नवरा नवरी डोंगरावर इतिहासाच्या पाऊलखुणा
तिथे सासरा आहे. नवरा, नवरी, कलवरी तर आहेच, बामणही आहे. आणि मध्येच डोके वर काढून बसलेला बिडा म्हणजे व्याही देखिल आहे. ही सगळी नावे डोंगरांना दिलेली. जणू इतिहास काळात एखादी वरातच डोंगर रूपाने प्रस्थापीत झालेली. तु्म्हाला ह्या पुरातन लग्नाचे वर्हाडी व्हायला आवडेल का?
नाशिक जिल्ह्याच्या दक्षिणी भागात इगतपूरी-घोटी परिसराच्या डोंगररांगेत नवरा नवरी नावाने परिचित असलेल्या ऐतिहासिक स्थानाचा शोध लागून उणीपूरी नऊ वर्षे लोटलीत. हा किल्लाच आहे, यावर नुकतेच एका प्रसिद्ध दुग अभ्यासकाने शिक्का मोर्तब केले. या निमीत्ताने संशोधनाचे एक दालन खुले झाले आहे. नवरा नवरीच्या डोंगरावर गेल्यानंतर आपले उर, आपण अशा पूर्वजांच्या वंशातले आहोत, या विचाराने भरून येते. विशाल अशा डोंगरांना ही नावे कोणी दिली? कुठून झाला असेल या आख्यायिकेचा जन्म? कोणत्या राजवटीत येथे राजकीय हालचाली झाल्या असतील? कुठल्या राजाच्या किंवा सरदाराच्या आदेशाने कातळकडा फोडून भव्य अशी गडवाट तयार झाली असेल? अतिउच्च स्थानावर कातळाचे पोट फोडून त्याच पाणी साठविण्याचे कोणते तंत्र त्या काळी असेल? या डोंगर परिसरात कोणत्या प्रकारच्या राजकीय हालचाली झाल्या. पैकी महत्वाच्या कोणत्या? युद्धाशी संबंधित कोणत्या? राजकीय व्यस्थापन कसे होते? आज सुन्या, वैराण डोंगरावर कोणे एकेकाळी कोण वैभव नांदत असेल? कोणकोणत्या राजवटींची येथे सत्ता होती?
तुम्ही वर्हाडी बनून येथे या आणि त्या पुरातन लग्न सोहळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. जमल्यास वेगवेगळ्या राजकीय कालखंडात या ठिकाणच्या घडामोडींचा वेध घ्या. इतिहासाची पाने शोधा. वस्तूसंग्रहालये, जुनी कागदपत्रे खंगाळा, गडवाटा चौफेर पालथ्या घालून दडलेला काही इतिहास मिळतो का याचा शोध घ्या! अशानेच या पुराण प्रसिद्ध महाराष्ट्र भूमीचा गौरवशाली भूतकाळ कळू शकेल.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वाडीवर्हे येथून १३ किलो मिटर अंतरावर चहुबाजूंनी डोंगराच्या कुशीत वसलेले कुशेगाव आहे. या कुशेगावच्या तीन वाड्या आहेत. पैकी, 'नवरा नवरीच्या डोंगरावर जायचे आहे', असे विचारून शेवटची वाडी गाठावी. तिथून अगदी आरामात चालले तरी तासाभरात आपण नवरा नवरी डोंगराच्या कातळात खोदलेल्या जुन्या पायरी मार्गावर येऊन पोहोचतो. मळलेल्या वाटेने आपल्याला अगोदर डोंगराची खाच लागते. ही खाच दुरवरून आपल्याला धोडपच्या प्रसिद्ध डाईक रचनेतल्या खाचे सारखी भासते, तिथून पाचच मिनीटात हा मुख्य प्रवेश मार्ग लागतो. त्यामुळे अगोदर नवरा नवरीचा डोंगर बघून यायचे. परतीच्या वाटेवर उतरताना या खाचेला भेट द्यायची. त्याशिवाय ही डोंगरयात्रा पूर्ण होणार नाही.
अर्थात तुम्ही सुई दोर्या सारखे जाऊ शकतात. कुशेगावातून अगोदर नवरा नवरीचा डोंगर बघायचा. त्या अगोदर वर सांगितल्या प्रमाणे खाच लागती तिला भेट द्यायची. पहिन्याच्या बाजूने उतरून नवरा नवरीच्या सुळक्याच्या पायथ्याने पुन्हा कुशेगाव गाठायचे. भटकंती मोठी करायची असेल तर मग शेवगे डांगवरून अधेली, आठवा असे करून सासर्या व त्याच्या तळाने जुन्या घाट वाटेने बिड्याला वळसा घालून तुम्ही नवरा नवरीच्या डोंगरावर येऊ शकतात.
२०११ सालच्या नोव्हेंबर महिन्यात इतिहासाचे अभ्यासक तथा नाशिकचे प्रसिद्ध दुर्ग संशोधक गिरीश टकले यांनी या ठिकाणी भेट देऊन, हा किल्ला असू शकतो, असा कयास मांडला होता. त्याच्या काही महिने अगोदर गिरीश टकले व अविनाश जोशी या नाशिकच्या वैनतेय गिर्यारेाहण संस्थेच्या संस्थापक सदस्यांना इगतपूरी परिसरात अनगड भटकंतीचा शोध घेताना नवरा नवरी नावाच्या डोगराचा सुगाव लागला होता. अंजनेरी किल्ल्याच्या उत्तर दिशेला असलेले नवरा, नवरी व तिची कलवरी या नावाचे सुळके प्रसिद्द आहे. अंजनेरीच्या बरोबर दक्षिण बाजुला पहिन्याच्या जवळ असेत तीन सुळके आहेत. त्यांची नावे सुद्धा नवरा, नवरी, कलवरी आहेत. परंतू हे अंजनेरीचा भाग नाहीत. शिवाय सुळके जरी असले तरी संपुर्ण डोंगराला स्थानिक मंडळी नवरा नवरीचा डोंगर म्हणून संबोधतात. पंचक्रोशीत सर्वत्र हा डोंगर या नावाने ओळखला जातो.
