![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg7HkRuLwVi3AYMbjMozmDhnJjvCX_FpQtiTxJwf0jktzncft3Za2jAZTm3B3V_lgRjXsvyXGTPRDcTSlu9Bt4L1HjAp42fMKP0dFy-dDqz6e8UVfeIpHNflH66SfG54orZmrFEJ5XG9gri/w640-h480/20210718_121910+copy%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25A7.jpg) |
इंद्राई किल्ल्याची साठपाटीची वाट |
वातावरण मरणाचं सुंदर होतं। सातमाळेतल्या प्रत्येक डोंगरावर आज ढगांचा मुकुट धरला होता। गच्च हिरवाईने बहरलेल्या काळ्याशार डोंगरांना निळ्याशार आकाशाची पार्श्वभूमी। त्यावर पांढरेशुभ्र पुंजके। ढगांची स्पर्धा होती 'आभाळाची निळाई' झाकोळण्याची। जिथे कुठे ढग कमी पडायचे ते नील गगन डोंगरांचे रूप निखरायचे। आणि वारा? तो काळ्याकभिन्न डोंगरांना लपेटलेली ढगांची मखमाली दुलई हलकेच विस्कटायचा। हा खेळ किती काळ बघत रहावा। स्वर्ग यापेक्षा वेगळा असू शकतो का? टोलेजंग इंद्राई किल्ल्याच्या साठपाटीची दुर्मिळ वाट जोखताना, आयुष्यभर जपून ठेवावी अशी ही अनूभूती। सर्वांगसुंदर सह्याद्री भ्रमंतीची!
नासिकच्या सुरगाणा तालूक्यापासून ते अगदी हैदराबादेपर्यंत पसरलेली सह्याद्रीची प्रमुख डोंगररांग, जिचा उल्लेख 'अजिंठा - सातमाळा' असा केला जातो. यातला सातमाळा हा उल्लेख नासिक जिल्ह्यात असलेल्या डोंगरांपूरता केला जातो. मनमाड पर्यंत ही रांग ५० मैल इतकी पसरलेली. तिथून ती राजापूर, कासारी असा वळसा घेत खान्देशला विभागते. (तशी ती नाशिक जिल्ह्याला देखिल एका अखंड डोंगरमाळेने विभागते; ही इतकी सलग आहे की, तुम्ही अचला पासून ते थेट चांदवड पर्यंत डोंगरावरून चालत जाऊ शकतात) तिथे मराठवाड्याच्या सीमेवर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी निर्माण केल्या गेल्या. तिथून पुढे ती बेरार प्रांतात प्रवेश करते. बुलढाण्यातून अकोला, यवतमाळ, परभणी, निझामाबाद असा हैदराबादेपर्यंत तिचा विस्तार.
नासिक जिल्ह्यात मोडणार्या सातमाळा रांगेला चांदोर किंवा चांदवडची डोंगररांग या नावाने ओळखले जाते तर अजिंठा परिसरात इनहायद्री या नावाने. हा इनहायद्री शब्द कशाची फोड करून बनलाय? तो अपभ्रंशातून आला असावा? इंग्रजांनी बर्याच शब्दांचे अपभ्रंश केलेत (तद्वताच अनेक ठिकाणी अगदी बिनचूकही वापरलेत) हा इनहायद्री शब्द त्यांच्या आकलनातून आलेला की, भारतीय परंपरेतला हे स्पष्ट झाले नाही. पण हा इनहायद्री शब्द इंद्राईशी मेळ खाणारा. इंद्राई आणि सह्याद्री अशा संयोगातून तो निर्माण केला जाऊ शकतो. हा अगोदरच कुठेतरी वापरात असावा असे दिसते. एका भल्या मोठ्या डोंगररांगेला ज्याचा शब्द दिला जाऊ शकतो तितकी महत्ती इंद्राईची नक्कीच आहे हे त्याचा अफाट विस्तार आणि त्यावर विखुरलेल्या पुरातत्वीय अवशेषांचे भरमसाठ प्रमाण पाहून स्पष्ट होते. असे असूनही आपल्या बद्दल फार थोडी माहित या 'शैल सुंदरी'ने जगाला उघड केलेली दिसते. प्रचंड आकारमान
सातमाळा डोंगररांगेतला सर्वात मोठा व देखणा पुरातन लेणी समूह इंद्राईवर आहे. जसा एक रांगेत देखण्या कातळ कोरीव स्तंभांनी मंडित लेणी समूह सर्वोच्च भागावर आहे काहीसा तसाच तो खालच्या भागात जिथून कातळभाग सुरू होतो त्यापायथ्याला पूर्व बाजूने सुद्धा करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. अर्थात तिथे अशा लहान खोल्या रांगेने कोरण्याचे प्रयोजन वेगळे असू शकते. शिवाय त्यावर नक्षी कामही केलेले आढळत नाही. हा एक फार मोठा मोठा पसारा असलेला किल्ला आहे. हा आकारमानाने अंजनेरी, हरिश्चंद्रगडाच्या तोडीचा. याचा वरचा भाग म्हणजे काहीसा आयाताकृती एक प्रचंड आकारमानाचा अखंड खडक. हा खडक चहूबाजूंनी सरळसोट उभा. कुठे शंभर तर कुठे दिडशे फुट उंच. आभासी तंत्राने मोजून पाहिले तर हा तीन किलो मिटरहून अधिक भरतो. याचे क्षेत्रफळ डोळे विस्फारणारे चार लाख सत्त्याहत्तर हजार आठशे शहात्तर पुर्णांक दहा शतांश वर्ग मीटर म्हणजेच एक्कावन्न लाख त्रेचाळीस हजार आठशे पंधरा पुर्णांक बावन्न शतांश वर्ग फुट इतके भरते.
दोन पायरी मार्ग
माणूस या कातळावर जाणे शक्य नव्हते तेव्हा जुन्या हिंदू राजवटीत यावर जाण्यासाठी पायरी मार्ग तयार करण्यात आला. यासाठी सुमारे दिडशे फुट उंचीचा सरळ उभा कातळकडा त्याच्या तळापासून छन्नी हाथोड्यांनी तासून पायर्यांचा मार्ग बनविलेला. या पार्यांची रूंदी कुठे १० फुट तर कुठे २५ फुट. अगदी नावाला साजेशी अशी या राजमार्गाची घडण. त्याच्या वैभवाच्या काळात सह्याद्रीतल्या सर्वात देखण्या बांधीव राजमार्गापैकी हा एक असावा याची प्रचिती त्याचे भग्न रूप पाहूनही येते.
एक दोन पाच पायर्यांचा छोटा टप्पा चढून गेल्यावर कड्यात कोरलेला हा राजमार्ग सुरू होतो. तो काटकोनात डावीकडे वळण घेतो. डोंगराचा मजबूत कणखर दगडी किनारा लाकूड तासावं इतक्या सफाईने तासून काढला आहे इतके हे अफाट तासकाम. यातून दोन हत्ती सहज जाऊ शकतात इतकी त्याची भव्यता. अर्थात ही वाट दुर्घट पद्धतीने घडविलेली, म्हणजे वर जनावरे नेता येणार नाही अशी अवघड बनवलेली. घोडासुद्धा वर नेणे शक्य नाही. पायदळाला उंची आणि उंच पायर्यांवरून जाणे सोपे होऊ नये असाच.
तिथून पुढे राजमार्ग उजवीकडे वळतो. हा भला मोठा पायरी मार्ग म्हणजे दिडशे फुटाचा खडक सरळ कापून तयार केलेला. त्याच्या वरच्या भागात अलिवर्दी खानाचा फार्सी भाषेतला तो प्रसिद्ध शिलालेख आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. राजमार्गाची रचना एवढी संरक्षित की, त्यावर शत्रुला सरळसरळ हल्ला करणे अवघड. कोणी वर येण्याचा प्रयत्न केलाच तर गडावरून त्याचा अस्त्र किंवा दगड आदींनी मोठ्या प्रमाणावर प्रतिकार केला जाऊ शकतो अशी ही रचना.
तोफांचा मारा करायाचं ठरलं तर त्यासाठी कुठे जागाच नाही. लांब अंतरावरूनही तोफांचा मारा करणे कठिण. मुख्य प्रवेशद्वारावर हल्ला करायचा तर शत्रूला डोंगरांच्या कोंढावळ्यात येणे भाग. तिथे आल्यावर त्याचा निभाव तो काय लागणार. इंद्राई चहूबाजूंनी निसर्गत: संरक्षित होताच. त्याच्या प्रवेश मार्गाची रचनाही संरक्षित स्वरूपाची. त्यावर हल्ला करण्याचा विचार स्वप्नात सुद्धा कोणाला आला नसेल. 'हा पडला असेल तर केवळ शिष्टाईने' किंवा पल्लेदार तोफांचे यूग अवतरल्यानंत. स्पष्टच सांगायचे तर इंग्रजांनी मोठ्या अंतरावर मारा करणार्या तोफांनी आणि बंदूकाची कार्यक्षमता वाढल्यानंतरच भारतीयांवर विजय मिळवला. समोरासमोर बाण, भाले तलवारीच्या युद्धात भारतीय योद्ध्यांवर विजय मिळविणे कठिण होतं. राजमार्गाची निर्मीती भारतात दारूचा वापर होण्याच्या पूर्वीची निश्चीत. आजचा विषय राजमार्ग नाही. आजची भटकंती थरारक अशा साठपाटीची किंवा साठ पायर्यांच्या वाटेची. तेव्हा आपण त्याकडेच वळूया.
