Friday, February 2, 2018

Dhodap 3: अनेक गुहांनी सजलेली धोडपची पगडी


किल्ले धोडपचे हे एक भौगालिक आश्चर्य...अजस्त्र आकाराची व्होल्कॅनिक प्लग...जणू धोडपची पगडीच...याच्या पश्चिम धारेवर वैनतेयचे गिर्यारोहक समीरन कोल्हे, सोमदत्त म्हस्कर, प्रतिक रनाळकर वगैरेंनी प्रथम आरोहण केले आहे.

 धोडप भाग ३: तिन भौगोलिक आश्चर्ये अनं अनेक गुहांनी सजलेली धोडपची पगडी

ऐतिहासीक काळातल्या विविध राजवटीतल्या बांधकामांचे अवशेष किती बघावेत आणि किती नाहीत. १४७२ मिटर असे महाराष्ट्रातले तिसरे सर्वोच्च शिखर असलेल्या धोडपच्या मुक्कामी भटकंतीने आम्हाला भरभरून दान दिले, त्याच बरोबर धोडपच्या तीन आश्चर्यांनी मन तृप्त केले. राहता राहिला प्रश्न तो ट्रेकर आणि एसटी बस यांच्यातल्या जुन्या नाते संबंधाचा, 'टेकर्सचे बस सोबतचे नाते हळू हळू कमी होतेय, त्या मागचे कारण म्हणजे ट्रेकच्या नियोजनात जिथे वेळेला अनन्यसाधार असे महत्व येते तिथे आज घडीला एसटीचा पर्याय शेवटच्या क्रमांकावर आहे, असे म्हणायला हरकत नाही. राज्य परिवहन मंडळाच्या बदललेल्या धोरणांचा सर्वात मोठा फटका अर्थातच ग्रामीण व दुर्गम महाराष्ट्राला बसतोय, हे मात्र नक्की. त्यावर वेळीच उपायोजना करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा महाराष्ट्राची सूनियोजीत वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

