उंच माझा आकाशदीवा
मोहनदरीच्या नेढ्यात...
उंच माझा आकाशदीप
सह्याद्रीच्या शिखरी
शूरांसाठी एक दीवा
दुर्गांच्या दारी
भयकारी परचक्र
उरावरी झेलले
तरवारीच्या तालावर
कितीएक शत्रू लोळविले
तुर्क हबशी मुघल
त्राही त्राही झुंजविले
यवनादींचे फेरे
प्राण अर्पूनी भेदीले
समस्त त्या वीरांना
शतश: करितो नमन
आकाशदीवा माझा
त्यांजसाठी अर्पण
।।जय हो।।
- प्रशांत, १४/११/२०२३
सह्याद्रीच्या उंच शिखरावर, गडकोटाच्या वरती मोठा आकाशदीप झळकावण्याचे माझे हे तिसरे वर्ष. माझी आवड, छंद आणि व्यवसाय आकाशकंदिल बनविण्याचा असल्याने लहानात लहान आणि मोठ्यात मोठे अनेक आकाशकंदिल बनवत असतो. मागच्या वर्षी दुर्गभांडारच्या कडेलोट बुरूजावर ९ फुट उंचीचा भव्य आकाशकंदिल लावला होता, त्याच्या आदल्या वर्षी हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर असाच नऊ फुट उंचीचा आकाशकंदिल लावला होता. यंदा बेत होता साल्हेरचा, पण काही कारणामुळे तो योग जुणून आला नाही. हातात वेळ थोडा मिळाल्याने मग मोहनदरीची निवड केली.
मोहनदरी किल्ल्याचं नेढं अगदी दुरून साद घालणारं. निसर्गाची एक अदभूत निर्मीती म्हणजे या नेढ्यांची निर्मीती. सह्याद्रीचे ते व्यवच्छेदक लक्षण. त्यातही नासिकचा कळवण तालूक्याचा परिसर म्हणजे म्हणजे नेढी आणि पातळ अश्मभिंती अर्थात डाईकच्य अश्मरचनांची मांदियाळी. याच तालूक्यात पिंपळागडाच्या रूपाने सह्याद्रीतले सर्वात विशाल नेढे आहे तर घनघोर युद्ध झालेले कण्हेर गडाचे नेढे प्रसिद्ध आहे. धोडपचा किल्ला तर तिहेरी गुणवैशिष्ट्ये बाळगणारा - नेढं, डाईक आणि व्होल्कॅनिक प्लग.
या सगळ्यात मोहनदरीचं नेढं एक वेगळंच रूप ल्यायलेलं. देवी दुर्गेने महिषासुराचा निपात करताना जो त्रिशूळ फेकुन मारला त्याने डोंगराला आरपार छिद्र पडलं अशी या मागची पौरिणिक कथा. सप्तश्रृंगीगडावर जाणार्यांचे लढ मोहनदरीच्या नेढ्याकडे वळले नाही तर नवल. इतिहास काळात कुठल्या तरी राजवटीत मोहनदरीच्या डोंगरावर किल्ला बांधण्यात आला. याचा उद्देश नांदूरी घाटावर लक्ष देण्यासाठी निर्माण केला असावा. तसा हा सातमाळा डोंगररांगेचा चौकदार म्हणून शोभून दिसतो.
नासिकच्या पिंपळपारावरची रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट अनूभवली. नव्या पिढीची दमदार शास्त्रीय गायिका स्नीती मिश्रा यांच्या नितांत सुंदर गायिकीचे श्रवण करून तडक घर गाठले आणि आकाशकंदिलावर मोहनदरी, शिडका ही किल्ल्याची अक्षरे बनवायला घेतली. तोवर माझे आजच्या भटकंतीतले सवंगडी महेंद्र पाराशरे, किशोर व संगीता हे थेटे दंपती येऊन पोहोचणार होते. हो नाही करता तासभर लागला ही अक्षरे रंगीत कागदावर कापायला. मग ती चिकटवून आम्ही नासिक सोडले. तसं आम्हाला सकाळी १-३० वाजता निघायचे होते, पण आता निघायला बरोबर दुपारचे बारा वाजले.
