हरिहर: साहसी पर्यटनाचा मानबिंदू
हरिहरच्या साहसी पर्यटनावर बंदी हा सर्वथैव अयोग्य विचार ठरेल. विचार क्षमता खुंटते, काही करण्यासारखे हातात नसते तेव्हाच बंदीचे विचार समोर येतात. २३ जुनचा हरिहरचा प्रसिद्द बोटलनेक! काय घडते त्यादिवशी? वने, पर्यटन खात्यांना काही थोड्या सोप्या बदलातून पावसाळी पर्यटनाचा चेहरा बदलता येऊ शकतो. प्रशासनासाठी गडावर जाणारी गर्दी सहजपणे नियंत्रीत करता येऊ शकते...ताजा भटकंती ब्लॉग...हिरव्या कंच छायाचित्रांसह...---
यंदा पावसाचा हंगाम लांबणीवर पडला. अखेर जुन अखेरीस त्याने वर्दी दिली आणि तिसर्या रविवारी त्र्यंबकेश्वर जवळच्या हरिहर किल्ल्यावर आजवर कधी नाही ते घडले. एकाच दिवशी तीस ते चाळीस जणांचे गट हरिहरवर भटकंती करण्यासाठी दाखल झाले. पाऊस नव्हता. वातावरण कमालीचे रोमांचकारी होते. आसपासच्या सगळ्याच डोंगरांवर ढगांची दाटी होती. मधून उन्ह डोकावत होती. 'ज्याच्यासाठी आपण आलो आहोत तो पाऊस लागणार'? अशी लोकांची अटकळ होती.
हरिहरचे वैशिष्ट्य आहे तो त्याचा प्रवेश मार्ग. सर्वच बाजुंनी नव्वद अंशातले कडे असलेल्या या डोंगराला जुन्या काळात कुठल्याशा राजवटीत पश्चिम बाजुने सरळसोट उभ्या पायर्या कातळात खोदून प्रवेशमार्ग तयार करण्यात आला. याचा महादरवाजा इतका छोटा की मुश्कीलीने दोन तीन जण त्यातून जाऊ शकतात, त्याचे स्थान मात्र रोमांचकतेची पुरेपूर प्रचिती.
वेताळाच्या कड्यावरून या पार्यांचे दर्शन म्हणजे छातीच दडपते. दोन्ही बाजुंनी खुल्या, थेट कड्याला बिलगलेल्या, त्यामुळे बरेच जण दुरून दर्शन घेऊन आल्या पावली माघारी फिरतात. जेव्ह या सरळसोट पायर्यांवर अनेक लोका एकाच वेळी चढताना दिसतात तेव्हा, आपल्यालाही जमेल अशी एक साधारण धारणा बनून लोक सरसावतात हरिहराचा रोमांच अनूभवण्यासाठी. रविवारीही तेच झाले. एक एक करत भटक्यांचे गट हरिहराच्या पायर्या चढून जात होते. यातल्या बर्याच जणांची ही कदाचित पहिलीच भेट असावी, त्यामुळे हरिहर हे नेमके काय प्रकरण आहे, वर गेल्यावर पुढ्यात काय वाढून ठेवलेत? इतकी गर्दी वर जात आहे तर खाली उतरताना कोंडी होणार की नाही याची कोणतीच कल्पना या समुहाला नसावी.
ज्यांना याची कल्पना आली, त्यांनी इथवर आलोच आहोत तर आता वर जाऊनच येऊ, या विचाराने तेही त्या गर्दीत सामिल झाले.
हिरवाकंच हरिहरचा परिसर श्रावण महिन्यात अनूभवावा |
वेताळापासून ते माथ्या पर्यंत पोहोचायला सर्वसाधारण पर्यटकांना अर्धा ते पाऊण तास लागू शकतो. याचा अर्थ नीट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. एक गट वेताळाच्या कड्यावरून हरिहरवर जात असेल तर त्या गटाचे जे काही दहा वीस लोक असतील ते वर जाई पर्यंत वरून कुणालाही पुढे सरकता येणार नाही. तशी वाटच नाही. कोणी बस, रेल्वेच्या लाईनी प्रमाणे लाईन मोडून पुढे जाण्याचा प्रयत्न येथे फारच धोकादायक ठरू शकला असता.
