावह अशी बाब आहे. सह्यभटकंतीची आवड असलेल्यांच्या 'इच्छा यादीत' मोहनदरीचा हमखास समावेश होतो तो त्याच्या सर्वगुण संपन्नतेमुळे. 

मोहनदरच्या माथ्यावरून समुची सातमाळा आणि सेलबारी, ढोलबारी रांगेसह विस्तृत असा प्रदेश दृष्टीस पडतो. उंचीने लहान आणि टेहाळणीसाठी उपयुक्त अशा कारणासाठी मोहनदरी किल्ल्याची निर्मीती झाली असावी.  इतिहास प्रसिद्ध नांदूरी घाटावरचा हा किल्ला उत्तरेकडून येणार्‍या व्यापार मार्गावरच्या देखरेखीसाठी आणि राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला असावा. मोहनदर किल्ल्याची दक्षिण बाजूची धार थेट बलशाली अशा अहिवंत किल्ल्याला जाऊन भिडते, त्यामुळे मोहनदरास टेहाळणी योग्य किंवा युद्ध काळात सहाय्या करण्यासाठी निर्माण केले असावे.
काही अभ्यासकांच्या मते मोहनदर हा अहिवंत किल्ल्याचाच विस्तार आहे. मागच्या डिसेंबरात आम्ही सातमाळा डोंगरयात्रेच्या पाहणीसाठी अहिवंतवरून मोहनदरकडे जाणार्‍या वाटांचा वेध घेतला तेव्हा लहान आणि मोठा सूपा असे दोन डोंगर मोहनदरला अहिवंतशी जोडतात असे आढळले. शिवाय सुप्यावर जुन्या बांधकामाचे कुठलेच अवशेष नाहीत. मोहनदर हा अहिवंताचाच विस्तर असता तर सुप्याला मजबूत तट घालावे लागले असते, तसे काही दिसत नाही.
मोहनदरचा इतिहास जसा अज्ञात तशाच त्यावरच्या राजकीय घडामोडींबद्दल फारशा नोंदी वाचायला मिळत नाही. गडावर मोठ्या संख्येने असलेली जुन्या इमारतींचे भग्न अवशेष, तटबंदी आणि कातळात कोरलेली पाण्याची टाकी यावरून हे महत्वाचे ठाणे असावे याची प्रचिती येते.
मोहनदर हे नाव खुपच वेगळे भासते. व्यावहारात त्याचा वापर सहजगत्या आढळत नाही. कशावरून आले असावे हे नाव? तसा सिंधू संस्कृती सोबत इथला संबंध अद्याप प्रस्थापित होऊ शकलेला नाही. मोहनदर हे नाव मोहंजोदारोशी काहीसा मेळ खाते याबद्दल कुतुहल वाटते.
गोष्टीवेल्हाळ विलास गावित...आशिष सोबत गप्पा मारताना...

उत्तरेतल्या परकीय शासकांची दक्षिण भारत जिंकण्याची लालसा. बहामनी, निझामशाही सत्तांचा प्रदेश राखण्यासाठी संघर्ष यातून सातमाळेतल्या डोंगरांवर किल्ल्यांच्या बांधकामांना वेग आला असण्याची शक्यता आहे. परकीय शासकांच्या अगोदरच्या काळात किल्ल्यांची फार माठी बांधकामे मोजक्याच ठिकाणी झाली असण्याची शक्यता आहे. अधिकतर धार्मिक कारणामुळे या परिसरात कातळातली बांधकामे झाली असण्याची शक्यता आहे. बिलवाडी, देवळी कराड, मार्कंड पिंप्री ही अत्यंत देखणी कातळकोरीव मंदिरांची बांधकामे मुसलमानपूर्व वैभवाची साक्ष देणारी. 


डोंगरावर झाड असते?

