सुक्ष्म सिंचन...काळाचा पडदा बाजूला सारून जगवा
बिनखर्चाची जलक्रांती
जलसंकट? अखिल मानवजाती समोर उभी ठाकलेली ही समस्या; प्रत्येक वर्षी अधिकाधिक बिकट बनत जाणारी आहे. ''पावसाचे पाणी अडवायचे, त्याकरिता लहान, मध्यम व मोठी धरणे बांधायची. तलावात, तळ्यात, टाक्यात पाणी साठवायचे'', माणूस बर्याच काळापासून हे उपाय करत आला आहे, असे केल्याने जलसंकट कधी थांबले आहे का? मोठे किंवा छोटे, सगळेच कृत्रिम जलसाठे गेल्या काही वर्षांपासून कोरडे पडत आहेत. पाऊस कमी किंवा अनियमीत झाला तर या साठ्यात पाणी येणार कुठून? आणि समजा पडलाच तरी जितका पडतो त्याच्या पाच टक्के पाणी सुद्धा कृत्रिमपणे साठवणूक केले जाऊ शकत नाही, इतकी अफाट गरज माणसाची आहे. धरणे दर पावसात वाहून येणार्या गाळाने भरत आहेत तशी त्यांची पाणी साठवण क्षमता कमी कमी झाली आहे. हा गाळ उपसण्याचे जेवढे म्हणून प्रयत्न झालेत ते अल्पजीवी ठरले; कारण गाळ काढणे अव्यवहार्य आहे. 'मोफत गाळ घेऊन जा, शेतजमिन सुपिक बनवा', अशा घोषणा केल्यानंतरही गाळ खोदून काढणे व त्याची वाहतूक करून तो पसरविणे याबाबी अव्यवहार्य ठरल्याने या योजनेला फार अल्प प्रतिसाद मिळाला. तोही काही काळा पूरताच.
यंदाच्या वर्षी महाराष्ट्रासमोर जे जल संकट उभे राहिले आहे ते १९७२च्या दुष्काळापेक्षाही भिषण आहे. फरक इतकाच आहे की, ७२च्या दुष्काळाच्या वेळी खायला अन्न नव्हते, ती स्थिती यावेळी नाही. ७२च्या दुष्काळापेक्षा यंदाचा दुष्काळ आणखी एका कारणासाठी वेगळा आहे, त्यावेळेला पाणी वाहून नेण्याची साधने मर्यादीत होती, यंदा त्यात बरीच सुधारणा झाली आहे. ७२च्या दुष्काळात विहीरींना पाणी होते, यंदा विहीरींनी तळ गाठले आहे, ही चिंतेची बाब.
दुष्काळावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात अलिकडच्या काळात जलयूक्त शिवार अभियान, वॉटर कप स्पर्धा अशा विविध उपक्रमांनी जोर धरलेला दिसतो, यात गाव परिसरातील नद्या, तलाव, तळी टाकी यातला गाळ काढणे, नव्याने जमिन खोल खोदून घेणे ज्या योगे पावसाचे पाणी जास्त प्रमाणावर साठून राहील. काही ठिकाणी पाणी साठविण्यासाठी बांधही घातले जात आहेत. हजारो हात याकरिता झटत आहेत. सर्वसामान्यांपासून ते महत्वाचे, अती महत्वाचे व्यक्ती, शेतकरी, मजूर अशा अनेकांच्या सहभागातून जलसंकटावर मात करण्याची लढाई गेल्या तीन चार वर्षांपासून महाराष्ट्रात वेग घेत आहे. अल्पावधीत काही गावांना त्यामुळे पाणी मिळू लागले आहे.
जलयुक्त, वॉटर कपची कामे अशीस अखंडपणे सुरू राहो! त्याने होईल तर तो फायदाच. या दोन योजनांच्या पुढचे काय? जलक्रातीतले हे घटकमात्र आहेत. आपली पाण्याची गरज याहून कितीतरी अधिक आहे. विशेष करून शेती क्षेत्राचा विचार केला तर या उपाययोजना पुर्या पडणार नाहीत. शेती आणि जंगल या दोन अत्यंत महत्वाच्या घटकांसाठी पाण्याचा वेगळा विचार करावा लागणार आहे.
जमिनीवर पडणार्या पावसापैकी ७० टक्के पाणी समुद्रात तर ३० टक्के जमिनीवर पडते. या ३० टक्क्यांपैकी सुमारे २८ टक्के पाणी हे गोठलेल्या स्थितीत असल्यामुळे किंवा समुद्रात वाहून जात असल्यामुळे माणसासाठी सहजासहजी उपलब्ध होत नाही. 'पृथ्वीवरच्या अखिल मानव जातीला रोजच्या वापरासाठी केवळ २ टक्केच पाणी उपलब्ध आहे', अशी अभ्यासकांची निरीक्षणे उपलब्ध आहेत.
प्रभावी जलक्रांतीसाठी माणसाने बांध बांधणे, कृत्रिम जलसाठ्यांतले गाळ काढणे हे फार प्रभावी उपाय नाहीत कारण यात उर्जा, मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर खर्च होणार आहे. त्यासाठी पैसाही लागणार आहे. (जगभरातले जलतज्ज्ञ धरण, नद्यातला गाळ उपसणे हा अव्यवहार्य व पुरा न पडणारा म्हणून त्यास त्याज्य मानत असले तरी काही ठिकाणी मोठ्या कष्टाने गाळ उपसल्याने पाण्याची साठवणूक सोपी झाली आहे, एक मात्र खरे ती मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरलेली नाही. याचा अर्थ हे उपाय बंद करावे असे मुळीच नाही. ज्याने त्याने यथा मती, यथा शक्ती हे प्रयोग करीत रहावे, ते करताना एक काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे नद्या, तळी, टाकी प्रमाणापेक्षा जास्त खोल करून चालणार नाही, अन्यथा पावसाळ्यानंतर भूगर्भातले पाणी नद्यात येऊन त्यांचे बाष्पीभवन होण्याचा धोका राहील. शिवाय पाणलोटाच्या वरच्या विहरी व शेतीवर त्याचा परिणाम होईल.)
यशाचा मार्ग मोठ्या अडचणींतूनच जातो, घोर तपश्चर्येतूनच यश साध्य केले जाऊ शकते असे अजिबात नाही, त्याच्या काही वाटा सोप्या, सहज साध्यही असतात...तुम्ही त्याकडे डोळसपणे बघण्याची आवश्यकता असते. सुक्ष्म जलसिंचन हे त्यातलेच.
आपला देश फार मोठ्या प्रमाणावर मोसमी पाण्यावर अवलंबून आहे. आपल्याकडे पावसाच्या पाण्यावरचे पिक हे सगळ्यात महत्वाचे मानले गेले आहे. मोठी धरणे, बंधार्यांच्या सहाय्याने आपण केवळ दहा पाच टक्का पाणी कृत्रिमरित्या साठवून ठेवू शकतो. त्याने केवळ पिण्याच्या आणि दैनंदिन वापरासाठी लागणार्या पाण्याची काही अंशी गरज भासू शकते, ती देखिल सर्व प्रदेशाची पाण्याची समान गरज भागवू शकत नाही. शेती आणि जंगल या साठी लागणार्या पाण्याचे काय? पाऊस आणि पर्यावरण समतोल त्यावरच मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. जमिनीवर पडणार्या पावसापैकी फार मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते व फार थोड्या प्रमाणात जमिनीत मुरते. सातत्याने खालावत चाललेल्या भूजलस्तरामागचे हे एक महत्वाचे कारण आहे. अर्थात वाढलेली जनसंख्या, पाणी वापर करणारे मोठे उद्योग, जास्त पाणी लागणारी पिके आणि उद्योगधंदे ही देखिल कारणष आहेच.
रासायनिक शेती, बेसूमार वृक्षतोड, शहरे व गावात सर्वत्र पसरलेले पक्क्या रस्त्यांचे जाळे, या मुळे जमिनीत मुरणार्या पाण्याचे प्रमाण हे वाहून जाणार्या पाण्यापेक्षा कितीतरी पट कमी झाले आहे. जास्त पाऊस झाला की, नद्यां, नाल्यांना मोठमोठे पूर येऊ लागलेत, आजवर कधीही नव्हते इतके मोठे पूर अलिकडच्या काही वर्षात बघायला मिळाले. याचे कारणच जमिनीत पाणी मुरविणारी नैसर्गिक यंत्रणा माणसाने आपल्याच हातून मारून टाकली.
पाणी मुरवायचे कसे?
कुठल्याही साधनांचा व फार मोठ्या मनुष्यशक्ती शिवाय इतके अफाट पाणी जमिनीत मुरवायचे कसे? नैसर्गिक पद्धतीने? ज्याकरिता ना मोठ्या यंत्रांची ना यंत्रणांची गरज भासेल, असे काही आहे का? सुक्ष्मसिंचन म्हणजे काय?
सुक्ष्मसिंचनात सगळेच घटक नैसर्गिक आहेत! मग ते आणायचे कुठून? त्यासाठी काय करायचे. किती खर्च येणार?
जमिनीच्या जलस्तराचा विचार करताना वरील प्रश्न सतावतात, त्यावर मग जमिनीच्या जलाचे पुनर्भरण करण्याचा विचार पुढे आला. त्याकरिता नव्या इमारती बांधताना घराच्या छपरावरचे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची यंत्रणा असेल तरच बांधकाम पूर्णत्व द्यायचे असे नियम आले.
काही गावांनी व वनखात्याने आपआपल्या हद्दीत जमिनीला चर घातले, खड्डे खोदले. अटकळ ही की, पावसाचे पाणी उतारावरून वाहताने या चरात समावून जमिनीत मुरेल. खड्ड्यात पावसाचे पाणी साठूत ते सरतेशेवटी जमिनीच्या पोटात जाईल.
सु्क्ष्मसिंचनासाठी
सु्क्ष्मसिंचनासाठी कुठेही दूरवर जाण्याची आवश्यकता नाही. तुमच्या परिसरातच ते तुम्हाला करायचे आहे. झाडाखाली जो पालापचोळा पडतो ते सुक्ष्मसिंचनाचे कारखाने आहेत. त्याची ताकद बघा! जमिनीवर जो पाला पाचोळा पडलेला असतो त्याला हलवले नाही तर त्याखाली उन्हातही आद्रता राहते. हाच पाला पाचोळा झाडाखाली असेल तर तिथे त्याला सावली मिळते व झाडीच्या सोबतीने जमिनीच्या वरच्या थरातले पर्यावरण अबाधित राहते. जमिनीत ह्यूमस तयार होतो तसे एक ग्रॅम मातीत सुमारे ३३ कोटी जिवाणूंचे चलनवलन होते असा या क्षेत्रातल्या अभ्यासकांचे निष्कर्ष आहेत. या जिवाणूंच्या नित्य क्रीयांमुळे जमिनीला सुपिकता येते, जमिनीत त्यामुळे पाणी मुरायला होते. पावसाचे पाणी त्यातून जमिनीच्या आत जाते. जमिन कडक न राहतो भूसभूशीत राहते, त्यामुळे त्यातून पाणी तर मुरतेच, पण ती जास्त काळ ओली राहते, जमिन जास्त पाणी धरून ठेवते. झाडांच्या मुळ्या देखिल पाणी वाहून जाण्यास अवरोध निर्माण करतात व त्याही सतत पाणी मुरविण्यास मदत करतात. अशा ओल्या जमिनीत मग गांडूळासारखे जीव तयार होतात, तसे ते जमिनीत खोलवर जाऊन खड्डे करतात, माती सुपिक करण्याबरोबरच पाणी मुरविणारे छिद्र अहोरात्र तयार करत राहतात.
झाले काय की, बेसूमार वृक्षतोड, पाश्चात्य शेती पद्धती यामुळे आपण आपल्या हातून नैसर्गिकपणे सुरू असलेली नैसर्गिक जलसिंचनाची साखळी पिढी दर पिढी तोडली गेलो. अन्न सुरक्षा प्रदान करताना हरितक्रांतीने जमिनीच्या पर्यावरणाचे अतोनात नुकसान केले. त्यावर सुरूवातीच्या काळात व्यवस्थितपणे अभ्यास झाला नाही, पिक येतेय, म्हणून त्याकडे दुर्लक्ष झाले.
ज्याला त्याला जास्तीत जास्त उत्पन्न हवे होते. त्यासाठी वाणांचे संकर विकसीत केले गेले. त्यातून कमकूवत वाणांची पिढी येत राहीली ती विविध रोगांचा मुकाबला करण्यास सक्षम नव्हती. त्यावर नी किडींवर फावरण्यासाठी रासायनिक औषध कंपन्या सरसावल्या. त्यातून उत्प्नाची हमी मिळाली, पण जमिनीचे आरोग्य बिघडत गेले. जमिनीच्या वरच्या थराच्या पर्यावरणाचे नुकसान गुणाकार पद्धतीने वाढत गेले. सुक्ष्मसिंचन करणारी सुक्ष्म जिवाणूंची अफाट हानी अगोदर वरच्या थरात आणि मग जमिनीच्या खालच्या थरात झाली तशी भूजलपातळीत घट होत राहीली.
पूर्वी विहीरींना वर्षभर पाणी रहायचे. आता दोन, अशीचशे, तीनशे फुटाच्या विंधन विहीरींना देखिल पाणी लागत नाही. काही ठिकाणी हजार, बाराशे फुटाचे बोर घेतले गेलेत, त्यांनाही पाणी नाही.
यावर काही उपाय आहे का?
- यावर शंभरटक्के शाश्वत व कमी खर्चाचा उपाय आहे. हा बिनखर्चाचा, थोड्याशा मेहनतीचा व आयुष्यभर पूरू शकेल असा हा उपाय असेल.
