Wednesday, September 18, 2019

साल्हेर साल्हेर राहो


साल्हेरशी खरोखरच असे खेळले जाऊ नये. महाराष्ट्रातला हा सर्वात उंच किल्ला आहे. तिथला इतिहास अजोड आहे. तिथली जैवविविधता बेजोड आहे. विकासाचे भलतेच वारे त्याचा लौकिक धुलिस मिळवू शकते. येणार्‍या पिढ्यांसाठी याचा इतिहास आणि भूगोल शिल्लक तर ठेवाल! याचे भान नाही ठेवले तर महाराष्ट्राच्या इतिहासात हा मोठा आत्मघात ठरेल.
साल्हेर साल्हेर राहो
साल्हेरची जैवविविधता थक्क करणारी आहे. खरे तर सारा सह्यद्री जगातले जैवविविधतेचे अनोखे ठिकाण आहे. तिथल्या जैवविविधतेला मानवी विकासाची बाधा झाल्यामुळे ती कमालीची धोक्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने दहा वर्षांपूर्वीच त्यास जैवविविधतेस सर्वाधिक धोका पोहोचलेल्या जगातील ६४ स्थळांपैकी ७वे सर्वात बाधित स्थळ म्हणून घोषित केले आहे. जगभरातील अभ्यासकांच्या ठायी सह्याद्रीतून अनेक जिव हद्दपार होत आहेत. वाघ, हत्ती सारखे मोठे जीव आता केवळ नावा पूरतेच उरले आहेत. सिंह, चिते नामशेष झाले आहेत. लहान जीवांची तर गणनाच नाही. असे असताना नुकतेच महाराष्ट्रातल्या शंभरएक किल्ल्यावर पर्यटनस्थळ उभारण्याचा मनोदय महाराष्ट्र सरकारने व्यक्त केले आहे. तिथे हॉटेल थाटणार. लग्न सोहळे रंगणार या बातम्या मन सुन्न करणार्‍या आहेत.


सद्या साल्हेरवर पावसाळी फुलांचा मेळा भरला आहे. संपुर्ण साल्हेर हा जांभळ्या गुलाबी, तेरड्याने सजला आहे. अक्षरश: लाखोंच्या संख्येने तेरडा फुलला आहे.  वरच्या टप्प्यात पिवळी फुले आहेत. गडमाथ्याच्या भोवती फिकट निळी रानफुले आहेत. तर रेणूका मातेच्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर गुलाबी, पांढरी फुले फुलली आहेत.
कोणे एके काळी साल्हेरला घनदाट जंगल होते. ते आता पुर्णपणे नामशेष झाले आहे. याची सुरूवात केली ती इंग्रजांनी. तिवस हे जगाच्या पाठीवर साल्हेर परिसरातच आढळायचे. अतिशय टणक लाकुड देणार्‍या या झाडाची इंग्रजांनी रेल्वेचे स्लिपर्स बनविण्यासाठी तुफान कत्तल केली. परिसरातल्या लाकुडतोड्यांनी त्याची इतकी कत्तल केली की, अनमोल असा तिवस आता शोधायचे म्हटले तर दिसत नाही. मानवी वरवंट्यात फक्त तिवस सापडला नाही, बागलाणच्या या गौरवशाली जंगलाची इतकी अफाट प्रमाणावर तोड झाली की, सह्याद्रीतले सगळ्यात उंच डोंगर असूनही आज हा परिसर पावसाला पारखा झाला आहे. मोजक्याच भागात चांगला पाऊस होतो. आता उरली सुरली जैव संपन्नता सरकारच्या अशा प्रयत्नांनी नष्ट होणार हे सांगायला कोण्या कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही.

साल्हेरचे दरवाजे शाबूत आहेत. जुन्या हिंदू राजांनी कातळात देखणे शिल्प कोरून हे दरवाजे बनवलेत. सुंदरशा गुहा खोदल्यात. गडाला देखण्या पायर्‍यांची गडाला वाट आहे. कित्येक तळी, टाकी आहेत. त्याचा इतिहास, त्यावरची पाने, फुल अशा पद्धतीनेसंवर्धन केले जाऊ शकतात की सार्‍या जगाला हेवा वाटावा. पुरातत्व विभागाने दोन वर्षांपूर्वीच शासनाला महाराष्ट्रातील १८ गडांची सूची संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी पाठविली होती. प्राथमिक अधिसूचित साल्हेर, धोडप (नाशिक), पारगड, गगनगड, कलानंदीगड, पावनगड, सामानगड (कोल्हापूर) दातेगड, वर्धनगड, भूषणगड, वंदनगड (सातारा) यांचा समावेश प्रलंबित आहे तर, अंतिम अधिसूचनेसाठी हातगड (नाशिक), लळिंग (धुळे), खर्डा (अहमदनगर), निविती (सिंधुदुर्ग), कर्नाळा, खांदेरी (रायगड), मौजे साटवलीची गढी ( रत्नागिरी) प्रलंबित आहेत.
पावसाळ्याचे चार महिना साल्हेर त्याच्यावर पाय टिकू देत नाही इतका त्यावर पाऊस असतो. त्याच्या पुरातन पायवाटा कमालीच्या निसरड्या बनलेल्या असतात. महाराष्ट्र सरकारला त्यावर पर्यटनस्थळ उभारणे सर्वथैव गैरकायदा वगैरसोयीचे ठरेल.

