Sunday, December 30, 2018

chand bibi mahal and heritage amhednagar


लग्न आणि डोंबल्यांचं हेरिटेज टूर...

अंगात भिनलेली उनाडकी, ती जाता थोडीच जाईल! हा पूर्व इतिहास पक्का ठाऊक असल्याने, 'तुम्ही लग्नाला जात आहात, ट्रेकला नाही, तेव्हा कपडेलत्ते सॅकमध्ये घालून न्यायचे नाहीत!' 'नातलगांशी बोलत चला' आणि हो, तुमच्या ट्रेकच्या निरसगप्पात कुणाला इंटरेस्ट नसतो, तेव्हा नातेवाईकांच्या मुलाबाळांची विचारपूस करा...
एक मीच अशी...बाकी सगळ्या बहिणींचे मिस्टर नियमीतपणे सगळ्यांची आस्थेवाईकपणाने चौकशी करत असतात...आल्या गेलेल्यांची त्यांना सगळी माहिती असते...कोण आजारी पडलं...कुणाच्या मुलाला कुठे अॅडमिशन मिळाली या सगळ्या गोष्टी त्यांना ठाऊक असतात',  'तुम्हाला मात्र कुळांची नावे, नातेवाईकांच्या मुलामुलींची नावे, ते काय करतात काय नाही, यातले ओ म्हणता ठोकळत नाही...तेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासाचे ज्ञान पाजळत बसू नका, कुटुंबाच्या इतिहासात जरा रस घ्या'...

या नाताळच्या सुट्टीत अहमदनगरला सौभाग्यवतींच्या बहिणीच्या मिस्टरांच्या भावाच्या मोठ्या मुलीचे लग्नाकरिता तब्बल पाच दिवस अगोदर जाण्याचे तगडे नियोजन होते. मला गोड भाषेत मिळालेला दम प्रत्यक्षात गंभीर स्वरूपाचाच होता...तो असा हसत हसत जाऊ देण्यासारखा नव्हताच. माझ्या नाताळच्या सुट्टीतल्या हमखास ट्रेकला यंदा पूर्णविराम मिळणार होता. मिळणार होता काय, तो मिळालाच!

माझी खरोखरच पंचाईत होणार होती. पाच दिवसांचे लग्न झोडण्याइतकी माझी प्रकृती 'तंदूरूस्त' नव्हती. त्या ऐवजी पाच काय, दहा दिवसांचा एखादा रेंज ट्रेक असता तर? पण करणार काय, ते औरंगजेबाचे फर्मान होते!
माझ्या हेरिटेज टूरचे किमयागार महेंद्र व येागेश

अहमदनगरहून खुद्द वधुपिता वीरूभाऊ हे पत्रिका द्यायला घरी आले, तेव्हा आमचा घरात पत्ताच नव्हता. 'नेमकं कुणी पाहुणे घरी आले की, तुम्ही ट्रेकवर असतात', हा नेहमीचा प्रश्न यंदाही उपस्थित झाला होत, पण सौम्य स्वरूपात. नुकत्याच १ ते ९ डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या आमच्या तथाकथित ऐतिहासिक सातमाळा भटकंतीच्या नियोजनात, कधी नव्हे ते आमच्या सौभाग्यवतींचे भरभरून सहकार्य मिळाले होते. माझी सगळी तयारी करण्यापासून, सगळे सहभागी रद्द झाले, तेव्हा काळजी करू नको, कोणी नाही आले तर मी तुझ्या सोबत येईन, असे म्हणे पर्यंत हे सहकार्य होते, त्यामुळे अहमदनगरचे पाहूणे पत्रिका द्यायला आल्यावर माझ्या घरातल्या अनूपस्थितीचा विषय तितका गाजला नव्हता.

सातमाळा मोहिमेकरिता मला मनस्वी सहकार्य मिळाले होते, आता अहमदनगरच्या लग्नाच्या मोहिमेला मनस्वी सहकार्य देण्याची माझी पाळी होती...आमचा पूर्व इतिहास खासा कलंकित, त्यामुळे, 'नगरला फक्त लग्नच अटेन्ड करायचे, ट्रेकबिकच्या भानगहीत काही पडायचे नाही', ही सूचना मला अगोदरच निक्षून देण्यात आली होती.

बरोबर २० डिसेंबरला ट्रेकला...सॉरीऽऽ लग्नाला रवाना होण्याच्या दिवशीच आमची मुख्य तेल घाणी नादूरूस्त झाली. त्यामुळे लग्न नावाच्या मोहिमेवर दोन दिवसांनी उशिरा निघण्याचे नियोजन झाले. आता सारी भिस्त ही उर्वरीत दोन घाण्यांवर होती, त्यांचा रखरखाव करण्यात मी स्वत:ला झोकून दिले होते. या सार्‍या भानगडीत लग्नाला निघायला २४ तारखेची दुपार उजाडली. आता मला अहमदनगरला प्यूअरली लग्नच अटेंड करावे लागणार होते. निझामशाहीचा महत्वाचा इतिहास वागवणार्‍या नगरच्या जून्या वास्तूंच्या दर्शनाची शक्यता पार मावळली होती.

आमच्यात लग्नाच्या आदल्यादिवशी देवीचे रात्रीचे जागरण असते. गेल्या अनेक वर्षात हा रातजागा मी अनूभवला नव्हता. संध्याकाळचे जेवण उरकून तमाम महिला वर्ग सजण्याधजण्यात व्यस्त असताना माझ्या धातीत कालवाकालव सुरू झाली होती. रातजाग्यात आता नेमकी कोणती भूमिका वठवावी लागणार? हा चिंतेचा विषय होता. तो सोडवण्यासाठी एक डाव टाकला...

मी: अगं, हे रातजागरण म्हणजे बायकांचे काम असते, तिथे आम्हा पुरूषांचे काही काम नसते.

ती:  तुम्हा पुरूषांचे नव्हे, तुमचे काही काम नसते, असे म्हणायचे आहे का?

या प्रतिप्रश्नातल्या उत्तराची धार ओळखून मी दोन पावले मागे आलो.

पण मग तिथे आम्ही करायचे काय?
ट्रेकला कॅम्पफायर करतात ना, तसाच हा कॅम्पफायर समजा...नाही गाता आलं तर निदान मुलांच्या गुणांना दाद तर द्या! आणि जरा आलेल्या गेलेल्यांची चौकशी करा!

आणखी एक तार्किक प्रश्न टाकला,
'पण तिथे तर गाण्या, नाचण्याचे आवाज असतील ना'
त्याचे उत्तर फक्त कटाक्षाने मिळणार होते!!

ही बहिणीकडच्या लग्नाला आल्यामुळे लग्नानंतरही दोन तीन दिवस थांबणार होती. माझी सुटका लवकर होणार होती. २५ डिसेंबरचे गोरज मुहुर्ताचे लग्न लाऊन रात्रीत नाशिकला परतून 'एखादा बेत' अर्थात एखादा ट्रेक हाणण्याचा माझा बेत एव्हाना बाद झाला होता.

'तुम्ही मुलीकडून लग्नाला आलात, तेव्हा सगळ्या कामात मदतीची अपेक्षा राहील. काम कोणी देणार नाही, तेव्हा ते मागून घ्या'. आता आमच्या साडूकडचा तमाम महाराणा संघ लग्नाच्या कामात बुडालेला बघायला मिळाला. मी बापूडा त्या अनोळखी शहरात काय काम करणार. एक तर लग्नातले एकुणएक काम कुणाला ना कुणाला उक्ते दिलेले होते. काही काम मिळते का म्हणून मी टकमक बघत होतो, तोच लहानग्या समर्थला कोणी तरी दुध आणायला सांगितले, मी झपाटून पुढे सरसावलो आणि कामगिरी मागून घेतली, परंतू अन्य एका पोराने ती माझ्या हातून हिरावून घेतली आणि गाडी घेऊन तो रवाना देखिल झाला. त्याचे नाव अर्थातच मला ठाऊक नव्हते!

