अचाट...अफाट...विनायक बुरूजाचा तासलेला कडा |
पुराण प्रसिद्द ब्रम्हगिरीचा डोंगर उर्फ श्रीगड किल्ल्याचा हा पूर्व भाग. त्रिंबक, जव्हारचा परिसर पहिने, भिलमाळ, कोजुली आदी भागाशी जोडणार्या दोन लहान घाटवाटा या परिसरातून जातात. इंडिखिंडी हे स्थानिकांनी दिलेलं लाडाचं नाव, अर्थात ते काही नव्याने दिलेलं नाही. अगोदर पासूनच स्थानिक मंडळी ते वापरत आहेत. प्रचलित नाव म्हणजे विनायक खिंड. आदिवासींच्या भाषेचा जबर प्रभाव असल्याने विनायकचं इनायक आणि त्याची खिंडी त्यावरून उच्चारायला सोपे असे इंडिखिंडी हे नाव पडले असावे. याच विनायक खिंडीत पूर्वी पासूनची विनायक मेट आहे. अर्थात युद्दजन्य परिस्थितीत हल्ल्याचा वार सर्व प्रथम करणारे किंवा झेलणारे हे लष्करी ठाणे वजा वस्तीचे ठिकाण.
बुरूज भिंतीचे तासकाम
हत्तीमेटेकडे किंवा महादरवाजाने त्र्यंबक किल्ल्याकडे जाणारी ही महत्वाची वाट. समोरा समोरच्या युद्दात कधीच न पडलेल्या श्रीगडाचा लष्करी दृष्ट्या हा संवेदनशील भाग. चहुबाजूंनी सरळसोट उंच कड्यांचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या ब्रम्हगिरीची ही काहीशी तकलादू बाजू. कारण विनायक खिंडीतून ब्रम्हगिरी माचीवर जाण्याचे हे सर्वात कमी अंतर शत्रू सैन्याला सहजसाध्य होऊ नये या साठी विनायक खिंडीचा कडा छन्नी हाथोड्यानी तासून काढला आहे. तासकाम इतके सुरेख की, आज काळातली सर्व अद्ययावरत यंत्र समुग्री वापरली तरी अशा प्रकारे भला मोठा डोंगरकडा तासता येणार नाही. त्याकाळी अवघड अशाकड्यावर इतके कौशल्यपूर्ण तासकाम कसे केले असेल हा विचार करून आश्चर्य वाटते. दुर्ग भांडारात दोन अडीचशे फुटांचा सरळसोट कातळ फोडून केलेल्या पायर्यांच्या तोडीचे हे तासकाम.
विनायक बुरूजाचा तासलेला कडा |
त्र्यंबक किल्ल्यावर ४० बुरूज होते. गडावर जाण्याची महादरवाजाची वाट हीच वापरात होती. आज प्रमुख वाट असलेली उत्तर बाजूची वाट अस्तित्वात असली तरी तिचा पूर्वीच्या काळी वापर कमी होता. तर या चाळीस बुरूजांपैकी दोनच बुरूज अस्तित्वात आहेत. बाकी बुरूजांचे नाव निशाण दिसत नाही.
विनायक खिंडीचा बूरूज आजही सुस्थितीत आहे. अर्थात त्यावर जायचे असेलतर गडावरूनच तिथे जाण्याचा मार्ग आहे. विनायक खिंडीतून फक्त विनायक बुरूजाचा कडा आणि बुरूजाची बाह्य तटभिंत दृष्टीस पडते.
येथे विनायक मेट ही जुनी वस्ती आजही टिकून आहे. काही वर्षांपूर्वी दरडी कोसळू लागल्याने ही वस्ती पलिकडे हलविण्यात आली. तरी काही घरे अजूनही तिथेच आहेत.
असे म्हणतात की या खिंडीत पूर्वीच्या काळी गणपतीची दगडात घडवलेली मूर्ती होती. या मूर्तीचे पुजक असलेल्या कुटुंबियांनी रोजची पुजा करणे शक्य व्हावे यासाठी नंतरच्या काळात मुर्ती त्र्यंबकमध्ये अणली. रोज पुजेसाठी अर्धातास पायपीट, तसेच तुफानी पावसात तर बर्याचदा वर जाणे दुरापास्त अशा स्थितीत विनायकाची मुर्ती गावात हलविण्यात आल्याचे सांगतात. विनायक मेट व विनायक खिंड हे नाव मात्र टिकून राहिले. गडावर रेणूकेचे मंदिर आहे. ही रेणूका स्वयंभू, मोठ्या दगडी शिळेतली. रेणूकेचे मुळ स्थान हे पंचलिंगाच्या खालच्या बाजूला विनायक बुरूजाच्या वाटेवर कड्यात होते. ती रेणूका नंतरच्या काळात खाली हलविण्यात आल्याची वदंता आहे. तिच्या बाजुला रेड्याचेही शिल्प आहे. हे दोन्हीही शेंदूरचर्चित.
