Wednesday, November 2, 2022

महाराष्ट्राचा रस्ते विकास पट; उलगडतो न्हावी रतनगड

 

 

पाताळवडीतून...

आयुष्य कसं नियोजनात बद्द असावं. प्रत्येक गोष्ट योजनाबरहुकुम चालावी. जिथल्या गोष्टी तिथे असाव्या म्हणजे कसं सगळं सुरळीत चालतं. भटकंतीच्या बाबतीत तर हे तथ्य तंतोतंत असावं! 

असं कुठे असतं? असा प्रश्न आपलाच आपल्याला पाडणार्‍या अनियोजित, अनियंत्रित अशा भटकंतीतलीच ही भटकंती होती. किल्ले रतनगड. न्हावी उर्फ न्हावा रतनगड. बांगलाण प्रांतातला नासिक जिल्ह्याच्या नी महाराष्ट्राच्या अगदीच कोपर्‍यातला. पार गुजरातच्या सीमावर्ती भागातला. उंचीने तसा लहान, परंतू प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकल्या शिवाय पुढे सरकू न देणारा थरारक चढाई मार्गाचा. पातळधार आणि दृष्टीभय निर्माण करणार्‍या त्याच्या सर्वोच्च माथ्याच्या सुळक्याच्या चढाईचा. अशा आडवाटेच्या न्हावा रतनगडाची भटकंती नियोजितच असायल हवी ना? पण नाही असे काहीही नव्हते. या भटकंतीने दोन महत्वाच्या गोष्टींचा साक्षात्कार घडवला, एक म्हणजे सह्याद्रीतल्या दुर्गावर जगभलात जलसंकट म्हणून उदभवणार्‍या पाणवेलींनी भरलेले पाण्याचे टाके दाखवले. दुसरा म्हणजे महाराष्ट्रातल्या खड्डे युक्त रस्त्यांवर सापडलेला नामी उपाय. हा उपाय अंमलात आणला तर आपली खड्ड्याच्या त्रासातून मुक्तता होईल. खर्चाची प्रचंड बचत होईल. आणि गाड्यांचे होणारे अतोनात नुकसान टळेल. हा विषय ब्लॉगच्या अखेरच्या टप्प्यात वाचायला मिळेल. महाराष्ट्रातल्या रस्ते समस्यांवर कदाचित हा एक नवा तोडगा असेल अशी आशा आहे.

शनिवारी रात्री डेक्कन ट्रेकर्सच्या व्हॉट्‌स्‌अॅप समुहावर अंजनेरी भटकंतीची माहिती झळकली. उद्देश होता अंजनेरी गावातून चढाई करून माथ्यावरच्या पठारावरच्या वनस्पतींचे अवलोकन करण्याचा. तिथून मुळगेवच्या वाटेवर असलेल्या दुर्मिळशा तटबंदीचे अवशेष बघून परतण्याचा. चाल तगडी होती. अनेक फुलांची सद्या रेलचेल होती. माझ्यातल्या प्रकाशचित्रप्रेमीसाठी ही पर्वणी ठरणार होती. परंतू ही भटकंती नशिबात नव्हती. मालक अंबरिश राजे मोरेंशी संपर्क होऊ शकला नाही. मग ठरवलं गेला बाजार चामरलेणीच्या डोंगरमाथ्याला तरी भेट देऊया. तिथे पायथ्याल वृक्षमित्र सागर शेलारांनी मोठ्या कष्टाने गेल्या तीन वर्षांपासून झाडांची जोपासना केली आहे. काही झाडे आपणही लावल्याने त्यांची वाढ बघता येणार होती. 

रविवार ३० ऑक्टोबर

शिरस्त्या प्रमाणे सकाळी ५-००च्या सुमारास जाग आली. अंतर्मनाने आवाज दिला, आज चामरलेणी करण्यापेक्षा घरात लाकडाची प्रायोगिक बैठक तयार करण्यचा उपक्रम हाती घेतला, तो अपूर्णच असल्याने त्याच्या पुर्णत्वाला हात घालावा. म्हणून मग झटपट तयार होऊन घरा जवळच्या रस्त्यावर अर्धा किलो मिटर पळून आलो. एक किलो मिटर पळायचे होते. पण दिवाळीच्या हंगामात व्यायाम सुटल्याने तितकेही पळता आले नाही. निराश मनाने घरी परतलो. पहिला तास लेखन, मननासाठी द्यावा म्हणून मग ब्रम्हगिरीवर दिवाळी पाडव्याला झळकावलेल्या मोठ्या आकाशकंदिलाचा ब्लॉग लिहीयला घेतला. ८-०० वाजे पर्यंत ब्लॉग लिहून झाला. मग चहाची एक फेरी केली. चांगला आल्याची पाने, तुळस, गुळ टाकून बनवला. सव्वा आठच्या सुमारास सन्मित्र दीपक पवारचा फोन घणाणला -

आज काय करतोय?

काही खास असे नाही...

तुला ते नियोजन सांगिलते नव्हते का, राजमाची-भीवगड-ढाक, ईर्शाळगड वगैरे चार दिवसांची भटकंती. त्याचे नियोजन करायचेय.

बरं...

