Monday, August 9, 2021

इंद्राई - साठपाटीची वाट

 
इंद्राई किल्ल्याची साठपाटीची वाट

वातावरण मरणाचं सुंदर होतं। सातमाळेतल्या प्रत्येक डोंगरावर आज ढगांचा मुकुट धरला होता। गच्च हिरवाईने बहरलेल्या काळ्याशार डोंगरांना निळ्याशार आकाशाची पार्श्वभूमी। त्यावर पांढरेशुभ्र पुंजके। ढगांची स्पर्धा होती 'आभाळाची निळाई' झाकोळण्याची। जिथे कुठे ढग कमी पडायचे ते नील गगन डोंगरांचे रूप निखरायचे। आणि वारा? तो काळ्याकभिन्न डोंगरांना लपेटलेली ढगांची मखमाली दुलई हलकेच विस्कटायचा। हा खेळ किती काळ बघत रहावा। स्वर्ग यापेक्षा वेगळा असू शकतो का? टोलेजंग इंद्राई किल्ल्याच्या साठपाटीची दुर्मिळ वाट जोखताना, आयुष्यभर जपून ठेवावी अशी ही अनूभूती। सर्वांगसुंदर सह्याद्री भ्रमंतीची!

नासिकच्या सुरगाणा तालूक्यापासून ते अगदी हैदराबादेपर्यंत पसरलेली सह्याद्रीची प्रमुख डोंगररांग, जिचा उल्लेख 'अजिंठा - सातमाळा' असा केला जातो. यातला सातमाळा हा उल्लेख नासिक जिल्ह्यात असलेल्या डोंगरांपूरता केला जातो. मनमाड पर्यंत ही रांग ५० मैल इतकी पसरलेली. तिथून ती राजापूर, कासारी असा वळसा घेत खान्देशला विभागते. (तशी ती नाशिक जिल्ह्याला देखिल एका अखंड डोंगरमाळेने विभागते; ही इतकी सलग आहे की, तुम्ही अचला पासून ते थेट चांदवड पर्यंत डोंगरावरून चालत जाऊ शकतात) तिथे मराठवाड्याच्या सीमेवर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी निर्माण केल्या गेल्या. तिथून पुढे ती बेरार प्रांतात प्रवेश करते. बुलढाण्यातून अकोला, यवतमाळ, परभणी, निझामाबाद असा हैदराबादेपर्यंत तिचा विस्तार. 

नासिक जिल्ह्यात मोडणार्‍या सातमाळा रांगेला चांदोर किंवा चांदवडची डोंगररांग या नावाने ओळखले जाते तर अजिंठा परिसरात इनहायद्री या नावाने. हा इनहायद्री शब्द कशाची फोड करून बनलाय? तो अपभ्रंशातून आला असावा? इंग्रजांनी बर्‍याच शब्दांचे अपभ्रंश केलेत (तद्वताच अनेक ठिकाणी अगदी बिनचूकही वापरलेत) हा इनहायद्री शब्द त्यांच्या आकलनातून आलेला की, भारतीय परंपरेतला हे स्पष्ट झाले नाही. पण हा इनहायद्री शब्द इंद्राईशी मेळ खाणारा. इंद्राई आणि सह्याद्री अशा संयोगातून तो निर्माण केला जाऊ शकतो. हा अगोदरच कुठेतरी वापरात असावा असे दिसते. एका भल्या मोठ्या डोंगररांगेला ज्याचा शब्द दिला जाऊ शकतो तितकी महत्ती इंद्राईची नक्कीच आहे हे त्याचा अफाट विस्तार आणि त्यावर विखुरलेल्या पुरातत्वीय अवशेषांचे भरमसाठ प्रमाण पाहून स्पष्ट होते. असे असूनही आपल्या बद्दल फार थोडी माहित या 'शैल सुंदरी'ने जगाला उघड केलेली दिसते. प्रचंड आकारमान

