Tuesday, August 20, 2019

भैरोबाचा माळ:


भैरोबाचा माळ:
सह्याद्रीच्या भटकंती विश्वात निव्वळ पठार किंवा डोंगरमाळा तितक्या लोकप्रिय नाहीत जितके डोंगर, डोंगरी किल्ले, सागरी किल्ले आणि घाटवाटांना महत्व आहे; अशा भटकंतीला जोडून पठार किंवा माळ प्रदेश अनेक सापडतील, पण फक्त माळ भटकंती म्हंटले तर त्या वाटा तशा कमीच! अशा दुर्मिळ माळ भटकंतीच्या दुनियेत भैरोबाचा माळ एक आगळे वेगळे महत्व सांभाळून आहे. निसर्गाचे अत्यंत रौद्र भिषण रूप आणि त्याच्या अगदी विपरीत कधीही विसरता येणार नाही अशी सौंदर्याची उधळण असे दोन टोकाचे वेगवेगळे अनूभव देणार्‍या भटकंतीचा वृत्तांत.
मुंबई, पुणे, ठाणे या महानगरांच्या स्थानिक रेल्वे प्रवासातले नाशिकला जोडणारे कसारा रेल्वे स्थानक प्रसिद्ध आहे. समुद्रापासून सुरू होणार्‍या कोकण प्रदेशाचा हा सीमावर्ती भाग. कसार्‍याचा डोंगर चढून गेल्यावर सुरू होतो तो देश. त्यामुळे देशावरून कोकणात जायचे असेल किंवा कोकणातून देशात जायचे असेल तर स्थानिक रेल्वेचे मार्गावरचे हे महत्वाचे स्थानक. इथला अवघड घाट स्थानिक रेल्वे चढून जाऊ शकत नाही. त्याकरिता जादा ताकदीचे इंजिन असलेल्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्याच घाट चढून जाऊ शकतात. 
स्थानिक रेल्वेचा प्रवास अंगवळणी पडलेले मुंबई, पुणे, ठाणेकरांचा प्रवास येथे खंडित होतो, इथून पर्यायी वाहन घेऊनच त्याच्या देशावरच्या भटकंतीचा पुढचा प्रवास सुरू होतो. देशावरच्या मंडळींचा कसार्‍याशी संबंध येतो तो मुंबई, ठाणे परिसरातल्या भटकंतीला जाताना. स्वस्त आणि वेगवान असा हा प्रवास भटक्यांच्या आयुष्यात कधी ना कधी घडलेला असतो. पहाटे पाच वाजे पासून ते रात्री अकरा वाजे पर्यंत येथे स्थानिक रेल्वे गाड्यांची दर तासाला या हिशेबाने या जा सुरू असते त्यामुळेही इथल्या प्रवासाला पसंती दिली जाते.
कसारा स्थानकावर प्रवाशांचे फार काळ थांबणे तसे होत नाही. याचे कारण म्हणजे लांब पल्ल्याच्या गाड्यां बरोबरच स्थानिक लोकल गाड्यांचे मुबलक पर्याय. दोन डोंगरांच्या बेचक्यात वसलेल्या या लहानशा गावाच्या जवळ कुठलाच किल्ला किंवा ज्ञात असे ऐतिहासिक ठिकाण नाही. इथून एखादी भटकंती होऊ शकते असे कोणाच्या स्वप्नातही येणार नाही. नाशिकच्या एका डोंगरभटक्याने १९८२च्या सुमारात कसार्‍यापासून जवळच देशावर असलेल्या इगतपूरीत नोकरीस असताना कसारा गावातूनच जाणारी भटकंतीची एक वाट शोधून काढली. आजची भटकंती त्या वाटेवरची. 
पठारावरचे पहिले दर्शन