सुक्ष्म जलसिंचन कशा पद्धतीने करायचे? कुठल्या संस्थेची मदत घ्यायची? सरकारी मदत कशा पद्धतीने घ्यायची?
- एव्हाना तुमच्या लक्षात आले असेल नैसर्गिक पद्धतीचे जलसिंचन हेच सूक्ष्म जलसिंचन आहे. त्यात झाडांची भूमिका अनन्यसाधारण महत्वाची आहे.
आज उपलब्ध असलेल्या झाडांच्या मदतीने ते करता येईल. दैनंदिन गरजेच्या किती पट पाणी, मुरवायचे, वेगवेगळ्या भूस्तरात त्याचे प्रमाण वेगवेगळे राहील हे त्याकरिता ध्यानात घ्यावे लागेल. किती झाडे असतील तर किती पाणी मुरेल, किती क्षेत्रातल्या नैसर्गिक शेती पद्धतीने पाणी मुरण पुरेशी ठरेल हे वेगवेगळ्या ठिकाणांसाठी वेगवेगळी सूत्रे लागू पडतील. यासाठी सरकारच्या मदतीवर विसंबून राहून चालणार नाही. त्याकडे आर्थिक देवाण घेवाणी करतात तशा दृष्टीकोनातून बघून चालणार नाही. सरकारे किंवा कुठल्या संस्था त्याकरिता पुढे येऊ शकतील की नाही ठाऊक नाही. पहिल्या प्रथम तुमचे तुम्हीच काम सुरू करावे लागेल. पाणी हा प्रश्न तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा आहे, त्यामुळे सामुहीक प्रयत्नातून, विषयाची निकड ओळखून सगळ्यांना या ना त्या प्रकारे या कार्यात झोकून द्यावे लागणार आहे. तसे नाही केले तर पाण्यावाचून नामांकीत वसाहती, गावे किंबहूना शहरातील लोकांवर स्थलांतराची वेळ येऊ शकेल. २०१९च्या दुष्काळी परिस्थितीने तसे संकेत दिले आहेत.
हे अगदी खरे आहे की, तुम्हाला फुकटाच्या जलसिंचनासाठी झाडांची आवश्यकता आहे. बहूतांशी ठिकाणी झाडे नाहीत. जिथे आहेत, तिथे आपल्याला हवे त्या प्रकारचे जलसिंचन होत असेलच असे नाही. आपल्याला काम तर करायचे आहे आणि त्याचे मोजमापही ठेवायचे आहे. त्यासाठी आपण सुरूवातीला, 'माणशी दहा झाडे', असे उद्दीष्ट ठेवू या.
झाडांच्याशिवाय तुम्हाला पाणी मिळणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे तेव्हा प्रत्येकाने दहा झाडे लावायची आणि त्यांचे पुढील पाच वर्षांसाठी संगोपन करायचे किंवा दहा झाडे निवडून त्याखाली सुक्ष्म सिंचनाचे उपाय राबवायचे. ही कामे एकट्या दुकट्याने न करता समुहाने करायची आहे. म्हणजे गाव पातळीवर, वस्ती पातळीवर, पंचक्रोशीच्या पातळीवर. 'पुढच्या पाच वर्षात आपल्या भागातले पाणी आपल्याला साठवाचे आहे, त्यासाठी आपल्याला सुक्ष्मजलसिंचनाचा आधार घ्यायचा आहे', या मुद्दयावर एक बैठक बोलावून सगळ्यांने हा प्रकार लोकांना समजून सांगायचा आहे. यात अस्तित्वात असलेली झाडे आणि नव्याने लागवड करायची झाडे असे दोन भाग असतील.
आज घडीला उभ्या असलेल्या झाडांखाली महिन्या पंधरा दिवसात एकदा पाला पाचोळी झाडलोट करून झाडाच्या घेर्यात ढकलून द्यायचा, त्यावर गाईचे शेण, गोमुत्र आणि गुळ (१+१+पावकिलो) या प्रमाणात ७२ तास १० लिटर पाण्यात मुरवून ते गाळून घ्यायचे. त्यात चार पट पाणी टाकून तयार होणारे जीवामृत झाडाखालच्या पाला पोचोळ्यावर शिंपडायचे. झाडांवर सुद्धा जमल्यास फवारायचे जेणे करून रोग, किडीवर ते उपयोगी ठरू शकेल. किड, रोग असेल तर दशपर्णी अर्क सुद्धा फवारला जाऊ शकतो.
तुम्ही संगोपनासाठी निवड केलेले झाड जंगलातले असेल तर त्यावर किडनाशकांच्या फवारणीची कसरत करायची गरज नाही, बांधावर, घराच्या जवळ किंवा गावाच्या जवळ असलेल्या झाडांवरच दशपर्णी अर्क फवारावे. आवड असल्यास जंगलात व डोंगरावर सुद्धा किड नियंत्रणासाठी हा उपाय केला जाऊ शकतो, तथापी जंगलात झाडांना सहसा फार मोठा किडीची प्रादूर्भाव आढळत नाही, असला तरी समिश्र पद्धतीची झाडे असतील तर त्याचे नियंत्रण निसर्गत: आपोआप होते, फक्त त्यासाठी काही काळ जावा लागतो. जिथे एकाच पद्धतीची झाडे लावली आहेत तिथे मात्र एखाद्या रोगरार्ईच्या सपाट्यात जंगलच्या जंगल बांधित झाली आहेत. (यंदाच्या वर्षी अती विषारी म्हणून ओळखल्या जाणार्या ग्लिरिसीडीया या वनखात्याच्या आवडत्या झाडांवर फार मोठ्या प्रदेशात रोगाचा प्रादूर्भाव झाल्याचे बघायला मिळाले.)
झाडाखालच्या पालापाचोळ्यावर जीवामृत पाण्याची सुरूवातीला दोनदा पंधरा दिवसांनी, नंतर महिन्यातून एकदा व नंतर तीन महिन्यांनी एकदा अशा स्वरूपात केलेली शिंपण आदर्शवत राहील. एका छोट्या झाडासाठी एक पेला इतके. पाच वर्षांनंतर याची काहीच आवश्यकता राहणार नाही.
सुक्ष्म जलसिंचनाचा दुसरा टप्पा अतिशय मत्वाचा आहे, यात तुम्हाला झाडे लावायची आहे. जमल्यास रोपे तयार करावी किंवा बीजरोपण करावे. बीज रोजण जास्त फायद्याचे. ज्या बिया वापरणार त्यांना हलक्या हातांनी अगोदर सांगितलेल्या जीवामृतात घोळून दुसर्या दिवशी या बिया, कोयी जमिनीत रोवायच्या. (बिया गोळा करणार असाल तर त्या सावलीत वाळविणे व माठात राख टाकून त्यात संरक्षित करणे).
साधारण बी किंवा कोय मावेल इतका अल्पशा आकाराचा खड्डा करून घ्यावा. फार मोठे खड्डे करण्यात वेळ व श्रम वाया घालवू नका.
तुमच्या समोर दहा झाडा लावण्याचे उद्दीष्ट आहे. सुरूवातीला पहिले तीन महिने आठवड्यातून एकदा पाणी टाकावे. तीन महिन्यानंतर या झाडांच्या घेर्याच्या बाहेर पाण्याची बाटली उपडी करून त्याला खाली लहान छिद्र करून त्यात सुतळी किंवा कपड्याची चिंधी लावावी. ही सु्क्ष्म झिरपण या झाडांना जिवंत ठेवण्याचे काम करील. झाड जसजसे मोठे होईल तसतशी त्याची नियमीतपणे छाटणी करावी. छाटणीचे प्रमाण झाडाच्या आकाराच्या दहा टक्क्यांच्या आतच असावे. छाटणीमुळे झाडे अधिक जामाने वाढतात. छाटणी केलेली पाने, काड्या त्याच्या बुंध्याच्या भोवती पसराव्यात व आसपासचे गवत, काडी कचरा त्याभोवती पंधरा दिवसातून एकदा झाडलोट करून गोळा करून ठेवावा. प्रसंगी पाणी द्यायला जमले नाही तरी या पालापोचोळ्यामुळे झाड पाण्याअभावी मरण्यापासून बचावते.
जिथे बाटली नसेल तिथे निरूपयोगी किंवा फु्टक्या लहान माठांचा वापर केला जाऊ शकतो. झाकणबंद डबे असतील तर त्यांतूनही सुतळी जमिनीवर सोडली तर त्याने पाणी थिबकत राहून सुरूवातीच्या काळात झाडासाठी आवश्यक असलेले पाणी कमी मेहेनतीत दिले जाऊ शकते.
कोरड्या पालापोचाळ्यात दव शोषून घेण्याची क्षमता असेत. त्यात निर्माण होणारे काही जिवाणू झाडांकरिता आवश्यक नायट्रोजन आदी घटक पुरविण्याचे काम करतात. त्यासाठी झाडाखालच्या सृष्टीला चालना देण्यासाठी हे उपाय अतिशय महत्वाचे आहेत.
तसे बघितले तर माणशी दहा झाडे लावायचे आणि त्याची पाच वर्षे देखभाल ठेवायची तर त्यासाठी तसा खर्च काहीच येणार नाही. तुम्ही राहतात त्याठिकाणापासून सुरूवात करावी. तिथून पुढच्या टप्यांवर झाडे लावण्यासाठी जागा निवडत तुमच्या निवासाच्या किंवा शेताच्या चौफेर सुक्ष्म जलसिंचनाचे कारखाने तुम्हाला वसवायचे आहेत म्हणजे तुमच्या वस्तीच्या फार मोठ्या परिसरात पाणी मुरेल तसे आसपासच्या जलस्त्रोतांना आणि शेतीला त्याचा लाभ होईल.
कोवळी झाडे जनावरे खाऊन फस्त करू शकतात. जोराच्या वार्यात झाडे उखडू शकतात त्याकरिता उपयोगात नसलेल्या काठ्या, बांबू, गज, तारा, बल्ल्या ते अगदी प्लास्टिकचे पाईक असा कशाचाही वापर केला जाऊ शकतो. त्याला वापरात नसलेले कापड गुंडाळले (जसे वापरात नसलेल्या साड्या, बारदान, निरूपयोगी पोती इत्यादी. त्यामुळे बकर्या, गाई आदी गुरांपासून त्यांचे रक्षण करता येईल. हे झाड रक्षक साडे पाच फुटांचे तरी असावे. अर्धा फुट जमिनीत गाडल्यानंतर ते पाच फुट उभे रहावे.
वृक्षपंचायत
तुम्हाला तुमच्या वस्ती पातळीवर, गाव पातळीवर, पंचक्रोशीत संपुर्णपणे कुर्हाडबंदी करावी लागेल. 'कुर्हाड आली की पाणी गेले', त्यामुळे कुठे नियम करून, कुठे आणाभाका घेऊन तर कुठे देवाच्या नावाने किंवा समाजातील थोर पुरूषांच्या नावाने आव्हान करून शंभर टक्के वृक्षतोड बंदीचा निर्णय अवलंबिणे व प्रसंगी याचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई करावी. याकरिता गाव पातळीवर वृक्षपंचायतीचे गठन करावे. त्यात सरपंच, विविध जाती समुहाचे सर्व वयोगटाचे प्रतिनिधी यांची निवड करावी. दर दोन किंवा तीन वर्षांसाठी हे मानाचे पद असावे. या समितीने आपल्या भागातील वृक्षांची गणना करून त्यावर देखरेख ठेवण्याचे काम करावे. सर्व प्रकारची झाडांची छाटणी, फांद्या तोडणे, काटक्या गोळा करणे यासारखी कामे वृक्षपंचायती मार्फत केली जावीत. त्यावर देखरेख ठेऊन त्याचे सर्पण, कुंपण आदी कांमांसाठी लोकांना उपलब्ध करून द्यावे. त्याकरिता शक्यतो कोणतीही रक्कम आकारू नये. ज्यांनी मागणी केली असेल त्यांना मोफत उपलब्ध करून द्यावेत.
गावात डोंगरदेव, होळी आदी झाडे जाळण्यासंबंधीचे उत्सव असतील तर मोठे झाड कापून ते जाळण्यावर पूर्ण प्रतिबंध करावा, त्याऐवजी वृक्ष पंचायतीने छाटणी केलेल्या झाडाच्या काटक्या, गवत किंवा गोवर्यांचा वापर करावा.
गावात धार्मिक उत्सव असेल किंवा विवाह आदी समारंभासाठी मंडप बांधताना झाड तोडून त्याच्या बल्ल्या वापरण्याची पद्धत असेल तर त्या वापरण्यावर शंभरटक्के प्रतिबंध करावा. गावची गरज भागविण्यासाठी गरजेनूसार काही बांबूची बेटाची लागवड करावी. तीन वर्षात पन्नास ते सत्तर फुटांपर्यंत बांबू वाढतो, त्याचा वापर मांडव आदी कामांसाठी करावा, तसेच टोपल्या, पाट्या, सुपं, गोठ्यांचे, घरांचे छप्पर आदी कामांसाठी तीन वर्ष पूर्ण झालेल्या बांबुवर धूराची अथवा वाहत्या पाण्यात आठवडाभर भिजविण्याची प्रक्रिया करावी म्हणजे असा बंबू दीर्घ काळ टिकेल व त्याला सहजासहजी किड लागणार नाही.
गावाने स्वत:च्या वापराकरिता बांबु लागवड केले तर त्याच्या तोडण्यास कायद्याने बंदी नसल्याने मुक्तपणाने त्याचा रोजच्या गरजांसाठी वापर करता येईल.
