Monday, April 25, 2022

कात्राबाईची घळ

 

 कात्रा घळीचेमुखकमल...त्यातून दर्शन रतनगड, खुटा, शिपनूर, अ - म - कुचे!

कात्राबाई, ही आजवरची ज्ञात असलेली सह्याद्रीतली सर्वांत उंच घळ. आमच्या समोर तिन प्रमुख आव्हाने होती. ही वापरातली वाट नसलेल्या सुट्या दगड शिळांच्या उत्तूंग नदी मार्गाने उतराई करायची. चाळीशी पार केलेल्या तापमानाने अवघा महाराष्ट्र होरपळत असताना, ही कडकडीत उन्हातली भटकंती आणि तिसरे प्रमुख आव्हान ठरणार होते ते मधमाशांचे पोळे. पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने संपुर्ण मोहिमेसाठी लागणारा पाण्याचा भार पाठीवर वाहून न्यायचा म्हणजे गिर्यारोहण साहित्य आणि खाण्या पिण्याच्या ओझ्यासह हे वाढीव ओझे. सह्याद्रीत एखादा डोंगर सर करायचा तर त्या सोबत डोंगरा इतकी आव्हाने सर करावी लागतात, 'हा आव्हानांचा डोंगर आमच्या चंद्रकोर ट्रेकर्सच्या ९ जणांच्या चमूने 'ठरल्या वेळेत' सर केला', त्या शोधयात्रेचा हा वृत्तांत...

सह्याद्रीत अशा नाळा ठिकठिकाणी आपले भेदक सौंदर्य पसरत उभ्या आहेत. माणसाला जेवढे आकर्षण या डोंगरांचे, जेवढे आकर्षण त्याच्या शिखराचे, प्रस्तरभिंती नी सुळक्यांचे तितकेच आकर्षण या नाळांमधल्या ऐतिहासिक खुणा शोधण्याचे. या नाळा पावसाचं पाणी वेगाने खाली वाहून नेतात. ढगांच्या या जननीच. यांच्या गर्भात काही वेळेला ढगांची निर्मीती सुद्धा होताना दिसते. मग ते ढग डोंगरांला तलम मखमली पांढरी शाल ओढतात. असे स्वर्गीय दृष्य सह्याद्रीची विशेष ओळख...

Warning: Katrabai ghal is not a regular mountain route. It is a difficult level expedition. It can be descended using mountain gears. It shall require trained mountaineers. It is not a place to organise treks. It will be very risky to take Untrained people over there. After the technical patches the descend is steep through a fast and deep river source. This complete area is full of unstable rocks. There is thick and remote forest cover in this area hence prone to beehives. Water source is only midway or at the base. 

कड्याचे दगड निखळून यांच्यात मोठमोठे शिलाखंड पडलेले आढळतात. पावसाच्या पाण्यामुळे गोल गुळगुळीत झालेल्या दगडांची तर अगदी नदीच यातून वाहते की काय असे वाटावे. अफाट असा शैल पसारा यांच्यात समावलेला दिसून येतो. जिथे काही सोप्या नाळा पूर्वपार लोकांनी डोंगराच्या अल्याड पल्याड ये जा करण्याचे मार्ग म्हणून वापरले तिथे काही नाळा या अतिशय भेदक, भयकारी. यांच्या वाटा दुर्घट. माणसांची ये-जा त्यातून अशक्य. त्यातून केवळ पक्षीच जाऊ शकतात. अशा एखाद्या नाळेने खुणावले तर? रतनगडवर बारा पायर्‍यांच्या शोधयात्रेवर असताना दिवंगत गिर्यारोहक अरूण सावंत यांना कात्राबाईच्या नाळेने तिच्या भेदक सौंदर्याने आकर्षुन घेतले. मग आघाडीचा गिर्यारोहक सूरज मालूसरे यांच्यासह त्यांच्या ९ जणांच्या चमूने ४ जानेवारी २०१३ला या घळीचे प्रथमावरोहण केले. या चमूत ४ स्थानिक गिरीजनांचा सहभाग होता.
कात्राबाई खिंडीला जोडणारी मुड्याची नयनरम्य डोंगरधार भाद्रपदात अशी हिरवाईने नटते. मागे दिसतो तो उत्तूंग उभा गवळदेव.
कात्राबाई खिंडीला जोडणारी मुड्याची नयनरम्य डोंगरधार भाद्रपदात अशी हिरवाईने नटते. मागे दिसतो तो उभाउ त्तूंग गवळदेव.

कोकण आणि देश अशी विभागणी करणार्‍या सह्याद्री पर्वताच्या तीन उपशाखांनी महाराष्ट्र व्यापला आहे. त्यात सर्वाधिक उंचीचे डोंगर हे हरिश्चंद्रगड - बालाघाटाच्या डोंगररांगेत आढळतात. १६४६ मिटर  उंची असलेले कळसुबाई डोंगराचे शिखर हे सर्वोच्च. हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई यांच्या मध्ये आणखी एक आडवी गेलेली लघुरांग आहे जिचा विस्तार शिरपुंज्याच्या भैरवगडापासून आजा पर्वता पर्यंत झालेला आहे. या रांगेतले गवळदेव हे १५२२ मिटर उंचीचे महाराष्ट्रातले तिसरे सर्वोच्च शिखर. त्यालाच खेटून पूर्व बाजुस घनचक्कर हे १५०९ मिटर उंचीचे चौथे सर्वोच्च शिखर. त्याला लागून मुड्याचा डोंगर असाच तोलामोलाच्या उंचीचा तर त्याला खेटून असलेला कात्राबाईचा डोंगर म्हणजे महाराष्ट्रातले उंचीने दहाव्या क्रमांकाचे शिखर. उंची १३९८ मिटर म्हणजेच ४५८७ फुट. विस्ताराने अतिशय लहान असलेल्या भैरवगड ते आजा पर्वता दरम्यान उंचच उंच डोंगरांची एक सलग अशी डोंगर मालिकाच उभी. करंडा आणि रतनगड हे या रांगेतले तितक्याच तोलामोलाच्या उंचीचे डोंगर. रतनगड तर डोंगरभटक्यांचा अत्यंत आवडीचा किल्ला.

कळसुबाई प्रमाणेच एका स्त्री पात्राचे मिथक कात्राबाई डोंगराशी जोडले गेले आहे. 'देवत्वाचा स्पर्ष झालेल्या कळसुबाईची एक निस्सीम भक्त', अशी कात्राबाईची ओळख, तिच्याच नावाने हा डोंगर ओळखला जातो. साम्रद-रतनगडवरून पाचनईकडे जाणार्‍या वाटेवर हिच्या खिंडीत काही जुन्या शेंदूरचर्चित मुर्ती आढळतात. यातली दगडात कोरलेली उभ्या स्थितीतली मुर्ती ही कात्राबाईची असल्याची मान्यता आहे. परिसरातले गिरीजन नित्यनेमाने कात्राबाईच्या मुर्तीची पूजा करण्यासाठी येतात. सह्याद्रीतल्या डोंगर देवांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं आकाशाशी असलेलं नातं. यांच्यावर छताची आवश्यकता नसते. खुलं आकाशच त्यांचं छत. उन वारा पावस यांच्यावर सतत अभिषेक करत असतात. ही देऊळं भक्तांसाठी कायम खुली. घरात सुखाचा किंवा दु:खाचा प्रसंग असला तर या देवांची हमखास आठवण काढली जाते. घरात नवं बाळ जन्मलं, शेतात नवं अन्न उगवलं. काही गार्‍हाणं असेल काही मागणं असेल तर या देवांना स्थानिक गिरीजन मंडळी कृतज्ञतेने भेट देतात. प्रसाद, पैसे, वस्त्र वाहतात. त्यांचे आपल्यावर कृपाछत्र राहो म्हणून अवघड कडे कपारीत वसणार्‍या देवांवर गाढ श्रद्धा ठेवतात. नी समाधानाने घरी परततात. 

कात्रा खिंडीतून शिखराकडे जाणार्‍या वाटेवर कारवीच्या दाटीत विराजमान कात्राबाईचे देऊळ

पावसाळ्यात या देवळाला हिरवा दागिना मढलेला असतो...

चंद्रकोर ट्रेकर्सने या घळीच्या उतराईचे नियोजन ९,१० एप्रिल २०२२ या दिवशी केले. हेतू हा की, या घळीच्या निमीत्ताने आजूबाजूच्या प्रसिद्ध घाटवाटांचे अवलोकन करायचे. कात्राच्या डोंगरावर पाण्याचे साठे असू शकतील का? काही ऐतिहासिक खाणाखुणा आढळतात का? घळीच्या बाजूने काही राजकीय टेहाळणी वगैरे झाली असेल का? याची पाहणी करायची. गेल्या महिन्या भरापासून या मोहिमेचे नियोजन होत होते. सहभागींच्या तारखांचा मेळ जमवताना कालापव्यय होत होता. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही घळ पार करणे गरजेचे होते. त्यात पुढच्या काही तारखांचे मेळ बसेना म्हणून भर उन्हात हिचा मुहुर्त निघाला. मुहूर्तही केवढा सुंदर, दुर्गाष्टमी आणि रामनवमी.

१२२ वर्षातील एप्रिल महिन्यातले सर्वाधिक तापमान - साम्रद ३९, ४० अंश सेल्सियस.


