Tuesday, December 17, 2019

Dhak bhari...most thrilling cave hikes in the Sahyadris



या आहेत काळाच्या उदरात दडलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा. मावळात असा अपरिचीत इतिहास खोर्‍यांनी दडलेला आहे. त्यांच्या खाणा खूणा कोणत्या काळातल्या? सातवाहनांच्या? पांडवकालीन की अन्य कुठल्या राजवटीतल्या? त्यांच्या नावाचा मागमुस अजून तरी कुणाला लागलेला नाही. सरळसोट उंच कड्यात एवढे अवघड दिव्य कसे काय निर्माण केले? ते करण्यामागचे कारण तरी काय? एक ढाकचा किल्ला आणि त्याच्या बहिरीची गडद लेणी बघितली तरी याची प्रचिती येते.
चहुबाजूंनी दाट जंगलांनी वेढलेला ढाकचा किल्ला सह्यभटक्या मंडळीत ओळखला जातो तो त्याच्या लेणींमुळे. 'ढाक-बहिरी'ची भटकंती केली, असे सहज म्हटले जाते. प्रत्यक्षात प्रचंड विस्ताराचा ढाक किल्ला बाजुला राहतो, भटकी पावले बहिरीच्या लेण्यांच्या चढाईचा थरार अनूभवून संतोष पावतात. या लेखात तुम्हाला ढाकची रक्षक चौकी असा लौकिक मिरवणारा भिवगडचा किल्ला, गाळदेवीच्या घाटाने ढाकची चढाई, त्याच्या विस्तीर्ण पठाराचा सैरसपाटा, गच्च रानातल्या पुरातन गारू आई देवीच्या मंदिरातला मुक्काम, कळकरायच्या खिंडी पर्यंतची थरार पायपीट, हृदयाची धडधड वाढवणारी ढाकच्या गुहेची मुक्त चढाई आणि सांडशी घाटाने केलेली उतराई असा दोन दिवसांच्या भटकंतीचा वृत्तांत वाचायला मिळेल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत महत्वाचा प्रदेश असलेल्या बारा मावळातील हे अंदर मावळ. अर्थात आंध्रा नदीचे खोरे. मावळ परिसराचे एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर आढळणार्‍या कातळात खोदलेल्या लेणी. भारतामध्ये खोदलेल्या लेणींच्या ९५ टक्के लेणी या एकट्या महाराष्ट्रात आहेत. या परिसरातील कार्ला, बेडसा, भाजे, कोंढाणा या लेणी प्रसिद्द आहेत तशा कातळकोरीव काम नसलेल्या असंख्य लेणी आहेत. ढाकच्या बहिरीच्या लेणीचेही तसेच. तिथे कातळातले कोणतेच नक्षीकाम नाही. लेणीचे स्थान इतके भन्नाट की, सह्याद्रीतल्या सर्वात रोमांचक स्थानात याचा समावेश व्हावा!

मावळात अपरिचीत, अप्रकाशित लेण्यांची संख्या कमी नाही. ज्या ज्ञात आहेत त्यातील कित्येक लेणींचा इतिहास अद्याप उजेडात आलेला नाही. शिल्पशैली, शिलालेख, मुर्तींची जडणघडण असे कुठलेच पुरावे मागे न ठेवणार्‍या अशा कित्येक लेणी आहेत. यांचे ऐतिहासिक दस्तावेजही सापडत नाहीत. काही लेणी तर इतक्या अवघड ठिकाणी आहेत की, तिथे मोठी जोखिम पत्कारून जावे लागते. बर्‍याच लेण्यात स्वच्छ, थंडगार पाणी वर्षभर उपलब्ध होते. त्यात देवी देवतांच्या मुर्तींची प्रतिके आहेत. अशा अपरिचीत लेण्या जिज्ञासुंच्या शोधक दृष्टीमुळे प्रकाशित येतात.
दुर्ग अभ्यासक साईप्रकाश बेलसरे व त्यांच्या चमुने मागे एकदा आन्ध्रा नदीच्या खोर्‍यात क्रमवार भटकंती करून सात ते आठ ठिकाणी प्रकाश झोतात न आलेल्या ७-८ लेणी व डोंगरमाथ्यावरील राऊळांचा शोध लावणारी भटकंती सिद्ध केली. (लेखाच्या शेवटी या भटकंतीवर आधारीत साप्ताहीक लोकप्रभामध्ये छापून आलेल्या लेखाची लिंक देत आहे.)

मावळातील काही लेण्यांतले मुर्ती, नक्षीकाम जगातल्या अनन्यसाधारण कातळकोरीव शिल्पकामात मोडणारे. मोठ्या प्रमाणावर खोदकाम हे सातवाहन काळाशी जोडणारे. म्हणजेच इसवीसनाच्या पहिल्या शतकापासूनचे. त्यानंतरच्या विविध राजवटीतले कातळातले खोदकेम या परिसरात नोंदविले गेले आहे. सातवाहन काळाच्या अगोदरच्या पाउलखुणांचा म्हणावा तितका अभ्यास झालेला नाही किंवा त्यावर विस्तृत प्रमाणावर संशोधन न झाल्याने त्या कालखंडाशी जोडणारा इतिहास उपलब्ध नाही. या अनूषांगाने प्राचीन भारतीय स्थळ वर्णनात उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेतली स्थानांबद्दल फारच तोड्या प्रमाणावर माहिती उपलब्ध आहे.

आंदर मावळाला आंध्रा नदीवरून हे नामाभिधान मिळाले आहे. मत्स्य पुराणात सातवाहनांचा उल्लेख, आंन्ध्रभृत्य असा करण्यात आला आहे. काही अभ्यासकांनी यावरून आंध्रा नदी आणि सातवाहनांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. २५-३० किलो मिटरचा विस्तार असलेल्या आंदर मावळात सात ते आठ डोंगरांवर कातळात खोदलेल्या लेण्या आढळल्या आहेत ज्यांची वहिवाट जीवघेणी अवघड आहे. या लेण्यांना दगडात ओबडधोबड पावट्या खोदलेल्या व आत स्वच्छ पाण्याची कातळात खोदलेली टाकी आढळली आहेत. तथापी सातवाहनांशी जोडणारा कुठलाही शिल्पाकृती पुरावा अद्याप प्रस्तापित होऊ शकलेला नाही, असे निरीक्षण साईप्रकाश बेलसरे यांच्या लेखात वाचायल मिळते.

ज्या प्रमाणे एखादे लाकूड अथवा सजिवाच्या मृत अवशेषाचे कार्बन डेटिंगवरून ते किती वर्षांपूर्वीचे असावे याचे अनूमान काढला जाते तसे एखादे कातळकाम किती जुने आहे याचे अनूमान काढणारी परिक्षण पद्दती प्रचलित नाही. अत्यंत अवघड ठिकाणच्या लेण्या जिथे आम जनतेची ये जा नाही अशातील टाक्यांच्या तळाचे उत्खनन करून काही प्राचीन पुरावे गवसले जाऊ शकतात का? या टाक्यातला गाळ  वाहून जाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यांच्या तळात काही हत्यारे, एखादं नाणे, भांडे किंवा कौल, माठ, बांगड्यांच्या अवशेषावरून काही दुवे शोधण्याचा प्रयत्न केले तर या लेणींच्या कालमानावर आणि पर्यायाने त्या परिसरातील राजवटींवर महत्वाचा प्रकाश टाकण्यास वाव मिळू शकेल. विद्यापिठ, सरकार किंवा संशोधन कार्यास चालना देणार्‍या एखाद्या संस्थेच्या मदतीने या दिशेने शोध घेण्याची आवश्यकता आहे.
ढाक किल्ल्यावरून दिसणारा कुसूरचा परिसर

