Thursday, February 1, 2018

Dhodap 2: इथली अन्न साखळी खंडित होतेय?

धोडप भाग २:
(उत्तरार्ध) 
''आपण महाराष्ट्रातील दुसर्‍या सर्वात उंच किल्ल्याच्या शिखराच्या पोटात एका प्रशस्त गुहेत आज मुक्काम करत आहोत'', ही भावनाच अधिक सुखावणारी होती. नाशिकहून धोडपच्या गुहेपर्यंतचा प्रवास प्रत्येक क्षणाला आनंद देणारा. जिवाभावाच्या एसटीने ऐनवेळी धोका दिल्याने, माझ्याकडे 'काय म्हणते तुमची एसटी? अशा अविर्भावात कटाक्ष टाकण्यात आला, असे केव्हा केव्हा घडते...घडू शकते असे इशार्‍यातले उत्तर दिल्यानंतर सर्वांना धोडपची गुहा कशासाठी प्रसिद्ध आहे तर ती तिथल्या उंदरांमुळे...रात्र उंदरांची जागा रहा या उक्ती नुसार सर्वांना सहजग होऊन आजची रात्र काढावी लागणार याची कल्पना दिली. गुहेतले उंदीर लोकप्रिय आहेत, तेव्हा भोजन केल्यानंतर उरलेला भात आणि गुळाच्या शिर्‍याच्या पातेल्यावर मोंठे दगड ठेवून आम्ही शुभरात्री केली. उद्या याचाच नाष्त्यासाठी उपयोग होणार होता. धुळीचा त्रास जाणवू नये व उंदरांची भिती नको, म्हणून आम्ही गुहेच्या आत दोन तंबु लावले. 
हे मूषकराज मोठे धीट...खिशातून मोबाईल फोन काढून बॅटरीच्या उजेडात त्यांना कॅमेराबंद करे पर्यंत पठ्ठ्या जागचा हलला नाही...'इथे आमचेच अधिराज्य', असेच जणू तो सूचवत असावा!

रात्र उंदरांची जागा रहा
सोबतचा शिधा आम्ही तंबुत घेतला. मध्यरात्र उलटी तोच, उंदीर पातेले उचकटण्याचा प्रयत्न करण्याचे आवाज येऊ लागले. थकव्यामुळे कुणीच उठण्याच्या मन:स्थितीत नव्हते. गुहेतल्या मिट्ट काळोखात उंदराचे चिरकणे व इकडून तिकडे पळणे जाणवत होते. त्यामुळे नम्रताची झोप उडाली होती. गार्गी व तिची मैत्रिण गाढ झोपेतुन जाग्या झाल्या त्या उंदरांच्या पळापळीमुळे. अजय बाहेर झोपला होता, त्यांच्या पांघरूणावरून उंदीर पळत होते. तंबुवरून ते इकडून तिकडे जाताना जाणवत होते. आमच्या बाहेरच्या बॅंगांकडे त्यांनी केव्हाच मोर्चा वळवला होता. दोन एकदा उठून उंदरांना हटकले, पण ते बरेच धीट भासले...हटकण्याचा त्यांच्यावर फार काही उपयोग झाला नाही.

'उंदीर काही तरी कुरतडतोय!' असे सांगुन नम्रताने मला उठवले. हो...नाही करता मी परत एकदा उठलो, बॅगा उलथून बघितल्या तर त्या खालून उंदीर पळाले. आम्ही बॅगांमध्ये काहीच खाण्याचे पदार्थ ठेवले नव्हते हे बरे केले. थोड्या वेळाने नम्रताने पुन्हा उठवून उंदीर काही तरी कुरतडत असल्याचे सांगितले. आम्ही बाहेर जाऊन तपासले, तेव्हा गार्गीच्या तंबूला एक बारीक छिद्र दिसून आले. उंदरांच्या प्रतापामुळे आपसूकपणे मध्यरात्री उठण्याची संधी मिळाली, परंतू ज्या पद्धतीने दिसायला हवी ती मंदाकिनी आकाशगंगा तितकी काही स्पष्ट दिसला नाही? काही वर्षांपूवी रतनगडवर मात्र असा अवर्णनीय नजारा बघितल्याचे स्मरत होते. काळ्या ढगांच्या पार्श्वभूमीवर लखळकणार्‍या अब्दावधी चांदण्या, ग्रह...जणू प्रकाशमान हिरे लखलखताहेत, असा तो अवर्णनीय नजारा होता. पुन्हा गुहेत शिरून आम्ही सोबतच्या सामानाची सुरक्षा ठेवण्याच्या कामाला जुंपलो. थोडी झोप लागली असेल, तोच तंबूत उंदिर शिरल्याचे गार्गी आपल्या मैत्रिणीला मोठ्यांदा सांगु लागली. बॅगेतही उंदिर शिरल्याचे ती म्हणाली, पुन्हा झोपमोड...पुन्हा सामानाची राखण... 