कडकडीत उन

एप्रिल २०२२ - महाराष्ट्र १२२ वर्षातील विक्रमी उन्हाने अक्षरश: होरपळतोय. बर्‍याच शहरात उन्हाच्या प्रकोपामुळे रस्ते लवकर निर्मनुष्य असल्यागत भासत आहेत. अगदी दुचाकी चालवायचं म्हटलं तरी मिनीट मिनीटभर उन्हात थांबवत नाही. शरीराच्या उघड्या भागाला चटका बसलाच म्हणून समजा. अशा कडकडीत उन्हात या भटकंतीचा योग जुळून आला. खरं तर सह्याद्री भटकंतीचा योग जुळून येणं महत्वाचं. हवामान टोकाचे असेल तर डोंगरयात्रा टाळल्या जाऊ शकतात पण त्या टाळायलाच हव्यात असे नाही. बर्‍याचदा सुखकर हवामान अचानकपणे बदलते तेव्हा आपल्याला त्याचा सामना करावाच लागतो. सह्याद्रीच्या आश्रयाने महाराष्ट्राच्या भूमिपूत्रांनी सर्व प्रकारच्या विपरीत हवामानात क्रुर आणि बलाढ्य परकीय शत्रुंशी लढे दिले. हवामानाचे भय बाळगून युद्द कधी थांबले नाही. उलट परकीय शत्रुंना सह्याद्रीच्या जोडीने बर्‍याच प्रसंगात विपरीत हवामानात अनपेक्षितरित्या पकडून त्यांची कोंडी केली म्हणूनच हिंदवी स्वराज उभे राहण्यास मदत झाली. गिर्यारोहण किंवा भटकंतीच्या मनस्वी मोहिमा इरसाल घुमक्कडांना हवामानाचे कारण पुढे करून टाळून नेणे कधी शक्य तरी होऊ शकते का! तुमच्या मनाची तयारी असावी, तेवढे पूरे. त्यासाठी स्वत:वर विश्वास हवा आणि चमू ताकदीचा आणि नियोजन तगडे.

प्रसाद कुलकर्णीने चंद्रकोर ट्रेकर्सची कमान सातत्याने अनगड अवघड वाटांच्या भटकंती आयोजित करून समर्थपणे सांभाळली आहे. अंजनेरीच्या त्याने सर्व वाटा केल्या आहेत. रतनगडाची आव्हानात्मक प्रदक्षिणा नुकतीच पूर्ण केली. पावसाळ्यापूर्वी कात्राबाईच्या घळीचा बेत तडीस नेण्याचा त्याचा मनोदय होता. त्याच्या अंजनेरीच्या नंदीच्या धारेच्या शोध मोहिमेत सहभागी होण्याचा योग आला होता. त्यावेळेला ती धार सापडली नाही म्हणून मग आम्ही धोदातीच्या अवघड घळीचे प्रथम आरोहण केले होते.

अरूण सावंत यांच्या नेतृत्वाखाली या घळीचे प्रथम आवरोहण करणार्‍या चमूचा आघाडीचा गिर्यारोहक सूरज मालूसरे या शोधयात्रेत सहभागी होण्यास तयार झाला. कात्राबाईच्या घळीचे सुक्ष्म आवलोकन करण्यासाठी ही मोहिम उपयोगी ठरेल असे त्याने सहभागी होण्यामागचे कारण स्पष्ट केले. वैनतेयच्या डोंगर बचाव दलाचा आघाडीचा आरोहक रोहित हिवाळे हा अंजनेरीच्या धोतातीच्या घळीच्या आरोहण चमूचा मुख्य आरोहक सोबतीला होता, त्यामुळे आणखी दोघे तांत्रिक आरोहक घेऊन बारा जणांचा मोजका चमू नेण्याचे नियोजन झाले. सहभागीं पैकी तिघा जणांचे वेळेचे गणित न जुळल्याने नऊ जणांचा चमू सज्ज झाला. प्रसादने व्हॉट्सअॅपवर यासाठी स्वतंत्र समूह तयार केले. नियोजनाचे काम महिन्याभरापासून सुरू होते. माझा समावेश अगदी शेवटच्या आठवड्यात झाला. ही मोहिम अवघड श्रेणीची असल्याने गिर्यारोहणाचा विशेष करून प्रस्तर आवरोहणाचा अनूभव गरजेचा होता. कडकडीत उन्हे, भरपूर उंची अशी स्थितीत भरपूर सामान वाहून न्यावे लागणार होते. आणखी एक अडचण म्हणजे कात्राबाई डोंगरावर पाणी नाही. खिंडीत एके ठिकाणी टाकं असल्याची माहिती मिळाली पण त्याचा ठावठिकाणा कोणालाही माहित नव्हता, त्यामुळे त्या भरवशावर न राहता रतनगड - पाचनई वाटेवरच्या वाघ टाक्यातून पूरेसे पाणी वाहून नेण्याचे नियोजन करण्यात आले. 

आमच्यापैकी अनेकांनी कात्राबाईच्या डोंगराला एकाहून अधिकवेळा यापूर्वी भेट दिली आहे. त्याची उंच चढाई भर उन्हात कशी ठरेल याचा अंदाज होता. सकाळच्या वेळेला लवकर चढाई सुरू करणे ईष्ट ठरणार होते, परंतू मुंबापूरीतून चौघे जण येणार असल्याने भल्या सकाळी त्यांचे पायथ्याला पोहोचणे अशक्य होते. त्यासाठी रात्रीच घर सोडण्याचा पर्याय होता, परंतू प्रवासाचे साधन सार्वजनिक वाहतूकीचे असल्याने वेळेचे गणित जुळत नव्हते. मग प्रसादने सुटसुटीत नियोजन आखले. तो स्वत: अनेक वर्षे कल्याणला राहिल्याने पहिल्या लोकलने निघा, असे त्याने सुचविले. नासिक आणि मुंबई असे दोन चमू घोटीत भेटण्याचे ठरले. येताना सगळ्यांनी दुपारचे जेवण उरकून यायचे. तिथून तात्काळ निघायचे आणि साम्रद गाठायचे. प्रवासाच्या ताळमेळात हे अगदी योग्य होते. पण त्यामुळे भर दुपारी चढाई सुरू करावी लागणार होती, ती करण्या वाचून गत्यंतर नव्हते. आणि ते झालेही तसेच.

घोटीला लोहमार्गावर वाहतूकीसाठी नवा पूल झाल्यापासून आता गावात जाण्याची गरज भासत नाही. घोटी-सिन्नर मार्गावरचा हा नाका भेटीचे ठिकाण ठरले. आम्ही नऊवाजेच्या सुमारास आमच्या खासगी वाहनाने पोहोचलो. एका परिचिताकडे आमचा कार नावाचा रथ उभा करून महामार्गावर मराठमोळ्या पद्धतीचा दाबुन नाष्ता केला. पोहो, उपमा, मिसळ, ताक, कॉफी आणि बरेच काही. मुंबईचा चमु कसारा स्थानकावर दाखल झाला. तिथून त्यांनी काळी पिवळी जीप केली, त्याच जीपने आम्ही साम्रद गाठले तेव्हा दुपारचे बारा वाजून गेले होते. भटक्यांमध्ये चांगले नाव असलेला लहू मुठे त्याच्या कामात व्यस्त असल्याने येऊ शकला नाही. त्याने त्याचा भाऊ ईश्वरला या मोहिमेसाठी तयार केले. आता या साम्रद गावचे मोठे त्रांगडे आहे. तुम्ही गाडी नेऊन गावात जाऊ शकत नाही. अलिकडेच प्रकाश झोतात आलेल्या सांधण दरीमुळे हे गाव आता पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरले आहे. प्रवेशकर भरूनच गावात जाता येते. नुसते कोणाला बोलावण्यासाठी आत जाऊ देत नाहीत. केवळ निरोप देण्यासाठी तो भरणे प्रशस्थ नाही वाटले तेव्हा गाडी बाहेरच उभी करून आमच्यातील दोघे गावात जाऊन ईश्वर मुठेला घेऊन आले. 

कात्राबाईच्या खिंडीकडे जाण्याच्या दोन वाटा...

साम्रदवरून रतनगडची एक वेगळी वाट आहे. भटकी मंडळी अन्यथा रतनवाडीच्या अमृतेश्वराचे दर्शन घेऊनच रतनगडला जातात. साम्रदची वाट खुट्याला वळसा मारून जाते. प्रचलित शिडी मार्गाने किंवा त्र्यंबक दरवाजा अशा दोन्ही वाटा साम्रदवरून आहेत. आमचे लक्ष्य होते कात्राबाई, त्यामुळे इंग्रजंनी तयार केलेल्या जंगलातल्या महामार्गावरूनची वाट योग्य राहिल असे प्रसादला वाटत होते. ईश्वरशी बोलल्यानंतर त्याने ती वाट सोपी राहिल असा दुजोरा दिला. कात्राबाईचा डोंगर त्याने बघितला नव्हता. त्यामुळे त्यालाही या मोहिमेची उत्सुकता होती.

रतनगड ते हरिश्चंद्रगड अशी भटकंती आम्ही सप्टेंबर २०१५मध्ये केली होती. भाद्रपद महिन्यात हिरवाईने नटलेल्या आणि सुस्पष्ट आसमंताची नी ढग धुक्यांची सोबत लाभलेल्या त्या भटकंतीच्या रम्य आठवणी माझ्य मनात होत्या. आज हवामान त्याच्या अगदी विपरीत असणार होते. ईश्वरने साम्रदच्या पुढे किलो मिटरभर नेले आणि तिथून एक सोपी चढण पार करून आम्ही रतनगड - खुट्याच्या पूर्व बाजुला खालून जाणार्‍या आडव्या टप्प्यावर दाखल झालो. बर्‍यापैकी झाडांची सावली लाभल्याने उन्हाचा दाह जाणवला नाही. जुन्या ते मध्यम वयाच्या अनेक झाडांचा हा परिसर ग्रीष्माची चाहूल लागल्या पासून हिरव्या कोवळ्या पाना फुलांनी बहरलेला. खाली सर्वत्र पानगळ झालेली. रोजच्या शहरी घबडग्यात कोमूजून जाणार्‍या मनाला अशा वाटा कितीही थकवणार्‍या असल्या तरी सुखद अनूभूती देणार्‍या ठरतात. आम्हालाही या वाटेने भूरळ घातली. मोहिमाचा आरंभ दुपारी १२.५९ वाजता.