सह्याद्रीच्या सातमाळा रांगेत डाईकची अश्मरचना अनेक ठिकाणी दिसून येते. धोडपचा डाईक अखिल महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. डाईक म्हणजे डोंगरांची अगदी पातळ कातळ भिंत...समोरून अफाट मोठा दिसणारा कातळ बाजूने पातळ पडद्या प्रमाणे दिसतो. सुमारे ३ कोटी वर्षापूर्वी दोन महाखंडांच्या टकरीनंतर पृथ्वीवर जी उलथापालथ झाली त्याचा हा परिपाक. लोणावळ्या जवळच्या तैल बैलाचा डाईक प्रसिद्ध आहे. धोडपचा डाईक लांबलचक पसरलेला तर आहेच, शिवाय त्याला मध्ये बरोबर चौकोनी आकाराची खाच पडली आहे. या डाईकच्या खाचेचे सर्वात उत्तम दर्शन घ्यायचे झाल्यास धोडप सुळक्याच्या उत्तर टोकाला जायला हवे, तिथपर्यंत जाण्याची वाट फारशी बिकट नाही.
काय आश्चर्य...धोडपची ही नैसर्गिक गुहा पश्चिम मुखी असून दक्षिण ती अचानक दक्षिण बाजुला वळण घेऊन निमुळत्या तोंडाने तिथे उघडते...एक प्रकारचे धोडपचे हे वळणदार नेढेच!
 विशेष म्हणजे या डाईकला जिथे खाच पडली आहे. त्याला लागुनच एक बुरूज होता, त्याचे अवशेष आजही बघायला मिळतात. हल्ली या डाईकवर वनखात्याने चक्क लोखंडी खांबांचे सुरक्षा कठडे बसवले आहेत. येथे खंडाळा, लोणावळ्या सारखी मोठी गर्दी उसळेल तेव्हा लोक दरीत घसरून पडू नयेत अशी या मागची भावना ठेवून केलेले हे बांधकमा प्रत्यक्षात एका अजोड भौगोलिक आश्चर्याच्या सौंदर्याला बाधाच पोहोचवत आहे. एकट्या डाईकवर सुमारे सातशे फुटांचा भल्या मोठ्या आकाराच्या लोखंडी सुरक्षा कठड्यांचा खटाटोप करण्यात आलाय. यातले काही कठडे दोनच वर्षांच्या उन्मळून पडण्यास सुरूवातही झाली आहे. (स्थानिक मंडळी यासंबंधिची सप्तश्रृंगी देवीची दंतकथा सांगताना, देवी कोपली त्यावेळी तिने धोडपवर येऊन डोंगरावर आपला गुडघा मारला तेव्हा पासूनची ही खाच आहे, हीच देवी धोडपच्या गुहेत विराजमान असल्याची काही मंडळींची धारणा आहे).
धोडपचं दुसरे भौगोलिक आश्‌चर्य म्हणजे व्होल्कॅनिक प्लग, अर्थात ज्वालामुखीय उद्रेकातून शंखुसारखा उठावलेला डोंगरमाथा, जणू काही डोंगराला घातलेली पगडीच. हाच तो धोडपचा सुळका, अखिल सह्याद्रीत आपल्या वैशिष्टपूर्ण आकारासाठी ओळखला जातो. (याची पूर्व बाजू आरोहणाच्या दृष्टीने सोपी, तर पश्चिम बाजू मध्यम जोखिमेची आहे) त्यावेळी इथला जो भूमाख होता त्याचे बंध झुगारून तप्त लाव्हा रस पृथ्वीच्या उदरातून उफाळत वर आला आणि त्यातून या डाईक व प्लगची निर्मीती झाली. डाईकची भिंत आणि प्लग यामुळे धोडप किल्ला फार दूर अंतरावरून सहजपणे ओळखू येतो. या प्लगच्या अर्थात, सुळक्याच्या पोटात दक्षिण मुखी अनेक गुहा कोरण्यात आल्या आहेत. यातील बहुतांशी गुहा या पाणी साठविण्यासाठी खोदण्यात आल्या आहेत. काही गुहांचा आकार अजस्त्र आहे. यारून धोडपच्या किल्ल्यावर मोठा राबता असल्याचे अनूमान निघते.

देवी टाक्याची अविट गोडी...
धोडपची मुख्य गहा याच प्लगच्या पोटात मधोमध कोरली आहे. त्यात गडाच्या देवतेची जुनी कातळातली मुर्ती पूर्वीभिमूख आहे. या मंदिराच्या तळाशी पाण्याचे विशाल टाके आहे. यात वर्षभर पाणी उपलब्ध असते. संपूर्ण गडावर इतके स्वच्छ व गोड चविचे पाणी सापडणार नाही. सुरूवातीला बारा पंधरा फुटाचं हे टाकं पुढे अखिल खोल होत जातं. त्याच्या मधोमध एक दगडी खांब कोरण्यात आला आहे. भटकंती व सहलीसाठी येथे येणार्‍यांकरिता पिण्याच्या पाण्याचा हा सर्वात मोठा आसरा. त्यात अनेक दगडी शिळा पडलेल्या दिसतात. कचराही बराच दिसून येतो. प्लास्टिकच्या खाद्यपदार्थाच्या पिशव्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या टाकण्यात आल्या आहेत.

सुळक्याच्या दक्षिण बाजुला एक फार मोठी नैसर्गिक गुहा आहे, धेाडपचे हे दिसरे भौगोलिक आश्चर्यच म्हणायला हवे. सुमारे पन्नास फुट लांबीच्या या गुहेचे तोंड दक्षिण बाजूने उघडते गुहा पूर्वेकडे अरूंद होत जाते आणि अचानकपणे दक्षिण बाजुला वळसा घेत डोंगरातून आरपार जाते. म्हणजे दक्षिण बाजूने किंवा पश्चिम बाजूने या गुहेतून आरपार बघितले जाऊ शकते.


