Tuesday, December 2, 2008

Students of Kalwan experience Bullets and Grenades


Picture of the Taj Heritage hotle taken from the sea.

कळवणच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवला थरार
प्राण कंठाशी : समुद्रातील ते अस्वस्थ आठ तास

प्रशांत परदेशी,
नाशिक, ता. 1 : 26 नोव्हेंबरला अतिरेक्‍यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्याचे "लाइव्ह कव्हरेज' बघण्यात अनेकांनी रात्र घालवली. कळवण व आसपासच्या गावांतील अनेक घरांनी आख्खी रात्र दूरचित्रवाणी संचासमोर घालवली; परंतु त्यातील अनेकांच्या नजरा दूरचित्रवाणीवर व प्राण समुद्राकडे लागले होते. सहलीनिमित्त गेलेल्या आपल्या चिमुकल्यांचे काय झाले असेल? या चिंतेत ग्रामस्थांचा प्रत्येक क्षण कमालीच्या तणावाखाली गेला. तब्बल 21 तासांची पालक व आप्तस्वकीयांची घालमेल सहलीची बस कळवणला परतल्यावर शमली; परंतु त्या 21 तासांची अस्वस्थता पालकांच्या काळजाचा थरकाप उडवीत आहे.

कळवणच्या एका शाळेच्या 87 विद्यार्थ्यांची सहल सोमवारी (ता. 24) मुंबईला निघाली. त्यावेळी "गावाकडच्या मुलांना मुंबई दर्शन घडणार' याचे समाधान पालक व आप्तस्वकीयांच्या चेहऱ्यावर जणू झळकत होते. बरोबर सहा शिक्षक होते. कळवा येथे निवासाची सोय करण्यात आली होती. मंगळवारी (ता. 25) दिवसभर "एस्सेल वर्ल्ड'चा आनंद लुटल्यानंतर सहलीचा मुक्‍काम पुन्हा कळव्याला.
दुसऱ्या दिवशी मुंबई दर्शन करायचे, रात्री गेट वे ऑफ इंडियासमोर बोटीत भोजनाचा आस्वाद घ्यायचा, असा सहलीचा कार्यक्रम होता.
दिवसभर मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे बघितल्यानंतर बुधवारी (ता. 26) रात्री आठला हॉटेल ताजजवळील पार्किंगवर बस थांबवून विद्यार्थी व शिक्षकांचा लवाजमा गेट वे ऑफ इंडियावर पोचला. बोटीवर डेरेदाखल झाल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. लाटांवर हेलकावणाऱ्या बोटीत गाण्यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी सुमारे तासभर मनमुराद नृत्याचा आनंद लुटला. त्यानंतर बोटीवरच जेवण देण्यात आले होते; मात्र पावणे दहाच्या सुमाराला कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने साऱ्यांचे लक्ष वेधले. बोट चालकाने बॉंबस्फोट झाल्याची खबर दिली आणि बोटीवरच्या शिक्षकांत भीतीची लाट पसरली. "आता पुढे काय' या विवंचनेत बोट गेट वे ऑफ इंडियाच्या किनाऱ्यावर नेण्यात आली तेव्हा हॉटेल ताजमधून गोळीबार व हातबॉंबचे सत्र सुरू होते. अशा स्थितीत आपली बस पार्किंगमधून बाहेर काढणे अशक्‍य होते. इतक्‍या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना बाहेर आणण्याचा धोका ओळखून शिक्षकांनी तत्काळ बोट मागे फिरवून समुद्रात तीन ते चार किलो मीटर दूर नेली.
त्यानंतर सुरू झाले ते अत्यंत भेदरवणारे सत्र. गोळी बार व हातबॉंबचे आवाज काळीज हेलावून टाक होते. बोटीवरचे संगीत व सर्व दिवे बंद करून विद्यार्थ्यांना गुपचूप बसण्याचे निर्देश देण्यात आले. शिक्षकांनी बोटीचा वरचा मजला पूर्ण रिकामा करून विद्यार्थ्यांना आडवे होण्याचे निर्देश दिले, त्यानंतर सर्वांनी याचि देही याचि डोळा "ताज'मधून होणारा गोळीबार व हातबॉंबचा वर्षाव बघितला.
"बोटीत विद्यार्थी असल्याचे अतिरेक्‍यांना समजले असते, तर कोण अनर्थ ओढवला असता' या जाणिवेने शिक्षकांची गाळण उडाली होती. कोणीही जागचे हालत नव्हते. कोणाला तहान लागत नव्हती, की मच्छरांचे गुणगुणणे जाणवत नव्हते. सुरवातीला त्रासदायक वाटणारा दमट हवेचा त्रास केव्हाच पळाला होता. साऱ्यांना एकच चिंता सतावत होती, ती आपली बस सुखरूप असेल ना, याची.
"बोटीत कोणी नाहीच आहे', इतक्‍या निपचीतपणे विद्यार्थ्यांनी रात्र काढली. डोळ्यासमोर दहशतवादाचा भयानक चेहरा नाचत होता. त्यामुळे अनेकांना झोपसुद्धा लागली नाही.
सकाळी सहाच्या सुमाराला बसचालकाने मोठ्या शिताफीने पार्किंगमधून बस काढून कुलाब्याकडे किनाऱ्यावर आणली. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बोट कुलाबा किनाऱ्यावर आणून कळवणचे विद्यार्थी व शिक्षक बसमध्ये बसले आणि सप्तशृंगीचे नामस्मरण करून बस थेट नाशिकच्या दिशेने दामटविण्यात आली.
इकडे कळवण व परिसरातील पालक व आप्तस्वकीयांचे प्राण जणू कंठाशी आले होते. मोबाईलवरून अनेकांनी शिक्षकांशी संपर्क साधला तेव्हा सर्व जण सुखरूप असल्याचा निरोप मिळाला होता; परंतु अतिरेक्‍यांनी संपूर्ण मुंबईत दहशत माजविल्याचे चित्र दूरचित्रवाणीवरून बघितल्याने गावात कुणालाही चैन पडत नव्हती.
गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमाराला बस कळवणमध्ये दाखल झाली, तेव्हाच पाणावलेल्या नजरा शांत झाल्या. जो तो आपल्या जिवाच्या तुकड्याला शोधून बिलगत होता व रडत होता. "सकाळ'ने काही मुलांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी गोळीबार व हातबॉंबचा थरार कथन केला. भरसमुद्रात अंधारात अजिबात न हालता रात्र काढताना कमालीचा त्रास झाला; परंतु शिक्षकांनी न हालता चुपचाप राहण्याचे निर्देश दिल्याने आम्ही सुखरूप राहिल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

