तब्बल पाच वर्षांपासून तो हुलकावणी देत होता खैराईचा किल्ला घरापासून इतका जवळ असूनही हाती लागत नव्हता. नाट हा प्रकार खरोखरच अस्तित्वात असावा का? इतका हा छोटासा किल्ला एकापाठोपाठ एक बेत रद्द करत सूटला होता. या जन्मी खैराईचा गड सर होणार की नाही? अशी भिती वाटू लागली होती. मग मनाशी निर्धार केला, खैराईचा बेत आखायचा नाही. दुसर्या एका घाटवाटेचा बेत आखला. झालं! माझी नाट चलबिचल झाली. गपगुमान मागे फिरली. अगदी शेवटचा टप्पा सर हाईपर्यंत होतो की नाही...होतो की नाही...म्हणत अखेरीस शनिवार दिनांक ६ फेब्रुवारीस मोहिम खैराई फत्ते झाली!
|
दुरून नव्हे...प्रत्यक्ष...खैराई किल्ला साजरा |
यंदा त्र्यंबकेश्वरी मोठा मुक्काम ठोकलायं. तिथल्या दुर्गप्रेमींची गडभटकंतीमधली रूची पाहून परिसरातल्या अनेक ठिकाणांसह खैराईचे नियोजन केले होते. बाकी सगळं भटकून होत होतं. पण खैराईचा बेत ठरवला की तो रद्द व्हायचा. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा अशा हा अनूभव पाहिल्यानंतर, कोणीची तरी नाट लागली की काय? असे वाटू लागले. नाट खरोखर असते असे वाटू लागले...
|
ध्वस्त...पण पस्त नाही...मी खुणा लढ्याच्या... |
मग ठरवलं, खैराईचा बेत ठरवायचा नाही. मग पाहू नाट उलटते की काय? आश्चर्य म्हणजे मी गोंदे घाटातल्या घोड्याच्या वाटेचा बेत ठरवत होतो आणि आता मला खैराईला जाऊ...खैराईला जाऊ अशी मागणी येऊ लागली. जिथून अपेक्षा नव्हती, त्या एका मित्राने, 'चल हरसुलला जाऊ, तिथे माझे काही काम आहे. ते करू व खैराईपालीला जाऊ', अशी सुवार्ता दिली. आदल्या दिवशी नियोजन ठरले ओणि दुसर्या दिवशी सकाळीच आम्ही जे वाहन नेणार होतो, ते काही मिळू शकले नाही. तसा मोटरसायकलने जाण्याचा पर्याय होता. पण काही गोळा केलेले नवे कपडे नेऊन त्या परिसरात वाटप करायचे होते, थोडे सामान सोबत न्यायचे होते. मग दुसर्या गाडीचा ऐनवेळी बंदोबस्त झाला. आम्ही ठाणापाडाच्या दिशेने सकाळी साडे नऊ वाजता सुरूवात केली.
|
'चुलीवरचे रूचकर अन्न - जीभेवरची चवय कायम' |
'नागलीची भाकर, उडदाची भूजणी, तिखटजाळ ठेचा' भोजन तृप्ती हीच!
हनूमंत पाड्याला सुनिलच्या मित्राच्या घरी उडदाची भूजणी, तिखटजाळ ठेचा आणि गरमागरम नागलीची भाकरी रसस्वादाची सुंदर अनूभूती. हा बेत असल्यावर कुठल्याही पक्वानाची गरज भासू शकत नाही. अन्यथा आजकाल अन्नाची अशी खरीखूरी चव राहिली कुठे? पुढचे अनेक दिवस ती जिभेवर राहणार हे नक्की.
वाटेत वेगवेगळी ठिकाणे पाहताना खैराईला पोहोचायला अडीच वाजून गेले. आम्ही खैराईपालीला न जाता, साप्ट्याच्या पाड्यातून वर जाण्याचा निर्णय घेतला. कच्ची जंगलाची वाट. फक्त खडीकरण करून ठेवलेली. तिथे एक शाळामास्तरीन कदाचित बसची वाट बघत होत्या. त्यांनी ही बाजू अवघड असून पलिकडच्या आश्रमाच्या दिशेकडून जा, असे सांगितले. गाडी वळवून मुख्य रस्त्याला लागलो आणि काही स्थानिक युवक भेटले. ते म्हणाले साप्ट्याच्या पाड्यातूनच जा. पलिकडून इतक्या लांबून कशाला जातात. अर्ध्या तासात वर पोहोचाल. पुन्हा गाडी वळवली.
