मोगल मराठा संघर्षात महत्वाचं युद्ध लढल्या गेलेल्या कांचना किल्ल्याला लागूनच असलेल्या बाफळ्या डोंगराची ही एक छोटेखानी भटकंती तिच्यावरच्या विशाल गुहेमुळे उत्सुकता चाळविणारी ठरली. खरे तर बाफळ्यावर वाड्याच्या जोती, बाफळ्यावर वीरगळी, बाफळ्यावर लेणी अशा वार्ता कानावर येऊन धडकावच्या. त्याच्या प्रत्यक्ष भेटीतून बर्याच दिवसांची इच्छा पूर्ण झाली...पण तिने काही नवे प्रश्न उपस्थित केले!
डिसेंबर २०१८मध्ये संपुर्ण सातमाळा डोंगररांग आठ दिवसांच्या तंगडतोड भटकंतीत डोंगराच्या धारेने पार करण्याचे स्वप्न साकार झाले होते. त्यावेळेस कांचना किल्ल्यावरून पूर्व बाजूने उतरून बाफळ्यावर जाण्याचे नियोजन आडवी वाट न सापडल्याने कोलमडले होते. कांचनाचा या बाजूकडून तिव्र उतार व घसारा असल्याने बाफळ्याला जोडणारा मार्ग सापडू शकला नव्हता. त्या दिवसाचे नियोजन भले तगडे होते, ''सकाळी कांचना गाठून तिथून कोळधेर आणि तो करून राजधेरचा पायथा''. ''आम्ही सोबती दोघेच''. वाट सांगणारा कोणीही न भेटल्याने आम्हाला बाफळ्याला बगल द्यावी लागली होती. नंतर पुढचा काही काळ अनेक ठिकाणहून बाफळ्याचे नाव कानावर येत होते. अनेक प्रतिथयश डोंगर भटक मंडळी बाफळ्याचा डोंगराचा उल्लेख करत. त्यावर कोणी जाऊन जाऊन आल्याची माहिती मिळत नव्हती. वर काय असावे? की काही नसल्याने लोक वर जात नाही? असे प्रश्न पडत.
एकदा बागलाण भागातल्या भटकंतीसाठी जाताना, शिरस्त्या प्रमाणे भावडबारीत दोन क्षण थांबलो तर तिथे खेलदरीचे बाळू बाबा भेटले. 'शहंशा ए भावडबारी' या नावाने परिचीत असलेल्या पिराची ते मनोभावे पुजा अर्चना करतात. या अवलियावर परिसरातल्या जनतेची मोठी श्रद्धा. 'त्याची सेवा केली तर बरकत मिळते', या भावनेतून ते बालपणापासून त्याची देखभाल करत आहेत. बाफळ्या विषयी चौकशी केली तर त्यांनी वर जाता येते असे सांगितले. अवघ्या तासाभरात वर पोहोचू, चलायचं असेल तर चला! अशी त्यांनी लगेच तयारी दर्शविली. अर्थात त्यावेळी वेगळे नियोजन होते त्यामुळे जाणे शक्य नव्हते झाले. बाबांना विचारलं वर पाणी आहे का? ते म्हणाले कायम असतं! गुहा, पायर्या, टाकी आहेत का? असं विचारलं तर ते म्हणाले पायर्या नाही पण गुहा व टाके आहे.
११ जुलै २०२१
एकदाचा बाफळ्याचा योग जुळून आलाच. दीपक पवार, अजय हातेकर असा आमचा तिन जणांचा छोटेकानी ताफा. दीपकने खेलदरीतून बाबांना घेऊ किंवा भावडबारी घाटात ते भेटतील असे सांगत रविवारीय भटकंतीचे नियोजन केले. नासिक-सोग्रस फाटा-खेलदरी हा दुचाकीचा प्रवास पावसाळी वातावरणात सूसाट महामार्गाचा रस्ता असल्यने कधी पूर्ण होतो ते कळत सुद्धा नाही. खेलदरीत बाबा घरी नव्हती. ते कुठे गेले हे घरच्यांना माहित नव्हते. ते गावाच्या वेशीवर एका हॉटेलच्या बाहेर अचानक दिसले. त्यांनी आम्हाला बरोबर ओळखले. म्हटलं चलायचं का बाफळ्यावर. म्हणाले चला जाऊन येऊ.
