नाशिक आणि नगर जिल्ह्यात वसलेला एक मध्यम उंचीचा किल्ला, पट्टागड. त्याला विश्रामगड असेही संबोधले जाऊ लागले. अष्टभूजा पट्टाई देवी गडाची अधिष्ठात्री, तिच्यावरून पट्ट्याचा डोंगर आणि पुढे जेव्हा केव्हा त्यावर किल्ला बांधला तेव्हा पट्टागड, त्याच्या बरोबरीने विश्रामगड हे नामाभिधान.
राजगड, रायगड आणि कदाचित पन्हाळगडानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वाधिक काळ वास्तव्य केलेला गड म्हणून त्याची इतिहासात नोंद झाली. महाराजांनी आजारपणात असताना येथे विश्राम केला म्हणून विश्रामगड? एवढे एकच कारण असावे, की हा गड खरोखरच आरामदायी आहे? येथे राहणार्याला तो चिंतामुक्त ठेवतो म्हणून येथे आराम वाटत असेल? इथल्या वातावरणात व्याधी बर्या होतात म्हणून बरे वाटत असेल? इथले हवामान अल्लाददायक म्हणून उत्तम हवापालट करण्यायोग्य हा असेल, की हा सगळ्या तापाव्यापा पासून दूर ठेवतो म्हणून, विश्राम?
'आपल्याला पट्टागडावर जायचे आहे, त्याचे त्या कोनामधूनचे छायाचित्र छान येईल. बघूया, पट्ट्याचे प्रतिबिंब मिळते का ते? 'चल, शनिवारची मस्त पावसाळी भटकंती होईल'!
मला कामातून सुटी नसताना अजय हातेकरचा हा प्रस्ताव आला तेव्हा सौभाग्यवतींना त्याच्या मनाची तळमळ सांगितली, ती ही कळवळली, 'तो इतका आतून म्हणतोय तर जाऊनच ये'! होकार देऊन पाठीत धपाटा टाकण्याची जुन्या शिक्षकांची, पूर्वीच्या मंडळींची पद्धत होती, कोणी जर काही अवास्तव मागितले तर चांगला दणका बसायचा, असा काही हा प्रकार नाही ना? त्यामुळे जरा चाचरतच, हो! जाऊन येतो! असे तिला आश्वासन दिले.
ऐन कामाच्या दिवशी आश्चर्य, अनपेक्षीत असा कौल गृहमंत्रालयाकडून मिळाला होता. आता सारे लक्ष भटकंतीवर केंद्रीत केले. मनात बर्याच वर्षांपासून गडातला विश्राम शोधाण्याचे घाटत होते, ती वेळ आज येऊन ठेपली होती.
|
औन्ढा: भात खाचरातले प्रतिबिंब... |
'येडे का खुळे! असा एका भेटीत गड भेटतो का? तुम्ही गेले आणि त्याने तुमच्यासाठी पायघड्या टाकल्या. भडाभडा सगळी गुपिते, तुमच्या पुढ्यात रिती केलीत', गड आपल्याला काही सांगेल का? त्याच्याकडून काही संकेत मिळतील का, ही चिंता होतीच. 'आपण काय भावनेने त्याला सामोरे जातो', हे महत्वाचे, मनाने ठरवले तर नक्कीच घडेल, हा आशेचा एक किरण सोबत होता.
दोन हजार साली बघितला, त्याच्या फारशा स्मृती मनात नव्हत्या. तेव्हा आम्हाला भटकंतीत नैतिकता असते हेच ठाऊक नव्हते. आम्ही मस्त मजा करायला चार मित्र दोन गाड्यांवरून गेलो होतो. भगूरच्या बाजारातून एक भलामोठा मासा विकत घेतला होता. गडावर रात्री पोहोचलो, माशाचे कालवण केले. सकाळी जाग आल्यावर वरची पडकी वास्तू बघितली. 'इथे शिवाजी महाराजांनी विश्राम केला', असे एकमेकांना सांगून गड नीटपणे न बघता उतरलो होतो. गडावरचा त्र्यंबक दरवाजा तर आठवत सुद्धा नव्हता. (अजय मागच्या भेटीत आला तेव्हा त्याला त्र्यंबक दरवाजाचे भग्न रूप दिसले होते. त्यावरच्या प्रकाशाच्या छटा त्याने टिपल्या होत्या. २०१६च्या गिरीमित्र संमेलनात त्याने या दरवाजाची संकल्पना घेऊन भित्तीचित्र बनवले होते, त्याबद्दल त्याचा विशेष सत्कार झाला.)
त्र्यंबक नावाचा दरवाजा आहे, तर तर काही वर्षांनी कळले होते. आता गडाकडे बघण्याची नजर लाभली आहे, तेव्हा विश्राम नावातले आश्चर्य हूडकून तर काढू! तपात थोडी शक्ती असली की हाती काही तरी लागते, काही नाहीच गवसले तर चांगली छायाचित्र तर नक्कीच मिळतील!