नवरा नवरीच्या डोंगराचे सर्वात माठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा मुख्य प्रवेश मार्ग. एखाद्या पसरट सुळक्या प्रमाणे बाहेर आलेल्या कातळातून ही वाट फोडून प्रवेश मार्ग बनविण्यात आला आहे. गिरीश टकले यांनी यापूर्वी नाशिक परिसरात ११ अपरिचीत दुर्ग शोधले आहेत. त्यांच्या शोधक नजरेतून हा भला थोरला कातळ फोडून मार्ग तयार केल्याचे हेरले. सहा वर्षांपूर्वी आम्ही दुर्ग भटक्यांचा एक लहान गट घेऊन या मार्गाने डोंगरावर गेलो होतो. धुव्वाधार पावसात आसपासचे काहीच दिसत नव्हते. जाताने आम्ही वेगळ्याच घळीतून डोंगरावर गेलो होतो तर उतरताना या मार्गावर प्रचंड चिखलामुळे सावधपणे उतरावे लागले होते. डोंगरावर गडाचे गडपण त्यावेळी बघता येऊ शकले नव्हते. तद्वताच आसपासचे डोंगर अत्यंत कमी दृष्यमानतेमुळे दिसू शकले नव्हते.
गिरीष टकले यांनी लिहीलेल्या, सूरतेची लूट की स्वराज्याची भरपाई? ह्या पुण्यातील महाराष्ट्र देशा फाऊन्डेशनने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमीत्तेने प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक
भगवान चिले नाशिकला आले होते. 'यापूर्वी नवरा नवरीच्या डोंगराला भेट दिली, पण तो किल्ला असावा असे वाटत नाही, म्हणून पुन्हा एक भेट द्यावी', असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi9FStCucj7ybYxnN_MfrG40Ba2pFpMFsRxzkMcUKS26f_i2QyqaBi8KQNh2NkmaN4brK8I2H8g6QbnaQnFL4GBVkhuQnzF9s8lANaxi19WutL0DABjb9yEYr0RLZo6DGE6O6jURrMD77_l/s640/20200120_112215.jpg) |
ज्या नावाचे सुळके त्याच नावाचा डोंगर अशी नवरा नवरीची वेगळ्या प्रकारची ओळख आहे. |
२० जानेवारी २०२०
दुर्गभटकंती आणि त्यावर वर्तमानपत्रातून लिखाण करणारा इतिहास अभ्यासक सुदर्शन कुलथे याने नवरा नवरी डोंगराच्या शोध यात्रेवर महारष्ट्र टाईम्समध्ये लेख लिहीला होता. हा डोंगर त्याने दोनदा बघितल्याने त्यानेच आजच्या भटकंतीची कमान सांभाळली. महाराष्ट्रात दुर्गअभ्यास संशोधन, संवर्धन तसेच पुस्तक चळवळ राबविणारा पुण्याचा बोंबल्या फकिर, भारतीय रेल्वेचा अभ्यासक तथा सह्याद्री व हिमालयात वेगवेगळ्या वाटांवर गेल्या पंचवीस वर्षांपासून अखंड भटकंती करणारा नाशिककर राहूल सोनवणे अशा पाच जणांच्या चमुने साडे अकरा वाजेच्या सुमारात कुशेगावात धडक दिली. भगवान चिले हे महाराष्ट्रातले एक दर्दी दुर्गभटके असून त्यांनी चारशेच्या वर किल्ल्यांना अभ्यासाच्या चष्म्यातून बघितले आहे. भटकंतीच्या छंदातून त्यांची आजवर दहा पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. या विषयावर दुर्ग भेटी व व्याख्याने असा त्यांचा व्यासंग आहे. त्यांच्यासाठीच या भटकंतीचे खास आयोजन करण्यात आले होते.
