Friday, November 8, 2019

chaulher fort


महराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला साल्हेरचा पहारेकरी.  अनेक शतके खानदेशच्या राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू असलेल्या मयूरगिरी व त्याची दोन भावंडं मोरगिरी, हरगड या दुर्ग त्रिकुटा समोर अविचल उभा, चार व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवतो, त्यावरून विशेष असे नामाभिधान लाभलेला, देवगिरीच्या जगप्रसिद्ध अंधारीशी नाते सांगणारे पाच दरवाजांचे भुयारी महाद्वार लाभलेच्या किल्ले चौल्हेरची भटकंती म्हणजे अनेक भेटवस्तू ठासून भरलेला पेटारा...
सह्याद्रीतल्या गडांवर भटकायला जावे आणि इतिहासाच्या साखळीच्या कड्या जुळू नयेत! तेव्हा इरसाल भटक्यांची कोण अवस्था होत असेल. गडांवर घडलेल्या राजकीय घडामोडींचा पट कोणी उलगडून दाखविला तर? कुठल्या राजवटी तिथे नांदल्या? व्यापार कसा बहरला? थक्क करून सोडणारे स्थापत्य अविष्कार कोणी निर्माण केले? नगरे कशी वसली? अस्सल वस्त्र, भांडी नेमकी कशा प्रकारची होती, ती आज बघायला मिळणे इतके दुरापास्त का? नाणी कशी पाडण्यात आली? चौल्हेरच्या बाबतीत अगदी तसेच घडते. गडाच्या भग्नावशेषांकडे बघूनच जाणवते, ऐन भरात तिथे काय वैभव असेल!
आज चौल्हेरचा परिसर इतका शांत कसा? अनेक शतकांची धामधूम. अनेक राजवटींचा उत्कर्ष आणि क्षय पाहिलेले इथले गड कालचक्रात शांततेची चादर तर नाही ना ओढून बसलेत. यादवांचा राजा पाचवा भिल्लम याने मुल्हेरवरून राजधानी देवगिरी किल्ल्यावर हलवली, या अनुषंगाने चौल्हेरची पाच दरवाजांची मालिका असलेली महादरवाजाची अंधारी वाट म्हणजे जगाच्या पाठीवर अद्वितिय संरक्षणसिद्ध अशा देवगिरी किल्ल्याच्या अंधारीच्या अगोदर नसेल ना बांधली गेली? कला,कल्पता आणि स्थापत्याचा काय सुदर अविष्कार आहे तो.  
इतिहासाच्या साखळीच्या अशा अनेक कड्या जोडण्यासाठी मन आसुसते तशा या गडभेटी सर्वांर्थाने समाधानकारक ठरतात. बर्‍याच दिवसांपासून मनात असलेली चौलेर किल्ल्याची भटकंती या दिवाळीत पदरात पडली. अल्पवेळेत फार सवंगडी जमू शकले नाहीत, तेव्हा आम्ही दोघेच गडासमोर जाऊन नतमस्तक झालो. सर्व प्रकारचा मार आणि मारा झेलूनही चौल्हेर प्रत्येक वळणावर, गतकाळाचे वैभव मुकपणाने दाखवत होता. 
दुरून एकसंघ वाटणारा हा गड प्रत्यक्षात पुर्णपणे दोन डोंगरात विभागलाय. सबंध गडावर नऊ दरवाजांचे अवशेष बघायला मिळतात. त्यातले काही सुस्थितीत तर काही भग्न. तटाचा भलामोठा घेरा. याच्या २४ पाण्याच्या टाक्यांची कहाणी तर दंतकथाच बनून समोर येणारी. प्रत्येक टाक्यातले पाणी म्हणजे कुणाचा वास वेगळा तर कुणाचा रंग. काही मुख्य गडवस्तीत, काही डोंगराच्या पोटात तर काही, जाणेच शक्य नाही अशा डोंगरकड्यात. बागलाण परिसरातील नामसाधर्म्य चक्रावणारे. मुल्हेर-साल्हेर-चौल्हेर, कळवण-तिळवण. नावांतील लयी प्रमाणेच अर्थपूर्णरित्या जुळणारी ही नावे. काही सहजपणे लक्षात येणारी तर काही अर्थ शोधण्यास उध्यूक्त करणारी.