नाशिकरोड-देवळाली-छावणी-पांढूली-ठाणगाव हा मार्ग पुसटसा आठवत होता. अजय जाऊन आला होता, पण त्यालाही रस्ता ठाऊक नव्हता. आम्ही भगूरवरून पाच किलो मिटर पूढे जाऊन घोटी-सिन्नर मार्गावरचे पांढूर्ली गाठले. २००० साली हा मार्ग अस्तित्वात नसावा किंवा घोटीवरून शिर्डीला जाण्यासाठी त्यावर सोयीचा रस्ता नसल्याने तो लहान, अविकसीत आणि त्यामुळे कमी वहिवाटीचा असावा. साईभक्तीच वाढ होत गेली तसा हा मार्ग अधिकाधीक उन्नत होत गेला, अजूनही होत आहे. आता तर समृद्ध हा मुंबई-नागपूर महामार्ग या परिसरातून जात असल्याने त्याचे नव्याने महत्व वाढले आहे.
ठाणगाववरून मोठे अंतर कापावे लागते हा आमचा कयास होता, तो बरोबर निघाला. 'तुम्हाला टाकेद मार्ग सोपा पडेल, शिवड्यावरून जवळचा मार्ग आहे, पण तुम्हाला उमजणार नाही', काही पांढूर्लीकरांनी वाट सांगितली, आम्ही शिवड्याचेच आव्हान स्विकारले.
|
बेलूहून सुसाट पाटाची वाट |
बोरखिंड...
पांढूर्ली गावातून पुढे ४ किलो मिटरच्या निसर्गरम्य रस्त्याने जाताना आजवर न बघितलेले डोंगर न्याहाळत बरोखिंडीत पोहोचलो. नाव ऐकुनच आनंद द्विगुणीत झाला. विश्रामगड दोन घाटवाटांनी जोडला आहे हे ठाऊक होते, त्याला खिंडीची वाट आहे, ही आमच्याज्ञानात भर घालणारी गोष्ट होती.
'इथून पुढे रस्ताच संपतोय, गाडीवाटच नाही. तुम्ही इथे आलात कसे? इथून विश्रामगडावर जाता येणार नाही, पुन्हा पांढूर्लीला जाऊन तिथून टाकेद मार्गे जा, सरळ टाकेदला न जाते बेलू फाट्याने गेलात तर म्हसवळन घाटात पोहोचण्यासाठी दिड एक किलो मिटरचे अंतर वाचू शकते', गावच्या वेषीवर बसची वाट बघत उभे असलेल्यांनी सांगितले. 'बोरखिंडीतून मागच्याच आठवड्यात गावची मंडळी विश्रामगडावर जाऊन आली होती, पण आत्ता निघालात तर संध्याकाळ होईल तिथवर पोहोचायला. शिवाय तो रस्ता तुमच्या सारखी मंडळी चालून जाऊ शकणार नाही'.
बरोखिंडीतून वाट आहे आणि ती मोठी पायपीटीची आहे. कदाचित बिकट असू शकते ही माहिती पदरात पडली. त्यावरून पुन्हा केव्हा तरी या खिंडीच्या वाटेचा वाध घेऊ, आजची भटकंती अर्ध्या दिवसात उरकायची, तेव्हा बरोखिंडीच्या परिसरात जुनी मंदिरे, पुरातन अवशेष याची माहिती घेतली आणि आम्हा आल्या वाटे पांढूर्लीला परत फिरलो. काही वेळेस चुकीच्या वाटा चांगले काही तरी पदरात टाकतात, भविष्यातील भटकंतीसाठी ही चुकामुक लाभदायक ठरणार!
|
म्हैसवळण घाटाचा पाठीराखा... |
बेलू फाटा व तिथून लहानसे बेलू गाव सोडल्यावर एका पाटाच्या किनार्याच्या पक्क्या बांधीव रस्त्या आडवा आला, इथून उजवे वळण घ्यायचे की, डावे? की समोर डोंगरातून वाट निघते? या निर्जन ठिकाणी कोणाला विचारावे असे वाटत असताना समोरून एक स्थानिक मोटरसायकलवरून येताना दिसला, त्याला वाट विचारत असताना आणखी दोन मोटरसायकल स्वार आले, आमचा मनसुबा सांगितला तेव्हा त्यांच्या बोलण्यातून आश्चर्य जाणवले. यावाटेने भटकी मंडळी फारशी जात नसावी.
पाटालगतच्या निर्जन निसर्गरम्य रस्त्यावरून अजय गाडी दामटत होता. घोटी-सिन्नरला जोडणारी ही भली मोठी डोंगररांग इथून सलग भासत होती. आवंढा, पट्टा, रतनगड, बितनगड, आड, डुबेरा यांच्या जोडीला काही अज्ञाताच्या गर्तेत हरवलेले इतिहास काळातले काही डोंगर यात असतील या विचारांनी मनात उत्साह वाढवला. विचारांची तंद्री तेव्हा भंगली जेव्हा एका भातखाचरात आवंड्याचे प्रतिबिंब उमटलेले दिसले. अजयने गाडी मागे वळवली. योग्य जागा शोधून पाण्यात उठलेले प्रतिबिंब त्याने त्याच्या कॅमेर्यात आणि मी माझ्या मोबाईल फोनच्या कॅमेर्यात टिपून घेतले.
|
एकच प्रजातीचे रोपण जैवविविधतेला घातक तेव्हा ही रोपे वेगवेगळ्या ठिकाणी लावावीत. |
तिथून पाच दहा मिनीटातच म्हसवळण घाटाला लागलो. अजयच्या दुचाकीला, 'अल्टीट्यूड सिकनेस'चा त्रास जाणवू लागला. गाडी घाट चढते की नाही, अशी स्थिती निर्माण झाली. घाटाच्या माथ्यावर उजवीकडे बितंग नावाच्या डोंगराची पाटी दिली. बितंग्याचे काही महत्व असावे, काही देऊळ वगैरे, माहिती सांगणारे कोणी नसल्याने आम्ही डाव्या बाजुला कोकणगावची वाट पकडली. समोर आडवा पसरलेला विश्रामगड दिसत होता. डुबेरे किंवा ठाणगावरूनच तो जवळ पडला असता असे वाटू लागले. डावीकडे पवनचक्क्या आणि त्याच्या खालूनच घाटमाथ्याचा रस्ता, आसपास ना गावे ना वाहनांची वर्दळ त्यामुळे गर्दीपासून दूर आल्याच्या जाणिवेने मन हलके झाले. एक मोठा वळसा घालून थेट विश्रामगडाच्या पायथ्याला गाडी पोहोचली.
