हा आकाशकंदिल कोकणकड्याच्या अंधारात उठून दिसत होता. उद्देश होता गडावर दुर्ग दिवाळी साजरी करण्याचा, तिथे पडलेल्या विरांना श्रद्धांजली वाहण्याचा. कोकणकड्याने आजवर अमाप समाधानाचे क्षण दिलेत. आपल्याकडून त्याच्यासाठी ही छोटीशी पुजा! तो ती स्विकारेल?
हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा। कितीही पहा मन भरत नाही। महाराष्ट्राला पडलेलं हे राकट कणखर स्वप्नच! त्याच्या सानिध्यात अनेक उन्हाळे पावसाळे व्यतित केलेत. 'एखादी दिवाळी तिथे साजरी करावी, कोकणकड्याच्या भव्यतेला साजेसा एखादा मोठा पारंपारिक आकाशकंदिल तिथे लावावा', हे स्वप्न अनेक वर्षांपासून मनामध्ये रुंजी घालत होते. यंदा तो योग आला. तसं कोणतंही पूर्व नियोजन नव्हतं. आमचा व्यवसाय हा दिवाळीशी निगडीत असल्याने घरून सुट्टी मिळण्याचा प्रश्नच नव्हता. लक्ष्मी पूजनच्या दिवशी `घरात एक मोठा लक्ष्मीबॉम्ब फुटला', अशा प्रसंगी सर्वात मोठा आधार असतो तो मित्रांचा. सह्याद्रीतर मित्रांचा मित्र, ठरवलं त्याच्या कुशीत जाऊन दिवाळी साजरी करायची. 'कोकणकड्यावर जाऊन धडक मारायची. तिथे एक भव्य आकाराचा कंदिल बसवायचा'. सणावाराला कोणी सोबत येण्याची शक्यता नव्हती, तेव्हा एकट्यानेच जाण्याचा निर्णय घेतला. सहज म्हणून सन्मित्र दीपक पवारला साद घातली तर तो तयार झाला. जोडीला संतोष उगले तयार झाले. एक बारा पंधरा फुटाचा कंदिल बनविण्याचा बेत पक्का झाला.
या कंदिलाच्या आकृतीत ८ त्रिकोण, ८ आयात, ८ चौकोन तयार करावे लागतात. ४८ काड्यांचा संच तयार झाला. कोकणकड्यावर जोरदार वारे वाहत असतात त्यामुळे कागदा ऐवजी कॉटनचे रंगीबिरंगी कपडे लावण्याचे ठरवले. रंगसंगती ठरवून ते आकारात कापून घेतले. साचा तयार करण्यासाठी तारचुका, हाथोडी, पक्डक, दोरी इत्यादी साहित्य जमा केले. इतका मोठा कंदिल लावायचा तर त्यावर गडाच्या नावाचे सुलेखन करणे आवश्यक होते. त्यासाठी प्रसिद्द चित्रकार सूदर्शन तळेकर आणि मुर्तिकार मानसिंग ढोमसे यांची मदत घेतली. सामानाची तजवीज करताना रात्रीचे १०-०० वाजून गेले. घरात लक्ष्मीपूजनाचा सण असूनही दोघांनीही त्यासाठी वेळ दिली. ढोमसे यांच्या कार्यशाळेत जाऊन कंदिलाच्या चार बाजूंकरिता हरिश्चंद्रगड ही अक्षरे पिवळ्या कपड्यावर रेखाटून घेतली. आता रात्रीचे ११-३० वाजलेले. तोच लक्षात आले की, कंदिलासाठी लागणार्या झिरमिळ्या तयार करायच्या राहून गेल्या. मग परत माझ्या कार्यशाळेत जाऊन ७ फुटाच्या झिरमिळ्या कापून घेतले.
पुनर्वापर केलेल्या देवदार लाकडाच्या काड्या |
दिडएक महिन्यापासून सह्याद्रीत कोणतीही मोठी भटकंती झालेली नव्हती, त्यामुळे ट्रेकचे सामान इस्तत: पसरले होते. ते गोळा करून घरी आकाशकंदिलाचे सामान एकदचे गोळा झाले. ६० लिटरची पाठपिशवी भरून तयार झाली. तोवर १-३० वाजून गेला.