एकदाचे लग्न यथासांग पार पडले. आमच्यात लग्न हे मध्यरात्रीच्या समयी लागते, फक्त मंगलअष्टके गोरज मुहुर्तावर होतात, पाहुणे मंडळे जेवण घेऊन रवाना होते आणि मग आमचा पारंपारिक लग्नविधी मध्यरात्री पर्यंत सुरू राहतो. (कोंबडं आरवण्याच्या आत वधू सासरी रवाना झालेली पाहिजे ही अट असते...आंबेजोगाईत एक लग्न सकाळ पर्यंत सुरू राहिल्याने सारी वरात दगड बनली. त्या दगडांकीत वरातीचे पुतणे आंबेजोगाईत असल्याची माहिती मला माझ्या मावशीकडून मिळाली होती. बालपणी ती पुरातन शिल्प मी बघितली, परंतू ती घटना नीट स्मरत नाही)














थंडीचा जोर असल्यामुळे मंगल कार्यालयाच्या लॉनवर अंगात थंडी भरून आली. ''ट्रेकवर आपल्याला कधी थंडी वाजते?'' या प्रतिप्रश्नाने मुक्कामाच्या ठिकाणी परत जाण्याचा विषय एका झटक्यात निकाली काढण्यात आला. महेंद्र आणि विरूभाऊ या दोघांनी अपार मेहनत घेऊन एक देखणा लग्न सोहळा पार पाडताना आम्हाला कामाची कुठलीच तोशिष पडू दिली नाही. दुसर्‍या दिवशी कडाक्याच्या थंडी मुळे मला दुपारचे जेवण होऊन रवाना होण्याचा आग्रह झाला. सगळ्या पाहूण्यांना रवाना करताना महेंद्र मला सारखे, थांबून जा! असे सांगत होता. 

अॅकॅडमीकली, लग्न पार पडल्याने आणि ट्रेक बिक हा विषय माझ्याकरिता अगोदरच बाद करण्यात आल्याने मी, परतण्याची तयारी केली होती. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत एक एक पाहूण्याला रवाना करून महेंद्रने हळूच विषय काढला, 'थांब तुला चांदबीबी महालावर घेऊन जातो'.  ही सूवार्ता मी मनातच ठेवली असती तर बरं झालं असतं!

लग्नाच्या दुसर्‍या दिवशी मी थांबल्यामुळे सौभग्यवतीं आदंनात होत्या. मी आनंद प्रकट केला, 'अगं महेंद्र मला चांदबीबीचा महाल बघायला घेऊन जातोय, माझं थोडं का होईना, हेरिटेज नगर बघून होणार? 

तो किती दमला आहे, कळत नाही, कसलं डोंबल्याचं हेरीटेज टूर करता? या प्रतिहल्ल्याने मी थोडा गांगरला...पण महेंद्रने, 'भक्ता, काळजी नसावी'च्या अविर्भावात इशारा केला. मी त्याला लगेच सांगितले, अरे तू खुप दमला आहेस. आठवड्याभरापासून जोरदार धावपळ सुरू आहे. पुढच्या वेळेला बघू.

निझामशाहीतला मातब्बर प्रधान सलाबत खानाचा मकबरा आणि भोवतालचा कोट
मागच्या वेळेस नगरचा भूईकोट किल्ला दाखवून आणणार्‍या महेंद्रने माझ्याकरिता खरोखरच लवकर जेवण उरकले. येणारे प्रत्येक काम मार्गी लावत, मोठी गाडी कामासाठी बाहेर गेली असताना त्याने, 'मी काही वर येणार नाही खाली बसून राहील, तु बघून ये सांगत त्याने दुचाकीला सेल मारला.

चांद बिबीचा महाल, नगर गावात असावा अशी माझी कल्पना होती. जिल्हा बॅंकेसमोर मित्राच्या दुकानाजवळ गाडी लाऊन महेंद्रने त्याचा मित्र योगेशला बोलावून चांदबीबी महालाला जायचेय असे सांगितले. अवघ्या पाच मिनीटात हजर होताना या पठ्ठ्याला आपल्या गृहमंत्रालयाला राजी करावे लागले हे त्याच्या मोबाईल फोनवरच्या संभाषणावरून स्पष्ट होत होते. 

महेंद्रने ओळख करून दिली, हा प्रशांत माझा साडू, नाशिकला असतो...याला ऐतिहासिक स्थळे बघण्याची...गडकिल्ले फिरण्याची आवड आहे. योगेशने चांदबीबीचा महाल ज्या डोंगरावर आहे, तो शहा डोंगर आज नगरकरांचे आकर्षण बनल्याची माहिती दिली. अतिशय प्रमाणबद्द बांधकाम असलेला हा महाल उत्तम स्थितीत असून सुट्टीच्या दिवशी तिथे अलोट गर्दी होते. रोज सकाळी व्यायामासाठी या डोंगरावर जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. लोक नगरवरून आता सायकली घेऊन येतात, तर काही जण धावत डोंगरावर जातात. येथे मोर व हरणे बर्‍याचदा दृष्टीस पडतात. बिबट्याचे मात्र येथे कोणतेच अस्तित्व नाही. इतर सगळ्या ठिकाणांप्रमाणे तरूणाई इथल्या महालात सेल्फी फोटोबाजीसाठी येते तर काही जण भिंतींवर आपल्या कथित प्रेमाचा बाजार मांडतात, तो पूसण्यासाठी नगरमध्ये मॉर्निंग वॉक करणार्‍यांचा गट कार्यरत आहे. योगेश आणि महेंद्र यांच्याकडून अशी एक एक माहिती मिळत असताना आम्ही शहा डोंगराच्या पायथ्याजवळ आलो. योगेशने वर जाण्याच्या पायवाटा दाखविल्या. आमच्याकडे वेळ थोडा असल्याने आम्ही थेट गाडी वर नेली. येथे जाण्याचा घाटरस्ता उत्तम असल्याने घाटात गाड्यांची बर्‍याचदा रिघ लागते! सुट्टीच्या दिवशी अलोट गर्दी असते. 
चांदबिबीचा महाल...की सलाबतखानाचा मकबरा...वास्तू मात्र सुबक, टोलेजंग!

पायथ्याला शहापूर गाव, त्यामुळे याला शहा डोंगर हे नाव निझामशाहीत पडले असावे. डोंगराचा निष्पर्ण पसारा अगदी दुर अंतरावरून नजरेत खुपतो. वनखात्याने महाराष्ट्रातल्या अनेक डोंगरांप्रमाणे येथेही रेन ट्री, ग्लिरिसीडीयाचे मोनोकल्चर आणल्यामुळे संपूर्ण डोंगर भकास झाला आहे. डोंगरावर उगवणारे गवत टिकू देण्याचा तर प्रश्नच नाही. पूर्णपणे चराई करून साफ झालेल्या या डोंगरावर त्यामुळेच गवताच्या आश्रयाने वाढणारी जीवसृष्टी सुद्धा फारशी नसावी अशी स्थिती आहे.

चांदबीबीचा महाल ही मोठी गौरवशाली वास्तू आहे, हे दूर अंतरावरूनच जाणवायला लागते इतके ते विशाल बांधकाम आहे. चहूबाजुंनी दगडाच्या सुबक बांधणीचा कोट असून कोट आणि महाल ही दोन्ही बांधकामे एकाच वेळ करण्यात आल्याचे जाणवते. आवारात पूर्व बाजूने लोखंडी प्रवेश द्वार असून त्या जवळ पुरातत्व खात्याने दगडात कोरलेल्या माहितीवर, 'सलाबत खानाचा मकबरा', असे लिहीले आहे. हा चांदबीबीचा महाल नाही, पण नगर मध्ये त्याला त्याच नावाने संबोधले जाते. सरकारी दिशादर्शन पाट्यांवरही चांदबीबीचा महाल, असेच रंगवले आहे. 
वास्तूचे गुढ एकमात्र चिंचोळ प्रवेशद्वारा

लांबून पाहताक्षणी प्रेमात पडावे इतकी ही देखणी वास्तू आहे. २१.४ मिटर उंची आणि तीनच मजले यावरून बांधकामाची भव्यता लक्षात येईल. कोणतेही नक्षीकाम नसलेले हे बांधकाम जितके भव्य तितकेच ते सुबक आहे. अष्टकोनी चबुतर्‍यावर अष्टकोनातली स्तभाच्या आकाराची रचना अनोखी आहे. सगळेच दगड समप्रमाणात घडवून कमानी यच्चयावत एकजात सारख्या आहेत. 

