|
Thanapade temple |
एखाद्या वैभवाची अवदशा होते तेव्हा त्याला, 'काळाचा महिमा' म्हंटलं जातं. इथे माणूस काळाचा फास हातात धरून उभा आहे. इथल्या तीन मंदिरांच्या भोवती त्याने तो आवळला आहे. अगोदर परकीय आक्रमकांच्या रूपाने आणि आता स्वकीय बनून! कोणी तरी जाऊन सांगायला हवं, भारत आता स्वतंत्र झाला आहे, सोडा तो काळाचा फास...करा ती तीन मंदिरे मुक्त. हवं तर नका करू त्यांची डागडूजी किंवा पूनर्निमाण, तिथल्या शिवशंकराची अप्रतिष्ठा करू नका. तिथला बुद्ध, महावीर किंवा जो इष्ट देव असेल त्याला असा कचर्यात लोटू नका. गणपती, देवी-देवता, यक्ष, सूरसुंदर्या, किर्तीमुख, सिंहादींच्या मुर्ती केरापासून मुक्त करा...
नासिकच्या हलसुल तालुक्यातील ठाणापाडा गावची ओळख म्हणजे तिथला इतिहासप्रसिद्ध खैराईचा किल्ला. कोणे एके काळी हा प्रसिद्ध अशा रामनगर साम्राज्याचा भाग होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या उत्तर काळात हा किल्ला जिंकून घेतल्याचे उल्लेख आहेत, त्याला त्यांनी भेटही दिली होती. त्यांची पहिली सूरतेची स्वारी याच प्रांतातून झाली आहे. गडावर अजूनही चहूबाजूंनी भक्कम तटबंदी आहे. दोन तोफा ज्या उन वार्याच्या भरवशावर पडलेल्या आहेत. त्यातल्या एका तोफेवर काहीशी देवनागरी अक्षरे दिसतात. ती खालच्या बाजूला असल्याने वाचता येत नाहीत. किल्ल्या प्रमाणेच ठाणापाड्याची ओळख ठरावी अशी ही तीन मंदिरे आज कमालीच्या जिर्णशीर्ण दशेत आहेत. त्यातली दोन बर्यापैकी उभी आहेत. परंतू सांगताना अंगावर शहारे येतात, त्यांचा उपयोग चक्क...कचरा कुंडी म्हणून केला जात आहे. तिसरे मंदिर पूर्णपणे ध्वस्त झाले असून त्याच्या अनेक मुर्ती काळाच्या दयेवर उघड्यावर ऊन वारा खात आहेत.
|
lion the symbol of Supreme ruler... |
५ फेब्रुवारी २०२१ या दिवशी ठाणापाड्याला केवळ खैराई किल्ला बघण्यासाठी भेट दिली होती. त्यावेळी ज्याठिकाणी आम्ही आमची गाडी उभी केली होती त्याच ठिकाणी घरांच्या कोंढावळ्यात ही मंदिरे निघाली. तेव्हा किल्ला बघण्याचा उद्देश होता. म्हणून फार थांबता नव्हते आले. स्थानिकांकडून चौकशी करूनही गावातल्या या वैभवशाली मंदिरांची माहिती मिळाली नव्हती. दूर्गवीर रोहीत जाधव हा तिथे भेट देऊन आला. दीपक पवार आणि दीपक मनोहर अशी आमची छोटेखानी तुकडी दुपारी उशिरा ठाणापाड्याच्या दिशेने निघाली. नासिक ते ठाणापाडा हे एका बाजूने ७० किलो मिटरचे अंतर. गिरणारे सोडलं की पुढून सगळा प्रवास हा डोंगराळ भागातला. वाघेरा किल्ल्याला लांबून नमस्कार करून वाघारे घाटाने हरसूल आणि तिथून ठाणापाडा गाठेस्तोवर दुपारचे साडे चार वाजून गेले. थंडीच्या गारठ्यात चहाची हूक्की येऊनही, 'अगोदर मंदिरे पाहून, मावळतीच्या सूर्य किरणात छान न्हाऊन निघतील तेव्हा त्यांची उत्तम छायाचित्रे टिपू', असा विचार करून आम्ही गावच्या मुख्य बाजारपेठेतल्या मशिदी समोरच्या रस्त्यावर दाखल झालो. हा तसा वर्दळ कमी असलेला भाग. तिथेच गाडी उभी केली तर कळलं, बाजूच्या बोळकांडीतून आत जावं लागेल. बोळ तर काही दिसली नाही, पण काही घरांची एक चिंचोळी वाट दिसली. आत दाटीदाटीने घरे होती. एका घराच्या ओसरीतून गोठ्यात व तिथून अक्षरश: अडगळीच्या सामानातून वाट काढून पुढे जातो तर तिथे पुन्हा घरांची दाटी. त्या दाटीत डाव्या बाजूला मंदिर. अगदी थक्क करणारं दृष्य.
