Sunday, October 30, 2022

दुर्गभांडारचा आकाशकंदिल


''दुर्गभांडारच्या पुराण प्रसिद्ध अश्मभिंतीवर पाच डोकी मिट्ट अंधारात १४ फुटांचा भव्य असा आकाशकंदिल तयार करण्यात गुंतली होती. जणू काही एखादा अवघड डोंगरकडा सर करताना झटापट व्हावी तशी त्यांची झटापट सुरू होती - वेळेशी आणि दुर्गभांडारच्या अजस्त्र राकट शैल कड्याशी. सुदैवाने आज वारा शांत होता. थंडीही बोचरी नव्हती. अंधारात काम करूनही आकाशकंदिल निम्मासुद्धा तयार झाला नव्हता. हा मनोदय काही सफल ठरत नाही'', असेच वाटू लागले होते. सूर्य कलण्याच्या बेतात असतानाच तो तयार व्हायला हवा होता, तरच तो लावता येणार होता.

सुमारे साडे तीन कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर दोन खंडाच्या टकरीतून झालेल्या ज्वालामुखीय उद्रेकातून निर्माण झालेल्या सह्याद्रीची जणू पोचपावती देणारीही ही राकट भिंत, तिथे जाऊन एवढा मोठा आकाशकंदिल बनविण्याचे प्रयोजन तरी काय होते? जेमतेम पाच सात फुट रूंदीच्या भिंतीवर, जिच्या दोन्ही बाजुला थेट नव्वदच्या कोनातला दरीत कोसळणारे शेकडो फुटाचे कडे! हा मनोदय सफल होण्याच्या वाटा बंद झाल्या होत्या. फक्त एकच वाट शिल्लक होती, ती म्हणजे आमच्या चमुचे धारिष्ट्य. बस त्या एका गोष्टीवर हे शिवधनुष्य पेलले गेले. 

किल्ल्यांचे गतवैभव केवढे अफाट होते

राजेशाही थाट होता

शत्रुला त्यांचा धाक होता

राज व्यवस्थेचे ते केंद्र होते

प्रजेचे तिथे रक्षण होते


हे किल्ले सणावारी गजबजून जायचे

त्यावर व्यापार उद्यम चालायचा

प्रवासी तिथे भेट द्यायचे

शुरांचे ते घर होते

वीरांचे ते अंगण होते

त्यावर आपले रक्त सांडून

त्यांनी स्वराज्य रंगवले होते

त्या शुरांना वंदन करण्या

दुर्गदिवाळी क्रमप्राप्त होती

त्यासाठी मनोदय होता

गडावर भव्य आकाशकंदिलाचा

त्या रूपाने वीर योद्ध्यांच्या 

पवित्र स्मृतींना आदरांजली वाहण्याचा.

आपले सह्याद्रीतले गडकोट आहेच मुळी राकट. तिथे फक्त गरूडच त्यांच्या माथ्यावर रूबाबात उभा ठाकू शकतो. वाघाची डरकाळीच तिथला आसमंत दणाणू शकते. अशा ठिकाणी जातं तरी कोण. घरची दिवाळी सोडून कोण तिथे धुळ झाडायला बसलाय? दुर्गप्रेमींची एक अल्पसंख्यांक जमात, 'अजुन वाली आहोत', या अविर्भावात, या दुर्गांनी इतरांनी जरी त्यांना वार्‍यावर सोडले, त्यांची 'चराऊ कूरणे बनवली, त्यांचे अधिक खस्ताहाल केले', तरी तिथली पवित्र धुळ मस्तकी लावायला उरली आहे. या दुर्गवेड्याच्या पंक्तीत आपणही बसून पहावं असा निर्धार मागल्या वर्षी केला होता, तेव्हा हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर असाच १४ फुटांचा भव्य आकाशकंदिल झळकावला होता. दोघा सवंगड्यांची उत्तम सोबत लाभली होती. मनस्वी आनंददायी ती घटना होती. यंदा दुर्ग दिवाळी कोठे साजरी करायची? अनेक पर्याय समोर होते. नियोजन मात्र काही केल्या होता होत नव्हते. 

भास्करगड, हरिहर आणि ब्रम्हगिरी अशा तीन पर्यायांवर येऊन पोहोचलो. अगदी आदल्याच दिवशी या संबंधीची घोषणा केली. आमचा पारंपारिक आकाशकंदिलाचा कौटुंबिक व्यवसाय असल्याने गणपती उत्सवापासूनच या कामाची घरात लगबग असते, त्यामुळे नेहमी सारखी नियोजनबद्ध भटकंती होते तसे येथे करायला जमले नाही. ऐनवेळी सवंगडी मिळेना. भास्करगडावर दाट झाडी आहेत. शिवाय तिथे कोणाचे सहाय्य मिळू शकेल अशी स्थिती नसल्याने भास्करगडाचा विषय बाद झाला. अन्यथा यंदा सात वर्षींनी फुललेल्या कारवी फुलांच्या निळ्या आच्छादनाच्या साक्षीने गडाच्या सुंदरशा प्रवेशद्वारावर भव्य आकाशकंदिल झळकला असता. 