अतिशय कडक उन्हात भर दुपारी साम्रद पासून मोहिमेची सुरूवात

आता रतनगडाच्या कात्राबाई चौकी पर्यंत पोहोचायला २-५४ वाजले. पाठीवर बराच भार वाहत दोन तासात केलेली ही चाल दमदार ठरली. वाटेत इंग्रजांनी तयार केलेल्या मार्गाचे दोन मैलाचे दगड लागले. त्यातल्या एका दगडावर साम्रद ५ आणि पाचनई १३ अशी अक्षरे कोरली होती. म्हणजे आम्ही साधारण ५ मैलांची चढण चढून आलो होतो. जंगलातून जाणारा हा जुना मार्ग इंग्रजांनी कोणत्या उद्देशाने तयार केला असेल हे कळायला मार्ग नाही. डोंगराच्या पोटातून इतक्या अवघड ठिकाणहून त्याकाळी कोणत्या उद्देशाने या मार्ग तयार केला असावा. हा बैलगाडी किंवा बैल, खेचरांचे तांडे नेता येऊ शकतील असा प्रशस्त मार्ग. पूर्वीच्या काळी अशाच मार्गांनी वाहतूक व्हायची. जिथे बैलगाडी पुढे जाऊ शकत नाही तिथे सामानवाहू जनाव रांच्या पाठीवर टाकून घाट चढले जायचे. जनावरे चालू शकतील अशा या वाटा असायच्या. अशीच एक वाट आम्हाला त्र्यंबकेश्वरच्या जंगलात नुकसीत सापडली. या वाटांचे महत्व संपुष्टात आल्याने  अनेक वाटा या विस्मृतीत गेल्या आहेत. स्थानिक गिरीजनांना अशा वाटा ठाऊक असतात. त्यांचे अनन्यसाधारण असे ऐतिहासिक महत्वही, ते ओळखून त्यांच्या नोंदी ठेवणे नितांत गरजेच. प्रशासकीय स्तरावर अशा वाटांचे जतन करण्याचा कोणताही विचार भारतात अजून तरी रूजलेला दिसत नाही. फार मोजक्या ठिकाणी जुन्या वाटांवर संशोधन सुरू असल्याचे आढळते. अशा वाटांचे आहे त्या स्वरूपात जतन न करणे हा घोर ऐतिहासिक अपराध आहे हे आपल्या प्रशासकांना आणि लोकांचे प्रतिनिधी म्हणून विविध प्रकारची पदे भूषविणार्‍या लोकप्रतिनिधींना कळू नये याचे आश्चर्य वाटते.


जंगलातला महामार्ग: साम्रद ५ पाचनई १३, मार्गावरचा मैलाचा दगड, त्यावरची ना अक्षरे पुसली ना रंग


डोक्यावर झाडांची सावली नी पायाखाली पानगळ कडकडीत उन्हात अशी सावलीची वाट सुखद

तिकडे युरोपात घोड्याच्या जुन्या वाटांचे काही ठिकाणी जतन केल्याचे आढळते. कळसुबाईची डोंगररांग नी त्यावरचे किल्ले - भैरवगड ते आजा पर्वताची डोंगररांग नी त्यावरचे किल्ले - हरिश्चंद्रगडाची डोंगररांग नी त्यावरचे काही किल्ले यांना जोडणारा हा जुना व्यापाराचा नी वहिवाटीचा मार्ग आहे. इंग्रज येण्याच्या अगोदर पर्यंत हा परिसर महत्वाच्या राजकीय घडामोडींच्या दृष्टीने वर्दळीचा होता याचे काही ऐहिासिक दाखले वेगवेगळ्या लेखातून वाचनात येतात. आज आपण जे रस्ते वापरतो...पक्क्या रस्त्यांनी मोटरवीाहने नेतो त्या रस्त्यांची उभारणी ही इंग्रजांनी केली. जुन्या वाटा पक्क्या करून घेताना त्यांनी खास रस्ते बांधणीसाठी डोंगरांचे अवघड भाग सुरूंगांनी फोडले. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मजूर तथा यंत्रांचा वापर केला. त्यामुळे मोटरगाड्या धावण्याजोगे रस्त्यांचे जाळे भारतात तयार झाले. 

साम्रद - पाचनई किंवा उडदवणे - पाचनई हा मार्ग गाडीरस्त्यासाठी तयार केला असण्याची शक्यता कमी वाटते याचे कारण म्हणजे या रस्त्यात आडवी येणारी कात्राबाईची खिंड. पुन्हा कुमशेतवरून पेठेच्या वाडीत उतरताना मुळा नदीचे भव्य खोरे तिथून पुन्हा पाचनईकडे मुळेच्या खोर्‍याचे भले मोठे वळण. या भागात आदिवासींचे लढे तिव्र झाल्याने या मार्गाची त्यांनी मोजणी केली असेल किंवा हा मार्ग घोड्यांच्या वापरासाठी तयार केलेला असू शकतो. 

इतिहासात घेऊन जाणारा हा जंगलातल्या महामार्गाचा प्रवास भलताच भारी वाटत होता. तोच पुढे चालणार्‍या सूरजच्या तोंडून वाऽऽ शब्द ऐकु आला. आम्ही रतनगडावर जाणार्‍या वाटेच्या जवळ पोहोचलो होतो. या ठिकाणी चौकीच्या जोत्यांचे काही अवशेष आहेत. हा प्रशस्त असा परिसर दाट झाडी आणि कमालीच्या शांततेने नटलेला. पायथ्याला गिरीजनांनी कारवीत बांधलेली झोपडी दिसली. याचा वापर खाद्यपदार्थ विक्रीसाठी केला जात असावा. रतनगड आता पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. सुट्टीच्या दिवशी तिथे मोठी गर्दी उसळते तेव्हा अशा आडवाटेला जंगलात उभारलेल्या झोपड्यांतून हमखास खाद्यपदार्थ नी पाण्याच्या बाटल्यांची विक्री होताना दिसते. आज तिथे नीरव शांतता होती. अशा तप्त वातावरणात सुट्टीचा दिवस असूनही येतं कोण. 

नीरव शांतता स्थळ कात्रा - रतनगड फाटा

चाळीशीने गाठले...

दोन तासांची वेगवान न थांबता केलेली चाल दाट झाडी असूनही काहीशी दमवणारी ठरली. डोंगर किती चढून गेलो याचा अंदाज खुट्याच्या पायथ्याची धार दिसल्यावर आला. प्रसादने अगोदरच घोषित केले होते, दुपारचे जेवण वाघ टाक्यावर करू. उन प्रत्यक्ष अंगावर पडत नसले तरी ते कडकडीत होती. तापमापकाने पारा ३९ अंश दाखवला होता. हे खुप जास्त तापमान आहे. वैश्वीक तापमानवाढीचा हा परिणाम मानला जातो. जगातल्या अनेक भागांप्रमाणे बेफाम प्रमाणावर वृक्ष कटाई आणि आधुनिक जीवनशैलीमुळे जमिनीत मुरणारे पाण्याचे प्रमाण निम्म्याहून कमी झाल्याने तापमान वाढीला मोठा हातभार लागत आहे. शिवाय माणसांकडून रोज जीवनात केले जाणारे कार्बनचे उत्सर्जन आणि पृथ्वीचे हवामान राखण्यात महत्वाची भूमिका बजावणारा ओझन वायूचे कवच पातळ होत जाणे ही त्याची काही महत्वाची कारणे. 

icebox proved useful...though it was more on weight

अन बर्फाच्या पेट्या...

रतनगडाकडे जाणार्‍या वाटे पासून अवघ्या ४ मिनीटात आम्ही वाघ टाक्यावर दाखल झालो. पुढे दाखल झालेल्या मंडळींनी एव्हाना पातेलीने पाणी अंगावर घेऊन अंग थंड करून घेतले. लागोलाग पथारी अंथरून जेवणाची तयारी केली. जवळपास प्रत्येकाचा घसा उन्हाने कासावीस झाला होता. अशात जेवण फार जात नाही. तरी पण भाजी, पोळी, चटणी, लोणचे पुढ्यात आले आणि मग भूकेचा डोंब अधिकच पेटला. नऊ जणांची तुकडी आता घरून आणलेल्या चवदार अन्नपदार्थावर तुटून पडली होती. भाजी पोळ्यांचा लकेच फडशा पडला. मग प्रसादने कलिंगड कापले. ते संपत नाही तोच खरबुज कापले. खरबुज संपत नाही तोच पपई कापली. मग त्याने एकाला फणसाचे गरे काढायला सांगितले. प्रत्येकाच्या वाट्याला आठ फणसाचे गरे येणार होता. तप्त उन्हात झपझप चालीनंतर फळांची अशी लयलूट? एक रम्य कल्पना आम्ही प्रत्यक्षात अनूभवत होते. मोहिमेच्या नेत्याचे हे कसब. 

हे सगळे कमी म्हणून की काय प्रसादने एकदम थंडगार ताक पुढ्यात ठेवले. होय! थंडगार. नुसतेच नावाला थंडगार नव्हे तर प्रत्यक्षात बर्फात थंड केलेले ताक. प्रसादने या भटकंतीसाठी दोन बर्फाच्या पेट्या सोबत घेतल्या. दवाखान्यात इंजेक्शन ठेवण्यासाठी वापरतात तशा छोटेखानी पेट्या. यातली एक पेटी त्याला डॉ. अजय पाटील यांच्याकडून सप्रेम प्राप्त झाली. भटकंतीच्या पाठपिशवीत तळाला त्यांना व्यवस्थित जागा मिळाली. त्यात बर्फ टाकून त्यात त्याने कायकाय भरून आणले? आतला एक पदार्थ संपला की दसरा त्यात टाकायचा. मागे एका भटकंतीवर त्यांच्या चमूने चढाई ते उतराई असा या पेटीत बर्फ टिकल्याचा अनूभव घेतला होता. त्यामुळे त्यात शीतपेय व फळे उत्तम प्रकारे गारेगार राहतात. कडकडीत उन्हात भर डोंगरधारेवर असे थंड केलेले पदार्थ मिळणे एक स्वप्नवत अनूभूती. आता या थांब्याचा शेवट त्याने एका थंडगार चॉकलेट ड्रिंकने केला...

वाघ टाके

वाघ टाक्याला लागून असलेले दुसरा छोटे टाके. यातला पाणी गढुळलेले दिसले.

जेवणानंतरची विश्रांती न घेताना निघायचे होते तेव्हा पाय रेंगाळले...