सातमाळा डोंगररांगेतला सर्वात मोठा व देखणा पुरातन लेणी समूह इंद्राईवर आहे. जसा एक रांगेत देखण्या कातळ कोरीव स्तंभांनी मंडित लेणी समूह सर्वोच्च भागावर आहे काहीसा तसाच तो खालच्या भागात जिथून कातळभाग सुरू होतो त्यापायथ्याला पूर्व बाजूने सुद्धा करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. अर्थात तिथे अशा लहान खोल्या रांगेने कोरण्याचे प्रयोजन वेगळे असू शकते. शिवाय त्यावर नक्षी कामही केलेले आढळत नाही. हा एक फार मोठा मोठा पसारा असलेला किल्ला आहे. हा आकारमानाने अंजनेरी, हरिश्चंद्रगडाच्या तोडीचा. याचा वरचा भाग म्हणजे काहीसा आयाताकृती एक प्रचंड आकारमानाचा अखंड खडक. हा खडक चहूबाजूंनी सरळसोट उभा. कुठे शंभर तर कुठे दिडशे फुट उंच. आभासी तंत्राने मोजून पाहिले तर हा तीन किलो मिटरहून अधिक भरतो. याचे क्षेत्रफळ डोळे विस्फारणारे चार लाख सत्त्याहत्तर हजार आठशे शहात्तर पुर्णांक दहा शतांश वर्ग मीटर म्हणजेच एक्कावन्न लाख त्रेचाळीस हजार आठशे पंधरा पुर्णांक बावन्न शतांश वर्ग फुट इतके भरते.




दोन पायरी मार्ग

माणूस या कातळावर जाणे शक्य नव्हते तेव्हा जुन्या हिंदू राजवटीत यावर जाण्यासाठी पायरी मार्ग तयार करण्यात आला. यासाठी सुमारे दिडशे फुट उंचीचा सरळ उभा कातळकडा त्याच्या तळापासून छन्नी हाथोड्यांनी तासून पायर्‍यांचा मार्ग बनविलेला. या पार्‍यांची रूंदी कुठे १० फुट तर कुठे २५ फुट. अगदी नावाला साजेशी अशी या राजमार्गाची घडण. त्याच्या वैभवाच्या काळात सह्याद्रीतल्या सर्वात देखण्या बांधीव राजमार्गापैकी हा एक असावा याची प्रचिती त्याचे भग्न रूप पाहूनही येते. 

एक दोन पाच पायर्‍यांचा छोटा टप्पा चढून गेल्यावर कड्यात कोरलेला हा राजमार्ग सुरू होतो. तो काटकोनात डावीकडे वळण घेतो. डोंगराचा मजबूत कणखर दगडी किनारा लाकूड तासावं इतक्या सफाईने तासून काढला आहे इतके हे अफाट तासकाम. यातून दोन हत्ती सहज जाऊ शकतात इतकी त्याची भव्यता. अर्थात ही वाट दुर्घट पद्धतीने घडविलेली, म्हणजे वर जनावरे नेता येणार नाही अशी अवघड बनवलेली. घोडासुद्धा वर नेणे शक्य नाही. पायदळाला उंची आणि उंच पायर्‍यांवरून जाणे सोपे होऊ नये असाच. 

तिथून पुढे राजमार्ग उजवीकडे वळतो. हा भला मोठा पायरी मार्ग म्हणजे दिडशे फुटाचा खडक सरळ कापून तयार केलेला. त्याच्या वरच्या भागात अलिवर्दी खानाचा फार्सी भाषेतला तो प्रसिद्ध शिलालेख आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. राजमार्गाची रचना एवढी संरक्षित की, त्यावर शत्रुला सरळसरळ हल्ला करणे अवघड. कोणी वर येण्याचा प्रयत्न केलाच तर गडावरून त्याचा अस्त्र किंवा दगड आदींनी मोठ्या प्रमाणावर प्रतिकार केला जाऊ शकतो अशी ही रचना.