किल्ले ढाक
ढाक किल्ल्याची निर्मीती ही कुसूर घाटावर लक्ष ठेवण्यासाठी केली गेली असावी.
कल्याण, चौल बंदरावरुन होणारा व्यापार प्रामुख्याने पिंप्रिघाट, तोरणघाट, चेंढ्याघाट, मेंढ्याघाट, माळशेज, नाणेघाट, वाघजाईघाट, तुम्हिणी, उंबरखिंड, कुसूर, भोरघाट मार्गे होत असे. एकट्या भोरघाटावर लक्ष ठेवण्यासाठी कर्नाळा, प्रबळगड, माणिकगड, राजमाची, लोहगड, विसापूर या किल्ल्यांची निर्मीती केली केली. कुसूर आणि भोरघाटाच्या मधोमध असलेला ढाक किेल्ला विस्ताराने मोठा आहे. त्यावर कातळात खोदलेल्या पायर्‍या, पाण्याची कातळातली टाकी, तटबंदी, वाड्यांची जोती ही प्रामुख्याने पूर्व बाजूच्या भागात एकवटलेली दिसतात तर गडावरची जुन्या वस्त्या ही प्रामुख्याने पश्चिम भागात आढळते. त्यातही ढाक आणि कळकराय सोडले तर इतर वाड्या वस्त्या आता उठल्या आहेत. ढाकच्या पठारावरही दोन पाच घरांचीच लहानशी वस्ती उरली आहे.
सांडशी, वदप, गौरकामत अशी पायथ्याची खेडी आता दुर्गम राहिली नाहीत, त्यामुळे वरच्या वस्त्या उठून लोक या पायथ्याच्या गावात स्थायीक झाले आहेत. गाळदेवीच्या घाटाने तुळशीच्या माळावर आता एकमात्र घर दृष्टीस पडते. प्रचंड पावसाच्या या प्रदेशावर निसर्ग मेहेरबान असला तरी बदलत्या वातावरणात, बदलेल्या जीवनशैलीत गडावरून प्रत्येक गरजेच्या गोष्टीसाठी चढाई उतराई हे जिकीरीचे काम असल्याने गडावरची प्राय: सगळीच वस्ती दोनपाच घरांचा अपवाद वगळता उठून पायथ्याच्या गावात स्थिरावली या मागचे एक प्रमुख कारण म्हणजे आजारपणात गडावर औषधोपचाराच्या सुविधांचा अभाव असल्याचे मत पूर्वी कळकराय वाडीत राहणारा आणि आता सांडशी जवळ स्थायीक झालेल्या सुरेश पवार या आमच्या वाटाड्याने व्यक्त केले.
झाडांची घटलेली संख्या हे आणखी एक कारण त्या मागे असू शकते. पूर्वी येथे घनदाट जंगल असल्याने पावसाळी शेती सरल्यानंतर वर्षभर जंगलाच्या आश्रयाने फळे, कंद, साली, फुले यांच्या रूपाने औषध अन्न उपलब्ध होते. जंगलात शिकारही मुबलक प्रमाणावर असे. मोठ्या आकाराचे वृक्ष कमी झाल्यामुळे अन्नपाण्याची दादात. शिवाय राजेशाहीच्या काळात वरच्या वस्त्यांमध्ये हातांना काम मिळत असावे. तोही उत्पन्नाचा मार्ग. खरे तर घाटातल्या व्यापारासोबत गडांवर राबता असेल त्याकाळात गडांच्या वस्त्यांमध्ये भरभराट नांदत असणार. ब्रिटिशांनी भारतात सत्ता काबिज केल्यानंतर गडांच्या आश्रयाने सह्याद्रीत लढे उभे राहू नये याकरिता गडांच्या वहिवाटा, प्रवेशमार्ग आणि काही प्रमाणावर पाण्याचेस्त्रोत तोफा सुरूंग लावून नष्ट केले तशा गडांवरच्या वस्त्या ओस पडू लागल्या. त्यातल्या काही वस्त्या इंग्रज भारत सोडून गेल्यानंतरही तगून राहिल्या. ढाक, कळकराय वाडी अशा काही वस्त्या सह्याद्रीच्या डोंगरांवर आत्ता आत्ता पर्यंत होत्या.
अशा दुर्गम ठिकणी प्रशासनास वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य अशा जीवनावश्यक नागरी सुविधा पुरविणे जिकिरीचे असल्याने, त्याच प्रमाणे दरडी कोसळण्याचा धोका असल्याने मोठ्या प्रमाणावर डोंगरावरच्या वस्त्या वाहने व मदत पोहोचू शकेल अशा खालच्या भागात हलविण्याचा सपाटा लावला. त्यात ढाकवरच्या वस्त्या उठल्या. भिंमाशंकर जवळ माळीन येथे साठवण तलाव फुटून संपूर्ण वस्ती मातीच्या ढिगाराखाली गाडली गेल्यानंतर सह्याद्रीच्या डोंगरांवरच्या वस्त्यांना घरघर लागली. अशीच एक वस्ती नाशिकच्या ब्रम्हगिरी किल्ल्याच्या विनायक खिंडीतून उठविण्यात आली. या वस्तीवर विनायक बुरूजाचे दगड कोसळून जिवीत हानी झाली होती. कुलंग किल्ल्याच्या पायथ्याला भाम येथील वस्ती अलिकडे उठवून घोटी मार्गालगत नव्याने वसविण्यात आली.  अर्थात ही वस्ती भाम धरणाच्या बुडितात येत असल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले.
गौरकामत वरून भिवगडकडे निघण्यापूर्वी सूचना...

२३ नोव्हेंबर २०१९
पुनश्च एकदा डॉ. हेमंत बोरसेंच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या ट्रेकसोल्स या बहूतांशी नाशिक, पुणे, मुंबईतल्या डॉक्टर भटक्यांच्या समुहाने पहाटे सव्वा पाच वाजता मुंबई नाक्यावरून कसार्‍याच्या दिशेने प्रयाण केले. प्रस्थानाची वेळ पहाटे ४-३०ची ठरली होती. तथापी काहीशा विलंबाने आलेली गाडी आणि मग पुढे एक एक टप्प्यात एक एक गडी गोळा करण्याच्या नादात ४५ मिनीटांचा विलंब झाला. शहापूर-मुरबाड रस्ता यंदाच्या पावसाळ्यात बराच मोडकळल्याने तसेच म्हस्याच्या अलिकडच्या पुलाच्या कामामुळे मारावा लागणारा मोठा फेरा टाळण्यासाठी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कसार्‍या समोरच्या डोळखांब फाट्यावरून मधल्या वाटेने जाण्याचा निर्णय घेण्यात आला. या फाट्यावर टेंपो चालकाने चहा पिण्याची इच्छा व्यक्त केली. मग काय सगळेच उतरले. चहाच घेत आहोत तर थोडा नाष्ताही करण्याचा सुपिक कल्पना पुढे आली. ढाब्यावर अजून कुठलीच लगबग नव्हती. नाष्त्याची तयार नव्हती की चहा तयार नव्हता. पंधरा मिनीटात ताजा चहा तयार होइल अशी स्वयंपाक्याने हमी दिली. पण त्याने भले मोठे आधण ठेवले. हा चहा होण्यासाठी अर्धा तास तरी लागणार होता. उकळी लवकर फुटत नाही हे पाहून आमच्या हिमांशू देशमूख मधला स्वयंपाकी जागा झाला. त्याने स्वयंपाक घराचा ताबा घेतला. मग कोणी कांदा चिरतोय तर कोणी मिरच्या. झटपट दहा पंधरा अंडी टाकून त्याने अंड्याची भूर्जी तयार केली. पाऊण तासाचा हा मोठा ब्रेक पाहून ट्रेक नेत्याने डोळे विस्फारले. आठ वाजता तिथून आमची गाडी हलली. डोळखांबवरून आम्हाला गाठायचे होते टोकावडे.