हरिहर आवाक्यात वाटत होता. पण तिथेही तीच अडचण होती, चार पाच सोबतीं आवश्यक होते, अन्यथा हर्षेवाडीतून तासाभरात गडावर पोहोचता आले असते. साडेचार तासात कंदिल तयार होणार होता. तेव्हा तो मावळत्या सुर्याच्या साक्षीने झळकला असता. मावळतीच्या रंगात त्याचे रंग पाहणे रम्य अनूभूती ठरली असती.

त्र्यंबकच्या शिवप्रतिष्ठानचे सवंगडी उपलब्ध होऊ शकतील अशी शक्यता वाटल्याने अखेरीस दुर्गभांडारवर शिक्का मोर्तब केले. सुरूवातीला नासिकमधून कोणीच सवंगडी सोबत नव्हते. निघताना अखेरच्या क्षणी दोघे जण लाभले. चित्रकार सुदर्शन तळेकर आणि कोणी सोबत असो नसो, सातत्याने डोंगरभ्रमंती करणारा दीपक पवार. त्याच्याच गाडीतून आम्ही त्र्यंबकेश्वर गाठले. दिवाळीची सुट्टी असल्याने त्रिंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी लोटली होती. तशी तिथे ती प्रत्येक सुट्टीच्या वेळी असते. अहिल्या गोदा संगमाच्या जवळ आम्ही वाहतूक कोंडीत अडकलो. सुदैवाने १० मिनीटात तिथून सुटका झाली. पावणे दोन वाजता आम्ही गौतम तलावा जवळ असलेल्या निखील महाजनच्या घरी पोहोचलो. तो आमची वाटच बघत होता. त्याच्या सोबत येऊ शकणारे अनेक सवंगडी रद्द झाले होते. आम्ही तिघांनी पुढे कुच करावी, तो दोघा तिघांना घेऊन मागून येईल असे ठरले. त्याने आम्हाला मुक्कामाच्या हिशेबाने शिधा बांधून दिला. गडावरत अशोक काका झोलेंच्या झापावर मुक्कामाची व भोजनादी बनवण्याची हक्काची जागा होतीच. लाला महाराजने आम्हाला त्याच्याकडचा बल्ब दिला. चार्ज केलेला हा बल्ब आम्हाला आकाशकंदिलात लावण्याच्या उपयोगाचा होता.

Bramha Savatri Mandir area the starting point

दुपारचे २-००

दीपक आदल्या दिवशीच रतनगड करून आला होता. त्याला बराच थकवा जाणवत होता तरीही तो आमच्या सोबत आला होता. दोन एक तास झोप घेतो व मग वरती येतो असे तो म्हणाला. माझी त्याला खाली सोडण्याची अजिबात इच्छा नव्हती. ब्रम्हगिरीच्या माची पर्यंत त्याला सहज येता आले असते. तिथे अशोक काकांच्या झापावर त्याची विश्रांतीची उत्तम सोय करता येणार होती. पण त्याने खाली थांबण्याचे ठरवले. २-१९ वाजता मी आणि तळेकर असे आम्ही दोघेच निघालो. तळेकर हे कलाध्यापक असल्याने त्यांनी गावातील त्यांच्या विद्यार्थ्यांकडून जेवणाचे डबे मागवून घेतले होते. निघण्याच्या तयारीमुळे आमचे दोघांचे दुपारचे जेवळ बाकी होते. अमोल ससाणे हा त्यांचा विद्यार्थी सर कसे काय वर जाणार, या विचाराने गडाच्या पायथ्याला आला. त्याचा मित्र गणेश झोलेला त्याने सोबतीस घेतले. त्यांना समजले की, आपले सर डोईवर कंदिलाच्या सामानाचा भार घेऊन निघालेत. त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी हातातले काम टाकले. वर माकडांचा त्रास होणार हे गृहीत धरून एकाची गलोल मागून घेतली. ब्रम्हगिरीवर माकडे भयंकर बिधरलीत. येणार्‍या प्रत्येकावर ते अन्नासाठी झडप घालून हल्ला करतात. त्यामुळे स्थानिक मंडळी त्यांना गलोल दाखवून हटकतात. आता गलोलीचा प्रसाद कळाल्याने त्यांना नुसती गलोल दाखवली तरी ते दूर पळतात. प्रत्यक्षात दगड मारण्याची गरज भासत नाही हा त्र्यंबककरांचा सार्वत्रिक अनूभव आहे.

