Tuesday, July 2, 2019

डोंगर, किल्ले, धबधब्यांची भटकंती


बंदीचे बालंट टळले...आता सबुरीने घ्यावे!
डोंगर, किल्ले, धबधब्यांची भटकंती

किल्ले हरिहरवर जाण्यावर नियंत्रण आले आहे. खरे तर वनविभागाने बंदीच घातली होती, परंतू जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी वनखात्याशी चर्चा करून मध्यम मार्ग काढला आहे. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सकारात्मक पाऊल उचलले. आता आपली सगळ्यांची जबाबदारी राहील ती नियमांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची. 

आपली खासियतच आहे...आपण अनूभव घेतल्याशिवाय काही करत नाही. बुद्धीला पटले तरच निर्णय घेतो, अन्यथा आपलेच खरे मानतो. पावसाळी पर्यटन आणि स्वयंछाया प्रतिमा, अर्थात सेल्फीच्या नादापायी या सह्याद्रीने अतोनात जिवीत हानी बघितल्यानंतरच निसर्ग पर्यटनाला अकार देण्याचे प्रयत्न सुरू झालेत. उशिरा का होईना! अधिक जिवीतहानी टाळण्यासाठी हे महत्वाचेच. लोक खुप बेफाम वागले...आपला आनंद त्यांनी सर्वोच्च मानला. आपला खर्च वसूल करण्यासाठी गर्दीतही गडांवर जाण्याचे, धबधब्यांखाली डुंबण्याचे अट्टाहास पूरे करून घेतले. परिणामी प्रशासनाने अनेक ठिकाणे पर्यटकांसाठी बंद केलेत.


जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी २९ जुन रोजी जिल्ह्यतील सर्व प्रशासकीय यंत्रणेले गडकिल्ले व पर्यटकांच्या गर्दीच्या ठिकाणी गर्दीचे नियोजन करण्याची उपाय योजना तातडीने राबविण्याचे अध्यदेश काढले हाते. त्यानंतर सर्व यंत्रणा लागोलाक कामाला लागली तर नाशिक पश्चिम वनविभागाने हरिहरवर जाण्यास बंदीची घोषणा केली होती. वैनतेय गिर्यारोहण संस्थेने या बाबत सहानूभूतीने विचार करावा अशी विनंती केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी तसेच वनखात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी या मागणीचा मान ठेवला व बंदी ऐवजी परवानगी असा बदल केला. आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की, सरकारी अध्यदेशांचा मान ठेवायचा. शेवटी सुरक्षित पर्यटन, सुरक्षित भटकंती हाच सगळ्यांचा अंतिम उद्देश असतो व तोच असावा!

बंद केव्हाही शेवटचा पर्याय ठरतो, ती पाळी बेफाम, उद्धामपणे वागणार्‍यांमुळे महाराष्ट्राच्या निसर्ग पर्यटन क्षेत्रावर आली आहे. यात सगळ्या प्रकारात बदनाम झाले ते मात्र भटकंती किंवा ट्रेकिंगचे जग, जे खरे तर नियमात पक्के बांधलेले आहे, ज्यात सुरक्षा ही प्रधान आहे. डोंगर, वृक्ष आणि त्यातले जीव आणि माणूस यांच्या सुरक्षिसाठी पैसा व वेळेच्या अपव्यया कोणतीच किंमत नाही. माध्यमांनी प्रत्येक अपघात हा ट्रेकरचाच असतो, असेच गृहीत धरले व तशाच पद्धतीचे वार्तांकन केले. नोकरशाहीने तेच शब्द उचलून धरले...असो...

