Saturday, July 13, 2019

Anjaneri: Sundara Jagantara


भटकंती विक्रमी पावसातली...
पावसाच्या नानाविविध कलांनी जणू कळस गाठला होता. अंजनेरी आज सारखा यापूर्वी कधीच दिसला नव्हता. त्याच्या हरेक कड्यातून असंख्य शुभ्रधार जलरेघा अखंडपणे स्त्रवत होत्या, काही चहाच्या रंगाच्या, काही अगदीच चिंचोळ्या तर काही अजस्त्र आकाराच्या. जणू एखादे अजाण बालक मनसोक्तपणे डोंगराच्या चित्रावर दाटीने पांढर्‍या, तपकिरी रेघोट्या ओढतोय, काही पातळ तर काही गडद! किती जलधारा कोसळताहेत याची तर मोजदाद नव्हती. धबधबे म्हणाल तर आज तो वेगळ्या मस्तीत होता. डोंगराच्या प्रत्येक दहा वीस मिटर अंतराने ते खाली कोसळत होते. कित्येकांना जोराचे वारे खाली येऊ देत नव्हता, त्यामुळे डोंगरमाथ्या झर्‍यांना हरेक क्षणाला बळ मिळत होते. स्पर्धा होती ती, कोणाची ताकद मोठी, पाण्याच्या भाराने वजन झालेल्या धबधब्यांना खाली खेचणार्‍या गुरूत्वाकर्षणाची की, त्यांना वर लोटणार्‍या वार्‍याची. आज अंजनेरी अक्षरश: चहूअंगांनी धबधब्यांच्या राशी ओतत होता, कुठूनही बघा तो आज खिळवून ठेवण्याच्या मन:स्थितीत होता. त्याचे चक्रावून टाकणारे अगणीत धबधबे, झरे नी ओहळींच्या अविस्मरणीय दर्शनाची, गडमाचीवर आमची वाट मध्येच अडवून त्यातून आमची सुटका करणार्‍या भटकंतीचा ताजा ताजा वृत्तांत... 

६ जुलै २०१९, आमच्या वैनतेय ट्रेकर्स व्हॉटस्‌अॅप समुहावर आशिष शिंपीने माहिती टाकली, 'हिमालयातील गिर्यारोहणाच्या प्राथमिक शिबीराकरिता निवड झालेल्या तिघा गिर्यारोहकांच्या 'भारवाहन सरावाकरिता', मुळेगावच्या पाचपावली वाटेने अंजनेरीची छोटेखानी भटकंती. श्रेणी सोपी. दुपारी २-०० पर्यंत परत. जागा मर्यादित, फक्त १५ प्रवेश. सोबत बक्षिस म्हणून एकाच कड्यावर एकाच वेळेला वीस एक धबधब्यांचे दर्शन तरी दाखविले जाईल'.
दुपारच्या आत परत येण्याची हमी असलेली रविवारीय भटकंती मोठे अमिष असते. त्यात अंजनेरीच्या माथ्यावर अंजनीच्या मंदिरा पर्यंत जायचे. सोबत असंख्य धबधब्यांचे दर्शन म्हणजे कुठल्याही घुमक्कडासाठी फायद्याचा सौदा!
अंजनेरीवर सात वेगवेगळ्या मार्गांनी पुरातन वाटा आहेत. त्यातली मुळेगावची वाट अजून बघितलेली नव्हती. पाचपावली, बाजारपट्टा हा भाग काही ऐतिहासिक खुणा सांभाळून आहे, त्या बघण्याचा योग येणार होता.



महाराष्ट्रातली सगळीच वनसंपदा आपली आहे. आपल्यासकट आपल्या काही पिढयांकडून तिचे संगोपन करणे आपल्याला जमले नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राची वृक्षसंपदा नाहीशी झाली. अनेक जीव त्यामुळे हद्दपार झाले तर कित्येक नामशेष. अशा स्थितीत वनविभागाने ज्याठिकाणी प्रवेशशसंबंधीचे नियम कडक केले आहेत, त्यात अंजनेरीच्या संरक्षित संवर्धन क्षेत्र अतीशय महत्वाचे. 
अंजनेरी हे तीन एक वर्षांपूर्वी वनविभागाने वनौषधींकरिता संरक्षित संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्रातले पहिले संरक्षित संवर्धन नाशिकच्याच बोरगड किल्ल्याच्या पायथ्याला घोषित केल्यानंतर लगेचच अंजनेरीची घोषणा करण्यात आली. बोरगडच्या पायथ्याला नाशिकच्या विविध सामाजिक संस्था व काही उद्योग समूहांनी सातत्याने वृक्षारोपण मोहिमा केल्यामुळे येथे चांगले वन आकारास आले आहे. त्या सोबतच त्यात बिबटे, मोठ्या पाली आदी वन्यजीवांचे आश्रयस्थान निर्माण झाले आहे. अंजनेरीवर वनविभाग भरपूर मेहनत घेत असल्याने भविष्यात येथेही वनौषिधींचे चांगले वन आकारास येऊ शकेल. त्यामुळे वनविभागाने गडावर भटकंती करणार्‍यांकरिता अनेक प्रकारचे नियम लागु केले आहेत.