२८ जैले २०१९ रविवारी पहाटे नाशिकच्या मुंबईनाका परिसरात सगळ्यांनी जमायचे. तिथून खासगी जीपगाड्यांनी कसारा गाठायचे. अगदी कसारा रेल्वे स्थानकावरूनच भटकंती सुरू होणार ही कल्पना रोमांचक होती. पहाटे ४-००चा गजर लाऊन ठेवला होता. तो वाजण्यापूर्वीच पहाटे ३-०० वाजता अचानक जाग आली ती पाठीत उठलेल्या एका तिव्र पण अनामिक कळीमुळे. कुस बदलणे सुद्धा अवघड अशी अवस्था होऊन गेली होती. 
काही जणांना अपघातात पायाच्या गुडघ्याचे लिगामेंट  स्नायू दुखापतग्रस्त होतात तेव्हा तो माणूस पयायावर उभा राहूच शकत नाही. अशी अवस्था माझ्या पाठीची झाली होती. थोडंसं जरी हललं तरी पाठीच्या खालच्या भागाचा स्नायू आत ओढला जात होता. अशा अवस्थेत नुसती कुस बदलायची म्हणजे श्वासच थांबून जात होता. माझ्या भटकंतीचे काही खरे नव्हते. 
सौभाग्यवतींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गरम पाण्याची पिशवी शेकायला दिली. थोडा बाम लावला. त्याने कोणताच फरक पडला नाही. साडेचार वाजे पर्यंत माझ्या पाठदुखीचा घराच गाजावाचा सुरू होता. इकडे आईने ट्रेकला जायचे म्हणू मसाला भेंडी आणि पोळ्या बनवून ठेवल्या होत्या. जागचे हालता येत नाही, हे बघून आईने परत गरम पाण्याची पिशवी आणून दिली आणि एक वेदनाशमक गोळी घे, असा सल्ला दिला. कमालीची टोकाची स्थिती येत नाही, तोवर औषध घ्यायचे नाही, हा माझा नियम आजही कायम ठेऊन तो पर्याय मी धुडकावला. तोवर डोळा लागला. अर्ध्या तासाने पुन्हा घडाळाच्या घंटीने जाग आणली. हलणे अजूनही शक्य नव्हते. महत्प्रयासाने आजच्या भटकंतीचे नेते डॉ. हेमंत बोरसेंना माझ्या गंभीर स्थितीची कल्पना देऊन, मी आज रद्द, असे सांगून टाकले. 

थांबेल तो हेमंत कसला, त्याने डॉक्टर ज्ञानेश्वर गुंजाळांना पाठवतो, ते उत्तम फिजियो थेरपीस्ट आहेत असे सांगून माझ्या भटकंतीची धुगधूगी जिवंत ठेवली. डॉ. गुंजाळांना मोबाईवरून घरचे ठिकाण कळविण्यासाठी गुगल मॅपचे लोकेशन पाठवले. ते पावणे सहा वाजता आमच्या दारात आले, पण मी त्याच्याकरिता दोन जिने उतरून दार उघडू शकत नव्हतो. आमची लहानगी जान्हवी जागीच होती, ती खाली किल्ली घेऊन गेली आणि तिने डॉक्टरांना कुलुप उघडण्यास सांगितले. डॉ. गुंजाळांनी तपासवले व तुमचा ट्रेक या अवस्थेत होणे शक्य नाही, असे स्पष्ट केले. डॉ. हेमंतला फोन लाऊन तशी कल्पना दिली. हेमंतने काही तरी कानमंत्र दिला. डॉ. गुंजाळांनी आपण जाऊन बघू, नाही बरे वाटले तर तुम्ही गाडीतच थांबा असा सल्ला दिली. 
मिलिंद नगरच्या सौंदर्यपूर्ण वाटा