पवारांनी उडवली झोप
डोळखांबच्या वाटेवरची लहान लहान गावे मागे पडत होती. आजा पर्वताचे दिव्य दर्शन घडत होते. बरीच मंडळी पहाटे तीन साडे तीनवाजता उठून भटकंतीच्या तयारीला लागल्याने गप्पा, दंगामस्तीला विराम लागून डोळ्यांवर झोपेचा पडदा चढत होता. माझ्या मोबाईल फोनची घंटी घणघणायला लागली, सौभाग्यवती नम्रताचा फोन येत असल्याचे पाहून मी दचकलो. तोच पलिकडून आवाज आला, अभिनंदन! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री...थोडा विराम घेऊन, उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार! दोघांचे शपथविधी मध्यरात्री पार पडलेत!
काय? हे कसे काय शक्य? मुख्यमंत्री म्हणून तर खुद्द शरद पवारांनी आदल्या दिवशी मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा केली होती. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना मिळून सरकार स्थापन करणार होते? महिनाभरापासून या तीन वेगळ्या वाटेच्या पक्षात यासाठी खल चालला होता. या माहितीवर माझा विश्वास नव्हता, तिला म्हटलं तु स्वत: वृत्तवाहिनीवर बघितलसं का? तिने सांगितले माझ्या धाकट्या भावानेच जिममध्ये फोनकरून तीला ही माहिती दिली.
हा मोठा धक्का होता. एरवी भटकंतीच्या प्रवासात एखादा विषय केंद्रस्थानी असणे आणि त्यावरून मग किस्से कहाण्या फटफजितीच्या घटनांचा धुराळा उडणे हे नित्याचे. यंदा प्रथमच एका राजकीय प्रसंगाने ती जागा घेतली होती. एव्हाना गाडीत प्रत्येकाची झोप उडाली होती. माळशेजच्या अफाट डोंगरांचा भला थोरला शैल कॅनव्हास दिसू लागला आणि राजकीय गप्पांची जागा पुन्हा भटकंतीने घेतली. मोरोशीच्या भौरवगडाच्या मागून कोवळी सूर्यकिरणे येत होती. खुल्या डोळ्यांसमोर भैरवगडाची सॉफ्ट फोकस प्रतिमा एक अद्वितीय अनूभूती ठरत होती. हा नजारा डोळे भरून बघायचा यासाठी खास गाडी थांबवून सगळ्यांनी बाहेर उतरून हा नजारा आपल्या मनामध्ये कैद केला, काहींनी आपल्या कॅमेर्‍यात तर काहींनी मोबाईल फोनमध्ये तो टिपून घेतला.
माळशेज परिसरातल्या डोंगरांचा भन्नाट कॅनव्हास आणि त्यातला हिरा भैरवगड

टोकावड्या जवळ माळशेज रस्त्यावर मोबाईलच्या इंटरनेटला रेंज मिळाली आणि मग थेट प्रसारीत बातम्या बघून खात्रीच पटली. मिळालेली खबर बरोबर होती. महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला होता. समोर गोरखगड, मच्छिंद्रगडाचे सुळके दिसू लागले आणि पुन्हा आमच्या चर्चेचा केंद्र राजकारणावरून भटकंतीकडे वळला. कोणी तरी आठवण करून दिली, ट्रेकसोल्स या संस्थेची मुहूर्तमेढ गौरखगडावरच रोवली गेली होती. त्याभटकंतीत अभिजीत खडतरे उर्फ आमचा लाडगा चांदोबा, केदार देशपांडे यांची अनपेक्षीत भेट घडली आणि तेव्हा पासून ते ट्रेकसोल्समध्ये सामिल झालेत. मागच्या वर्षी पुण्यात एका रस्ते अपघातात अभिजीतचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने थोडावेळ वातावरण शोकमग्न झाले होते. अभिजीतचा स्वभाव विनम्र तितकाच खोडकर होता, तेव्हा हिमांशूने पुढच्या क्षणाला त्याच्या नेहमीच्या खोडकर शैलीत वातावरण हलके केले.
इतका वेळ प्रवासात एक गोष्ट जाणवत असूनही जाणवत नव्हती, ती म्हणजे रस्त्यांची स्थिती. गप्पा, किस्से कहाण्यात सगळे इतके गढून गेले होते की, रस्त्यावरच्या अगणीत खड्ड्यांवर काही खल झाला नव्हता. शहापूार-मुरबाडवरून म्हसा गाठणे तसे जवळचे अंतर होते, तथापी हा रस्ता बराच खराब असल्याने व पुलाच्या कामामुळे मोठा वळसा पडणार असल्याने ही वेगळी वाट धरण्यात आली. या वेगळ्या वाटेवर मोडकळेल्या रस्त्यांचे ताट तयार होते. अंतर्गत रस्ते बर्‍याच ठिकाणी मोडकळलेले, त्यामुळे प्रवासाचा वेग मंद होता. टोकावडे ते म्हसा या मार्गावर इतक्या ठिकाणी रस्त्यांची दुरूस्ती सुरू होती की, गाडीस वेग असा मिळत नव्हता. म्हस्यावरून कर्जत पर्यंत स्थिती काही बदलली नव्हती. एव्हाना आमच्यात सामिल होणारे मुंबईकर व पुणेकर गौरकामतमध्ये येऊन दाखल झाले होते. गावाच्या बाहेर एका टूमदार घरात त्यांनी डेरा जमवला होता. तिथे चहा-नाष्ता असा मजबूत बेत त्यांनी हाणला. आम्ही तिथे पोहोचल्या बरोबर चहाची आणखी एक फेरी झाली. सगळ्यांनी सोबतच्या बाटल्यात पाणी भरून घेतले. यंदा पाऊस दिवाळी नंतरही लांबला. त्या बरोबरच थंडीचे आगमन लांबले. ऑक्टोबर महिन्यातले कडक उन जाणवले नव्हते. ते नोव्हेंबरात जाणवेल याची ट्रेक सुरू करण्यापूर्वी कुणीही कल्पना केली नव्हती. गाळदेवी घाटाने आजची चढाई होणार असल्याने वाटेत पाणी मिळण्याची शक्यता दुरापास्त होती. प्रत्येकाने सोबत सुमारे तीन लिटर पाणी घेतले होते.

विलंबाची कारणे अनेक
खरे तर साडे नऊ वाजेच्या सुमारास गौरकामतवरून गाळदेवीच्या घाटाची चढाई करण्याचा बेत होता. नाशिक सोडायला झालेला ४५ मिनीटांचा विलंब, चहा व नाष्त्याचा सुमारे तासाभराचा अवकाश आणि जोडीला कसारा ते वदप या खराब रस्त्यामुळे लागलेला वेळ, याने आमचे वेळापत्रक सुरूवातीलाच कोलमडले. लहानशा गौरकामत गावाच्या बाहेर डाव्या बाजूस लहानसा भिवगडचा किल्ला दिसत होता. दुपारी १२-२३ बाराच्या टळटळीत उन्हात आमच्या भटकंतीस सुरूवात झाली होती. स्वच्छ भारत अभियान इथे अजून पोहोचले नसावे, त्यामुळे गावालगतच्या वाटांवरचे 'केक' मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागत होते.
कोकणातला दमटपणा हा काय प्रकार असतो याचा झटका आम्हाला पहिल्या वीस मिनीटातच अनूभवायला मिळाला. भिवगडची खिंड म्हणजे ना मोठी उंची ना अधिकचे अंतर. वाटही अतिशय सोपी. शेवटच्या टप्प्यात थोडी झाडींनी यूक्त. पंचवीस मिनीटांचे अंतर पार करायला आम्हाला तास लागला. भटकंतीच्या सुरूवातीला निघालेला घामटा अनपेक्षीत होता.
भिमगड अथवा भिवगड उंचीत कमालीचा थोटका
भिवगडावरचे पाण्याचे टाके