३१ ऑक्टोबर २०१९
ऐनवेळी ठरल्यामुळे काही सवंगडी रद्द झाल्यानंतर अजय आणि मी असे आम्ही दोघेच उरलो. भटकंती दिवसभरात आटोपायची तर भल्या सकाळी लवकर जाऊन लवकर परतायला हवे. नाशिक-सटाणा-वाडी चौल्हेर प्रवासाचा मोठा टप्पा. एका बाजूने सत्तर किलो मिटर मोटरसायकल चालवायची. भला थोरला गड चहुबाजुंनी बघायचा आणि पुन्हा ७० किलो मिटरचा परतीचा प्रवास. साल्हेर-सालोटा, मुल्हेरच्या तुलनेत सोपी वाटणारी ही भटकंती कोणत्याच अंगाने सोपी नसणार हे स्पष्टच होते. आमच्या मोताश्रींनी भल्या पहाटे उठून दुपारच्या जेवणासाठी ठेचा, भाकर, भेंडीची भाजी असा डबा बनून दिला. सोबतील दिवाळीचा फराळ, फळे म्हणजे खाण्यापिण्याची कोणतीच कमी पडणार नव्हती. पहाटे साडे पाचचे प्रस्थान ६:२० असे काहीसे लांबले. सटाण्यावरून वाडी चौल्हेरला बस व खासगी प्रवाशी वाहनांचे अतिशय मर्यादित पर्याय पाहता आम्ही मोटरसायकलने जाण्याचा निर्णय घेतला तो अगदी योग्य ठरला.
सोग्रस मार्गावरच्या झेंडू शेतीतून बाकळ्या, कांचना, हंड्या, लेकुरवाळा, इखारा, धोडप
सातमाळेत गुंतलो...
चांदवडच्या अलिकडे सोग्रसला उगवतीच्या प्रकाशात सातमाळा रांग दृष्टीपथात पडली आणि आम्ही थबकलो. रस्त्यावर पडलेले झेंडूच्या फुलांचे ढिग शेतकर्‍यांची व्यथा कथन करत होते. यंदा महामोर पाऊस झाला, तो अजूनही पडतोच आहे. त्यामुळे दसरा व दिवाळी पावसातच गेली, त्यामुळे मोठी मागणी असलेला टपोरा झेंडू अत्यल्प प्रमाणावर तयार होऊ शकला. त्यातही पावसात ज्यांचे झेंडू तगले त्यांना काढणी व वितरणाचे नियोजन कोलमडल्यामुळे उच्च दर असूनही माल बाजारात पोहचवता आला नाही, पर्यायी माल फेकून द्यावा लागला.
थांबणे हा आपला धर्मच नाही, म्हणत बळीराजा ओल्या दुष्काळाचे मळभ झटकून कामाला लागल्याचे शेता शेतात दिसत होते. सोग्रस जवळ एका मळ्यात पाचएक गुंठ्यात झेंडू फुललेला दिसला. तांबडं फुटून अर्धातास झाला. ढगांच्या दाटीमुळे भास्कर झाकोळला होता. प्रकाश मंद पण पुरेसा होता. काळसर राखाडी आकाश डोळ्यादेखत निरभ्र निळे होते होते. त्यात हलकेसे पांढरे ढग होते. संपुर्ण पावसाळ्यात, 'थोडे थांब', म्हणत झुलविणार्‍या ढगातून भास्कराने, 'झाले ते पूरे',च्या अविर्भावात थोडं तांबड पुढे धाडलच. त्यामुळे सातमाळा डोंगररांगेवरचे आकाश वेगाने बहुरंगी, बहुढंगी रूप धारण करत होते. पहाटेच्या बदलत्या रंगात सातमाळेतल्या गडकिल्ल्यांचे दुरून दर्शन पाय अजिबात पुढे हलू देत नव्हते.
अशा वातावरणात डोंगरांचे सौंदर्य काय खुलते. कांचना किल्ल्याला टपोर्‍या झेंडूची फुले व निळ्या आकाशाची पार्श्वभूमी लाभली. गाडी थांबवणे भागच होते. क्षण दोन क्षण डोळे भरून बघावे आणि जमली तर काही छायाचित्रे टिपावीत, म्हणजे वाडी चौलेरला पोहोचायला उशिर होणार नाही. आमचे हे मनसूबे आज धडाधड कोसेळणार होते.
एका टप्प्यात कांचना टिपून थोडे पुढे जातो तोच इतका वेळ पुसटसे दिसणारे लेकुरवाळा, हंड्या, इखारा व धोडप अधिक स्पष्ट दिसू लागले. दुसर्‍या शेतातही पिवळा, नारंगी टपोरा झेंडू फुलला होता. वेगळे दृष्य, वेगळा कोन, पुन्हा दुचाकीची चाके थबकली. पुन्हा क्लिक...क्लिक.
सोग्रस मार्गवरून कोळधेर, कोल्हयाचे डोंगर
अडवून ठेवतो कोळधेर...
आणखी थोडे अंतर पुढे जातो तोच उजव्या हाताला चमत्कार दिसला. कोळधेर, कोल्ह्या, राजदेर, इंद्राई, साडेतीन रोडग्यांची डोंगर रांग, `फोटो प्लीज', म्हणत खुणावू लागली. त्यांचा, 'आम्ही काय पाप केले'चा प्रश्न निरूत्तरीत करणारा होता. डोळ्यात, मनात व छायाचित्रात यांना बंदिस्त करणे भाग होते. पुन्हा तळाला झेंडूच्या मळ्याची पार्श्वभूमी होतीच. आम्हाला मिनीटभरात हा फोटो सोहोळा आटोपायचा होता. पण हे डोंगर दर क्षणाला वेगळे रूप दाखवून आम्हाला मुद्दाम वाडी चौल्हेरला जाण्यापासून रोखत होते.
थोडेच पुढे गेलो असेल. अगदी काही मिटर, तोच कोळदेरला पांढर्‍या ढगांची रेशमी चादर खालच्या बाजुने लपेटायला सुरूवात झाली. हा नजारा चुकवायचा म्हटले तरी चुकलवला जाऊ शकत नव्हता. एक ऐवजी पाच मिनीटे खर्च करून तो थोडाफार कॅमेर्‍यात छायाचित्रबद्द केला. कोळधेरला रामराम करून पुढे निघालो, पण त्याला काय फिकीर, कोण आपल्याकडे बघतोय आणि कोण नाही. 
तांगडी गावाच्या फाट्यावर कोळदेरचे आणखी वेगळे रूप दिले, असे क्षण कधी चुकवायचे नसतात. इथला अर्धा बंद अर्धा सुरू असलेला टोलनाका पार करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर दोन मिनीटांचा अनिवार्य थांबा घ्यावा लागला तो मागच्या वर्षीच्या सातमाळा डोंगरयात्रेच्या आठवणीं निघाल्याने. 
मागच्या वर्षी केम ते चांदवड अशा आठ दिवसीय सातमाळा मोहिमेचा महत्वाचा टप्पा येथून पार झाला होती. मी व दीपक असे बारा पंधरा गड्यांच्या या भटकंतीत धोडप नंतर आम्ही दोघेच उरलो होतो. त्यादिवशी कांचन बारीतून चालत, कांचना करून इथवर पोहोचलो होतो.  पोटात भुकेचा आगडोंब माजला होता. सकाळी केलेली न्याहारी कुठच्या कुठे विरली होती. कांचना ते इंद्राईवाडी असा भला मोठा पल्ला गाठण्याचे उद्दीष्ट असताना दुपारचे भोजन बनविण्यास सवड मिळाली नव्हती. वाटेत कुठे तयार भोजन मिळण्याची शक्यता नव्हती, अशात एका शेतमजूराच्या झोपडीत आम्हाला तांदळाची खिचडी मिळाली होती. या भटकंतीत, बर्‍याच दिवसांनंतर गाडी व रस्त्याचे दर्शन घडले होते. इथून कसे वर आलो आणि कोळदेर करून राजदेरवाडी कशी गाठली या स्मृतींना उजाळा देऊन चार एक मिनीटात इथून काढता पाय घेतला. 
भावडबारीच्या टपावरून उजवा वळसा घेतल्यानंतर पुन्हा कोळधेरचे नवे प्रकरण सुरू झाले. पुन्हा थांबा आणि पुन्हा छायाचित्र. जिवाभावाच्या गडकिल्यांची ही वेचक रूपे चुकवून पुढे जाण्याचे पाप आमच्या हातून घडणार नव्हते. दुचाकी चालवता चालवता सातमाळाच्या रम्य आठवणी निघत होत्या. कोळधेरवर सूर्य मावळल्यानंतर जुनानी व राजदेरवाडी गाठतानाचा संघर्ष या गप्पातून ताजा ताजा उभा राहिला. 

