भादव्याच्या उन्हात गौरीफुले रूसली
एखाद्या भटकंतीत कथा तरी किती उलगडाव्यात. ही ऐन भाद्रपदातली.२८ सप्टेंबर २०१९
अखेरच्या क्षणी ठरलेली. किल्ले विश्रामगड उर्फ पट्ट किल्ल्याची. आनंदाच्या शिखरावरून कडेलोटाकडे नेण्याच्या बेतातातली. कथा मृतप्राय तेरड्याची. आजवर नेहमीच हुलकावणी देणार्या पट्टागडाच्या खर्या वैभवाची. पायथ्या पासून माथ्या पर्यंत उर्जाभारीत गवत फुलांची. जणू कंच हिरव्या चादरीवर लक्षावधी पिवळ्या ठिपक्यांची. सर्वस्व लूटल्यानंतरही ताजं तजेलदार रहायचं कसं याचे मुर्तीमंत उदाहरण बनलेल्या पिकल्या पानाची. ध्यानी मनी नसतं ते घडतं त्याला अपघात का म्हणतात याच्या उलगड्याची.
रात्री उशिरा ठरलेल्या काही भटकंतीसारखाच आजचा दिवस. भटकंतीचा विषय होता, गौरीची फुले अर्थात तेरड्याचा बहर बघण्याचा. मागच्या पंधरवड्यात साल्हेरला अशीच अचानक भेट झाली तेव्हा सह्याद्रीचे छप्पर तेरड्याने कसे भरभरून ओसंडत होते हे बघायला मिळाले. काही सवंगड्यांनी रावळ्या जावळ्यावर सर्वात जास्त तेरडा फुलल्याची वार्ता पोहोचवली. मागच्याच महिन्यात तेरड्यांच्या अगणीत पुंजक्यांच्या बेटांनी सजलेला विश्रामगड बघितला होता. तोच रावळ्या जावळ्याची खबर? एक आख्खा डोंगरकडा संपुर्ण लालसर जांभळा रंगलेला. जावळ्याच्या कड्याचे ते छायाचित्र बघून डोळे विस्फारले होते.
फोनाफानी झाली. कोण येणार कोण नाही हे ठरले. संख्या दहाच्या आत राहणार हेही नक्की झाले. रावळ्या जावळ्यावर जाण्याचा मनसुबा पक्का झाला. पहाटे पाचला नाशिक सोडायचे. तासाभरात वणी गाठता येते. तिथून मुळाणबारी म्हणजे मोजून पंधरा ते वीस मिनीटांचा प्रवास. सूर्य कलण्याच्या दोन तास अगोदर दोन्ही किल्ल्यांची भटकंती आटोपून घटपुजेसाठी लवकर घरी परतता येईल. हिशोब सरळ होता.
पहाटे ५-०० वाजता नाही निघता येणार, ८-०० होतील. एका सवंगड्याच्या अडचणीने रावळ्या जावळ्याचे नियोजन क्षणार्धात धाराशाही झाले. त्यापेक्षा पट्टा करूया. प्रवासाचे अंतर जास्त आहे, पण चढण सोपी. तिथल्या कोवळ्या तेरडाचाही रूबाब रावळ्या जावळ्याच्या तोडीचा असेल. मग ठरले तर.
पट्टा गडावर आजवर बर्याच भेटी झाल्या आहेत. या भेटीत गौरी फुलांचे जांभळे, गुलाबी डोंगरकडे बघण्याशिवाय दुसरे काही प्रयोजन नव्हते. या हंगामात पट्ट्या इतका तेरडा अन्यत्र कुठेच नसावा. यंदा जुलैच्या महिन्यात झालेल्या भेटीत आकंठ फोफावलेला तेरडा बघायला मिळाला होता. तेव्हाच ठरवले होते, याचा बहर बघायचा! गणपतीच्या आसपास तो बहरतो त्यामुळे ऋषीपंचमीच्या बेताला पट्ट्यावर खास तेरडा भटकंतीसाठी जाण्याचा मनोदय होता. गणपतीत कोणाचा काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता त्यामुळे ऐन बहरातली भटकंती होता होता राहून गेली. एकतर हे पावसाळी झुडूप. त्याचा बहर पावसाळा संपताना संपुन जातो. यंदा पाऊस लांबल्यामुळे आम्ही नशिब आजमावण्याचे ठरवले. तिथला वाटाड्या भरत निसरडचा दूरभाष संपर्क होत नव्हता. पट्ट्यावरची नेमकी स्थिती समजत नव्हती. काही तरी वेगळे नक्की पहायला मिळेल. ही आशा मनात पक्की होती.
भाद्रपदात सगळा आसमंत हिरवा शालू पांघरलेला असतो. आकाश निरभ्र होऊ लागते. उन्हे दिसू लागतात. त्यांच्या उर्जेने असंख्य फुले उमलतात. फुलपाखरे, पक्षी, किटक अशी सृष्टी बहरात येते. दूरवरच्या डोंगररांगा न्याहाळता येतात. निळ्या आकाशावर पांढर्या ढगांचे डोंगरच्या डोंगर तयार होतात. मग ते एकमेकांशी स्पर्धा करतात. काही इकडून तिकडे तर काही विरोधी दिशेने येऊन आकाशतला हा खेळ भान हरपून बघायचा तो एखाद्या डोंगर परिसरातच.