सरळसोट पायर्यांची वाट हरिहराचा राकट सौंदर्य |
गडावरच्या शेवटच्या पायरी पासून तळाच्या शेवटच्या पायरी पर्यंत पंधरा जणांच्या नवख्या समुहाला अर्धा ते पाऊण तास उतरायला लागू शकतो. काही जणांना मात्र याहून अधिक वेळ. एक चमु वर जातोय व त्यानंतर दुसर्या चमुला खाली उतरण्याची संधी मिळतेय, या बेताने तासाला दोन चमुंचे निष्कासन या पायर्यांवरून होऊ शकते असे गृहीत धरले तर सकाळी ७-०० ते दुपारी ३-०० या वेळेत साधारणपणे पंधरा जणांचे १८ गट एका दिवसात हरिहरवर भटकंती करू शकतात.
जुनच्या तिसर्या रविवारी काय घडले, तर दुप्पटहून अधिक गट हरिहर भटकायला आले. यातल्या बर्याच गटांचा आकार हा पंधरापेक्षा जास्त होता. प्राप्त माहिती नुसार एक गट पंचाहत्तर जणांचा!
याचा परिणाम असा झाला की, बराच काळ कोंडी झाल्यामुळे लोकांनी संयम ढळला. लोक पायर्यांवर अडकून पडले, पण तरीही खालून लोंढे वर जाण्याचा प्रयत्न करत होते. दृष्टीभयामुळे वरच्यांचा खाली उतरण्याचा वेग स्वाभाविकपणे मंदावलेला हाता. काही महाभाग ओव्हर टेक करत पुढे जेते होते, ज्यांचे डोळे फिरले, ते बिचारी जागच्या जागीच थबकून राहिले.
तुमचे आमचे सगळ्यांचे सुदैव की, त्याचे पर्यावसन कुठल्या दुखद घटनेत झाले नाही. महादरवाजा खालच्या पायर्या या ७० ते ८०च्या कोनात आहेत. तिथे आधारासाठी दगडात खोदलेल्या खोबण्या आहेत. काही ठिकाणी पायर्या तुटलेल्या आहेत. दोन्ही बाजुंला एक्सपोझर. वरून उतरताना नजर थेट दरीच्या तळा पर्यंत जाते. आपले पाय आणि दरी एकाच वेळी दिसू लागतात.
हरिहर बाल्कनीवरून पायर्यांचे अमिट सौंदर्य |
त्याठिकाणी काही जबाबदार भटक्यांनी स्थितीचे गांभीर्य ओळखले. त्यांनी पुढाकार घेऊन गर्दीला वाट करून देण्याचा प्रयत्न केला. त्यात संयम ढळलेल्या मंडळींकडून त्यांना शिव्याही खाव्या लागल्या. 'अगोदर आम्हाला सोडा', आम्ही केव्हा पासून थांबून आहोत, आम्ही महिला आहोत, आमचे डोळे फिरलेत, त्यांचा गट मोठा, आमचा छोटा, अशा नाना सबबींवर अक्षरश: लाखोली वाहिली जात होती, पण ते ठिकाणच असे होते की, कुणाच्या हातात काहीच नव्हते, त्यामुळे परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी ते निमूटपणे तो अपमान सहन केला. 'काहींनी तर, आम्ही खर्च करून आलो आहोत, पुन्हा नाही जमणार', अशी कारणे सांगून गडावरचाचा हट्ट भागवून घेतला.
हरिहर - अमिट सौंदर्य |
हरिहरवर परिस्थितीचे भान ओळखून बचाव कार्य करणार्या त्या अनाम अज्ञातवीरांना मनापासून धन्यवाद. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात पावसाळी हंगामाच्या पहिल्या रविवारी कुठलीच दुखत बातमी आली नाही.