१४ एप्रिल २०१९:
'वैशाख वणवा भडकण्याच्या आत जमेल तितकी भटकंती करावी. चैत्रातले सगळेच रविवार काही हाती येणे शक्य नाही, हा रविवार मिळतोय तर संधी सोडण्यात काहीच अर्थ नाही', असा विचार करून डॉ. अजय पाटलांनी घोषित केलेल्या अलंग-मदन-कुलंग परिसराच्या जंगल भटकंतीचा बेत रद्द झाल्यानंतर दुर्गभांडार, घाटघर अशा काही मंडळींच्या फिरस्त्यांची घोषणा झाली होती, रात्री ११-३० वाजता फोन बघितला तर आशिष शिंपीचे तीन मिस कॉल दिसले तेव्हाच ओळखलं काही तरी शिजतयं! आशिषलाफोन करून विचारले तर त्याने छोटेखानी बेत सांगितले, मोहनदर, सकाळी जाऊन दुपारच्या बेताला परतता येईल.
गेल्या आठवड्याभरापासून नाशिकचे दिवसाचे तापमान महाराष्ट्रातल्या तप्त प्रदेशांशी स्पर्धा करत होते, त्यात रात्रीच्या तापमानाची भर पडली. तब्बल ३० अंश सेल्सियस इतकी तप्त रात्र, हवेचा वेग ताशी ८ ते १० किलो मिटर इतकाच, त्यामुळे दिवसभर तापणारी सिमेंट कॉक्रिटची घरे मध्यरात्रीपर्यंत तप्त राहतात. घरात पंखा फिरत असला तरी तो गरम हवा फेकणार. अशा कोंडमार्‍यात रविवारचा दिवस रखरखीत सातमाळेतल्या उघड्या बोडक्या मोहनदरीत म्हणजे जरा धाडसाचेच काम होते, पण मनाने सांगितले, चल! तर निघायचे...मग मागे पुढे बघायचे नाही. 
'वैशाख बरा' इतकी टिपेवर पोहोचलेल्या उन्हात आजची दुपार कटणार होती. पावलोपावली उष्मा एके उष्मा अशी परिस्थिती शरीर थंडावा शोधत होते, त्यावर, 'ट्रेक हा काही उपाय होऊ शकत नाही, त्यापेक्षा एखाद्या नैसर्गिक जलाशयात डुंबणे केव्हाही परवडणारे ठरले असते, गेल्या काही वर्षांपासून पाण्याची भिषण स्थिती पाहता, अशी नैसर्गिक जलाशये आंघोळी करून खराब करायला मन धजत नाही, त्यांचे पाणी कित्येक वाडी वस्त्यांमध्ये पिण्यासाठी, नित्य वापरासाठी उपयोगात आणले जाते, आपण आंघोळ करून ते खराब करण्यात काहीच अर्थ नाही, त्यापेक्षा भटकंती थंडावा शोधलेलाच बरा, 'अंगभर उन्ह खाल्ल्लयानंतर तिथल्या एखाद्या विशाल वृक्षाच्या खाली तास दोन तास पहुडायला मिळेल, कातळातल्या जुन्या टाक्यातले पाणी चवदार, गारेगार असेल; मन आणि शरीर अशा दोघांनाही थंडावा मिळू शकेल तो भटकंतीत! मोहनदर आहे तरी कितीसा? या परिसरात काही जुनी मंदिरे आहेत, त्यातले देवळी कर्‍हाडचे मंदिर करूया! असे ठरवून सकाळी ६-३० वाजता नाशिकहून आम्ही नांदूरीच्या दिशेने कुच केली. 


डोंगरांच्या अंगाखांद्यावर बागडणारी ही मुले ही त्याचीच लेकरे...त्यांना त्यावर कशाची भिती...

दुपारचे खानपान हॉटेलात न करता आपले आपणच बवायचे या बेताने छोटी गॅस शेगडी व शिधा सामुग्री गोळा केली. ज्यात मोड आलेली मसूर, भरपूर भाज्यांचा समावेश होता. आजच्या सुखवस्तू (कथित) जीवनैलीत ५५ किलो मिटरचा प्रवास म्हणजे असा सुरू होतो आणि असा संपतो. दिंडोरी ओलांडताच सातमाळेची रांग गाडीतूनच दृष्टीस पडते. अचला, अहिवंत, सप्तृश्रृंगीगड, मार्कंडेय असा भला थोरला शैल नजारा डोळ्यासमोर उभा राहणार तर त्यातल्या वेगवेगळ्या आठणींना उजाळा मिळणारच. गाडीत होतो तिघेच, त्यात जो तो आपआपल्या नजरेतून या डोंगरांच्या लहान सहान आठवणी कथन करत होता. गप्पांच्या ओघात नांदूरीचा घाट कधी पार केला हे कळलेच नाही, त्यामुळे दरेगावच्या पुढे डाविकडचे वळण चुकले आणि आम्ही नांदूरीत पोहोचलो. तिथून अभोणा रस्त्याने मोहनदरीत जायचे म्हणजे चार किलो मिटरचा हकनाक मोठा वळसा, तो पडलाच! नांदूरीत अभोणा रस्त्यावर वीरगळांची रांग दृष्टीस पडते. यातील बहुतांशी वीरगळांना शेंदरी रंग फासले आहेत. एक जुनी भग्न दशेतली गणपती मूर्ती आणि इतर काही जुन्या पूरान्या कातळात घडवलेल्या मुर्त्या पिंपळाच्या झाडाखाली मुकपणे पहुडलेल्या दिसतात. 
समोर थोड्याच अंतरावर आभोण्याकरिता रस्ता बनविण्यासाठी डोंगर धार कापून खिंडीतून रस्ता बनविण्यात आला आहे. याच्या डाव्या हाताचा डोंगर मोहनदरीचा. येथेही वीरगळ आहेत, त्यातील एका वीरगळावर लेख कोरला आहे.
मोहनदर गावात पोहोचताच आम्ही मोटारगाडी उभी करण्यासाठी झाडाची सावली शोधू लागली. एक दोन ठिकाणी झाडांची सावली मिळू शकली असती, पण गाडी उभी करून गेलो असतो तर या लहानशा गावच्या चिंचोळ्या रस्त्यात वाहतूकीला अडथळा झाला असता त्यामुळे लोखंडी खांबांवर पत्र्यांचे आच्छादन असलेले मोठ्या आकाराचे सभामंडप दिसताच, ही जागा योग्य राहील, असा विचार करून तिथल्या एका काकांना, येथे गाडी लावू का? असे विचारले, लावा की, असे खुल्या मनाने सांगून ते शेतीच्या कामासाठी निघून गेले. एका कोपर्‍यात गाडी उभी करून आम्ही नको असलेल्या गोष्टी पाठपिशवितून बाहेर काढल्या...पाण्याच्या दोन बाटल्या, दोर असे कमीत कमी वजन घेतले. एक शाळकरी मुलगा बाकावर येऊन बसला, कुठे किल्ल्यावर जाणार का? दोन वाटा आहेत, एक सरळ आणि दुसरी जरा लांबून पण सोपी वाट आहे. वाटाड्याची तशी आवश्यकता नव्हती. आशिष म्हणाला आपण वाटाड्या घेऊ, त्यामुळे त्यांना काही रोज तरी मिळेल. मुलाने २००/- रूपये घेईन असे सांगितले. लहान मुलाला
अकारण इतकी रक्कम देऊन त्यांची सवय बिघडविण्यात काही अर्थ नाही, असा विचार करून आम्ही चालू लागलो. तोही, गरज नाही, अशा अविर्भावात त्याच्या घरात निघून गेला. थोडे पुढे गेल्यावर त्याने आवाज देऊन, वाटांची चुकामुक होईल, किती देणार? त्याला बोटानेच एकचा आकडा दाखवला, तो तयार झाला. 