२९ सप्टेंबर, रविवारची सुटी असल्यामुळे मला अधिकृतरित्या भटकंतीला जाण्यास घरातून आडकाठी येणार नव्हती. त्यातच सूर्य प्रसन्न झाला. सौभाग्यवतींनी सांगितले: जीव घाबराघुबरा होतोय. अन्न गोड लागत नाही. पाण्याची चव कळत नाही. पाठ आणि पाय तर सारखे दुखत आहेत. यापूर्वी शहरातल्या काही डॉक्टर्सचे उंबरठे झिजवून झाले होते, म्हटलं तुला मोठ्या डॉक्टरकडे घेऊन जातो.
शनिवारचा दिवस कामाचा कळस गाठणारा. रविवारच्या सुटीच्या अगोदरची कामे उरकायची असतात. त्यात आमच्या व्यवसायाचा हंगाम तोंडावरच आलेला. डोक्यावर कामांचा डोंगर उभा असताना भटकंती म्हणजे धाडसाचेच काम. पदरात अनपेक्षित दान पडावं तसं सौभाग्यतींच्या नव्याच आजाराचे दान पडले होते.
इथे येऊन थांबते...रस्ते बांधणी तंत्रज्ञान |
जायचे कसे?
काळी पिवळी करूया. त्यासाठी दहा ते बारा जण असावेत. आमचे सहाच जण होत होते. सुषमाने थार घेते असे सांगितले आणि मन थरारले. ट्रेकला कोणी थार घेणार असेल तर त्याला कधी नाही म्हणतात का? चारही चाके स्वतंत्रपणाने चालविण्याच्या तंत्रावर चालणार्या थार जीपने डोंगराचे अवघडात अवघड कडे चढता व उतरता येतात. भर नदीतून, चिखल ओहळीतून थार चालू शकते. हा लांभाश टाळणे शक्य नव्हते. तोच अमोल शिंदे सामिल झाले. आजवर त्याच्याशी केवळ गप्पा झाल्या होत्या. त्याचीही चारचाकी सज्ज होती. चार दोन गडी वाढले असते तरी गाड्यांचा बंदोबस्त झालेला होता.
सुषभा, विद्या, संगीता आणि डॉ. प्रिती या चार मैत्रिणी, अमोल शिंदे आणि परदेशी दाम्पत्य असा छोटा लवाजमा भल्या सकाळी मुंबई नाक्यावर नेहमीच्या किनारा हॉटेलजवळ जमणार होता. जाऊन बघतो तर काय, किनार्याचे नामोनिशाण नव्हते. इतकी वर्षे नाशिकची सांस्कृतीक ओळख बनलेले किनारा हॉटेल गेले कुठे. का मीच चुकलो. तिथे कुंपण दिसले. आत हिरवे शेत. एका बाजूला शेवाळलेला सिमेंटचा खांब पडलेला होता. त्यावर किनारा हे रंगवलेले नाव दिसले आणि खात्री पटली. आपण चुकलो नव्हतो. किनार्याचा काळ झाला होता.
नाशिकहून घोटी हे २१.४ मैल म्हणजे जवळपास ३४ किलो मिटरचे अंतर आमच्या थारने ४५ मिनीटात पार केले. वेग बेताचाच होता. आता परिक्षा सुरू झाली ती घोटी-शिर्डी मार्गाची. मुंबईहून शिर्डीला जाणार्या तसेच पुण्यास जाणार्या वाहतुकीचा या मार्गावर मोठा भार आहे. त्यातच स्थानिक वाहतूकीही बेसुमार वाढली आहे. ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा रस्ता बांधला ते इथल्या वातावरणात टिकणारे नाही, त्यामुळे थोड्याच काळात हा रस्ता जो खराब झाला तो दुरूस्त होण्याचे नावा घेईना. सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणने आहे की, सर्वोत्तम दर्जाच्या सिमेंट मिश्रणाचा वापर करूनही या रस्त्यावरचे खड्डे तग धरेनात, तेव्हा आता नव्या हरित तंत्रज्ञाचा वापर करून खड्डे भरण्यात येतील, त्यामुळे खड्डे लवकर उघडे पडणार नाहीत. अर्थात याचा मुहुर्त केव्हा उजाडणार.
भटकंतीसाठी अशी दणकट सोबत मिळणे भाग्याचे... |
हा प्रयोग करून पहावा
थार असल्यामुळेच घोटी-टाकेद हे चाळीस किलो मिटरचे अंतर पार करताना फारसा त्रास जाणवला नाही, तथापी प्रत्येक खड्ड्यातून गाडी नेताना मागच्या बाजुला बसणार्यांची हाडेनहाडे वाजत होती. थार सारखे अतिशय दमदार वाहन असूनही या मार्गाने परतायचे नाही, असा निर्धार अर्धा तासाच्या मारानंतर पक्का झाला. रस्ता म्हटले की, चार दोन खड्डे स्वाभाविक. इथे तर एक खड्डा चुकवला की दुसरा पुढ्यात येऊन उभा. पावसाच्या प्रदेशात डोंगराळ भागात आपण रस्ते बांधू शकत नाही, हे मान्य करायला हवे. त्या ऐवजी रस्ते हे कच्चे मातीचे ठेवले तर वाहनांची आदळ आपट कमी होईल. त्यांचा घसारा फार होणार नाही. प्रवास करणार्यांना मोठमोठे दणके बसणार नाहीत. उलटपक्षी वाहतुकीचा वेग वाढू शकेल. किमान पाऊस नसेल तेव्हा तरी अशा कच्चा रस्त्यांचा लाभ हा खड्डे युक्त रस्तत्यांच्या तुलनेत कितीतरी मोठा असेल. हळूहळू हे कच्चे रस्ते मग रूळतील. चांगले मळतील. शेकडो टन वाहतूकीच्या वजनात तेही मग पक्के बनतील. हा कमी खर्चाचा पर्याय आजमावून बघावा का? अतिश्योक्ती नाही, हे सत्य आहे. आम्ही महाराष्ट्राच्या विविध भागात राष्ट्रीय कार रॅली अजिंक्यपदाचे आयोजन करताना सर्वाधिक प्राधान्य पूर्णकच्च्या रस्त्यांना देतो. डोंगराळ, घाटांच्या मार्गावरून अतिशय वेगवान व साहसी गाडी दौडविणार्या स्पर्धकांची पसंती ही डांबरी रस्त्यापेक्षा कच्चा रस्त्याला असते. जागतिक कार रॅली अंजिंक्यपद स्पर्धा तर केवळ आणि केवळ कच्च्या रस्त्यांवरून आयोजित केली जाते.