२००० साली येथे एकच झोपडी दिसली होती. त्याच्या पुढे आम्ही उघड्यावरच गाड्या लाऊन गडावर मुक्काम केला होता. आज या परिसराचे चित्र केवढे बदलले आहे. पक्का डांबरी रस्ता आणि त्याच्या लगत तीन चार घरे येथे दिसत होती. एक तर पक्के सिमेंट कॉंक्रिटचे. पहिलेच घर भरत निसरड यांचे. शासकीय घरकुल योजनेतून बांधून मिळाले असावे.
चहा, नाष्ता मिळेल का? असे विचारताच त्यांचा बाहेर खेळणारा मुलगा आत पळाला, भरत यांनी बाहेर येऊन स्वागत केले. गेल्या काही वर्षांपासून ते गडावर येणार्यांसाठी जेवण पाण्याची व्यवस्था करत आहेत, त्यामुळे आम्ही योग्य ठिकाणी आलो होतो. 'तुम्ही अगदी बरोबर आणि जवळच्या मार्गाने आलात. ठाणगावरून लांब पडते', निसरडांनी आमच्या मनातली शंका दूर केली होती. चहा पोहे होई पर्यंत पिकपाण्याच्या गप्पा झाल्या. या ऋतूत आहारात काय घेतात वगैरे विचारले आणि आम्ही त्याच्याच दारात गाडी उभी करून पट्ट्याकडे निघालो.
पक्क्या रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावली आहेत. त्यांना प्लास्टिकच्या जाळीचे कुंपण केले आहे. काही रोपे कुंपणासकट उन्मळून पडली होती. 'गडाच्या पायथ्याला एक तोफ होती', असे अजयला आठवले. तोफ तर दिसली नाही, पण झाडाखाली एका जुन्या मंदिराचे काही अवशेष आणि शेंदूर लावलेल्या मुर्त्या दिसल्या.
मुसलमानपूर्व काळात वैभवशाली हिंन्दू संस्कृती नांदत असल्याच्या त्या खुणा, फार सुंदर कातळा नक्षीकाम केलेले मंदिर असावे याची साक्ष देत होते. मुर्ती आणि नक्षी घडविलेले चार दोनच दगड शिल्लक राहिलेत, बाकी भग्नावशेष बघायला सुद्धा शिल्लक नाहीत. मनाला असे काही बघितले की मोठ्या वेदना होतात. आम्ही दोघे त्या भग्न अवशेषात हरवून त्याची प्रकाशचित्रे घेत असताना पलिकडून एक आजी धावत आल्या आणि फार जुनी ओळख असावी अशा अविर्भावात बोलू लागल्या.
|
सुमन महादू जाधव...जगण्याची उर्जा पट्टागड देतो... |
आजींच्या डोळ्यातली चमक पाहून मी छायाचित्रण बंद केले आणि मोबाईलने त्यांचे चलतचित्रण सुरू केले. त्यांना मनभरून बोलायचे होते. तब्बल आठ मिनीटे त्या न थकता बोलत राहिल्या. पाऊस कमी झाल्या पासून त्याचे मालक कसे दगावले...पिकपाणी कसे रोडावले...पावसाचे तंत्र बदलल्याचे आश्चर्य...मुलं सोडून गेलीत...सांभाळणारे कोणीच नाही.
त्या आपली दुख:द कहाणी सांगत होत्या की एखादी यशोगाथा, काहीच उमजेना, इतका उत्साह त्यांच्या बोलण्यातून धबधब्या सारखा ओसंडत होता. शिवाजी महाराज वर राहून गेल्याचे सांगताना डोळ्यात उठणारे ते भाव...आज साडे तीनशे वर्षांनंतर कुठल्या डोंगरकपारीत एक फाटके जीवन जगणारी आजी, इतक्या आदर, उत्साहाने बोलताना बघून मन गहिवरून येत होते.
तुम्ही वर जा...येथे कशाचीच भिती नाही, असे सांगून आजींनी त्यांच्या भग्न घराचे चिरे दाखवले व त्या निघून गेले....जाता जाता नाव विचारले तर परत जवळ आल्या, सुमन महादू जाधव. आम्ही जाधव, जिजाऊ सुद्धा जाधव, आमचेच कोणी किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळात कामाला असतील, हे सांगताना त्यांच्या मनातला अभिमान बघण्याजोगा होता.