 नेढ्यावरचे पाण्याचे टाके पूर्णपणे गाळाने भरलेय...

८-४७: आम्ही गावातून सरळ नेढ्याकढे चालायला सुरूवात केली. वरच्या भागात चढाई उभी होईल, दमछाक होणार, शिवाय उन्हं चांगलीच चटका देणारी होती. मुलगा मोठा चुणचुणीत निघाला, त्याने आपले नाव सांगितले, विलास गावित, तो गावातल्याच आश्रमशाळेत सहावीत शिकतोय. आमची तिघांची नावे त्याने विचारली. त्यानंतर त्याची बडबड सुरू झाली ती शेवट पर्यंत सुरूच होती, जी एैकायला बरी वाटत होती. त्याच्या आमच्या बद्दल सारी माहिती विचारून घेताना आपल्याबद्दल माहिती सांगितली. गावच्या चाली रिती त्याच्या बोलण्यातून समजत होत्या.

आशिषने, गावात पाण्याची परिस्थिती कशी आहे! कुठून पाणी आणतात, असे विचारले तर, दोन विहीरी आटल्यात, हात पंपाला पाणी नसते, गावाबाहेरून एक हातपंप आणि एक विहीर आहे. तिथून भरून आणावे लागते, त्याला गाव परिसराची उत्तम माहिती होती, तसेच रोजच्या जगण्यात येणार्‍या अडचणींमुळे
त्याच्या उत्तरात हताशपणा जाणवत होता. 


गवत कुठे गेले...अगदी सफाचट!

'पावसाळ्यात मोहनदरच्या डोंगरावरून दोन मोठे झरे गावाच्या दिशेने वाहत येतात, एखादा मोठा खोल खड्डा जमिनीत केला तर गावाला वर्षभर पूरेल इतके पाणी त्यात साठवले जाऊ शकते', अशी आमची चर्चा सुरू होती. 'गावकरी मदतीला येतील', गावचे लोक कुठल्याही कार्यासाठी एकत्र येतात, लग्न असो, आश्रमशाळेसाठी बांधकाम मजूरी गावकर्‍यांनीच केली अशी माहिती देताना त्याचा अभिमान दाटून येत होता. 

गावामधून थेट नेढ्याच्या दिशेने गडावर जाणारी वाट स्पष्ट दिसते, ती समोर जातेय असे वाटत असताना, विलास नेमके कुठे वळायचे हे सांगत होता. आपण कल्पना करू शकत नाही, इतकी फसवी वळणे होते. म्हणजे वाट समोर दिसतेय, पण ती डावीकडून घसार्‍याने वर गेल्यावर समजायचे की, समोर गेलो असतो तर वाट चुकली असती. या रणरण उन्हात अशा चुका काही कामाच्या नाहीत. विलासला सोबत घेतले हे बरोच केले.

जस जसे वर जात होतो, तसतसे मोहनदरचे नेढे मोठे होत होते. ''देवीने राक्षसाचा पाठलाग केला, तो लांब पळाला तर त्याला त्रिशुळ मारला, त्यामुळे ह्या डोंगराला असे भोक पडलेय.'', 'तुम्ही धोडपवर गेला आहात का'? 'डोंगरदेवाच्या उत्सवाला याल का'? दोन वर्षांनी चैत्रात हा उत्सव असतो, तेव्हा मोहनदरवरच्या टाक्याचे पाणी दुध होते, ते बाटलीत भरून आणायचे व आजारी माणसाला पाजायचे, 'पुढच्या महिन्यात ताईचे लग्न आहे', तुम्ही याल का? 'आज आभोन्याला बाजार आहे, तिथून कपडे घ्यायचे आहे', विलासचे अखंड बोलणे ऐकता ऐकता ९-५५ वाजता नेढ्या जवळ पोहोचलो. 