साल्हेरवर रिसोर्ट, हॉटेल, विवाह कार्यालये थाटण्याचा विचार न केवळ मुर्खपणाचा तो मन सुन्न करणारा आहे. तिथे काहीच बदल करता येणार नाही. केवळ पुरातत्व खात्याच्या संरक्षित स्मारके सूचित नाही म्हणून त्यावरच्या  अनमोल पुरातत्वीय अवशेषांकडे दुर्लक्ष करून सरकारला त्यावर कोणतेच बांधकाम करता येणार नाही. उलट ही सूची त्यांनी तातडीने मंजूर करावी याकरिता दुर्गप्रेमी व दुर्गसंवर्धन संस्थांनी आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ नेऊन सरकारला विनंती करावी.

साल्हेरवर रिसोर्ट, हॉटेल, विवाह कार्यालये थाटण्याचा विचार न केवळ मुर्खपणाचा तो मन सुन्न करणारा आहे. तिथे काहीच बदल करता येणार नाही. हजार कोटी रूपये खर्च केले तरी जुने वैभव वागवणारे बांधकाम पुन्हा निर्माण करता येणार नाही. मग त्यात गडाच्या सौंदर्याला, तिथल्या इतिहासाला बाधा आणील असे आजच्या पद्धतीचे काम करून कसे चालेल.
गडाची दगडीवाट नविन बांधकाम न करता दुरूस्त करावी. पायवाट ही दगड गोटे काढून थोडी स्वच्छ करावी. गडावरच्या गुहा, मंदिरे लेणी हे झाडलोट करून स्वच्छ करण्याची व्यस्था बसवावी. गडावर आजवर बसवलेले मार्गदर्शन फलक, दिशादर्शक बाण आदी काहीच टिकू शकले नाहीत इतके तिथले प्रतिकुल हवामान आहे. तेव्हा सरकार जो काही खर्च करणार तो वायाच जाणार आहे. शिवाय तिथे उंची राहणीमान असलेली मंडळी मोठ्या संख्येने येत नाही. येथे बहुतांशी लोक अंगापिंडाने मजबूत व मनाने सह्याद्रीमय असल्यामुळे ते सगळा कुटुंब कबिला घेऊन गड पायी चढतात व उतरतात. त्यांना ना दोरवाटेची गरज आहे ना पदपाथाची ना बांधिव पायर्‍यांची. राहण्यासाठी हॉटेलची आवश्यक्ता नाही, त्या ऐवजी गुहा, मदिरे स्वच्छ वा दूरूस्त करावीत.
सटाण्यातील दुर्गवीर प्रतिष्ठानच्या प्रयत्नांनी सूर्याजी काकडेची नव्याने उजाडेत आलेली समाधी.
आधिनिक साहित्या त्यावर टिकत नाही म्हणून जुन्या पद्दतीने बांधकाम वा दुरूस्ती करावी. थोड्या खर्चात गड सावरावा. पायथ्याला वनखात्याने कित्येक छत्र्या उभ्या केल्या आहेत. त्याचा पर्यटक लाभ घेत नाहीत असे स्थानिकांचे म्हणने आहे. त्याही जिर्ण झाल्या आहेत. हा सगळा खर्च वायफळ ठरला आहे. आणखी काही कोटी ओतुन पैसा मातीमोल करण्यापेक्षा कित्येक पिढ्या इथला निसर्ग व इतिहास आठवणीत ठेवतील अशा प्रकारचा या गडाचा विकास व सुधारणा करावी.

स्थानिक लोकांतून गडाचा इतिहास व जैवविविधता याची माहिती देणारे गडमार्गदर्शक प्रशिक्षण देऊन तयार करावेत. स्थानिकांनाच जेवण नाष्ता आदी बनविण्याचे व ते स्वच्छ पणे सादर करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून द्यावा. मोठ्या हॉटेल चेनकडे किंवा केटररकडे गड देऊन काय उपयोगाचा. त्याने बाजारू पद्दतीच्या सोयी व सुविधा मिळतील. ज्या आज सर्वत्र मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहेत. साल्हेरचा लाल तांदूळ हा सुद्धा याच परिसरात आढळतो. तो रासायनिक खते न वापरता पिकवण्यास प्रोत्साहन दिले तर जगाच्या पाठीवर त्याचा डंका वाजेल.
दुर्गवीरचे कार्यकर्ते समाधीस्थळाची स्वच्छता करताना.