तोफांचा मारा करायाचं ठरलं तर त्यासाठी कुठे जागाच नाही. लांब  अंतरावरूनही तोफांचा मारा करणे कठिण. मुख्य प्रवेशद्वारावर हल्ला करायचा तर शत्रूला डोंगरांच्या कोंढावळ्यात येणे भाग. तिथे आल्यावर त्याचा निभाव तो काय लागणार. इंद्राई चहूबाजूंनी निसर्गत: संरक्षित होताच. त्याच्या प्रवेश मार्गाची रचनाही संरक्षित स्वरूपाची. त्यावर हल्ला करण्याचा विचार स्वप्नात सुद्धा कोणाला आला नसेल. 'हा पडला असेल तर केवळ शिष्टाईने' किंवा पल्लेदार तोफांचे यूग अवतरल्यानंत. स्पष्टच सांगायचे तर इंग्रजांनी मोठ्या अंतरावर मारा करणार्‍या तोफांनी आणि बंदूकाची कार्यक्षमता वाढल्यानंतरच भारतीयांवर विजय मिळवला. समोरासमोर बाण, भाले तलवारीच्या युद्धात भारतीय योद्ध्यांवर विजय मिळविणे कठिण होतं. राजमार्गाची निर्मीती भारतात दारूचा वापर होण्याच्या पूर्वीची निश्चीत. आजचा विषय राजमार्ग नाही. आजची भटकंती थरारक अशा साठपाटीची किंवा साठ पायर्‍यांच्या वाटेची. तेव्हा आपण त्याकडेच वळूया.

राजमार्ग हा पुर्व उत्तर कड्यात जेथे डोंगरधार दक्षिणाभिमूख होते त्याठिकाणी तर साठपाटी याच्या अगदी पलिकडे दक्षिण पश्चिम कड्यात, सर्वोच्च कातळ टप्प्याच्या खालच्या कातळ टप्प्यात कोरलेली. इंद्राईची पूर्व बाजू अंतर्वक्र आकाराची. एका भल्या लांब आडव्या वाटेने राजमार्गापासून साडे तीन रोडग्याच्या डोंगराच्या धारेला याची एक धार थेट जाऊन मिळते. त्याच्याच खालच्या बाजूला साठपाटी. काही भटक्यांनी साठपाटी दोन टप्प्यात विभागल्याचे म्हंटले आहे. एक ६० पायर्‍यांचा व थोडे अंतर राखून पुढे ३० पायर्‍यांचा. त्यांनी केलेली ही नोंद योग्य वाटत नाही. कारण आम्हाला ११५ पायर्‍या लागल्यात, डावीकडे सरळ गेल्यानंतर पुन्हा डावीकडे वर चढत जाणार्‍या.  दोन स्वतंत्र पायरी समूह लागले नाही. पायर्‍या चढून गेल्यानंतर सरळच साडेतीन रोडग्याकडे जाणार्‍या डोंगरधारेची वाट लागली.  

आपल्या अंगाखांद्यावर असंख्य कातळ कोरीव भग्नावशेष बाळगून असलेला इंद्राई हा राजधानीचा किल्ला होता. एका महत्वाच्या घाटावरचा पण मुख्य मार्गापासून काहीसा आत. याच्या पश्चिम बाजूला भावडबारीचा घाट तर पूर्व बाजूस राहूड घाट. जुन्या काळापासून या घटांनी मोठी वर्दळ अनूभवली आहे. इंद्राई किल्ल्यावरची जुनी बांधकामे आणि कातळातले भग्नावशेष एक दोन भेटीत पाहून होत नाहीत. 

साठपाटीच्या पायर्‍यांची रचना कमालीची सौंदर्यपूर्ण...