पाण्याची कातळातली टाकी मुबलक प्रमाणावर...मोहनदरवर  सैन्याच्या महत्वाच्या हालचाली होत असाव्यात...

वाटेत पाच सहा ठिकाणी मोठ्या मोळ्या बांधून ठेवल्या होत्या. मोहनदरच्या डोंगरावर एकही झाड हिरवं असावे असे वाटत नव्हते, सगळीकडे कोरडे शुष्क लहान झुडपे व बारीक बुंध्यांची वाळकी झाडे. काहीच शिल्लक नसलेल्या रानातून सर्पण? शासनाची उज्वला मोहिम यांच्या पर्यंत पोहली नाही का? स्थानिक नेते मंडळी, स्वयंसेवी गटांनी इथल्या घराघरात गॅस जोडणी मिळवून देण्यात पुढाकार घेतला नाही का? 
जास्त पावसाच्या या प्रदेशात जंगल संपदा अशी नाहीच, त्याला कारण झाडांची बेसुमार कत्तल. ही कत्तल आपल्या जीवावर बेतणार! शेतीच काय, प्यायला पाणी महाग अशी स्थिती. यावर गावकर्‍यांना त्याचे काहीच वाटत नाही का?
विलास सोबत चर्चेतून असे समोर येणारे वास्तव चिंतेत टाकणारे होते, 'गावात प्यायला चांगले पानी नाही, लोक जार विकत घेतात. प्यायला ते पानी आनी वापरायल हापसा नाही तर विहीर, ते देखिल गावाबाहेरून आनायचे म्हनजे लई ताप होतो'. आता हे जार काय प्रकरण आहे हे शहरी माणसाला सांगण्याची आवश्यकता नाही. शहरात लग्न असो की कुठलाही समारंभ संपन्न मंडळी जिथे शुद्ध पाणी म्हणून मिनरल वॉटर, आर ओचे पाणी पाहुण्या मंडळीसाठी बाटल्य वा प्लास्टिकच्या पेल्यातून पिण्यासाठी उपलब्ध करून देतात तिथे थोडी कमी आर्थिक क्षमता असलेली मंडळी जार विकत घेते. शहरात महापालिकेच्या नळांचेच पाणी क्लोरिनचा वापर करून कथितरित्या शुद्ध केले जाते व ते जारमधून देतात. यात थंड पाणी देण्याची सुविधा असते. पन्नास, शंभर रूपयांना असे जार म्हणजे तात्पुरती सोय. यात पाणी शुद्द करण्याचे तंत्र अर्थातच शास्त्रशुद्ध नसते, जो तो ज्याच्या त्याच्या अनूभया प्रमाणे पाणी साफ करून विकतो. यात कधी क्लोरिनचे प्रमाण खुप अधिक असते तर कधी आरओ तंत्राच्या सहाय्याने तमाम उपयुक्त, घातक जिवाणू मारलेले असतात. दुर्गम भागातल्या जारच्या दर्जाबद्दल तर विचारायलाच नको!
येथे लाकूड तोडायला कोण येते, यावर माहिती मिळाली, गावात कुठलाही समारंभ असला की मंडपासाठी बल्ल्या येथून तोडून आणल्या जातात. त्यांचा पूनर्वावर होतो पण आता बल्ल्या मिळावे अशी झाडे सुद्धा शिल्लाक राहिली नाहीत. दर दोन वर्षांनी डोंगर देवाच्या उत्सवासाठी तिन दिवस झाडाची लाकडे पेटविण्याची जूनी प्रथा आहे. त्यासाठी झाड येथूनच तोडले जाते. आता गावकरी म्हणतात सीताफळ, आंबा आदी झाडांचे रोपण करूया. 

 