साप्ट्याच्या पाड्याच्या थोडं पढे गेल्यावर खाच खळग्याचा रस्ता संपला. तिथेच गाडी लावली. श्री व सौ लोहगावकर यांना पुढे आणखी एका ठिकाणी जयाचे होते. घड्याळात दुपारचे २-४४ वाजले होते. त्यांना साडे पाच पर्यंत मुख्य रस्त्यावर भेटू असे सांगून आम्ही दोघे खैराईच्या स्वप्नवत भटकंतीवर निघालो. नुकताच बारावीची परिक्षा दिलेला नवा मित्र भटकंतीच्या दुनियेत तसा नविन होता. त्याने अंदाज व्यक्त केला. गडाचा पसारा पाहून अडीच तास तरी लागतील वर पोहोचायला. मग आम्ही पैंज लावली तासाभरात पोहोचण्याची. खडीकरण केलेला रस्ता वळसा घालून वर जात होता. आम्ही लांब वळसा टाळण्यासाठी सागाच्या जंगलात शिरलो.
|
गडाचा विकास...'इतिहसा सोबत झाडांचा र्हास' |
हा परिसर म्हणजे सरळ रेषेत वाढणार्या झाडांचा परिसर. नेहमी दिसते त्यापेक्षा वेगळ्या झाडींचा प्रदेश. प्रामुख्याने साग, सादड्याची मोठ्या संख्येने झाडी. अपवादात्मक ठिकाणी अर्जून सादडा, खैराचे वृक्ष. आंबेही भरपूर. पण सगळ्यात नजरेत भरत होते ते गिरीपुष्प. महाराष्ट्रातल्या वन हद्दीत हे झाड अगदी सहजपणे दृष्टीस पडते. याला उंदिरमारी असेही नाव आहे, ते यांच्या उंदिर मारण्याच्या अनन्यसाधारण क्षमतेमुळे. परंतू असे असले तरी ही प्रजाती पर्यावरणाच्या संतुलनाला मारक आहे. हा भरपूर नायट्रोजन देणारा म्हणून ओळखतात पण हा दुसर्या कोणाला वाढू देत नाही. ना याचे सर्पण निघते ना सावली. याच्यावर पक्षी अजिबात फिरकत नाही.
|
बुटका साग....खुरटा साग...वाढू देतील तर शपथ! |
खैराई किल्ल्यावर सागाचे छान जंगल तयार करण्यात आले आहे. ते दाट नाही. सगळा साग हा अगदी अलिकडचा. मग इथल्या वनातले खरे वृक्ष गेलेत कुठे, जे या जंगलाची चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वीची कथा सांगू शकतील. खुरट्या सागाच्या वनात भल्या मोठ्या वाळलेल्या साग पानांचा तडतड आवाज करत वरचा टप्पा गाठला. या भागात मात्र खरोखरचे पन्नास ते शंभर वर्ष जुने वृक्ष दिसले. ती संख्या पण मर्यादित. वर गेल्यावर पुन्हा खडीकरण केलेला रस्ता लागला.
'हा रस्ता कशासाठी बांधला आहे. ज्या जंगलात झाडे शिल्लक राहिनात. जिथे वनविभगाने कसोशिने सागाची झाडे लावली त्या वनहद्दीत रस्ता भविष्यात वाढ होणार्या मौल्यवान सागवृक्षाचा काळ न ठरो', अशी मनोमन प्रार्थना केली.
|
'नशिब', ही दोनपाच जुनी झाडे ठेवली |
मागच्या वर्षी नासिकच्या स्थानिक वर्तमानपत्रात एक बातमी छापून आली होती. अगदी एकाच स्वरूपाची बातमी विविध वर्तमानपत्रात, हरसुल, ठाणापाडा परिसरात शिवकालिन खैराई किल्ला आहे. पर्यटन विकासाच्या अभावी या किल्ल्याची शोभा हरवली आहे. या ठिकाणी पर्यटन विकास करावा, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा'. वर्षभरातच या बातमीने परिणाम केला की काय कोण जाणे. गडाची वाट फोडून तिथे थेट वरपर्यंत घाटरस्ता तयार करण्यात आला. अशा प्रकारची मागणी करणारे ग्रामस्थ कोण असतात ज्यांना गडावर अशा स्वरूपाचा 'पर्यटन विकास' हवा असतो आणि त्यांची वर्तमानपत्रातली बातमी वाचून लागोलाग घाटरस्ता फोडून तो बांधून देणारा अधिकारी वर्ग तरी किती तत्पर म्हणावा!