याउपर जर हरिहर किंवा अन्या कुठल्याही गडावर एक जरी मृत्यू हा गर्दीमुळे, सुरक्षेचे पूरसे उपाय न घेतल्यामुळे किंवा सेल्फी काढताना झाला तर मात्र बंदीची टांगती तरवार कोसळेल यात शंका नाही.
त्याची व्यप्ती मग किती मोठी असेल किती ठिकाणी कडक उपाय योजले जातील हे काही सांगता येणार नाही. त्यामुळे मुख्यत्वे पावसाळी पर्यटनासाठी बाहेर पडणार्‍यांनी जबाबदारीचे भान ठेऊन निसर्गाचा आणि सह्याद्रीच्या रौद्र सौंदर्याचा आनंद घ्यावा. त्याला गालबोट लागू देऊ नये.
यंदाच्या पावसाळी हंगामाच्या पहिल्या रविवारी म्हणजे २३ जुनला हरिहरवर  असे म्हणतात की, पन्नासहून अधिक गटांचे पर्यटक व काही ट्रेकर्स सहलीसाठी अथवा दुग्रभ्रमंतीसाठी गेले होते. खरे तर पावसाच्या सुरूवातीला गडांवर जाणे खासे धोकादायक ठरते. एक तर गरम खडकावर सुरूवातीचा पाऊस पडला की, दगड सुटतात, दरडी कोसळतात, वीजा कोसळण्याची तर हमखास शक्यता असते.


वीजांमुळे दरवर्षांप्रमाणे यंदा शेती परिसरात जिवीत हानी झाली आहे. डोंगरांवर ती कैक पटीने वाढते. असे असूनही लोक बेफिकीरपणे सुरक्षिततेच्या गोष्टींकडे दुलर्क्ष करत आहेत. रविवारी ३० जूनला पेब किल्ल्यावर एकच १०० जणांची बॅच होती, तर राजमाचीवर तीन हजारच्या आसपास लोक असल्याचे निरीक्षण ज्येष्ठ गिर्यारोहक वसंत  वसंत लिमये यांनी आजच्या महाराष्ट्र टाईम्सच्या लेखात नोंदविले आहे.

साहसी सहली आयोजित करणार्‍या काही मंडळींनी सामाजिक माध्यमांच्या मदतीने कुठल्या गडावर किती जण जात आहेत, याची ताजी आकडेवारी देण्याची पद्दत सरू केली आहे, ते एक प्रकारे खुप चांगले. त्यामुळे कुठल्या गडावर जास्त समूह जाणार नाही याची आयोजकांना माहिती मिळू शकते. अर्थात काही समूह या समूहा
सोबत जोडलेले नसतील तर नेमका आकडा मिळू शकणार नाही, अशा स्थितीत गडावर गेल्यानंतर तिथे प्रमाणाबाहेर गर्दी दिसते असे बघून तात्काळ आपल्या भटकंतीच्या योजनेत बदल करावा व दुसरे
ठिकाण निवडावे. जसे तुम्ही हरिहरला गेलात तिथे दहा पेक्षा जास्त समूह वर गेल्याची माहिती मिळाली तर तात्काळ भास्करगड किंवा उतवडला जावे किंवा ब्रम्हगिरी, वाघेरा, अंजनेरी, सासर्‍या या त्र्यंबकच्या घेर्‍यातल्या डोंगरांकडा जावे म्हणजे तुमचा भटकंतीचा दिवस वाया जाणार नाही आणि सुरक्षेचा कोणता प्रश्न निर्माण होणार नाही.
अगोदरच कमी मनुष्यबळ असलेल्या प्रशासनाचे काम जर वाढवले नाही तर भविष्यात तुमची भटकंती ही निर्धोक होण्यास मदत होईल. खरे तर पर्यटनाच्या सुविधा वाढविण्याच्या त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यातून निसर्गाचे संवर्धन होण्यासाठी साहसी पर्यटन क्षेत्रातील सगळ्याच घटकांनी काम केले किंवा सहकार्य केले तर आपल्या महाराष्ट्राच्या निसर्ग, साहसी दुर्ग पर्यटनाला चांगले रूप देता येऊ शकेल.

