Thursday, February 4, 2021

शेलारवाडीचा घोराडेश्वर

 ५ लेख ९ लेण्या १ वृक्षारोपण


सुटीच्या दिवशी फिरायला येणार्‍यांची येथे गर्दी

पापाची ही व्याख्या जरा वेगळी आहे. ते एक छानसे टूमदार 
ठिकाण. ते न बघता पुणं सोडलं असतं तर ते पाप ठरलं असतं. 
एक शक्ती आपल्या सोबत असते, जी आपल्या हातून असं पाप 
घडू देत नाही. मावळाचा आरंभी डोंगर तळेगाव दाभाड्याचा 
शेलारवाडी किंवा घोराडेश्वर नावाने ओळखला जाणारा. खरे तर 
तिथे गेल्या पाच एक वर्षांपासून सुरू असलेल्या वृक्षारोपणाचे काम 
बघण्यासाठी तो बघायचा होता. त्यावर काही लेणी आहेत, हे 
ठाऊक होतं, पण ती ईतकी जुनी असतील, इतकी छानशी 
असतील याची कल्पना केली नव्हती. हा समूह न बघता 
नासिकला गेलो असतो तर ते पाप ठरलं असतं!

अंधश्रद्धा पाळणे जेव्हा लाभदायक असते तेव्हा ती जरूर पाळावी. ज्या ठिकाणी एखाद्या समारंभाच्या निमीत्ताने जाण्याचा योग येतो त्यावेळेला तिथल्या प्रमुख देवालयाला भेट द्यावी हा शिरस्ता जसे काही जण पाळतात, त्याच पद्दतीने तिथले डोंगर आणि त्यावरची जैविक, पुरातत्वीय संपदा पहावी, गड असेल तर तो जरूर पहावा हा शिरस्ता माझ्यापूरता मी सांभाळला आहे. तो चुकला तर माझ्या कामात गती येत नाही, ही श्रद्धा पाळली आहे, अंध असली तरीही. ३१ जानेवारीला या अंधश्रद्धेचा लाभ म्हणजे वृक्षरोपण करून जीवापाड जपलेला १ डोंगर, ५ लेख, ९ लेण्या.

एका कौटुंबिक समारंभा निमीत्त पुणे भेटीचा योग आला. 
नात्यातील नावे कसोशिने लक्षात ठेवूत
समारंभाचे सोपस्कार सर्व पार पाडत
तीन दिवसांचा खासा पाहूणचार झोडत,
'आता गरिबावर द्या करा', 
हा अविर्भाव चेहेर्‍यावर दाखवला तेव्हा अर्धा अर्धा दिवस भटकंतीची परवानगी मिळाली. पहिला अर्धा दिवस पाय तुटेस्तोवर राजा दिनकर केळकर पुराणवस्तू संग्रहालय नजरेखालून घातले. दुसर्‍या अर्ध्या दिवसासाठी अनेक विविध पर्याय समोर येत असताना, ती शक्ती कामी आली जिने शैलारवडीच्या लेणी चुकविण्याचे पाप हातून घडू दिले नाही.


पुण्यातला ब्लॉगर मित्र विनित दाते हा नेहमी सुटीचा दिवस घोरेडेश्वराच्या डोंगरावर वृक्षारोपणासाठी जातो. त्याच्या संवर्धनकार्याची माहिती अधून मधून कानी पडते. त्याला अर्धा दिवसाच्या भटकंतीबद्दल विचारले तर त्याने धोराडेश्वराला जाऊ. तासाभरात पाहून होतो. नाशिकला परतताना तो पाहूनच परतावे, असा प्रेमळ सल्ला दिला. असा सल्ला थोडाच मोडवतो. मी रहायला कोंडव्यात, हा डोंगर निगड्यात मावळात. पुण्यातल्या एका भटक्या दोस्ताला साद घातली. रविवार कामाचा  व्याप असूनही तो सकाळी पटकन जाऊन येऊ म्हणत तयार झाला. 