आमच्या अगोदर गुहेत डेरा टाकणारा मुंबईच्या भटक्यांवर मात्र उंदरां काहीच प्रभाव नसावा, मंडळी निपचीत घोरत पहुडली होती. त्यांची भटकंती सप्तश्रृंगीकडापासून सुरू झाली होती. तिथून रवळ्या, जवळ्या, बंड्या करून तो धोडपवर आले होते, त्या थकव्याचा हा परिणाम असावा...पहाटे केव्हा तरी झोप लागली, परंतू तोवर अजयने सूर्योदय बघण्यासाठी उठवले. गुहेच्या बाहेर तांबड फाटलं होतं, तेव्हा भराभर सगळ्यांना उठवून आम्ही गुहेच्या बाहेर आलो. तोवर मुंबईकर ट्रेकर्सच्या बोलण्यातून, कुणाचा पेला गायब तर कुणाचे काय पळविण्यात आलेले. त्यांच्या राशनपाण्यावर मुषकराजांनी चांगला डल्ला मारला होता. माझ्या नव्या कोर्‍या सॅकचा एक पट्टा कुरतडण्यात आला, तर गार्गीच्या सॅकचा पट्टा व तिची टोपी कुरतडण्यात आली होती. या धोडपच्या गुहेत एकदा अंधार दाटला की काहीच सुरक्षित राहू शकत नाही, तिथे फक्त मुषकराजांचे अधिराज्य. त्यावर आजघडीला तरी काही पर्याय नाही. 

महाराष्ट्रातल्या गडकिल्यांवर, गुहांमध्ये मुषकराजांचे अस्तित्व अनेक ठिकाणी आहे, परंतू धोडपवर ते जास्त मोठ्या प्रमाणावर आहे. ज्येष्ठ लेखक आनंद पाळंदेंच्या एका वर्णनात धोडपच्या गुहेतल्या उंदरांबद्दल वाचण्यात आले होते. ते प्रमाण आता अफाट वाढले आहे. त्याच्या सपाट्यात काय सापडेल अनं काय नाही'. मागच्या वेळी धोडप सुळक्याच्या उत्तर धारेच्या प्रथम आरोहण मोहिमेच्या वेळी आमच्या चमुने आरोहणाचे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी गुहेच्या छताला बोल्ट मारून आपल्या सॅक त्यांस अडकविल्या होत्या, त्यावेळी त्यांच्या दोरावरून कुशल आरोहणाचे किस्से या निमीत्ताने ताजे झाले...येथे मुक्काम करायचा तर उंदरांची जोखिम पत्कारूनच.
रात्रीच्या अंधारात धोडपच्या एका नैसर्गिक गुहेत हा पक्षी रात्रीच्या निवार्‍याला थांबला होता...त्यांचे घर म्हणजे संपुर्ण दरीचा परिसर सहजपणे दिसू शकणारे एक prime location...

अन्न साखळी खंडलीय...
असे का घडतेय की, सह्याद्रीतल्या डोंगरांवर उंदरांचे प्रमाण वाढतेय? जिवो जीवस्य जीवनम्‌...येथे निसर्गातली अन्न साखळी कशी काय खंडित झालीयं? मला वाटतं, याचं मुळ सह्याद्रीत अफाट प्रमाणावर कत्तल केलेल्या झाडांच्या मुळाशी असावं. शिवकाळात झाडे सहजासहज तोडण्याची परवानगी नव्हती. मोठमोठाले वृक्ष होते, तेव्हा त्यावर वाढणारी नानाविविध प्राणी, पक्षी, किटकांची दुनिया आबाद होती. प्रत्येकला त्याचे अन्न व निवारा मिळत होता. आता वृक्षच राहिले नाही तर त्यावर उदरनिर्वाह करणारे जीव तरी कुठून येणार उंदरांसारखे फार थोडे जीव आहेत जी, कमालीच्या विपरीत स्थितीतही आपले अस्तित्व टिकवून आहेत. तीच गोष्ट बिबट्यांची व काही प्रमाणात माकडांची. 