काहींना तास दोन तास ताटकाळावे लागले. हलायला कुठेच जागा नव्हती. गर्दी भरपूर असल्यामुळे दृष्टीभय असलेल्या टप्प्यावरची भिती किमान नजरेपूरती का होईना आपसूकच कमी झालेली होती. काही जणांना या कोंडीतून बाहेर पडताना साडेतीन तासाहून जास्त वेळ लागल्याची माहिती हाती आली आहे. काहींना त्यामुळे अंधारात शेवटचा टप्पा उतरावा लागला.
नशिब बलवत्तर होते आपले सगळ्यांचे की, त्यावेळी पाऊस आला नाही. पाऊस झाला असता तर खडकावरून घसरून पडण्याची शक्यता कैकपटीने वाढली असती. लोकांचा संयम ढळळ्याची शक्यता होती. या परिस्थितीत अंधारातही लोक सही सलामत उतरले, हे विशेष.
हरिहर हा खालपासून वर पर्यंत अत्यंत धोकादायक आहे. आम्ही मागच्या सोमवारी अभ्यास कामासाठी वेताळाचा परिसर व पायर्यांच्या खालच्या परिसरा पर्यंत जाऊन आलो होतो. पाच पाच मिनीटांच्या पावसाच्या जोरदार सरी आम्हाला दोनदा लागल्या. आम्ही तिघेच जण होतो. त्यात दोघे जण गेल्या पंचवीसहून अधिक वर्षांपासून सह्याद्रीत भटकंती करणारे. प्राय: सगळ्या कठिण ठिकाणी भटकंती करून आलेले, त्यामुळे तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की, पायर्यांच्या खालच्या लहानशा कातळटप्प्यावर फार काळजीपूर्वक चढाई करावी लागली. अर्थात आमच्या सोबत गिर्यारोहण साहित्य होते, त्यामुळे आम्ही निर्धोकपणे चढाई करण्यासाठी सज्ज होतो. ज्या लोकांनी हरिहर बघितलेला नाही, त्यांच्यासाठी हा टप्पा काळजीपूर्वक चढण्याचे आव्हान राहिल. इथे थोडीशी चुक झाली तर माणूस थेट दरीत घसरू शकतो.
- जोराच्या पावसात हा रॉकपॅच खासा आव्हानात्मक |
सुरूवातीचे काही पाऊस हे विजा घेऊन येण्याची शक्यता असते. पाऊस नसल्यामुळे विजाही नव्हत्या.
'पाऊस कोसळला नाही, वीजा कडाडल्या नाहीत, चेंगराचेंगरी सारखी स्थिती असूनही काही वाईट घडले नाही, कोणी गर्दीत अडकून पडल्याने अस्वस्थ होऊन कड्यावरून पडले नाही', अशा सगळ्या गोष्टींचे सुदैव आपल्या सगळ्यांना लाभले आणि कोणतीही वाईट घटना घडली नाही.
गड्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, नशिब नेहमीच साथ देईल, असे नाही. तुम्ही सगळे जण निसर्गाचे लोभसवाणे रूप बघायला जातात. पाऊस अंगावर झेलण्यासाठी तुम्ही सगळे जण आतूर आहात, डोंगरावरचा पाऊस तर काही वेगळीच मजा असते, तुम्हाला आव्हाने स्विकारायला आवडते, तुम्ही काही बच्चे नाही, तुम्ही नादान वेडे नाहीत, स्वत:चा जीव का कोणी फुकाफूकी टांगणीला लावतो? तुमच्या मनात वरील प्रमाणे विचार असतील तर एक गोष्ट ध्यानात घ्या. मागच्या वर्षी महाराष्ट्रात पावसाळी पर्यटनादरम्यान नव्वदहून अधिक जण मरण पावलेत. (महाराष्ट्र माऊन्टन रेस्क्यू दलाने तयार केलेली अपघात घटनांची यादी शेवटी देत आहे.)