अगोदर सांगितल्या प्रमाणे या मोहिमेचे फारसे नियोजन केले नव्हते. आकाशकंदिलासाठी लागणार्‍या जुन्या देवदार लाकडाच्या पट्टा घरातून निघतानाच योग्य कोन देऊन कापून घेतल्या होत्या. रंगीत सुती कापड योग्य मापात कापून घेतले होते. सोबत खिळे, हाथोडी, पकड, पिना, दोरी, गोंद असा जामानिमा तयार करून घेतला होता. थोडेसे अंतर चालल्यावर तळेकरांनी थोडे खाऊन घेऊ म्हणून बसकन मारली. तसा आमचा दीपकच्या घरी फराळ झाला होता. तळेकर काही नेहमी भटकंती करणारे नव्हते. खुल्या वातावरणात भुख खवळल्याने त्यांनी थांबा घेतला होता. मोहिमेच्या वेळेचे गणित डोक्यात घड्याळाचा काटा टिक टिक वाजवत असल्याने त्यांचा हा अनपेक्षित थांबा रूचणारा नव्हता. खाल्ल्यानंतर पावले अशीही जड पडतात. प्रसंगी सुस्ती येते, त्यामुळे त्यांना पटपट उरकण्याचे सांगून मी पुढे निघालो. त्यांच्याकडे लाकडाच्या चैकटी दिल्या होत्या. माझीही तंदूरूस्ती काही कारणामुळे यथातथाच झाली होती तेव्हा थोडं पुढे व्हावं, जमलं तर पायर्‍यांचा टप्पा पार करून माचीवर अशोककाका झोलेंच्या झापावर थांबावं असा विचार होता. 

Pauranic information about Bramhagiri from ''Trambakam Gautami Tate''

आज मोठ्या संख्येने पर्यटक मंडळी ब्रम्हगिरीवर अवतरली होती. गंगेच्या उगमाचे ठिकाण पाहण्यासाठी सप्तनद्यांच्या परिसराचे दर्शन घेण्यासाठी गडावर प्रत्येक सुट्टीच्या दिवशी वर्दळ हा नेहमीचाच विषय बनला आहे. अनेक जण परतीच्या वाटेला लागले होते. वर जाणार्‍यांची संख्या तशी कमीच होती. पायर्‍यांच्या शेवटच्या टप्प्यात परतणार्‍यांची गर्दी वाढलेली जाणवली. पायर्‍यांवर पाणी आणि कचरा दोन्ही वाहत होते. या टप्प्यात माकडांचा भरपूर त्रास असतो. अंगावर झेपाऊन ते पिशव्या ओढण्याचा प्रयत्न करतात. परंतू दुपार नंतर त्यांचा उत्साह कमी झालेला असतो. तोवर त्यांना लोकांनी भरपूर खायला दिल्यामुळे त्यांची पोटं तशी भरलेली असतात. गडाच्या शेवटच्या टप्प्यात पायर्‍यांची वाट ही कातळ कोरून भूयारी मार्गागत बनवली आहे. एकसरळसोट कड्यातली ही वाट चालळ्‌यास बिकट असल्याने तिथे लोकांची कोंडी होते, त्यामुळे वर जाण्याचा वेग कुर्मगती झाला. तोवर तळेकर त्यांचा विद्यार्थी अमोल ससाणे आणि अमोलचा मित्र गणेश झोले हे तिघे दाखल झाले. त्यांना पाहून अंगात खर्‍या अर्थाने जीव आला. दोन होतो तिथे चौघे जण जमल्याने पुढील कामासाठी बळ मिळाले. 

vegetation on Bramhagiri comprise mostly of Bamboo and endemic shrubs

साडे तीन वाजता अशोक काकां झापावर पोहोचलो. इथवर पोहोचायला वाजवीपेक्षा अर्धातास जास्त लागला. अशोककाका झापावर नव्हते, त्यांचा मुलगा कैलासने आस्थेवाईकपणे चौकशी केली व लिंबुपाणी दिले. त्याला रात्री मुक्कामी येणार असल्याची कल्पना दिली. तिथे त्यांच्याकडे गॅस टाकी असल्याने स्वंयंपाकपाणी करण्याची आमची सोय होती. तशी ही आमची नेहमीची हक्काची जागा. अशोक काका म्हणजे ब्रम्हगिरीची इत्थ्यंभूत माहिती असलेला ब्रम्हगिरीचा यात्री. या गडाबद्दल त्यांच्या मनात अतीव जिव्हाळा आहे. त्यावर ते नेहमी भरभरून बोलतात. गडावरची पाण्याची टकी अधून मधून स्वच्छ करतात. गडावरच्या झाडांचे संवर्धन करतात. त्यांची भेट घेणे हा एक मन:स्वी अनूभव असतो. ते आज लवकर गडउतार झाल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही याची रूखरूख वाटली.