वाघ, चित्ते, अस्वल, तणमोर, माळढोक आपल्या महाराष्ट्रातल्या सह्यासृष्टीत कोणे एकेकाळी अस्तित्वात होते. इंग्रजांच्या काळात वृक्षतोड आणि प्राण्यांची शिकार केवळ छंद म्हणूनही वाढीस लागली. इंग्रज गेल्यावर आपल्या लोकांनी, 'आपलीच मालमत्ता', या अविर्भावात या अनमोल जीवसृष्टीवर असा काही डल्ला मारला की आता त्यांतले फार थोडे जीव शिल्लक आहेत. त्यांना वाचविण्यासाठी कायदे, नियम बनवावे लागत आहेत, तरीही माणसाला अजून भानच नाही, तो आपल्या क्षणिक, क्षुल्लक गरजांकरिता उरले सुरले जीवही कवडीमोल लेखून वागत आहेत. त्यामुषकांना दोष देण्याचा येथे हेतू नाही, फक्त काय स्थिती आहे सह्याद्रीतल्या डोंगरांची व कशा प्रकारे सह्याभ्रमंती प्रभावित झाली आहे. मुक्कामाच्या निमीत्ताने काय काळजी घेतली जावी, याकरिताच हा प्रपंच! आमची तारांबळ कशी उडाली हेच यातून सूचित करायचेय!
दमदार चढाईनंतर ताजे गरम जेवण म्हणजे ट्रेकवरचे सर्वात मोठे आमिषच...इथे तर गुळ नी साजूक तुपाच्या शिर्‍यांचा बेत...जोडीला रशाची भाजी नी मसाले भात...

तो येतोय!

'तसा तो राजच येत असतो', आपले कधी लक्ष जाते किंत्येकदा आपल्या गावीही नसते, पण डोंगरावर त्याचे येणे आणि जाणे या दोन्ही कमालीच्या सुखावणार्‍या गोष्टी. अगदी रोज जरी हा योग आला तरी त्याचं नित्य नूतन दर्शन हे घडणारच! आजही तंबुच्या बाहेरची लगबग ऐकुन, 'तो येणार', याची गंधवार्त पसरली. रात्रभर मुषकराजांच्या सानिध्यामुळे पहाटे उशिरा झोप लागली होती, परंतू ती तोडण्यातच शहाणपणा होता. तो काही क्षणच थांबतो ना! नंतर मात्र त्याचे संसारी माणसाला फार अप्रुप नसते. सर्व वृक्षवल्लींना तो आपल्या हलक्या स्पर्षाने अन्न पुरवतो...
निसर्ग मोठा कलाकार...धोडपवरच्या जीर्णशिर्ण अवशेषातूनही इखारा सुळक्याचे लोभस दर्शन घडत होते...

पूर्वेला काळ्याशार पार्श्वभूमीवर हलकेच एक भलामोंठा लालेलाल गोळा वर आला. तो जस जसा वर येत होता, तस तसे त्यात कधी तांबूस तर कधी पिवळा रंग मिसळत क्षणाक्षणाला आपले रूप पालटत होता. मंद छटांकडून लखलखीत होतानाचा सूर्य पाहणे केवळ विलोभनिय. हे दृष्य आयुष्यात कितीदा बघितले असेल! पण त्याची रंगत जराही कमी नसल्याचे जाणवत होते. इखार्‍याच्या आडून हळूहळू वर येणार्‍या भास्कराच्या विविध रंगी छटांमध्ये आसपासची अनेक खेडी आता ऊठून दिसत होती. सातमाळाच्या डोंगररांगेतली ही गावे एकमेकांपासून तशी बरीच दूरवर वसली आहेत, परंतू त्यांनी गुंफुन ठेवणारा एक समान धागा दिसत होता, तो म्हणजे शेतीचे असंख्य चौकोनी आयाताकृती आकार. पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असलेल्या नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या या भागात कैक संख्येने शेततळी बांधण्यात आली आहेत, उगवत्या सूर्या बरोबर त्यातले पाणी चमकत असल्याने एक वेगळेच दृष्य दिसत होते. 