|
beleaguered state... |
या मंदिराचे खांब उत्तम स्थितीत आहे. सुबक सफाईदारपणे कोरलेले सहा मजबूत खांब, गंभारा नी गर्भगृहावरचे छत कोसळलेले. अंतराल पूर्णपणे उधवस्त त्यामुळे मुख्य प्रवेशद्वार आता अस्तित्वात नाही. गर्भगृहाचे द्वार उत्तम दशेत. कळसाचा भला मोठा भाग दाराच्या समोरच पडलेला. देवळात एकही देवाची मूर्ती नाही. या मंदिराचा वापर कचरा कुंडी म्हणून केला जाताना दिसला. मंदिर इतकं सुंदर आहे की, त्या कचरा कुंडीची तमा न बाळगता आम्ही आत शिरून त्याचे अवलोकन केले. तोच तिथले उपसरपंच अशोक कुंभार दाखल झाले. त्यांना विचारले की, ही मंदिर कसले, तर ती कुठल्या देवाची हे काही कळत नाही. बुद्द मुर्ती असावी, गणपती, हनूमान, शिवपिंड होती असं समजतं. वाडवडिलांकडूनही या मंदिरांच्या ईष्ट देवतांबद्दलची कोणती माहिती मिळाली नव्हती असे त्यांनी सांगितले. या मंदिरांची त्वरीत स्वच्छता करायला हवी. हवं तर आम्ही काही दुर्गसेवक पाठवू असं जूजबी बोलून आम्ही मंदिर चहूबाजूंनी न्याहाळले तोच घरांच्या दाटीत आणखी एक मंदिर असल्याची माहिती मिळाले. या मंदिराचा मुख्य प्रवेशमार्ग अडगळीचे सामान टाकून बंद करण्यात आलेला आढळून आला. केवळ एक अडीच तीन फुटांची जागा आत कचरा फेकण्यासाठी ठेवल्याचे आढळून आले. आता नेहमीच कचरा फेकला जात असावा असे एकूण प्रकार पाहून स्पष्ट झाले. या दुसर्या मंदिराची तीच गत. धत कोसळलेले, याला आठ मजबूत असे उत्तम स्थितीतल कोरीव स्तंभ. गाभार्यात अर्थातच मुर्ती नव्हती. आपण थांबू शकत नाही इतका तो कचर्याचा ढिग होता. एका ठिकाणी एक सुंदरसा कोरीव दगड दिसला. त्यावर हत्ती आणि व्यालाच्या अगदी बारीक पण अतिशय देखण्या आकृती कोरलेल्य आढळल्या. सूर्य मावळण्याच्या आत तिसरे मंदिर बघणे गरजेचे होते. मुख्य रस्त्यावर आलो तर तो गाव कमालीचा स्वच्छ दिसले. खरं तर अवघा ठाणापाडा हे स्वच्छ गाव आहे. रस्त्यावर कुठेच कचरा टाकलेला आढळून आला नाही. मग या मंदिराचा वापर लोक कचरा टाकण्यासाठी का करत असावे? या विचाराने मन सुन्न झाले.
|
fallen relics... |
अशोक भाऊंना घेऊन गावच्या बाहेर उत्तर बाजुला विहीच्या जवळ तिसरे मंदिर दिसले. या मंदिराचे ना स्तंभ ना छत केवळ त्यांचे भग्नावशेष आणि देवी देवतांच्या मुर्त्या माळावर विखुरलेल्या. मंदिराचे जोते अजून शाबूत आहे. एक मोठे शिवलिंग, त्याच्या मध्ये लिंगा ऐवजी कुठला तरी कोरीव स्तंभ रोवलेला तर आत चाफ्याचे झाड उगवलेले. समोरच्या बाजूला अलिकडे बांधलेली एक घुमटी दिसली. त्यात देवीच्या रूपात शेंदूर लावलेली एक मुर्ती ठेवण्यात आलेली तर बाहेरच्या बाजूला गणपतीच्या तीन मुर्त्या, शिवलिंगाशी मेळ खाणारा मोठा फुटलेल्या दशेतला नंदी आणि एक देखणी आयाळ असलेला सिंह दिसला. एक विरगळी सारखा दिसणारा तुकडाही दिसला. सुदैवाने हे मंदिर कचर्यापासून मुक्त होते. शिवपिंडीच्या आकारावरून हे मंदिर मोठे असावे याचा अंदाज बांधता येतो.