कोणी तरी यातला गाळ काढण्यापूर्वी यात उत्खनन करावेगतकाळाच्या खाणाखुणा दडलेल्या असू शकतील.
''गडाची दुरूस्ती व्हावी. शक्य असेल तर डागडूजी व्हावी. गडदेवतेचा परिसर सुशोभित व्हावा. गडावरची पाण्याची टाकी पुनरूज्जीवित व्हावी. गडावर उत्खनन व्हावे व गडाचा गतकाळ माहित व्हावा. गडावर ढासळलेल्या तटबंदीची दुरूस्ती व्हावी. गडाचा इतिहास शोधण्यासाठी अभ्यासकांना आवश्यक त्या सुविधा किंवा निधी उपलब्ध करून द्यावा'', अशी मागणी कोणीच कसे करत नाही. जितका पैसा घाटरस्ता बांधण्यात खर्च केला. तेवढ्या पैशात गडाच्या संवर्धसाचे कार्य करता आले नसते का?हा पुर्णपणे आदिवासी पट्टा आहे. या भागातल्या लोकांना काय मागावे काय मागू नये यातले काही कळत नाही. त्यांना पुढे करून अशा स्वरूपाची मागणी रेटायची. पुढे गडाचे वैभव जतन होवो ना होवो. एकदा घाट फेाडला की झाला गड विकास. मग पुढे त्याच्या कामाची प्राकलेने निघत राहतात. मग हळूच गडाचे प्राचीनत्व नष्ट करणारे आणि अतिशय ओंगळवाणे दिसणारे लोखंडी नळ्यांचा रेलिंग नावाचा विद्रुप प्रकार गडाला जोडला जातो. मग लोकांचे नाव पुढे करून लोखंडी शिडी बसवली जाते. काही वर्षात ती डळमलीत होते. रेलींगची तीन वर्षांत वासलात लागते. सौर दिव्याच्या बॅटर्या व एलईडी बल्ब चोरीला गेलेले असतात. त्यांचे जिर्णशिर्ण खांब त्यांचे दिवे व बॅटर्या चोरीला गेल्याची कथा कथन करतात. मग विचार येतो, आपण चारांच्या राज्यात राहताय का?
|
खुप कठिणतेत घडलाय हो...आम्हा गडांचा जुना इतिहास |
विचारांचे काहुर डोक्यात उठले होते. सोबतचा छोटा दोस्त पुढे जंगलातली वाट कशी सापडणार या विवंचनेत होता. त्याला आश्वस्ति केले, जर तु थकलास, तुला वर जाणे शक्य नाही असे वाटले तर माघारी फिरू. तुला भिती नाही वाटली तर गडावर जाऊ. तसा तो निडर होता त्यामुळे चिंता नव्हती. अतिशय कमी वहिवाट असल्याने गडाच्या वाटा पुरेशा मळलेल्या नव्हत्या. मुख्यवाट मळलेली होती. परंत नंतर ती गायवाटांमध्ये हरवली. तीवर भरपूर गवत उगवल्याने आणि बर्याच दिवसांपासून या भागातून कोणी वर न गेल्याने आम्हाला मुख्यवाट सापडली नाही.
वरच्या भागात घसारा वाढू लागला. वाट हरवल्याने निसरड्या गायवाटांवरून एकएक टप्पा पार करत आम्ही तासाभरात शेवटच्या कातळटप्प्यावर पोहोचलो. हा टप्पा काहीसा अवघड वाटत होता. तिथे थोडी पोटपुजा केली. कोकमचे सरबत बनवले. अंगात तरतरी आली. आता वर जाऊन वाट बघावी. गरज भासल्यास दोर बांधावा म्हणून कातळटप्प्यावरून चढाई सुरू केली. सोप्या श्रेणीची चढाई असल्याने सहज वर जाता आले. नवख्या मंडळींनी येथे काळजीपूर्वक आरोहण करावे. शक्यतो पश्चिम बाजुस वळसा मारावा. तिथला कातळटप्पा त्यामानाने सुकर आहे.