पूर्व सपाटीपर्यंत जाऊन आम्ही सूर्योदयाचा मनमुराद आनंद घेतला. गुहेत माघारी परतून अगोदर चहा आणि नंतर नाष्त्याची तयारी असा क्रम सुरू असताना मुंबईकर भटक्यांच्या आवराआवरीने चांगलाच वेग घेतल्याचे दिसत होते. त्यांच्या दीर्घ भटकंतीचा आज समारोप होणार होता, त्यांची ती लगबग. आमची छावणी मात्र, 'कोणतीही घाई नाही', अशा अविर्भावात यथावकाश तयारी करत होती. 'गड चढताना होते तशी दमछाक उतरताना होत नाही, तेव्हा दिड दोन तासात खाली पोहोचू', अशी अटकळ बांधली जात होती. आम्ही सोबतच्या सर्व बाटल्या देवी टाक्याच्या कमालीच्या चविष्ट पाण्याने भरून घेतल्या. दिवसा उजेडी देवीच्या टाक्यातले दृष्य मात्र मन खट्टू करणारे होते. धोडपवर वर्षभर पुरेल इतके अतिशय चवदार व स्वच्छ पाणी या टाक्यात साठते. गडावरचे बाकी सर्व टाके शेवाळेलेले, हिरवट तेव्हा किमान देवी टाक्याची स्वच्छता राखण्याची जबाबदारी येथे भेट देणार्‍या प्रत्येकाचीच...प्रत्यक्षात तसे काही घडत नव्हते. या टाक्यात प्लास्टिकची खाद्यपदार्थांची वेष्टने, पाण्याच्या बाटल्या व अन्य घाण टाकून ठेवल्याने पाणी काळजीपूर्वक उपसावे लागत होते. बरं, टाके कमालीचे खोल असल्याने व पुढच्या भागात पाण्याची खोली जास्त असल्याने त्यातून पाणी उपसणेही सोपे नाही.
हीच का सौंदर्यदृष्टी...भुगोलातला चमत्कार प्रत्यक्षात दर्शविणार्‍या धोडपच्या डाईकच्या अश्मभिंतीला अशा प्रकारे कठडे बसविण्याची खरच आवश्यकता नाही...

तुमच्या डाईकला आमचे संरक्षण?
सर्व सामानाची आवराआवर करून आम्ही गडाचे पश्चिम टोक गाठले. या ठिकाणी दोन्ही बाजुंला वनखात्याने लोखंडी पाईपची कैक मिटर लांब अशी अखंड रेलंगची, अर्थात सुरक्षा कड्याची रांग खडकात सिमेंट कॉंक्रिटच्या सहाय्याने बसवली आहे. अशा प्रकारचे सुरक्षा कडे नितांत सुंदर सह्याद्रीला अभिषाप ठरावेत इतक्या बेढब पद्धतीने जिथे अजिबात गरज नाही, तिथे उभारण्यात आले आहेत, त्याला धोडपही अपवाद नव्हता. जिथे हजारोंच्या संख्येने लोक येत नाहीत, जिथे अतिशय धोकादायक असे कडे नाहीत, अशा ठिकाणीही लोखंडी पाईपचे सुरक्षाकडे उभारून ठेवलेत. गडाचे संवर्धन कशा पद्धतीने करावेत, या संदर्भात महाराष्ट्रातील अनूभवी दुर्गसंवर्धक, गिर्यारोहण संस्थांची मते विचारात घेतली जातात की नाही, की त्यांना केराची टोपली दाखविली जाते. दुर्ग संवर्धन समित्या महाराष्ट्रात अलिकडच्या काळात सरकारमार्फत स्थापिल्या जात आहेत, परंतू तरही गडांना अशी अवकळा आणण्याचे काम अव्ह्यातपणे सुरू आहे. त्यावर जो मोठा खर्च होतोय तो अनाठी ठरत आहे. अशी बांधकामे, असे सुरक्षा कडे डोंगरांवरच्या कमालीच्या विपरीत हवामानात टिकू शकत नाहीत, हे वारंवार सिद्ध झाले आहे, तरीही हा अट्टाहास सुरूच राहणार असेल आणि महाराष्ट्रातीली जनता त्याकडे असहाय्य पणे बघणार असेल तर त्या सह्याद्रीतल्या गडकोटांच्या दोन पाच टक्का उरलेल्या अवशेषांच देवच रक्षण करो!
गडांवरच्या प्रतिकुल हवामानात आजच्या युगातले बांधकामतंत्र किती कुचकामी ठरते...संरक्षक कठडे दोनेक वर्षातच मान टाकू लागलेत...त्याची दूरूस्तीही आता परवडणारी नाही...