आणि आज बागलाण प्रांतात पिलघाट्या, शेंदवडभवानी, फोफर्‍या वगैरे रांगेंची रेकी करायची...

हू...

आणि तुझा न्हावी रतनगड, तांबोळ्या झालेत का?

तांबोळ्या झाला आहे, वडाखेलच्या मुख्य चढाई मार्गावरून काहीही दुर्ग अवशेष नाहीत. 

बरं...चल मग येतोस का...आमच्या सौभाग्यवतीला परवा दसान्यावरून आणायचे आहे. तोवर या डोंगरांची चाचपणी करून येऊ. दीपक येई पर्यंत दूर्गभांडारच्या आकाशकंदिलाचा ब्लॉग अपलोड करून झाला असता. म्हंटलं ये!

आईला माझ्या अकस्मात भटकंतीची कल्पना दिली. कुंल्याही क्षणी होकारच देणार्‍या आईने नाष्त्याची तयारी केली. आज माहितीच्या महाजालाचे वेग खासा मंदावलेला होता. दूर्गभांडारच्या आकाशकंदिलाचा ब्लॉग अपलोड करताना छायाचित्रे जात नव्हती. कसंबसं एक एक छायाचित्र हूळूहळू जात होतं. दीपकला तासाभरात तयार होतो असं सांगितलं होतं. आता सव्वा तास उलटला तरी माझं हातातलं काम पुर्ण झालेलं नव्हतं. भटकंतीची कोणतीच तयारी झाली नव्हती. कशीबशी ३५ लिटरची पाठपिशवी भरायला घेतली. एक जादा कपड्यांजी जोडी घेतली. न्हावा रतनगडाचा पायरीचा मार्ग कठिण आहे, असे दीपक म्हणाला. चार वर्षांपूर्वी त्याला शिखरावर जाता आले नव्हते, म्हणून त्याने दोर घ्यायला सांगितला तो दोर व दोन कॅरॅबिनर घेतल्या. कुठे तरी दगडा झाडाचा आधार बघून गरज भासली तर दोराचा उपयोग करता आला असता. 

९-०५ वाजता तो घराच्या खाली आला. वर आला नाही. वर आलो तर हा उशिर करेल, असे त्याचे साधे गणित असणार यात शंका नाही. अखेरीस  दूर्गभांडारच्या आकाशकंदिलाचा ब्लॉग अपलोड झाला. अन्यथा पुढचे चार दिवस तो टाकता आला नसता. दुर्ग दिवाळी उपक्रमास सहभागींना ब्लॉगची उत्सुकता होती. शिवाय मग ताजा विषय जुना झाला असता. म्हणून निघताना घाईघाईनेच तो कसाबसा टाकला. श्रेयनमावलीची स्लाईड अपलोड झाली नाही. मातोश्रींना चरणस्पर्ष करून घर सोडले. दीपकचा नाराजीचा कटाक्ष झेलून गाडीत स्थानापन्न झालो. गाडी महामार्गाला लागली तशी ब्लॉग लिंग भटक्यांपर्यंत पोहचवली आणि मग धावत्या चारचाकीत लहान सहान गप्पाची मैफिल सुरू झाली. पिंपळगावचा पथकर नाका आला. या ठिकाणी हलक्या चारचाकी वाहनांसाठी २१०/- रूपये पथकर मोजावा लागतो. नासिक जिल्ह्यातील ज्या वाहनांनी येथे नोंदणी केली असेल त्यांना केवळ ४०/- रूपये मोजावे लागतात. एक अर्थाने पथकराची ही रक्कम फार अधिक आहे. पहिल्यांदा येणार्‍याला तर संपूर्ण रक्कम भरावीच लागते. गाडाची कागदपत्रे दिली नाहीत तर दरवेळी हा भुर्दंड. पुढचा चांदवडचा पथकर हा १४५/- रूपये. सुदैवाने आज आमचा तो चुकणार होता. आम्ही त्याच्या अगोदरच सोग्रस फाट्यावरून पुरातन भावडबारीने सटाणा गाठणार होतो. 

भावडबारीत आले की, तिथल्या शहंशाए भावडबारीच्या पिराच्या ठिकाणाकडे दोन मिनीटे थांबव्या शिवाय आमची गाडी पुढे जात नाही. याच ठिकाणी बाफळ्याचे प्रथम आरोहण करताना बाळूबाबा पवारांची भेट झाली होती. त्यांच्याच मदतीने आमची ती संस्मरणीय भटकंती मोहिम महामारीच्या दुसर्‍या लाटेनंतर तडीस गेली होती. तिथेच अंगाने थकलेल्या जमिल बाबांची भेट झाली होती. बाळूबाबा अलिकडे निवर्तले. थकलेले जमिलबाबा अजूनही या घाटात येऊन बसतात. त्यांचे मन पायथ्याच्या खेलदरी गावापेक्षा भावडबारीतच रमते. काही काम असो नसो दिवसभर ते तिथेच बसतात. बाळूबाबांच्या प्रमाणे या ठिकाणातच त्यांचे मन गुंतले आहे. घाटातली पोलिस चौकी केव्हाच बंद जाली आहे. त्याच्या रिकाम्या कठड्यावर त्यांची उत्साहमुर्ती बसलेली दिसते. आता त्यांना विस्मरण होतं, पण बाफळ्या करून आल्यावर आपण भेटलो होतो, असं सांगितलं की, त्यांना आठवू लागतं. प्रेमभराच्या दोन गप्पा करून आज त्यांचा निरोप घेतला. बाळूबाबांची आठवण निघते ती निघाली आणि त्यांचा निरोप घेतला.

