सह्याद्री आणि नाथ साम्प्रदाय यांचे अतूट नाते आहे. सह्याद्रीतल्या काही अतिकठिण डोंगरांवर नाथांची ठाणी दृष्टीस पडतात. गोरखगडावरचे ठाणे रोमांचकतेने ओतप्रोत भरलेले. मच्छींद्रगडावर तर जाणे दुरापास्त. सातमाळा डोंगररांगेतल्या इखार्यावरचे ठाणे प्रसिद्ध आहे. ही मंडळी इतक्या अवघड ठिकाणी कशी काय वास्तव्य करत असतील, जे पाहूनच माणसाचे पाय लटपटतात? कुठल्याही कृत्रिम साधनांशिवाय दृष्टीभयाचे जीवघेणे कडे कसे काय पार करत असतील? आजची भेट इखारा सुळक्यावर...इखार्यावरचे मुक्त आरोहण...नाथ साम्प्रदायींच्या शैलीत...
''आदीनाथ म्हणजे खुद्द भगवान शिवशंकरास गुरूस्थानी मानणारा नाथ साम्प्रदाय कठिण योगसाधना करणारा, बौद्ध मतात लीन झालेला, शाक्त उपासक, गुरूदत्ताची आराधना करणारा, जगापासून अलिप्त तद्वताच गृहस्थाश्रमींमध्ये रमलेला''. नाथ साम्प्रदायींची ठाणी सह्याद्रीतल्या अती दुर्गम डोंगरकपारीत दृष्टीस पडतात. आठव्या शतकातले मत्स्येंद्रनाथ या पंथाचे उद्गाते. तसा हा पंथ त्याही अगोदरपासूनचा. गुरू गोरक्षनाथांनी या साम्प्रदायाचे मठ ठिकठिकाणी स्थापन केले. त्याच्या काळात अवघड कडे कपारीत नाथांचे मठ स्थापन झाल्याची मान्यता आहे. स्वत: गोरक्षनाथांनी सातमाळा डोंगरांगेतल्या इखारा सुळक्यावर वास्तव्य केल्याची मान्यता आहे. डोंगराच्या मध्यावर गोरक्षनाथांचा आश्रम आहे. गोरक्षनाथांचा काळ हा दहाव्या, अकराव्या शतकातला मानला जातो. या ठिकाणी ११व्या शतकात अजोड असे कातळ नक्षीकाम असलेले मंदिर असावे. डोंगरावर मोठ्या प्रमाणावर भग्नावशेष मातीत दबलेले आहेत. आश्रमातील महाराजांनी त्यातील काही अवशेष जमिन खोदून बाहेर काढलेत. त्यात चुना मळण्याचे घाणीचे भलेमोठे चाक, काही स्तंभांचे कोरीव नक्षीचे अवशेष असे बरेच नक्षीकाम केलेले तसेच तासून काढलेले दगड सापडलेत. धोडपचा किल्ला बराच काळ मोगलांकडे होता, त्याकाळात हे मंदिर ध्वस्त करण्यात आल्याचे स्थानिक मंडळी सांगतात.
नाथांचे साधक जिथे जिथे वास्तव्य करत तिथे तिथे शिखरावर भगवा ध्वज लावण्याची प्रथा आहे. २०१८च्या डिसेंबर महिन्यात आम्ही आठ दिवस डोंगरधारेने चालत सातमाळा डोंगरयात्रा केली. त्यावेळी गोरक्ष आश्रमातले काही साधक यात्रेच्या आदल्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या साधारण एक महिना अगोदर येणार्या फाल्गून द्वितीयेला सुळक्यावर जातात. हा एक लहानसा जत्था असतो. त्यातले दोघे किंवा तिघे सुळक्याचा शेवटचा अतिशय अवघड असा टप्पा मुक्तपणे चढून जातात व वर भगवा ध्वज फडकावतात, अशी माहिती मिळाली होती. महाराष्ट्रातले गिर्यारोहक इखार्यावर कृत्रिम आरोहणाच्या मोहिमा करतात तिथे हे साधक मुक्तपणाने आरोहण करून झेंडा फडकावितात ही कुतुहलाची व धाडसाची गोष्ट. या साधकांचा आरोहण मार्ग कसा असू शकतो? या विषयी नेहमीच जिज्ञासा वाटली आहे.
तीनएक वर्षांपूर्वी सुळक्यावर जाणार्या साधक तुकडीला सुरक्षितपणे जाता यावे यासाठी इखारा आश्रमाच्या वतिने ८० फुटाची साखळी लावण्यात आली. पायथ्याच्या कुंडाणे गावातली काही धाडसी तरूण मंडळी या साखळीच्या मदतीने शिखरावर जाऊन आली. सह्याद्रीत आम्ही आजवर नेहमीच कातळआरोहण हे कृत्रीम साधने घेऊन म्हणजे, पाचर, खिळे तसेच नैसर्गिक आधारांना दोर अडकवून केलेत. यंदा नाथ साम्प्रदायी करतात तसे मुक्त आरोहण करण्याचा निश्चय करून आम्ही दोघांनी इखारा सुळक्याला साद घातली. कोव्हिड १९ आजाराच्या दुसर्या लाटेने आमचा नासिकचा परिसर पुरता हेलावलेला. रोज कोणा ना कोणा परिचीताच्या निधनाची बातमी कानावर आदळत. कामकाज जवळपास बंदच. घरात थांबून आवडत्या भटकंती, गिर्यारोहण विषयी पुस्तकचे चाळायची तर ते अधिकच त्रासदायक, असं झोकदार वर्णन वाचून पाय शिवशिवले नाहीत तर नवल.
