Saturday, March 23, 2019

Mahuli: Sahaji's secret capital


माहुली: गुप्त राजधानी

ब्लॉगमध्ये वाचा...
- माहुलीची रविवारीय भटकंती
- शहाजींचे युद्ध
- शिवाजींचे युद्ध
आपल्या माथ्यावर सुळक्यांची मालिका बाळगणारा सह्याद्रीतला लक्षवेधी डोंगर म्हणजे माहुली, त्यामुळेच महाराष्ट्राच्या गिर्यारोहकांचे तो एक आवडीचे ठिकाण आहे. या किल्ल्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची दुर्गमता. निसर्गत: अतिशय दुर्घट अशा वाटांमुळे स्वराज्य संकल्पक शहाजी राजांचा तो आवडता किल्ला होता. जिजाबाई आणि बाल शिवाजींसह त्यांनी न केवळ या किल्ल्यावर वास्तव्य केले, काही काळ या किल्ल्याचा वापर गुप्त राजधानी म्हणून केला.
प्रत्यक्षात शहाजीराजे आणि शिवाजी महाराजांना जबर पराभवाचे तोंड दाखविणारा माहुली किल्ला सोळाव्या शतकात राजकीय उलथापालथींचे महत्वाचे ठिकाण ठरला होता.
काही अभ्यासकांच्या मते हा किल्ला मुघलांनी बांधला तर काहींच्या मते तो निझामशहीत बांधला गेला. किल्ल्याच्या बांधकामांवर मात्र हिन्दू पद्धतीचे शिल्प कोरलेले आढळतात. इथल्या बांधकामाच्या खुणा शिलाहार राजवटीतल्या असल्याची काही पुरातत्व अभ्यसकांची धारणा आहे. भटकंतीसाठी माहुली आजही तितकाच दुर्घट आहे. 'कल्याण, सोपारा बंदरावरील मालाची वाहतूक दक्षिण व उत्तर भारत, तसेच मध्य आशिया पर्यंत खुष्कीच्या मार्गाने करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय व्यापार, उदीमास चालना देणार्‍या सातवाहन, शीलाहारांच्या राजवटीत मोक्याच्या व्यापार मार्गावर निसर्गत: बळकट संरक्षण लाभलेल्या माहुलीवर किल्ला बांधला जाणे स्वाभाविक गोष्ट ठरते', याबाबतचे पुरावे नसले तरी संकेतांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, शेवटी काळाच्या उदरात गडप झालेले पुरावे शोधले तर ते सापडतील, ते शोधणे हेच आपले कर्तव्य आहे. या किल्ल्यावर भटकंतीचा सर्वोत्तम हंगाम पावसाळ्यातलk. आम्हाला योग आला तो मार्च महिन्याच्या रखरखीत उन्हाळ्यात. किल्ले माहुलीवर केलेल्या रविवारीय भटकंतीचा वृत्तांत...

या ब्लॉगमध्ये माहुलीच्या वाटेचे भौतिक वर्णन आणि दुसर्‍या भागात या परिसरात घडलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहाजी व शिवाजी महाराजांच्या काळातल्या राजकीय घडामोडींचा वेध घेण्यात आला आहे. त्यासाठी काही ऐतिहासिक साहित्य, लेख, व्याख्याने व दूरचित्रवाणी मालिकांचा आधार घेण्यात आला आहे.  पर्यावरणच्या अंगाने माहुली जंगलपरिसरातील घडोमोडीचा वेध घेण्यात आला आहे...


३ ‍मार्च २०१९
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर जवळचा माहुलीचा डोंगर लक्षवेधी ठरतो तो त्याच्या सुळक्यांमुळे. पावसाळ्यात या डोंगराला ढगांचा सतत वेढा असतो, महामार्गावरून जाता येता हा नजारा कधीच चुकू नये असे वाटते. ढगांनी वेढलेली माहुलीची शिखरे नी त्यातून उंच मान करून डोकावणारे सुळके म्हणजे मोठे मनोहारी दृष्य असते.

जानेवारीचा महिना सरला की थंडीचा जोर ओसरू लागतो, ऊन्हाचे चटके उत्तरोत्तर वाढू लागतात. सह्याद्रीत भटकंती करण्यासाठी सगळ्यात जिकीरीचा हंगाम तोंडावर येण्याचा हा सुमार.  मार्च महिन्याचा पूर्वार्ध म्हणजे उन्हाचा प्रकोप वाढण्याच्या आत जमेल तितकी सह्या भटकंती करून घ्यावी, 'मनामध्ये अपूरे राहिलेले बेत' उरकण्यचा हा काळ, त्यास अनुसरून सद्या अनेक ठिकाणी डोंगर भटकंतीच्या आणि दुर्गभेटीच्या योजना शिगेला पोहोचल्या असताना, '३ एप्रिल रविवारचा दिवस आहे,  माहुलीला जायचे का?', हिमालयातील रूपीन पास ट्रेकसाठी सह्याद्रीत सरावाचे ट्रेक करणार्‍या नाशिकच्या ट्रेकसोल्स संस्थेच्या डॉ. पारस पणेरने आमंत्रण दिले. वेळेच्या दृष्टीने हा परवडणारा सौदा होता. आजवर आमच्यासाठी माहुली हे प्रकरण अक्षम्यपणे  दुर्लक्षित राहिले होते. शहाजी राजांना हा गड इतका सुरक्षित का वाटायचा, या प्रश्नाचे ढग त्याला भेट दिल्या नंतर काहीसे दूर होऊ शकतील असा विचार करून माहुलीवर लगेच शिक्कामोर्तब करण्यात आले.

माहूलीच्या भटकंतीसाठी निघण्याच्या आदल्या  रात्री अचानक आमच्या दोन्ही कन्या गार्गी व मैत्रेयी यांनी ट्रेकला येण्यात रस दाखवला. मैत्रेयीची नववीची वार्षिक परिक्षा अगदी तोंडावर असताना आणि गार्गीची अकरावीची रितसर सुरू असतानाही सौभाग्यवती नम्रताने दोघींनाही ट्रेकची परवानगी दिली? हे मात्र माझ्यासाठी एक कोडेच आहे.  पहाटे ४-०० वाजता प्रस्थान करायचे आहे, तेव्हा दुपारच्या जेवणासाठीची भाजी-पोळी रात्रीच बनवून देतेस का? अशी नम्रताला विचारणा केली. तिने वांगे-बटाट्याची सुकी भाजी, पोळ्या, हिरव्या मिरचीचा ठेचा रात्री दिड वाजता बनवून ठेवला.  इलेक्ट्रॉल पावडरची तीन पाकिटे, गुळ शेंगदाण्याच्या चिक्क्या, प्रत्येकी ३ लिटर पाणी, बाटल्या असा जामानिमा प्रत्येकाच्या पाठपिशव्यात भरून आम्ही, किल्ले माहुलीसाठी सज्ज झालो. गार्गी,  मैत्रेयी सोबत सद्या आमच्याकडेच शिक्षणासाठी राहणारी नम्रताची भाची रिमा ही तिच्या ऑप्थेलमोच्या सवंगड्यांना घेऊन ट्रेकमध्ये सामिल झाली. यातील एक मुलगी आणि तिन मुले असे चार जण प्रथमच भटकंतीवर येत होते.

पहाटे अडीच वाजता मोबाईल फोनच्या घंटीने जाग आणली. सगळ्यांना उठवून यथावकाश तयारी करत आमचे आणखी एक सवंगडी डॉ. संजय गुंजाळ यांना घेऊन पारस पणेरांचे घर गाठले. सव्वा चारच्या सुमारास आमचे शहापूरकडे प्रस्थान झाले. गार्गी-मैत्रेयी-रिमा व त्यांचे सवंगडी एका कारने मागून निघाले तर तिकडे मुंबईवरून शैलेश राव, भागवत उगले, डॉ. प्रसन्ना महाजन व त्यांचा मुलगा मलय हे आम्हाला शहापूर जवळ येऊन भेटणार होते.


नाशिक ते आसनगाव व तिथून माहुलीचा पायथा म्हणजे साधारण सव्वाशे किलो मिटरचा प्रवास. त्यासाठी घोटीजवळ १२० रूपये पथकर बसला. पथकर आकारणीमुळे हा महामार्ग वाहनाने प्रवास करण्याच्या दृष्टीने फारच सोयीचा झाला आहे, अन्यथा वीस बावीस वर्षांपूर्वीचे दिवस आठवतात. तेव्हा मुंबईच्या दिशेचा असो की आग्र्याच्या दिशेचा, प्रवासाचा प्रत्येक मिटर जणू खड्यांनी भरलेला असायचा, वाहन चालकांची मोठी कसोटी त्यावर लागे. तसे काही आता घडत नाही, तरी देखिल नविन गाडी खरेदी करतेवेळी भरमसाठ रस्ता कर आकारला जातोच, असे असतानाही प्रत्येक प्रवासाच्या वेळी वेगळा पथकर म्हणजे एक न उलगडणारे कोडेच आहे. त्यातही तुमच्या शहर किंवा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातली भटकंती असेल तर पथकराची खिशाला मोठी चाट बसते. जवळच्या अंतरासाठी कमी पथकराचा एखादा पर्याय असायला हवा होता.
माहुली गावात जाण्यासाठी महामार्ग नेमका कोणत्या ठिकाणहून सोडायचा हे बघण्यासाठी आमची एक गाडी आसनगाव जवळ रस्त्याखालून जाणार्‍या मार्गाजवळ उभी ठाकली. मिट्ट काळोखात हे वळण चटकन लक्षात येण्यासारखे नाही. नाशिक आणि मुंबई अशा दोन्ही बाजूंनी एक एक वाहन आमच्यात सामिल होणार असल्याने त्या गाड्यांची वाट बघण्यात अर्धा तास गेला पण त्याने, 'गाड्यांची चुकामुक होणार नाही', हे निश्चीत झाले.
नाशिकहून येताना आम्हाला आसनगावहून माहुलीकडे जाण्यासाठी उजवूकडून वळण घ्यावे लागते. महामागार्वरची भर्धाव वाहने समोरून येतात त्यामुळे हे वळण अडचणीचे व खासे धोकादायक ठरते. त्या ऐवजी आसनगाव पुलाच्या पुढे डावीकडे वळण घेऊन महामार्गा खालच्या भूमिगत रस्त्याने जाणे सोपे व सुरक्षित ठरते, पुढे नेलेल्या गाडी मुळे ते साध्य झाले.
नाशिकची गाडी आम्हाला येऊन मिळाली तेव्हा तांबडं फुटलं होतं. औद्योगिक कारखान्यातून जाणार्‍या रस्त्यावर ठिकठिकाणी मानस मंदिराच्या पाट्या दिसतात. मानस मंदिराकडे जाणारा रस्ता उजवीकडे ठेऊन समोरची वाट माहुलीत घेऊन जाते. इथून आपण दाट झाडी झाडोर्‍याच्या ठिकाणात जात असल्याची चाहुल लागते. माहूलीत पोहेचेपर्यंत मुंबईकर भटकेही येऊन दाखल झाले. आज आमचा वाटाड्या होता कृष्णा आगिवले यांचा मुलगा रघुनाथ.
महामार्गावर इतक्या सकाळी चांगला नाष्ता मिळण्याची शक्यता नाही, त्यापेक्षा स्थानिकांकडे ताजा नाष्ता मिळेल असा विचार करून आम्ही आसनगाव जवळ थांबलो असतानाच आगिवलेंनाच चहा नाष्ता बनवण्यासाठी फोनवरून कळविले, त्यांनी आम्ही पोहोचे पर्यंत पोहे बनवून ठेवले. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकलेले गरमागरम पोहे मनसोक्त मिळाल्याने अंगात तरतरी आली.


सकाळी ७-३६:
वनखात्याच्या तपासणी कार्यालयाजवळ पोहोचलो. तिथेच आमच्या गाड्या उभ्या करण्यास जागा मिळाली. प्रत्येकी २० रूपये या दराने आम्ही तिकीट घेतले. प्रथमच ट्रेकवर येत असलेल्या आमच्यातल्या एकाने पुढे होऊन तिकीटे घेतली. '१३ जणांचे २६०/- रूपये होतात खरे, तुम्ही अडीचशेच द्या', असे त्याला सांगण्यात आले. पावती घेऊन अजिबात न घुटमळता आम्ही गडाच्या वाटेला लागलो. या ठिकाणी वनविभागाने एक स्वच्छता गृह बनवले आहे, त्याला उजवीकडे ठेऊन गडाकडे जाणारी वाट आहे.

थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला पावती दोनशेचीच मिळाली हे लक्षात आले. काश्मीरात पुलवामा येथे ४० भारतीय जवानांची दहशतवाद्यांनी हत्या केल्याने प्रतिउत्तरादाखल भारतीय सैन्यदलाने थेट पाकिस्तानात घुसून अतिरेकी तळ उधवस्त केले. या घटनेला पंधरवडा उलटत आला होता, तेव्हा पासून भारतात राष्ट्रभावना अधिकच तिव्र बनली. त्यावरून संपूर्ण देशात सद्या देशसेवेचे वारे वाहत आहेत. 'तुम्ही बहुतांशी जण सीमेवर लढायला जाऊ शकत नाही, तथापी इमानदारीने वागा, कायद्याचा सन्मान करा, फार काय, नुसता कचरा जरी इस्तता पसरवला नाही तरी ती देशसेवाच ठरेल', काश्मीरात पाकिस्तान व दहशतवाद विरोधी कारवाई दरम्यान हेलिकॉप्टर विमानाच्या अपघातात वीरमरण आलेल्या नाशिकच्या विजय मांडवगणे यांच्या पत्नी विजेता यांची प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेली प्रतिक्रीया आणि एकुणच देशभरात राष्ट्रभावनचे विचार बळकट होत असताना चिरीमिरीचा प्रकार बघून 'त्या खाकी वर्दीची' किव वाटली.


भारंगीचे उगम
माहुली किल्ल्यावर भारंगी नदीचा उगम होतो. ही नदी पूर्व दिशेला वाहते, भातसई नदीची ती उपनदी आहे. भातसई नदी ही ठाणे जिल्ह्यातील महत्वाची नदी आहे. हिला भातसा असेही म्हणतात. या नदीचा उगम कसारा घाटात घाटनदेवी, उंटदरी येथे होतो. भातसा नदीला चोरणा नदी, भारंगी नदी भुमरी नदी आणि कुंभेरी नदी या उपनद्या येऊन मिळतात. त्यांतल्या चोरणा आणि भातसा या नद्यांच्या संगमावर बांधलेल्या धरणाला भातसा धरण म्हणतात. ह्या धरणातून मुंबईला पाणी पुरवठा होतो आणि वीज निर्मितीही होते. पुढे ही नदी आंबिवली येथे काळू नदीला येऊन मिळते.
भारंगी नदीवर पूर्व बाजूला माहुलीचा प्रसिद्ध धबधबा आहे. पावसाळ्यात पर्यटकांना माहुली परिसराची भूरळ पडते. अनेकजण या धबधब्याला भेट देतात. गेल्या काही वर्षात या धबधब्यावर अनेक जण बुडून मरण पावलेत, त्यामुळे पावसाळ्यात माहुली धबधब्याकडे जाण्याच्या वाटा जिल्हा प्रशासनाच्या वतिने बंद करण्यात येतात. या धबधब्यात मृत्यू पावलेल्या माणसांचा आकडे पन्नासाच्या घरात पोहोचल्याची माहिती स्थानिकांसोबत केलेल्या चर्चोतून मिळाली.

आजच्या भटकंतीत काही नवोदित मंडळी सहभागी झाली होती, त्यामुळे डॉ. प्रसन्ना महाजन यांनी त्यांना भटकंतीचे मुलभूत तत्व समजावून, संघभावना, एकमेकांस मदत, जंगलातल्या वृक्ष, वेली व तमाम वन्यजीव संपदेला कुठलीच बाधा पोहोचणार नाही या विषयी काळजी घेण्याच्या सूचना केल्या. या जंगलात चुकामुक होऊ शकते, त्यामुळे जास्त मागे राहू नका, पाने फुले तोडू नका, सोबत आणलेल्या कुठल्याच वस्तू किंवा खाण्याच्या पदार्थांची वेष्टने, रिकामी पाकिटे कुठेही न टाकता सोबतच्या पिशवितच टाका, अधून मधून थोडे थोडे पाणी पीत रहा, अशा काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या. ७:४३ वाजता आमची चढाई सुरू झाली.


वनखात्याने आसपासचे दगड गोळा करून त्यांची पायर्‍यांसारखी रचना केली आहे. ही ढोबळ पायर्‍यांची वाट माहुली किल्ल्यावर घेऊन जाते. काही ठिकाणी जिथे अशा पायर्‍या रचणे शक्य नाही, तिथे वाटेच्या दुतर्फा लहान दगडांच्या रेषा मार्ग भरकटू देत नाहीत. सुरूवातीच्या टप्प्यात वनखात्याने ग्लास फायबरमध्ये चित्ता, तरस, मोर आदी काही प्राण्यांच्या प्रतिकृती बनविल्या आहेत. तर मार्गावर अनेक ठिकाणी अडीच ते तीन इंच व्यासाच्या लोखंडी गॅलव्हनाई्ज्ड पाईपचे कठडे बसवले आहेत. हेतू हा असावा की, या कठड्यांमुळे लोक अवघड कड्यांवरून खाली पडू नयेत. महाराष्ट्रात कित्येक गडकिल्ल्यांवर वनखात्याने अशाच प्रकारचे संरक्षक कठडे बसवून आपल्या 'दुर्गपर्यटन प्रेमाची' साक्ष दिली आहे. त्यातुन त्यांना चांगल्या उत्प्नाचीही आशा आहे, ती कितपत सफल ठरली हे सांगण्यासाठी कुण्या कुडमुड्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. अशा संरक्षक कठड्यांनी माहुली किल्ल्याच्या सगळ्याच दुर्घट वाटा पर्यटकांसाठी सुरक्षित करण्याचा हा कथित प्रयत्न. प्रत्यक्षात हे कठडे सह्याद्रीतल्या वातावरणात फार कळ तग धरत नाहीत व कित्येक ठिकाणी तर अगदी अनावश्यकच आहेत. असाच प्रकार हा डोंगर कड्यांवर बसविलेल्या लोखंडी शिड्यांचा. जिथे आवश्यकता नाही अशा या शिड्या, कठडे ही अल्पकाळ टिकणारी कामे म्हणजे जनतेच्या करातून येणार्‍या पैशावर अनेक ठिकाणी अक्षरश: घाला ठरली आहेत. अशी कामे करताना वनखाते तज्ज्ञ मंडळींकडून माहिती घेत असावी असे अजिबात वाटत नाही. आम्ही जसजसे वर जात होतो तसतसे लोखंडी रेलींग लावून ठेवल्याचे दिसत होते.