भावडबारी सोडली आणि आम्ही मान पाठीची हाडे मोडून सजग होऊन बसलो. इधून आता संपुर्ण रस्त्या म्हणजे खाचखळग्यांची अखंड मालिका सुचरू होणार होती. मागे मी व चित्रकार मित्र अजय हातेकर असा आम्ही चौल्हेरच्या भटकंतीवर दुचाकीवरून जाताना या मार्गाचा प्रसाद घेतला होता. सटाण्या पर्यंत हा रस्ता जेरिस आणतो असा तो अनूभव होता. ऑक्टोबर २०१९चा तो दिवस. दीपकला म्हंटलं, तसा हा रस्ता यापूर्वीपासूनच मोडकळलेला आहे, तो अजूनही दुरूस्त नाही झाला. या भागातला किमान दोन आमदार तर नक्कीच या मार्गाने येत जात असतील. त्यांना याचा त्रास होत नसेल का? की ते गावात नावापूरतेच येतात नी नासिकला इतर लोकप्रतिनिधींप्रमाणे निवास करतात? आमच्या मनालाच पडलेल्या या प्रश्नाची उत्तरे आम्हाला मिळू शकली नाहीत, परंतू दीपकने त्याच्या अल्टोची नुकतीच दुरूस्ती करून घेतली होती. त्यामुळे त्याने जास्तीत जास्त खड्डे टाळत किंवा त्यावरून गाडी न उसळवता हाकायला घेतली. 

तसं बघायला गेलं तर खड्ड्यांची ही मालिका सोग्रस फाट्यावरूनच सुरू होतो. म्हणजे तुम्ही मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग सोडून चांदवड प्रकाशा या नव्याने तयार झालेल्या राज्य महामार्गाला लागतात तेच मुळी खड्ड्यांच्या मार्गावरून. आता आमच्या भाळी हा ५९.३ किलो मिटरचा प्रवास हा आकाशातल्या तार्‍यांइतक्या खड्यांची संख्या असलेल्या रस्त्यावरून सुरू झाली. दीपकच्या मणक्यात रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या विचारांनी एकच शिरशिरी आली. चारच दिवसांपूर्वी तो महाराष्ट्रातल्या अतिशय प्रसिद्द अशा पर्यटनस्थळ मार्गावरून खड्ड्यंचा प्रसाद घेऊन आला होता - घोटी राजूर रस्त्यावरून. 

वीस एक मिनीटात आम्हाला नी आमच्या गाडीला खड्ड्यांचा सराव झाला आणि आमची गाडी रूळावर आली. पुन्हा आम्ही नॉर्मल गप्पा मारू लागलो. आमच्या मनाने गियर बदला, चारचाकी गाडी ही अंमळ हळूवारपणे एक एक खड्ड्याची सफर करत, गप्पा मारत, प्रत्येक दुकानीची पाटी न्याहाळत करायचा असतो. आता गाडी झोपाळ्यागत डुलू लागली. त्याने माझ्या थकलेल्या शरीराला गप्पातून बाहेर काढून डूलकी आणली. मला पाहून दीपकलाही झोप येऊ लागली. मग ने देवळ्याच्या अलिकडे गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन थोडी केळी विकत घेतली. हा छोटासा ब्रेक डोळ्यावरची झोप उडविण्यासाठी पुरेसा ठरला. सटाणा ते ताहराबाद हा राज्य महामार्गाचा भाग दुरूस्तीला घेऊन ३ वर्षे झालीत. याची अर्धी बाजू पक्की करण्यात येत आहे. तोवर एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. येथे सर्व बाजूंनी धुळ उडते. अवघ्या २३ किलो मिटरचा हा रस्ते तीन वर्षात पुर्ण होऊ शकला नाही, या बद्दल जनता बिचारी काय आणि कोणाकडे तक्रार करणार. त्या लोकप्रतिनिधींना, त्या साबा अधिकार्‍यास, त्या महसुल प्रमुखास शांत झोप लागते ना? एवढेच आपल्यासाठी महत्वाचे. ते यशवंत महादेव भोसेकर असते तर त्यांच्या काळात असे घडले नसते याची मलाच काय प्रत्येक बागलाणवासियांस हमी होती. यशवंतराव सरकारी अधिकारी असूनही इतक्या निष्ठेने त्यांनी लोकांची सेवा केली की, लोकांनी त्यांचे मंदिरच बांधले. आज सव्वाशे वर्षे लोटलीत तरी त्यांच्या नासिक जिल्ह्यात दोन ठिकाणी यात्रा भरतात आणि लोक त्यांची रोज पुजा करतात. असं संतपदाला कोणत्या सरकारी अधिकार्‍यास किंवा लोकप्रतिनिधीला पोहोचायचे आहे. आम्ही आपले उगीचच आदर्शाच्या गप्पात रंगलो. आमच्या बुद्दीवर चढलेली झांज उतरवण्यासाठी आम्ही बागलाणच्या डोंगरळ रांगात रमण्याचा निर्णय घेतला. अंतापूर, मुल्हेर मार्गे न जाता आम्ही दासवेल गावावरून गाडी वळवली. वळणालाच मांगीतुंकी व तांबोळ्या या दुर्गत्रिकुटाचे मनोहारी दर्शन घडले. डोक्यात महाराष्ट्राचे रस्ते पुराण घोळत असल्याने याचे सुदरसे छायाचित्र घेण्याचा विचार बाजुला सारला. दावलमलिकच्या डोंगर समोरून मांगीतुंगीचे छायाचित्र घेतले. 