इखारा कुंडाणे गावातून |
गेल्या काही दिवसांपासून पाठीचा एके ठिकाणचा स्नायू दुखावला होता. रविवारी घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चामरलेणी डोंगराच्या शिखरावर जाऊन तो दुखणारा स्नायू पुरेसे ताणून बघण्याचा मनोदय होता. शिखर दहा मिनीटे बाकी असताना दीपक पवारचा फोन आला, चलतोस का इखार्याला. इखारा नाव ऐकून माझ्या डोक्यात निखारा पेटला. ''दोन एक महिन्यांपूर्वी आम्ही काही सवंगडी दुर्गभांडारची भटकंती करून आलो. त्यावेळी निफाडचा दुर्गप्रेमी द्राक्ष उत्पादक दीपक घंगाळे याने इखार्यावर जाता येते, अशी माहिती दिली. आश्रमातील साधकांनी वरच्या भागात साखळदंड लावला आहे. आपण विहिरीत जसे उतरतो आणि वर चढून येतो तसे त्यावर चढूज जावे लागते''.
कुंडाण्यातले काही तरूण वर जाऊन आले. त्यातला मुकुंद बोरसे हा आज आमच्या सोबत येणार होता. आम्ही वडाळीभोईत पोहोचून मुकुंदला फोन लावला तर तो आईची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नासिकला निघाला होता. मग आम्ही कुंडाण्यात पोहोचलो. तिथे मुकुंदच्या वडिलांची भेट घेतली. दुरून त्यांच्याशो दोन शब्द बोलताना त्यांनी, तुम्ही वर जाऊ शकतात असा विश्वास दिला. आश्रमापर्यंत मोटरसायकल नेता येते, असे त्यांनी सांगितले. कुंडाण्यातून इखार्याचा सुळका अतिशय भेदक दिसत होता. या वर चढाई करायची? या विचाराने हबकून जाण्यासारखे झाले. त्यात तो दगड मूरूमाचा घाटमार्ग म्हणजे गाडीची चाके निसटवणारा. आश्रमात पोहोचून आश्रमाचे महंत गणेशनाथ महाराज यांची भेट घेतली. त्यांनी आश्रमाच्या बाहेर येऊन वर जाण्याचा मार्ग समजावून सांगितला. आमची साधक मंडळी वर यात्रेच्या वेळी जात असते अशी पुस्ती त्यांनी जोडली.
सकाळचे १०-४०:
घाणेरीच्या कपडे ओढू काट्यातून मार्ग शोधत आम्ही आश्रमाच्या वरच्या टप्प्याच्या दिशेने कुच केली. थोड्याच वेळात लक्षात आले की, काही मळलेल्या वाटा आहेत आणि काही कमी मळलेल्या. कमी मळलेल्या वाटेवर घाणेरेच्या काटेदार फांद्या त्रासदायक ठरत होत्या. मग आम्ही मळलेल्या वाटेने पूर्व बाजूला जाऊन खुणेच्या दगडाला डावा वळसा मारला. तिथून धोडपच्या बाजूचे टोक गाठून खुणेच्या झाडापाशी पोहोचलो. तिथून मागच्या म्हणजे कांचना किल्ल्याच्या दिशेने जाणार्या वाटेने जायचे होता. गवत खुप वाढल्याने वाट सापडत नव्हती. दोन गायवाटा संभ्रमित करणार्या होत्या. वरच्या कातळाला भिडून आम्ही त्याच्या अंगाने जाणार्या बारीकशा वाटेने पुढे सरकु लागो. दीपक घंगाळे व मुकुंद बोरसे यांना फोन करून वाट बरोबर असल्याची खात्री करून घेतली. त्यांनी पुढे एका घळीतून सोप्या श्रेणीची बारा फुटांची चढाई करावी लागेल, असे सांगितले.
ती खुणेची घळ गाठताना गवत व घसार्यातून वाट काढणे नाकीनऊ येत होते. आम्हाला कुठे ठाऊक की, ही तर घसारायुक्त वाटेची सुरूवात आहे. पुढे ती आणखी आव्हानात्मक होत जाणार!