Talekar sir carrying the frames of the Lanterns from the stair way

अमोल व गणेश यापूर्वी अनेकदा दुर्गभांडावर येऊन गेलेत. दुर्गभांडार पाहिला नाही, असा त्र्यंबककर खरे तर विरळाच. त्यांना म्हंटलं पूर्व कड्याने जाऊ म्हणजे लवकरच पोहोचू. तुम्ही तळेकरसरांना सांभाळून न्या. तसे तळेकरही शेतशिवारात वावरलेले असल्याने त्यांनी सरांना घेऊन येऊ अशी हमी दिली. दुर्गभांडावर सर्वाधिक अपघात याच वाटेवर झालेत. डोंगराच्या पोटातली ही वाट साधारण साडेचार हजार फुट उंचीची. काही ठिकाणी जेमतेम पाऊल ठेवण्या इतकी वाट तर काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे मोडकळलेली. दोन ठिकाणी आव्हानात्मक घसारा असलेली. यंदाच्या भरपूर पावसामुळे गवत व झुडपे वाढल्याने वाटेची भेदकता सहज लक्षात येत नाही. खुप सावधपणे या वाटेने चालावे लागते. डावीकडे उभा सोट कातळ कडा आणि उजवीकडे खोल निसरडी दरी यामुळे डोळे फिरायला लागतात. आमची ही सरावाची वाट असल्याने आम्ही दुर्गभांडारवर नेहमी या वाटेने जातो. जटामंदिराच्या वाटेने जायला जास्त वेळ लागतो. 

the eastern traverse to Durghbhandar


ही वाट सावकाशपणे परंतू निश्चींत मनाने अर्ध्यातासात पार केली. आता दुर्गभांडारच्या अश्मपुलावर पोहोचायला सव्वा चार वाजले. कंदिल बनवायला चार साडेचार तास लागणार म्हणजे हा कंदिल भर अंधारात लावावा लागणार हे एव्हाना निश्चीत झाले होते. 

फारसा वेळ न दवडता परिस्थितीचा आढावा घेतला. दीपकचा फोन लागत नव्हता. निखील काही जणाना सोबत घेऊन निम्मा गड चढून आला होता. त्याने भातखळे पारही केले होते. (हे भातखळे म्हणजे ज्या ठिकाणी भाताचा शोध लावल्यानंतर ऋषी गौतम यांनी भाताची खळणी केली ते पौराणिक ठिकाणी. स्वर्गीची गंगा पृथ्वीवर - ब्रम्हगिरी पर्वतावर आणल्यानंतर, समस्त मानवाची भुख भागावी या उद्देशाने त्यांना अजोड असे अन्न निर्माण करायचे होते. यासाठी त्यांनी भात पिकावर संशोधन करून त्यांची सर्वप्रथम निर्मीती त्र्यंबकेश्वरी केली अशी ती पुराण कथा आहे.) आता थोड्याच वेळात निखीलची कुमक येऊन आम्हाला मिळणार होती. 

small entrance to Durghbhandar

अमोलला जटामंदिराच्या येथून काही वापर नसलेल्या झापाच्या बल्ल्या मागून आणण्यास पाठवले. ज्यांच्या बल्ल्या आणू त्यांना त्या परत काढून घेता येणार होत्या. दुर्गभांडारवर जटामंदिराकडून कधी आलेच नाही, असे त्याने सांगितले. ही वाट सोपी असल्याचे सांगून त्याला रवाना केले. पठ्ठ्यांनी कामगिरी अगदी चोख पार पाडली. पोच मोठ्या बल्ल्या खांद्यावर घेऊन आलेत. तोवर आकाशकंदिलाच्या चार मुख्य चौकटींवर तळेकरांनी 'ब्रम्हगिरी' आणि 'त्रिंबकगड' ही अक्षरे रंगवायला घेतली. तोवर मनोज खैरनार दोघा जणांसह दाखल झाला. निखील तार आणि बांबूचा बंदोबस्त करण्यात गुंतला होता तो मागाहून कैलास झोलेस घेऊन आला. 

lettering for the big lantern being done on the Durghbahandar Dike

आमची खरी योजना होती ती दुर्गभांडारच्या वरच्या कड्यात दोन ठिकाणी एक्सपान्शन बोल्ट मरायाचा. त्याचा दोर मध्या पर्यंत आणायचा आणि तिथे ३० फुटांचे उंच बांबू जोडून आकाशकंदिल लावायचा. ब्रम्हगिरीवर चौफेर एवढा बांबूच बांबू आहे. तिथले जुने वृक्ष औषधा पूरतेच शिल्लक आहेत इतका तिथे बांबू माजला आहे, तेव्हा तीन चार मोठाले बांबू सहज मिळू शकले असते असा माझा अंदाज होता. प्रत्यक्षात बांबूचे जंगल हे गडाच्या जुन्या पायरी मार्गाच्या खालच्या बाजुला असल्याने बांबूसाठी धावपळ झाली. आता पंधरा फुटी बांबुंच्या ऐवजी पाच सात फुटी बल्ल्यांवर भागवावे लागणार होते. 

