Sunday, March 13, 2022

पिसोळगडाचे स्वर्गीय सावर

पिवळा धम्मक गवती माळ, त्यावर मधोमध पन्नास एक काटेसावर फुललेले...बेमोसमी पावसाची वर्दी घेऊन आलेल्या आकाशाची निळाई पार्श्वभूमीला लाभलेली, हे चित्र 'मरणाचं सुंदर' तेव्हा ठरतं जेव्हा तुम्ही रडत खडत एखाद्या आड वाटेच्या दुर्गावर जातात...काट्याकुट्यात तुमची वाट हरवते. अगोदरच तळपलेला भास्कर तुम्हाला बेजार करतो. वरून अचानकपणे निर्माण झालेले दमट हवामान तुमची चाल मंदावते...गडाची अगदीच उभी चढण...छातीचा भाता सतत उघड-बंद होत श्वासोच्छवास तेज करणारा. अशा अवस्थेत तुम्ही सर्वोच्च माथा गाठतात आणि समोर तूमच्या समोर उभं ठाकतं ''हे असं दृष्य''...जणू गायतोंडेच्या अमुर्त चित्रातलं एखादं गुढ उलगडल्यागत...
Blue background...yellow grass...katesawar what a class 
ती एक कष्टप्रद डोंगरयात्रा होती. अंतर आणि पल्ला फार नसला तरी फाल्गुन महिन्यातला तो एक उष्ण दिवस होता. नासिकवरून भल्या पहाटे निघण्याचा मनोदय अयशस्वी ठरला, पायथ्याचे वाडी पिसोळ गाव गाठताना १०-३० वाजले. एव्हाना उन्ह तापली होती. पायथा ते माथा हे अंतर दिड तासात अगदी आरामात गाठून होतं. तप्त उन्हामुळे अर्धा तास जास्तीचा लागणार हे गणित. एका स्वागत कमानीने आमचं स्वागत केलं. महाराष्ट्रात आता हे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळतं. राज्य शासनाचा गडकोट विकासासाठी निधी आला की, त्यातून पहिले काम केलं जातं ते म्हणजे सिमेंट कॉंक्रिटची चौकोनी स्वागत कमान बांधण्याचे.
can you please welcome us with a proper gate that resemble with history or nature...
या कमानीचा, 'पर्यटन विकासाशी काय संबंध आहे, हे आजवर कळले नाही. एक तर त्यांचा रंग वर्षदिड वर्षात उडून जातो. त्यावर रंगवलेली अक्षरेही उडून जातात. या कमानी तिथल्या पूरातत्वीय अवशेषांसोबत मेळ खात नाहीत. अगदीच तुटपुंजा गडविकासाचा निधी असा अनाठायी खर्च होतो. पायथ्याला एका स्वामींचा आश्रम थाटलाय तर काही ठिकाणी वनविभाग पॅगोडा नाव देतं ते गोल बांधकाम करून ठेवलेले निवारे. पर्यटक आले तर त्यांनी यात उन, पावसापासून संरक्षण मिळविण्यासाठी त्यात बसावं, प्रसंगी त्यात जेवावं, विश्रांती घ्यावी असा उदात्त उद्देश असला तरी हे निवारा घुमट तद्दन बांधकाम साहित्य वापरून बांधल्याने त्यांची निगा ठेवली जात नाही. त्यांची स्वच्छता करायला माणूस नेमला जात नाही व काही वर्षात ते धाराशाही होतात किंवा जीर्ण.
Pushpa...giri pushpa... ☺
गडाचा खालचा टप्पा अगदीच शुष्क वन प्रकारातला. वनविभागाने सर्वच्या सर्व गिरीपुष्पाची झाडे लावल्याने कमी पर्जन्यमान असलेल्या या जंगलाला असे स्वरूप आले. गिरीपुष्पाच्या फांद्या म्हणजे आठ दहा फुट लांबीच्या काड्या. ही झाडे ढेरेदार स्वरूपाची नाहीत त्यामुळे अजिबाद सावलीदार नाहीत. याची पाने भरपूर नायट्रोजन युक्त असली तरी वाजवी पेक्षा जास्त आम्लता असलेली. यांना छान फुले येतात, परंतू ती विषारी. त्यांनी उंदिर मरतात, म्हणून याला उंदीरमारी असे नाव पडले. ग्लिरिसिडीयाची ही झाडे अर्थातच भारतीय प्रजातीची नाहीत. लवकर वाढतात. पाणी द्यावे लागत नाही. देखभाल गरजेची नसते. जेवढे कापू तेवढे ते अधिक जोमाने वाढता व झपाट्याने पसरतात यामुळेच कुठल्याशा काळात महाराष्ट्राच्या वनविभागाने यांचे अफाट मोठ्या क्षेत्रात रोपण केले. गिरीपुष्पाचे जंगल एवढे विषारी मानले गेले आहे की त्यात साप, विंचू हे विषारी जीव राहत नाहीत, असे अभ्यासकांचे निरीक्षण आहे. त्यात किती तथ्य आहे हा भाग वेगळा, परंतू या झाडांवर पक्षी येत नाहीत. प्राणी पक्षांचे ते खाद्य नाही. या ठिकाणी असे निरस जंगल आणि असा ओसाड टप्पा सुरूवातीलाच आपल्या वाटेला येतो. २०२२ या वर्षाचा सुरूवातीचा काळ पुष्पा या चंदनतस्कर वीरप्पन याच्या जीवनकथेवर चित्रीत झालेल्या प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपटामुळे ओळखला जाईल. त्यातला मान कापण्याच्या इराद्याने मानेवरून हात फिरवत मारलेला, पुष्पा हा संवाद भलताच प्रसिद्धीस पावला. त्यावरून इथे गिरीपुष्पाचे जंगल फुलविणार्‍या बद्दल, पुष्पा...गिरीपुष्पा...? मै छोडेगा नही साला...अशी वात्रटिका उच्चारत त्या वनाधिकार्‍यास जाब विचारावासा वाटला.