रेणूकेचा रमणीय परिसर |
दुधना नदी
पंचलिंगावर पाच नद्या या त्याच्या तत्पूरूष, अघोर, ईशान, वामदेव, सद्योजात या शिखरावर उगम पावतात अशी मान्यता आहे. विनायक मेटेला वळसा घालून जाणारी आणखी एक लहान नदी आहे. स्थानिक मंडळी तिला दुधना नदी असे म्हणतात. या नदीच्या तिरावरच रेणूकेचे मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला नाग गारूडी, वेताळ, देवीचे भक्त अशा कातळकोरीव शिळा वीरगळी सारख्या बसविल्या आहेत. त्याही फार पूर्वी पासून तिथे आहेत. येथे एक घाटरस्ता बांधण्यात आला. ब्रम्हगिरी गडावरची अवघी पाच दहा टक्के असलेली वनसंपदा या रस्त्यामुळे धोक्यात येऊ नये या साठी ब्रम्हगिरीच्या निसर्ग प्रेमीं मंडळींनी, 'आक्रोश ब्रम्हगिरीचा', हे अभियान राबवून रस्त्याचे काम बंद पडले होते. लोकांचा रोष लक्षात घेऊन हेच काम बेमालूमपणे टप्प्या टप्प्यात पुर्ण करण्यात आले. आता हा घाटरस्ता थेट ब्रम्हगिरीच्या गावातून जाणार्या पायरी मार्गापर्यंत भिडला आहे. पन्नास शंभर मिटरची जोड दिली तर जनक्षोभास कवडीची किंमत न देता पूर्ण केला जाणारा हा घाटरस्ता भविष्यात नक्की सुरू करण्यात येईल. त्यानंतर थेट वरच्या भागा पर्यंत प्लॉट पडतील. जी स्थिती दुर्ग भांडारच्या उत्तरी पायथ्याला तसेच येथे प्लॉटिंग पडल्याचे दिसू लागेल. अंजनेरीला दसरा घाट मार्ग बांधण्याचे काम निसर्गप्रेमी मंडळींमुळे रद्द करण्यात आले तसे भाग्य ब्रम्हगिरीच्या वाट्याला आले नाही.
हे झाड नक्की मारणार |
झाडाची साले काढण्याचे काम सुरू |
हे झाड वाचवा...पाया पडतो हे झाड वाचवा |
एक झाड कटण्याची प्रतिक्षा...
भटकी मंडळी इंडिखिंडीत बडा उदासीन आखाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारा लगतच्या चिंचोळ्या वाटेने वर जातात. अवघ्या वीस बावीस मिनीटात माणूस वर पोहोचू शकतो. वाटेवर आंब्याचे एक मोठे झाड आहे. या झाडाला काहीही झालेले नाही. ना रोग ना किडीचा प्रादूर्भाव ना त्याचे वय होऊन बुंधा निसर्गत: पोखरला गेलाय. तरीही पैंजेवर सांगतो, येत्या काही दिवसात हे झाड तोडले जाईल. भलामोठा विस्तार असलेल्या या देखण्या झाडाची सालं काढण्याचे काम सुरू आहे. वनविभागाला ते दिसणार नाही. कारण त्याच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, जे मोठ्या झाडांचे योग्यपद्धतीने रक्षण करू शकेल. किंवा दोषी लोकांवर कडक कारवाई करू शकेल.
खंदक भला लांब |
खंदक तुकडी ठेवण्यासाठी
विनायक खिंडीच्या कड्याच्या खाली कातळामध्ये भलामोठा खंदक खोदलेला दिसतो. रात्रीच्या अंधारात शत्रुला माळा लाऊन चढणे शक्य होऊ नये यासाठी हा खंदक लाकूड फाट्याने भरून टाकला जायचा. शत्रुने हल्ला केलाच तर वरून आग टाकून तो जाळून टाकला जायचा. त्यामुळे अकस्मात हल्ल्याचे प्रयत्न विफल होत. या खंदाकाचा सैनिक छावणी म्हणून सुद्धा वापर होत असावा असे बारकाईने निरीक्षण केल्यावर जाणवते. खंदकाला आच्छादनाने झाकण्यासाठी ठिकठिकणी कातळ खोबण्या आहेत. ज्यामध्ये बल्ल्या रोवून छत शाकारणे शक्य होते. पावसाळा सोडल्यास इतर ऋतूमध्ये सैनिकांच्या तुकड्या खंदकात ठेवल्या जात असतील. खंदकात कातळावरच देवाची चिन्ह कोरली आहेत. एका बाजूल दगडाला शेंदूर लावला आहे. त्यामुळे सैनिकांना भिती वाटू नये. देवाचा आसरा वाटावर या साठी ही दैवते त्याकाळी पुजली जात असावी. शे दिडशेची तुकडी पाहर्यासाठी बसविली जाऊ शकते इतका हा मोठा खंदक आहे. खंदकाच्या जवळ पाण्याची कुठलीही सोय नाही. परंतू तिथून विनायक मेट ही देान मिनीटांच्या अंतरावर असल्याने तिथल्या विहिरीतून पाण्याची पूतर्तता केली जात असावी.