चांदवड तालुक्याचा जास्त पाऊस असलेला हा परिसर गेल्या काही वर्षांपासून सतत घटनारे पर्जन्यमान. बेफाम वृक्षतोड, ग्रीष्मात लागणारे जंगल वणवे. हरितक्रांतीच्या फेर्यात अडकलेला लहान शेतकरी. वरून पिण्याच्या पाण्याचे तोकडे नियोजन या अडचणींना ग्रासलेला. रोजगारवाढीसाठी, राष्ट्रीय महामार्गालगत मुबलक खुल्या जागा असूनही परिसरात लहान मोठे उद्योग मोठ्या प्रमाणावर आणता आले नाहीत, त्यामुळे औद्योगिक विकासातही हा परिसर मागासलेला. पिढीजात श्रीमंत, राजकीय पाठबळ असलेली मंडळी, घरात सरकारी नोकरदार किंवा कोणी ठेकेदार असलेल्यांनी आपल्या जागेवर हॉटेलचे व्यवसाय नावाचे पिक उभे केले. कोणी स्वत: तर कोणी जागा भाड्याने देऊन. काहींनी शेत बागायती करून घेतलेले ही या भागातली श्रीमंतीची व्याख्या.
छोटे शेतकरी शेतीचा हंगाम आटोपल्यावर शिरस्त्या प्रमाणे मोलमजूरी करून आयुष्य कंठणारे. बाळू पोपट पवार बाबांची स्वत:ची शेती नाही. आता वयोमानाने त्यांच्याकडून शेतीची कामे होत नाही. मुलं थोडी फार जमिन बटाईने कसतात. त्याने दोन वेळची भाकर जोडण्यापलिकडे हाती काही लागत नाही. मग बाबांचे मन अवलियाच्या सेवेत रमते. त्यांचे वडीलही मनोभावे सेवा करायचे. बाफळ्या, कोल्ह्या, कोळधेर परिसरात रानात भटकायचे. औषधी वनस्पतींची चांगली जाण होती. बाळू बाबांच्या लहानपणी ते निवर्तले.
पावसाळ्याचे चार महिने आणि नंतर हिवाळ्याचे दोन महिने संपले की निष्पर्ण सातमाळेचे डोंगर रखरखीत भासू लागतात. वनसंपदा औषधापूरतीही शिल्लक राहिलेली नाही. कोळधेर, इंद्राईचा परिसर असे मोजकेच वनपट्टे उरलेत. मोठाल्या वृक्षांची बातच नको. बाकळ्या आणि कोळधेरच्या मध्ये अर्धा किलो मिटरचा अगदी बारीकसा जंगल पट्टा परिसरातल्या अनेक वसाहतींची लाकुड सर्पणाची गरज भागवतो. मोठी झाडे ना इथे शिल्लक राहिली ना त्यांचे रोपण करून ती जगविण्याचे प्रयत्न केल्या तीस चाळीस वर्षात कोणी केले. डोळ्यांत अल्पशी हिरवाई साठवत चिंचेच्या माळावर कधी पोहोचलो हे कळेच नाही. तसा हा ठिसूळ दगडाचा मुरमाड डोंगर. याचा सर्वोच्च माथा म्हणजे एक प्रकारची भली मोठी कातळ टोपी. या कातळाला चहूबाजूंनी तिव्र उतार. सगळी माती ही काळी सूपीक माती. ही सुपिकता तिथल्या गवत झुडपांमुळे आणि त्या आश्रयाने जगणार्या सृक्ष्म जीवांमुळे लाभलेली. पावसामुळे ओलसर बनलेल्या या वाटा कमालीच्या निसरड्या बनलेल्या. मुलत: मुरमाड जंगलहीन स्वरूपामुळे हा उन्हाळ्यात भटकण्याच्या दृष्टीने सोयीचा नाही.