|
used as gargabe bin ...😠 |
अगोदर पाहिली ती कचर्याने भरलेल्या दोन मंदिरांची स्थिती उत्तम आहे. त्यावरची झाडे वेली तातडीने काढून आतला कचरा साफ करण्याची आवश्यकता आहे. या तिनही मंदिरांचा ताबा विनाविलंब पूरातत्व विभागाने घेण्याची अवश्यकता आहे. ग्रामपंचायतीच्या मदतीने अगोदर कचरा कुंडी बंद करून तिथल्या लोकांना कचरा टाकण्याची व्यवस्था करून द्यावी. या मंदिरा भोवतीची घरे अन्यत्र उठवून मंदिरांचा परिसर मोकळा करण्याची आवश्यकता आहे. इथल्या रहिवाशांना नव्या ठिकाणी घरांना जागा दिली तर युद्ध पातळीवर या मंदिरांचा परिसर मोकळा करता येईल. त्यानंतर मंदिराचे दगड गोळा करून एक ठिकाणी आणावेत आणि मग त्यांच्या जिर्णोद्दाराचा कार्यक्रम हाती घ्यावा.
|
neatly carved lion near the broken Nandi... |
छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय जोखडातून स्वराज्याचा रथ हाकताना या परिसराचे महत्व ओळखले होते. गूजरातच्या सीमावर्ती भागात असलेला किल्ला त्यांनी जिंकून घेतला होता. पूर्व काळात दळणवळणा बरोबरच या भागातून व्यापार उद्यम होत असणार यात शंका नाही. खैराई सारखा टूमदार वनदुर्ग पाहून त्याची प्रचिती येते. हा परिसर बराच काळ जव्हार किंवा रामनगर राज्याचा भाग असावा. मोगलाईचा वरवंटा येथे फिरलेला असणार हे मंदिराची भग्न दशा पाहून स्पष्ट होते. परिसरातील नागरिकांनी यास दुजोरा दिला. मंदिराचाच्या खांबाचा एक भाग आता मारूती मंदिरात हलविण्यात आलेला आहे. त्यावर एक अक्षराचा शिलालेख आहे. देसी..गड अशी ती अक्षरे. गडच्या अगोदरचे अक्षर म वाटते त्यावरून देसीरामगड सदृष्य अक्षर तयार होते. कोणा गुजरात वंशीय राजाच्या काळात तर खैराईचे हे नाव नसावे ना? त्याच्या काळात यातले एक मंदिर बाधलेले असू शकते हे त्यावरील जैन पद्धतच्या शिल्पांवरून स्पष्ट होते.
|
jain deity laying by the roadside... |
या मंदिरांची स्वच्छता करून त्यांचा परिसर मोकळा केला तर हे वैभव पाहण्यासाठी इतिहासप्रेमींच्या भेटी या परिसरात सुरू होतील. खैराई दुर्ग पाहण्यासाठी येणारी मंडळी या मंदिरांना भेट देण्याची संधी दडणार नाही. गावात इतिहास आणि डोंगरभटक्यांच्या रूपाने पै पाहूणे येऊ लागतील तसे इथल्या चलनवलनालाही हातभार लागेल, तेव्हा स्थानिकांनी आपल्या गावचा हा अतिशय अनमोल असा ठेवा आता जोपासायला हवा.
|
way to the tample from here |
दगड खाणींना उपयूक्त
या एकुण परिसराची एक अडचण म्हणजे केवळ पावसाच्या भरवशावर होणारी शेती. पावसाळ्यानंतर हाच शेतकरी मोलमजूरीसाठी बाहेर पडतो. त्यातल्या काही जणांना हालाखीच्या दशेत शेतीवाडी विकावी लागली आहे. संपुर्ण परिसर प्रचंड पावसाचा असून चहूबांजूनी डोंगरांनी वेढलेला आहे. गावात खडकाळ जमिनीचे फार मोठे प्रमाण आहे. डोंगर फोडूनच बांधकामासाठी दगड वापरण्याचा अभिशाप लाभलेल्या नासिक जिल्याला या निमीत्ताने जमिनीतून दगड काढण्याची एक सुवर्ण संधी आहे. त्यामुळे ज्या शेतकर्यांच्या जागेत खडक आहे, त्यांना तिथे जमिनीत दगडाची खाण चालविता येईल. याच खाणीत त्यांनी पाणी साठवणीची व्यवस्था केली तर खाण संपल्यानंतर धरणातला गाळ आणून आपल्याच जमिनीत शेतीही करता येईल व आपल्याच जमिनीत वर्षभर पूरेल इतके पाणीही साठवता येईल. त्याकरिता जमिनीतला दगड विकून आवश्यक पैसा उभा राहणार हे सांगणे न लागे. शासनालाही महसूला परी महसूल मिळेल, शिवाय डोंगर फोडून केल्या जाणार्या खाणांवर हा नामी उपाय असेल. सद्या नासिकमध्ये डोंगर वाचवा चळवळ वेगात सूरू आहे. त्यामुळे डोंगर आणि त्यावरचे जंगल आणि डोंगरामुळेच उदगम पावणार्या नद्या नी नद्यांच्या पाण्याचे स्त्रोत वाचविता येतील. याचा उपयोग तमाम जीवसृष्टीला होईल, त्यात माणसाचा अग्रक्रम राहील. नुकसान तर कोणाचेच होणार नाही हे नक्की. ठाणापाड्याच्या तीन जीर्ण मंदिरांकडून आपल्याला ही सुबूद्दी मिळेल तो सूदिन.