ही रित वाहतूकीची...
आज घाटात वाहतूक वर्दळ कमी दिसत होता. घाट उतरल्यानंतर भिलवाड गावापासून पुढे एक दुचाकी डावीबाजू सोडून अचानक रस्त्याच्या मध्यावर आमच्या समोर आली. महाराज उजवीकडे अचानक वळण घेणार असे वाटत असताना त्यांनी पुन्हा डावीकडे दुचाकी दामटली. असे काही घडेल याची कल्पनाच केली नव्हती. टक्कर थोडक्यात वाचली.  'त्याने एवढी सगळी कसरत भलामोठा खड्डा चुकविण्यासाठी केली होती'. आपल्याकडे बर्‍याच ठिकाणी नित्य घडणारा हा प्रकार. आपण ज्या रेषेत गाडी चालवतो ती रेष मोडण्याचा प्रयत्न टाळावा. अगदी खड्डा समोर आला तरी. म्हणजे आपल्या मागून पुढे जाणार्‍या वाहनांची दिशेची लय बिघडत नाही. गतीचा अंदाज घेऊन ती सुरक्षितपणे पुढे जाऊ शकतात. गाडी चालवताना, लेन मोडू नका, असे यासाठीच म्हटले जाते. हा साधा सरळ नियम न पाळल्यामुळे अनेक अपघात घडलेतात.
इथून पुढे रस्त्यात खड्डेच खड्डे आडवे येऊ लागले. लख्ख उजेडात ते चुकविणे काही फार कठिण काम नव्हते. बरेच  वाहनचालक बिनदिक्कतपणे गाडी वेडीवाकडी वळवून ते चुकवत होते. मला वाटतं, अशा वेळेस सरळ गाडीचा वेग कमी करून खड्डा हळूच पार करावा, हे अधिक श्रेयस्कर. सुरक्षितते बरोबरच आपली हाडे आणि गाडीच्या तब्येतीसाठी ते लाभदायक.
आता देवळा गाव लागले. नाशिकहून सुरू झालेला आमचा प्रवास अडीच तासात इथवर येऊन पोहोचला. मध्ये चहापानासाठी थांबा घेतला नाही. एक थांबा गाडीत पेट्रोल भरण्यासाठी, दुसरा चाकात हवा भरण्यासाठी आणि त्यानंतर काही थोडे थांबे सातमाळा रांगेचे डोंगर कॅमेर्‍यात टिपण्यासाठी. देवळ्याहून गिरणा नदी ओलांडून लोहणेर, सूत गिरणी असलेले ठेंगोडा गाव व तिथून ९ किलो मिटरवर सटाणा असे ३२ किलो मिटरचा पुढचा टप्पा.
वाडी चौल्हेरच्या रक्षक खरकांडी टेकडीवरून दिसणारा चौल्हेर
कसले चौल्हेर...
सटाणा शहरात प्रवेश करण्याची आवश्यकता भासणार नाही याचा अंदाज होता. शहर येण्यापूर्वी वाडी चौलेरकडे कोणता फाटा जाते हे जाणून घेण्यासाठी एका स्थानिका गृहस्थात विचारले तर त्याने, चौलेर नसेल, साल्हेर असेल असा प्रतिप्रश्न केला. त्यामुळे आम्ही दुसर्‍या दुकानदाराला विचारले तर त्यालाही वाडी चौलेर ठाऊक नव्हते याचे मोठे आश्चर्य वाटले. 
मोरे वाडी नंतरच्या एका वळणावर काही प्रवासी उभे होते, त्यांना वाडी चौलेरचा रस्ता विचारला तर त्यांनीही माहित नाही, असे सांगितले. अन्य एका दुकानदाराला तिळवणचा रस्ता विचारला तर त्याने दुकाना लगतचा रस्ते थेट तिळवणला घेऊन जाईल असे सांगितले. आता आम्ही तिळवणच्या रस्त्याला लागलो होतो. प्रत्यक्षात तिळवणला जाण्याची आवश्यकता नव्हती, त्यामुळे आणखी तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी वडी चौलेरची माहिती विचारली. नवेगाव फाटा पकडा, तिथून नवेगावकडे न वळता उजवा रस्ता धरा म्हणजे वाडी चौलेरला पोहोचाल. हे दिशादर्शन अचूक होते.  इथून दिसणार्‍या तिन शिखरांच्या समुहात सगळ्यात शेवटचे शिखर म्हणजे चौलेरचा किल्ला हे दुरवरूनही सहज कळत होते. त्यामुळे लहान मोठ्या वळणांवर न चुकता आम्हाला वाडी चौलेरची दिशा बरोबर सापडली. 