पहिल्या घळीतून धोडप आणि त्याच्या अलिकडच्या पिंड्या डोंगराचे सुंदरसे दर्शन |
या घळीतून धोडपचे सुंदरसे दर्शन घडते. सोपे कातळारोहण करून वर गेल्यावर धोडप अधिकच देखणा दिसत होता. सभोवताली धोडपच्या उजव्या अंगाला पुसटशा वातावरणात कण्हेरगड दिसत होता, तर डावीकडे बंड्या आणि रावळ्या. आणखी थोडा उजवीकडे चौल्हेरचा भला उंच किल्ला दृष्टीस पडला. आता खुरट्या जंगलातून वरची अंगावर येणारी वाट दिसत होती. त्याच्यावर इखार्याचा सुळका आणि त्याला लावलेले दोन ध्वज. पुढे काय वाढून ठेवले आहे? हा सुळखा खरोखरच मुक्तपणे चढाई करून साधता येईल का? हा विचार बघताक्षणी डोकावला तेव्हा मनाला समजवलं, जाऊन तर बघू!
तार नावाची धोक्याची घंटा
कडक उन्हातून काट्यांच्या झुडपातून आमची वाटचाल सुरू होती. इतक्या कडक उन्हात अंगावर येणारी उभी चढाई? शक्य तरी आहे का? नाना विचारांचे काहूर सूरू होते. आश्रमातून गोल बुरूज वजा खडकावर लावलेली तार दृष्टीस पडत होती. ती तार दुरूनच दिसली. सातमाळेत रावळ्या जावळ्याच्या पठारावर अशीच एक तार बांधलेली दिसली होती. या ताराच्या मदतीने स्थानिक मंडळी माळावरेचे गवत कापून खाली पोहोचवतात. मग तो चारा जनवारांना खायला देतात. हा परिसर दुभत्या जनावारांचा म्हणून ओळखला जातो. सातमाळेत काही डोंगरावर पूर्वपार गाईचे दुध आटवून खवा तयार करण्याचा उद्योग केला जात आहे. पूर्वी लोक डोंगरावर गुरे वर्षभर ठेऊन वरच भट्टी पेटवून खवा तयार करायचे. मग विक्रीसाठी तो खाली आणायचे. अलिकडे वनविभागाने डोंगरांवर सरपण जाळून खवा तयार करण्यास मज्जाव केला आहे. आता ही मंडळी गावातच गाई व म्हशी ठेवू लागली. डोंगरावरून सरपण व गवत आणून गावातच अस्सल खवा बनविण्याचा उद्योग शेतीला जोडधंदा म्हणून चालविला जात आहे.
माळावरचे गवत, लाकुडफाटा या ताराच्या मदतीने खाली जाणार...? |
वरकरणी गरिब शेतकरी आदिवासी वर्गाचा हा आर्थिक आधार वाटत असला तरी याने माळावरच्या गवताची मोठ्या प्रमाणावर कटाई होऊ लागली आहे. त्याने माळाच्या आश्रयाने फुलणार्या जीवसृष्टीवर संक्रांत आली आहे. गवत नसल्याने त्यात राहणारे ससे, सरडे प्रजाती, किटक प्रजातींचे आश्रयस्थान हिरावत आहे. त्यावर जगणारे जंगली तृणभक्षी जनावरे, शिकारी पक्षी यच्चयावत समुच्या साखळीवर गंडांतर आले आहे.
या तारेपासून वरचा संपुर्ण भाग हा घसार्याचा. सावकाशपणे त्याच्याशी झटापट करत आम्ही शिंदीच्या झाडांचा जत्था पार करून जोड सुळक्याच्या मधल्या टापूवर पोहोचलो. तिथे लहान सुळक्याच्या पोटा पर्यंत जाण्याची वाट मिळाली. तिथे छान सावली होती. तिथेच सोबत आणलेला डबा खाल्ला आणि मुख्य आरोहण मार्गाचे निरीक्षण केले. साठ सत्तर फुटांची मोठी भेग काहीशी आत झुकलेली. या भेगेतूनच आम्हाला आज मुक्तचढाई करायची होती. साखळीची फॉल लाईन दरीच्या दिशेने तयार झाल्याने तिचा झोल पडून एक प्रकाराचा ओव्हर हँग दिसत होता. हा ओव्हरहॅंग टाळण्यासाठी साखळी पकडून चिमणीत शिरताना साखळीवर पुर्ण विसंबून राहता येणार नाही हे स्पष्ट होत होते. खडकावरच्या कातळ आधाराच्या मदतीनेच वर चढावे लगणार होते.
पाहता क्षणी...''हा इतका टप्पा मुक्तपणे चढायचा''? |
मुक्तारोहणाचा थरार...
खालच्या भागात एक सहा फुटाचा टप्पा ओलांडून वर आणखी एक वीस बावीस फुटांचा तिव्र स्वरूपाचा घसारा लागला. तो पार करताना खडकाचा किंवा झुडपांचे आधार मिळत नव्हता. आता आम्ही चिमणी सुरू होते त्या टप्प्यात पोहोचलो. तिथून वरच्या भागात काय दिव्य वाढून ठेवले याचा काहीही अदमास लागत नव्हता. सुरूवातीला मी काही फुट वर गेलो, परंतू रणरणत्या उन्हात शरीराची बरीच उर्जा खर्ची होत होती. त्यात दोन पाय पूर्णपणे फाकवून आधार घेताना पायाच्या स्नायूत गोळे येत होते. गेल्या काही दिवसांपासून दुखावलेला पाठीचा स्नायू डोके वर काढू पहात होता. हा टप्पा पार होणे अवघड दिसू लागले. दीपकने मुकुंद बोरसेला फोन लावला, परंतू त्याच्याकडे आश्रमात येण्याकरिता वाहन नव्हते.