साठपाटी...साठ पायर्‍यांची वाट

पाचवीला पुजलेला कामाचा व्याप, ब्रम्हगिरी आदी डोंगरावर दगडखाणी आणि अधिकारी-पुढार्‍यांच्या निसर्ग गृहप्रकल्पांमुळे नासिकमध्ये तिव्र होत चाललेली सह्याद्री बचाव चळवळ, महामारीच्या रपाट्यात धंद्यातली अद्वितीय मंदी अशी कमालीची निराश मनोवृत्तीत असतांना, कोणी जर कुठल्या शोधयात्रेला साद घातली तर? त्या आवतनाचे काय होणार? 'ताणतणावावरचे सर्वोत्तम औषध म्हणजे सह्याद्री'. त्रिशतकी दूर्ग सफरींकडे वाटचाल करणारा सन्मित्र दीपक पवारने साठपाटीच्या भटकंतीची माहिती घेऊन ठेवली हाती. पायथ्याच्या देहेणेवाडीत भगवान ढगे यांच्याशी त्याचे बोलणे झाले होते. मागच्या आठवड्यात केलेल्या बाफळ्या डोंगराच्या शोधयात्रेच्या वेळी आम्ही देहेणेवाडीत जाण्याचा विचार केला हाता. परंतू बाफळ्या उतरताना जोरदार पाऊस लागला. त्यामुळे खाली उतरायला उशिर झाला. अशी ही दुर्लक्षीत, रोमहर्षक, थरारक साठपाटीची वाट. ही साठपाट म्हणजे नक्की काय असावी याचा काहीच अंदाज येत नव्हता. बैलगाडीच्या साठ्याच्या आकारासारखी कमनीय रमणीय पायर्‍यांची रचना म्हणून तर नसेल ना हे नाव दिलेले, किंवा मग तिच्या ११५ पायर्‍यांची विभागणी ६० आणि ५५ अशी करून त्यालाच ढोबळमानाने साठपाटी किंवा साठ पायरीची वाट असे नाव पडले असावे?

दीपक म्हणाला तिन जण होतील. जायचे का? म्हंटलं चला. मग तीनाचे पाच झाले. लागोलाग तिन कमीही झाले. मग दोघांनीच निघण्याचे नियोजन केले. पावसाळ्यात साठपाटी घसरडी असणार. त्यावाटेने फारच थोडी मंडळी जातात. वाटाड्या नाही मिळाला तर आपला आपण मार्ग शोधू, कुठे गरज भासली तर सुरक्षेसाठी दोर असतोच. निफाडवरून दीपक घंगाळे, अमोल जाधव आणि... असे आणखी तिघे डेहेणेवाडीत दाखल झालो. तिथे नवनाथ ढगे त्याचा चुलत भाऊ असा मोजका चमू देहेणेवाडीतून मंगरूळ - भावडबारी हा उत्तम दशेतला डांबरी रस्ता ओलांडून पावणे दोन किलो मिटर अंतरावर आपण मतेवाडीत दाखल झालो. भगवान म्हणाला गाड्या इथेच उभ्या करू. तिथून इंद्राईचा पायथा आणखी एक किलो मिटर अंतरावर. ही मते वाडी म्हणजे इंद्राईची दक्षिण बाजू. गावाला लागूनच बुधा नावाचा डोंगर आणि त्याला लागून असलेली डुक्कर नाळ ही इंद्राई व कोळधेर यांच्यात जाणारी घाटवाट. अर्थात ती तीचे पुरातन रूप सांभाळून आहे. त्यामुळे साठपाटीने वर जाऊन डुक्कर धारेने उतरण्याचे आजचे नियोजन होते. अशा पद्धतीने इंद्राईच्या दोन वाटा दृष्टीपथात होत्या. एक साठपाटीने जाऊन वर चोर वाटेने माथ्यापर्यंत पोहोचायचे आणि कोल्ह्या बाफळ्याच्या दिशेने उतरून बुध्याला वळसा मारून डुक्करधारेने खाली यायचे. बेत तर नामी होता.