राजमार्ग हा पुर्व उत्तर कड्यात जेथे डोंगरधार दक्षिणाभिमूख होते त्याठिकाणी तर साठपाटी याच्या अगदी पलिकडे दक्षिण पश्चिम कड्यात, सर्वोच्च कातळ टप्प्याच्या खालच्या कातळ टप्प्यात कोरलेली. इंद्राईची पूर्व बाजू अंतर्वक्र आकाराची. एका भल्या लांब आडव्या वाटेने राजमार्गापासून साडे तीन रोडग्याच्या डोंगराच्या धारेला याची एक धार थेट जाऊन मिळते. त्याच्याच खालच्या बाजूला साठपाटी. काही भटक्यांनी साठपाटी दोन टप्प्यात विभागल्याचे म्हंटले आहे. एक ६० पायर्यांचा व थोडे अंतर राखून पुढे ३० पायर्यांचा. त्यांनी केलेली ही नोंद योग्य वाटत नाही. कारण आम्हाला ११५ पायर्या लागल्यात, डावीकडे सरळ गेल्यानंतर पुन्हा डावीकडे वर चढत जाणार्या. दोन स्वतंत्र पायरी समूह लागले नाही. पायर्या चढून गेल्यानंतर सरळच साडेतीन रोडग्याकडे जाणार्या डोंगरधारेची वाट लागली.
आपल्या अंगाखांद्यावर असंख्य कातळ कोरीव भग्नावशेष बाळगून असलेला इंद्राई हा राजधानीचा किल्ला होता. एका महत्वाच्या घाटावरचा पण मुख्य मार्गापासून काहीसा आत. याच्या पश्चिम बाजूला भावडबारीचा घाट तर पूर्व बाजूस राहूड घाट. जुन्या काळापासून या घटांनी मोठी वर्दळ अनूभवली आहे. इंद्राई किल्ल्यावरची जुनी बांधकामे आणि कातळातले भग्नावशेष एक दोन भेटीत पाहून होत नाहीत.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiJUpb-a-Ay1W27b-9yYqNwWi4JmcXWpomw7ZiXI0kRYOcQm8lJ_n5H8LbuLxXMUbNVsLQh7vukayJSjxa9t4ctBiucIGdQaLhbZkoExvycO1_ViLFbGTD7TkQDlKMJ9aQ8kS3frN5aXeGX/w640-h480/1-20210718_121234.jpg) |
साठपाटीच्या पायर्यांची रचना कमालीची सौंदर्यपूर्ण... |
साठपाटी...साठ पायर्यांची वाट
पाचवीला पुजलेला कामाचा व्याप, ब्रम्हगिरी आदी डोंगरावर दगडखाणी आणि अधिकारी-पुढार्यांच्या निसर्ग गृहप्रकल्पांमुळे नासिकमध्ये तिव्र होत चाललेली सह्याद्री बचाव चळवळ, महामारीच्या रपाट्यात धंद्यातली अद्वितीय मंदी अशी कमालीची निराश मनोवृत्तीत असतांना, कोणी जर कुठल्या शोधयात्रेला साद घातली तर? त्या आवतनाचे काय होणार? 'ताणतणावावरचे सर्वोत्तम औषध म्हणजे सह्याद्री'. त्रिशतकी दूर्ग सफरींकडे वाटचाल करणारा सन्मित्र दीपक पवारने साठपाटीच्या भटकंतीची माहिती घेऊन ठेवली हाती. पायथ्याच्या देहेणेवाडीत भगवान ढगे यांच्याशी त्याचे बोलणे झाले होते. मागच्या आठवड्यात केलेल्या बाफळ्या डोंगराच्या शोधयात्रेच्या वेळी आम्ही देहेणेवाडीत जाण्याचा विचार केला हाता. परंतू बाफळ्या उतरताना जोरदार पाऊस लागला. त्यामुळे खाली उतरायला उशिर झाला. अशी ही दुर्लक्षीत, रोमहर्षक, थरारक साठपाटीची वाट. ही साठपाट म्हणजे नक्की काय असावी याचा काहीच अंदाज येत नव्हता. बैलगाडीच्या साठ्याच्या आकारासारखी कमनीय रमणीय पायर्यांची रचना म्हणून तर नसेल ना हे नाव दिलेले, किंवा मग तिच्या ११५ पायर्यांची विभागणी ६० आणि ५५ अशी करून त्यालाच ढोबळमानाने साठपाटी किंवा साठ पायरीची वाट असे नाव पडले असावे?
दीपक म्हणाला तिन जण होतील. जायचे का? म्हंटलं चला. मग तीनाचे पाच झाले. लागोलाग तिन कमीही झाले. मग दोघांनीच निघण्याचे नियोजन केले. पावसाळ्यात साठपाटी घसरडी असणार. त्यावाटेने फारच थोडी मंडळी जातात. वाटाड्या नाही मिळाला तर आपला आपण मार्ग शोधू, कुठे गरज भासली तर सुरक्षेसाठी दोर असतोच. निफाडवरून दीपक घंगाळे, अमोल जाधव आणि... असे आणखी तिघे डेहेणेवाडीत दाखल झालो. तिथे नवनाथ ढगे त्याचा चुलत भाऊ असा मोजका चमू देहेणेवाडीतून मंगरूळ - भावडबारी हा उत्तम दशेतला डांबरी रस्ता ओलांडून पावणे दोन किलो मिटर अंतरावर आपण मतेवाडीत दाखल झालो. भगवान म्हणाला गाड्या इथेच उभ्या करू. तिथून इंद्राईचा पायथा आणखी एक किलो मिटर अंतरावर. ही मते वाडी म्हणजे इंद्राईची दक्षिण बाजू. गावाला लागूनच बुधा नावाचा डोंगर आणि त्याला लागून असलेली डुक्कर नाळ ही इंद्राई व कोळधेर यांच्यात जाणारी घाटवाट. अर्थात ती तीचे पुरातन रूप सांभाळून आहे. त्यामुळे साठपाटीने वर जाऊन डुक्कर धारेने उतरण्याचे आजचे नियोजन होते. अशा पद्धतीने इंद्राईच्या दोन वाटा दृष्टीपथात होत्या. एक साठपाटीने जाऊन वर चोर वाटेने माथ्यापर्यंत पोहोचायचे आणि कोल्ह्या बाफळ्याच्या दिशेने उतरून बुध्याला वळसा मारून डुक्करधारेने खाली यायचे. बेत तर नामी होता.
बुध्याला लागून इंद्राईचा किल्ला ही त्याची दक्षिण बाजू. किल्ल्याची सर्वात कमी विस्तार असलेली बाजू. इतर तिनही बाजूंनी त्याचा विस्तार मोठा आहे. मतेवाडी कडून इंद्राईला स्थानिक मंडळी सोडली तर वर सहसा कोणी जात नाही. त्यातही गुरे चारून आणण्यासाठी किंवा लाकूड फाटा आणण्यासाठी हिचा वापर केला जायचा, हल्ली तोही जवळपास बंद झाला आहे. याचे कारण म्हणजे आता कोणी जास्त गुरे सांभाळत नाही. ट्रॅक्टर प्रत्येक दारात दिसते. शेळ्या मेंढ्या राखण्याचे प्रमाणही जवळपास संपलेले. स्वयंपाकासाठी इंधन म्हणून घराघरात गॅस आलेला. ज्यांच्याकडे नाही त्यांना गरजेपूरता लाकुडफाटा खालच्या भागात मिळून जातो. त्यामुळे वाट फारशी मळलेली नाही. पायथ्या पासूनच काटेरी बोरी, घाणेरीतून वाट शोधण्याचे आव्हान. वाट चुकली की झुडपांनी कपडे ओढून धरलेच म्हणून समजा. एकतर गाडी बरीच दुर उभी करावी लागते. तिथून मोठी पायपीट. सकाळच्या उत्साहात तशी ती जाणवली नाही. वातावरणच इतके सुंदर होते की, पाय किती अंतर कापत आहेत आणि वाट किती घसरडी, काटेरी झुडपातून जाणारी याचे भान उरले नव्हते. काही ओहळींचा परिसर शेवाळलेला त्यामुळे ओलांडण्यास अवघड, आज त्या ओहळी लिलया पार होत होत्या. हा परिणाम नितांत सुंदर वातावरणाचा.