nice rustic step way of Pisol fort
ओबडधोबड दगडांच्या मार्गावरून आपली वाटचाल सुरू होते. पाच मिनीटांच्या चालीत आपण, 'पिरसाहेब बाबा', अशा अक्षरांची पाटी रंगवलेल्या थडग्याजवळ पोहोचतो. याला आता पत्र्याचे छत आणि जाळीचे कुंपण केले आहे. अलिकडच्या काळात सह्याद्रीतल्या महत्वाच्या गडकिल्ल्यांवर अशा थडगी मजारींची रंगरंगोटी करून तिथे कारण करण्यात आल्याचे चित्र बघायला मिळते, त्यातुलनेत प्रत्येक गडावर उघड्यावरच्या गडदेवतांच्या मंदिरांचा जिर्णोद्दार किंवा त्यांच्या स्वच्छतेची, पुजा अर्चा करण्याची तजवित केली जात नाही, त्यामुळे इतिहास व दुर्गप्रेमींमध्ये नाराजीचे सूर बघायला मिळतात. इथून पुढच्या पाच मिनीटांच्या चालीत गिरीपुष्पाच्या जंगलाचा टप्पा संपतो आणि आपण खुल्या टप्प्यावर येऊन पोहोचतो.
thorny scrub forest at the foot hills
आता गिरीपुष्पाचे जंगल मागे पडले आणि सह्याद्रीतल्या काटेरी झुडपांचे रान सुरू झाले. अशा रानात चालताना डोक्यावर सावली मिळण्याची शक्यता नसते आणि पायाखाली उन वारा व पावसामुळे खडबडीत झालेली जमिन लागते. नीट विचार केला तर याला र्स्वस्वी आपणच जबाबदार असल्याचे लक्षात येते. नासिकवरून आम्ही सव्वाशे किलो मिटरचे अंतर पार करून इथवर आलो. वाटेत कुठेच आम्हाला मोठ्या झाडांचा जंगल टप्पा लागला नाही. केवळ सातमाळेच्या डोंगररांगेत दोन ठिकाणी डोंगरावरचा एक ते दिड किलो मिटरचाच परिसर काय तो मोठ्या झाडी झाडोर्‍याचा बघायला मिळाला, बाकी सर्वच्या सर्व जमिन ही उघडी बोडकी. जंगलात झाडे नाहीत, असतील तर ती फार थोडी. सर्वत्र दिसते ती एक तर शेतजमिन किंवा लोकवस्ती, शहरे, गावं. वाडी पिसोळ म्हणजे नासिक जिल्ह्याचे सुदूर टोक. याला लागून धुळे नंदूरबारचा परिसर सुरू होतो. या पिसोळ गडाच्या परिघातही मोठ्या झाडीचे जंगल उरले नाही. डोंगरावर जिथे पाऊस पडतो तिथे मोठ्या झाडांची सावली व त्याचा पालापाचोळा नसल्याने जमिन उघडी पडते. तिच्यावरची मौल्यवान माती वाहून जाते. भूतलावरच्या पर्यावरणीय परिसंस्थेतला हा अत्यंत महत्वाचा घटक, तो कमी झाल्यामुळे जमिनीत होणारा पावसाच्या पाण्याचा झिरपा खुप कमी होतो. सूपिक माती वाहून गेल्यावर दगड, गोटे आणि वालूकामय माती उरते. त्याने वाटा घसार्‍याच्या होतात. अशा स्थितीत बर्‍याच वृक्षप्रजातींच्या नैसर्गिक वाढीस पायबंद बसतो. वन्यजीव नाहीशे होतात. उरतो तो फक्त माणूस आणि त्यांची ती बेगडी बांधकामे. त्याचा तो बेगडी विकास. जो करायला निघालाय अवघी सृष्टी भकास.
by cutting trees we have not only washed the all important soil...we have badly affected a great water percolation system of the Sahyadris...
आपल्यावर हजार वर्षे परकीय आक्रमकांनी सत्ता गाजवली. सोन्याचा धूर निघणारा आपला संपन्न देश लूटून नेला. मोठ्या लढ्याअंती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या गरिब जनतेने नैसर्गिक संसाधनांचा उदनिर्वाहाकरिता वापर केला. साधारणपणे नव्वदच्या दशकापर्यंत लोकांनी गरिबीचे चटको सोसल्यावर सुबत्ता येऊ लागली. नव्वद ते दोन हजार बावीस अशा तीस बत्तीस वर्षाचा काळ हा प्रगतीचा. तेव्हा जंगलावरचे अवलंबित्व कमी कमी होत गेले. या काळात एव्हाने आपली जंगले पुन्हा फुलायला हवी होती. ३०-३२ वर्षात झाडांची पूर्ण वाढ होते. पण तसे घडले नाही. ना नव्या झाडांचे रोपण करून ती वाढवली ना निसर्गत: झाडे वाढू दिली. उलट आहे ती मोठी झाडे तोडण्याचा सपाटा काही कमी झाला नाही. आपल्याकडे केंद्रात व राज्यात वनविभाग असताना, स्वतंत्र वनमंत्रालय असताना आणि प्रत्येक ग्रामपंचायत तथा शहरांना वनकायदे लागू असताना, वनांचे रक्षण करणे बंधनकारक असताना, झाडे तोडणे गंभीर गून्हा असताना, वृक्षारोपणाच्या अगणित योजनांवर अमाप पैसा खर्च झालेला असतानाही आपली जंगले वाढली नाहीत. मोठाली झाडे नसल्याने पर्यावरणीय परिसंस्थेला मोठा धक्का बसला. लहान मोठ्या प्राण्यांचे वस्तीस्थान हिरावले गेले, त्यांचे अन्न नाहीसे झाल्याने ते परागंदा झाले तर कित्येकांचे अक्षरश: उच्चाटन झाले. आता तर प्राण्यांचे उच्चाटन हा शब्द उचारतानाही भिती वाटते. अजूनही अनेकांना प्राण्यांच्या उच्चाटनाचे अजिबात गम्य नाही. आता या जंगलात बिबटे, रानडूक्कर आणि ससे हेच सस्तन प्राणी थोडे फार अस्तित्व टिकवून आहेत. इथे माकडं असल्याची माहिती दीपकने दिली. माकडे असतील तर त्यांना खाण्यासाठी काय? हा प्रश्न विचलीत करून गेला.