माझी सॅक व डबा दोन्ही तयार होते. आता अडचण होती ती पायात बुट घालण्याची आणि गुंजाळांसोबत मुंबईनाक्यापर्यंतचा प्रवास करण्याची. वेदनांची तिव्रता इतकी अधिक होती. तोवर आई चहा घेऊन आली. दोन बिस्कीटे खाल्ली व तिने तिच्या कडची वेदनाशमक गोळी डॉक्टरांना दाखवली. डॉक्टर म्हणाले, ही गोळी चालेल, घेऊन बघ. अर्ध्या तासात तिचा असर झाला तर आराम मिळेल.
तितक्यात डॉ. हेमंतचा फोन आला, तुम्ही आता मुंबईनाक्यावर नका येऊ. थेट विल्होळीला या, तिथून काही जण सामिल होणार आहेत. माझी तर पाचावर धारणा बसली. डॉ. गुंजाळांच्या दुचाकीवर आणखी आठ नऊ किलो मिटरचा प्रवास करावा लागणार होता. 
६-०० ही प्रस्थानाची वेळ ठरली होती. घरातच सहा वाजून वीस मिनीटे झाली होती. पोहोचायला आणखी बारा पंधरा मिनीटे लागणार होते. मी हेमंतला विनंती केली की तुम्ही पुढे जाऊ नका. आम्ही पोहोचतोच. तोवर चमत्कार घडला होता. मी आता काही पावले टाकू शकत होतो. आता मला कसार्‍या पर्यंत जाऊन दुखणे थांबते की नाही याची वाट बघता येणार होती. 
आजच्या भटकंतीचे वैशिष्ट्य म्हणजे निम्मे अधिक डॉक्टर भटके यात सामिल होते. ऑर्थोपेडिक पासून सगळे. माझ्याकरिता ते जोखिम पत्कारू शकणारे असल्याने माझे घरातून पाउल हलले. मुंबई नाक्यावर दोन जिपमध्ये ट्रेकसोल्स खच्चून भरले होते. कसार्‍यात आज आमच्या परिचयाचा आणखी एक नाशिककरा भटक्यांचा गट सहभागी होणार होता, ट्रेंडी ट्रेकर्स. 
मुंबई नाक्यावरून जीप हालली आणि दहा मिनीटांनी लक्षात आले की, माझे हेल्मेट हॉटेलातच राहिले. मग काय जीप गाडी पुन्हा मागे वळवली. काही उशिरा आलेल्या मंडळींचा नाष्ता झालेला नव्हता. या माघारीत त्यांची ती इच्छा पूर्ण झाली. विल्होळी येथे येवल्याचे काही डॉक्टर भटके सामिल झाले. तिथून कसार्‍यात पोहोचलो. डोळखांब फाट्यावरच्या आमच्या नेहमीच्या हॉटेलवर ट्रेंडी ट्रेकर्सचा गट थांबला होता. येथे चहा नाष्त्याचे आणखी एक आवर्तन पार पडले. तिथून महामार्ग ओलांडून आमच्या गाड्या कसारा रेल्वेस्थानकालगतच्या मिलिंद नगराच्या कमानीपाशी येऊन थांबल्या. 


उत्तर आषाढात बरसलेल्या जोरदार सरींनी महाराष्ट्राच्या अनेक भागात पाण्याची पातळी वाढून जनजिवन विस्कळीत झाले तर अनेक मार्ग खचले, अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. परिणाम अनेक ठिकाणांकडे जाणारे रस्ते बंद झाले. त्यात कसार्‍याचाही समावेश होता. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणचे भटकंतीचे बेत रद्द होत असल्याचे संदेश सामाजिक माध्यमांवर धडाधड येऊन पडत होते. आमच्या भटकंतीचा मार्ग निर्धोक होता. कसारा घाटातला एक बाजुचा रस्ता खचला होत, पण आम्हाला तिथवर जायचे नव्हते. आमची वाट निर्धोक होती.

मिलिंद नगर येथून रस्त्यावरून पाण्याचा दोन अडीच इंचाचा प्रवाह वाहत होता. गाडीतून उतरल्याबरोबर पाय भिजले. असेही दिवसभर पाऊस लागणार होता. त्यामुळे त्या भिजल्या पावलांचे कोणतेही वैषम्य जाणवले नाही. शिरगणती घेऊन ८:४६ वाजता येथून प्रस्थान केले. मिलींद नगर ही एक आंबेडकरी वसाहत. डोंगर उतारावरची घरे. पुर्वी कौलारू असायची आता त्यातली बहुसंख्य पक्की सिमेंट कॉंक्रिटची झालेली. तुफान पावसाच्या या प्रदेशात मिलिंद नगर वसाहतीला हिरवाईचा साजच चढलेला. प्रत्येक घराचे अंगण, पत्रा आणि प्रत्येक वाटेला हिरव्या गवत, झुडपाची सजावट. अशा नितांत सुंदर वातावरणात भटकंती सुरू झाली, माझी पाठदुखी केव्हा पळाली हे लक्षात सुद्धा नाही आली. मिलिंद नगर वसाहतीची टप्पा ओलांडताच आपण पठारावर येऊन पोहोचतो. पूर्व, पश्चिम, दक्षिण असा चैहुकडे पसरलेला पठाराचा पसारा पाहून कसारा स्थानकावरूज प्रवास करताना आजवर लपून राहिलेला स्वर्गच जणू आज खुला झाला होता. 