काही परिचित तर काही अपरिचीत डोंगर ओळखत अगदी निवांत पणे आम्ही डोंगर खाचेजवळ येऊन पोहोचलो. कुशेगाव ही आदिवासी बहूल वस्ती. गावचे अर्थकारण पूर्णत: शेतीवर अवलंबून. पक्क्या रस्त्यांचे जाळे, दळणवळणाची वेगवान साधने यामुळे तरूण वर्ग मोठ्या प्रमाणावर गावापासून दूर जाऊन नोकरी धंद्याला लागलाय. त्यामुळे घरातली काही मंडळी शेती सांभाळते तर काही जण नोकरी, व्यवसाय व मजूरी करून उदर्निवाह करतात. महिला मंडळाची तिनस्तरावर कसरत सुरू असते. पाणी शेंदणं, चुल आणि मल सांभाळणे आणि उरलेल्या वेळात शेतात काम करणे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दिसणारे सावत्रिक चित्र येथेही तसेच उमटले आहे.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiEq-tn-KoSYbYxjqoAyfsIR35khcmY1Oakb3rWtKpIngvEXVon89cKqAZtNFrIMYLuLIgPbKzlJrIixeD9JhPMN6j3132mqWoeEjSeXssJ9Fd2s1O1un4MomMJ2n4TR1RdfOcsTE8_3WWI/s640/20200120_112140.jpg) |
- डाविकडून सासरा, बिडा आणि सगळ्यात उजव्या बाजुला नवरा नवरीचा डोंगर. |
गावचे बुजूर्ग बोरू सराई हे आमच्या सोबत वाट दाखवायला होते. त्यांचे शालेय शिक्षण झालेले नाही, पण परिसरातील हरेक गोष्टींची त्यांना छान माहिती. आपण अनूभवलेले आणि पुर्वजांकडून ऐकत आलेल्या एकएक गोष्टी ते सांगत होते तशी आमची भटकंती बहरत होती. एक सुशिल आणि ज्ञानसंपन्न वाटाड्या लाभणे म्हणजे भाग्यच. अगदी निर्मळ मनाने ते कुठल्याही प्रश्नावर आपली माहिती सादर करायचे. समारच्या सुळक्यांकडे निर्देश करत त्यांनी माहिती दिली, 'ते समोर दिसतात ते नवरा व नवरी बाजुला त्यांची कलवरी आणि डोके आणि ढेरीचा भाग म्हणजे त्यांना बामण म्हणतात'. बाबा ही राब जाळण्यासाठी आत्ताच का अंथरून ठेवली, अजून तर पावसाला उशिर आहे ना? त्यावर बाबांना काय बोलावे कळेने, 'ही तिरींबकच्या बामनाची जमिन, गावसे लोक कसत्यात. वय बरेच असले तरी बाबांचा चालण्याचा वेग आणि एकुणच शरीराची क्षमता आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त असावी असे जाणवत होते. तसे बघितले तर दुर्गम आदिवासी भागातली माणसे काटकच असतात. बोरू सराई वयाच्या मानाने जास्त तंदूरूस्त वाटले.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhZY9wwloz3qPIE7ktnTvANotsuAckw5PQfUE7Ov_z1qVTCq0VGU9UaC1RBH5lfDN-7ZeblGSZZ_ptD0CqAsdasvMkCfZ2Lhbvq1SoFaqi6Hx_cm5WpbdWIDNNsO0CgkwW31DH26dX6BbJM/s640/20200120_123323.jpg) |
- गप्पाष्टके किल्ल्याएवढी... |
आजचा जमावडा हा दुर्गवेड्यांचा असल्याने दुर्गभटकंतीच्या हरेक अंगाने अभ्यासू, ऐतिहासिक माहितीची देवाण घेवाण घेतच वाट सुरू होती. गप्पांच्या ओघात डोंगरखाचेच्या जवळ केव्हा येऊन पोहोचलो कळलेच नाही. मुख्य प्रवेशमार्गाजवळ येताच भगवान चिले यांनी स्पष्टच केले, डोंगरकड्यातले हे छिद्र नैसगिक नाही. ते कोरून काढलेले. दगड तासून ही वाट बनवलेली. हा किल्लाच आहे याची पावती देणारी ही वाट आहे. भविष्यात आणखी थोडे संशोधन करण्याच्या दृष्टीने त्यांनी काही सूचना केल्या. जुन्या मार्गाचे राकट सौंदर्य सर्वजण हरखून गेल्यागत बघत होते. महाराष्ट्रात कातळ कोरून भव्य आकरारातली मंदिरे, लेण्या, प्रवेशद्वार, दिपमाळा आदी बांधकामे कमी नाहीत. नवरा नवरीच्या डोंगराचा प्रवेश मार्ग त्या लौकिकाला साजेसा. या डोंगरावरून मोठ्या लष्करी हालचाली नसाव्यात त्यामुळे साधारण वाटावी आशीच ही मुख्य वाट तयार करण्यात आली आहे. पण त्याला एक छानसा अमूर्त आकार देण्यात आला आहे. अमुर्त शैलीतले चित्र माणसाला कदाचित लवकर कळणार नाही, पण या वाटेची अमुर्त घडण खाशी आकर्षक आहे.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3530srPdPd04cqEIn4psqD9bHI2GJ14aQTzZkMp1QEwTAF7cm7PIeIvGz69XjNxLRxNk0i-KvUT1tLLOkKOLHRgRhJhsMccrGGkicx_O_MgqNkB13SpAbw-bGerGBx_mh-pPbQEVtNXdR/s640/20200120_130625.jpg) |
- सुळक्या सारखा बाहेर आलेला कातळकडा फोडून बनविण्यात आलेला नवरा नवरी किल्ल्याचा वैशिष्ट्यपूर्ण प्रवेश मार्ग |