fort God in the open air at the base
मन विचलीत करणारे विचारांचे अरण्यरूदन मित्रवर्य दीपकने दाखविलेल्या एका उघड्या स्वरूपातल्या मंदिरामुळे थांबले. तो एक ओबड धोबड सुटे दगड नुसतेच एकमेकास लाऊन तयार झालेला चौथरा. कदाचित पूर्वकाळात तिथे मंदिर असावे. त्याच्या जोत्यावर एक दगडी उठावाची मुर्ती. देव कुठला हे लक्षात येत नाही. ही मुर्ती अलिकडच्या काळातली असू शकते. ती कमालीची झिजलेली. तिच्या समोरचा दिव्याचा दगड मात्र बराच जुना असावा. चांगला सव्वा फुळ व्यासाचा हा गोल दगड आत पणती ठेवण्यासाठी छानसा चौकोन कोरलेला. कुठल्याही देवळात आल्यावर जसं मन शांत होतं तसं ते इथे आल्यावर ते थोडं शांत झालं. दीपकची ही पाचवी पिसोळ दुर्गवारी असल्याने त्याला इथली सर्व माहिती आहे, तो म्हणाला या परिसरात पाण्याची दोन टाकी आहेत. ठिकाण आठवत नाही, पण या क्षणाला नाही सापडली तर परतताना शोधू.
stupendous work where mountain was cut as if a piece of bread ...
पिसोळची खाच इथून आमचे लक्ष आडव्या पसरलेल्या पिसोळ दुर्गाच्या विस्तीर्ण डोंगर पसार्‍यावर खिळले. समोर एक मोठी खाच दिसत होती. ही खाच म्हणजे डोंगराची सलग धार कापून पिसोळचा बेल्याच्या डोंगराकडून येणार्‍या वाटेशी असलेला संपर्क तोडण्यासाठी केलेला खटाटोप. दीपकने सांगितले, विस्तीर्ण अशा डेरमाळ किल्ल्याला डोंगराची सलग धार पिसोळ दुर्गाशी जोडते. जणू काही राजगड ते तोरण्याला जोडणार्‍या डोंगरधारे सारखा हा प्रकार. वर गेल्यावर खाचेच्या भव्यतेचा अंदाज येईल, असे तो म्हणाला. इथे घाणेरीचे प्रचंड रान माजलेले. घाणेरी म्हणजे विदेशातून आपल्याकडे आलेले सुंदर फुलांचे एक काटेरी झुडूप. अगदी दहा पंधरा फुटा पर्यंत ते वाढते. या फुलांवर वेगवेगळे किटक येतात आणि त्यांचे परागीभवन वेगाने घडून त्यांचा अफाट प्रसार होतो. आपल्यापैकी अनेकांनी बालपणी घाणेरीचे मिरीच्या आकाराचे पक्व झालेले काळे गोड मणी खाल्ले असतील. कोरड्या शुष्क घाणेरीच्या जंगलातून वाट काढणे म्हणजे एक प्रकारचे दिव्य. आता आमच्या समोर पिसोळच्या डाव्या बाजूची घळ दिसत होती. त्या घळीची चढण बर्‍यापैकी भासत होती आणि सावली अगदी तुरळक. त्यातून आमचा गडमाध्यावर पोहोचण्याचा मार्ग जात होता.
first water cistern at the foot hill...
second water cistern at the foot hill...