भैरोबाचा माळ म्हणजे कसार्‍यातले पाच सहा डोंगरांना जोडणारा सपाटी असलेला पठारी समुह. आता डोंगरांवरचे पठार म्हटले की, मोठी चढण उतरण नसते, पण चालायचे म्हटले तर एकएक दान दोन मिटरच्या उंच सखल वाटा, ज्यात स्वैर पडलेल दगड, धोंडे. ते चालताना पाय आणि जीव शिणून जावा. या डोंगरांच्या परिसरात अतिशय तुरळक लोकवस्ती असून चहूबाजूस सरळ उंच कडे. लोकांच्या हस्तक्षेपापासून दूर असल्यामुळे बराचसा परिसर हा गच्च दाट झाडींनी नटलेले. 
खरे तर माळ हे तिथल्या एका पाड्याचे नाव. त्यालाच भैरोबाचा माळ म्हणतात. माळ नावाची ग्रामपंचायतच आहे जिच्या आख्यारीत पठारावरच्या अनेक वाड्या वस्त्या समाविष्ट होतात. अत्यंत दाट झाडींचे डोंगर कडे, चहुबाजुस धरण, बंधारे आणि वरच्या सपाटीवर गवतीमाळ, नाना विविध प्रजातीचे गवत, झुडपे आणि काही मोठे वृक्ष अशी संपन्न निसर्गसंपदा लाभलेला हा परिसर लोकांच्या लगबगीपासून नेहमी दूर राहिलेला. शिवाय माळ परिसरात अजूनही कच्चे रस्ते त्यामुळे वाहनांची वर्दळ अतीशय तोकडी. 

चौफेर पसरलेला गवतीमाळ

आडवाटेची, कमी वर्दळीची, पिकनिकबाजांच्या ससेमिर्‍यापासून दूर अशी ही भटकंती दर्दी घुमक्कडांसाठी जिथे खास ठरते, तिथे निव्वळ सहलबाजी करणार्‍यांसाठी अजिबात उत्साह वर्धक नाही. याचे कारण म्हणजे संपुर्ण मार्ग हा दगडगोट्यांचा. त्यातून दहा पंधरा किलो मिटर पायपीट करणारा हाडाचा डोंगरप्रेमी, निसर्गप्रेमी किंवा जंगलवाचक हवा, अन्यथा माणूस कद्रुन गेलाच म्हणून समजला. या माळावर ना खादाडीच्या कुठल्या सुविधा ना नशेबाजांकरिता बसण्यासाठी सोयीची कुठली जागा. त्यामुळेच आजवर भैरोबाचा माळ पिकनिक बाजांच्या गर्दीपासून दूर राहिला.  डोंगरांचा लळा, निसर्गाच्या एकांताची आवड आणि नव्या वाटांची हौस असणार्‍यांना इथला एकांत मनास भावणारा ठरतो. 
---
पावसाचे नंदनवन असले तरी पिण्याचे पाणी हा वेगळा विषय...

पंधरा मिनीटांच्या पायपीटीनंतर खालच्या टप्प्यात एक मध्यम बंधारा दिसत होता. आसपास दाट झाडींमुळे हा परिसर प्रेक्षणिय बनलाय. तिथे थोडे रेंगाळून पंधरा मिटरची डोंगर उतरण पार केल्यावर कच्चा रस्ता लागतो. तो ओलांडून पुन्हा एक छोटी चढण आणि तिथून झुडपी जंगलातुन पठारी मार्ग. येथे एक मोठी अनोखी गोष्ट बघायला मिळाली. वरच्या वसाहतीतल्या काही लहान मुली डोक्यावर हंडा घेऊन पाणी भरायला आल्या होत्या. धोधो पावसाच्या प्रदेशात सुद्धा पाण्याचे दुर्भिक्ष्य. एका कातळ खड्ड्यातून मूली पाणी भरत होत्या. पाणी अर्थातच स्वच्छ. कदाचित वर्षभर येथून पाणी मिळत असावे. पाण्यासाठी वरच्या वसत्यांचा हा महत्वाचा आधार. 
अत्यंत तुरळक वस्ती आणि लोकांची फारच कमी वर्दळ यामुळे या परिसराला एकांतपणाची झळाली लाभलेली. त्यामुळे बरीच झुडपे टिकून. मोठाली झाडी मात्र काहीच दिसत नव्हती. डावीकडे अर्धा किलो मिटर चढण पार केल्यानंतर बंधार्‍याचे दृष्य अधिकच खुललेले दिसले. बंधार्‍यात एक बेट असून त्यावर गच्च् झाडी दिसत होती. पुढच्या उतारावर झुडपांची दाटी वाढलेली बघायला मिळाली. 
आज हिरवे कंच दिसणारा हे पठार पावसाळ्या पश्चात इथल्या गवताची सगळीच तोड होत असावी. त्याच्या खुणा सर्वत्र दिसत होती. थोड्याच अंतरावर काही गाई चरताना दिसत होत्या. आम्ही भैरोबाच्या माळाच्या खालचा महत्वाचा राड्याच्या पाड्याजवळ पोहोचल्याची ती खुण होती. कमालीच्या मुरमाड आणि खडकाळ जमिनीत काही ठिकाणी शेतीकामाची लगबग सुरू होती. भाताची काही तुरळख खाचरे. नाचणी, वरईचची काही ठिकाणी लावणी सुरू होती. 
वाडीतली चंद्रमौळी घरे