आज दिवाळीच्या सुट्टीमुळे रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होती. त्यात नासिक सापूतरा हा रस्ता तुलनेने चिंचोळा. ढकांबे, दिंडोरी येथे तर नेहमीच वाहतूक खोळंबलेली असते. नासिक ते नांदूरी हे किलो मिटरचे अंतर पार करायला तब्बल दोन तास लागले. तरी बरं वाटेत आम्ही कुठेही थांबलो नाही. आता थोडी पोटपूजा आणि सोबत आणलेला आकाशकंदिल किल्ल्याच्या शिखरावर नेण्याची तयारी करायची होती. अगोदर ९ फुट उंचीचा आकाशकंदिल लावण्याचे नियोजन होते, परंतू त्यासाठी मुक्कामी येण्याची आवश्यकता होती. त्यासाठी कोणी सवंगडी न भेटल्याने आकाशकंदिलाचा आकार थोडा कमी करून ५ फुट उंचीचा करण्यात आला. तोही घरीच बनवून घेतला म्हणजे किल्ल्यावर जास्त वेळ जाणार नाही. त्या गडबडीत एका बाजूच्या झिरमिळ्या निघून गेल्या. सोबत काही अवजारे आणली नव्हीत, तेव्हा गावात सुईदोरा मिळवून झिरमिळ्या शिवण्यात आल्या. २-५० वाजता आमची किल्ल्यावर चढाई सुरू झाली. आज किल्ल्यावर सोबत येण्यासाठी कोणी भेटेनात. उपसरपंचांशी बोलून रघू साबळा हा सोबत यायला तयार झाला.
तशा मोहनदरीच्या वाटा माहितीतल्या होत्या, परंतू सह्याद्रीत भकटकंती करताना स्थानिकांची सोबत केव्हाही आवडीची आणि उपयोगाची गोष्ट ठरते. रघूमुळे नेड्याच्या शंभर मिटर उजवीकडे यंदाच्या पावसाळ्यात कडा कोसळल्याचे समजला. तसं खालून ते दिसतच होतं. हा टप्पा काळजीपूर्वक पार करून आम्ही कडक उन्हात ४० मिनीटात गड गाठला, एरवी नेड्या पर्यंत पोहोचायला वीस मिनीटे पुरेशी ठरतात.
वाटेत रघूला महत्वाचा प्रश्न विचारला कड्यावर काही मधमाशांची पोळी आहेत का? या हंगामात सह्याद्रीत तशी ती सर्वत्रच असतात, परंतू नेमकी नेढ्यावर तीन मध्यम आकाराची पोळी होती. आता आम्ही मधमाशांची कडक आचारसंहिता अवलंबली. तसंही आमच्या पैकी कोणीही अत्तर, डियो स्प्रे मारून आलेलं नव्हतं. धूर करण्याचा किंवा पोळ्याला दगड मारण्याचा प्रश्न नव्हता, आवाजाने त्या चवताळायला नको याची काळजी घेणे आवश्यक होते. थोडावेळ परिसर न्याहाळल्यानंतर आकाशकंदिल कुठे लावायचा याचे आकलन सुरू केले. कुठल्याही परिस्थितीत दगडात खिळा ठोकायचा नव्हता मग अगोदरच मनात ठरवले त्या प्रमाणे नेढ्याच्या वर जाऊन दोर सोडायचा व आकाशकंल वर ओढून नेढ्याच्या मधोमध बांधायचा हा निर्णय पक्का केला. फक्त मधमाशांची पोळी असल्याने मधोमध न घेतो तोउजवीकडे घेण्याचे ठरवले. रघू सोबत असल्याने नेढ्यावर जाण्याचा विषय सुकर झाल. दक्षिण बाजूने काहीशा आव्हानात्मक कड्यावरून त्याने नेढ्यवर मुक्त आरोहण केले. इथली काही मंडळी याच मार्गाने मुक्तपणे नेढ्यावर किंवा नेढ्याच्या पलिकडे जातात. रघूला वर पाहोचायला २० मिनीटे लागली. त्याने खाली दोर सोडलाही, पण आता त्याला आकाशकंदिल बांधूनही तो दोर ओढेना. त्याचा फोनही उचलेना. मग मी वर जाऊन त्याला सांगण्याची तयारी केली. खालून ओरडून सांगून काहीउपयोग नव्हता. वर त्याच्या पर्यंत आवाज पोहोचणार नव्हता. शिवाय मधमाशांना त्याने डिवचले गेले असते. सुदैवाने दहा बारा मिनीटांनी रघूने फोन उचलला आणि आमचा आकाशकंदिल नेढ्याच्या मधे लागला. नेढ्यात आकाशकंदिल देखणा दिसत होता. भारताच्या तिरंगा ध्वजाच्या रंगसंगतीत हा लाकूड व सुती कापडापासून तयार करण्यात आला. याच्यावर मोहनदरी आणि शिडका ही किल्ल्याची अक्षरे चिकटवण्यात आलेली होती. आम्हाला किल्ल्यावर पोहोचाला उशिर झाल्याने फार वेळ न दवडता उतराई सुरू करणे आवश्यक होते, अजून तर शिखर माथाही गाठला नव्हता. नेड्याचा लहानसा कातळटप्पा उतरून पलिकडे गेलो तर तिथेही वरच्या भागात मधमाशाचे पोळे दिसले. ही चारही पोळी आमच्या पासून जवळ होती, आमच्याकडून त्यांना आवाजाचे वा इतर कुठलेही आव्हान वाटेल असे काहीही न घडल्याने बाका प्रसंग उदभवला नाही हे नशिब. इथून पुढे जवळच अगदी वाटेवर मधमाशा एक आणखी एक पोळं बनवत असल्याच्या दिसल्या. येत्या काळात या पोळ्यामुळे ही वाट पर्यटक व ट्रेकर्ससाठी निशिद्य ठरेल.