सुळक्याच्या मध्यावर गुहा
विशाला अशी धोडपवरची डाईकची अश्मरचना बघून आम्ही परतीचा रस्ता धरला. तिथून दिसणारी गावे, शहरे, डोंगर, किल्ले याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला, परंतू हवामानात धुसरता खूप होती, त्यामुळे दृष्यमानता स्पष्ट नव्हती. गुहेतल्या देवीची यथासांग पुजा करण्यात आली व आम्ही मुक्कामाची जागा सोडली. सुळक्याच्या पूर्व कड्याला मध्यावर एक चौकोनी गुहा आहे. तिथपर्यंतचा मार्ग मोठा बिकट, तो आम्ही काळजीपूर्वक पार केला, परंतू शेवटच्या कातळटप्पा कठिण असल्याने नव्या गड्यांना खालीच थांबण्यास सांगून आम्ही दोन खांबांची गहा बघितली. त्यात माणूस कसा बसा बसू शकतो, उभे राहण्याचा प्रश्नच नाही. त्यातही भिंतीवर काहींनी आपली नावे लिहून ठेवली आहेत.  या गुहेचा उपयोग कशाकरिता करत असावेत? टेहाळणी, संपत्ती ठेवण्यासाठी की दारूगोळा की आणखी काही? इथून पूर्व कड्याचा व इखारा सुळक्याचा नजारा फार सुंदर दिसतो.
पूर्व कड्या लगत वाड्याचे भग्नावशेष विखुरले आहेत. तिथे शेवाळेली पाण्याची दोन टाकी आहेत. वाड्यांच्या चिरेबंदी भिंती ढासळल्या आहेत. तर एकेठिकाणी चिरेबंदी छत अजूनही टिकून आहे. त्याचे स्थापत्य, त्याची सांधणी थक्क करून सोडते. इथल्या बांधकामाला चौकोनी आकाराचे दगड छताला अजूनही सुस्थितीतपणे टिकून आहेत, त्यांची बांधणी तरी कशी करत असावेत? मनात उठणारा हा सवाल चक्रावून टाकतो. 

त्यावेळचे बांधकामशास्त्र काय अजोड होते! काही ठिकाणी हिन्दू पद्धतीची मंदिरे पाडून वाड्याचे बांधकाम करण्यात आले असावे, असे काही चिरे बघून जाणवते. धोडप अधिक काळ मोगलाइत होत्या, त्यावेळी गडावरची मंदिरे पाडण्यात आल्याचे जाणकार मंडळी सांगतात. एके ठिकाणी आम्हाला कळसाच्या आतील बाजूची मोरपट्टी दिसली, त्यावरून येथे कोणे एकेकाळी फार मोठे मंदिर हिन्दू राजांनी बांधले असावे, याचा बोध होतेा. 
या ठिकाणी प्रामुख्याने गडाच्या प्रमुख अधिकार्‍यांची निवास्थाने असावित. एकाच परिसरात मोठ्या प्रमाणावर वाड्याची जोती आढळतात. काहीं जोती तर असंख्य उन, वारे नी आक्रमकांच्या धडका सोसूनही आजही सुबकपणा टिकवून; त्यांच्या आकारमानावरून तिथे कचेर्‍या असाव्यात असे वाटते. या पडक्या अवशेषांच्या मागे पाण्याचे मोठा बांधिव तलाव असून त्याला मोठी तटबंदी आहे. त्यातून खालच्या गावात गुरूत्वाकर्षण पद्धतीने लोखंडी पाईपच्या सहाय्याने पाणी उपसा केले जातो.
असे बांधकाम आजच्या पिढीच्या हातून घडणे नाही...धोडपच्या पूर्व टोकावरच्या या पडक्या वाड्याचे छप्पर दगडी चिर्‍यांचे बनले आहे...चारेकशे वर्षातही ते टिकून आहे...छताला असे चिरे बसवतात तरी कसे? हा प्रश्न आजच्या अभियंत्यांना पडायलो हवा...असे चिरकाळ टिकणारे बांधकाम नव्याने साकारण्याचा प्रयत्न करून बघायला हवाच हवा!