तुंगीचा सुळका

हे वागणं बरं नव्हं


दुपारची जेवणाची वेळ होती. दीपकने घरून ५ पोळ्या, ठेचा नी लोणचं आणलं होतं. ते आणिबाणीसाठी बाजूला ठेऊन आम्ही मांगीतुंगीच्या भोजनालयात जेवणाचे बेत आखला, परंतू तिथे भोजन संपल्याने अर्धातास थांबावे लागणार होते म्हणून मग आम्ही भीलवाडवरून गाडी वडाखेलच्या दिशेने वळवली. इथे मांगीतुंगी ट्रेस्टने थेट ऋषभदेवाच्या मुर्तीपर्यंत जाण्यासाठी गाडीरस्ता तयार केला आहे. त्यासाठी तिथे प्रवेशकर मागण्यात आला. आम्ही वडाखेलला जाणार असल्याने तो नाकारला आणि तांबोळ्याच्या पायथ्याला एका झाडाखाली विसावून सोबतची चटणी भाकरी खाल्ली. तिथल्या गुराख्याने तांबोळ्यावर कोणताही अवशेष नसल्याची माहिती दिली. तिथून २ किलो मिटरवर पाताळवाडी. न्हावी रतनगडाचे पायथ्याचे गाव. गाव कसले १४ घरट्यांची छोटीशी वस्ती. वडाखेलचाही रस्ता मोडकळलेला तर पाताळवाडीचा नवा असल्याने उत्तम दशेत. येथे पोहोचायला दुपारचे पावणे तीन वाजले. 

पाताळवाडीत फुललेल्या बाजरीच्या मळ‍्य़‍्तुन दिसणारे त्रिकुट


संपुर्ण वाडी निर्मनुष्य असल्यागत भासत होती. जो तो शेतात कामासाठी निघून गेलेला दिसला. दीपक म्हणाला वरच्या माळावर जाऊ. तिथे मी आराम करतो, तु कोणा गुराख्याला घेऊन जाऊन ये. पायर्‍यांची वाट सांभाळून जा. 


३-२५

पाठपिशवितले अनावश्यक सामान गाडीत ठेऊन आम्ही न्हावी रतनगडाच्या दिशेने कुच केली. आज माथा गाठणे अशक्य वाटत होते म्हणून थोडं वर पर्यंत जाऊन येऊ. त्याच्या थरारक पायर्‍यां बघू आणि दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठून आरामात गड फिरू असे आम्ही ठरवले. सुदैवाने एक लहान मुलगा गुरे घेऊन नुकताच गावात आला. त्याला दीपकने माळा पर्यंतची वाट दाखव म्हणून विचारा केली. मोठ्या आनंदाने तो वाट दाखवायला निघाला. अंगात शाळेचा गणवेश होता. वर पर्यंत येणार का विचारले तर, नाही म्हणाला, आई शेतात काम करत आहे ती नाही म्हणेल असे सांगितले. बाजरीची कणसे वार्‍यावर डोलत होती. वाल पापडीच वावर सोडून आम्ही चढणीला लागलो. संपुर्ण हिरव्या उंचगवताने पायवाट झाकली होती तरी त्यातून मळलेली वाट जाणवत होती. टेकडी पर्यंत सोबत मिळाली. तिथून आम्ही डोंगरकड्याच्या वाटेने गवतात हरवलेली पाऊलवाट शोधत चढाई सुरू केली. गवत हिरवे असले तरी त्याची कुसळं वाळली होती. काट्यागत ती कपड्यांमध्ये घुसत होती. आमच्या दोघांना ही चढाई दमवणारी वाटली. ऑक्टोबरचे कडक उन पडले होते. त्यात ही अनियोजीत भटकंती आमची पावले हळूवार टाकत होती. 