विनायक खिंडीला लागून ब्रम्हगिरी डोंगराच्या पूर्व टोकाचे पाच लहान डोंगर आहेत. त्यातला कार्वीचा डोंगर खिंडीला अगदी लागून आहे. त्यावर जाण्याची जुनी वाट आहे. त्या वाटेसाठी कातळात खोबणी वजा पायर्या खोदल्या आहेत. या पन्नास पायर्या असाव्यात. चढाईसाठी हा मार्ग अतिशय आव्हानात्मक आहे. त्याला लागून असलेल्या तळईच्या डोंगरावर सुद्धा अवघड वाटेने वर जाता येते. तिथे मात्र पायर्या किंवा टाके अशी कोणत्याच खुणा नाहीत. पूर्वी कल्याणच्या बंदरात येणारा माल थळ घाट मार्गे देशावर आणल्यानंतर गुजरात, त्र्यंबक, जव्हार या भागात तो या घाटांनी पलिकडच्या बाजुला नेण्यासाठी याचा वापर केला जात असावा.
कार्वीचा डोंगर |
थोडीफार वनसंपदा याच भागात टिकून आहे. जेव्हा कच्चा रस्ता पक्का होईल तेव्हा या वनसंपदेला अखेरची घरघर लागलेली असेल हे मात्र नक्की. आज घडीला नाशिक-त्र्यंबक मार्गावरून एक नवा घाटरस्ता कोधळा, मोधळा, सीतागुंफा, तळई, कारवी या डोंगरांना वळसा घालून उत्तर बाजुच्या पायरी मार्गाच्या जवळ पर्यंत येऊन पोहाचतो. सद्या दुचीकी वाहने थेट वर पर्यंत येतात. आता हा रस्ता कोणत्याही क्षणी पक्का केला जाऊ शकतो. कारण त्यावर खडीकरण व बर्यापैकी सपाटीकरण करण्यात आलेले आहे. रिंगरोडवरून आणखी एक घाट रस्ता या मार्गाला जोडतो. तोही अपूर्ण आहे. पर्यावरणवाद्यांचा आक्रोश कमी होईल तेव्हा मार्ग पक्का करण्याच्या हालचाली पुन्हा सुरू होतील असे दिसते.
ब्रम्हगिरीच्या विशाल सरळसोट कड्याचे या भागातून मनोहारी दर्शन घडते. या कड्याला तसेच हत्ती मेटेकडे जाणार्या अशाच विशाल मोठ्या कड्याला नेहमी मधमाशांची पोळी लागलेली असतात. या मोठ्या आकाराच्या चावणार्या, घातक मधमाशा आहेत. त्यामुळे या भागात वावरताना धुर होणार नाही. अत्तराचे वास दरवळणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. हत्तीमेटेच्या वाटेवर कड्याला चाळीस पन्नास पोळी सहज लागलेली असतात.
या परिसरात गिधाडांची घरटी आहे. डोंगराच्या नैसर्गिक गुहा येथे अनेक आहेत. त्यात त्यांची ऊंचीवर घरे आहेत. आम्हाल एक लहान कळप तळई व कारवीच्यावर घिरट्या घालताना दिसला.
हा परिसर वाघाचा आहे. मागच्याच आठवड्यात येथून एक कुत्री वाघाने पळवून नेली. या कुत्रीची सात पिले ग्रामस्थ सांभाळत आहेत. विनायक खिंडीची जवळपास सर्व वस्ती ही ब्रम्हगिरवरच उत्तर बाजुच्या कड्यात हलविण्यात आली आहे. त्यामुळे विनायक मेट आता ओस पडल्या सारखी आहे. या खिंडीचा अकार गलोली सारखा आहे. तळाच्या दगडाच्या घड्या स्पष्टपणे दिसू शकतात. इतिहासाच्या अंगाने ही एक छोटेखानी भटकंती होऊ शकते.
।।जय हो।।
प्रशांत परदेशी, २२/१/२०२१
इंडिखिंडीची रेणूका |
दुप्पट खा...रमून जा...ताजे तवाने होऊन जा |
दुचाकी येथे सहज येते |
मावळतीच्या सूर्याने धरलेला कवडसा |
मुद्दाम सुट्टी टाळून फिरण्यात खरी मजा आहे |
खंदकाची चढाई...घसार्यावरून...जा जरा जपून |
समोर दिसतो तो अंजनेरी त्याचा कोथळा आणि उजवीकडे नवरानवरीचा किल्ला |
No comments:
Post a Comment