करंजी नदीच्या किनार्यावर जुन्या पद्धतीने दगड काढण्यात आल्याच्या खुणा ... |
स्वच्छ सुंदर खळाळती करंजी
वाटेत चहा नाश्ता घेण्यासाठी थांबायचे नाही असे नियोजन केले होते. सोबत पुरेसा नाश्ता घरून बनवून घेतला होता. टाकेद ओलांडून म्हैसवळण घाटाच्या सुरूवातीला बितंग्यावरून येणार्या करंजी नदीचा खळाळता शुभ्र प्रवाह पुढे जाऊ देईना. नदीकाठच्या खडकावर सकाळच्या उन्हात न्याहारी घेण्यासाठी याहून अधिक चांगली जागा असूच शकत नव्हती. या ठिकाणहून जुन्या पद्दतीने दगड काढल्याच्या खुणा दिसत होत्या. जवळच टाकेदचे रामायण कालिन जटायू मंदिर असल्याने करंजी काठचा दगड त्याकरिता वापरला गेला असण्याची शक्यता आहे. इथून दगड अतिशय योजनाबद्द पद्धतीने बरोबर चौकानात कापून नेला आहे. काय तंत्रज्ञान असेल त्यावेळचे. ना कुठल्या यंत्राचा वापर ना विस्फोटकांचा. आश्चर्य याचे की, इतका कमी दगड का काढला असेल. की नंतरच्या टप्प्यात एखाद्या लहान कामासाठी इथून दगड काढून नेला असेल.
याठिकाणी नदी काठी घाण अजिबात नव्हती. गावालगत नदीकाठी सहसा केशवपन करण्याची जागा दिसते. निसर्गरम्य ठिकाण म्हणून लोक फिरायला येतात व कचरारूपी खुणा ठेवून जातात. इथे यापैकी काहीच नव्हते. अशी छान स्वच्छता ठेवण्याची बुद्धी केवढी चांगली गोष्ट.
म्हैसवळण घाट टाकेद बुद्रूकवरून |
म्हैसवळण घाट
लहानसा म्हैसवळण घाट चढत असताना पश्चिमेला इगतपूरी-अंजनेरी-त्र्यंबकेश्वरची डोंगररांग सुस्पष्ट दिसत होती. निळ्या आकाशावर पांढरे ढगांचे पुंजके आणि त्यातून डोंकावणारे असंख्य परिचीत असे डोंगर. अगदी सूदूरचा उतवड्या सुद्धा ओळखू येत होता. त्र्यंबक रांगेतला हा सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात उंचा असा किल्ला.
घाटातल्या नाना कलांनी नटलेल्या हिरवाईतून या डोंगरांगांचे दर्शन वेड लावणारे होते. एकेठिकाणी गायवाटांची हिरवी नक्षी लक्षवेधी ठरत होती. हिरव्या कंच पार्श्वभूमीवर इवलीशी पिवळी फुले कुण्या चित्रकाराने हलके पिवळे शिंतोडे उडवल्यागत भासत होती. थोडे पुढे गेल्यावर लक्षात आले की, हिरव्या मखमली डोंगरकड्यांवर शेकड्यांनी पिवळे गवतफुलांचे पुंजकेच्या पुंजके बहरले आहेत. आम्ही आलो होतो तेरड्याचा बहर बघायला. या पिवळ्या ठिपक्यांनी हा वेगळाच अनपेक्षित लाभ मिळवून दिले. काही ठिकाणी ही पिवळी फुले इतकी अधिक होती की, त्यामुळे गच्च हिरव्या डोंगरकड्यांना पिवळी छटा आल्यागत भासत होते.
हिरवी मखमली गावयाटांची नक्षी |
चकाकणारे हे पिवळे ठिपके आता आम्हाला अडकवू पाहत होते. त्यात अडकायचे नाही, आपले उद्दीष्ट आहे तेरड्याचा जांभळा बहर आणि तोही पट्टा उर्फ विश्रामगडावर. वेळ न दवडता, एक दोन ठिकाणी थांबलो ते पुरे असे मनाला बजावत आम्ही जसजसे पुढे जात होतो, तसतशी पिवळ्या गवतफुलांची नक्षी बदलत होती. काही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा त्यांची जणू रांगोळी पसरली होती. आमच्या स्वागतासाठी निसर्ग असा सजून सज्ज होता आणि आम्ही मात्र त्याला टाळून पुढे जाण्याचा विचार करत होतो.
