Monday, December 2, 2024

अंजनेरी एक धावती मोहिम

 



पावणे दोन किलोमीटरची चाल आणि समुद्र सपाटीपासूनची 900 मीटर पर्यंतची चढाई, 11 जणांचे डोंगर बचाव दल आता, पाठीमागे वाघ लागल्यागत झपाझप पावले उचलत हे दुहेरी आव्हान पेलत रात्रीच्या अंधारात महादेवाच्या डोंगराच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. थंडी तर मी म्हणत होती आणि जोडीस गार वारा...

अंजनेरी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत वैनते गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेचं डोंगर बचाव दल सलग तिसऱ्या वर्षी सहभागी होत होते, सहभाग होता तो कुठल्या धावपटूला काही इजा झाल्यास त्याला तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी, सोबत गिर्यारोहणाचे साहित्य, प्रथमोचार आणि काही फोल्डिंग स्ट्रेचर असं हे प्रशिक्षित डोंगर बचाव दल. नाशिकची ग्रेप कौंटी ही संस्था गेल्या काही वर्षांपासून अंजनेरी हिल मॅरेथॉन ही लांब पल्ल्याची धावण्याची स्पर्धा आयोजित करत आहे. साधारणपणे हजार ते पंधराशे च्या घरात स्पर्धकांचा यात सहभाग असतात, राज्याच्या तसेच देशाच्या विविध भागातून स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात. आमच्या पथकाकडे जबाबदारी होती ती महादेवाच्या डोंगराच्या अवघडशा कड्याजवळ सज्ज राहण्याची, त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाची नोंद ठेवण्याची. मध्यरात्री सव्वा तीनच्या सुमारास नाशिक शहरातून या पथकातील जो तो आपापल्या घरातून निघाला होता, थंडी चांगलीच पडलेली होती, आदल्या दिवशी तर ८.१ अंश सेल्सिअस असं चांगलंच थंडगार तापमान होतं, काल रविवारीही 10 डिग्रीच्या घरात तापमाना असावं. सव्वा पाच वाजता पन्नास किलोमीटरची स्पर्धा सुरू होणार होती, यात सात धावपटूंचा सहभाग होता. त्यानंतर 30 किलोमीटर शर्यतीचे स्पर्धक या भागातून जाणार होते, स्वाभाविकपणे आमचं बचाव दल महादेवाच्या डोंगराच्या सर्वोच्च माथ्यापासून अवघ्या 40 ते 50 मीटर अंतराच्या ठिकाणी स्पर्धा सुरू होण्याच्या आत दाखल होणं कर्म प्राप्त होतं. आयोजकांनी आमची स्पर्धेच्या ठिकाणी आदल्या दिलशीच राहण्याची व्यवस्था केली होती, परंतु बचाव दलातील काही सदस्य हे वेगवेगळ्या मोहिमांवर असल्याने स्पर्धेच्या ठिकाणी आदल्या दिवशी मुक्कामी जाण्याचा बेत रहित करावा लागला आणि स्पर्धेच्या दिवशी मध्यरात्री नाशिक वरून निघण्याचं नियोजन करावं लागलं. यात मोठी जोखीम होती, वेळेची गणित काटेकोरपणे पाळावी लागणार होती, अगदी मध्यरात्री उठून आणि स्पर्धा स्थळ गाठायचं, सोबत लागणारे साहित्य टेबल पाण्याच्या बाटल्या नाश्ता इत्यादी घेऊन पावणे पाच वाजेच्या आत अंजनेरीच्या नवऱ्या सुळक्याच्या समोर असलेल्या महादेवाच्या डोंगराच्या उत्तर बाजूला सर्वोच्च माथ्याजवळ दाखल होण्याचं. अखेरीस स्पर्धा सुरू व्हायला अवघे वीस मिनिटे उरलेली असताना आम्ही आम्हाला लागणारे सामान ताब्यात घेऊन आमच्या गाड्या नाशिक त्रंबक मार्गावरील पहिले बेझे फाट्यावरून दामटत पुढे नेल्या आणि हनुमान टेकडी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बेझे घाटात मोबाईल टॉवरच्या जवळ विद्युत मंडळाच्या आवाराच्या बाहेर उभ्या केल्या. तोच ढोल पथकाचे आवाज कानी पडले स्पर्धा सुरू झाली. आता आमच्या कडे अजिबातच वेळ उरला नव्हता, आम्हाला अक्षरशः धावत जाऊन महादेवाच्या डोंगराचा सर्वोच्च माथा जवळ करायच् होता.
आपण जेव्हा एखाद्या उपक्रमासाठी डोंगरावर जातो तेव्हा स्वाभाविकपणे, शिवकाळात स्वराज्य रक्षण करणाऱ्या मावळ्यांची एखाद्या युद्धप्रसंगात कोण लगबग होत असेल याचे विचार मनात यायला लागतात. 'आपल्याला काहीतरी कामगिरी आपल्या सेनापतीने दिलेली आहे आणि आपल्याला वेळेत डोंगरावरचे एखादे ठिकाण गाठून चौकी सांभाळायची आहे आणि गनिम मागे लागला आहे', आता धावाधाव करण्या वाचून गत्यंतर नाही', अशी कल्पना काही क्षण डोकावून गेली. आणि खरोखरच अंजनेरीच्या परिसरात असे कित्येक युद्धाचे प्रसंग आपल्या स्वराज्यरक्षकांनी इतिहासात कितीतरी वेळा बघितले असतील. शिवकाळात तर अशा घटना नक्कीच घडलेल्यात, इतिहासात तर गणेश गावची लढाई रामशेज च्या युद्धाच्या वेळी खाशी प्रसिद्ध...