प्रमुख दरवाजा उतरताना, इतक्या उंचीवर, ओबड धोबड मार्गाने रात्री आपण या ठिकाणहून वर आलो? असे आश्चर्यमिश्रीत उद्‌गार कानी पडत होते.  मान उंचावून मागे नजर फेरली, तेव्हा तट व बुरूजाचे बेजोड बांधकाम आज शेकडो वर्षे उन वारा पाऊस सहन करत कसे काय टिकून आहे, हा विचार आपल्याला आपल्या गत वैभवाच्या आठवणीत घेऊन जातो. आपल्या पूर्वजांचे त्याकाळचे स्थापत्य, बांधकामातील अचूकता, विज व उपकरणांच्या शिवाय अफाट मोंठी बांधकामे करण्याची हातोटी पाहून आश्चर्य झाल्याशिवाय राहत नाही. दुसरा बुरूज ओलांडत असताना आमची भेट ओतुरहून आलेल्या युवकांशी घडली, त्यांच्यापैकी एकाने लोखंडी सुरक्षा कड्याचा एक खांबच खेचून आणला होता. गावाकडची ही मंडळी अक्षरशा माकडागत कड्याच्या पोटातल्या टाक्यापर्यंत पोहोचली, आता यांच्या संरक्षणासाठी या लोखंडी कठड्यांचे काय काम...आणि सह्याभटक्यांकरिताही हे संरक्षक कठडे गरजेचे नाहीत. येथे मोठी जत्राही भरत नाहीत, ज्यामुळे गडावर एकच गर्दी उसळते, मग हा खर्च अनाठायीच नाही का ठरत?
छाती दडपणारा अफाट कातळकडा
थोडी खाली उतरल्यावर मुख्य वाट सोडून उजवीकडे लोखंडी सुरक्षाकड्यांची रांग पश्चिम दिशेला जात असल्याचे दिसत होते. हा काय प्रकार म्हणून आम्ही ती वाट धरली, पण रस्ता संपता संपेना. कड्यालगत वळणावळणांची चारशे मिटर पेक्षा अधिक अंतराचा हा टप्पा प्रत्यक्षात धोडपच्या अजस्त्र अशा घळीत घेऊन जातो. वर शेकडो फुट उंची व विस्ताराचा कडा, त्यावर नजर ठहरत नाही. यापूर्वीच्या भटकंतीत हा भाग बघण्याचे राहून गेले होते. धोडपवरचे गायीचे नैसर्गिक शिल्प येथे असावे या अपेक्षेने आम्ही ही वाट धरली, ती आम्हाला पाण्याच्या धारेच्या मार्गावर घेऊन गेली, तिथे सुट्ट्या दगडांची वाट खाली उतरते व तिथून डावीकडे पुन्हा लोखंडी सुरक्षाकडे थेट धोडपच्या कातळ टप्प्याच्या पायर्‍यांखाली घेऊन येतात. 
पुर्वी धोडपच्या बिकट कातळ  टप्प्याला हा मार्ग पर्यायी असावा! आता मात्र दोन मोठ्ठे लोखंडी जिने बांधल्याने या पर्यायी मार्गावर इतके अफाट रेलिंग कशासाठी? हा सवाल आपल्या डोक्यात उपस्थित झाल्यावाचून राहत नाही. सिमेंट व लोखंडात इतके लांबलचक सुरक्षाकडे उभारण्यामागचे कारण तरी काय?

वीस फुटांचा सरळ सोपा उतरण्याचा मार्ग असताना हा लक्षावधींच्या खर्चाचा लांबलचक वळसा कशासाठी तयार केलायं? तो करण्यामागे कोणती सुपिक कल्पना असावी? या बेबंद खर्चाचा ताळेबंद कोणी तपासत नसेल? अशा अनेक प्रश्नासह आपला पूढचा मार्ग सुरू होतो, तो आश्रमाच्या दिशेने. वीस मिनीटात खडतर उतार पार करून आश्रमाच्या टप्प्यावर दाखल झाल्यानंतर आम्ही सुंदर स्थापत्याचे नमुना असलेली बारव डोळे भरून बघितली.

 ही बारव खालच्या भागात दगडात व वरच्या भागात विटात घडवली आहे. अनेक प्रकारचे कमानी बांधकाम लक्ष वेधून घेते. बारवचे पाणी कमालीचे थंड आहे, परंतू त्यात फार मोठ्या प्रमाणावर घाण साठली आहे, ते न केवळ पिण्यासाठी उपयोगाचे, हातपाय धुण्यासही सुरक्षित नाही. इथून उजवीकडे दहा मिनीटांच्या अंतरावर दोन पुरातन मंदिरे आहेत, तर डावीकडे गडाचे पूर्व टोक. तिथे गडाच्या वस्तीची वेस व त्यावरचा देवनागरी शिलेलेख असलेला दगडी दरवाजा बर्‍याच प्रमाणावर सुस्थितीत उभा आहे. 

या प्रवेश दरवाजाच्या आतील बाजुला ठिकठिकाणी जुन्या बांधकामांचे अवशेष आहेत. काही ठिकाणी तर जमिनीच्या पोटात पायर्‍यांची पाण्याची टाकी, तर काही ठिकाणी झाडीच्या आत लपलेले खाली उतरण्याचे मार्ग, जणू चारवाट असावी. मारूतीचे एक पडझड झाल्यामुळे काहीसे कललेले मंदिर आहे, त्याचा अर्धवर्तूळाकार घुमट इतका गोल कसा? असे गोल घुमट मुसलमानी बांधकामात अधिकतर बघायला मिळतात. 