पावसाची ओढ
यंदा नासिक जिल्ह्याला पावसाने मोठी ओढ दिली. पावसाचे माहेर घर म्हणून ओळखले जाणारे घोटी, इगतपूरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या भागात पावसाची सरासरी कमालीची घसरली. इतकी की, भाताच्या पेरण्या आषाढ महिना येण्याच्या बेतात असताना अजून पूर्ण झालेल्या नाही. भाताची पेरणी लांबणीवर म्हणजे पावसाची सरासरी कमालीची घसरलेली हे समिकरण. याभागात अशी घटना ही दुर्मिळात दुर्मिळ. भाता सोबतच भूईमूग आदी पेरण्याही खोळंबलेल्या. त्याचे पडसाद चांदवडच्या याभागात बघायला मिळाले. ज्यांनी मातीत तलाव खोदून मेनकापडाच्या लहान तलावात पाणी साठविले त्यांना सोयाबीन, कोबी आदी पिके घेतलेली तर ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा नाही त्यांची शेतं नांगरून ठेवलेली. काही मोजक्या ठिकाणी बागायत क्षेत्र फुललेले तर काहींनी पहिल्या दोन पावसांवर पेरण्या उरकलेल्या. या भागात लहान लहान वसत्या तशी शेतातली ठिकठीकाणी घरे. त्यामुळे शेतीची उत्तम देखभाल केलेला हा परिसर. डोंगराच्या पायथ्याला काळीभोर माती तर तिथून पुढे काही मिटरपासून मुरमाड स्वरूपाची जमिन. पिंकांची निवडही नव्या काळाला अनूसरून अशी. विदेशातून आलेल्या सोयाबीनचा अधिक बोलबाला. कुठे द्राक्ष, उस, टमाटा, कोबी, युरोपियन गोड मका अशी पिके घेतलेली.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg8hGvqdDhm3KGcH3lPfE3XgMS-6yqwf4pqrJpJZ7vtxJxyWyl5erEguxalVK-qhM24FbI9tEsLHwFwxqEAfOJw4a9EH4EVGC783D4zyUQEF-1vUYgudVF3rJcvRm4zvrUjQ72grGRr00oW/w640-h480/20210718_102421+copy.jpg) |
mountains from the chandwad and manmad region with clear visibility |
समोर चांदवडच्या पलिकडचे सर्व डोंगर आज स्पष्ट दिसत होते. हडबीची शेंडी, कात्रा, गोरखकड, अंकाई-टंकाई या बाजूने हा डोंगर समूह वेगळा आनंद देत होता. शिवाय त्यावर ढगांचे भलेमोठे आवरण, लख्ख प्रकाश, आकाशाची निळाई अशा मनोहारी वातावरणात चालण्याचा वेग मंदावणे स्वाभाविक होते. जमेल तितके दुरचे डोंगर बघताना औंढा पट्ट्याच्या पलिकडची कळसुबाई रांग शोधण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतू त्याभागात ढगदाटी आणि धूसरपणामुळे ते दिसले नाही. मळलेली वाट न सापडल्याने गायवाटेने आता भराभर उंची गाठली जात होती. साठपाटीची वाट ही डेहेणेवाडीतूनही दिसते. कातळात कोरून काढलेल्या पायरी मार्गाचे सौंदर्य सर्व बाजूंनी भुलवणारे. जवळ गेल्यावर, 'पूर्वकाळात काय देखणं काम करून ठेवलयं', असे अस्फुट गौरवोदगार निघाले नाही तर नवल.
या पायर्या ठिकठीकाणी सतत रिसणार्या पाण्यामुळे शेवाळलेल्या. उजव्या बाजूला थेट दरीत कोसळणारा उभा कडा. याची कातळातली संरक्षणबाजू अस्तित्वात होती. ही वाट नक्कीच इंग्रजांनी राजधेरच्या युद्दानंतर सुरूंग लाऊन उधवस्त केलेली असणार. येथे दोर अडकविण्याची सोय नसल्याने एकाने पुढे जाऊन सुरक्षा दोर पुरवायचा व शेवटच्याने खालच्या बाजूने आणि मग शेवटच्या गड्याला वरच्याने सावकाशपणे सुरक्षा पुरवायची असे नियोजन करून आम्ही हा मार्ग पार केला. गावातली मंडळी मात्र तशीच पुढे निघून गेली. आता साडेतीन रोडग्याच्या डोंगराला जोडणार्या इंद्राईच्या धारेवर आम्ही येऊन पोहोचलो. स्पष्ट वातावरणामुळे हिरव्याशार डोंगरांचे सौंदर्य डोळ्यात साठत नव्हते. हा भाग भल्या मोठ्या सपाटीचा. इथून इंद्राईची पूर्वबाजू अंतवक्र स्वरूपाची.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhdeHHXvKE6DckKunqFk0QExUnqD4B_5ExmiV8MmqSwKEFFjqtsLbr2ulSl7RbkftjNPhftkQHdddM34haT0ju3-qV0Hx63ecI3gUaLlXlUTivaq2m43Q05WDuU47A2Jk7o6DjN0zhia37t/w640-h480/20210718_110337+copy.jpg) |
डुक्कर घळ |
वातावरण खुपच सुंदर होते. त्याच्या सोबत दमाटपणाही तितकाच. नकळतपणे शरीरातून घामावाटे भरपूर पाणी निघून जात होते. भटकंती म्हंटलं की आव्हानात्क वाटा. वरच्या बाजूने दगड, दरड कोसळण्याची शक्यता गृहीत धरून कुठे थांबायचे? कधी थांबायचे? याचे गणित जुळविणे महत्वाचे असते. आम्ही साडे तीन रोडग्याच्या डोंगराला जोडणार्या इंद्राईच्या धारेवरच थांबण्याचे ठरवले. तिथे एक सपाट स्वच्छ खडक जणू आमच्यासाठीच अंथरलेला होता. सोबत आणलेल्या डब्यांवर ताव मारून आम्ही येथेच दुपारचे जेवण उरकले. आजची भटकंती तशी फार उशिरा सुरू झाली. आम्हाला ढेहेणेवाडीतून निघायला १०-१५ वाजले तर इथवर पोहोचायला १२-४०. भल्या सकाळी घरच्या मंडळींने प्रेमाने तयार केलेला स्वयंपाक अशा मनोहारी वातावरणात अधिकच रूचकर लागतो. कोणी हिरव्या मिरचीचा ठेचा, कोणाकडे सर्व कालिन लोकप्रिय बटाटा भाजी, एकाने भेंडी, एकाने गिलके अशा घरच्या बनलेल्या मस्त चवदार भाज्यांची ही दमदार मेजवानीच.
खालच्या बाजूने साठपाटी सारखी व्यवस्थित घडलेली पायरी वाट असेल तर वरच्या बाजुला शेवटचा कातळ टप्पा पार करण्यासाठीही वाट असायला हवी ना? इथे तसे काही दृष्टीस पडले नाही. साडेतीन रोडग्याच्या सपाटीवरून मुख्य कातळाला लागून असलेली एक लहानशी अनगड खडकाळ वाट चढून आम्ही राजमार्गाच्या दिशेने कुच केली. इथून इंद्राईचा विशाल टप्पा दृष्टीस पडतो. ऐतिहासिक वाटावी अशा वाटेची कोणतीही खुण इथे दृष्टीस पडत नाही. ही अगदी डोंगराच्या कडेने जाणारी अतिशय जोखिमेची आडवी वाट (traverse). हा अतिशय दाट झुडपांचा भाग. झुडपे कुठे पुरूषभर उंचीची तर कुठे डोक्याच्याही वर जाणारी. छानसे हिरवे जाड बारीक मध्यम पात्याचे विविध प्रकारचे गवताचे पुंजके, अनेक प्रकारची चीरपरिचीत झुडपे, त्यातून जाणारी ही वाट अजिबात सोयीची नाही. बर्याच ठिकाणी जेमतेम पाय ठेवायला जागी, तिथून सरळ दरीत उतरणारा घसारा. नजर वर करून चालण्याची सोय नाही पण खाली बघूनही चालता येत नव्हते इतकी झुडपांची दाटी. कुठे चिखल तर कुठे दगड शिळांचे खंड तर कुठे मोठाले अनगड दगडी ठोकळे. साठपाटी चढताना दमटपणा जाणवत होता तो या ठिकाणी जास्त जाणवायला लागला. वेळेवर खाणे पिणे होऊनही जीव पाणी पाणी करत होता. शरीराचे पाण्याचे गणित बिघडल्याची ही लक्षणे. असे का घडते? याचे सरळ सोपे उत्तर म्हणजे घामावाटे, उच्छवासातून बाहेर पडणारे पाणी शरीरात भरून निघत नव्हते. मला व दीपकलाही हा त्रास जाणला. स्थानिक मंडळी पुढे निघून गेली होती.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhW9UcJbAs_6V-qW18um-52Dyz6GMwTluVAs1ZBnXkVaCMH1Nqt_9f7wMmk1Hub7p9Y_RXxsgqpjNWSDpdD-zC09P-mxmFl9POpntay_oRvOI4cgvBjInxDECQ3gBzAkfr8kYwkZhKAZHyk/w640-h428/1-20210718_133217.jpg) |
दाट हिरव्या गचपनातली वाट शोधण्याचे दिव्य...☺ |
थरारून टाकणारा पाऊस स्तंभ
एका खडकातल्या ताज्या झर्याचे पाणी पिऊन आम्ही थोडी विश्रांती घेण्याचे ठरवले. दीपकचे डोळे लालेलाल झाले होते. साडेतीन रोडग्यावर ऊन सावलीचा खेळ सरू होता. अखेर तो आलाच...इतका वेळ ज्याने दम काढला तो पाऊस! पावसाच्या सरी सुरू झाल्या आणि काहीली करणार्या आमच्या जीवाला थंडावा लाभला. एका बाजूला अंधारलेले तर समोर लख्ख उन आणि मध्ये पाऊस सरी असे तिन प्रकाशछटांचे हे जिवंत दृष्य. समोरच्या बाजुला अंस्पष्टशा पावसाच्या तीन भिन्न छटांच्या रेषा आकाशातून कोसळताना दिसत होत्या. तो स्तंभासारखा कोसळणारा पाऊस होता. म्हणजे आजूबाजूला सर्वत्र हलकासा शिडकावा तर मध्ये स्तंभ होऊन पडणारा पाऊस. असा चमत्कारीक पाऊस आजवर कधीही बघितला नव्हता. समोर हिरवाकंच साडे तीन रोडगा आणि त्यावर हे तीन स्तंभ. मागून उन्हं येत असल्याने पावसाचे थरारून टाकणारे चित्र. हा पाऊस शिडकाव्याच्या स्वरूपाचे फार जोर नसलेल्या बारीक थेंबांचा. फार वेळ चालणार नाही हे त्याचा जोर पाऊनच कळत होते. वारा मात्र आपला पूरेपूर जोर दाखवून अगणीत थेंबं दूरवर फेकत होता. थोड्याच वेळात तो थांबला.