प्रत्यक्षात राड्याच्या पाड्याला बगल देऊन आम्ही समोरच्या डोंगराची वाट धरली. त्याच्या पायथ्याला एका शेताची नांगरणी सुरू होती. पावसाने जोर धरला होता. त्यामुळे छत्री सावरत नांगरणी करणार्‍या बैलांचे छायाचित्र घेण्यासाठी थोडी वाट वाकडी केली तर तिथे जुन्या दफनभूमीचे अवशेष दिसले. काही लाकडी स्मृतीस्तंभासोबत एक भली मोठी दगडात सुंदर घडवलेली पण नक्षीकाम नसलेली स्मृतीशिळा आढळून आली. तिथून जवळच एक पुरातन शिवलिंग लक्ष्ववेधून घेत होते. आदिम जमातीत मृत्यू झालेल्यांच्या स्मृती जपण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडाचे स्मृतीस्तंभ आढळतात तसे इथे मोठ्या प्रमाणावर दिसून आले.
याच्या थोडे पुढे आणखी एक कृत्रीम साठवण तलाव लागतो. तो पार करताच माळाला जोडणारा डोंगर लागतो. त्याच्या डाव्या बाजूने चालताना झुडपांच्या वैविध्यपूर्ण प्रजाती लक्ष वेधून घेत होत्या. कृत्रिम तलावापासून वीस मिनीटांच्या चढणीनंतर एक सुंदरशा धबधब्याने लक्ष वेधून घेतली. ही पावसाळी भटकंती असल्याने सगळ्यांनी अर्धा पाऊण तास या धबधब्यात शीण घालवला. इथून आणखी वीस मिनीटांच्या चढणीनंतर माळाच्या माथ्याजवळ जाऊन पोहोचतो. तिथू भरपावसात दुपारचे जेवण. एकाच वेळेस दोन गट आल्यामुळे मोठ्या संख्येने नानाविविध पदार्थांची लयलूट. जेवण सुरू असताना पावसाची जोरदार सर कोसळली. त्याने जेवणात कोणताही खंड पडला नाही. उलट अशा ओल्याचिंब अवस्थेत पावसाने वार्‍यासह जारदार तडाखा दिला, त्यासरशी काही मंडळींनी अवडीच्या पदार्थावर अक्षरश: झपाटा मारला. पावसाच्या मार्‍यात असे मख्ख होऊन किती काळ जेवत बसणार? त्यात हिमांशू देशमूख सारखा मस्तीखोर सवंगडी असला म्हणजे हरेक क्षणाला अखंड मस्ती ही आलीच.
बंधार्‍यातले बेट...समृद्ध