आमच्यापैकी निम्म्या अधिक जणांनी चहा देखील घेण्याची उसंत मिळाली नव्हता, अन्यथा एवढ्या थंडीत खरं तर चहा तरतरी आणणारे हलकेसे गरम उत्तेजक ठरतो, परंतु आमचं वेळेचं गणित अगदी काटेकोर असल्याने ते शक्य झालं नाही. बेझाच्या घाटात आमच्यासाठी काही सामान काढून ठेवण्यात आलं होते ते ताब्यात घेतलंर गावातल्या चार मदतनीसंना सूचना केल्या, त्यात बहुमोल असे पाच मिनिटे गेली, त्यानंतर मात्र आम्हीच स्पर्धक आहोत अशा बेताने झपाझप पावले उचलत हनुमानाच्या डोंगराच्या जंगलातून मार्गक्रमण सुरू केले. आमच्यापैकी निम्म्या जणांनी हा परिसर यापूर्वी बघितला होता तर काहीजण प्रथमच सहभागी झाले होते. बॅटरीच्या उजेडात मळलेली वाट शोधण्यात कुठली अडचण नव्हती थोडसं अंतर चालतो न चालतो तोच दुरून ढोलचे आवाज कानावर पडले. आमच्या वाॅकी वर 30 किलोमीटरची स्पर्धा सुरू झाल्याचा आगाज झाला. आता आमचा चालण्याचा वेग अधिकच वाढला. ते १.४२ किलो मिटरचं अंतर भरं अंधारात आम्ही कसं पार केलं हे आम्हाला आमचं आम्हाला कळलं नाही परंतु आम्ही घेतलेलं आव्हान पूर्ण झालेलं होतं, पहिला स्पर्धक येण्याच्या आत आम्ही आमच्या ठिकाणावर येऊन पोहोचलो होतो. महादेवाच्या डोंगराचं हे ठिकाण म्हणजे भरपूर गवताळ आणि मोठ्या उताराचं, इथे गिर्यारोहणाचे बूट देखील सटकत होते एवढ एवढा हा उतार होता. आम्ही आमचा टेबल लावून आणि सोबत आणलेले साहित्य व्यवस्थितपणे एका ठिकाणी रचून स्पर्धकांची वाट पाहू लागलो. पूर्वेला आकाशात किंचितशी लाली आलेली होती, तोच अंधुकश्या प्रकाशात एक स्पर्धक जंगलातून धावत वर येताना दृष्टीस पडला. हा नक्कीच पन्नास किलोमीटर शर्यतीचा स्पर्धक असणार! प्रत्यक्षात तो 50 किलो मिटरचूया स्पर्धकांना मागे टाकून पुढे आलेला 30 किलोमीटर शर्यतीचा स्पर्धक निघाला, भले शाब्बास! हा मोठा आनंदाचा क्षण होता, तो स्पर्धक आमच्या जवळ आला त्याला आम्ही उजवीकडे कडून डोंगराला वळसा घालून जाण्यास सांगितले तसा तो आश्चर्य वाटावं एवढ्या सुंदर वेगाने धावत सुमारे अर्धा किलोमीटर  सर्वोच्च माथ्याचं वर्तुळाकार वळण पूर्ण करून पुन्हा आमच्याकडे आला आणि खाली उतरून बेझे घाटाच्या दिशेने जंगलात दिसेनासा झाला. त्यानंतर मग थोड्या थोड्या वेळाने एक एक स्पर्धक येत होते, आम्ही मात्र आता पूरते स्थिरावलो होतो. आज सकाळी आमचीच मॅरेथॉन स्पर्धा झाली म्हणून एकमेकांवर दात काढत भल्या थंडीत कुड कुड वाजणाऱ्या दातांना हरवत होतो.