आमच्या थकव्याचे कारण होते ते कडक उन आणि ढगांमुळे तयार झालेला दमटपणा. भरीस भर म्हणजे जमिनीत आद्रता असल्याने तो जास्त वाढला. भली मोठी आणि सतत चढत जाणारी चाल या मुळे घाम आणि उच्छवासातून पाणी बाहेर जात होते. त्यातुलनेत शरीराची पाण्याची तुट भरून निघत नव्हती. पाणी नियमीत न प्यायल्याने एकदम पाणी पिऊन भागत नाही. मला तर सकाळी उठल्या बरोबर अडीच ते तीन ग्लास गरम पाणी पिण्याची सवय आहे. तरीही आज शरीराची पाण्याची गरज भागली नव्हती. वाटेत थोडे थोडे थांबून तीन वेळा घोट घोट पाणीही घेतले होते, तेही पुरले नाही? थोड्याशा विश्रांती नंतर तरतरी आली. पावसाची सर थांबली. आमची चाल पुन्हा सुरू झाली. हिरव्याकंच वनराईचा अंगाला सतत स्पर्ष होत सुखावणारी वाट. पायाखालची जमिन अस्थिर, असमतल दगड चिखलाची, खाली थेट दरी. अंगात आलेला थकवा, त्यामुळे सावधपणे आमची वाटचाल सुरू होती.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhom1Fk3ZRvPPD9g_zbWQt5hpD2oTHcl9vj_J3yKwHIejLpLSwg7EJ9mXMRkzfMSi_uMZDcukvcSR_YMVcybdHd5IGwkkql2D-aEvF3mWZsAQJ03keztaVmQYhsQqdHH0xQcLmbNSsF6tG8/w640-h406/1-20210718_143933.jpg) |
vertical fortification neat and immaculate wall construction that stood test of time |
शंभर फुट उंचीचा तट
राजमार्गाच्या अलिकडे तीन डोंगर नाळा वर जातात त्यात दुसर्या नाळेत चोरवाटेवर खिडकी किवा दरवाच्या दोन चौकटी लांबूनच दृष्टीस पडल्या. अगदीच उभ्या चढणीचा हा पायरी मार्ग कोसळलेला दिसत होता. त्याच्या अलिकडची नाळ खालपासून वर पर्यंत चौकीनी दगडांची भली मोठी भिंत बांधून संरक्षित केलेली आश्चर्यकारक रचना दिसली. अशा प्रकारच्या तटभिंती सह्याद्रीत अगदी अपवादात्मक. इंद्राईवर राजदेरच्या बाजूने येतानाही एक अशीच बरीच मोठी भिंत डोंगरनाळेची वाट बंद करण्यासाठी बांधल्याचे दिसून येते. २०१८च्या भेटीत ती भिंत आम्ही बघितली होती. जुन्या बांधकामाच्या सफाईदार आणि बिनचूक कामाचा परिणाम असा की, शेकडो वर्षे या भिंती तसुभरही हलल्या नाहीत. इतकं श्रेष्ठ दर्जाचं जुनं काम बघितलं की, आजच्या सिमेंट थांपुन केल्या जाणार्या अल्पजीवी तकलादू बांधकामांची किव येते. आजचा महाराष्ट्रात पुराणवास्तू संवर्धनाच्या कामाचा दर्जा पाहिला तर हे काम केवढे श्रेष्ठ होते याची प्रचिती आल्या वाचून राहत नाही. शासन लाखो, करोडो रूपये काही गडांच्या संवर्धनासाठी खर्च करतं. आज आधूनिक बांधकाम साधने उपलब्ध आहेत. तळाला दगड घडवून ते गडावर नेण्यासाठी बांधकामाचे रज्जूमार्गही वापरण्यात येतात. तरीही जुन्या बांधकामाच्या आसपासही आपण पोहोचू शकत नाही? डोंगराची दिडशे ते दोनशे फुटांची दरी चक्क घडवलेल्या चौकोनी दगडांची भिंत बांधून बंदिस्त करायची म्हणजे अभियांत्रिकी आश्चर्याचा नमूना. गुरूत्वीय बल मापून ट्यूब लेव्हल व्यवस्थित तपासून केलेले हे अतिशय सफाईदार बांधकाम. इतकेच नव्हे. त्याल सांधणारा चुना केवढा समर्पक मळलेला. त्यावेळचे चुना मळण्याचेही अजोड असे तंत्र, जे आजच्या आपल्या शासन व्यवस्थेला ठाऊक नाही. (तोरणा किल्ल्यावर दोन वर्षांपूर्वी आठ कोटी रूपये पुरातत्व विभागासाठी मंजूर करण्यात आले होते. तोवर गडावर त्यांनी भरपूर डागडूजी करून ठेवली. अत्यंत बेजबाबदारपणे पुरातत्व नियमांचा सरसकट भंग करणारे लोखंडी नळकांड्यांचे संरक्षक कठडे बनवले. ना ते कठडे टिकले ना तो चुना. शेवटी आले ते सिमेंट कॉंक्रिटवर. आणि निर्णय कसला तर आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी गडावर दुर्ग इतिहासप्रेमींना मुक्काम करण्यावर बंदी. कशासाठी ही बंदी? ही मोगलाई लागून चालली की जुलमी युरोपियन राजवट? ज्यांचा एकदिवसात अभ्यासपूर्ण पद्धतीने तोरणा बघून होत नाही. त्यांनी पुन्हा खाली उतरायचे? पुन्हा दुसर्यादिवशी गड चढून उरलेला भाग बघायचा? तथाकथित शिवप्रेमी राज्यकर्त्यांना तर गडांच्या आणि इतिहासप्रेमींच्या व्यथा जाणून त्यावर तोडगा काढायला तर वेळच नाही) एक विस्मृतीत गेलेली बांधकाम पद्धती. अशी आव्हाने झेलत आज दुर्ग संवर्धन नावाचा खेळ सह्याद्रीच्या गडकोटावर खेळला जाताना दिसतो. आपण पुरातन भारतीय स्थापत्याच्या जवळ पास का पोहोचू शकत नाही, ही खंत मनाला अस्वस्थ करते.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhHBEh-rDoU12hO_qZgiTuLHNv_JGE4MsH0-I9b8daw8H7DwI_dt74vUrbHlxBphPe5dySeY602pQ3PClWIPB7ZeiJbWAsgvgpa4vv4ITMe7ODaafFNUA54ZYexw85_StaDDrnQXbQ33PDj/w640-h480/1-20210718_145938.jpg) |
unfinished leni...a series of chambers at the base of the rockportion |
लेणी समूह
या परिसरात कातळाच्या पोटात दोन मोठी टाकी पाण्याने भरलेली दिसली. एक छोटासा उभ्या चढणीचा टप्पा पार केल्यावर आपण त्याच्या जवळ पोहोचतो. यातले एक टाके फारच विशाल आकाराचे अतिशय सफाईदारपणे आयाताकृतीत खोदलेले. त्याची रूंदी पन्नास फुटांपेक्षा जास्त असावी तर उंची २० फुट. दगड माती पडून हे विशाल टाकं वर पर्यंत बुजले गेले आहे. आतले पाणी स्वच्छ आहे पिण्या योग्य. दुसरं एक टाकंही बर्यापैकी मोठं सुबक चौकोनी थोडं पुढच्या बाजूला आहे. त्यातही दगड माती भरलेली. याच्या मागे कातळात काही खोल्याच्या रचना आहेत. त्यावर आता दगड पडून त्या उध्वस्त स्वरूपात असल्या तरी एका देखण्या बांधकामाची त्या साक्ष देतात. याचा वापर निवासासाठी, साधनेसाठी की आणखी कशासाठी', हा विचार मनात आल्यावाचून राहत नाही. डाव्या बाजूला आणखी एक फार मोठी खोदलेली गुहा दिसली. या गुहेचा वापर अलिकडच्या काळात गुरे ठेवण्यासाठी केल्याचे संकेत दिसतात. याच्या तळाला भरपूर धुळमाती साठलेली दिसली. ही माता काळी नसून पांढरी आहे. त्याच्या पुढे आणखी एक चौकोनी खोदीव गुहांची रांग लागते. या गुहांचे मुख सुबक अशा मोठ्या चौकोनी आकारात खोदलेले. महाराष्ट्रातल्या लोकप्रिय लेणी समूहात जसा मुखाकडचा भाग हा विशाल चौकोनी रचनेतून कोरलेला असतो तशाच स्वरूपाचे हे देखणे कोरकाम. अर्थात आतमध्ये मुर्त्या किंवा कुठलेही चिन्ह खोदलेले नाही. हे कदाचित अपूर्ण राहिलेले काम असावे. तसे असेल तर गडाच्या आयुष्यातला तो धकाधकीचा काळ असू शकतो.