तानसा अभयारण्य
हा सगळा परिसर तानसा अभयारण्याचा भाग आहे, त्यामुळे येथे झाडे उत्तम प्रकारे राखली गेली आहेत. मार्चची सुरूवात असली तरी डोंगर पायथ्याला झाडांच्या पानांची गळ झाल्याने अवघे जंगल वाळलेल्या पाला पोचोळ्याने आच्छादित झाले आहे. सागाची मोठमोठी पाने, त्यातून चालताना होणारा करऽऽ करऽऽ आवाज, सकाळची कोवळी उन्ह, झाडांमधून येणारी सूर्य किरणांची तिरीप, त्यात ही पानझड आपल्याला जंगलाच्या वेगळ्या दुनियेत घेऊन जाते.




जस जसे आपण वर जाऊ तसतसे पानांची प्रकार, आकार व रंग बदलतात. मधल्या टप्प्यावर हाताच्या पंजापेक्षा मोठ्या लांबीची पाने त्यांना फिकट निळसर व लालसर छटा. चालताना अपघ्यात त्यांच्याकडे लक्ष गेले तर चमकदार संमिश्र रंगांची जादू मोहून टाकते; त्यावरून परावर्तीत होणारा प्रकाश म्हणजे जिवंत नक्षीचा हा खेळ थांबून थांबून बघण्यात मन हरखून जाते. मग अचानक जाणीव होते, उन्ह वाढणार, सतत चढण आहे, थांबायचे नाही, पाय उचलत रहायचे...पाय उचलत रहायचे!
येथे गवतही उत्तम राखले गेले आहे. याचाच अर्थ किमान या टप्प्यात तरी चराईची जनावरे नाहीत, त्यामुळेच गवताच्या आश्रयाने उमलणार्‍या जीवसृष्टीचे अधून मधून दर्शन घडते.

आता आठ वाजले होते, पण उन्हाचा चटका स्पष्टपणे जाणवत होता. तोच समोरच्या नवरा, नवरी, भटोबा, करंगळी या सुळक्यांचे समोरासमोर दर्शन घडले. दाट झाडीतून थोडे बाहेर पडून समोरच्या डोंगरांचे आता स्पष्ट दर्शन होत होते. 'मध्यभागी आहे तो माहुलीचा किल्ला, त्याच्या डाव्या बाजुला भांडारदूर्ग आणि उजव्या बाजुला पळसगड, आगिवलेंनी माहिती दिली. 'म्हणजे सगळे सुळके हे भांडारदूर्गावर आहेत तर', या प्रश्नावर आगिवलेंनी सांगितले की, खरे तर तो भांडारदूर्गाचाच भाग गणला जातो पण तो आहे चंदेरीचा डोंगर. त्यावर जाण्यासाठी भांडारदूर्गावरून वाट नाही. त्याची वाट पूर्णपणे वेगळी आहे. चंदेरीवर कातळातील बांधकामे,पाण्याची पुरातन टाकी आहेत का? यावर रघुनाथने, असे कोणतेही अवशेष वर नाहीत', असे स्पष्ट केले. आजवर माझा असा समज होता की, माहुली हा तिन किल्ल्यांचा समुह आहे, या तिन किल्ल्यांचे डोंगरमाथे पुर्णपणे वेगळे आहेत आणि याला जोडूनच चौथा डोंगर तो चंदेरी...माहुलीचा किल्ला म्हणजे एक प्रकारे चार डोकीच!
वणवा: सह्याद्रीत सद्या उन्हाळ्यात सर्वत्र दिसणारे भयचित्र.

माहुलच्या जंगलात वणव्याच्या आगीत बेचिराख झालेला वृक्ष...

माहुलीच्या जंगलात अनेक रानकेळी आहेत...वणव्याने ती अक्षरश: होरपळून काढली...

वणव्यात वृक्षांसोबत कित्येक किटक, पक्षी, त्यांची घरटी, अंडी, झाडे, वेली नष्ट झाली असतील याचा सुमार नाही...

वणव्याच्या खुणा
वीस बावीस मिनीटांच्या चालीनंतर थोडी सपाटी लागते, इथून एक चिंचोळीवाट माहुलीच्या डोंगराला भिडते. या ठिकाणी सह्याद्रीतले काळीज चर्रर करणारे दृष्य बघायला मिळाले - वणवा! संरक्षित जंगलातही वणवा लावण्याची बुद्धी कुठला आसूरी आनंद मिळवून देत असावी? हे न कळे! उजव्या बाजुच्या जंगलात गवताचा सगळा पट्टा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे बघायला मिळाले. किल्ल्यावर जाणार्‍या लोकांची या वाटेवरून अखंड ये जा सूरू असते, त्यामुळे डावीकडचे गवत सुरक्षित ठेवण्यासाठी या वाटेनेच आगपट्ट्याचे काम केले. गवतासोबतच अनेक वृक्षांचा कोळसा झालेला बघायला मिळाला. यात पक्षांची घरटी, कित्येक किटक, त्यांची अंडी, झाडे व गवताच्या बिया जळून नष्ट झाल्या असतील त्याचा सुमार नाही.
उन्हाची काहिली जाणवू लागल्याने चाल तशी बेताचीच होती. पंधरा मिनीटे चालल्यानंतर पुन्हा सुटे दगड रचलेल्या पायर्‍या लागल्या. या सुट्ट्या दगडात काही घडवलेले जुने बांधकामाचे दगड दिसत होते. अर्थातच हे दगड पायर्‍यांचे नसुन, 'किल्ल्यावरच्याच कुठल्या तरी बांधकामाचे असावे', हे जाणवत होते.

८:२१
डोंगर दरीचे दृष्य बघण्यासाठी महामार्गावर किंवा पर्यटन स्थळी डोंगराच्या काठाला लोखंडी पाईपचे रेलिंग लाऊन एक प्रकारचे सुरक्षित क्षेत्र केले जाते तसा हा टप्पा. येथे पाण्याचा पहिला अवकाश घेतला. येथून पुढची वाट पुन्हा उजवीकडून वर नेते. माहुलीचा डोंगर अजूनही समोरच्या बाजुला दिसत होता, म्हणजे अजून बरीच पायपीट करावी लागणार होती. याठिकाणीही वणव्याच्या आणखी खुणा दिसत होत्या. रानकेळीचे बुंधेच्या बुंधे या वणव्याने जाळून टाकले होते. काही बुंध्यात अजूनही जीव असल्याने पावसाळ्यात ते पुन्हा जीव धरतील असा आशावाद रघुनाथने व्यक्त केला तेव्हा जरा हायसे वाटले.

मोबाईल फोनमध्ये ८:३३ वाजले होते आणि समोर एक मोठा आठवा खडक दिसत होता. त्याला डाव्या बाजुने वळसा घालून वर जायचे होते. इथून थोड्या उभ्या चढणीने वर गेल्यानंतर दक्षिण बाजुच्या दरीच्या दृष्याने स्तब्ध केले. लहान मोठ्या टेकड्या नी डोंगर सगळ्यांना धुक्याने वेढले होते व त्यातून त्यांचे माथे डोकावत होते. उन्हाची रखरख, निष्पर्ण झाडींचे जंगल तेव्हा वातावरणात धुंदपणा निर्माण करणारे धुके कुठून येणार? पण आज भर ऊन्हातही धुके दिसत होते, तेही फक्त आग्नेय बाजुच्या काही डोंगर टेकड्यांवर. या अनेक टेकड्यांच्या समुहाच्या पायथ्याला एकाच वेळी अनेक ठिकाणी शेतजमिन भाजण्यासाठी पाला, पाचोळा गवत तर जाळले नसेल ना? अशी शंका वाटली. पण हे धुकेच असावे, असे वाटले. महाशिवरात्रीला कडाक्यांची थंडी पडते. काही वेळेला सूर्य वर आल्यावर सुद्धा थंडीचा कडाका वाढल्याचे यापूर्वी अनेकदा अनूभवला आहे, तसाच हा प्रकार असावा, त्यामुळेच धुके तयार झाले असावे.

संरक्षक कठडे
डोंगराची धार आता काहीशी उभी होत होती व या ठिकाणी सुरक्षेसाठी लोखंडी कठडे बसविल्याचे बघायला मिळाले. या ठिकाणहून चंदेरीचे सुळके आणखी जवळ भासत होते. या वाटेवर रस्त्याच्या मधोमध उभे असलेल्या एका मोठ्या वृक्षाची कटाई करण्यात आल्याचे बघायला मिळाले. आता धार अधिक वर चढत जाऊन माहुलीच्या डोंगराला भिडते. दोन्ही बाजुला दरी आणि मधून निसरडी, चिंचोळी दगडावरची ही वाट फार बिकट नसली तरी चालून येणारा शत्रु थोपविण्यासाठी खाशी उपयोगाची. त्याच्या थोडं पुढे पुन्हा ही वाट माहुलीला भिडणार्‍या धारेच्या पोटातून डावीकडून सरकते. येथे दरीच्या बाजुचा उतार तिव्र होतो. उजवीकडे नव्वदच्या अंशात वळण घेऊन एका खुप लहानशा खिंडीतून ही वाट पश्चिमेकडे जाते, हे ठिकाणही युद्धाच्या प्रसंगात गडावर चालू येणार्‍यांसाठी मोठी तापदायक ठरणार हे नक्की.  येथून पळसगड बरोबर उजवीकडे राहतो, त्याची दक्षिण बाजू ही नाखिंदा किंवा नागेश्वरच्या डोंगराच्या कातळाला जसा गवताच्या साज दिसतो त्या प्रभाणे भासते.

गलोलीच्या आकाराच्या या लहानशा खिंडीतून पूर्व बाजूला एक छोटी धार टेहाळणीसाठी खाशी उपयोगाची शिवाय त्याधारेच्या वरून खालच्या बाजुने चालून येणार्‍या गनिमांवर मारा करण्यासाठी अगदी योग्य. माहुलीच्या डोंगराला जोडणारी डोंगरधार आता खुपच चिंचोळी होते व तिच्या दोन्ही बाजुला तिव्र उताराच्या दरीने ती खुपच दुर्घट बनते. या ठिकाणी लोखंडी रेलींग बसविल्याने जणू पुलावरून चालल्याचा आभास होतो. दाट धुके आणि कमी दृष्यमानता असताना येथून जाणार्‍यांना सुरक्षा मिळावी यासाठी हा भाग सुरक्षित केला असावा.


आता समोर माहुलीची तटबंदी दृष्टीपथात आली. नागमोडी वळणाच्या या वाटेवर चार ठिकाणी कातळटप्पे आहेत. युद्दकाळात ते ओलांडून पुढे जाणे म्हणजे कर्मकठिण ठरत असावेत. हा भाग तोफांच्या मार्‍यात येऊ शकत नाही व येथे जवळ पास तोफा आणण्यासाठी जागा नाही, त्यामुळे फार कमी संख्या असलेले सैनिक या वाटा लढवून किल्ल्याचे रक्षण करू शकतात अशी निसर्गत: स्थिती.

९:४५
पावणे दोन तासांच्या पायपीटींनंतर एकदाचे आम्ही माहुली किल्ल्याच्या अंतिम टप्प्याजवळ येऊन दाखल झालो. एका झाडाखाली थोडी विश्रांती घेतल्यानंतर वरचा पंधरा एक फुटाचा कातळ टप्पा पार केला. याभागातला दगड अगदी भुसभूशीत असून चिंचोळ्या वाटा वालूकामय आहे. उन्हाळ्यात त्याने मोठा घसारा तयार होतो.

लोखंडी शिडी
दगडी तटबंदीला लोखंडी शिडी लावली आहे. हा कातळ टप्पा उभी चढणीचा, त्याच्या वरच्या भागात लोखंडी शिडी, ती नसती तरी हाता पायांनी काही सोपे आधार घेत वर जाणे फार अवघड नव्हते. अगदी सत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकालाही येथून वर चढता येऊ शकले असते. थोडक्यात काय तर शिडी लाऊन चढाईचे थोडे फार आव्हान सुद्धा शिल्लक ठेवण्यात आलेले नाही.
सह्याद्रीतल्या डोंगराचे गडपण दाखवतात ते कातळातल्या पायर्‍या, तटबंद्या नी दरवाजे. येथे भली मोठ तटबंदी, 'माहूलीवर तुमचे स्वागत आहे', असे सांगत होती. या तटबंदीच्या उजव्या भागाला एकावर एक ठेवावे असा भलामोठा कातळकडे पुढे आला आहे, जणू निसर्गाने गडाच्या रक्षणासाठी बांधलेला उभा बुरूजच. त्यावर भगवा झेंडा डौलाने फडकत होता. या तटावरून आणखी एक छोटी चढण पार केली, आता माहुलीच्या वरच्या सपाटीला लागलो. बारीक बुंध्यांच्या कमी उंचीच्या झाडांचे जंगल याठिकाणी भर उन्हात जणू आमच्या स्वागताला हिरवा साज चढवून सज्ज होते. इथून पूर्व बाजूली बघितल्यानंतर समजते माहुलीचा किल्ला इतका दुर्गम का होता ते. ठाणे जिल्ह्यातला सर्वाधिक उंचीचा हा डोंगर चहुबाजुंनी उभ्या कातळकड्यांनी निसर्गता संरक्षित आहे. अनेक चढ असलेली, तीन ठिकाणी वळण घेणारी, वरच्या बाजुला पातळ झालेली डोंगरधारेची वाट पूर्व बाजूने मुख्य डोंगराला जोडते. चाल करून येणार्‍या शत्रुला यथे थोपवले तरी गड राखला जाऊ शकतो.
माथ्यावर मुख्य सपाटीला लागल्यावर सर्वत्र खुरटे, लहान झाडांचे हरित जंगल लागते. हे जंगल म्हणजे एक भुलभलैय्या. त्याच्या पायवाटा खडबडीत दगडाच्या. पर्यटक वाट चूकू नये यासाठी काही ठिकाणी लहान गोलसर सुट्ट्या दगडांच्या रेघा तयार करण्यात आल्या आहेत, त्यामुळे मुळ वाट सोडून भरकटण्याची चिंता राहत नाही.

माहुलीवर पाण्याचे दुभिक्ष आहे...वरच्या पठारावर हे एकमात्र कोतळखोदीव टाके स्वच्छ करून पिण्यायोग्य राखणे...त्यात जरा सुद्धा घाण होणार नाही याची काळजी घेण्या इतकी शूचिता आपल्या पर्यटकात केव्हा येईल...

एका नागमोडी वळणानंतर थोड्या उतारावर डाव्यू बाजूला कातळात खोदलेले पाण्याचे टाके लागते, यातले पाणी खुपच गढूळ आहे. या टाक्यातला गाळ अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय काळजीपूर्वक रित्या काढून त्यात काही पुरातत्वीय अवशेष, बांगड्या, कौल, जुन्या विटशंचे अवशेष नष्ट होणार नाहीत या बेताने काढला आणि त्यावर शाकारणी केली तर गड भेटीसाठी येणार्‍यांना पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय होऊ शकेल. येथून पुढे वाय आकाराची वाट लागते, म्हणजे आपण पूर्व बाजूने येतो तेव्हा उजवी वाट महादरवाजाकडे घेऊन जाते तर डावी वाट ही भांडारदूर्गाकडे घेऊन जाते. आम्ही अगोदर डाव्या बाजूने पुढे निघालो म्हणजे शक्य तितकी गड फेरी करता येऊ शकते या विचाराने.
वरचा सगळा परिसर विस्तीर्ण असला तरी तिथे मोठी सपाटी कुठेच आढळली नाही. पाळीव प्राण्यांच्या खुणा आढळल्या नाहीत. याचा अर्थ डोंगर माथ्यावर पाळीव जनावर आणण्याकरिता सोयीच्या वाटा नाहीत, इतकी या डोंगराची दुर्गमता आहे. दक्षिण बाजुला वळसा घेणार्‍या वाटेवर दोन सतीशिळा दृष्टीस पडतात, त्या कोणाच्या आहेत या संबीधी माहिती मिळत नाही. त्याच्या थोडं पुढे दगडचा एक लहान चौथरा असून त्यावर एखाद्या स्तंभा सारखा मध्यम उंचीचा चौकोनी चिरा आहे. त्यावर चिन्ह किंवा अक्षरे कोरल्याचे दिसत नाही.
राजसदर: येथे शहाजी राजे, जिजाबाई, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी वास्तव्य केलेयं.

राजसदर
सहा सात फुटाच्या दाटीवाटीच्या कारवीतून आपली वाट जाऊन पोहोचते ती थेट राजसदरेवर. तीस फुट लांब व रूंद अशा घडवलेल्या कातळ चिर्‍यांचे ऐसपैस उंचीचे जोते शिल्लक असून त्यावर दक्षिण बाजुला मंदिरा सारखे काही तरी रचून ठेवले आहे. मुळ इमारतीचा केवळ चौथराच शिल्लक असून त्याच्या भिंती, छत, दालनांचे कोणतेही दगड येथे दिसून आले नाही. एका फ्लेक्सच्या फलकावर, पुण्य राजसदर, शहाजी राजे, जिजाऊ, शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण', अशी अक्षरे त्यावर छापली आहेत. राजसदरेच्या पलिकडे आणखी काही जुन्या बांधकामाचे चौथरे दिसतेत. हा परिसर दाट झुडपांचा असून इथल्या पायवाटा चिंचोळ्या व दगड मातीच्या आहेत. गडावर पर्यटकांचा सतत राबता असल्याने त्या खाशा मळल्या आहेत.
राजसदरेपासून अवघ्य काही मिनीटावर भग्न दशेतले मंदिर आहे. या मंदिराच्या तीन भिंती काहीशा टिकून आहेत, समोरची बाजू पुर्ण मोकळी आहे. येथे शिवलिंग असून तेही भग्न स्थितीत आहे. इतर काही मुर्त्या व चिन्ह कोरलेली आहेत. एक चौकोनी शिळा ज्यावर धनुष्य व बाण कोरला असून ती वीरांच्या स्मरर्णार्थ तयार केल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या मधोमध एक मोठे झाड उगवले आहे व भिंतींना गिलावा दिलेला आहे. काही सतीशिळेचे अवशेष येथे ठेवण्यात आले आहेत, जे अर्थातच अन्य कुठून तरी उचलून येथे ठेवण्यात आल्याचे जाणवते. या मंदिराचा एकुण आब पाहता हीच गडाची प्रमुख देवता असावी असे दिसते. या देवास कोणत्या नावाने ओळखले जाते याची माहिती मिळू शकली नाही.
मंदिराच्या समोर भला मोठा तलाव आहे. तो मात्र दगड व गाळाने काठोकाठ भरला असून त्याच्या बाजुच्या भिंती चिर्‍यांनी घडवलेल्या असाव्यात असे वाटते. तलावात फार थोडे पाणी पावसाळ्यात शिल्लक राहत असावे.