नासिकचा प्रांत बागलाणशी जोडणारी हा जुना व्यापारी मार्ग असू शकतो का? हे स्पष्ट होऊ शकले नाही. ही महत्वाची घाट वाट होती हे नक्की. त्यावरून घोडी जात असावीत. लमाण, बंजारे, चारणांचे तांडे आपल्याजवळच्या घोडी, बैलांवरून अल्याड पल्याड सामानाची ने आण करत असतील. काळ्या खडकाळ धोरेमुळे बैलगाडीची यातून वाट नसावी असे वाटते. ती वाट पलिकडे राहूड घाटातून नासिक-बागलाण जोडत असावी. या कारणामुळे जुन्या काळापासून बाफळ्याचा राजकीय वापर झाला नसावा. अन्यथा या डोंगराचा किल्ला, चौकी म्हणून वापर करण्यास प्रचंड वाव होता. वरचा कातळ चौबाजुंनी उभ्या कड्या मुळे संरक्षित. त्याला तिव्र मातीच्या घसार्याचे संरक्षण आणि बाकळ्याचे एकुण रूपच असे की, त्याचा माथा तळापासून वरवर निमुळता होत जाणारा. त्यामुळे किल्ला असता तर तो राखणे सोयीचे ठरू शकणारे!
आम्ही उजव्या हाताच्या बाजूने वळसा मारून उत्तर-पूर्व टोक गाठले. या ठिकाणहून चौल्हेरचा किल्ला स्पष्टपणे दिसतो. सेलबारी डोलबारी डोंगररांग ढगाळ वातावरणामुळे दिसू शकली नाही. कांचना ते जावळ्या पर्यंतचे सातमाळेच्या डोंगरांचे एका वेगळ्या कोनातून दर्शन घडते. जो लेकुरवाळा डोंगर राष्ट्रीय महामार्गावरन एखाद्या सुळ्या सारखा दिसाते तो इथून भला पसरट दिसत होता. स्पष्टच आहे की तीही एक अग्नीजन्य भिंत. डाईकची अश्मरचना. कांचना किल्ला येथून भान हरपून बघावा. त्याची या बाजूने दिसणारी बाजू म्हणजे उभा उंच कातळ.
गुहा आणि गरूड टाकं
बरोबर उत्तर-पूर्व टोकावर गरूड टाकं. खडकातून पाण्याचा अगदीच बारीकसा झिरपा. तर पलिकडे दिड फुटाचा कातळात खोदलेला चौकोनी खड्डा. तेच गरूड टाके. हे मोठं टाकू असू शकेल का? बाजूचा खडक उध्वस्त करून टाके फोडण्यात आले असावे का? इंग्रजांनी सह्याद्रीतले पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणावर नष्ट केले त्या वरवंट्यात? असे काही घडले असू शकेल का? याभागात आदिवासी योद्द्यांनी इंग्रजांना डोंगराच्या आश्रयाने सळो की पळो करून सोडणारे लढे दिले आहेतच. इंग्रजांनी केलेल्या विद्वसांचा प्रश्नही अनुत्तरीत राहणारा. असे असंख्य प्रश्न उठवत आम्ही नवनाथाच्या गुहेकडे प्रस्तान केले.