श्रावण परिक्रमेलाही एवढी गर्दी लोटत नाही |
डोंगरावर सर्व काही आलबेल वाटत असले तरी परिस्थिती बदलायला अजिबात वेळ लागत नाही. तुमच्या डोंगरयात्रा या अनूभवी मंडळींनी आखलेल्या असाव्यात असाच आग्रह राहू द्या. सोबत अनूभवी ट्रेकलिडर नसेल तर, अजिबात जोखिम पत्कारू नका.
ऑक्टोबर २०१८ ब्रम्हगिरी-ब्रम्हा-हरिहर श्रावणी परिक्रमा |
हरिहरावर चाळीसच्या आसपास चमु, ही डोळे विस्फारायला लावणारी गोष्ट आहे. काहींच्या मते हा आकडा पन्नासच्या पार होता. अगोदर सांगितल्या प्रमाणे हरिहरवर एका दिवशी जास्तीत जास्त अठराच चमु जाऊन येऊ शकता. त्याहून अधिक म्हणजे धोक्याला आमंत्रण. महाराष्ट्रात बहुतांशी गडांच्या वाटा इतक्या गर्दीसाठी बनलेल्या नाहीत. पावलोपावली तिथे धोके आहेत. ही पर्यटनाची ठिकाणे अजिबातच नाहीत. थंड हवेच्या ठिकाणी किंवा समुद्र किनार्यावर किंवा बाग बगिचात सहलीला जातात त्याच्या अगदी विपरीत इथला परिसर आव्हानांनी भरलेला आहे. तु्म्ही डोंगर पर्यटनासाठी सक्षम आहात काय? मान्य आहे, तुमचा सगळ्यांचा गडकिल्ले फिरण्याचा, निसर्गाचा आनंद घेण्याचा हक्क आहे, पण त्याकरिता तुमची शारिरीक व मानसिक तयारी व्यवस्थितरित्या झाली आहे का? पाऊस, वीजा आणि अकस्मिक संकटांना सामोरे जाण्याची तुमची किमान मानसिकता तरी आहे का? हे प्रश्न तुमच्या जीवाशी सुद्धा महत्वाचे आहेत व इतरांच्याही. त्याची उत्तरे तुमची तुम्हीच मिळवा व मगच डोंगर पर्यटनाला जा. ट्रेकचे नियम कडक आहेत व त्यांना कोणतेच किंतू नाहीत. तितकी समज, तितका संयम, माघार घेण्याची क्षमता तुमच्यात असेल तरच तुम्ही पावसाळी गडपर्यटनाचा सह्याद्रीत आनंद घेऊ शकतात, नाही तर तुमच्या वाट्याला आनंदापेक्षा कटूता येण्याची शक्यता राहील.
पाऊस सुरू होण्यापूर्वीच वेताळावर सज्ज स्थानिक चहा नाष्त्याची दुकाने -२०१९ |
ऑक्टोबर २०१८ - मोठी श्रावणी परिक्रमा |
हरिहराचा बालेकिल्लाही आव्हानात्मक आहे. नाशिकच्या वैनतेय गिर्यारोहण संस्थेच्या बचाव दलाने येथून अनेक गिर्यारोहकांची यशस्वीपणे सुटका केली आहे तर काही घटनांमध्ये प्राणहानी सुद्धा झाली आहे.
या लेखाचा उद्देश कुणाच्या धैर्याला आव्हान देण्याचा मुळीच नाही. कुणाला कमी लेखण्याचा अजिबात नाही. माणसाने नेहमीच नवनवी उंची गाठावी मग ते साहसाचे क्षेत्र का असेना! प्रश्न आहे तो अननूभवी मंडळींचा. प्रश्न आहे तो गिर्यारोहण, दुर्गभ्रमंती बद्दल अनभिज्ञ असणार्यांचा. प्रश्न आहे तो योग्य तयारी न करता जाणार्यांचा. प्रश्न आहे तो नेतृत्व अभावाचा. प्रश्न आहे ता चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळेस जाण्याचा अन्यथा याच हरिहराच्या उभ्या कातळ भिंतीवर दहा एकतरी यशस्वी आरोहण मोहिमा झाल्या आहेत. जगातल्या काही सर्वात आव्हानात्मक प्रस्तर भिंतीत इथल्या स्कॉटिश कड्याचा समावेश होतो.