दीपकची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पहाटे ४-४० वाजता त्याचा फोन घणघणला. प्रेमभराने त्याने, 'उठ', म्हणून साद घातली. कालचा दिवस दगदगीचा होता. त्याअगोदरचा महिना दिड महिन्या काळ कामाच्या धामधूमीचा होता. रोज रात्री एक दिड वाजता काम आटोपायचे. दिवसभर सतत कामच काम सुरू असायचे, त्याचाही शीणवटा होता, अन्यथा रात्रीच पाचनईत धडक मारून अंधारात चढाईचा बेत होता. मरगळ झटकून तयार झालो. पावणे सहा वाजता गंगापूर पाईपलाईन रस्त्यावर दीपकचे घर गाठले. दोघे असतो तर मोटरसायकलने रवाना झालो असतो. आता तिघे असल्याने दीपकने त्याची चारचाकी काढली.
नासिक ते पाचनई हे अंतर एका बाजूने सव्वाशे किलो मिटरचे. पाचनईतून हरिश्चंदगडावर चढाईचा सर्वात सोपा मार्ग. घोटी पर्यंतचे ४८ किलो मिटरचे अंतर चहाचा थांबा धरून ४० मिनीटात पार झाले. तिथून पुढचा टप्पा म्हणजे राजूर. नगर जिल्हयाती अकोले तालुक्यातले हे ठिकाण म्हणजे तमाम भटक्यांचा महत्वपूर्ण थांबा. घोटीवरून ३२ किलो मिटरचा हा टप्पा म्हणजे एक मोठे आव्हानच. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि वनविभाग यांनी घोटी ते राजूर परिसरात दहा वीस पर्यटन स्थळे तरी विकसीत केली आहेत. त्यावर कोट्यावधी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. या मार्गावर बारा महिने आठोकाळ पर्यटकांचा राबता असतो. गेल्या काही दिवसांपासून मुंबई परिसरातून शिर्डीला जाणारे भाविक नासिकला न जाता घोटी वळण मार्गाने शिर्डीला जाणे पसंत करतात. त्याने त्यांचे सुमारे पन्नास किलो मिटर अंतर वाचते. असे असूनही घोटी - सिन्नर रस्ता हा चंद्राच्या पुष्ठभागाशी स्पर्धा करणारा, म्हणजे चंद्रावर जास्त खड्डे की या मार्गावर. पर्याटन विकास करताना अगोदर तिथे जाणारा रस्ता उत्तम करण्याची गरज आहे. आजमितीला महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी हेच चित्र थोड्या फार फरकाने बघायला मिळते. त्या उलट शेजारील गुजरात, गोवा, कर्नाटक, आंध्र यांनी आपल्या रस्त्यांचा दर्जा सर्वोत्तम राखला आहे. महाराष्ट्राला तो राखण्यात कोणती अडचण आहे? झालं आम्हाला या ३२ किलो मिटर अंतरासाठी एक तास लागला. सुदैव म्हणजे पूर्वीपेक्षा रस्त्याचे काही टप्पे दुरूस्त करण्यात आलेत. घोटीपासून संपूर्ण रस्ता हा डोंगर भागातून जाणारा, जास्त पावसाच्या प्रदेशातला. त्याला साजेशे रस्ते बनविणे आजवर कोणत्याही राजवटीत शक्य झाले नाही. रस्ते दुरूस्तीचा हा अनूशेष भरून काढल्याशिवाय पर्यटन विकासाला गती येणार नाही. तेव्हा ठरवून या ठिकाणी जागतिक दर्जाचा मार्ग तयार करण्याची आवश्यकता आहे.
राजूर ते पाचनई हा मार्ग अधिक डोंगराळ व दोन लहान घाटरस्त्यांचा. इथे प्रवासाची खरी परिक्षा. बघूया २७ किलो मिटरसाठी किती वेळ लागतो ते.