जारचे पाणी
भरपूर पावसाच्या सातमाळेत आदिवासी मंडळी जारचे पाणी विकत घेताहेत', हा विचार ऐकून डोकं काम करेना. 'कुठे नेऊन ठेवलाय सह्याद्री आपला'! भर उन्हात मेंदूला चटका देणारी स्थिती ऐकत असताना विलास पुढे सरसावला आणि नेढ्याचा लहानसा कातळटप्पा सरसर वर चढून गेला. येथे मागची एक आठवण त्याने सांगितले, एक मानुस एकटा आला होता, तवा इथं बल्ली उभी केली होती, त्यावरून चढताना तो घसरला. आंग थरथरत होते. तुम्ही या, तुम्हाला जमेल, सोपं आहे. एक एक खाच तो सांगत होता. खुप अवघड नसला तरी हा टप्पा सोपा नक्कीच नाही. विना हेल्मेट, विना सुरक्षादोर वर चढून जाताना पुरेशी सावधानता बाळगावी, वरून घसरला तर खाली फार थोडी सपाटी, त्यापुढे  चार एकशे फुटांची सरळसोट दरी, चुकीला अर्थात कोणताच वाव नाही!
वर पोहोचल्यानंतर सोबतच्या दोराने अगोदर सगळ्यांच्या पाठपिशव्या ओढून घेत सुरक्षा दोर खाली सोडला. निलेशने नेढे उतरून पलिकडून दोर धरून वर खेचून घ्या असा सांगितले. त्याच्या सांगण्यात तथ्य होते. वर दोर बांधायला काहीच आधार नव्हते. पलिकडून दोर खेचणे सुरक्षित होते, पण त्याने आरोहक दिसू शकत नाही, मग खाली एका दगडाला दोर अॅंकर करून तो खाली सोडला. दोघे वर चढले. इथून उतरताना मोठी कसरत करावी लागणार होती. शेवटच्या माणसाला खालून सुरक्षा दोर देण्यासाठी कातळाला कुठून दोराला वळसा द्यायचा याची पाहणी करत असताना, विलासने आता इथून उतरायचे नाही, पलिकडून जायचे असे सांगितले.
मोहनदरच्या नेढ्यात पाच सहा जण आरामात बसू शकतात. पलिकडच्या बाजूने उतरणे त्या मानाने सोपे आहे. समोर साल्हेर, सालोटा आणि टकारा सुळक्याचे दर्शन घडल्याने आम्ही आनंदात होतो. डाव्या कोपर्‍यावर अचला, तौल्याची उत्तुंग शिखरे शानदार दिसत होती. नेढ्याला वीस एक फुटांवर एक आग्या मोहोळ दृष्टीस पडले. विलासने त्याच्या आजोबांनी सांगितलेली हकिकत कथन केली, एकदा पुन्याचे लोक आले होते, त्यात एकाने झाडावर लागलेल्या आग्या मोहोळाला गलोल मारली तर आग्यामाशा उठल्या, लोक इकडे तिकडे पळत होते. पळता पळता काही गावात पाहोचले व आमच्या घरात लपले, आग्यां घरात घुसून त्यांना चावल्या.



'तुम्हाला ते घर माहित आहे का? कितीला येते? आम्हाला पन तसे घर घ्यायचे आहे. आम्ही येथे येऊन त्यात मुक्काम करू'! मागे पुन्याचे लोक आले होते. त्यांनी दोन घरे तयार केली, एकात आम्ही झोपलो होतो'. 
'तसे लहान घडीचे तंबू सात आठशे रूपयांपासून मिळतात! काय करायचे घेऊन, त्याचा तितका उपयोग होईल का'? निलेशला काही बोध झाला नाही. इतका खर्च त्याच्या कुटुंबियांच्या आवाक्यात असेल असे वाटत नव्हते, त्याच्या निरागस प्रश्नांना कारूण्याची झालर वाटत होती. 
आमच्या सोबत एक डॉक्टर आहे हे त्याला कळाले होते, त्याने थेट प्रश्‌न केला, बाबांचा पाय लई दुखत हाये, तुम्ही तपासाल का? डॉक्टरांनी तो कापायला सांगितला आहे. त्याच्या बोलण्यात अतिश्योक्ती वाटत होती. डॉ. गोसावींनी त्याला बघतो असे सांगितल्याने त्याच्या चेहर्‍यावर समाधानाने हास्य उमटले, क्षणभराचीच ती प्रतिक्रीया लाखमोलाची ठरली होती.


Add caption

१०-३८ वाजता आम्ही नेढे सोडले आणि पश्चिम बाजूच्या पायवाटेने शिडक्याला वळसा मारून पंधरा मिनीटात वरच्या सपाटीला पोहोचलो. नेढ्या पासून वरच्या बाजूची उत्तर बाजू पर्यंत पसरलेल्या या लहानशा सपाटीतच मोहनदरी किल्ल्याचे अवशेष आहेत. हा खरे तर टेहाळणीसाठी वापरात असावा. वरच्या भागात उधवस्त तटबंदी अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहे. पाण्याची कातळात खोदलेली जुनी टाकी ठिकठीकाणी असून वाड्यांची जोती मोठ्या प्रमाणावर दृष्टीस पडतात. आज घडीला एकाही टाक्यात पाणी टिपूसभर सुद्धा शिल्लक नव्हते. सगळी टाकी, गाळ मातीने भरलेली. पावसाळ्यात यात मुळातच फार थोडे पाणी साठत असावे जे भाद्रपतानंतर किती महिने टिकत असेल कुणास ठाऊक?
मोहनदरवर इतक्या मोठ्या संख्येने पाण्याची कातळात खोदलेली टाकी बघून वाटते की, त्यावरून तिथे सैन्याचा उपयुक्त राबता नेहमी असावा असे वाटते. आज ही सगळी टाकी गाळाने बुजली आहेत. पुरातत्वीय संशोधनाच्या अंगाने या टाक्यातला गाळ अगदी काळजीपूर्वक काढून संशोधन केले तर गत काळातील नाणी अथवा ऐतिहासिक महत्वाच्या काही गोष्टी किंवा वस्तुंचे अवशेष त्यात सापडू शकतील व या गडासंबंधी इतिहासातले महत्वाचे दुवे सापडण्यास मदत होऊ शकते. अती उत्साही दुर्गसंवर्धकांची दृष्टी फेरण्याच्या अगोदर हे कार्य दुर्ग संशोधकांनी अथवा पूरातत्व विभागाने करण्याची आवश्यकता आहे.