अर्ध्या तासाच्या भोजन अवकाशाने अंगात तरतरी आणली. या टप्प्यावर आसपास कोणतीच वस्ती नाही की, माणसांची वर्दळ. अधून मधून काही गुरं चराई करताना दिसत होते. पावसाचा जोर आणखी वाढल्यामुळे खळाळत वाहणारा एक मोठा ओढा एकमेकांचे हात धरून सावधपणे पार करावा लागला. वरच्या टप्प्यात आणखी एक बंधारा आणि त्यातून वाहणारा ओढा. त्यातून सावरत पुढे गेल्याबरोबर एक छोटी चढण लागली. याभागात भातशेतीची कामे जोरात सुरू होती. पाऊस एव्हाना थांबला होता आणि संपुर्ण माळ ढगांनी भरून गेलेला होता. अक्षरश: स्वर्गीय वतावरण तयार झाले होते.
आता माळ गाव दृष्टीपथात दिसत होते. शेवटच्या जत्थ्यातील मंडळी यायला आणखी अर्धा तास तरी लागणार होता, त्यामुळे आम्ही माळाच्या दक्षिण टोकापर्यंत जाऊन मध्य वैतरणा किंवा मोडकसागर जलाशयाचा परिसर बघण्याचा निर्णय घेतला. या संपुर्ण परिसरातले डोंगर हे गच्च दाट झाडींनी डवरलेले. लोकवस्ती अशी नाहीच. शिवाय तिथे वृक्षतोड करण्यासाठी जाण्याच्या वाटा सोयीच्या नाहीत, त्यामुळे प्रचूरमात्रेत वनसंपदा टिकून. काही डोंगरातून धबधबे वाहत होते. अर्था तास उलटला तरी इथून हलण्याची इच्छा होत नव्हती. पावसाचा जोर आता खुपच जास्त वाढल्याने माघारी फिरण्याचा निर्णय घेण्यात आला. तोच आम्ही ज्या कड्यावर होतो तिथे एक अगदी बारीकसा धबधबा सुरू झाला. आता वार्‍याने वेग घेतल्यामुळे धबधब्याचे पाणी पुन्हा वर येत होते. उलट माघारी फिरणारा धबधबा इतक्या जवळून बघायल मिळाला की, त्याला हात लाऊन बघणे सुद्धा शक्य होते. चमत्काराची ही सुरूवात होती.
जोरदार पावसामुळे हा धबधबा काहीसा मोठा झाला. त्याचे पाणी दरीत पडल्यानंतर गोल टपोरे मोत्याचे रूप घेऊन वर उडत होते. पावसाबरोबरच हवेचा वेग वाढला तसे लाह्या फुटाव्या तसे शेकडो मेाती या धबधब्यातून फुटून वर येत होते. बंदूकीतून गोळ्या झाडाव्यात तशा गतीने हे मोती भराभर सुटताना पाहणे एक स्वप्नील अनूभव ठरला.
कमी वहिवाटीच्या वाटा...

श्वास रोखून बघावे असा हा चमत्कार आमच्यापासून काही फुटांवर सुरू होता. त्यामुळे तिथून हलण्याची अजिबात इच्छा नव्हती. पावसाचा व वार्‍याचा जोर इतका वाढला होता की या कड्यावर उभे राहणे अशक्य बनले, त्यामुळे माळ गावाच्या दिशेने आमची वाटचाल सुरू झाली. स्तब्ध करणारे सौंदर्य बघितल्यानंतर आता पाळी होती निसर्गाच्या रौद्रभिषण चमत्काराची. 
पावसाळ्याच्या सुरूवातीला आकाशात कडाडणार्‍या वीजा हे नेहमीचे चित्र. इथे ऐन पावसाच्या मध्यात वीजा कडाडत होत्या. एक वीज आमच्या खुप जवळ कोसळली. कानठळ्या बसवणारा आवाज सर्वांग शहारणारा होता. सृष्टरचे रौद्र रूप फार जवळून बघायला मिळाले. एव्हाना आमच्या जीपगाड्या येऊन लागल्या होत्या. कोणताच गजबजाट नसलेल्या माळाच्या भटकंतीचा समारोप अशा आक्राळ आवाजात होईल अशी कधीच कल्पना केली नव्हती. भटक्या मंडळींचा येथे वावर असा नाहीच, वेगळ्या पेहेरावात दिसणारी शहरी माणसं बघण्याचे कुतुहल गावातील लहान मुले मुलींच्या नजरेतून जाणवत होते. माळावरून कच्च्या रस्त्याने कसारा घाटाच्या वाडा-विहीगाव फाट्यावर अर्ध्या तासाचा प्रवास करून पोहोचलो. तिथून मुंबई व पुणेकर मंडळींना नमस्कार करून भैरोबाच्या माळाच्या भटकंतीचा समारोप झाला.  
माळावर गवत टिकत नाही...चराई किंवा कटाई...याने गवतीमाळाच्या आश्रयाने जगणारी जीवसृष्टी संपुष्टात येते...

