उन्हाची चाहुल लागली खरी...पण 'तो' अंग भाजून काढण्या इतका तिव्र झालेला नाही, तेव्हा एखादी भटकंती सहज होऊ शकते', हा विचार करून आम्ही २४ व २५ फेब्रुवारी (२०१८) असा दिड दिवसांचा शिपनूर-कुलंगवाडीचा महत्वाकांक्षी बेत आखला...तो सफळ-सुफळ ठरला की नाही...मित्राच्या भावाच्या लग्नाचा बेत कोणामुळे हुकला? एका वेगळ्या वाटेवरच्या रविवारीय भटकंतीचा हा वृत्तांत...
'जिवाभावाच्या मित्राच्या विवाहाला हजेरी लावायची...वधू वरांना शुभ आर्शिवाद द्यायचे...पंक्तीतलं छानसं जेवण करायचं आणि वाटेतल्या एक एक गड्याला घेत सरळ साम्रदचा रस्ता धरायचा', मागच्याच आठवड्यात हातात लग्नपत्रिका पडली आणि आमच्या शिपनूर-कुलंगवाडी ट्रेकच्या कार्यक्रमात थोडा बदल करण्यात आला तो असा.
तसं बघितलं तर ही कोणत्या किल्ल्यावरची भटकंती नव्हती...वाटेत ना कोणती ऐतिहासीक बांधकामे बघायला मिळणार होती...ना एखादे जंगल...नाही म्हणायला, छोट्या कुलंगच्या रूपाने कुलंग किल्ल्याला बगल देऊन होणारा हा एक आडवळणाचा भटकंतीचा बेत होता; तो तितकाच रोमहर्षक ठरेल? खरं तर सह्याद्रीतल्या भटकंतीबद्दल असा प्रश्न मनामध्ये उपस्थित व्हायला नको! पण यावेळेला का? कोण जाणे? हा प्रश्न उपस्थित झाला...पण त्याने मनातला बेत डळमळीत झाला नाही, 'ही सह्या भटकंती आहे राजा', या एक वाक्याने भटकंतीला जायचे या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
या भटकंतीच्या मार्गावर भलेही एकही ऐतिहासिक नोंद असलेले स्थळ नसेल, इतिहासातल्या कित्येक घडामोडींची साक्ष असलेल्या मनाच्या कप्प्यात अढळस्थानी बसलेल्या काही दुर्गांचे दूरून दर्शन अनोखे ठरणार होते. 'एका वेगळ्या वाटेने त्यांचे हे दर्शनच या भटकंतीचा आत्मा ठरणार', याची पक्की खात्री होती. यात होणार होती दमदार चाल आणि भंडारदरा धरणाच्या परिघातल्या डोंगरांगांचे मनोवेधक चित्र.
- रात्रीच्या वेळेला दुर्गम भागातला विजपूरवठा असा कमीदाबाने असतो... (स्थळ: साम्रद) |
जोडीला महाराष्ट्रातले सर्वोच्च शिखर असलेला कळसुबाईचा डोंगर...त्याचे पहारेकरी किर्डा, साकिर्डा, महाराष्ट्रातली उत्तुंग अशी घनचक्कर, गवळदेव, मुडा, आजोबा, कात्रा, करंडा अशा एकाचढीस एक डोंगरांचा अद्वितीय नजारा चांदण्या रात्रीला बघायचा; दुसर्या दिवशी उगवत्या सूर्याच्या साक्षीने नेहमीच भूरळ घालणारे हे डोंगर दुरून साजरे करायचे. परंतू आमचा हा बेत पहिल्या झटक्यात फसण्याची चिन्ह दिसू लागली. याचे खापर स्थानिक नेत्यांवर फुटणार नाही 'याची आम्ही काळजी घेत होतो'.