केम पासून सुरू होणार्‍या सातमाळा रांगेतील तौल्या, अचला, अहिवंत, सप्तश्रृंगी, मार्कंडेय, रावळ्या जावळ्या, लहान-मोठा बंड्या, धोडप, इखारा, लेकुरवाळा, कांचना, बाफळ्या, कोल्ह्या, कोळधेर, राजधेर असा भला मोठा विस्तार डोळ्यात समावत होता. सेलबारी-ढोलबारी रांगेतले काही किल्ले ओळखण्या इतके स्पष्ट दिसत होते. तर कण्हेरगड, कळवणची मोठी भिंत, प्रेमगिरी, ढोर्‍या, चौल्हेर, दीर-भावजई अशा कितीतरी डोंगरांच्या दर्शनाने मन हरखून जात होते.


भरपूर प्रमाणावर विखूरलेल्या इमारतींच्या भग्नावशेषांवरून येथे महत्वाचा सैन्य राबता असावा असे वाटते...

गडमाथ्यावर गवताचे पाते सुद्धा शिल्लक दिसले नाही. याचा अर्थ चराई किंवा घास कापून नेल्या स्पष्ट होत होते. लांबून एक गाय दिसली, पण ती आमची चाहूल लागल्याने लगेचच गुडूप झाली. वरच्या भागात झुडपाच्या नावाने करवंदा सारखी भासणारी पण मोठ्या पानांची झुडपे चैत्र पालवीमुळे हिरवीकंच भासत होती. ही आळवाची झाडे आहेत, त्यांची फळे आम्ही खातो असे विलासने सांगितले. संपुर्ण पठारावर करवंदाचे एकच झाड दिसले बाकी सगळे आळवाच्या लहान झुडपांचेच राज्य. याची पाने सुद्धा गुरे खात असावीत, अन्यथा आळवाची झाडे चांगली फोफावतात. पिवळ्या धम्मक डोंगरावर खालच्या बाजुला कुठे गर्द हिरवी झाडे तर कुठे झाडांना लालस, गुलाबी पालवी अशी संमित्र रंगसंगती मन सुखावत होती. 


उत्तर बाजूची तटबंदी

गडाच्या उत्तर टोकावरून भर उन्हात आमची उतराई सुरू झाली. आता आम्ही खालच्या टप्प्यावर आलो होतो. माथ्यावरून इथवर पोहोचायला सात आठ मिनीटे पुरेसे. कातळाच्या पातळ धारेचे हे उत्तर टोक, मोहनदरी हा एक डाईक आहे याची साक्ष देत होते. डाईक, अर्थातच ज्वालामुखीय उद्रेकातून तयार झालेली डोंगराची पापडा सारखी भासणारी भली लांब अशी पातळ धार आणि कातळाची ठोकळ्या ठोकळ्यासारखी रचना. सह्याद्रीत अशा अनेक डाईक प्रसिद्ध आहेत. कळवण परिसरात अनेक ठिकाणी डाईकच्या अश्म रचना, त्यातली धोडपची रचना ही सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण. याबाजूने डोळ्याच्या सरळ रेषेत ही कातळ भिंत एखादा सुळका भासत होती. येथे काही मधमाशा कानावरून सारख्या घोंघावत होत्या. काही धोका तर नाही, याचा अदमास घेत असाव्यात. सवयी प्रमाणे कोणीही त्यांना हटकले नाही, विलासला हे फार आवडले, 'माशीला मारलं की, त्या धावतात, त्यांना मारायचे नाही'. कड्यावर आणखी काही पोळी नजरेस दिसत होती. 
उन टिपेला होते, मग ते जाणवत का नव्हते? या प्रश्नाचे उत्तर आम्हाला या ठिकाणी सापडले. जोराचा वारा सुटला होता. जोर इतका की, सगळ्या अंगाला वार्‍याचा स्पर्ष जाणवत होता. पाऊस येण्याच्या अगोदर सोसाट्याचा वारा सुटतो तसा हा सोसाट्याचा वारा आमची सोबत करत होता. ही शूभ चिन्ह होती. पाऊस आज गाठणार! हे निश्चीत झाले होते. अंगाची लाही लाही करणार्‍या शरीराला पाण्याचा थंडावा मिळावा तर तो एखाद्या गडावर किंवा गडाच्या परिसरात. आज हे भाग्य आमच्या वाटेला येण्याची शक्यता होती. इथून पंचवीस मिनीटात मोहनदरीच्या सभामंडपात येऊन आम्ही दुपारच्या जेवणाची तयारी केली. सोबतच्या लहान गॅस शेगडीवर पाण्याच्या आधणासोबत अर्ध्या तासाच गरम जेवण तयार झाले. गावच्या मुलांसोबत गप्पा आणि जेवण असे आनंदाचे क्षण होते. विलासने त्याचा मित्र निलेशला कैर्‍या घेऊन यायला सांगितल्या. त्या कैर्‍या त्याने निष्णातपणे सोलल्या व त्यावर मिठ भूरभूरले. जेवणाला कैर्‍यांच्या चवीची सोबत लाभली होती.