पुण्यापासून ४० किलो मिटर अंतरावर पुणे मुंबई महामार्गावर तळेगाव-दाभाडे येथे पोहोचायला साडे सात वाजून गेले. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या. ही वाहने धावती नव्हती, तर तर डोंगरभेटीसाठी आलेल्या हौशी पर्यटकांनी रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवली होती. 'प्रशस्त महामार्ग असूनही भल्या सकाळी वाहन उभे करायला जागा मिळू नये', यावरून हा डोंगर सुद्दा नाशिकच्या पांडवेणीच्या डोंगरासारखा तर नसेल ना? असे उगिचच वाटून गेले. महाराष्ट्रात अलिकडच्या काळात साप्ताहिक पोय मोकळे करण्याच्या मोहिमेने जोर धरला आहे. कार्यालयात कामात गढून पिचून गेलेल्यांची रोजच्या वाहतूक वर्दळीत हवापालट करण्याची घरालगतची जागा ही शहराजवळच्या लहानशा डोंगरावर बघायला मिळते तसाच हा प्रकार.

।।रान राखावे रान जोखावे रान मेळवावे परोपरी।।  निसर्गमित्रचे स्वयंसेवक वृक्षसेवेचा जयजयकार करताना

।।रान राखावे रान जोखावे
रान मेळवावे परोपरी।।

निसर्गमित्रचे स्वयंसेवक वृक्षसेवेचा जयजयकार करताना

डोंगर पायथ्यापासून थोडे दूर गाडी उभी करून विनित आणि राहुल कोरे असे आम्ही तिघे डोंगर चढू लागलो तसा मीच विषय छेडला, डोंगरावर आज गर्दी लोटलेली दिसते, काही डोंगर हे गर्दीछाप लोकांसाठी मोकळे ठेवावे, त्यांना तरी निवांतपणे कुंठे अनूभवता येणार? अशी मंडळींपासून जर काही उपद्रव होणार असेल तर ज्या डोंगरावर जैवविविधता नाजूक अवस्थेत आहे, ज्याठिकाणी पुरातत्वीय अवशेषांची दूरावस्था आहे, असे डोंगर, लेण्या, किल्ले त्याने वाचविले जाऊ शकतील. काही ठिकाणे ही आम जनतेसाठी खुली असायलाच हवीत.विनितच्या नजरेत, हा गर्दीसाठी हवा की नको, असे कोणतेच भाव वाचायला मिळाले नाही. तो फक्त माहिती देत गेला, याठिकाणी अगोदर फक्त आणि फक्त गवतीमाळ होता. निगडीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागाने येथे वृक्षारोपणाची मोहिम हाती घेतली आणि याचे रूप पालटायला सुरूवात झाली. मागिल पाच वर्षांत झाडे लावण्याच्या मोहिमेने वेग धरला आहे. कार्यकर्ते सुट्टीच्या दिवशी येऊन झाडांची निगा राखतात. नऊ हजारच्या वर झाडे लाऊन झालीत. ती जगविण्याचे काम सुरू आहे. एक एका  टप्प्यावर निसर्गमित्रचे कार्यकर्ते भेटत होते. हे काम बघण्यासाठी नासिकवरून आलोय हे कळताच त्यांचाही आनंद दुणावत होता. याठिकाणी पाण्याची टाकी बसवली होती, तिला काणी तरी भोक पाडले. या ठिकाणी काडी टाकून गवत जाळले. या ठिकाणी हा कचरा, त्याठिकाणी तो युगुलांचा ससेमिरा, त्या पलिकडे मद्यप्रेमींनी सोडून गेलेल्या पाऊलखुणा. 
''लोकांसाठी...त्यांच्या गर्दीसाठी...आखडलेल्या पायांसाठी...मोकळे मन करण्यासाठी'', घोराडेश्वरचा डोंगर असावा? या माझ्या विचारांना, नको नको...'तो नसावा', अशी कलाटणी खायला सुरूवात केली.
गर्दी थांबविणे आपल्या हातात नाही. ती आपण नियंत्रीत करू शकत नाही. 
लोकांनी असे चालावे, तसे चालू नये
हे करावे, ते करू नये
या दिवशी यावे, त्यादिवशी येऊ नये
असं वागावं, तसं वागू नये...
हा आपला दृष्टीकोण कितीही भल्या विचारांवर आधारलेला असला तरी प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. जिथे कोणालाच थांबायचं नसतं तिथे 
अशी माणसे निसुन तरी काढावी कशी? 
बंदीचे अस्त्रही जिथे कुचकामी ठरते तिथे लोकांची गर्दी नियंत्रित करावी तर ती कशी? 
इथे येणारे मुळातच सगळेच वृक्षप्रेमी नव्हेत, इतिहास अभिमानी असतीलही पण इतिहासप्रेमी नव्हे. त्यांची छाटणी कशी करणार. वनविभागाने येथे प्रवेशावर बंदी टाकून बघितली. पण तो प्रयोग यशस्वी ठरला नाही. एकवर्ग संवर्धन, प्रबोधन वगैरे करतोय तर एक वर्ष याच्याशी काहीही देणे घेणे नसलेला. त्यांना एकतर त्यांचा त्यांचा आनंद साजरा करायचा. कोणाला तर सेल्फी सारखी छायाचित्रे काढून घ्यायची. कोणाला प्यायचं, कोणाला कोणाला आणून नुसतं हिंडवायचं.
या संघर्षात झाडांची ज्या वेगाने वाढ व्हायला हवी तितक्या वेगाने ती होत नाही. पण त्याने निसर्गमित्रच्या कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. त्यांच्या अथक श्रमामुळे घोराडेश्वराच्या डोंगराला वैभव प्राप्त होत आहे. लेण्याकडचा डोंगराचा भाग हा जसा लोकप्रिय तसाच वृक्षरोपणाकडचा भाग लोकांमध्ये आकर्षणाचा विषय ठरला आहे.