हा तिव्र उताराचा परिसर. आता येथून लूटून नेण्यासारखे असे काहीच उरले नाही. इथली झाडांची ताड पूर्ण झालेली आहे. अठरा विश्वे दारिद्र्यात खितपत राहणारी आसपासच्या वाडी वस्त्यांमधली जनता येथे शेळ्या चराईला येते. पूर्वी भरपूर वन होते. लोक गोई घेऊन चरायला यायचे. आता गाई नाही आणि मोठाली झाडेही नाहीत. बाफळ्याच्या ढोरवाटाही पुसल्याची खंत बाळूबाबा व्यक्त करतात. आम्ही डोंगरभटके म्हणजे डोंगराचे पाहूणे. वनांचे प्राणपणाने रक्षण करणारे. वन असो की, कातळखडक की तिथली हरेक वस्तू, ना खडकाला कुठले नुकसान पोचावे ना सोबत काही घेऊन जावे', अशा भावनेतून अभ्यास आवलोकन करण्यासाठी, इतिहास व संस्कृती जाणर्यासाठी डांगरास भेट देणारे. सह्याद्री आपल्यावर रूष्ट होणार नाही याची सदोदित काळजी घेणारे. पण तिथल्या सुक्ष्म जीवांना आमचा स्वभाव कुठे ठाऊक? त्यांनी हाता पायांना काही डंख दिले. मधमाशा नव्हत्या. मच्छरही नव्हते. काही तरी वेगळेच किट. तिथे त्यांची सत्ता. त्यातून वाट काढत नवनाथांचे ठाणे गाठले. वर पोहोचताच आनंद गगनात मावेनासा झाला. आम्ही एक भल्या मोठ्या गुहेसमोर उभे होतो. पुरातन काळात माणसाने सह्याद्रीच्या कातळात काहीही खोदलेले पाहणे नेहमीच एक रम्य अनूभूती ठरते. इथे तर भली मोठी गुहा कोरलेली.
विजेर्या विझतात का...
ही गुहा म्हणजे सातवाहनांच्या शैलीची आठवण करून देणारा कातळाचा एक मोठा स्तंभ मध्ये ठेऊन केलेल्या कोरकामाची आठवण करून देणारी. आतमधली बारीक वाळू सदृष्य माती हे पाण्याचे विशाल टाके असावे याची जाणिव करून देत होते. पण भर पावसात त्यात पाणी नाही म्हटल्यावर ते कशामुळे आटले असावे हे कळण्यास मार्ग नाही. ही गुहा तीन भागात विभागलेली. उजवीकडे सात व सहा फुट रूंदीचे व अडीच फुट उंची तर डावीकडे १२ फुट लांबीचे परंतू थोडे अधिक उंचीचे गुहेचे मुख. उजव्या बाजुला ती चांगली वीस फुट खोल आहे. आत आणखी चार मोठ्या खोबण्या काही माणसं आत बसू शकतील इतक्या मोठ्या पण जेमतेम आकाराच्या. ध्यान धारणे साठी आदर्शवत ठिकाण.डाव्या बाजूचे दोन मुख पुढे आत अणखी एका गुहेच्या मुखापाशी नेतात. तिथून ती आत चिंचोळी होत जाते. तिचे टोक दिसत नाही. आत सरपटत गेलो तर तिची खोली कळू शकली असती. आमच्याकडे वेळेचे नियोजन नसल्याने तो विषय घेतला नाही. शिवाय सोबत प्रशिक्षित चमु नसल्याने तिचे अंतरंग शोधण्याचा विचार बुजाला ठेवावा लागला.
आम्ही उगाचच बॅटरीचा उजेड टाकून, मार्कंडेय किल्ल्याची अलिकडे प्रसिद्ध झालेल्या दंत कथे सारखे या गुहेतही विजेरी बॅटर्या विझतात का? या प्रयोगाची गंमत केली. विजेरी विझली नाही. आत जाऊन सहा महिन्यांचा एक दिवस करणारा मार्कंडेयकथे सारखा प्रयोग करायचा नसल्याने गुहेतून बाहेर पडून शेवटच्या कातळ टप्प्याला भिडायचे ठरवले.