  सातमाळ डोंगरांच्या परिसरात अनेक डाईकच्या अश्मरचना व नेढी बघायला मिळतात. धोडपची ही गुहा म्हणजे आतून वळसा घेतलेलं एक प्रकारचं नेढच आहे. सर्वात मोठं नेढं अर्थातच धोडपच्या वायव्य दिशेला असलेल्या पिंपळागड उर्फ कंडाळ्यावर आहे. सप्तश्रृंगीगडा समोरच्या मोहनदरी किल्ल्यावरचे नेढे चौकोनी आकाराचे आहे. पिंपळागडचे नेढे मधल्या भागात उंचावलेले तर दोन्ही बाजुला अरुंद होत जाणारे आहे. त्याचा आकार पन्नास फुटाहून मोठा आहे. याच परिसरातल्या रामजी पांगेराच्या हौतात्मासाठी ओळखल्या जाणार्‍या कण्हेरगडावरही नेढं आहे. धोडप नंतरचा सर्वात मोठा डाईक म्हणजे कळवणची मोठी भिंत होय!

धोडपच्या डाईकवरून उत्तर दिशेला बंड्या, रवळ्या-जवळ्या, मार्कंडेय व सप्तश्रृंगीगड दिसत होते. कळवण शहर दूरवर दिसत होते, त्यापलिकडच्या डोंगर रांगा मात्र अस्पष्ट दृष्यमानतेमुळे निरखता आल्या नाहीत. पूर्वेकडे इखारा, लेकुरवाळा, कांचना, कोळदेर, इंद्राईच्या पलिकडचे डोंगर दिसत नव्हते.

जंगल भलेही खुरटे...रखरखीत झाले असेल...पण त्यातले सौंदर्य कितीतरी पट अधिक आहे...हे सागणारा हा पळस...त्याची कित्येक भावंडे सद्या धोडपच्या परिसरात बहरली आहेत...मावळतीला जंगलावर अचानक नजर फेरली तर याच्या ज्वाळांचा आभास होतो...म्हणूनच तर इंग्रजीत याला, जंगल फ्लेम म्हणतात...
 बहरले जंगल
भौगोलिक आश्चर्या सोबतच या हंगामात काही नैसर्गिक चमत्कार बघायला मिळाले. त्यातला पहिला चमत्कार म्हणजे पुर्ण जोमात बहरलेला पळस. धोडपची चढाई करताना अंधारत आम्हाला भर रस्त्यात पळस लागला, तेव्हाच स्पष्ट झाले की आम्ही वहिवाटीची वाट सोडून आडवाटेने चाललो आहोत. यंदा पळस थोडा लवकर बहरला आहे. धोडपच्या डाईकवरून उत्तर दिशेच्या जंगलात सर्वत्र अग्नीलोळ दिसत होते...तो पळस येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर बहरून आला आहे. आमच्या नाशिकला रंगाच्या पेशवेकालीन रहाडीत याच पळसाचा रंग करण्याची प्रथा अनेक वर्षांपर्यंत कायम होती.

करवंदाची फुले छान बहरली आहेत. 'त्या पांढर्‍या फुलांचा वास घेऊन बघ', असे गार्गीला सांगितले, तेव्हा 'त्याचा गंध म्हणजे परफ्यूम पेक्षाही सुंदर' असल्याची प्रतिक्रिया तिने व्यक्त केली. या जंगलातही वनखात्याने आवर्जुन गिरीपुष्पाचे मोठ्या प्रमाणावर रोपण केले आहे. त्याची निळसर पांढरी फुले बहरली आहेत. रूईची फुले फार टवटवीत पणे बहरल्याचे दिसून येत होते. बाकी झुडपांचेच या जंगलात अधिराज्य आहे. इथला बाभूळ मात्र पूर्वी फार दिसायचा, आता औषधापूरताही तो दिसून आला नाही.

या औदुंबर वृक्षातून सद्या पाणी झिरपतेय...इथल्या जीव सृष्टीच्या पोषणासाठीच परमेश्वराने तो पाझरवला असावा...