करवंद फुलांचा गंध वेडावून टाकणारा...ही हिरवी कंच फळे मे अखेर पर्यंत पूर्ण पक्व होतील तेव्हा... |
'मुंबई-पुण्या सारखी आमच्या नाशिकला वाहतूकीची तशी कोंडी होत नाही. तासन तास कधी रस्त्यात अडकून पडण्याची वेळ येत नाही', अशी आमची आम्हीच शेखी मिरवली व वाहतूकीच्या जंजाळातून पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागलो. पण हायरे देवा? इथली वाहतूक पुढे का सरकत नाही? आमचा आशिया खंडातल्या या सर्वाधिक लांबी असलेल्या उड्डाण पुलावर चक्क वाहतूकीच्या खोळंब्याने ट्रेकघात होतो की काय? अशी
स्थिती निर्माण झाली. क.का. वाघ महाविद्यालय चौकातच आम्ही अडकून पडलो. बराच वेळ वाहतूक पुढे हलेना, तेव्हा आम्ही डाव्या बगलेतून सेवा मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला, परंतू आमच्या दोन्ही बाजुंला वाहने अशी काही थबकली होती की, आम्हाला ना पुढे जाता येई ना उजवीकडे ना डावीकडे.
मिनाताई ठाकरे क्रीडांगणा लगत उड्डाणपूल खाली उतरतो तो क.का.वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारा समोर. तिथ पर्यंत सर्व काही ठिक होते, तिथून अवघ्या चार एकशे मिटरवरचे बळीचे मंदिर गाठायला थोडे थिडके नव्हे, तब्बल पावणे दोन तास लागले. वाहतूक सरण्याची कोणतीही चिन्ह दिसेना. लग्न आटोपून सगळ्या सवंगड्यांना गोळा करायचे, तिथून ३८ किलो मिटरचा राष्ट्रीय महामार्गावरचाच घोटी पर्यंतचा प्रवास करायचा, तिथे आणखी दोघा मुंबईकर भटक्यांना घ्यायचे आणि तिथून पुढचा ६० किलो मिटरचा घाटवळणांचा प्रवास, तोही रात्रीचा. अशा डळमळीत स्थितीत आम्हाला नाईलाजाने परतावे लागले.
सह्याद्रीत हा नजारा बघण्यासाठी पावले आपोहाप थबकतात... |
परतणे सुद्धा सोपे नव्हते. कसे तरी करून आम्ही डाव्या बाजूच्या सेवा मार्गाला लागलो, तिथून वीस मिनीटात अर्था किलो मिटर माघारी फिरून आम्ही घुसखोरीची संधी साधत उजव्या सेवा मार्गावर शिरकाव केला. आता आम्ही मुंबई-आग्रा महामार्ग सोडून नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गाला लागलो, तिथून तपोवनातून नाशिक पुणे राज्य महामार्ग धरला व तिथून द्वारका चौकातून पुन्हा मुंबई महामार्ग असा सापशिडीचा खेळ खेळत अखेर मुंबई नाक्यावर येऊन पोहोचलो.
आमच्या चर्चेचा सूर इतर सर्व नाशिककरांप्रमाणे, नाशिकमधून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करणार्या राष्ट्रप्रेमी नेते मंडळींच्या दिशेने वळू लागताच आम्ही काळजी घेतली की, नेत्यांना कोणताही दोष दिला जाणार नाही...''यात नाशिकच्या नेते मंडळींची कोणतीही चुक नाही, चुक परिसरातल्या लोकांचीच...काही एक कारण नसताना दूर अंतरावरच्या नोकर्या पत्कारतात...दूर दूर अंतरावर आपले व्यवसाय थाटतात...सायकल, बैलगाडी, तांगा असे लोकप्रिय पर्याय उपलब्ध असताना उगीच दुचाकी,
चारचाकी वाहनांचा सोस धरतात; आणि हे काय? सगळेच जण एकाच वेळेला कामाकडे कसे जातात...काम आटोपून घरी परतात''...तेव्हा यात नेत्यांचा दोष कुठला...बिचार्यांना कुठे ठाऊक की, उडाण पुल काही ठिकाणी खाली उतरवून पुन्हा वर उचलल्याने शहराच्या वातूकीची बोजवारा उडतो...नाही तर त्यांनी अशा पद्धतीने थोडीच पुलाचे नियोजन केले असते.
