नव्या वर्षाचे स्वागत कसे करावे...सर्वोच्च ठिकाणी एखाद्या डोंगरावर...एखाद्या कपारीत, गुहेत किंवा मंदिरात, किंवा एखाद्या नदीच्या खोर्यात मुक्काम करावा...सवंगड्यांसोबत किस्स्यांची मैफिल जमवावी...वाटल्यास सरणार्या वर्षाचे हिशेबठिशेब मांडावा...नवा संकल्प सोडावा, डोंगरावरची मंतरलेली पहाट, सूर्योदयाच्या साक्षीने नव्या वर्षाचे स्वागत करावे...
म्हणायला ती एक तारीख आहे...पण आमच्या सारख्या बहानेबाजांना त्याचे काय! आम्हाला तर सेलिब्रेट करायचे आहे, स्वत:ला एक्सप्रेस व्हायचे आहे, मग तो फिरंगी वर्षाचा अखेरचा दिवस का असेना...तोही चालेल. चला तर मग थर्डीफर्स्ट साजरा करूया!
या वर्षातल्या...२०१५मधल्या सगळ्या भल्या बुर्या गोष्टींचं आपल्या पुरतं संमेलन भरवूया. अर्थात जवळच्या दोस्त मंडळींच्या सोबतीने. पण हे संमेलन आपल्याला जमिनीवर भरवण्याची इच्छा नाही, म्हणजे आपल्याला हॉटेलात जाणे वगैरे आवडत नाही, असे नाही; पण आपल्याला हे सर्वस्वी वेगळ्या स्वरूपाचे सेलिब्रेशन करायचे आहे...जमिनीपासून शेकडो मिटर किंवा फुट उंचीवरच्या ठिकाणावर.
...म्हणजे शहरातलं थर्टीफर्स्टचं वातावरण धम्माल असतं, पण आता तो गोंगाट नकोसा वाटतो. पूर्वी ढोल ताशा, डीजेचा दणदणात अंगात एनर्जी निर्माण करायचा, त्याचा आवाज कानातून डोक्यात शिरायचा, तासन तास भान हरपून थिरकायला खुप मजा यायची, पण गेल्या काही वर्षात इतका नानाविविध प्रकारचा गोंगाट वाढला आहे की, त्यातून आता सुटकाच ना ही, तेव्हा यांत्रिक पद्धतीच्या आवाजापासून लांब जावेसे वाटते. स्वत:ला एक्सप्रेस करायचे तर अशा प्रकारच्या गर्दी व गोंगाटापासून लांब जायला हवे, म्हणूनच आपल्याला या गोंगाटापासून दूर जायचे आहे. येणार ना तुम्ही?
तो असा मनस्वी भेटतो की...
आपलं टार्गेट आहे सह्याद्रीतला आडवाटेवरचा डोंगर. त्यातिथे काय काय वाढून ठेवलं आहे, नुसत्या कल्पनेने अंगात शहारे भराायला लागे आहेत. अहो! सह्यभेट म्हणजे साधी गोष्ट नव्हे. तो असा मनस्वी भेटतो की, पुढचे अनेक दिवस त्यांची झिंग डोक्यात राहते आणि आठवणी तर दीर्घकाळ मनाच्या कप्प्यात साठवून राहतात. त्याची भेट कमालीची आनंदादायी, तेव्हा अशा सह्यगिरीच्या शिखर माथ्यावर मस्तपैकी मुक्काम ठोकण्याची काय मजा येईल, कल्पना करवत नाही. त्या डोंगरावर हुडहूडवून टाकणार्या थंडीचा खराखुरा आनंद घ्यायचा. स्वत:च्या हाताने चुलीवर मस्तपैकी आवडीचा बेत करायचा, टाक्यातलं नैसर्गिक मिनरल वॉटर प्यायचं आणि भल्या सकाळी उठून त्या भास्कराचं दर्शन घ्यायचं. डोंगरावरची पहाट, हा आपल्या मोहिमेचा हाय पॉईंट असेल.सूर्य, आपला रोजचाच सोबती, पण आपल्या गावात त्याची जादु कळत नाही. डोंगरावरची पहाट म्हणजे एकदम डिफ्रंट बॉल गेम असतो. रानातून, डोंगरकड्यावरून दिवसभर मस्त पायपीट करून डोंगरमाथा गाठायचा, गुहेत किंवा टाक्याच्या बाजुला किंवा एखाद्या दूर्गशिखरायरच्या मंदिरात मुक्काम म्हणजे ए वन बेत ठरेल. रात्री मस्तपैकी शेकोटी भोवती एक एक करून सर्वांनी वर्षभरातल्या चांगल्या नी वाईट कामांची जंत्री मांडायची, तडीस नेण्यासाठी नवे संकल्प सोडायचे, गप्पा टप्पा, जोक्स वोक्स, गाणी बिणी सर्व पोतडीच खोलून टाकायची अनं धमाल थर्डीफर्स्ट साजरी करायची.