बुध्याला लागून इंद्राईचा किल्ला ही त्याची दक्षिण बाजू. किल्ल्याची सर्वात कमी विस्तार असलेली बाजू. इतर तिनही बाजूंनी त्याचा विस्तार मोठा आहे. मतेवाडी कडून इंद्राईला स्थानिक मंडळी सोडली तर वर सहसा कोणी जात नाही. त्यातही गुरे चारून आणण्यासाठी किंवा लाकूड फाटा आणण्यासाठी हिचा वापर केला जायचा, हल्ली तोही जवळपास बंद झाला आहे. याचे कारण म्हणजे आता कोणी जास्त गुरे सांभाळत नाही. ट्रॅक्टर प्रत्येक दारात दिसते. शेळ्या मेंढ्या राखण्याचे प्रमाणही जवळपास संपलेले. स्वयंपाकासाठी इंधन म्हणून घराघरात गॅस आलेला. ज्यांच्याकडे नाही त्यांना गरजेपूरता लाकुडफाटा खालच्या भागात मिळून जातो. त्यामुळे वाट फारशी मळलेली नाही. पायथ्या पासूनच काटेरी बोरी, घाणेरीतून वाट शोधण्याचे आव्हान. वाट चुकली की झुडपांनी कपडे ओढून धरलेच म्हणून समजा. एकतर गाडी बरीच दुर उभी करावी लागते. तिथून मोठी पायपीट. सकाळच्या उत्साहात तशी ती जाणवली नाही. वातावरणच इतके सुंदर होते की, पाय किती अंतर कापत आहेत आणि वाट किती घसरडी, काटेरी झुडपातून जाणारी याचे भान उरले नव्हते. काही ओहळींचा परिसर शेवाळलेला त्यामुळे ओलांडण्यास अवघड, आज त्या ओहळी लिलया पार होत होत्या. हा परिणाम नितांत सुंदर वातावरणाचा. 

पावसाची ओढ

यंदा नासिक जिल्ह्याला पावसाने मोठी ओढ दिली. पावसाचे माहेर घर म्हणून ओळखले जाणारे घोटी, इगतपूरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या भागात पावसाची सरासरी कमालीची घसरली. इतकी की, भाताच्या पेरण्या आषाढ महिना येण्याच्या बेतात असताना अजून पूर्ण झालेल्या नाही. भाताची पेरणी लांबणीवर म्हणजे पावसाची सरासरी कमालीची घसरलेली हे समिकरण. याभागात अशी घटना ही दुर्मिळात दुर्मिळ. भाता सोबतच भूईमूग आदी पेरण्याही खोळंबलेल्या. त्याचे पडसाद चांदवडच्या याभागात बघायला मिळाले. ज्यांनी मातीत तलाव खोदून मेनकापडाच्या लहान तलावात पाणी साठविले त्यांना सोयाबीन, कोबी आदी पिके घेतलेली तर ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा नाही त्यांची शेतं नांगरून ठेवलेली. काही मोजक्या ठिकाणी बागायत क्षेत्र फुललेले तर काहींनी पहिल्या दोन पावसांवर पेरण्या उरकलेल्या. या भागात लहान लहान वसत्या तशी शेतातली ठिकठीकाणी घरे. त्यामुळे शेतीची उत्तम देखभाल केलेला हा परिसर. डोंगराच्या पायथ्याला काळीभोर माती तर तिथून पुढे काही मिटरपासून मुरमाड स्वरूपाची जमिन. पिंकांची निवडही नव्या काळाला अनूसरून अशी. विदेशातून आलेल्या सोयाबीनचा अधिक बोलबाला. कुठे द्राक्ष, उस, टमाटा, कोबी, युरोपियन गोड मका अशी पिके घेतलेली.

mountains from the chandwad and manmad region with clear visibility 

समोर चांदवडच्या पलिकडचे सर्व डोंगर आज स्पष्ट दिसत होते. हडबीची शेंडी, कात्रा, गोरखकड, अंकाई-टंकाई या बाजूने हा डोंगर समूह वेगळा आनंद देत होता. शिवाय त्यावर ढगांचे भलेमोठे आवरण, लख्ख प्रकाश, आकाशाची निळाई अशा मनोहारी वातावरणात चालण्याचा वेग मंदावणे स्वाभाविक होते. जमेल तितके दुरचे डोंगर बघताना औंढा पट्ट्याच्या पलिकडची कळसुबाई रांग शोधण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतू त्याभागात ढगदाटी आणि धूसरपणामुळे ते दिसले नाही. मळलेली वाट न सापडल्याने गायवाटेने आता भराभर उंची गाठली जात होती. साठपाटीची वाट ही डेहेणेवाडीतूनही दिसते. कातळात कोरून काढलेल्या पायरी मार्गाचे सौंदर्य सर्व बाजूंनी भुलवणारे. जवळ गेल्यावर, 'पूर्वकाळात काय देखणं काम करून ठेवलयं', असे अस्फुट गौरवोदगार निघाले नाही तर नवल. 