अंजनीच्या जांभळ्या रंगाच्या फुलांचे घोसच्या घोस शिपनूरच्या डोंगरावर लगडलेत... |
खरे तर ज्यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरच्या नाशिक-मुंबई टप्याचे चौपदरीकरण झाले आणि लागोलाग सहापदरीचे बांधकाम सुरू झाले, तेव्हाच नाशिक शहरातून जाणार्या महामार्गावर आशिया खंडातला सर्वात मोठ्या उडाण पुलाची घोषणा करण्यात आली होती. पांडवलेणी ते पिंपळगाव बसवंत असा हा पुल होणार, या वार्तेने नाशिककर हुरळून गेले होते. हळू हळू या पुलाला अनेक फाटे फुटले. 'कोणी आपल्या हॉटेल करिता पुलाला छेद देऊन उतरणीचे रस्ते बनवले तर कोणी चक्क आपल्या बंगल्यासाठी', असे उघड आरोप होऊ लागले परिणामी दिड-दोन वर्ष बांधकामाचा त्रास सोसल्यानंतर नाशिककरांकरिता हा पुल लोकार्पण झाला, तेव्हा समजले की, याला तर सेवा मार्गच नाही. सद्या ज्याला सेवा मार्ग म्हटले जाते त्या रस्त्याला सेवा मार्ग म्हणता येणार नाही.
Add caption |
नाशिक शहरवासियांचा रस्ता राष्ट्रीय महामार्गासाठी गिळंकृत करण्यात आला आणि केवळ नावापूरत्याच असलेल्या चिंतोळ्या मार्गावर जो वाहतूक खोळंब्याचा सिलसिला सुरू झाला तो उत्तरोत्तर वाढतच राहिला. अनेक अपघात होऊन बरेच लोक हा सेवा मार्ग ओलांडताना मृत्यूमूखी पडले तर अनेक जण जायबंदी झाले. अपघातांची ही मालिका इतकी मोठी, की अपघातात कोणी मृत्यूमूखी पडले नाही, असा एकही आठवडा जात नाही. महामार्गावरच चक्क गती रोधक. नाशिक शहरात झपाट्याने विकसीत झालेल्या नव्या वसाहतींना महामार्ग ओलांडण्याची कोणतीही व्यवस्था नाही, परिणामी महामार्ग हा महामार्ग न राहता एखाद्या गर्दीत कोंदटलेल्या शहराचा चौक बनला. एक दोन नव्हे तर तब्बल नऊ विविध ठिकाणी या विक्रमी उडाणपुलाने नवे वाहतुक खोंळंबे निर्माण केलेत. अशा प्रकारे आमच्या भटकंतीची दयनीय सुरूवात झाली. मित्राच्या भावाच्या विवाह सोहळ्याला मुकावे लागल्यानंतर आम्ही वेगाने सगळ्या सहभागींना एक एक करून आमच्या काळ्या पिवळ्या बोलेरो जीपमध्ये गोळा केले आणि ठरलेल्या वेळे पेक्षा अडीच तास उशराने प्रस्थान केले.
मुंबईहून शैलेश राव व भागवत उगले सामिल होणार होते. ते इगतपूरीला रेल्वेने दाखल झाले, परंतू तिथून त्यांना घोटी चौफुलीवर येण्यासाठी वाहन मिळेना. कसे बसे पथकर नाक्या पर्यंत त्यांना वाहन मिळाले. तिथे रात्रीचे जेवण आटोपून ते आमची बराच वेळ वाट बघत होते. आम्हीही वाटेत वाडीवर्हे येथे भटक्यांच्या ठेवणीतले खास हॉटेल असलेल्या प्रभूच्या ढाब्यावर छानसे जेवण घेतले होते. घोटीला येई पर्यंत आणखी एक वाईट बातमी समजली. आमच्या जीपचे गियर अडखळत होते. जीपवाल्याने तात्काळ दुसरी जीप आणण्याची तयारी केली. आम्हाला चौफुलीवर उभे करून तो घोटी गावात दुसरी जीप आणण्याकरिता रवाना झाला. तोवर आमच्या ट्रेक गप्पा महामार्गावरच रंगू लागल्या. मुस्लीम धर्मियांच्या औरंगाबाद इज्तेमा नावाच्या धार्मिक सोहळ्यासाठी काही कार्यकर्ते महामार्गावर उभे राहून भाविकांच्या गाड्यांना घोटीहून जाण्याचे सूचित करत होते. सुमारे अर्धा तास आम्ही त्या कार्यकर्त्यांची लगबग बघत होतो. आमच्याकरिता बदली जीपगाडी आली आणि आम्ही आमच्या पाठपिशव्या त्यात रचून भंडारदरा रस्त्याला लागलो.