पाच सहा वर्षांपूर्वी बाळू बाबा शिखर माथ्यावर ज्या वाटेने गेले ती वाट सापडली. पावसाळ्यात सुद्धा त्यावर काटेरी झुडपांचे अधिराज्य. गरजेपूरते काही साफ करत आम्ही चढाईच्या टप्प्याच्या पायथ्याल पोहोचलो. उभे राहण्यासाठी इथे जेमतेम जागा. झाडीतून कुठे सरकायचे तर अंगावरचे कपडे ओढून घेणारी काटेरी झुडपे. त्यांच्याशी झुंजत पुढच्या बाजूने दिसणारा एक सोपा कातळ टप्पा निवडला. गिर्यारोहणाची उपकरणे सोबत नसल्याने चढाई मुक्तपणे करायची होती. पावसाचे सावट होते. कातळ ओला झाला तर ना चढाई होऊ शकते ना उतराई. वरचा टप्पा गाठला तरी त्याच्यावरचा कातळ कसा असू शकतो याचा काहीच अंदाज येत नव्हता.
'आदेश' आणखी एका शिखराचा
बाळू बाबा ज्या वाटेने चढले होते त्या वाटेने वर जाण्याची त्यांची इच्छा नव्हती. सुमारे पाऊण तास कुठल्या बाजुने चढाई करायची यातच गेला. आम्ही येण्यापूर्वी एक मध्यमवयीन गुराखी समोर शेळ्या चरताना दिसत होता. त्याला मोठी विनवणी करून चढाई मार्ग सांगता का, अशी विचारणा केली. ते पलिकडच्या कड्याजवळ शेळ्या राखत होते. त्यांच्यात व आमच्यात भरपूर अंतर असल्याने संवात होत नव्हता. शेवटी त्यांना जवळ येण्याची विनंती केली. शेलू गावातले दोन तरूण वर जाण्यासाठी आले होते, परंतू त्यांना चढाईचा मार्ग ठाऊक नसल्याने ते गुहेकडे निघून गेले. पंधरा मिनीटे वाट पाहिल्यानंतर गुराखी काका आले आणि त्यांनी उभ्या धारेतून वर जाण्याची वाट दाखवली.
आता आमचा उत्साह दुणावला. मागच्या महिन्यात इखार्याच्या सुळक्यावर मुक्त आरोहण केल्याने तो अगोदरच उंचावलेला होता.
त्यावेळ प्रमाणेच यावेळी देखिल नाथांची आमच्यावर पुन्हा एकदा कृपाच म्हणावी. हाता पायांची पकड घेत पंधरा फुटाची चढाई केली तोच वरून एक प्लास्टिकची दोरी लटकताना दिसली. झेंडा लावण्यासाठी वर जाणार्या भक्त मंडळींनी ही दोरी लावल्याचे स्पष्ट झाले. चाळीस एक किलो वजनाचा माणूस ही धोरी धरून वर जाऊ व उतरू शकतो. अशी ती जेमतेम मजबूतीची. शेतीच्या कामासाठी तिचा वापर होतो. परंतू ही दोरी काही कारखान्यात तयार केली जात नाही. रस्त्यावर सापडणार्या प्लास्टिकच्या पिशव्यांपासून, पोत्याच्या धाग्यापासून काही मंडळी केसांची वेणी विणावी तशा पद्धतीने तिचा दोर वळतात. बर्याचदा रस्त्याच्या कडेला झाडाला बांधून दोर विणणारे दृष्टीस पडतात. ही स्वस्तातली दोरी लहान मोठ्या कामांसाठी वापरली जाते. डोंगराच्या अवघड टप्प्यावर हिचा वापर करणे धोकादायक ठरू शकतो. आणखी महिन्या दिड महिन्यात ती उन पावसात जीर्ण होऊन जाणार हे निश्चीत.