यंदा पाऊस बराच लांबल्यामुळे संपुर्ण परिसर हा हिरवईने नटल्यासारखा भासत होता. समोरच्या गोलाकार टेकडीवर एक लहान मुलगी तिच्या गाई घेऊन आली होती. ही टेकडी आणि त्यावर ती नी तिची गुरे मोठे नयनरम्य दृष्य भासत होते. चार डोंगराच्या मध्ये तिचा स्वर्गच जणू अवतरल्यासारखा वाटत होता. शेवटच्या कातळ टप्प्याच्या खाली वाघदेव आहे. तिथे तीन गुराखी बसले होते. त्यांच्याशी ग्प्पा सुरू झाल्या. त्यातला एकजण दीपक गवळीवर आम्हाला वर न्यायला तयार झाला. आम्ही वाघ देवाच्या माळावर एका झुडपाच्या सावलीत पाठ टेकली. दहा मिनीटे वामकुशी घेतली आणि ताजेतवाने झालो.

a girl from Patalwadi grazing her heard on a lush green hill with breathtaking mountain sorrounding

३-४२: 

दुपारी उशिराच चढाईला सुरूवात झाली. आता आमची खर्‍या अर्थाने वेळेसोबत स्पर्धा सुरू झाली. पार्‍यांचा मार्ग कठिण होता. सूर्य मावळ्याच्या आत खाली पोहोचण्याची शक्यता कमी वाटत होती. बॅटर्‍या सोबत असल्या तरी अंधारात अशा अनगडवटा फारच परिक्षा बघणार्‍या असतात. वर चढताना जाणवलं की, काही वाटा या जेमतेम एक पाउल ठेवण्याइतक्या पातळ आहेत. त्या उतारावर असल्याने दिवसा उजेडी चालताना दमछाक होत होती. अंधारात अशा वाटा नकोशा होऊन जातात व फार सावधपणे पार कराव्या लागतात. ४-१९ वाजता गडाची देवी सप्तश्रृंगीचे दुरून दर्शन घडले. पाण्याच्या टाक्यात एका भिंतीवर ही कोरलेली आहे. तिल ऑईलपेंटचा रंग दिलाय. हे आडव्या आकाराचं तीसेक फुटांचं टाकं कोरडंठाक पडलय. त्याच्यात पावसाचे पाणी साठून राहत नाही, परंतू थोडी ओल दिसते. देवीच्या बाजुलाच औदुंबराचे जुने झाड टाक्यातच उगवले. देवीच्या अगदी डोक्यावर एक बुरूज दिसतो. त्याच्या भग्न पायर्‍या दृष्टीस पडतात. ही वाट कठिण असल्याने आम्ही नेढ्याच्या खालच्या पायरी मार्गाकडे मार्गस्थ झालो. 


water hyacinth...on around 3500 feet  height in a water cistern?

वॉटर हायसिंथ...

पुढे जाऊन पाहतो तर काय, एक आख्ख टाकं पाणवेलींनी भरलेलं आढळलं. या पाणवेली डोंगरावर दिसण्याची ही अतिशय दुर्मिळ घटना. मी तर प्रथमच पाहत होतो. या टाक्यात या वेलीची बिजे कशी काय आली असतील? कुठल्या पक्षाच्या मार्फत की कोणा पर्यटकाने ती आणून टाकलीत काहीही कळत नाही. वॉटर हायसिंध नावाची ही पाणवेली जगभरातल्या गोडे पाण्याची एक डोके दु:खी बनली आहे, इतकी की, त्यांचे उच्चाटन करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत, परंतू त्यावर कोणताही उपाय नाही. जगाच्या गोड्या पाण्यात आता यांचा फैलाव ४०% क्षेत्रावर झाला आहे. तशा या बिनविषारी, परंतू त्या इतक्या दाट पसरतात की, पाण्यात इतर कोणत्याही वनस्पतीस वाढू देत नाहीत. तळाला सूर्यप्रकाश पोहाचू देत नाही. त्यामुळे पाण्यातील वनस्पती व जलचरांची संख्या प्रचंड प्रमाणावर कमी होते. एकमात्र नक्की, पाणवेलींमुळे तिच्या सभोवतालचे पाणी कमालीचे शुद्ध होते, असा जलपर्णी संशोधकांचा अभ्यास आहे. सह्याद्रीत कुठल्याही दुर्गावर पाण्याच्या टाक्यात अशी जलपर्णी आजवर कधीही बघितली नव्हती. 

the tricky rock cut stairway to be dealt with extra caution

इथून पुढे कातळातच कोरलेल्या पायर्‍यांची वाट.  या पार्‍या उभी चढण चढत जाणार्‍या असून त्या थेट अंगावर येतात. त्यावर माती, मुरूम गवत असल्याने सावकाशपणे त्या चढाव्या लागतात. हाता पायांना भक्कम आधार मिळत असले तरी इथून घसरण्याची बात नच्छो एवढा या कड्याचा कोन उभासोट आहे. साधारण साडेतीन हजार फुट उंचीवर अशा पायर्‍या चढताना दमछाक ही होतेच. वरच्या बाजुला बुरूजाला लागून गडाचे प्रवेशद्वार असणार. आता आडवी वाट सुरू झाली. लगेच एक आडवे खांबटाके लागले. ही खांबटाक्याची पद्धत फारच जुनी. अगदी सुरूवातीच्या काळात अशी टाकी कोरली जायची. त्यात पावसाचे पाणी वळवले जायचे किंवा काही अंतर्गत पाण्याचे स्त्रोतही त्यास जोडलेले असायचे. यात पाणनिवळी दिसल्याने हे पाणीही पिण्यासाठी उपयुक्त आहे. पाण्याची चव उत्तम आहे. पुढे आणखी एक कोरडे टाके लागते. तिथून आपण गडाच्या उत्तर बाजुच्या बुरूजावर येतो. इथून पुन्हा कड्यात कोरलेली दगडी पायर्‍यांची उभीसोट वाट. पंचवीस तीस फुटांच्या चढणीनंतर गडाचे सर्वोच्च पठार येते. इथून सभोवतालचा नजारा स्तिमित करतो. पश्चिमेकडे शेंदवड भवानीचा डोंगर तर दक्षिण बाजुला हरगड, मुल्हेर किल्ले. हरणबारीच्या वर पाचपांडव, सालोटा, साल्हेर. संपुर्ण चढाई मार्गावरन तांबोळ्या, मांगीतंगींच्या डोंगराची साथसोबत लाभते. पाठीमागे कलणार्‍या सूर्यामुळे पाताळवाडी व वडाखेल शिवारात रतनगडाची सावली गडाचा आकारमान मोठा करून दाखवत होतील.  