इतकी खादाडी झाली की अर्धा ते एक तास विश्रांती घेणे क्रमप्राप्त ठरते. आज मात्र आम्हाला ती सोय नव्हती. कात्राच्या माथ्यावर अंधार दाटण्याच्या आत छावणी उभी करण्याचे लक्ष्य होते. अजून निम्मी चाल बाकी होती. शिवाय इथून पुढे सगळा मार्ग हा उभ्या चढणीचा काही ठिकाणी तो अंगावर येणारा. इथून पुढे आणखी एक महत्वाची गोष्ट ठरणार होती ती म्हणजे पाणी. हे शेवटचे ज्ञात स्त्रोत असल्याने प्रत्येकाने किमान आठ लिटर पाणी सोबत घ्यावयाचे होते. प्रत्येकाच्या बॅगेत खाण्या पिण्याचे पदार्थ त्यात या पाण्याचे ओझे. तांत्रिक चढाईच्या सामानाची एक जड बॅग होतीच. प्रत्येकाकडे आता पंधरा ते अठरा किलोचे ओझे पाठीवर आले होते. कल्पना करा आपल्या घरात येणार्‍या स्वयंपाकाच्या गॅसची टाकी कोणी जर कळसुबाई इतक्या उंचीवर न्यायला सांगितली तर? किती जण तयार होतील? भटकंती करणारी मंडळी हे असे प्रकार नेहमी करत असतात. त्यामुळे चाल मंदावते खरी पण मोहिमाचा उत्साह संचारल्याने त्याचे ओझे जाणवत नाही.

काही मोठ्या भटकंतीच्या मोहिमात तर खरोखरची गॅसची टाकी गिरीजनांच्या मदतीने डोक्यावर वाहून नेण्यात आली आहे. गिरीजन मंडळी याहून अधिक मोळ्यांचा भार आपल्याडोक्यावर वाहून आणतात. आजच्या प्रदुषीत हवामानात, निकस अन्न खाऊन नी दुषित पाणी पिऊन शहरी भटके जर अशा प्रकारे श्रम करू शकतात तर जुन्या काळातले लोक याहून अधिक सक्षमपणे डोंगरांवर भार वाहून नेत असणार यात शंका नाही. तात्पर्य हे की मन प्रसन्न असावे, व्यायाम आदी शारिरीक हालचाली नित्यनियमाने असाव्यात आणि अंगात जोम, कुठलेही कठिण उद्दीष्ट मग कठिण वाटत नाही. डोंगरभटक्यांमध्ये आढळणारी ही क्षमता प्रत्येकाच्याच आवाक्यातली. फक्त स्वत:ला आजमावण्याची आवश्यकता.


कात्राबाईची तटबंदी

कात्राच्या खिंडीची उभी चढाई पार करताना आता आमची आमच्याशी स्पर्धा सुरू झाली. ताज्या दमाची मंडळी मोठ्या नेटाने वेगात पुढे सरसावत होती. माझी बॅटरी मध्यपर्यंत गुल झाली. प्रसाद मागून उत्साह वाढवत होता, पण पाय काही उठत नव्हते. अगदी मंद वेगाने चाल सुरू होती. मग त्याने चक्क माझी पाठपिशवी काढून, थोडे वर पर्यंत नेते असे सांगून उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्या पाठीवर ३२ ते ३५ किलोचे ओझे होते. पुढच्या वळणावर आमच्यातल्या एका सवंगड्याच्या पायाचा स्नायू आखडला. मग त्याला मिठपाणी दिले. तोवर मलाही थोडी विश्रांती मिळाली. मग मी माझी पाठपिशवी चढवून पुढची वाट धरली. वरच्या टप्प्यावर एक गुहेवजा ठिकाण दिसले. तिथे पुढे गेलेली मंडळी थांबली होती. इथे पाणी पिण्याचा थांबा घेतला. प्रसाद मागोमाग दाखल झाला. त्याने आणखी एक कलिंगड कापायला घेतले. जेवण केल्या नंतर बरोबर तासाभराने आणखी एक गारेगार कलिंगड घशाखाली उतरणार होते - बर्फाच्या पेटीत जे ठेवले होते. लागोलाग दोन ताकाच्या पिशव्या फोडण्यात आल्या. थोडेफार पाणी घशाखाली उतरले आणि तुकडी ताजीतवानी झाली. 

कात्रा खिंडीतली पहिली तटबंदी

खिंडीत जुन्या काळातल्या दगडकाम केल्याच्या खुणा

मला आमच्या सात वर्षांपूर्वी भाद्रपत महिन्यात केलेल्या भटकंतीची आठवण झाली. त्यावेळेस माझ्या मनात होता त्याहून हा कातळ टप्पा काहीसा वेगळा वाटला. कदाचित आम्ही डाव्या बाजूने चढाई केली असणार. हाता पायाचे आधार घेत केलेली ती चढाई कातळ भिंतीवरून केल्याचे आठवत होते. डोंगरावरच्या गाय वाटा जशा डाव्या उजव्या डाव्या उजव्या करत सतत बदलत जातात तशी ही वाट डावी उजवी वळणे घेत वर जात होती. वाट पुरेशी प्रशस्त. जुन्या काळच्या वहिवाटीच्या स्पष्ट खुणा. या वाटेवरून बैलांवर सामान वाहून नेणे अगदी शक्य. घोडेही अशा वाटा चढू शकतात. अर्थात स्वार होऊन नव्हे पण एकट्याने ते अशा वाटा चढू शकतात. ही वाट वापरातली तर होतीच पण भार वाहण्यासाठी योग्य अशी. तिचा तसाच वापर झालेला असणार. या खिंडीतून अल्याड पल्याड मालवाहतूकही झालेली असणार असेच दिसते. वरच्या टप्प्यावर आश्चर्य घडले. जुन्या तटबंदीचे अवशेष. ते पाहून मन हरखून गेले. डोंगरभटक्यांना तटबंदी, दगडात कोरलेल्या पायर्‍या, दरवाजे, बुरूज, पाण्याची टाकी आदी जुन्या वास्तू भग्न स्वरूपात दिसल्या तरीही मनस्वी आनंद होता, आम्हालाही तो झाला. त्या भग्न चिर्‍यातून त्यांचे मन इतिहासाचा ठाव घेऊ लागते. आपली भारतभूमी तर अशा इतिहसाने अगदी समृद्द. महाराष्ट्राला इतिहासाचा फार मोठा नी जुना वारसा. 'कोण जुन्या राजवटींची पावले येथे उमटली असतील? ', या विचारांनी मन रम्य आठवणींनी संचारते. 

खिंडीच्या खालच्या भागात अर्धवट राहिलेल्या खोदकामाच्या खुणा

ही काही चुन्याने मढलेली आखिव रेखी तटबंदी नाही. मोठ्या शिळा एकावंर एक रचुन केलेली संरक्षण सज्जता आहे. ही भारतात तोफांचे युग अवतरण्यापूर्वीची वाटते. हिचा वापर चाल करून येणारे शत्रू रोखण्यासाठी होत असावा. रतनगडला जोडणारी ही महत्वाची वाट असल्याने याठिकाणी पहार्‍याची चौकी असणार. व्यापारी नाकाही असू शकतो. खालच्या बाजुला गुहेवजा ठिकाण दिसले त्यावरून वर्षभर कार्यरत असलेल्या चौक्या उभ्या करण्याची तजविज दिसून  येते. आजवर कात्राबाईच्या डोंगराचा संबंध ऐतिहासिक घडामोडींशी असल्याचे ऐकले नव्हते. या तीन तटांच्या निमीत्ताने तो जोडला गेला ही या भटकंतीतली मोठी आनंददायी घटना ठरली. एकापाठोपाठ एक असे तिन तट आहेत. मागच्या भेटीतही त्यावरूनच गेलो होतो पण तेव्हा पावसाच्या वातावरणात दाट झुडूपात त्याची जाणिव झाली नव्हती. शिवाय कोणा भटक्याच्या तोंडून कधी कात्राबाईवर तटबंदीचे अवशेष असल्याचे ऐकले नव्हते. त्यामुळे हा आनंद मोठा ठरला.

खिंडीतली दुसरी भिंत

कात्राबाईच्या खिंडीतले तट पाहून अंगात नवा उत्साह संचारला. अवघ्या पंधरा मिनीटात आम्ही खिंडीच्या मुखावर पोहोचले. हे अगदी भारी ठिकाण आहे. इथून उत्तर बाजुला नजर फेरली तर समोर कळसुबाईची डोंगरांग दिसते. किरडा, साकिरा, अलंग, मदन, कुलंग ही अवघी डोंगररहाळ दिसते तर दक्षिण बाजुला हरिश्चंद्रगडाचा परिसर. पूर्व बाजुस जणू आसमंद छेदत वर आलेला गवळदेवाचा डोंगर. त्याच्या पलिकडचा घनचक्कर आणि पाबरगड दिसतो. याच खिंडीत पूर्व बाजुला म्हणजे मुडा डोंगरावरून येणार्‍या वाटेवर पाण्याचे एक कुंड असल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे त्या कुंडाची शोधमोहिम सुरू झाली. पण ते कुंड काही सापडले नाही. ती शोध मोहिम थांबवून आम्ही अंतिम चढाईसाठी सज्ज होणार तोच प्रसादने त्याची बर्फाची पेटी उघडून थंडगार दह्यात पायनॅपलचे तुकडे टाकून पायनॅपल रायता बनवला. प्रत्येकाच्या वाट्याला वाटी दिडवाटी पायनॅपलचा रायता...

pinaple raita at katrabai khind

कात्रा खिंडीची चढाई दमवणारी तेव्हा दही अननसाची मेजवानी...

मावळतीच्या प्रकाशात खिंडीतून दिसणारी कळसबाईची डोंगररांग

२०१५च्या भाद्रपद, कात्रा खिंडीतुन...कळसुबाई, साकिरा, सिंदोळा, बैलघा्या धोंडिरा, काटिरा, अलंग ☝🏻




येता येईना शिखर...