साल्हेर संग्रामात शिवाजी महाराजांचा महत्वाचा सरदार सूर्याजी काकडे आहे पाच एक हजार मराठ्यांसह कामी आल्याचा गौरवशाली इतिहास आहे. सूर्याजीरावांची समाधी काळाच्या उदरात हरवली होती. आजवर तिसर्‍या दरवाजानंतर लागणार्‍या सपाटीवरची समाधी ही सूर्याजी काकडेंची समाधी म्हणून मानली जात होती. त्याबद्दल सबळ असे पूरावे नव्हते. सटाण्याच्या दुर्गवीर प्रतिष्ठानने बागुल राजांच्या वंशजांशी संपर्क साधला. तिथल्या एका बुजुर्गाने सूर्याजी काकडेची समाधी कोणत्याठिकाणी होती याची माहिती दिली. त्यावरून शोध घेण्यात आला. रविवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी या समाधीची दुर्गवीर्‍या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली.
अनेक राजवटींचा या गडाला इतिहास लाभला आहे. इतिहास, पराणातील अनेक थोर मंडळींनी या गडाला भेटी दिल्याचे दाखले दिले जातात. त्यावर अभ्यास करून गडाच्या पायथ्याल दृकश्राव्य सादरीकरणाची व्यवस्था करता येऊ शकते. साल्हेर साल्हेरच राहू द्या. तो काही फक्त सर्वात उंच किल्ला नाही, महाराष्ट्राच्या इतिहासाचा, भुगोलाचा व जैवविविधतेचा तो मानबिंदू आहे.
गडनिवासिनी कालिकादेवी मंदिर परिसरात जुन्या तटबंदीलगतचा तळे

मातीत दबल्या गेलेल्या विशाल तटबंदीचे अवशेष.


दगडा जवळ सुद्धा हट्टाने उगवलेला तेरडा सर्वत्रच

तेरड्याच्या ताटव्यामागे लपलेला टकारा

पावसाळ्याचा जोम तेरडा


गडावरची प्रत्येक वाट मोहक फुलाच्या ताटव्यातून

टकार्‍यालगतचा हा कडा सूदूर तरड्याने बहरलेला

साल्हेरवाडीकडचे कडे हिरवे जांभळे बहरलेले

पहिला बुरूज साल्हेरवाडीच्या बाजूने त्याला घेराव तेरड्याचा

थोडा वेळ पांढरे ढग बाजूला होऊन स्वच्छ किरणांना वाट करून देताना

प्रत्यक्षात पहिला दरवाजा कोणी तरी कुंचल्यातून आज सजवला होता

पलिकडची कथा...पहिल्या दरवाजाच्या मागे असा स्वर्ग फुलला 

महादरवाजाचे छोटे देखणे प्रवेशद्वार

दुसर्‍या दरवाजावरचा मराठी शिलालेख

त्या शौर्याला हिरवाईची मानवंदना

फक्त आणि फक्त तेरड्यातून उलगडलेली वाट जणू टकार्‍याकडे घेऊन जातेय

आखीव नाही रेखीव नाही...इथे सगळेच मोठे कलात्मक

पाना फुलांचे साज गाठे स्वर्गाची वाट

जुनी कातळ वाट

कठिणतेची कसोटी शेवटच्या कातळद्वाराच्या उभ्या पायर्‍या

काही क्षण ढगाचा तलम पडदा सरला साल्हेरवाडीचे घ्या रम्य दर्शन

शेवटच्या दरवाजाची हिरवी छटा खास पावसाळी स्वागतासाठी 
कोणा तरी वीराने नक्कीच या दगडावर विश्राम केला असेल



काय ते वैभव...टोपली कारवीतून उलगडली वाट

टोपली कारवीच्या वाटेचा थाट

जेव्हा ही कारवी फुलेल तेव्हा.. 
यांचे कार्यक्षेत्र ठरलेले शेवटच्या दरवाजापासून माथ्यापर्यंत



शूर वीर साधूचरित वा वन्यजीवांचे पाणवठे

साल्हेरच्या गुहांच्या भेटीत लाभतात ढग सतत 
गुहेत दोनच स्तंभ एक सुंदर कोरी दुसरा साधा रूंद



कवीराज भुषणाची वंदना


साल्हेर संग्रामाचे रसदार वर्णन
यांचं ठरलय...ही निळसर फुले फक्त शेवटच्या दरवाजानंतरच दिसतात
कार्वी आणि गवताच्या मध्ये शिरकाव करून यांनी आपली जागा शोधलीय...



दभूत..अमूर्त मातीटाके फक्त मुक्या जीवांसाठीच!

गंगासागर तलावाच्या वरच्या टप्प्यातल्या डाव्या गुहेच्या दालनातला एकमात्र कोरीव खांब

गंगासागरच्या वरची गुहा उजवीकडे मारूतीची मुर्ती मध्यभागी आणि डावीकडे अशी तीन दालने

निळी पिवळी जुगंलबंदी


गंगासागर तलाव...चार महिने तो असाच ढग नी धुक्यात वेढलेला...

केवढी ही शांतता...यात रेणूगामातेची जुनी कातळकोरिव मुर्ती तर शेजारी गणपतीची मुर्ती
जुने वैभव संपलेय...आता झाडे झुडपे यास सजवताहेत...



रेणूका मंदिराच्या प्राकारात असे सुंदर नक्षिदार खांब

ही प्रजाती थोडी खास...मंदिर परिसरातच यांची आरास...

साल्हेर 'सर' केल्यावर अशी फुले दर्शनाने घालवी सारे श्रम...

सह्याद्रीत आम्ही सर्वत्र...येथू रेणूकाईच्या सेवेसी...

सजिव चित्र: ही रंगसंगती...काळ्या पाषाणावर...