छाप जोशीकाकांची

विश्वास बसत नाही, पण एका अवलिया भटक्याने आपल्या नोकरीच्या आरंभीच्या काळात, ज्यावेळेला डोंगर भटकंतीचा फारसा गाजावाजा नव्हता अशा मागिल शतकाच्या एैशीच्या दशकात कसारा घाट परिसरात एक दमदार माळेची भटकंती हूडकून काढली होती. सह्याद्रीचा हा ठेवा जास्तीत जास्त जणांना मिळावा याकरिता या माळावर सातत्याने दर्दी भटक्यांना घेऊन जाण्याचा ३९ वर्षांपूर्वी सुरू केलेला कित्ता आजही सुरूच असून आहे. यंदा ऑगस्टच्या पहिल्या दोन रविवारी दोन गट याकरिता सज्ज होती.

महाराष्ट्र सेवा संघ, मुलूंड येथे मागच्या वर्षी पार पडलेल्या १६व्या गिरीमित्र संमेलनात, 'गिरीमित्र जीवनगौरव', ह्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित अविनाश जोशी, उर्फ नाशिकच्या भटकंती विश्वातले मानाचे पान जोशी काका यांनी १९८२ साली इगतपुरी येथे कृषी खात्यात नोकरीला असताना कसार्‍यात एक दुर्गम ठिकाणी असलेला माळ भटकण्याकरिता उत्तम ठिकाण असल्याची माहिती मिळाली. वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेने यापूर्वी आठ वेळा भैरोबाच्या माळाची भटकंती आयोजित केली. यंदा ऑगस्ट महिन्यात दोन सलग रविवारी दोन वेगवेगळे गट नेण्यात आले. एकाच वेळी जास्त गर्दी होऊ नये याकरिता ही विभागणी करण्यात आली. 
---
माळ भटकंतीचा हा दुसरा टप्पा...समोरच्या डोंगरावर आणखी एक  टप्पा

भटकंती स्नेही भटकंती
''इरसाल घुमक्कडांना भटकंतीचे एखादे ठिकाण समजावे. त्यावर त्यांनी लहान लहान गटात लोकांना नेऊन भटकंतीचा आनंद द्यावा. अशी अस्पर्षीत ठिकाणे लोकांच्या नजरेत यावीत. काही वर्षातच त्यांना गर्दीची बाधा पोहोचावी. मग उडते एक न घडणारा संघर्ष उडावा - डोंगर भटके विरुद्ध सहलबाज. सहलबाजांनी निसर्गाचा मुलाहिजा न बाळगता गडबड, गोंगाटाने अशी ठिकाणे गजबजून टाकावीत. तिथे मुक्तहस्ते केरकचरा टाकावा. निसर्गाचा एकांत भंग करावा. अशा गर्दी पासून मग दर्दी भटक्यांनी दूरावा राखावा''. महाराष्ट्रात हा प्रकार एक एक करून सगळ्याच प्रसिद्ध ठिकाणी घडत आला आहे. इतका की अगदी शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतल्या महत्वाच्या प्रसंगंचे साक्षिदार असलेल्या ठिकाणांना सहलबाजीने बरबटून टाकले असताना भैरोबाचा माळ सहलबाजांच्या नजरेतून वाचून राहीला ही एक दुर्मिळ, तशीच भाग्याची गोष्ट. त्या मागची कारणे शोधली तर, त्याच्या अडचणीच्या वाटा. पर्यटन सुविधांचा अभाव. थांबायला गैरसोयीचे ठिकाण आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सूई दोर्‍याची स्थिती, म्हणजे जिथून भटकायला सुरूवात केली त्याच्या पलिकडे नेऊन ठेवणारी वाट. या काही कारणांमुळे निव्वळ निसर्गाचा आनंद घेणारेच अशा वाटांचा आनंद घेऊ शकतात. तो घेऊ न शकणार्‍यांच्या पसंतीक्रमात भैरोबाचा माळ कधी सामिल होऊ शकत नाही.
--------
मोठाले वृक्ष नाही...झुडपेही चराईमुळे तोकडी होत चालली