चाळीस फुटांचा हा चढाईचा टप्पा. ठिसूळ दगड व मुरमाड मातीच्या घसार्यामुळे चांगलाच आव्हानात्मक. चढताना मातीसह खाली कोसळण्याचा सदोदित धोका. चढाईची श्रेणी सोपी असली तरी त्याचे अस्थिर रूप आणि बर्यापैकी असलेली उंची यामुळे अनूभवी, प्रशिक्षित गिर्यारोहकांनाच साध्य होणारा. वरच्या बाजुला एका झाडाचा बारीक बुंधा दिसला. त्याला गिर्यारोहणाचा दोर बांधून आम्ही आमचा चढाई मार्ग सुरक्षित केला. दीपक वर आल्यानंतर हा दोर काढून शेवटच्या कातळ टप्प्याकडे प्रस्थान केले. वरच्या भागात अतिशय दाट पसरलेली झुडपी वनस्पती. याभागात स्थानिक मंडळींचाही अतिशय नगण्य असा वावर असल्याने वरची झुडपे जनावरे व अतिक्रमणापासून बचावलेली. त्यामुळे नाना विविध प्रकारची झुडपे अगदी प्रसन्नपणे फुललेली दिसत होती. वरच्या बाजुला सर्वोच्च माथा गाठण्यासाठी आणखी एक छोटा कातळ टप्पा लागला. दाट झाडीतून वाट शोधत कातळाचा अंदाज घेतला तर त्याचे ठिसूळपण दिसून आले. भेग असलेल्या खडकावर उभे राहणे धोकादायक. त्यामुळे वरच्या कड्यात उगवलेल्या खडक पायराला दोर ओवून वर चढण्याचा निर्णय घेतला.. हा खडकात उगण्यात धन्यता मानणारा पिंपळ प्रजातीतला लहानसा पण अतिशय मजबूत असा वृक्ष. त्याला दोर लाऊन त्यातून चढाई मोठी कसरत झाली. वर शिरताना गालाला थोडा प्रसाद मिळाला. पण आमची मुक्त आरोहण मोहिम यशस्वी ठरली. शिखरमाथ्यावर पाऊल ठेऊन त्याला वंदन केले. एका अपरिचीत डोंगरावरची ही छोटेखानी चढाई आत्मिक आनंद देणारी ठरली. या चढाईचा आनंद आम्ही दुपारचे जेवण करून साजरा करण्याचे ठरवले. भल्या सकाळी तयार झालेली भेंडीची भाजी, पाच पोळ्या. घरचे लोणचे आणि पाण्याच्या दोन बाटल्या असा अगदीच छोटेखानी बंदोबस्त पोटाबा करण्यासाठी पुरेसा होता. जेवणासाठी असा दुर्मिळ दुर्गम सह्यकडा लाभला हे आमचे भाग्य होते. पंधरा मिनीटात अगदी निवांतपणे जेवण उरकले. सातमाळेच्या देदिप्यमान डोंगर रांगेचे रांगडे रूप डोळ्यात साठू लागले तशी कांचनबारीच्या लढाईची आठवण झाली.