देवळा पासून पुढच्या पाच मिनीटात आम्हाला दोन टाक्यांचं दर्शन घडली. सह्याद्रीत एखाद्या डोंगरावर किल्ला असल्याचे ते व्यवच्छेदक लक्षण मानला जाते. जुना पायरी मार्ग, अस्तित्वात असलेले किंवा त्याच्या खाणा खुणा शिल्लक असलेले तटबुरूज, दरवाजे आणि घरांची व कचेर्‍यांची जोती म्हणजे किल्ला हे समिकरण. अर्थात अशा किल्ल्यांचे ऐतिहासिक उल्लेख कुठे ना कुठे आढळतात, तेही तितकेच महत्वाचे. ही दोन्ही पाण्याची टाकी एकमेकांना खेटून आहेत. त्यांचा आकार मोठा आहे. सुबक पद्धतीने दगडात आयाताकृती कोरून त्यात पावसाचे पाणी साठविण्याचे नियोजन केलेले. यातील एक टाके एका बाजूने उघडे झाले असून त्यात वरून मोठ्या शिळा कोसळल्याने त्याची एक बाजूची भिंत फुटली असावी. टाक्यात भरपूर गाळ असावा. एक टाके बर्‍यापैकी पाण्याने भरलेले तर दुसरे अर्धेमूर्धे रिकामे. त्यात गाळ आणि हिरवे शैवाळ साठलेले. त्यातले पाणी अर्थात पिण्याच्या योग्यतेचे नाही. प्राण्यासाठी मात्र त्याचा भरपूर उपयोग होत असावा. दर्दी भटक्यांना पाण्याचे टाके म्हणजे इतिहासात डोकावणयाची संधी. त्याआनंदाच्या भरात आम्ही पुढे चालत गेलो ते कळलेच नाही. आता पाऊलवाट संपली आणि थोडे खालच्या बाजूला पाण्याचा आटलेला ओघ लागला. तिथून पुढे डोंगरधारेची चढण. समोर एका गुहेच्या समोर काही लाल भगवे झेंडे दिसत होते. याचा अर्थ कुठली तरी गडदेवता त्यात असावी. आपण वाट चुकलो आहोत, पण या गुहे्च्या जवळून वर जाण्याचा प्रयत्न करता येईल, अशी माहिती दीपकने दिली. ती वाट भरपूर घसार्‍याची वाटत असल्याने एवढ्या उन्हात शरिराची उर्जा घालविण्यात काही अर्थ नव्हता. मग दीपक म्हणाला आपण असेच अनगड वाटेने वर चढून मुख्य वाटेला लागू. ही अनघड वाट घाणेरीच्या काट्यांनी भरलेली होती. शिवाय तिचा घसाराही बराच दिसत होता. चाळीस एक फुटाचा हा टप्पा आम्ही पार करण्याचे ठरवले. दीपकने कोयता आणला होता. पण त्याने कोरडी ठक्क घाणेरी तोडता येईना. डोंगर परिसरात राहणार्‍या गिरीजनांना त्याची सवय असते, त्या वेगाने आपल्याला झुडपे साफ करता येत नाही. अर्ध्या वाटेत जाणवले की, आम्ही खाली असतानाच टाक्या जवळ परत फिरलो असतो तर सहज सोपी वाट गवसली असती. आमची त्या लहानशा झुडपांशी वीस मिनीटे झटापट चालली तेव्हा कुठे मुख्य वाट गवसली. मुख्य वाटेवर खालून दिसणारे हिरवे झाड हे चिंचेचे झाड होते. त्याच्या सावलीत थोडी विश्रांती न घेण्याचा विचार करणे या घडीला पाप ठरले असते. इथे एक एक फळ आणि थोडे पाणी घेतले. वरच्या टप्प्यात जुन्या दरवाजाचे अवशेष दृष्टीस पडले. त्याने अंगातला उत्साह द्विगूणित झाला. चिंचेच्या वर दोन आणखी मोठी निष्पर्ण झाडे लागली तर समोरच्या कड्यात भक्कमपण ठाण मांडून बसलेला खडक पायर दृष्टीस पडला. चिंचेच्या खाली समोरच्या बाजूला एक वडाचे झाड दिसत होते. त्यावर असंख्य पक्षी किलबिलाट करताना दिसले. या जंगलाला मोठ्या झाडांची केवढी गरज आहे आणि इथे आहेत की ती नाहीत किंवा अगदीच तुरळक.
the Dermal gate of Pisol fort
सुरूवातीला तीन दरवाजे...? खालून दिसणारे ते बांधकाम चौकीच्या लहान दरवाजाचे असावे आणि त्याच्या बाजूला तटबंदी. बांधकाम फार जुने नसावे. साधारपणे पेशवाईत त्याची डागडूजी केलेली असावी. या बांधकामाच्या पुढे आणखी एक मोठे बांधकाम दिसले. एक मोठी तट भिंतच. त्यात दरवाजाही असावा असा दीपकने अंदाज व्यक्त केला. इथे चुकामुक झाली आणि समोरच्या डोंगरधारेची वाट धरली तर पुढे डोंगरकड्यातला एक बुरूज लागेल. तिथे ती वाट संपते. हा चढण व घसार्‍याचा धोकादायक भाग. त्यामुळे स्पष्ट मळलेली वाट लक्षात ठेवण्याची त्याने सूचना केली. इथून वरची वाट सोडून तो, माझ्या मागे ये म्हणाला. मागे त्याने पिसोळ ते डेरमाळ ही डोंगर धारेची भटकंती केली, त्यावेळी त्यांना पिसोळ गडावरचे डेरमाळ प्रवेशद्वार लागले होते. मुख्य वाटेच्या अगदीच जवळ असले तरी अनेकांना हे ठिकाण सापडत नाही. पिसोळचा डेरमाळ दरवाजा पूर्णपणे ध्वस्त झालेला नाही. त्याला लागून अर्धगोलाकार बुरूज आहे. आणि त्याच्या आत पाण्याची दोन भव्य गुहा टाकी सुबकपणे खोदलेली. पावसाचे पाणी साठविण्यासाठी डोंगरकड्यावरून एक प्रकारची नळी आत वळविण्यात आलेली. दराजाच्या आतील बाजूस एक चौकी पहार्‍याची खोली अजूनही चांगल्या स्थितीत आहे. दरवाजावर आता खडकपायर वृक्षाने ताबा घेतला आहे. त्यातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला राजगडावरच्या आळू दरवाजाच्या परिसराची आठवण होऊ शकते. डेरमाळ प्रवेशद्वार पाहून आम्ही तडक माघारी फिरलो. वरच्या भागात आणखी एक बुरूज लागला. याच्या तळाला एक गोल छिद्र असलेला दगड दिसला. या बुरूजाला वळसा मारून एक पायर्‍यांची वाट वरच्या बाजूला जाते. तिच्या दोन्ही बाजूंस दगडांची तटबंदी तयार केलेली. हे दगड चुन्याने न सांधता नुसतेच एकमेकांवर रचून ठेवलेले तरीही त्यांची रचना इतकी अचूक की, शेकडो वर्षे त्यांचा आकार टिकून राहिला. या वाटेच्या समोर डोंगर काहीसा आडवा होतो, त्याच्यावर एका मोठ्या पडक्या बुरूजाचे अवशेष तर डाव्या बाजुला महादरवाजाचे भग्न अवशेष. महादरवाजेची मुख्य वाट खालून वर येताना दिसली. जी आता वापरात नसल्याने खालच्या बाजूने वर येताना लक्षात येत नाही.