सुमन आजी: त्या बोलायला लागल्या की पाय निघता निघत नाही... |
चैतन्याचा खळाळता झरा
सगळेच अनूभवी भटके असले तरी सोबत महिला मंडळ असल्यामुळे स्वैर स्वंच्छंदी भटकंतीचा विचार सुद्धा मनात नव्हता. अंधार दाटण्याच्या आत घरी परतायचे हे उद्दीष्ट ठरविण्यात आल्याने त्या स्वागत सोहळ्याकडे चक्क कानाडोळा करून आम्ही पट्टेवाडी गाठली. तिथे सुरूवातीलाच असलेल्या भरत निसरड यांच्या घरात आवाज दिला तर भरत चक्क हजर दिसला. दोघींना उपवास असल्याने त्याला पाच जणांचे जेवण बनवून ठेवायला सांगून आम्ही विश्रामगडाचा पायथा गाठला. समोर चैतन्याचा खळाळता झरा हजरच होता.
सुमन महादू जाधव यांनी बरोबर ओळखले, 'मागच्यावेळी तुम्ही त्या झाडाखाली फोटू काढत व्हता. लई छान वाटलेरे पोरांना परत आला, जा...वर जाऊन या..माकडं थोडा तरास देशाल...पन तुम्ही घाबरू नका...जा सांभाळून जा...'
असा जा...जा...सांगणार्या सुमन आजींचे बोलणे थोडेच थांबते. त्यांच्या चेहर्यावरचे चैतन्य थोडेच कमी होते. पुन्हा माघारी आल्या आणि एक छानसा रामकथेतला प्रसंग त्यांनी रसभरल्या गाण्यातुन उलगडला. अंजनेरी, आजोबा, हरिश्चंद्रगड अशा सगळ्या टापूत इथल्या मुळनिवासींच्या गाण्यात रामायणाच्या कथा झळकल्याचे वेगवेगळ्या भटकंतीत अनूभवायला मिळाले आहे. रामायणाचा या भागाशी फार जुना संबंध असावा याचे ते द्योतक. अन्यथा या परिसरात रामकथा फारशा होत नाहीत. यांना रामायण कोणी शिकवत नाही. ते तर त्यांच्या रक्तातच. पिढ्यान पिढ्यांचे संस्कार.
पिढीजात ही गाणी त्यांच्या सोबत आली आहेत याची प्रचिती येते. सुमन आजींच्या गाण्यात आवंढा, पट्टा ही किल्ल्यांची नावे आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे कथन ऐकून अंगभर शहरे उठत होते. दहा एक मिनीटे खिळवून ठेवल्यानंतर त्यांनी आम्हाला जाऊ दिले.
गड चढतानाच जाणवत होते, तेरडा जळालाय...भादव्या पर्यंत त्यांची जीवनक्रमणा तशीही संपायला येते... |
तेरडा अनं निराशा
वनखात्याची माणशी ५/-रूपये प्रवेश रक्कम भरली. पुस्तकात नाव गाव गाडी दुरध्वनी क्रमांक लिहून आम्ही लागोलाग गड चढू लागलो. गड हिरवा कंच दिसत होता, पण हे काय? तेरड्याने फुललेल्या कड्यांचे काय झाले. कड्यांच्या जांभळ्या गुलाबी छटा का दिसत नव्हत्या. काही मिटर चालल्याबरोबरच आपला कालक्रम पुर्णकरून अर्धामुर्धा कोमेजलेला तेरडा, तुम्ही अंमळ उशिर केला असे ओरडून सांगत होता. या डोंगरावर सर्वत्र इतका भरभरून उगवलेला तेरडा ऐन बहरात डोंगराचे काय सुंदर रूप सजवत असेल. केवळ कल्पनेतच हे चित्र उभे केले जाऊ शकत होते. ज्यासाठी आलो, तो तेरड्याचा बहर संपलेला होता. आता पुढ्यात काय राहील? निराशा?
तेरडा...गौरी फुले म्हणजे लढण्याचे प्रतिक...सौंदर्याचे प्रतिक...सह्याद्रीचा मान! |
वरच्या टप्प्यावर पट्टाई देवीचे मंदिर बघून मन पुन्हा एकवार हिरमुसलो. प्रत्येक भेटीत मंदिराचे हे रूप डोकं चक्रावणार हे नक्की. गडावरचे मुळ दगडातले मंदिर पाडून भडक रंगातले, सिमेंट कॉंक्रिटमध्ये तयार केलेले हे आजच्या पद्धतीतलेमंदिर. त्याच्या तळाच्या चकाकणार्या लाद्या गडाच्या प्राचीन सौदर्याशी आंणि इथल्या एकुणच निसर्गाशी कुठेच मेळ साधत नव्हत्या. देवीच्या जुन्या शेंदूर चर्चित मुर्ती बाजुला बसवून नविन सिमेंट कॉंक्रिटच्या मुर्ती बसविण्यात आल्या आहेत. त्यांना अर्थातच ऑईल पेंटचे रंग. नाही म्हणायला त्र्यंबक दरवाजा जवळ थोडा वेळ रेंगाळलो आणि आम्ही राणी महाल नावाने ओळखल्या जाणार्या वरच्या टप्प्याकडे प्रस्थान केले.
गवताचा वाळेक्या पिसार्याच्या लाटा...त्याची मोत्यांमखमलाची झळाळी खिळवून ठेवत होती... |
गवत लाटा...