इतका भव्य कातळ फोडणे सोपे काम नाही. ते फोडताना बाहेरच्या बाजूने बाह्य आक्रमण रोखण्यासाठी पुरेशा उंचीचा आडोसा आहे. युद्धजन्य स्थितीत या बाजूने आक्रमण करणे सोपी गोष्ट असू शकत नाही. उजव्या हाताला वाटेच्या मधोमध डोंगरदेव स्थापित आहे. मुर्तीच्या रूपात एका दगडी कोनाड्यात दगडाचाच देव पुजतात. वाटेच्या मधोमध एक भलीमोठी शिळावरच्या बाजूने येऊन खाचेत अडकून राहीली आहे. मागे केव्हा तरी कडा तुटून ती कोसळून आली असावी. त्याने या प्रवेश मार्गाच्या राकट सौंदर्यात मात्र भर टाकली आहे. वरच्या बाजूने सतत दगड, माती कोसळल्यामुळे त्याखाली मुळ पायरी मार्ग दबल्या सारखा वाटतो. या मार्गवरून डावीकडून वर आल्याबरोबर एकलहान आकारातला तलाव लागतो. हा तलाव आकृतीबद्ध नसला तरी पाणी साठवण्याकरिता तो व्यवस्थितपणे घडविल्याचे जाणवते. दक्षिणोत्तर दिशेला वैतरणा जलाशय आणि त्याच्या काठावर मोठे पठार असलेला सोळावा नावाचा डोंगर दिसतो. त्याच्यापलिकडे पहिने परिसरातले प्रसिद्द झारवड गाव आणि त्याच्या निकट मोठ्या उंचीचा ढोर्या डोंगर लक्ष वेधून घेतो. आपल्या नजरा प्रसिद्ध थळ घाटाचा रक्षक त्रिंगलवाडी किल्ला शोधण्याकडे लागतात, पण तो घाटाच्या अगदी सुरूवातीला असून इथून तो दिसत नाही.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjwQj-DGexiG4BAYTuEo77Q9zvHXnXQMm74ixCjUtzYMyltBsh6jNAd92s3KYo3c_EPU_M7WcQklIBFDoxzuAVkeAXoHPwvOLMRQLChaJB5_NqwU7QulxVyLWQmswr48lVWpOrWFhlbnvbp/s640/20200120_132815.jpg) |
सोळावा डोंगर उर्ध्व वैतरणा जलाशयाच्या पार्श्वभूमिवर |
इथून पुढे वाट उत्तर दिशेकडे जाते. नैसर्गिक दगडांचे काही जोती सदृष्य ढिग दृष्टीस पडतात. संपुर्ण पठार पिवळ्या पडेल्या गवताने आच्छादलेले. काही ठिकाणी लूसलूशीत मऊशार गवताचे पट्टे त्यावर मुक्त लोळण घेण्याचे अमिष सतत दाखवतात. यंदा भरपूर पाऊस झाल्यामुळे गावातच पुरेसा चारा उपलब्ध असल्याने कदाचित डोंगरमाथ्यावर चराई सुरू झाली नसावी. पन्नास वर्षांहून मोठी झाडे मात्र या संपुर्ण परिसरात अभावाने आढळतात.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjDy2gnJOwBJ0ApfZ0c514iVrqSthlMTYCQ69aknACM-20EEPKRqYdUYMcKzxl4Wb5oWjTVTKoODhfGfL4mirnKfOAbtvLBL_KbC39UOr10RoRJynWkhevY2Pg2uqAGuzAd5Fesp22IOWTn/s640/20200120_134921.jpg) |
पहिने घळीतून दिसणारी विनायक खिंड, कार्वी, तळई, सीता गुंफा, कोधळा, मोधळा व त्यांचे रविवार१ व रविवार २ हे सुळके |
आता आम्ही उत्तर टोकाकडे आलो. इथली घळ अंजनेरीच्या तळवाडे घळीसारख्या आकाराची. त्यातुन अगदी समोर दिसते ती ब्रम्हगिरीची पूर्व बाजू. पंचलिंगापैकी एक शिखर आणि त्याला लागूनच इंडीमिंडीची खिंड. य खिंडीच्या उजव्या हाताला ब्रम्हगिरीच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेचे प्रतिक असलेले कारवी, तळई, सितागुंफा, कोधळा, मोधळा ही शिखरे आणि त्यांचे रविवार१, रविवार२ या गिर्यारोहकांनी आधुनिक नावांनी बारसे केलेले सुळके दिसतात. ह्या खळीतून तसेच दक्षिण बाजूच्या घळीतून येण्याच्या वाटा आहेत. पण त्या सोप्या नाहीत. उजव्या बाजूच्या कड्यात एक छानशी गुहा लक्ष वेधून घेते. सुदर्शन आणि राहूल यांनी हा सोपा कातळ टप्पा सरसर चढत वाट दाखवली. वर चढून बघितल्यावर आश्चर्य आणि आनंदाला पारावार राहत नाही. दुरून नैसर्गिक वाटणारी ही गुहा खोदून काढलेली आहे. हे एक गुहा टाके आहे. खोदकामावर त्या कामाच्या कालखंडाचा अंदाज येत नाही. पाण्यावर किंचीत हिरवा तवंग होता. तो बाजुला केल्यानंतर पिण्याचे स्वच्छ पाणी मिळाले. चव उत्तम आणि ते थंडगार लागले.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjqKdZkwuSlD_u-Hq7nCnTtNP1hcyX2l1V08ClZXRtmmVEyhOjO3WQeQk_DQ9eU0GaL93Pk0aw1ELvTwewAL7t55rRrE2AgbTDrYE-_wG6MyCcKtA2CrsMPeXPejXb71Z3L6-98HKaK4C_t/s640/t+p+s+sonawane+quote.jpg)