हनुमान दरवाजा
तलावाच्या दक्षिण बाजेने पुढे गेल्यानंतर एक मातीची लहान टेकडी आहे. ती चढून गेल्यानंतर त्यावरून डोंगरमाथ्यावरचा मोठा परिसर दृष्टीस पडतो. आम्हाला येथुन हिरवेगर्द जंगल दिसत होते. मागून येणारी काही मंडळी वाट भरकटल्याचे दिसतात आम्ही त्यांना आवाज देऊन दिशादर्शन केले, तेव्हा कुठे ते आमच्या दिशेने येऊन पोहोचले.

हनूमान दरवाजावरची वैशिष्ट्यपूर्ण शिल्प

इथून पूर्व बाजुला पाच दहा मिनीटाच्या चालीनंतर हनूमान दरवाजा लागतो. हनूमान दरवाजाच्या वरच्या बाजुला तटाचे भग्नावशेष असून हनुमान दरवाजा उतरण्याची वाट खुप निसरडी व धोकादायक आहे. या ठिकाणी फार काळजीपूर्वक उतरावे लागते. खालच्या बाजूला उजव्या कड्यावर हनूमान व त्याच्या शेजारी आणखी एक मुर्ती ठाशीवपणे कोरली आहे. हनूमानाच्या हातात छोटी तलवार असून हनूमानाला मिशी दाखविली आहे व गळ्यात एक पानाचे पदकही कोरले आहे. पायाच्या खाली राक्षस कोरला असून डाव्या बाजुला आणखी चार हात असलेला व वरहासारखे शिर असलेला प्राणी कोरला आहे. याच्या गळ्यातही हनूमानाच्या मुर्तीसारखेच पदक कोरण्यात आले आहे. येथे एक गणपती दगडात कोरण्यात आल्याचे माझ्या वाचनात आले होते, परंतू येथे गणपती काही दिसला नाही.
हनूमान दरवाजाचा पूर्ण विध्वंस करण्यात आला आहे. याच्या पायर्‍या व प्रवेशद्वार याच्या खुणा पुसटशा...

समोरचा डोंगर भांडारदूर्ग...

हनूमान दरवाजाच्या खालच्या बाजूला दोन लोखंडी शिड्या आहेत. या शिड्या आर्थातच आजच्या काळातल्या असून त्या उभ्या करून ठेवण्याचे प्रयाजेन काही कळू शकले नाही. पर्यटकांसाठी या शिड्यांनी वर येण्याची सोय केली असेल तर वरचा तिव्र घसारा पाहता ते धोकादायक आहे. नवख्या मंडळींसाठी तर अजिबात सुरक्षित नाही. येथे दरवाजाच्या कमानीचे कोणतेही अवशेष दिसत नाहीत. कातळ पायर्‍याही पूर्णपत: उधवस्त करण्यात आल्या असाव्यात, त्यांचे कोणते नामोनिशाण दिसत नाही. आल्या वाटेने परत जाऊन दक्षिण दिशेला लागायचे पंधरा मिनीटातच आपण माहिलीच्या दक्षिण टोकाला येऊन पोहोचतो.

भांडारदूर्ग
‍‍एक लहानशी खोगिरवाजा खिंड माहुली आणि भांडारदूर्ग या किल्ल्यांना वेगळी करते. उजव्या बाजूने एक सोप्या उताराची वाट खिंडीत घेऊन जाते. या खिंडीत येण्यासाठी दोन्ही बाजूंनी वाटा असाव्यात. कातळाच्या धारेतून चाळीस एक फुटांची सोपी चढण चढून गेल्यानंतर आपण भांडारदूर्गावर पोहोचतो. कातळात हात व पायांसाठी अनेक सोपे नैसर्गिक आधार आहेत तर वरच्या बाजुला कातळात पायर्‍या खोदल्या आहेत. कोणत्याही आरोहण साहित्याशिवाय हा टप्पा सहजपणा पार केला जाऊ शकत असे.  येथेही लोखंडाच्या दोन शिड्या लावल्या आहेत. इथून दक्षिण दिशेकडे पाच मिनीटांच्या अंतरावर माहुली किल्ल्याचे सगळ्यांत सुंदर आकर्षण बघायल मिळते, कल्याण दरवाजा!



कल्याण दरवाजा
हा कल्याण दरवाजा म्हणजे माहुली किल्ल्याची दुर्गम, दुर्घट ओळख. सरळसोट उभ्या कातळात खोदलेल्या पायर्‍या व त्यावर कमानाकार कल्याण दरवाजा. या पायर्‍या अर्थात इंग्रजांनी गडांच्या आश्रयाने बळावत चाललेला भारतीय स्वातंत्र्यसंग्राम चिरडून टाकण्यासाठी सुरुंग, तोफा लाऊन उधवस्त केलेल्या या पायर्‍या वरच्या भागात खड्या चढणीच्या असून त्याच्या वर आणखी एक कमानी दरवाजा आहे. या कल्याण दरवाजातून वर येण्यासाठी पलिकडच्या वांद्रे वस्तीतून किंवा भोरांडे वस्तीतून जाता येते. हा परिसर भिवंडी तालूक्यात मोडतो. येथून वैतरणा धरणातून मुंबई व परिसरालापाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जाते.
खालच्या ध्वस्त कातळ पायर्‍या व जिन्यातून वर आल्यानंतर पुन्हा उभ्या चढणीच्या पायर्‍या असून त्याच्या वरच्या टप्प्यात त्या ध्वस्त करण्यात आल्याने तिथेही आरोहण साहित्याची आवश्यकता भासते. तेथे सद्या एक मोठी बल्ली व दोर बांधण्यात आला असून पुरेसा आत्मविश्वास असेल तर त्यावरून वर येण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
हा वरचा दरवाजाही ध्वस्त स्थितीत आहे, तथापी थोडी जोखिम पत्कारून भांडारदूर्गावरून त्यात विनाआरोहण साहित्य जाता येते. कातळ चिर्‍यांच्या चौकोनी प्रवेश मार्गाने या दरवाजातून उतरता येते. वरच्या टप्प्यातला भाग उधवस्त करण्यात आला आहे व त्याच्या वर काही कातळातल्या पायर्‍या आहेत. येथे एक पुसटशा स्थितीतला देवनागरीतला शिलेलेख आहे तो मात्र आम्हाला बघायला मिळाला नाही. कल्याण दरवाजाचा सगळा भाग अतिशय उताराचा व घसार्‍याचा असल्याने कल्याण दरवाजा हे जपून बघण्याचे प्रकरण आहे.


खांबटाके
कल्याण दरवाजा पासून दहा बारा मिनीटांच्या अंतरावर कातळाच्या पोटात खांबटाके आहे. या टाक्यातले पाणी काहीसे खराब असले तरी मुक्काम करायचा झाल्यास ते गाळून व उकळून पिण्यायोग्य बनविले जाऊ शकते. या खांबटाक्यात मात्र येथे भेट देणार्‍यांनी खुपच घाण करून ठेवली आहे. हल्ली कुठल्याच गडावरच्या पाण्याच्या टाक्याचा रखरखाव ठेवला जात नाही, तशाच पद्धतीने हे खांबटाके देखिल दुर्लक्षित राहिले आहे.
खांबटाक्यापासून दहा मिनीटाच्या अंतरावर भांडारदुर्गाच्या टोका पर्यंत जाता येते. येथून माहुली किल्ल्याचे प्रमुख आकर्षण असलेले सुळखे अगदी जवळून बघण्याचा रोमांच अनूभवता येतो. त्यात सुदूर दक्षिण बाजुला वझिर सुळका तर घळीच्या मध्ये भला मोठा घेर असलेला नवरा व खालच्या बाजुला भटोबा हे सुळके दृष्टीस पडता. या सुळक्यांच्या डोंगरांचे स्वतंत्र अस्वित्व मानले गेले असून त्यास चंदेरीचा डोंगर असे म्हणतात. या चंदेरीवर ऐतिहसिक बांधकामाच्या कोणत्याच खुणा नसून पाण्याची कोणतीच सोय नसल्याची माहिती रघुनाथ आगिवले याने दिली. चंदेरीचे राकट सौंदर्य व त्याच्या आसपासचे नयनरम्य सुळके मनसोक्त बघून ज्या शिड्यांनी आपण भांडारदूर्ग चढलो, त्या पुन्हा उतरून माहुलीवर यायचे. माहुलीच्या पुर्व बाजुच्या कड्याने सुरू झालेला आपला परतीचा प्रवास आता दक्षिण बाजुच्या कड्याने सुरू होतो.

गुढ इमारतीचे...
अर्ध्या तासाच्या चाली नंतर आपल्याला कातळातल्या बांधकामाचे अवशेष दृष्टीस पडता. हा किल्ला बराच काळ मुसलमानी राजवटीत असल्याची साक्ष हे अवशेष देतात, यास नमाजगिरा असे म्हणतात. आदिलशाही, मोगलाईत येथे नमाजपठण केले जात असावे.
सकाळी भरपेट नाष्ता झाला होता, परंतू आता दुपारचे सव्वा वाजत आला होते. सगळ्यांना चांगली भूक लागली होती. काहींच्या कडचे पाणी संपले होते. आता लवकर पाणी मिळावे, जेवणाला बसावे अशी सगळ्यांचीच इच्छा होती.
या ठिकाणहून पळसगडाच्या जंगलात एक भल्या मोठ्या इमारतीचे अवशेष दृष्टीस पडतात. स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार हलक्या सिमेंटच्या चादरींचा वापर करून येथे वन खात्याने विश्रामगृहाची इमारत तयार करून घेतली, तथापी त्याचा कोणताच रखरखाव नसल्याने ती निर्मनुष्य आहे. ही इमारत कोणत्या कारणासाठी बांधली होती, याची माहिती मिळू शकली नाही. जर पर्यटकांसाठी बांधली असेल तर इतक्या दुर्गम ठिकाणी पर्यटकांना कोणत्या सुविधा देण्याची योजना होती? पर्यटक म्हटले की, त्यांना सोयी सुविधा, खानपान आले, काही प्रमाणात नोकरचाकरांची गरज भासते. इतक्या अवघड किल्ल्यावर इतक्या दुर्गम ठिकाणी अशा प्रकारचा खटाटोप खरोखरच धाडसाचे काम ठरते.  वनखात्याने तो खरोखरच केला असेल? यावर विश्वास बसत नाही. एकवेळ ट्रेकर/भटके माहुलीवर मुक्काम करू शकतात, परंतू इतक्या अवघड वाटेने येऊन येथे पर्यटक येऊन मुक्काम करू शकतात? जर ही इमारत अन्य कुठल्या कामासाठी तयार गेली असेल तर मात्र त्याचा रखरखाव ठेवला असता तर बरे झाले असते.


पेयजल दुषित
नमाजगिर्‍याहून पाचच मिनीटात माहुलीच्या दाट झाडीत लपलेला उत्तर गडा दृष्टीपथात आला. खालच्या उतारावर पर्यटक/भटक्यांची बर्‍यापैकी संख्या दिसत होती. कातळातली मोठी बांधकामे येथून दिसत होती. खाली उतरण्याची वाट कच्ची आहे. सुरूवातीलाच एक दगडाच्या चिर्‍यात साकारलेले चौकोनी टाके दिसत होते, त्यात पाण्याचा जिवंतच झरा असल्याने ते भरून वाहत होते. 'माहुली किल्ल्यावर पिण्यासाठी आजमितीला हे एकमात्र सुरक्षित असे टाके आहे', अशी माहिती रघुनाथने दिली. आपले कर्म म्हणजे, बरेच जण दोन अडीच तासांची पायपीट करून माहुली गडावर येतात, त्यांना ठाऊक असते की, पिण्यायोग्य असे हे पाण्याचे टाके आहे, तरी पण तो स्वच्छ ठेवावे अशी कोणतीच भावना नसलेली मंडळी ते स्वच्छ राहील याची कोणतीच खबरदारी घेत नाहीत. या टाक्यात काही लहान मासे आहेत, पाणीही वाहते आहे, पण त्यात बरेच दगड पडले असून पाणी गढूळ दिसते. आम्ही त्यातून दोन तिन बाटल्या भरल्या तोच एका पर्यटकाना पलिकडच्या बाजुला ठेवलेली प्लास्टिकची बादली टाक्यात तशीच बुडवली. या बादलीच्या तळाला बरीच माती लागली होती. सगळे पाणी ढवळून निघाले, महाशय मात्र स्वच्छंदपणे आपले चेहेरा धुण्यात मग्न झाले, जणू काही झालेच नाही अशा बेतात. आमच्या कडे फार इलाज नव्हता.
आमच्यापैकी तिघांकडे घरून आणलेल्या पाण्यापैकी प्रत्येकी एक लिटर पाणी अजून शिल्लक होते, तेव्हा खाली देवडीत उतरून जेवण करू आणि टाक्यातले पाणी स्थिर झाल्यावर त्यातून बाटली भरून घेऊ असे ठरवून आम्ही कातळातल्या प्रशास्त पायर्‍या उतरून देवडीत दाखल झालो. या देवडीचीही कर्मकहाणी आहेच. बरेच जण देवड्यात, पहारेक्यांच्या खोल्यांमध्ये जेवण करतात. तिथे अन्नकण तसेच राहते, ते तसेच टाकून दिले तर त्यावर माशा भिनभिनायला लागतात. या देवड्यात इतक्या माशा होत्या की, आमच्यातली काही मंडळी त्यात गेली तेव्हा या माशा उठल्या. दुरून मधमाशां उठल्या सारखे वाटत होते. त्या बाहेर गेल्यानंतर थोड्याच वेळात परिस्थिती स्थिरस्थावर झाली.


भटकंतीत सगळ्यात मजा असते ती भोजनाची. घरून आणलेल्या जेवणावर ताव मारण्यास खासे सुख ते कोणते! घरून बनवून आणलेल्या वेगवेगळ्या भाज्या, पोळ्या, हिरव्या मिरचीचा ठेचा, लोणचे, काकडी, टोमॅटो अशा पदार्थांबरोबर चिक्या, चकल्या, गुळाचे लाडू अशा मोठी मेजवानी भटकंतीचा सारा शीण घालवणारी ठरते.
भोजन सत्रानंतर अर्धा तास विश्रांती गरजेचे होती. देवड्यात स्वच्छ जागा नसल्याने वर जाऊन झाडाखाली विश्रांती घेण्याचे ठरविण्यात आले. देवड्या व पहारेकर्‍यांच्या खोल्यांचा तळ खडबडीत दगडाचा असून त्यावर बरीच माती आहे. तिचा वापर करणार्‍या पर्यटकांनी त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष न पुरवल्याने त्या जेवणास व विश्रांतीसाठी थांबण्याच्या योग्यतेच्या नाहीत.

महादरवाजा
महाजरवाजाचा परिसर बघून परतीला लागण्याचा निर्णय ट्रेक प्रमुखाने जाहीर केला.  देवड्याच्या पुढेच महादरवाजा आहे. एक भली मोठी कमान, वरचा भाग उध्वस्त अवस्थेत असे हे महादरवाजाचे रूप माहुलीच्या वैभवाची साक्ष देते. डोंगरकड्याचे अखंड कातळ फोडून महाकाय आकाराच्या पायर्‍या आणि दरवाजा कोरण्याचे तंत्रज्ञान अचंभित करणारे आहे. त्याकाळी बांधकामाचे शास्त्र केवढे प्रगत होते याची अनूभूती शेकडो वर्षे मजबुतीने उभे राहिलेल्या या वस्तू देतात.
महादरवाजा सोबतच आजूबाजेची तटबंदी उध्वस्त स्थितीत असून त्यांचे सगळे दगड महादरवाजाच्या समोर पडले आहेत. दोन विशाल गोलाकार बुरूजातून महादरवाजाकडे जाणारी वाट वळण घेते, त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या थेट मार्‍या पासून महादरवाजाचे आपोआप रक्षण होते.


गवसले शरभ शिल्प
सह्याद्रीचे रखवालदार यासंस्थेने शुक्रवार दिनांक२१ एप्रिल २०१७ रोजी माहुली गडाच्या संवर्धनाची मोहीम आयोजित केली होती. १५ जणांच्या चमुने महादरवाजाच्या बुरुजाखालील मातीच्या ढिगातली घाण साफ करून काही दगड हलवले तेव्हा मातीत गाडले गेलेले शरभाचे शिल्प त्यांना सापडले.
सह्याद्रीत अनेक डोंगरांवरच्या बांधकामात शरभाचे शिल्प आढळते. सिंहाचा चेहेरा, पंख, गरूडासारखे रूप जे काही ठिकाणी चीनच्या ड्रॅगन प्रमाणे भासते, या शरभाचे कोडे मात्र अद्याप उलगडलले नाही.
नजिकच्या काळात माहुलीवर गड उत्साव साजरा केला असावा. त्यावेळी लावलेल्या भगव्या पताका जिर्णावस्थेत असून फुलांच्या कोमेजलेल्या माळा उधवस्त तटावर व महादरवाजाचवर तशाच लटकत आहेत. कोणी तरी देव समजून शरभावर हळद उधळून टाकली होती.


घाण दरवाजा
या महादरवाजात खालच्या बाजूने वर येण्यासाठी कातळकोरीव वाट असावी, परंतू ती पुर्णपणे उधवस्थ असल्याने हा मार्ग बंद आहे. पलिकडच्या बाजुला मोठी तटबंदी आहे. तीस चाळीस फुट खोल असलेल्या या परिसरात पर्यटकांनी मोठा कचरा टाकला आहे. हा कचरा अशा ठिकाणी साठला आहे जो दरीत उतरून काढून आणणे अवघड आहे. शिवाय पावसाच्या पाण्या सोबत तो झर्‍यातून वाहत जाऊन उगमालाच पाणी दुषित करणार.
सकाळी आठच्या सुमारास सुरू झालेली पायपीट दोन वाजेपर्यंत तळपत्या उन्हात सुरू असल्याने जेवणानंतर अर्धातास विश्रांती घेण्यासाठी आम्ही स्वच्छ जागा शोधू लागलो. महादरवाजा आणि किल्लेदाराच्या वाड्याच्या परिसराती ती नसल्याने मग वरच्या टापूवर एका मोठ्या झाडाच्या सावलीत विसावा घेऊन ३-०० वाजता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. पळसगड बघायचा राहिला. पुढच्या भेटीत कल्याण दरवाजाने चढाईकरून पळसगड बघायचा या निर्धाराने माहुलीचा निरोप घेण्यात आला.