आमच्या या चौकी वजा टप्प्यावर पन्नास किलोमीटर शर्यतीचे स्पर्धक दोनदा येऊन जाणार होते, अशी दोन आवर्तने पूर्ण झाल्यानंतर मग आम्ही हनुमान टेकडी उर्फ महादेवाच्या डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो, त्या ठिकाणी देवाचे ठाण दिसलं, एक नव्यानेच घडवलेला नंदी, दगडात कोरलेले जुने शिवलिंग, सप्त मातृकांत सारख्या दगडात शेंदूर फासलेल्या अनगड प्रतिमा आणि एक अतिशय देखणी अशी जुन्या काळातली मूर्ती, त्रिशूल आणि नाग यावरून ती शंकराची असावी आणि या मूर्तीच्या पायथ्याला दोन स्त्री प्रतिमा दिसल्या, अर्थात ही मूर्ती या ठिकाणची नसावी ती अंजनेरी परिसरातून इथे आणून बसविण्यात आली असावी, कारण अंजनेरीच्या पायथ्याला एक सुंदर असा प्राचीन मंदिर समूह भग्न अवस्थेत असून तिथे अशा अनेक जुन्या देखण्या सुबक मुर्त्या आजही बघायला मिळतात.
इथून त्रंबक डोंगर रांगेचा बऱ्यापैकी परिसर दृष्टीस पडतो. प्रचंड धुसर वातावरणातही अंजनेरीचा तो अक्राळ पसारा नजरेत भरत होता. त्याच्या उजव्या बाजूला पहिने खिंड डाव्या बाजूला तर डावीकडे पाचा डोंगराचे ते पाच उंचवटे. पेगलनाडीला लागून असलेली ब्रह्मगिरीची खालच्या टप्प्यातील पाच शिखरे कोधळा मोधळा (ज्यावरच्या सुळक्यांना गिर्यारोहक संडे वन, संडे टू पिनॅकल म्हणून संबोधतात), सीता गुंफा कार्वी आणि तळई ही शिखरे, आणि त्याच्याच वरच्या बाजूस ब्रह्मगिरी डोंगराची ती पुराण प्रसिद्ध पाच शिखरे यांना पंचलिंग म्हणूनही ओळखलं जातं ते तत्पुरुष अघोर ईशान व बामदेव आणि सद्योजात. या पाच शिखरे यावरून पाच नद्या उगम पावतात, त्यातली दक्षिण भारतातली सर्वात मोठी गोदावरी तर मुंबापुरीला सदोदित जल आपूर्ति करून देणारी वैतरणा नदी. त्याच्या उजव्या बाजूलाच दुर्ग भांडार आणि मागे डोकावणारा ब्रम्ह्याचा डोंगर असा तो छानसा नजारा मनामध्ये साठवून आम्ही या छोट्याशा मोहिमेच्या उत्तम स्मृती घेऊन पाय डोंगरावरून उतार झालो.


जय हो

-:प्रशांत परदेशी
२\११\२०२४


































No comments:

Post a Comment