''संपूर्ण कुर्हाडबंदी, नव्या वृक्षांचे रोपण, त्यांची देखभाल, जीवामृताची नियमीत शिंपडण आणि नानाविविध प्रजातीची झाडे'', अवघ्या पाच वर्षांच्या कालावधीत तुमच्या कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणावर तुम्ही सुक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पाणी तुमच्या गावाच्या आसपास जमिनीपासून अगदी जवळ उपलब्ध केलेले असेल. याने नद्या, झरे, ओहळी जास्त काळ प्रवाही राहतील शिवाय विहीरींना पाणी राहील, हापशांना पाणी मिळेल. कृत्रिम पद्धतीने धरण, बंधारे, तळी, टाक्यांच्या तुलनेत हा उपाय शाश्वत व कायमस्वरूपी उपयोगाचा.
काही डोंगरपठारावरची गावे व शहरे असतील तर तिथे पाणी टिकत नाही अशा ठिकाणी स्वत:च्या उपयोगापूरते जलसाठे निर्माण करावे लागतील पण त्यासाठी वृक्षारोपण आणि सुक्ष्मजलसिंचन या सारख्या उपायांना फाटा देऊन चालणार नाही, कारण तुमच्या प्रयत्नांमुळे खालच्या भागात पाणी पोहोचणार आहे. झरे, ओहळी, नद्यांवर आसपासचे दगड गोळा करून त्यांचे बांध घालावे. त्याला सिमेंट कॉंक्रिट लावण्याची कोणतीच आवश्यकता नाही. नुसती माती दाबून टाकावी. कालांतराने या बांधाच्या भेगात माती बसेल तशी वाहते पाणी थोपवून धरण्याची क्षमता वाढेल. शिवाय पाण्याचा स्त्रोत प्रवाही राहील, तो दुषित होण्याचा धोका राहणार नाही. खालच्या उताराच्या ठिकाणी त्याचा लाभ होईल. याकरिता पायथ्या पासून माथा अशा क्रमाने कच्चे बांध आणि वृक्षारोपण करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून डोंगराच्या पायथ्याला त्याचा लाभ मिळेल.
याच्या दुसर्या लाभाकडे तुम्हाला लक्ष द्यायला हवे. झाडांमुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर फळबहार उपलब्ध होईल जो तुम्हाला व तुमच्या मुलाबाळांना अतीशय उच्च दर्जाचे अन्नस्त्रोत म्हणून अगदी फुकटच उपलब्ध होईल. वृक्ष पंचायतीमार्फत फळबहार काढून त्याची गाव पातळीवर प्रत्येकाला वाटणी करता येईल व अतिरीक्त बहार विक्री करून त्याने वृक्ष व जलसंधारणासाठी काही प्रमाणावर निधी उपलब्ध करता येईल. काही औधषी महत्वाच्या झाडांचा पाला, फुले, फळे, शेंगा, साली यांची आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधने बनविणार्या उत्पादकांना विक्री करता येईल. हे करताना झाडांना कायमस्वरूपी इजा होणार नाही याची काळजी घेऊन मर्यादीत प्रमाणावरच झाडांच्या अवयवांची काढणी करण्यात यावी. याकरिता देवराईचा पुरातन कायदा वृक्षपंचायतींनी अंमलात आणावा.
छाटणी, काढणी, निगा राखणार्यांना रोख रक्कम देण्याऐवजी, झाडांपासून मिळणारा फाटा, बहार आदींचा वाटा निर्धारीत करून द्यावा. यासाठी काहीजण सेवा कार्य म्हणून सूद्धा सहभाग घेण्यास तयार होऊ शकतील. अशांना प्रोत्साहीत करणे, मानसन्मान देणे या गोष्टींचा अवलंब करावा. यात एका गोष्टीचे कसोशीने पालन व्हावे ती म्हणजे झाडांचा निम्माच फळबहार मानवाने वापरावयाचा आहे व उर्वरत झाडांवर तसाच राहू द्यायाच आहे. त्याचा उपयोग सृष्टीतले प्राणी, पक्षी करतील तसे निसर्गाचे चक्र तुमच्या परिसरात कायम राहील. झाडांमुळे अनेक पक्षी येतील तेव्हा शेतावर येणार्या अळ्या व किडींचा बंदोबस्त करणारी यंत्रणा तुमच्या दिमतीसाठी हजर असेल. नव्वद टक्यांहून अधिक पक्षी हे मांसाहारी आहेत. ते तुम्या पिकांपेक्षा किटके खाण्याला पसंती देतात. समजा काही शाकाहरी पक्ष्यांची संख्या वाढली तर तुमच्या परिसरात असलेल्या वृक्षांमुळे शिकारी पक्षी येऊ लागतील. मोठाल्या झाडांवर त्यांना निवासाला जागा मिळू शकेल म्हणजे निसर्ग कुणा एकालाच वाढू देणार नाही. त्याची स्वत:ची नियंत्रण यंत्रणा आहेच!
गाव पासून, घरापासून सुरू झालेली सु्क्ष्म जलसिंचनाची योजना हळू हळू गावच्या डोंगरांवर पायथ्या पासून माथ्या पर्यंत, दरी, घाटात अशी तुम्ही पाहिजे तितकी विस्तारू करू शकता. एका माणसाला दहा झाडे संगोपन करण्यासाठी फार मोठे उद्दीष्ट नसेल अन्यथा ब्रम्हपूत्रेच्या काठावर जादव पायेंगने एकट्याने ५०० हेक्टरचे जंगल बीज रोपणातून तयार केले व त्यात पट्टेदार वाघ, एक शिंगी गेंडा अशा दुर्मिळ प्राणी प्रजातीपासून असंख्य जीवांना आश्रय लाभला.
आपल्या संस्कृतीत वृक्ष हा देव मानला आहे तो मानवाच्या कल्याणासाठीच. वड, पिंपळ, उंबर ही झाडे तोडणे घोर अपराध व पापकारक मानले आहे त्यामागे देखिल सृष्टीचे व मनुष्याचे कल्याण ही महत्वाची भूमिका राहिली आहे. या वृक्षांच्या खालची माती ही जिवाणू माती म्हणून निसर्गशेतीजगतात त्यास अनन्यसाधारण असे महत्व आहे. देव वृक्ष यांनाच तर म्हणतात, त्याकडे निव्वळ धार्मिक थोतांड म्हणून बघितले जाऊ नये.
या संपूर्ण प्रक्रियेत गाय हा सगळ्यात महत्वाचा प्राणी आहे याचे कारण गायीच्या शेण, गोमुत्रात असलेली अनन्यसाधारण अशी नैसर्गिक रसायनांची जंत्री आणि त्याची असाधारण अशी रोगनिवारक क्षमता.
पाणी तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच हवे आहे. पाऊस पाडणे आपल्या हातात नाही, पण पाऊस पडावा व जमिनीचे जलस्तर राखले जावे हे आपल्याशिवाय इतर कुणाच्याही हातात नाही. माणूस देवभोळ्या वृत्तीचा असला तर तो अशा उपक्रमांकरिता सहजच पुढे येईल. काही मंडळी कदाचित येणार नाही. काहींना शारिरीक व्याधी असू शकेल अशांच्या वाट्याच्या दहा झाडांची जबाबदारी कुणीतरी उचलावी. वृक्षपंचायतीकडे त्याची नोंद करावी. जास्त प्रमाणावर वृक्षांचे संगोपन करणार्या, वृक्षतोडीवर कसोशिने नजर ठेवणाचे असाधारण कार्य करणार्यांचा जाहीरपणाने सन्मान व्हावा व गावाच्या मंदिरात किंवा समाज मंदिरात 'वृक्षश्रीं'ची नावे बोर्डांवर रंगवावीत....श्रीयूत....यांनी...तारखे पासून...तारखे पर्यंत विक्रमी...झाडांचे संगोपन केले. लाकूड तोड्यांपासून झाडे वाचविलीत...
शेताच्या बांधावर जगात अनेक ठिकाणी मोठमोठाली झाडे आहेत. पिकांचे अन्न हे जमिनीच्या वरच्या दिड दोन इंचातच आहे. त्यासाठी शेतात सेंद्रीय कर्ब जेवढा म्हणून राखाल तितके पिकपाणी निरोगी राहील. सेंद्रीय कर्बाचे महत्व तर पाश्चात्य शेतीतज्ज्ञ देखील मान्य करतात. मोठाली झाडे उभी राहण्यासाठी त्यांच्या मुळ्या झाडांच्या उंचीच्या पाचपट अधिक खोलवर नेतात, तेव्हात ते वादळ वार्यात तगू शकतात. शेतातल्या पाण्याची त्यांना गरज नसते, त्यांचे पाणी जमिनीच्या वीस मिटरच्या खाली असते. उलट त्यांचा पालापाचोळा शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असा सेंद्रीय कर्ब उपलब्ध करून देतो.
झाडांच्या घेर्या खालची मातीही सर्वात सुपिक व उपयुक्त जीवाणूंनी युक्त असते याचा उपयोग शेती पिकांसाठी अनन्यसाधारण महत्वाचा आहे. सशक्त पिक घ्यायचे तर जीवामृत तयार करताना अशी सजीव माती उपयोगाची ठरेल. बांधावरच्या झाडांमुळे शेतात सावली, आडोसा व थंडावा तर राहतोच शिवाय झाडांमुळे शोभा येते. फळबहार तर अमापच मिळतो हा लाभ निराळा.
ढग डोंगरांशी सोयरीक करतात. तेव्हा डोंगरांवरचे वृक्ष तुमच्या परिसरात वर्षभर विहीरींना व जलाशयांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सगळ्यात महत्वाचे ठरते. सुदूर जंगलातले झाड निरूपयोगी कधीच नसते. ते तुमच्यापर्यंत पाणी आणणारी यंत्रणा असते. त्यामुळे गावापासून दूर जाऊन झाड तोडणे म्हणजे आपल्या लाखमोलाच्या जीवावर घाव घालणे. दूर अंतरावरचे झाडच तुमच्यापर्यंत जमिनीखालून पाणी आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावत असते. डोंगरावरचे झाड तर कधीच तोडू नये. डोंगरावर पाऊस जास्त पडतो, पाणी दीर्घकाळ प्रवाही ठेवण्यासाठी ही झाडे महत्वाची भूमिका बजावतात. तिथे जमिनीत पाणी मूरू दिले तर ते खाली वाहत तुमच्या पर्यंत पोहोचते.
सह्याद्रीत डोंगरभटकंती करताना आम्हाला पाच दहा टक्केच डोंगरावर थोडी फार वृक्षसंपदा दिसून आली, ती पन्नास टक्क्यांवर आणण्याचे उद्दीष्ट तुम्हाला ठेवावे लागेल, त्याने तुमच्या मुलाबाळांना आणि पुढच्या सगळ्या पिढ्यांना पाण्याची कधीच दादात राहणार नाही. तुमच्या शेतीला पाण्याबरोबरच अनेक महत्वाचे घटक मिळविण्याची फुकटची सोयच त्यामुळे उपलब्ध होईल.
एक नियम कसोशीने पाळला जावा, तो म्हणजे झाड पाच वर्षांपेक्षा मोठे झाल्यावर त्याच्या भाराच्या वीस टक्के इतकाच भार छाटणी करून काढून टाकावा. मोठ्या फांद्या तोडू नये. वाळवी लागली असेल किंवा वीजेच्या तारांना, घराच्या छपरावर, मंदिराच्या छपरावर अडसर असेल तरच धोकादायक, तुटण्याच्या बेतातल्या फांद्या छाटाव्या.
तुमच्या मुलाबाळांवर असे संस्कारच होऊ द्या, झाड कधीच तोडायचे नाही. त्याचे उत्पन्न घ्यायचे, म्हणजे फळे, फुले अणि मर्यादित प्रमाणावर सर्पण. झाडा लावा....त्यांना जगवा...त्यांचे संवर्धन करा!
बिनखर्चाच्या...थोड्याशा मेहनतीच्या जुन्याच असलेल्या नव्या जलक्रांतीसाठी तुम्ही सज्ज आहात?
तुम्ही संगोपन केलेले झाड पाच फुटांचे झाले तर त्यापासून पहिल्यावर्षी एक टॅंकर इतके पाणी जमिनीत मुरेल. ते तुम्हाला नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतातून मिळेल. दरवर्षी झाड जसजसे मोठे होईल, तसतशी त्याची सुक्ष्मसिंचन क्षमता वाढत जाइल. एक झाड पन्नास ते शंभर टॅंकर इतके पाणी जमिनीत मुरविण्याइतके मोठे डौलदार बनविण्याचे सर्वांनी उद्दीष्ट ठेवावे.
पंचक्रोशितली खुरटी झाडे, काटेरी झुडपे, बोर, चिंच आदी झाडे खुप उपयोगाची आहे या सारखी झाडे तोडण्याची कोणतीच आवश्यकता नाही. दोन झाडात झाडाच्या घेर्याचा अंदाज घेऊन पुरेशी जागा सोडणे. जसे आंबा, वड, पिंपळ वीस तीस मिटर घेर्यात वाढते. त्यामुळे मोकळ्या रानात जास्त अंतर सोडणे. रस्त्याच्या दुतर्फा सात आठ मिटर अंतर ठेवणे म्हणजे झाडांचा घेर पुरेसा वाढू शकेल.
आज बर्याच भागात वर्षातला बराच काळ पाण्याच्या टॅंकरचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. काही ठिकाणी एखादा हंडाच पाणी मिळते तर काही ठिकाणी दिवसा आड तर काही ठिकाणी अगदी पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही.
पाण्याच्या टॅंकरसाठी मागणी करायची. तो आला की त्यातले पाणी भरण्यासाठी झुंबड उडवायची. कुठे नद्या वळविण्याची मागणी तर कुठे धरणाचे पाणी आम्हाला द्या असा रेटा! त्यापेक्षा आपणच आपले पाणी का निर्माण करू नये!
आपल्याकडे आजही आल्या गेलेल्याला प्रथम पाणी देतात. पाणी हे सगळ्यात पवित्र असे दान मानले गेले आहे. आज आपल्यावरच पाण्यासाठी हाथ पसरण्याची वेळ यावी? हे चित्र बदलणार केव्हा?