सुबक दगडात अष्टकोनाची बाहेर जशी बाजू तसाच आतमध्ये खालपासून वर पर्यंत अष्टकोनात हा मकबरा उठावला आहे. प्रत्येक मजल्यावर प्रत्येक कमानीच्या आतील छत अर्ध गोलाकार असून ही गोलाई वर निमुळती होत जाते. बांधकामाच्या दृष्टीने अतिशय अवघड असलेले असे २४ लहान घुमट आहेत. मुख्य मकबर्‍याचा घुमट मोठा असून तोही पूर्णपणे अर्ध्यवर्तुळाकार आहे. हे सगळेच्या सगळे घुमट लहान दगडाच्या चिर्‍यात बांधले आहेत.  गणित, भुमीती, मापे, चुन्यात दगड सांधण्याचे शाश्वत तंत्र,दगडांचे एकमेकांना केलेले लॉकिंग, चौकोनी, गोलाकार व अन्य आकारातली दगड कटाई इतकी अचूक की घुमटाचा गोलही अगदी परिपूर्ण असे सगळे काही येथे बघायला मिळते. संपुर्ण मकबरा हा आतील बाजूने व्हरांडा आणि मधोमध खालपासून छतापर्यंत पर्यंत एकजात मोकळा आहे. ओबडधोबडपणा कुठेच नाही. या वास्तूत महाल असण्याचे कोणतेच लक्षण नाही. वर जाण्यासाठी एक चिंचोळे प्रवेशद्वार. खोल्या किंवा स्वच्छतागृह अशी कुठलीच रचना आत संभवत नाही, त्यामुळे याचे बांधकाम हे महाल म्हणून केलेले नाही हे स्पष्टच होते. मग इतके विशाल आणि सुबक बांधकाम करण्याचे प्रयोजन तरी काय असावे?


आपल्या हयातीत सलाबत खानाने खरोखरच कबर बांधण्यासाठी इतकी मोठी वास्तू उभारली असेल?

छताला काही ठिकाणी दगडाचे सांधण थोडे हलल्याचे जाणवते व त्यातून पावसाचे पाणी रिसत असावे. मुख्यघुमटातूनही पावसाचे पाणी रिसत असावे, अशा चून्याच्या धारा दिसून येतात. ज्या ठिकाणहून मकबर्‍याच प्रवेश होतो, त्याच्याच उजव्या बाजूने एक तळघर असून या अष्टकोनी तळघराचे बांधकामही तितकेच सुबक आहे. त्यात दोन कबरी आहेत.  नगरच्या निझाम पहिल मुर्तझा याचा वझिर सलाबतखान दुसरा याने १५६५ ते १५८८ या काळात त्याच्या जितेपणीच आपल्या व आपल्या पत्नीच्या कबरीकरिता हा मकबरा बांधला, असे सांगितले जाते. एक वेडगळ राजा म्हणून या मुर्तझाची कारकिर्द ओळखली जाते. 

सलाबत खानाने विषाचे तीन पेले केले...त्याच्या ज्या पत्नीने विष नाही घेतली तिची व तिच्या कुत्र्याची कबर बाहेरच्या बाजुला...तर सलाबत खानासोबत मृत्यू कवटाळणार्‍या पत्नीला मुख्य मकबर्‍यात स्थान मिळाल्याची आख्यायिका. एैकायला मिळते.
हा चांदबीबीचा महाल असण्याची कोणतीच शक्यता वाटत नाही. नगरच्या प्रसिद्द भूईकोट किल्ल्यात विजापूरच्या खालोखाल देखणे महाल होते, अशा ऐतिहासिक नोंदी असल्याचे कळते. सुरक्षित आणि सुसज्ज असा किल्ल्यातला निवास सोडून चांद बीबी सारखी लढवैय्यी, जिने बलाढ्या मुघल फौजेला ताकास तुर लागू दिली नाही, ती अशा निर्जन ठिकाणी निवास करत असेल यावर विश्वास बसत नाही. खुद्द सलाबत खान सुद्धा त्यात निवासासाठी थांबला नसेल. अन्यथा तळघरात कबरीच्यावर निवासस्थान ही मुसलमानी राजवटीची पद्दत कुठेच आढळत नाही. 

तळघरातली कबरही नक्कल असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येते. मुसलमानी राजवटीत प्रसिद्दी व्यक्तींना दफन केल्यानंतर त्याच्या वर कबरीची नकल करण्याचा प्रघात आढळतो. ताजमहालातही तसेच आहे. 
इंग्रज आमदनीत अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांसाठी या मकबर्‍यात निवासीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाला होता, त्यासाठीच वर पर्यंत घाटरस्ता तयार करण्यात आला. परंतू शहा डोंगरावर पाणी कुठेच नाही. पावसाचे पाणी तिथल्या तीन्ही तलावात पुरेसे साठत नाही. शिवाय येथे हवेचे प्रमाणही खुप आहे.

टोलेजंग मकबर्‍याचा मुख्य घुमट म्हणजे भव्य, सुबक, अप्रतिम बांधकामशास्त्राचा नमुना
जिल्हाधिकार्‍याचे निवासस्थान होऊ शकले नाही, तेव्हा इंग्रजांनी या मकबर्‍याच्या कमानींना काचेची मोठाली तावदाने लाऊन अधिकार्‍यांचे विश्रामगृह बनविण्याचा प्रयत्न केला, परंतू तिथले वातावरण विश्रामाकरिता योग्य नसल्याने इंग्रजांना तेथे वास्तव्य करता आले नाही, अशा नोंदी इंग्रजांनी गॅझेटियरमध्ये लिहून ठेवल्या आहेत. 

दिवस लहान असल्याने सूर्य कलू लागला तसे आम्हाला परतीचे वेध लागले. नगरच्या वारसौ दौर्‍याचा हा लहानसा अंश होता. दगडातील अप्रतिम कॅलिग्राफी आणि नक्षीकामाचा उत्कृष्ट नमूना असलेली दमडी मशिद, आलमगिर, जिथे मुघल बादशाह औरंगजेबचा मृत्यू झाला, बागरोजा आणि त्याच्याच जवळ असलेली १९६५च्या तालिकोट युद्धात शौर्य गाजवणारा गुलामअली हत्तीची कबर, फराहबक्ष महाल आणि आसपासच्या असंख्य निझामशाही वास्तुंचा मनमुराद वेध घेण्यासाठी वेळही तितकाच जास्त लागणार होता. 


परतीच्या वाटेवर, निझामशाही पूर्वीच्या ऐतिहासिक खाणाखूणांबद्दल मी योगेश व महेंद्र यांना मुद्दाम विचारले तर त्यांनी दोन तीन ठिकाणी काही जुनी हिंदू पद्दतीची बांधकामे असल्याची माहिती दिली. एक तर शहा डोंगराच्या अगदी मागेच असल्याचे समजले व मी तिथे जाण्याचा आग्रह धरला. महेंद्रलाही त्याच्या गृहमंत्रालयातून एव्हाना फोन सुरू झाले होते, तशातच आम्ही वीरभद्र मंदिराकडे कुच केली. जंगम समाजाकडे ताबेदारी असलेल्या या मंदिराच्या बांधकामा संबंधी माहिती देणारे तिथे कोणीच नव्हते. बांधकाम यादव कालीन असावे असे वाटत होते. मी योगेशला मुद्दाम या परिसरात काही शिलेलेख वगैरे आहेत का असे विचारले, तर त्याने यामंदिरात असंख्य वेळा येऊन गेल्याचे व दगडावरचे कोणतेच लेख नसल्याचे सांगितले. मंदिराच्या बाहेर पडत असताना एका पडक्या बारवाचे काम दृष्टीस पडले. मी कमीनी दरवाजातून आत गेलो तर रस्ता विटांच्या भिंतीने बंद करण्यात आला होता. पलिकडच्या बाजूने विहीरीत डोकावून परतत असताना अचानक वरच्या बाजूला एक ठसशशीत शिलेलेख दिसला. परतण्याची खुपच घाई असल्याने त्याचे दुरून छायचित्र घेता आले. 