आज विचार केला तर कातळ अशा प्रकारे छन्नी, हाथोडीने फोडण्याचे कसब चकित करते. त्याहून आश्चर्य म्हणजे पावसाचे पाणी यात कशा प्रकारे साठत असेल. त्या काळचे ते अजोड तंत्र होते, जे आज जवळपास हरवले आहे. आज घडीला अशा प्रकारे टाके खोदण्याचे औचित्य नसले तरी पाणी ही आजच्या जगाची मोठी समस्या आहे. अशा प्रकारे नैसर्गिकरित्या पाणी साठविणे आणि त्याचा वर्षभर दैनंदिन उपयोगासाठी वापर करणे ही आजच्या काळाची अत्याधिक निकड बनली आहे. त्यावर मात्र काम होताना दिसत नाही. आज बांधली जातात ती धरणे, लघू-मध्यम वा मोठे साठवण प्रकल्प खुल्या जमिनींच्या खोलगट भागाचा वापर करून. त्यावर अवाढव्य पैसा खर्च केला जातो. त्याने तहान मात्र सर्व प्रदेशाची भागत नाही. कातळ फोडण्याचे काम इतिहास काळात सुद्धा माठे खर्चिक असेल यात शंका नाही. पण त्याने वर्षभर पुरेल इतके पिण्याचे व वापरण्याचे पाणी उपलब्ध होत असे. महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचे हे वैशिष्ट्य सर्वच जुन्या कातळकोरीव कामातून डोकावते. डोंगरावर जितक्या माणसांना पाण्याची गरज, तितकी तजविज हे त्या काळचे गणित. आणि डोंगर पायथ्याला, नद्या, ओढ्यांच्या काठाला विहीरीतून लोकवस्त्या व नगरांकरिता पुरेसे पारी उपलब्ध व्हायचे. त्यामागे अर्थात भरपूर वनसंपदा, निसर्गातील सर्व जिवांचा वावर व त्यातून जमिनीत पुरेशा प्रमाणावर पाणी मुरायचे. आता माणसाने आपल्या हाताने हे चक्र उलटे फिरवल आहे. जंगल मोठ्या प्रमाणावर नाहीशे केले. निसर्गातले कित्येक जिव हद्दपार केले. वाघ, सिंह, हत्ती सारख्या मोठ्या प्राण्यांची संख्या माणसाच्या बेफाम विकासचक्राने अक्षरश: घटवून टाकलेली. सर्वत्र जंगले कापून त्यावर शेती, रस्त्यांचे जाळे. शेती व दैनंदिन व्यवहारच असा की जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी घटलेले. एकीकडे हे प्रमाण घटत असताना पाण्याचा उपसा बेसुमार. त्यामुळे भुजल पातळी खालावून शेतीवर जलसंकटाचे सतत सावट. अनेक प्राणी, पक्षी, किटक, माशांची संख्या केवळ माणसाच्या विकासवादळाने घटवली तर दुसरीकडे शेतीपिकावरचे रोग व किडीचे प्रमाण मात्र कैक पटीने वाढलेले. पाणी आणि निसर्गाचे चक्राची उजळणी नवरा नवरीच्या त्या एका गुहा टाक्याने डोक्यात केली तोवर सुदर्शन व राहूलने सोबत आणलेल्या गॅस स्टोव्हवर छानचा चहा बनवला. थोडी फळे, चहा आणि अन्य प्रकारची खादाडी करून गप्पांच्या आवर्तनाने एव्हाना परिसराचा भुगोल आणि दुर्गबांधणी या विषयाकडे वळण घेतले. अर्ध्या तासाचा थांबा हलवून आम्ही आता गुहेच्या वरच्या टप्प्यावर दाखल झालो. एक विस्तीर्ण पठार पाहून मन चक्रावून गेले. पहिने खिंडी पर्यंत दोन टप्प्यात पसरलेला हा तीन किलो मिटर लांबीचा व अर्धा ते पाऊण किलो मिटर विस्ताराचा पसारा असावा. चहू बाजूंनी ताशीव कडे असलेल्या या डोंगरावर येण्याजाण्याच्या अनेक वाटा असल्या तरी त्या संरक्षित करून एक टोलेजंग किल्ला सहज बांधला जाऊ शकत होता. तो का बांधला गेला नसावा याचा अंदाज उत्तर-पश्चिम कड्यावर आल्यानंतर येतो. त्याकरिता इतिहासात थोडे डोकावून बघूया. अपरांत आणि दक्षिणपथ अर्थात कोकण आणि दख्खन यांना सह्य करणार्या सह्याद्रीचा घाटाच्या वरचा हा भाग. कोकणात शूर्पारक बंदरावरचा प्राचीन घाटमार्ग म्हणजे थळचा घाट. या घाटाच्या संरक्षणासाठी बांधलाय तो त्रिंगलवाडीचा किल्ला. समुद्र मर्गाने चालणारा व्यापार या या घाटातून होत असे. थट घाटातून वर येणारा व्यापारी मार्ग पुढे पांडवलेणीवरून नाशिकमार्गे उत्तर मध्य भारतापर्यंत पसरलेला होता.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiM_qxg18IZatSE6BDrlggbr_QnModJ4wK3g7f5OKk-0Vq78qnv5zgjxWbaAUoWD6BAhIxJ1HXK63_Of3Wl44j3_wRbIy9k6nPoP65OWvpurCcywPhTYZAZ2G0W0o8dqqrjhxptDMGygxws/s640/20200120_134653.jpg) |
हे गुहा टाके म्हणजे जलव्यवस्थापनाचा अचंबित करणारा नमुना. |
आजचा मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग ब्रिटीशांनी बांधलाय. त्याकरिता कसार्याच्या डोंगरातून त्यांना तिव्र उताराचा व चढाचा मार्ग तयार करावा लागला. त्या सोबतच त्यांनी अनेक बोगदे खोदून त्यातून रेल्वे मार्ग नेलाय. मुंबईला उत्तर भारताशी जोडणारा पश्चिम रेल्वेचा हा मार्ग. हा महामार्ग आणि रेल्वे मार्ग तयार झाला आणि त्रिंगलवाडीचे व्यापारी महत्व नामशेष झाले. तो नव्हता तेव्हा त्रिंगलवाडी हे या व्यापार मार्गावरचे पहिले मुख्य ठाणे होते. जुन्या काळात त्रिंगलवाडीवरून वाटा दोन दिशांना फुटायच्या. त्यातली एक वाट पांडवलेणी व दुधाळा डोंगराच्या खिंडीतून नाशिक मार्गे जात होती तर दुसरी पहिने बारीतून. या पहिने बारीच्या पूर्व अंगाला अंजनेरी तर पश्चिम अंगाला ब्रम्हगिरी असे दोन टोलेजंग किल्ले. यातील अंजनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व पुरेशा प्रमाणावर प्रकाशात आलेला नाही. त्र्यंबकचा किल्ला मात्र नासिक प्रांताचा बराच काळ केंद्रबिंदू होता. विशेष करून मुसलमानी कालखंडात व मराठा कालखंडात त्र्यंबकगडावरून परिसराची राजकीय कमान सांभाळली जात होती याचे इतिहासात सबळ दाखले मिळतात.