या भागातून साडे तीन रोडग्याचा डोंगर आणि त्याच्या मागचा चांदवडचा डोंगर. त्या पलिकडे मनमाड परिसरातले डोंगर न्याहाळता येतात. खाली विशाल खोरे हे दाट झाडीने नटलेले. त्याच्या मधल्या टप्प्यातून नदी किंवा झर्याच्या खुणा नाहीत, पण अलिकडच्या काळात बांधलेला एक बंधारा दृष्टीस पडतो. त्यात म्हशी मस्तपैकी डुंबत होत्या. तर गावातली मुलं चेंडू फळी खेळण्यात दंग. त्यांचा दंगामस्तीचा आवाज इथवर स्पष्टपणे ऐकू येत होता. म्हणजे खालच्या बाजूने हाकारे दिले तर गडावर व्यवस्थित ऐकू येत असणार. एखाद्या किलो मिटरवरून खालचे बोलणे वर पर्यंत ऐकू येत असणार!समोर दाट झाडीत एक पुरातन मंदिर. हे शेकडो हेक्टर पसरलेलं खोरं यातून थेट वडबारे गावाकडे जाणारी वाट. याच्या पुढच्या भागात नदी असू शकते किंवा आता ती राहिली नसावी. आमच्या सातमाळा डोंगरयात्रेच्या वेळी राजमार्ग उतरून हनूमानाच्या मुर्तीच्या बाजूने खाली उतरताना आम्हाला नदी सारखी आटललेल्या दगडगोट्यांची रचना दिसली होती. तेव्हाही त्यात वाहते किंवा साठलेले पाणी दिसले नव्हते. मग तिथे असे वाहून आल्या सारखे दगड कसे काय? हा प्रश्न तेव्हा उपस्थित झाला होता. आता आम्ही वरच्या बाजूला असल्याने तिथेही नदी किंवा वरून पडणारा धबधबा दृष्टीस पडला नाही. काय रहस्य असावे या आटलेल्या नदीचे.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjY2W6f9MMmTjn1_f9xGiWp1iig-dPpSSm3uGcTBH6WAtrC9TszFUwEoTdC05Botb8L59keH7D4TQ6n3v-YAHYcTbpbixKIzMoGxjWrXi6Lo3dbiqeR_MLZP579rJCFju2pdSLDPUHLq8Jj/w640-h388/1-20210718_144607.jpg) |
चोरवाट |
|
|
चोरवाट
आता आम्ही राजमार्गाने वर न जाता चोरवाटेने वर जाण्याचा निर्णय घेतला. स्थानिक तरूणांचा एक गट वरून येत होता. त्यांना विचारलं की, वाट कशी आहे. यायला काही अडचण तर नाही ना. तर ते म्हणाले ही सुरक्षित नाही, तुम्ही राजमार्गाने वर या. आम्ही म्हणालो, आम्हाला याच वाटेने वर यायचे आहे, तेव्हा ते म्हणाला मग या! आमच्या पैकी दोघा दीपकांनी ही वाट बघितलेली होती. पण सुरूवातीला ती तीच असावी का? याचा त्यांना अंदाज आला नाही. दीपक घंगाळे हा मागिल भेटीत या वाटेच्या वरच्या मंदिरा पर्यंत आला होता. वर गेल्यावर त्यांना ती ओळखता आली. अतिशय सुंदररित्या कातळात घडवलेली चिर्यांच्या रचनेची ही वाट चोरवाट असू शकते याची मनोमन खात्री पटते. इंग्रजांनी राजदेरवर चढाई केल्यानंतर या परिसरातल्या किल्ल्यांचामोठ्या प्रमाणावर विध्वंस केला त्यात ही भली थोरली चोरवाट पुर्णपणे उधवस्त केली गेली असणार यात शंका नाही. आज भग्नदशेतही तिचे महत्व आणि सौंदर्यपूर्ण रचना खिळवून ठेवते.
बर्याच गडांच्या बाबतीत, चोरवाट हा शब्द ऐकिवात येतो यात 'चोरांसाठीची', असा अर्थ होत नाही तसा तो अभिप्रेतही नाही. गुप्त वाटांना चोरवाट म्हणण्याचा प्रघात होता. हे सामान्यांच्या नजरेपासून लपवून ठेवलेले गडावरचे निष्काशन मार्ग. आणिबाणीच्या प्रसंगी या वाटांचा उपयोग गडातून बाहेर पडण्यासाठी केला जात असे. हे मार्ग वापरले जात नसत, एखादा बोगदा, भूयारातून हे मार्ग काढलेले असत काही ठिकाणी निम्मी अधिक वाट दिसायची व नंतर ती गायब व्हायची. म्हणजे ती दिसणार नाही, कोणाच्या लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने ती लपवली जायची. दरवाजा असेल तर तो माती भरून बंद करून ठेवला जायचा. गरजेच्या प्रसंगी ही माती उकरून त्यातून गडावरचे महत्वाचे व्यक्ती किंवा सैन्या तुकड्या त्याचा वापर करत.
रामसेजच्या चोरवाटेचा इंग्रजांनी तयार केलेल्या राजपत्रात उल्लेक आढळतो. रायगडावरचा वाघ दरवाजा याचे उत्तम उदाहरण, या वाटेने राजाराम महाराजांनी प्रमुख सरदार मंडळींसह गड सोडल्याची वदंता आहे. इंद्राईची चोरवाट दूरवरून राजरोसपणे दिसते, तर ती चोरवाट असू शकते का? अशी शंका अनेकजण विचारत आहेत. त्यात तथ्य असू शकेल. परंतू हे नाव प्रचलित आहे. ते चुकीने झाले असावे किंवा चोरवाटेचा वापर बंद केलेला असावा व आणिबाणीच्या प्रसंगी तिच्या वापराचे नियोजन असावे. साठपाटीची वाट बघितल्यावर तिथून वरच्या मागात जाण्यासाठी सोयीचा मागच नाही. अवघड अशी आडवी वाट पकडूनच गडावर जाता किंवा गडावरून उतरता येऊ शकते. कदाचित साठपाटीचा संबध आणिबाणीच्या प्रसंगातला निष्काशन मार्ग असू शकतो.
चोर वाटेवर खालच्या बाजूला दोन ठिकाणी दरवाजाची रचना आहे. मातीने हे दरवाजे चिनून ती बंद करत असावेत. चोरवाटा अशाच बंद करून ठेवल्या जातात व आणिबाणीच्या प्रसंगी माती उकरून गडावरची मंडळी किंवा सैन्य तुकड्या यातून बाहेर पडतात. या वाटेची बरीच पडझड झाली आहे. ती कोणी बांधली? कधी बांधली? केवढ्या घडामोडी तिने पाहिल्या? या सगळ्या गोष्टी काळ नावाच्या ग्रंथात कुलुपबंद झाल्या आहेत. संवर्धन व संशोधना अभावी हा मौल्यवान ठेवा आता निसर्गात मिसळून चालला आहे.