बाजरीच्या कणसांचा डौल...
या परिसरात अनेक शेतात बाजरीची कणसे काढणीसाठी सज्ज झाल्याचे दिसत हाते. आणखी दहावीस दिवसात येथे बाजरीची कापणी होणार असे दिसत होते. पावसामुळे चाळीत साठवलेला कांदा व शेतातच कापून ठेवलेल्या मक्याचे मात्र मोठे नुकसान काही शेतात दिसले.
वाडी चौलर म्हणजे एक छोटे गाव. पक्की घरे नावापुरतीच. बहूतांशी चादरी, गोधड्यांनी आडोसा बांधलेल्या चंद्रमौळी झोपड्या. मराठा, माळी आदिवासी घरांची हा बहुसंख्य वस्ती. दुमजली घर सापडणे अवघड. डोंगरभटक्यांना आवडीने गडावर घेऊन जाणार्‍या नंदू बोरसेला सोबत घेऊन जायचे होते. त्याच्याकडे मोबाईल फोन असल्याने संपर्क केला तर तो सटाणा येथे कामाला लागल्याची माहिती मिळाली. दुसर्‍या सहकार्‍याला पोठवतो असे तो म्हणाला, म्हटलं पाठव, आम्ही हळूहळू पुढे निघतो. एका झोपडीच्या दारजवळ गाडी लावली. हेल्मेट ठेवले व नमस्कार करून किल्ल्याचा रस्ता धरला. भल्या सकाळी एक पुर्ण तर्राट झालेला तरूण, अहिराणी सुरात, तला मी गड दावतो म्हणत आमच्या सोबत येऊ लागला. आम्हाला अशी सोबत नकोच होती. शिवाय तो पाय घसरून पडला असता तर? गावातले लोक म्हणाले, त्याचा वर सिताफळांचा प्लॉट आहे. त्याला काही नाही होणार. तरी पण आम्ही त्याला परत जाण्याची विनंती केली. तो जाता जाईना. मग आम्ही आत्ताच दमलो आहोत, आमच्याच्याने गड काही सर होणार नाही असे सांगून त्याला कटवले. 
सुस्वागतम! गडावर जा या कमानीतून...

वनं पर्यटन बांधकामे...
वाडी चौल्हेर मधून खरकांडी  टेकडीच्या मार्गाने गडावर प्रवेश होतो. अर्थात या टेकडीचे नाव आणि त्याच्या पुढच्या आणखी तीन टेकड्यांची नावे कळली ती रोहित जाधव यांनी बागलाण देशा या पुस्तकातून बागलाण तालुक्याचा भूराजकीय, सामाजिक, सांस्कृतीक इतिहास पट मांडल्यामुळे. खरकांडीवर वनखात्याने सुरूवातीलाच चौकोनी आकाराची सिमेंट कॉंक्रिटमध्ये कमान बांधली आहे. या कमानीतून कोणतेही वाहन जाऊ शकत नाही. माणूसांनी त्यातून जावे यासाठी ही कमान. खरकांडी टेकडी पार करताना वायव्य दिशेने दिर भावजई असे जुळे सुळके असलेला डोंगर लक्ष्य वेधून घेत होता. 
वरच्या टप्यात वनखात्याने तात्पुरत्या निवार्‍यासाठी सहा सात ठिकाणी सिमेंट वीटात छत्र्या बांधल्या आहेत. कडक उन्हात किंवा पावसात तिथे लोकांना थोडा निवारा मिळावा असा त्यामागचा उद्देश असावा. असे निवारे अगदी सुरूवातीलाच बांधण्याचा फारसा लाभ होत नाही. लोकांना चालून थकल्यावरच अशा निवार्‍याची आवश्यकता भासू शकते. ट्रेकर मंडळी अशा निवार्‍यात कधी दिसत नाहीत. स्थानिक भाविकांचेही तिथे काही काम पडत नाहीत. त्यामुळे हे निवारे निपचीत उभे दिसतात.  

आमच्यापैकी कोणीही यापूर्वी चौल्हेरला आलो नव्हतो, त्यामुळे वरच्या टप्प्यावर येऊन गडावरच्या वाटा निरखण्याचा प्रयत्न केला. एक ठळक वाट डाव्या बाजुकडून मध्यापर्यंत जात होती. वाट चुकण्याचा काहीच संभव नव्हता. शिवाय गडावर दाट झाडी अजिबात नसल्याने भरकटण्याचाही धोका नव्हता. बागलाणचा हा जास्त पावसाचा प्रदेश असला तरी इथला उन्हाळा भयंकर असतो. शिवाय भूसभूशीत खडीमातीमुळे डोंगरवाटा या घसार्‍याच्या असतात. दिवाळी नंतरही पाऊस कायम राहिल्याने घसारा अजिबात जाणवत नव्हता. उन्हं वाढतील तशा त्या घसरड्या बनू लागतील. वाटेत सिताफळाची अनेक झाडे दिसत होती व त्यांना बरीच फळे लगडलेली दिसत होती. खाली शेत शिवारात काम करणार्‍यांचे आवाज कानी पडत होते. मोराचे आवाज सतत येत होते. खरकांडी आकारमानाने तशी लहान. येथे बसून काही गुराखी राखणदारी करताना दिसत होते. 

खरकांडी टेकडीवरील जुन्या पायर्‍यांच्या वाटा पुसट झाल्यात
दक्षिण बाजुस खरकांडी संपते आणि एक लहानसा उतार साळमुख टेकडीकडे घेऊन जातो. टेकडी मोठ्या घसार्‍याची, त्यामुळे येथून पावले सांभाळूनच जावे लागते. तिव्र चढणीच्या जुंध्या, खांडबारा टेकड्या पार करून आपण डोंगराच्या मधोमध असलेल्या ठळक वाटेला लागतो. या वरच्या सोप्या टप्प्याला दोन ते अडीचशे मिटर लांब पसरलेले लोखंडी नळ्यांचे संरक्षक कठडे बसवण्यात आले आहेत. 
संरक्षक कठडे संपतात आणि आपण कातळ टप्प्यावर येऊन पोहोचतो. इसवी सनाच्या १८१८मध्ये चौल्हेरच्या प्रमुख मार्गाचे इंग्रजानी तोफा सुरूंग लाऊन मोठा विध्वंस केला आहे. त्यामुळे अवघड बनलेला हा टप्पाकाळजीपूर्वक पार करावा. आदल्या रात्रीच्या जोरदार पावसामुळे शेवाळलेल्या स्थितीत येथे थोडी कसरत करूनच वर जाता आले. वर तोंड करून बघितले तर प्रकाशकिरणे थेट डोळ्यात शिरत होती, त्या स्थितीतही गडाचे मुख्यप्रेशद्वार सुखावणारे दर्शन देत उभे होते. 
सृष्टीतले अमुर्त हात...सतत त्यांची कारागिरी गडकिल्यांवर!