आता कात्राबाईच्या शिखराची अंतिम चढाई दृष्टीपथात होती. कारवीच्या एकसुरी जाळ्यांची छानशी नक्षी या परिसराने पांघरली होती. सह्याद्रीतल्या अनेक परिचीत वनस्पतींनी हा परसिर सजवून ठेवला. माणसांच्या गोंधळ गोंगाटापासून अगदी अलिप्त असा निरव शांत परिसर. येथे गार हवा लागली आणि अंगातला थकवा पळून गेला. घड्याळ ६-२७ची वेळ दाखवत होते. छावणीसाठी इस्पितस्थळी पोहोचायला अजून तासभर तरी लागणार होती. छावणी उजेडात लागणार नाही हे स्पष्ट झाले होते. खिंडी पासून चाळीस पन्नास पावलांवर कात्राबाईचे देऊळ लागले. उदबत्ती लाऊन, नतमस्तक होऊन सर्वांनी तिचे आशिर्वाद घेतले. मग गाय वाटांनी आम्ही शिखर जवळ करू लागलो, पण ते आहे की हाती यायला तयार नव्हते. माती मुरमाच्या घसार्‍यावर पाय काळजीपूर्वक टाकावे लागत होते. थकव्या मुळे समोर दिसत होता तोच डोंगरमाथा ठरावा असे मन सांगत होते, पण ते तसे नसते. आपण माथा समजून वर जावे तर आणखी एक माथा पुढ्यात उगवलेला दिसतो. तो पार केला की आणखी एक. इथेही असेच घडत होती. वरच्या बाजुला वनविभागाने दगडांवर दगड ठेऊन उभा केलेला बुरूज दिसला. तिथून आणखी २४ मिनीटे चालल्यानंतरही आजोबाचे दर्शन घडत नव्हते. ज्याला आम्ही माथ्यावर लहानसा पसारा समजत होतो तो माथा तर भलताच मोठा निघाला. 

कात्रावरचा सुट्या दगडांची स्तंभ...अजून शिखरमाथा पाऊण तासाचे अंतर

बुरूजापासून पंधरा मिनीटाच्या चालीवर एक सोपा कातळ टप्पा पार केला आणि माथ्याचा सर्वात वरचा भाग दृष्टीपथात आल्याचे जाणवले इथून आजोबा डोंगराचे टोक दिसले. त्याच्या मागे मावळतीची आभा धरली होती. आजोबाला दैवी वलय लाभले होते. आता इथे पूर्ण अंधार पडला. प्रसादने एके ठिकाणी छावणी करू असे मत मांडले. सूरजने जी घळ उतरायची त्याच्या मुखावर जाऊन मुक्काम करू म्हणजे सकाळी महत्वाचे वेळ वाचेल असे सूचविले. दोघात एकाने विजेर्‍या काढायचे ठरले. त्यामुळे अंधारात रात्रभर आमच्याकडच्या बॅटर्‍यांचे उजेड पुरवून वापरता येणार होते. मळलेल्या वाटेचा विषय नव्हताच. दगड धोड्यातून अनघड वाट तुडवत आम्ही सूरजच्या मागून चालू लागलो. आणखी वीस मिनीटे खर्ची पडली पण त्याने सात आठ वर्षांपूर्वी दिवसा उजेडी गाठलेले ठिकाण चक्क अंधारात शोधून दिले. उत्तर बाजू, मोठ्या झाडांची दाटी आणि दरीच्या दिशेने जाणारा उतार यावरून तो बरोबर आम्हाला घळीच्या जवळ घेऊन आला. 



हा पायी चालण्याचा परिसर नाही. भरपूर दगड, गोटे, निसरडा गवती कड्यांचा परिसर. तीन ठिकाणी घसारा युक्त उतार. मुक्कामाच्या दृष्टीने इथे सपाटी नव्हती. समोरच्या बाजुला खडक व काहीसा सपाट भाग दिसत होता. प्रसाद व सूरज यांनी तिथे छावणी टाकू अशी कल्पना मांडली. ती सगळ्यांना आवडली. दोघांनी पाण्याची काही खळगी सापडतात का त्याचा शोध आरंभला. छावणीच्या जागेकडे जाताना मला डाव्या बाजुला खड्ड्यात पाणी दिसले आणि मी ओरडलो, पाणी सापडले. सोच समोरून गणेशलाही पाण्याचा एक खड्डा सापडला. प्रसादलाही एक खड्डा दिसला. आता आम्हाला छावणी वार वापरण्यापूरते दहा पंधरा लिटर पाणी मिळणार होती. डब्बा परेड सोबत भांडी धुवायला याचा उपयोग होणार होता. जमल्यास दुसर्‍या दिवसासाठी पाण्याची बेगमी होणार होती. कारण संध्याकाळ होईस्तोवर आम्हाला उन्हाचा सामना करावा लगणार होता. इथून पाणी मिळणार होते ते थेट शाई नदीच्या तळाच्या पात्रात आजोबाच्या जंगलात. कात्र्यावर पाणी अजिबात नाही, मग हा चमत्कार कसा. ईश्वरने प्रकाश टाकला मागच्या आठवड्यात होऊन गेलेले पावसाचे ते पाणी असावे.

शिखर दृष्टीपथात असताना कलला सूर्य...त्या संधीप्रकाशात समावलेले डोंगरभटके

दुपारी एकच्या सुमारास अत्यंत कडक उन्हात सुरू केलेल्या भटकंतीला कात्राबाईच्या शिखरावर आजच्या पूरता विराम मिळाला छावणी उभी करून तातडीने रात्रीचे जेवण बनवायचे होते. प्रत्येक जण कामाला लागला. अगोदर बुट काढून उघड्या पायांना दगड गवताचे स्पर्ष घडवले. गार वार्‍याने पाय निवले. पटापट छावणीचे नियम ठरले. कुठून पाणी आणायचे. डब्याची वाट कोणती. तंबुत कोण झोपणार. भाज्या कोणी चिरायच्या. सगळी यंत्रणा जणू कामाला लागली. ट्रेकिंग पोल आणि आधाराच्या काठीचा ट्रायपॉड बनवून त्याला विजेरी लावण्यात आली. त्या प्रकाशात जेवणाची तयारी सुरू झाली. खाली खिचडी व पनीरची भाजी शिजत होती आणि वर गप्पा. शिरस्त्या प्रमाणे डाळखिचडीचा बेत होता. आख्या मसूरची डाळ खिचडीत छान लागते. सोबत कांदा, बटाटा टाकला जाणार होता. आमच्या लाकडी घाण्याचे शेंगदाण्याचे तेल आणले. ते चोपडून उडदाचे पापड ब्यूटेन गॅसच्या शेगडीवर पटापट भाजले गेले. सोबत आणेलल्या तयार द्यपदाथांना पोटात जागा मिळत होती. गणेशने पनीर आणले होते. मग पनीरची भाजी तयार करण्यात आली. 

ब्यूटेनच्या गॅसवर खिचडीचा बेत...आणि वर तडतड गप्पांचा बेत

कात्राच्या सर्वोच्च माथ्यावर छान गार हवा सुटली होती. अष्टमीचा चंद्र असल्याने परेसा उजेड पसरले होता. उद्या रामनवमी असल्याने छानशा मुहुर्तावर सह्याद्रीतली सर्वोच्च घळ आवरोहण करण्याचा मनोदय तडीस जाणार होता. रात्रीच्या अंधारात गप्पा, कोट्या नी विनोदाला कोणत्याही मर्यादा उरल्या नव्हत्या. तोच प्रसादने त्याचे ठेवणीतले हिंमगंगे ताल काढले. त्याच्या छानशा वासाने छावणीचा परिसर भरून गेला. डोक्याल हलकी मालिश करताच छान गार स्पर्षाची जाणिव झाली. अगोदरच डोळ्यावर चढलेली झोपेची चादर आणखीन गडद झाली. आपल्या आयुर्वेदाला शेवटी तोड नाही!

चार ग्रहांची पर्वण

हवेच्या प्रदुषणा सोबतच प्रकाशाच्या प्रदुषणापासून हा परिसर अलिप्त. त्यामुळे अष्टमीचा चंद्र असला तरी आकाशातले ग्रह नी तार्‍यांची चमक न्यारी भासत होती. अन्यथा शहरात आपल्याला हे सुख लाभत नाही. हल्ली पूर्व क्षितीजावर चार ग्रह सरळ रेषेत दिसत असल्याने मध्यरात्री आकाशगंगा बघण्यासाठी आणि पहाटे ग्रहांची रांग बघण्यासाठी लवकर उठण्याचा निर्धार करून छावणी झोपेच्या अधिन झाली. तंबुत तिघे तर तंबुच्या बाहेर उघड्यावर पाच जण निद्राधिन झाले. झोप कधी लागली ते कळलेच नाही. मध्यरात्री दोन तीनदा जाग आली तेव्हा आकाशगंगा पुसटशी अवतरल्याचे जाणवत होते. कदाचित ढगांमुळे त्यांचा तो पुंजका तितका स्पष्ट दिसत नव्हता. 

पहाटे पाचला बरोबर जाग आली. हळूहळू छावणी जागी होत होती. पूर्व क्षितिजावर तळपणार्‍या शुक्रतार्‍याने लक्ष वेधून घेतले. त्याच्यावरचा मंगळ व शनी ग्रह सरळ रेषेत दिसत होते. थोड्या वेळाने क्षितिजावरून गुरूही उगवला. आता हे चार ग्रह एका तिरक्या रेषेत उभे ठाकलेले दिसले. मानवाने शेकडो वर्षापूर्वी या तार्‍यांची स्थिती आणि सूर्या भोवतीच्या परिक्रमेचे अचूक निरीक्षण करून ठेवले. भारतीय अवकाश निरीक्षकांनी तर गुरूच्या प्रदक्षिणेच्या इत्थ्यंभूत नोंदी करून ठेवल्या. गुरूच्या गती व परिक्रमेवरून भारताचे पुरातन साठ वर्षांचे संवत्सर सुरू करण्यात आले. प्रत्येक संवत्सराला अर्थात वर्षाला ब्रम्ह्याच्या मुलांची नावे दिली. सूर्या भोवती फिरताना गुरूचा कोणत्या वर्षी केवढ्या वेळेचा क्षय होतो किंवा वृद्धी होते याची मोजमापे इतकी बिनचूक की आजच्या विज्ञान यूगात त्या वेळची गणिता तसूभरही चुक नसल्याचे प्रत्यंतर येते. यंदाचे संवत्सर हे शोभकृत.

सकाळची आन्हिके उरकून प्रत्येक जण सामानाची आवराआवर करण्यात मग्न होता. आता प्रतिक्षा होती तो डोंगरावरूनचा स्वर्गीय सूर्योदय बघण्याची. आज ती चिन्ह काही दिसेना. एक तर सर्वोच्च माथ्याच्या पोटात ही छावणी शंभर फुट तरी खाली होती. आणि ढगांनी सूर्याचे आगमन झाकोळले होते. तोच माझा फोन घणाणला. सूरज म्हणाला रतनगड्या बाजूने ये. पाच मिनीटाचा वॉक असेल! काही तरी नक्कीच तो दाखविणार होता, म्हणून मी रतनगडच्या दिशेने चालू लागलो. 