महादरवाजाची डावी तटभिंत चुन्याने पक्की केलेली. भटकंतीचा रंग आता खर्‍या अर्थाने चढू लागला. पुढच्या पाच मिनीटात समोरच्या बाजुला रांगेत पाच लेणी कोरल्याचे बघायला मिळाले. पिसोळ दुर्ग इतका वैभव संपन्न आहे हे पाहून मनस्वी आनंद होत होता. दीपकने माहिती दिली की, ती सर्व गुहा टाकी आहेत. त्यात पाणी असून समोर नंदी दिसतो त्यातले पाणी पिण्यायोग्य आहे. एक सोपा कातळ टप्पा चढून आपण या गुहा टाक्यांपाशी येते. ही सर्व टाकी आतल्या बाजूने चौकोनी खिडक्या कोरून एकमेकांना जोडलेली. आता यातल्या पाण्याचा वापर नसल्याने आत दगड माती पडलेली तर पाण्यावर हिरव्या शैवाळाचे तवंग. हे पाणी पिण्या योग्य नसल्याचे जाणवले. दीपक म्हणाला वरच्या बाजूला सुंदरसे पाणी मिळेल. इथे सोबत आणलेले पाणी पिऊ. गुहे समोर नंदी असला तरी आत शिवलिंग दिसत नव्हते. पाण्यात शिवलिंग बुडालेले असेल की नंदी अन्य कुठून आणून येथे ठेवलेला याचा उलगडा होऊ शकला नाही. बागलाणचे इतहास अभ्यासक रोहित जाधव यांनी मात्र, नंदी समोरच्या गहा टाक्यात शिवलिंग असल्याची माहिती दिली.
the nandi...there must be shivlinga submerged in the cistern
गुहा टाकी पाहून पुढची चढण सुरू केली तर वाटेवर आडबाजूला पडलेला एक कळसाकृती दगड दिसला. त्यालाही पणती ठेवण्यासाठी कमानदार खोबण कोरलेली. शेवचा टप्पा आला असे वाटत असताना आसमंत ढगांनी झाकोळला आणि सूर्य गायब झाला. त्याने उष्मा अधिकच वाढला. आता आम्ही शेवटच्या टप्प्यावर दाखल झालो. इथे दोन विशाल टाक्यांनी आमचे स्वागत केले. त्यातल्या एका टाक्यातले पाणी चांगले स्वच्छ जाणवत होते. हे दोन्ही टाके खुप मोठ्या आकाराचे. त्याच्या वरच्या बाजूला एक छानसा काटेसावर वृक्ष फुलेला दिसता. तर समोरच्या माळावर एका रांगेत लाल फुलं असलेली अनेक झाडे दिसली. आम्हाला कचेरीचा सुबक दरवाजा बघायचा होता. त्यामुळे झाडांचा मोह टाळून आम्ही डोंगरात कारलेल्या अनगड पायर्‍यांनी कचेरीच्या दरवाजाकडे प्रस्थान केले. तिथे जमिनीत खोदलेले आणखी एक टाके दिसले.
the Kachari darwaja
कचेरीचा दरवाजा अगदी लांबूनच आपले देखणे रूप लेऊन उभा होता. त्याचा निम्मा भाग हा दगड रचून बंद केलेला असल्याने त्यातून आत प्रवेश करता येत नाही. दीपक आणि प्रल्हाद शिंदे सरांनी मागच्या वर्षी या दरवाजाच्या भोवतालची काटेरी झुडपे काही ग्रामस्तांना मदतीला घेऊन स्वच्छ केली होती. त्यामुळे अगदीच लपलेल्या दशेतला हा दरवाजा मोकळा झाला होता. त्यावेळी त्यांच्या सोबत गावचे सरपंच पवार हे देखिल हजर होते. या दरवाजाला दोन सुबक नक्षीदार कोनाडे असून त्याच्या खाली देखणी नक्षी पट्टी कोरली आहे. उजव्या बाजूने काहीशी अवघड चढाई करून आम्ही आत दाखल झालो. कचेरीच्या मागच्या बाजुला दगडाच्या भिंतीवर एका मोठ्या खडकपायर वृक्षाने खोड वाढवून पूर्ण ताबा घेतलेला आढळला. कचेरीच्या दरवाजातून डेरमाळ आणि बेल्याचा डोंगर तसेच पिसोळ किल्ल्याचा माळ अतिशय देखणा दिसत होता. समोरच्या बाजूला एक जुनी इमारत दिस होती. त्योवर भगवा झेंडा डौलाने फडकत होता. या इमारतीकडे जाताना मुसलमान शैलीतल्या बांधकामाची लक्षणे दृष्टीस पडली. कमानी कमानीचे बांधकाम आणि समोर एक कोनाडा. नक्कीच इथे मुसलमान सैनिक व अधिकारी नमाज अदा करत असतील. आता मात्र तिथे गणपतीची मुर्ती, वीरांच्या समाधी समोर दिसतात तशी दोन दगडात कोरेली पावले आणि आणखी एक देवीची मुर्ती दिसली. या मुर्त्यांवरून इथे पूर्वी मंदिर असावे अशी शक्यता वाटते.
wherein I exhibit my love in the cheapest way...