हा संपूर्ण परिसर वनविभागाने वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन विकासासाठी संरक्षित केला आहे. अलीकडे त्यात काजवा महोत्सवाची भर टाकली आहे. त्यावर अनन्यसाधारण असा खर्च केला आहे. दर दोन पाच वर्षांनी पर्यटन स्थळावर बांधलेले निवारा स्थळे (पॅगोडे), लोखंडी नळकांड्यांचे संरक्षक कठडे, शिड्या इत्यादीवर कोट्यावधी रूपये खर्च केला जातो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सोबत घेऊन जर एकत्रितपणे पर्यटनाचा विकास केला तर या नितांत सुंदर निसर्गस्थळी उत्तम दर्जाचे रस्त्यांचे जाळे तयार करता येऊ शकते. जास्त पावसात टिकणारे रस्ते तसेच सरपटणार्या प्राण्यांच्या व पावसाच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी निष्काषन मार्ग असलेले रस्ते ही काळाची गरज आहे.
आम्ही पाचनईला अडीच तासात पोहोचलो. मध्ये कुठलाही थांबा घेतला नाही. म्हणजे ५ किलो मिटर अंतरासाठी सरासरी अर्धा तास लागला. आता आमची स्पर्धा वेळे सोबत सुरू होणार होती. इतका मोठा आकाशकंदिल बनविण्यासाठी पाच तास लागणार होते. जास्त वेळ लागला असता तर अंधारात कोकणकड्यावर आकाशकंदिल बसविणे दुरापास्त ठरले असते. बरेच दिवस डोंगरावर चालण्याचा सराव नव्हता हे जाणवत होते. पाठीवर गच्च भरलेली ६० लिटरची पाठपिशवी. त्यात मागच्या महिन्यात शरीरात बी१२ व्हिटॅमिनची घटलेली मात्रा आणि दिवाळीत जाणवलेला सर्दीपडशाचा त्रास, याचा परिपाक चालण्याच्या वेगावर झाला नसता तर नवल. एरवी दिडतास हरिश्चंद्रगड चढून होतो, आज दोन तास लागणार अशी चिन्ह दिसू लागली. दीपक हा नियमीतपणे गडकिल्ले फिरणारा असल्याने तो सूसाट निघाला. वर जाऊन कंदिल लावण्या सोबतच आम्हाला हरिश्चंद्रगड परिक्रमेचे नियोजन करायचे होतो. हा महाराष्ट्रातला आकारमानाने सर्वात मोठा किल्ला याच्या वीसहून अधिक वाटा. त्यासाठी आम्ही बेलपाड्याचा कमा आणि कमळू पोकळा यांच्याशी संपर्क केला. मागे भास्कर बादडशी या विषयी बोलणे झाले होते. आज भास्करचा संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा कमाला नळीच्या वाटेने गडावर येण्यास सांगितले. तो म्हणाला तुम्ही पोहोचा, मी दोन तासात वर येईन.
गड चढत असताना कमाचा फोन आला, ''वातावरण ढगाळ झाले असून भात झोडून तो कणग्यात सुरक्षित करणे महत्वाचे आहे आज येऊ शकणार नाही.'' ढगाळ वातावरणामुळे हवेत दमटपणा वाढला होता. चालताना त्याचाही त्रास जाणवत होता.
गणपती धारेला खेटून असलेल्या विशाल कड्याची आडवी वाट गाठायलाच ५१ मिनीटे लागली. इथुन पुढे पाण्याच्या वाटेपासून मंदिराच्या दिशेने न जाता कोकण दरवाजाच्या वाटेला लागून असलेल्या आडवाटेने कोकणकडा गाठायचा प्रस्ताव मांडला. ही वाट आजवर न केल्याने ती शोधण्याचे आव्हान होते. सुदैवाने पाचनईचा सुदाम बादड त्याच्या झोपडीसाठी लागणारे सामान घेऊन जात होता, वाटेत त्याची भेट घडली. स्थानिक मंडळी त्याच मध्यम मार्गाने जाते. तो म्हणाला यंदा ही वाट मळलेली नाही, पण या वाटेने गेलो तर लवकर पोहोचू.