त्यासाठी सगळे हात एकत्र आले तर आपण जागतिक दर्जाचे पर्यटन नक्की निर्माण करू शकतो. दारू पिण्यासाठी आपल्याकडे बंदी नाही, त्यामुळे ती घरात किंवा हॉटेलात घेतलेलीच बरी डोंगरावर तुमचा स्वत:चा
जीव तर धोक्यात येतोच, शिवाय पर्यटन, भटकंतीचे क्षेत्र बदनाम होते.
तीच गोष्ट हल्लडबाजीची, जंगलसंपत्तीच्या नाशाची, केरकचरा पसरविण्याची. या सगळ्याची 'दक्षता घ्यावी', असे दुर्दैवाने सांगावे लागते, खरे तर या गोष्टी का सांगायला हव्यात? इतका तर आपला समाज शिकला सवरलेला आहे ना! तरी पण डोंगर, दर्‍या, नदया, खोरी बघितली तर ही समस्या गंभीर रूप धारण करून आहे हे जाणवते. त्यावर आपण कधी काम करणार आहोत. जगभरात आपली प्रतिमा ही बेदरकार, अस्वच्छ असू
राहू नये असे अनेकांना वाटते. ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जे लोक साहसी किंवा कोणत्याही सहलींचे आयोजन करतात त्यांनी कसोशिने पाकिटबंद, डबाबंद, पिशवीबंद पदार्थ टाळावे. बाटलीबंद पाण्या
इतका शरीराला कशाचाच धोका नाही, हे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे, त्यामुळे थोडे कष्ट सोसून आपले पदार्थ, आपले पाणी आपणच घरून आणले किंवा स्थानिकांकडून घेतले तर पर्यटन अधिक सुखकर, सुलभ आणि सर्वसमावेशक ठरेल.

वने आणि पर्यटन विभागाने तर पाकिटबंद, डबाबंद, पिशवीबंद पदार्थांवर बंदी आणावी, बाटलीबंद पाण्यावर बंदी आणावी, त्यामुळे स्थानिक पदार्थांना मागणी मिळेल व रोजगार, व्यवसाय संधीचे सर्व ठिकाणी समान वितरण होईल. जो जितकी चांगली सुविधा देईल, जितके शाश्वत पदार्थ सादर करेल, जितके भोजन निवासाची स्वच्छता ठेवील, त्याची चलती होऊन एक निकोप स्पर्धा वाढीस लागेल. मोठ्या उत्पादकांऐवजी समाजातल्या तळागाळात आणि दुर्गम भागातल्या रहिवाशांना त्यामुळे व्यवसाय मिळेल, हा लाभ केवढा मोठा असेल! शिवाय ताज्या पदार्थांचे जितके फायदे, तितकेच तोटे पाकिट, पिशवी, बाटली, डबाबंद पदार्थांचे आहेत, त्यामुळे लोकांच्या आरोग्याला त्याचा मोठा लाभ होईल.

शेवटी आपल्या सगळ्यांना निसर्गात रममाण व्हायला आवडते. निसर्गाची नानाविविध रूपे बघायला आवडतात. हिरव्या कंच डोंगरांचे नजारे आवडतात. डोंगरावरचा पाऊस आवडतो. त्याचा निकोप आनंद घेण्यातच खरी मजा आहे.
सरकारने जर काही डिजीटल यंत्रणा तयार केली तर कुठल्या ठिकाणी किती लोक जाणार आहेत. किंवा कुठल्या रस्त्यावर किती गाड्या गेल्यात. कुठल्या पर्यटन ठिकाणी पर्यटकांची आकडेवारी किती आहे याबद्दल सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी प्रयत्न करावे, कारण गर्दी एखाद्या ठिकाणी जास्त आहे की कमी, हे जर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून समजले तर अनेकांना आपल्या सहली, भटकंतीच्या योजानांमध्ये बदल करता येईल. त्यामुळे रस्त्यांरची वाहतूक खोळंबणार नाही व स्थानिक यंत्रणांवरचा ताण कमी होण्यास मदत होईल. अशा प्रकारे आपण सहलींची, निसर्ग पर्यटकांची गर्दी नियंत्रीत करू शकलो तर ती पर्यटनाच्या जागतिक नकाशावरची सुद्धा एक मोठी उपलब्धी ठरेल. यासाठी सरकारीच कशाला, काही खासगी समूह देखिल सॉफ्टवेअर बनविण्यासाठी प्रयत्न करू शकतात. त्यातून त्यांना देखिल व्यवसायाची किंवा सामाजिक सेवाची संधी रहील. 

No comments:

Post a Comment