परवानगी नसताना माझ्या नगरच्या हेरीटेज टूरची शानदार सुरूवात झाली होती. महेंद्रने आणखी एकदा खडा टाकला, आज रात्री मुक्काम करून जा, उद्या तुला काही तरी द्यायचे आहे. लग्नात आलेल्या पाहुणे मंडळींना टॉवेल, टोपी दिल्याशिवाय रवाना करत नाही. मला फक्त टॉवेल, टोपी साठी महेंद्र थांब म्हणणार नव्हता.
सहाशे वर्षात धक्का पोहोचला नाही असे बेजोड बांधकाम

थंठीचा कडाका दुसर्‍यादिवशी सकाळी वाढला होता. माझे सकाळचे साडे सहाचे प्रस्थान आता दहा वाजेला नियोजीत करण्यात आले होते. परतीची बॅग तयार होती. दहा वाजता जेवण घेतले आणि महेंद्रने जर माळीवाड्यात जाऊन येऊ अशी साद घेतली. तिथल्या ओळखीच्या दुकानातून त्याने सरदार ना.य. मिरीकरांचे नगरच्या इतिहासावर १९१६मध्ये लिहीलेल्या पुस्तकाची तिसरी नवी कोरी आवृत्ती घेऊन दिली. त्यानंतर तो अहमदनगर ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयाच्या आवारात घेऊन गेला. या  वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीचे दुरूस्तीचे काम सुरू असल्याने ते सद्या बंद आहे, पुढल्या वेळेस येथे तुला भरपूर खाद्य मिळेल असे सांगून आम्ही बाहेर जाऊ लागलो. तोच महेंद्रने आत जाऊन बघूया असे सांगितले. आतील कर्मचार्‍यांनी वस्तूसंग्रहालय सद्या बंद असल्याचे सांगितले. 
हरिश्चंद्रगडावरील नरसिंहाची मुर्ती १२वे शतक

आल्यासरशी मग त्यांची काही प्रकाशने मिळतील का याची चौकशी केली. त्यांनी काही पुस्तके आणून दिली. ती सगळी घेतल्यानंतर माझी कोपर्‍यातल्या मुर्तीवर नजर गेली. त्यावर लिहीले होते किल्ले हरिश्चंद्रगड...पाय त्या क्षणी स्तब्ध झाले. हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर एका भव्य तलावाच्या अवशेषांचा आम्हाला नुकताच शोध लागल्याचे सांगून या वस्तू संग्रहालयाकडून आवश्यक माहिती मिळू शकेल का याची चौकशी केली. आणखी एका मुर्तीने लक्ष वेधून घेतले, ती होती रतनगडच्या अमृतेश्वर मंदिरातली गणपतीची मुर्ती. 

आज नशिब चांगले महेरबान होते. स्वराज्यासाठी हौतात्मय पत्कारणारे कोल्हापूर संस्थानचे चौथे शिवाजी यांची समाधी बघता आली नाही. संभाजी महारजांचा मुघलांनी वध केला, त्या प्रसंगीचे दुर्मिळ असे चित्र बघण्याची संधी मिळाली नाही, परंतू ध्यानी मनी नसताना अहमदनगरचे जे काही वारसा दर्शन घडले मन समाधान पावले.

नगर शहराच्या आसपास पुरातन वारसा खजिना स्वरूपात विखूरला आहे. इथले सव्वा मैल लांबीचा भूईकोट किल्ला पुन्हा बघायचा आहे. मुघल आणि आदिलशहा यांच्या संयुक्त फौजांनी शहाजी राजांच्या नेतृत्वाखाली जिथे पराभवाची धुळ चाखावी लागली, ते भातवडी, पारनेरचा परिसर, यादव, सातवाहन, राष्ट्रकुट आदी काळातल्या इतिहासाच्या असंख्य खाणाखुणांनी नगर समृद्ध आहे. 
मावळतीच्या सूर्याची तिरीप मकबर्‍याची शोभा वाढविताना

मकबर्‍याच्या आवारातला विशाल वृक्ष आणि तितकाच विशाल पार

बुलढाण्याच्या या सदगृहस्थाने या पुराणवास्तूची भिंत अशा ठिकाणी विद्रुप केली की, ती स्वच्छ करणेही मुश्कील

सूर्य अस्ताला जाताना त्याची थोडी लाली अशा देखण्याठिकाणी रोजच सोडत असेल

मकबर्‍याच्या बाहेरचा विशाल तलाव व त्याची भली चौडी भिंतं.


---








Saturday, December 1, 2018

पुरातन बंधारा हरिश्चंद्रगडावरचा ancient water resiorvior of harishchandra fort



हरिश्चंद्रगडाच्या अफाट पसार्‍याचा विचार करता, तिथली पाण्याच्या साठवणूकीची पुरातन व्यवस्था मोठी असायला हवी होती, परंतू ती आज तशी दिसत नाही. तारामतीच्या शिखराच्या पायथ्याला असलेल्या पुरातन पाणी व्यवस्थेशिवाय गडावर अन्यत्र दगडात घडवलेली, बांधिव अशी व्यवस्था सहजासहजी दृष्टीस पडत नाही. गडावर अशी व्यवस्था खरोखरच होता का? हा देखिल प्रश्न पडावा. नसेल तर ती का नव्हती? हाही प्रश्न आहेच.

प्राचीन राजधानीचे ठिकाण जुन्नर पासून जवळ,  नाणेघाटाच्या जवळ असलेला, त्याकाळचा हा महत्वाचा किल्ला होता. चहुबाजुंनी नैसर्गिक तटबंदी लाभलेल्या या गडावर चहुदिशांना तट, बुरूज होते, त्याचे अवशेष आजही बघायला मिळतात. पाचनईकडूत येताना सीतेच्या न्हाणीच्या जवळच्या तटबंदीचे काही अवशेष आहेत. बैल घाटाच्या मार्गावरही आहेत. गडावर साठवणूकीच्या पाण्याचा विचार केला तर आज सगळी साठवणूक तारामतीच्या पोटातील लेणी, हरिश्चंद्रेश्वर, केदारलिंगी महादेवाची लेणी आणि त्याच्या आसपास बघायला मिळतो. बालेकिल्ल्यावर कातळात खोदलेली पाण्याची टाकी आहेत, परंतू गडाच्या अन्य टोकांवर जी काही पाण्याची उपलब्धता आहे ती बहुतांशी नैसर्गिक खड्डे, ओढे, नाल्यात साठलेली. त्यामुळे ती वर्षभर उपलब्ध नसते. त्या पाण्यावर गडाची भिस्त असण्याची शक्यता नाही.
- नळीच्या वाटेवरून कोकणकड्यावर येताना जुन्या बुरजाचे अवशेष
कातळात खोदलेली टाकी गडाच्या चहुबाजूंना असायला हवी होती, ती का नाहीत? हा प्रश्न नेहमी सतावत होता. गडाला चहुअंगांना नैसर्गिक तटबंदी असल्याने मोठ्या संरक्षणाची आणि पर्यायोने गडाच्या सुदूर भागात पाण्याच्या फार मोठ्या नियोजनाची गरज भासली नसावी? या शक्यतेवर विश्वास नव्हता, परंतू कुणाच्या सांगण्यात किंवा वाचनातही अशा व्यवस्था असल्याची माहिती मिळत नव्हती. २५ नोव्हेंबरला कोकणकड्याची उत्तर बाजु व डोंबांच्या डोंगराच्या मधल्या मार्गाने, अर्थातच प्रचलित अशा नळीच्या वाटेने नाशिक-पुणे-मुंबई अशा विविध ठिकाणच्या २० डोंगरभटक्यांनी ट्रेकसोल्सच्या झेंड्खाली एकदिवसाची छान भटकंती केली आणि अचानक एके ठिकाणी एका भल्या मोठ्या तलावाच्या अवशेषांनी आमचे लक्ष वेधून घेतले. एक तर या तलावाची अभ्यासकांकडे नोंद आहे की नाही याची मला काहीच माहिती नाही, परंतू ती असेल त या तलावाविषयी फार गांभीर्याने बघितले गेले नसावे, अन्यथा तो असा दुर्लक्षित राहिला नसता. असा प्राचीन तलाव, हरिश्चंद्रगडासारख्या ठिकाणी म्हणजे इतिहासातला मोठा खजिना आहे. 
सप्तीतीर्थ पुष्कर्णी...यातील चौदा विष्णू मुर्ती आता हरिश्चंद्रेश्वराच्या गुहेत अडगळी सारख्या टाकून दिल्या आहेत...
''गडावरचे तलाव फक्त स्वच्छ पाणी मिळावे इतक्या क्षुल्लक हेतूने कधीच साफ करायचे नसतात''. त्यांचे उत्खनन करायचे असते. त्यात इतिहासाचे मुक साक्षीदार, नाणी, बांगड्या, कौल, माठ यांचे तुकडे दडलेले असू शकतात. अशा संशोधनातून इतिहासाचा एक धागा सुद्धा आपल्याला कुठच्या कुठे नेऊन जाऊ शकतो, परंतू या बद्दल कोणतेही गांभीर्य नसल्याने आज महाराष्ट्रात गड स्वच्छतेची जी लाट आली आहे ती फक्त दगड, गाळ उपसण्यात सार्थकी मानण्या इतपत! फार मोजक्या संस्था असतील ज्यांनी काळजीपूर्वक पाण्याचे कुंड, तळी, टाकी स्वच्छ करून पुरातत्वीय अवशेष वेगळे केले, अभ्यासकांना उपलब्ध करून दिले. त्याला हरिश्चंद्रगडही अपवाद नाही. आज ह्या तलावाचा परिसर चक्क मौजमजेचे ठिकाण बनला आहे. तिथे आता कित्येक तंबु लागु लागलेत, ते तंबु लावणार्‍यांच्या, तिथे मुक्काम करणार्‍यांच्या गावी तरी असेल का की, आपण ज्याठिकाणी रात्री डेरा टाकलाय ते ठिकाण नेमके आहे तरी काय?