यज्ञवेदी...पाषाणात...पुराणकाळाशी नाते जोडी

इथे साधे सरळ काहीच नाही...पाण्याचे टाकेही आकंठ सजलेले...
शिवश्क्तीला वंदावे...मग पाणी भरावे...उरकावी नित्य कर्मे



सवय, सराव असेल तरच: ओल्या निसरड्या पायर्‍यांमुळे..पावसाळ्यात साल्हेर धोकादायक

तिथे उन वारा पाऊस...त्यात काही टिकतच नाही...मग ही कशाची हौस!

लालसर छटा म्हणजे तेरड्याचे ताटवे... 
सूर्याजींची समाधी सापडली आहे...हे कोण वीर असतील ज्यांना मोठा मान दिला...



अनामवीरा तुझे नाव कळेल का कधी आम्हा...

जड यंत्र आलय...उरले सुरले जीव इथले पळवून तो लावणार

तट राखण्या जल हव...तेही सुंदर सजलेले... 
टोलेजंग किल्ल्याचे जलसाठेही सुंदरतम



काय सुंदर नियोजन...वर कडा सुंदर...खाली टाके अतीसुंदर


निसर्ग इतिहास प्रेमींनो तुमच्यासाठी जांभळ्या पायघड्या...

हिरवी जांभळी टवटवी...तसूभरही कमी पडणार नाही...याची दक्षता घेती ढग! 
यथेच्छ भोजन सुरू आहे...पर्यटक येण्यापूर्वी घ्या आटोपून



फुलांनी सजल्या वाटा...अवमानू नका त्या कधीच!

थांबा...पहा...येथून फक्त वन्यजीवांनाच वाटा...तुम्ही जा वळसा मारून!

कलती ताटवे हिरवी जांभळी त्यावर तलम ढगांची नक्षी

गाव घ्या पाहून शेवटचे इथून पुढे ढगात हरवत्या वाटा...

लाल फुलांची...हिरव्या मनांची...वाट वाकडी धरू नका


शोधतो मी स्वत:स...सह्यागिरीच्या स्वर्गात


मी साल्हेर बोलतोय..,

allowTransparency="true" allow="encrypted-media">


Friday, September 13, 2019

fort development fund for fort development only


ज्यांना इतिहास नाही, फक्त चार भिंतीच आहेत असे अडगळीतले किल्ले शासन ताब्यात घेणार! या वार्तेने सर्वसामान्य मराठी मन कळवळले आहे. त्यावरून गदारोळ उठला आणि वक्तव्य आले, गडांना किंचित सुद्धा धक्का लागू दिला जाणार नाही. मग वक्तव्य आले शिवाजी महाराजांच्या गडांना हात सुद्धा लावणार नाही. पंचवीस का शंभर अशी काहीशी यादी आहे, ज्यावर महाराष्ट्र शासनाला हॉटेल्स थाटायची आहेत. काही ठिकाणी उंची निवासस्थाने तर काही ठिकाणी विवाह सोहळे आयोजित करण्यासाठी सुविधा तयार करायच्या आहेत. या सगळ्या गदारोळात दोन ठिकाणहून स्थानिक आमदारांच्या हवाल्याने बातम्या आल्यात गडविकासाच्या. एक म्हणजे पेठचा कोथळीगड आणि दुसरा म्हणजे नाशिकच्या सातमाळा रांगेतला विखार्‍या किंवा इखारा किल्ला.

कोथळीगड व इखारा या किल्ल्यांच्या विकासासाठी काही कोटींच्या घरात निधी मंजूर झाला आहे. बातमीत लिहीले आहे, गडविकास करणार. आजवर हे असेच घडत आले आहे. वर्तमानपत्रात बातमी दिली जाते, गडविकासाची. प्रत्यक्षात निधी खर्च केला जातो तो गडावर रस्ता तयार करण्यासाठी. त्याठिकाणी वीज आणण्यासाठी. गडावर मुळात अस्तित्वात असलेला रस्ता तयार व दुरूस्त न करता नविनच रस्ता तयार करणे, वीजेचे खांब वर पर्यंत नेणे एवढीच गड विकासाची व्याख्या असू शकते का? गडविकासाचा तो भाग असू शकतो का? या दोन गोष्टीचा गडाच्या विकासाशी काही संबंधच नाही. सरळ का नाही म्हणत, गडावर रस्ता नेणार, घाट बांधणार, डोंगर फोडणार. वर पर्यंत वीज नेणार. पर्यटनाचे नवे स्थळ बनवणार!
याकामात गडाच्या कुठल्याच जुन्या अवशेषाचे संवर्धन होणार नाही. गडावरच्या पुराण वास्तूची ना डागडूजी होणार ना पूनर्निर्माण. ना त्याठिकाणचे जुने दगड गोळा करून त्यांवर संशोधन होणार ना त्याठिकाणी उत्खनन कार्य केले जाणार. ना गडाचा इतिहास शोधण्यासाठी अभ्यासकांना, इतिहासतज्ज्ञांना पाचारण केले जाणार. त्याठिकाणी फक्त आणि फक्त रस्ता व वीजव्यवस्थेची कामे केले जाणार जे गडाला तारक ठरतील की मारक याचा कोणता अभ्यास न करता.