भिवगड: बालेकिल्ल्या जवळचे मोठे टाके



भिवगड: खांबटाके बघून परतताना
मला या टप्प्यात चांगले उन लागले. उर धपापत भिवगडची खिंड गाठली. तिथे सोबतच्या पाठपिशव्या ठेऊन सगळे जण सोबत थोडे पाणी घेऊन भिवगडच्या शिखराच्या दिशेने मार्गस्थ झाले. कडक उन व दमटपणामुळे माझी पुढे जाण्याची इच्छा होत नव्हती. एका झाडाच्या सावलीत मी व सलिल असे  आम्ही दोघे छोटीशी झोप घेण्यासाठी आडवे झालो. सलिलही उन्हामुळे कासावीस झाला होता. पुन्हा भिवगडला केव्हा येणार? असा विचार करून आम्ही थकव्याचा विचार बाजुला केला आणि बालेकिल्ल्यावर दाखल झालो. पाण्याची टाकी, तटबंदीचे अवशेष, कुठलाही केर कचरा नाही, परिसरातल्या डोंगरपायथ्यांना असलेली दाट झाडी यामुळे मन प्रसन्न झाले. भिवगडला भिमगडही म्हणतात. शिखरावर एक खांब टाके आहे. वाड्याची जोती व तटबंदीचे अवशेष आहेत. याच्या उत्तर बाजूला दाट झाडींचे जंगल अवघा ढाकचा किल्ला आच्छादते. भिमाशंकर - लोणावळा या पट्ट्यातले हे जंगल.
भिवगड उतरून गाळदेवी वाटेला...
लहानशी भटकंती आटोपून भिवगड उर्फ भिमगडच्या खिंडीत ठेवलेल्या पाठपिशव्या पाठीवर चढवल्या तेव्हा दुपारचे २-०० वाजले होते. खडी चढण आणि कोकणातले दमट वातावरण यात शरीराचा मोठा कस लागणार होता. माझ्याकडून एक चूक झाली. रोज सकाळी उठल्या बरोबर चार ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय, आज ट्रेकच्या लगबगीमुळे जलप्राशन काही करता आले नाही. गाडीत बसताना दुसरी चूक. पाण्याच्या बाटल्या सॅकमध्येच होत्या. त्या सगळ्यांचा ढिग गाडीत मागे रचण्यात आला होत. प्रवासात तहान लागत होती, परंतू जवळ पाणी नव्हते. गैरकामतात थोडे पाणी घेतले. पण आता गाळदेवी घाटात पाणी पिण्याबाबत केलेला अक्षम्य हलगर्जीपणा आता जाणवू लागला. वरच्या टप्प्या पर्यंत भराभर पोहोचण्याचे लक्ष्य असल्याने वाटेत थांबून अवजड सॅक उघडून पाणी पिणे होत नव्हते. मी हायड्रेशन बॅग वापरत नसल्याने अधून मधून थोडे थोडे पाणी पिणे होत नव्हते. अर्ध्या पाऊण तासात त्या हलगर्जीपणाने आपले रंग दाखवायला सुरूवात केली. एव्हाना उन लागले होते. आता थांबून थांबन पाणी घेत होतो, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. सूर्य मावळण्याच्या आजचे मुक्कामाचे ठिकाण गाठणे आवश्यक असल्याने विश्रांतीसाठी मोठा थांबा घेता येणार नव्हता. शरिरातले पाण्याचे संतुलन बिघडले होते. आणखी एक गोष्ट विपरीत घडली होती. माझा टीशर्ट व पॅन्ट पुरेसे हवेदार नव्हते. इतर अनेक ट्रेकवर ते मी यापूर्वी अनेकदा घातले आहेत, पण जेव्हा उन लागते तेव्हा असा पेहेराव उपयोगाचा ठरत नाही. अंगातली गडद निळी जाड कॉटनची पॅन्ट शरीरात निमर्याण होणारी उष्णता बाहेर फेकण्यास सहय्य करत नव्हती, उलट गडद रंगामुळे बाहेरची उष्णता शोषून घेत होती. टी-शर्टचेही तसेच. त्याचा कपडा घाम शोषणारा असला तरी तो पुरेसा जाडसर होता, त्यामुळे शरीरातली उष्णता बाहेर फेकण्यात अडथळा आणित होता. सुदैवाने आमच्याकडे वॉकी टॉकीचे चार संच सोबत असल्यामुळे पुढच्या सदस्यांचा मागच्या सदस्यांशी वेळोवेळी संपर्क होत होता.
तुळशीच्या माळावरचा भोजन अवकाश

नागली

ट्रोकसोल्स न्याहारीत दंग


'वीज, वाहने, दुकाने...शहरी गजबजाट न रासे', तुळशीच्या माळावर निर्जन आयुष्य दंगलेल्या आजी

तुळशीचा माळ, गाळदेवी घाट: नागलीच्या खळ्यावरच्या आठवणी...

अग्रभागी सदस्य तुळशीच्या माळावर असलेल्या एकमात्र घराजवळ पोहोचले. तिथे सावली आणि पाणी असल्याने घरून सोबत आणलेले दुपारचे जेवण आम्ही  ४-००च्या सुमारास घेतले. ४-४७ वाजता आम्ही तुळशीचा माळ सोडला. ढाकच्या पठाराचा  वरचा कडा तिथून उंच चढणीवर दिसत होता. प्रत्यक्षात वर पोहोचल्यावर आणखी परत डोंगर टप्पा लागेल की नाही याचा काहीच अंदाज येत नव्हता. पाऊण तासाच्या भोजन अवकाशात माझे शरीर काही पूर्वपदावर आले नव्हते. शरीरातले पाण्याचे संतूलन बिघडलेलेच होते. आता डॉक्टर अभिजीत इंगळे व डॉक्टर संजय गुंजाळ माझ्यासाठी मागे थांबले. मला अधून मधून थोडे थोडे पाणी देत होते व सूर्य मावळण्याच्या आत वरच्या टप्प्यावर दाखल व्हायला हवे याची जाणीव करून देत होते. उन लागल्यावर शरिराचे तापमान एक डिग्रीने वाढले की, शरीराचा कार्यक्षमता दहा टक्कयांनी कमी होती. माझ्या शरीराचे तापमान किती वाढले हे काही कळत नव्हते. एकदा चालायला सूरूवात केली, पंधरा वीस मिनीटे जरी चाललो तरी शरीराचे तापमान वाढते, इथे तर आम्ही दुपार पासून चालत होतो आणि वरून कडक उन खात होतो. अंगात निर्माण होणारी उष्णता चुकीच्या पेहेरावामुळे सुरळीत बाहेर पडत नव्हती. पाणी पोटात साठून राहिल्याचे जाणवत होते. शरीराची क्षमता खाशी मंदावली होती. अभूतपूर्व अशा उन्हाळी आणि थकव्यात कड्याचा शेवटचा टप्पा ओलांडताना कमालीच्या थकव्यामुळे जणू सागरमाथ्याची शेवटची चढाई करतोय असा आभास होत होता. दीर्घ श्वासन करण्याची सूचना डॉ. अभिजीत व गुंजाळ यांनी केली, त्याचा चांगला फायदा होत होता. दहा पंधरा मिनीटे चालल्यावर असे दीर्घ श्वसन व उच्छावसन अंगात तात्पुरती उर्जा भरत होते. थोडा अधिक प्राणवायू मिळत असल्याने त्याचा तात्काळ फायदा होत होता.
सूर्य मावळतीच्या आत ढाक माचीवर प्रवेश

५-३५ वाजता अखेर ढाकच्या पठारावर दाखल झालो. पलिकडच्या डोंगरामागे उन्हे कलू लागली होती. सोबतचे सगळे सवंगडी एव्हाना गारू आईच्या देवळात दाखल झाले होते. तिथे त्यांनी चहापानाची तयारी सुरू केली होती. मावळत्या सूर्याचे दिव्य दर्शन घेत आम्ही बरोबर ५-५३ वाजता गारू आईच्या देवळात पोहोचलो. गच्च हिरवाईतले हे देऊळ अती थकव्यामुळेर नुसते दुरून पाहून माझा थकवा पळून जातोय असे वाटले. देवळाच्या समोरची विस्तीर्ण जमिन कमालीची सुपक. मातीची मोठमोठी ढेकळं आणि त्यावर ठिकठीकाणी निळ्या मंजिरीचे पुंजके. अनेक प्रकारची झाडी झुडपे आणि अस्ताला गेलेला सूर्य अशा वातावरणात रोजच्या शहरी ताणतणावाचे सर्व विचार गळून पडले होते. आम्ही त्या वातावरणात छान एकरूप झालो.
सगळा थकवा पळवून लावणारे गारू आई देवीचे गर्द झाडीतले ठाणे

ढाक पठारावर गारू आई देवीच्या जुन्या मंदिराचा जिर्णोद्धार अशा पद्धतीने केलायं.