चिमणीतून प्रस्तरारोहण...साखळीचा मोठा आधार...धोडप बघतोय... |
'इथवर आलो हेच खुप', असा विचार करून आम्ही तिथून परतण्याची मनाची तयारी केली. आजवर नेहमीच सुरक्षा साधनांच्या मदतीने आरोहण केल्याने ही चढाई फारच जोखिमेची होती. या ठिकाणी सुरक्षा दोर देण्यासाठी स्वत:ला सुरक्षित कसे करायचे हा प्रश्न होता. चिमणीमुळे पाठीला आधार मिळत होता. तसेच हाता पायला पुरेसे आधार मिळत होता. तसं बघितलं तर शांत डोक्याने गेलं तर वरच्या बाजूला जाऊन आणखी आधार दिसतात का हे कळणार होतं. शिवाय सुरक्षेसाठी साखळी होतीच.
शेवटी दीपक म्हणाला मी पाच एक फुट वर जाऊन बघतो. मग त्याच्या कमरेला दोर बांधला. त्याला सुरक्षादोर देण्यासाठी मला चिमणीत भक्कम जागा मिळाली. वरच्या बाजूला भक्कम खडक दिसत होता, तिथे पाय रोवून त्याचा सुरक्षा दोर सज्ज झाला. दीपक म्हणाला, हा टप्पा पार केला तर वरचा टप्पा काही अवघड वाटत नाही. ही सुखावणारी वार्ता होती.
दीपकला म्हंटलं मला सुरक्षादार दे. तो साखळी सोडायला तयार नव्हता. पायाखाली दरीच दिसत होती. त्याला म्हंटलं एक हाताने साखळी धरली तर सुरक्षा दोर देता येणार नाही. दोन पाय व्यवस्थित लांब करून खडकावर आधार घे...सुरक्षा दोर दे...मी असाही खडकाला पकडून चढणार आहे. पकड निसटण्याची स्थिती जाणवली तर खडकावर ओणवा होईन व साखळीचा आधार घेईन. तू ती धरलेली असेल तर दोघांसाठी ते धोकादायक ठरेल.
अखेर दीपक तयार झाला. मग मी वर पोहोचलो. आम्हाला दोघांना जेमतेम पाय ठेवण्या इतकी जागा मिळाली. तिथून वरचा टप्पा दीपकने चिमणीतून न जाता दरीकडच्या बाजुने पार केला. हातांचे व पायाचे भक्कम आधार घेत तो आणखी दहा बारा फुट वर जाऊन पोहोचला. तिथे त्याला उभे राहण्यासाठी प्रशस्त जागा मिळाली.
एव्हाना पंन्नास फुटाची चढाई झाली होती. साखळी प्रचंड मजबूत होती, तथापी त्यावर गरज असेल तेव्हाच भार देत आम्ही कातळारोहण सुरू ठेवले. एकमेकांना आलटून पालटून सुरक्षा दोर देत एक दुसर्याचा हुरूप वाढवत राहिलो. साखळी जवळच असल्याने त्याचा मोठा आधार होताच. पाय घसरू द्यायचे नाही. साखळीचा आधार गरज असेल तेव्हा घ्यायचा व खडकावरून मुख्यत्वे आरोहण करायचे. पकड राहत नाही असे वाटले तर साखळी धरायची. तिची पकड सुटतेय असे वाटले तर हाता पायाची पकड घ्यायची. घसरण्याची प्रक्रिया घडतेय असे वाटले तर ती थांबविण्यासाठी सुरक्षादोर खेचून धरायचा/ धरायला सांगायचा...बिले टाईटऽऽ
वाट्टेल तितका वेळ लागो, सावकाशपणे वर जात रहायचे हे धोरण यशस्वी ठरले. आता शिखराच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आम्ही येऊन ठेपलो. हा मात्र सर्वात आव्हानात्मक भाग होता. साखळी खालच्या बाजुला भेगेत पाचरीने ठोकली होती. त्याच्या वर हा घसारा. हा इतक्या बेक्कार ठिकाणी होता आणि प्रचंड उताराचा होता की विचारता सोय नाही. सुदैवाने त्याच्या बाजूला खडक असल्याने तो पकडत वर जाणे शक्य होते. त्यावर मात्र भरपूर निवडूंग माजल्याने खडकाला धरायला गेलो तर निवडूंगाच्या काट्यांना हात जात होता. हा भाग मी सहजपणे वर जाऊ शकतो, अशी खात्री वाटल्याने मी पुढची चढाई करून शिखरावर पाऊल ठेवले. तिथे वरच्या खडकाला दोर बांधून प्रथम मला सुरक्षित करून घेतले. मग दीपकला सुरक्षा दोर देऊन वर घेतले. दुपारी २-५२ वाजता आमचे पाऊल इखार्याच्या माथ्यावर होते. आमची मुक्त आरोहण मोहिम यशस्वी ठरली होती. इखार्यावर असलेल्या ध्वजा समोर नतमस्तक होऊन सातमाळा डोंगररांगेचे नयनरम्य दृष्य आम्ही मनात साठवले. परिसरातील डोंगर ओळखत त्यांची विविध छायाचित्रे घेत आम्ही पहिल्या वहिल्या मुक्त आरोहणाचा पुरेपूर आनंद घेतला.