सह्याद्रीतले गड हे मुळातच आपल्या कठिणतेसाठी ओळखले जातात. जगातल्या कुठल्याच ताकदवान सत्तेला त्यांचा कायमस्वरूपी ताबा घेता आलेला नाही, इतके ते बेलाग आहेत. असे म्हटले जाते की हा गौरवशाली इतिहास फक्त आणि फक्त महाराष्ट्राला लाभला आहे.
अशा गडांचे मुळ स्वरूप बदलून टाकताना कुठले संकेत पाळले जातात? याकरिता पुरातत्व संवर्धनाचे एक उदाहरण बघूया, रायगडावर सद्या विकासकामाचा एक भाग रायगड विकास प्राधिकरण सांभाळत आहे. त्यांनाही काही कोटींचा निधी मिळाला आहे. दस्तूरखुद्द संभाजीराजे छत्रपती या प्राधिकरणाचे प्रमुख या नात्याने जबाबदारी सांभाळत आहे. राज्य शासनानेच त्यांना ही जबाबदारी दिली आहे. शिवकाळात जशी बांधकामे होती तशी ती उभे करण्यावर याचा भर आहे. त्यासाठी प्राधिकरणाने आपल्या कामाला संशोधनाची जोड दिली.
सर्वात प्रथम त्यांनी गडाचा मुळ परिसर किती याचा आराखडा तयार केला. या मुळ परिसराला जोडणारा परिसर, गडाच्या वहिवाटा, त्यात येणारा खासगी मालकीचा परिसर अशी पाहणी केली.

रायगडचे क्षेत्र हे १२५० एकर
आधूनिक कॅमेर्‍यांच्या मदतीने गडाची मोजमापे घेऊन सीमारेषा अगोदर निश्चीत केल्या ज्यात त्यांना बांधकामे वा दुरस्ती, संवर्धन, उत्खनन वगैरे करायचे आहे. आमचे तर हा आकडा एकून डोळे विस्फारले, 'रायगडचे क्षेत्र हे १२५० एकर इतके आहे' (यातही मला वाटतं माची रायगडाचा समावेश नसावा. कारण पाचाड, हिरकणीवाडी या सारख्या घेर्‍यातली आज आढळणारी गावे रायगडाचीचा भाग होता व त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर सैन्यदल सहज हालचाल करता येऊ शकेल अशा बेताने तळाला माचीवर ठेवले जायचे. तसे असेल तर रायगडाचा परिसर अपेक्षेपेक्षा कितीतरी मोठा राहील).
रायगड: पायवाट विकास
प्राधिकरणाने चुन्याचे उत्तम मिश्रण बनविण्यात यश मिळवले जे गडाच्या विपरीत हवामानात दीर्घकाळ टिकू शकेल. दगड अशा पद्धतीने घडवले जे रायगडच्या शिवकालीन कामाशी मेळ साधतील. त्याचा वापर करून काही ठिकाणच्या पायर्‍या, तट व दगडी पायवाटा बनविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हत्ती तलावाची गळती शोधण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी सुरू केले आहे.
गडाचा घेरा, तटबंदी, त्याची व्यप्ती, जमिनीत जुनी बांधकामे कुठे कुठे गाडली गेलीत, कुठे ढासळली नव्या आणि जुन्या पद्धतींचा वापर करून माहिती गोळा केली जात आहे. जी कामे सुरू आहेत ती मुळ कामापेक्षा वेगळी व ठिगळबाज घडण वाटणार नाही याची ते दक्षता घेत आहेत. तरूण संवर्धन वास्तूतज्ज्ञ वरूण भामरे यांच्या कामाची झलक दोन महिन्यांपूर्वी आम्ही प्रत्यक्ष जाऊन बघितली. रायगडाचा सांगोपांग अभ्सयास असलेले ज्येष्ठ इतिहास लेखक प्रा.प्र.के.घाणेकर, गिरीष टकले, सदानंद आपटे अशी मान्यवर मंडळी त्यावेळी उपस्थित होती.
बेलाच्या पाण्यात चुना मिश्रण
तिथे एक प्रश्न विचारला गेला, शिवकाळात गडावर तीनशेहून अधिक इमारती होत्या, तुम्हाला इतका निधी मिळालाय तर, त्यातल्या काही इमारती का बांधत नाहीत, त्यावर भामरेंनी स्पष्ट केले, मुळ वास्तूचा काही आराखडा, नकाशा एखादे जुने संकल्पचित्र जोवर मिळत नाही, तोवर अशा वस्तू उभ्या केल्या जाऊ शकत नाहीत. केवळ कल्पनेने तर नाहीच नाही. भारतीय पुरातत्व नियमात तसे स्पष्टच म्हटले आहे. जगभरात हेच सूत्र लागू होते.
तांत्रिकदृष्ट्या महाराष्ट्रात सगळेच गडकिल्ले हे पुरातत्व खात्याच्या ताब्यात नसले तरी गडावरचा एकही दगड कुणाला पुरातत्व खात्याच्या परवानगी शिवाय हलवता येत नाही. तिथल्या स्थितीत कोणता बदल करता येत नाही. जर कोणाला करायचा असेल तर प्राचीन पुरावे, दाखले शोधून आणून द्यावे लागतील मगच अशा कामांना पुरातत्व विभागाकडून सुरूवात केली जाऊ शकते.