सर्वात उत्तम दृष्य...सर्वात कठिण चढाईनंतरच...

कात्रावरून रतनगड, शिपनूर अ-म-कु, कळसुबाईची रांग...

वाट मळलेली दिसत होती. समोरचे दृष्यपाहून आवाक झालो. इतक्या कडकडीत उन्हाळ्यात आसमंतात चक्क ढग गोळा झाले होते. सह्याद्रीत हे दृष्य काही नविन नाही, पण आज आम्ही अजिबात अपेक्षा ठेवली नव्हती. ढगांनी कळसुबाईची डोंगररांग वेढली होती. डोंगरांचे माथे सोडून सर्व बाजूंनी ढग. रतनगडला अर्धाधिक ढगांचा घेरा दिसत होता. शिपनूरचा डोंगर जहूबाजूंनी ढगांनी वेढला होता. रतनगडच्या दरीत ढग तयार होऊन वर हळू हळू सरकताना दिसत होते. आणखी थोड्या वेळाने सूर्याच्या किरणांनी डोंगरांचे शिखर या ढगांच्या दुलईत अधिकच उजळलेले दिसू शकणार होते. आमचे आजच्या दिवसाचे सत्र मोठे, दमवणारे व आव्हानात्मक असणार होते. त्यामुळे प्रसादने निर्वाणीचा इशारा देऊन माघारी बोलावले. पंधरा एक मिनीटे ढग आणि सह्याद्रीचे सर्वोच्च डोंगर असा नजारा नजरेने मनसोक्त टिऊन आम्ही छावणीकडे परतलो. सूरजच्या फोनमध्ये अल्टी मिटर असल्याने तो कात्राबाईच्या शिखरावर जाऊन उंची मोजून आला. छावणी आटोपण्यापूर्वी दोन फळांचा फडशा पाडण्यात आला. कोरा चहा अगोदरच झाला होता. कागद कपटा आदी सर्व गोळा करून छावणी परिसर स्वच्छ करण्यात आला. आता मागे फक्त आमच्या पाऊलखुणा उंरल्या होत्या. 

सर्वोच्च माथ्याच्या कुशीतली रम्य छावणी आटोपताना...

कात्राबाईच्या घळीला सह्याद्रीतली सर्वात उंच घळ का म्हणतात याचे उत्तर येथे मिळाले. एक तर हा उंचीने दहावा सर्वात उंच डोंगर. याची घळ सर्वोच्च माथ्यापासून केवळ दिडेकशे फुट खालून म्हणजे एक प्रकारे शिखरावरूनच सुरू होते. सुरूवातीला चिंचोळी भासणारी घळ पुढे जाऊन मोठी आणि आक्राळ विक्राळ घेते. आज आम्ही तिच्यातून उतरून जाणार होतो. सूरजने दोन पक्क्या दगडांना दोर बांधले. दगड पक्के असल्याची खात्री करण्यात आली. आवरोहणासाठी आधाराच्या यंत्रणेची पूरेशी तपासणी केल्यानंतर सर्वात प्रथम ईश्वर मुठेला खाली पाठविण्यात आले. त्याला वरून सुरक्षा दोर दोऊन उतरविण्यात आले. जोवर योग्य जागा मिळत नाही तोवर तो उतरणार होता. त्यानंतर थोडे चालत जाऊन वरून कोसळण्याची शक्यता असलेल्या सुट्ट्या दगडांच्या टप्प्या बाहेर तो उभा राहून वरून आवरोहण करणार्‍यांचा दोर नियंत्रण करणार होता. वरून उतरताना कोणाचे नियंत्रण सुटलेच तर तो खालून दोर ताणून नियंत्रण करणार होता. ७-०८ वाजता पहिला आरोहक उतरला. गणपती बाप्पा मोरया म्हणत सगळ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. समोर ढगांनी आच्छादलेल्या रतनगडाच्याही आम्हच्या मोहिमेला जणू शुभेच्छा मिळाल्या. 

गणपती बाप्पा मोरयाऽऽ पहिल्या आरोहकाला शुभेच्छा

आवरोहणाचा पहिला टप्पा हा १३५५ मिटर उंचीवर अर्थात ४४४५ फुट उंचीवर. माथ्यावरची आमची छावणी १३७४ मिटरवर म्हणजेच ४५०७ फुटांवर. पहिला टप्पा अगदीच सोपा ५० फुटांचा. याच्या तळाला मात्र काही दगड फुटून तिक्ष्ण धार बनलेले त्यामुळे आवरोहण करताना काळजी घेतली नाही तर पायाला इजा होण्याची शक्यता. आमच्या कडे तांत्रिक साधने सिमीत होती. ही मोहिमच अल्पाईन पद्धतीची, कमीत कमी साधन सामुग्री आणि मनुष्यबळ असलेली, तेव्हा खाली उतरल्या बरोबर लगेच पुढच्या टप्प्यावर आवरोहणाची तजविज करण्यासाठी दुसरी फळी पुढे निघाली. 





घळीचा मुखाच्या बाजुचा भाग अरूंद. जसजसे खाली उतरू तसा तसा तो रूंद होत जाणार असा कयास होता. समोर रतनगड अजूनही ढगांनी आच्छादलेला दिसत होती. त्याचा राणीचा हुडा, कडेलोटाचे तट ओळखू येत होते. पहिल्या टप्प्या पासून सव्वा दोनशे फुट उतरल्यावर आवरोहणाचा दुसरा टप्पा लागला. याठिकाणी दोर बांधायला योग्य दगड मिळेना. मग मातीत फुटभर उंचीचा खिळा ठोकण्यात आला. दोन दगड आणि हा खिळा असा त्रिस्तरीय सुरक्षा असलेला अँकर तयार झाला. सूरजने पेगला यु करून उतरावे लागणार असल्याने लागलीच त्याची ताकद तपासण्यासाठी पुढचा आवरोहक त्यावरून खाली सोडला. 


शिखर माथ्याच्या अगदी जवळून घळीचे मुख उघडते...

हा दुसरा टप्पा म्हणजे  वरच्या बाजुला तीन भल्या मोठ्या शिळा अडकलेल्या. त्यावरून आवरोहण करताना सावधानता बाळगावी लागते. पाय घसरला तर आतल्या दगडावर आपटून पायाला इजा होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक जण काळजीपूर्वक या टप्प्यावरून खाली उतरत होता. हा टप्पा ६० फुटांचा. तो पार केल्यावर आणखी थोडे आवरोहण करावे लागते तेव्हा आपण सुरक्षित ठिकाणी उभे राहू शकतो. या टप्प्या पासून अडीचशे फुट उतराई केल्यानंतर तिसरा टप्पा हा ११९२ मिटर्सवर म्हणजे ३९१० फुटावर सुरू होतो. घळीत अगदी मुखाच्या सुरूवातीपासूनच मोठमोठ्या शिळा पडलेल्या आहेत. काही पावसाच्या जोरामुळे गोल गुळगुळीत झालेल्या तर काही दरडी कोसळून अणकुचीदार नी नानाविविध आकार घेतलेले. यातल्या मोठ्या शिळा जिथे अडकून पडलेल्या साधारण तेच टप्पे आम्हाला आवरोहण करून उतरावे लागत होते. घळीत अडकलेले हे चोकस्टोन्स आणि त्या खालचे कातळ  टप्पे असा या घळीच्या तांत्रिक आवरोहणाचा क्रम दिसू लागला.




घळीत वरच्या बाजुला जणू शैल भिंतीतून तयार झालेली मुखवाट

प्रत्येक टप्प्यावर आवरोहणाची यंत्रणा बसवताना दगडात खिळा किंवा रिंग बोल्ट मारावे लागत होते. पहिल्या मोहिमेच्या वेळी सोडलेले मायलॉन मात्र कुठेही आढळून आले नाही. समोर रतनगडाशी समोरा समोर नजरा नजर होत होती. ही नजर भेट मोठी सुखावणारी अनूभूती होती. सकाळच्या थंड वातावरणात आमची तांत्रिक उतराई सुरू असताना लाडका रतनगडचा किल्ला त्याच्या देखण्या रूपात सतत आमची सोबत करत होता. या घळीला माणसाचा स्पर्ष दुर्मिळात दुर्मिळ गोष्ट ठरते तद्वताच प्राण्यांनीही हिचा वापर केला नसल्याचे दिसून येत होते. आम्हीला ज्याचे सर्वाधिक भय वाटत होते ती मधाची पोळी घळीत नव्हती, परंतू ती शेजारच्याच कड्यात नसतील हे कशावरून? तेव्हा उतरताना गोंगाट होणार नाही याची सर्वजण काळजी घेत होते. पाण्याच्या बाटलीवर एक मधमाशी येऊन बसली. तिचे पोळे शेजारीच होते की ती पाणी शोधण्याच्या पथकातली होती हे कळेना. तिला हटकण्याचा प्रयत्न न करता हवा तिका वेळ बाटलीवरचे थेंब तिला पिऊ देण्यात आले. इतक्या विशाल डोंगर पसार्‍यावर त्यांना पाण्याचा गंध इतका लांबून कसा येत असेल? या विचाराने मन थक्क होते. हे घातक जीव त्यांना आपल्यापासून धोका वाटता कामा नये याची दक्षता घेणे सर्वात महत्वाची गोष्ट. अशा ठिकाणी आपण निसर्गाचेच भाग असल्यागत वावरलो तर त्यांचा प्रकोप होण्याची शक्यता कमी होते. 