आमच्या मागुन आलेले सर्व जण तास दोन तास थांबून लगेच परतणार होते त्यामुळे त्यांची जमेल तितकी मदत घेण्याचा प्रयत्न सुरू होता. पश्चिम क्षितिजावर ब्रम्हा हरिहर उतवडच्या डोंगराआड सुर्य कलला तरी अक्षरे रंगवून झाली नव्हती. एकदाची ती रंगवून झाली आणि आकाशकंदिल जोडणीचे काम सुरू केले. मनोजच्या जिद्दीला दाद द्यायला हवी. हृदयविकार असूनही तो त्यातुन लवकर सावरला. त्याला डॉक्टरांनी व्यामादीची परवानगी दिल्यानंतर त्यांची ही पहिलीच दुर्गभांडारवार होती. थोडा वेळ थांबून तोही परतणार होता. त्याने अलिकडेच गोदाकाठ हा गजेंद्र अहिरें बहुचर्चित चित्रपट कलादिग्दर्शीत केलाय, या एका कारणासाठी त्यांची गंगेच्या उगम स्तानाविषयीची ओढही त्यामागे होती.

Amol and Ganesh catching the glimpses of the lantern making from atop the cliff

a great place to work on...with deep straight fall on both sides

सव्वा सहा वाजता आकाशकंदिलाची मुख्य जोडणी सुरू केली. अमोल व गणेश यांनी आणलेल्या बल्ल्यांवर इतका मोठा कंदिल दुर्गभांडारच्या खाचेत कसा काय लावायचा? हा प्रश्न होता. माझ्या समोर सोपा पर्याय होता तो म्हणजे सुपल्याच्या मेटेवरच्या बुरूजावर जाऊन लावणे. या बुरूजाला कडेलोटाचे ठिकाण संबोधतात. हा बुरूज एकसंघ कातळात कोरून काढलेला आहे. तिथे बल्ल्यांना बांधून कंदिल सहजपणे सोडता येईल असा माझा अंदाज होता. सोबतच्या सवंगड्यांनी हाच विचार बोलून दाखवला आणि आम्ही आकाशकंदिलाचे ठिकाण निश्चीत केले.

आता एक नविन अडचण उभी ठाकली. कापड ठोकण्याची गनटेकर काम करेना. ही गन चालली नसती तर कंदिल तयारच करता आला नसता. तळेकरांना पेंटींगचे कॅनव्हास बसविण्याचा अनूभव असल्याने त्यांनी टेकरमध्ये अडकलेल्या पिना शोधण्याचा प्रयत्न केला. माझ्याडे आमच्या लाकडी घाण्यावरचे तिळाचे तेल होते. थोडे तेल टेकरच्या स्प्रिंगवर टाकले आणि आश्चर्य म्हण्जे टेकर चालू झाली. 

Mavaltya Dinakara, great view of Bramha-Utwad- Harihar

इकडे उतवडवर मावळतीचे रंग खिळवून ठेवत होते. ''आकाशकंदिल बनवावा की त्या मावळतीच्या संधीत हरवून जावे'', अशी द्विधा मनस्थिती होती. दोनच छायाचित्रे घेऊन हा प्रश्न निकालात काढला. एव्हाना निखील महाजन सोबत आलेल्या मंडळींनी आमचा निरोप घेतला. आता आकाशकंदिल, अंधार आणि दुर्गभांडार हे त्रिकुट मेळविण्याची लढाई सुरू झाली. पावणे सात वाजेच्या सुमारास गडावर मिट्ट काळोख दाटला. सोबत आणलेल्या बल्बच्या उजेडात माझे कंदिल जोडण्याचे काम सुरू झाले. त्याच्या पंचकोनांना त्रिकोण, आयाताकृती बाजुस कापड ठोकण्याची प्रक्रिया सुरू झाली. आज आम्हाला बारिक खिळे मिळाले नव्हते. काहीशा मध्यम आकारच्या खिळ्यांमुळे कंदिलेच्या काड्या चिरून जाण्‌याची भिती होती. त्यामुळे सावकाशपणे हाथोडी चालवावी लागत होती. मातेर्‍या भागावर खिळे ठोकले जात नव्हते, मग एका मोठ्या कातळावर चौकटी ठोकायल्या घेतल्या मजबुत आधार मिळाल्याने खिळे लवकर बसले.

Painting the lantern...