तलवारी गेल्या...हाती झारे कढाया
पायथ्याच्या हट्टी गावात जिर्णशीर्ण अवस्थेतले चिरेबंदी वाडे लक्ष वेधून घेतात. त्यांचा चौसोपी दगडी पाया, मोठमोठे लाकडाचे खांब, चुन्यातल्या विटांच्या भिंती, वैशिष्टपूर्ण खिडक्या नी दरवाजे गतकाळात येथे केवढे वैभव नांदत असेल याची साक्ष देतात. गावात बहुतांशी परदेशी मंडळी राहतात. हे प्रामुख्यान राजस्थानातून आलेले राजपूत आहेत. बरेच राजपूत सरदार मोगलांच्या चाकरीत असताना त्यांच्या सोबत राजस्थानातून आलेले राजपूत कालांतराने बांगलाणच्या विविध ठिकाणी स्थायीक झाले. हट्टीत मात्र त्यांची संख्या सर्वाधिक आहे. लढवैय्या राजपूतांनी कोणत्या कालखंडात आपल्या तलवांरी सोडून गुराख्याचे व खव्याचे काम हाती घेतले याचा निश्चीत काळ समजण्यास मार्ग नाही.

आज त्यांचा खव्याचा उद्योग मान टाकण्याच्या स्थितीत आहे. अशीच अवस्था इथल्या अहिरांच्या काचेच्या बांगड्यांच्या उत्पादनाची झाली व कोळशाच्या अभावामुळे व काचेच्या बांगळ्यांची बदलत्या काळात मागणी घटल्यामुळे हा व्यवसाय केव्हाच बंद झालाय. धोडंब्याचा कातडी कमावण्याचा व्यवसाय अखेरची घटका मोजतोय. या परिसरात गेल्या दशकात टोमॅटो सॉस व विदेशी दारू निर्माण करण्याचे कारखाने मात्र उभे राहिलेत.


हट्टीत आम्ही चारच्या सुमारास पोहोचलो. आम्हाला ज्याने सोडले होते ती जीप आम्हाला वेळेवर घ्यायला आली. सकाळी नऊ वाजेपासूनच त्याचा आम्हाला फोन येत होता, तसा आम्ही त्याला आमचे बेत व ठिकाण सांगत होते. आम्ही येई पर्यंत त्याच्या वडाळीभोई पर्यंतच्या फेर्‍या सुरू असल्याने त्याला आमच्यासाठी वाट बघत थांबावे लागले नाही. आमचा ट्रेक खरेतर हट्टीत संपला होता...परंतू?


'आधार', बसचा लहान गावांसाठी नाही?
वाटेत जीपवाल्या काकांनी त्यांच्या गावचा रानमेवा चाखायला दिला. एका बोरीवरची अनेक फळे पिकलेली होती. झाड गदागदा हलवून त्याने बारांचा सडा पाडला. त्यांची अविट गोडी चाखत आम्ही वडाळीभोईला अर्ध्या तासाच पोहोचलो. पुलावरच तुम्हाला बस मिळेल अशी माहिती मिळाल्याने आम्ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३च्या द्रुतगती मार्गिकेच्या बाहेर बसची वाट बघू लागलो. पोटातले कावळे  वडाळीभोईच्या लोकप्रिय पदार्थांकडे खुणावत होते. आम्ही एक एक प्लेटची पटकन ऑर्डर दिली, तोच एक खच्चून भरलेली बस येऊन थांबली. त्यात आमच्याकरिता जागा नसल्याने व या मार्गावरून भरपूर बस नाशिकला जात असल्याने आम्ही पोटपूजा आटोपून बसथांब्यावर येऊन पोहोचलो. गावातली मंडळी मात्र बसची वाट न बघता जीपमध्ये बसून प्रवासाला लागत होती. बसचा प्रवास सर्वात सुरक्षित व सुखकर, ही मंडळी का बरं अवैद्य, असुरक्षित प्रवास करतात? असे प्रश्न मनात उपस्थित व्हायला वेळ लागत नाही, त्याचे उत्तर मात्र थोळ्याच वेळात आम्हाला मिळाले.