दुर्ग संवर्धनाच्या वाटा
तसे बघितले तर महादरवाजाच्या वाटाने एखादी भेट घडली तर? हा विचार मात्र साकार होईल असे वाटत नाही. महाराष्ट्रात आजची दुर्गसंवर्धनाची स्थिती पाहता हे अशक्यच वाटते.  माहूलीच काय, आजमितीला अनेक गडांवरच्या प्रमुख वाटांच्या ढिगार्‍यात इतिहासाची काही पाने  दडली आहेत, परंतू या वाटा मोकळ्या करणार कोण? गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी झुंजणार्‍या संस्थांच्या आवाक्यातले ते काम नाही आणि सरकारात ती मानसिकता नाही, ह्याच नव्हे कुठल्याच सरकारने ती आजवर दाखविली नाही.
आता रविवारचा दिवस निम्मा सरला होता, लवकर गड उतरून पाचच्या आत घरी पोहोचण्याचे उद्दीष्ट गाठण्यासारखे होते. त्यामुळे कुटुंबियांसोबत उरल्या सुरल्या रविवारच्या सुटीचे काही क्षण घालवता येणार होते.
आमच्यातले काही नेहमीचे भटके भराभर पावले टाकत पुढे निघाले. मुंबईकरांचा प्रवास थोडा अधिक अंतराचा असल्याने ही मंडळी आता फार कुठे न रेंगाळता वेगाने गड उतरत होती. आमच्या सोबत प्रथमच सहभागी होत असलेल्या नवोदितांच्या अखंड गप्पा सुरू होत्या. मंडळी बरीच मागे राहत होती. ३-२२ वाजती माहुलीला जोडणार्‍या पूर्व धारेलगतच्या तटावर आल्यानंतर जाणवले की, इथून टप्पा आव्हानात्मक आहे, नवख्या मंडळींना सोडून फार पुढे जाण्यात अर्थ नाही. आमच्या सोबतचा पुढे निघालेला चमु आता नजरेच्या आड झाला होता आणि ही मंडळी मात्र मागेच रेंगाळत होती,


त्यामुळे मी चालण्याचा वेग कमी करून त्यांना सारखे पुढे पिटाळत होतो. नंतर जाणवले की, मागची मंडळी वाजवीपेक्षा खुप हळू उतरत आहे. इथल्या कातळ मार्गावर आणि घसार्‍यावर त्यांचा वेग कमी झाला होता. त्यांच्यातील एका मुलीला उतरण्यात अडचणी येत होत्या, त्यामुळे तिच्या सोबत आलेली मंडळी मागे मागे राहत होती. एका कातळटप्प्यावरून खालच्या वालूकामय घसार्‍यावर तिचा पाय घसरला, जोरदार आपटी खाल्ल्याने दोन्ही गुडघ्यांना थोडे खरचटले. भटकंतीतल्या काही मुलभूत गोष्टी डॉ. प्रसन्ना महाजन यांनी सुरूवातीलाच सांगितल्या होत्या, त्या लक्षात ठेऊन तिच्या सहकार्‍यांनी मानसिक धीर देत पायथ्यापर्यंत सहीसलामत उतरविले, गावात पोहचता पोहोचता साडे पाच वाजले. आमच्या अगोदरची मंडळी तासभर अगोदरच पोहोचली होती. मुंबईकर एव्हाना परतीच्या वाटेला लागले होते.


इतिहासात माहुली...
माहुली किल्ला कोणत्या राजवटीत बांधला गेला, या संबंधी इतिहासाच्या अभ्यासकात मतभेद आहेत. माहितीच्या महाजालावर काही उल्लेख खुपच गोंधळात टाकणारे आहेत, जसे की, 'हा किल्ला मुघलांनी निर्माण केला', '१४८५ मध्ये तो निझामशाहीत आला', या स्वरूपाचे उल्लेख ऐतिहासिक आधाराशिवाय वापरणार्‍या लेखकांनी मुघलशाहीचा भारतातला प्रारंभ,  निझामशाही स्थापनेचा काळ जुळतो की नाही याची कोणतीच तपासणी केली नसल्याचे जाणवते.
जुन्नर जवळच्या नाणेघाटात सातवाहनांनी जीवधन किल्ला बांधुन व्यापारास चालना दिली. थळ घाटावर त्रिंगलवाडी सारखा महत्वाचा किल्ला बांधण्यात आला होता तेव्हा सातवाहनांच्या किंवा शिलाहारांच्या कालखंडात माहुलीवर एखादे ठाणे वसविले असावे का? कागदोपत्री तसे पुरावे मिळणे दुरापास्त आहे, तथापी दगड, धातूवरच्या वृत्तांताचा आधार आश्वासक ठरू शकतो पण तीही शक्यता फारच दुर्मिळ, तेव्हा माहुली परिसरात उत्खननातून काही वस्तुंचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न केल्यास त्याने जुन्या राजवटींचा काल ठरवायला मदत होऊ शकते.


माहुली किल्ल्यावर तीन ऐतिहासिक घटना अत्यंत महत्वाच्या ठरतात. त्यातली एक म्हणजे निझामशाहीत माहुली अल्पकाळ का असेना शहाजी महाराजांनी त्याचा गुप्त राजधानी म्हणून वापर केला. दुसरी महत्वाची घटना म्हणजे शहाजी राजांनी माहुली किल्ल्यात घेतलेला आश्रय आणि त्यांचा मुघल आणि आदिलशाह यांच्या संयुक्त फौजांकडून झालेला पराभव. त्यानंतरचा दुसरा मोठा पराभव शिवाजी महाराजांना त्याच्या कारकिर्दीतले यशदायी वर्ष १६७०मध्ये पचवावा लागला, ही या किल्लयावर घडलेली तिसरी महत्वाची ऐतिहासिक घटना. या युद्धात हजारच्या आसपास मावळे कामी आले. आपण येथे या तिन घटनांशी संबंधित ऐतिहासिक घडामोडींचा आढावा घेणार आहोत. त्यासाठी वेगवेगळी पुस्तके, व्याख्याने, दूरचिणवाणी मालिका आणि काही तज्ज्ञ मित्रांच्या सोबत केलेल्या चर्चेतून ही संकलन केलेली माहिती फक्त मी तुमच्या समोर मांडणार आहे.
१२९४ साली अल्लाउद्दीन खिलजीने दख्खनवर स्वारी करून देवगिरीचे साम्राज्य मांडलीक बनवले. १३४७च्या सुमाराला बहामनी साम्राज्य निर्माण झाले. १४००च्या सुमाराला पाच शाह्या या त्याच्या शकलांमधुन निर्माण झाल्या. देवगिरी, विजयनगर, वारंगळ आदी हिदू राजवटी खालसा केल्यानंतर वर्चस्वासाठी या शाह्यामध्ये एकमेकांसोबत लढाया सुरू झाल्या. तालिकोटच्या लढाईत (१५६५) विजयनगरचे गौरवशाली हिन्दू राज्य संपवल्यानंतर मुघल, आदिलशाहा यांनी आकारमानाने लहान असलेल्या निझामशाहीवर लक्ष केंद्रित केले. आपल्या राजकीय आकांशा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्थानिकांमधून मोठ्या प्रमाणावर लष्करात भर्ती केली. शेतकरी, आदिवासी लढवैय्यांचे घोडदळ इथल्या डोंगराळ प्रदेशात दैदिप्यमान कामगिरी बजावू लागले. महाराष्ट्रात जाधव व भोसले ही घराणी स्वतंत्रपणे उदयास आली.
सुमारे तीनशे वर्षे मुसलमानी सत्तांचा दबाव झेलणारा दक्षिण भारत एक प्रकारे सांस्कृतीक धक्क्यात वावरत असताना वेरूळचे सरदार शहाजी भोसले यांच्या मनात स्वराज्य संकल्पना रूंजी घालू लागल. या शाह्यांची सत्ता येथून जावी, स्थानिकांचे राज्य निर्माण व्हावे व रयतेला सुखाचे दिवस यावे असे त्यांना वाटायचे त्यासाठी योग्य संधीची वाट बघत कधी निझाम तर कधी आदिलशाहा तर कधी मुघल अशा आपल्या निष्ठा सतत बदलणारे शहाजीहे पहिले सरदार असावे ज्यांनी न केवळ स्वराज्याचे स्वप्न बघितले, त्या दिशेने त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपली पावले वळविली.
पिता मालोजीराजां प्रमाणेच शहाजी महाराज उत्तम सेनानी होते. त्यांच्यात नेतृत्वगुण होते. विशेष म्हणजे त्यांच्या तलवारीला विजयाची सतत सवय होती. ज्यांनी या भूमीचे स्वातंत्र्य हिरावले त्यांच्यात राहूनच त्यांना स्वराज्याचा डाव मांडायचा होता. प्रबळ मोगलाईत राहून त्याचा फार उपयोग होणार नाही हे त्यांना कळून चुकले असावे, त्यामुळे त्यांनी निझामशाहीकडे आपल्या निष्ठा वाहिल्या. तिथेही योग्य सन्मान होत नाही, असे बघून त्यांनी आदिलशाहीची (१६२५) वाट पकडली.
आदिलशाहा तर्फे त्यांनी महाराष्ट्रात काही लढायाही केल्या. इब्राहीम आदिलशाह जाऊन त्याच्याजागी महंमद आदिलशाह आला. महंमद आदिलशाहचा कल हा मुस्लीमांना अनुकुल व हिन्दूंच्या विरोधात होता. इथे राहून आपला काही फायदा होणार नाही हे शहाजी राजांच्या लक्षात आले त्यामुळे शहाजी राजे पुन्हा निझामशाहीकडे परतले.

दरम्यान १६३२च्या सुमारास देवगिरीच्या किल्ल्यात शहाजीराजांचे सासरे लखुजी जाधवराव व त्यांची मुले अचलोजी, रघोजी आणि यशवंतराव या चौघांचा भरदरबारात खुन झाला...त्यामुळे शहाजीराजांच्या मनात असुरक्षेची भावना निर्माण झाली. ते मोगलांकडे गेले. मोगल तोवर दक्षिणेत आलेच होते. मोगलांकडे असताना
त्यांच्या असे लक्षात आले की निझामशाहीमध्ये पुन्हा संधी मिळतेय. मलिक अंबर गेल्यानंतर फतेहखान सत्तेवर आला, त्याच्यात
दुरदृष्टी नव्हती, औदार्याचा अभाव होता, त्याच्यात उद्यामशीलता नव्हती, त्यामुळे निझामशाहीत वाव मिळतोय हे पाहून १६३३ ते निझामशाहीत पुन्हा परतले. तिथे कोणीच वाली नव्हता. तिथे हुसैन निझाम होता, त्याला फतेह खानाने मुगलांच्या हवाली केले. मुगलांनी त्याला ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैदेत ठेवले. हूसैन निझाम शाहाने दौलताबादचा किल्लाही मोगलांच्या ताब्यात दिला. निझामशाहीला पुन्हा कोणीही वाली राहिला नाही. अशा परिस्थितीत शहाजी राजांनी असं ठरवलं की, निझामशाही कुटुंबातला एक पुत्र मुर्तझा तिसरा याला सिंहासनावर बसवावं. बाल मुर्तझाला ते संगमनेर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर घेऊन गेले तिथून त्यांनी निझामशाहीचा कारभार चालवला. लहानगा मुर्तझा शहाजीराजांच्या मांडीवर बसायचा, त्याला घेऊन ते सिंहासनावर बसायचे.

शहाजींचा सुरतेवर हल्ला
पेमगिरी सुरक्षित नाही याचा अंदाज बांधून त्यांनी निझामशाहची राजधानी गुप्तपणे माहुली किल्ल्यावर हलवली. माहूलीवर जिजाबाई व बालशिवाजी यांना सुरक्षित ठेवणे शक्य होते.
जिजाबाईंना राज्यकारभार पाहण्याचा अनूभव होता, त्यामुळे त्याच सगळा राज्यकारभार सांभाळतील असे त्यांनी नियोजन केले. निझामशाहीची आर्थिक स्थिती खुप बनली होती, त्यासाठी शहाजींनी मुघलांचे आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या सुरतेवर हल्ला चढवून तिथल्या व्यापार्‍यांकडून जबर खंडणी वसूल केली.
या प्रकरणामुळे मुघालांच्या संतापात भर पडली. त्यांना निझामशाही जिंकून दक्षिणत हातपाय पसरायचे होते. अगोदर मलिक अंबर आणि आता शहाजी, यामुळे चाळीस वर्षे ते निझामशाही बुडवू शकले नव्हते. त्यामुळे शहाजहानने महाबतखानाला निझामशाहीवर पाठवला. खान दोरान, शाहीस्तेखान ही मंडळी त्यावेळी महाराष्ट्रात होती.
शहाजी हे प्रकरण आपल्याकडून आटोपत नाही, हे बघून स्वत: १६३५मध्ये स्वत: शहाजहान दक्षिणेत आला. शहाजीराजांचे बंड मोडण्यासाठी शहाजहानला येथे यावे लागले, तो त्यावेळी खडकीला आला. हे शहर मलिक अंबरने स्थापन केलं आहे त्यावेळी त्याचे औरंगाबाद हे नाव नव्हते.
शहाजहानने आपल्या सैन्याचे चार गट केले, शाहीस्तेखानाला त्याने संगमनेर, जुन्नर परिसरावर पाठवले, अलिवर्दीखानाला चांदवड परिसरातले किल्ले घेण्यासाठी पाठवले, १६३६चा तो सुमार, सातमाळा रांगेत सगळीकडे त्यासंबंधीचे शिलालेख सापडतात. खान दौरानला त्याने आदिलशाहीवर पाठवले कारण शहाजीराजांने अप्रत्यक्ष आदिलशाहीची मदत तीच. आदिलशाहीला माहित होते की, हे राज्य गेले तर पुढे आपल्यावरच मोगलांचा रोख राहणार होता.


माहुलीचा पराभव
आदिलशाहाच्या दरबारातला हबशी सरदार रणदुल्ला खान उर्फ रूस्तम जमान, पंडित मुरार जगदेव हे शहाजीराजांना मदत करत होती हे शहाजहानच्या लक्षात आले तेव्हा त्याने त्यांना कडक शब्दात पत्र पाठवले की, तु्म्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. आदिलशाहाने १६३६च्या सुमारास शरण येऊन मोगलांशी करार केला व शहाजी राजे एकटे पडले. मोगालांनी शाहीस्तेखानाला परत बोलावले व खान जमानला पाठवले त्यावेळे त्याने संगमनेर, जुन्नर हा परिसर जिंकून घेतला. मोगल एक एक करून पुढे सरकत होते. शहाजीराजे कुंभा घाटातून दंडाराजपूरीला गेले तिथे सिद्दींची त्यांना मदत मिळू शकली नाही, नाईलाजाने  प्रबळगड, पनवेलहून ते माहुली किल्ल्यावर गेले.
शाहाजी रानांनी माहुलीचा तगडा बंदोबस्त केला तिथे मोगलांनी मोर्चे घातले, रणदुल्ला वेढ्यात सामील झाला, मदत कुठूनच मिळेना अखेर शहाजी राजांनी शरण जाण्याचा निर्णय घेतला. शेवटचा निझाम मुघलांच्या ताब्यात आला तिथून त्याची रवानगी ग्वाल्हेरच्या किल्ल्यात झाली. माहुली किल्ल्यावर मुघल आणि आदिलशाहा यांच्या संयुक्त फौजांकडून पराभव झाल्यानंतर शहाजींना मारण्यात आले नाही अन्यथा या सत्ताधिशांचा इतिहास सुडाचा, खुनाखूनीचा. शहाजींना दोघांकडे जाण्याची संधी होती. त्यांनी आदिलशाहीत जाणे पसंत केले. त्यांची जहागीर कायम ठेवण्यात आली.
इथवर माहुलीच इतिहासातले महत्व आपल्या लक्षात येते. हा काळ म्हणजे मुघल आणि पाच शाह्यांनी शहरांना मजबूत कोट बनवून बळकट भूईकोट किल्ले उभे केले आणि त्यातून राज्यकारभार चालविला. शहाजी राजांनी मातब्बर फौजांना तोंड देण्यासाठी डोंगरी किल्ल्याचे महत्व ओळखले. माहुलीच्या रूपाने त्यांना प्रबळ मुसलमानी सत्तांना टक्कर देऊ शकेल असे नवे युद्धक्षेत्र गवसले होते. बळकट कोंढाण्यानंतर माहुली नावारूपाले आले ते शहाजींमुळेच. त्यानंतर सुमारे पस्तीत वर्षे माहूलीवर म्हणावी तशी हालचाल झाली नाही ती झाली शिवशाहीत.