या बद्दलांचा काही वेळेला खर्‍या ट्रेकर्सना आणि गिर्यारोहकांना फटका बसल्याचे काही प्रसंग ऐकायला मिळायचे. शुद्ध गिर्यारोहण करणार्‍यांना त्यामुळे काही मोहिमा रद्द कराव्या लागल्या आहेत तर काहींचे गिर्यारोहण साहित्य जप्त करण्यात आल आहे. गडाचे हे बदललेले रूप बघावे. वनविभागाच्या नियमांची माहिती करून घेण्यासाठी ही भटकंती उपयोगी ठरेल असाही एक विचार मनात होता. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून अंजनेरी गावात शिरताना जाणवले की, नवरीच्या सुळक्यावरून एक अजस्त्र धबधबा कोसळत आहे. 
धबधब्याचा रंग मातकट होता, याचा अर्थ रात्रभर झालेल्या पावसामुळे भरपूर माती या सोबत वाहून येत असावी. आजवर न दिसलेले काही धबधबे बघायला मिळण्याचे ते संकेत होते. परिसरातल्या सगळ्यांच डोंगरांवर असंख्य जलधारा कोसळत होत्या. कुठल्या डोंगराच्या कुठल्या बाजुला किती धबधबे याचा हिशोब करत आमचा गाडीतला प्रवास सुरू होता. 



कार्वी किंवा कार्वा डोंगरावर धबधब्यांची मजेदार नक्षी दिसत होती. यंदाच्या उन्हाळ्यात या कार्वीवरच्या जुईच्या अजस्त्र झाडाची आठवण झाली. जुईचा वेल बघितला होता. कार्वीवर चक्क भले मोठे झाड आणि त्यावर असंख्य फुले. जुईची झुडपेही अनेक होती. एखाद्या झाडाच्या अभ्यासकाला नेऊन याबाबतची खात्री पुन्हा करावी लागणार. आज ती वेळ नव्हीत, हा शोध पुन्हा केव्हा तरी!

रस्ता गेला वाहून
यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे शेतीच्या कामांना अजून सुरूवात झालेली नाही. त्र्यंबकेश्वर परिसरात दहा पंधरा दिवसांपासून पावसाचा जोर राज्याच्या इतर ठिकाणच्या तुलनेत जास्त आहे, तसा तो नेहमीच जास्त असतो. सगळी भात खाचरे मातकट तपकिरी रंगाच्या पाण्याने भरली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या नैसर्गिक नाल्या ओसंडून वाहत होत्या. पहिन्याच्या डोंगरावरून  मातकट तपकिरी रंगाचे काही मोठे धबधबे, अनेक झरे सरसरत खाली येताना दिसत होते.



नाशिकहून तासाभरात आम्ही मुळेगावी दाखल झालो. रस्त्यावर चिटपाखरू सुद्धा दिसत नव्हते. मुळेगाव तशी लहान लोकवस्ती. गावच्या बाहेरच दोन ठिकाणी निम्मा रस्ता जोरदार पावसामुळे खचून गेला होता. आमची काळीपिवळी जीप तिथेच सोडून आमचा आजचा वाटाड्या गोपाळच्या घरी जायचे होते. चहापान अगोदरच झाला होता. नाष्ता घरूनच करून येण्याची सूचना आजचा नेता आशिष शिंपी याने दिली होती. या गोपाळच्या घरात जायचे काही सोपे काम नव्हते. त्याच्या भात खाचरात कमरे इतके पाणी भरले होते. एका बाजुने मोठ्या ओढ्यातून ते वाहून जात होते. प्रवाह वेगवान होता. सगळ्याच शेतकर्‍यांनी भात खाचरातले पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था केल्याने डोंगर पायथ्या पासून गोळा होणारा अवघा पाऊस गावच्या रस्त्या पर्यंत मोठ्या ओहळीत रूपांतरीत झाला होता. आमचा चढाई मार्ग गोपाळच्या घराच्या अंगणाच्या वरून होता.



गोपाळच्या घरात शौचालय बांधलेले आहे, त्यामुळे पोटावरचा ताण हलका करून तिथे अजिबात न घुटमळता थेट चढाईला सुरूवात केली. अंजनेरीच्या डोंगरावरचे धबधबे हे सगळे शुभ्र होते. त्यांच्या आजूबाजुला लहान पातळ दोरी सारख्या जलनक्षांनी पावसाळी भटकंतीचे रंग भरले होते. 

मनातल्या मनात आम्ही अंजनेरीवर किती धबधबे दिसतात ते मोजू लागलो. आज कोणाची काय खेचायची, तर आजच्या नेत्याचीच खेचू असा विचार मनात. 'एका कड्यावर किमान विस धबधबमे दिसतील असे त्याने सांगितले होते. त्यात एक जरी कमी दिसला किंवा एक जरी जास्त दिसला तरी त्याला घेरायचे. बदल्यात नुकसान भरपाई म्हणून चहा-भजीचा अल्पबेत पदरात पाडून घ्यायचा, असा कट शिजवून ठेवलेला. 



रात्रभर पाऊस झाला की, सकाळी तो उघडतो. असे सहसा घडते. आज तसे काही घडत नव्हते. अपेक्षा होती की, वर जाऊ तेव्हा पाऊस उघडेल, वातावरण निवळेल आणि आसपासच्या डोंगररांगा दिसतील. मग शोधू कुठले डोंगर कुठल्या दिशेला दिसतात ते.

