प्रत्येक डोंगराचे हक्काचे जंगल असते. त्या डोंगरावरची झाडी, गवत, झुडपे वेलींच्या अश्रयाने मोठी जीव सृष्टी नांदते. नद्या, त्यांच्या ओहळी, झरे, धबधबे हे देखिल त्या नदीचाच भाग असतात. या महत्वाच्या कारणासाठी डोंगरावचे जंगल क्षेत्र हे राखायलाच हवे. नुकत्याच त्र्यंबकेश्वर डोंगर रांगेतल्या सोळाव्या डोंगराला भेट देण्याचा योग आला तेव्हा डोंगराचे जेवढे पठार आहे. त्याच्या पंचवीस टक्के इतकेच दाट झाडीचे आच्छादन शिल्लक राहिल्याचे दिसून आले.
आता प्रश्न राहतो ते डोंगराचे मुळ जंगलक्षेत्र गेले कुठे? अगोदरच्या पिढीत कोणी त्याचा नाश केला का? आज घटकेला या जंगलाचे मुळ क्षेत्र जतन व संवर्धन का होत नाही. आपल्याकडे वनविभाग, जो महसुल विभागाच्याही अगोदर अस्तित्वात आला आहे, या कामासाठी पूर्णवेळ नियुक्त असताना मुळ जंगलक्षेत्र पुनर्स्थापित का होताना दिसत नाही. या भटकंतीतून कमीत कमी केवढे जंगलक्षेत्र डोंगरासाठी हक्काचे आहे याचे साध्या डोळ्यांनी दिसणारे चित्र दिसून आले, ते मी तुमच्या समोर मांडत आहे. येत्या पाच ते दहा वर्षात आपण डोंगराचे मुळ जंगलक्षेत्र राखण्याचे उद्दीष्ट ठेवले तरच मानव विरुद्द जंगली श्वापदे, माणूस विरुद्ध इतर सर्व जनावरे यांच्यातला संघर्ष कमी करता येईल. शिवाय नद्यांच्या लगतचे जंगलक्षेत्र तयार करण्याची मोहिम उघडली तर आपल्याला वर्षभर पिण्याचे व शेतीसाठी स्वच्छपाणी उपलब्ध होऊ शकेल. भुजलपातळीसाठी आवश्यक झिरपा तेव्हाच तयार होईल जेव्हा नदीच्या किमान ५०० मिटर क्षेत्रातले जंगल क्षेत्र राखले जाईल आणि डोंगरांच्या क्षेत्रफळाच्या दहा टक्के इतके. नद्यांच्या बाबतीत आपण हवं तर यातून दाट लोकवस्तीच्या शहरांना व गावांना वगळू शकतो, कारण नदीकाठच्या जुन्या बांधकामांचे काही करता येईल असे दिसत नाही. अगदी मोबदला देऊन सुद्धा ते शक्य असेल असे वाटत नाही.
त्र्यंबक डोंगर रांगेची व्यप्ती म्हणजे पालघर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागापासून सुरू होणारा उतवडचा डोंगर ते नासिक शहराचं प्रवेश द्वार असलेला प्रसिद्ध पांडवलेणीचा डोंगर. ही एक सलग स्वरूपाची डोंगररांग आहे जिचा विस्तार सदतीस (३७) किलो मिटर इतका भरतो. याच रांगेत डोंगराच्या अल्याड पल्याड जाण्यासाठी खिंडी तयार करण्यात आल्यात. यातल्या काही तर हजारो वर्षांपासून माणसांची ये जा करणार्या प्राचीन वाटा आहेत.
या रांगेचे लहान लहानसे फाटे दक्षिण दिशेकडे फुटतात. त्यावर हरीहर किल्ल्या जवळ कापड्या, गौतमाचा धस असे एकांडे डोंगर दिसतात. अंजनेरीच्या परिसरात त्या महा उद्रेक काळात मोठी खळबळ उडालेली असणार. कारण या ठिकाणी पाच सहा डोंगर दक्षिणी फाट्याच्या रूपाने निर्माण झाले. या डोंगरांवर तीन ते चार किल्ल्यांची निर्मीती झाल्याचे बघायला मिळते. त्र्यंबक डोंगर रांगेचे अंजेनेरी फाटा चांगला साडे बारा किलो मिटर विस्तारला आहे.