जुन्या बांधकामाच्या मागील बाजूस तटबंदीचे अवशेष दृष्टीस पडतात. हा लांबचा फेरा टाळून आम्ही दक्षिणी बुरूज तथा दोन हनूमानाच्या मुर्ती बघण्यासाठी खालच्या दिशेने प्रस्थान केले. त्या पडक्या बूरूजावरून आता वाडी पिसोळ गावचा परिसर छान न्याहाळता येत होता. खालच्या बाजूस आम्हाला येताना लागलेली पाण्याची दोन टाकी इथून दिसत होती तर डेरमाळ दरवाजाच्या अलीकडे डोंगरकड्यात खोदलेली आणखी दोन टाकी दिसत होती. पिसोळ दुर्ग म्हणजे पाण्याच्या टाक्यांनी संपन्न असल्याची प्रचिती येत होती. आल्या वाटेकडे उतरताना आम्हाला खुल्या मैदानात दोन मारूतीच्या मुर्ती दृष्टीस पडल्या. या मारूतीच्या हातात गदा नसून त्याची शेपटीही दिसत नव्हती. दोन्ही हात जोडलेल्या अवस्थेत असून चेहेर्‍यावर मिशी आहे. ही मूर्ती मधोमद भेदली गेली आहे. तिला पूर्णपणे शेंदूर लाण्यात आलेला आहे. तिच्या समोरचा दगड हा एखाद्या गदा सारखा भासतो. तो पूर्ण नसावा, त्याचा केवळ तुकडा शिल्लक असावा. याच्या मागच्या बाजूच्या मुर्तीचेही तसेच. तिला शेपटी नाही की, हातात गदा नाही. ही मुर्ती काहीशी गणपतीची वाटली. अगदी खुल्या माळावर या दोन मुर्ती उघड्यावर असून गावची मंडळी गडावर आल्यावर त्यांना शेंदूर लावतात व त्यांची पूजा अर्चा करतात. याच्या मागे छानसा काटेसावर फुलला होता. तर त्याच्या मागे पांढरी अर्थात कहांडळ पूर्ण बहरला होता.
the protector God...he dose not need any protection...No! he need only  your love and faith
गडमाथ्यावर दाखल झाल्यावर जी दोन टाकी लागली तिथून आम्ही लाल फुले फुललेल्या माळावर दाखल झालो. या परिसरात काही हिरवी झाडे आणि लाल फुलोर्‍याची बरीच झाडे ओळीने उभी दिली. जवळ जाऊन पाहिले तर छाती धडधडत होती. सावर वृक्ष नव्या वर्षांच्या आगमानापूर्वी फुलतो खरा, पण एकाच वेळी तीस पस्तीस सावर फुललेले. त्याचा पायथा पिवळ्या धम्मक गवताचा तर बेमोसमी पावसाची वर्दी घेऊन आलेले निळसर आकाश. या तिन रंगांच्या संगतीने डोळ्याचे पारणे फेडले. सह्याद्रीत आजवर असे दृष्य कधीही पहायला मिळाले नव्हते. अगदी भानन हरपून पहात रहावे असे ते दृष्य. दुपारच्या रटरट उन्हातही तिथून पाय निघता निघत नव्हता. सावरीच्या जोडीला कहाडळ पूर्ण बहरलेला. ही दोन्ही झाडे एकही पान नाही पण फुलांचा पूर्ण बहर अशा अजोड सौंदर्याची धनी. या परिसरात पाण्याची काही मोठी टाकी असल्याने येथे झाडांना मुबलक पाणी मिळते म्हणून किल्ल्याचा हा भाग हिरवा भासाते अशी पुस्ती दीपकने जोडली.
have I entered into a painting...