जगात पर्जन्यछायेतल्या काही शहरांनी मोठी जलक्रांती करून स्वयंपूर्णता मिळविली आहे. आपण इतरांचेच गुणगान गाणार की, स्वत:ही काही तरी भव्य दिव्य करण्याच्या दिशेने पावले टाकणार! आपल्या दहा टक्के इतकाच पाऊस असलेल्या इस्त्रायलच्या शेती यशोगाथेचे आणि जलसंवर्धन यंत्रणाचे किती दिवस कौतूक करणार?
विदर्भ, मराठवाडा या पर्जन्यछायेतल्या भागाची पाण्याची ओरड सातत्याने वाढली आहे. जास्त पर्जन्यछायेच्या गावांनी पाण्याच्या हरेक थेंबाचा वापर करण्याचे उद्दीष्ट ठेवावे. तुमच्या घरात वापरल्यानंतरचे पाणी गटारीमध्ये जाण्यापूर्वी आठ दहा वेळा त्याचा पुनर्वापर करावा. घरात स्वयंपाकीची भांडी धूताना, अर्धेमुर्धे उरलेले पाणी फेकून देण्याऐवजी बादलीत गोळा करायचे. परसात किंवा सोसायटी, बंगल्याच्या आवारात झाडांने ते द्यायचे. काही गोष्टी धुण्यासाठी या पाण्याचा सहजपणे वापर होऊ शकतो. असे साठवलेले पाणी आठवड्यात एक दिवस पाठीवर पाच लिटरची कॅन अडकवायची. सायकल, मोटरसायकलाला पाच दहा कॅन सहज डकवून घेऊन जाऊ शकतात. कुटुंबातील आणखी काही सदस्य सोबत घ्यायचे व आपण लावलेले झाड जगविण्यासाठी एक तास खर्ची घालायचा. झाडींची गरज पाणी, जीवामृत आणि भरपूर सूर्यप्रकाश. यातील सूर्यप्रकाश सोडला तर उर्वरीत दोन गोष्टी तुमच्या हातात आहे आणि सूर्यप्रकाश आपल्याकडे मुबलकच आहे. झाडाचे ते खरे अन्न. पाणी, जीवामृत झाड जगण्यासाठी जमिनीचे पर्यावरण निर्माण करण्यास मदत करतात, तुम्हाला तीच तर काळजी घ्यायची आहे.
झाड लावताना काळजी घ्यायची, ती म्हणजे कुणाच्या खासगी जागेत परवानगी घेऊनच झाडे लावावी. काहींना जमिनीचा वापर व्यावसायीक कामासाठी करायचा असतो, काहींना आपल्या क्षेत्रात झाडे नको असतात, तेव्हा तंटे बखेडे उभे राहणार नाही याची काळजी घ्यावी, ते करता आले तर अशा जलवृक्ष संवर्धनाला अर्थ राहणार नाही. भांडण तंट्यामुळे अकारण नवी डोकेदुखी उभी न राहो!
तुमचा विठ्ठल पंढरपूरात भेटेल की नाही ठाऊक नाही, पण तुम्हा वृक्षसेवकांना तुम्ही लावलेल्या झाडाच्या आसपास तो असेल. तुमचे तुका, तुमचे माऊली, तूमचे बसवस्वामी, तुमचा वाल्मीकी, तुमचे बाबासाहेब, तुमचे शिवाजी, संभाजीराजे असे अनेक थोर महापूरूष तुम्हा वृक्षसेवाकांना तुम्ही लावलेल्या झाडाजवळ हमखास भेटतील.
५०० लोकसंख्येचे गाव असेल तर तुमच्याकडे उत्तम निगा राखलेली पाच हजार झाडे असतील, त्यातून तुम्ही कमीत कमी ५०० टॅंकर इतके पाणी जमिनीत मुरवलेले असेल. आजच्या उपलब्ध झिरपण क्षमतेत हे अधिकचे ठरेल. शिवाय हे प्रमाण दरसाली वाढतच राहील तशी तुमची पाण्यासाठी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू होईल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे पाणी तुमच्या गावच्या जमिनीखाली असेल ज्याचा थेट लाभ गावाच्या शेतीला, विहीरींना होईल. म्हणजे 'आंबा तर आंबा कोयीचेही पैसे'. आता कल्पना करा, पाच हजार ऐवजी पंधरा, वीस, पन्नास हजार किंवा एक लाख झाडे तुमच्या परिसरात असतील आणि त्यांची निगा राखली गेली, तोट पूर्ण टाळली तर? काय बिशाद की तु्म्हाला पाणी मिळू शकणार नाही.
हे कदापी शक्य नाही! लोक मानणार नाही! निम्मे लोकच सहभाग घेतील! अशा शंका मनातून काढून टाका. तुम्ही सकारात्मक होऊन सुरूवात करा.
'माणसाने कधी आपल्या सवयी बदलल्या आहेत का?' असा प्रश्न मनाला शिवू देऊ नका. इंदूर शहराचे उदाहरण बघा. तिथले लोक आजही, बार, गुटखा, तंबाखू खातात पण स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करत नाहीत. पुर्वी हे शहर सगळ्यात गलिच्छ शहरात मोडत होते. मागच्या पाच वर्षात तिथल्या प्रत्येक नागरिकाने, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकदिलाने आवाज दिली, 'आमचे इंदूर जगातले सगळ्यात स्वच्छ व सुंदर'. केवळ घोषणा देण्यावर व त्या भिंतीवर रंगवण्यावर ते थांबले नाही. त्याचा परिणाम तुमच्या समोर आहे. इंदूर हे निशंशय भारतातले सगळ्यात स्वच्छ शहर आहे. शहरातले लाखोलोक एक विचार घेऊन एकत्र आले असा चमत्कार तुम्ही का नाही घडवू शकत.
तुमचा गावकूस आणि पंचक्रोशीतल्या डोंगरांना जगात सगळ्यात सुंदर, वृक्षसंपन्न बनविण्याचा विचार मनात रूजवा व तो प्रत्यक्षात साकारण्यासाठी तुमचे उभे आयुष्य वेचण्याचा विचार मनात आणा, तुम्हाला पाण्यासाठी स्वयंपूर्ण होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही,
त्याचे पुढचे पाऊल म्हणजे घातक कृत्रिम रसायनविरहीत शेतीचे तुम्ही पाईक व्हा...विषमुक्त अन्नाचे हकदार व्हा!
आपल्याकडे नद्या हिमालयातल्या नद्यांप्रमाणे बारमाही नाहीत. पावसाळ्याच्या चार महिने व त्यानंतर दोन एक महिने त्यांना पाणी राहते. जमिनीत सगळ्यांनी पाणी मुरवले तर नद्या आणखी काही महिने जास्त प्रवाही राहतील. जमिनीखालच्या 'नद्या' डोळ्यांनी दिसणार नाहीत, त्यांचे पाणी मात्र नेहमीच उपलब्ध राहील, हाकेच्या अंतरावर!
मोठ्या शहरांसाठी...
मोठ्या महानगरातील लोकांना संख्येच्या तुलनेत झाडे लावण्यासाठी कदाचित जवळची ठिकाणे उपलब्ध होणार नाही. त्याकरिता थोडे दूर जावे लागू शकते. घरा जवळचे रस्ते, बगिचे यांच्या किनार्यावर मोठाली झाडे हमखास लावली जाऊ शकतात. शहरातल्या सगळ्याच रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावली जाऊ शकतात. इतकेच काय तुमच्या कार्यालया समोर किंवा दुकाना समोर तु्म्ही झाड लाऊ शकतात. अगदी रहदारीच्या रस्त्यांच्या दुतर्फा अनेक ठिकाणी जुनी, मोठाली झाडे आहेतच, मग नव्यानेही लावली जाऊ शकतात. महामार्गांच्या दुतर्फा झाडे लावली जाऊ शकतात. त्याने प्रवास करताना मिळणारी सावली आणि रस्त्यांच्या सौंदर्यात पडणारी भर काय वर्णावी! आपल्याच प्रयत्नांनी पाणीच पाणी निर्माण करू शकलो तर? स्वप्नवत वाटते, पण अशक्य नक्कीच नाही. हे पाणी केवळ पाणी नसेल, ते असेल प्रगतीचे दार. व्यापार, उद्यमाला त्याने चालना मिळेल. कित्येक उद्योग त्याच्या मुळे बहरतील. याचे लाभ अमर्याद!
तुमच्यासाठी आरोग्य जीतेपणीच. स्वर्गही जीतेपणीच!
टीप:
यातील एक शब्द सुद्धा माझा नाही. विविध शेती तज्ज्ञ, वनांचे संवर्धक, थोर शास्त्रज्ञ, संतसाहित्य यातील उपयूक्त माहितीचे संकलन करून मी फक्त वाढप्या प्रमाणे तुमच्या समोर माहिती वाटायला आलो आहे. तुम्ही हा प्रसाद मनोभावे ग्रहण करा. सकारात्मक होऊन कार्य करा. यश तुमचेच.
- तुमच्या मातापित्यांचा जयजयकार
या राष्ट्राचा जयजयकार,
भरतभूमीचा जयजयकार.
संदर्भ:
भावार्थ दीपिका,
अमृतानूभव,
चांगदेवपासष्ठी,
बृहतसंहिता,
वृक्षायूर्वेद,
ज्ञानदेवांच्या वनश्रीतील पर्यावरण, गजानन खोले
Tending The Earth, Winin Periera
The One-Straw Revolution, Masanobu Fukuoka
गतीमान संतुलन, दिलीप कुलकर्णी
व्याख्यान:
१) पद्मश्री सुभाष पाळेकर, शुन्य खर्चाच्या शेतीक्रांतीचे प्रणेते.
२) डॉ. अरूण देशपांडे, शेती बॅंकेचे प्रणेते.
३) जीतूभाई कुटमुटिया, जीवनव्रती कार्यकर्ता
४) ज्ञानेश्वर बोडके, अभिनव फार्मर्स,
वृत्तवाहिनीवरच्या मुलाखती:
संजय पाटील, बायफ,
राहीबाई पोपरे
बिनखर्चाची जलक्रांती
तु्म्हाला ठाऊक आहे का, तुम्हाला हवे असलेले पाणी तुम्ही खुप सोप्या पद्धतीने मिळवू शकता! कुठल्याही जटिल तंत्रज्ञानाचा वापर न करता! कुठल्याही मोठमोठ्या यंत्रणांची मदत न घेता!
या लेखात वाचा: आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरेल असे जलसिंचन, त्यासाठी करावे लागणारे उपाय हे जवळपास फुकटच आहेत. सुरूवातीला मेहेनत आहे. तुमच्या वेळेतला एखादा टक्काच वेळ खर्च होईल पण नंतर तेही आवश्यक राहणार नाही. हा उपाय खात्रीशीर आणि दीर्घकालीक असेल!
जलसंकट? अखिल मानवजाती समोर उभी ठाकलेली ही समस्या; प्रत्येक वर्षी अधिकाधिक बिकट बनत जाणारी आहे. ''पावसाचे पाणी अडवायचे, त्याकरिता लहान, मध्यम व मोठी धरणे बांधायची. तलावात, तळ्यात, टाक्यात पाणी साठवायचे'', माणूस बर्याच काळापासून हे उपाय करत आला आहे, असे केल्याने जलसंकट कधी थांबले आहे का? मोठे किंवा छोटे, सगळेच कृत्रिम जलसाठे गेल्या काही वर्षांपासून कोरडे पडत आहेत. पाऊस कमी किंवा अनियमीत झाला तर या साठ्यात पाणी येणार कुठून? आणि समजा पडलाच तरी जितका पडतो त्याच्या पाच टक्के पाणी सुद्धा कृत्रिमपणे साठवणूक केले जाऊ शकत नाही, इतकी अफाट गरज माणसाची आहे. धरणे दर पावसात वाहून येणार्या गाळाने भरत आहेत तशी त्यांची पाणी साठवण क्षमता कमी कमी झाली आहे. हा गाळ उपसण्याचे जेवढे म्हणून प्रयत्न झालेत ते अल्पजीवी ठरले; कारण गाळ काढणे अव्यवहार्य आहे. 'मोफत गाळ घेऊन जा, शेतजमिन सुपिक बनवा', अशा घोषणा केल्यानंतरही गाळ खोदून काढणे व त्याची वाहतूक करून तो पसरविणे याबाबी अव्यवहार्य ठरल्याने या योजनेला फार अल्प प्रतिसाद मिळाला. तोही काही काळा पूरताच.
यंदाच्या वर्षी महाराष्ट्रासमोर जे जल संकट उभे राहिले आहे ते १९७२च्या दुष्काळापेक्षाही भिषण आहे. फरक इतकाच आहे की, ७२च्या दुष्काळाच्या वेळी खायला अन्न नव्हते, ती स्थिती यावेळी नाही. ७२च्या दुष्काळापेक्षा यंदाचा दुष्काळ आणखी एका कारणासाठी वेगळा आहे, त्यावेळेला पाणी वाहून नेण्याची साधने मर्यादीत होती, यंदा त्यात बरीच सुधारणा झाली आहे. ७२च्या दुष्काळात विहीरींना पाणी होते, यंदा विहीरींनी तळ गाठले आहे, ही चिंतेची बाब.