इथे आता घर नाही, शेतात काही पिकत नाही, मग या ठिकाणी काय करतात, या प्रश्नावर म्हणाल्या, तुमच्या सारखे कोणी आले तर गाड्या सांभाळते, कोणी दहा वीस रूपये देतं...कोणी नाही देत...पन लोकं तर भेटतात...त्यांच्याशी थोडं बोलता येतं...नाही तरी घरात जाऊन कोणासाठी काय करणार...घरात तर कोणीच नाही, माझ्या एकटीचे मीच करणार...त्यानंतर शेतात येणार...तिते पिकत काही नाही...पिकतात फक्त गाड्या...त्या सांभाळायच्या हेच माझं पिक!
डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. आजींच्या घरात कोणीच नाही, उत्पन्नाचे कोणते साधन नाही. पर्यटक आले तर थोडे फार पैसे मिळतील, नाही आलेत तर? कशी गुजरण होत असेल? वृद्धांसाठीचा शासनाचा निर्वाह भत्ता तरी मिळत असेल का? मिळाला तरी तो पुरत असेल? रोज किती लोकांशी बोलत असतील या...किती दिवसांपासून...प्रत्येकाशी बोलून सुद्धा पट्टागडाबद्दल, जणू पहिल्यांदाच सांगत आहेत, असा अविर्भाव!
भले शाब्बास!
मनात जे घेऊन आलो होतो, त्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला गडाच्या पायथ्यालाच मिळाले होते. आमच्या नशिबावर आम्हीच आमची पाठ थोपटून घेतली. एक फाटके जीवन जगणार्या निराधार आजींना गडाने एकटेपडू दिले नव्हते. त्यांना तो सावरत होता. त्यांच्या मनाला आराम मिळत होता, त्यामुळे त्या अंधरूणाला खिळण्याऐवजी रानातून तरातरा चालत, हासत, 'हारायचे नाही, जगायचे, आनंदात रहायचे, काही कमी पडले तर तो देईलच', या आशेवरचे त्यांचे जगणे. माणसाच्या जगण्यातला विश्राम यापेक्षा वेगळा असू शकतो का? शिवाजी राजांनाही आजारपणात येथे अशीच तरतरी आली असेल. त्यांचेही पाय निघता निघत नसतील, असा हा आरामासाठी जखडून ठेवणारा गड!
आठ दहा मिनीटे आजींशी गप्पा मारल्यानंतर आता गडावर नसतो गेलो तरी चालू शकले असते, इतकी आमच्यात तरतरी आली होती. समोर एक चौकोनी प्रवेशद्वार नव्याने बांधलेले. अर्थात दगडात नसून सिमेंट कॉंक्रिटमथ्ये. त्याला रंगरंगोटी करून जन्या बांधकामा सारखे भासविण्याचा प्रयत्न. आतल्या बाजुला चौकी. तिथे वनखात्याचा मजूर पर्यटकांकडून प्रत्येकी ५/- रूपये गोळा करतो. यातून रक्कम तर गोळा होतेच, शिवाय गडावरच्या वास्तूंचा, विशेष करून झाडांचा रखरखाव सुद्धा ठेवला जातोय हे परिसराकडे बघितले तरी चटकन नजरेत भरते.
|
पट्टागडाकडे जाणारा पक्का रस्ता व दुतर्फा वृक्षारोपण |
समोर पाण्याचे पाईप अर्धगोल वाकवून त्याला पत्रा ठोकून आणखी एक प्रवेश कमान, त्यावर गटाचे नाव रंगवलेले. पुढे एक मोठा हत्ती बनवलेला, अगदी खर्या हत्ती इतका मोठा आकार. पर्यटन विकास निधीतून हा खर्च करण्यात आल्याचे प्रतित होत होते. त्याच्या वरच्या बाजूला एक तोफ भगव्या रंगात रंगवलेली दिसली. अजयने ओळखले, ही तीच तोफ जी पूर्व पायथ्याला पडून होती. तिचे पुढचे टोक सापडल्याने ते आतून जोडून तोफ पत्र्याच्या चाकांवर उभी केलेली. रंग न देता, मुळ स्वरूपातच जतन केली असतील तर तिचे ते रूप जास्त भावले असते.
इथून उजवीकडे वळणार्या मार्गावर प्लास्टिकच्या कापडावर गडाची व पर्यटन विकासूतून केलेल्या कामांची संक्षिप्त सचित्र माहिती देणारे फलक, गडाचा नकाशा. याच्या समोरच्या बाजूला मजबुत बांधणीचे स्वच्छतागृह बघून आश्चर्य वाटले. आत जाऊन बघितल्यावर सारा उत्साहच मावळला. हात धुण्याचा नळ तुटका होता व हात धुण्याच्या भांड्यात घाण होती. शौचालयाची अवस्था कमालीची बिकट. आपली माणसं हिणकस वृत्ती स्वच्छतागृहात हमखास दाखवतात. गडावर उघड्यावर बसण्यापेक्षा स्वच्छतागृह केवढी उपयोगाची वास्तू. महिलांचा तर कोणी विचारच करत नाही.