आता गडावरचे उन पेटले होते. सावरीच्या रानाने नकळतपणे गायतोंडेच्या चित्रमयी दूनियेचा आभास घडविला. जणू त्याच्या चित्रातले एखादे गुढ उकलावे तसा अमुर्ततेकडून मुर्ततेकडे जाणारा मनाचा प्रवास. समोरच्या बेल्याच्या डोंगराच्या दिशेने चालत गेले की, डोंगरवाट संपते आणि थेट ६०-६५ फुटाचा उभा कडा खाली कोसळती. ही तीच खाच जी खालून दिसत होती. याठिकाणी पिसोळला डेरमाळ डोंगलाला जाडणार्‍या धारेपासून तोडण्यासाठी हा इतका प्रचंड डोंगरकडा फोडून काढलाय. शिवाय तो तासून गुळगूळीत केल्याने शत्रू सैन्याला तो लांघता येऊ नये असा दुर्घट करण्यात आलाय. शिवाय वरच्या बाजूला तटभिंतीत मोठी निरीक्षण खिडकी बसवण्यात आली आहे. त्यात एखादी तोफही बसवता येऊ शकती इतकी ती चौसोपी. या खाचेच्या मागच्या बाजूला मांगी तुंगी आणि त्या पाठचा तांबोळ्या डोंगर धुसर वातावरणातही ओळखू येत होते. थक्क करून सोडणारे खाचेचे बांधकाम पाहून आम्ही लालभडक काटेसावरास वळसा मारून डोंगराचे दुसरे टोक गाठले. इथून खालचे दीघावत गाव दिसत होते. तर समोर साक्रीचा परिसर. आम्ही इथून सहजगत्या धुळे जिल्ह्यातील गावे बघू शकत होतो. थोडे पुढे गेल्यावर पाण्याचे आणखी एक चौसोपी विशाल टाके लागले. त्याच्या कडेला कहांडळची तीन झाडे पूर्ण वाढ झालेली. त्यांचा बहर ऐन जोमात आलेला. याच्या मागच्या बाजुला पाणी पिण्या जोगे स्वच्छ पाण्याचे टाके असल्याची माहिती दीपकने दिली. या दोन टाक्यांच्या मधोमद दोन काटेसावरीची झाडे लालभडक फुलांनी लगडलेली होती. पाणी पिण्याचे शुद्ध टाके अगदीच आडबाजूला लपलेले. त्याच्यावर खडक पायवर उगवलेला तर त्याची मुळे चक्क पाणी पिण्यासाठी आसूसलेली भासत होती. टाक्याचे पाणी अतिशय स्वच्छ व थंडगार. अंग भाजणार्‍या उन्हात विश्रामासाठी इतकी सुंदर जागा दुसरी असू शकत नाही. इथे वीस मिनीटांची विश्रांती घेऊन आम्ही परतीची वाट धरली. वाटेत दोन ठिकाणी जोती लागली. एका जोत्यात दोन नाचणारे गरूड आणि त्यांच्या पायात साप असे उठेवाचे अतिशय देखणे शिल्प आढळले. एका अर्धवट फुटक्या शिळेवर छानसे शिवलिंग कोरले होते. तर बाजूला आणखी एक नक्षीदार दगड. पुढचे जोते काहीसे लहान. कदाचित तिथे मंदिर असावे. हा नजारा नजरेत साठवून आम्ही घळीच्या मुखाशी येऊन पोहोचलो. समोरच्या झाडावर माकडांची टोळी दृष्टीस पडली. फळे नाही, परतू त्यांच्यासाठी या परिसरात काही मोजक्या झाडांचा पाने आहार म्हणून उपयोगात येत असावी. शिवाय गडावर असलेले विपूल प्रमाणेतले पाणी त्यांच्यासाठी आसरा. या गडावर केवळ पडके अवशेष असल्याने आणि संपूर्ण गडपरिसर घरड्या मार्गाचा बराचसा निष्पर्ण असल्याने पर्यटकांची पावले येथे फारशी वळत नाही. तेच इथल्या थोड्या फार प्रमाणावर तग धरून राहिलेल्या वन्यजीवांसाठी फायद्याचे ठरत आहे. या गडाचा चुकून जर विकास केला आणि वर पर्यंत क्रुत्रिम वाट बांधून काढली तर यावर केवळ अर्धा टक्का उरलेली झाडे व त्यावरचे अत्यंत मोजके प्राणी जीवन धोक्यात येईल.
the Kandhal bloom with Dermal at the far end
उतरण्याची वाट भरपूर घसार्‍याची व सुट्या दगड मुरमाची असल्याने काळजीपूर्वक पावले टाकत आम्ही एक एक टप्पा पार करत होतो. ध्यानी मनी असतांना केलेली ही भटकंती आता शेवटाला पोहचतहोती. एकतर मित्रवर्य दीपक पवारला त्याच्या मोतोश्रींना घ्यायला जायचे होते सटाण्या जवळच्या निताण्याला त्यासाठी आम्ही शुक्रवारचा दिवस मुकर्रर केला होता म्हणजे दोन दिवस मुक्कामी जायचे, एकोणीस किल्ल्यांची माला परिधान केलेल्या बांगलाण प्रांतात किमान तीन किल्ले पदरात पाडायचे, जे दीपकचे अगोदरच पाहून झाले आहेत पण 'माझे' झालेले नाही असे निवडायचे...असा या भटकंतीतला त्याचा उदात्त हेतू... माझ्यावर अचानकपणे एका सेंद्रीय कृषी प्रदर्शनात स्टॉल लावण्याची जबाबदारी येऊन पडली. गृहमंत्रालयाचा आदेश धुडकावणे आवाक्याबाहेर होते, त्यामुळे दीपकने मोठ्या मनाने हा बेत पुढे ढकलला. आता आम्ही रविवारी रात्री निघायचे ठरवले, वडाखेलला मुक्काम ठोकून, पहाटे लवकर न्हावी रतनगगड करायचा सहा सात तास धरले तरी बाराच्या आत शिखरमाथा गाठवून घाली परतण्याजोगा कार्यक्रम होता. तिथून लागोलाग वाडी पिसोळ गाठायचे. दुपारच्या जवणाची भानगड न ठेवतो फळे अल्पोपाहरावर निभावून न्यायचे. किल्ले पिसोळची चढाई करायची. या परिसरात बिबट्यांचे साम्राज्य असल्याने अंधार पडण्याच्या आत पायथा गाठायचा...हा कार्यक्रम अगदी हातात असल्यासारखा. रविवारी मला प्रदर्शनाची आवराआवर करण्यात ११ वाजून गेले. मग आम्ही शेवटचा पर्याय म्हणजे सोमवारी सकाळी लवकर निघून पिसोळचा बेत ठरवला. उन्हाची रखरख वाढल्याने, 'भास्कररावांचा कोप होणार की कृपा, हे सर्वस्वी प्रारब्धावर अवलंबून. वाटेतच दिवस भराचे इंधन भरून घ्यायचे, असा विचार करून सोग्रस फाट्यावर भरपेट नाष्ता हाणून घेतला. जोडीला फळे आणि निर्जलीकरणाची मात्रा म्हणून नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे, ओआरएस नामक भुकटी सोबत घेऊन ठेवली.