तटबंदी...इखार्‍यावरचे दुर्मिळ बांधकाम अवशेष

महाराष्ट्रात असे आजवर गडांच्या बाबतीत घडले आहे का? ज्याला मन मानेल तशी कामे केली गेलीत. अगदी पुरात्तव विभाग सुद्धा यात मागे नाही. आणि ज्यांना आपण शिवाजी महाराजांची प्रमुख वास्तव्य स्थाने म्हणतो असे शिवनेरी, रायगड, राजगड, तोरणा, प्रतापगड हे प्रमूख गड सुद्धा त्याल अपवाद नाहीत. या शिवतीर्थांवर शेकडो लोकांना सहजपणे ये जा करण्यासाठी गडाच्या वर पर्यंत रस्ते बांधले. त्यामुळे गडाचे पार गडपण हरवून टाकले गेले. तिथली वाहनतळे, फाटकी दुकाने, खाद्यपदार्थांचे ठेले पाहून आपण एखाद्या बाजारजत्रेत आल्याचा आभास होतो.

महाराष्ट्र शासन बिन इतिहास असलेले, चार भिंतीच असलेल्या गडावर विकास करणार तर तो कुठल्या आधारावर. तिथला काही इतिहासच माहित नाही तर बांधकामे कोणत्या नियमाच्या अधारे करणार, त्याचा शोध घेण्याची तसदी न घेता. यासाठी कायद्यात बदल करून आणणार आहे का?
महाराष्ट्राला इतिहास हा काय फक्त शिवकाळाच्या आसपासचाच आहे का? त्या अगोदरचा काळ तितकाच महत्वाचा. त्याचे धागेदोरे काहीच हाती नसताना अशा गडांना पोरके मानून त्यावर कामे करणार तरी कशी. तिथल्या पर्यावरणाला बाधा येईल असे कुठलेच काम करता येणार नाही. संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेल्या यादीत जैवविविधता सर्वाधिक धोक्यात आलेले संवेदनस्थळ सह्याद्री त्यामुळे अधिकच बाधित होईल हा भाग सुद्धा त्यात आहेच.
अंजनेरीच्या बाबतीत काय झाले. पर्यावरण संवेदनशील म्हणून या संपूर्ण परिसराला ना बांधकाम श्रेत्राचा दर्जा देण्यात आला होता. न्यायालयाचे सक्त आदेश कित्येक वर्षे पाळली गेलीत. मग मंत्रालयातल्या एका उच्चपदस्थाने एक डोंगरच विकत घेतला. पोटखराबा जमिन म्हणून त्याला ती खाशी स्वस्तात लाभली. मग त्याने जादुची कांडी फिरवली आणि कायद्यात बदल घडवून आणला. हे सगळे राज्यपातळीर घडले की राष्ट्रीय पातळीवर हे बाहेर कधीच आले नाही...पण त्यानंतर धडाधड शिक्षण संस्था, करमणूक केंद्र, रिसोर्ट, हॉटेलांच्या मालिका अंजनेरीच्या चहुबाजूंना तयार झाल्या आणि पर्यावरण? त्याची तर पार वासलात लागली, इतकी की, लोकांचा या परिसरात प्रचंड हस्तक्षेप वाढून वन्यजीवे हे ठिकाण सोडून गेलीत...ती जगली की मेली की त्यांचे उच्चाटन झाले? एक खरपुडीचे तर नक्कीच ज्यालाच सेरेपेजिया अंजनेरीका असे शास्त्रीय नाव देण्यात आले आहे. जगाच्या पाठीवर असे म्हणतात की, हे कंदिल पुष्प फक्त आणि फक्त अंजनेरीवर असायचे. आज एखादेदुसरेच कधी तरी दृष्टीस पडते.


इखार्‍याच्या तटाच्या बाजूने कांचनबारीकडे ये जा करण्यासाठी चौकी असावी...
इखार्‍याची तटबंदी
बेलाग अशा धोडप किल्ल्याला खेटून उभा असलेल्या विखार्‍यावर आजवर गड म्हणून  कुठलेच अवशेष बघायला मिळत नव्हते ते आम्हाला यंदा सातमाळा डोंगरयात्रेच्या निमीत्ताने बघायल मिळाले. जिथून सह्याद्रीतल्या सातमाळा रांगेचा उगम होतो त्या सुरगाण्यातील केमच्या डोंगरापासून आमची आठदिवसांची डोंगरयात्रा २ ते ९ डिसेंबर २०१८ या काळात आम्ही काही सह्याभटक्यांना सोबत घेऊन केली. त्यावेळी विखार्‍यावरून कांचनबारीत उतरताना आम्हाला लेकुरवाळा डोंगराकडे उतरणार्‍या खिंडीत विखार्‍याच्या तटाचे अवशेष दिसले. तटबंदी अर्थातच खुप जुनी आहे. त्याचा उल्लेख आजवरच्या वाचनात बघायला मिळाला नव्हता.
या छोट्याशा तटावरून अंदाज लावला जाऊ शकतो विखार्‍यावर सुरक्षेची केवढी चोख व्यवस्था असेल.
महाराष्ट्रातला अत्यंत महत्वाचा व मजबूत अशा धोडप किल्ल्यावर इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्यात. युद्ध झालीत त्या सगळ्या घडामोडींचा परिणाम इखार्‍यावर नक्कीच झाला असणार. धोडपवर अनेक राजवटीत मोठा फौजफाटा बाळगला गेला, त्या अनुषंगाने इखार्‍यावर केवढी हालचाल होत असणार.