 निसरड्या शेवाळलेल्या पायर्‍या पार करून वाट उजवीकडे वळण घेते. येथे गडाचे पहिले प्रवेश द्वार. याची रचना काय कल्पक. प्रवेश मार्ग अगदी चिंचोळा, म्हणजे एका वेळेला एकच माणूस जाऊ येऊ शकतो. दरवाजा बंद केल्यावर हत्तीला किंवा मोठ्या ओंडक्याच्या सहाय्याने धडका मारण्यासाठी कोणताच वाव ठेवलेला नाही. 
भूयारी-अंधारी: चौल्हेरचा प्रसिद्ध महादरवाजा

अंधारी मार्ग...
वरच्या चिंचोळ्या पायर्‍या पार केल्या की वाट डावीकडे वळण घेते. येथून महादरवाजाच्या भव्य बांधकामाची प्रचिती येते. हाच तो चौल्हेरचा प्रसिद्ध भूयारी अंधारी मार्ग. महादरवाजाची रचना अशी की, तो कुठल्याच बाजूने तोफांच्या मार्‍यात येत नाही. हत्ती किंवा ओंडक्याने त्याला धडका दिल्या जाऊ शकत नाही, अशी बाहेर आलेल्या भल्या मोठ्या कातळ टप्प्याची ही वाट चढणीसाठी सोपी नाही. महा दरवाजाचा प्रवेश मार्ग चिंचोळा ठेवण्यात आला आहे. वर श्रीगणेशेची मुर्ती कोरलेली आहे. 
पहिला प्रवेशमार्ग...कोण्या हातांनी दिवाळीत रंगवलेला...

मोठाल्या पायर्‍या पाय करून पहिल्या दारातून आत गेल्या बरोबर भर दिवसा गुडूप अंधारात वाट हरवले. आता डावीकडे जायचे की उजवीकडे. समोर कोण आहे अनं कोण नाही. कशाचे काहीच कळत नाही. पुन्हा डावीकडे उंच पायर्‍या आणि कातळाची चढण. तिथून वाट उजवीकडे वळते. तिथे दोन दरवाजे पार करून बाहेर आल्यावरच उजेडाचे दर्शन होते आणि जीव भांड्यात पडतो. आक्रमकांसाठी हा प्रवेशमार्ग म्हणजे मरणाचे दार. शेवटच्या दारातून बाहेर पडल्यावर कळते की, हा डोंगर मधोमध दोन भागात तुटला आहे. अगोदर डाव्या कातळपायर्‍यां चढून पूर्व टोकाच्या तटबंदी पर्यंत जाता येते. सुरूवातीला काही जोती लागात. खाली उतारावर पाण्याचे दोन कुंड लागतात. हा परिसर झटपट बघून खाली परतायचे आणि महादरवाजाच्या वर बांधलेल्या तटावर उभे रहायचे. तिथे काही कातळ कोरीव बांधकामांसोबत एक शिवलिंग दृष्टीस पडते. खालच्या बाजुला अवघड कड्यात पाण्याचे लांबलचक आयाताकृती टाके पाण्याने पूर्णपणे भरल्याचे दृष्टीस पडते. 
राजगडच्या बालेकिल्ल्याची छबी वाटावा चौल्हेरचा बालेकिल्ला...

इथून आपली वाट दुसर्‍या डोंगरला लागते. प्रथम डाव्या बाजूस चौरंगनाथाच्या मंदिराकडे प्रस्थान करावे. येथे काहीजुन्या मुर्त्या असून सिमेंट कॉंक्रिटचे भडक रंगात रंगवलेले नविन मंदिर बाधण्यात आले आहे. वरच्या बाजूने डोंगराच्या पूर्व अर्ध्या भागात अगदी खालच्या बाजूला अत्यंत अवघड अशा कड्यात छानसे टाके पाण्याने भरल्याचे दिसते. चौरंगनाथापासून तसेच पुढे गेल्यावर दक्षिण टोकाची तटभिंत व तिथे पाण्याचे टाके. बालेकिल्ल्याच्या कातळात वरच्या बाजूला आणखी एक लंबाकृती पाण्याचे टाके. इथून बालेकिल्ल्याचा चढाईमार्ग रोमांचक आहे. कातळ आरोहणाची माहिती असल्या शिवाय येथून वर जाणे खासे धोकादायक. आल्यावाटेने परतून  उत्तर बाजूने बालेकिल्ल्याकडे घेऊन जाणारी गडाची मुख्यवाट पकडावी. सुरूवातीला कातळ चिरांच्या भिंतीचा आडोसा केलेली पाण्याची अनेक टाकी लागतात. ती पार करून गडाच्या उत्तर टोकाला पोहोचलो की, उध्वस्त पायर्‍यांची कातळवाट बालेकिल्ल्याकडे घेऊन जाते. इथले प्रवेशद्वार पूर्णपणे ध्वस्त करण्यात आले आहे. त्याच्या शेकडो घडीव चिरा इस्तत: पसरलेल्या दिसतात.
बालेकिल्ल्यावर एका तटाने सर्वोच्च माथ्यावरची निवासस्थाने संरक्षित करण्यात आली आहेत. त्यांचे अवशेष बर्‍यापैकी सुस्थितीत आहेत. खाली वाकून चिंचोळ्या दगडी कमानीतून वर गेल्यावर अनेक टाक्यांचा समुह लागतो. तिथून जवळच गडाचा सर्वोच्च माथा.  हवामान स्वच्छ असेल तर इथून सेलबारी, डोलबारी, दोधेश्वर,  सातमाळा रांगेतील अनेक किल्ल्यांचे दर्शन घडते. 
प्रचूर मात्रेत जिकडे पहावे तिकडे जुने बांधकाम अवशेष विखुरलेलेत. ते पायच हलू देत नाहीत. पावसाळा सुरू होऊन सहा महिने लोटलीत तरी यंदा पाऊस थांबण्याचे नाव घेईना. प्रचंड उकाड्यानंतर ढग दाटून येऊ लागल्याने सोबत आणलेले दुपारचे जेवण महादरवाजा उतरूनच घेण्याचा निर्णय घेतला. जोराचा पाऊस झाला तर निसरड्या वाटा पार कराव्या लागू शकतात. भरल्यापोटी ही कसरत जीवावर आली असती. 
आईच्या हातचे जेवण: या प्रत्येक घासाचे मोल...अनमोल