या पायर्‍या ठिकठीकाणी सतत रिसणार्‍या पाण्यामुळे शेवाळलेल्या. उजव्या बाजूला थेट दरीत कोसळणारा उभा कडा. याची कातळातली संरक्षणबाजू अस्तित्वात होती. ही वाट नक्कीच इंग्रजांनी राजधेरच्या युद्दानंतर सुरूंग लाऊन उधवस्त केलेली असणार. येथे दोर अडकविण्याची सोय नसल्याने एकाने पुढे जाऊन सुरक्षा दोर पुरवायचा व शेवटच्याने खालच्या बाजूने आणि मग शेवटच्या गड्याला वरच्याने सावकाशपणे सुरक्षा पुरवायची असे नियोजन करून आम्ही हा मार्ग पार केला. गावातली मंडळी मात्र तशीच पुढे निघून गेली. आता साडेतीन रोडग्याच्या डोंगराला जोडणार्‍या इंद्राईच्या धारेवर आम्ही येऊन पोहोचलो. स्पष्ट वातावरणामुळे हिरव्याशार डोंगरांचे सौंदर्य डोळ्यात साठत नव्हते. हा भाग भल्या मोठ्या सपाटीचा. इथून इंद्राईची पूर्वबाजू अंतवक्र स्वरूपाची. 

डुक्कर घळ

वातावरण खुपच सुंदर होते. त्याच्या सोबत दमाटपणाही तितकाच. नकळतपणे शरीरातून घामावाटे भरपूर पाणी निघून जात होते. भटकंती म्हंटलं की आव्हानात्क वाटा. वरच्या बाजूने दगड, दरड कोसळण्याची शक्यता गृहीत धरून कुठे थांबायचे? कधी थांबायचे? याचे गणित जुळविणे महत्वाचे असते. आम्ही साडे तीन रोडग्याच्या डोंगराला जोडणार्‍या इंद्राईच्या धारेवरच थांबण्याचे ठरवले. तिथे एक सपाट स्वच्छ खडक जणू आमच्यासाठीच अंथरलेला होता. सोबत आणलेल्या डब्यांवर ताव मारून आम्ही येथेच दुपारचे जेवण उरकले. आजची भटकंती तशी फार उशिरा सुरू झाली. आम्हाला ढेहेणेवाडीतून निघायला १०-१५ वाजले तर इथवर पोहोचायला १२-४०. भल्या सकाळी घरच्या मंडळींने प्रेमाने तयार केलेला स्वयंपाक अशा मनोहारी वातावरणात अधिकच रूचकर लागतो. कोणी हिरव्या मिरचीचा ठेचा, कोणाकडे सर्व कालिन लोकप्रिय बटाटा भाजी, एकाने भेंडी, एकाने गिलके अशा घरच्या बनलेल्या मस्त चवदार भाज्यांची ही दमदार मेजवानीच.