नव्या वर्षाी मग पक्षांच्या किलबिलाटासह भल्या सकाळी लवकर उठून स्लिपिंग बॅगच्या बाहेर पडायचं. आहे की नाही, नववर्षाची सर्वोत्तम सुरूवात! लागोलाग शेकाटी पेटवून पाणी गरम करायला ठेवायचं, सगळ्या झोपाळूंना जागं करायचं आणि निघायचं त्याच्या दर्शनाला. सकाळी सकाळी तो क्षितीजा आडून अलगद डोकावतांना बघण्या सारखे सुख नाही, तो क्षण आपल्याला मिस नाही करायचा.
त्याच्या नुसत्या आगमनाने आसपासच्या सृष्टीत केवढी चहल पहल होते...रंगाची काय ती जादू...क्षणा क्षणाला बदलणार्या छटा डोळ्यात अन डोक्यात मनमुराद साठवायच्या आहेत...त्या आसपासच्या डोंगररांगा व वृक्षराजींचा तो सिलहूवेट इफेक्ट...त्याचे अमिट चित्र हृदयात साठवायचे आहे...पक्षांची गगनभरारी नजरेत भरायची आहे आणि या वातावरणा आले मसाल्याचा घमघमीत चहा म्हणजे नववर्षाची आइडियल सुरूवात ठरेल.
काम तितकं सोपं नाही...
यंदाचा थर्डीफर्स्ट सह्याद्रीतल्या एखाद्या डोंगरमाथ्यावर साजरा करण्याची कल्पना आहे तर भन्नाट. पण काम तितकं सोपं नाही. राडेबाज मंडळींचा ससेमिरा नको, म्हणून आडवाटेचा गड निवडायचा. आपले किती अंतर प्रवास करण्याचे नियोजन आहे, यावर सर्व काही अवलंबून असेल. हरिश्चंद्रगड सारख्या लोकप्रिय ठिकाणी ओव्हरक्राऊडींगचा धोका कायम राहणार, त्यापेक्षा कमी वहिवाटीची ठिकाणे काय कमी आहेत का? वेळ थोडा असेल, कामावर लवकर हजर होणे गरजेचे असेल तरी फिकीरनॉट, तुमच्या जवळ पासचे ठिकाण सुद्धा निवडू शकतात की. आणि हो, आपल्या सारखेच निसर्ग व इतिहासाचा आदर करणारे दोस्तमंडळी अगोदरच येऊन थांबली असेल तरी काही बिघडत नाहंी, त्यांचे व आपले विचार जुळवून घ्यायचे, मनाचा हिरमोड होऊ द्यायचा नाही. उलट नवे दोस्त जोडता आले तर जोडायचे. हवं तर आपली वेगळा तळ बनवायचा, पण एकपेक्षा अधिक ग्रुप म्हणजे अडचण? असं मानण्याचे कारण नाही. हो! येणारे राडेबाज असतील तरी निसर्गाचा,आपल्या थोर इतिहासाचा मान राखण्याचे सांगुन बघावे, बहुतांशी लोक ताळ्यावर येतात, नाही तर सरळ फोन फिरवून प्रशासनाला कल्पना द्यायची. कारण गडांवर, डोंगरांवर गोंधळ माजवणार्यांना पोलिस, वन विभाग किंवा स्थानिक वन संरक्षण समितीच्या कारवाईला सामोरे जावे लागेल यात शंका नाही. त्याकरिता गडावर जाण्यापूर्वीच नंबर्स मिळवून ठेवावेत.अस्पष्टतेच्या चादरीआड...
चला तर मग लवकरात लवकर ठिकाण जॉटडाऊन करू, दोस्त मंडळींची लिस्ट बनवा. सोबत नेण्याच्या व न नेण्याच्या वस्तुंची यादी बनवा आणि लागा कामाला.
आपल्याकडे थंडीने चांगला जोर धरला आहे, त्यामुळे रानात व डोंगरावर सकाळी व सायंकाळी मंतरलेले वातावरण असेल याची खात्री बाळगा. त्यासाठी थोडं दूर प्रवास करण्याचे, पायथ्यापासून डोंगराचा माथा गाठण्याचे कष्ट सोसावे लागतील, पण या कष्टाचे चीज असे असेल की विचारू नका!
आडवाटेचा सोडा, तुम्ही तुमच्या परिचयाच्या डोंगरावर गेलात तरी तुम्हाला त्याची भेट मनस्वी आवडेल, कारण ही ठिकाणे अशी आहेत की त्यांचा कधी कंटाळा येणार नाही.