पुन्हा माहुली...
मुघल आणि आदिलशाहीचे लचके तोडत तोडत दक्षिणेत स्वत:चे राज्य निर्माण करणार्‍या शिवाजींच्या हिंदवी स्वराजाचा बिमोड करण्यासाठी मुघल बादशाह औरंगजेबने हर तर्‍हेचे प्रयत्न केले, परंतू त्यांस माफक असे यश मिळत गेले. पूर्ण विजय त्याच्या नशिबी आलाच नाही, अधिकतर पराभवच.
संपूर्ण भारतात मुघल सत्तेला आव्हान मिळत होते ते महाराष्ट्रातून. शिवाजी महाराजांनी प्रतापगड (१० नोव्हेंबर १६५९) आणि पन्हाळगडाच्या संघर्षात (१२ जुलै १६६०) विराट आदिलशाही मार्‍यासमोर मिळवलेल्या यशानी औरंगजेबचे डोळे विस्फारले. पुण्यात औरंगजेबचा मामा शास्ताखानला (५ एप्रिल १६६३) त्याच्या राहत्या घरातून पळून जाण्याची नामुष्की ओढवली, या घटनांनी चवताळलेल्या औरंगजेबने त्याचा कडवा सरदार जयपूरचा राजा मिर्जाराजे जयसिंगला (१९ जानेवारी १६६५) शिवाजींचे राज्य खालसा करण्याची मोहिम देऊन मोठी रसद घेऊन दक्षिणेवर पाठवले.
स्वराज्यावरचे हे संकट भिषण होते. मिर्झाराजे नुसते गडावर डोळे ठेऊन नव्हते, त्यांनी गावच्या गावे लूटत रयतेला बेजार करून सोडले. निकराने हल्ला चढवून पुरंदरचा (१४ एप्रिल १६६५) किल्ला जिंकला. रयतेची अधिक फरपट होऊ नये, आपल्या सैन्याची आणखी प्राणहानी टाळण्यासाठी शिवाजी महाराजांनी शरणागती पत्कारली. ११ जुन १६६५ला पुरंधरच्या तहात मुघलांना २३ किल्ले, ४ लाख होन उत्पन्न असलेला मुलूख देऊन टाकला आणि औरंगजेबची चाकरी पत्कारीत असल्याचे दर्शविले. या तहात माहुलीचा किल्ला सुद्धा देण्यात आला.
नोकरी पत्कारलीच आहे, तेव्हा  आयुष्यभर बादशाहच्या सेवेत राहण्यासाठी, त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी मिर्झाराजांनी शिवाजी महाराजांना संरक्षणाची पूर्ण हमी देऊन बादशाहाच्या वाढदिवसानिमीत्त आग्र्याला (५ मार्च १६६५) जाऊन भेट घेण्यासाठी मनवले. १२ मे १६६६च्या दरबारात शिवाजी महाराजांना अपमानास्पद वागळूक मिळाली. त्यानंतर त्यांना नजरकैद झाली, ही एक प्रकारे कैदच होती. 'आपला सर्वात प्रबळ शत्रू हाती आला म्हटल्यावर विश्वासघातकी औरंगजेब शब्द थोडीच पाळणार',  उलट्या काळजाच्या औरंगजेबने मिर्झाराजांच्या शब्दाला किंमत दिली नाही, त्याची योजना शिवाजींना मारण्याचीच होती.
तीन महिने कैदेत राहिल्यानंतर शिवाजी महाराज ऑगस्ट ( तारीख १७, १९६६)च्या महिन्यात आग्रा येथून निसटले आणि अवघी मुघलशाही हेलावली. महाराज राजगड (२ सप्टेंबर १६६६) येथे परतले. स्वराज्याची घडी विस्कळीत झाली होती, त्यामुळे शिवाजींनी मुघलांशी संघर्षाची भूमिका न घेता नरमाईचे धारण स्विकारले. 'आपल्याला तातडीने परतावे लागले, पण आपण आपलेच नौकर आहोत', अशा आशयाचे पत्र त्यांनी औरंगजेबला पाठविले.
उणेपूरे चार वर्षे शिवाजी महाराजांनी संयमाची भूमिका घेतली. आपले बळ वाढवण्यावर, किल्ल्यांची मजबुती करून स्वराज्याची बिघडलेली घडी बसवण्यावर भर दिला. जेधे शकावली नुसार १६६९च्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात औरंगजेबने बनारसमध्ये हिन्दू देवळे पाडण्याचा सपाटा लावला. त्याने काशीचे देऊळ पाडले. इकडे खडकीत औरेंगजेबचा मुलगा शहजादा मुअज्जमच्या चाकरीत संभाजी राजांच्या सोबत प्रतापराव आणि आनंदराव होते. त्यांना कैद करण्याचे आदेश दिल्लीहून रवाना झाल्याची कुणकुण लागताच शिवाजींनी त्यांना तातडीने परत बोलावून घेतले. 'आता वेळ आली ती मुघलांना सपाटून मार देण्याची'. आजवर शिवजींचा भर हा आदिलशाही मुलूख ताब्यात घेण्यावर असायचा, मुघलांशी सरळ सरळ
सामना ते टाळत होते. आता मात्र मोगलाईला तडाखा देण्याची योजना होती.
१६७० हे साल शिवशाहीत अनेक महत्वपूर्ण घडामोडींनी भरलेले. याच वर्षी राजगडावर राजाराम महाराजांचा (१४ फेब्रुवारी १६७०) जन्म झाला. स्वराज्यासाठी हा पायगुण मोठे यश मिळवून देणारा ठरला. त्या अगोदर मुघलांच्या ताब्यातला अत्यंत बळकट असा कोंढाणा (४ फेब्रुवारी १६७०) जिंकून मुघलांविरूद्ध रणशिंग फुंकण्यात आले. कोंढाण्याच्या छापामार युद्धात शिवाजी महाराजांना अत्यंत जिव्हाळ्याचा सरदार तानाजी मालूसरे गमवावा लागला.


स्वराजात जिथे जिथे मुघल फौजा होता तिथे तिथे त्यांच्यावर हल्ले सुरू झाले. प्रतापराव गुर्जर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव भोसले अशा मातब्बर सरदारांसोबत स्वत: शिवाजीं महाराज मैदानात उतरले. पुरंदर, लोहगड, रोहीडा असे एक एक गड मुघलांकडून हस्तगत केले. महाराज स्वत: किल्ले शिवनेरीच्या रोखाने निघाले हा महाराजांच्या जन्माचा किल्ला. महाराजांनी शिवनेरीला वेढा घातला. कित्येक दिवस झुंज देऊनही शिवनेरी रिघ देईना, नाईलाजाने माघार घेऊन महाराज नाणेघाटाने कोकणाकडे वळले. तिकडे निळोपंतांनी पुरंधर (८ मार्च १९७०)  घेतला.

जबर पराभव
महाराज कोकणात उतरले आणि त्यांनी माहुलीच्या किल्ल्यावर छापा टाकला. यावेळी येथे होता राजपूत किल्लेदार राजा मनोहरदास गौड. तो दक्षतेने गड सांभाळीत होता. महाराजांनी स्वत: गडावर छापा टाकला. जबर झटापट झाली. हजार मावळे गमवावे लागले, महाराजांना माघार घ्यावी लागली. महाराज आपल्या सैन्यानिशी टिटवाळ्यास आले. महागणपतीचे हे टिटवाळे. तळ पडला. पुढचे काय पाऊल टाकावे हा विचार त्यांच्या मनी होता. शहर बंदर कल्याण आणि तेथील किल्ले दुर्गाडी मोगलांच्या ताब्यात होता. महाराजांनी तेच लक्ष्य केले. त्यांनी सुभे कल्याणवर झडप घातली. मोगलांची अक्षरश: दाणादाण उडाली. जगाच्या अनेक भागातून येणार्‍या व्यापारी गलबतांची वर्दळ असलेले कल्याण फत्ते झाले. तिथून मराठी फौजांनी चांदवडवर चाल करून चांदवड साफ लूटले.
माहुलीचा किल्ला निकाराने झुंजविणार्‍या मनोहरदास गौंड याने (इ. १६७० , एप्रिल अखेर) सेनापती दाऊदखान कुरैशीला पत्र लिहून, हा किल्ला राखणे आता त्याच्या आवाक्यातली बाब नाही, किल्ल्यावर दारूगोळा आणि शिबंदी कमी असल्याचे कारण त्याने पुढे केली व आपली विनंती बादशापर्यंत पोहचण्यास सांगितले. तो बराच वृद्ध असावा, औरंजेबने त्याची विनंती मान्य केली आणि त्याच्या जागी अल्लावार्दीखानाची नेमणूक करण्यात आली.
मराठी फौजांची बेफाम मुसंडी सुरूच होती. खानदेशातून मोठी फौज घेऊन दाऊदखानने जुन्नरकडे मोर्चा वळवला. पारनेर, माहुली याभागातल्या फौजा हटवून मराठ्यांनी अहमदनगर, परिंडा याभागातील ५१ गावे लूटली.  ह्या संधीची वाट साधून मोरोपंत पिंगळेंनी माहुलीवर हल्ला चढवला, त्यात अल्लावर्दीखान मारला गेला. १५ जुन १६७०मध्ये माहुली स्वराज्यात दाखल झाला.
शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजी महाराजांनी माहुलीवर वास्तव्य केले असण्याची शक्यता आहे. सद्या गडावर संवर्धन कार्य करणार्‍या संस्थांनी राजसदरेवर लावलेल्या फलकात संभाजी महाराजांनी वास्तव्य केल्याचे लिहीले आहे. संभाजी महाराजांचा या किल्ल्याशी कशा प्रकारे संबंध आला होता, हे पाहणे औत्सुक्याची ठरेल!
१८व्या शतकात माहुली इंग्रजांच्या ताब्यात आला. १८१८ साली त्यांनी सह्याद्रीतल्या बहुतांशी गडांप्रमाणेच माहुली किल्ल्याचा प्रचंड विध्वंस करण्यात आला. महादरवाजा, कल्याणदरवाजा, हनूमान दरवाजा आणि कित्येक तटांना सुरूंग आणि तोफा लाऊन उध्वस्त केले. त्यादगडांच्या ढिगार्‍याखाली दबलेला इतिहास बाहेर येऊ शकतो जर ते ढिगारे बाजूला सारले गेले तर.
'गड संवर्धन' या नावाखाली आज गडांचे कुठलेच संवर्धन होताना दिसत नाही, हा आवाक्यात नसलेला विषय वाटतो त्या ऐवजी उत्खनन कार्य केले तर इतिहासातल्या कितीतरी गोष्टी उजेडात येऊ शकतील. माहुलीवर तर उत्खनन जरूर करावे!




 Sahyadri Trekkers Bloggers





Sunday, December 30, 2018

chand bibi mahal and heritage amhednagar


लग्न आणि डोंबल्यांचं हेरिटेज टूर...

अंगात भिनलेली उनाडकी, ती जाता थोडीच जाईल! हा पूर्व इतिहास पक्का ठाऊक असल्याने, 'तुम्ही लग्नाला जात आहात, ट्रेकला नाही, तेव्हा कपडेलत्ते सॅकमध्ये घालून न्यायचे नाहीत!' 'नातलगांशी बोलत चला' आणि हो, तुमच्या ट्रेकच्या निरसगप्पात कुणाला इंटरेस्ट नसतो, तेव्हा नातेवाईकांच्या मुलाबाळांची विचारपूस करा...
एक मीच अशी...बाकी सगळ्या बहिणींचे मिस्टर नियमीतपणे सगळ्यांची आस्थेवाईकपणाने चौकशी करत असतात...आल्या गेलेल्यांची त्यांना सगळी माहिती असते...कोण आजारी पडलं...कुणाच्या मुलाला कुठे अॅडमिशन मिळाली या सगळ्या गोष्टी त्यांना ठाऊक असतात',  'तुम्हाला मात्र कुळांची नावे, नातेवाईकांच्या मुलामुलींची नावे, ते काय करतात काय नाही, यातले ओ म्हणता ठोकळत नाही...तेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासाचे ज्ञान पाजळत बसू नका, कुटुंबाच्या इतिहासात जरा रस घ्या'...

या नाताळच्या सुट्टीत अहमदनगरला सौभाग्यवतींच्या बहिणीच्या मिस्टरांच्या भावाच्या मोठ्या मुलीचे लग्नाकरिता तब्बल पाच दिवस अगोदर जाण्याचे तगडे नियोजन होते. मला गोड भाषेत मिळालेला दम प्रत्यक्षात गंभीर स्वरूपाचाच होता...तो असा हसत हसत जाऊ देण्यासारखा नव्हताच. माझ्या नाताळच्या सुट्टीतल्या हमखास ट्रेकला यंदा पूर्णविराम मिळणार होता. मिळणार होता काय, तो मिळालाच!

माझी खरोखरच पंचाईत होणार होती. पाच दिवसांचे लग्न झोडण्याइतकी माझी प्रकृती 'तंदूरूस्त' नव्हती. त्या ऐवजी पाच काय, दहा दिवसांचा एखादा रेंज ट्रेक असता तर? पण करणार काय, ते औरंगजेबाचे फर्मान होते!
माझ्या हेरिटेज टूरचे किमयागार महेंद्र व येागेश

अहमदनगरहून खुद्द वधुपिता वीरूभाऊ हे पत्रिका द्यायला घरी आले, तेव्हा आमचा घरात पत्ताच नव्हता. 'नेमकं कुणी पाहुणे घरी आले की, तुम्ही ट्रेकवर असतात', हा नेहमीचा प्रश्न यंदाही उपस्थित झाला होत, पण सौम्य स्वरूपात. नुकत्याच १ ते ९ डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या आमच्या तथाकथित ऐतिहासिक सातमाळा भटकंतीच्या नियोजनात, कधी नव्हे ते आमच्या सौभाग्यवतींचे भरभरून सहकार्य मिळाले होते. माझी सगळी तयारी करण्यापासून, सगळे सहभागी रद्द झाले, तेव्हा काळजी करू नको, कोणी नाही आले तर मी तुझ्या सोबत येईन, असे म्हणे पर्यंत हे सहकार्य होते, त्यामुळे अहमदनगरचे पाहूणे पत्रिका द्यायला आल्यावर माझ्या घरातल्या अनूपस्थितीचा विषय तितका गाजला नव्हता.

सातमाळा मोहिमेकरिता मला मनस्वी सहकार्य मिळाले होते, आता अहमदनगरच्या लग्नाच्या मोहिमेला मनस्वी सहकार्य देण्याची माझी पाळी होती...आमचा पूर्व इतिहास खासा कलंकित, त्यामुळे, 'नगरला फक्त लग्नच अटेन्ड करायचे, ट्रेकबिकच्या भानगहीत काही पडायचे नाही', ही सूचना मला अगोदरच निक्षून देण्यात आली होती.

बरोबर २० डिसेंबरला ट्रेकला...सॉरीऽऽ लग्नाला रवाना होण्याच्या दिवशीच आमची मुख्य तेल घाणी नादूरूस्त झाली. त्यामुळे लग्न नावाच्या मोहिमेवर दोन दिवसांनी उशिरा निघण्याचे नियोजन झाले. आता सारी भिस्त ही उर्वरीत दोन घाण्यांवर होती, त्यांचा रखरखाव करण्यात मी स्वत:ला झोकून दिले होते. या सार्‍या भानगडीत लग्नाला निघायला २४ तारखेची दुपार उजाडली. आता मला अहमदनगरला प्यूअरली लग्नच अटेंड करावे लागणार होते. निझामशाहीचा महत्वाचा इतिहास वागवणार्‍या नगरच्या जून्या वास्तूंच्या दर्शनाची शक्यता पार मावळली होती.

आमच्यात लग्नाच्या आदल्यादिवशी देवीचे रात्रीचे जागरण असते. गेल्या अनेक वर्षात हा रातजागा मी अनूभवला नव्हता. संध्याकाळचे जेवण उरकून तमाम महिला वर्ग सजण्याधजण्यात व्यस्त असताना माझ्या धातीत कालवाकालव सुरू झाली होती. रातजाग्यात आता नेमकी कोणती भूमिका वठवावी लागणार? हा चिंतेचा विषय होता. तो सोडवण्यासाठी एक डाव टाकला...

मी: अगं, हे रातजागरण म्हणजे बायकांचे काम असते, तिथे आम्हा पुरूषांचे काही काम नसते.

ती:  तुम्हा पुरूषांचे नव्हे, तुमचे काही काम नसते, असे म्हणायचे आहे का?

या प्रतिप्रश्नातल्या उत्तराची धार ओळखून मी दोन पावले मागे आलो.

पण मग तिथे आम्ही करायचे काय?
ट्रेकला कॅम्पफायर करतात ना, तसाच हा कॅम्पफायर समजा...नाही गाता आलं तर निदान मुलांच्या गुणांना दाद तर द्या! आणि जरा आलेल्या गेलेल्यांची चौकशी करा!

आणखी एक तार्किक प्रश्न टाकला,
'पण तिथे तर गाण्या, नाचण्याचे आवाज असतील ना'
त्याचे उत्तर फक्त कटाक्षाने मिळणार होते!!

ही बहिणीकडच्या लग्नाला आल्यामुळे लग्नानंतरही दोन तीन दिवस थांबणार होती. माझी सुटका लवकर होणार होती. २५ डिसेंबरचे गोरज मुहुर्ताचे लग्न लाऊन रात्रीत नाशिकला परतून 'एखादा बेत' अर्थात एखादा ट्रेक हाणण्याचा माझा बेत एव्हाना बाद झाला होता.

'तुम्ही मुलीकडून लग्नाला आलात, तेव्हा सगळ्या कामात मदतीची अपेक्षा राहील. काम कोणी देणार नाही, तेव्हा ते मागून घ्या'. आता आमच्या साडूकडचा तमाम महाराणा संघ लग्नाच्या कामात बुडालेला बघायला मिळाला. मी बापूडा त्या अनोळखी शहरात काय काम करणार. एक तर लग्नातले एकुणएक काम कुणाला ना कुणाला उक्ते दिलेले होते. काही काम मिळते का म्हणून मी टकमक बघत होतो, तोच लहानग्या समर्थला कोणी तरी दुध आणायला सांगितले, मी झपाटून पुढे सरसावलो आणि कामगिरी मागून घेतली, परंतू अन्य एका पोराने ती माझ्या हातून हिरावून घेतली आणि गाडी घेऊन तो रवाना देखिल झाला. त्याचे नाव अर्थातच मला ठाऊक नव्हते!

एकदाचे लग्न यथासांग पार पडले. आमच्यात लग्न हे मध्यरात्रीच्या समयी लागते, फक्त मंगलअष्टके गोरज मुहुर्तावर होतात, पाहुणे मंडळे जेवण घेऊन रवाना होते आणि मग आमचा पारंपारिक लग्नविधी मध्यरात्री पर्यंत सुरू राहतो. (कोंबडं आरवण्याच्या आत वधू सासरी रवाना झालेली पाहिजे ही अट असते...आंबेजोगाईत एक लग्न सकाळ पर्यंत सुरू राहिल्याने सारी वरात दगड बनली. त्या दगडांकीत वरातीचे पुतणे आंबेजोगाईत असल्याची माहिती मला माझ्या मावशीकडून मिळाली होती. बालपणी ती पुरातन शिल्प मी बघितली, परंतू ती घटना नीट स्मरत नाही)














थंडीचा जोर असल्यामुळे मंगल कार्यालयाच्या लॉनवर अंगात थंडी भरून आली. ''ट्रेकवर आपल्याला कधी थंडी वाजते?'' या प्रतिप्रश्नाने मुक्कामाच्या ठिकाणी परत जाण्याचा विषय एका झटक्यात निकाली काढण्यात आला. महेंद्र आणि विरूभाऊ या दोघांनी अपार मेहनत घेऊन एक देखणा लग्न सोहळा पार पाडताना आम्हाला कामाची कुठलीच तोशिष पडू दिली नाही. दुसर्‍या दिवशी कडाक्याच्या थंडी मुळे मला दुपारचे जेवण होऊन रवाना होण्याचा आग्रह झाला. सगळ्या पाहूण्यांना रवाना करताना महेंद्र मला सारखे, थांबून जा! असे सांगत होता. 