जमिनीच्या पोटात खोदलेल्या सातवाहन कालीन टाक्याची खिडकी


महाराष्ट्रातल्या अनेक डोंगराप्रमाणे ही डोंगर देखिल चहुबाजूंनी गिरीपुष्पाने वेढलेली आहे. हे न केवळ विदेशी प्रजातीचे झाड त्याचे पर्यावरण साखळीवर प्रतिकुल परिणाम दिसून आले आहेत. ग्लिरिसिडीया झाडांच्या कचाट्यात इतर बहुतांशी झाडे जगू शकत नाहीत. या झाडांवर पक्षी येत नाहीत. त्यांची सावली धरत नाही, त्यामुळे त्यांच्या परिसरातली जमिन ही उन्हामुळे कडक होऊन जाते व त्यात जमिनीचे पर्यावरण कमी होऊ लागते. त्यात अर्थातच बरीच झाडे जगू शकत नाहीत. लोकांच्या गर्दीचा ताण आणि गिरीपुष्पाचा ससेमिरा यातून घोराडेश्वरच्या डोंगरावर वृक्षरोपणाने चांगले मुळ धरले आहे. पाच वर्षे वयाची झाडे बघून मोठा आनंद होतो. या भागात कातळात खोदलेली पाण्याची तीन पुरातन टाकी आहेत. काही भागात त्याचा वापर वृक्षारोपणासाठी होत आहे. 
आम्हाला प्रत्येक टप्प्यावर कार्यकर्ते वखर, खुरप चालवताना झाडांना पाणी देताना, त्यांच्या मुळाशी असलेले तणकट स्वच्छ करताना दृष्टीस पडत होते. एकएका जत्थ्याची भेट घेत आम्ही वरच्या भागात पोहोचलो. तिथून लेणींचा समुह असलेल्या उत्तरपूर्व भागात उतरलो. कातळात खोदलेल्या पुरातन पाणी टाकी पाहून जितका आनंद झाला तितकाच आनंद लेण्यांच्या दर्शनाने घडत होता. विनित दाते हा हाडाचा भटक्या आहे. अभ्यासूपणाने त्याने आपल्या भटकंतीचे वर्णन ब्लॉगच्या माध्यमातून करून ठेवले आहे. त्याच्या सोबत लेणी पाहण्याची मजा येत होती. साईप्रकाश बेलसरे, सागर बोरकर या प्रसिद्द ब्लॉगर्सचे घोराडेश्वर विषयी ब्लॉग वाचायला मिळाले. काही जणांनी व्ह्लॉग्ज म्हणजे ब्लॉग आणि व्हिडीयो यांचा मेळ साधून केलेले वार्तांकन यूट्यूब चॅनलवर टाकले आहेत. माहितीच्या महाजालावरचा हा आजघडीचा लोकप्रिय प्रकार.