हवामान धुरस असल्याने आस पासचे डोंगर, दर्या म्हणाव्या तशा सुस्पष्ट दिसणार नाही, पण त्यातच खरी गंमत आहे. अस्पष्टतेच्या चादरीआडची सृष्टी काही औरच दिसते. तुमचा मोबाईल किंवा एसएलआर कॅमेरा नुसता धडाडू दे! सह्यकडे, डोंगरांवरच्या पुरातन वास्तू, पाण्याची टाकी, गुहा, मंदिरे, पायर्या, गवाक्ष, पाने, फुले व अवघी वनसंपदा तुमच्या डोळ्याने टिपा की कॅमेर्याने प्रत्येक क्षण तुम्ही एन्जॉय कराल यात शंका नाही.
एक मात्र काळजी घ्यायची, आपली आनंदयात्रा, तिचा शेवटही आनंदानेच करायचा. यासाठी डोंगरावर वावरण्याचे जे नियम ट्रेकर मंडळी पाळतात त्याचे कसोशिने पालन करायचे. सर्वात पहिली अट, ही काही कोणती स्पर्धा नाही, तेव्हा पुढे जाण्याची, डोंगर चढण्याची स्पर्धा निर्माण होऊ द्यायची नाही, कोणी करणार असेल तर त्याचा तिथेच दी एन्ड करून टाकायचा. काही वेळा सहज सोप्या वाटणार्या ठिकाणी सुद्धा तोल जाण्याचे, घसरून पडण्याचे प्रकार घडले आहेत, आणि डोंगरावर तुम्ही पडला तर मोठी आपत्ती ओढवण्याची शक्यता असते. मदत आणि बचाव कार्य तर सर्वात कठिण होऊन बसते, त्यामुळे अशी वेळ येणार नाही हे भान कायम मनात ठेवायचे व आपल्या दोस्त मंडळींना त्याबद्दल जागृक करायचे. कोणी चांगल्या सूचनांची थट्टा करणारा असेल तर त्याला लगेच ताळ्यावर आणायचे.
डोंगराच्या पायथ्याच्या ठिकाणी वाडी वस्तीतून एखादा मार्गदर्शक घेणे प्रथम प्राधान्य ठेवावे, त्याकरिता योग्य ती रक्कम ठवरून घेणे. कोणी स्थानिक जर सोबत असेल तर त्यासाठी चांगली गोष्ट ती दुसरी नाही. त्यामुळे कुठे अंधारात ये-जा करावी लागली तरी वाट चुकण्याचा संभव राहत नाही. डोंगरावरच्या वास्तू, महत्वाची ठिकाणे, पाणवठे यांची सहजपणे माहिती मिळते. शिवाय या मंडळींशी गप्पा मारून त्यांच्या परिसराची छान माहिती पण मिळू शकते.
सोबत गरम कपडे, शिधा सामुग्री, बॅटरी, पाण्याच्या बाटल्या, वही-पेन जरूर ठेवावे. ज्याठिकाणी जाणार असेल त्याची माहिती अगोदर वाचून काढावी, इतिहासाच्या खाणा खुणा बघायला, काही भौगोलिक वेगळेपण असेल तर ते बघायला उपयोगी ठरते.
ही ठिकाणे ना मद्यपान करण्याची ना मांसाहार शिजविण्याची, असे काही प्रकार करण्याची उत्कट इच्छा असेल तर तुमच्या गावातच थांबलात तर बरे. शिवाय असा काही कार्यक्रम केला तर, थर्टीफर्स्टच्या रात्री वर्षातले सर्वाधिक अपघात घडतात हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा जणू शिरस्ताच बनला आहे. हे दुर्दूैवी असल्याने पोलिस व प्रशासनही पहाटेपर्यंत मोक्याच्या ठिकाणी तपासणी करून तळीरामांना कोठडीत विश्रांतीसाठी पाठवते, तेव्हा खरी झिंग ही निसर्गभेटीची येऊ द्या!
काय करावे...काय करू नये!!
निसर्गाच्या सानिध्यात थर्डीफर्स्ट साजरा करण्यासारखी भन्नाट कल्पना नाही, त्यासाठी खर्च खुप थोडा येतो व वस्तूही फार थोड्या लागतात.१.) मुक्कामाचा अवधी बघून वापरण्याजोगे कपडे. कपडे निवडताना संपुर्ण शरीर झाकणारे पुर्ण बाह्यांचे शर्ट किंवा टॉप व पूर्ण बॉटमची पॅन्ट. हवं तर एखादा जादा ड्रेस नेऊ शकता व नाईटसाठी सुटसूटीत ड्रेसही चालू शकतो. दिवसा मात्र भाजून काढणारे उन असू शकते. जंगलातून चालताना शरीराला काटे टोचू शकतात किंवा झाडांशी घर्षण होऊन अंग सोलवटू शकते, हे ध्यानात घेऊन शरीर पुर्ण झाकणारे कपडे असावे, हाफ, थ्री फोर्थ बिलकुल नको. हिवाळा असल्याने पर्याप्त गरम कपडे हवे.