गोपाळच्या घराचे टेकाड ओलांडल्यानंतरच लहान लहान ओहळीतून चालावे लागत होते. त्यात खुप मजा होती. दगड धोंड्यातून सरसरात जाणार्‍या ओहळींतून असे घिसाडघाईने चालायचे नसते. कधी दगडावर तर कधी दगडाच्या बेचक्यात पाय टाकत पाण्याची मजा घ्यायची. शहरी जीवनात सगळं कसं पायर्‍या, जिने, गुळगुळीत रस्ते. कुठे खड्डा दिसला तरी रस्ते बांधणार्‍याच्या नावाने कपाळावर आठ्या चढवायच्या. इथे एकजात सपाट रस्ता नसणार, लहान मोठ्या उंच, सखल वाटा तुम्हाला वेगळ्या वातावरणात घेऊन जाते. आसपासचा झाडी झाडोरा वृक्ष, वेली, वनस्पती आणि त्या सोबत काही किटक, पाण्याचले जीव आणि नशिब असेल तर काही मोठ्या वन्यजीवांचे दर्शन, सोबत भरपूर चालणे, भरपूर दमणे, भरपूर शुद्ध हवा, त्यामुळे लागणारी सपाटून तहान-भूख रोजच्या त्याच त्याच निरस चक्रापासून पुर्णपणे दूर घेऊन जाते ती अशी!



चहा मनात भिनलेला
पावसाचा जोर खुप जास्त नव्हता. साधारणच होता. पण तो सतत पडत अल्याने डोंगरांवरून माती वाहून आणत होती. हा सगळा लाल मातीचा भाग. त्यामुळे चहाच्या नद्या, चहाचे झरे, चहाचे धबधबे वाहताहेत असा आभास होत होता. चहा इतका मनात भिनलेला!
भटकंतीची सुरूवात ही 'चहा घेऊन होणे', हा गेल्या अनेक वर्षांचा जणू प्रघातच. आशिषच्या नियोजनात आज नाष्त्या सोबत चहाचेही नियोजन नव्हते. भरपूर मोठी चाल आणि वेळेत परतायचे. कुठे फार घुटमळायचे नाही असेच आजच्या छोटेखानी भटकंतीचे स्वरूप हाते, त्या मुळे या गोष्टी घरूनच करून येण्याचे त्याने बजावले होते.

आम्हाला नेणारा जीपचालक सकाळी ७-०० वाजता येणार होता. तो आला साडे सात वाजता. तोवर नाशिकची सांस्कृतिक ओळख असलेल्या हॉटेल राजदूतवर अलिकडे सुरू झालेला इराणी पद्धतीचा चहा तयार होता. गाडी येई पर्यंत त्याचे एक अवर्तन सहज घडले. या हॉटेलचे उद्‌घाटन १९७२ साली महाराष्ट्राचे प्रसिद्ध राजकीय नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले आहे.



आम्ही जसजसे डोंगरावर जात होतो तसतसे पावसाच्या मनोहारी दर्शनात गुरफटत होतो, त्या नादात धबधबे मोजण्याचे कसे काय राहून गेले ते कळलेच नाही. संतोषाच्या डोंगरापासून पुढे कार्वा अंजनेरीची पूर्व, दक्षिण बाजू त्याच्या आसपासचे आणखी काही डोंगर असे सत्तरच्या आसपाद तरी मोठाले धबधबे थेट डोंगरकड्यावरून कोसळताना मोजून झाले होते. सगळे खुप मोठ्या आकाराचेच, बारीकची तर गणनाच नाही. त्यानंतरची गणती राहीली. अर्थात हे धबधबा लांबूनच बघण्याचे. त्यांचे ठिकाण इतके अवघड की ते दुरूनच साजिरे.
रात्री ट्रेकची तयारी केल्या पासून सुरू झालेला पाऊस...सकाळी ट्रेकसाठी बाहेर पडताक्षणी भिजवणारा पाऊस...गाडीत बसताना ओलेचिंब करून टाकणारा पाऊस...रस्त्याने जाताना डोंगरांवर अनेक जलधारा दाखविणार पाऊस...पायथ्याच्या गावचा रस्ता वाहून नेणारा पाऊस...तिथून पायपीट करत वाटाड्याच्या घराला वेढणारा पाऊस...डोंगर चढताना एक क्षण सुद्धा विश्रांती न घेणारा पाऊस...



आमच्या लहानशा चमुत चार महिला होत्या. त्यामुळे गोपाळला शंका होती की त्या चालतील की नही. वर भरपूर वारं असेल, असे त्याने दोनतिनदा सांगुन बघितले, तेव्हा सह्याद्रीत आणि हिमालयात नेहमी भरपूर चालण्याचा त्यांना सराव आहे असे सांगून सुद्धा त्याला ते पटले असावे, असे जाणवले नाही. 
डावीकडच्या कोथळ्याचा सुळका बघून पाऊण तासात आम्ही मुळेगावची बाजू ओलांडून पहिन्याच्या बाजुच्या डोंगरकड्याच्या बाजुला भिडलो. या सुळक्याच्या वाटेवर किश्किंधा तीर्थ असल्याची माहिती आशिषने दिली. दगडात बांधलेले पाण्याचे हे जुने टाके आहे. परतीच्या वाटेवर तिथे जाण्याचा योग येणार होता. 