मोहिम फत्ते झाल्याचा आनंद काही वेगळाच असतो... |
वीस एक मिनीटे वर थांबल्यानंतर आम्ही परतीचा मार्ग धरला. आम्हाला सहीसलामत वर पोहचविल्याबद्दल इखार्याचे मनस्वी आभार मानले. आरोहणाचा टप्पा जितका कठिण तितकाच आवरोहणाचा. मला स्वत:ला खडकाकडे मुख करून उतरण्याचा सराव असल्याने प्रथम दीपकला वरच्या भागातल्या घसार्यातून खाली उतरवले. नंतर तिथे पडलेल्या एक मोठ्या काठीने आधार घेत मी खाली आलो. आता खडकाकडे मुख करत उतरण्यात मी पुढाकार घेतला, तर वरच्या बाजूने दीपकने सुरक्षादोर पुरविला. एक टप्पा उतरायचा आणि हातापायाचे आधार घेतले की ते दीपकला सांगायचे असे करत आम्ही फार लवकर चिमणी उतरून खाली आलो. खालचा घसारा पार करून साखळीचे टोक सोडले आणि एका अवर्णनीय आरोहणाची सांगता झाल्याचा आनंद लिंबूपाणी घेऊन साजरा केला. परंत संकट पुरते टळले नव्हते. खाल पर्यंतचा घसारा अजून बाकी होता. परंतू तो तितका जोखिमेचा नसल्याने त्याचे दडपण नव्हते.
अगदीच उभा असलेला दोन सुळक्यांची जोडी असलेला शिखरमाथा म्हणजे शंभर फुटांची थरारक चढाई. याची चिमणी सत्तर फुटांची तरी असावी. बाकी चढाचा नी घसार्याचा भाग, दोघांचीही तिव्रता जणू एकसारखीच. ही एक मध्यम जाडीची साखळी आहे. चाळीस चाळीस फुटाच्या दोन साखळ्या जोडून एकच अखंड साखळी वरच्या बाजुला भेगेत मोठी पाचर ठोकून बसविली आहे. ही साखळी आणखी किती काळ टिकेल हे सांगणे कठिण आहे. खालच्या बाजुला तिला पाचराने सुरक्षित करण्यात आले होते, तथापी साखळीची फॉल लाईन गुरूत्वाकर्षण शक्तीमुळे दरीच्या बाजूने एका विशिष्ट ठिकाणी जाणारी, त्यामुळे खालची पाचर निघून गेली आहे. या साखळीचा निम्मा भाग आता गंजला आहे. ही एकाच पाचरीवर ठोकली आहे. अधिक सुरक्षेसाठी तिन ठिकाणी पाचर मारली तर सुरक्षेची हमी अधिक राहील.
साल्हेरचे दर्शन
एक अविस्मरणीय आरोहण मोहिम पार पडल्याचा आनंद होता. इखार्याच्या वरच्या टप्प्यात जिथे सुळका आहे त्या ठिकाणी भेट देणारे मोजकेच भटके असतात. तसा या भागात गुराख्यांचाही फार राबता नसावा. त्यामुळे गडावर बर्यापैकी झुडपी वनस्पतींचे वैविध्य दिसून आले. शिंदीची अनेक झाडे दृष्टीस पडली. त्याला काप दिल्याने स्थानक मंडळी त्यापासून दारू बनवत असावी हे स्पष्ट होत होते. इथून साल्हेर दिसावा अशी खुप इच्छा मनात होती. तोच माझ्यापाठीमागे पाहून दीकक ओरडला, तो पहा...उत्तर क्षितीजावर. आज वातावरण चांगले ढगाळ होते. आम्ही आरोहण करून खाली उतरे पर्यंत आकाश गडद राखाडी होते. गार वारा सुटला होता. दुर कुठेतरी पाऊस झाल्याची ती चिन्हे होती. तोच राखाडी ढग बाजूला करून मावळतीची सूर्यकिरणे साल्हेर रांगेवर प्रकाश फेकताना दिसली. त्यात मग टकारा पासून साल्हेर, सालेटा, पाचपांडव, हरगडादी रांग इतकी सुंदर दिसली की त्यान मन आनंदून गेले. हा एक अचंबित करणारा प्रकार होता. गडद अंधारी वातावरणात सर्वदूर क्षितीजाच्या वर मधल्या भागातच प्रकाश, नियंत्याचे इतके देखणे नियोजन कसे काय असू शकते. एखादा चित्रकारच अशी कल्पना करू शकतो. शेवटी चित्रकार मंडळी सुद्धा त्या परम तत्वाच्या जवळ पोहोचलेली असतात ना!