तोरणमाळ: मोठाली झाडे तोडलीत. खुरट्या झाडांचेच साम्राज्य...पाणी कसे टिकणार? |
दुष्काळावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात अलिकडच्या काळात जलयूक्त शिवार अभियान, वॉटर कप स्पर्धा अशा विविध उपक्रमांनी जोर धरलेला दिसतो, यात गाव परिसरातील नद्या, तलाव, तळी टाकी यातला गाळ काढणे, नव्याने जमिन खोल खोदून घेणे ज्या योगे पावसाचे पाणी जास्त प्रमाणावर साठून राहील. काही ठिकाणी पाणी साठविण्यासाठी बांधही घातले जात आहेत. हजारो हात याकरिता झटत आहेत. सर्वसामान्यांपासून ते महत्वाचे, अती महत्वाचे व्यक्ती, शेतकरी, मजूर अशा अनेकांच्या सहभागातून जलसंकटावर मात करण्याची लढाई गेल्या तीन चार वर्षांपासून महाराष्ट्रात वेग घेत आहे. अल्पावधीत काही गावांना त्यामुळे पाणी मिळू लागले आहे.
जलयुक्त, वॉटर कपची कामे अशीस अखंडपणे सुरू राहो! त्याने होईल तर तो फायदाच. या दोन योजनांच्या पुढचे काय? जलक्रातीतले हे घटकमात्र आहेत. आपली पाण्याची गरज याहून कितीतरी अधिक आहे. विशेष करून शेती क्षेत्राचा विचार केला तर या उपाययोजना पुर्या पडणार नाहीत. शेती आणि जंगल या दोन अत्यंत महत्वाच्या घटकांसाठी पाण्याचा वेगळा विचार करावा लागणार आहे.
जमिनीवर पडणार्या पावसापैकी ७० टक्के पाणी समुद्रात तर ३० टक्के जमिनीवर पडते. या ३० टक्क्यांपैकी सुमारे २८ टक्के पाणी हे गोठलेल्या स्थितीत असल्यामुळे किंवा समुद्रात वाहून जात असल्यामुळे माणसासाठी सहजासहजी उपलब्ध होत नाही. 'पृथ्वीवरच्या अखिल मानव जातीला रोजच्या वापरासाठी केवळ २ टक्केच पाणी उपलब्ध आहे', अशी अभ्यासकांची निरीक्षणे उपलब्ध आहेत.
प्रभावी जलक्रांतीसाठी माणसाने बांध बांधणे, कृत्रिम जलसाठ्यांतले गाळ काढणे हे फार प्रभावी उपाय नाहीत कारण यात उर्जा, मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर खर्च होणार आहे. त्यासाठी पैसाही लागणार आहे. (जगभरातले जलतज्ज्ञ धरण, नद्यातला गाळ उपसणे हा अव्यवहार्य व पुरा न पडणारा म्हणून त्यास त्याज्य मानत असले तरी काही ठिकाणी मोठ्या कष्टाने गाळ उपसल्याने पाण्याची साठवणूक सोपी झाली आहे, एक मात्र खरे ती मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरलेली नाही. याचा अर्थ हे उपाय बंद करावे असे मुळीच नाही. ज्याने त्याने यथा मती, यथा शक्ती हे प्रयोग करीत रहावे, ते करताना एक काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे नद्या, तळी, टाकी प्रमाणापेक्षा जास्त खोल करून चालणार नाही, अन्यथा पावसाळ्यानंतर भूगर्भातले पाणी नद्यात येऊन त्यांचे बाष्पीभवन होण्याचा धोका राहील. शिवाय पाणलोटाच्या वरच्या विहरी व शेतीवर त्याचा परिणाम होईल.)
यशाचा मार्ग मोठ्या अडचणींतूनच जातो, घोर तपश्चर्येतूनच यश साध्य केले जाऊ शकते असे अजिबात नाही, त्याच्या काही वाटा सोप्या, सहज साध्यही असतात...तुम्ही त्याकडे डोळसपणे बघण्याची आवश्यकता असते. सुक्ष्म जलसिंचन हे त्यातलेच.
घोरवड: वडाची उंचच उंच झाडे राखलीत. या पालापाचोळ्याखाली जमिनीत पाणी मुरविण्याचे नैसर्गिक कारखाने. |
आपला देश फार मोठ्या प्रमाणावर मोसमी पाण्यावर अवलंबून आहे. आपल्याकडे पावसाच्या पाण्यावरचे पिक हे सगळ्यात महत्वाचे मानले गेले आहे. मोठी धरणे, बंधार्यांच्या सहाय्याने आपण केवळ दहा पाच टक्का पाणी कृत्रिमरित्या साठवून ठेवू शकतो. त्याने केवळ पिण्याच्या आणि दैनंदिन वापरासाठी लागणार्या पाण्याची काही अंशी गरज भासू शकते, ती देखिल सर्व प्रदेशाची पाण्याची समान गरज भागवू शकत नाही. शेती आणि जंगल या साठी लागणार्या पाण्याचे काय? पाऊस आणि पर्यावरण समतोल त्यावरच मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. जमिनीवर पडणार्या पावसापैकी फार मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते व फार थोड्या प्रमाणात जमिनीत मुरते. सातत्याने खालावत चाललेल्या भूजलस्तरामागचे हे एक महत्वाचे कारण आहे. अर्थात वाढलेली जनसंख्या, पाणी वापर करणारे मोठे उद्योग, जास्त पाणी लागणारी पिके आणि उद्योगधंदे ही देखिल कारणष आहेच.
रासायनिक शेती, बेसूमार वृक्षतोड, शहरे व गावात सर्वत्र पसरलेले पक्क्या रस्त्यांचे जाळे, या मुळे जमिनीत मुरणार्या पाण्याचे प्रमाण हे वाहून जाणार्या पाण्यापेक्षा कितीतरी पट कमी झाले आहे. जास्त पाऊस झाला की, नद्यां, नाल्यांना मोठमोठे पूर येऊ लागलेत, आजवर कधीही नव्हते इतके मोठे पूर अलिकडच्या काही वर्षात बघायला मिळाले. याचे कारणच जमिनीत पाणी मुरविणारी नैसर्गिक यंत्रणा माणसाने आपल्याच हातून मारून टाकली.
पाणी मुरवायचे कसे?
कुठल्याही साधनांचा व फार मोठ्या मनुष्यशक्ती शिवाय इतके अफाट पाणी जमिनीत मुरवायचे कसे? नैसर्गिक पद्धतीने? ज्याकरिता ना मोठ्या यंत्रांची ना यंत्रणांची गरज भासेल, असे काही आहे का? सुक्ष्मसिंचन म्हणजे काय?
सुक्ष्मसिंचनात सगळेच घटक नैसर्गिक आहेत! मग ते आणायचे कुठून? त्यासाठी काय करायचे. किती खर्च येणार?
जमिनीच्या जलस्तराचा विचार करताना वरील प्रश्न सतावतात, त्यावर मग जमिनीच्या जलाचे पुनर्भरण करण्याचा विचार पुढे आला. त्याकरिता नव्या इमारती बांधताना घराच्या छपरावरचे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची यंत्रणा असेल तरच बांधकाम पूर्णत्व द्यायचे असे नियम आले.
काही गावांनी व वनखात्याने आपआपल्या हद्दीत जमिनीला चर घातले, खड्डे खोदले. अटकळ ही की, पावसाचे पाणी उतारावरून वाहताने या चरात समावून जमिनीत मुरेल. खड्ड्यात पावसाचे पाणी साठूत ते सरतेशेवटी जमिनीच्या पोटात जाईल.
कमळगड: 'गर्द झाडी', जावळीच्या खोर्याचे हे पूर्वपार वैशिष्ट्य. हल्ली पंधरा ते वीस टक्केच गर्द झाडीं शिल्लक. |
सु्क्ष्मसिंचनासाठी
सु्क्ष्मसिंचनासाठी कुठेही दूरवर जाण्याची आवश्यकता नाही. तुमच्या परिसरातच ते तुम्हाला करायचे आहे. झाडाखाली जो पालापचोळा पडतो ते सुक्ष्मसिंचनाचे कारखाने आहेत. त्याची ताकद बघा! जमिनीवर जो पाला पाचोळा पडलेला असतो त्याला हलवले नाही तर त्याखाली उन्हातही आद्रता राहते. हाच पाला पाचोळा झाडाखाली असेल तर तिथे त्याला सावली मिळते व झाडीच्या सोबतीने जमिनीच्या वरच्या थरातले पर्यावरण अबाधित राहते. जमिनीत ह्यूमस तयार होतो तसे एक ग्रॅम मातीत सुमारे ३३ कोटी जिवाणूंचे चलनवलन होते असा या क्षेत्रातल्या अभ्यासकांचे निष्कर्ष आहेत. या जिवाणूंच्या नित्य क्रीयांमुळे जमिनीला सुपिकता येते, जमिनीत त्यामुळे पाणी मुरायला होते. पावसाचे पाणी त्यातून जमिनीच्या आत जाते. जमिन कडक न राहतो भूसभूशीत राहते, त्यामुळे त्यातून पाणी तर मुरतेच, पण ती जास्त काळ ओली राहते, जमिन जास्त पाणी धरून ठेवते. झाडांच्या मुळ्या देखिल पाणी वाहून जाण्यास अवरोध निर्माण करतात व त्याही सतत पाणी मुरविण्यास मदत करतात. अशा ओल्या जमिनीत मग गांडूळासारखे जीव तयार होतात, तसे ते जमिनीत खोलवर जाऊन खड्डे करतात, माती सुपिक करण्याबरोबरच पाणी मुरविणारे छिद्र अहोरात्र तयार करत राहतात.
झाले काय की, बेसूमार वृक्षतोड, पाश्चात्य शेती पद्धती यामुळे आपण आपल्या हातून नैसर्गिकपणे सुरू असलेली नैसर्गिक जलसिंचनाची साखळी पिढी दर पिढी तोडली गेलो. अन्न सुरक्षा प्रदान करताना हरितक्रांतीने जमिनीच्या पर्यावरणाचे अतोनात नुकसान केले. त्यावर सुरूवातीच्या काळात व्यवस्थितपणे अभ्यास झाला नाही, पिक येतेय, म्हणून त्याकडे दुर्लक्ष झाले.
ज्याला त्याला जास्तीत जास्त उत्पन्न हवे होते. त्यासाठी वाणांचे संकर विकसीत केले गेले. त्यातून कमकूवत वाणांची पिढी येत राहीली ती विविध रोगांचा मुकाबला करण्यास सक्षम नव्हती. त्यावर नी किडींवर फावरण्यासाठी रासायनिक औषध कंपन्या सरसावल्या. त्यातून उत्प्नाची हमी मिळाली, पण जमिनीचे आरोग्य बिघडत गेले. जमिनीच्या वरच्या थराच्या पर्यावरणाचे नुकसान गुणाकार पद्धतीने वाढत गेले. सुक्ष्मसिंचन करणारी सुक्ष्म जिवाणूंची अफाट हानी अगोदर वरच्या थरात आणि मग जमिनीच्या खालच्या थरात झाली तशी भूजलपातळीत घट होत राहीली.
पूर्वी विहीरींना वर्षभर पाणी रहायचे. आता दोन, अशीचशे, तीनशे फुटाच्या विंधन विहीरींना देखिल पाणी लागत नाही. काही ठिकाणी हजार, बाराशे फुटाचे बोर घेतले गेलेत, त्यांनाही पाणी नाही.
कोळेश्वर: पठारावर वनसंपदा कमी वहिवाट व मनुष्यवस्ती असल्याने टिककून पण त्याला वणव्यांचा धोका आहेच. |
यावर काही उपाय आहे का?
- यावर शंभरटक्के शाश्वत व कमी खर्चाचा उपाय आहे. हा बिनखर्चाचा, थोड्याशा मेहनतीचा व आयुष्यभर पूरू शकेल असा हा उपाय असेल.
सुक्ष्म जलसिंचन कशा पद्धतीने करायचे? कुठल्या संस्थेची मदत घ्यायची? सरकारी मदत कशा पद्धतीने घ्यायची?
- एव्हाना तुमच्या लक्षात आले असेल नैसर्गिक पद्धतीचे जलसिंचन हेच सूक्ष्म जलसिंचन आहे. त्यात झाडांची भूमिका अनन्यसाधारण महत्वाची आहे.
आज उपलब्ध असलेल्या झाडांच्या मदतीने ते करता येईल. दैनंदिन गरजेच्या किती पट पाणी, मुरवायचे, वेगवेगळ्या भूस्तरात त्याचे प्रमाण वेगवेगळे राहील हे त्याकरिता ध्यानात घ्यावे लागेल. किती झाडे असतील तर किती पाणी मुरेल, किती क्षेत्रातल्या नैसर्गिक शेती पद्धतीने पाणी मुरण पुरेशी ठरेल हे वेगवेगळ्या ठिकाणांसाठी वेगवेगळी सूत्रे लागू पडतील. यासाठी सरकारच्या मदतीवर विसंबून राहून चालणार नाही. त्याकडे आर्थिक देवाण घेवाणी करतात तशा दृष्टीकोनातून बघून चालणार नाही. सरकारे किंवा कुठल्या संस्था त्याकरिता पुढे येऊ शकतील की नाही ठाऊक नाही. पहिल्या प्रथम तुमचे तुम्हीच काम सुरू करावे लागेल. पाणी हा प्रश्न तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा आहे, त्यामुळे सामुहीक प्रयत्नातून, विषयाची निकड ओळखून सगळ्यांना या ना त्या प्रकारे या कार्यात झोकून द्यावे लागणार आहे. तसे नाही केले तर पाण्यावाचून नामांकीत वसाहती, गावे किंबहूना शहरातील लोकांवर स्थलांतराची वेळ येऊ शकेल. २०१९च्या दुष्काळी परिस्थितीने तसे संकेत दिले आहेत.
हे अगदी खरे आहे की, तुम्हाला फुकटाच्या जलसिंचनासाठी झाडांची आवश्यकता आहे. बहूतांशी ठिकाणी झाडे नाहीत. जिथे आहेत, तिथे आपल्याला हवे त्या प्रकारचे जलसिंचन होत असेलच असे नाही. आपल्याला काम तर करायचे आहे आणि त्याचे मोजमापही ठेवायचे आहे. त्यासाठी आपण सुरूवातीला, 'माणशी दहा झाडे', असे उद्दीष्ट ठेवू या.