आवरोहणचा तिसरा टप्पा किंचित मोठा होता. समुद्र सपाटीपासून याची उंची १२२९ मिटर. येथे सुमारे ८० फुटांचे आवरोहण होते. हा देखिल तुलनेने सोप्या श्रेणीचा. चौथा टप्पे लगेच लागला. उंची ११८२ मिटर. येथे दोर बांधण्यासाठी फार कमी पर्याय असल्याने सुरक्षेसाठी रिंग बोल्ट मारण्यात आला. दगड अतिशय टणक असल्याने बोल्ट ठोकायला बरेच श्रम पडले. या ठिकाणी प्रसादने मसाला पान बनविले. इतक्या आवघड ठिकाणी मसाला पान? या पानाने अंगात तरतरी आणली. हा टप्पा वरच्या भागात अवघड आहे. सुरूवातीलाच बाहेर आलेल्या दगडामुळे खाली थोडे तरंगत उतरावे लागते. पाय टेकवायला जागा नसल्याने दोरावर पूर्ण भार देऊन आधांतरीच उतरावे लागते. त्यामुळे पायाला आधार शोधण्यापेक्षा हातांनी दोर नियंत्रित करून हवेत तरंगत उतरणे क्रमप्राप्त ठरते. हा अंदाज घेता आला नाही तर मात्र गुडघ्याला इजा होण्याची संभावना. थोडे खाली उतरल्यावर उभ्या कातळाची शभर ते सव्वाशे फुटांची तिरकस पण सोप्या पद्दतीची उतराई. वरून दगड निखळणार नाहीत याची काळजी घेत हा टप्पा लिलया पार झाला. सुरज प्रत्येक टप्प्यावर उतरण्याची यंत्रणा तयार करत होता. रोहित हिवाळे पुढच्या टप्प्यावर जाऊन उतराईच्या यंत्रणेची चाचपणी करत होता तर ईश्वर मी व गणेश सोनवणे आलटून पालटून सुरक्षा दोर खालच्या बाजूने सांभाळत होतो. एकीकडे तांत्रिक गट उतराईच्या व्यापात मग्न होता तर दुसरा गट खानपानाची तजविज करत होता. वेळ मिळेल तेव्हा एखादे फळ, ताकाची पिशवी किंवा सुका मेवा पेश केला जात होता. त्यामुळे भरपूर उंचीवर आव्हानात्मक असूनही उतराईचा पथकावर कुठलाही दबाव नव्हता. 






शेवटचा टप्पा सगळ्यात मोठा नी अव्हानात्मक आहे याची कल्पना होती. त्या तुलनेतपाचवा पंधरा फुटांचा टप्पा तसा अगदी सोपा. पण आमचा हा विचार चुकीचा ठरला. हा कमालीचा छोटा टप्पा उतण्यास जास्त जिकरीचा ठरला. एक मोठा गोलगुळगुळीत दगड घळीत अडकून पडलेला. या ठिकाणाची उंची समुद्र सपाटीपासून ९८६ मिटर म्हणजे ३२३४ फुट. इथे पाय लाऊन उतरायला कोणताही वाव नाही. हवेत तरंगत उतरण्याची आवश्यकता. पण अंतर इतके कमी की, दोर नियंत्रित करण्यासाठी शरीर पूर्ण सोडेस्तोवर आवरोहक कडीतून दोर सटकन सूटलेला असतो. सूरज बजावून सांगत होता की, दोर वरून नियंत्रित होतोय, पण ते न समजल्याने येथे घसरगुंडी झालीच. मग हातांनी दोर नियंत्रित करावा लागला. यात मोठे घर्षण होते. हा कॉल न समजलेल्यांनी वेळीच दोर सावर्‍याने सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. या ठिकाणी शेवटचा आरोहक उतरल्यानंतर दोर दगडात अडकून बसला. तो खालालून खेचून घेता येईना. पुन्हा खालून वर चढाई करून तो सोडविण्याची आवश्यकता होती. ईश्वर मुठेने पुढाकार घेऊन आरोहण केले. त्याला योग्य ती सुरक्षा पुरविण्यात आली आणि तो चपळतेने खाली उतरला. 


शेवटच्या आरोहकाच्या सुरक्षिततेसाठी कडीचा खिळा ठोकताना...

आता सगळ्यांना वेध लागले होते ते शेवटच्या टप्प्याचे. हा टप्पा ९३६ मिटर्स उंचीवर सुरू होतो. या ठिकाणी दोन मोठ्या आकाराचे चोक स्टोन्स पडले आहेत. त्या दोघांच्या मधुन उतरताना पावणे दोनशे फुट तरंगत उतारावे लागते. हा ओव्हरहॅंग पार केल्यानंतर खालच्या बाजुला तिरकस कातळभिंत, ती सुरक्षित पार केली की तांत्रिक आवरोहणाचा विषय संपणार होता. समोर रतनगड अजूनही दृष्टीपथात होता. याचा अर्थ तांत्रिक टप्पे उतरल्यानंतर खाली पोहोचण्यासाठी निम्म्याहून अधिक घळ उतरावी लागणार होती. खालचा भाग काठिण्यपातळीवर हरिश्चंद्रगडाच्या नळीची वाट किंवा माकडनाळेपेक्षा कमी तर नक्कीच नसणार होता. असला तर तो अधिकच कठिण ठरणार होता, कारण ही वापरातली घळ नसल्याने पायाखालच्या हालत्या दगड्यांचे आव्हान ठरणार होते. हा टप्पा उतरताना सह्याद्रीचे वैशिष्ट्य असलेला भला थोरला सुळका आमच्या स्वागतासाठी सज्ज होता. रांजळ सुळका. आपल्या अनेक गिर्यारोहकांनी तो सर केला आहे. याच्या तळा पर्यंत पोहोचणे मात्र फारच जिकिरीचे. शाई नदीचा अथांग शैल पसारा ओलांडून निम्मी घळ चढून जायची म्हणजे रांजण सुळक्याची मोहिम भरपूर दमवणारी ठरते. शिवाय त्याची चढाई कठिण श्रेणीत मोडणारी. त्यामुळे हा कसलेल्या आरोहकांचा आणि सुत्रबद्ध नियोजन असलेल्या संघाचा विषय.




सहावा आणि शेवटचा तांत्रिक टप्पा भल्या मोठ्या तरंगत्या उतराईचा...

इथून घळ खुली झाल्याने छानसा वारा लागणार होता, पण उन्हाचा दाह या ठिकाणहून खर्‍या अर्थाने जाणवणार होता. एका बाजुने भले मोठे रांजण वाटणारा हा सुळका पलिकडून वझिर सुळक्याची लघू आवृत्ती वाटावी अशा तोर्‍यात भिंतीला चिकटून उभा. याच्या तळाला बसून, सहाच्या सहा तांत्रिक टप्पे सुरक्षित पार झाल्याचा आनंद आम्ही कलिंगड, खरबूज कापून आणि थोडे गुलाबाचे सरबत बनवून साजरा केला. दुपारच्या जेवणाला फाटा असल्याने पिशव्यात दडलेली खाऊची पाकिटे पटापट रिती होत होती. त्यानेही पोट भरले नाही तेव्हा प्रसादने त्याच्या बर्फाच्या पेटीतून ताकाच्या पिशव्या काढून त्यात मिठ कालवून भांडभर थंडगार ताक तयार केले. प्रत्येकाला अर्धा ते पाऊण ग्लास ताक मिळाले. 

या तांत्रिक आवरोहणात सूरज मालूसरे याने त्याच्या उत्तम गिर्यारोहण तंत्राचे दर्शन घडले. सह्याद्रीत जिथे तांत्रिक आरोहण करताना मोजकेच परंतू काही घातक अपघात घडतात तिथे प्राथमिक गोष्टींची काळजी घेतली, तांत्रिक टप्पे समुहातील प्रत्येकाला समजावून सांगितले. सुरक्षा दोर सजग ठेवला तर अपघात टाळले जाऊ शकतात याची अनूभूती या निमीत्ताने मिळाली. आमच्या सुदैवाने मधमाशंची मोहळ जवळपास आढळून आले नाही. काही मधमाशा या कानाजवळ घोंघावून गेल्या पण आमच्या पासून धोका नसल्याचे संकेत त्यांनी नक्कीच ग्रहण केले असणार. तशी आम्ही संभाव्य हल्ल्याच्या दृष्टीने तयारी केली होती. सोबत औषधे होती ओणि हल्ला होण्याच्या स्थितीत बचावाची तयारी होती. घळ उतरताना इथवर दोन ठिकाणी थेंब थेंब पाणी दगडातून झिरपताना दिसले. ते गोळा करण्याइतका वेळ आमच्या हातात नव्हता. दोन ठिकाणी शेकडो फुटांच्या कातळ टप्प्यावर उंबराची झाडे दिसली. काय जिद्द म्हणावी यांची. पाण्याचा थेंबभराचा झिरपाही त्यांना शोधून त्याठिकाणी बस्तान बसल्याचे पाहून निसर्गाची अचंभित करणारी कारागिरी बघायला मिळाली. इतक्या कठिण उन्हात याने थेंब थेंब पाणी मिळवले म्हणजे पावसाळ्यात आणि त्यानंतरचे काही महिने याला भरपूर पाणी मिळणार. पुढच्या दहा वीस वर्षात इथला उंबर विशाल रूप घेणार आणि त्याच्या बिजांचा प्रसार होऊन आणखी काही झाडे या घळीत येत्या काळात दिसणार ही आनंदाची गोष्ट.



तांत्रिक आवरोहणाची यशस्वी सांगता रांजणाच्या साक्षीने...

कात्रा नदीचा हा भलामोठा ओघ. पुढे ही नदी शाई गावाच्या परिसरा उगम पावणार्‍या शाई नदीला जाऊन मिळते. या नदीला रतनगड, अग्नीबाणची घळ आणि करंड्याच्या घळी ओणि गुयरीच्या दारावरून खाली येणारे भरपूर पाणी मिळते. त्यामुळे पुढे पुढे ही नदी काळू नदी सारखीच विशाल रूप धारण करते. याच शाई नदीवर धरण प्रकल्प साकारून ठाणे महानगराच्या पाणी पुरवण्याच्या योजनेचे नियोजन होते. येणार्‍या काळात उल्हास, भातसा, काळू या नद्यां प्रमाणेच शाई नदीवरही एखादा मध्यम प्रकल्प होण्याची शक्यता आहे.