डोळ्यावर एव्हाना झोप चढली होती. डोळे सारखे लागत होते. त्यात भंडारदरा केव्हा आले आम्ही धरणा लगतचा रस्ता केव्हा धरला हे कळले
नाही. साम्रदला पोहोचलो, तेव्हा अर्थातच संपूर्ण गावही झोपी गेलेले होते. यशवंत बांडेच्या घरा शेजारच्या एका सारवलल्या ओसरीत पथार्या पसरल्या व पहाटे ५-००चा गजर लाऊन आम्ही एकमेकांना शुभरात्री म्हटले तेव्ह घड्याळात २-०० वाजून गेले होते. पाचचा गजर झाला की नाही, ठाऊक नाही, पण मला पावणे सहाला जाग आली. तात्काळ सगळ्यांना आवाज देऊन आम्ही मिट्ट काळोखात आवर सावर सुरू केली. पाऊण तासात आम्ही आवरून सज्ज होतो. यशवंताच्या घरचा चहा घेतल्यानंतर त्याने आमच्या सोबत येण्यास अंमळ उशिरच केला. म्हणजे आमचे रविवार सकाळचे प्रस्थानही तास दिड तास उशिरानेच झाले.
भारतातल्या अनोख्या नैसर्गिक स्थळांच्या यादीत स्थान असलेल्या सांदण दरीकरिता काही तंबु आदल्या रात्रीच लागले होते...आम्हाला उजवीकडे खुट्याचा सुळका व त्याच्या पाठीमागे काळ्या अग्नीजन्य पाषाणाचा भलामोठा पडदा धरणारा अत्यंत आवडीचा रतनगड, कात्रा व आजा डोंगराची काळी प्रतिकृती दिसत होती. वाटेत काही ठिकाणी करवंदाला पांढरी फुले लागल्याचे दिसत होते. या फुलांचा वास अगदी जीव वेडावून टाकणारा इतका सुरेख.
शिपनूरच्या डोंगरावर बुंधा जाळून टाकलेला हा वृक्षच सांगतो, या परिसरात मोठमोठाले असंख्य वृक्ष होते...त्यांचा माणूस नावाच्या यंत्राने काळ केलायं! |
खुट्याच्या सुळक्याच्या डाव्या बाजुला हलकी तांबूस छटा तयार झाली तेव्हा, 'तो आता थोड्याच वेळात येणार आणि अवघे आसमंत उजळून टाकणार', हे स्पष्ट झाले. भास्कराने डोंगरांच्या काळ्या कडांवरून डोके वर काढले व हळू हळू तो वर येऊ लागला...जस जसा वर येत, तसतसा त्याचा गडद लालपिवळा रंग फिकट होत होता...काही क्षण अशा विविध छटा बिखेरल्यानंतर एकदाचा तो वर आला...शिपनूरचा डोंगर त्या उजेडात प्रकाशमान झाला...त्याच्या डाव्या बाजुला निसणीची घाटवाट होती, परंतू आज आमचा तो मार्ग नव्हता.
थोड्याच वेळात चढण सुरू झाली. उगवतीच्या सूर्यकिरणांनी जंगलातल्या वृक्षांतून प्रवेश करत अनोखे नजारे तयार केले...
आणि हे काय...? जंगलाच्या मधल्या टप्प्यात अचानक जांभळट गुच्छे कोण्या झुडूपावर इतक्या अफाट प्रमाणावर कसे लगडलेत...हा तो आंजण...जांभळ्या छटेचा हा फार मोठा बहर...इवल्या इवल्या फुलांचे गोलाकार गुच्छे संपुर्ण झाड व्यापून होते. मला वाटलं, करवंदावरचे हे परजीवी झुडूप अथवा वेल असावे, परंतू करवंदाची पाने गोलाकार असतात, याची पाने करवंदा सारखीच, परंतू टोकला निमुळती.