इखारा डोंगरास स्वतंत्र किल्ला म्हणून मान्यता नसली तरी या डोंगराला तटबंदी आहे. पाण्याची कातळ खोदीव टाकी आहेत. जुन्या बांधकामाचे असंख्य अवशेष मातीत दबले आहेत, ज्यातील बहुतांशी अवशेष हे अकराव्या शतकातील मंदिराचे असावेत. डोंगरावर एक प्रशस्त लेणे आहे. हा धोडप माचीशी सलगपणे जोडलेला असल्याने, येथे प्रवेशासाठी चौकी असणार यात शंका नाही. खास करून कांचन बारीतून येण्याच्या वाटेवर निश्चीतपणे चौकी असावी.
पक्षांची आई विनता...
इखार्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, त्यावरून उगम पावणारी विनता नदी. ही विनता निफाड येथे कादवा नदीत जाऊन मिळते. पुराणात सापांची आई म्हणजे कद्रू तीच कादवा असल्याची धार्मिक मान्यता आहे. ही कादवा किंवा कद्रू नदी सुरगाण्या जवळ केमच्या डोंगर परिसरात उगम पावते. हा तोच केमचा डोंगर ज्यावरून गिरणा, नार, पार आदी सात नद्या उगम पावतात. २०१८च्या १ डिसेंबरला आम्ही याच डोंगरावरून आमच्या सातमाळा डोंगरयात्रेची सुरूवात केली होती. आणखी एक छोटी कद्रू नदी ही वडाळीभोई परिसरात असलेल्या केद्राई जवळ उगम पावते अशी आणखी एक माहिती मिळाली. मला वाटतं विनते सोबत कद्रू ही आवश्यक जोडी आहे. कादवा हीच तिच्या तोडीची मोठी नदी असल्याने दिसून येते.
विनता आणि कद्रू या दक्षप्रजापतीच्या लेकी. पौराणिक कथांनूसार ब्रम्हाच्या सात मानसपुत्रांपैकी मारिची याने कश्यप नावाचा प्रजापती पुत्र उत्पन्न केला. दक्षाच्या बारा मुलींचे कश्यपशी लग्न लाऊन दिले. त्या प्रत्येक स्त्रीपासून सृष्टीतल्या महत्वाच्या जीवांची उत्पत्ती झाली. आदिती पासून आदित्य, दिती पासून दैत्य, दनू पासून दान, काष्ठा पासून अश्व आदी, अनिष्ठा पासून गंधर्व, सुरसे पासून राक्षस, इले पासून वृक्ष, मुनि पासून अप्सरागण, क्रोधवशा पासून सर्प, सुरभी पासून गौ व महिष, सरमा पासून हिंस्त्र श्वापद, ताम्रा पासून जलजन्तू, विनता पासून गरूड व अरूण, कद्रु पासून नाग, पतंगी पासून पतंग व यामिनी पासून शलभ.
इखार्याच्या नदीला विनता हे नाव कोणत्या गोष्टीमुळे दिले असावे? पृथ्वीवरच्या पक्षीगणांच्या आईचे नाव इथल्या नदीला देताना कदाचित इखार्याचा परिसर त्याकाळी पक्षांचे आश्रयस्थान तर नसावा! इखार्याचा रूबाबदार सुळका पहिल्यावर सहजच एक कल्पना मनाला शिवून जाते, एक विशाल गरूड ऐटदार उंच भरारी घेत त्याच्या सुळक्यावर पंख बसलाय...तिथून तो अवघ्या सह्याद्रीवर नजर फेरतो.
त्याचा 'आदेश' होता म्हणून...
जग, प्राणवायू...प्राणवायू करतय! अनेकांचा त्या वाचून जीव जातोय. वाट्टेल तितका पैसा खर्च करून आणि देशातली तमाम प्रशासकीय यंत्रणा वापरूनही मृत्युशी झुंजण देणार्या लोकांना आज टाकीबंद प्राणवायू मिळणे जिथे दुरापास्त, तिथे आम्ही या भिषण महामारीच्या मध्यात नैसर्गिक प्राणवायू घेण्यासाठी इखार्यावर जाऊन पोहोचलो. सोबत नुकतीच कोरोना बाधेवर मात करून भरपूर अॅन्टीबॉडीज मिळविणारा भिडू होता. वाटेत कुठे थांबायची नाही हा नेम पुरेपूर पाळत ही दुक्कल मुक्तारोहण मोहिम तडीस गेली.
उतरणीची संपुर्ण वाट वाळेल्या गवताने झाकलेली. काही गायवाटांमधून ही मुख्य वाट अंदाजाने शोधता येत होती. घसारा एके घसारा करत आम्ही आश्रमातून दिसणार्या खुणेच्या झाडाजवळ येऊन पोहोचलो. तिथून पंधरा मिनीटात आश्रम गाठले. आश्रमात गेल्यावर प्रथम गणेशनाथ बाबांना लांबूनच धन्यवाद दिलेत. (करणार काय, या महामारी काळात समोरा समोर जाणे टाळणे हेच श्रेयस्कर) त्यांनी शिखरा पर्यंतची वाट बरोबर सांगितल्याने आम्हाला मोठा फेरा पडला नाही.