|
कांडोळ...याला देखणी फुले येतात...याचा डिंक प्रसिद्ध आहे... |
वर पोहोचल्यानंतर समोरत तटाची भिंत दिसली तेव्हा लक्षात आले ही नेहमीची वाट नव्हे. खालच्या बाजुला एक ठळक वाट डावीकडच्या जंगलात उतरत होती. तिने पुढे गेलो असाते तर पलिके पश्चिम टोकावरच्या सोप्या वाटेकडे जाता आले असते. नव्या दोस्ताला चढाई करायची नव्हती. मग पंधरा मिनीटांची वेळ मागून गडाच्या माथ्याकडे कूच केली. खैराई म्हणजे काय छान वैभव. गड लहान, त्याचा पसाराही लहान. चहूबाजूंनी तटबंदीचे अवशेष.
पाण्याची भरपूर टाकी. त्यात एका टाक्यात छानशा पायर्या खोदलेल्या. वर बाजूला विटकाम केलेले. वेताळाचे छानशे खुल्या चौकटीचे देऊळ आणि त्याच्या प्रांगणात दोन तोफा. मन भरून डोळ्यात साठवून ठेवावा असा हा लहानसा चौसोपी किल्ला. याठिकाणी घाट रस्ता बनवण्या ऐवजी अगोदर हा निधी या तटाच्या दुरूस्ती, डागडूजीसाठी खर्च केला असता तर?
मध्यम श्रेणीचा कातळटप्पा...नवोदितांनी पश्चिम बाजूने जावे
त्या निधीतून नवा तट बांधण्याची आवश्यकता नाही. जुने दगडच रचून चुन्याने सांधावे. चुना सुद्दा अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार करावा. त्याचे मिश्रण मुरण्यासाठी दिडेक महिन्याचा कालावधी लागतो. इतका वेळ वाट पाहण्याची हल्लीच्या ठेकेदार मंडळींची तयारी नसते. जे पुढारी, अधिकारी बांधकामाचा कार्यादेश काढतात त्यांनाही काम झटपट करून हवे असते. इथे गडाशी कोणला देणे घेणे आहे की नाही समजत नाही. घिसाडघाई करून काम केले की, तो अपरिपक्व चुका लवकर सुटायला लागतो. त्याने केलेले बांधकाम तकलादू ठरते. त्याचा नमुना आपल्याला राजगड, तोरण्यासह बर्याच किल्ल्यावर बघायला मिळू शकतो.
खैराई म्हणजे जुन्या काळच्या रामनगर राज्याचा भाग. हे एक कोळी राज्य होते. जव्हार राज्याला चिकटून असलेला, पण त्यापेक्षा जास्त मोठा भाग असलेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतेच्या पहिल्या लूटीच्या वेळी रामनगर राज्याशी जवळीक साधली होती. परंतू ते मोगलांचे मांडलीक असल्याने महाराजांनी दुसर्या सुरत मोहिमेच्या नंतर ते राज्य स्वराज्याला जोडले. त्यावेळी त्यांनी खैराईचा किल्ला जिंकून घेतला. इतिहासाचे अभ्यासक गिरीश टकले यांनी रामनगर राज्याचा सांभाव्य नकाशा त्यांच्या, सूरतेची लुट की स्वराज्याची भरपाई, या मराठी देशा फाऊन्डेशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकात दिला आहे.
हा किल्ला महाराष्ट्र गुजरातच्या सीमावर्ती भागात आहे. गुजरातशी जोडणारा असल्याने मोगली प्रदेश ताब्यात घेण्याच्या दृष्टीने महाराजांनी हा परिसर स्वराज्यात सामिल करून घेतला. दक्षिण दिग्विजय मोहिमेनंतर त्यांचा पुढचा बेत होता, गुजरात व मध्यभारतात हातपाय पसरायचे. नियतीला ते मान्य नसावे. महाराज पन्नाशीत निवर्तले अन्यथा मोगलशाहीचा हा प्रदेश जिंकून घेण्याचा त्यांचा बेत होता.