वनविभागाने पर्यटन विकासाच्या नावाखाली खाल पासून पाणी पूरवठ्याचे लोखंडी पत्र्याचे नळकांडे वापरून सिमेंटच्या पार्यांना संरक्षक कठडे बसविले आहेत. पायर्या प्रशस्त असल्याने त्या हलत्या कठड्यांचा आधार घेण्याची वेळ येत नाही. वर दोन ठिकाणी पत्र्याचे आडोसे तयार केले आहेत. लोकांना उन, पावसात त्याखाली थोडा विश्राम घेता येऊ शकतो, ही त्यामागची भावना उदात्त असली तरी असे आडोसे गडावरच्या कमालीच्या विपरीत हवामानात टिकत नाहीत. केलेला सगळा खर्च हा हमखास वाया जातो. माकडांच्या टोळ्या पत्र्ये व लोखंडी पट्ट्या खेचून काढत त्या खिळखीळ्या करताना दिसत होते.
|
चित्रवत दृष्य...ठिकाण पट्टा किल्ल्याचा पायथा. |
आज आम्हा दोघांचीच चौकी नाक्यावर नोंदणी झाली होती. गड रिकामा होता. निर्जन गडावर भटकंतीचा आनंद वाढवला तो मार्गाच्या तुतर्फा उगवलेल्या गवताच्या ताटव्यांनी. जसजसे वर जात होतो, तसतसे गडभर पसरलेले हिरवे पुंजके नजर वेधून घेत होते. अशा गणीत गवती, झुडपी पुंजक्यांनी गडाच्या सौंदर्याला हिरवी झळाली दिल्याचे दृष्य हिरवाईत हरवून टाकणारे.
वरच्या टप्प्यावर तीन मुखाच्या देवीची मुर्ती बसविण्यात आली आहे. येथे घोडे बांधण्यासाठी दगडात पाचठिकाणी खाचा खोदल्यात त्यावरून ही घोड्यांची पाग असावी असे वाटते.
|
पट्टेवाडी..दगडीभिंतीच्या घरांचे वैभवशाली अवशेष |
पहिल्या सपाटीवर उत्तर बाजुला त्र्यंबक दरवाजा. याचे ढासळलेले दगड सिमेंटमध्ये सांधून हा दरवाजा पुन्हा उभा करण्यात आला आहे. याच्या खालच्या पार्यांना रेलिंग बसविण्यात आले आहेत. खरे तर त्र्यंबकदरवाजातून खाली उतरणारी वाट पुढे बंद झाली आहे. कदाचित इंग्रजांचा हा प्रताप असावा. आज या वाटेने गडावर वहिवाट नाही. संरक्षक नळकांड्यांचा हा खर्च अनाठायी.
त्याहून मोठे आश्चर्य दिसले ते दक्षिण बाजुला. पूर्वी तिथे पट्टाईचे जुने चिरेबंदी मंदिर होते. ते पुर्णपणे पाडून त्याजागी सिमेंट कॉंक्रिटचे भले मोठेमंदिर उभारण्यात आले आहे. त्याला लहानसा गाभाराही बनविण्यात आला आहे. जुन्या वास्तुंचे पुननिर्माण करण्याचा विषयच ठेवलेला नाही. सरसकट बांधकाम जमिनदोस्त करून त्या जागी नवे मंदिर! इतिहासाची अक्षम्य हानी आपल्याच हातून घडतेय. गडांवरच्या पुननिर्माणावर शासानाचे कुठलेच धोरण नसावे? कुठलाच अंकुश नसावा?
|
किल्ल्याच्या पायथ्याला सुमन जाधव यांच्या घराचे अवशेष |
पर्यटकांची फार मोठी ये जा येथे अलिकडे सुरू झाल्यामुळे माकडे फार बोकाळलीत. पिशवित खाण्याचे पदार्थ आहेत, असाच त्यांचा ग्रह असतो. त्यामुळे ते अंगावर अक्षरश: धावून येतात. त्यांचा ससेमिरा चुकवत मंदिरापासून तसेच पुढे दुसर्या टप्प्यावर पोहोचता येते. हा भाग म्हणचे खच्चून भरलेला तेरडा. आता तेरडा म्हणजे येत्या काही दिवसात का चमत्कार घडवितो, हे जाणकाराला समजलेच असेल!
हलणार्या संरक्षक नळकांडी खांबांचा आधार न घेता वरच्या सपाटीवर गडाची सगळ्यात महत्वाची ऐतिहासिक वास्तू. असे म्हणतात की, शिवाजी महाराजांनी या गडावर सतरा दिवस वास्तव्य केले. काही लेखक हा काळ सव्वा तीन महिना तर काही जण तीन महिने असल्याचे नमुद करतात, परंतू सतरा दिवसांचा मुक्काम ही शास्वत माहिती मानली जाते.
आज गडावर जी भव्य वास्तू दिसते त्यात महाराजांनी मुक्काम केल्याचे काही जण मानतात, परंतू ते बरोबर वाटत नाही. एक तर हे निवासस्थान नाही. या वास्तूला दारे खिडक्या नाहीत तीन बाजुंना अगदी लहान दरवाजे, ज्यातून एका वेळेला एकच माणूस जाऊ शकतो. हे धान्याचे कोठार असावे किंवा कचेरी असावी. किल्लेदाराचा वाडा असता तर त्याला जोतं, दारे, खिडक्या तरी असत्या.
|
पट्टागडाचा मुसलमानपूर्व काळ वैभवशाली असल्याची साक्ष. |
या वास्तूचे बांधकाम निझामशाही शैलीसोबत मेळ खाते. तसे बघितले तर हा गड बहामनींकडे होता. त्यांच्या अस्तानंतर तो निझामशाहीत दाखल झाला, त्यामुळे गडावर बहमनी काळातलील बांधकामांच्या अवशेषांचा शोध घेतला जाऊ शकाते.