अजी 'कांचनबारी'चे युद्द कल्पिले
इसवी सन १६७०मध्ये दुसर्यांदा सुरतेची लूट करून परतताना शिवाजी महाराजांनी मुल्हेरची मोगलांची संपन्न बाजारपेठ लुटली. सुरत दुसर्यांना लुटल्याची माहिती औरंगाबादेत पोहोचल्याची वार्ता कळताच महाराजांनी लुटीचे सामान पुढे पाठवून मोगलांचा समोरासमोर प्रतिकार केला. ही लढाई वणी-दिंडोरीची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. अस्सल साधनात या लढाईचे उल्लेख आढळतात. काही अभ्यासक कांचनबारीत लढाई झाल्याचे मानतात. फारसी साधनात कांचनबारीच्या युद्धाचा उल्लेख आढळतो. प्रत्यक्ष कोणत्या ठिकाणी लढाई झाली यावर इतिहासकारत एकमत नाही. परंतू कांचनबारीच्या लढाईचे रसभरीत वर्णन वाचायला मिळते. जर खरोखरच कांचनबारीत लढाई झाली असेल तर हा बाफळ्याचा त्याचा साक्षीदार असावा हे निश्चीत. कांचन खिंडीत महाराज स्वत: हजर होते तर त्यांच्या काही तुकड्या कांचनाच्या दोन्ही बाजूंनी सज्ज. कांचना आणि बाकळ्याच्या मधला परिसर हा मराठी फौजांसाठी दडून बसण्यासाठी अगदी आदर्शवत असा. येथून भावडबारीवरही लक्ष ठेवता आले असेल. आणि इशारा मिळताच बाफळ्याची धारखिंड ओलांडून दाऊद खानाच्या सैन्याला मागच्या बाजूने घेरणे सोपे गेले असेल. थोड्या वेळा पूरते का होईना...आम्हाला बाफळ्या कांचनबारीच्या लढाईत घेऊन गेला.
पाऊस सुरू होण्याच्या आत दोन कातळटप्पे उतरण्याचे आव्हान होते. त्यामुळे परतीची लगबग सुरू केली. पूर्व बाजूचे टोक गाठले. या भागात बाफळ्याचा माथा अगदी चिंचोळी. खालच्या बाजूने त्याची जरासुद्धा कल्पना येत नाही. इथून कोळधेर किल्ल्याचे विशाल रूप दृष्टीस पडते. भावडबारीचा हिरवाईने नटलेला घाट. पलिकडे राजधेर किल्ल्यावर पडलेला हलकाचा उजेड, साडेतीन रोडगे, इंद्राई, चांदड किल्ले डोळ्यात साठवत आम्ही परतीची वाट धरली.
नाम उत्पत्ती
बाफळ्या हे नाव कशावरून पडले असेल. बाफळ्या नावावरून काही पदार्थ आपल्याकडे प्रचलित आहेत तर आयुर्वेदात कोथिंबीर, जीरे, ओवा कुळातल्या वनस्पतीला बाफळी म्हणतात. या डोंगरावर बाफळीची प्रचूर मात्र असल्याने हे नाव पडले असेल का याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. हिच्या प्युसिडॅनम या वंशातील एकूण सु. १२॰ जातींतील दहा जाती भारतात आढळतात त्यांपैकी ही एक असून तिचा प्रसार महाराष्ट्रात (कोकण, दख्खन) सह्याद्रीत बराच आहे ही समूहाने वाढते. हिची उंची सु. १ मी. असून ती गुळगुळीत, मांसल व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ओषधी आहे. आणखी एक बाफळी हे बी असुन कुळीथासारखे चपटे असते. ही भाजी चिरून उकडून, त्यात हरभऱ्याची डाळ घालून बनवली जाते. या भाजीच्या फळांचे तेलही काढतात. पोटदुखी, जंत होणे यासारख्या त्रासांमध्ये या भाजीचे सेवन करतात. या टापूतल्या वनस्पती सह्याद्रीचा अमुल्य असा ठेवा. केवळ वहिवाट नसल्याने तो टिकून आहे. झाडाझुडपांचा अभ्यास करणार्यांनी अशा दुर्गम डोंगरमाथ्यावरच्या वनस्पतीं, गवत वेलींचा अभ्यास करण्याचे आव्हान स्विकारायला हवे. त्यामुळे काही दुर्मिळ प्रजातींची माहिती मिळू शकेल.