हरिश्चंद्रगडावर अलिकडेच दिसणारे साधूबाबा
(आता सप्ततीर्थ पुष्कर्णीचेच बघा: काही वर्षांपूर्वी एका साधूने तिची स्वच्छता केली, त्यात त्याला तीन गोण्या भरतील इतकी पुरातन नाणी मिळाली. गडाचा जिर्णोद्दार करण्यासाठी ती तो घेऊन गेला अशी वदंता आहे. त्याचे पुढे काय झाले हे ठाऊक नाही.)

रविवारचा दिवस आमच्याकरिता सह्याद्रीतल्या एका अविस्मरणीय भटकंतीचा होता. नळीच्या वाटेच्या चढाईचा प्रत्यक क्षण ह्याद्रीतल्या एका उत्तभ भटकंतीला आल्याचा आनंद पदोपदी मिळवून देत होता. खरे तर नळीच्या वाटेबद्दल जितके ऐकुन होतो, त्यामानाने ही वाट बघण्याचा योग इतका उशिरा का आला याचे माझे मलाच आश्यचर्य वाटत आहे. 

सरावाची भटकंती: नळीची वाट!
हा योगही मोठा विचित्र जुळून आला, आमची ही भटकंती खरे तर सरावासाठी होती, म्हणजे आम्ही येऊ घातलेल्या डिसेंबरच्या सुरूवातीला सातमाळा रांगेत सलग नऊ दिवसांची भटकंती करणार आहोत. त्याकरिता रोज थोडा थोडा सराव सुरू होता. एक मोठा सराव गरजेचा होता, तो नळीच्या वाटेच्या रूपाने इतका मोठा करायला मिळावा? आहे का नाही आश्चर्याची गोष्ट. आमच्या दृष्टीने या भटकंतीचे हे एकमात्र आश्चर्य होते. परंतू तिथले पेटारे उघडायला लागले की, एक एक गोष्टी बाहेर येऊ लागतात. 

नळीच्या वाटेने गेल्यावर हरिश्चंद्रगडावर मुक्काम करावा लागतो हे मी ऐकत आलो आहे. तिन ठिकाणच्या छोट्या कातळारोहणात वरच्या दोन भागात सुरक्षा म्हणून कमरेला दोर बांधून किंवा शिडी लावण्याची प्रथा होती, त्यात अर्थातच बराच वेळ जायचा आणि बेलपाडा किंवा वालिवर्‍हे वरून कोकणकडा गाठायला आठ/नऊ तासांचा अवधी लागायचा. काहींना तर अकरा, बारा तासही लागलेत, तेव्हा नळीच्या वाटेने वर गेल्यावर मुक्काम हमखास घडायचा. एक तर तुम्ही बेलपाड्यातून सुरूवात करणार म्हटल्यावर तुमच्या गाड्या बेलपाड्यात राहणार किंवा तिथे बसने आलात तरी दुपारी हरिश्चंद्रगडावर पोहोचल्यानंतर पलिकडे उतरून पाचनईवरून परतीच्या प्रवासाची  व्यवस्था नसल्याने या मुक्कामाला पर्याय नव्हता. अलिकडे वनखात्याने हरिश्चंद्रगडावर रात्रीच्या मुक्कामाला बंदी घातल्यानंतर तर आमचा नळीच्या वाटेचा बेत बारगळल्यात जमा होता. 

कोकणकड्याचा स्थानिक मार्गदर्शक बेलपाड्याचा कमा पोकळा नेहमी म्हणायचा, सात तासात सहज वर पोहचता येते, गावातली मंडळी बायका मुलांसकट तीन तासात वर जातात. नळीच्या वाटेने वर जायचे, कोकणकडा बघायचा आणि बैलघाटाने वालिवर्‍हेत परतायचे असाही बेत शिजत होता, परंतू आज काही तरी वेगळेच योग जुळून आले होते. आम्हाला बेलपाड्यात सोडायला आलेली गाडी पाचनईत जाऊन थांबणार होती. मुक्कमाची अवश्यकता नव्हती. लवकर पोहोचलो तर तारामती किंवा बालेकिल्ला असे एखादे दान पदरात पाडून घेण्याची संधी होती. आमच्यासाठी मात्र कोणती संधी वाट बघतेय? याची सुतराम कल्पना नव्हती.
पन्नास फुटाचे दोन दोर, आणि फारच माफक असे आरोहणाचे साहित्य घेऊन आम्ही सहा तासाच कोकणकड्यावर पोहोचलो. आमच्या २० जणांच्या चमुत तीन महिला होत्या, चाळीशी पार केलेले अनेक होते तरी त्यामानाने बर्‍यापैकी वेग राखता आला. आमच्या गार्गीचा तर हा तिसराच ट्रेक होता, तोही ती सातमाळेच्या सरावाकरिता आलेली. सराव ट्रेक कुठे? हरिश्चंद्र नळीची वाट! हीपण एक आश्चर्याची गोष्ट. या आनंदात असताना दोन गोष्टी आम्हाला सतत खुणावत होत्या: एक म्हणजे दक्षिण बाजुला दिसणारी माकडनाळ (जी २००६च्या जानेवारीत मध्यापर्यंत पोहचूल्यानंतर दोर कमी पडल्याने अर्धवट सोडून आम्हाला माघारी परतावे लागले होते). दुसरे म्हणजे रोहीदासचा डोंगर. 

नळीची वाट, माकडनाळ, रोहीदास या तिन गोष्टींभोवती विचाराचे चक्र फिरत आमचे आरोहण सुरू असताना मध्येच कोणी तरी, कोकणकड्याच्या मध्यमार्गावर लटकलेला दोर दिसतोय, असे सांगितले.

पहाटे साडेचारला उठून आम्ही बरोबर ६-०५ वाजता कोकणकड्याच्या दिशेन प्रस्थान केले. चाळीस मिनीटात हरिश्चंद्रेश्वरी नदीच्या पात्राजवळ पोहोचलो तोच बिबट्याची विष्टा दृष्टीस पडली. एव्हाना आमच्या आगमनाने हुप्प्यांचे सतर्कतेचे इशारे सुरु झाले होते. ७-१० वाजता आम्ही तीन महाकाय पायर्‍यांवर पोहोचलो. कोकणकड्यावरून जिचा प्रवास होतो, त्या नदीत फक्त एकाच ठिकाणी या तीनपायर्‍या, अन्यत्र का नाही? 
याभौगोलिक रचनेचे कुतुहल वाटल्यावाचून राहत नाही. ''हरिश्चंद्रगड नावाचे हे गारूडच असे की, त्याच्या कोपर्‍यान कोपर्‍यात अशी असंख्य आश्चर्य दडली आहेत, ती धुंडाळता आली तर? त्याकरिता एकदा सहा दिवस, एकदा तीन दिवस, एकदिवसांचे तर अगणीत अशा माझ्या मुक्कामात हरिश्चंद्रगडाचे भग्नावशेष, कोसळलेले तट, मंदिरे, लेणी, तळी, टाकी नजरेखालून घालण्यातला आनंद आजवर नेहमीच गडभ्रमंती सार्थकी लावणारा ठरला आहे. एकदा तर हरिश्चंद्रगडाच्या पूर्व भागात असलेल्या नेढ्यापर्यंत आम्ही तिन मित्र मुसंडी मारून आलो आहोता. आज असे काही बघायला मिळेल का? असा कोणताच विचार मनात नव्हता.'' नळीच्या वाटेने जाण्याचा आनंदच काही और.