कोळेश्वर: डोंगरमाथ्यावर पालापोचाळा सदैदित पडलेला, माणसाचा हस्तक्षेप कमी, भरपूर पाणी येथे जमिनीत मुरते. |
झाडांच्याशिवाय तुम्हाला पाणी मिळणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे तेव्हा प्रत्येकाने दहा झाडे लावायची आणि त्यांचे पुढील पाच वर्षांसाठी संगोपन करायचे किंवा दहा झाडे निवडून त्याखाली सुक्ष्म सिंचनाचे उपाय राबवायचे. ही कामे एकट्या दुकट्याने न करता समुहाने करायची आहे. म्हणजे गाव पातळीवर, वस्ती पातळीवर, पंचक्रोशीच्या पातळीवर. 'पुढच्या पाच वर्षात आपल्या भागातले पाणी आपल्याला साठवाचे आहे, त्यासाठी आपल्याला सुक्ष्मजलसिंचनाचा आधार घ्यायचा आहे', या मुद्दयावर एक बैठक बोलावून सगळ्यांने हा प्रकार लोकांना समजून सांगायचा आहे. यात अस्तित्वात असलेली झाडे आणि नव्याने लागवड करायची झाडे असे दोन भाग असतील.
आज घडीला उभ्या असलेल्या झाडांखाली महिन्या पंधरा दिवसात एकदा पाला पाचोळी झाडलोट करून झाडाच्या घेर्यात ढकलून द्यायचा, त्यावर गाईचे शेण, गोमुत्र आणि गुळ (१+१+पावकिलो) या प्रमाणात ७२ तास १० लिटर पाण्यात मुरवून ते गाळून घ्यायचे. त्यात चार पट पाणी टाकून तयार होणारे जीवामृत झाडाखालच्या पाला पोचोळ्यावर शिंपडायचे. झाडांवर सुद्धा जमल्यास फवारायचे जेणे करून रोग, किडीवर ते उपयोगी ठरू शकेल. किड, रोग असेल तर दशपर्णी अर्क सुद्धा फवारला जाऊ शकतो.
तुम्ही संगोपनासाठी निवड केलेले झाड जंगलातले असेल तर त्यावर किडनाशकांच्या फवारणीची कसरत करायची गरज नाही, बांधावर, घराच्या जवळ किंवा गावाच्या जवळ असलेल्या झाडांवरच दशपर्णी अर्क फवारावे. आवड असल्यास जंगलात व डोंगरावर सुद्धा किड नियंत्रणासाठी हा उपाय केला जाऊ शकतो, तथापी जंगलात झाडांना सहसा फार मोठा किडीची प्रादूर्भाव आढळत नाही, असला तरी समिश्र पद्धतीची झाडे असतील तर त्याचे नियंत्रण निसर्गत: आपोआप होते, फक्त त्यासाठी काही काळ जावा लागतो. जिथे एकाच पद्धतीची झाडे लावली आहेत तिथे मात्र एखाद्या रोगरार्ईच्या सपाट्यात जंगलच्या जंगल बांधित झाली आहेत. (यंदाच्या वर्षी अती विषारी म्हणून ओळखल्या जाणार्या ग्लिरिसीडीया या वनखात्याच्या आवडत्या झाडांवर फार मोठ्या प्रदेशात रोगाचा प्रादूर्भाव झाल्याचे बघायला मिळाले.)
झाडाखालच्या पालापाचोळ्यावर जीवामृत पाण्याची सुरूवातीला दोनदा पंधरा दिवसांनी, नंतर महिन्यातून एकदा व नंतर तीन महिन्यांनी एकदा अशा स्वरूपात केलेली शिंपण आदर्शवत राहील. एका छोट्या झाडासाठी एक पेला इतके. पाच वर्षांनंतर याची काहीच आवश्यकता राहणार नाही.
कोळेश्वर: ऐन एप्रिलच्या महिन्यात इथल्या जमिनीचे जलस्तर सुद्रुढ. सहा वस्त्यांना पाण्याचा असा वाहता प्रवाह उपलब्ध |
साधारण बी किंवा कोय मावेल इतका अल्पशा आकाराचा खड्डा करून घ्यावा. फार मोठे खड्डे करण्यात वेळ व श्रम वाया घालवू नका.
तुमच्या समोर दहा झाडा लावण्याचे उद्दीष्ट आहे. सुरूवातीला पहिले तीन महिने आठवड्यातून एकदा पाणी टाकावे. तीन महिन्यानंतर या झाडांच्या घेर्याच्या बाहेर पाण्याची बाटली उपडी करून त्याला खाली लहान छिद्र करून त्यात सुतळी किंवा कपड्याची चिंधी लावावी. ही सु्क्ष्म झिरपण या झाडांना जिवंत ठेवण्याचे काम करील. झाड जसजसे मोठे होईल तसतशी त्याची नियमीतपणे छाटणी करावी. छाटणीचे प्रमाण झाडाच्या आकाराच्या दहा टक्क्यांच्या आतच असावे. छाटणीमुळे झाडे अधिक जामाने वाढतात. छाटणी केलेली पाने, काड्या त्याच्या बुंध्याच्या भोवती पसराव्यात व आसपासचे गवत, काडी कचरा त्याभोवती पंधरा दिवसातून एकदा झाडलोट करून गोळा करून ठेवावा. प्रसंगी पाणी द्यायला जमले नाही तरी या पालापोचोळ्यामुळे झाड पाण्याअभावी मरण्यापासून बचावते.
जिथे बाटली नसेल तिथे निरूपयोगी किंवा फु्टक्या लहान माठांचा वापर केला जाऊ शकतो. झाकणबंद डबे असतील तर त्यांतूनही सुतळी जमिनीवर सोडली तर त्याने पाणी थिबकत राहून सुरूवातीच्या काळात झाडासाठी आवश्यक असलेले पाणी कमी मेहेनतीत दिले जाऊ शकते.
कोरड्या पालापोचाळ्यात दव शोषून घेण्याची क्षमता असेत. त्यात निर्माण होणारे काही जिवाणू झाडांकरिता आवश्यक नायट्रोजन आदी घटक पुरविण्याचे काम करतात. त्यासाठी झाडाखालच्या सृष्टीला चालना देण्यासाठी हे उपाय अतिशय महत्वाचे आहेत.
तसे बघितले तर माणशी दहा झाडे लावायचे आणि त्याची पाच वर्षे देखभाल ठेवायची तर त्यासाठी तसा खर्च काहीच येणार नाही. तुम्ही राहतात त्याठिकाणापासून सुरूवात करावी. तिथून पुढच्या टप्यांवर झाडे लावण्यासाठी जागा निवडत तुमच्या निवासाच्या किंवा शेताच्या चौफेर सुक्ष्म जलसिंचनाचे कारखाने तुम्हाला वसवायचे आहेत म्हणजे तुमच्या वस्तीच्या फार मोठ्या परिसरात पाणी मुरेल तसे आसपासच्या जलस्त्रोतांना आणि शेतीला त्याचा लाभ होईल.
तांबोळ्या: बागलाणातले हे एक प्रातिनिधीक चित्र. कुठेच झाडी शिल्लक नाही. सारे काही निष्पर्ण. |
कोवळी झाडे जनावरे खाऊन फस्त करू शकतात. जोराच्या वार्यात झाडे उखडू शकतात त्याकरिता उपयोगात नसलेल्या काठ्या, बांबू, गज, तारा, बल्ल्या ते अगदी प्लास्टिकचे पाईक असा कशाचाही वापर केला जाऊ शकतो. त्याला वापरात नसलेले कापड गुंडाळले (जसे वापरात नसलेल्या साड्या, बारदान, निरूपयोगी पोती इत्यादी. त्यामुळे बकर्या, गाई आदी गुरांपासून त्यांचे रक्षण करता येईल. हे झाड रक्षक साडे पाच फुटांचे तरी असावे. अर्धा फुट जमिनीत गाडल्यानंतर ते पाच फुट उभे रहावे.
वृक्षपंचायत
तुम्हाला तुमच्या वस्ती पातळीवर, गाव पातळीवर, पंचक्रोशीत संपुर्णपणे कुर्हाडबंदी करावी लागेल. 'कुर्हाड आली की पाणी गेले', त्यामुळे कुठे नियम करून, कुठे आणाभाका घेऊन तर कुठे देवाच्या नावाने किंवा समाजातील थोर पुरूषांच्या नावाने आव्हान करून शंभर टक्के वृक्षतोड बंदीचा निर्णय अवलंबिणे व प्रसंगी याचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई करावी. याकरिता गाव पातळीवर वृक्षपंचायतीचे गठन करावे. त्यात सरपंच, विविध जाती समुहाचे सर्व वयोगटाचे प्रतिनिधी यांची निवड करावी. दर दोन किंवा तीन वर्षांसाठी हे मानाचे पद असावे. या समितीने आपल्या भागातील वृक्षांची गणना करून त्यावर देखरेख ठेवण्याचे काम करावे. सर्व प्रकारची झाडांची छाटणी, फांद्या तोडणे, काटक्या गोळा करणे यासारखी कामे वृक्षपंचायती मार्फत केली जावीत. त्यावर देखरेख ठेऊन त्याचे सर्पण, कुंपण आदी कांमांसाठी लोकांना उपलब्ध करून द्यावे. त्याकरिता शक्यतो कोणतीही रक्कम आकारू नये. ज्यांनी मागणी केली असेल त्यांना मोफत उपलब्ध करून द्यावेत.
गावात डोंगरदेव, होळी आदी झाडे जाळण्यासंबंधीचे उत्सव असतील तर मोठे झाड कापून ते जाळण्यावर पूर्ण प्रतिबंध करावा, त्याऐवजी वृक्ष पंचायतीने छाटणी केलेल्या झाडाच्या काटक्या, गवत किंवा गोवर्यांचा वापर करावा.
मार्कंडेय: काही भागात अजूनही झाडी टिकून आहे. त्यामुळे या उंबरातून वर्षभर पाणी असे सतत झिरपते. |
गावात धार्मिक उत्सव असेल किंवा विवाह आदी समारंभासाठी मंडप बांधताना झाड तोडून त्याच्या बल्ल्या वापरण्याची पद्धत असेल तर त्या वापरण्यावर शंभरटक्के प्रतिबंध करावा. गावची गरज भागविण्यासाठी गरजेनूसार काही बांबूची बेटाची लागवड करावी. तीन वर्षात पन्नास ते सत्तर फुटांपर्यंत बांबू वाढतो, त्याचा वापर मांडव आदी कामांसाठी करावा, तसेच टोपल्या, पाट्या, सुपं, गोठ्यांचे, घरांचे छप्पर आदी कामांसाठी तीन वर्ष पूर्ण झालेल्या बांबुवर धूराची अथवा वाहत्या पाण्यात आठवडाभर भिजविण्याची प्रक्रिया करावी म्हणजे असा बंबू दीर्घ काळ टिकेल व त्याला सहजासहजी किड लागणार नाही.
गावाने स्वत:च्या वापराकरिता बांबु लागवड केले तर त्याच्या तोडण्यास कायद्याने बंदी नसल्याने मुक्तपणाने त्याचा रोजच्या गरजांसाठी वापर करता येईल.
''संपूर्ण कुर्हाडबंदी, नव्या वृक्षांचे रोपण, त्यांची देखभाल, जीवामृताची नियमीत शिंपडण आणि नानाविविध प्रजातीची झाडे'', अवघ्या पाच वर्षांच्या कालावधीत तुमच्या कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणावर तुम्ही सुक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पाणी तुमच्या गावाच्या आसपास जमिनीपासून अगदी जवळ उपलब्ध केलेले असेल. याने नद्या, झरे, ओहळी जास्त काळ प्रवाही राहतील शिवाय विहीरींना पाणी राहील, हापशांना पाणी मिळेल. कृत्रिम पद्धतीने धरण, बंधारे, तळी, टाक्यांच्या तुलनेत हा उपाय शाश्वत व कायमस्वरूपी उपयोगाचा.
काही डोंगरपठारावरची गावे व शहरे असतील तर तिथे पाणी टिकत नाही अशा ठिकाणी स्वत:च्या उपयोगापूरते जलसाठे निर्माण करावे लागतील पण त्यासाठी वृक्षारोपण आणि सुक्ष्मजलसिंचन या सारख्या उपायांना फाटा देऊन चालणार नाही, कारण तुमच्या प्रयत्नांमुळे खालच्या भागात पाणी पोहोचणार आहे. झरे, ओहळी, नद्यांवर आसपासचे दगड गोळा करून त्यांचे बांध घालावे. त्याला सिमेंट कॉंक्रिट लावण्याची कोणतीच आवश्यकता नाही. नुसती माती दाबून टाकावी. कालांतराने या बांधाच्या भेगात माती बसेल तशी वाहते पाणी थोपवून धरण्याची क्षमता वाढेल. शिवाय पाण्याचा स्त्रोत प्रवाही राहील, तो दुषित होण्याचा धोका राहणार नाही. खालच्या उताराच्या ठिकाणी त्याचा लाभ होईल. याकरिता पायथ्या पासून माथा अशा क्रमाने कच्चे बांध आणि वृक्षारोपण करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून डोंगराच्या पायथ्याला त्याचा लाभ मिळेल.