घड्याळात दुपारचे ३-११ वाजले होते. यावाटेने वर गेल्यानंतर पलिकडून खालच्या बाजूला उतरणारी एखादी वाट असू शकते का? हे जाणने महत्वाचे होते. कारण डुक्कर घळीतून उतरण्यासाठी ते गरजेचे होते. त्याचे उत्तर कोणाकडेच नसल्याने आलोच आहोत तर माथ्यावरचा देखणा लेणी समूह बघू, वरच्या पुरातन शिवमंदिराला भेट देऊन परतीचा मार्ग धरू, असा निर्णय आम्ही घेतला. आमच्या समोर आणखी एक अडचण होती, ती म्हणजे पायरी मार्ग उतरून गेल्यानंतर आव्हानात्मक आडवी वाट पार करायची. जोराचा पाऊस झाला तर साठपाटी उतरणे अवघड ठरले असते. तिथे पोहोचल्यावर पाऊस झाला तर ती उतरण्यावाचून गत्यंतर नव्हते. मग आम्ही राजमार्ग उतरून वडबारे गावात उतरण्याचा निर्णय घेतला. तिथून एखाद्या वाहनाने मतेवाडीत येणे म्हणजे फार मोठी कसरत ठरणार होती. शिवाय आजची भटकंती खाशी थकवणारी होती.
वर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही आजूबाजूचा परिसर न्याहाळला. डोंगर ओळखून घेतले. आज कोळधेर, धोडप आदी थेट अचला किल्ल्या पर्यंतचा परिसर ओळखता येत होता. सातमाळा रांगेतले अनेक डोंगर एकामागे एक अशा स्वरूपात इथून दृष्टीस पडतात. कोणत्याही ऋतूत हे दृष्य पाहत रहावे असे. आज तर ते हिरवेगच्च, स्वच्छ ढगांच्या निळ्या आकाशाने मढलेले. मावळीमुळे पलिकडून येणार्या किरणात त्यांचे सौंदर्य वेगळे खुलत होते. वाटेत एक स्थानिक कुटुंब परतताना दिसले तर गुराख्यांचा लहान कबिला पाणी भरून मोठ्या वाहण्यासाठी आलेला. इथून पाचच मिनीटात माथ्यावरचे सर्वात मंतरलेले ठिकाण लागते ते म्हणजे विस्तीर्ण आकाराचा तलाव आणि त्याच्या मागे कातळात खोतलेलले चार खांबांचे शिवमंदिर. जुन्या काळातले ज्ञात असे हे बांधकाम. स्तंभ नक्षीत कोरलेले. तर बाजूच्या भिंतींतही अर्धस्तंभाकार कोरलेले. गाभार्यात शिवपिंड तर शेजारच्या लहान कोनाड्यात शीर नसलेली देवीची भग्न मुर्ती. यामुर्तीला भरपूर शेदूर लावल्याने कोणत्या देवीची असावी याचा बोध होणे कठिण. ही पार्वतीची असावी असे वाटले. आणखी काही मुर्त्यांचे अवशेष भग्न स्वरपात विखुरलेले. दीर्घकाळ मुसलमान आक्रमकांच्या ताब्यात हा किल्ला होता, तेव्हा देवी देवतांच्या मुर्त्यांचा विध्वंस करण्यात आलेला दिसतो. येथे फार वेळ रेंगाळता येणार नव्हते. मावळती आम्हाला परतण्याचा इशारा देत होती आणि दिवसभर बर्यापैकी दम धरलेला पाऊस.
परतताने वाटेत वाड्यांची सुबक जोती आणि उत्तमरित्या आयातात कोरलेले चिरे दृष्टीस पडत होते. वैभवाच्या काळात काय देखण्या वास्तू याकिल्ल्यावर असतील? अशा भूतकाळात आपण सहजच मागे निघून जातो. आम्ही यावेळही सर्वोच्च माथा गाठू शकणार नव्हतो. पूर्व कड्यात आठ इंच व्यासाची सरळ रांगेत खोदलेली खोबण्यांची भलीमोठी रांग दिसली. अशा प्रकारे या खोबण्या कशासाठी खोदल्या असतील. हा दगड काढण्याचा प्रकार तर नव्हे किंवा मग लाकडी ओंडके रोवण्यासाठी केलेली भिंतीची सोय.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhjLDnDh4RPZlmoYnragpGVxcU8hrPyGCK5476a6Nx_GCkbGjkMxf2VHOx_BLvRIOfKc-YP8-2m1_nnUBjGYs8uWBjSqZhbqGn13qHt_FwLh7zqO-tnrwj4C3VaHnKaiajC3eexm14S53UX/w640-h388/20210718_154347+copy.jpg) |
अंचला अहिवंत पर्यंत सातमाळेचे दर्शन... |
गडांची जबाबदारी कोणाची?
आता आम्ही राजमार्गाला लागलो. वरच्या भागातून सटाणा, मालेगाव, चांदवड व येवला ही गावे ओळखता आली. अलिवर्दी खानाच्या शिलालेखाच्या खालच्या पार्यांवर फारसा दगड गोटा पडलेला जाणवला नाही. दीपकने माहिती दिली, काही वर्षांपूर्वी तो इथे आला तेव्हा या पायर्या सलग होत्या. नंतर गुरे वर नेण्यासाठी त्या मधोमध फोडल्या असाव्यात. आम्हाला माथ्यावर खरोखरच म्हशी व गाईंचा कळप दिसला.
या किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणीच घेत नाही. हे किल्ले वनखात्याच्या हद्दीत आहेत. परंतू ते पुरातत्वीय अवशेषांची, पायर्या, बुरूजांची त्यातल्या मुर्त्यांची जबाबदारी घेत नाहीत. ते काम पुरातत्व विभागाचे असे म्हणतात. पुरातत्व विभागाची कोणतीही अशी योजना नाही, जी गडांवरच्या विखुरलेल्या अवशेषांची, तट, भिंतींची, पायर्यांची, मंदिरांची किंवा मुर्त्यांचे संरक्षण करू शकेल. इतकेच काय, त्यांच्याकडे या सर्व वास्तूंची सविस्तर नोंद नाही. रोजचे सोडू या, पण अधून मधून त्यांची पाहणी करूत राहण्याची योजना नाही. ज्याला वाटेल तो गडाच्या वास्तूंना हवं ते करू शकतं, अशी ही दुर्लक्षित व्यवस्था. पायथ्याच्या वाड्या वस्त्या, ग्रामपंचायतींवर सुद्धा जबाबदारी टाकली जात नाहीत, कारण त्यांच्या हद्दी डोंगरावर येत नाहीत. गावातून कोणी असा विध्वंस केला तर त्यांची नोंद ठेवण्याची व ती माहिती पुरातत्व विभागाला कळविण्याची काही तरी व्यवस्था असायला हवी. इथक्या देखण्या पायर्या मधल्या बाजूने फोडून काढल्या असतील तर हा अतिशय गंभीर प्रकार आहे. भारताच्या इतिहासाचे एक न भरून निघणारे नुकसान.
राजमार्गाचे सौंदर्य डोळ्यात साठवत आम्ही ४-५७ वाजता शेवटच्या पायरीवर दाखल झालो. आता एकच आव्हान होते, ते म्हणजा पावसाचे. आम्ही वेळेत उतरू शकणार होतो, त्यामुळे वडबार्यात न जाता आम्हाला आमच्या गाडया उभ्या केल्या त्या मतेवाडीत उतरता येणार होते. उन लागल्याने जी आडवी वाट पार करायला आम्हाला दिड तास लागला होता ती आता आम्ही अवघ्या ४० मिनीटात पार केली. साठपाटीवर पुन्हा सुरक्षेसाठी दोर लावला आणि साठपाटी ६-०४ वाजता पार झाली. याच्या पुढचा टप्पा सकाळी कसा चढलो काहीच आठवत नव्हते उतरताना जाणवलं ती केवढी मोठी चाल होती ती. मळलेल्या पाउलवाटा तीन ठिकाणी हरवल्या. गायवाटा, घसारे, शेवळलेल्या ओहळी पार करता करता नाकी नऊ आले. थकवा मात्र पुर्णपणे गेला होता. चालण्याचा वेग जोराचा होता. सपाटीला आल्यानंतरही आम्हाला आमच्या गाड्यांपर्यंत दिड किलो मिटर अंतर चालावे लागले. तिथे मात्र अंधार पडला. ढगे आजोबांनी नाही म्हणत असतानाही फार आग्रह करून त्यांच्या शेतातल्या नारंगी लिंबाचा चहा पाजला. काळोखातही निळ्या रंगछटेत डुक्कर घळ खुणावत होती, ''ही वाट केव्हा''?