विहरीचे पाणी पिऊन तृष्णा भागविली आणि आम्ही तात्काळ परतीची वाट धरली. आता नासिकला पोहोचायला अंधार होणार होता. परंतू मोहिम अंधार दाटण्याच्या आत आटोपली ही समाधानाची बाब होती.
घाटात पिराच्या बाजुला असलेल्या खडकावर बसून थोडावेळ धोडप, इखारा आणि परिसरातले डोंगर न्याहाळले. आणि मग कुंडाण्यात गाडीवर बसल्या बसल्याच मुकुंद बोरसेंची भेट घेऊन आम्ही त्याचे भरपूर धन्यवाद मानत नासिक गाठले. इतक्या कर्मकठिण वातावरणात आमची विना साहित्य मुक्त आरोहण मोहिम पार पडल्याच्या आनंदात नासिकला कधी पोहोचलो कळलेच नाही. सह्याद्रीत अनेक वर्षे भटकंतीचा अनूभव, हाता पायाची भक्कम पकड आणि दरीत कोसळत्या कड्यांवरून जाताना सुद्धा मेलेली नजर या काही गोष्टी आमच्या उपयोगी पडल्या असाव्यात. पुरेसा अनूभव नसेल. उंचीची भिती वाटत असेल तर या सुळक्यावर मुक्त आरोहणाचा विचार करता येणार नाही. त्यासाठी मग रितसर कृत्रिम चढाई करणार्या चमु सोबत जाणे ईष्ट ठरेल. तसं बघितलं तर धोडप व इखारा या जोड आरोहण मोहिमांचे आयाजन करण्याची प्रथा आहे. इखारा हा सोप्या श्रेणीचा, नवोदितांना गिर्यारोहणाची सुरूवात करण्यासाठी योग्य असा तर धोडप हा कठिण श्रेणीचा. त्यामुळे नवोदित व अनूभवी अशा दोन्ही प्रकारच्या आरोहकांना या जोड आरोहण मोहिमेवर गिर्यारोहण करण्याची संधी मिळते.
मुक्त आरोहण हा सर्वस्वी वेगळा प्रकार आहे. गिर्यारोहण जगतात काही मोजकी नावे यात घेतली जातात, त्यात मिलिंद पाठक, किरण आडफाडकर, दिलीप झुंजारराव प्रभूती. अलिकडच्या काळात अनिल वाघ, सागर नलावडे यांनी लिंगाण्यावर वेगवान मुक्त आरोहण करण्याचा पराक्रम केलाय. ही या क्षेत्रातली कसबी मंडळी. यांच्या इतके कौशल्य प्राप्त करण्यासाठी सराव आणि मोहिमांचे रतिब घातले तर नव्या पिढीकडून मुक्तारोहण साध्य होऊ शकते. तथापी जोखिमेची ही वरची पातळी. गिर्यारोहणाचा मुलमंत्रच सुरक्षितता आहे. त्यामुळे तंत्रशुद्ध गिर्यारोहण हे श्रेयस्कर, 'जीवन आहे तर जग', या न्यायाने हा कानमंत्र नवोदित गिर्यारोहकांनी ध्यानात ठेवायला हवा. स्थानिक मंडळी मुक्त आरोहण करत असेल तर अशा मार्गाची पुर्णमाहिती घ्यावी. कितपत पुढे जायचे. कुठून परतायचे, यश घेऊनच परतायचे की, गणिते जूळत नसल्याने माघार घ्यायची याचा ताळमेळ बसवता आला पाहिजे.
जगासमोर अॅलेक्स हॅनोल्डने, 'फ्री सोलो', नावाचे शिखर उभे करून ठेवले आहे. न केवळ गिर्यारोहणावरचा ऑस्कर पुरस्कार प्राप्त असलेला हा लघूपट, ही एक खरी खुरी कथा जी त्याने तीन हजार फुटाच्या एल कॅप्टन नावाच्या योसेमिटी राष्ट्रीय उद्यानात लिहीली आणि मनुष्यजातीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले.