we would have done every bit to save or review this tree - @ kersane, Satana
it is not at all a development if you cut such large trees... @ Vinchur Prakasha highway, near Satana
विचूर - प्रकाशा राज्य मार्ग क्रमांक ७ वर सटाण्या पासून पुढच्या टप्प्यात रस्त्याच्या नुतनीकरणाचे व मजबूतीकरणाचे काम सुरू असल्याने संपुर्ण रस्ता फोडलेला. एक मार्गिका बांधून तयार असली तरी सिमेंट कॉक्रिट स्थिर व्हावे यास्तव ती अजून सुरू करण्यात आली नव्हती. सटाण्याजवळ काही विशाल झाडे तोडल्याचे पाहून दु:ख झाले. अशी फार फार मोठ मोठाली झाडे गाव कुसातही तोडल्याचे पाहून, या कमी / मध्यम पावसाच्या प्रदेशात लोकांना झाडांचे महत्वच नाही का', असा उद्‌वीग्न प्रश्न पडला. करंजाड येथे जुन्या महादेव मंदिराच्या प्रांगणातला एक भला मोठा पिंपळच तोडून टाकलेला आढळून आला. तिथल्या काकांनी सांगितले, ''तो निम्मा वाळला होता, शिवाय त्याच्या फांद्या इतक्या पुढे आल्या होत्या की, त्या रस्ता झाकोळून टाकत होत्या, त्यांचा वीजेच्या तारांना धोका पोहोचला असता म्हणून मग झाड तोडण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला''. येतानाचा हा प्रवास गड उतरनाना डोळ्यासमोर तरळून गेला. दीपकने आता पावले उचलायला हवी, निताण्याला आईला घेऊन नासिक लवकर गाठायला हवे याची जाणिव करून दिली. आम्ही पायथ्याला पोहोचलो आणि वातावरणाने अचानकपणे कुस बदलली. आमची निताण्याला जाण्याची धावपळ सुरू झाली. निताणे गाठेस्तोवर आम्हाला पावसाच्या टपोर्‍या थेंबांनी गाठले. निताण्यात खांदेशचा मान असलेली गरमागरम खिचडी, उडदाचे पापड आणि नागलीचे पापड असा बेत आमच्या समोर पेश केला गेला. इतकी दमदार भटकंती झाली त्यावर असा फक्कड बेत म्हणजे नामी उतारा. पोटाची भूख शमली होती. पिसोळ गडाचे नाव कसे पडले असावे, या संदर्भात काही लेखकांची रंजक माहिती वाचनात आली ती म्हणजे १७०४च्या सुमारास वाईचा सूभेदार सूर्याची पिसाळ देशमूख यास पिसोळसह बागलाण परिसरातील काही किल्ल्यांची जहागीर मिळाली. त्याचा भाऊ जीवाजी हा नंदिमाळचा किल्लेदार म्हणून नियूक्त झाला. त्याच्यावरून पायथ्याच्या वाडीचे नाव वाडी पिसोळ व किल्ल्याचे नाव पिसोळ किल्ला असे काही लेखकांचे म्हणणे आहे. अर्थात ही माहिती किती खरी किती खोटी हे कळू शकले नाही. इतिहासाची पाने चाळताना पिसोळच्या संदर्भात जुना उल्लेख हा देवगिरीच्या यादवांशी जोडल्याचे आढळते. १३व्या शतका पर्यंत यादवांची बागलाण परिसरावर सत्ता होती. त्यामुळे पिसोळ डेरमाळ सह परिसरातील किल्ले त्यांच्या ताब्यात असावेत असा कयास मांडला जातो. तेराव्या शतकात देवगिरीचे राज्य अस्तंगत पावल्यानंतर बागलाण प्रदेश बागुल वंशीय राजांच्या ताब्यात आला. त्यात बागुल राजे पिसोळ गडासह बागलाणातील विविध गडांवर राहत असल्याचे मत अभ्यासक व्यक्त करतात. गवळी राजांच्या शासनकाळात पिसोळवर मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाल्याचे सांगितले जाते. एक मात्र नक्की गडाची भटकंती जशी महत्वाची तशीच इतिहासाची मुशिफिरीही महत्वाची. आता टोलेजंग डेरमाळच्या भटकंतीचे वेध लागलेत. बघूया तो योग केव्हा जूळून येता ते... ।।जय हो।। भटकंतीच्या पाऊलखुणा, ६.३.२०२२
old rock cut water storage system
this deity resemble with the one laying in the open air...
fort Pisol from Wadi Pisol village
steep climb with scree 
this banyan tree nested lots of birds in this arid jungle
the Gunja arrow to lead the way...
the entry gate and baston long view
Ye dosti Hum Nahi Choodege...
water cisterne near the Dermal gate...why do they get dry
it gives me immense pleasure if I could serve you a bit...
no big trees even at the foot hills...?
What a Horror picture: mountains in the sahyadris have lost there tree cover completely
where roots come to drink...
the Nrutya mayur with serpent in there beak
the dried water tank of Pisol fort
he must have served with delicacies over the years...
I will face all hardships to be a part the painting of nature...








Sahyadri Trekkers & Bloogers



No comments:

Post a Comment