दोन दोस्तांना जोडणारा शहंशाह
शिखर माथ्यावरून एक वाट खाती उतरताना दिसली. शेवटचा कातळटप्पा टाळता येऊ शकतो. पाचच मिनीटात झपझप पावले टाकत आम्ही मुख्य कातळटप्पा गाठला. तिथे एका लहान झाडाला दोर ओवून एकमेकांना सुरक्षादोर देत उतराई सुरू केली. हा भाग दगड मातीयू्क्त असून मातीच्या सोबत दगड घरंगळून येतात. त्यामुळे उतराईचा मार्ग काळजीपूर्वक निवडणे आवश्यक होते. इखार्या प्रमाणेच आम्ही येथे एकमेकांस सुरक्षादोर पूरवत उतराई केली. शेवटच्या पंधरा फुटांवर जोरदार पावसाने गाठले. दोर सोडून घेतल्याने सावकाशपणे तो पार करणे आवश्यक होते. भिजलेल्या खडकावर पाय पकड घेत नव्हते. सुदैवाने थाड्याशा प्रयत्नातून पायाचे आधार मिळत गेले आणि उतराई सुरक्षितपणे पूर्ण झाली.
आता बरीच दमछाक झाली होती, तेव्हा पुन्हा गुहेत जाऊन थोडे जलप्राशन केले. कांचना पासून धोडप पर्यंतचे डोंगर किल्ले जणू आपले दिव्य रूप दाखवित पावसात भिजत उभे होते. इथून चाळीस फुटांचा तिव्र उताराचा घसारा दमछाक करणारा ठरला. पावसामुळे इथली सुपिक माती निसरडी बनली होती. सोबत आधाराला काठी नसती तर उतरणे फार जड गेले असते. कसा बसा हा उतार पार केला तर पवार बाबा खाली दगड ओडोशात आमची वाट बघत उभे होते. आता अम्ही डाव्या बाजूने बाफळ्याला वळसा मारून चिचाच्या माळावर आलो. अगदी खाली मान करून भावडबारीचा घाट पाहताना त्यावर धरलेला ढगांचा पुंजका मनोहरी भासत होता. भर पावसात फोन, कॅमेरे काढेस्तोवर तो बाजुच्या डोंगराकडे सरकला.
आम्ही उतरून आलो आणि बाफळ्याचा माथा ढगांनी घेरला. थोड्या वेळात तो पुर्ण झाकोळला. नंतर ढग बाजूला झाले आणि त्यांनी निळे गुलाबी रंगाचे अभ्र त्यावर धरले. मावळतीत एखाद्या डोंगराचा माथा बघणे भान हरवून टाकणारा अनूभव ठरतो. त्यात आकाशात निळ्या, गुलाबी रंग छटा म्हणजे द्विगुणीत करणारा आनंद. त्या आनंदात हरखून गेलो ते भावडबारी घाटातल्या वाहनांच्या आवाजांनी जाग आणली. पवार बाबा आणि त्यांचे सवंगडी जमिलबाबा यांच्याशी थोड्या गप्पाटप्पा झाल्या. जमिल बाबांची चिंचोळी खोली बघता आली. त्यात ते अंघोळपाणी, स्वयंपाक आणि विश्राम कसे करत असतील? एकच माणूस त्यात राहू शकतो इतकी ती चिंचोळी. डोंगरात रमलेले हे दोन डोंगरयात्री आयुष्याच्या संध्याकाळी रोज भावडबारीच्या घाटात भेटतात आणि सूर्य मावळल्यानंतर एकमेकांचा निरोप घेतात. कधी तिथेच मुक्काम तर कधी खेलदरीत आपल्या कुटुंब कबिल्यात जाऊन रमतात. बाफळ्याचा डोंगरमात्र त्यांचा पिच्छा सोडत नाही. तेही त्याचा पिच्छा सोडत नाहीत. ते दोघेही एकमेकांच्या बद्दल बोलत असतात. शहंशा ए भावडबारीचा अवलिया या दोन फाटक्या दोस्तांना बाफळ्याशी बांधून ठेवतो. पैशा पलिकडच्या श्रीमंतीत न्हाऊन देण्यासाठी.
- डोंगरयात्री, ११/७/२०२१