तटबंदी, पायर्‍यांची वाट
'वरून खळखळत येणार्‍या झर्‍यातून डोंगरचढाई', हा सकाळ पासूनचा कित्ता थांबता थांबत नव्हता, त्याचा कुणाला कंटाळाही येत नव्हता. पावसाने विश्रांती घेण्याचा कुठेच विषय नव्हता. 
इथून पंधरा मिनीटांवर डोंगर कड्याकडे बघून अंगात रोमांच उठले. कड्याला चक्क जुन्या तटबंदीचे घडवलेले काही चौकोनी दगड दिसत होते. अंजनेरीवर आमचा प्रथमच तटबंदीचे अवशेष बघण्यचा हा अपूर्व योग आज जुळून आला होता. याला लागूनच कातळात खोदलेल्या पायर्‍या दिसल्या. एक जुनी वाट पार केल्याचा आनंद द्विगुणित झाला होता.
पायर्‍यांच्या वाटेने कातळटप्पा कार करताच वरच्या बाजूला आणखी एक डोंगराचा कातळकडा लागला, त्याला डावीकडे ठेऊन दाट झुडपी जंगलातून प्रवास सुरू होता. वरच्या बाजूला आता बरेच धबधबे समोरच्या डांगरावरून कोसळताना दिसत होते. या सगळ्या परिसरात मोठाली झाडे कुठेच दृष्टीस पडत नव्हती. काहीशा खुल्या माळावर दोन ठिकाणी कंदिल पुष्पाची झुडपे दृष्टीस पडली. नजर शोध घेत होती ती अंजनेका सेरोपेजिया या कंदिल पुष्प वर्गातील फक्त अंजनेरीवर आढळणार्‍या वनस्पतीचा. पण ती ही नाही हे लवकरच लक्षात आले. डावी कातळबाजू पार करून आता वळसा घेतला आणि पुन्हा डावीकडे डोंगराचा मोठा कातळ उंचवटा लागला. त्याच्या पोटात एकानैसर्गिक गुहेवरून एक छानसा धबधबा कोसळत होता. 
या गुहेत गाई ठेवल्या जात असाव्यात. आतमधल्या शेणावरून ते स्पष्ट होत होते. या सोप्या पण रोमांचक धबधब्यात सगळ्यांनी शीण घालवला. गुहेच्या आतून बघितले तर बाहेर धबधबा कोसळतोय, हा अनूभव रोमांचित करणारा होता. हा भूरळ पाडणारा नजाराच आमचे पहिले विश्रांती स्थान ठरले. अर्थात बसण्यासाठी कुठेच योग्य खडक नव्हता, त्यामुळे धबधब्याच्या जोरकस धारा अंगावर झेलून पायांना येथे थोडी विश्रांती देण्यात आली, एरवी सकाळपासून अखंड चालीमुळे ते चांगले शिणले होते.








मोत्यांचा पाऊस
या अर्ध्या तासाच्या खंडाने अंगात तरतरी आणली. पावसाचा वेग इतका सातत्यपूर्ण होता की, डोंगरावर वाहणार्‍या पाणत्यात ते पडून त्याचे मोती बनत होते. खाली मान घालून चालताना असंख्य मोती बरसत आहेत असा आभास व्हायचा. क्षण दोन क्षण त्यांचे दर्शन घडत आहे आणि ते लगेच पाण्याच विरून जात आहे. भान हरपून बघावे असे हे दृष्य असल्याने लांबलचक चालीचा कंटाळा कुठच्याकुठे पळून जात होता.
गुहेच्या धबधब्यापासून पुढच्या दहावीस पावलांवर स्वर्ग आपली वाट बघतोय असे त्यावेळी पुसट सुद्धा वाटले नव्हते. अंजनेरीच्या माथ्याचा आक्राळविक्राळ कडा चहूअंगांनी धबधब्यांनी ओसंडून वाहत होता. हा माथा दोन टप्पात आहे. वरचे पठार विस्तीर्ण, साधारण किलोमिटर पेक्षा थाडे जास्तच, त्यामुळे वरच्या टप्प्यावरचे पावसाचे भरपूर पाणी गोळा होता. पावसाळ्यात सह्याद्रीचे अवघे माथे ढगांनी वेढलेलेच बघायला मिळतात. त्यावर सतत पाऊस होतो तेव्हा मोठ मोठ्या जलधारा त्यावरून धबाबा कोसळत असतात. अंजनेरीवर हे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त. एक तर पाच हजार फुटाची उंची, त्यात हा सगळा परिसर कोकण देशाशी जोडणारा, त्यामुळे पूर्वपार भरपूर पाऊस ही याचा खास ओळख.

जलधारा शिखरावरून
अंजनेरीच्या माथ्यावर जन्म घेणारे धबधबे खालच्या टप्प्यावर ओहळ बनत, पुढे पाच दहा मिटरवर तर काही ठिकाणी एखाद्या मिटरवर मोठा अजस्त्र कडा, त्यामुळे धबधबे पुन्हा नव्याने जन्म घेत. नजरेच्या एका टप्प्यात उभे आणि  आडवे, दुमजली आणि लांबलचक कड्यावर कित्येक धबधबे, आहाऽऽ काय नजारा वर्णावाऽऽ

कातळाचा एक किलोमिटर विस्तीर्ण आणि शंभर एक फुट उंच निसर्गाचा भला थोरला पडदा. त्यावर झाडे झुडपे नी गवताचे पुंजके. त्यातून प्रसवणार्‍या अगणीत जलधारा. काही धबधबे इतके मोठे की, आठवड्या भराच्या प्रवाहात एखाद्या मध्यम गावाची वर्षभराची तहान भागवली जाऊ शकते. काही जल धारा इतक्या बारिक की जणू पांढर्‍या शुभ्र तारा. हा नजारा डोळ्यात साठविण्यासाठी अर्धा तास तरी किमान देण्याची गरज होती, तोच नेत्याने शिट्टी मारली, चला अजून बरेच चालायचे आहे, मंदिरात जाऊन जेवण घ्यायचे आहे. 