तिथे बसवलेल्या लोखंडी नळकांड्यांच्या कठड्यांचे कोडकौतूक करत असताना समोरचे दृष्य खिळवून ठेवणारे होते. तेरडा संपला होता. त्याजागी उगवलेल्या गवताला सुकलेला करड्या रंगाचा मोहोर दिसत होता. वार्याच्या सोबत हा मोहोर लाटांसारखा भासत होता. अक्षरश: मखमली लाटा. क्षणाक्षणाला रंग बदलणार्या. रंगही साधे सुधे नाही. मोत्यांच्या सारखे. हाय रामा! हे केवढे सुंदर आहे. तेरडा नाही तर त्याच्या जागी पिवळी गवत फुले आणि आता ह्या गवताच्या मोतीदार छटांच्या मनोहारी लाटांनी आजची भटकंती सार्थकी लावली.
राणी महालाचा जुना बाज संपल्यात जमा आहे. याठिकाणी एक नव्हे तर दोन दोन मेघडंबरी बसविण्यात आली आहे. एक बाहेर तर दुसरी आत. आतिल भागातल्या मेघडंबरी समोर शिवराज्यभिषेकाचे दृष्य वेगवेगळ्या फायबरच्या पुतळ्यांनी साकारले आहे. शिवाजी राजांच्या दरबाराचा देखावा एका चिंचोळ्या जागात कुलुपात बंद अवस्थेत.
राणी महालाच्या भोवताली सर्वत्र तेरडा फुलेला. या संपुर्ण परिसराला जाळीचे कुंपण बसविण्या आले आहे. कुणाच्या डोक्यातून ही आईडियाची कल्पना आली असेल? येथे
फार काळ न रेंगाळता आम्ही शिखराच्या दिशेने कुच केली. शिखराच्या खालच्या भागात विस्तृत पठार सुंदर विविधरंगी फुलांनी बहरले होते. हिरव्या मखमली शिखरावर ढगांचा हलका मुकुट धरला होता. त्याच्या थोड्या भागावरच सूर्याची किरणे दिसत होती. हे दृष्य अनोखे. बराच वेळ खिळंवून ठेवणारे.
अबब ६ फुटी तेरडा
थेट शिखराकडे न जाता वाटेतले दोन तलाव, पुरातन टाकी आणि त्यांना सजवणारी फुले असा आमचा स्वर्गीय प्रवास सुरू होता. पहिल्या गुहेकडे जाताना तेरडा पुरूष सहज बुडेल असा साडे सहा सात फुट उंचीचा लागला. तेरड्याचे अभ्यासक तो तीन चार फुट वाढतो असे सांगतात. इथेही अफाट उंची चक्रावणारी. त्याचा बहर संपलेला. त्याची उंची हाच कौतुकाचा विषय.
अस्वच्छ लेणी
इथून औंढ्याच्या दिशेने चालत गेल्यावर दुसरी कातळ खोदीव गुहा लागते. या गुहेच्या वाटा अद्याप मळलेल्या नव्हत्या. आमच्या जाण्याने वाटा मळणार होत्या. त्याकरिता पावला इतके गवत तुडवणे हे आलेच. मन कचरत होते. पण पाऊस संपण्याच्या बेतात असल्याने लोकांची येथे ये-जा वाढेल तशा या वाटा अधिक ठळक होतील. आम्ही मुद्दाम छायाचित्र घेण्यासाठी किंवा जवळचा मार्ग काढण्यासाठी गवत वा फुलांचे ताटवे तुडवले जाणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेत होतो. त्यात खरे तर अधिक समाधान होते. या दुसर्या विशाल लेणीमध्ये काही भूमिगत धान्य कोठारे दिसत होती. या लेणीत माणसांच्या सोबत कठिण हवामानात जनावारेही बांधली जात असावीत. कदाचित घोडे. दगडात तशा खाचा आढळतात.
लेणी अर्थातच कमालीच्या अस्वच्छ. तिथली घाण साफ करणारी कुठलीच यंत्रणा आजच्या महाराष्ट्रात नाही. येथे ट्रेकर मंडळींचा फार राबता नाही. शासकीय पातळीवर तर तसे कोणतेच प्रयत्न कुठल्याच गडावर बघायला मिळत नाही, ते इथे कसे मिळणार. गडविकास निधी फायबर, सिेंमेंट कॉंक्रिटचे काम करण्यावर. तिथे अल्पजिवी ठरणारे आणि एकुण गडसौंदर्याला बाधा पोहचविणारे लोखंडा नळकांड्यांचे कठडे लावण्यापेक्षा लेणी, गुहा, मंदिरे स्वच्छ करण्यावर केला जाऊ शकतो. गडाच्या वाटा आजच्या बांधकाम पद्धतीने बांधून न काढता तिथलेच लहान दगड दुतर्फा बसविले आणि चिखल, माती, खाचा दगडगोट्यांनी बुजविल्यातर प्रचलित मार्गावरच्या छान पायवाटा तयार होऊ शकतील. त्यामुळे लोक गडफेरी करताना चुकणार नाहीत. गवत फुलांचे ताटवे तुडविले जाणार नाहीत आणि हे सगळे लाभ अत्यल्प पैशात मिळविले जाऊ शकतील.