पर्यटक, ट्रेकर मंडळी सहसा या वाटेचा वापर करत नसल्याने वाटेचे निर्जन रूप टिकून आहे. मंगळगंगेचा प्रवाह ओलांडल्यानंतर मात्र काहीसा अंगावर येणारा घसारा लागतो. इथे आमच्या तंदूरूस्तीचा कस लागला. कोकणकडा गाठायला २ तास १५ मिनीटे लागली. पाठीवरचे ओझे, सरावाचा अभाव आणि इतर कारणांमुळे पंचवीस एक मिनीटे जास्तीची लागली. सव्वा वाजेच्या सुमारास आम्ही कोकोकणकड्यावर स्थितीत सुदाम बादडच्या झोपडीत बस्तान मांडले. तो त्याच्या कारवीच्या झोपडीला बाहेरच्या बाजूने शेतात वापरली जाणारी हिरवी नायलॉन जाळी चहूबाजूंनी लावणार होता. झोपडी पाना गवताने शाकारलेली होती तर पाण्याची गळती थांबविण्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यात आला होता. आज तो जमिन धोपटून सारवून घेणार होता.
कंदिल बनविण्यासाठी पाच तास मिळणार होते. आजवर डोंगरावर जाऊन कधीही कंदिल बनवला नव्हता. तिथे कोणकोणत्या अडचणी येणार काहीच कळत नव्हते. सुदामने छान कोरा चहा टाकला. तो रिचवून कंदिलासाठी लागणार्या लाकडाच्या चौकटी बनवायला घेतल्या. मातीवर पट्ट्या उभ्या करून खिळा बसत नव्हता. मग आम्ही बाहेर खडकावर जाऊन चौकटी ठोकू लागलो. खडक सपाट नसल्याने काही वेळा खिळे बाहेर निघत होते तर काही खिळे बरोबर बसत होते. ही सर्व कसरत सूरू असताना पावसाचे टपोरे थेंब सुरू झाले.
कंदिलासाठी लागणार्या लाकडाच्या ४८ काड्या मोजून आणल्या होत्या. त्यातील काहींना योग्य त्या कोनात छाटून घेतले होते. एकपण जास्तीची काडी नव्हती. हाथोडीची घाव जपून मारणे क्रमप्राप्त होते. एका काडीला गाठ असल्याचे लक्षात आले. नेमकं त्या काडीला खिळा नीट बसला नाही आणि झालं, काडी गेली मोडून!
काडी मोडल्यावर ऐनवेळी जोडण्यासाठी काही बारीक पट्ट्या आणल्या होत्या. चौकटीची एक काडी कमी भरली. 'घरून निघताना एक काडी कशी काय कमी पडली. की ती सामान भरताना राहून गेली'. आता मोठी पंचाईत झाली. सुदामला विचारलं की एखादी बारीक पट्टी मिळेल का? तो म्हणाला कारवीची चालेल का? एक मोडलेली आणि एक कमी! आजवर कारवीला कधीही खिळा मारण्याचा प्रसंग आला नव्हता. तिची टोकं ४५ अंशात छाटावी लागणार होती. त्यासाठी वर कोणाकडे करवत नव्हती. मग संतोष अण्णांनी कोयत्याने ती छाटून दिली. कारवीच्या काडीतून किमान एक खिळा अचूक मारणे आवश्यक होते. शिवाय कंदिलाची जोडणी करताना कारवी आणि गाठेची काडी असलेली चौकट कंदिलाचा भार येणार नाही अशा बेताने लावावी लागणार होती. चौकटी तयार होईस्तोवर ३-२० वाजून गेले. आता पुढेआणखी एक संकट आमची वाट बघत होते.