नवरा नवरीचा किल्ला आणि रांजणागिरी. यातला रांजणागिरी अगदीच लहानसा, तर नवरानवरच्या किल्ल्याचा प्रचंड विस्तार. अंजनेरीला खेटूनच दोन देखणे सुळके मिरवणारा हा विस्तीर्ण पठाराचा किल्ला, त्याच्या पश्चिम धारेला चिटकून तसाच विस्तीर्ण पठाराचा डोंगर म्हणजे सोळावा डोंगर. याला स्थानिक आदिवासी मंडळी सोळशा, सोल्या ही म्हणतात.
ज्वालामुखीय उद्रेकातून नवरानवरीच्या किल्ल्याला सुळके नी डाईकची भिंत लाभलेली बघायला मिळते. सोळश्यावर असे कुठलेही भौगोलिक आश्चर्य त्याच्या या पूर्वी केलेल्या दोन भेटीत आणि भोवतालच्या डोंगरावरून केलेल्या निरीक्षणातून जाणवले नाहीत. तरी देखिल या सोळाव्या डोंगराने साद घालणे काही थांबवले नाही आणि आमची दुसरी सोळाव्या डोंगराची भेट संपन्न झाली.
इंग्रजांच्या नोंदीत या डोंगरांचा सोळावा डोंगर असा उल्लेख आढळतो. आकड्याचा हा खेळ काही लक्षात येत नाही. कुठूनही मोजून पाहिला तरी हा सोळाव्या क्रमांकाचा डोंगर वाटत नाही. त्र्यंबक रांगेत आकड्यांवरून नाव दिलेला हा काही एकमात्र डोंगर नाही. पाचवा आणि आठवा ही नावे देखिल आहेत. यातला पाचवा हा तर त्र्यंबकच्या मुख्य रांगेत उभा आहे. त्याला काही जण पाच्या म्हणतात. नवरा नवरीच्या किल्ल्याची दक्षिणी खाच म्हणजे बिड्यांची खाच. हा व्याही या नावाचा अपभ्रंश वटतो. याच खाचेच्या शेवगे डोंगकडे उतरणार्या टोकावर आठवा उभा आहे. याचा आकार अधेली सारखा. जुन्या काळात धान्य मोजण्याचे हे माप उपडे करून ठेवल्यागत याचा आकार. या अधेलीच्या खिंडीतून आठव्याची अनगड चढाई मार्ग.
|
माकड रानाचे जंगल |
आमच्या आजच्या भटकंतीचा उद्देश होता, सोळाव्या डोंगराच्या लहानशा जंगलात असलेले बेहड्याचे जुने झाड बघण्याचा. हे झाड अडीचशे वर्षे जुने असावे. त्याचा अगदी तळाचा घेर २० फुटांचा तरी असावा. आपल्या छातीच्या उंचीवर हाच घेर १२ फुटांचा भरतो. ''या झाडात पंचवीस ते चाळीस हजार मेट्रीक टन एवढा कार्बन सिक्वेस्टर असावा, याचा कार्बन सिक्वेस्टर एनर्जी व्हॅल्यू नुसार दहा ते पंधरा पेट्रोल टॅंकर इतका असेल'', अशी माहिती या भागात निवास करणारे जीवनव्रती सेवक अमित टिल्लू यांनी दिली.