मार्कंडेय: प्राचीन रामतीर्थाला वर्षभर शुद्ध पाणी राहते. |
याच्या दुसर्या लाभाकडे तुम्हाला लक्ष द्यायला हवे. झाडांमुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर फळबहार उपलब्ध होईल जो तुम्हाला व तुमच्या मुलाबाळांना अतीशय उच्च दर्जाचे अन्नस्त्रोत म्हणून अगदी फुकटच उपलब्ध होईल. वृक्ष पंचायतीमार्फत फळबहार काढून त्याची गाव पातळीवर प्रत्येकाला वाटणी करता येईल व अतिरीक्त बहार विक्री करून त्याने वृक्ष व जलसंधारणासाठी काही प्रमाणावर निधी उपलब्ध करता येईल. काही औधषी महत्वाच्या झाडांचा पाला, फुले, फळे, शेंगा, साली यांची आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधने बनविणार्या उत्पादकांना विक्री करता येईल. हे करताना झाडांना कायमस्वरूपी इजा होणार नाही याची काळजी घेऊन मर्यादीत प्रमाणावरच झाडांच्या अवयवांची काढणी करण्यात यावी. याकरिता देवराईचा पुरातन कायदा वृक्षपंचायतींनी अंमलात आणावा.
छाटणी, काढणी, निगा राखणार्यांना रोख रक्कम देण्याऐवजी, झाडांपासून मिळणारा फाटा, बहार आदींचा वाटा निर्धारीत करून द्यावा. यासाठी काहीजण सेवा कार्य म्हणून सूद्धा सहभाग घेण्यास तयार होऊ शकतील. अशांना प्रोत्साहीत करणे, मानसन्मान देणे या गोष्टींचा अवलंब करावा. यात एका गोष्टीचे कसोशीने पालन व्हावे ती म्हणजे झाडांचा निम्माच फळबहार मानवाने वापरावयाचा आहे व उर्वरत झाडांवर तसाच राहू द्यायाच आहे. त्याचा उपयोग सृष्टीतले प्राणी, पक्षी करतील तसे निसर्गाचे चक्र तुमच्या परिसरात कायम राहील. झाडांमुळे अनेक पक्षी येतील तेव्हा शेतावर येणार्या अळ्या व किडींचा बंदोबस्त करणारी यंत्रणा तुमच्या दिमतीसाठी हजर असेल. नव्वद टक्यांहून अधिक पक्षी हे मांसाहारी आहेत. ते तुम्या पिकांपेक्षा किटके खाण्याला पसंती देतात. समजा काही शाकाहरी पक्ष्यांची संख्या वाढली तर तुमच्या परिसरात असलेल्या वृक्षांमुळे शिकारी पक्षी येऊ लागतील. मोठाल्या झाडांवर त्यांना निवासाला जागा मिळू शकेल म्हणजे निसर्ग कुणा एकालाच वाढू देणार नाही. त्याची स्वत:ची नियंत्रण यंत्रणा आहेच!
गाव पासून, घरापासून सुरू झालेली सु्क्ष्म जलसिंचनाची योजना हळू हळू गावच्या डोंगरांवर पायथ्या पासून माथ्या पर्यंत, दरी, घाटात अशी तुम्ही पाहिजे तितकी विस्तारू करू शकता. एका माणसाला दहा झाडे संगोपन करण्यासाठी फार मोठे उद्दीष्ट नसेल अन्यथा ब्रम्हपूत्रेच्या काठावर जादव पायेंगने एकट्याने ५०० हेक्टरचे जंगल बीज रोपणातून तयार केले व त्यात पट्टेदार वाघ, एक शिंगी गेंडा अशा दुर्मिळ प्राणी प्रजातीपासून असंख्य जीवांना आश्रय लाभला.
मार्कंडेय: गडावरच्या करिता पाणी शेंदताना पवार मामी...पाणी त्यांना अगदी जवळच उपलब्ध आहे. |
आपल्या संस्कृतीत वृक्ष हा देव मानला आहे तो मानवाच्या कल्याणासाठीच. वड, पिंपळ, उंबर ही झाडे तोडणे घोर अपराध व पापकारक मानले आहे त्यामागे देखिल सृष्टीचे व मनुष्याचे कल्याण ही महत्वाची भूमिका राहिली आहे. या वृक्षांच्या खालची माती ही जिवाणू माती म्हणून निसर्गशेतीजगतात त्यास अनन्यसाधारण असे महत्व आहे. देव वृक्ष यांनाच तर म्हणतात, त्याकडे निव्वळ धार्मिक थोतांड म्हणून बघितले जाऊ नये.
या संपूर्ण प्रक्रियेत गाय हा सगळ्यात महत्वाचा प्राणी आहे याचे कारण गायीच्या शेण, गोमुत्रात असलेली अनन्यसाधारण अशी नैसर्गिक रसायनांची जंत्री आणि त्याची असाधारण अशी रोगनिवारक क्षमता.
पाणी तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच हवे आहे. पाऊस पाडणे आपल्या हातात नाही, पण पाऊस पडावा व जमिनीचे जलस्तर राखले जावे हे आपल्याशिवाय इतर कुणाच्याही हातात नाही. माणूस देवभोळ्या वृत्तीचा असला तर तो अशा उपक्रमांकरिता सहजच पुढे येईल. काही मंडळी कदाचित येणार नाही. काहींना शारिरीक व्याधी असू शकेल अशांच्या वाट्याच्या दहा झाडांची जबाबदारी कुणीतरी उचलावी. वृक्षपंचायतीकडे त्याची नोंद करावी. जास्त प्रमाणावर वृक्षांचे संगोपन करणार्या, वृक्षतोडीवर कसोशिने नजर ठेवणाचे असाधारण कार्य करणार्यांचा जाहीरपणाने सन्मान व्हावा व गावाच्या मंदिरात किंवा समाज मंदिरात 'वृक्षश्रीं'ची नावे बोर्डांवर रंगवावीत....श्रीयूत....यांनी...तारखे पासून...तारखे पर्यंत विक्रमी...झाडांचे संगोपन केले. लाकूड तोड्यांपासून झाडे वाचविलीत...
शेताच्या बांधावर जगात अनेक ठिकाणी मोठमोठाली झाडे आहेत. पिकांचे अन्न हे जमिनीच्या वरच्या दिड दोन इंचातच आहे. त्यासाठी शेतात सेंद्रीय कर्ब जेवढा म्हणून राखाल तितके पिकपाणी निरोगी राहील. सेंद्रीय कर्बाचे महत्व तर पाश्चात्य शेतीतज्ज्ञ देखील मान्य करतात. मोठाली झाडे उभी राहण्यासाठी त्यांच्या मुळ्या झाडांच्या उंचीच्या पाचपट अधिक खोलवर नेतात, तेव्हात ते वादळ वार्यात तगू शकतात. शेतातल्या पाण्याची त्यांना गरज नसते, त्यांचे पाणी जमिनीच्या वीस मिटरच्या खाली असते. उलट त्यांचा पालापाचोळा शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असा सेंद्रीय कर्ब उपलब्ध करून देतो.
रावळ्या: किल्ल्यावर भरपूर झाडी, तेव्हा पाण्याचे असे नैसर्गिक कुंड पाण्याने लबलब भरलेलेत. |
झाडांच्या घेर्या खालची मातीही सर्वात सुपिक व उपयुक्त जीवाणूंनी युक्त असते याचा उपयोग शेती पिकांसाठी अनन्यसाधारण महत्वाचा आहे. सशक्त पिक घ्यायचे तर जीवामृत तयार करताना अशी सजीव माती उपयोगाची ठरेल. बांधावरच्या झाडांमुळे शेतात सावली, आडोसा व थंडावा तर राहतोच शिवाय झाडांमुळे शोभा येते. फळबहार तर अमापच मिळतो हा लाभ निराळा.
ढग डोंगरांशी सोयरीक करतात. तेव्हा डोंगरांवरचे वृक्ष तुमच्या परिसरात वर्षभर विहीरींना व जलाशयांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सगळ्यात महत्वाचे ठरते. सुदूर जंगलातले झाड निरूपयोगी कधीच नसते. ते तुमच्यापर्यंत पाणी आणणारी यंत्रणा असते. त्यामुळे गावापासून दूर जाऊन झाड तोडणे म्हणजे आपल्या लाखमोलाच्या जीवावर घाव घालणे. दूर अंतरावरचे झाडच तुमच्यापर्यंत जमिनीखालून पाणी आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावत असते. डोंगरावरचे झाड तर कधीच तोडू नये. डोंगरावर पाऊस जास्त पडतो, पाणी दीर्घकाळ प्रवाही ठेवण्यासाठी ही झाडे महत्वाची भूमिका बजावतात. तिथे जमिनीत पाणी मूरू दिले तर ते खाली वाहत तुमच्या पर्यंत पोहोचते.
सह्याद्रीत डोंगरभटकंती करताना आम्हाला पाच दहा टक्केच डोंगरावर थोडी फार वृक्षसंपदा दिसून आली, ती पन्नास टक्क्यांवर आणण्याचे उद्दीष्ट तुम्हाला ठेवावे लागेल, त्याने तुमच्या मुलाबाळांना आणि पुढच्या सगळ्या पिढ्यांना पाण्याची कधीच दादात राहणार नाही. तुमच्या शेतीला पाण्याबरोबरच अनेक महत्वाचे घटक मिळविण्याची फुकटची सोयच त्यामुळे उपलब्ध होईल.
जावळ्या: जुन्या शासकांनी जावळ्या किल्ल्यावर बांधलेल्या या कातळ टाक्यात पाणी हमखास मिळते. |
एक नियम कसोशीने पाळला जावा, तो म्हणजे झाड पाच वर्षांपेक्षा मोठे झाल्यावर त्याच्या भाराच्या वीस टक्के इतकाच भार छाटणी करून काढून टाकावा. मोठ्या फांद्या तोडू नये. वाळवी लागली असेल किंवा वीजेच्या तारांना, घराच्या छपरावर, मंदिराच्या छपरावर अडसर असेल तरच धोकादायक, तुटण्याच्या बेतातल्या फांद्या छाटाव्या.
तुमच्या मुलाबाळांवर असे संस्कारच होऊ द्या, झाड कधीच तोडायचे नाही. त्याचे उत्पन्न घ्यायचे, म्हणजे फळे, फुले अणि मर्यादित प्रमाणावर सर्पण. झाडा लावा....त्यांना जगवा...त्यांचे संवर्धन करा!
बिनखर्चाच्या...थोड्याशा मेहनतीच्या जुन्याच असलेल्या नव्या जलक्रांतीसाठी तुम्ही सज्ज आहात?
तुम्ही संगोपन केलेले झाड पाच फुटांचे झाले तर त्यापासून पहिल्यावर्षी एक टॅंकर इतके पाणी जमिनीत मुरेल. ते तुम्हाला नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतातून मिळेल. दरवर्षी झाड जसजसे मोठे होईल, तसतशी त्याची सुक्ष्मसिंचन क्षमता वाढत जाइल. एक झाड पन्नास ते शंभर टॅंकर इतके पाणी जमिनीत मुरविण्याइतके मोठे डौलदार बनविण्याचे सर्वांनी उद्दीष्ट ठेवावे.
पंचक्रोशितली खुरटी झाडे, काटेरी झुडपे, बोर, चिंच आदी झाडे खुप उपयोगाची आहे या सारखी झाडे तोडण्याची कोणतीच आवश्यकता नाही. दोन झाडात झाडाच्या घेर्याचा अंदाज घेऊन पुरेशी जागा सोडणे. जसे आंबा, वड, पिंपळ वीस तीस मिटर घेर्यात वाढते. त्यामुळे मोकळ्या रानात जास्त अंतर सोडणे. रस्त्याच्या दुतर्फा सात आठ मिटर अंतर ठेवणे म्हणजे झाडांचा घेर पुरेसा वाढू शकेल.
रावळ्या: डोंगर पठारावर असूनही या कुंडात पाणी झिरपत राहते. |
आज बर्याच भागात वर्षातला बराच काळ पाण्याच्या टॅंकरचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. काही ठिकाणी एखादा हंडाच पाणी मिळते तर काही ठिकाणी दिवसा आड तर काही ठिकाणी अगदी पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही.
पाण्याच्या टॅंकरसाठी मागणी करायची. तो आला की त्यातले पाणी भरण्यासाठी झुंबड उडवायची. कुठे नद्या वळविण्याची मागणी तर कुठे धरणाचे पाणी आम्हाला द्या असा रेटा! त्यापेक्षा आपणच आपले पाणी का निर्माण करू नये!
आपल्याकडे आजही आल्या गेलेल्याला प्रथम पाणी देतात. पाणी हे सगळ्यात पवित्र असे दान मानले गेले आहे. आज आपल्यावरच पाण्यासाठी हाथ पसरण्याची वेळ यावी? हे चित्र बदलणार केव्हा?
जगात पर्जन्यछायेतल्या काही शहरांनी मोठी जलक्रांती करून स्वयंपूर्णता मिळविली आहे. आपण इतरांचेच गुणगान गाणार की, स्वत:ही काही तरी भव्य दिव्य करण्याच्या दिशेने पावले टाकणार! आपल्या दहा टक्के इतकाच पाऊस असलेल्या इस्त्रायलच्या शेती यशोगाथेचे आणि जलसंवर्धन यंत्रणाचे किती दिवस कौतूक करणार?