इतका मोठा लाकडी सांगाडा कशाने जोडायचा कशाने? त्यासाठी तारेची आवश्यकता होती. नेमकं तारा राहून गेल्या. बांधकामाच्या तारा कुठेही सजपणे मिळतात. गडावर इतक्या झोपड्या आहेत पण त्या सर्व झाडाच्या फांद्याच्या खाचेत बांबू बल्ल्या लाऊन उभ्या केलेल्या. पकड, हाथोडी, करवत अशी अवजारे ही मंडळी वापरत नाही. तोच दीपकने भोजन अवकाश घोषित केला. लोणचं, पोळी, पापडाची चटणी असा मोजका बेत पोटात गेला आणि डोक्याची वात पेटली. गिर्यारोहणात कशाच्याही पक्क्या गाठी मारल्या जाऊ शकतात. दीपकला सोबत दोरी आणायला सांगितली होती. ती कशाची हे सांगितले नव्हते. या ठिकाणी जाड चांभारी दोरा उपयोगाचा ठरला असता. दीपकने कपडे वाळविण्याची नायलॉनची दोरी आणली होती. त्याला वाटलं या दोरीला कंदिल बांधायचा आहे. त्यासाठी मी पक्की सूती दोरी आणली होती. दीपकला नायलॉन दोरीचे एक फुटाचे तुकडे करायला सांगितले. तिचे वेणी सारखे तीन पदर सोडविल्यानंतर बारीक दोरी मिळाली. साधी बैलगाठ आणि त्याला अंगठागाठीने सुरक्षित करून आमचा साडे पाच फुटाचा भव्य असा सांगाडा दुपारी साडे चारच्या सुमारास उभा राहिला.
कंदिल चालला कोकणकड्यावर... |
कोर्या चहाची आणखी एक फेरी घेतल्यानंतर कंदिलेला रंगसंगती प्रमाणे कापड चढवायला सुरूवात केली. त्यासाठी गन टेकर आणली होती. जसे कागद स्टेपलरच्या पीनने एकत्र ठेवतात तशी ही गन टेकर. चित्रकार मंडळी हिच्या मदतीने लाकडी चौकडीवर कॅनव्हास ठोकतात. एक प्रकारे लाकडावर चालणारे हे स्टेपलर. आता आणखी एक संकट उभे राहिले, स्टेपलरच्या पुरेशा पिना सोबत आणल्या नव्हत्या. काल सामानाची जुळवा जुळव करताना दोन पाकिटे टाकली, परंतू त्यात पिना कमी होत्या. प्रत्येक चौकट, त्रिकोण आयाताला किती पिना लागणार याचा हिशेब करून सोबतच्या पिना पूरविल्या. झिरमिळ्या आणि सजावटीसाठी सोनेरी चमकीचे काठ लाऊन बरोबर ६-०७ वाजता कंदिल एकदाचा उभा राहिला.
आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. सोबत दोन बॅटर्या आणल्या होत्या. त्या कंदिलात लावण्याचे ठरवले होते. सोपानने त्याची सौर वीजेवर चालणारा एलईडीचा बल्ब देऊ केला. कोकणकड्याला उंचावर कंदल बांधणे गरजेचे होते. त्यासाठी त्याच्या झोपडीचे दोन उंच बांबू काढून घेतले. ढगाळ हवामानामुळे कोकणकड्यावर सूर्यास्त दिसला नाही. तिथे काही जणांचे तंबू लागले होते. त्यातील काही मित्रांना साद घालून मध्यमार्गाच्या बरोबर वर कंदिल लावण्याची तयारी सुरू केली. त्यात बॅटरीचा उजेड टाकताच 'हरिश्चंद्रगड' ही अक्षरे उठून दिसत होती. पिवळ्या चौकोनांना बाजूने भगवे, हिरवे, निळे त्रिकोण आणि वर व खालच्या बाजूला लाल पांढरे आयात अशा बहूरंगातला हा कंदिल कोकणकड्याच्या अंधारात उठून दिसत होता. उद्देश होता गडावर पडलेल्या विरांना आजव दिवाळा पाडव्याच्या दिवशी श्रद्धांजली वाहण्याचा. कोकणकड्याने आजवर अमाप समाधानाचे क्षण दिलेत. आपल्याकडून त्याच्या लेकरासाठी ही छोटीशी पुजा तो स्विकारेल का? हा प्रश्न मनात डोकावून गेला. कोकण कड्याला नळकांड्यांचे संरक्षक कठडे बसविल्याने तो काहीसा खट्टू झाला आहे. भला मोठा आकाशकंदिल पाहून त्याने मोठ्या मनाने त्याचा स्विकार केला. दोन काठ्या एकमेकांना जोडून त्याच्या मध्ये हा कंदिल मध्यमार्गाच्या अगदी वर ऐटीत विराजमान झाला. अवघा कोकणकडा दिपावलीच्या आनंदात न्हाऊन निघाल्यासारखा भासला. तळाच्या बेलपाडा आणि आसपासच्या वाड्यांचे लुकलूक दिवे जणू कोकणकड्याच्या आकाशकंदिलाकडे न्याहाळताता भासत होते. उरी बाळगलेले अनेक वर्षांपासूनचे स्वप्न साकार झाले होते.