नाशिकची पाटी लागलेली एक बस आमच्या समोरून निघून गेली, त्यात जागा असूनही बस का थांबली नाही. वडाळीभोई तर या मार्गावरचे महत्वाचे गाव आहे! या विचारात असताना दोन पाठोपाठ बस आमच्या समोरून गेल्या, त्याही थांबल्या नाहीत. जीपगाड्याही नसल्याने काही गावकरी आमच्या सोबत बसची वाट बघू लागले, तोच एका जीपने प्रवासी भरायला सुरूवात केली. आम्हाला तर त्याने ऑफरच दिली, तुम्हाला एकाच ठिकाणी बसवतो. मागे चार आसने होती, त्यात सात जण जमले की, लगेच नाशिकला स्वस्तात घेऊन जातो! त्याची जीपगाडी प्रवाशांनी भरत नव्हतीव आमची पावले तिथे वळत नव्हती, दरम्यान नाशिकला जाणारी एक एक बस आमच्या डोळ्यादेखत निघून जात होती.

हट्टी गावात असे काही वाडे अजून आपल्या गतवैभवाच्या खुणा टिकवून आहेत...काहींनी चांगली आर्थिक प्रगती साधली तेव्हा यांचे जतन न करता सिमेंट कॉंक्रिटची घरे मात्र उभारलीत...

 तब्बल दिड तास आम्ही वडाळीभोईच्या बस थांब्यावर होतो, पण एकही बस आमच्या समोर थांबली नाही. काही बसमधून वडाळीभोईला उतरणारे प्रवासी असायचे त्या बसही बस थांब्या पासून दोनशे मिटर दूरवर थांबायच्या व प्रवाशांना उतरवून निघून जायच्या. बस तर कधीही प्रवाशी नाकारत नाही, हा काय प्रकार आहे? या समजण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा एकाने सांगितले की या विनावाहक बसेस आहेत. एका स्थानपावरून सुटल्या की थेट दुसर्‍या स्थानकाला जातात, मध्ये थांबत नाही. पण येथे तर वडाळीभोईचे प्रवासी उतरत होते, मग रिकामी बस नेण्या ऐवजी ते प्रवासी का नेत नाहीत? या प्रश्नावर त्या ग्रहस्थाकडे कोणतेच उत्तर नव्हते.

शेवटी सूर्य क्षितीजापलिकडे निघाला तसा आमचा संयम सुटला. आता आम्ही महामार्गाच्या वर येऊन नाशिककडे जाणार्‍या बसेसना हात देत होतो व हाका मारून थांबण्याचे विनवत होते. गावतली काही मंडळी रस्त्यावर आली होती. महामार्गावर असे उभे राहणे खरे तर असूरक्षित, पण बस गाड्या प्रवाशांना नेणार नसतील तर त्यांनी प्रवास तरी कसा करायचा? आता आम्हाला कोडे उलगडले होते की, राज्य परिवहन खात्यातल्या कोणा सुपिक डोक्याने बसतो तोटा भरून काढण्यासाठी विनावाहक बसेसचा जसा घाट घातला, त्याच प्रमाणे महत्वाच्या गावांमध्ये वेगवान वाहतूक करून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मधली गावेच्या गावे वगळण्याचा अजब नियम केला, त्यामुळे ग्रामीण मंडळी बसची वाट बघण्याच्या भानगडीत न पडता थेट जीपच्या प्रवासाला पसंती देत होती. अशाने एसटी बसचा तोटा तरी कसा भरून काढणार.

भटकंतीत अशी बक्षिसं मिळण्याचा हा हंगाम आहे...हट्टी बाहेर बहरलेल्या एका बोरीवर ते आम्हाला प्राप्त झाले...
बस थांब्यावर आमच्या मागे उभ्या असलेल्या एका महिलेने गमतीशीर किस्सा सांगितला की, ती नाशिक ते लासलगाव बसमध्ये बसली. ती थेट बस होती. वाटेतले किमान दहा थांबे वगळून थेट नाशिकते लासलगाव धावणारी, त्यात आम्ही फक्त तीन प्रवाशी होतो. वाटेत जर ती थांबली असती तर भरून गेली असती. तीन प्रवाशांवर बसला कसे काय परवडते? हा तिने उपस्थित केलेला प्रश्न बस खात्यातल्या अधिकार्‍यांसमोर उपस्थित झाला नसेल.