महाराष्ट्राला मुक्त आरोहणाची प्राचीन परंपरा आहे. नरवीर तानाजी मालूसरे डोणागिरीचा कडा मुक्त चढून गेले आणि त्यांनी मॉसाहेब जिजाबाईंच्या चरणी कोंढाण्याचे दान टाकले. 'इथून कोणी येणारच नाही' असाच तो भेदक कडा होता. त्यामुळेच तिथे पहारे बसवले नव्हते. कोंडोजी फर्जंदची 'ती साठ भूतं' पर्नालपर्वत अशीच आडवाटेने रात्रीच्या अंधारास सरसर चढली असतील. ज्यांनी केवळ साठ योद्ध्यांच्या बळावर आदिलशाहीचा मुकूटमणी हस्तगत केला. ही परंपरा काही स्थानिक डोंगरांवर आजच्या यूगात ही मूक्त आरोहक स्थानिक मंडळी जोपासत आहेत. आम्ही एक वेगळा अनूभव घेण्यासाठी हा बेत आखला . एक मात्र नक्की डोंगरयात्रा करताना आपल्यापैकी अनेक जण सोबत सुरक्षितता म्हणून दोर ठेवतात. तांत्रिक साधने नसताना अनेकदा अवघड कडे दत्त म्हणून समोर ऊभे राहतात. तेव्हा मोठ्या कसोशिने ते पार करावे लागतात. अशा वेळी एकतर मुक्तपणे आरोहण करावे लागते किंवा तिथून माघार घ्यावी लागते.
फेब्रुवारी २०१४मध्ये आम्ही रोहीदास केला. परतताना माकडनाळेने उतरण्याचा निर्णय घेतला. या भटकंतीत तांत्रिक साधनसामूग्री नेण्याचा विषय नव्हता. तरी सोबत एकांडा दोर होता. खालच्या टप्प्यावर पोहोचल्यावर लक्षात आले की, इथून कमरेला दोर बांधून खाली सोडण्यासाठी पुरेसा ठरणार नाही. शिवाय तो टप्पा कातळआवरोहण करून उतरून जाऊ की नाही या बद्दल खात्री वाटत नव्हती. तिथून माघार घेणे खुप जीवावर आले होते. नेट लावला असता तर कदाचित खटाटोप करून तो छोटासा टप्पा पार झालाही असता. पण त्यात जोखिम होती. त्यावेळी मुक्तपणे उतरायचे असे कुठलेही नियोजन केले नव्हते. सहभागींपैकी सगळेच जण उतरू शकणार नव्हते. त्यामुळे सन्मानजनक माघार घ्यावी लागली. त्याने फार काही फरक पडला नाही. वेळेचे गणित थोडेसे बिघडले. साधारणपणे दोन तासा जास्तीचे पडले इतकेच. विखार्याचे तसे नव्हते. तिथे ठरवूनच गेलो होतो, एक वेगळा अनूभव घेण्यासाठी. तसा तो मुक्तपणे जाण्यासाठी सोपा नाही. नेट लावला तर साध्य होऊ शकते. खालून बघितल्यावरच लक्षात येतं, त्याच्या वाटेला जायचं की नाही. आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं तो साध्य होईल. त्यादिवशी मनोदशा उत्तम होती. मनावर कुठलेही दडपण नव्हते. त्याचा आम्ही पुरेपूर मान ठेवत होतो आणि त्याला आजमावत होतो, 'तो आम्हास कुठवर ताकास तूर लागू देईल याचा', त्याने स्विकारले...त्याचा 'आदेश होता' तेव्हा अपयशाची सावली दूर राहिली.
।।जय हो।।
---समाप्त---
उपयूक्त धागा: साह्यकडा एडवेंचर प्रतिष्ठान 🚩
दिनांक - २२ ते २४ फेब्रुवारी २०१९
किल्ले धोडप आणी इखारा सुळका आरोहण
https://www.facebook.com/Sahyakada/posts/1993471490961148/
इखार्यावर झेंडा लावण्यासाठी लावलेली साखळी... |
साखळीचा आधार खरा..पण सगळा भरवसा हाता पायाच्या पकडींवरच |
धोडप सुळक्याच्या पोटातल्या गुहेतुन इखारा दर्शन... |
इखार्याचा बुरूज |
लेकुरवाळ्याच्या माळावरून इखारा व त्या मागची सातमाळा डोंगररांग |
जुन्या खुणा जोपासणार्या धोडंबे गावच्या जुन्या वेशीचे शेवटचे उभे अवशेष |
दगडाचेच रंग रूप घेणारी वनस्पती |
तृणांचे मुक आक्रंदन...नको या तारा...त्या आम्हाला मारतील... |
साखळी धरून घसारा पार होतो...पण कातळावर हिचा आधार कमीत कमी घ्यावा |
इखार्याच्या चिमणीतून दिसणारा सुंदरसा धोडप किल्ला |
धोडपच्या वाड्याच्या भग्न खिडकीतून इखारा... |
इखार्याची जुनी तटबंदी...लेकुरवाळ्याच्या बाजूने तिथे पहार्याची चौकी असावी... |
लेकुरवाळ्यावर मनसोक्त चरणारे गोधन...मागे त्यांचा पाठीराखा इखारा... |
लेकुरवाळ्याच्या बाजूने इखार्याची पायर्या पायर्यांची रचना |
लेकुरवाळा माळावरून इखार्यांचे सुंदरसे दर्शन... |
इखार्याच्या शिखरावरून धोडप बंड्या, रावळ्या जावळ्या आदी डोंगर |
उतरून आल्यानंतर दिपक पवारची आनंदमूद्रा... |
नियम म्हणजे नियम...ट्रेकवरचे सरबत ट्रेकवर... |