कातळारोहण हा आमचा विषय नसल्याने कोकणकड्याच्या मध्यमार्गावर जाण्याचे योग कधीही येणार नाही हे आमच्या दृष्टीने सष्ट असले तरी त्या दिशेने चालत जाण्याची भावनाही मोठा आनंद देते. आज तर आम्ही लाडका रोहीदास, माकडनाळ आणि भवानी धार यांचे जवळून दर्शन घेत नळीच्या वाटेने जाणार होतो.
तब्बल दोन तास नदीतल्या मोठमोठ्या शिळांची धम्माल वाट पार करून ८-०० वाजता आम्ही नळीच्या वाटेला लागलो. 


या पैशाला केवढे मोल!
आजही माझा मोबाईल फोन मधला कॅमेरा एक एक गोष्टीची नोंद ठेवण्याची आठवण करून देत होता. पूर्व बाजूने येणार्‍या सूर्यकिरणांमुळे मध्यमार्ग, रोहीदास छान विरोधाभासी चित्र मिळवून देत होते. डॉ. अभिजीत इंगळे वरच्या टप्प्यावरून कसलासा ग्लास दाखवून, 'तुझ्यासाठी सरबत ठेवले आहे', असे सांगत होता. आता इतक्या अवघड ठिकाणी याला ग्लास कुठून सापडला? आमच्या चुमतला पुढचा जत्था एका मोठ्या दगड सपाटीवर विश्रांतीकरिता थांबला होता. सगळ्यांच्यात हातात काचेचे मोठे ग्लास होते. पाचनईचा एक ग्रहस्थ आपल्या मुलीसमवेत लिंबूपाणी विकण्यासाठी येथे आला होता. 'शनिवार, रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवसात आम्ही येथे लिंबुपाणी घेऊन येतो', अशी माहिती त्याने दिली. इतकी अवघड चढण चढून आल्यानंतर हातात आयता लिंबुपाण्याचा ग्लास मिळावा? या परिस्थितीत सुख: यापेक्षा वेगळे असू शकते का? विक्रीचे ठिकाणही असे की, हमखास विक्री होणारच. तरी पण पाचनई पासून हरिश्चंद्रगड, तिथून नळीच्या वाटेचे सगळे कातळटप्पे पार करून इथपर्यंत डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन दोन अडीचशेची कमाई म्हणजे या पैशाला केवढे मोल?


लिंबूपाणी, कोकमचे सरबत खुपच छान होते. वर उंबराला लाल चुटूक फळे लगडली होती, त्यातली तीन चार तोडून खाल्ली त्याची चव अप्रतिम होती, तोच आमच्यात कोणी तरी ओरडलं, अरे तोडू नका...माकडांसाठी गडांवर फार थोडी फळझाडे उरलीत, त्यामुळे वेळीच सावरून उंबर तोडण्याचा कार्यक्रम रहित करण्यात आला. 
कोरड्याठाक नळीच्या वाटेत उंबराची काही झाडे कुणाच्या जिवावर तगुन राहिलीत. येथे पाण्याचे टिपूस नसताना अनेक झुडपांने पाणी कोण देतं? पारंपारिक शेती करणार्‍यांचे हे म्हणणे आहे, 'झाडांना पाणी खुप कमी लागते, वाफसा लागतो तो पालापाचोळ्यातून त्यांना आपसूकच मिळतो, त्यांचे खरे खुरे अन्न तर सूर्य प्रकाश!' याची प्रचिती येथे येत होती. तशी ती कोळेश्वराच्या पठारावर अनूभवली आहे. तिथल्या बापू खुटेकरांनी हिवाळ्यात दवाच्या पाण्यावर भरगोस गव्हाचे पिक घेतल्याचे आमच्या मागच्या दोन्ही भेटीत अभूवले आहे. (कोळेश्वराच्या यंदाच्या मार्चच्या भेटीत मात्र बापुंची गहूशेती बघण्याचा योग जवळ असून सुद्धा चुकला त्याची रूखरूख लागून आहे.) 

इथून आता आम्ही नळीच्या मध्ये मध्ये शिरू लागलो, तसा पश्चिम धारेवरचा फॅन्टमहेड नजरे आड होऊ लागला आणि डोंगराच्या दोन्ही धारा विशाल होऊ लागल्या. ९-०० वाजेच्या सुमारास आम्ही कोकणकड्याच्या ईशान्य कातळ मार्गाला लागलो, तिथून दहा मिनीटात पहिला सोपा कातळटप्पा लागला. 



सकाळचे ९-४०: 
दुसर्‍या कातळ टप्प्याजवळ माझा प्रवेश झाला तोवर काशिनाथने वरच्या झाडाला दोर लाऊन सहा सात जणांना वर घेतले होते. दोर शिवाय वर येता येते हे त्याने सांगितले, माझ्याकडे ५० फुटाचा दोर होता, तेव्हा एकाने बॅगा वर घ्यायच्या व दुसर्‍याने माणसांना वर घ्यायचे असे गट प्रमुखाने ठरविले. खरोखरच हात आणि पायांना पुरेसे आधार सापडतात त्यामुळे ही छोटीशी चढाई मजेदार ठरली. काशिनाथने झाडाला केलेले अँकरिंग बघून समाधान वाटले. मुंबई, पुण्यातील गिर्यारोहकांच्या सानिध्यात राहून गिर्यारोहणातले तंत्र ही मंडळी उत्तमरित्या शिकली आहे. 
११-०० वाजता हा टप्पा पार करून वरच्या उंबराच्या सावलीत जिथे एका वेळेस मुश्कीलीने पाच सहा जण थांबू शकतात, असे सुंदरशा ठिकाणी थोडी पोटपूजा करण्याचा योग आला. तिथून आता नळीचा शेवटचा कातळटप्पा दहा मिनीटांच्या अंतरावर. 'हा देखिल दोर न लावता चढता येतो', मॅरेथॉनपटू डॉ. विजय नेमाडेंनी त्याची प्रात्यक्षिके करून दाखविली. 
या ठिकाणी पुन्हा एकदा ताज्या ताज्या लिंबुपाण्याचा लाभ झाला. पाचनईचे आणखी एक ग्रहस्थ काचेच्या मोठ्या ग्लासात लिंबूपाणी तयार करून देत होते. हे ग्लास धुवून स्वच्छ करण्यासाठी त्यांनी दोन भांड्यात पाणी आणले होते. हे पाणी अर्थातच हरिश्चंद्रेश्वर मंदिरातले. खरेदी आणि विक्रीच्या मध्ये एक रेषा असते ती 'अनोखी...कष्टप्रद...मजेदार...काम भागविणारी...दाम मिळवून देणारी', कोणत्याही एका किंवा सगळ्या दृष्टीकोणातून त्याकडे बघितले जाऊ शकते. जगातल्या काही सर्वात अनोख्या व्यावसायातला हा एक व्यवसा, हे मात्र नक्की!
आता नळीच्या वाटेचा दगड धोंड्यांचा मार्ग संपण्याच्या बेतात होता. नळीची वाट म्हणजे डोंगराचे मोठ मोठे दगड, शिळा एका अरूंदशा धारेतून पाणी वाहत जावे तशा खाली वाहण्याच्या अविर्भावात निश्चीत भासतात. त्यांना पाण्यासारखा प्रवाह नसला तरी हळूहळू त्यांचा तळापर्यंत कुर्मगती प्रवास सुरू असतो, त्यामुळेच हा मार्ग नेहमी अस्थिर असतो. संपुर्ण डोंगरावर याच भागात हा चमत्कार! तो आमच्या पूरता आज संपणार होता. 
कातळाला एक छोटासा वळसा घेऊन प्रथमच पायाखाली माती आल्याचे जाणवले. एक वीस पंचवीस फुटाचा घसारा पार करून वर गेल्यावर नाफ्ता आणि त्याचे नेढे अशा सुखावणारे चित्राने आमचे स्वागत केले. येथपासून हिरवेगार झुडपी वन लक्ष वेधून घेत होते. उन्हात सतत चढाई केलेल्या काहीली झालेल्या जिवाला इथला गारवा म्हणजे चित्राची दुसरीच बाजी. दगड, धोंड्यांच्या तिव्र चढाच्या नदीमार्गाने चढाई जसजशी वर जात होती, तसतशी दमछाक वाढत होती. त्यामुळे गारवा जाणवत असला तरी दमछाक अजून तास दिड तास तरी सुरू राहणार होती. 