।।जय हो।।
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiSXIye5jFvM4mB9njqldEstMe_mOvKdO482TgHkMs5tsFA4CUvFrJs7JoNLRjkL20lQ6baKzqrBYpCDiqLsESXcCGferxO9msphyphenhyphenvShE4ElGgAUdo-XbQWTWiOpclaTQXafAIeuHVn60EP/w640-h380/1-1-20210718_175658.jpg) |
ही दरड अलिकडे कोसळलेली...त्यामुळे दिसून येणारे इंद्राईवरचे बारिकसे नेढे |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiPhDp3qjrQu-JAC4VnMeL3ZsLpteLyX_kRY7MStjoXO2daOKyRLwMv7UisXl_7cRbPGODOadK4G25EJU7Q2tsQ4mcyI9gpFmXZo1dk3JmPXWlipw6R5LQ1Lyg418b6c5F7MSuscwYC1cGn/w640-h480/1-20210718_092155.jpg) |
खजिना झाकावा तसे डोंगर झाकण्यासाठी ढगांची दाटी...डेहेणेवाडीतून! |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhU7tO-xKs73titGJqKR8fOmqUwmLGBSPx4bbrsVzKqiUClRKjE58YtCr8iQ7RLegzGFHVpBWg_39v4O63sp4xaEWetcLR5jpjeQYcUHWHMzdEZRwdmm-hnBtKGLveDXkyThBfOC-NTCRbo/w640-h480/1-20210718_102216.jpg) |
clear visibility with passing white clouds |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBs9N57HwMAMSlNFUaCG_KgbYHqCUYdj8eztHF_tThuEF3GlIxnx_ezPrip40fiTGPgQthp34DahK0X5r9BmMNT9__Inevn6HFb4OAjRg_SOqSPg-wb05nd7pzp1e6mvAysdHiINtSnupa/w640-h430/1-20210718_115020.jpg) |
साठपाटीच्या वाटेवर हरळीतच पक्षाने केलेले घरटे |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhBm9KXKkNtUb6i5oL6TtEJKPXiHGGzoe7kvaXebggbNuy76hK_1xJrPzEtRbtlWtUYKLtnvtsuwSQFT4WvEWO0DiR-kXFdmzpOzmvGBO52ZiYI1Gl-7zrlQEeCdj_gJGA2h_uiZziMxeRu/w640-h480/1-20210718_122012.jpg) |
शेवाळलेल्या पायर्यांवर सुरक्षेसाठी दोर |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhpWGxDw5Plb1KJnIdVtvOzSn2Y1vnciGKdJIBln5d_9lkCBqKkrcHDC8wrGwBbb-JLkqRHwudQ1VyqMEp5HobW0ahIJHzltrqUTANsktkIhHrCMrw856z_5p79gQvwzs8cMOIkTGdqZGPa/w640-h484/1-20210718_122749.jpg) |
समोर दिसतोय तो चांदवडचा किल्ला आणि नितांत देखणा रासलिंग महादेवाचा डोंगर |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjwtZ0fryyKpf-3tPVJ1AZ99XkH46y1ZoMrI5n9t4FZV4jb3cMu0TAYLpLnrX3u6kkfDUWSvkjWK0T0OI9JXU_HdOFaU6mDJEsREhHqwiMDJaFkg7txTkPcV3dgZKr0XwtRJ5a-0KB121vd/w640-h444/1-20210718_123154.jpg) |
हातावर गुपचूप येऊन बसलेले फुलपाखरू |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEinYfleLuB-k0Z8X4J1FaLf3dzjXVXgJ9h_gO_vDSkMO2mst4RpNQVSjnhEHoUBIWQK7LJqRfP8T04ETKetqooFNVBTbAppFldqfcFBJHbfqsjTmE2GpQEoe2rgXPxv9T-icNwpsWqBhVgA/w640-h480/1-20210718_124017.jpg) |
the ridge that leads towards the sade teen rodge mountain |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiK3_VIkTWrM5084AVkZ_KV_L-ruviC_en8PPOarQhZcDoop5kP2R-kRr4ctLqgMOsE3oDo-bsVUMEvn_oB9rpdH3WvZBLPy1hxeXxC0BrHEOnQVBYj8XMVzwdYa4VBqKbSOVsHiRJBZ6fp/w640-h376/1-20210718_124211.jpg) |
its sheer luck to get facing light to get the silhouette |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhrn9Ui-TwPcBF4wOGy4M_CeO4ItwAshH-Ne8vSGxlzhD0cQgVchi-1mcvYb-oWoO9LpBJKbG4G-RaVYhym6HaKuHD5VCAD3g529z-2reNAtJMcHk8oVYG9exzTVkTrLRVHlow21RMEocse/w640-h370/1-20210718_124409.jpg) |
वर च्या कातळात दोन पायरी मार्ग |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgqAVdQT0GPbGxQ1ZBZB5pZq0UZmYvtzAZExPwsPQjH9Vo2Y-USqeULmG8TZQM_AY4nPWNSlIy3UfpZZ4HDrwn5r0knFQGxXXJ9h3e8QTll3dyiqZhuDq5xcSb3Pu2WSyBJoaJlMO-ej8Yf/w640-h368/1-20210718_125423.jpg) |
राजमार्गा पर्यंत १.६७ किलो मिटरची आडवी वाट |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhugMAUVePGbS27PL9_AUFNZ-_qr0D9KT1_LaPvkryr6ctBVRG6yYfWWlECItX2U7uCe6ubl0gElEyxLQ3zbHwV6mjZqCE10ExgZThY1UvTqSb9YQ6OkJENOoQW-HX9h10Z7Zui-1rFBs-G/w640-h480/1-20210718_133421.jpg) |
ना समोरचे काही दिसते ना पायाखालचे... |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEght2Riz38xRQ2lryymUraaJjKEaXZTeuJ0Ulpsdgk3UJKRym0MVn76rnH1-FpRTt-i-dMYxA8MSMU8oksxzpY_Ps1HZoYvbW1O9R_XCNjQA1WUr2EuxoZXn6LxvRJdX8TMbSPUrSI3uAzm/w640-h480/1-20210718_134050.jpg) |
ही आडवी
वाट म्हणजे एक
दिव्यच नितांत सुंदर तरी
आव्हानात्मक |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi9rVPzWTrOkeV1_3ADJJuNHAUhrrPaeGd_vpLdhlS0iNngcLB1JIpQnlDi96BejPZzXa49WrfhH26MogtS2L27bgL-135vMDKDavGK4Oegkor3FPxS0gilFU4_FkFMh3owf2RAaDAr6hMi/w640-h422/1-20210718_134319.jpg) |
साठपाटीच्या वाटेने जोडणारी
इंद्राइ डोंगरधार... |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg5zDy6mWZbFx3Vec8kRJe03BUSkB9RVWyIaJjh5n7XDSoUueKwYnNPLOCKUtp2LltqDHXfbV_mgDKX8syW3Lq5rXEb1WjdqZ6tdiGDCCBYpI6QAAGWZSAQ7GX9XqmO82mOyNStMWLsPRiE/w640-h480/1-20210718_134451.jpg) |
हिरवी निळी पांढरी
रंगसंगती आणि प्रकाशाची
प्रसन्न उधळण |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgqZ60vTVf3qbNfW5jXvnPuYIpLXoxVg6x-YKs-JyNhlctbSZDr9afWRbNSzUrEGDb94OZE2zgWMueqTQhdxjRFrFfuF4Ix1HvOsVPv-v3-nISsJX-kew0l9boUImNhQPoipbpBIzKg0tGs/w640-h396/1-20210718_134456.jpg) |
मधूनच समोरचा प्रकाश
येऊ तृणपाती उजळून
देई |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhzxLBUGAqRVKlk08-yHiUqcg_SHjibPbpden1EwXB12758w65UORSPNtjvmybJ0eIVCd5ySdFsdsi-VvZT8kaEGKQPMsPHfCG7RGy4ckp5Q0ALqEvNEBjv1_TzhXjoGKe0_H0Zwbsnyel5/w640-h396/1-20210718_134649.jpg) |
ढगांचे आवरण यांना
झाकून देई मग
थोड्या प्रकाशाने रान उजळून
देई |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiNCRNK4QFHPs10vBGT7xuNbKB_w5E0sjyCXywz_32_5lxNfP6nrL56dr8gW5ReaKnQyY_1brGqqzC4r40dnH-YMnoVzPDZMXdcx525AEc5Eid8gYzJyXKgbF0owEbsg4e_se8qmrZqNKl8/w640-h396/1-20210718_140836.jpg) |
साडेतीन रोडगे व
इंद्राई मधल्या भागातले खुरटे
वन मध्ये साठवण
बंधारा |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgIEPpImnk4671c7JICMqpaxJ25UaY6Gpn27eZQFnK7r9Tcq8cdSoIKW2zNq30v56lF3hOBcu9xn2qAW3Zgyk9FnOzEAbYvYNOc_6vJnaP2dURHYlmQru9Fi6O-HkGLabofxLb5K9HVtF5y/w640-h408/1-20210718_141450.jpg) |
हे जाड
पातेदार गवत अंगाला
स्पर्ष करून पवित्र