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjvFrWeNn2oe_qm0OkI69_ButsBGmeLzlQYk_8rpHr-UYRTni_Qf1tApJVylfmxhS3LQK-z96jICdItx8K1Ojtv_G40G5Rcb4zIKU9G5h23dv7UdQoYqZdQ39M-JrYRMZmGYYfwSauSkLz2/s640/20200120_142715.jpg) |
पुरातन बांधकामाच्या खुणा |
आता नासिक बारीकडे वळूया. पांडवलेणी-दुधाळ्या खिंडीच्या पश्चिम अंगाला अंजनेरी साधारणपणे वीस किलो मिटर अंतरावर आहे. या अंजनेरीला पहिने, नवरा नवरी पासून थेट आठव्या डोंगरा पर्यत सलग अशी धार आहे. या सलग धारेवर ये-जा करण्यासाठी सगळ्यात सोपा डोंगर म्हणजे नवरा नवरीचा डोंगर. त्यामुळे त्याचा वापर हा संपुर्ण परिसरावर देखरेख करण्यासाठी केला जात असावा. मोठ्या शिबंदीचे प्रयोजन नसल्याने म्हणून त्यावर शक्य असूनही मोठा किल्ला बांधण्यात आला नसावा. अंजनेरीची रक्षक चौकी आणि परिसरावर देखरेख याकरिता लहान शिबंदीची आवश्यकता असावी. त्यादृष्टीने त्यावरून माफक हालचाली होत असाव्या. युद्धजन्य परिस्थितीत पायथ्याला मोठी शिबंदी ठेवण्याची व्यवस्था देखील गेली जाऊ शकते, पण इतिहासात याच्या पायथ्यचा वापर तशा प्रकारे केल्याचे उल्लेक वाचनात आलेले नाहीत. त्र्यंबक किल्ल्याचे संरक्षण, व्यापारी मार्गावर देखरेख या दृष्टीने नवरा नवरीचा किल्ला महत्वाचा ठरतो. याच्या माथ्यावरून अगदी सहजपणे चौफेर देखरेख ठेवता येते. कोकणचढून वर आल्यानंतर त्र्यंबकगड हा महत्वाचा किल्ला. त्याच्याकडे येण्याची प्रमूख वाट ही दक्षिण बाजूला. त्यामुळे हत्ती दरवाजा या नावाने ओळखला जाणारा त्र्यंबकगडाचा महादरवाजा हा देखिल दक्षिण बाजुला केल्याचे आपल्याला बघायला मिळते.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzkLszhUnEWoTJ70il7cZDzGJB3kSCmB8NNmfqTrkDA9Yn4F7SpUbYf0oDJS8lvyBrOQzicxCKxju6aKVIy_ZAX1ggh0mBEZo2oIvtmawhsjXdNlj-Yj8GdZ_D1TXjGRm5elraNItLpxf9/s640/20200120_142756.jpg) |
पुरातन बांधकामाच्या खुणा |
साडेचार तासांची भटकंती आटोपून आम्ही परतीच्या वटेला लागलो. माथ्याच्या पठारावर दक्षिण टोकाला जुन्या वाड्याचे भले मोठे जोते आढळले. इथून पाण्याचे गुहा टाके बरेच जवळ आहे. शिवाय वरच्या बाजुला काही सुकलेली टाके दिसले. ते कातळात व्यवस्थितपणे कोरून काढलेले नसली तरी पाणी साठविण्यासाठी घडवल्या सारखे दिसतात. परतीच्या वाटेवर आमचा मोर्चा डोंगरखाचेकडे वळला. याखाचेची दक्षिण बाजू म्हणजे बिड्याचा डोंगर. या बिड्यावर जाता येत नाही, अशी माहिती बोरू सराई यांनी दिली. याला लागून असलेला डाव्या बाजूचा डोंगर हा सोनशिळा म्हणून ओळखला जातो अशी नविन माहिती त्याच्या बोलण्यातून समोर आली. यावर सोने असल्याच्या आख्यायिका प्रसिद्ध असून मागे सैन्यदलाकडून त्यावर शोध घेण्याचा प्रयत्न झाल्याचे सराई यांनी सांगितले. तो प्रकार त्यांनी स्वत: बघितला की, त्यांनी ऐकला होता याचा मात्र त्याच्या बोलण्यातून उलगडा होऊ शकला नाही. सराई यांनी आणखी एक माहिती बोलण्याच्या ओघात दिली, ती म्हणजे, येथे गवळी राजा होता. आपल्याला माहित आहे की, या परिसरात अभिर राजा वीरसेन याची काही काळ सत्ता होती. असे म्हणतात की, वीरसेनने काही काळ अंजनेरीवरून राज्य केले. उत्तरेत या अभिरांची सत्ता महाभारत काळापासून असल्याचे उल्लेख आढळतात.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhha4AtdIjt7xywWEQs9OU98IhD9qelUrrTdsDn9a1NVv1sVE4s-Kybq51XmMGn9xglph9iP1E6h5jTQFPhjxdtJeXx79JnNAixx7rykQZ8rB-YNpZXn9xuXFkW2Wzh9FRbv4UcoAnBPk5k/s640/b+chile+quote.jpg)
बिड्याच्या उजव्या बाजुचा डांगर हा सासर्या म्हणून ओळखला जातो. काही ठिकाणी त्याचा सासेर म्हणून उल्लेख असून सासर्यावर जाऊन आल्याची माहिती गिरीश टकले यांच्याशी केलेल्या चर्चेतून मिळाली.