येथे तटाचे मजबूत बांधकाम असावे...पाठीमागे प्रेमगिरी, मोठी भिंत, ढोर्‍या, धोडप असा संपन्न पसारा

इकडे विलास घरी जाऊन वडिलांना घेऊन आला. त्यांचा पाय एकदा मुरगळला होता. स्थानिक उपचार केल्याने तो बरा न होता गुडघ्याच्या वर पर्यंत त्रास सुरू झाला. वरच्या नसा आखडून गेल्या व चालणे दुर्भर झाले. डॉ. गोसाविंनी नाशिकमध्ये कोणत्या ठिकाणी उपचार होऊ शकतील याची माहिती दिली व नाशिकला आल्यावर संपर्क करायला सांगितले. प्रधानमंत्री जन धन योजनेचे कार्ड त्यांनी काडले होते, त्यामुळे पाच लाखांपर्यंतचा त्यांचा औषध उपचारांचा खर्च मोफत होऊ शकणार होता. प्रश्न असा आहे की, त्यांचा हा विमा सहजतेने मंजूर होईल का? नाही तर सरकारच्या अनेक चांगल्या योजना कागदावरच शेाभतात!





निम्मी सातमाळा तर मोबाईलच्या कॅमेर्‍याने टिपली आहे...साध्या डोळ्यांनी कोळधेर, राजदेर पर्यंतचे दर्शन घडत होते

अजूनही शाबूत असलेला तटाचा भाग...

या टाक्यातले पाणी पावसानंतर काही महिने तरी उपलब्ध राहते

तटबंदी चे अवशेष...

आशिष शिंपी, डॉ. अशोक गोसावी

मोहनदरला हवीय देवराई आणि वर्षभर पूरेल इतकी पाण्याची साठवणूक...



लहानसे वावटळ पाऊस येणार याची आगाऊ सूचना देताना...


शेवटी कार बाजुला लाऊन पायपीट...

देवळी कर्‍हाड
दुपारचे सव्वा वाजले. आम्ही मोहनदरीला रामराम करून देवळी कराडच्या दिशेने निघण्याचे ठरवले. त्याकरिता वणी सापूतारा रस्त्याने जाणे भाग होते. किती किलो मिटर अंतर पडेल अशी माहिती, तिथे जाऊन आलेल्या ज्ञानेश्वर गांगुर्डेला विचारली, तर तो बर्‍याच वर्षांपूर्वी जाऊन आल्याने त्याला नीटसे आठवत नव्हते. आठ किलो मिटर असे असे त्याने सांगितले. वणी चौफुली वरून खडी टाकलेला रस्ता सुरू झाला. गुजरात राज्य मार्गाचे काम सुरू होते. आठ किलो मिटर्सचाच प्रश्न असल्याने आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला. बारा किलो मिटर झाले तरी देवळी कर्‍हाडकडचे वळण सापडण्याची चिन्ह दिसेना. एक दोन ठिकाणी थांबून विचारले तर, तिथे मंदिर बघायला जाताय? त्यासाठी इतका आटापिटा? अशा प्रतिक्रीय ऐकायला मिळाल्या. अगोदर घागबारीचा फाटा लागेल, तिथून डाविकडे भनवड तर थोडे पुढे गेल्यावर खडी क्रशर लागेल त्या रस्त्याने खिरीड, पळसदरा, मोहपाडा सोडून पुढे जायचे. माहपाड्याकडे न जाता त्याच्या अगोदर वळण घ्यायचे. या प्रत्याक टप्प्यावर आमची थोडी थोडी चुकामूक झालीच, परंतू सजगता बाळगल्याने आम्ही लगेच वाट दुरूस्त करत होतो. हा आतला रस्ताही सर्वत्र खडवण टाकून नव्याने तयार केला जात होता. एके ठिकाणी गाडी पूढे जाऊ शकत नाही, अशी स्थिती होती तेव्हा गाडी रस्त्याच्या कडेला लाऊन पायीच देवळी कर्‍हाडकडे प्रस्थान केले. अर्थात हे अंतर किलोमिटरभर होते त्यामुळे फार त्रास जाणवला नाही. 
देवळी कर्‍हाडचे शिवमंदिर लांबून दिसत होते त्यावरून त्याची भव्यता लक्षात येत होती. या भागात सह्याद्रीचे वेगळेच रूप बघायला मिळत होते. तौल्या-आतळ्या (अचला) सोडले तर एकही ओळखीचा डोंगर दिसत नव्हता. 


कराडेश्वर मंदिराच्या प्रांगणातला हा विशाल पिंपळ...