सगळ्याच लेणी बघण्याचा आज योग होता. इथे पाच शिलालेख आहेत ही माहिती ऐकून आनंद द्विगुणीत झाला. लेण्या साधारणपणे डोंगराच्या मधल्या भागात आहेत. त्याच्या वरचा भाग हा वहिवाटीचा नाही. काही ठिकाणी तो खुप निसरडा. काही ठिकाणे तर इतकी जोखिमेची की, कोणी घसरलं तर त्याचं काही खरं नाही. तरीही डोंगराची शिस्त ठाऊक नसलल्या लोकांची गर्दी पाहून धातीत धडकी भरते. काही वर्षांपूर्वी एक पर्यटक येथून पाय घसरून मृत्यूमुखी पडला होता. या घटनेनंतरही लोक निर्धास्तपणे चालताना पाहून मनात भिती निर्माण होत होती. 
या लेणी खोदण्याची सुरूवात ईसवीसनाच्या पहिल्या शतकापासून झाल्याच्या नोंदी अभ्यासकांनी करून ठेवल्या आहेत. काही लेणी या अवघड ठिकाणी आहेत. तिथे उभ्या कड्याचा कातळटप्पा पार करून जावे लागते. सर्वसाधारण पर्यटक या ठिकाणी जात नाहीत. हा भाग लोकांच्या नजरेपासून दूर आहे हे बरेच आहे.
काहीशा अवघड कातळारोहणानंतर लागणारा दोन विहारांचा पायरी मार्ग

अबब...भलं मोठं पोळं...उठलं तर पळताभूई थोडी


विनीत आम्हाला एका ठिकाणी घेऊन गेला. डोंगरकड्यात वीस एक पायर्‍या आहेत. काही ठिकाणी तुटक्या आहेत. डोंगराला चिकटून सावकाशपणे वर जावे लागते. वर दोन विहार आहेत. यांची निर्मीती बौद्द साधकांसाठी केली गेली असावी. आम्ही वर गेलो तर एका विहारात दोन एक फुटाचे भले मोठे मधमाशांचे पोळे लोगलेले होते. त्यातून मधमाशांच्या पंखांचे आवाज भितीदायक वाटत होते. तिथे थांबण्याची जोखिम न पत्कारता आम्ही तात्काळ ते ठिकाण सोडले. 'याठिकाणी लेणीत मधमाळीचे पोळे लागले आहे, पर्यटकांनी तिथे जाऊ नये, अन्यथा त्याचे घातक परिणाम होऊ शकतात', हा इशारा लोकांनी ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे. अशा अवघड ठिकाणी मधमाशांचे पोळे लागले तर ते नेहमी तिथे लागत राहणार. असेही हे ठिकाण पर्यटकांच्या नजरेपासून दूर आहे. त्याचा कडा व पायर्‍या या जोखिमेच्या आहेत. मधुमक्षिकांचं जग तिथे फुलणार असे तर ते तसचं फुलू द्यावं. नाही तरी माणूस म्हणून आपण वन्यजीवांचा अधिवास व भोजन यावर प्रचंड अतिक्रमण केले आहे. 


श्री घोराडेश्वराचे मुळ स्थान - याच्या वरच्या भागात 
हर्मिकेचा भाग साबूत आहे...सुरूवातीच्या काळात येथे स्तूप असावा...