पूर्ण अंधार दाटला आणि कोकणकड्याचा हा आकाशकंदिल दुर अंतरावर जाऊन आम्ही न्याहाळत राहिलो. दुरून तो आणखी सुंदर भासत होता. वार्याचा वेगही मंद होता. इकडे सुदामने बाजरी व तांदळाचे पिठ एकत्र केलेली भाकरी, वरणभात आणि झणझणीत रशाची बटाटा बाजी बनवून ठेवली होती. अडीच तीन गरमागरम भाकरी भाजी अशी भरपेट पोटपूजा आटोपून झोपडीबाहेर आलो तर कंदिल हवे सोबत डोलताना दिसला. कड्या जवळ झोपून नका आज वारं जास्त असेल अशी कल्पना सुदामने दिली. त्याच्या झोपडीबाहेरच दोन तंबु लावण्याची तयारी केली. तोच एक पाणदिवड सळसळताना दिसली. हा काळ्या रंगाचा बिनविषारी साप, चावतो मात्र कडकडून, वृत्तीने अतिशय आक्रमक, प्रसंगी तो मांस बाहेर काढतो अशी त्या बद्दलची ख्याती ऐकलेली. तो पकडण्याच्या भानगडीत न पडता सुदामने त्याला काढीवर उचलून झोपडीपासून दूर नेले.
हल्ली शनिवार व रविवार नेहमीच जोरदार गार वारे वाहते ही माहिती त्याने पुरवली. आम्ही दोन एक चकरा मारून कोकणकड्यावरचा कंदिल बघून आलो. तो त्याने स्विकारलेला होता. त्याची कुठलीही मोडतोड झाली नव्हती. रात्रभर खरोखरच जोरदार वारे वाहत होते. त्यातही त्याची कोणतीच क्षती झालेली नव्हती. सकाळी आन्हिके उरकून कंदिलात लावलेला दिवा काढून घेतला आणि पुन्हा तो नव्याने बांधला. मग आमची पावल कोकणकड्याच्या दक्षिण टोकाकडे वळली. तिथून रोहीदास आणि माकडनाळेचे विहंगावलोकन केले. दुर अंतरावरून कंदिल छोटा छोटा होत दिसेनासा होईस्तोवर आम्ही कोकणकड्याचा एक टोक गाठले. तिथून तारामतीचे शिखर आणि बालेकिल्ला हा बेत तडीस नेण्यासाठी आम्ही कोकणकड्याच्या आकाशकंदिलाला नमस्कार केला!
।।जय हो।।
नासिक ते पाचनई प्रवासासाठी लागलेला अंतर आणि वेळ...
नासिक (०) किलो मिटर) ६-२०
घोटी (४८ किलो मिटर) - ७-०५
राजूर (३२ किलो मिटर) - ८-०५
पाचनई (२७ किलो मिटर) १०-३५
------
एकूण अंतर व वेळ = (१०७ किलो मिटर)
४ तास ०५ मिनीटे
या छायाचित्राचे वैशिष्ट्य म्हणजे रात्रीच्या अंधारात उजळलेल्या तळाच्या वाड्या, पारूंडी नदी आणि हरिश्चंद्रगडावर उगम पावणार्या काळू, हरिश्चंद्रेश्वरी नदीच्या कुशीतल्या |
दीपक पवार, संतोष उगले...मोलाची साथ. |
इथे याची आवश्यकता नाही |
इथे कशाला हवे नळकांड्यांचे संरक्षक कठडे.... |
हरिश्चंद्रगडावर काय विज नेण्याचे नियोजन आहे |
तिथल्या निसर्गसौंदर्याची हे कळेना मेळ साधे |
No comments:
Post a Comment