विदर्भ, मराठवाडा या पर्जन्यछायेतल्या भागाची पाण्याची ओरड सातत्याने वाढली आहे. जास्त पर्जन्यछायेच्या गावांनी पाण्याच्या हरेक थेंबाचा वापर करण्याचे उद्दीष्ट ठेवावे. तुमच्या घरात वापरल्यानंतरचे पाणी गटारीमध्ये जाण्यापूर्वी आठ दहा वेळा त्याचा पुनर्वापर करावा. घरात स्वयंपाकीची भांडी धूताना, अर्धेमुर्धे उरलेले पाणी फेकून देण्याऐवजी बादलीत गोळा करायचे. परसात किंवा सोसायटी, बंगल्याच्या आवारात झाडांने ते द्यायचे. काही गोष्टी धुण्यासाठी या पाण्याचा सहजपणे वापर होऊ शकतो. असे साठवलेले पाणी आठवड्यात एक दिवस पाठीवर पाच लिटरची कॅन अडकवायची. सायकल, मोटरसायकलाला पाच दहा कॅन सहज डकवून घेऊन जाऊ शकतात. कुटुंबातील आणखी काही सदस्य सोबत घ्यायचे व आपण लावलेले झाड जगविण्यासाठी एक तास खर्ची घालायचा. झाडींची गरज पाणी, जीवामृत आणि भरपूर सूर्यप्रकाश. यातील सूर्यप्रकाश सोडला तर उर्वरीत दोन गोष्टी तुमच्या हातात आहे आणि सूर्यप्रकाश आपल्याकडे मुबलकच आहे. झाडाचे ते खरे अन्न. पाणी, जीवामृत झाड जगण्यासाठी जमिनीचे पर्यावरण निर्माण करण्यास मदत करतात, तुम्हाला तीच तर काळजी घ्यायची आहे.
बंड्या: गवताची बेसूमार तोड पण वहिवाट कमी झाडी भरपूर मग असे पाणी पायथ्याला साठणारच. |
झाड लावताना काळजी घ्यायची, ती म्हणजे कुणाच्या खासगी जागेत परवानगी घेऊनच झाडे लावावी. काहींना जमिनीचा वापर व्यावसायीक कामासाठी करायचा असतो, काहींना आपल्या क्षेत्रात झाडे नको असतात, तेव्हा तंटे बखेडे उभे राहणार नाही याची काळजी घ्यावी, ते करता आले तर अशा जलवृक्ष संवर्धनाला अर्थ राहणार नाही. भांडण तंट्यामुळे अकारण नवी डोकेदुखी उभी न राहो!
तुमचा विठ्ठल पंढरपूरात भेटेल की नाही ठाऊक नाही, पण तुम्हा वृक्षसेवकांना तुम्ही लावलेल्या झाडाच्या आसपास तो असेल. तुमचे तुका, तुमचे माऊली, तूमचे बसवस्वामी, तुमचा वाल्मीकी, तुमचे बाबासाहेब, तुमचे शिवाजी, संभाजीराजे असे अनेक थोर महापूरूष तुम्हा वृक्षसेवाकांना तुम्ही लावलेल्या झाडाजवळ हमखास भेटतील.
५०० लोकसंख्येचे गाव असेल तर तुमच्याकडे उत्तम निगा राखलेली पाच हजार झाडे असतील, त्यातून तुम्ही कमीत कमी ५०० टॅंकर इतके पाणी जमिनीत मुरवलेले असेल. आजच्या उपलब्ध झिरपण क्षमतेत हे अधिकचे ठरेल. शिवाय हे प्रमाण दरसाली वाढतच राहील तशी तुमची पाण्यासाठी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू होईल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे पाणी तुमच्या गावच्या जमिनीखाली असेल ज्याचा थेट लाभ गावाच्या शेतीला, विहीरींना होईल. म्हणजे 'आंबा तर आंबा कोयीचेही पैसे'. आता कल्पना करा, पाच हजार ऐवजी पंधरा, वीस, पन्नास हजार किंवा एक लाख झाडे तुमच्या परिसरात असतील आणि त्यांची निगा राखली गेली, तोट पूर्ण टाळली तर? काय बिशाद की तु्म्हाला पाणी मिळू शकणार नाही.
हे कदापी शक्य नाही! लोक मानणार नाही! निम्मे लोकच सहभाग घेतील! अशा शंका मनातून काढून टाका. तुम्ही सकारात्मक होऊन सुरूवात करा.
'माणसाने कधी आपल्या सवयी बदलल्या आहेत का?' असा प्रश्न मनाला शिवू देऊ नका. इंदूर शहराचे उदाहरण बघा. तिथले लोक आजही, बार, गुटखा, तंबाखू खातात पण स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करत नाहीत. पुर्वी हे शहर सगळ्यात गलिच्छ शहरात मोडत होते. मागच्या पाच वर्षात तिथल्या प्रत्येक नागरिकाने, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकदिलाने आवाज दिली, 'आमचे इंदूर जगातले सगळ्यात स्वच्छ व सुंदर'. केवळ घोषणा देण्यावर व त्या भिंतीवर रंगवण्यावर ते थांबले नाही. त्याचा परिणाम तुमच्या समोर आहे. इंदूर हे निशंशय भारतातले सगळ्यात स्वच्छ शहर आहे. शहरातले लाखोलोक एक विचार घेऊन एकत्र आले असा चमत्कार तुम्ही का नाही घडवू शकत.
तुमचा गावकूस आणि पंचक्रोशीतल्या डोंगरांना जगात सगळ्यात सुंदर, वृक्षसंपन्न बनविण्याचा विचार मनात रूजवा व तो प्रत्यक्षात साकारण्यासाठी तुमचे उभे आयुष्य वेचण्याचा विचार मनात आणा, तुम्हाला पाण्यासाठी स्वयंपूर्ण होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही,
त्याचे पुढचे पाऊल म्हणजे घातक कृत्रिम रसायनविरहीत शेतीचे तुम्ही पाईक व्हा...विषमुक्त अन्नाचे हकदार व्हा!
आपल्याकडे नद्या हिमालयातल्या नद्यांप्रमाणे बारमाही नाहीत. पावसाळ्याच्या चार महिने व त्यानंतर दोन एक महिने त्यांना पाणी राहते. जमिनीत सगळ्यांनी पाणी मुरवले तर नद्या आणखी काही महिने जास्त प्रवाही राहतील. जमिनीखालच्या 'नद्या' डोळ्यांनी दिसणार नाहीत, त्यांचे पाणी मात्र नेहमीच उपलब्ध राहील, हाकेच्या अंतरावर!
मोठ्या शहरांसाठी...
मोठ्या महानगरातील लोकांना संख्येच्या तुलनेत झाडे लावण्यासाठी कदाचित जवळची ठिकाणे उपलब्ध होणार नाही. त्याकरिता थोडे दूर जावे लागू शकते. घरा जवळचे रस्ते, बगिचे यांच्या किनार्यावर मोठाली झाडे हमखास लावली जाऊ शकतात. शहरातल्या सगळ्याच रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावली जाऊ शकतात. इतकेच काय तुमच्या कार्यालया समोर किंवा दुकाना समोर तु्म्ही झाड लाऊ शकतात. अगदी रहदारीच्या रस्त्यांच्या दुतर्फा अनेक ठिकाणी जुनी, मोठाली झाडे आहेतच, मग नव्यानेही लावली जाऊ शकतात. महामार्गांच्या दुतर्फा झाडे लावली जाऊ शकतात. त्याने प्रवास करताना मिळणारी सावली आणि रस्त्यांच्या सौंदर्यात पडणारी भर काय वर्णावी! आपल्याच प्रयत्नांनी पाणीच पाणी निर्माण करू शकलो तर? स्वप्नवत वाटते, पण अशक्य नक्कीच नाही. हे पाणी केवळ पाणी नसेल, ते असेल प्रगतीचे दार. व्यापार, उद्यमाला त्याने चालना मिळेल. कित्येक उद्योग त्याच्या मुळे बहरतील. याचे लाभ अमर्याद!
तुमच्यासाठी आरोग्य जीतेपणीच. स्वर्गही जीतेपणीच!
टीप:
यातील एक शब्द सुद्धा माझा नाही. विविध शेती तज्ज्ञ, वनांचे संवर्धक, थोर शास्त्रज्ञ, संतसाहित्य यातील उपयूक्त माहितीचे संकलन करून मी फक्त वाढप्या प्रमाणे तुमच्या समोर माहिती वाटायला आलो आहे. तुम्ही हा प्रसाद मनोभावे ग्रहण करा. सकारात्मक होऊन कार्य करा. यश तुमचेच.
- तुमच्या मातापित्यांचा जयजयकार
या राष्ट्राचा जयजयकार,
भरतभूमीचा जयजयकार.
धोडप: गवळीवाडीची वेस सुरू होण्यापूर्वी डोंगरउतारावरून झिरपणारा अविट गोडीच्या पाण्याचा झरा... |
ममदापूर: काळविटांसाठी बंधारा बांधणार्या नाशिकच्या सामाजिक संस्थेचे पत्रक. |
सूर्यमाळ: महाकाय आकाराचे आंम्रवृक्ष परिसरातल्या वाड्यांना वर्षभर पाणी पूरविण्याकरिता अनन्यसाधारण महत्वाचे... |
मेळघाट: या अती उष्ण पट्ट्यात पाऊस भरपूर पण जमिनीचे जलस्तर पूर्वपार खोलवर |
पेठेचीवाडी: भरपूर झाडी हरिश्चंद्रगडाची उत्तरबाजू समृद्द करणारी... |
कात्रा: एकेकाळी येथे वाघ असायचा, आता मेाठी झाडी नाहीत तरीपण गवती कुरणे इथल्या गुराख्यांचा मुख्य आधार |
कळसुबाइ ते हरिश्चंद्रगड पट्ट्यात वृक्षसंपदा निम्म्याने घटली तरी परिसराला ती अजूनही भरपूर पाणी देते... |
राजापूर: पण या जमिनीत पाणी टिकत नाही...ते खोलवर मुरते व खालच्या भागाला वरदान ठरते. |
गवळदेव: जमिनीत मुरलेले पाणी असे झरा बनून वाहते. |
ममदापूर: पाण्याच्या प्रवाहावर असे कच्चे बांध घालयचे...त्यावर माती टाकली की पाणी अडूनही राहते व प्रवाही राहते. |
भूपतगड: खडकात पावसाचे पाणी साठले, पण ते पिण्यालायक राहीले नाही. |
रतनगड: झाडी भरपूर असल्याने दीर्घकाळ जमिनीत मुरलेले पाणी खिंडीतल्या कुंडातून मिळत राहते. |
ब्रम्हगिरी: झाडी अफाट तोडलीत तरी पंचलिंगवर टिकून...त्याच्या झिरप्यात असे कुंड आपसूक भरतात. |
कुडपन: प्रतापगडाच्या घेर्यात जावळीच्या खोर्यात झाडी मुबलक पाणी मुबलक. |
डहाणू: झाडे काही फक्त पाणीच देत नाहीत...घरांना अमुल्य दागिन्यांनी सजवतात... |
डहाणू: भूरपूर पावसाच्या डहाणून हिरवा साज ल्यायलेले विश्रामगृह. |
सोनगीर: निझामशाहीत खापराच्या नळीतून पाणी वाहून नेण्याची सुविधा. |
ब्रम्हगिरी: माउलींच्या इतके झाडांचे महत्व आणखी कोण समजावणार! आमच्या मात्र अजून ते गळ्यात नाही उतरत. |
सोनगिर: किल्ल्यावर जुनी कोट्यावधी लिटर पाणी साठवण व्यवस्था...पायथ्याचे गाव तहानलेले |
सोनगिर: महाराष्ट्रातले हे प्रातिनिधीक चित्र...मोठी झाडी गायब खुरटी झाडे काय जलपूनर्भरण करणार |
देहेरी: हे मानव निर्मीत जंगल. दहा वर्षात बहरले...कुर्हाडबंदीमुळे टिकले. |
चांदोरी: नांदूरमध्यमेश्वर धरण गाळाने आकंठ भरल्याने पाणथळ हे जगप्रसिद्ध पक्षीआश्रयस्थान बनले. |
फाशीचा डोंगर: पाणी मुरवण्यासाठी अशी चर म्हणजे अमाप खर्च व मनुष्य शक्तीचा व्यय...ती पुरणार तरी किती. |
नाशिक: म्हसरूळ देवराईत झाडे लावण्यासाठी दोन हजार लोक लोटले...पाचवर्षी भरपूर वनसंपदा उभी. |
राजगड: अती उंचीवर साठवलेले पाणी...महाराजांचा महाराजांनी झाडे तोडू नका हा संदेश कोण मानतो. |
राजगड: चंद्रकोराच्या आकारातला हा देखणा तलाव बालेकिल्ल्यावरची शिवकालिन पाणी व्यवस्था. |
नाशिक: अशी महाकाय झाडे म्हणजे पिढ्यान पिढ्यांची पाण्याची तरतूद... |
राजदेर: मोठ्या मेहनतीने गडावर चर खोदल्यात...आता भरपूर झाडी लावण्याची आवश्यकता. |
धोडप: पुरातन पाणी व्यवस्था. |
धोडप: गवळीवस्तीतले जुने पाणी टाके. |
संदर्भ:
भावार्थ दीपिका,
अमृतानूभव,
चांगदेवपासष्ठी,
बृहतसंहिता,
वृक्षायूर्वेद,
ज्ञानदेवांच्या वनश्रीतील पर्यावरण, गजानन खोले
Tending The Earth, Winin Periera
The One-Straw Revolution, Masanobu Fukuoka
गतीमान संतुलन, दिलीप कुलकर्णी
व्याख्यान:
१) पद्मश्री सुभाष पाळेकर, शुन्य खर्चाच्या शेतीक्रांतीचे प्रणेते.
२) डॉ. अरूण देशपांडे, शेती बॅंकेचे प्रणेते.
३) जीतूभाई कुटमुटिया, जीवनव्रती कार्यकर्ता
४) ज्ञानेश्वर बोडके, अभिनव फार्मर्स,
वृत्तवाहिनीवरच्या मुलाखती:
संजय पाटील, बायफ,
राहीबाई पोपरे
खुप छान ब्लॉग लिहिला... माझ्या गावाला आजही खुप जिवंत पाण्याची झरे आहेत... पण आता पाणी खुप कमी झाले... खूपच कमी झरे वर्षभर चालु असतात...
ReplyDelete