नवे गिरीस्थान हवे
भैरोबाच्या माळेचे अर्थकारण अर्थातच शेती. पावसाळी शेती. पावसाळा सरल्यावर मात्र माळाचे अर्थकारण मंदावते व लोक मोल मजूरीकरिता शहरांकडे वळतात. या आर्थिक मंदिचे प्रतिबिंब वाड्या, वस्त्या नी तिथल्या राहणीमानात उमटते. हे चित्र बदलण्याचा आजवर विचार झाला नसावा, परंतू येथे माथेरान सारखे एखादे गिरीस्थान वसवण्यासाठी भरपूर असा वाव आहे. एकतर येथे माथेरान सारखा भरपूर पाऊ होतो.  डोंगरांचे उंच कडे, जंगल संपदा आणि मुबलक पाणीसाठी असल्यामुळे मोटरवाहन मुक्त असे हे गिरीस्थान निर्माण केले तर. दगड, विटा, मातीच्या देखण्या राहूट्या, घरे, विश्रामालये उभारली. चमचमीत ऐवजी इथल्या स्थानिक पदार्थांनाच ग्राहकाभिमूख सादर करण्याचे गुण स्थानिकांना शिकवले. माळावर दाट झाडीवाढू दिली तर महाराष्ट्राच्या पर्यटन जगतात ती भर टाकणारी गोष्ट ठरेल शिवाय माळावरच्या पर्यावरणाचे छान संवर्धन करता येऊ शकेल. 

माळाच्या पायथ्यालाच कसारा रेल्वे स्थानक आहे, तिथून एखादा मध्यम किंवा पुर्ण विस्तराचा रेल्वे मार्ग माळाच्या विविध टोकांना नेऊन पोहोचणे सहज शक्य होऊ शकते. फक्त बैलगाड्या, घोडागाड्या व घोडेस्वारी, सायकल व सायकल रिक्षा अशाच दळणवळणाच्या विना मोटरवाहन, विना आवाज, विना प्रदुषण सुविधा ठेवल्या तर लोकांना पर्यावरणाच्या अधिक जवळ नेणारा, पर्यावरणाचे संवर्धन करणारा स्वस्त आणि मस्त असा पर्यटन पर्याय उभा केला तर? महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांपैको कोणी तरी आणि प्रशासनातील बाबुंनी हे स्वप्न बघून प्रत्यक्षात साकारायला काय हरकत आहे. नाही तरी आपण आजही खंडाळा, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी, तोरळमाळ हे इंग्रजांनी विकसीत केलेली पर्यटनस्थळेच मिरवत आहोत. स्वतंत्र भारतातले आपण निर्माण केलेले एकही गिरीस्थान पर्यावरण, निसर्गस्नेही नाही, ती तुट भरून काढण्याची येथे मोठीच संधी असेल. 


माळाचे सोंदर्य पावसाळ्यातच...एकदा गवत कटाई किंवा चराई झाली की माळ उघडाबोडका...



उल्कापात होऊन माळावर असे दगड विखुरल्याची मान्यता आहे

रानकेळी अशा अवघड जागीच का? का तर सोप्या ठिकाणी तिची चराई होते...अशा अघड जागीच ती जगू शकते!

मध्यवैतरणा प्रकल्प...मानवी हस्तक्षेप नसल्याने वनराई टिकून...


पानाचे सौदर्य सतत कुस बदलेल...गुलाबी...हिरवे...घट्ट हिरवे...तपकीरी आणि नंतर शिरा शिल्लक राहतील तोवर आनंद उधळेल.

लहानसा सडा

भटकंतीतले अनमोल क्षण...स्वत:ला शोधण्याचे...की स्वत:ला हरवण्याचे

राड्याचा पाडा ओलांडल्यानंतरची डोंगरधार

भैरोबाच्या माळावरचे कठिण जीवन...

शेतीसाठी हिरवे पट्टे पिवळे झालेत...धन्यभाग्य मोठी झाडे टिकवलीत...


माळावरचे जुने शिवलिंग...

समोर दिसतो त्या डोंगराला मध्यावरून वळसा मारून भैरोबाच्या माळाचा शेवटचा टप्पा

आषाढस्य शेतीची मशागत

दिवंगतांच्या स्मृती काष्ठस्तंभ रूपात


जुनी स्मृतीस्तंभ

1 comment:

  1. व्वा, स्मृतींना उजाळा...

    ReplyDelete