या दरवाजाला बाहेरच्या बाजूने दोन मोठे बुरूज आहेत. तिथून पाचच मिनीटात नैसर्गिक तलाव आणि त्या वाटेवर राखण करण्यासाठी उभा असलेला धोडप किल्ल्याचा सर्वात देखणा व सुथितितला बुरूज उभा आहे. त्याच्या वरच्या मार्गावर मात्र मोठा कडा कोसळा आहे. 

इथुन घळीच्या वाटेने हट्टीकडे उतरता येते. हा मार्ग प्रचलित व जास्त सोपा, आम्ही मात्र आश्रमात परतलो, कारण आमचे दोन गडी तिथल्या औदुंबर वृक्षाखाली विश्रांती घेत होते. वाटेत लहान बाळाला कडेवरून घेऊन जाणारे एक जोडपे भेटले. वळाळीभोई इथल्या एका खेड्यातून ते जुन्या घाटवाटेने कळवळला जात होते. लक्षात घ्या धोडप ते कळवण हे अंतर रस्ता मार्गा दहा किलो मिटर आहे. हे जोडपे घाटा, जंगल, डोंगर असे अंतर पायी कापणार होता. गाव तेथे एसटी बस सेवेचा लाभ त्यांच्या गावाला होत नसावा, किंवा एसटीचे भाडे आवाक्या बाहेर जात असावे किंवा दोन्ही कारणे असावीत!

या तलावाच्या काठावर लष्करी छावणी असावी. बुरूजाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर घरांची जोती व दगडी बांधकामांचे असंख्य अवशेष येथे विखुरलेले आहेत. येथे मोठी सपाटी असल्याने लष्करी तळासाठी ही जागा योग्य वाटते. दुसर्‍या सूरत मोहिमेवरून परतताना छत्रपती शिवाजी महाराजांनी धोडपला भेट दिल्याचे ऐतिहासिक उल्लेख आहेत. परंतू धोडप हा सर्वाधिक ओळखला जातो तो राघोबादादा आणि माधवराव या पेशवाईतल्या युद्धामुळे ज्यात पुतण्याने काकांचा जुन १७६८मध्ये पराभव केला. भारतात इंग्रज सत्तेची पाळेमुळे घट्ट रोवण्यात या लढाईचे महत्व मानले जाते. धोडपचे पेशवाईतले प्रसिद्ध युद्ध कोठे झाले असावे? याचा काही बोध होत नाही.


अनं खवा आटला...
या आश्रमा समोर असलेल्या औदूंबर वृक्षाखाली पाण्याचा जिवंत झरा वाहतोय. येथे लोखंडाची दोन अजस्त्र घमेली आहेत. बर्‍याच वर्षांपासून या किल्ल्यावर गाईचे दूध आटवून खवा तयार केला जायचा. सातमाळा रांगेतले हे नेहमीचेच चित्र. गडांचे राजनैतिक महत्व इंग्रजांनी देशावर कब्जा केल्या पासून संपले. १८१८च्या सुमारास इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतांशी गडांचे मार्ग तोफा, सुरूंग लाऊन उध्वस्त केले आणि कोणे एकेकाळी तलवारींचा खणखणाट करणार्‍या योध्यांनी नंतर हातात चक्क डाव घेऊन कुटुंबाचा गाडा चालविला, त्याचे उत्तम उदाहरण हट्टीत बघायला मिळते. आता तेही मिळायचे असे म्हणावे लागेल, कारण वनकात्याने गडावरचा लाकुडफाटा तोडून खवा आटविण्यास बंदी घातली आहे. हे एक प्रकारे चांगलेच झाले असे म्हणावे लागेल. 

इंग्रजांनी तयार केलेल्या दार्शनिकेत धोडपवर मोठ्या प्रमाणावर जंगल असल्याचे व त्यात अर्जुन, सादडा, जांभूळ, आंब्याचे असंख्य वृक्ष असल्याचा उल्लेख आहे. आज घडीला त्यातले पाच टक्के सुद्धा मोठे वृक्ष शिल्लक नाहीत. गडावर अफाट मोठे सुरक्षाकठडे आणि लोखंडी जीने बसविण्यापेक्षा हा खर्च जर ढासळलेल्या तट, बुरूजांच्या डागडुजीवर किंवा मोठाले वृक्ष वाढवून पुन्हा नव्याने सजिवसृष्टी साकारण्यावर खर्च करण्यात आला असता तर? आम्ही ट्रेकर अशा स्वप्नरंजनात पटकन शिरतो!