|
उभे उत्तुंग आम्र वृक्ष |
पूर्वी समुचे जंगल अशा जुन्या प्रचंड वृक्षांनी भरले होते. ब्रम्हगिरी आणि अंजनेरीवर आज घडीला अशी दहा त पंधराच मोठी जुनी झाडे असावी, असे माझे गेल्या पाच एक वर्षात या दोन डोंगरावर चहू अंगानी केलेल्या भटकंतीतले निरीक्षण आहे. तात्पर्य आपण शंभर टक्के जरी नसले तरी ९९.९९ टक्के मोठाले वृक्ष प्रचंड मोठ्या डोंगरांवरून नामशेष केलेत. आपण म्हणजे आपल्या पिढीने, आपल्या मागच्या पिढीने. इंग्रज आमदनी पर्यंत जंगल क्षेत्र बर्या पैकी टिकून होते. स्वतंत्र्य प्राप्तीनंतर राज्याची घडी बसत असताना गरिबीच्या झळांनी जंगल क्षेत्र घटविण्यास हातभार लावला, हा युक्तीवाद मान्य केला तरी. गेल्या तीस चाळीस वर्षात देशात सुबत्ता येत असताना डोंगरावरची झाडे लावण्याचे व जगविण्याचे प्रयत्न का दिसून येत नाही. वनविभागासारखा विभाग या कामासाठी संपूर्णपणे नियूक्त असताना ते त्यांचा फार मोठा निधी पर्यटनावर का खर्च करताता. डोंगरांवरच्या किल्ल्यांवर अकारण का हक्क सांगतात व तिथल्या पुराणवास्तुंचे रूप बदलून टाकणारी कामे करून पर्यटनास काही एक कारण नसताना चालना देण्याचा खटाटोप करतात. यात भ्रष्ट साखळी हे एकमात्र कारण आज तरी समोर येत आहे. आणि देशाच्या नैसर्गिक संसंधनांचे अतोनात नुकसान होत असताना ज्यांच्यावर या प्रत्येक संसाधनांच्या रक्षणाची जबाबदारी आहे तो प्रशासन विभाग गप्प का आहे, बघ्याची भूमिका का घेत आहे. ज्यांना आपण देश चालविण्यासाठी निवडून देतो ते पुढारी याप्रकरणात लक्ष का नाही घालत. या दोन अत्यंत जबादार घटकांचे मौन किंवा निष्क्रीयता पुन्हा भ्रष्ट साखळीकडेच संकेत करते. आता ००.१ टक्के इतकेच जंगल जर डोंगरावर शिल्लक राहिले आहे तर ते राखायचे कोणी. आज घडीला काही पर्यावरण वाचविणार्या मुठभर संस्था आणि स्थानिक मंडळींपैकी काही जण यात पढाकार घेताना दिसतात. यातला सोळावा डोंगर हे एक उदाहरण आहे. तिथले बेहड्याचे झाड या जतन व संवर्धनातला दुवा म्हणून उभे आहे. एकदा ते तोडले की समजायचं, इथल्या संघर्षाने पुर्णविराम घेतला.
आमचे नियोजन होते ते रविवारच्या दिवशी छोटीशी पायपीट करायची. सोळाव्या डोंगराच्या पोटातले १२० फुटी घेर असलेला बेहड्याचा वृक्ष बघायचा आणि दिवाळीचा फराळ आपल्या आदिवासीं बंधुच्या सोबत वाटायचा, असा सोपा सुटसुटीत उद्देश डेक्कन ट्रेकर्सच्या अंबरिश मोरेंनी नियोजन केलेल्या या भटकंतीचा होता. पत्र्याच्या पाड्यातून सकाळी सव्वा आठ वाजता भटकंतीला सुरूवात झाली. कार्तिकचा महिना हा कडक उन्हे आणि थंडीची चाहुल घेऊन आलेला. घरून निघताना घातलेले गरम कपडे येथे पोहोचल्यावर, उन्हाच्या चटक्याची स्थिती दिसल्याने तात्काळ काढावे लागले. वातावरण मोठे निरभ्र होते. दुरच्या डोंगर रांगा धुसरशाच दिसत होत्या. परंतू जवळचे डोंगर प्रकाशमान दिसत होते.
|
the mangos jungle preserved for the Monkeys
|
उतारावरच काहीं गिरीजनांनी वरई तर काहींनी नागलीची पेरणी केलेली. तळाच्या भागात सर्वत्र भात कापणी ही बहूतांशी प्रमाणावर पूर्ण झालेली. आता नागली, वरईच्या कापणीचा हंगाम. आम्ही चालू लागले तेव्हा उगवतीच्या प्रकाश किरणांनी गवताचे शेंडे छानसे प्रकाशमान होताना दिसत होते. अगदीच एखादे दुसरे मोठे झाड या परिसरात नावापूरते का होईने शिल्लक असल्याचे पाहून आपल्याला आश्चर्य वाटते, मोठी झाडे येथे नाहीत तर मग कुठे गेली असतील. शिरस्त्या प्रमाणे एकमेकांशी परिचय, ओळख करून घेण्यात आली. इथल्या वनजमिनीचे घोटाळे कसे बाहेर येताहेत याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अंबरिश मोरे यांनी दिली.