|
घडवू नका...किमान राखाल तर राखा आम्हा |
वरच्या भागात पर्यटक नाहीत. हॉटेल नाही. वस्ती नाही. आपला मार्ग आपणच शोधत त्याचा माथा गाठायचा म्हणजे कळतो सह्याद्रीचा लढाऊ बाणा. आपले आजचे राज्यकर्ते ह्या लढावू सह्याद्रीचे पर्यटनस्थळ बनवायला निघालेत. पण ते करण्या अगोदर याचे भान ठेवायला हवे की, गडाचे गडपण संपवून विकास साधला जातोय की, तो आपल्याच हातून नष्ट केला जातोय. युरोपियन लोक लुटारी नी क्रुर असले तरी इतिहासाचे जतन ते छान पद्धतीने करतात. त्याच्या मुळ संकल्पनेला धक्का लागू देत नाहीत. किमान यूरोपात तरी त्यांना हा नियम पाळला आहे. त्याच्याकडे आपल्या सारखा खोर्यांनी विखुरलेला गडदुर्गांचा ठेवा असता तर त्यांनी त्याच्या मुळ संकल्पनेला कदापी धक्का लावला नसता. महाराष्ट्रातच हे असे का घडते.
''पुरातत्व खात्याचे नियम हे पुराणवास्तू आहे त्याठिकाणी लागू होतात. गडाचे लढावूपण नेस्तनाबूत करणारे घाटरस्ते बांधताना केवळ पुरातत्वाच्या ताब्यातली जागा नाही म्हणून असा निर्णय हा महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहसाला मारक ठरत आहे. येथे येणार्या प्रत्येकाला मोटारगाडीने गडमाथ्यावर नेण्याचा अट्टहास कशासाठी. महाराष्ट्रातले लोक इतके कमजोर नाहीत, की त्यांना सेठजींसारखे गाडीत बसून गडावर जाण्याची आवश्यक्ता भासते''. विचारांचे मनात तयार झालेले वादळ गडपायथ्या पर्यंत कायम होते.
आता पुढच्या वेळेला या गडावर जाणे होईल तेव्हा सिमेंटचा रस्ता झालेला तर नसेल ना. गडावर नळकांड्यांचे बेभरवसा रेलिंगकरण झाले नसेल ना. सोप्या कातळावर सुद्दा शिडी किंवा जीना तर झाला नसेल ना? आपल्याच्याने ते पहावणार नाही. नशिब गडभकास होण्यापूर्वी गड पाहता आला. खर्या इतिहासप्रेमींनी आपल्या लोकप्रतिनिधींना ठणकावून सांगावे, आम्हाला अशा पद्दतीचा गडविकास नको. आम्हाला खरेखूरे गडसंवर्धन हवे आहे. असे गडसंवर्धन ज्याने पुढच्या पिढ्यांनाही कळेल, आपले पूर्वज केवढ्या कठिण प्रदेशात लढले. केवढे अवघड गड त्यांनी जिंकले. बागबगिचे, डांबरी रस्ता असलेले गड त्यांनी नाही जिंकले हा इतिहास दाखविण्यासाठी काही गड तर शिल्लक ठेवा, असे खेदाने म्हणावेसे वाटते.
।।जय हो।।
प्रशांत परदेशी, सह्याद्री ट्रेकर ब्लॉगर
दिनांक ५/२/२०२१
|
गडदवणे गावातली प्रसिद्ध पाट्या वरवंट्याची देवी |
|
पूर्वजांच्या स्मृती...शिरसगाव |
|
देवकापूस: वर्षभर कापूस देणारे झाड. |
|
आंबा - फणस यूती अभेद्य |
|
कडक उन्हात बिन पाण्यात पिवळा केशरी टवटवीत झेंडू |
|
आदिवासींचे स्वत:चे दर्जेदार अन्न...यांना बर्ड फ्लू होत नाही |
|
ठाणापाडा-हरसुलचा निरव शांत परिसर |
|
साग इथले वैभव...जपाल तर जगाल! |
|
| सागाने लढवली अशी एक शक्कल | सरड्याच्या पाठीची हुबेहुब नक्कल |
|
रंगपंचमीची बेगमी...पळस फुले |
|
चिर्या चिर्यांच्या...लढ्या लढ्यांच्या...झुंजणार्या देशा |
|
घाट बांधताय...पहिले आमचे चिरे तर सांधा... |
|
अस्वस्थ चिरे...नशिबाचे फिरले वारे |
|
चिर्याखाली दडल्यात हजार कथा...त्या न जाणता कुठे चाललात! |
|
| पडली आहे तर पडू द्या | माझी तोफ जूनी | ढकलून द्याल वरून तर | होईल तिची हानी |
मी एक जातं - या गडशी नातं
जात्या वरच्या ओव्या भोवती
मन माझं फिरतं
मी माझा वेताळ
पाहे गड त्रिकाळ
उगवेल का हो माझी
रम्य एक सकाळ