अॅकॅडमीकली, लग्न पार पडल्याने आणि ट्रेक बिक हा विषय माझ्याकरिता अगोदरच बाद करण्यात आल्याने मी, परतण्याची तयारी केली होती. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत एक एक पाहूण्याला रवाना करून महेंद्रने हळूच विषय काढला, 'थांब तुला चांदबीबी महालावर घेऊन जातो'.  ही सूवार्ता मी मनातच ठेवली असती तर बरं झालं असतं!

लग्नाच्या दुसर्‍या दिवशी मी थांबल्यामुळे सौभग्यवतीं आदंनात होत्या. मी आनंद प्रकट केला, 'अगं महेंद्र मला चांदबीबीचा महाल बघायला घेऊन जातोय, माझं थोडं का होईना, हेरिटेज नगर बघून होणार? 

तो किती दमला आहे, कळत नाही, कसलं डोंबल्याचं हेरीटेज टूर करता? या प्रतिहल्ल्याने मी थोडा गांगरला...पण महेंद्रने, 'भक्ता, काळजी नसावी'च्या अविर्भावात इशारा केला. मी त्याला लगेच सांगितले, अरे तू खुप दमला आहेस. आठवड्याभरापासून जोरदार धावपळ सुरू आहे. पुढच्या वेळेला बघू.

निझामशाहीतला मातब्बर प्रधान सलाबत खानाचा मकबरा आणि भोवतालचा कोट
मागच्या वेळेस नगरचा भूईकोट किल्ला दाखवून आणणार्‍या महेंद्रने माझ्याकरिता खरोखरच लवकर जेवण उरकले. येणारे प्रत्येक काम मार्गी लावत, मोठी गाडी कामासाठी बाहेर गेली असताना त्याने, 'मी काही वर येणार नाही खाली बसून राहील, तु बघून ये सांगत त्याने दुचाकीला सेल मारला.

चांद बिबीचा महाल, नगर गावात असावा अशी माझी कल्पना होती. जिल्हा बॅंकेसमोर मित्राच्या दुकानाजवळ गाडी लाऊन महेंद्रने त्याचा मित्र योगेशला बोलावून चांदबीबी महालाला जायचेय असे सांगितले. अवघ्या पाच मिनीटात हजर होताना या पठ्ठ्याला आपल्या गृहमंत्रालयाला राजी करावे लागले हे त्याच्या मोबाईल फोनवरच्या संभाषणावरून स्पष्ट होत होते. 

महेंद्रने ओळख करून दिली, हा प्रशांत माझा साडू, नाशिकला असतो...याला ऐतिहासिक स्थळे बघण्याची...गडकिल्ले फिरण्याची आवड आहे. योगेशने चांदबीबीचा महाल ज्या डोंगरावर आहे, तो शहा डोंगर आज नगरकरांचे आकर्षण बनल्याची माहिती दिली. अतिशय प्रमाणबद्द बांधकाम असलेला हा महाल उत्तम स्थितीत असून सुट्टीच्या दिवशी तिथे अलोट गर्दी होते. रोज सकाळी व्यायामासाठी या डोंगरावर जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. लोक नगरवरून आता सायकली घेऊन येतात, तर काही जण धावत डोंगरावर जातात. येथे मोर व हरणे बर्‍याचदा दृष्टीस पडतात. बिबट्याचे मात्र येथे कोणतेच अस्तित्व नाही. इतर सगळ्या ठिकाणांप्रमाणे तरूणाई इथल्या महालात सेल्फी फोटोबाजीसाठी येते तर काही जण भिंतींवर आपल्या कथित प्रेमाचा बाजार मांडतात, तो पूसण्यासाठी नगरमध्ये मॉर्निंग वॉक करणार्‍यांचा गट कार्यरत आहे. योगेश आणि महेंद्र यांच्याकडून अशी एक एक माहिती मिळत असताना आम्ही शहा डोंगराच्या पायथ्याजवळ आलो. योगेशने वर जाण्याच्या पायवाटा दाखविल्या. आमच्याकडे वेळ थोडा असल्याने आम्ही थेट गाडी वर नेली. येथे जाण्याचा घाटरस्ता उत्तम असल्याने घाटात गाड्यांची बर्‍याचदा रिघ लागते! सुट्टीच्या दिवशी अलोट गर्दी असते. 
चांदबिबीचा महाल...की सलाबतखानाचा मकबरा...वास्तू मात्र सुबक, टोलेजंग!

पायथ्याला शहापूर गाव, त्यामुळे याला शहा डोंगर हे नाव निझामशाहीत पडले असावे. डोंगराचा निष्पर्ण पसारा अगदी दुर अंतरावरून नजरेत खुपतो. वनखात्याने महाराष्ट्रातल्या अनेक डोंगरांप्रमाणे येथेही रेन ट्री, ग्लिरिसीडीयाचे मोनोकल्चर आणल्यामुळे संपूर्ण डोंगर भकास झाला आहे. डोंगरावर उगवणारे गवत टिकू देण्याचा तर प्रश्नच नाही. पूर्णपणे चराई करून साफ झालेल्या या डोंगरावर त्यामुळेच गवताच्या आश्रयाने वाढणारी जीवसृष्टी सुद्धा फारशी नसावी अशी स्थिती आहे.

चांदबीबीचा महाल ही मोठी गौरवशाली वास्तू आहे, हे दूर अंतरावरूनच जाणवायला लागते इतके ते विशाल बांधकाम आहे. चहूबाजुंनी दगडाच्या सुबक बांधणीचा कोट असून कोट आणि महाल ही दोन्ही बांधकामे एकाच वेळ करण्यात आल्याचे जाणवते. आवारात पूर्व बाजूने लोखंडी प्रवेश द्वार असून त्या जवळ पुरातत्व खात्याने दगडात कोरलेल्या माहितीवर, 'सलाबत खानाचा मकबरा', असे लिहीले आहे. हा चांदबीबीचा महाल नाही, पण नगर मध्ये त्याला त्याच नावाने संबोधले जाते. सरकारी दिशादर्शन पाट्यांवरही चांदबीबीचा महाल, असेच रंगवले आहे. 
वास्तूचे गुढ एकमात्र चिंचोळ प्रवेशद्वारा

लांबून पाहताक्षणी प्रेमात पडावे इतकी ही देखणी वास्तू आहे. २१.४ मिटर उंची आणि तीनच मजले यावरून बांधकामाची भव्यता लक्षात येईल. कोणतेही नक्षीकाम नसलेले हे बांधकाम जितके भव्य तितकेच ते सुबक आहे. अष्टकोनी चबुतर्‍यावर अष्टकोनातली स्तभाच्या आकाराची रचना अनोखी आहे. सगळेच दगड समप्रमाणात घडवून कमानी यच्चयावत एकजात सारख्या आहेत. 

सुबक दगडात अष्टकोनाची बाहेर जशी बाजू तसाच आतमध्ये खालपासून वर पर्यंत अष्टकोनात हा मकबरा उठावला आहे. प्रत्येक मजल्यावर प्रत्येक कमानीच्या आतील छत अर्ध गोलाकार असून ही गोलाई वर निमुळती होत जाते. बांधकामाच्या दृष्टीने अतिशय अवघड असलेले असे २४ लहान घुमट आहेत. मुख्य मकबर्‍याचा घुमट मोठा असून तोही पूर्णपणे अर्ध्यवर्तुळाकार आहे. हे सगळेच्या सगळे घुमट लहान दगडाच्या चिर्‍यात बांधले आहेत.  गणित, भुमीती, मापे, चुन्यात दगड सांधण्याचे शाश्वत तंत्र,दगडांचे एकमेकांना केलेले लॉकिंग, चौकोनी, गोलाकार व अन्य आकारातली दगड कटाई इतकी अचूक की घुमटाचा गोलही अगदी परिपूर्ण असे सगळे काही येथे बघायला मिळते. संपुर्ण मकबरा हा आतील बाजूने व्हरांडा आणि मधोमध खालपासून छतापर्यंत पर्यंत एकजात मोकळा आहे. ओबडधोबडपणा कुठेच नाही. या वास्तूत महाल असण्याचे कोणतेच लक्षण नाही. वर जाण्यासाठी एक चिंचोळे प्रवेशद्वार. खोल्या किंवा स्वच्छतागृह अशी कुठलीच रचना आत संभवत नाही, त्यामुळे याचे बांधकाम हे महाल म्हणून केलेले नाही हे स्पष्टच होते. मग इतके विशाल आणि सुबक बांधकाम करण्याचे प्रयोजन तरी काय असावे?


आपल्या हयातीत सलाबत खानाने खरोखरच कबर बांधण्यासाठी इतकी मोठी वास्तू उभारली असेल?

छताला काही ठिकाणी दगडाचे सांधण थोडे हलल्याचे जाणवते व त्यातून पावसाचे पाणी रिसत असावे. मुख्यघुमटातूनही पावसाचे पाणी रिसत असावे, अशा चून्याच्या धारा दिसून येतात. ज्या ठिकाणहून मकबर्‍याच प्रवेश होतो, त्याच्याच उजव्या बाजूने एक तळघर असून या अष्टकोनी तळघराचे बांधकामही तितकेच सुबक आहे. त्यात दोन कबरी आहेत.  नगरच्या निझाम पहिल मुर्तझा याचा वझिर सलाबतखान दुसरा याने १५६५ ते १५८८ या काळात त्याच्या जितेपणीच आपल्या व आपल्या पत्नीच्या कबरीकरिता हा मकबरा बांधला, असे सांगितले जाते. एक वेडगळ राजा म्हणून या मुर्तझाची कारकिर्द ओळखली जाते. 

सलाबत खानाने विषाचे तीन पेले केले...त्याच्या ज्या पत्नीने विष नाही घेतली तिची व तिच्या कुत्र्याची कबर बाहेरच्या बाजुला...तर सलाबत खानासोबत मृत्यू कवटाळणार्‍या पत्नीला मुख्य मकबर्‍यात स्थान मिळाल्याची आख्यायिका. एैकायला मिळते.
हा चांदबीबीचा महाल असण्याची कोणतीच शक्यता वाटत नाही. नगरच्या प्रसिद्द भूईकोट किल्ल्यात विजापूरच्या खालोखाल देखणे महाल होते, अशा ऐतिहासिक नोंदी असल्याचे कळते. सुरक्षित आणि सुसज्ज असा किल्ल्यातला निवास सोडून चांद बीबी सारखी लढवैय्यी, जिने बलाढ्या मुघल फौजेला ताकास तुर लागू दिली नाही, ती अशा निर्जन ठिकाणी निवास करत असेल यावर विश्वास बसत नाही. खुद्द सलाबत खान सुद्धा त्यात निवासासाठी थांबला नसेल. अन्यथा तळघरात कबरीच्यावर निवासस्थान ही मुसलमानी राजवटीची पद्दत कुठेच आढळत नाही. 

तळघरातली कबरही नक्कल असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येते. मुसलमानी राजवटीत प्रसिद्दी व्यक्तींना दफन केल्यानंतर त्याच्या वर कबरीची नकल करण्याचा प्रघात आढळतो. ताजमहालातही तसेच आहे. 
इंग्रज आमदनीत अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांसाठी या मकबर्‍यात निवासीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाला होता, त्यासाठीच वर पर्यंत घाटरस्ता तयार करण्यात आला. परंतू शहा डोंगरावर पाणी कुठेच नाही. पावसाचे पाणी तिथल्या तीन्ही तलावात पुरेसे साठत नाही. शिवाय येथे हवेचे प्रमाणही खुप आहे.

टोलेजंग मकबर्‍याचा मुख्य घुमट म्हणजे भव्य, सुबक, अप्रतिम बांधकामशास्त्राचा नमुना
जिल्हाधिकार्‍याचे निवासस्थान होऊ शकले नाही, तेव्हा इंग्रजांनी या मकबर्‍याच्या कमानींना काचेची मोठाली तावदाने लाऊन अधिकार्‍यांचे विश्रामगृह बनविण्याचा प्रयत्न केला, परंतू तिथले वातावरण विश्रामाकरिता योग्य नसल्याने इंग्रजांना तेथे वास्तव्य करता आले नाही, अशा नोंदी इंग्रजांनी गॅझेटियरमध्ये लिहून ठेवल्या आहेत. 

दिवस लहान असल्याने सूर्य कलू लागला तसे आम्हाला परतीचे वेध लागले. नगरच्या वारसौ दौर्‍याचा हा लहानसा अंश होता. दगडातील अप्रतिम कॅलिग्राफी आणि नक्षीकामाचा उत्कृष्ट नमूना असलेली दमडी मशिद, आलमगिर, जिथे मुघल बादशाह औरंगजेबचा मृत्यू झाला, बागरोजा आणि त्याच्याच जवळ असलेली १९६५च्या तालिकोट युद्धात शौर्य गाजवणारा गुलामअली हत्तीची कबर, फराहबक्ष महाल आणि आसपासच्या असंख्य निझामशाही वास्तुंचा मनमुराद वेध घेण्यासाठी वेळही तितकाच जास्त लागणार होता. 


परतीच्या वाटेवर, निझामशाही पूर्वीच्या ऐतिहासिक खाणाखूणांबद्दल मी योगेश व महेंद्र यांना मुद्दाम विचारले तर त्यांनी दोन तीन ठिकाणी काही जुनी हिंदू पद्दतीची बांधकामे असल्याची माहिती दिली. एक तर शहा डोंगराच्या अगदी मागेच असल्याचे समजले व मी तिथे जाण्याचा आग्रह धरला. महेंद्रलाही त्याच्या गृहमंत्रालयातून एव्हाना फोन सुरू झाले होते, तशातच आम्ही वीरभद्र मंदिराकडे कुच केली. जंगम समाजाकडे ताबेदारी असलेल्या या मंदिराच्या बांधकामा संबंधी माहिती देणारे तिथे कोणीच नव्हते. बांधकाम यादव कालीन असावे असे वाटत होते. मी योगेशला मुद्दाम या परिसरात काही शिलेलेख वगैरे आहेत का असे विचारले, तर त्याने यामंदिरात असंख्य वेळा येऊन गेल्याचे व दगडावरचे कोणतेच लेख नसल्याचे सांगितले. मंदिराच्या बाहेर पडत असताना एका पडक्या बारवाचे काम दृष्टीस पडले. मी कमीनी दरवाजातून आत गेलो तर रस्ता विटांच्या भिंतीने बंद करण्यात आला होता. पलिकडच्या बाजूने विहीरीत डोकावून परतत असताना अचानक वरच्या बाजूला एक ठसशशीत शिलेलेख दिसला. परतण्याची खुपच घाई असल्याने त्याचे दुरून छायचित्र घेता आले. 

परवानगी नसताना माझ्या नगरच्या हेरीटेज टूरची शानदार सुरूवात झाली होती. महेंद्रने आणखी एकदा खडा टाकला, आज रात्री मुक्काम करून जा, उद्या तुला काही तरी द्यायचे आहे. लग्नात आलेल्या पाहुणे मंडळींना टॉवेल, टोपी दिल्याशिवाय रवाना करत नाही. मला फक्त टॉवेल, टोपी साठी महेंद्र थांब म्हणणार नव्हता.
सहाशे वर्षात धक्का पोहोचला नाही असे बेजोड बांधकाम

थंठीचा कडाका दुसर्‍यादिवशी सकाळी वाढला होता. माझे सकाळचे साडे सहाचे प्रस्थान आता दहा वाजेला नियोजीत करण्यात आले होते. परतीची बॅग तयार होती. दहा वाजता जेवण घेतले आणि महेंद्रने जर माळीवाड्यात जाऊन येऊ अशी साद घेतली. तिथल्या ओळखीच्या दुकानातून त्याने सरदार ना.य. मिरीकरांचे नगरच्या इतिहासावर १९१६मध्ये लिहीलेल्या पुस्तकाची तिसरी नवी कोरी आवृत्ती घेऊन दिली. त्यानंतर तो अहमदनगर ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयाच्या आवारात घेऊन गेला. या  वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीचे दुरूस्तीचे काम सुरू असल्याने ते सद्या बंद आहे, पुढल्या वेळेस येथे तुला भरपूर खाद्य मिळेल असे सांगून आम्ही बाहेर जाऊ लागलो. तोच महेंद्रने आत जाऊन बघूया असे सांगितले. आतील कर्मचार्‍यांनी वस्तूसंग्रहालय सद्या बंद असल्याचे सांगितले. 
हरिश्चंद्रगडावरील नरसिंहाची मुर्ती १२वे शतक

आल्यासरशी मग त्यांची काही प्रकाशने मिळतील का याची चौकशी केली. त्यांनी काही पुस्तके आणून दिली. ती सगळी घेतल्यानंतर माझी कोपर्‍यातल्या मुर्तीवर नजर गेली. त्यावर लिहीले होते किल्ले हरिश्चंद्रगड...पाय त्या क्षणी स्तब्ध झाले. हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर एका भव्य तलावाच्या अवशेषांचा आम्हाला नुकताच शोध लागल्याचे सांगून या वस्तू संग्रहालयाकडून आवश्यक माहिती मिळू शकेल का याची चौकशी केली. आणखी एका मुर्तीने लक्ष वेधून घेतले, ती होती रतनगडच्या अमृतेश्वर मंदिरातली गणपतीची मुर्ती. 

आज नशिब चांगले महेरबान होते. स्वराज्यासाठी हौतात्मय पत्कारणारे कोल्हापूर संस्थानचे चौथे शिवाजी यांची समाधी बघता आली नाही. संभाजी महारजांचा मुघलांनी वध केला, त्या प्रसंगीचे दुर्मिळ असे चित्र बघण्याची संधी मिळाली नाही, परंतू ध्यानी मनी नसताना अहमदनगरचे जे काही वारसा दर्शन घडले मन समाधान पावले.

नगर शहराच्या आसपास पुरातन वारसा खजिना स्वरूपात विखूरला आहे. इथले सव्वा मैल लांबीचा भूईकोट किल्ला पुन्हा बघायचा आहे. मुघल आणि आदिलशहा यांच्या संयुक्त फौजांनी शहाजी राजांच्या नेतृत्वाखाली जिथे पराभवाची धुळ चाखावी लागली, ते भातवडी, पारनेरचा परिसर, यादव, सातवाहन, राष्ट्रकुट आदी काळातल्या इतिहासाच्या असंख्य खाणाखुणांनी नगर समृद्ध आहे. 
मावळतीच्या सूर्याची तिरीप मकबर्‍याची शोभा वाढविताना

मकबर्‍याच्या आवारातला विशाल वृक्ष आणि तितकाच विशाल पार

बुलढाण्याच्या या सदगृहस्थाने या पुराणवास्तूची भिंत अशा ठिकाणी विद्रुप केली की, ती स्वच्छ करणेही मुश्कील

सूर्य अस्ताला जाताना त्याची थोडी लाली अशा देखण्याठिकाणी रोजच सोडत असेल

मकबर्‍याच्या बाहेरचा विशाल तलाव व त्याची भली चौडी भिंतं.