काहीशा पश्चिमी बाजूला घोराडेश्वराचे जुनेस्थान आहे. या ठिकाणी काही कोरीव स्तंभ हिनयान काळातील बांधकामाकडे निर्देश करतात. अर्थात हे देखिल मुळ शिवस्थान नाही हे हरमिकेचे अवशेष पाहून लक्षात येते. या लेणीच्या बाहेर नंदी ठेवला आहे तोही स्तूपाचा भाग असावा. मंदिराच्या भिंतीवरचा इ.स. १४३९ म्हणजे १५व्या शकतात या लेण्यांचे रूपांतर करण्यात आले त्या संबंधीचा आहे. त्यातले धनकाटक हे नाव सद्याचे डहाणू या शहराशी संबंधित असावे असा अभ्यासकांचा कयास आहे. या मंदिराला अलिकडच्या काळात लोखंडी दरवाजा बसविण्यात आला. त्यात एक शिलालेख क्षतिग्रस्त झाला आहे. या ठिकाणहून उतरून आल्यावर खालाच्या बाजुला नविन घोराडेश्वराचे लिंग स्थापित करण्यात आले आहे. ही सर्वात प्रशस्थ लेणी असून येथे शिवभक्तांची नेहमी वर्दळ असते. महाशिवरात्रीला येथे मोठे जत्रा भरते. तेव्हा गर्दी नियंत्रीत करण्यासाठी येथे लोखंडी नळकांड्यांचे दुभाजक बसविले आहे. बाहेरच्या बाजुला काही ठिकाणी अशा नळकांड्यांचे रेलिंग किंवा संरक्षक कडे तयार करण्यात आले आहे जे इथल्या गौरवशाली पुरातत्वीय बांधकामाशी अजिबात मेळ खात नाहीत. इतके अफाट बांधकाम आपण आजच्या काळात करू शकत नाही तर जे आहे त्यांचे जतन चांगल्या पद्धतीने करावे. एक पुरातत्व विभागाच्या नियमांचे कसोशिने पालन केले तरी अशा स्वरूपाचे ओंगळवाणे काम करण्याची कोणाची छाती होणार नाही. अशा कामांना परवानगी कशी काय दिली जाते हा एक प्रश्नच आहे. 

जाता जाता एक गोष्ट सांगाविशी वाटते. डोंगर कितीही लहान असला. वहिवाट गर्दीचा असला तरी तो सोपा असतो असे नाही. पुण्याला येताना माझ्याकडे भटकंतीसाठी नेहमी वापरतो तो गणवेश नव्हता व बुट नव्हते. बर्‍याच वर्षांपासून सह्याद्रीत भटकंतीचा अनूभव असल्याने जपूनच चालत होतो, तरी खाली उतरल्यानंतर एकेठिकाणी थोडी घसरगुंडी झालीच. पडतापडता हात पुढे करून सावरता आले, परंतू त्यात हात थोडा दुखावला. दुखापत मोठी नाही. अवघड ठिकाणी भरपूर काळजी घेतली होती. येथे येणार्‍यांनी ती जाणिव पूर्वक घ्यावी. 
।।जय हो।।

तुमची घोराडेश्वर शेलारवाडीची यात्री सुखकारक, निर्धोक, झाडांचे रक्षण करणारी, लेण्यांचे संवर्धन करणारी ठरो...या शुभेच्छा











रूजणे अमचा धर्म...तुमचा धर्म रखरखावाचा का नाही?

याला आता एकही पान नाही...उन्ह वाढतील तसा हा लाला लालभडक लूसलूशीत फुलांनी डवरून जाईल...


ही फुले कदाचित फक्त पक्षांसाठी राखलेली असावी...कोणी झाडावर चढून तोडू नये यासाठी कदाचित याला अशा दणकट काण्यांचे संरक्षण तर नसेल ना?

निळ्या आकाशी पडद्यावर चाफा...काटेसावराचा बहर


घोराडेश्वराची सद्याच सर्वाधिक वापरात असलेली लेणी -
अनूपम प्राचीन वारशाला यापेक्षा चांगले रूप देता येऊ शकत नाही का?



कमी वर्दळ असलेल्या वरच्या लेणीतील श्री घोराडेश्वराचे मुळ स्थान -
याच्या वरच्या भागात हर्मिकेचा भाग साबूत आहे...
सुरूवातीच्या काळात येथे स्तूप असावा...

अनूपम ऐतिहासिक वारसास्थळी अशा प्रकारचे पाईपकाम न केवळ कुचकामी...ते खुप ओंगळवाणेही दिसते...शिवाय तीन चार वर्षात त्याचा निकाल लागतो







No comments:

Post a Comment