पुर्ण उंचीच्या गवत व झुडपातून आम्ही झपाझप पावले टाकत चाललो तोच एका चौसोपी मोठ्या आकाराच्या पाण्याच्या टाक्याने दर्शन दिले. दोन पुरूष तरी हे खोल असावे. आत पाण्यावर हिरव्या वेलींचा तवंग उठला होता. त्याच्या थोडं पुढे आणखी एक कोरडं टाकं नी वाड्याच्या जोत्याचे अवशेष दिसले. आता दक्षिण दिशेला गडाचा सर्वोच्च माथा दिसत होता. गोलाई असलेला हा सुळकेवजा माथा म्हणजे अगदीच उघडाबोडका असल्याने चढाईच्या दृष्टीने चांगलाच आव्हानात्मक दिसत होता. नेढ्याच्या वरच्या बाजुने त्याच्या पायथ्याची वाट. ही वाट अगदीच थरारक. दोन अडीच पावले मावतील अशी दगड गोट्यांची ही ओबडधोबड वाट. दोन्ही बाजुला सरळसोट दरीत कोसळणारी. त्यामुळे त्यावरून चालताना छातीची धडधड वाढते. या ठिकाणी कमरेला दोर बांधून जाणे केव्हाही श्रेयस्कर. अमच्याकडे दोर होता. परंतू तो बांधायला कोणता नैसर्गिक आधार नव्हता. शिवाय सोबतचे दोघेही जण सुरक्षा दोर देऊ शकत नसल्याने आम्ही दोर न बांधताच ही लहानशी पूलवजा वाट पार केली.

the summit climb is not a technical one but comes with lot of exposure 

इथून सुळक्याच्या चढाईला सुरूवात होते. चढाई सोप्या श्रेणीची असली तरी सुळक्याच्या धार दृष्टीभय निर्माण करते. हाता पायांना उत्तम नैसर्गिक आधार मिळतात, तरी जोराचा वारा नी खुली दरी यामुळे फारच सावधपणे इथून चढाई करावी लागते. तशी ही छोटीशी चढाई. ती पार केल्यावर सर्वोच्च माथ्यावर पोहोचण्याच आनंद काही वेगळाच. तिथल्या झेंड्या जवळून सभोलतालचे डोंगर न्याहाळणे, त्यांची नावे ओळखण्याचा प्रयत्न करणे ही रम्य अनूभूती. आता दुपारचे ४-५६ वाजले होते. आम्ही अगदी योग्य वेळेत वर पोहोचलो होतो. दीपक गवळी हा पाताळवाडीचा. त्याच्यासाठी हे ठिकाण अंगवळणाचे. तो सोबत होता म्हणूनच आमच्या भाळी न्हावी रतनगडचा माथा साध्य झाला. अन्यथा आज एवढी दूरवरची आव्हानात्मक भटकंती शक्य नव्हती.

the summit...very little place atop

चढताना जेवढी भिती वाटली तेवढी उतरताना वाटली नाही. आता श्वास फुलणे कमी होणार होते. सुळकाउतरून आल्यावर सोपी सपाटी. तिथेच उजवीकडे वळण घेऊन गडाचे नेढे बघितले. नेढ्यात जाण्यासाठी चढाई करावी लागणार होती. यात वीसेक मिनीटे सहज गेली असतील. आमच्या समोर आता कातळ पायर्‍यांची ना कड्यातली गवताळ पातळ वाट पार करण्याचे लक्ष्य होते. अंधार दाटण्याच्या आत करण्यातच आमच्या या डोंगरयात्रेचे भले होते ही कल्पना असल्याने नेढ्यात चढण्यासाठी दोर न लावण्याचा निर्णय घेऊन परतीच्या वाटेला लागलो. 