बारा टाक्यांची हिरवी ऐट! |
बारा टाके
आता बारा टाके शोधण्याचे आव्हान होते. त्यासाठी दाट गवतात पुसट झालेल्या जुन्या पाऊलवाटा शोधत एकदाच्या बारा टाक्या गाठल्या. येथे निळ्या, पांढर्या फुलांसोबत टोपली कारवीचे गच्च दाट ताटवे दिसत होते. बारा टाक्यांच्या शेवटच्या भागातली गुहा अशीच गच्च दाट गवत, कारवीने बहरली होती. इथून दूरवर आवंढा किल्ला दिस होता. त्याच्या मधोमध एक जुनी भिंत. आजवर कुठल्याच भेटीत ही भिंत बघण्याचा योग आला नव्हता तो आज साधण्याचा निर्धार केला. आव्हान अर्थातच वाटा शोधण्याचे. अधून मधून दाटणार्या ढगातून आणि निसरडड्या वाटांतून चालत जाण्याचे होते. समोरचे कित्येक पिवळ्याफुलांचे ताटवे तिथे जाण्याचे अमिष बनून उभे होते. अर्थात औढा किल्ल्याचे विशाल रूप तिथून अधिक चांगले निरखता येणार होते.
बारा टाक्यांपासून तटाची भिंत बरीच लांब दिसत होती. औढा आणि पट्टा यांच्यात एखादी दरी असावी आणि त्यावर पट्ट्यांची स्वतंत्र संरक्षण सज्जता म्हणून ही भिंत उभी केली असावी असे या ठिकाणहून भासत होते. या मोसमात या वाटेवरून कोणीच गेले नव्हते. त्यामुळे गच्च दाट गवतातून पुसटशा पाउलवाटा शोधताना चांगली कसरत होत होती. जसजसे पुढे जात होतो, तसतसा औढा किल्ला अधिक मोठा भासत होता. उन्हं अधूनमधून डोकावून जात होती. त्यांच्या लखलखाटात पिवळ्या फुलांचा बहर अधिकच सुखावत होता. आकाश निरभ्र असले तरी सगळ्या डांगरांचे माथे ढगांचे मुकुट धारण करून होते. त्यामुळे बितनगड, कळसुबाइ, अलंग-मदन-कुलंग, दूरवरचे हरिश्चंद्र-तारामती आदी कुठलेच डोंगर ओळखण्याची संधी मिळत नव्हती.
दिल्ली दरवाजा...मुगलाईतले नाव...आपल्या राजवटीत याचे नाव काय असेल! |
दिल्ली दरवाजा
तटाची भलीमोठी भिंत आता अदृष्य झाली होती. उत्तर बाजूचा कडा उतरताना अचानक भिंत दृष्टीस पडली. आम्ही ती ओलांडून त्याच्या पुढच्या बाजूला आलो होतो. तटाचे दोन बुरूज आणि त्यामध्ये दरवाजाचे भग्नावशेष. हाच तो दिल्ली दरवाजा. येथे पाण्याचे मोठे टाके दृष्टीस पडले. नेहमी पर्यटकांच्या गर्दीपासून दूर असणारा हा परिसर निर्जन आणि तितकाच जुन्या काळाशी नाते सांगणारा. या तटाच्या दरीकडच्या टोकाच्या बुरजा पर्यंत जाऊन आमची भटकंती खर्या अर्थाने सार्थकी लागली.
या गडाचा इतिहास बहामनी, निझाम, आदिलशाही, मोगल, मराठे, पेशवे, इंग्रज असा वेगवेगळ्या राजवटींशी जोडला जातो. बहामनींच्या अगोदर गडाला मोठा इतिहास असावा हे इथल्या नक्षीदार भग्न मंदिराच्या अवशेषांवरून वाटते. त्याकरिता गडविकासाची निम्मा अधिक निधी हा गडावर उत्खनन व अभ्यासकांना ऐसिहासिक संशोधनासाठी उपलब्ध करून द्यायला हवा. म्हणजे कळेल हा गड पडक्या तटाभिंतींची बिन इतिहासाची वास्तू नाही. याचा इतिहास तर भारताच्या सुवर्णकाळाशी नाते सांगणारा.
दिल्ली दरवाजाचे तट कललेत...पण त्यांची मजबूती जमिन पकडूनच...काय अजोड बांधकाम! |
घड्याळात दिड वाजले होते. परतीची नवी वाट शोधायची होती. खाली कड्यालगतचा निसरडा रस्ता टाळण्यासाठी एक छोटीशी चढण पार करून पुन्हा वरच्या पठारावरून वाटेचा शोध सुरू केला. पिवळ्या गवत फुलांच्या ताटव्यातून एक मोठा टप्पा पार करायचा होता. शिखरमाथा जवळच असूनही वेळेअभावी तो गाठता येणार नव्हता. या मार्गावर आणखी एक जुने कातळातले पाण्याचे टाके लागले. त्याच्या पुढे दगडात अनेक गोल छिद्रे मुद्दाम कोरल्यासारखी भासत होती. त्यात साठलेले पाणी आरसपानी भासत होते. जणू काही कोणी तरी मुद्दाम त्यात फुल झाडे लावली होती. निळ्या मंजिरी सारखी शेकडो मंद लाल गुलाबी फुले या छिद्रातल्या लहाल कुंड्या सजवित होते.
एक मोठा फेरा पार करून पायथ्याला वाहन तळ गाठले. तिथे सुमन आजींचे आणखी एक पौराणिक गाणे. पंधरा एक मिनीटे गप्पा झाल्यावर त्यांनी पायथ्याला असलेली शिवकालीन विहीर, शिवमंदिर बघून घ्या असे सूचविले. तु्म्हाला निंबाळकरांची समाधी सापडणार नाही. गाडी नेणार असाल तर ती तिथे वळवता येईल का याचा विचार करा अशा सूचना दिल्या. मागे एक कार विहिरीच्या परिसरात अडकल्याचे त्यांनी सांगितले.