गारू आई मंदिराच्या मागे मातीतले टाके नैसर्गिक झर्‍याने भरलेले असते

जुन्या खाणाखुणा पुसून टाकणारा गारू आई मंदिराचा जिर्णोद्धार...

जुन्या देवळाचा आजच्या पद्दतीने जिर्णोद्धार करण्यात आला आहे. खाली लादी फरशी बसविण्यात आली तर बाहेर स्वागत कमान म्हणून फ्लेक्सचे फलक लावलेत. देवळाच्या मागे मातीच्या लहान गोलाकार खड्ड्यात मुबलक स्वच्छ पाणी. हे पाणी वर्षभर असते, याचा काही तरी जिवंत स्त्रोत असावा. आसपाद दाट झाडी व गवत असल्यामुळे भटकी मंडळी किंवा बहिरी, गारू आईचे भक्त नसतील तेव्हा इथली वन्य श्वापदे येथे पाणी पिण्यासाठी येत असावीत. तोंड हाथ धुवून मी लिटरभर पाणी रिचवले. तथापी दिवसभर घेतलेले पाणी लघवीवाटे बाहेर पडत नव्हते. आज माझ्याकडे स्वयंपाक किंवा भांड्यांची जबाबदारी नसल्याने मला चांगली विश्रांती घेण्याची संधी होती. त्यामुळे पाण्याचे संतुलन लवकरच होईल अशी आशा वाटत होती.
बिरबलाची खिचडी...

देवळात स्थिर स्थावर झाल्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची लगबग सुरू झाली. सोबत आणलेला भाजीपाला धूवून चिरण्यासाठी अनेक हात लागले. एव्हाना चहा तयार झाला होता. त्या वातावरणात चहाचा स्वाद द्विगुणीत झाला. देवळात एका कोपर्‍यात मोठी बॅटरी दिसली. तिच्या वायरी जोडून आम्ही गारू आई समोरचा बल्ब सुरू केला. देवळाच्या कळसाच्या जवळ सौर उर्जेची तबकडी बसविल्याने दिवसभराच्या उन्हात बॅटरी चार्ज होते. स्वयंपाक देवळाच्या बाहेर आम्ही सोबत आणलेल्या गॅस शेगडीवर बनविर्‍याचे काम सुरू होते. तिथे मात्र या बल्बचा प्रकाश मिळणार नव्हता, त्यामुळे सोबतच्या बॅटर्‍यांच्या उजेडात आमचा खिचडीचा बेत सुरू झाला. कोणी तरी त्याला, 'बिरबलाची खिचडी' असे नाव दिले, तर कोणी तरी, 'अनेक स्वयंपाकी, काम बिघाडी' ची उपमा दिली. खिचडी बेतानेच शिजली, परंतू कांदा, लसूण, वाटाणा, गाजर, बटाटे, तिखट, मिठाच्या योग्य प्रमाणामुळे, ताटात टाकली की संपली अशी रात्रीच्या जेवणात अवर्तने सुरू झाली. खिचडी जबराट झाली होती. जोडीला लोणचं, पापड आणि सोबत आणलेले नानाविविध पदार्थ यामुळे ट्रेकवरचा हा बडाखाना चांगला रंगला.

वदपहून एक वीस पंचवीस यूवकांचा गट बहिरीच्या दर्शनासाठी आमच्या सोबतच देवळात मुक्कामी थांबणार होता. त्यांची जेवणावळ रात्री बरीच उशरापर्यंत सुरू राहिल्याने आमच्या झोपेचे खोबरे होणार होते. जेवण झाल्यानंतर एक छोटी काव्य मैफिल रंगली आणि दिवसभराच्या थकव्यामुळे झोप कधी लागली हे कळलेच नाही. मध्यरात्री जोरदार प्रेशर आल्याने उठावे लागले. उन्हामुळे दिवसभर लघवी झाली नव्हती, ती आता झाली. त्यानंतर तब्बल तीनदा असेच जमा झालेले प्रेशर खाली करावे लागले. शरीरातले पाण्याचे संतूलन पूर्वपदावर आल्याचे ते चिन्ह होते.  डोंगरमाची आणि जंगल असूनही थंडी अजिबात जाणवली नाही. याभागात प्रकाश अथवा ध्वनीचे अजिबात प्रदुषण नाही, त्यामुळे मध्यरात्री आकाशगंगेची दिवाळी दिसावी असे मनोमन वाटत होते, पण आज तो दिवस नव्हता. शिवाय आकाशात ढग असल्यामुळे मिट्ट काळोखात दिसणारी ग्रह, तार्‍यांची दिवाळी सर्वोच्च प्रखरपणे दिसली नाही.

बंदी अजूनही वरचेवर...प्लास्टिकच्या ग्लासात गरम पदार्थ कर्करोगाला आमंत्रण...



पुरातन स्तंभ
सूर्य उगवण्याच्या तासभर अगोदर उठण्याचा शिरस्ता आजही पाळला गेला होता. सकाळची आन्हिके उरकत असताना ढाक किल्ल्याच्या मागून तांबडं फुटताना दिसू लागलं. तोवर डॉ. अजय धोंडगेंनी चुल पेटविली होती, तर हिमांशू, डॉ. अभिजीत इंगळे, केदार केळकरांनी आल्याचे कडक चहा तयार केला होता. चहाचे घुटके घेत आजचा सूर्यदय ढाक किल्ल्यावरून दिसणार होता. काही क्षणात तो भराभर अनेक रंगांची उधळण करत अवतिर्ण झाला. देवळाबाहेरचा प्राचीन कातळ स्तंभ कोवळ्या उन्हात न्हाऊन निघत होता. आजचा दिवस कालच्या दुप्पट, तिप्पट चालीचा असल्याने सकाळी लवकर निघण्याची लगबग सुरू झाली. आज फार चढण नसणार, त्यामुळे शरीरातले पाण्याचे संतुलन पुन्हा बिघडले तरी काल इतका त्रास जाणवणार नाही, किमान थकवा तरी तितका नसेल, या विचाराने मी सुखावलो.
आज दुपारचे जेवण म्हणून मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी अनेक हातांनी तयार केली. 'अनेक स्वयंपाकी, चव बिघडवी', हे विशेषण आजही फोल ठरले होते. सुक्या मटकी सोबतचा अंगरस्सा जबर चवीचा बनला होता. खिचडी सोबत हा सगळा रस्सा संपवण्यात आला. नाही तरी डब्यात थोडा सुद्धा रस्सा नेऊन चालणार नव्हते. दिवसभराच्या पायपीटीत तो सॅकमध्ये तसाही सांडला असता.
मटकीला ताजी फोडणी

प्रत्येक भाविक एक फांदी तोडून जाळणार असेल तर?


गारू आईचा निरोप...आज दिवसभर तंगडतोड पायपीट...