---








Saturday, December 1, 2018

पुरातन बंधारा हरिश्चंद्रगडावरचा ancient water resiorvior of harishchandra fort



हरिश्चंद्रगडाच्या अफाट पसार्‍याचा विचार करता, तिथली पाण्याच्या साठवणूकीची पुरातन व्यवस्था मोठी असायला हवी होती, परंतू ती आज तशी दिसत नाही. तारामतीच्या शिखराच्या पायथ्याला असलेल्या पुरातन पाणी व्यवस्थेशिवाय गडावर अन्यत्र दगडात घडवलेली, बांधिव अशी व्यवस्था सहजासहजी दृष्टीस पडत नाही. गडावर अशी व्यवस्था खरोखरच होता का? हा देखिल प्रश्न पडावा. नसेल तर ती का नव्हती? हाही प्रश्न आहेच.

प्राचीन राजधानीचे ठिकाण जुन्नर पासून जवळ,  नाणेघाटाच्या जवळ असलेला, त्याकाळचा हा महत्वाचा किल्ला होता. चहुबाजुंनी नैसर्गिक तटबंदी लाभलेल्या या गडावर चहुदिशांना तट, बुरूज होते, त्याचे अवशेष आजही बघायला मिळतात. पाचनईकडूत येताना सीतेच्या न्हाणीच्या जवळच्या तटबंदीचे काही अवशेष आहेत. बैल घाटाच्या मार्गावरही आहेत. गडावर साठवणूकीच्या पाण्याचा विचार केला तर आज सगळी साठवणूक तारामतीच्या पोटातील लेणी, हरिश्चंद्रेश्वर, केदारलिंगी महादेवाची लेणी आणि त्याच्या आसपास बघायला मिळतो. बालेकिल्ल्यावर कातळात खोदलेली पाण्याची टाकी आहेत, परंतू गडाच्या अन्य टोकांवर जी काही पाण्याची उपलब्धता आहे ती बहुतांशी नैसर्गिक खड्डे, ओढे, नाल्यात साठलेली. त्यामुळे ती वर्षभर उपलब्ध नसते. त्या पाण्यावर गडाची भिस्त असण्याची शक्यता नाही.
- नळीच्या वाटेवरून कोकणकड्यावर येताना जुन्या बुरजाचे अवशेष
कातळात खोदलेली टाकी गडाच्या चहुबाजूंना असायला हवी होती, ती का नाहीत? हा प्रश्न नेहमी सतावत होता. गडाला चहुअंगांना नैसर्गिक तटबंदी असल्याने मोठ्या संरक्षणाची आणि पर्यायोने गडाच्या सुदूर भागात पाण्याच्या फार मोठ्या नियोजनाची गरज भासली नसावी? या शक्यतेवर विश्वास नव्हता, परंतू कुणाच्या सांगण्यात किंवा वाचनातही अशा व्यवस्था असल्याची माहिती मिळत नव्हती. २५ नोव्हेंबरला कोकणकड्याची उत्तर बाजु व डोंबांच्या डोंगराच्या मधल्या मार्गाने, अर्थातच प्रचलित अशा नळीच्या वाटेने नाशिक-पुणे-मुंबई अशा विविध ठिकाणच्या २० डोंगरभटक्यांनी ट्रेकसोल्सच्या झेंड्खाली एकदिवसाची छान भटकंती केली आणि अचानक एके ठिकाणी एका भल्या मोठ्या तलावाच्या अवशेषांनी आमचे लक्ष वेधून घेतले. एक तर या तलावाची अभ्यासकांकडे नोंद आहे की नाही याची मला काहीच माहिती नाही, परंतू ती असेल त या तलावाविषयी फार गांभीर्याने बघितले गेले नसावे, अन्यथा तो असा दुर्लक्षित राहिला नसता. असा प्राचीन तलाव, हरिश्चंद्रगडासारख्या ठिकाणी म्हणजे इतिहासातला मोठा खजिना आहे. 
सप्तीतीर्थ पुष्कर्णी...यातील चौदा विष्णू मुर्ती आता हरिश्चंद्रेश्वराच्या गुहेत अडगळी सारख्या टाकून दिल्या आहेत...
''गडावरचे तलाव फक्त स्वच्छ पाणी मिळावे इतक्या क्षुल्लक हेतूने कधीच साफ करायचे नसतात''. त्यांचे उत्खनन करायचे असते. त्यात इतिहासाचे मुक साक्षीदार, नाणी, बांगड्या, कौल, माठ यांचे तुकडे दडलेले असू शकतात. अशा संशोधनातून इतिहासाचा एक धागा सुद्धा आपल्याला कुठच्या कुठे नेऊन जाऊ शकतो, परंतू या बद्दल कोणतेही गांभीर्य नसल्याने आज महाराष्ट्रात गड स्वच्छतेची जी लाट आली आहे ती फक्त दगड, गाळ उपसण्यात सार्थकी मानण्या इतपत! फार मोजक्या संस्था असतील ज्यांनी काळजीपूर्वक पाण्याचे कुंड, तळी, टाकी स्वच्छ करून पुरातत्वीय अवशेष वेगळे केले, अभ्यासकांना उपलब्ध करून दिले. त्याला हरिश्चंद्रगडही अपवाद नाही. आज ह्या तलावाचा परिसर चक्क मौजमजेचे ठिकाण बनला आहे. तिथे आता कित्येक तंबु लागु लागलेत, ते तंबु लावणार्‍यांच्या, तिथे मुक्काम करणार्‍यांच्या गावी तरी असेल का की, आपण ज्याठिकाणी रात्री डेरा टाकलाय ते ठिकाण नेमके आहे तरी काय?

हरिश्चंद्रगडावर अलिकडेच दिसणारे साधूबाबा
(आता सप्ततीर्थ पुष्कर्णीचेच बघा: काही वर्षांपूर्वी एका साधूने तिची स्वच्छता केली, त्यात त्याला तीन गोण्या भरतील इतकी पुरातन नाणी मिळाली. गडाचा जिर्णोद्दार करण्यासाठी ती तो घेऊन गेला अशी वदंता आहे. त्याचे पुढे काय झाले हे ठाऊक नाही.)

रविवारचा दिवस आमच्याकरिता सह्याद्रीतल्या एका अविस्मरणीय भटकंतीचा होता. नळीच्या वाटेच्या चढाईचा प्रत्यक क्षण ह्याद्रीतल्या एका उत्तभ भटकंतीला आल्याचा आनंद पदोपदी मिळवून देत होता. खरे तर नळीच्या वाटेबद्दल जितके ऐकुन होतो, त्यामानाने ही वाट बघण्याचा योग इतका उशिरा का आला याचे माझे मलाच आश्यचर्य वाटत आहे. 

सरावाची भटकंती: नळीची वाट!
हा योगही मोठा विचित्र जुळून आला, आमची ही भटकंती खरे तर सरावासाठी होती, म्हणजे आम्ही येऊ घातलेल्या डिसेंबरच्या सुरूवातीला सातमाळा रांगेत सलग नऊ दिवसांची भटकंती करणार आहोत. त्याकरिता रोज थोडा थोडा सराव सुरू होता. एक मोठा सराव गरजेचा होता, तो नळीच्या वाटेच्या रूपाने इतका मोठा करायला मिळावा? आहे का नाही आश्चर्याची गोष्ट. आमच्या दृष्टीने या भटकंतीचे हे एकमात्र आश्चर्य होते. परंतू तिथले पेटारे उघडायला लागले की, एक एक गोष्टी बाहेर येऊ लागतात. 

नळीच्या वाटेने गेल्यावर हरिश्चंद्रगडावर मुक्काम करावा लागतो हे मी ऐकत आलो आहे. तिन ठिकाणच्या छोट्या कातळारोहणात वरच्या दोन भागात सुरक्षा म्हणून कमरेला दोर बांधून किंवा शिडी लावण्याची प्रथा होती, त्यात अर्थातच बराच वेळ जायचा आणि बेलपाडा किंवा वालिवर्‍हे वरून कोकणकडा गाठायला आठ/नऊ तासांचा अवधी लागायचा. काहींना तर अकरा, बारा तासही लागलेत, तेव्हा नळीच्या वाटेने वर गेल्यावर मुक्काम हमखास घडायचा. एक तर तुम्ही बेलपाड्यातून सुरूवात करणार म्हटल्यावर तुमच्या गाड्या बेलपाड्यात राहणार किंवा तिथे बसने आलात तरी दुपारी हरिश्चंद्रगडावर पोहोचल्यानंतर पलिकडे उतरून पाचनईवरून परतीच्या प्रवासाची  व्यवस्था नसल्याने या मुक्कामाला पर्याय नव्हता. अलिकडे वनखात्याने हरिश्चंद्रगडावर रात्रीच्या मुक्कामाला बंदी घातल्यानंतर तर आमचा नळीच्या वाटेचा बेत बारगळल्यात जमा होता. 

कोकणकड्याचा स्थानिक मार्गदर्शक बेलपाड्याचा कमा पोकळा नेहमी म्हणायचा, सात तासात सहज वर पोहचता येते, गावातली मंडळी बायका मुलांसकट तीन तासात वर जातात. नळीच्या वाटेने वर जायचे, कोकणकडा बघायचा आणि बैलघाटाने वालिवर्‍हेत परतायचे असाही बेत शिजत होता, परंतू आज काही तरी वेगळेच योग जुळून आले होते. आम्हाला बेलपाड्यात सोडायला आलेली गाडी पाचनईत जाऊन थांबणार होती. मुक्कमाची अवश्यकता नव्हती. लवकर पोहोचलो तर तारामती किंवा बालेकिल्ला असे एखादे दान पदरात पाडून घेण्याची संधी होती. आमच्यासाठी मात्र कोणती संधी वाट बघतेय? याची सुतराम कल्पना नव्हती.
पन्नास फुटाचे दोन दोर, आणि फारच माफक असे आरोहणाचे साहित्य घेऊन आम्ही सहा तासाच कोकणकड्यावर पोहोचलो. आमच्या २० जणांच्या चमुत तीन महिला होत्या, चाळीशी पार केलेले अनेक होते तरी त्यामानाने बर्‍यापैकी वेग राखता आला. आमच्या गार्गीचा तर हा तिसराच ट्रेक होता, तोही ती सातमाळेच्या सरावाकरिता आलेली. सराव ट्रेक कुठे? हरिश्चंद्र नळीची वाट! हीपण एक आश्चर्याची गोष्ट. या आनंदात असताना दोन गोष्टी आम्हाला सतत खुणावत होत्या: एक म्हणजे दक्षिण बाजुला दिसणारी माकडनाळ (जी २००६च्या जानेवारीत मध्यापर्यंत पोहचूल्यानंतर दोर कमी पडल्याने अर्धवट सोडून आम्हाला माघारी परतावे लागले होते). दुसरे म्हणजे रोहीदासचा डोंगर. 

नळीची वाट, माकडनाळ, रोहीदास या तिन गोष्टींभोवती विचाराचे चक्र फिरत आमचे आरोहण सुरू असताना मध्येच कोणी तरी, कोकणकड्याच्या मध्यमार्गावर लटकलेला दोर दिसतोय, असे सांगितले.

पहाटे साडेचारला उठून आम्ही बरोबर ६-०५ वाजता कोकणकड्याच्या दिशेन प्रस्थान केले. चाळीस मिनीटात हरिश्चंद्रेश्वरी नदीच्या पात्राजवळ पोहोचलो तोच बिबट्याची विष्टा दृष्टीस पडली. एव्हाना आमच्या आगमनाने हुप्प्यांचे सतर्कतेचे इशारे सुरु झाले होते. ७-१० वाजता आम्ही तीन महाकाय पायर्‍यांवर पोहोचलो. कोकणकड्यावरून जिचा प्रवास होतो, त्या नदीत फक्त एकाच ठिकाणी या तीनपायर्‍या, अन्यत्र का नाही? 
याभौगोलिक रचनेचे कुतुहल वाटल्यावाचून राहत नाही. ''हरिश्चंद्रगड नावाचे हे गारूडच असे की, त्याच्या कोपर्‍यान कोपर्‍यात अशी असंख्य आश्चर्य दडली आहेत, ती धुंडाळता आली तर? त्याकरिता एकदा सहा दिवस, एकदा तीन दिवस, एकदिवसांचे तर अगणीत अशा माझ्या मुक्कामात हरिश्चंद्रगडाचे भग्नावशेष, कोसळलेले तट, मंदिरे, लेणी, तळी, टाकी नजरेखालून घालण्यातला आनंद आजवर नेहमीच गडभ्रमंती सार्थकी लावणारा ठरला आहे. एकदा तर हरिश्चंद्रगडाच्या पूर्व भागात असलेल्या नेढ्यापर्यंत आम्ही तिन मित्र मुसंडी मारून आलो आहोता. आज असे काही बघायला मिळेल का? असा कोणताच विचार मनात नव्हता.'' नळीच्या वाटेने जाण्याचा आनंदच काही और.

कातळारोहण हा आमचा विषय नसल्याने कोकणकड्याच्या मध्यमार्गावर जाण्याचे योग कधीही येणार नाही हे आमच्या दृष्टीने सष्ट असले तरी त्या दिशेने चालत जाण्याची भावनाही मोठा आनंद देते. आज तर आम्ही लाडका रोहीदास, माकडनाळ आणि भवानी धार यांचे जवळून दर्शन घेत नळीच्या वाटेने जाणार होतो.
तब्बल दोन तास नदीतल्या मोठमोठ्या शिळांची धम्माल वाट पार करून ८-०० वाजता आम्ही नळीच्या वाटेला लागलो. 


या पैशाला केवढे मोल!
आजही माझा मोबाईल फोन मधला कॅमेरा एक एक गोष्टीची नोंद ठेवण्याची आठवण करून देत होता. पूर्व बाजूने येणार्‍या सूर्यकिरणांमुळे मध्यमार्ग, रोहीदास छान विरोधाभासी चित्र मिळवून देत होते. डॉ. अभिजीत इंगळे वरच्या टप्प्यावरून कसलासा ग्लास दाखवून, 'तुझ्यासाठी सरबत ठेवले आहे', असे सांगत होता. आता इतक्या अवघड ठिकाणी याला ग्लास कुठून सापडला? आमच्या चुमतला पुढचा जत्था एका मोठ्या दगड सपाटीवर विश्रांतीकरिता थांबला होता. सगळ्यांच्यात हातात काचेचे मोठे ग्लास होते. पाचनईचा एक ग्रहस्थ आपल्या मुलीसमवेत लिंबूपाणी विकण्यासाठी येथे आला होता. 'शनिवार, रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवसात आम्ही येथे लिंबुपाणी घेऊन येतो', अशी माहिती त्याने दिली. इतकी अवघड चढण चढून आल्यानंतर हातात आयता लिंबुपाण्याचा ग्लास मिळावा? या परिस्थितीत सुख: यापेक्षा वेगळे असू शकते का? विक्रीचे ठिकाणही असे की, हमखास विक्री होणारच. तरी पण पाचनई पासून हरिश्चंद्रगड, तिथून नळीच्या वाटेचे सगळे कातळटप्पे पार करून इथपर्यंत डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन दोन अडीचशेची कमाई म्हणजे या पैशाला केवढे मोल?


लिंबूपाणी, कोकमचे सरबत खुपच छान होते. वर उंबराला लाल चुटूक फळे लगडली होती, त्यातली तीन चार तोडून खाल्ली त्याची चव अप्रतिम होती, तोच आमच्यात कोणी तरी ओरडलं, अरे तोडू नका...माकडांसाठी गडांवर फार थोडी फळझाडे उरलीत, त्यामुळे वेळीच सावरून उंबर तोडण्याचा कार्यक्रम रहित करण्यात आला. 
कोरड्याठाक नळीच्या वाटेत उंबराची काही झाडे कुणाच्या जिवावर तगुन राहिलीत. येथे पाण्याचे टिपूस नसताना अनेक झुडपांने पाणी कोण देतं? पारंपारिक शेती करणार्‍यांचे हे म्हणणे आहे, 'झाडांना पाणी खुप कमी लागते, वाफसा लागतो तो पालापाचोळ्यातून त्यांना आपसूकच मिळतो, त्यांचे खरे खुरे अन्न तर सूर्य प्रकाश!' याची प्रचिती येथे येत होती. तशी ती कोळेश्वराच्या पठारावर अनूभवली आहे. तिथल्या बापू खुटेकरांनी हिवाळ्यात दवाच्या पाण्यावर भरगोस गव्हाचे पिक घेतल्याचे आमच्या मागच्या दोन्ही भेटीत अभूवले आहे. (कोळेश्वराच्या यंदाच्या मार्चच्या भेटीत मात्र बापुंची गहूशेती बघण्याचा योग जवळ असून सुद्धा चुकला त्याची रूखरूख लागून आहे.) 

इथून आता आम्ही नळीच्या मध्ये मध्ये शिरू लागलो, तसा पश्चिम धारेवरचा फॅन्टमहेड नजरे आड होऊ लागला आणि डोंगराच्या दोन्ही धारा विशाल होऊ लागल्या. ९-०० वाजेच्या सुमारास आम्ही कोकणकड्याच्या ईशान्य कातळ मार्गाला लागलो, तिथून दहा मिनीटात पहिला सोपा कातळटप्पा लागला. 