पाचपावली
आमचे लक्ष आता अंजनेरीच्या सर्वोच्च माथा गाठण्याचे होते. डाव्या बाजुने कातळाचा भलाथोरला पसारा पायथ्याने ओलांडून वरच्या बाजूने चढाई मार्ग होता जिथून धबधब्यांची मालिका कोसळत होती, त्यावाटेने जाण्याचा मार्ग जुनाच आहे. धबधब्यांचा आकार पाहून व कडेच्या ओल्याचिंब कातळाच्या निसरड्या वाटेने जाणे सुरक्षित नसल्याने आम्ही डाव्या बाजुची वाट कायम ठेवत पाच पावली गाठली. एव्हाना दुपारचे साडे बारा वाजले होते. ही पाचपावली बरोबर पहिन्याकडून येणार्‍या खिंडीवर वसलेली आहे. देवाचे जुने ठाणे. एका कातळ भिंतीवर अनेक ठिकाणी शेंदूर लाऊन स्थानिक मंडळी शेकडो वर्षांपासून डोंगरावरच्या आराध्य दैवताची पुजा करत आली आहे. अंजनीचे मुळ स्थान हेच, असे गोपाळने सांगितले. त्यावर काही ठिकाणी रान हळदीची फुले वाहिली होती. पावसाळ्यात रानहळदीचे नुसते दर्शन केवढे सुखावणारे असते!
भल्या सकाळी नाष्ता असा झालाच नव्हता. नाही म्हणायला आमच्या गार्गीने सकाळी ऊठून पोहो बनवून दिले होते, तोच पोटाला थोडाफार आधार होता. साडे तीन तासांच्या पायपीटीत तो कुठल्या कुठे विरून गेला आणि भुकेच्या कावळ्यांची कावकाव अखंड सुरू झाली. दुपारच्या जेवणासाठी रात्रीच पोळ्या बनवून ठेवल्या होत्या व भल्या सकाळी भाजी. त्यामुळे सोबत डबा होता, तो खाण्याचे स्वातंत्र्य आम्हाला फक्त आणि फक्त गडमाथ्यावर अंजनी मातेच्या देवळातच मिळणार होते.

सगळ्याच सहभागींनी भाजी पोळीचा डबा सोबत घेतला होता. सगळ्यांना भुखही खुप लागली होती. सकाळपासूनवाटेत थोडे थांबून सोबतचे कुठलेच पदार्थ खाण्याची सोय नव्हती इतकी पावसाची रिपरिप. कुठे बसायला कोरडे ठिकाण प्रश्न नव्हता, विश्रांतीसाठी बसण्याकरिता खुला कातळ भागही कोठे लागला नाही, जेव्हा तो लागला तेव्हा चालण्याची लय असल्याने थांबण्याची स्थिती नव्हती. 



शेवटची चढाई चांगलीच दमवणारी होती. वेगवान वारे पावसाच्या थेंबांना सुयांचे रूप देत होते. त्यामुळे चेहेर्‍यावर अॅक्यूप्रेशर थेरपी आपोआप होत होती. वारे इतके वेगवान होते की, सोबतच्या छत्र्य म्यान कराव्या लागल्या. परिणामी मोबाईल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू बॅंगेत गुंडाळून ठेवाव्या लागल्या. 

नाजूक समतोल पर्यावरणाचा

सर्वोच्च पठार म्हणजे सोंदर्याची खाणच. रानहळदीचे कित्येक ताटवे फुललेत. नागफणीच्या फुलांचे कोंब धरल्याने जमिनीला घट्ट चिकटलेल्या त्यांच्या गोल पानांची नक्षी ठिकठीकाणी उमटलेली दिसली. येत्या काही दिवसात रानहळद, नागफळीसह आणखी काही फुले लागतील तेव्हा या पठारावरचे चैतन्य काही औरच असेल. या ताटव्यांना अधून मधून टोपली कारवीच्या गोलाकार झुपक्यांचे साज चढलेत. काही अपरिचीत झुडपांनी टोपली कारवीची नक्कल करत गोलाकार रूप घेतल्याचे दिसत होते. माळी जसा बागेत झुडपांची वेगवेगळ्या आकारात छाटणी करून त्यांना सौंदर्यपूर्ण रूप देतो. तसा निसर्गाचा माळीच जणू टोपली कारवी सारख्या झुडपांना आकार देत असावा.



पाऊस उघडताच या पठारावर भाविक, पर्यटक, सहलवीर यांचा राबता राहील तेव्हा इथल्या वनस्पतींचे लोकांपासून संरक्षण करण्याची निकड भासेल. गडाच्या सर्वच वाटा मळलेल्या. त्याच्या कडेला दोन्ही बाजूस दगड रचले तरी ती वाट आहे हे त्यावरून स्पष्ट होईल. त्यामुळे लोकांना मुख्य वाट सोडून भरकटण्याची शक्यता राहणार नाही. लोकांची पावले मुख्य वाटेच्या बाहेर पडणार नाहीत, तेव्हा या वनस्पतींचा संरक्षण मिळेल. 

वनविभागाने काही किल्ल्यांवर सिमेंट कॉक्रिट टाकून त्यात लहान मोठे दगड गोटे चिनून टाकलेत, तसा प्रयोग येथा होता कामा नये. अशा वाटा या चालायला एकतर कमालीच्या अडचणीच्या ठरतात, त्यामुळे लोक त्याच्या बाहेरून चालणे पसंत करतात, त्यामुळे त्याच्या लगत आपोआप पाय वाट तयार होते व इतका खर्च करून केलेल्या वाटेचा उपयोग होत नाही. किल्ले धोडपवर अशी खाल पासून थेट शिखरा पर्यंत आणि संपूर्ण माचीला वळसा घालणारी दगडगोट्यांची वाट बनवल्याचे बघायला मिळते.