आता आम्ही पायथ्याच्या दिशेने येऊन पोहोचलो. पुन्हा एकदा बोरूसराईनी सांगितले. ह्या डोगरावरून शेवगे डांगकडे जाणारी जुनी वाट आहे. एक वाट पहिन्याकडे तर खाचेतून पलिकडे झारवडकडे जाते येते. गड सांगोपांग बघून झाला होता. नवरा नवरी नावाची उत्पत्ती कशातून झाली असावी या प्रश्नाचा उलगडा झाला नव्हता. बोरू सराईंना याची हकिकत माहित नव्हती. भगवान चिले यांनी नवरा नवरी नावाचा संबंध विशद करताना सांगितले, पुर्वीच्या काळी नवरी पळविणे म्हणजे सर्वात मोठी मानहानी समजली जायची. काही घाटातून वरातींवर हल्ले करून वरातींना मारल्याचे दाखले कथा कहाण्यातून मिळतात. असा काहीसा इथला प्रकार असू शकतो. सकाळी साडे अकराच्या सुमारास सुरू झालेल्या भटकंतीचा सायंकाळी साडेपाचच्या सुमारास समारोप झाला.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhV_Ve5Y-MWaTvKpxU01c_NNTT6xhwh9HcV5aOC9RVxZqyAZXP1pgwicWn3EDEkgKzC4bEDkJxdx42-Mw9RcCJn8usWxhkJh06unHLh29V4VpvZQRkh0FJsglQGyRRhuDY75hLF5ep1zCEU/s640/20200120_105925.jpg) |
कुशेगावला लागून असलेल्या शिरसाटे गावातले विरगळ |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhTD2EcqvDIrasRfqFHFz6ys2RsE54XjkBpjACQh4AfDyw08redMiny3gt7mcpFJL7L2gQpIVeXx8hOD0Olcm87xjbM9D072Ad9uqWistDz5jD00Z2wlAbefYjH_IvSVMaPP0Fm6bqOGOn9/s640/20200120_120227.jpg) |
मध्यापर्यंत शेती केली जाते. येथे त्र्यंबकच्या ब्राम्हणांची वंशपरापरागत जमिनी असल्याचे स्थानिक सांगतात. |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh6PqiKJimYqrD0iCVwNPT58vhUuRE1YlFFGYWRMTU3DJ1yWAG1jZtJWotdUxkc0MnwnSyKf1ScM-TtfTip7EnbU0Z0baYajKixfWpbsE7QyRlky4C0A-9Wcm2FBrTFZN-LHv_USN6xre-U/s640/20200120_123634.jpg) |
डोंगरवेड्यांची शोत्रयात्रा |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgDAIkn5y-9l-JEDdzQ19pj7Rxuv0sIcq4M8On3WZ77bsdYZKcQWWVuNm2YVIGCdNKyuU7A-btzuQaOZwJYGJm_PU3PR8oOcBfK_HGaLUCeI2lj01xKTOqo1ePA7sobecvxzJvs8g4m4r3G/s640/20200120_124259.jpg) |
वाटेवर आढळलेली खाजकूयरी |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgmL7vTzfSoWQOmwW8QqgrOIXjs6V_7nyN6H8OWFxoPmwhqJ2YKrhr6FHqAgfMuyxU2N7TE8DMgdbNWB0Yw5KbPYc4rUaa3igzqIfe9N6Eomr73bHzel30iS1izwdQuvphBXYctzIzbTASO/s640/20200120_124335.jpg) |
बिडा डोंगराला सासर्या पासून विलग करणारी खाच |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjNt5zIaVCoRgkBHcaAkM6mqxKWxlihyphenhyphenE6PUCFQqgttP5lq1u2pscCwChH1tqljIr6PG5se_Wow9IeRyLkneVRcNzXOO4paKKhooWpOPlpJQEB0_eY5W88AbJ5k4iX9LR7u_D9l7iH4av99/s640/20200120_124857.jpg) |
छानशा पानपेट्या...यात बनतील बिया... |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEivlywZienKUHfVxhzFBu_ZOFq8HDzS1P8Rl39_ukkFm0BZCyNtmA-EcuQwqVcLCmRmto8xHyeOXoL_gYVRf9MW9KHBoxYJWhqtOnDuGUJqWQ7YDNQfHR1yLuW85TOXVGvMeS62_td6mv0I/s640/20200120_130832.jpg) |
'हा जाणिवपूर्वक कातळ खोदून तयार केलेली वाटच आहे' |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiTw9hZmfV9I0ZvECxxJVhoXCVsU1KUHEb8aKo5wGZYCInzqKQv4DD0wocr3l1fZ5j_ZnzsLeGdZE1bxx7V0lO6FAhJZX3XZpQR0VSPyMnf7o0ac8fmQ-obqRga8QSU_-STesS4Ks4mOaqQ/s640/20200120_132735.jpg) |
नवरा नवरी डोंगरावर या तलावात सर्वाधिक काळ पाणी राहते |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhPnPLujEFWbk4jDVTCzi3RoUmjhSadD2LmQLOdcU1mX4q1-0eJxHenkhREi_eFboSk5HryCKCztEt9Dbb6UZtLQZiQTkcyfB57ZPLIa_YFkERcl6M5eKOMDB2ppDfqtJYASL9zu0qvhs9L/s640/20200120_133256.jpg) |
तलावाच्या जवळ असलेली जोती |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjIr52WmVdujQU0Hf2p3jPYahCutyHdK5vukVyzhmX4ZHmMNrGYQE1XMoK7wbrTiGoviS0yAhS4B65zFKBhyphenhyphen2zirX_wXnOc4QqyTM2kGCKsOAsvufhso9Be03ZiymPE20h6ZIIVs59R8A3T/s640/20200120_133629.jpg) |