गड निजे नीशेच्या गर्भात
तेव्हा पेटे श्वेत दिवा
नमन करण्या शूर वीरांना
प्रकाशिण्या नभास


उत्तर बाजुच्या बुरूजावरून मोडकळेली पायर्‍यांची वाट दिसत होती. दीपक गवळी या वाटेने कोणी जात नाही असे म्हणाला, मग आम्ही तिथून मागे फिरलो आणि आल्या वाटेने उतरू लागलो. ६-०० वाजेच्या सुमारास आम्ही वाघ्या देवाच्या माळावर म्हणजेच अंतिम कातळ टप्पा पार करून सुरक्षित ठिकाणी पोहोचलो. दोन घोट पाणी घेऊन आमची यात्रा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली. गावातच मुक्काम करून काही तरी जेवण घेण्याचा विचार होता. परंतू गावात कोणीही जेवण बनवून देण्यात उत्सुकता दाखवली नाही. गावात दगडात कोरलेले गणपतीचे उघडे देऊळ आहे. त्याच्या समोर गावातली मुले आणि तरूण गोट्या खेळताना दिसले. नदीतले गोटे घेऊन त्यांनी ते घासुन गुळगुळीत केले होते. त्यामुळे त्यांच्या दगडाच्या गोट्या अगदी सुबत झाल्या. काहीशा वेगळ्या पद्धतीने पण भान हरपून ही मुले गोट्या खेळत होती. गुलमोहराच्या झाडा खालील झोपडी ही भगताची. त्याच्याकडे कोरा चहा घेतला आणि आम्ही पाताळवडी सोडले. तिथून तांदूळवाडीत दीपकच्या मावशीकडे आमचा पाहूणचार झाला. मावशीच्या हातचे गरमागरम जेवळ, नागलीचे पापड आणि भरपूर गप्पा मारत आमचा दिवस सत्कारणी लागला. दुसर्‍या दिवशी फोपर्‍या डोंगरचा किंवा हनूमानगडाचा बेत होता. हनूमानगड येथे कोठेच आढळत नाही. पण एका डोंगराला हनूमानाचा डोंगर हे नाव आहे. त्यावर गडाच्या नावाने कोणतेही अवशेष नाहीत. तेव्हा भरपूर डोंगरांनी भरलेल्या बालगाणात गुजरातच्या सीमेलगतची डोंगररांग बघण्याचे नियोजन होते. अचानक दीपकला त्याच्या कंपनीतून साहेबांचे बोलावणे आले. त्याल तात्काळ हजर रहावे लागणार होते. त्यामुळे आम्हाला आमची तीन चार दिवसांची डोंगर यात्रा दुसर्‍याच दिवशी संपवावी लागली. अर्थात या सवेमुळे दीपकला पुढच्या भटकंतीसाठी रजा मिळणार असल्याने आम्ही बागलाणच्या मोहिमेचा अल्प संतोष मानून समोरोप केला. आता विषय रसत्यावर पडलेल्या खड्ड्यांचा. 

Limitless joy whey you have tough marbles made from river pebbles rubbing on stones finely tuned 

महाराष्ट्रात खड्डे नाही असा एकही प्रांत नाही. पूर्वपार रस्त्यांची अशीच दयनीय अवस्था. त्यामुळे पर्यटनाच्या संधी ठासून भरलेल्या असतानाही महाराष्ट्रात रस्ते प्रवाश एक दुस्वप्न ठरतो. नेमकं काय होतं. इतक्या वर्षांपासून आपण रस्ते बांधत आहोत तरीही त्यांचा दर्जा का सुधारत नाही. शेजारच्या गुजरात, गोवा, कर्नाटक, आंध्र ते अगदी नव्याने स्थापन झालेल्या तेलंगणात उत्तम रस्ते दिसतात. आमच्याकडे रस्ते उत्तम नाही तर ते अती खराब दर्जाचे आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणावर पथकर वसूल केला जातो तरी रस्ते चांगले मिळत नाहीत. आपल्याकडे नेमकं काय घडतयं. रस्त्याच्या कामात होणारा प्रचंड भ्रष्टाचार हे एक कारण सांगितले जाते. त्याच्यापलिकडे जाऊन रस्ते हा विषय आपण घेणार आहोत की नाही. किती वर्ष हे असं चालायचं. याने प्रवासाचा वेग कमी होतो. वाहनांची अवस्था बिघडते व लोकांचं वेळेचं, खर्चाचं गणित बिघडतं.

राज्य शासनाकडे वर्षाकाठी रस्तेबाधणीसाठी किती रकमेची तरतूद आहे. त्या रकमेत खरोखरच सर्वश्रे्ठ दर्जाचे किती किलोमिटरचे रस्ते तयार होऊ शकतात. याचा मंत्रीमंडळाने हिशेब तयार केरावा व तेवढेच रस्ते बांधण्याचे काम हाती घ्यावे. जगातल्या सर्वश्रेष्ठ रस्ते बांधणी संस्थांना ही कामे द्यावी. सद्याच्या कंपन्या, ठेकेदार हे मोठ्या प्रमाणावर विकाऊ स्वरूपाचे आहेत हे एव्हाना सिद्ध झाले आहे. त्यामुळे आजपासून ही यंत्रणा पुर्णपणे बाद करावी. वर्षभरात फार तोड्या रस्त्यांची कामे होतील, परंतू वर्षदरवर्ष आपल्या पदराती उत्तम रस्ते पडतील. मग पथकराची गरजही उरणार नाही. त्याने प्रवास स्वस्त झाला तर राज्यातला व्यापार, उद्यम, पर्यटन उद्योग वेगाने उभा राहू शकेल. 