प्रसादने नुकताच चिकणदरा मार्गे रतनगड प्रदक्षिणा केल्याने नदीच्या तळापासून डेहेण्या पर्यंतची वाट त्याला ठाऊक होती. ही फारच सुखत गोष्ट ठरणार होती. नदीतल्या मोठमोठ्या शिळांवरून वाट काढणे तशी आनंददायी गोष्ट ठरावी. पण ४१ अंश तापमानात तिचे खडक कमालीचे तापल्याने त्यातून माग काढणे आव्हानात्मक होते. दुपारी ३-३२ वाजता आम्ही रांजण सुळक्याचा परिसर सोडला. तिथून नदीचा तळ गाठण्यासाठी मोठा उतार असलेली दगड शिळांनी गच्च भरलेली घळ उतरणे तांत्रिक आरोहणा इतकेच आव्हानात्मक होते. तळाला पोहोचल्यानंतर पुढची सगळी चाल ही कडकडीत उन्हातून दगड गोट्यांच्या नदीपात्रातून दिड तासाची चाल डेहेण्याला घेऊन जाणार होती. दुपारचे चार उलटून गेले तरी आमची घळ उतरून झाली नव्हती. पाच वाजेच्या सुमारास घळीचा शेवटचा टप्पा लागला. तिथे खडकातून झिरपून येणारे पाणी एका खळग्यात गोळा झालेले दिसले. त्यात भरपूर पाणनिवळ्या नी मासे पोहोत होते. हे सुरक्षित असल्याने हे ताजे स्वच्छ पाणी बाटली भरून घेतले. इथन आजोबाचा डोंगर अजूनही दिसत नव्हता कात्राबाई सोबतच करंड्याची पुढे आलेली धार दिसत होती. अशा पाच धारा वर पासून खाल पर्यंत उतरत असल्याने या परिसराला काही जण पाचपाती अशी माहिती मिळाली. घळीच्या तळात उतरल्यानंतर कळमंजाच्या दराचा वेध घेण्याचा प्रयत्न केला, पण डोंगर पातींच्या भाऊगर्दीत त्याचा ठाव लागेना. चिकणदर्‍याची वाट मात्र स्पष्ट दिसत होती. एक घळ कात्राच्य अग्नीबाळ सुळक्यावरून खाली उतरत होती. प्रसाद आशाळभूतपणे तिच्याकडे बघत होता. येणार्‍या काळात आग्नीबाण घळीची मोहिम निघणार हे निश्चीत.




इथून पुढे गोल गुळगुळीत लहान मोठ्या कमालीच्या तापलेल्या नदीच्या दगडांची वाट आणखी दिड ते दोन तास तुडवावी लागणार होती. गुयरीच्या दाराची घळ दिसेल असे वाटत होते, परंतू नदीच्या तळातून त्याचा अदमास येईना. डेहेण्यावरून कसारा लागोलाग गाठावे लागणार होते तेव्हा कुठे शेवटची लोकल रेल्वे मुंबईकडे जाणार्‍यांना सापडू शकणार होती. व्यक्तीश: मला या ठिकाणी उन्हाचा जबर तडाखा जाणवला. त्यामुळे चाल मंदावली. सुमारे अर्धा तास मंदगती चालल्यानंतर माझी पाठपिशवी सूरजने घेतली. तरीही पाय उचलता उचलवे ना. प्रसादने नदीची वाट सोडून झाडीतली वाट शोधली. वरून आता उन्हाता तडाखा बसणार नव्हता. पायाखालची वाट मात्र दगड धोड्यांचीच. मला थोडी विश्रांती घेऊन शरीर थंड करण्याची गरज होती, परंतू हातात वेळ नव्हता. वीस एक मिनीटांच्या कुर्मगती चालीनंतर शाई नदीत एक डोह लागला. इथून नदी उजवीकडे ठेऊन पुढचा मार्ग झाडीतून जाणारा होता. या ठिकाणी काही जणांनी सोबतच्या भांड्यातून अंगावर पाणी ओतून कडकडीत उन्हात थंडगार अंघोळीचा आस्वाद घेतला. थोडी विश्रांती घेऊन मी अंगावरच्या कपड्यानिशी पाणी घेण्याचे ठरवले. चांगली तीन पातेली रिती करण्यात आली. सर्वसाधारण परिस्थितीत अशा प्रकारे शरीर थंड करणे योग्य ठरत नाही, परंतू अपवादात्मक परिस्थितीत याचा चांगला उपयोग होऊ शकतो. मला ही मात्रा चांगली लागू पडली. सात वाजून गेले होते, कडक उन्हामुळे परिसरातला उष्मा जरही कमी झालेला नव्हता. या लहानशा अंघोळीने अंग झटक्यात थंड झाले. माझी नव्याने खरेदी केलेली बॅटरी आदल्या दिवशीच बंद पडली होती. सूरजने त्याच्याकडची जादा हेड टॉर्च दिली. आता जंगलातून झपझप चालत डेहेणे गाठण्याचे वेध लागले होते. पावले पुरेशा वेगाने उठत होती. शरीर थंड झाले की ते पुन्हा नव्या जोमाने कामाला लागते. मला पुढच्या एक तासात याची प्रचिती आली.


ही मोहिम कडक उन्हातली असल्याने त्यासाठी मनाची तयारी आवश्यक होती. फार उन लागले तर अंगावर लागलीच थंड पाणी ओतून घेणे अयोग्य ठरते. उलट त्याचा त्रास होऊ शकतो. ती हद्द ठाऊक असल्याने व अनेक वर्षांच्या भटकंतीचा अनूभव गाठीशी असल्याने पाण्याचा हा उतारा कामी आला. मिट्ट अंधारात डेहण्याची पहिली वाडी चिंचवाडी हा टप्पा बरोबर तासाभरात पार झाला. साडे सात ते आठच्या दरम्यान तिथवर पोहोचण्याचे प्रसादचे नियोजन होते. प्रसिद्ध डेहेणे हे तीन वाड्यांनी बनले आहे. वोरपडी आणि खोखरी या त्याच्या अन्य दोन वाड्या. चिंचवाडीत रामनवमी उत्सव सुरू होता. आजोबा गडाचे छत्र लाभलेल्या, रामायणाचे रचनाकार वाल्मिक ऋषींच्या आश्रमाचे सानिध्य आणि लव कुशाचे जन्मस्थळ असलेल्या या परिसरात गिरीजनांमध्ये रामनवमीच्या उत्साह दिसून आला. आम्ही वाडीत दाखल होताच आम्हाला भोंग्यावरून आवाहन करत भोजन प्रसादाचे आमंत्रण मिळाले. इतक्या दमदार भटकंती पश्चात ताजे प्रसादाचे भोजन मिळणे ही भाग्याची नी अतिव गरजेची गोष्ट. दुर्दैवाने आमच्या हातात तितकाही वेळ नव्हता. त्यामुळे आम्ही पत्रावळीवर प्रसाद मागविण्याचा निर्णय घेतला. प्रसादाला थोडा वेळ लागणार असल्याने रामाला नमस्कार करून आम्ही आमची थकली पावले जीपगाडीत विसावली, तिने आम्हाला कसार्‍याला सोडले तेव्हा मुंबईकडे जाणारी शेवटची लोकल रेल्वे निघण्याच्या तयारीत होती. मुंबैकरांनी धावतपळत वजनदार सॅक सांभाळत तिच्यात स्थानापन्न झाले. आम्ही टॅक्सीने घोटी गाठले व तितून आमची वाहने घेऊन नासिक. एक दमदार भटकंतीचा समारोप वाडीवर्‍हे जवळच्या हरिओम भोजनालयात रूचकर जेवण घेऊन करण्यात आला. घरी पोहोचायला रात्रीचे बारा वाजले. या भटकंतीची झिंग पुढील अनेक दिवस अनूभवायला मिळणार होती. जोवर दुसरी मोहिम होत नाही तोवर तिच्या आठवणींची राळ गप्पातून, चर्चेतून आणि सामाजिक माध्यमावरील टपालातून निघत राहिली...

।।जय हो।।

कात्राबाईची घळ

रांग - भैरवगड - आजोबा

ऊंची - १३९८ मिटर (४५८७ फुट)

घळीची उंची - १३७५ मिटर

तांत्रिक आवरोहण - ६ टप्पे

पाणी - पायथ्याच्या ठिकाणी

ऐतिहासिक खुणा - कात्रा खिंडीत तटबंदी

गडदेवी - कात्राबाई, कळसुबाईची निस्सीम भक्त


सहभाग 

प्रसाद कुलकर्णी ( मोहिम प्रमुख) - नासिक

सूरज मालूसरे ( मुख्य आरोहक) - मुंबई

रोहित हिवाळे - सह आराहक - नासिक

गणेश सोनवणे - नासिक

दीपक साठे - कल्याण

कुणाल कदम  - वडाळा

अजय मिश्रा - घाटकोपर

प्रशांत परदेशी - नासिक

ईश्वर मुठे, साम्रद

altitude measurement by Suraj Malusare

additional information by Prasad Kulkarni



every hotel create this within a day and most of the bottles end up in ocean rivers or ponds...


हिरवेकंच करवंद पंधरा दिवसात आंबट ते गोड प्रवास...


कितीही असुदे उन...ही जंगल वाट विश्राम...

thick cover of trees reduced the temperature considerably 

we took left turn to the Khuta pinnacle

entering thick tree cover a soothing experience in top summer heat...

jungle highway...yet a lot distance to cover!

this is an easy route from Samrad to Ratangad and Katrabai

why our colors get fed so early...

या झोपडीत माझ्या...कारवीच्या झोपडीचे सौंदर्य वेगळेच!

mulching of leaves...important factor of the jungle cycle...

असे स्फटीक घरी न न्यावे...ते  तिथेच शोभून दिसतात..

कात्रा खिंडीच्या खाली ही ऐसपैस जागा

good vegetation at the Katra Khind

the final push to towards katra khind...

the ridge of Muda joining katrabai khind, behind is the majestic Gawaldev

thanks a lot...technical leader Suraj Malusare with Rohit Hiwale

दीपक साठे - कल्याण

expedition leader Prasad Kulkarni

entring the ghal...

सह्याद्रीतले राजेशाही दृष्य





जख्खड म्हातारे शैल मुखवटे...




































masala pan on the patch...what a treat leader.




rocky talks







Audumbar...it can find water any where...its quest is breathtaking...


river of water...also a river of stones


the Ranjan pinnacle


very clean water after descending the ghal


technical leaders with there heavy sacks...


beauty in the deep remote woods


Google map view of the Katrabai ghal


long view covering Kumshet

साम्रद ते कात्रा शिखर वाटेचा नकाशा - भाग १

साम्रद ते कात्रा शिखर वाटेचा नकाशा - भाग २

साम्रद ते कात्रा शिखर वाटेचा नकाशा - भाग ३

साम्रद ते कात्रा शिखर वाटेचा नकाशा - भाग ४ - courtesy Suraj Malusare












।। धन्यवाद ।।