इथले आणखी एक आव्हान असेल ते म्हणजे चराई. गोपाळकडून माहिती घेतली तेव्हा कळले की, गॅस परवडत नाही म्हणून गावकरी अजूनही लाकूड फाट्याचा सरपण म्हणून वापर करतात. गुरे पावसाळा झाल्यानंतर माथ्यावर चराईसाठी सोडतात, त्यामुळे डोंगराच्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्वाचे गवताचे व विविध झुडपे व झाडांचे आच्छादन नाहीशे होते. त्यामुळे गडावरची जैवविविधता तर लोप पावते, शिवाय पाने, फुलांचा काडी कचरा पडून त्याच्या खाली जमिन भूसभूशीत करणारी आणि पर्यायाने जमिनीत पाणी मुरविणारी अत्यात महत्वाची यंत्रणा नष्ट होते. याचा फटका अर्थातच पायथ्याच्या गावांना बसतो जेव्हा पावसाळ्याच्या काही महिन्यातच त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या वाहून येणारे पाणी आटतो. विहीरी, नाले कोरडे पडतात ते गवताच्या बेफाम चराई मुळे, झुडपांच्या काटक्या गोळ्या केल्याने व मोठाले वृक्ष तोडल्याने. या संदर्भात स्थानिकांमध्ये प्रबोधनाची नितांत आवश्यकता आहे. शिवाय डोंगरावर येणार्‍या पर्यटक व सहलबाजांच्या प्रबोधनाची, प्रसंगी कडक नियमांची आवश्यकता राहील. 

गिधाडांचे संवर्धन हा अंजनेरीच्या दृष्टीने आणखी महत्वाचा विषय. इथल्या कडेकपारीत असलेल्या नैसर्गिक गुहात  गिधाडांचे पूर्वपार वस्तीस्थान आहे. गिधाडे खुप मोठ्या संख्येने कमी झालीत. निसर्गातले स्वच्छक म्हणून ओळख असलेल्या या विशालकाय पक्षाचे अनेक वर्षे नामोनिशाण दिसत नव्हते. अलिकडे गिधाडे पुन्हा दिसू लागलीत. त्याच्या संवर्धनासाठी अंजनेरी हे महत्वाचे ठिकाण असल्याने वनविभागाने त्या दिशेने पावले टाकली आहेत. अर्थात त्याकरिता गिधाडांचे खाद्य हा कळिचा मुद्दा ठरणार असून महाराष्ट्रात अनेक भागात अजूनही जनावरांना वेदनाशमक औषध दिल्यामुळे ती मृत झाल्यावर त्यांचे दुषित मांस खाल्ल्याने गिधाडांचे मोठ्या प्रमाणावर उच्चाटन झाले आहे. त्याकरिता वनखात्याला आसपासच्या दिडशे किलो मिटर परिघात तरी पाळीव जनावरांच्या उपचारासंबंधी वेदनाशमक औषधांच्या निर्बधांचे आदेश जारी करावे लागतील, अन्यथा गिधाडा सारखा अजस्त्र पक्षी आपली शेवटचीच घटका मोजतो आहे. माळढोकाच्या पाठोपाठ त्याचेही अस्तीत्व माणसाच्या हावरेपणामुळे संपून जाईल!



साक्षात्कार तुफानी पावसाचा 
अंजनी मातेच्या मंदिरात पोहोचलो तेच पोटात आगीचा डोंब घेऊन. त्यामुळे देवीचे दर्शन घेऊन मंदिरा शेजारीच एका स्थानिकाने बनविलेल्या खानावळीत आम्ही पथार्‍या टाकून सोबत आणलेल्या डब्यांवर ताव मारला. दोन जणांनी बटाटा भाजी आणली होती. कोणी भेंडी, कोणी फ्लॉवर. लोणच्याचे तीन प्रकार. साखर आंबा, इडली, खाकरा, राजगिरा लाडू अशा नानाविविध पदार्थांची मेजवानी ओल्याचिंब अंगाने झोडण्याची वेगळीच मजा. आमचे जेवण सुरू असताना पावसाने तुफानी रूप धारण केले. ही जोरदार सर असेल असे वाटले, पण ते तसे नव्हते. तोड्याच वेळात स्पष्ट झाले की तो थांबण्याच्या मनस्थितीत नाही.

सोबत आलेल्या महिलां मंडळाने आपआपले मोबाईल फोन तपासले तेव्हा त्यावर अनेक मिसकॉल दिसत होते. पावसाच्या आवाजात कुणालाच फोनची घंटी जाणवली नाही, शिवाय ओल्याचिंब स्थितीत फोन बाहेर काढून बघण्याची स्थिती नव्हती.



नाशिकमध्ये पावसाने जोर धरला असावा म्हणून घरचे चिंतीत असतील असा अंदाज बांधला तो अगदी खरा ठरला. थोड्या खटपटीनंतर एकीचा फोन घरच्यांशी लागला आणि सगळा उलगडा झाला. नाशिकला गोदावरी दुधडी भरून वाहत आहे. यंदा नाशिकला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे दमदार पाऊस होऊन धरण भरल्याशिवाय दावरीला पुर येणार नाही, अशी अटकळ होती. आठ दहा तासा संतततधारेमुळे गोदेला येऊन मिळणार्‍या लहान मोठ्या प्रवाहांमुळे गोदा दुधडी भरून वाहिली. त्र्यंबकेश्वरला गोदेच्या पाणलोटातही जोरदार पाऊस झाला. नाशिक त्र्यंबक रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे बंद करण्यात आला. सकाळी नाशिकहून निघालो तेव्हा स्थिती सामान्य होती. तीन साडेतीन तासात  पावसाने जोर धरल्यामुळे ती बदलली होती. 