स्थानिक मंडळी किरकोळ जखमांवर याचा पाला किंवा साल रगडुन लावतात...पूर्वी या पासून पिवळा रंग तयार केला जायचा, अशी माहिती आमचा वृक्ष अभ्यासक प्रमोद धामणेंने पुरविली...भारतीय प्रजातीच्या या झुडपाचे अस्तित्व म्हणजे जमिनीची पाणी धारण क्षमता उत्तम असल्याचे लक्षण...साम्रदचा अवघा परिसरच हा भरपूर पावसाचा...त्याचे हे लक्षण...फुले इतकी सुंदर की, जणू खोट्या फुलांचे गुच्छेच्या गुच्छे झाडाला कोणी तरी चिकटवलेत...शिपनूरवर आम्हाला मधल्या पट्ट्यात अनेक आंजण दिसलेत...दगडावर व खालच्या मातीवर त्यांची इवलीशी कोवळी निळी, पांढरी फुलांची मोठ्या प्रमाणावर गळ झालेली दिसून आली...फार सुंदर नक्षीच त्यामुळे दगडांवर व जमिनीवर तयार झाली होती.
आज आम्हाला फार मोठा पल्ला गाठायचा होता, त्यामुळे सकाळच्या गारव्यात आम्ही झपझप चाल धरली. आमच्या सोबत साम्रदहून तीन कुत्री आली होती. त्यांना बघून जंगलातल्या हुप्प्यांनी कल्ला केला...कुत्रे त्यांना काही बधली नाहीत, उलट त्यांच्या मागे धावण्याचा प्रयत्न करू लागली, परंतू झाडांवरच्या राजांना त्यांच्या पासून कोणताही धोका नव्हता. लवकरच आम्ही एक डोंगरधार चढून वर आलो. चहुबाजुला आमच्या अनेक भटकंतीचे वेगवेगळे डोंगर नी गड किल्ले दिसत होते. अखेर उजव्या बाजुला अजस्त्र अलंगचे दर्शन घडलेच. त्याच्या लगतचा मदन व त्याचे नेढेही दिसत होते. कुलंगचा तर भला थोरला पसारा, छोटा कुलंगही त्याच्या डावीकडे.
शिपनूर हा काही नेहमीच्या भटकंतीचा डोंगर नाही त्यामुळे वाट मळलेली असली तर फार काही तुडवलेली नसल्याने आसपासचा परिसर मनाला अधिक भावत होता. पायाखाली मात्र सततच्या दगडधोंड्यांनी आमची चाल मंद केली होती. यापरिसरात मोठाले वृक्ष नाहीत, आहेत ते र पाच वर्षांचे बाल्यावस्थेतले. बडे वृक्ष अर्थातच येथे कैक पिढ्यांनी भूईसपाट केलेले.
आणखी वर चढून गेल्यावर उजव्या बाजुला महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसुबाई व त्याच्या आजु बाजुचे किरडा, साकिर्डा दृष्टीस पडले. आता समोरच्या बाजुला प्रसिद्ध 'अमकु'ची रांग स्पष्ट दिसू लागली. अर्थात आज वातावरण पूर्णपणे साफ नव्हते, परंतू धुसरपणातही भटक्यांच्या हृदयातले हे गड एका वेगळ्या कोनातून बघण्याची मजा काही औरच.
शिपनूरचा शिखर माथा म्हणजे काहीसा डाईक सारखा परंतू डाईक नसलेला एक पसरट काळा फत्तर...त्याच्या मध्ये एक भली मोठी खाच. आमचे लक्ष होते ते त्या खाचेत जाऊन सर्वोच्च ठिकाणहून आसपासचे डोंगर नी गडकिल्ले बघण्याचे. आम्ही अजिबात न रेंगाळता शेवटच्या चढाईला भिडलो. या ठिकाणची कारवी मनाला भूरळ घालणारी. इतका वेळ आम्ही मेलेल्या कारवीची वाट तुडवताना जेरीस आलो होतो, परंतू शिखरा जवळ करंगळीपेक्षा बारीक सरळसोट कारवी. घरे बांधण्यासाठी ही सर्वोत आदर्शवत. ती विणायला सोयीची. मधून ती तोडली तर आजच्या पिढीला खासा परिचीत असलेला थर्माकॉल सारखा त्याचा अंतर्भाक दिसतो, हाच पांढरा हलका पदार्थ कार्वीला उन्हात थंड व थंडीत उष्ण ठेवतो, अर्थातच आजच्या भाषेतली थर्मोस्टॅटिक वनस्पती.