चहा, नाष्ता व दुपारचे जेवण अशी मोठी लगबग आटोपून ८-३५ वाजता आम्ही गारू आईचे मंदिर सोडले. ढाकच्या विस्तीर्ण, झाडींचे आच्छादन असलेल्या या पठारावर जवळच ढाकची वस्ती आहे. तिथे भेट देण्याचा बेत रहित करावा लागला. इतिहास काळात या ढाक वस्तीचा मोठा तोरा होता. ढाककडे येण्यासाठी किमान पाच वेगवेगळ्या वाटा याची साक्ष देतात. ('घाटवाटांची भटकंती', या पुस्तकाच्या लेखिका डॉ. प्रिती पटेल यांनी पेज नदीच्या बाजूने ढाक कडे जाणार्‍या तीन अपरिचीत वाटांचा उल्लेख केला आहे. त्यासाठी जिज्ञासंनी या पुस्तकाचा संदर्भ घ्यावा. याशिवाय सांगाती सह्याद्रीचा, डोंगरयात्रा, ट्रेक द सह्याद्रीज या सह्यभटकंतीच्या भावार्थदीपिका म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुस्तकात ढाकच्या वाटांचे तंतोतंत वर्णन आहेच).
ढाक गावातून पुजार्‍याने भल्या सकाळी गारू आई दिवेची पुजा केली आणि मग तो सरळबहिरीच्या पुजेसाठी किल्ल्याच्या दिशेने रवाना झाला. वदपहून आलेले स्थानिक मुलांचे टोळकेही सकाळीच कोरा चहा घेऊन बहिरीच्या पुजेसाठी रवाना झाले. त्यांनी सोबत तीन कोंबडे आणले होते. 'गुहेत कारण करू, तुम्ही या जेवायला', अस आवतन त्यांनी दिले.
अत्यंत सुपिक जमिन...
ढाक पठारावर निळ्या मंजिरीचे मोठे साम्राज्य

मोठे वृक्ष तुरळक...गवत, झुडपी जंगल टिकून


चराई नाही की, भटके, पर्यटकांची वर्दळ...त्यामुळे गवतही छान टिकून...

श्रीवर्धन, मनोरंजन...राजमाचीचे दर्शन


सुदूर मधल्या शिखरात दिसणारे गारू आई मंदिराचे ठिकाण

समोर दुरवर ढाकचा किल्ला दिसत होता. तो बराच लांबवर दिसत होता. त्यावरून ढाक किल्ल्याचा विस्तार केवढा मोठा आहे याची प्रचिती येत होती. या संपुर्ण पठारावर मुबलक प्रमाणावर गवत, झाडी झाडोरा आणि खेकड्यांनी जमिनीवर उकरून टाकलेली लक्षावधी भूयारी घरटी दिसत होती. तुफान पावसाच्या प्रदेशात या भागात भाविक, भटक्यांची फारच तोकडी वर्दळ असल्यामुळे गवताचा माळ आणि त्याच्या आश्रयाने जगणारी सजिव सृष्टी साबूत असल्याची चिन्हे ठिकठीकाणी दिसत होती. मोसमी पाऊस जाऊन दोन महिने लोटूनी पठारावरचे गवत वरच्या प्राय: सगळ्या  वस्त्या उठल्यामुळे चराऊ जनावरेही फारशी नसल्याने भरपूर उंच वाढुन त्याला तुरे फुटले होते. त्यातून जाताना आख्खाच्या आख्खा माणूस बुडत होता. कारवी यंदाच्य हंगामात मेली असावी. तिच्या वाळक्या काटक्या याची साक्ष देत होत्या, तर नवी कारवी करंगळी पेक्षा बारी दिसत होती, त्यावरून येणारी सहा सात वर्षे कारवीची नवी सद्दी राहणार हा निसर्ग नियम सांगत होती. नाना तर्‍हेची झुडपे, गवत आणि अनेक प्रकारच्या फुलांचे दृष्य डोळ्यात साठवत तासाभराच्या पायपीटीत ढाकचे पठार केव्हा ओलांडले हे कळलेच नाही. आता समोर ढाक किल्ल्ल्याचा भलामोठा कातळ दिसत होती. एका प्रशस्त कातळावरून मांजरसुंब्याचा डोंगर, राजमाचीची जुळी शिखरे मनरंजन व श्रीवर्धन दिसत होते. टुमदार सांडशी गाव नजरेत भरत होते. सुदूर गच्च झाडीत रात्री मुक्कामाचे ठिकाण असलेले गारू आईच्या मंदिराचा परिसर स्पष्टपणे दिसत होता. तर डाव्या कातळ धारेच्या खालच्या पठारावर थोडीच घरे शिल्लक असलेली कळकराय वस्ती दिसत होती.
अजून थोडी घरे बाळगून असलेली कळकराय वस्ती...

दहा वाजता हा टप्पा सोडला आणि ढाक किल्ल्याची चढाई सुरू झाली. डाव्या हाताला कुसूर घाट परिसराचे दर्शन घडत होते. गारू आई देवळाच्या उजव्या बाजूला ढाकची उत्तर बाजू चौफेर पसरलेली आहे. तिथे दूरवर एक धबधबा अजूनही सुरू असल्याचे पाहून अचंबा वाटला. काल गाळदेवीचा घाट चढताना उन्हामुळे जो थकवा आणि त्रास जाणवत होता तो आज जाणवला नाही. आता आम्ही ढाकच्या उत्तर बाजूने मार्गाक्रमण करत होतो. तोच वायव्य दिशेला ढाक किल्ल्याची लांबवर पसरलेली तटबंदी दृष्टीस पडली. चिरांवर चिरा रचून केलेल्या या तटबंदीच्या बाजूने वहिवाटीचा मार्ग नसल्याने त्यावर मोठ्याप्रमाणावर झाडी व गवत उगवलेले दिसत होते. आणखी थोडे पुढे चालत असताना गवतात बुजलेली वाट काहीशी बदलली. आम्ही चक्क ढासळलेल्या जुन्या दरवाजाच्या अवशेषांवरून खालची वाट उतरत असल्याचे जाणवले. बांधला त्यावेळी या दरवाजाला काय नाव दिले असेल? नुसत्या विचाराने अंग मोहरून गेले.
गवत, झुडपा साज पांघरलेली किल्ले ढाकची भली मोठी तटबंदी...

दरवाजापासून आणखी थोडे पुढे गेल्यावर कड्याला लागून तीन कातळात खोदलेली पाण्याने भरलेली टाकी दृष्टीस पडली. ढाक किल्ल्यावर थोड्या प्रमाणावर असले तरी बर्‍यापैकी असलेले अवशेष भटकंतीचे मनोमन समाधान देत होते. गवत, झाडीत बुजलेली ही अस्पष्ट वाट अशीच पुढे जात होती. ती सोडून आम्ही बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी उजव्या बाजूच्या गवतातून शिखर माथ्याच्या दिशेने चढाई सुरू केली. अनेक प्रकारची गवत फुले आणि दाट झाडींचे हे जंगल. उजवीकडे थोडा वळसा मारून पुढे गेल्यानंतर गच्च झाडीत भलामोठा तलाव दृष्टीस पडला. दुपारचे ११-०० वाजले होते. इथून थोडे पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजुला जोत्याचे अवशेष दृष्टीस पडले. आणखी दहा मिनीटात आम्ही गडाच्या सर्वोच्च शिखरमाथ्यावर पोहोचलो. त्याच्या काळकभिन्न कातळावर दुपारच्या टळटळीत उन्हात आज आमचे दुपारचे जेवण रंगणार होते. बहिरीच्या गुहेच्या वरच्या बाजूचा हा भाग.

ढाकच्या बालेकिल्ल्याकडे जाताना लागणारा मोठा तलाव
ढाकच्या बालेकिल्ल्यावरचे जोते

तिरंगा...ढाक बालेकिल्ल्यावरून...