२.) ग्रुपच्या आकारमानानुसार व मेन्यू नुसार भांडी घ्यावी व पर्याप्त शिधा सामुग्री प्रवासाच्या सुरूवातीलाच प्रत्येकाकडे समसमानपणे द्यावी. पोर्टेबल स्टोव्ह असणे आवश्यक व उपयुक्त ठरेल. त्यामुळे अकारण लाकुडफाटा जाळण्यापासून वाचवला जाऊ शकतो. पोर्टेबल नसेल तर नेहमीचा स्टोव्ह सुद्धा चालेल. स्टोव्ह करिता रॉकेल मात्र स्वतंत्र बाटलीत भरून घ्यावे. काकडी, संत्रा, मोसंबी, लिंबु या सारखे ताजे पदार्थ कमालीचे समाधान देतात.
३.) कॅमेरा व नोंदवही, दुर्बिण, चघळण्यासाठी सुकामेवा, आवळा कॅन्डी, इलेक्ट्रॉल पाऊडर व गरज भासल्यास घरी तयार केलेला चिवडा किंवा भाजलेले मुरमुरे सोबत न्यावे. पाकिटबंद पदार्थ डोगरांवरच काय, घरात सुद्धा खाणे सुरक्षित नाही, तेव्हा त्यांचा विचार नकोच. उलट त्यांच्या सेवनाने होणारे स्लो पॉयझनिंक ध्यानात घेऊन आपल्या आईने, ताई किंवा कुटुंबातल्या सदस्यांचा प्रेम व जिव्हाळा असेलेले घरचे पदार्थ सर्वात उजवे ठरतात.
४.) मद्य, मांसाबरोबरच आवाज करणार्या कुठल्याही वस्तु नको, त्यात वाद्य व फटाकेही आलेच. या गोष्टी कुठल्याही डोंगरावर नेण्यास बंदी आहे. त्यामुळे कारवाई होऊ शकते, हा भाग निराळा, परंतू आपल्या इतिहासाचा अनमोल ठेवा असलेल्या गडांवरचे पावित्र्य नष्ट होते व आपल्या हातून आपल्या महान वारशाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण होते.
५.) डोंगरावरचे पाणीसाठे मर्यादित आहेत, त्याच प्रमाणे डोंगराच्या पायथ्याच्या वाडी वस्तीतही पाण्याची फार चांगली स्थिती नाही. आपल्यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही, ते दुषित होणार नाही ही काळजी सदोदित घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अंघोळ करणे टाळावे, ते जर आपण योग्यरित्या करू शकलो, तर आपल्या नंतर येणार्यांना कुठलाही त्रास होणार नाही व स्थानिक मंडळी आपल्याला अडचण न समजता, समजुतदार पर्यटक म्हणून मानायला लागतील व त्यांचा सर्वांना फायदा होऊ शकेल.
६.) आपल्या हातून डोंगराच्या देवतेचे पूजन घडणार असेल ते ती चांगली गोष्ट असेल. त्याकरिता नारळ, धुपबत्ती व थोडा प्रसाद सोबत न्यायला हरकत नाही, शिवाय गडावरच्या पाण्यानेच त्यांना अभिषेकही घातला जाऊ शकतो.
७.) एक वेगळी कल्पना: असा भन्नाट कार्यक्रम फक्त मित्रांसोबतच होऊ शकतो असे नाही, कुटुंबाचाही विचार करा. यावेळेला कुटुंबालाच अशा एक्झॉटिक ठिकाणी नेता आले तर. नक्की विचारकरा. कुटुंबातल्या सगळ्यांना मानवेल, अशी निसर्गाची अनेक ठिकाणे आहेत जी रिसोर्ट व हॉटेल उद्योगाच्या पलिकडची आहेत. कुठल्याह सुख सोयी, रुम सर्व्हिस शिवाय कशी धमाल करता येऊ शकते, हे तुम्ही दाखवून देऊ शकते अशी ठिकाणे तुम्हाला बक्कळ सापडतील. जाणकारांशी चर्चा करून असे एखादे सर्वस्वी वेगळे ठिकाण शोधणे काही अवघड नाही. फक्त मंडळी पायी किती चालू शकते हा विषय आहे. आणि फार पायी चालणार नसेल तरी तशा प्रकारची ठिकाणे आहेत. नाहीच काही तर एखाद्या शेतावर किंवा एखाद्या कृषी पर्यटनाच्या ठिकाणी, वणी, ब्रम्हगिरी सारख्या ठिकाणी तुम्ही कुटुंबाला मुक्कामी नेऊ शकता. फक्त थोडी अधिक तयारी करावी लागू शकते, इतकेच, पण हा विचार जरूर करून बघा!