चौकोनी चिर्यांतून तयार केलेला मोठा अर्धवतुळाकार घुमटाचे छत. बाजुला अशाच अर्ध, पाव वर्तुळातल्या घुमावदार कमानी. नगरच्या चांदबीबी महाल म्हणून ओळखल्या जाणार्या वास्तूलाही अशा स्वरूपाच्या अर्धवर्तुळाकार घुमावदार कमानी व वर भव्य गोल घुमटाकार छत बघायला मिळते.
एकुण काय तर, महाराजांनी वास्तव्य केले ती हीच इमारत असण्याची शक्यता कमीच. हा अंबारखानाच, किल्लेदाराचा वाडा अन्यत्र असावा. तिथे स्वयंपाक गृह, न्हाणीघर, स्वच्छतागृह अशी दालने असू शकतील. गडाच्या कचेरीचीही इमारत त्या काळी असू शकते. या एकुणक्ष एक इमारतींचे नामोनिशाण शिल्लक नाही. उत्खननातून दबलेल्या इमारातींचे अवशेष शोधले जाऊ शकतील.
पूर्वी अंबारखान्याची वास्तू भग्न स्थितीत होती. आता बाजुच्या घडीव दगडातून पडक्या भिंती सिमेंट कॉंक्रिटने सांधण्यात आल्या आहेत. तळाला शहाबादी फरशी बसविण्यात आली आहे. आश्चर्य म्हणजे या वास्तूच्या बाहेर रायगडासारखी मेघडंबरी आणि त्यात महाराजांचा अर्धाकृती पुतळाबसविण्यात आला आहे. त्याला मुगल शैलीतल्या बागेने व लोखंडी नक्षीच्या काठांनी सजविण्यात आले आहे.
|
या हिरवाईला तोड नाही...पट्टा किल्ल्याचा पायथा... |
इतिहासात या गडाचे महत्व काय होते आणि आज आपण कोणत्या वास्तू त्यावर निर्माण करतोय? कशाचा कशाशीच मेळ नाही. विश्राम गडावर मेघडंबरी? दुसरा रायगड दाखविण्याचा हा खटाटोप कशासाठी? त्यापेक्षा वास्तू आहे तशीच जतन केली असती, किंवा त्याच्या संबंधीचे संशोधन करता येऊ शकले असते.
याहून मोठे आश्चर्य तर वास्तूच्या आत बघायला मिळाले. शिवकाळातील सर्वज्ञात घटनांचे प्रसंगी भित्तीशिल्पांच्या मदतीने तयार करण्यात आले आहेत. त्यात लाल महालात जाऊन शाहिस्तेखानाची बोटे छाटताना सारखे प्रसंग. बाहेर जशी मेघडंबरी, तशी आणखदी दुसरी मेघडंबरी आतमध्ये सुद्धा. ही पुनरावृत्ती कशासाठी. येथे शिवराज्याभिषेकाचा प्रसंग मोठमोठ्या पुतळ्यांच्या मदतीने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यात गागा भट्ट, हेन्री ऑक्झेन्डन पासूनचे विविध पुतळे. पुतळे अर्थात फायबरमध्येच तयार करण्यात आले आहेत. शिवाय या दालनाला लोखंडी दरवाजा बसविण्यात आल्यामुळे लोकांची वहिवाट बंद करण्यात आली आहे, परिणामी उंदीर, वटवाघळांच्या वास्तव्यामुळे त्याचा उग्र दर्पही जाणवतो.
शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा मेघडंबरीत बसविण्यात आला आहे. अभ्यासकांच्या मते हे व्हिक्टोरियन पद्धतीचे आसन आहे. रायगडावरचे मयूर सिंहासन हे बैठे होते व त्यावर लोडतक्के होते. शिवाय कोणताही हिंदू राजा सिंहासनावर पादत्राणे घालून बसत नाही, महाराजांच्या पायातही पादत्राणे न दाखवता ती बाजूला असावीत.
|
वनविभागाची चौकी...गड प्रवेश सशुल्क |
इतिहासातील व्यक्तीरेखा व प्रसंग हे अभ्यासपूर्वकच असायला हवेत, अन्यथा पुढच्या पिढीकडे चुकिचा इतिहास पोहोचतो. पिढीदरपिढी ती चुक मग वाढतच राहते.
विश्रामगडचा संबंध जालनापूरच्या लढाईशी आणि तिथून संगमनेरच्या लढाईशी जोडला आहे. महाराज सव्वा महिना वास्तव्यास आहेत. त्यावरच्या अस्सल माहितीवर आधारीत काही प्रसंग साकारले असते तर ते नाविन्यपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि त्यामुळेच गडविकासाचा लौकिक वाढविणारे ठरले असते.
यावास्तूच्या उजव्या हाताला पाण्याचे कातळात खोदलेले भव्य असे टाके. त्याच्या वरच्या डाव्या बाजुला कातळात खोदलेली शिवपिंड जीर्ण दशेत आहे. इथून थोड्याच अंतरावर गडाची शेवटची तिसरी सपाटी. या सपाटीवर हिरवे गवत, तेरडा व टोपली सदृष्य कारवी व इतर झुडपांचे पुंजके म्हणजे डोळ्यांना मेजवानीच. इथल्या देशकड्याला लोखंडी पत्र्याच्या नळ्यांचे संरक्षक काठ बसविले आहेत. तसे हा परिसर धोकादायक आहे. परंतू काठ बसविण्याऐवजी दगडी चिरांची अडीच तीन फुटांची तटासारखी भिंत गडाच्या वतावरणासाठी संयुक्तिक ठरली असती. शिवाय तिचे आयूर्मानही जास्त राहिले असते. या सपाटीच्या वरच्या टेकडीवर वनखात्याची खास ओळख असलेला लहान सिमेंटमध्ये घडविलेले घुमट. त्याच्या पुढे पाण्याची कातळात खोदलेली दोन जुनी टाकी सद्या भर पावसात कोरडी पडली आहेत. इथून वर बालेकिल्ला. त्यालाही लोखंडी पत्र्याच्या नळ्यांचे संरक्षक काठ बसविलेत.