सभोवतालचे नाफ्ता, कलाडगड, भैरवगड, घनचक्कर, कात्रा, गवळदेव, आजोबा डोंगरांची ओळख पटवून आम्ही २५ मिनीटात एका लहानशा पठारावर पोहोचलो. आजचा दिवस हा रोहीदासच्या डोंगराचे अनेक कोनातून दर्शन घेण्याचा होता. तो आनंद असा सहजीसहजी वाट्याला येत नसतो. येथे दाट  झाडीच्या सावलीत पोहोचल्यावर सोबत आणलेल्या विविध पदार्थांवर ताव मारत, सोबतचे पाणी यथेच्छ पिऊन झाल्यावर १२-४५ वाजता आम्ही शेवटच्या छोट्याशा चढणीला लागलो आणि दहा मिनीटात कोकणकड्याच्या सपाटीला लागलो. येथे एक बुरूजाचे अवशेष विखुरलेल्या स्थितीत होते.
तारामतीचे शिखर आता डोकावत होते. पुढच्या काही मिनीटात कोकणकडा नावाचा चमत्कार पुन्हा एकदा नजरेत समावणार होता. कोकणकड्याच्या मध्यमार्गाजवळून प्रस्तरावरोहण (रॅपलिंग) म्हणजे कमरेला दोर बांधून दरीत उतरण्याचा उपक्रम सुरू होता. सर्वसामान्यांना कोकणकडा इतका जवळून आणि तोही इतक्या रोमांचक पद्दतीने बघण्याची संधी त्यामुळे मिळते. साधारणपणे एक किलो मिटरचा आणि पायथ्यापासून ३००० फुट उंचीच्या या कड्यावर सुमारे १८०० फुटांचे प्रस्तरावरोहण गेल्या काही वर्षांपासून कमालीचे लोकप्रिय ठरले आहे. जे लोक गिर्यारोहण करू शकत नाही, अशांना सुरक्षितपणे डोंगरावरून खाली उतरविण्याचा हा साहसी क्रीडा प्रकार. यात धोके मात्र भरपूर असतात. कोणत्या वेळी कशा प्रकारची स्थिती निर्माण होईल हे सांगता येत नाही. त्यासाठी कृत्रिम गिर्यारोहणाच्या तांत्रिक ज्ञानासोबतच असे उपक्रम आयोजित करण्याचा अनूभव आवश्यक असते. साधारण १००० फुटाच्या टप्प्यावर सहभागींना उतरवले जात होते. तिथून दुसर्‍या टप्प्याचे ८०० फुटाचे प्रस्तरोवरोहण. ते केले की, साधारण तीन तास जंगल आणि मोठमोठ्या शिळा असलेल्या नदीतून प्रवास करून ही मंडळी बेलपाड्याला पोहोचते. 

तलावाचे मुख्यस्त्रोत असलेल्या ओढ्यावरची बंधार्‍याची भिंत कोसळली आहे...

पाठ कुठे टेकलीयं?
आमची कन्या गार्गी हिची पहिलीच हरिश्चंद्रगड भेट असल्याने तिला कोकणकड्याचे दिव्य दर्शन घडले. त्यानंतर आम्ही ओढ्या लगतच्या झाडाच्या सावलीत दुपारच्या जेवणाकरिता विसावलेल्या आमच्या चमूत सामिल झालो. बेलपाड्यावरून कमा पोकळा यांच्याकडून पिठलं आणि तांदळाच्या भाकरी बांधन घेतल्या होत्या, परंतू सतत पाणी पिल्यामुळे जेवण काही जात नव्हते. बाकी मंडली मात्र सफरचंद, चिक्की, खजूर, लाडू, असे विविध पदार्थ सादर करत होती. पोटपूजा आटोपून आमच्यात जे प्रथमच या ठिकाणी आले आहेत त्यांना तारामतीच्या शिखराकडे रवाना करून आम्ही आठ दहा जणांनी झाडाच्या सावलीत मस्त ताणून देण्यासाठी जमिनीला पाठ टेकवली. 


बशी सारखा आकार
वेस्टर्न ट्रेकर्स संस्थेच्या प्रस्तरावरोहण मोहिमेकरिता बरेच सहभागी आले होते. आसपासच्या झोपड्यात त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या मोठ्याने बोलण्यामुळे झोप काही लागत नव्हती.
पुण्याचे आर्किटेक्ट केळकर हे ईशान्य दिशेकडे गेले, परतल्यावर त्यांनी हा तलाव असावा अशी शक्यता बोलून दाखवली. समोरच्या बाजुला तलावाच्या भिंतीचे दगड बघितल्याचे त्यांनी सांगितले. लागोलाग मी व मोहिम प्रमुख डॉ. हेमंत बोरसे आम्ही चाचपणी केली तेव्हा खरोखरच ओढ्याच्या मोठ्या प्रवाहावर दोन चौकोनात तासलेल्या लंबाकृती शिळा दिसल्या. त्याच्या आजुबाजूला आणखी काही चौकानी तासलेल्या शिळा इस्तत: विखुरलेल्या दिसल्या.  

कोकणकड्याकडे जाताना तारामतीच्या खालच्या पठारी भागातून आग्नेय बाजूने एक ओढ्यचा प्रवाह आहे, या प्रवाहाचे पाणी या तलावाचा मुख्य स्त्रोत आहे. याचा आकार बशी सारखा असून तळाला तो खोलगट आहे. पूर्व बाजूने दगडांची भली मोठी भिंत बांधण्यात आली आहे. ही भिंत सोडल्यास बाकी सगळे काठ हे नैसर्गिक आहेत. त्या भिंतीच्या चिरांना झाडी झुडपांनी वेढल्यामुळे ती लक्षात येत नाही.


पुरातन बंधारा मुक्कामाचे ठिकाण?
वर्तुळाकार अशा नैसर्गिक खोलकट भागाला घातलेला हा पुरातन बांध असून आसपासचे इतरही प्रवाह यात येऊन मिळतात. या भागात पावसाचे खुप जास्त प्रमाण असल्याने तो लवकर भरून त्याचे जास्तीचे पाणी त्या भिंतीवरून वाहून जाण्याची त्या काळी व्यवस्था केली असावी. गडाच्या एकुण विस्ताराच्या मानाने हा बंधारा छोटा असला तरी हरिश्चंद्रेश्वर मंदिरा समोर असलेल्या सप्ततीर्थाचा शंभरपट जास्त पाणीसाठविण्याची याची क्षमता असावी. पुरातत्व विभागाने किंवा जिज्ञासूंनी या तलावाचा अभ्यास केला तर त्याच्या पोटात दडलेल्या गाळात न जाणो कुठल्याशा जुन्या इतिहासाचे काही संदर्भ मिळू शकतील. दुर्दैवाने त्याचे महत्व न समजल्याने या ठिकाणी आता पर्यटकांचे तंबु लागतात. 

मधल्या काळात वनखात्याने हरिश्चंद्रगडावर भेट देण्यासाठी येणारे लोक प्लास्टिकचा कचरा अफाट प्रमाणेवर इस्तत: फेकून पर्यावरणाची हानी करतात ही सबब सांगून गडावर रात्रीच्या मुक्कामीची बंदी घोषित केली होती. ती बंदी कधी उठविली? नियमीत व सर्व नियमांचे पालन करून ट्रेक करणार्‍या भटक्यांना अजून पर्यंत यांची माहिती कळविण्यात आलेली नाही. पायथ्याला मात्र सूर्योदय ते सूर्यास्त इतकाच वेळ गडावर राहता येइल, असे दोन फलक आहेत. त्यामुळेच नळीच्या वाटेसारखी खडतर चढाई केल्यानंतर आम्ही गडावर मुक्कामाचे नियोजन केले नव्हते. आदल्या दिवशी मात्र येथे हजार लोक मुक्कामाला होते अशी माहिती मिळाली. ही संख्या किमान पाचशे तरी असावी. या सगळ्यांचे तंबु या प्राचीन बंधार्‍याच्या पात्रातच लागले होते हे विशेष.