|
Butterflies party |
रान फुले...गवत फुले पार करत आम्ही शिरलो माकडरानात! हा छोटासा पट्टा फारच वेगळा...येथे आंब्याची झाडे सरळसोट वाढलेली दिसतात. जणू काही त्यांच्यात उंच वाढण्याची स्पर्धा. या झाडावरचे आंबे खाण्यासाठी परिसरातील माकडांच्या टोळ्या येतात. त्यामुळे उन्हाळ्यात हा परिसर अनाहूत भटक्यांसाठी खुपच धोकादायक बनतो. याचे कारण म्हणजे माकडांना त्यांचा रानमेवा शहरी माणसाने घेतलेला आवडत नाही. त्यांचीच दैनंदिन खाण्या पिण्याची मारामार, इतकी या शाक भक्षी प्राण्यांची नी तृण भक्षी पक्षांची माणसाने त्याच्या स्वार्थासाठी आबळ केली आहे.
|
tall grown tree of Mango |
इथे एक देखणा पक्षी मृतप्राय आढळला. सह्याद्रीच्या भटकंतीत आजवर पक्षी उडताना पाहिलेत, इथे हा कसा काय मेला असावा. जीर्ण झालेल्या पानाचा चष्मा बनवून आम्ही आमचे मन रिझवले. मग माकडरानातल्या उत्तुंग आम्र वृक्षांना, दीर्घायू लाभो, हे जंगल सदा हरित राहो, अशी महाबली हनूमानाला प्रार्थना करून काढता पाय घेतला. पुन्हा माघारी येऊन आता कड्याच्या वाटेने डोंगर चढाई. इथला घसारा जपून पार केला आणि जोरदार वार्याने आमचे स्वागत केले. वार्याच्या झुळके सोबत मखमली गवताची सळसळ एक नयनरम्य सोहळा. आता ही वार्याची साथ शिखर माथ्या पर्यंत...नी तिथून पुन्हा खाली उतरून येई पर्यंत राहणार असेच आजचे वातावरण दिसत होते.
|
spects of nature |
त्र्यंबकच्या डोंगररांगेत थोडे फार...म्हणजे अगदीच थोडेफार जंगल टिकून आहे त्यात या परिसराचा समावेश करता येईल. पण ते किती थोडे आहे तर सांगतो, माणसाच्या एका फटक्यात ते नाहीसे होऊ शकते इतके थोडे आहे. पहिने, खरोली, शेवगे डांग या भागातील आदिवासी मंडळींनी टिकवून ठेवले आहे तितकेच जंगल आता उरले आहे. त्यांच्या दैनंदिन गरजा, गुरांचा चारा आणि अगदीच माफक प्रमाणावर मिळणारी वन उपज या जंगलांवर अवलंबून आहे. परंतू हे फार काळ चालणार नाही. या लोकांचा उदनिर्वाह आता जंगलावर अवलंबून रहिलेला नाही. मनुष्य वस्तीने इथल्या डोंगर परिसरात अगदी आत पर्यंत शिरकाव केला आहे. यात काही आदिवासी पुढारी मंडळींनी आर्थिक सुबत्ता प्राप्त करून या डोंगरांच्या परिसरातील जमिनींवर विकासाचे चाक फिरवले आहे. वैतरणा धरणाच्या परिसरात आता अनेक ठिकाणी रिसॉर्ट नी निवासी जमिनीचा विकास करण्यात आला आहे. शहरी लोक येथे वस्ती करून राहण्यासाठी आलेले नाहीत तर सप्ताहखेरची सुट्टी घालविण्यासाठी डोंगर परिसरात एखादे घर असावे या आशेने घरांकरिता दोन पाच गुंठ्यांचे लहान लहान तुकडे खरेदी करताना दिसत आहेत.