देवळी कर्‍हाड आणि वडाळी हटगड अशी ही दोन गावांची मिळून ग्रामपंचायत आहे. इथून हाटगडचा किल्ला दहा किलो मिटर अंतरावर आहे. हटगड किल्ल्याच्या पायथ्याचे हाटगड सोडून हटगड नाव जोडलेली परिसरात दरेगाव हाटगड, करंभेळ हाटगड अशी आणखी तीन गावे हाटगड नावाचा महिमाच कथन करतात. 
केमच्या डोंगरावर उगम पावणारी गिरणा नदी देवळी कराडला कवेत घेऊनच पुढे सरकते. या नदीच्या काठावर कुठल्या राजवटीत हे सुंदर मंदिर बांधले या संबंधात कोणतीच माहिती मिळू शकली नाही. मंदिराची शैली मला सिन्नरच्या गोंदेश्वराशी मिळती जुळती वाटली. अर्थात प्रवरेच्या आणि गोदावरी नदीच्या काठावर जशी पुरातन काळात शिवमंदिरे बांधण्यात आली, त्याच धर्तीवर गिरणेच्या काठावरचे हे शिव मंदिर असावे. मंदिरातील कराडेश्वराचे जुने शिवलिंग भंग पावल्यामुळे अलिकडच्या काळात नविन शिवलिंग स्थापन करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे नंदि, गणपतीच्या नव्या मुर्ती कातळात घडविण्यात आल्या आहेत. शिव-पार्वतीची जुनी मुर्ती अजूनही गाभार्‍यात आहे. मंदिराच्या प्रशस्त आवाराला सिमेंट कॉंक्रिटचे कुंपण तयार करण्यात आले आहे. भव्य आकाराच्या प्रांगणात सर्वत्र पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. सुंदर अशा पुरातन मंदिराच्या कातळ कोरिव नक्षीकामाशी ते अजिबात मेळ खात नाहीत. हल्ली अत्यंत कमी पैसा पर्यटन विकासाठी मंजूर होतो आणि त्यातून जी कामे होतात ती तात्पूरती मलमपट्टी ठरत आहेत. मंदिराच्या बाहेर जुना पिंपळाचा वृक्ष वीस मिटर तरी फैलावलेला असावा. इतका पसरलेला पिंपळ प्रथमच बघायला मिळाला. जी कहाणी मोहनदरीची तीच कथा देवळी कराडची - ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची अन शेतीच्या पाण्याची समस्या. येथे उन्हाळ्यात मोठ्या मुष्किलीने दोन चार हंडेच पाणी मिळते, बर्‍याचदा हंडा सुद्धा भरत नाही, ग्रामपंचायतीला पाणी विकत आणावे लागते. वापरण्यासाठी पाणी फारच तोकडे पडते, अशी व्यथा मंदिरात भेटलेल्या ग्रामस्थांच्या बोलण्यातून जाणवत होती.


मंदिराचे देखणे रूप बघून तिथे पोहोचण्यासाठी केलेला संघर्ष सार्थकी ठरला...

ऐन गिरणच्या काठावरच्या, चहु बाजुंनी डोंगरांनी वेढलेल्या, भरपूर पर्जन्यमान असलेल्या या गाव परिसरात जंगल बर्‍यापैकी टिकून आहे. परिसरात अनेक ठिकाणी शेती हिरवीगार दिसते. पण जिथे काही लोकांना शेतीसाठी पाणी मिळविण्याच्या खटपटी केल्या, तिथे काही पाऊसच नाही, असा निराशावादी सूर आळवणारे शेतकरी भेटले. अर्थात पावसाच्या पाण्यावरच्या पिकांनंतर आठ महिने शेतात काहीही न करणारी ही मंडळी स्वाभाविकपणे मजूरीकडे वळतात, त्यामुळे गावची पैसावारी खाशी कमी. एक मात्र मान्य करावे लागेल, हा परिसर दुर्गम व तुरळक लोकवस्तीचा डोंगरांळ असल्यामुळे येथे जंगल संपदा चांगली दिसून येते. इथल्या अपरिचीत भव्य दिव्य आकाराच्या वन संपदेने नटलेल्या सावर्‍या, देवीचा दांड, डुक्कर दांड आदी डोंगरे भटकंतीच्या नव्या वाटा उघडू शकते. 





 Sahyadri Trekkers Bloggers

1 comment:

  1. अप्रतिम लेख आणि फाटो... फेब्रुवारी मधे आम्ही सहा जन गेलो होतो. त्या ट्रेक ची आठवण झाली. आम्ही सकाळी पाच वाजता गावातून ट्रेक चालू केला होता. भल्या पहाटे आम्हाला कोणी गाइड मिळाला नाही.आम्ही गावातून टोर्च लाइट मधे नेढयाच्या दिशेने पाउल वाट शोधत चढलो होतो. वाट खुप चकवा देणारी होती.नेढयातुन सूर्योदय पाहणे हे प्रथम लक्ष होते. खुप सुंदर किल्ला आहे.पिंपळा उर्फ कंडाळ्या ला नेढे कुठे आहे आणि कसे जायचे ही अधिक माहिती मिळावी ही विनंती!!

    ReplyDelete