महादरवाजा उतरून त्याच्या पायर्‍यांवर बसकन मारली आणि शिदोर्‍या उघडल्या. ठेचा, भाजीच्या वासाने भूक आणकी भडकली. मनसोक्त जेवण, थोड्या गप्पा आणि थोडा विश्राम, चाळीस मिनीटे कशी गेली कळलेच नाही.  
चौलेर गडावर मोठे एकही झाड नसावे, ही गोष्ट मन खात होती. अगदी इंग्रज होते तोवर हा परिसर घनदाट अरण्याचा होता. दोन एकशे वर्षात तो पूर्णपणे उजाड झाला. फार फार थोडी झाडे शिल्लक आहेत. तीही डोंगराच्या अवघड टप्प्यांवर. इथे जे काही जंगल आहे ते खुरट्या झाडांचे बागलाण हा पूर्वपार शेती प्रधान परिसर. जोडीला जुन्या व्यापारी मार्गावरचे घाट असल्यामुळे या भागात व्यापार, उद्यम भरभराटीला. शिवाय हे व्यापार मार्गावरचे एक मोक्याचे ठिकाण, त्यामुळे जुन्या राजवटीत या परिसरावर ताबा मिळविण्यासाठी या परिसरात मोठे संघर्ष घडलेत. त्याच्या काही नोंदी इतिहासाच्या पानात सापडतात. 
छदमी...तुडतुड्या...अवघ्या भारताला वेड लावणार्‍या क्रिकेट्या!

गेल्या काही दशकात बेफाम जंगलतोडीमुळे या परिसरात पर्जन्यमान कमी झालेले. त्यात जो पाऊस पडतो, तो भूगर्भात मुरण्यासारखी ना शेताची जमिन ना डांगरांची पठारं. डोंगर परिसर अति चराईमुळे उघडी बोडकी होऊन कडक उन्हाच्या संपर्कामुळे मातीचे वरचे स्तर कडक बनले आहे. जोडीला विंधन विहिरींचा जसा सुळसूळाट. त्यामुळे पाण्याचा जेवढा उपसा केला जातो, त्या तुलनेत पावसाचे पाणी मुरविण्याचे प्रमाण निमम्म्याहून अधिक घटले. जमिनीच्या पोटात पाण्याची पुनर्भरण करण्याचे किंवा निसर्गत: होण्याचे प्रमाण अगदी विषयम. यामुळेच इथली शेती पाण्या अभावी खालावलेली. गेल्या काही वर्षात या परिसरात सुद्दा कांदा पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाऊ लागले. जोडीला सोयाबीनची तितकीच मोठी हजेरी. कांदा पिकाचे दर नेहमी कोसळलेले असतात, तीन ते चार वर्षांत मात्र तो असा काही पैसा देतो की, मागची सगळी कसर भरून निघते. यंदाचा चढ्या दराचा काळ असल्यामुळे ज्यांना कांदा कसोशीने साठवला ते शेतकरी रातोरात मालामाल झाले. अशी अचानक रक्कम हाती आली की, खर्चाच्या वाटा अनेक फुटतात. ते टाळून शेतीत किंवा शेती पुरक व्यवसायात गुंतवणूक केली तर इथल्या शेतीविश्वाला कधीच अवकळा येणार नाही.सततच्या पावसाने चाळीत साठवलेला कांदा खराब झालाय. अशात शेतकर्‍यांना गावठी बाजरीने मोठे हात दिला, अन्यथा महाराष्ट्राच्या अनेक भागात दिवाळी नंतरच्या पावसाने भात, मका, सोयाबीन, कांदा आदी अनेक पिकांचे विक्रमी नुकसान यंदा केले. 



सूर्य मावळण्याच्या आत चैाल्हेरची भटकंती आटोपली होती. चौल्हेरवर उगम पावणारी देव नदी बघता आली नाहीयाचे शल्य मनात राहीले. ज्या झोपडीबाहेर गाडी लावली, तिथल्या मुलाने चहा घेऊनच जा! असा आग्रह धरला. चहा नंतर मग दिवाळीचा फराळ पेश करण्यात आला. आम्ही कोण, कुठले याची कुठलीही विचार पूस न करता, अतिथी देवो भव प्रमाणे आमचे आदरातिथ्य झाले. भटकंतीतले हे मोठे भावूक क्षण असतात. नशिबाने ते आमच्या वाट्याला आले. 
किल्केश्वर मंदिरा समोर चंद्रकला नदीवर जुने तुळशीवृंदावन