ढाकच्या शिखरावर दुपारचे भोजन

भल्या सकाळी बनवलेली सुकी उसळ, सोबत आणलेली फळे, सुके पदार्थ अशी मनसोक्त पोटपूजा आटोपूल्यानंतर दहा वीस मिनटे विश्रांती तर गरजेचीच. शिखरमाथ्यावर झाडे अशी नाहीच. सावलीची तर नाहीच नाही. त्यामुळे भर उन्हात हातांनी डोळ्यावरचे उन थोपवताच ब्रम्हानंदी टाळी लागली. ज्या अर्थी या भागात वाड्याची भली मोठी जोती, त्या अर्थी इतिहास काळात येथे पाण्याची काही ना काही व्यवस्था नक्कीच असावी. ती आज हरवल्यासारखी वाटली. त्यांचा काही मागमूस नव्हता. दमट हवा आणि कडक उन्हात सकाळ पासून साडे तीन तासांची पायपीट आणि पुढे बहिरीची गुहा, मग सांडशी घाटाने उतराई असा उर्वरीत कार्यक्रम मोठा असल्याने शिखरावर फार काळ घालविण्याचे स्वातंत्र नव्हतेच. त्यामुळे शिखरावरचे शिवलिंग शोधण्याचे कष्ट न घेता आम्ही शिखरावरचा छोटासा मुक्काम हलवला. आल्यावाटेने पुन्हा टाक्याकडे परतण्यात बराच वेळ गेला असता, त्यापेक्षा बालेकिल्ल्याच्या पूर्व टोकाच्या डाव्या बाजूने गचपनातून उतराईची वाट धुंडाळली. भरपूर वाळके गवत आणि निसरड्या उतारावरून खालच्या टप्प्यात डाव्या किनार्‍या लगतच्या वाटेला लागलो, तोवर विचार केला नव्हता, ढाक किल्ल्याच्या थरारक वाटेची ही झलकमात्र होती.
ढाकचा बालेकिल्ला सोडताना...

गवतात बुजलेल्या, निसरड्या, उताराच्या डोंगरकड्याच्या वाटा...

एकही चुक ना घडो...नजर ना हटो...

एकही चुक ना घडो...नजर ना हटो...

डोंगरकड्याला चिकटून जेमतेम पाऊल ठेवता येईल इतकीच, पण व्यवस्थित मळेलली ही वाट बर्‍याच ठिकाणी सरळसोट उभ्या, शेकडो फुट खोल दरीचे दृष्टीभय निर्माण करणारी. काही ठिकाणी हातांना पकडण्याचे आधारच नाही. काही ठिकाणी पाय ठेवण्यासाठी जेमतेम पकड घेता येईल असे अगदी पुसटसे आधार तर काही ठिकाणी सरळ गोट्याच्या आकाराचे कातळ, ज्यावर पाय ठेवणे महामुश्कील. काही ठिकाणी मातीचे घरसडे उतार. थोडीशी चुक करण्यालाही वाव नाही, असे हा थरारक प्रवास तब्बल तासभर चालला. अंतर थोडेच असले तरी प्रत्येक टप्पा हा काळजीपूर्वक पार करण्याशिवाय दुसरा विषय नव्हता. पाठीवर ओझेही बरेच. शिवाय प्रत्येकाकडेचे तीन लिटर पाणी संपले होते किंवा संपण्याच्या बेतात. अखेर दुपारच्या १२-४८ वाजता कळकराय सुळक्याचे वरचे टोक दृष्टीस पडले. बहिरीच्या गुहेच्या जवळ पोहोचल्याची ती खुण होती. कळकरायच्या खिंडीतली शेवटची कातळ उतराई तितकीच थरारक ठरली. येथे दृष्टीभयाची स्थिती नसली तरी कातळारोहणाचा कस लावणारा हा टप्पा सहीसलामत पार झाला. कळकरायच्या खिंडीत डोंगरभटक्यांची बरीच वर्दळ दिसून आली. येथे पाण्याची सोय नव्हती. आता पाणी मिळणार तर ते, या भटकंतीतील सर्वात आव्हानात्मक चढाई केल्यानंतरच - बहिरीच्या गुहेत.
शेवटचा कातळटप्पा कळकराय खिंडीत उतरवताना...

धारेवरची कसरत...

Add caption




खबरदार...पक्का आधार...
वाहतूक कोंडी
कळकराय खिंडीत सर्वांनी पाठीवरच्या अवजड पिशव्या ठेवल्या. ज्यांनी यापूर्वी ढाक बहिरीची लेणी बघितली अशा दोघा तिघांना तिथे थांबवून तीन चार छोट्या पाठपिशव्यात सगळ्यांच्या रिकाम्या बाटल्या टाकून आम्ही लेणीच्या दिशेने कुच केली. साखळदंड जडलेल्या कातळ घळीतून उतरताना बराच वेळ लागत होता. खालून कोणी वर येत असेल तर वरून खाली उतरणे अवघड. त्यामुळे आलटून पालटून सामंजस्यने काही खालची मंडळी वर आल्यानंतर थोडी वरची मंडळी खाली उतरत होती. आता ढाकच्या लेणीचा प्रसिद्द ट्रॅव्हर्स दिसत होती, पण लेणीच्या चढाईचा मार्ग पुढे आलेल्या कातळामुळे झाकला गेला होता. लेणीच्या खालच्या बाजूला आल्यानंतर कातळातला सुरळसोट उभा चढाई मार्ग बघून छातीत धस्स झाले. अर्धामुर्दा पाय मावेल अशा पावट्या कातळात खोदलेल्या. वरून कातळात ठोकलेले गज, साखळ्या. त्या पकडत वर चढायचे म्हणजे जास्त जोखिमेचे वाटत होते. त्यापेक्षा कातळात मस्त आधार घेऊन चढणे जास्त सुरक्षित वाटत होते. ही सगळी चढाई हजार ते बाराशे फुट उंच कड्यावर. आज रविवारचा सुटीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविक, भटके लेणी बघण्यासाठी लोटले होते. यात सांडशी किंवा जांभिवलीतून येणार्‍यांची संख्या सर्वाधिक होती. यातील काही जणांनी तांबडं फुटण्याच्या आत चालायला सुरूवात केली होती, तेव्हा कुठे ते वेळेत दाखल झाले होते. आलेल्यांची संख्या मोठी असल्याने लेणीच्या अवघडा मार्गावर माणसांच्या गर्दीची सकाळ पासून अभूतपूर्व कोंडी झाली होती. वरून कोणी खाली उतरत असेल तर खालचा माणूस वर जाऊ शकत नाही अशी अवस्था. उन्हात दगड चांगलाच तापलेला. त्याला पकडून उभे राहणे म्हणजे मोठी सत्व परिक्षाच. त्यात वरच्या बाजूची मंडळी सारखी ओरडत होती. दोन तास झालेत, अजून इथेच अडकून पडलोत, आता आम्हाला उतरू द्या. वरच्या भागात तर एकाच वेळेस येणारे व जाणारे, अशी दुहेरी कसरत सूरू होती. हे फार खतरनाक दृष्य होते. एक हात किंवा पाय जरी निसटला तरी कोण आपत्ती ओढवेल, याचे काहींना गाभीर्य नव्हते. काही मंडळी थांबण्याच्या मनस्थितीत नव्हते. मोठ्या गोंधळाची स्थिती निर्माण झालेली. काही जण तर लहान मुलांना घेऊन आले होते तर काही मुली या अनवाणी आल्यामुळे उन्हाचे असय्य चटके सहन करीत होत्या. तोच वरच्या बाजूने मुलींच्या किंकाळण्याचे आवाज आले. कोणी तरी जाम घाबरलेलं जाणवलं. खालच्या बाजूने नेमका काय प्रकार आहे हे आम्हाला काहीच दिसत नव्हतं.
बहिरीच्या गुहेकडे जाणारी कातळकड्याची वाट
मुक्त आरोहण: ढाक गुहेची उभ्या चढाई