अखेरीस वडाळीभोईवरून बारा किलो मिटर अंतरावरच्या पिंपळगाव डेपोला जाणारी एक बस आली आणि आम्ही मागचा पुढचा विचार न करता त्यात स्थानापान्न झालो. आमच्या सोबत नाशिकला जाण्याकरिता तेथे आलेल्या ग्रामस्थांनी हीच बस पकडली. पिंपळगावला पोहोचलो, तेव्हा चित्र फारसे बदलले नव्हते. तिथेही बसचे काही खरे नाही, असे चौकशी अंती समजले व नाईलाजाने आम्हाला एका मारूती व्हॅनमध्ये बसावे लागले. ड्राईव्हरसह ११ जण त्यात विरजमान झाले. आमच्या बॅंगा टपावर ठेवण्यात आल्या व आम्ही नाशिकला सुखरूप पोहोचलो. बसने आम्हाला जो हात दाखवा, तो अगदी अनपेक्षीत होता. बिकट अवस्था बघायला मिळाली ती लहान खेड्यातल्या प्रवाशांची. त्यांच्यासाठी तर वडाळीभोई-पिंपळगाव बस सुद्धा थांबली नाही. आमचा प्रवास तर एक दिवसाचाच, त्या ग्रामीण जनतेची बसच्या बदललेल्या धोरणामुळे कोण ससेहोलपट होत असणार?

दिड तासात सोळा एसटी बसेसनी आम्हाला दुरूनच रामराम ठोकला...त्यातल्या कित्येक तर अर्ध्या रिकाम्या...पण बिचार्‍या करणार काय? नियम सांगाते...मधल्या गावात थांबण्यात वेळ दवडू नका!
ज्या पद्धतीने ग्रामीण जनतेची बस खाते फरपट करत आहे ती, पाहता भटक्यांनी आपल्या जीवाभावाच्या एसटीबसवर भविष्यात भरवसा ठेऊन भटकंतीची आखणी करणे योग्य ठरणार नाही. आमचा एक प्रयोग फसला, परंतू एखाद्याला बसच्या भरवशावर भटकंती करायची असेल तर प्रवासातील सर्व टप्प्यावरच्या बसच्या वेळांबद्दल अगोदरच बस स्थानकातून खात्री करून घ्यावी लागेल आणि विशेष म्हणजे त्या वेळांना तिथे हजर रहावे लागेल, अन्यथा स्वत:चे वाहन घेऊन येणे किंवा खासगी वाहनांचा आधार घेणे इष्ट ठरेल.

तसेही महाराष्ट्रात शेकडोंच्या संख्येने असलेले दर्दी भटके स्वत:च्या खासगी वाहनांनी ट्रेकचा प्रवास करण्यास पसंती देऊ लागले आहेत. त्याचा खर्च हा जवळ पास बसच्या तिकीटा इतकाच येतो. बसची सेवा ही स्वस्त राहिलेली नाही, आता हेच बघा, नाशिकहून वडाळीभोई ६७ रूपये. तिथून समजा हट्टी पर्यंतच्या १२ किलो मिटर करिता १५ रूपये पडतील म्हणजे एका माणसाला दोन्ही बाजुचे बस भाडे १५८ रूपये. पाच जणांच्या गटाला एका वेळी ७९०/- रूपये. यात बस थांब्या पर्यंत ऑटो रिक्षा किंवा टॅक्सीचा दोन्ही बाजींचा खर्च किमान २००/- रूपये.