वाडी चौल्हेरचा निरोप घेऊन तिळवण गाठले. तिथली स्माशानेश्वर, ही पुरातन आणि रामेश्वर हे अलिकडच्या काळातली मंदिरे बघायची होती. आता आमची स्पर्धा ही कलत जाणार्‍या सूर्याशी होती. रामेश्वर सोडलं तर तिळवणची मंदिरे विखूरलेली आणि नदी अनं झाडांच्या गतपनात गुंतलेली. ती शोधत अगदी धावत पळतच बघितली. मुर्त्या बर्‍याच झिजलेल्या असून जुन्या आहेत. त्यांचा इतिहास व कालखंड गावकर्‍यांना ठाऊक नाही. या मंदिराच्या रूपाने काही दुवे जोडता आले तर काय मजा येईल. आपल्या इतिहासो असेच आहे, त्यावरची धुळ झटकायची कोणी. अभ्यासक मंडळी स्वबळावरच या विश्वाची मुशाफिरी करत असतात. त्यातून आपल्या सारख्या जिज्ञासुंना माहितीचे महाद्वार उघडत असते. शासन, भाकरी-रस्ते-दवाखाने-वीज-वाहनतळ-इंधन अशा संसारात गुंतलय. त्यातून ते बाहेर येत नाही आणि पुरातन इतिहासात शोध व संशोधनाला काडीची किंमत देत नाही. विद्यापीठांनी या दिशेने काम केले तर दिवसागणिक लयाला चाललेल्या पुरातत्वीय अवशेष, मंदिर, तळी, टाक्यातून गतवैभवाची काही दारे नक्की उघडू शकतील.
तिळवणचा निरोप घेऊन सटाण्याचा रस्ता धरला. आता आम्हाला परतीच्या वाटेवरचा कमळ फुलांचा तलाव बघायचा होता. रोहीत जाधवने, आवर्जुन बघा असे सांगितले. पिंपळदर जवळ तलाववाडी विचारा, अशी माहिती दिली होती. प्रत्यक्षात तलाववाडी हे नाव किमान दहा एक जणांना विचारले तरी सांगता आले नाही. पिंपळदरचा पत्ता मिळाला. त्याच्या वाटेला लागलो. तिथे एका निवृत्त शिक्षकाने लहानपणी त्या तलावावर जायचो अशी आठवण सांगितली. टेकडी चढून जावे लागेल. अंधार होईल. तुमच्याकडे इतका वेळ आहे का? असा रास्त सवाल केला. तो अर्थातच आमच्याकडे नसल्याने आम्ही, 'पुन्हा केव्हा तरी', म्हणत तलावावाडीचा निरोप घेतला. मोटरसायकल आता सटाण्याच्या दिशेने दौडत होती. ठेंगोडा, लोहणेर, देवळा ही गावे भराभर मागे टाकत पुढे जाण्याचा बेत रस्त्यातील असंख्य खाचखळग्यांनी रोखून ठेवला. अगदी कुर्मगतीचा प्रवास सुरू झाला. देवळ्याला अंधार दाटला आणि अवजड वाहनांची मोठी वर्दळ लागली. गुजरातकडून येणारी अवजड वाहतूक या मार्गावरूनच होऊ लागली आहे. त्याकरिता हा रस्ता म्हणावा तितका सक्षम नाही. त्यामुळे सटाणा परिसरात घातक अपघात हा नित्याचाच खेळ होऊन बसलाय. त्यात रस्त्यांवरचे खाचखळगे असल्याने व वाहतूकीच्या नियमात कोणीच गाडी चालवत नसल्याने गड चढून-उतरून येण्याच्या तुलनेत कितीतरी आव्हानात्मक व धोकादायक असा हा टप्पा ठरला. एकतर रस्त्यावर प्रचंड धुळ, माती. त्यात खड्डेच खड्डे आणि अवजड वाहनांची भरमसाठ संख्या. स्थानिक दुचाकी व चारचाकी तर आपल्या नंदनवनाचे आपण मालक या अविर्भावात गाड्या चालवित असल्याने अत्यंत सावधपणे प्रवासाचा हा टप्पा सुरू झाला. एकदा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ ला लागलो की मग बिनदिक्कत सुसाट जाता येईल हा विचार डोक्यात घेऊन गाडीचा वेग कमी वा अधिक न करता, टार्गेट भावडबारी, डोळ्यासमोर ठेवले. भिलवाड जवळ कमाल झाली. संपुर्ण काळोख. ढग राखाडी, थोडाच संधी प्रकाश उरलेला. त्यात ढगांमुळे फक्त इखार्‍यावर लालीमा बाकी राखाठी काळोखी पार्श्वभूमी. इखारा काय सुंदर दिसत होता. मनभरेस्तोवर हे दृष्य डोळ्यात साठवले. त्यापायी रस्त्यावरचा काळोख अधिकच वाढला. हेल्मेटची काच (कचकडीची) बंद करून गाडी चालविणे अशक्य. कारण समोरून येणार्‍या वाहनांचा प्रखर प्रकाश कचगडीच्या चर्‍यांमुळे चांदणी सारखा पसरतो आणि ता अधिक प्रखर होऊन डोळ्यात शिरतो. त्यामुळे समोरचे काहीच दिसत नाही. हेल्मेटची काच उघडावी तर रस्त्यावरचे असंख्य किडे गाडीच्या हेडलॅम्पकडे झेप घेतात. काही बारीक किडे चेहेर्‍यावर सतत आपटतात. एक तर डोळ्यात गेला. खुप आग होऊ लागल्याने गाडी बाजुला घेऊन तो काढण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. वेळ दवडण्यात अर्थ नव्हता, तेव्हा तशाच चुरचुरत्या डोळ्यांनी भावडबारी घाटाचा पायथा गाठला. घाटातील अवजड व स्थानिक वाहतूकी सोबत कुठूच न चुकलेल्या खड्ड्यांचा सामना करत अखेर सोग्रस रस्त्याला लागलो. अंधारात हा सोग्रस रस्ता तसा प्रशस्त. खड्डे व वाहतूक वर्दळ इथेही पिच्छा सोडत नव्हती. महामार्गाला लागल्यावर हायसे वाटले. आता खड्ड्यांचा ससेमुरा चुकणार होता. प्रशस्त रस्त्यामुळे आणि दुभाजकामुळे समोरून येणार्‍या वाहनांचा सामना करावा लागणार नव्हता. राष्ट्रीय महामार्गाच्या हा टप्प्यावर धुळे, चांदवड, पिंपळगाव बसवंत, घोटी या ठिकाणी पथकर गोळा केला जातो. साधारणपणे प्रत्येक चारचाकी वाहनास त्याकरिता दिडशे रूपये मोजावे लागतात. दिवसाकाठी कित्येक हजार वाहने हा पथकर भरतात. वडनेर भैरव फाट्याच्या अलिकडे मधल्या व डाव्या लेनमधून ताशी तीस ते चाळीस किलो मिटर अशा कुर्मगतीने चालेल्या दोन जुनाट वाहनांमुळे आमचा मार्गच जणू रोखला गेला होता. मी वेगवान लेनमधून दुचाकी चालवत नाही, त्यामुळे या गाड्यांना ओलांडून जाणे क्रमप्राप्त होते. इथेच 'घात' झाला. रस्त्यात चक्क आठ दहा खड्डे. आमची गाडी ताशी पन्नासच्या वेगात पुढे जात असताना या वेगवान लेनमधल्या खड्ड्यातून धडधडतच पुढे जावे लागले. प्रगतीच्या मार्गवरचा हा भारत. सरकारातल्या यंत्रणा सुस्तावल्याचा नमुना. तिळवणून ५:११ वाजता सुरू झालेला परतीचा प्रवास ८:२७ वाजता नाशिकच्या वेशीवर येऊन संपला. १०० किलोमिटर अंतरासाठी साडेतीन तास. 