करत होते |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhMYGqFlTUxWHhLYHP_hpgB6WYVyormZU1KRnCCDJbV9eB6oncbPXsapyBuvb0jR5EAqr-2ruCg-8ixR4fdi1W8wQz8lKUxA9ugt8r5X4cZcUn2mt0Hx9YLvDz4zeNFQPLTo5sV6GCILlV4/w640-h480/1-20210718_143311.jpg) |
पुरूषभर उंचीचा झाडोरा
फोटो पूरता थोडा
कमी झालेला... |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgcyUazc4JdsiB2LxaVyPohp54vNEEsyFF_Cb-FQJCM419RVQCLGM0aRQK8IXFBeysQ4g-nHsiS9mvPWzpVLawZzmsaFXY_2DYIVBLNEkbx456g0g79KQFcOAB4MbvL0SNte5_0OffO2bYI/w640-h388/1-20210718_144607.jpg) |
चोरवाटेवर लांबूनच दिसणार्या दोन
मध्यम द्वार चौकटी |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEht75l7D70V3sg3z6ODCE6E4onU_TWh7t4iPcWSYvfHJwSdCtVKIOBiUCUZBU2MoYCuN70cCQvbPBmKYGwWr998qoXhfygB01QXB4QxGYujgOt0goNnad3c5Ke6Ps2ahvN8tmuCgsts8_9H/w640-h480/1-20210718_145701.jpg) |
चोरवाटेच्या खालच्याच भागातले
भव्य सुबक टाके... |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjjVMei8Uo0dypOXQzWgv-XBWpk7crNlnOygSfPJfhuY-I928p5RNbIOYy8OkW9kiZuRXlIDOETYZzdmvaZsZSBf5t69KDrqU7Jbi07bEW-yqnwziV_3pnfiBhyphenhyphenMcGjzDWBszx2buTekAfd/w640-h480/1-20210718_145705.jpg) |
केवळ छन्नी हाथोड्याच्या सहाय्याने केलेले मोठे आणि अचूक तासकाम |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgCBIZUl839129cQ0URFAJXfgzy6cUBDf3FpH0Buyu2QGYGcIbXMp5WFFrT5u5W7lhrubvgJl6lFPrkOXwA4ysyhhn0gKtguOn6EwKNOmmMJRsCen-47OIMkNQ0PcnMuDzQ6yQG00MRhjdE/w640-h480/1-20210718_150648.jpg) |
ही बर्यापैकी मोठी
खोदून काढलेली गुहा
सद्या गुरांचा आश्रय
बनलेली |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjPtfihPM7yosEbOEU2dXQSNjCDn5_Aewaqe9x1iaM-Ey9uOLdtUEa-1LhJPvkm2Wgd62FHJHpKn6UGGldjOkzUwL6pmNrVL-o8UYs6nXVAN6NfIgLOyCJl0o2Tz5VREoTKpo6_rTv8Jv9a/w640-h480/1-20210718_151609.jpg) |
चोरवाटे समोरच्या खडकावर
दिसणार्या या
खुणांचे प्रयोजन काय असावे? |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhldVhHz4GwBbiA6nL7KHyI8C9Thm6Rqje_ZQGdIJKguWKKoMJ0VdBEpW3J65_A3NvzzgJF-1El5EB1OmyKDCNqvtKemXsipGHNEy4vjsoWF1NVA0MuzocHITxbRrXH6Ul0G4Sb9hgztB5L/w640-h480/1-20210718_151733.jpg) |
प्रकाशाचा खेळ न्यारा...समोरून येतो बदले
नजरा... |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiYFAvN8GvrGzeb4869y2SZiWD89j-jpLI2Z3DQQLw5MRvAcGUtiodkEOiD6fpoalRpRlHlwTh9SSPEgScreCMcJdqXBghZmpwiAPprOWBGDOkixS_xzGO1kXuidoc6PYbyOYsGIkgNBmP-/w640-h480/1-20210718_151801.jpg) |
कोसळलेल्या पायरी मार्गातून
दिसणारा वडबारे गावच्या मागील
बाजुचा परिसर |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjEvdrFN4JhBs4sFxfVTzYA2q-cGPgMnoIaE8pmv4oUgt0Kcx1L_58ukqJ-JjfAcvlHkZaPATIpgI2tXhjdxSZO6sR8qeyfXN5a3wmaYVMxdrUKQ1-__gS5QmuhtWMOLf4iyO1flvUMoaqc/w640-h408/1-20210718_160642.jpg) |
महिष एवं
गोधनाचा मुक्त संचार...मुक्त
विहार |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg642YilY1tLcDJs15xO4BlFJ90v74eX7fNdfUZrYDngvjLPQLTmO3RjOWN98chuIp8zxgKa0GvDK8lGmRlWLMnrNKyJlVG9CRXfauPgx0kwRUobf_xolIKT6PUCLQ2i5LFMrAsBNgUGbSf/w640-h480/1-20210718_160805.jpg) |
इंद्राईचे शिवमंदिर |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiusOalrTT9Y8aolXlDKt-8INkSZ5I3Dm4avkKbQdh7KR0WUIc9Ox-GHdViTkikNChbehQFpodHFt9u4k9X_UQh9LSmZEfc8nyjJTuW0duMSNb4oDv1CwHanmOup2u7mmJy0oorKKJdT1c7/w640-h480/1-20210718_160830.jpg) |
इंद्राई शिवमंदिरा समोर
कातळात खोदलेला भव्य तलाव |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiOgwQ0RQ4mkT5ITP2SmfYgOBsRK_sPdUpj_HjV4naoewopKTXiN93wwasYUPMEQRoNS4xiEmlBBukptdkjvKQy8Yfa5G91GTlEuChAFS0gbB_M9UfCnJEt9NAg6gkLLEZkbvV0EjddRh-i/w640-h480/1-20210718_160853.jpg) |
इंद्राईवर पुर्णत: कातळ
खोदून तयार केलेले
सुंदर नक्षीदार शिवमंदिर |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgSdPb6uEKX5mclKEINSBPd8XbWe6bKtTy6Q6pEntYJZBF4I-D7a7n2eyJkEMgEUAD_K5KVgYCbmYdiGPXHSAi9TceGtsuD8uGXual2SxsLjF7zFWRg5VugTXFHo_kJBdB58e5YfSmFtoLj/w640-h436/1-20210718_160901.jpg) |
शिवमंदिराचा परिसर स्वच्छ
ठेवण्याची नितांत आवश्यकता |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh13lBI1_V2rAiKTOWv0wIY_GaaCdX4ZMTbRq4FuanvFgg4olYWfQdvouUpWlSyCPltzkpw69g-qcurqUx9IjkSfylkEfSppc9N20vszzIBvmych6IDFmzkHsh0oQqBIeRCZazqkmidFjr0/w640-h480/1-20210718_161031.jpg) |
शिवमंदिरात साठणारे पावसाचे
पाणी वाहून नेण्यासाठी
केलेली निष्कासन व्यवस्था |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhgvVpEpvIWXXkzqgvwOPsEcDalBpbXXUNhzXOH8MBLj9CQeB1NQxh6gEITNbovliAWpEgWpixqpy8wzZhscvMOFcr-gvAQMTIZN1iO4RpOXSn5kUsh2yUjpI49rDyyGGbgYNMcW3WrkGiW/w640-h480/1-20210718_162041.jpg) |
गोल छिद्यांची
रांग |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgTj-ji3CxkrFCStbF0qChE13H2Ibfp6N93-_YpamIjZOK-uC2L9VupeOFd5ZQqDEWE_D0ybqO2kqNNWV69BS1QcBi4TKxrjEoZUEnCS1xp3nQkMoMU6ZzrpqT1XXXDovICwQBLsbsV4qzA/w640-h480/1-20210718_164047.jpg) |
अलिवर्दी खानाचा शिलालेख
परिसराती जिंकलेल्या किल्ल्यांचा नोमोल्लेख |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgWMgG9D3xZTtPmFzIeK0fdLqfg0ChhsrpNq6rQ-WL9ZoLm1pOJ5W_vRpagidFLpWaOyC5wsZCwpntQxLRg6BwZAlXbwUL99BTpPg5SrOGz3IOEbvV08-CcNNiSySD8MeKsRJ5kFyFV3Q8T/w640-h480/1-20210718_164127.jpg) |
या पायर्या मधून फोडल्यात म्हणे...तसे असेल
तर हे प्रकार थांबावे कसे? |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj9MCJ2KFmGzXCWe8tgWKNoxwqvCbsyD_kZSSm4pPMripNmj73S2jIvX0epkaSZeZid216XjDS4_DHdy9OqS_gaP1vNMSNjGa1Q1kXZK6cspe7tIv7cR338fjxhVSnMakf_BTwUHKONvaA8/w640-h480/1-20210718_183525.jpg) |
इतकी मोठी
विष्टा बिबट्याची तर नक्कीच
नाही? |
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj0XzuXd9XdsglakWZ38X5cP5FN_SzPW3yQrud5AEE4t0GZarglCqzWykSaatjlvtC4wRGgBou0kNJZdzGsyY0d7UOD5S0qYjc9Km4RP3KmfkINZdFKMGKC_ezskR7lchEypMsWOqftYzQ4/w640-h450/20210718_090437+copy.jpg) |
सातमाळेच्या डोंगरांना कधी
मुकुट तर कधी
पूर्णाच्छादन... |