खालच्या बाजूने साठपाटी सारखी व्यवस्थित घडलेली पायरी वाट असेल तर वरच्या बाजुला शेवटचा कातळ टप्पा पार करण्यासाठीही वाट असायला हवी ना? इथे तसे काही दृष्टीस पडले नाही. साडेतीन रोडग्याच्या सपाटीवरून मुख्य कातळाला लागून असलेली एक लहानशी अनगड खडकाळ वाट चढून आम्ही राजमार्गाच्या दिशेने कुच केली. इथून इंद्राईचा विशाल टप्पा दृष्टीस पडतो. ऐतिहासिक वाटावी अशा वाटेची कोणतीही खुण इथे दृष्टीस पडत नाही. ही अगदी डोंगराच्या कडेने जाणारी अतिशय जोखिमेची आडवी वाट (traverse). हा अतिशय दाट झुडपांचा भाग. झुडपे कुठे पुरूषभर उंचीची तर कुठे डोक्याच्याही वर जाणारी. छानसे हिरवे जाड बारीक मध्यम पात्याचे विविध प्रकारचे गवताचे पुंजके, अनेक प्रकारची चीरपरिचीत झुडपे, त्यातून जाणारी ही वाट अजिबात सोयीची नाही. बर्‍याच ठिकाणी जेमतेम पाय ठेवायला जागी, तिथून सरळ दरीत उतरणारा घसारा. नजर वर करून चालण्याची सोय नाही पण खाली बघूनही चालता येत नव्हते इतकी झुडपांची दाटी. कुठे चिखल तर कुठे दगड शिळांचे खंड तर कुठे मोठाले अनगड दगडी ठोकळे. साठपाटी चढताना दमटपणा जाणवत होता तो या ठिकाणी जास्त जाणवायला लागला. वेळेवर खाणे पिणे होऊनही जीव पाणी पाणी करत होता. शरीराचे पाण्याचे गणित बिघडल्याची ही लक्षणे. असे का घडते? याचे सरळ सोपे उत्तर म्हणजे घामावाटे, उच्छवासातून बाहेर पडणारे पाणी शरीरात भरून निघत नव्हते. मला व दीपकलाही हा त्रास जाणला. स्थानिक मंडळी पुढे निघून गेली होती. 

दाट हिरव्या गचपनातली वाट शोधण्याचे दिव्य...☺


थरारून टाकणारा पाऊस स्तंभ

एका खडकातल्या ताज्या झर्‍याचे पाणी पिऊन आम्ही थोडी विश्रांती घेण्याचे ठरवले. दीपकचे डोळे लालेलाल झाले होते. साडेतीन रोडग्यावर ऊन सावलीचा खेळ सरू होता. अखेर तो आलाच...इतका वेळ ज्याने दम काढला तो पाऊस! पावसाच्या सरी सुरू झाल्या आणि काहीली करणार्‍या आमच्या जीवाला थंडावा लाभला. एका बाजूला अंधारलेले तर  समोर लख्ख उन आणि मध्ये पाऊस सरी असे तिन प्रकाशछटांचे हे जिवंत दृष्य. समोरच्या बाजुला अंस्पष्टशा पावसाच्या तीन भिन्न छटांच्या रेषा आकाशातून कोसळताना दिसत होत्या. तो स्तंभासारखा कोसळणारा पाऊस होता. म्हणजे आजूबाजूला सर्वत्र हलकासा शिडकावा तर मध्ये स्तंभ होऊन पडणारा पाऊस. असा चमत्कारीक पाऊस आजवर कधीही बघितला नव्हता. समोर हिरवाकंच साडे तीन रोडगा आणि त्यावर हे तीन स्तंभ. मागून उन्हं येत असल्याने पावसाचे थरारून टाकणारे चित्र. हा पाऊस शिडकाव्याच्या स्वरूपाचे फार जोर नसलेल्या बारीक थेंबांचा. फार वेळ चालणार नाही हे त्याचा जोर पाऊनच कळत होते. वारा मात्र आपला पूरेपूर जोर दाखवून अगणीत थेंबं दूरवर फेकत होता. थोड्याच वेळात तो थांबला.

आमच्या थकव्याचे कारण होते ते कडक उन आणि ढगांमुळे तयार झालेला दमटपणा. भरीस भर म्हणजे जमिनीत आद्रता असल्याने तो जास्त वाढला. भली मोठी आणि सतत चढत जाणारी चाल या मुळे घाम आणि उच्छवासातून पाणी बाहेर जात होते. त्यातुलनेत शरीराची पाण्याची तुट भरून निघत नव्हती. पाणी नियमीत न प्यायल्याने एकदम पाणी पिऊन भागत नाही. मला तर सकाळी उठल्या बरोबर अडीच ते तीन ग्लास गरम पाणी पिण्याची सवय आहे. तरीही आज शरीराची पाण्याची गरज भागली नव्हती. वाटेत थोडे थोडे थांबून तीन वेळा घोट घोट पाणीही घेतले होते, तेही पुरले नाही? थोड्याशा विश्रांती नंतर तरतरी आली. पावसाची सर थांबली. आमची चाल पुन्हा सुरू झाली. हिरव्याकंच वनराईचा अंगाला सतत स्पर्ष होत सुखावणारी वाट. पायाखालची जमिन अस्थिर, असमतल दगड चिखलाची, खाली थेट दरी. अंगात आलेला थकवा, त्यामुळे सावधपणे आमची वाटचाल सुरू होती. 