या पठारावर कातळातले एक लहान कुंड व त्याच्या बाजुला दगडात वैशिष्टपूर्व चीरा देण्यात आल्यात. त्याच्या थोडे पुढे कातळात शिवपूर्व काळातली खांब गुहा खोदलेली. या ऐसपैस गुहेत धुळमातीचे साम्राज्य. विश्रामगडाचे वैभव अर्ध्या दिवसाच्या भटकंतीत जमेल तितके साठवताना. परतीचे वेध लागले होते. बाले किल्ल्याला कड्याच्या बाजूने येणो ढग आणि उजवी हिरवीकंच बाजू उन्हाने उजळविणारे दृष्य अचंबित करणारे. समोर कळसुबाई, अलंक-मदन,कुलंग पुर्णपणे ढगात झाकोळलेले. एव्हाना काही पर्यटक गडावर आल्याचे दिसत होते. हिरव्या गवती, तेरड्याच्या ताटव्यातून कोणी घुसण्याचा प्रयत्न केला तर. चार महिने गडाची शोभा वाढविणारे हे सृष्टीचे अनोखे सौंदर्य, त्याला नजर लागेल तर ती माणसाचीच. पर्यटकांनी त्याची काळजी घेतली तरी पावसाळ्यानंतर चराईत वरचा गवती माळ व झुडपे सारीच भक्ष्यस्थानी पडणार. सह्याद्रीचे हे भयाण वास्तव सद्या बर्याच डोंगरांवर बघायला मिळते. आम्हाला मात्र पट्ट्याच्या अनोख्या रूपाचे दर्शन घडले होते. तो आरामदायी आहे. अंगात तारूण्य, तेज उत्साह भरणारा. म्हणूनच शिवाजी राजांनी याची निवड केली असावी.
महाराजांनी येथे महिना भर काय केले असेल. कुठेकुठे वावरले असतील. इतिहासात रममाण होत, हिरव्या कंच ताटव्यांना डोळेभर साठवत गड केव्हा पाय उतार झाला कळलेच नाही.
|
काही पर्यटकांनी सांगितले की, या हत्ती सोबत सुरूवातीला दोन पिल्लेही होती...फायबरचे काम किती काळ टिकणार? |
पायथ्याला पुन्हा आजी भेटल्या. त्यांनी आग्रह करून म्हळूंगी नदीच्या उगमा जवळचे जुने शिवमंदिर बघण्याचा आग्रह धरला. मनाला कमालीचा थंडावा देणारा मंदिराचा परिसरा. तिथले चिर्यातले बांधकाम. पाउल हलूच देत नव्हते. तिथून परतल्यावर पुन्हा आजींशी दहा वीस मिनीटे गप्पा. कुठून येते ही उर्जा...घरदार सगळं संपलेलं असताना निखळ हसत राहण्याची शक्ती कोण देतं? पट्टाच ना? त्याच्या कुशीत महाराजांप्रमाणेच आजीबाईंना आराम मिळतो!
आजींचा निरोप घेऊन निसरड यांच्या घरी दुपारचे ताजे गरमागरम, चुलीवरचे जेवण. भटकंतीचे पुरेपूर पेटारा उलगडून झाला होता. आमची दुचाकी कोकणगावच्या दरीत उतरत असताना, 'थांबा अजुन संपलेले नाही, पेटारा शिल्लक आहेच्या अविर्भावात, सूर्य ढगाआड नाहिसा झाला. आता सगळ्या दरीत ढग बसवले होते. धुसर वातावरण...पाण्याचा लवलेश नाही...हे खरेखुरे पावसाचे ढग. हिवाळ्यात धुके पडते तसे. आमचा प्रवास आता स्वर्गातून सुरू होता. त्या धुसर वातावरणाची धुंती काही औरच. त्या धुंदीत गाडी दौडत होती. ओथंबून भरलेल्या भात खाचरात काही शेतकरी पेरणीच्या लगबगीत तर कोणी बैलजोड्या घेऊन रस्त्याने परतताना. आसपास डोंगर, दरी, शेत आणि झरे याचेच सानिध्य!