भटकंतीवर दुपारचे जेवण झाले की, अर्धा तास विश्रांतीचा प्रघात मोडून आम्ही तात्काळ परतीचा निर्णय घेतला. गोपाळने मुळेगावला परत जाण्याच्या वाटा पाण्याने भरल्या असतील असे स्पष्ट केले.  झटपट गड उतरण्यासाठी परतीचा सोपा पर्याय निवडला, पायर्‍यांच्या वाटेने अंजनेरी गावात उतरण्याचा.

संततधार पावसाने मुसळधारेचे रूप घेतले होते. अंजनेरीच्या सर्वाच्च माथ्यावर सर्वत्र झुळू झुळू वाहणारे झरे नी ओहळी यांच्याशिवाय काहीच दिसत नव्हते. कड्यावरून धबधब्याचे रूप घेऊन त्या कोसळत होत्या. त्यातल्या कित्येक धारा जोरदार वार्‍यामुळे पुन्हा माघारी फिरत होत्या. वरून जोराचा पाऊस आणि कड्यावरून कोसळलेले धबधबे वार्‍यामुळे पुन्हा माघारी, त्याने माथ्यावरच्या ओहळी हरेक क्षणाला मोठ्या दमदार होत होत्या. 



आपण अंजनेरीच्या माथ्यावर आहोत आणि विक्रमी पाऊस सुरू आहे याची एव्हाना जाणिव झाली होती. खालून वर माथ्या पर्यंत अंजनेरी पर्यटन विकास योजने अंतर्गत सिमेंट कॉक्रिटच्या पायर्‍या बांधल्या आहेत. डोंगरावच्या विपरीत हवामानामुळे त्या अंमळ ठिकठिकाणी उघडलेल्या. त्या तोडक्या मोडक्या नी निसरड्या वाटेवरून सर्वोच्च पावसात उतरण्याचा थरार आम्ही अनूभवत होतो. 

मंची अंजनेरीवर भला मोठा तलाव आहे. त्याच्या पुढे अंजनीचे आणखी एक मंदिर आणि त्याच्या आसपास चहा भजी, भाजी पोळी, विकणार्‍या स्थानिक मंडळीच्या चंद्रमौळी खानावळी. आज त्यात ना विक्रेते होते ना पर्यटक. संपूर्ण गडावर फक्त आम्हीच. या मंदिरापासून हाकेच्या अंतरावा पार्‍यांचा दुसरा टप्पा तो पार केला की, आपण अंजनेरीच्या नवरा नवरी सुळक्याच्या सपाटीला लागतो. तिथून मग एक घाटाचा गाडी रस्ता असे शेवटच्या टप्प्याचे सोपे आवाहन फक्त पार करणे बाकी होते. इथे भले मोठे संकट आमची वाट बघत होते. पायर्‍यांच्या जवळ गेल्यानंतर जाणवले ते संकट काय आहे.



माची अंजनेरीच्या खालच्या पायर्‍या म्हणजे भाविकांची वर्षभर अखंड ये-जा त्यावरून असते. त्यावरून छाती एवढ्या उंचीचे पाणी रौद्रभिषण वेगाने खाली वाहत होते. यातून खाली उतरणे कुणालाही शक्य नव्हते. पाऊस थांबण्याची कोणतीच शक्यता दिसत नव्हती, इतकी संततधार झड सुरू होती. मुळेगावची वाट आम्ही अगोदरच सोडून आले होतो. पहिन्याची वाट तर त्याहून बिकट. आता शेवटचा पर्याय होतो तो म्हणजे तळवाडे घळितून जाण्याचा. मोठमोठ्या शिळांनी भरलल्या या घळीचे चित्र आणखीच विदारक असण्याची शक्यता होती. शिवाय दिवस मावळतीला आला होता. अंनजेरीवच्या इतर सोप्या वाटांच्या पर्यायांचाही त्यामुळे विचार करणे शक्य नव्हते.
अंधारात खाली उतरणे अशक्य होणार होते. आम्ही निर्णय घेतला, आज माचीवरच मुक्काम करू. वरच्या आश्रमात आश्रय मिळेल, शिवाय अंजनेच्या देवळातली खानावळ रात्रीच्या जेवणासाठी उपयोगी ठरणार होती. अर्थात मुक्कामाचे नियोजन नसल्यामुळे कोणीच त्या तयारीने आले नव्हते. सोबतच्या महिलांनी तर घरी काहीच सांगितले नव्हते, त्यामुळे गडावर अडकून पडल्याच्या विचाराने त्यांच्या चिंता वाढल्या होत्या. हा अगदीच शेवटचा पर्याय असेल असे स्पष्ट करून आम्ही उतरण्याच्या वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करू लागलो. आजची भटकंती ही अगदीच सोप्या श्रेणीची असल्यामुळे गिर्यारोहणाचे काणतेच साहित्य सोबत आणले नव्हते. इतक्या रौद्रभिषण पाण्यात त्याचा काही उपयोगही करता आला नसता. 