या निमीत्ताने चार्ली चॅप्लीनच्या चित्रपटातला एक प्रसंग या निमीत्ताने आठवला. तो हिटलरच्या सैन्यातला सैनिक असतो. त्या चौकीवर तो एकमात्र रक्षक सैनिक म्हणून काम पाहत असतो. त्याला तसे आदेश त्याच्या कप्तानाने दिलेले असतात. त्याचं काम एकच बंद डब्बा फोडून जेवण करायचं. जाड केसाळ कपडे घेलायचे आणि आकाशात बंदूकीच्या फैरी झाडायच्या. एक विमान आकाशातून येतं. तो जेवत असतो. डब्बाबंद अन्नाचा एक डबा नुकताच फोडलेला असतो. तो फोडून तो डब्बा तो बाहेर भिरकावतो. डब्ब्यांचा डोंगर झालेला असतो. तो डब्बा डब्ब्यांच्या शिखरावरून खाली घरंगळत येतानाचे दृष्य दाखवले आहे. आणि मग तो विभानाच्या दिशेने गोळ्या झाडतो. विमान गोळ्या चुकवतो. वैमानिकाच्या लक्षात येतं, युद्ध संपलेलं आहे. इथे शत्रुची कोणतीच तुकडी उरलेली नाही. तो उतरून त्या चौकीजवळ येतो आणि विचारतो, कोणावर गोळ्या झाडत आहेस. हिटरल सारखीच आपरी मिशी असलेला चार्ली म्हणतो, शत्रूवर. अरे राजा युद्ध संपलं आहे. जर्मनी हारली आहे. आता आपलीच सत्ता आहे इथे. हा अवघा प्रसंग विनोदी अंगाने दाखवला आहे. ठाणापाडच्याच्या मंदिरांचीही काहीशी तशीच गत आहे. काळाने मंदिरा भोवतीची मगरमिठी केव्हाच सैल केली आहे. परंतू मंदिराच्या नशिबास कळेना, या मंदिराचं अजूनही उत्पीडन करायचे की त्याला आता मुक्त करायचे.
चला आपल्या पैकी कोणी तरी जाऊन हलवू या...दु:स्वप्नातून जागं करू या...मंदिराची कचराकुंडी बंद करू या. त्यातले जाळे कोळिष्टके काढू या...त्यावरच्या उगलेल्या वेली, वनस्पती काढू या...जमलं तर चहुबाजूंनी आवळलेला श्वास थोडा मोकळा करू या...ठाणापाड्याचं खरे वैभव जितका खैराईचा किल्ला आणि त्या भोवतालचं जंगल आहे तितकीच ही तीन मंदिरे.
।।जय हो।।
|
outter portion demolished and blocked with scrap material |
|
opening kept to throw garbage |
|
residence around the temple |
|
the masjid road of thanapada kept neat and clean |
|
the third of the temple site of Thanapada |
|
big shivlinga |
|
destroyed Goddess... |
|
sculptors laying in the open... |
|
shree Ganesh |
|
diety at the recently built ghumti |
|
oneword stone inscription denoting letters Desi x x gad... |
|
sordid state: both temples used for garbage... |
|
fine carved Elephants and Vyalla and Goddess... |
|
unbearable garbage... |
|
very nicely carved pillars still intact. |
|
the entrance of the first temple |
|
scrap storage |
|
hidden by the creepers and shrubs |
|
stone inscription pillar kept at the Hanuman temple |
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1127419254670397&id=1321972767
https://m.facebook.com/story.php?story_fbid=993831378214335&id=1321972767