आज वाराही फारसा वेगवान नव्हता. थंडीही म्हणावी तशी बोचरी नव्हती. दुर्गभांडार बघायला आलेली मंडळी कुतुहलाने आमाचा खटाटोप बघून परतत होती. केरळहून आलेला एक ड्रोन कॅमेरामन आमची विचारपूस करून गेला. अमोल हा देखिल चित्रकार असल्याने त्याला गन टेकर चालविण्याचा सराव होता. त्यामुळे त्याची खुप मदत झाली. सगळे हात आता कंदिल पुर्ण करायचाच या इर्षेने कामाला लागले होते. निखीलला घरून सारखी फोनवरून विचारणा होत होती. तरीही त्याने लवकरच निघतो असे सांगून पुरेपूर साथ दिली. आता प्रत्येकाचीच इच्छा होती, की हा आकाशकंदिल पुर्ण करूच खाली उतरायचे. 

८-२५

अखेरीस हो नाही करता अकाशकंदिल पूर्ण झाला. त्याला सोनेरी लेस लाऊन सजवायचे होते. पिनांचे आख्खे पाकिट रिकामे झाले होते. सगळ्या बाजूंना लेस लागणे दुरापास्त वाटत होते. अंधारात विजेरीच्या प्रकाशात खाली काही पिना पडल्यात का याचा शोध सुरू झाला. आमच्या सुदैवाने तीन संच सापडले. आता पूरवून पूरवून पिनांचा वापर सुरू झाला. मिट्ट अंधारात भलामोठा कंदिल मोठा सुंदर भासत होता. तिकडे दिवाळीच्या उजेडात त्र्यंबक नगरी उजळून निघाली होती. त्र्यंबकेश्वर मंदिरावरची विद्यूत रोशनाई येथून नयनरम्य भासत होती. गल्ले गल्लीत फटाके फुटत तसे ते गडावरून गावात असलेल्या चैतन्याची साक्ष देत होते. ठरल्या प्रमाणे हा आकाशकंदिल दुर्गभांडारच्या भिंतीवरून पलिकडे न्यायच होता. एक अर्थाने आमच्या आकाशकंदिलाने दुर्गभांडारची ती थरारक भिंत भर अंधारात पार केली.

तिथून पायरी मार्गाने वर आणि तिथून कडेलोटाच्या बुरूजावर. ही संपुर्ण वाट अतिशय धोकादायक अशी आहे. आमच्यापैकी जवळपास सर्वांना अशा अवघड वाटांवर चालण्याची सराव असल्यामुळे आम्ही स्वत:ला तसेच सोबतच्या प्रत्येकाच्या सुरक्षेची काळजी घेत ती पार केली. दुर्ग भांडारचा पायर्‍यांचा मार्ग म्हणजे भय आणि सौंदर्य याच सुंदर मिलाफ. पुरातन काळातील स्थापत्याचा अद्वितीय अविष्कार. सौंदर्य दृष्टी जोपासत अतिशय कठिण असा कडा फोडून या पार्‍यां तयार केल्या आहेत. समुच्या सह्याद्रीत या किल्ल्या सारखे बांधकाम दुर्मिळ. इतिहासात हा किल्ला शत्रुच्या हाती कधी ही पडला नाही. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळत त्यावरचे गडकोट शत्रुच्या ताब्यातून हस्तगत करणार्‍या छत्रपती शिवाजी महराजांना हा गड फार अल्पकाळ ताब्यात ठेवता आला. शहाजी महराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवताना हा किल्ला मोगल आणि आदिलशाहाकडे दिले तेव्हा पासून हा मोगलांच्या ताब्यात राहिला. 

या किल्ल्याने मराठेशाहीचा अल्पकाळ अनूभवला याचे कारणच त्याच्या अजोड अशा बेलाग घडणीत. निसर्गत: हा संरक्षण सज्ज. शिवाय त्यावर टेहाळणी किंवा चालून येणार्‍या शत्रुवर मारा करण्यासाठी ४० तटबंद बुरूज होते. फार थोड्या शिबंदीनिशी हा गड राखला गेला. याचा विस्तर मोठा असूनही यावर एकच प्रमुख वाट आणि दुसरी चिंचोळी वाट. या दोन्ही वाटा गड ताब्यात त्याच्या हुकमतीत राहणार्‍या. याची बांधणी केव्हा करण्यात आली याचा नेमका इतिहास उपलब्ध नाही. साधारणपणे आपल्याकडे सातवाहन राजवटी पासूनच्या बांधकामाच्या जुन्या खुणा सापडतात त्या सातवाहनांच्या बांधकाम शैलीच्या खुणा या गडाच्या जुन्या बांधणीची साक्ष देतात. गडावरच्या लेणी, खांबटाकी सातवाहन कालीन बांधकामाकडे निर्देश करतात. इतक्या अवघड वाटेने एक हलका कंदिल नेताना, हे खायचे काम नाही याची आम्हाला प्रचिती आली. 

work amidst the Dark


माळिण...