|
पायथ्याची तोफ गडावर आणली पण रंगवून. |
खालच्या टप्प्यात पोहोचताच विश्रामगडावरचे काळे ढग बाजुला होत असल्याचे दिसले, आता एका बाजुने पांढर्या ढगांनी गडाला गुरफटायला सुरूवात केली. आम्हाला दहा एक मिनीटे हा नजारा दाखविण्यासाठी गडाचा पडदा थोडा बाजूला झाला, त्यानंतर पुन्हा सगळे काही झाकोळणारे दाट ढग. त्या ढगातून आमचा प्रवास म्हैसवळण घाटातून टाकेदकडे. घाटाच्या तळाला समोरचे डोंगर बघितले तर त्यातुन धबधबे कोसळेवेत असे पांढरे ढग आस्तेकदम खाली सरकताना दिसत होते. पलिकडचा डोंगर अर्धाधिक ढगांनी गुरफटलेला, त्याच्या डाव्या खाचेने डोळे खाडकन उघडले, अरे हा तर कळसुबाईचा डोंगर...महाराष्ट्राचा सागरमाथा. निसर्गाच्या यारूपासमोर हरवून जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. दहा मिनीटे पुन्हा हा नजारा मनभरून बघितल्यावर पुढचा उतार आणखी एक चमत्कार दाखविण्यासाठी सज्ज होता. समोरच्या दरित एक छोटा डोंगर तेवढा प्रकाशमान, त्याच्या डोक्यावर काळ्याकुट्ट ढगांची छत्री...बाजुली दरीचे हिरवेंकच कडे...आज दोहो करांनी ते इतके काही देत होता आणि त्याला मान देण्यासाठी आमचे डोळे प्रत्येक ठिकाणी दहा वीस मिनीटे थांबत होते. अखेर टाकेद गाव आले आणि जाणवले आपण स्वप्नात तर नव्हते. इथले वातावण आणि वरचे वातावरण यात केवढा फरक. आता पुढची धडक तेरड्याचे सौंदर्य टिपण्यासाठी भाद्रपदात! तोवर विश्रामगड नावाचे गारूड मनात हिरवे ताजे राहील!
-समाप्त-
|
एकनाथ महाराजकृत भावार्थ रामायणातील छंद |
|
विश्रामगडाच्या दुर्गवैभवाची फलकाद्वारे माहिती |
|
गडाच्या नकाशाचा फलक |
|
स्वच्छा गृह वापरण्यास आपण लायक आहोत? |
|
अजूनही सुरूच आहे गडांचा विध्वंसाचा कालखंड |
|
महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दवाखाना अजूनही भरतो |
|
गडमाहितीचा फलक |
|
शिवाजी महाराजांच्या वास्तव्याची माहिती कथन करणारा फलक |
|
गड संरक्षणसिद्ध करणारे तटाचे जुने भव्य बांधकाम |
|
लोखंडी पत्र्या पासून तयार केलेल्या नळ्यांचे संरक्षक कठडे |
|
तुमचे स्वागत असो...गवताचा रांगोळी... |
|
पहिल्या सपाटीच्या खालचा परिसर... |
|
याचा उल्लेख गप्त वाट म्हणून करतात...तिथे पाणी भरलेले दिसले |
|
देवीच्या गुहेत घोडे बांधण्याच्या कातळात कोरलेल्या खाचा |
|
तेरड्याने सजवलेली पायर्यांची सुंदर वाट |
|
आजच्या पद्धतीने जिर्णोद्धार केलेला त्र्यंबक दरवाजा |
|
फरक जुन्या व नव्या बांधकामातला |
|
म्हळूंगी नदी, त्र्यंबक दरवाजाचा प्रवेशमार्ग, पुरातन शिवमंदिराकडे जाणारा रस्ता |
|
त्र्यंबक दरवाजातून दिसणारी पट्टागडाची उत्तरबाजू |
|
लोखंडाची जाळी गडाच्या वातावरणात जिर्ण |
|
जुने मंदिर पाडून बांधलेले पट्टाईदेवीचे मंदिर |
|
कड्याला चढला हिरवा साज |
|
हे गवत गौराईदेवीला वाहण्याची प्रथा |
|
मन:प्रसन्न करणारे हिरवेकंच ताटवे |
|
अंबारखान्याच्या खालचे पठार |
|
हिरवाईच्या नाना छटा |
|
तकलादू बांधकामात कसे टिकतील संरक्षक कठडे |
|
हिरवाईशी विरोधी संगत साधणारी रंगसंगती |
|
नव्याने तयार करणार्यात आलेली रायगडावरच्या मेघडंबरीची प्रतिकृती |
|
पडका अंबारखाना, जिर्णोद्धार आजच्या बांधकाम पद्धतीने |
|
सह्याद्रीत अशा भव्य वास्तू अपवादानेच आढळतात |
|
पुर्व काळातले असाधारण बांधकामशास्त्र |
|
कार्वी टोपलीचा भाऊ की बहिण |
|
सर्वोच्च पठारावर वनखात्याने घेतलेल्या चरीत भरलेले पावसाचे पाणी |
|
देशकड्याला लागलेल्या रेलिंगच्या माळा |
|
पुरातन गुहेला चहूकडून हिरवाईचा घेरा |
|
हिरव्या वाटा अनेक |
|
हिरवाई थेट गुहेत शिरताना |
|
भरगच्च तेरड्याने लगडलेला कडा |
|
किती टिपशील दोहो डोळ्यांनी |
|
तेरड्याच्या ताटव्याचे जवळून घेतलेले छायाचित्र |
|
जंगल संपदा डोंगराच्या पायथ्या पर्यंत नष्ट झालेली |
|
इवलेशे फुल हिरव्या कंच पठारावर रंग पंचमिची सुरूवात करणारे |
|
वैशिष्ट्यपूर्ण शिवपिंड |
|
झोपडीतले जेवण...क्षुधा शांती... |
|
काळ्या ढगांचा पडदा सारून पांढर्या ढगांची चादर विश्रामगडाला लपेटताना |
|
महाराष्ट्राचा सागरमाथा डोंगरात हरवलाय! |