तोची अलंग ओळखावा... |
आमच्यातला एक गट नाशिकला लवकर परतणार होता, त्यांचे मन वळवून त्यांना घाटनदेवीच्या मंदिरा पर्यंत येण्याची गळ घातली. शिपनूरच्या डोंगराचा भला मोठा वळसा करून आम्ही अल्पशा मळलेल्या वाटेने डांबरी रस्त्यावर आलो. तिथून आम्ही घाटनदेवीच्या देवळाकडे मार्गाक्रमण सुरू केले. आता मात्र उन्हाची तिव्रता जाणवू लागली. यानंतरचा टप्पा खरा आव्हानात्मक. एरवी उडदवण्यावरून अलंग किल्ल्याची चढाई अनेकदा झाली आहे. अलंगचा किल्ला तर अजस्त्र या संकल्पनेतला. शिवाय त्यावरचे ऐतिहासिक बांधकामांचे अवशेष कित्येक. आज आम्ही, त्यापेक्षा वेगळ्या वाटेने छोट्या कुलंगकडे जाणार होतो.
शिपनूरची शेवटच्या टप्प्यातली चढाई म्हणजे तिव्र घसारा आणि धरायला तकलादू आधार म्हणजे चांगली झटापटीची मानसिक तयारी हवी! |
घाटनदेवीच्या मंदिरात मातेची मनोभावे पुजा केली, गुळपोळ्या व सोबतच्या अनेक पदार्थांवर ताव मारला तेव्हा गट नेत्याने स्पष्ट केले की, 'आपली पुढची भटकंती अडचणीत आहे, आपण नियोजित वेळेपेक्षा उशिरा या ठिकाणी पोहोचलो आहोत, छोट्या कुलंगला इथूनच रामराम करून परतीचा रस्ता धरू या'. अखेर नाईलाजाने या रोमहर्षक टप्प्याला आम्ही, 'पुन्हा तुझ्या भेटीला या मार्गाने येऊ', अशा निर्धारासह रामराम केला.
याभागात पाऊस कितीही होत असला तरी पावसाळा संपल्यावर इथल्या वाडी वस्त्यांची दररोजची एक कसरत ठरलेली...पाण्यासाठीची पायपीट...भटकंती आटोपून आम्ही दुपारच्या सुमारास साम्रदला पोहोचलो, तेव्हा तीन अगदीच लहान मुली डोक्यावर कळशी घेऊन हापशाचे पाणी भरताना दिसल्या...एक चिमूरडी तर इतकी लहान की, ती डोक्यावर लहानशी कळशीही घेऊ शकत नव्हती...पण आपल्या ताई सोबत तिलाही पाणी भरायचे होते, तेव्हा ती अडीचशे मिली लिटरची बाटी भरून पाणी वाहत होती...मोठे सुंदर, अचंबित करणारे, परंतू तितकीच विदारकता दर्शवणारे ते चित्र होते...
दृष्ट लागावे असा काटेसावराचा सडा |
साम्रदच्या शाळेतल्या संडासाची ही दुरावस्था... |
उंबरदर्यात उतरताना या ठिकाणी स्वच्छ सुंदरसा पाण्याचा नैसर्गिक झरा म्हणजे खरी खुरी क्षुधाशांती.. |
रंगपंचमीचा सण जवळ आल्याने आम्ही पळसाचे एकादे झाड दिसते का ते शोधू लागलो, परंतू आम्हला या परिसरात एकही पळस वृक्ष दिला नाही. काटे सावर मात्र अनेक ठिकाणी बहरला होता. त्याच्या भव्य, देखण्या लाल फुलांचे सौंदर्य न्याहाळत आम्ही रविवारी सायंकाळी ५-००च्या सुमारास नाशिक गाठले. घरच्यांना, अरे इतक्या लवकर कसे काय? असा पहिल्यांदा आश्चर्याचा धक्का मिळाला.
sahyadri trekkers bloggers