वरच्या बाजूने एक माकड एका मुलीच्या हातातली वस्तू घेण्यासाठी धावले होते. त्यात तिचा हात सुटला असता तर? मणक्यात भितीची शिरशीरी दौडवणारा हा विचार तिच्या खाली उभ्या आठ दहा जणांच्या मनात नक्कीच आला असणार. माकडं उड्या मारत असल्याने वरून लहान लहान दगड सतत पडत होते.
ढाकची लेणी वेडे साहस करण्याचे ठिकाण नाही. निम्मी अधिक जनता गिर्यारोहणाशी संबंधित नसल्याने त्यांच्याकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्राथमिक साधनेही नव्हती. हेल्मेट तर कुणीच आणले नव्हते. कातळ आरोहण नसेल तर ट्रेकवर कोणी सुरक्षेसाठी गिर्यारोहणाचे शिरस्त्राण घालत नाही. ढाकसारख्या ठिकाणी हेल्मेट घालून येणे अत्यंत आवश्यक आहे. वरून लिंबा ऐवढा दगड डोक्यात पडला तरी त्यांचे गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी ताकिद देणारा हा प्रसंग.
स्वत:च्या हातापायाच्या ताकदीवरच हा लेणी मार्ग चढला जाऊ शकतो. दृष्टीभय जाणवणार्‍यांसाठी हे ठिकाण नाही. सगळ्यात वरचा टप्पा तर भलताच कठिण. दोर किंवा गज पकडून वर जायचे तर पायाला काही आधारच नाही. त्यासाठी दोन सागाच्या बल्ल्या ठेवल्या आहेत. त्याच्या इंच दोन इंच जाणीच्या लहानशा फांद्यांवर पाय देऊनच वर चढता येऊ शकते. अक्षरश:  त्या मोडणार नाहीत अशा विश्वासावरच हा टप्पा सर करावा लागतो. जुन्या बल्लीचा वरचा भाग अलिकडे मोडल्यामुळे दुसरी बल्ली ठेवल्याचे ऐकण्यात आले.
एका आरोहकाने वर जाऊन खालच्या आरोहकांना सुरक्षा दोर पुरविणे व एकएकाला खेचून घेणे हे केव्हाही सुरक्षित. या टप्प्यावर आमचीही तारांबळ झाली. आमचे सगळे सवंगडे मागे पुढे झाल्याने एका रांगेत चढणे दुरापास्त झाले. त्यामुळे वर जाऊन सुरक्षा दोर काही लावता आला नाही.
बहिरी समोर कोंबडं...त्याचे करू कारण

बहिरीच्या गुहेतले शीतल जल: अविट...अविश्वसनीय...

ढाक किल्ल्यावरच राहणारा गारू आई आणि बहिरीचा पुजारी भक्तांचा नवस कबुल करताना...

२-०१ वाजता आमचा चमु गुहेत दाखल झाला. गुहेत पोहोचल्यानंतर विचार आला तो त्या माणसांचा ज्यांनी इतक्या अवघड जागी लेणी शोधून काढली. संपूर्ण ढाक किल्ल्यावर वर्षभर पिण्याच्या पाण्याची शाश्वती जर कुठे असेल तर ती गारू आईच्या मंदिरात अणि दुसरी म्हणजे बहिरीच्या लेणीत. तुडुंब भरलेल्या दोन टाक्यात वरच्या बाजूने थोडे थोडे पाणी झिरपत होते. अतिशय थंड आणि गोड चविचे हे पाणी काही तरी भाग्य गाठीशी असल्याशिवाय मिळू शकणार नाही. दिवसभराची पायपीट, थरारक कड्यांचे मार्ग आणि सरते शेवटी हवेत लटकत केलेली पंचवीस तीस फुटांची चढाई बहिरीच्या दर्शनाने आणि त्याच्या त्या अविट गोडीच्या थंड पाण्याने सार्थ ठरवली. आमचे नशिब बलवत्तर की, कळकराय खिंडीतून अवघ्या ४५ मिनीटात आम्ही बहिरीच्या गुहेत पोहोचलो. जितकी आव्हानात्कम चढाई त्याहून कठिण उतराई ठरणार होती. सुदैवाने फार कोंडी न माजता ती सुरळीत पार पडली. कळकराय खिंडीत पोहोचायला तीन वाजले.

कुंडेश्वराकडे जाणार्‍या वाटेने आमची उतराई सुरू झाली. खालच्या टप्प्यावर जंगलातला नाका लागला. इथे चार दिशेला चार वाटा फुटतात. एक जांभिवलीकडून येणारी, एक कळकरायकडून तर एक सांडशीकडून. चौथी कुसरूच्या दिशेची वाट ढाक किल्ल्याकडे नेते. अर्ध्या तासाच्या उतराईतच मला पुन्हा दमट हवामानाचा त्रास जाणवू लागला. शरीरातले पाण्याचे संतुलन बिघडच चालले, तसा थकवा वाढत गेला. अधून मधून थोडे थांबून, दीर्घ श्वसन केल्याने थोड्या वेळेसाठी थकवा नाहीसा होत होता. निम्मा घाट उतरल्यानंतर सुर्य मावळण्याच्या आत सांडशीला पोहोचू असा विश्वस मनात निर्माण झाला. जसजसे खाली उतरत होतो, तसतसा दमटपणा वाढत होता. मला दहा पंधरा मिनीटे झाडाखाली डोळे मिटून पडण्याची अनिवार इच्छा होत होती. डॉ. अभिजीतने प्रहार चित्रपटातल्या मेजर चौहान प्रमाणे, अंधार दाटण्याच्या आत सांडशी, असा मुलमंत्र प्रत्येक वेळी आळवला आणि मी डोळे मिटून पंधरा वीस मिनीटे विश्रांती घेण्याचा विचार झटकत गेलो.
खालच्या टप्प्यावर ताज्या ओहळीच्या पाण्याने थोडी तरतरी आणली. परंतू जितके खाली जाऊ, तितका दमटपणा जास्त वाढत होता. काल प्रमाणे आजही पाणी पिणे आणि लघवी न होणे हा शरीरातले पाणी असंतुलानाचा प्रकार घडला होता. अखेर खालच्या सपाटीवर आलो, परंतू आमचे वाहन येऊन थांबलेले सांडशी अजून अर्ध्या तासाच्या अंतरावर तरी होते.

कुंडेश्वर नाका: येथे भेटतात लोभी भटके...

धन्य पावलो कळकराया...बहिरीचे छान दर्शन घडवलेस!

भला थोरला ढाक किल्ला: ठाकुरवाडीवरून दिसणारी बहिरीच्या लेणीकडची बाजू...

वेळेत पोहोचलो ना: हे सांडशी...हा सूर्य अस्ताला...

दुपारी ५-३२ वाजता ठाकुरवाडी जवळ पोहोचल्याबरोबर सूर्य अस्ताला जाताना दिसला. उजव्या बाजुला त्याच्या कोवळ्या किरणांनी ढागचा भला थोरला पश्चिमकडा उजळला होता तर पश्चिमा अनेक रंगांनी प्रकाशाच्या विविध छटा फेकत होती. प्रकाश जसजसा अंधूक होत होता, तसतसे वातावरणातले लाल, निळे, पिवळे, जांभळे, नारंगी रंग गडद होत होते. निळ्या आसमंतावर पांढर्‍या ढगांच्या पुंजक्यांमुळे एका वेगळ्या नजार्‍याने दमदार भटकंतीची सांगता झाली. गावाबाहेर खास अंघोळी साठी वापरल्या जाणार्‍या हापशावर अंघोळी केल्याने जो शीण निघाला ते समाधान काही औरच.
२२ तासाच्या भटकंतीत
दोन किल्ले दोन घाटवाटा
शरिराने पाहिला प्रचंड घामटा

अजोड भटकंतीची सोय हो
आजच्या नेत्याची जय हो
मला सांभाळणार्‍या
उपनेत्याची जय हो
माझ्यासाठी वेळोवेळी
पेयपान देणार्‍या
सवंगड्यांची जय हो
ढाक बहिरीची जय हो!


संदर्भ:
सांगाती सह्याद्रीचा, संपादक ऋषीकेश यादव
डोंगरयात्रा, आनंद पाळंदे
ट्रेक द सह्याद्रीज, हरीष कपाडिया
लेणी, राऊळ-मंदिरांची रानभूल, साईप्रकाश बेलसरे, साप्ताहिक लोकप्रभा
भटकंती घाटवाटांची, डॉ. प्रिती पटेल
discoversahyadri 

चलतचित्रफित:
Dhak Bahiri - The Most Dangerous Trek Ever Done In My Life !