शिवकालीन बारव...कथितरित्या जिर्णोद्धार केलेले! |
अपघात
निर्जन एकांतातले भग्न शिवमंदिर आणि त्याच्या थोडे पुढे शिवकालिन विहीर छानशा भटकंतीचा आदर्शवत समारोप ठरल्या. येथे रस्ता संपतो. चारचाकी गाडी वळून घेणे तसे जिकिरीचे काम. आमची थार जीप असल्याने अशा कामात तरबेज असल्याने चिंता अशी नव्हती. थोडे खाली उतरून निंबाळकरांच्या समाधीचा अदमास लागतो का याची चाचपणी करत असताना वरून गलका एैकु आला. एक मोठा दगड उडून अमोलच्या दोन्ही पायांच्या नळ्यांना चाटून गेला. त्याला बरेच खरचटले.
झाले असे की, रस्ता सोडून कच्च्या उतारावर सुषमा काळजीपूर्वक जीप वळवत होती. चिखल मातीमुळे मागचे एक चाक वेगात फिरत होते. त्याने सगळी माती उडविल्यामुळे चाकाला पुढे जाण्यासाठी आधार मिळत नव्हता. गियर बदलताना गाडी मागे येत होती. तोच आमच्यापैकी कोणी तरी एक मोठा दगड लाऊन गाडीची घसरण थांबविण्याचा प्रयत्न केला. सुषमाला त्यांनी तसे सांगितले. पण सुषमा पर्यंत तो आवाज पोहोचला नसावा. तिने काळजी करू नका, असे सांगिलते. फोर व्हिलच्या गियरवर गाडी सहज वर येईल याचा तिला विश्वास होता. सुषमा म्हणजे नाशिकची पहिली प्रशिक्षीत गिर्यारोहक. अनेक सुळके, कातळ भिंती सर केलेल्या. गिर्यारोहणात सर्व प्रकारच्या सुरक्षेचे महत्व तिला पक्के ठाऊक.
फोर व्हिलचे गियर टाकल्यावर गाडीची खेचण्याची ताकद कैकपट वाढते. त्यामुळे तो पाच एक किलो वजनाचा भलामोठा दगड अचानकपणे हवेत उडऊन मागच्या बाजुस उभ्या असलेल्या अमोलच्या पायाच्या दिशेने उडाला. नशिब बलवत्तर की केवळ खरचटण्यावर निभावले. दगड मोठा असल्याने फार उडाला नाही, छोटा असतर तर? वर्मी बसला असता तर? अशा विचारांनी संकट थोडक्यात टळल्याचा सार्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. कल्पना करा, दगड थोडा छोटा असता...तो अधिक वर उडाला असता तर? परिणाम काय घडले असते? कल्पना शहारे आणणारी होती. अनवधानाने घडलेली असली तरी ती चुक आम्हाला भारी पडली असती. प्रत्येक जण चांगल्या भावनेतूनच खटपट करत होता. अशा खटपटी जीवावर बेतू शकतात याची कुणाल काहीच कल्पना नव्हती. कच्चा उतारावर गाडी वळविणे हा महत्वाचा भाग असतो. थार असल्याने निश्चींत होऊन चालणार नव्हते. आम्ही सगळ्यांनी अगोदर गाडी वळविण्याचे नीट नियोजन करायला हवे होते. एक छोटासा प्रश्न मोठे रूप घ्यायला वेळ लागत नाही. समाधीचा शोध नंतरही घेता आला असता. आमचा हा अनूभव कथन करण्याचा उद्देश एकच, भटकंतीवर असताना लहान लहान गोष्टीबद्दल काळजी घेण्याची आवश्यकता असते. गाफिल राहून चालत नाही. अपघात हा अपघातच असतो. तो काही सांगून येत नाही. महत्वाचे सोपस्कर पार पाडूनच भटकंती व्हायला हवी. सुरक्षिततेत कसूर काहीच कामाचा नाही. तुम्हीही भटकंतीच्या वेळी येणार्या कटू आठवणी कथन करत जा. त्यामुळे मागच्यांना सावध होता येते.
काही मार्ग :
१. नाशिक - सिन्नर - डुबेरे - ठाणगाव - पट्टेवाडी
२. नाशिक - देवळाली - भगूर - लहवीत - शेणीत - साकुरे फाटा - टाकेद बुद्रुक - पट्टेवाडी
३. नाशिक - वाडीवर्हे - अस्वली - साकुरे फाटा - पट्टेवाडी
४. नाशिक - घोटी - (घोटी - शिर्डी मार्गाने) धामणगाव - भंडारदरावडी
५. नाशिक - देवळाली - भगूर - पांढूर्ली - शिवडे - सोनांबे - आडवाडी - हिवारे - पट्टेवाडी
६. नाशिक - देवळाली - भगूर - पांढूर्ली - घोटी-शिर्डी रस्त्याने बेलू फाटा - बेलू - निनावी - भंडारदरावाडी फाटा - अडसरे - टाकेद बुद्रूक (टाकूद टाळून थेट घाटाकडे कच्च्या रस्त्याने - म्हैसवळण घाट - पट्टेवाडी
तेरडा
तेरडा ही वनस्पती बाल्समिनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव इंपॅटिएन्स बाल्समिना आहे. ती मूळची दक्षिण आशियाच्या भारत आणि म्यानमार देशांतील असून जगभर इंपॅटिएन्स प्रजातीच्या ८५०-१००० जाती आहेत. भारतात या प्रजातीतील सु.१५० जाती आढळतात. ही वनस्पती समुद्रसपाटीपासून सु.१५०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात, वनांमध्ये झाडाझुडपांच्या खाली वाढलेली आढळते. महाराष्ट्रात ही पश्चिम घाट, कोकण व दख्खनच्या पठारी भागांत वाढलेली आढळते.