झिरपणे वाढल्याने हा तलाव लवकर आटला... |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiLf9lf6h5WHKLCMp8u7rsB-YSTSZD-b-ZXl1CsmBNSkQtpfX04BtqxpcNpvl6Pu0hhEW6psK_flX8Ek36bDU3M4iOQIbuHX9qRhaK53IELENSn4bW5ipWQ2PBT8uTllOITnEdfWVLtG3Ce/s640/20200120_133925.jpg) |
लहानसा सडा |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhu7gHea48nGijfbrFYrwbbfwpto4RomKygwnsc1990VxxoaAsOaMo21x9lwcLPYDMUXOYAR0ANW_mefOC2acr9Y3PWDLw30M7ueoiz3JYH8nVZ59rAGOopz4Vn04iw9-Kp1YRykTvgNcgS/s640/20200120_134527.jpg) |
कातळात खोदलेली गुहा पाहून पावले थबकली |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEixCJI-QgwrQsxdbrCx_rCj8s-umUMTZMa4yZD6uSU4ZW-HAnGeZqyvzEhbl7L02U_HX8EgYBGW0WFT35CTox6hev7Oqw_EfMVq40ZM4UT46hKsjC8YuQZloBWfrKYyZ8rAeum8gACaLUef/s640/20200120_142732.jpg) |
बोरू सराई...जून्या सर्व कथा कहाण्यांनी भरलेले अनूभव संपन्न जीवन |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgZPtWJx6Mg7HSm6yil_8GjOMOEtXNXCWKG6RMZDc-uQ29LLSDYGmQ3fMue2l_Cc6JifYSCMlUvgsUO1YZ2QW9x6rDGAO_Nn_tUKtAtvDMbw7cWh-CJKh2YVLGWKEJrM09ZHWD9uUBiRKUs/s640/20200120_142834.jpg) |
इतिहासाच्या पाउलखुणा कॅमेर्यात बंदिस्त करताना भगवान चिले |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjQnzSsSnDdVDDtKoD6C1lvq-S1eR7sLmtPNYw7GtvjqNwN7LdlQAPy8JyGmh8fgjMvtmUCTsr93ksRDUomwNO5ExhjfBFA-Rc8f3e81hMFsVWNiZLRVUiHAawZOymWXAI3IWIJmgnp2bQ4/s640/20200120_144804.jpg) |
माध्यावर तिनएक किलोमिटर पसरलेला विस्तीर्ण पठारी प्रदेश |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjIInCb1EUwAVq6zOzUT135qpcO3hRot8Ir0IS7A_EjRo9k99xGgITetGkWqJn2UztaWLAI8yfFYm1MEpCbQyPabXW23u7VVIWeeJQrzvk01elkZdgs8yfcA_qN0mazZnMNCj_YXbW2VR6Y/s640/20200120_145040.jpg) |
तत्पूरूष, ईशान, अघोर, सद्योजात, वामदेव ब्रम्हगिरीची पंचलिंग शिखरे |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj7jWGxco8u9AzhDeivOtfZuLoWXW3CGfuKeGug7uC6GuK1rh7j7bEbO0OrnS1A_CwDrYShg4FXNW3wPIdPsblw53hEBhjHvR4StIApee1LZEtjeaW2TnpRHi0MDkKReZYdWHtcRhnla0JS/s640/20200120_145652.jpg) |
सुफळ भेटीचे समाधान देणारी भटकंती... |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjzJGAVuLu9hHOYXyTNshtcEVeSbddNB4x9PYOOzsdiTEXf9ocCjj2WHzUDpVBQ_NOREjz8ErKG75j-Tw85lfv4ZKx8RsN9zQaI5CDICapTwYmQZpjskLBGmsk9a0J3bRvJcRpV4l14Jq8Q/s640/20200120_152306.jpg) |
भटकंतीतले सर्वात कडवे आव्हान या कड्यावर ठिकठीकाणी लागले आहे... |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjn4W0ltIw0G7JlBzlaMiH9JCgeLUhlIKEaSxv3mZiP2TmCkSFLmi8LwDui5oYu4_pOqa3Jbo2RXlf8JFrqtx13Gp0oTFpH9i14w_9ibzPrpJZhJ4_84DkiLE4UOSttpPRq8LHKCBJ5w9oC/s640/20200120_153337.jpg) |
मला आहे रंग...मला आहे रूप...मी पिते पानी..मी खाते उन! |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi_tNwWSUdpSFmCQgyi3VmuScBg47qsvEPPE_ufVnKcG-59Y6yL_JdTw_3fHJnV_Peip3jj5ZG5-35JIeXMZa9SWvKE_UQAZQY-AVCO_DSTwEx77JqcV7Cv4gTA-7GnBEhdwOKZA1PUEhPX/s640/DSC_1069r.jpg) |
कुशेगावातून दिसणारा नवरा नवरीच्या डोंगराचा विस्तीर्ण पसारा |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEghpn5vyLCl4xEZS94H6kqLSI-ILz3eHeXDGnkaEnDsum8dSmrPvtn3Fq-K3fH_BS225hhZ2Hwtfqw_jrp5FE6kyy0Ohd_GF-PMqZkxLaUfJ_k3SqEN0lZDkQnYxVc8fZJo-GcDAq_dlaes/s640/DSC_1070r.jpg) |
सासर्याचा डोंगरही भला पसरलेला... |
विशेष आभार:
गिरीश टकले,
भगवान चिले,
सुदर्शन कुलथे,
रवि पवार,
राहुल सोनवणे,
राजेश दीक्षित,
प्रा. पी.एस.सोनवणे
बोरू सराई
उपयूक्त संदर्भ:
अपरिचित आणि दुर्लक्षित दुर्ग नवरानवरी