इखार्‍याची सुदूर पूर्व हद्द तटाने संरक्षीत केलेली होती

आज विखार्‍यावर जुन्या बांधकाम अवशेषांचे बघायला मिळणे दुर्मिळ झालेत. त्या अवशेषांचे दगड कुठे गेलेत. मातीत गाडले गेले की, इंग्रजांनी तोफा सुरूंगांनी उधवस्त केले. तिथे कोणत्या ठिकाणी निवासी वास्तू होत्या, कोणत्या ठिकाणी सैनिकी वास्तू होत्या, कोणत्या ठिकाणी व्यापार, व्यावसायिक वास्तू होत्या. तिथे थोडे अधिक नगर अथवा गाव नियोजन असेलच, त्यांची कुठली माहिती घेतली गेली का?
तिथल्या पाण्याच्या पुरातन टाक्यांची काय अवस्था आहे. इथून अगदी जवळच शिवाजी महाराजांच्या काळातली अत्यंत महत्वाची कांचनबारीची लढाई झाल्याची मान्यता आहे. ही लढाई खरोखरच काचंनखिंडीत झाली असेल तर त्याचा परिणाम कांचना बरोबरच इखारा व धोडपवरही नक्कीच झाला असणार.  फार मोठे मैदानी युद्ध म्हणून त्याची इतिहासातल्या काही अस्सल कागदपत्रात नोंद असल्याचे अनेक ठिकाणच्या संशोधन साहित्यात वाचायला मिळते. अशा इतिहास संशोधनाला वाट करून देणे हा गडविकासाचाच भाग. त्यासाठी हा निधी वापरायला हवा.


लेकुरवाळा डोंगराचा माळ: कांचनबारीतून इखार्‍यावर या वाटेने चांगली वर्दळ होत असावी प्रवेश या चौकीवर नियंत्रीत होत असावा

शहाजहानच्या काळात मोगलांनी अथक प्रयत्नाअंती दक्षिणेत सातमाळा रांगेत मोठे यश संपादन केले, त्याच्या खुणा आपल्याला धोडपवरच्या अलिवर्दी खानाच्या प्रसिद्ध शिलालेखातून मिळतात. असेच शिलालेख राजदेर, इंद्राई किल्ल्यावर सुद्धा आहेत. मध्ययुगातल्या महत्वाच्या राजकीय घडामोडींचा वेध घेऊन, योग्य त्याठिकाणी, तलाव, तळी, टाक्यातला गाळ, दगड, मुरूम काळजीपूर्वक उपसून या जुन्या कालखंडाबद्दलची माहिती प्राप्त केली जाऊ शकते. या ठिकाणी बोगस दुर्गसंवर्धक पोहोचले नसतीर तर तळ्या टाक्यातल्या गाळातूनही जुन्या काळातल्या महत्वाच्या दुव्यांपर्यंत पोहोचवायला मदत होऊ शकतो. कदाचित त्या काळातली नाणी, कौला बांगड्यांचे तुकडे, शस्त्रादी काही ना काही उत्खनन करून शोधता येईल.
गडविकास निधीतून गडावरच्या जुन्या आश्रमाचे काम केले जाणार असेल किंवा डागडूजी केली जाणार असेल तर त्याला काहीच हरकत नाही. पण त्या नावाखाली तिथे सिमेंट कॉंक्रिटचे खांब उभे करून त्यावर नळीचे पत्रा बसवणार असाल तर तो गडविकासाचा भाग असूच शकणार नाही. तो असेल पर्यटन विकासाचा भाग. गडाची जमिन ही पर्यटन विभागाच्या आख्यारीत येत नाही. डोंगरांवरची जमिन ही वनखात्याच्य आख्यातरीत येते. त्यावरच्या पुरणवास्तू व त्यांचा परिसर हा पुरातत्व विभागाच्या अधिकारात येतो. माणसाने घडवलेला कुठलाही जुना दगड, जुने काम हे त्यांच्या अधिकारात येते. जे गड पुरात्त्व अधिसूचित नाहीत त्यावरचे जुने अवशेष सुद्धा पुरातत्वला विचारल्याशिवाय कुणीही हलवू शकत नाही व व त्यावर काम करू शकत नाही.

कोथळीगडावर व विखार्‍यावर पुरातत्व व वन खात्याच्या कामांना बाजूला सारून पर्यटन विकासाचे काम केले जाऊ शकत नाही. धार्मिकस्थळ विकास करायचा असेल तर या दोन विभागांच्या परवानगीने काही माफक प्रमाणावर केला जाऊ शकतो, पण तो गडविकासाच्या मथळ्याखाली केला जाऊ शकत नाही. गडाच्या पुराणवास्तुंना व जंगलांना बाधा आणून तो मुळीच केला जाऊ शकत नाही. त्यासाठी स्पष्टपणे, 'धार्मिक पर्यटनस्थळ निधी', असायला हवा होता. हा मंजूर निधी तर गडविकासासाठी आहे ना!