हरिहवरवरून लोभसवाणा नागफणी, मागे भास्करगड, उतवड |
सुरूवातीचे काही पाऊस डोंगरावर जाणे धोकादायक. गरम खडकावर पाऊस पडला की, त्यामुळे खडकावर प्रक्रीया होऊन दगड सुटू लागतात. वाटा निसरड्या बनतात. विजांचा धोका राहतोच.
यंदाच्या पहिल्या पावसाळी रविवारा पासून सगळ्यांनीच धडा घ्यावा. अनूभवी मंडळींच्या सल्ल्याने भटकंतीच्या योजना आखाव्यात. कुटुंबियांना व मित्रांना रूखरूख लाऊन कुठेही जाऊ नये. गेलाच तर संयमाने परिस्थिती हाताळून तात्काळ माघारी फिरा. हे डोंगर दुरून जितके साजरे वाटतात तितके जवळ गेल्यावर प्रत्येक पावलागणिक आव्हाने बनवून ठेवतात. अगोदर अशी आव्हाने पेलण्याची मनाची तयारी करा. आपण ज्यांना सोबत नेणार आहोत, त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकू का? त्यांना अनिश्चीततेच्या गर्तेत तर नाही ना ढकलत? स्वत:ला या सारखे प्रश्न विचारा. योग्य ठिकाणांची निवड करा. अवघड कडे, धबधबे याठिकाणी पूरेसी काळजी घ्या. हमखास वाहतूक कोंडीचे रस्ते टाळा. सुटीचे दिवस मोठी गर्दी उसळते अशी ठिकाणे टाळा.
यंदाचा पावसाळा एकही दुर्घटना घडणार नाही या निर्धारानेच घराबाहेर पडा. पावसाचा आनंद जरूर जरूर घ्या, पण निसर्गाचा योग्य आब राखून. आनंदात घर सोडा व आनंदात घरी परत जा...
तुम्हाला पावसाळी पर्यटनाच्या खुप...खुप...शुभेच्छा!
प्रशासनाने हे करावे...
प्रशासनाने अशा गर्दीवर बंदी घालावी अशी मागणी काही गिर्यारोहकांकडून आणि समाजसेवी मंडळींकडून केली जात आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाळ्यात अशी बंदी यापूर्वीच लागी झाली आहे. त्यात हरिहराची भर पडू शकते, इतकी विकोपाची स्थिती आहे. अर्थात मी स्वत: बंदीच्या बाजूने नाही. बंदी घातल्याने फार काही साध्य होणार नाही. सह्याद्रीचा पसारा अफाट आहे, सगळ्या ठिकाणी बंदी घातली जाऊ शकत नाही. शिवाय लोकांचा निसर्गात जाण्याचा गडांवर जाण्याचा हक्क आपण हिरावू शकत नाही. फक्त त्यांनी नियम पाळावेत इतकाच आग्रह असायला हवा.
बंदी घातल्याने काय होते, हे आपण हरिश्चंद्रगड प्रकरणात बघितले आहे. स्थानिकांनी रोजगार बुडतो, म्हणून विरोध केला, त्यामुळे राजकीय दबाव वाढून बंदी नावापूरतीच राहिली. आता तिथे मुक्काम करता येणार नाही, हे बोर्ड रंगवलेले अजूनही आहेत, प्रत्यक्षात मुक्कामाला अलिखीत परवानगी आहे. काही वेळा अगदी दिड दिडशे तंबू वर लागतात.