तणाव चाचण्या

मुंबईत सहलीला गेलेले कळवणचे विद्यार्थी सहीसलामत घरी परतले, परंतू आता आपल्या पाल्याच्या चिंतेत सुमारे चोविस तास घालविणाऱ्या कळवण व परिसरातील पालकांना अस्वस्थपणा जाणवत असून मंगळवारी (ता. 2) काही पालकांनी नाशिक शहरात तणाव चाचणी करून घेतली. मुंबई दहशतवाद्यांच्या घेऱ्यात होती त्यावेळी ताज हॉटेल पासून अवघ्या काही मीटरवरून विद्यार्थी गोळीबार व बॉम्बस्फोट घडताना बघत होते, तर इकडे कळवण व आजपासच्या खेड्यातील पालकांच्या जीवाची क्षणाक्षणाला घालमेल होत होती.
दुरचित्रवाणीवरचा बातम्या "माहिती' म्हणून ठिक असला तरी त्याचा इतका प्रचंड मारा सुरू आहे की आता त्याचा त्रास होऊ लागला आहे. कळवणमध्ये काही पालकांची तब्येत खालावल्याने त्यांना नाशिकमध्ये तपासणीकरिता दाखल करण्यात आले. एका खासगी रूग्णालयात नातलगांची मोठी गर्दी झाली होती. दुरचित्रवाणीवरच्या बातम्या व तेच तेच चित्र, बातम्यांसोबत वाजणारे संगीत अस्वस्थ करणारे आहे, "ते' त्रासात भर घालत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. "नको त्या बातम्या, नको त्या मुलाखती', आम्हाला माफ करा अशा शब्दात या पालकांनी मुलाखत देण्यास नकार दिला. डिसेंबर महिन्यात कळवणला मोठी जत्रा भरते, परंतू यंदा जत्रेच्या तयारीत मन लागत नसल्याचे एका पालकाने बोलताना सांगितले.

1 comment:

  1. Your Story is quiet admirable, it has good journalistic values.

    ReplyDelete