वर्तमानपत्राच्या बातमीत म्हटलेय की, जनतेतून विखार्‍याच्या विकासाची मागणी करण्यात आली. आता स्थानिकांचे म्हणाल तर ती मंडळी पिढीजात विखार्‍यावर जात आहे. गडावरच्या आश्रमापर्यंत अगोदरच गाडीरस्ता बनवून टाकला आहे. स्थानिक मंडळींना अशा रस्त्यांची खरोखरच आवश्यकता नसते. ही मंडळी मुळातच काटक असतात आणि डोंगरावर अगदी कुटुंब कबिला, शिधापाणी घेऊन आपले धार्मिक पर्यटन पार पाडत असतात. मग गडांवर अशा चकाचक सुविधा हव्यात कोणाला, ज्या गडाचाच घास गिळण्याची शक्यता अधिक.
पेठच्या कोथळीगडाचा इतिहास फार जुना आहे. गडावर काय सुंदर कातळकोरीव लेणी आहे. त्याचे कातळ नक्षीकाम, डोंगराचे शिखर आतून कोरून केलेल्या पायर्‍या तर थक्क करणार्‍या. याभारतीय वास्तूकलेच्या काही सर्वोत्त अविष्कारात इथले कातळकोरीव बांधकाम मोडते. तिथे इतका मोठी निधी फक्त रस्ता डांबर टाकण्यासाठी व विजेचे खांब आणण्यासाठी करणार? मग खर्‍या गड विकासाचे काय?

शासनाला नियमांची भाषा समजते. त्यामुळे गडदुर्गइतिहास क्षेत्रात काम करणार्‍यांनी त्यांच्याशी त्याच भाषेत बोलले तरच त्यांना ती कळेल. मागे एकदा मुंबईच्या एका दुर्गप्रेमी ठेकेदाराने हरिहर किल्ल्यावर शिडी बसवण्यासाठी व गडविकासाठीचे काही कोटींचे प्राकलन तयार केले होते. त्यातून त्याने सर्किट ट्रेकिंग विकसीत करण्याची योजना तयार केली होती. यात साल्हेर, हरिहर व आणखी एक गड टाकला. ट्रेकर हा सर्किट ट्रेक करतील व त्यातून शासनाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होईल असा प्रस्ताव त्याने दिला. नवे काम किती काळ टिकेल, ते कशासाठी गरजेचे यावर काहीही शास्त्रीय पाहणी न करता, दुर्गइतिहास संशोधकांची कुठलीच मते विचारात न घाता त्याने देखभाल दूरूस्ती कोणत्या निधीतून करायची अशी रंजक आकडेवारी तयार करून प्रस्ताव दिला. कुठे दिशादर्शक बाण लावायचे, कुठे तंबु रोवण्याच्या जागा. कुठे रस्ते असे बरेच काही त्यात होते.
या कामाला नाशिकच्या काही दुर्ग संस्थांनी विरोध दर्शवला. सगळे लक्ष हरिहरवर असताना नाशिकच्या दुर्ग संस्थांना मागमुस लागू न देता अहिवंतगडावर ३५ लाखांचे रेलींगचे प्राकलन मंजूर झाले. भयावह गोष्ट म्हणजे ठेकेदाराने रेलींग वर नेण्यासाठी जेसीबी पोकलॅन यंत्र आणून डोंगरच फोडून काढला. आता विचार करा, अहिवंत किल्ल्यावर जुन्या बांधकामाचे इतके ढिगारे पडले आहेत की सह्याद्रीत कुठल्याही गडावर ते सापडणार नाहीत. उद्या या मार्गावरून तस्तरांनी हे जुने घडीव दगड चोरून नेले तर? अहिवंत हा ओळखला जायचा तो त्याच्या बेलाकपणामुळे. हा बेलागपणा केवळ रेलिंगचे सामान वर नेण्यापायी कायमस्वरूपी घालवून टाकण्यात आला. गडाचे ऐतिहासिक नुकसान त्याची जबाबदारी कोणता विभाग घेणार. शिवाय गडावरच्या प्राचीन चिरा चोरी होऊ नये यासाठी रस्त्यावर सुरक्षारक्षक नेमणार का? नेमले तर त्याचा पगार कुठून देणार.
हा विषय हनूमानाच्या शेपटी सारखा वाढतच राहील तेव्हा इथेच आटोपता घेतो. गडविकास या संकल्पनेत आणखी काही उदाहरणांवर पुन्हा केव्हा तरी भेटूच. तुर्तास कोथळीगड व विखार्‍याचा गडविकास निधी हा फक्त गडविकासासाठीच खर्च व्हावा, पर्यटन विकासासाठी किंवा धार्मिक पर्यटनविकासासाठी नव्हे यासाठी आग्रही राहूया. यासाठी महाराष्ट्र गिर्याराहण महासंघ, मॅक व तत्सम संघटनांची मदत घेऊया. त्यामुळे आपल्या मागणीला मोठे बळ मिळेल.

गडविकासासंबंधी सप्टेंबर २०१९च्या काही महत्वपूर्ण चर्चा (साभार फेसबुकवरून)
दुर्गपुरुषाची आत्मगाथा - रवि राजेंद्र पवार
गडकिल्ल्यांचा विकास - भगवान चिले