गडमाध्याकडे जात असताना सूर्य अस्ताकडे झुकलेला दिसला. सह्याद्रीतले हे अमुल्य दृष्य मनभर साठवून घेतले. काही छायाचित्रे टिपले आणि रघूला आणण्यासाठी नेढ्याच्या टपाकडे प्रयाण केले. टपावर जाण्यासाठी वरून एक कातळटप्पा उतरावा लागतो. त्याचा खालचा भाग आव्हानात्मक आहे. तिथून रघूला वर बोलावून घेतले. आता आमची स्पर्धा वेळे सोबत होती. ''ज्यांच्यामुळे आपण सगळे स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेऊ शकतोय त्या शूरवीरांना आणि राजे
तथा सरदारांना मन:पूर्वक वंदन करून व दीपावलीच्या सदिच्छा देऊन आम्ही परतीची वाट धरली. वाटेत एक पाण्यने तुडुंब भरलेलं टाकं लागलं. आणखी पुढे तीन मोठा टाक्यांचा समूह लागला तो शिगोशिग पाण्याने भरलेला होता. दोन कोरडी टाकीही लागली. म्हशींचा टोळीने आमची वाट आडवली. आमचा परिवेश पाहून त्यांना, अभ्यागत कोणीतरी आपल्या क्षेत्रात आल्याची जाणिव झाली. रघूने त्यांना बाजूला गेला. बाले किल्लावर असे पर्यंत उजेड होती. तिथून घाली उतरदाना दुहेरी तटबंदीचे ध्वस्त तळाचे अवशेष लागले. ते उतरत असताना सूर्य बुडाला. आता आम्हाला मुरमाड, गवताळ, घसार्याची वाट पार करायची होती. त्यात महेद्रचा पाय दुखावला त्यामुळे मी शेवटी राहून त्याला सोबत केली. एके ठिकाणी थोडी चुकामुक झाली, परंतू मळलेली वाट पुन्हा गवसली. विजेरीच्या प्रकाशात जंगल पार करताना जंगलातून काही प्राण्यांची चाहूल लागली. काही मोर झपकन बाजूने उडताना दिसले. समोर सप्तश्रृंगी गडाच्या घाटात वाहनांची मोठी वर्दळ अखंड सुरू असल्याचे दिसत होते. ७-०४ वाजता आम्ही मोहनदरी गावात पाऊल ठेवले.
घरात पाडव्याचा सण असल्याने लवकर पोहोचणे गरजेचे होते. वेळेचे आमचे गणित कोलमडले होते, परंतू एक नितांत सुंदर भटकंती घडल्याचे मनस्वी समाधान होते. विशेष म्हणजे आमचा पारंपारिक, पर्यावरणपूरक आकाशकंदिल सह्याद्रीतल्या शूरवीरांना पुन्हा एकदा समर्पित केल्याचे समाधान होते.
पाण्याने तुडुंब भरलेला टाक्यांचा समूह...↖↖↖↖个个个个个个 |
शिडका किल्ल्याच्या दुहेरी तटबंदीचे अवशेष... |
कोकणकडा, हरिश्चंद्रगड...५/११/२०२१ |
दुर्गभांडार, ब्रम्हगिरी... २६/१०/२०२२ |
आजच्या भटकंतीतले सवंगडी:
१. महेंद्र पाराशरे
२. किशोर थेटे
३. संगीता थेटे
४. रघू साबळे
आकाशकंदिल बनविण्यासाठी विशेष सहकार्य
जान्हवी परदेशी,
नम्रता परदेशी,
अनिता दाते
।।जय हो।।
No comments:
Post a Comment