माझ्या पुढे गणेश बॅटरीचा उजेड दाखवत होता व मी दोन्ही हातांवर कंदिल तोलत होतो. पार्‍यातुन वर नेणे खुपच अडचणीचे होते. सुरूवातीलाच तो एकेठिकाणी अडकला. मग अमोलने वरच्या बाजानू तो हळू हळू पुढे सरकवला. माळिण...माळिण हे शब्द माझ्या कानावर पडले पण तो काय प्रकार आहे हे मला काही कळले नाही. या पार्‍यांची उंची जास्त आहे. यावरून भरभर चढता येत नाही. आपण साधारणपणे रोज पायर्‍या चढ उतार करतो त्याच्यापेक्षा या दिडपट तरी अधिक उंचीच्या आहेत. 

पायर्‍या पार केल्यानंतर कडेलोटाच्या बुरूजाची वाट ही कड्याला अगदीच खेटून आहे. ती चालताने दृष्टीभयाची अनूभूती येते. त्यावरून आमचा कंदिल सावकाश प्रवास करत होता. नऊ वाजेच्या सुमारास आम्ही उत्तरी टोकावर पोहोचलो. तिथे जाऊन पाहतो तर काय बुरूजात पाणी भरलेले. याची एक बाजू दरीला चिकटून आहे. तिथे फक्त एक पाऊल मावेल इतकी पातळ वाट आहे. शिवाय तिथून ९०च्या कोनात वळसा घ्यावा लागतो. त्यामुळे इथून फार काळजीपूर्वक जावे लागते. वेगवगळ्या शक्यतांचा विचार करून अखेरीस आकाशकंदिल कशा पद्दतीने बांधायचा यावर एकमत झाले. 

सर्व बल्ल्या दुहेरी तारांनी आणि नंतर मजबूत दोराच्या मदतीने एकमेकांना बांधून घेतल्या. याचे एक टोक बुरूजात साठलेल्या पाण्यात एक मोठ्या दगडाला बांधून तो सगड पाण्यात सोडायचा आणि दुसरे टोक दरीत सोडून त्या टोकाला कंदिल बांधायचा असे नियोजन ठरले. विजेरीच्या मिणमिणत्या उजेडात हे जोडकाम अर्धा तास चालले. एरवी या बुरूजावर आम्ही फार सावकाशपणे चालत असू. आज मात्र अंगात वेगळे बळ संचारले होते. हा केवढा सरळसोट कड्याचा आहे हे ठाऊक असूनही आमच्या लहानशा चमुने मोठ्या हिकमतीने आकाशकंदिल अखेर बांधला. 

 Installing the lantern of the kadelot baston

The moment...what a feeling to bow to the martyrs of the Swarajya

वैभवाच्या काळात गडावर अशीच उत्साहात दिवाळी साजरी होत असणार. तसा थोडासा का हाईना आमच्या हातून प्रयत्न घडत होता. 'आजवर ज्यांची पदचिन्ह या ठिकाणी उमटली त्या सर्वाच्या समृतींना या आकाशकंदिलाचा प्रकाश मिळू दे', अशी प्रार्थना करून बल्यांना जोडलेला कंदिल एकदाचा दरीत सोडला. त्याचा दिवा पेटवला आणि काय सांगू मनस्वी समाधानाना छाती फुलली. भणाणत्या वार्‍यात कंदिल उडत होता. त्याचे छायाचित्र टिपणे दुरापास्त होते. अधून मधून त्याच्याकडे वाकून बघत दोन चार छायाचित्रे कशीबशी टिपत आम्ही रात्री साडे जऊ वाजता कडेलोटाचा बुरूज सोडला. प्रत्येक जण अभिमानाच्या भावनेने गड उतार होण्यास सज्ज झाला होता. कड्याची धोकादायक वाट आता अधिक सोपी झाली होती. 

कातळाता पायरी मार्ग जवळ आला आणि गणेश झोलेने विचारले, तुम्ही माळिनवर हात का टाकला? म्हंटलं माळिण, ही काही कातिन बितीन असते का? नाही ओ, हा विषारी साप असतो. त्याला म्हंटलं, मला माळिण हा प्रकार न कळल्याने ही गल्लीत झाली. शिवाय अंधारात ती दिसलीच नाही. पायर्‍या उतरताना माळिण तिथेच होती. हा मध्यम प्रभाव करणार्‍या विषग्रंथी असलेला ग्रीन वाईन स्नेक प्रजातीतला दोन फुटी साप होता. उतरताना त्याची दोन छायाचित्रे घेतली. अशा अवघड वाटेत साप आला तर त्याला बाजुला केल्या शिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. काही सौभ्य प्रकृतीचे साप जे चटकन हल्ला करत नाहीत, त्यांना न छळता पुढे गेलं तर त्रास होत नाही. माळिणही शांत प्रकृतीत मोडणारा साप. 