|
May I see the jungle through it. |
खरे तर माणसाला अशा ठिकाणी रहायला मिळणे ही त्याच्या मानसिक स्थैर्यासाठी खुप गरजेचे आहे. परंतू माणूसच तो, निसर्गात गेल्यानंतर तो किती काळ शांत बसेल. त्यात कोणाला तरी धांगडधिंगी घालण्याची हुक्की येणार आणि मग तो अशा निसर्गरम्य ठिकाणीही गजबजाट करणार. त्यातून होणारा विकास हा झाडांच्या मुळावर उठलेला दिसून येऊ लागला आहे. काही पुढार्यांनी थेट डोंगर कापून त्यावर जमिनींचा विकास सुरू केला आहे. जंगल म्हणाल तर येथे ते दोन ते पाच टक्के इतकेच शिल्लक राहिले आहे. होय! हे भितीदायक वास्तव आहे, परंतू तो मोजायला कोणत्या मोजपट्टीची गरज नाही. सोळाव्या डोंगरा सारख्या उंच ठिकाणावरून ते सहजपणे डोळ्याला दिसते. विचारी माणसे हा विकास पाहून सुन्न होतात.
तुमच्या लक्षात आलं असेल सोळाव्यावर नुसते गवतच गवत दिसत आहे. आज वारे जोरदार वाहत होते. या संपुर्ण पट्ट्यातून झाडे गायब केल्यानंतर गवताची चोरी सुरू झाली. आता रूपया दिड रूपयाला गवताच्या जुड्या विकल्या जातात. शहरी भागातून व्यापारी ट्रक घेऊन येतात नी त्यासाठी करतात इथल्या आदिवासी जनतेचे शोषण. त्याच गवताच्या पेंढ्या शहरी लोक सत्तर ते शंभर रूपयांना विकत घेतात नी मृतांचे अग्नीह संस्कार करतात! आता आम्ही सोळशाच्या पोटातले ते बेहड्याचे झाड बघायला आलो आहोत. वाट सोपी वाटत असली तरी जंगल वाटा सोप्या कधीच नसतात. अगदीच पातळ वाटांच्या दुतर्फा काटेरी झुडपे. त्यातून वाट काढत हा दिव्य दर्शन सोहळा.
केवढी लाजिरवाणी गोष्ट आहे की, जंगलात आता असे एखादे दुसरेच मोठे झाड शिल्लक आहे ते. ही लाज आम्ही आमच्या कमालीच्या स्वार्थी वागणूकीतून आणली. अवैद्य रित्या दारू गाळणार्यांनी इथल्या जंगलातली उरली सुरली झाडे तोडून त्यावर दारू उकळण्याचा सपाटा लावला आहे. त्यांला अटकाव करणारी पोलिस यंत्रणा आजवर कधीच प्रभावी न ठरल्याचा हा परिपाक. खरोली पंचक्रोशीतल्या आदीवासी मंडळींनी या झाडाचे कसोशिने रक्षण केले आहे. परतीच्या वाटेवर परिसरातील परिचीत डोंगर न्याहाळत आजच्या भटकंतीचा छानसा समारोप. डोक्यात मात्र वादळ निर्माण करणारा...
।।जय हो।।
|
tall trees talking with the sky |
डोंगर जपा
झाडे वाचवा
नद्या स्वच्छ ठेवा
माणूस या पृथ्वीवर
एकटा जगू शकत नाही
हे पक्के ध्यानात ठेवा...
तुमच्या मुला बाळांसाठी
येणार्या पिढीसाठी
हे उरले सुरले जंगल वाचवा...
हा कंठ शोष मी
कोणा समोर करतोय...
माझा हा आवाज तुमच्या पर्यंत
पोहोतोय?
सर्वसामान्य जनता
वन अधिकारी
वन कर्मचारी
पोलिस...महसुल प्रशासन
तुम्ही ऐकताय ना...
तुमच्या व्यस्त कामातून
जंगलाचे हे रूदन
सह्या शिखराची साद...
साद घालते सह्य शिखर...
|
left side viwe of the makadran trees |
|
small section of the Makadran |
|
women force |
|
rising rays penetrate through the jungle |
|
Tol camouflage on the leaf |
|
a group picture at the start |
|
knowing each other |
|
wild flowers |
|
glowing grass blades |
|
great atmosphere of the early morning |
|
varai yield...it should be consumed without polishing |
|
knowing about the surrounding from the locals |
|
a cow listening to our talks... |
|
early morning rays at the Patracha pada |
|
the top of solava dongar it measured 837,174.77 square meters |
|
only 535,103.97 square meters of jungle patch left now. |
|
the base of solave dongar is 4.33 kilometers |