औदुंबर वृक्षाचा पाझर रखरखत्या उन्हातही गायीगुरांची क्षुधा शांत करतो...गायीची पाणी पिण्याची पद्धत फारच चमत्कारीक...एका वेळी ती अर्धाधिक लिटर तरी पाणी शोषून घेते...
बसने ६० ते ६५ किलो मिटर अंतराचा ट्रेक करायचा झाल्यास हजारच्या आसपास खर्च येतो. त्या ऐवजी सहभागींपैकी कोणा एकाची एक कार नेल्यास १८ किलो मिटर प्रति लिटर पेट्रोल धरल्यास १४० किलो मिटरकरिता लागेल सुमारे ८ लिटर पेट्रोल म्हणजे आजच्या ८० रूपये लिटर प्रमाणे ६२२/- रूपये त्यात टोलचे (पथकर) सरासरी अडीचशे रूपये पकडल्यास ९००/- रूपये होतात. याचाच अर्थ बसने ट्रेक करण्यापेक्षा स्वत:च्या वाहनाने ट्रेक केला तर वेळे बरोबरच पैशांची बचत होते. असंही एसटीने आपल्या धोरणात अनेक बदल केले आहेत. त्यामुळे कायमच सजग राहणारी ट्रेकर मंडळी खर्चिक आणि वेळकाढू बसच्या नादाला लागण्याची शक्यता तशी कमीच.

काळ्या पिवळीला प्रोत्साहन...लहान पिढीवर संस्कार घडवणार?
एक वेळ ट्रेकर मंडळी वेळ व पैशाची बचत करणारा प्रवासाचा सर्वोत्तम पर्याय निवडतीलही, परंतू महाराष्ट्रात खेडोपाडी दररोज शेकडो प्रवाशांचे काय? त्यांना तर काळ्या पिवळ्यांवरच विसंबून राहवे लागणार. अधिकाधीक पावले ही खासगी सार्वजनिक वाहतूकीकडेच वळणार. आता खासगी प्रवाशी काळ्या पिवळ्या गाड्या या ग्रामीण बरोबरच शहरी प्रवासाकरिता उत्तम पर्याय म्हणून समोर आल्या असल्या तरी शासनच खासगी प्रवास करू नका! बसनेच प्रवास करा! अशी जाहिरात करत असतं. त्या जाहिरातीला अर्थ तरी काय उरतो.


याचा सर्वात वाईट परिणाम हा लहान मुलांच्या मनावर होणार, हे निश्चीत. वडिलधारी मंडळी काळ्या पिवळ्या गाड्यातून प्रवास करतात. जमेल तितके प्रवासी त्यातून वाहून नेले जातात, म्हणजे 'असे करणे बेकायदा नाही, त्यात काही वावगे नाही', असेच त्यांच्या मनावर बिंबणार? पुढे जाऊन ते त्यांच्या अंगवळणी पडणार! आणि ज्या भारतात युद्धा पेक्षा जास्त मृत्यू रस्ते अपघातात होतात, तिथे प्रवासाचा स्तर अधिकाधीक खालावणार...अशी ही व्यवस्था निर्माण करण्याची अवदशा तरी कोणाला आठवली? देव त्या अधिकारी व मंत्र्यांना सुबुद्धी देवो. ट्रेकरची लाल डब्ब्या सोबत तुटलेली नाळ पुन्हा जुळो', सह्याद्रीची पुढची भेट लवकरच घडो या सदिच्छेसह आमच्या भटकंतीला सहाय्य करणार्‍या सर्वांना धन्यवाद!


https://www.facebook.com/abpmajha/videos/10160027177210271/

(ट्रेक संपल्यानंतर हा वृत्तवाहिनीवरचा वृत्तांत हाती आला...आता त्यातली भाषा मोठी चमत्कारीक वाटते. 'वृक्षरोपणामुळे गाव आले संकटात', असा संदेश त्यातून प्रसारीत होतोय...प्रत्यक्षात तसे नाही. वनखात्याने महाराष्ट्रात बेफामपद्दतीने एक प्रजातीचे रोपण अक्षरश: उरकले...त्यात गिरीपुष्पाचा समावेश होतो...प्रत्यक्षात वृक्षारोपण करणे केव्हाही चांगलेच, पण ते एक प्रजातीचे कधीच नसावे, नाही तर अशी नैसर्गिक आपत्ती ही ओढवू शकते.)

(धोडप ट्रेक वृत्तांत समाप्त)

https://www.facebook.com/SahyadriTrekkersBloggers/
https://www.facebook.com/SahyadriTrekkersBloggers/

No comments:

Post a Comment