सकाळचे ९-४०: 
दुसर्‍या कातळ टप्प्याजवळ माझा प्रवेश झाला तोवर काशिनाथने वरच्या झाडाला दोर लाऊन सहा सात जणांना वर घेतले होते. दोर शिवाय वर येता येते हे त्याने सांगितले, माझ्याकडे ५० फुटाचा दोर होता, तेव्हा एकाने बॅगा वर घ्यायच्या व दुसर्‍याने माणसांना वर घ्यायचे असे गट प्रमुखाने ठरविले. खरोखरच हात आणि पायांना पुरेसे आधार सापडतात त्यामुळे ही छोटीशी चढाई मजेदार ठरली. काशिनाथने झाडाला केलेले अँकरिंग बघून समाधान वाटले. मुंबई, पुण्यातील गिर्यारोहकांच्या सानिध्यात राहून गिर्यारोहणातले तंत्र ही मंडळी उत्तमरित्या शिकली आहे. 
११-०० वाजता हा टप्पा पार करून वरच्या उंबराच्या सावलीत जिथे एका वेळेस मुश्कीलीने पाच सहा जण थांबू शकतात, असे सुंदरशा ठिकाणी थोडी पोटपूजा करण्याचा योग आला. तिथून आता नळीचा शेवटचा कातळटप्पा दहा मिनीटांच्या अंतरावर. 'हा देखिल दोर न लावता चढता येतो', मॅरेथॉनपटू डॉ. विजय नेमाडेंनी त्याची प्रात्यक्षिके करून दाखविली. 
या ठिकाणी पुन्हा एकदा ताज्या ताज्या लिंबुपाण्याचा लाभ झाला. पाचनईचे आणखी एक ग्रहस्थ काचेच्या मोठ्या ग्लासात लिंबूपाणी तयार करून देत होते. हे ग्लास धुवून स्वच्छ करण्यासाठी त्यांनी दोन भांड्यात पाणी आणले होते. हे पाणी अर्थातच हरिश्चंद्रेश्वर मंदिरातले. खरेदी आणि विक्रीच्या मध्ये एक रेषा असते ती 'अनोखी...कष्टप्रद...मजेदार...काम भागविणारी...दाम मिळवून देणारी', कोणत्याही एका किंवा सगळ्या दृष्टीकोणातून त्याकडे बघितले जाऊ शकते. जगातल्या काही सर्वात अनोख्या व्यावसायातला हा एक व्यवसा, हे मात्र नक्की!
आता नळीच्या वाटेचा दगड धोंड्यांचा मार्ग संपण्याच्या बेतात होता. नळीची वाट म्हणजे डोंगराचे मोठ मोठे दगड, शिळा एका अरूंदशा धारेतून पाणी वाहत जावे तशा खाली वाहण्याच्या अविर्भावात निश्चीत भासतात. त्यांना पाण्यासारखा प्रवाह नसला तरी हळूहळू त्यांचा तळापर्यंत कुर्मगती प्रवास सुरू असतो, त्यामुळेच हा मार्ग नेहमी अस्थिर असतो. संपुर्ण डोंगरावर याच भागात हा चमत्कार! तो आमच्या पूरता आज संपणार होता. 
कातळाला एक छोटासा वळसा घेऊन प्रथमच पायाखाली माती आल्याचे जाणवले. एक वीस पंचवीस फुटाचा घसारा पार करून वर गेल्यावर नाफ्ता आणि त्याचे नेढे अशा सुखावणारे चित्राने आमचे स्वागत केले. येथपासून हिरवेगार झुडपी वन लक्ष वेधून घेत होते. उन्हात सतत चढाई केलेल्या काहीली झालेल्या जिवाला इथला गारवा म्हणजे चित्राची दुसरीच बाजी. दगड, धोंड्यांच्या तिव्र चढाच्या नदीमार्गाने चढाई जसजशी वर जात होती, तसतशी दमछाक वाढत होती. त्यामुळे गारवा जाणवत असला तरी दमछाक अजून तास दिड तास तरी सुरू राहणार होती. 

सभोवतालचे नाफ्ता, कलाडगड, भैरवगड, घनचक्कर, कात्रा, गवळदेव, आजोबा डोंगरांची ओळख पटवून आम्ही २५ मिनीटात एका लहानशा पठारावर पोहोचलो. आजचा दिवस हा रोहीदासच्या डोंगराचे अनेक कोनातून दर्शन घेण्याचा होता. तो आनंद असा सहजीसहजी वाट्याला येत नसतो. येथे दाट  झाडीच्या सावलीत पोहोचल्यावर सोबत आणलेल्या विविध पदार्थांवर ताव मारत, सोबतचे पाणी यथेच्छ पिऊन झाल्यावर १२-४५ वाजता आम्ही शेवटच्या छोट्याशा चढणीला लागलो आणि दहा मिनीटात कोकणकड्याच्या सपाटीला लागलो. येथे एक बुरूजाचे अवशेष विखुरलेल्या स्थितीत होते.
तारामतीचे शिखर आता डोकावत होते. पुढच्या काही मिनीटात कोकणकडा नावाचा चमत्कार पुन्हा एकदा नजरेत समावणार होता. कोकणकड्याच्या मध्यमार्गाजवळून प्रस्तरावरोहण (रॅपलिंग) म्हणजे कमरेला दोर बांधून दरीत उतरण्याचा उपक्रम सुरू होता. सर्वसामान्यांना कोकणकडा इतका जवळून आणि तोही इतक्या रोमांचक पद्दतीने बघण्याची संधी त्यामुळे मिळते. साधारणपणे एक किलो मिटरचा आणि पायथ्यापासून ३००० फुट उंचीच्या या कड्यावर सुमारे १८०० फुटांचे प्रस्तरावरोहण गेल्या काही वर्षांपासून कमालीचे लोकप्रिय ठरले आहे. जे लोक गिर्यारोहण करू शकत नाही, अशांना सुरक्षितपणे डोंगरावरून खाली उतरविण्याचा हा साहसी क्रीडा प्रकार. यात धोके मात्र भरपूर असतात. कोणत्या वेळी कशा प्रकारची स्थिती निर्माण होईल हे सांगता येत नाही. त्यासाठी कृत्रिम गिर्यारोहणाच्या तांत्रिक ज्ञानासोबतच असे उपक्रम आयोजित करण्याचा अनूभव आवश्यक असते. साधारण १००० फुटाच्या टप्प्यावर सहभागींना उतरवले जात होते. तिथून दुसर्‍या टप्प्याचे ८०० फुटाचे प्रस्तरोवरोहण. ते केले की, साधारण तीन तास जंगल आणि मोठमोठ्या शिळा असलेल्या नदीतून प्रवास करून ही मंडळी बेलपाड्याला पोहोचते. 

तलावाचे मुख्यस्त्रोत असलेल्या ओढ्यावरची बंधार्‍याची भिंत कोसळली आहे...

पाठ कुठे टेकलीयं?
आमची कन्या गार्गी हिची पहिलीच हरिश्चंद्रगड भेट असल्याने तिला कोकणकड्याचे दिव्य दर्शन घडले. त्यानंतर आम्ही ओढ्या लगतच्या झाडाच्या सावलीत दुपारच्या जेवणाकरिता विसावलेल्या आमच्या चमूत सामिल झालो. बेलपाड्यावरून कमा पोकळा यांच्याकडून पिठलं आणि तांदळाच्या भाकरी बांधन घेतल्या होत्या, परंतू सतत पाणी पिल्यामुळे जेवण काही जात नव्हते. बाकी मंडली मात्र सफरचंद, चिक्की, खजूर, लाडू, असे विविध पदार्थ सादर करत होती. पोटपूजा आटोपून आमच्यात जे प्रथमच या ठिकाणी आले आहेत त्यांना तारामतीच्या शिखराकडे रवाना करून आम्ही आठ दहा जणांनी झाडाच्या सावलीत मस्त ताणून देण्यासाठी जमिनीला पाठ टेकवली. 


बशी सारखा आकार
वेस्टर्न ट्रेकर्स संस्थेच्या प्रस्तरावरोहण मोहिमेकरिता बरेच सहभागी आले होते. आसपासच्या झोपड्यात त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या मोठ्याने बोलण्यामुळे झोप काही लागत नव्हती.
पुण्याचे आर्किटेक्ट केळकर हे ईशान्य दिशेकडे गेले, परतल्यावर त्यांनी हा तलाव असावा अशी शक्यता बोलून दाखवली. समोरच्या बाजुला तलावाच्या भिंतीचे दगड बघितल्याचे त्यांनी सांगितले. लागोलाग मी व मोहिम प्रमुख डॉ. हेमंत बोरसे आम्ही चाचपणी केली तेव्हा खरोखरच ओढ्याच्या मोठ्या प्रवाहावर दोन चौकोनात तासलेल्या लंबाकृती शिळा दिसल्या. त्याच्या आजुबाजूला आणखी काही चौकानी तासलेल्या शिळा इस्तत: विखुरलेल्या दिसल्या.  

कोकणकड्याकडे जाताना तारामतीच्या खालच्या पठारी भागातून आग्नेय बाजूने एक ओढ्यचा प्रवाह आहे, या प्रवाहाचे पाणी या तलावाचा मुख्य स्त्रोत आहे. याचा आकार बशी सारखा असून तळाला तो खोलगट आहे. पूर्व बाजूने दगडांची भली मोठी भिंत बांधण्यात आली आहे. ही भिंत सोडल्यास बाकी सगळे काठ हे नैसर्गिक आहेत. त्या भिंतीच्या चिरांना झाडी झुडपांनी वेढल्यामुळे ती लक्षात येत नाही.


पुरातन बंधारा मुक्कामाचे ठिकाण?
वर्तुळाकार अशा नैसर्गिक खोलकट भागाला घातलेला हा पुरातन बांध असून आसपासचे इतरही प्रवाह यात येऊन मिळतात. या भागात पावसाचे खुप जास्त प्रमाण असल्याने तो लवकर भरून त्याचे जास्तीचे पाणी त्या भिंतीवरून वाहून जाण्याची त्या काळी व्यवस्था केली असावी. गडाच्या एकुण विस्ताराच्या मानाने हा बंधारा छोटा असला तरी हरिश्चंद्रेश्वर मंदिरा समोर असलेल्या सप्ततीर्थाचा शंभरपट जास्त पाणीसाठविण्याची याची क्षमता असावी. पुरातत्व विभागाने किंवा जिज्ञासूंनी या तलावाचा अभ्यास केला तर त्याच्या पोटात दडलेल्या गाळात न जाणो कुठल्याशा जुन्या इतिहासाचे काही संदर्भ मिळू शकतील. दुर्दैवाने त्याचे महत्व न समजल्याने या ठिकाणी आता पर्यटकांचे तंबु लागतात. 

मधल्या काळात वनखात्याने हरिश्चंद्रगडावर भेट देण्यासाठी येणारे लोक प्लास्टिकचा कचरा अफाट प्रमाणेवर इस्तत: फेकून पर्यावरणाची हानी करतात ही सबब सांगून गडावर रात्रीच्या मुक्कामीची बंदी घोषित केली होती. ती बंदी कधी उठविली? नियमीत व सर्व नियमांचे पालन करून ट्रेक करणार्‍या भटक्यांना अजून पर्यंत यांची माहिती कळविण्यात आलेली नाही. पायथ्याला मात्र सूर्योदय ते सूर्यास्त इतकाच वेळ गडावर राहता येइल, असे दोन फलक आहेत. त्यामुळेच नळीच्या वाटेसारखी खडतर चढाई केल्यानंतर आम्ही गडावर मुक्कामाचे नियोजन केले नव्हते. आदल्या दिवशी मात्र येथे हजार लोक मुक्कामाला होते अशी माहिती मिळाली. ही संख्या किमान पाचशे तरी असावी. या सगळ्यांचे तंबु या प्राचीन बंधार्‍याच्या पात्रातच लागले होते हे विशेष.







कोकणकड्या लगत काही वर्षांपर्यंत या भागात कार्वीची उंच व जाड बुंधा असलेली प्रजाती बघायल मिळायची. हा बुंधा माणसाच्या मनगटा इतका जाड असायचा. यंदा ती कारवी दिसली नाही.  आमची गड सोडण्याची वेळ समीप आली होती. ३-३७ वाजता हरिश्चंद्रेश्वर मंदिर परिसरात पोहलो. या परिसरातली भग्न मंदिरे व पुरातत्वीय भग्नावशेषातही मन पार रमून जाते. तासभर या परिसरात व्यतित केल्यानंतर आम्ही पाचनईला पोहोचलो तेव्हा अंधार दाटला होता. तिथे एक गृहस्थ सांगत होता, त्यांचे पाहुणे गडावर आहेत, त्यांना नीट दित नाही, त्यांचा गडावर कोणी तरी चष्मा फोडला. येथे फोनला रेंज नाही, अशी चिंता त्यांनी प्रकट केली.

गडावर आमच्या नंतर भरपूर संख्येने लोक जाताना दिसत होते. वरती भोजन व मुक्कामाची सोय असल्याने बाबांना भरपूर सोबत राहील. रात्र आज गडावरच जाणार असा विचार करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, तोच खबर आली की, हरिश्चंद्रगडावर ट्रेकर्स अडकुन पडलेत. ही बातमी एका वृत्तवाहिनीवर प्रसारीत होत होती. आमचाही वीस जणांचाच गट असल्याने आमच्या मित्रांपैकी काहींनी, तुम्ही सुखरूप आहात ना? अशी विचारणा केली.

थोड्याच वेळात स्पष्ट झाले की, कोकणकड्यवर प्रस्तरारोहण करण्यार्‍यातील काही मंडळी ही १००० फुटाच्या टप्प्यावरच अडकून पडली. आम्ही आयोजकांपैकी एकाशी चर्चा करताना, सहभागींना पहिला टप्पा उतरवून, दुसरा टप्पा उतरवून बेलपाड्यात पाठवताना अता अंधार दाटेल अशी शंकाही उपस्थित केली होती. दुसर्‍यादिवशी त्यांना मदत व शोध पथकाच्या मदतीने काढण्यात आले, ही बचाव मोहिम सायंकाळ पर्यंत सुरू असल्याची माहिती मिळाली. 

अभ्यासकांच्या मते यादव, सातवाहन काळाच्या काळात हा गड नावारूपाला होता. पुराणातले काशीमहात्म्य, दक्षिणप्रयोग महात्म्य, देवी भागवत, विष्णूपूराण, स्कंदपूराण, मत्स्य पुराण, पद्मपुराण, अग्नीपुराणादी काव्यात हरिश्चंद्रगडाचा उल्लेख असल्याचे निरीक्षण ज्यष्ठे अभ्यासक दिवंगत रा.चिं.ढेरे यांनी नोंदविले आहे. 

डॉ. वा.वि.मिराशी यांनी आपल्या टिपणात हरिश्चंद्रगडाच्या नावाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी नाशिकच्या अंजनेरी येथे भोगशक्ती राजाच्या काळातील दोन ताम्रपटांचा उल्लेख केला आहे. या पैकी एक ताम्रपट इसवी सनाच्या आठव्या शतकातला असून त्यात जयपूर नगरातील यात्रेकरिता व मंदिरे, अन्नछत्राकरिता नाशिक जिल्हा व उत्तर कोकण भागातील काही प्रदेशावर कर बसविण्याचे निर्देश आहेत. दुसर्‍या ताम्रपटात कालउल्लेख नाही, त्यात समगिरिपट्टानातील व्यापार्‍यास दिलेल्या काही सवलतींचा व तेथील गुन्हेगारांना दिलेल्या जाणार्‍या दंडात्मक शिक्षेचे निर्देश आहेत. या ताम्रपटात स्वामीचंद्र-सिंहवर्मन-भोगशक्ती अशी वंशावळ दिलेली असून स्वामीचंद्राला 'हरिश्चंद्रवंशस्यालंकारभूत:' असे विशेषण लावले आहे. मिराशींच्या मते हरिश्चंद्र हा पौराणिक राजा नसावा, तर खरोखरच भोगशक्तीचा वंशज असावा. त्याने हरिश्चंद्रगडावरचे शिवालय बांधून तेथे प्रतिष्ठापना केलेल्या शिवलिंगाला आपले नाव दिले असावे. 
ढेरे म्हणतात त्या प्रमाणे भारताच्या प्राचीन इतिहासात देवालये बांधणार्‍यांनी त्यास आपली नावे दिल्याची उदाहरणे आहेत. 

अंजनेरी समोरचे शिवलिंग साधर्म्या साधणारे
काही वर्षांपूर्वी आम्ही अंजनेरी समोरच्या एका टेकडीवर पॅराग्लायडींगकरिता गेलो होतो. या टेकडीवर एक छोटेसे कातळातले कुंड होते, त्याला स्थानिक मंडळी सीतेने तेथे आंघोळ केल्याने त्यास सीता कुंड असे म्हणतात अशी माहिती दिली. या कुडाच्या लगत असलेल्या ओळ्याच्या उत्तर बाजुला कातळात एक शिवलिंग कोरलेले दिसले हे शिवलिंग हरिश्चंद्र मंदिरातल्या शिवलिंगाशी साधर्म्या साधणे आहे. जर खरोखरच भोगशक्ती राजवंशाकडून हरिश्चंद्रगडावरचे शिवालय बांधण्यात आले असेल तर या दोन शिवलिंगातली साधर्मे लक्षात घेण्या जोगी आहेत. 

ब्रिटिश संशोधक डब्ल्यू.एफ.सिंक्लेर यांनी दी इंडियन अँटिक्वेरीच्या पाचव्या खंडात हरिश्चंद्रगडाची भव्यता, कोकणकडा, तारामतीचे शिखर, गडावरील विस्तृत पठार, लेणी, मंदिरे, समाध्या व इतर अवशेषांचे धावते पण नेमके वर्णन केल्याचे निरीक्षण ढेरेंनी नोंदविले आहे. हा खंड माझ्या वाचनात आलेला नाही, त्यामुळे कोकणकड्याच्या तलावाचा त्यात उल्लेख आहे की नाही, हे कळायल मार्ग नाही, परंतू या खंडाची सविस्तर माहिती ढेरे देतात त्यात कोकणकड्यावरच्या विशाल बशीच्या आकाराच्या मात्र तलावाबद्दल त्यांनी लिहीले नाही. ढेरेंनी प्रख्यात पुरातत्वज्ज्ञ जेम्स फर्ग्यूसन व प्रख्यात शिल्पज्ज्ञ जेम्स बर्जेस ज्यांनी हरिश्चंद्रगडावरच्या पुरातत्वीय अवशेषांची, मंदिरे, लेणी आदी सर्व माहिती संशोधकीय दृष्टीतून बारीक सारीक वर्णनासह, 'भारतातील गुंफा मंदिरावरच्या बृहदग्रंथात नोंदविली आहे त्याचाही आढावा आपल्या लेखात घेतला आहे, त्यातही त्यांनी कोकणकड्यावरच्या तलावाचा उल्लेख केलेला नाही. तो त्यांच्याकडून राहून गेला की, फर्ग्युसन, बर्जेस यांनी संशोधन केले त्यावेळी तो झाडी झुडपांच्या आड दडून होता हे कळायला मार्ग नाही. 

या दोन लिखाणांच्या प्रती हाती आल्यावर त्यावर अधिक प्रकाश पडू शकेल. तुर्तास तरी असेच दिसते की, एकतर कोकडकड्यावरचा हा मोठा बशीच्या आकाराचा तलाव अभ्यासकांना, पुरातत्ववेत्त्याना एकतर ठाऊक नाही, किंवा त्यांच्याकडे त्या संदर्भात माहिती असूनही त्याचे जतन, जिर्णोद्धार करण्याची कोणी तसदी घेतली नाही. त्यामुळे इतिहासातला अनमोल ठेवा आज अक्षरश: गाळ बनून दडला गेला आहे. त्यावरची धुळ कोणी झटकेल का?
https://www.facebook.com/SahyadriTrekkersBloggers/