हट्टीची खवा एक्सप्रेस
इंग्रजांकरवी १८१८मध्ये गडांचे प्रमुख मार्ग उध्वस्त करण्यात आले असले तरी सातमाळा रांगेत गडांवर वहिवाटीची उत्तम व्यवस्था असल्याने पायथ्याच्या लोकांनी गडांवर गायी, म्हशी शेळ्यांची चराई सुरू केली. मुबलक चारा, ठिकठीकाणच्या इतिहासा काळातील व नैसर्गिक तलावातील पाणी गुरांना उपलब्ध होऊ लागले, त्यामुळे सहाजिकच भरपूर प्रमाणात दूध तयार होऊ लागले. परंतू आसपास मोठी वस्ती नसल्याने हेच दुध आटवून त्यापासून खवा तयार करण्याचा उध्योग उभा राहिला. या खव्याला चांदवड, कळवण, वडाळीभोई अशा बाजारपेठे मिळू लागल्या. या बाजार पेठांमध्ये पूर्णत: नैसर्गिक चार्‍यावर वाढलेल्या गाईंच्या दुधा पासून बनविलेला उत्तम दर्जाचा खवा व त्या पासून पेढे तयार करण्याचा उध्योग सुरू झाला. अगदी तीनेक वर्षांपर्यंत हा व्यवसाय बहरत होता. धोडपवर तर इतका खवा तयार व्हायचा की, त्याला नाशिकमध्ये बाजारपेठ मिळावी याकरिता परिवहन महामंडळाने खास हट्टीसाठी खवा एक्सप्रेस बस सुरू केली. ही बस आजतागायत सुरू आहे. संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर खवा एक्सप्रेस हट्टी गावात दाखल होते व रात्रभर मुक्काम करून सकाळी ७-०० रवाना होते. ट्रेकर्स करिता अजिबात सोयीचे नसली तरी काही रात्रीच्या चढाईकरिता अगदी सोयीची आहे. 


साहस पर्यटन केंद्र
वनखात्याकडे भरघोस निधी आला आणि तत्कालिन वनखात्याचे प्रधान सचिव प्रविणसिंग परदेशी यांनी स्थानिकांना रोजगार मिळावा व वनांचे संरक्षण व्हावे या उदात्त हेतूने सुमारे दिड कोटी रूपये खर्च करून धोडपच्या पायथ्याला हट्टीच्या वेशिवर साहस पर्यटन केंद्र सुरू केले. येथे निवास व भोजनाची व्यवस्था होऊ शकते. बाकी साहसी खेळांचा दर्जा उद्‌घाटनाच्या दिवशीच स्पष्ट झाला होता. आज हे साहसी पर्यटन केंद्र कसेबसे तग धरून उभे आहे. एखादा मोठा अधिकारी मोठे स्वप्न रंगवून चांगल्या योजना राबवितो, परंतू हाताखालची नोकरशाही जर कुचकामी असेल तर काय घडू शकते याचे धोडप हे उत्तम उदाहरण. हे साहसी केंद्र चालविण्याचा हट्टीच्या रहिवाशांना कोणताही अनूभव नाही. त्यांना त्याचे पुरेसे प्रशिक्षण नाही. साहसी खेळाची उपकरणे सुमार दर्जाची, त्यामुळे या चांगल्या उपक्रमाला आता घरघर लागली आहे. गडावरही विकासीची जी कथित कामे केलीत, ती गडाचे गडपण राखण्याच्या योग्यतेची नाही. 

इंग्रज गेल्यानंतरही धोडपवर वेगवेगळ्या राजवटीतल्या तोफा होत्या, त्या अक्षरशा ओरबडून न्याव्यात अशा पद्धतीने उतरवून नाशिकच्या तोफखाना केंद्रात ठेवण्याचा घाट घातला गेला. त्या नादात तोफांचे अतोनात नुकसान झाले. गडावरच त्यांचे जतन झाले असेत तर आज धोडपचे रूप अधिक बहरले असते. अनेक तट, बुरूज, दरवाजे ढासळलेतर; वन, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, पुरातत्व या खात्यानी त्यावर बेफाम वाढलेली झाडे काढण्यावर, त्याचे निखळलेले दगड सांधण्यावर खर्च केला असता तर धोडपच्या सौंदर्याला केवढी उंची प्राप्त झाली असती. 
(पुढील भाग...)
-------------
https://www.facebook.com/SahyadriTrekkersBloggers/

No comments:

Post a Comment