पावसाने थोडी उसंत तर पायर्‍यांवरचा पाणी कमी होइल. साठ सत्तार पायर्‍यांनंतर पाण्याचा हा प्रवाह कड्यावरून खाली उडी घेतो, त्यामुळे डावीकडे एकदा सरकले की पुढची वाट सोपी व निर्धोक असेल याची कल्पना असल्याने आम्ही पाऊस कमी होण्याची वाट बघू लागलो. तोवर आम्ही सुरक्षित असल्याची व प्रसंगी गडावरच थांबणार असल्याची सूचना फोनवरून कुटुंबियांना देण्यात आली. 
या महिलांमध्ये एक होत्या सुषमा मिशाळ. नाशिकमध्ये तांत्रिक गिर्यारोहणाची सुरूवात ज्यांच्या मुळे झाली त्या पिढीच्या त्या प्रतिनिधी. आपल्या काळात गिर्यारोहणाचा प्राथमिक व प्रगत असे दोन्ही अभ्यासक्रम केलेल्या. अनेक सुळके व प्रस्तर भिंतींवर आरोहण केल्याने डोंगर आणि त्यावरची सुरक्षा हा विषय पक्का ठाऊक असलेल्या. त्यांनी सोबतच्या महिलांना धीर दिला. 

पायर्‍यांना लागून असलेल्या संरक्षक कठड्यांच्या वरच्या खंबाला दोर बांधून आम्ही दोघांनी पायर्‍यांवर उतरून बघितले, पायर्‍यांवर पाण्याचा जोर चांगलाच होता. पण दोर बांधून सगळ्यांना उतरविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकत होता. दोर अर्धाच पुरत असल्याने मधल्य टप्प्या पर्यंत जायचे आणि तिथून पुढचे पुढे बघून ठरवायचे असे ठरविण्यात आले. 



पावसाने थोडी उसंत धरली. ''थोडे शांत व्हा, जोखिम घ्या, डोके चालवा, लवकर निसटा'' असे संकेत मिळाले. अजिबात वेळ न दवडता आम्ही खळखळत्या पाण्यातून उतरू लागलो. सावधपणे, कोणी घसरून प्रवाहात वाहून जाणार नाही याची काळजी घेत होतो. इथून पाण्याचा प्रवाह एका मोठ्या धबधब्यात रूपांतरीत होऊन शंभर एक फुटांवरून पूर्व कड्यावरून कोसळत होता, हा अतिशय धोकादायक टप्पा सगळ्यांनी एकमेकांच्या साथीने कमीत कमी जोखिम पत्कारत पार केला. पायर्‍यांच्या वळणावर पोहोचलो तेव्हा पाण्याचा प्रवाह कमालीचा क्षीण झालेला होता, तरी पायर्‍यांवरून अजूनही दिड फुट पाणी वेगाने वाहत होते. आम्ही एका मोठ्या संकटातून पार झालो होतो. आता पंधरा मिनीटात वनखात्याच्या चौकीवर पोहचून अर्ध्या तासात त्र्यंबक रस्त्यावर पोहचण्याचे सोपस्कर बाकी होते.



अंजनेरीच्या पूर्व बाजूच्या कड्यावर धबधब्यांच्या आणखी एका माळेने आमचे स्वागत केले. आता अंधार दाटणार होता, त्यामुळे तिथे फार न घुटमळता गाडीवाल्याला फोन लाऊन बोलाविण्यचा प्रयत्न केला. वारंवार फोन लाऊनही संपर्क होत नव्हता. खाली पोहोचल्यावर वनखात्याची चौकी निर्मनुष्य दिसली. तिथल्या उपहारगृहात कोणीच नव्हते. आज गडावर पावसाचा कहर असल्यामुळे कुणालाच जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती, असे समजले. आमच्या जीपवाल्याशी संपर्क होत नसल्याने आता परतीचा प्रश्न निर्माण होणार होता. अर्थात नाशिक त्र्यंबक मार्गावर परत जाण्यासाठी वाहन सहजपणे मिळू शकले असते. रस्त्यावर आल्यानंतर तसेच घडले. दोन गाड्यात आम्हाला जागा मिळाली आणि २८ किलो मिटरचा शेवटचा रस्त्याचा प्रवास करून घरी जाण्यासाठी आम्ही मोकळे झालो.



'कधी भाजून काढणारे उन तर कधी झोडपून काढणारा पाऊस', इरसाल घुमक्कडांच्या पेटार्‍यात हे वाक्य या ना त्या प्रकारे सापडतेच. आजवर कधी विचारच केला नव्हता, ट्रेकवर असताना आपल्याला कधी सर्वोच्च उन्हे कोणत्या भटकंतीवर लागलीत...सर्वोच्च थंडी बहिरीच्या मटीवरची की, रतनगडाच्या हात गोठविणार्‍या गारेगार जलाची. सर्वाधिक पाऊस कोणता, रायलिंगच्या पठारावर अंधारात छावणी उभारतानाचा? ब्रम्हगिरी प्रदक्षिणेत हरिहराच्य रडतोंडीवरचा की, चांदोली भैरवगडावरच्या वाटेवरचा? आजची भटकंती नक्कीच सर्वोच्च पावसाच्या भटकंतीत अग्रस्थानावरची होती.


---समाप्त---







2 comments:

  1. अतीशय रौद्र व भयानक पावसाचा थरार आपल्या ह्या लेखातुन अनुभवलाय.. 👌👌👌

    ReplyDelete
  2. अगदीच छान वर्णन, प्रशांत!
    मुंबईच्या एका ग्रुपबरोबर असाच पावसाच्याच दिवसात 'अंजनेरी' केलेला पण परतीच्या घाईमुळे फक्त सितागुहेपर्यंतच! त्यामुळं खास असा आस्वाद नाही घेता आला पण यातल्या अप्रतिम छायाचित्रांनी मात्र माझ्या अनेक वर्षा-भटकंती डोळ्यांसमोर तरळल्या! वाह, छानच!!
    😊👍

    ReplyDelete