सुटीच्या दिवशी नोंद ठेवावी
पायथ्याच्या गावात ग्रामपंचायतीच्या वतिने वर किती लोक गेलेत याची नोंद ठेवून जास्त गर्दी वर जाणार नाही याची नोंद ठेवावी. गर्दी अनियंत्रीत होत आहे किंवा लोक एैकत नाही म्हटल्यावर पोलिस प्रशासनाची मदत मागवावी. ठरावीक संख्येने लोक वर गेल्यानंतर गावचे रस्ते प्रशासनाच्या अधिकृत सूचनेने बंद करण्यात यावे व लोकांना अन्यठिकाणी जाण्यास विनंती करावी. त्यामुळे पर्यटक संख्येवर नियंत्रण ठेता येईल.
कुंड, धबधबे तयार करावे
लोकांना पावसात भिजायला आवडते. सुट्टीचा दिवस निसर्गात जाऊन भटकायला आवडते, याकरिता महाराष्ट्र पर्यटन विभागाने पायथ्याच्या गावात पाण्याचे नैसर्गिक प्रवाह तात्पूरते वळवून पाण्याचे लहान लहान कुंड व छोट्या आकाराचे काही कृत्रिम धबधबे तयार केले तर बरीच मंडळी धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळेल. शिवाय गावाच्या पायथ्याला पर्यटनाचे केंद्र तयार होऊन स्थानिकांना रोजकार उपलब्ध होईल. याकरिता नैसर्गिक पाण्याचाच वापर करावयाचा असल्याने व पुढे ते पुन्हा ओढ्यातच जाणार असल्याने कमी खर्चात पावसाळी पर्यटन विकसीत केले जाऊ शकेल. या निमीत्ताने एक नवा आयाम महाराष्ट्राच्या पर्यटनाला दिला जाऊ शकतो. अगदी जागतिक दर्जाचे कृत्रिम पावसाळी पर्यंटन मर्यादित खर्चात, मर्यादीत संसाधनात उभे करण्याचे उद्दीष्ट असावे.
ट्रेक गाईड्सना प्रशिक्षण
ट्रेक गाईड ही संकल्पना राबवायला हवी. याकरिता स्थानिक गाईडस गावात उपलब्ध करावेत. या गाईड्सना प्रशिक्षण देऊन धोकादायक परिस्थितीत काय करायचे. प्रशासनाला त्याची माहिती कशी कळवायची व पर्यटकांना सुरक्षितपणे कसे घेऊन जायचे. परिस्थिती नुसार कसे निर्णय घ्यायचे. गावात कशा पद्धतीने भोजन आदी वस्तु पुरवायच्या. अंमली पदार्थच्या संदर्भात कशा पद्धतीने जनजागृती करायची, अशी मुद्द्यांवर प्रशिक्षीत केले जाऊ शकते.
हरिहर किल्ला म्हणजे तो जंगलाचा भाग आहे. तिथली वनसंपदा किमान पातळीवर खाली आली आहे. तेव्हा काही स्वयंसेवी संस्थांच्या व स्थानिक मंडळींच्या मदतीने या परिसरात नाशिकच्या बोरगड परिसरात फुलवले तसे जंगल निर्माण करण्याचे नियोजन करता येईल. बोरगडावर अक्षरश: पाच सात वर्षात पुर्णत: नष्ट झालेले जंगल पुन्हा निर्माण करण्यात आले व महाराष्ट्रातले पहिले संरक्षित संवर्धन क्षेत्र म्हणून त्याची निवड करण्यात आली. असा प्रयोग हरिहरला केला तर इथल्या जैवविविधतेला ते मोठे वरदान ठरेल.
बंदीचा पर्याय हा शेवटचा, सगळे मार्ग बंद झाले असतील, काही जमत, सूचत नसेल अशा हाताश स्थितीतीतच बंदी घातली जाऊ शकते. हरिहर हा साहसी खेळांचा राजा आहे, त्यामुळे गिर्यारोहण, पर्यटन, जंगल भटकंती अशा काही उपाययोजना करायला हव्यात. बंदी नकोच!
·
2017
o
Other
Rescue Organisations