तेरडा ही ३०-९० सेंमी. उंच वाढते. खोड मांसल असून फांद्या आखूड असतात. पाने साधी, सु.१५ सेंमी. लांब व भाल्यासारखी निमुळती असतात. पानांची मांडणी सर्पिलाकार व कडा दंतूर असून त्यांच्या देठावर ग्रंथी असतात. फुले गुलाबी, एकाकी किंवा झुबक्यांनी पानांच्या बगलेत येतात. मात्र फुलांचे जांभळट, फिकट गुलाबी, तांबडे किंवा पांढरे असे प्रकारही असतात. परागण कीटकांमार्फत व पक्ष्यांमार्फत होते. बोंडे सु. एक सेंमी. जाड व लवदार असून त्यांना स्पर्श झाल्यास ती तडकून फुटतात. तेरड्याच्या पानांत नॅफ्थॅक्विनोन, लॉसोन व लॉसोन मिथिल ईथर असे मुख्य क्रियाशील घटक असतात. बियांमध्ये कॅम्फेरॉल (फ्लॅवनॉइड) हा मुख्य घटक असतो. काही देशांत मेंदीप्रमाणे तेरड्याच्या पानांनी व फुलांनी हात व नखे रंगवितात. फुले थंडावा देणारी असून ती भाजलेल्या जागी लावतात. आशियातील काही देशांत ही वनस्पती संधिवात, अस्थिभंग आणि बद्धकोष्ठता इत्यादी विकारांवर वापरतात. बियांपासून मिळणारे हिरवट व चिकट तेल स्वयंपाकात व दिव्यासाठी वापरतात. महाराष्ट्रात गौरीगणपतीच्या सणाला पूजेकरिता तेरड्याची पानेफुले वाहतात. म्हणून तेरड्याला गौरीची फुले असेही म्हणतात.
लेखक -खोत, सुधाकर सं.
स्त्रोत: कुमार विश्वकोश
This is Google's cache of
आपली विशिष्ट प्रतिभा जपून ठेवणारे एक फुलझाड म्हणजे तेरडा.
सिमेंटने भरलेल्या दर्जा |
त्र्यंबकदरवाजाच्या वाटेवरचे भग्न शिवमंदिर आजही अमिश शांततेची अनूभूती... |
पट्टाई देवीचे जुने मंदिर पाडून त्याजागी उभे राहिले सिमेंटचे मंदिर... |
म्हैसवळण घाटातून इगतपुरी अंजनेरी त्र्यंबकेश्वरच्या डोंगरांगांचे सुस्पष्ट दर्शन घडविण्यासाठी प्रसन्न झालेला सूर्यदेव |
तेरडा पाच सहा फुटांचा... |
तेरडा कार्वी सारखा पठार कडे व्यापून... |
तेरड्या सोबत कुर्डुचे बेट... |
बाजुला पट्टाईच्या जुन्या मुर्ती...मधोमध सिमेंटमध्ये घडविलेल्या नव्या मुर्ती... |
औढा...मधोमध दिल्ली दरवाजाचे तट... |
हा कोण माळी...जो गडावर पाषाणात कित्येक गोल खड्डे खोदतो...त्यात पाणी भरतो आणि आकंठ फुले फुलवतो |
पिवळ्या गवतफुलांचीच सद्दी... |
दिल्ली दरवाजा पर्यंत केलेली पायपीट अशा फुलांच्या वाटांमुळे सूसह्य! |
बांधकामाचे सुंदर व अचूक नियोजन...दिल्ली दरवाजाचे तटाचे बांधकाम अवघड कड्यावर केलेत... |
शेकडो वर्षे उलटूनही आपला सुबक बांधणीचा बाज मिरवणारी तटाची भिंत... |
औढ्याच्या बाजूने दिल्ली दरवाजातून पट्ट्यात प्रवेश... |
औढ्याला जोडणारे पट्टा गडाचे पठार...जुने टाके |
अधून मधून ढग बाजूला सारून सूर्य या गवत फुलांना हसवत होता... |
पट्ट्याचे शिखर ओलांडताच औढ्याचा सुंदर नजारा... |
या गवतफुलांसाठीच तेरड्याने वाट करून दिली नसावी ना! |
बारा टाकी परिसरात टोपली कारवाईचे गुच्छे! |
हिरवाईच्या कित्येक छटा...त्यातून उलगडल्या वाटा... |
टाक्यातही रंगाचा खेळ कधी पांढरे...कधी आकाशी...कधी हिरवे तर कधी राखाडी प्रतिबिंब... |
तेरडा कुर्डुची दिलजमाई... |
हताश: तेरड्याचा बहर बघण्यासाठी थोडा उशिरच झाला... |
जुगलबंदी: सीतेच्या आसवांची गवत फुलांशी... |
सीतेची आसवे याच पठारावर टपकली असतील... |
कोणी तरी प्रकाश चमकवत होतं...शिखराचे दर्शन थोडं थोडं घडवत होतं... |
भाद्रपदाच्या हिरवाईला निळ्या नभाची छटा...त्यावर पांढर्या मेघांच्या लाटा |
वाटलं होतं दिसेल हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला... |
फायबरमध्ये बनवलेला महादरवाजा |
त्र्यंबकदरवाजा |
Awesome, the words are binded so well👍👌
ReplyDelete