कोकणकड्या लगत काही वर्षांपर्यंत या भागात कार्वीची उंच व जाड बुंधा असलेली प्रजाती बघायल मिळायची. हा बुंधा माणसाच्या मनगटा इतका जाड असायचा. यंदा ती कारवी दिसली नाही.  आमची गड सोडण्याची वेळ समीप आली होती. ३-३७ वाजता हरिश्चंद्रेश्वर मंदिर परिसरात पोहलो. या परिसरातली भग्न मंदिरे व पुरातत्वीय भग्नावशेषातही मन पार रमून जाते. तासभर या परिसरात व्यतित केल्यानंतर आम्ही पाचनईला पोहोचलो तेव्हा अंधार दाटला होता. तिथे एक गृहस्थ सांगत होता, त्यांचे पाहुणे गडावर आहेत, त्यांना नीट दित नाही, त्यांचा गडावर कोणी तरी चष्मा फोडला. येथे फोनला रेंज नाही, अशी चिंता त्यांनी प्रकट केली.

गडावर आमच्या नंतर भरपूर संख्येने लोक जाताना दिसत होते. वरती भोजन व मुक्कामाची सोय असल्याने बाबांना भरपूर सोबत राहील. रात्र आज गडावरच जाणार असा विचार करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, तोच खबर आली की, हरिश्चंद्रगडावर ट्रेकर्स अडकुन पडलेत. ही बातमी एका वृत्तवाहिनीवर प्रसारीत होत होती. आमचाही वीस जणांचाच गट असल्याने आमच्या मित्रांपैकी काहींनी, तुम्ही सुखरूप आहात ना? अशी विचारणा केली.

थोड्याच वेळात स्पष्ट झाले की, कोकणकड्यवर प्रस्तरारोहण करण्यार्‍यातील काही मंडळी ही १००० फुटाच्या टप्प्यावरच अडकून पडली. आम्ही आयोजकांपैकी एकाशी चर्चा करताना, सहभागींना पहिला टप्पा उतरवून, दुसरा टप्पा उतरवून बेलपाड्यात पाठवताना अता अंधार दाटेल अशी शंकाही उपस्थित केली होती. दुसर्‍यादिवशी त्यांना मदत व शोध पथकाच्या मदतीने काढण्यात आले, ही बचाव मोहिम सायंकाळ पर्यंत सुरू असल्याची माहिती मिळाली. 

अभ्यासकांच्या मते यादव, सातवाहन काळाच्या काळात हा गड नावारूपाला होता. पुराणातले काशीमहात्म्य, दक्षिणप्रयोग महात्म्य, देवी भागवत, विष्णूपूराण, स्कंदपूराण, मत्स्य पुराण, पद्मपुराण, अग्नीपुराणादी काव्यात हरिश्चंद्रगडाचा उल्लेख असल्याचे निरीक्षण ज्यष्ठे अभ्यासक दिवंगत रा.चिं.ढेरे यांनी नोंदविले आहे. 

डॉ. वा.वि.मिराशी यांनी आपल्या टिपणात हरिश्चंद्रगडाच्या नावाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी नाशिकच्या अंजनेरी येथे भोगशक्ती राजाच्या काळातील दोन ताम्रपटांचा उल्लेख केला आहे. या पैकी एक ताम्रपट इसवी सनाच्या आठव्या शतकातला असून त्यात जयपूर नगरातील यात्रेकरिता व मंदिरे, अन्नछत्राकरिता नाशिक जिल्हा व उत्तर कोकण भागातील काही प्रदेशावर कर बसविण्याचे निर्देश आहेत. दुसर्‍या ताम्रपटात कालउल्लेख नाही, त्यात समगिरिपट्टानातील व्यापार्‍यास दिलेल्या काही सवलतींचा व तेथील गुन्हेगारांना दिलेल्या जाणार्‍या दंडात्मक शिक्षेचे निर्देश आहेत. या ताम्रपटात स्वामीचंद्र-सिंहवर्मन-भोगशक्ती अशी वंशावळ दिलेली असून स्वामीचंद्राला 'हरिश्चंद्रवंशस्यालंकारभूत:' असे विशेषण लावले आहे. मिराशींच्या मते हरिश्चंद्र हा पौराणिक राजा नसावा, तर खरोखरच भोगशक्तीचा वंशज असावा. त्याने हरिश्चंद्रगडावरचे शिवालय बांधून तेथे प्रतिष्ठापना केलेल्या शिवलिंगाला आपले नाव दिले असावे. 
ढेरे म्हणतात त्या प्रमाणे भारताच्या प्राचीन इतिहासात देवालये बांधणार्‍यांनी त्यास आपली नावे दिल्याची उदाहरणे आहेत. 

अंजनेरी समोरचे शिवलिंग साधर्म्या साधणारे
काही वर्षांपूर्वी आम्ही अंजनेरी समोरच्या एका टेकडीवर पॅराग्लायडींगकरिता गेलो होतो. या टेकडीवर एक छोटेसे कातळातले कुंड होते, त्याला स्थानिक मंडळी सीतेने तेथे आंघोळ केल्याने त्यास सीता कुंड असे म्हणतात अशी माहिती दिली. या कुडाच्या लगत असलेल्या ओळ्याच्या उत्तर बाजुला कातळात एक शिवलिंग कोरलेले दिसले हे शिवलिंग हरिश्चंद्र मंदिरातल्या शिवलिंगाशी साधर्म्या साधणे आहे. जर खरोखरच भोगशक्ती राजवंशाकडून हरिश्चंद्रगडावरचे शिवालय बांधण्यात आले असेल तर या दोन शिवलिंगातली साधर्मे लक्षात घेण्या जोगी आहेत. 

ब्रिटिश संशोधक डब्ल्यू.एफ.सिंक्लेर यांनी दी इंडियन अँटिक्वेरीच्या पाचव्या खंडात हरिश्चंद्रगडाची भव्यता, कोकणकडा, तारामतीचे शिखर, गडावरील विस्तृत पठार, लेणी, मंदिरे, समाध्या व इतर अवशेषांचे धावते पण नेमके वर्णन केल्याचे निरीक्षण ढेरेंनी नोंदविले आहे. हा खंड माझ्या वाचनात आलेला नाही, त्यामुळे कोकणकड्याच्या तलावाचा त्यात उल्लेख आहे की नाही, हे कळायल मार्ग नाही, परंतू या खंडाची सविस्तर माहिती ढेरे देतात त्यात कोकणकड्यावरच्या विशाल बशीच्या आकाराच्या मात्र तलावाबद्दल त्यांनी लिहीले नाही. ढेरेंनी प्रख्यात पुरातत्वज्ज्ञ जेम्स फर्ग्यूसन व प्रख्यात शिल्पज्ज्ञ जेम्स बर्जेस ज्यांनी हरिश्चंद्रगडावरच्या पुरातत्वीय अवशेषांची, मंदिरे, लेणी आदी सर्व माहिती संशोधकीय दृष्टीतून बारीक सारीक वर्णनासह, 'भारतातील गुंफा मंदिरावरच्या बृहदग्रंथात नोंदविली आहे त्याचाही आढावा आपल्या लेखात घेतला आहे, त्यातही त्यांनी कोकणकड्यावरच्या तलावाचा उल्लेख केलेला नाही. तो त्यांच्याकडून राहून गेला की, फर्ग्युसन, बर्जेस यांनी संशोधन केले त्यावेळी तो झाडी झुडपांच्या आड दडून होता हे कळायला मार्ग नाही. 

या दोन लिखाणांच्या प्रती हाती आल्यावर त्यावर अधिक प्रकाश पडू शकेल. तुर्तास तरी असेच दिसते की, एकतर कोकडकड्यावरचा हा मोठा बशीच्या आकाराचा तलाव अभ्यासकांना, पुरातत्ववेत्त्याना एकतर ठाऊक नाही, किंवा त्यांच्याकडे त्या संदर्भात माहिती असूनही त्याचे जतन, जिर्णोद्धार करण्याची कोणी तसदी घेतली नाही. त्यामुळे इतिहासातला अनमोल ठेवा आज अक्षरश: गाळ बनून दडला गेला आहे. त्यावरची धुळ कोणी झटकेल का?
https://www.facebook.com/SahyadriTrekkersBloggers/