आणखी एक उपाय सुचवावासा वाटतो. ज्या रस्त्यांसाठी आपल्याकडे तरतूद नाही ते रस्ते दुय्यम रस्तेविकासकांना न देता तसेच फुटकेच राहू द्यावे. जमल्यास त्यावरून बुलडोझर, जेसीबी वगैरे चालवावे व रोडरोलरने राडारोडा दाबून टाकावा. त्यावरून वाहने जातील तसा त्याची बारीक माती तयार होऊन किमान खड्डे मुक्त रस्ते तरी तयार होतील. पावसाळ्यात यातल्या काही कठिण रस्त्यांसाठी स्नो स्कुटरच्या धर्तीवर मड स्कुटर्सचा हवं तर प्रयोग राबवावा. एकना एक दिवस या अविकसीत रस्त्यांचा क्रमांक लागेल तेव्हा तेही पुढे जाऊन पक्के करता येतील. तोवर जुन्या काळात जशा कच्चा वाटा होत्या तसे रस्ते तर लाभतील. ना देखभाल दुरूस्तीचा खर्च ना वाहने खड्टात आदळून गाड्यांना क्षती. काही तरी कटू निर्णय हा घ्यावाच लागेल. परंतू जनतेच्या कराचा प्रत्येक रूपया हा पुर्णपणे रस्त्याच्याकामासाठी खर्च झाला तर पुढच्या दहा पंधरा वर्षात आपल्याकडेही इतर राज्यांप्रमाणे उत्तम दर्जाच्या रस्त्यांचे जाळे तयार झालेले असेल. भर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नासिकमध्ये घरी पोहोचले तेव्हा रस्ते उपायाच्या स्वप्नातून खडबडून जागा झालो. एकभटकंती अपूर्ण राहिली, पण एक दैदिप्यमान किल्ला भाळी लागला याचे समाधान.

न्हावी रतनगड आणि तांबोळ्या यांचे इतिहासात महत्वाचे स्थान आहे. अहमदशहा बहामनी व गुजरातचा सुल्तान यांच्यात येथे १४३९मध्ये घनघोर युद्ध झाल्याची इतिहासात नोंद आहे. उभ बाजुंनी मोठी मनुष्य हानी झाली त्यामुळे दोन्ही फौजांनी युद्धातून माघार घेलती. तसा रतनगड हा टेहाळणीचा किल्ला वाटतो. त्याचा विस्तार कमी, परंतू गडावर फार जुन्या बांधकामाचे अवशेष दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला होता. त्यांना रतनगडावर संपत्ती सापडल्याचे मागे कोणाच्यातरी तोंडून ऐकले होते. ती तारीख मिळाली तर बरं होईल. दुसर्‍या सुरतेची लूट करून परतताना महाराज याच प्रदेशातून आले होते. मुल्हेर ही मोगरांच्या ताब्यातली महत्वाची बाजारपेठ त्यांनी लुटली होतील. तिथे त्यांना औरंगाबेदेवरून दिलेरखानाची फौज मागावर येत असल्याची सुगाव लागला. तेव्हा त्यांनी सूरत लुटीचा खजिना पुढे पाठवून मोगलांचा सामना केला. असं म्हणतात की उभयतांमध्ये कांचनबारीत समोरा समोरचे मैदानी युद्ध झाले. आजवर महाराजांनी मोगलांशी मैदानी युद्ध टाळले होते. आता त्यांची ताकद वाढली होतील. ही लढाई काहींच्या मते दिंडोरीला झाली. आम्हाला भावडबारीतून जाताना कांचना किल्ल्याची डाईकची अश्मभिंत दिसली त्यावरून शिवशाहीच्या इतिहासाला उजाळा मिळाला. अन्यथा बिकट रस्ते प्रवासाने डोके उठवले होते. आशा करूया येणार्‍या काळात आपले प्रगत राज्य या बिकट समस्येकडे गांभीर्याने लक्ष पूरविल. अहो तुम्ही रस्ते चांगला बांधा, राज्याची प्रगती बघा कशी दुप्पट वेगाने होईल. राजकीय पुढारी, सरकारी नोकरशहा यांच्या जोखडातून हा महत्वाचा विभाग कायमचा सोडवा ही कळकळीची विनंतील.

।।जय हो।।


Ratangad from Wadakhel

Shadow of Ratangad trying to compit with the trio of Tambolya, Matangeshwar and Tungeshwar peaks


Matangeshwar and Tungeshwar peaks


मांगेश्वर तुंगेश्वराची जुळी शिखरे... हिंदू धर्मातील मान्यतेनुसार येथे राम, हनूमान, सुग्रीव, नल, नील, महानील, गवा, गवाक्ष यांना मुक्ती मिळाली.

Glowing Grass blades taking light from the setting rays... 

Shree Ganesh at Patalwadi, the base settelment

the thorny grass in abundance

steep climb to reach the top grass field 

Goddess of the fort

inscription...cant say...engulfed in dry moss

didn't expected we would be here after starting so late in the afternoon


water cisterns with rock cut pillars mark of very old construction



Hargad, Pachpandav, Salota and Salher with Haranbari dam in one frame

Don't overcrowd the Sahyadris...be a responsible tourist be a trekker.









No comments:

Post a Comment