पायरी मार्ग उतरून आम्ही दुर्गभांडारच्या अश्मभिंतीवर दाखल झालो. तिथून आमच्या पाठपिठव्या गोळा केल्या आणि दुसर्‍या पायरी मार्गाला लागलो. वर दगडात कोरलेल्या मारूती जवळ घोरपडीचे पिल्ले आढळले. या दोन वन्य जीवांचे दर्शन घेऊन या व अशाच काही वन्यजीवांसाठी ब्रम्हगिरीचे संवर्धन केवढे गरजेचे आहे याची प्रचिती आली. याच कारणासाठी नासिकमध्ये आम्ही ब्रम्हगिरी बचाव सह्यगिरी बचाव चळवळ उभी केली. 

ब्रम्हगिरीवर महामारीचे सावट असताना कडेलोटाच्या बुरूजाच्या खालच्या बाजुला असलेल्या सुपल्याच्या मेटेच्या खालच्या भागात मोठ्या प्रमाणावर दगड फोडून प्लॉट पाडण्याचे काम करण्यात आले. हे काम वन हद्दीत, आदिवासी क्षेत्रात करण्यात आल्याचे सिद्ध होऊनही ब्रम्हगिरीवरचे अरिष्ट्य काही थांबले नाही. चहुबाजूंनी ब्रम्हगिरीवरचे जुने वृक्ष नव्वद टक्के इतके कापून नष्ट केले गेले. त्यामुळे गडावरचा आदिवासी समुदहाय आणि वन्यजीव सैरभैर झालेत. त्यांच्यासाठी हे शेवटचे आश्रयस्थान उरले आहे. यासाठी ब्रम्हगिरीची डोंगररांग ही पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित करण्याची गरज आहे. संयुक्त राष्ट्र संघाने पश्चिम घाटास बायो डायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहे. याचा अर्थ इथल्या प्रदेशनिष्ठ वनस्पती व वन्यजीवांवर मोठे गंडांतर आले आहे. आता भारत सरकारची आणि महाराष्ट्र शासनाची ही जबाबदारी आहे की डोंगरांच्या आश्रयाने महाराष्ट्रात उरलेले शेवटचे जंगल वाचवायचे असेल तर डोंगरांचे पंधरा किलो मिटरचे क्षेत्र हे पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित करायला हवे. म्हणजे तिथे येत्या पाच ते दहा वर्षात वेगाने वृक्षरोपण करून वन्यजीवांचे आश्रयस्थान निर्माण करण्याची गरज आहे. ध्यानात घ्यावे की, दक्षिण भारतात सर्वाधिक पावसाचे हे ठिकाण आहे. महाराष्ट्राचे ४० टक्के पाणी या क्षेत्रात पडणार्‍या पावसातून निर्माण होते. याठिकाणी डोंगरखाणी, रोपवे, घाटरस्ते, हॉलिडे होम आदी प्रकार कायमचे बंद करण्याची गरज आहे. इंग्रजांनी या सगळ्या डोंगरांवरच्या जंगलक्षेत्राची नोंद इंचन इंच मोजणी करून नकाशाच्या माध्यमातून करून ठेवली आहे. ते सर्व जुने मुळ नकाशे शासन दरबारात आहेत. त्यावरून मुळचे जंगलक्षेत्र सहज कळून येईल. हे नकाशे नसल्याचे उत्तर वनविभाग व महसुल विभागाकडून मिळते हे मात्र फारच गंभीर आहे. ब्रम्हगिरीची डोंगर रांग तातडीने पर्यावरण संवेदनशील घोषित करणे गरजेचे आहे. या रांगेतल्या नद्यांच्या संवर्धनासाठी कोणत्याही डोंगरांचे माथे व पायथे प्रत्यक्षात फुटणार नाही या नियमाचे कसोशिने पालन करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रकरणी मौन सोडणे गरजेचे आहे, अन्यथा आज जो भरघेास पाऊस हवामान बदलामूळे झाला. तसा तो रूष्ट होइल तेव्हा इथले डोंगर, इथल्या नद्या नी त्या परिसरातील झाडांची आठवण सर्वात अगोदर आल्याशिवाय राहणार नाही. ही दीपावली नी हा भव्य आकाशकंदिल आपल्या सगळ्यांच्या डोक्यात प्रकाश पाडो नी आपल्या सह्याद्रीचे रक्षण घडो ही त्र्यंबकराज चरणी प्रार्थना.


।।जय हो।।




Bhhatkhalyachi Barav seen from the Durghbhandar traverse

empty stairway at the knock of the evening 



Kadelot buruj seen from Lagna Stambh

we are the original dwellers but our Jungle is lost considerably 


Malin the  Green vine snake

Thanks Buddies..without your help it would have been too difficult to install the Lantern




Lantern seen from Lagna stambh