मध्ये भिलवाड सोडलं तर कुठेच थांबा घेतला नव्हता. अजयने प्रस्ताव ठेवला. अंग गारठलय, खिळखीळं झालय. काही तरी गरम पेय घेऊ. चहा किंवा कॉफी घेण्याची इच्छा नव्हती तेव्हा त्याने सुप मागवले. आल्या सरशी एक व्हेज बिर्याणीही सांगून टाकली. तोंड हात धुवून टेबलावर आम्ही विसावलो तोच डोक्यात ट्यूब पेटली. सुप आणी बिर्याणी मला प्लास्टिकच्या भांड्यात नको आहे. स्टिलच्या भांड्यात हवी. काही तरी अजब मागणी केल्यागत चेहेरा करून वेटरने, स्टिलची भांडी वापरत नाहीत अस स्पष्ट केले. मी म्हंटलं मग काचेचे भांडे चालेल. पठ्ठ्या काचेच्या ग्लासात सुप घेऊन आला. का..कशासाठी प्लास्टिकचे चमचे, ताटं, बाऊल वापरतात. धुताना व ठेवताना तुटफूट तर स्टिलच्या भांड्यांचीही होत नाही. ही प्लास्टिकची भांडी दिसायला अगदी क्रॉकरी सारखी चिनी माती सारखी दिसतात. त्यात गरम पदार्थ खाण्यची कल्पना केली जाऊ शकत नाहीत. ग्राहक राजाला त्याचे कुठलेच सोयर सुतक नसते. जे येईल, जसे येईल ते स्विकारायचे. क्रॉकरीच्या नावाखाली चक्क बनावट भांडी हॉटेल जगतात सर्रासपणे वापली जातात. मोजकी मंडळी धातूच्या वा काचेच्या भांड्यांचा आग्रह धरते. हॉटेल हेही सेवा क्षेत्र. त्यावर नियंत्रण  सरकार नावाची यंत्रणाच ठेवू शकते. तिचा संबंध अर्थसकल्पात हॉटेल उद्योगावर कर लादण्यापूरता येतो. अन्न सुरक्षा, पाण्याचा दर्जा, मालाचे दर, बिलातला घोळ, स्वच्छता व सेवेचा दर्जा यावर लक्ष ठेवण्याचे सरकारी नियम आहेत. 
पण म्हणतात ना, 
का खावे आपण प्लास्टिकच्या भांड्यात?

हॉटेलच्या बाहेर येऊन 
पाकिट घेऊन जायचे, 
तपासणीच्या नावा खाली 
डोळे झाकून घ्यायचे

निरीक्षण अहवाल
कल्पनेने रंगवायचे
हवे ते त्यावर 
सोयीस्कर लिहायचे

घसरला तर घसरो
दर्जा अन्नपाण्याचा
कच्चे सडके अन्न 
आपल्यास कुठे खायचे

हे राज्य निरीक्षकांचे
आहेस कुठं बेट्या
सेवेचे काय घेऊन बसलास
नादाला लाग मारत बस खेट्या

तुला कोणी आमंत्रण
दिले हॉटेलात जाण्याचे
गप गुमान गिळ
काय घेशील जाण्याचे...



सोग्रस मार्गावरून दिसणारे इखारा, लेकुरवाळा, हंड्या, कांचना 

ढगांच्या चादरीत सजतोय कोळधेर

खरकांडी वरून दिसणारा चौल्हेर किल्ला

गुळवेल

इवलीशी जांभळी गवतफुले

चौल्हेरच्या शेवटच्या टप्याच्या सुरूवातीला कातळात खोदलेल्या पायर्‍या

अंधारीतला गुडूप अंधार


अंधारी मार्गातली भक्कम द्वाररचना...

यातून यायचे? अंधारी मार्ग पार करून?

वार्‍यावर तर वार्‍यावर...गडाच्या रक्षक...गवताच्या सोबत...

कातळाची वाट...पूर्व टोकात...

महाद्वार टाके...प्रवेश मार्क कुठून...

मी किल्ल्यात...किल्ला माझ्यात...

चौरंगनाथ वाहील भार...कुटीला कशास हवे दार!

दक्षिण दिशेचे भले पसरट टाके अनेक दगडांनी बुजलेले...

नाही वापर तर नाही...इशान्य तटभिंत व्यापणार्‍या दर्भरेषा

तेरडा दिवळीनंतरही अस्तित्व राखून...

चौरंगनाथाला बसवले नव्या देवळात

मुल्हेर खिडकी...बालेकिल्ल्यावरून मुल्हेरवर नजर ठेवण्यासाठी...

जर्द हिरव्या वनस्पतींनी जपलेत रंग बालेकिल्ल्याच्या टाक्यात

चौल्हेरचे पूर्वटोक त्यावर एक टाके...दुसरे त्याच्या पोटात तळाला

चौल्हेरचे डोंगरी रूप सजवतात कोथंब्या आणि असेच काही डोंगर 

आठवणींचा ठेवा बनेल चौल्हेरचा सर्वोच्च माथा

'बरं आहे गचपनात कोणी तरी सोबती आहे'

हात वर करून सांगतो...मी शेवट पर्यंत लढीन...

बालेकिल्ल्याचा मुख्य चिंचोळा प्रवेश मार्ग


विचार गलिच्छ...कोण पुसशी अंधारात!

वेळ कुणाला...निवडुंगा तूच तुझा बाजुला हो!

सावरण्याची वाट पाहणारी बालेकिल्ल्यावरची शेवटची भिंत

मोती टाके नितळ किती...

आक्रमाकांना कठिण घुमावदार प्रवेशमार्ग

लाख मोलाचा आनंद, मु.पो. तिळवण

तिळवणची घरे ही अशीच...यात सापडेल भरपूर आनंद आणि विशाल मनाची माणसे

उत्तम राखलेला तिळवणचा वैभवशाली जुन्या वाड्या 

रस्त्याच्या मधोमध तिळवणकरांनी जोपासलेला वटवृक्ष

किलकेश्वर महादेव, तिळवण

गावावरची इडापिडा पळवणारी, पिके गुरांना सांभाळणारी तिळवणची रक्षक देवी

स्मशानात विराजमान तिळवणचा स्मशानेश्वर 


2 comments:

  1. खूप सुंदर व प्रेरणादायी 🚩🚩

    ReplyDelete
  2. Excellent blog prashant sir! I visit chaulher regularly whenever possible as I can see this beautiful fort from our terrace as I'm from satana. And next time onwards dont do one day trip in baglan region all the way from Nashik. It becomes very hectic. You can stay at satana.
    Anyways.. Looking up for more blogs from unexplored baglan forts.. #explore_baglan

    ReplyDelete