vertical fortification neat and immaculate wall construction that stood test of time

शंभर फुट उंचीचा तट

राजमार्गाच्या अलिकडे तीन डोंगर नाळा वर जातात त्यात दुसर्‍या नाळेत चोरवाटेवर खिडकी किवा दरवाच्या दोन चौकटी लांबूनच दृष्टीस पडल्या. अगदीच उभ्या चढणीचा हा पायरी मार्ग कोसळलेला दिसत होता. त्याच्या अलिकडची नाळ खालपासून वर पर्यंत चौकीनी दगडांची भली मोठी भिंत बांधून संरक्षित केलेली आश्चर्यकारक रचना दिसली. अशा प्रकारच्या तटभिंती सह्याद्रीत अगदी अपवादात्मक. इंद्राईवर राजदेरच्या बाजूने येतानाही एक अशीच बरीच मोठी भिंत डोंगरनाळेची वाट बंद करण्यासाठी बांधल्याचे दिसून येते. २०१८च्या भेटीत ती भिंत आम्ही बघितली होती. जुन्या बांधकामाच्या सफाईदार आणि बिनचूक कामाचा परिणाम असा की, शेकडो वर्षे या भिंती तसुभरही हलल्या नाहीत. इतकं श्रेष्ठ दर्जाचं जुनं काम बघितलं की, आजच्या सिमेंट थांपुन केल्या जाणार्‍या अल्पजीवी तकलादू बांधकामांची किव येते. आजचा महाराष्ट्रात पुराणवास्तू संवर्धनाच्या कामाचा दर्जा पाहिला तर हे काम केवढे श्रेष्ठ होते याची प्रचिती आल्या वाचून राहत नाही. शासन लाखो, करोडो रूपये काही गडांच्या संवर्धनासाठी खर्च करतं. आज आधूनिक बांधकाम साधने उपलब्ध आहेत. तळाला दगड घडवून ते गडावर नेण्यासाठी बांधकामाचे रज्जूमार्गही वापरण्यात येतात. तरीही जुन्या बांधकामाच्या आसपासही आपण पोहोचू शकत नाही? डोंगराची दिडशे ते दोनशे फुटांची दरी चक्क घडवलेल्या चौकोनी दगडांची भिंत बांधून बंदिस्त करायची म्हणजे अभियांत्रिकी आश्चर्याचा नमूना. गुरूत्वीय बल मापून ट्यूब लेव्हल व्यवस्थित तपासून केलेले हे अतिशय सफाईदार बांधकाम. इतकेच नव्हे. त्याल सांधणारा चुना केवढा समर्पक मळलेला. त्यावेळचे चुना मळण्याचेही अजोड असे तंत्र, जे आजच्या आपल्या शासन व्यवस्थेला ठाऊक नाही. (तोरणा किल्ल्यावर दोन वर्षांपूर्वी आठ कोटी रूपये पुरातत्व विभागासाठी मंजूर करण्यात आले होते. तोवर गडावर त्यांनी भरपूर डागडूजी करून ठेवली. अत्यंत बेजबाबदारपणे पुरातत्व नियमांचा सरसकट भंग करणारे लोखंडी नळकांड्यांचे संरक्षक कठडे बनवले. ना ते कठडे टिकले ना तो चुना. शेवटी आले ते सिमेंट कॉंक्रिटवर. आणि निर्णय कसला तर आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी गडावर दुर्ग इतिहासप्रेमींना मुक्काम करण्यावर बंदी. कशासाठी ही बंदी? ही मोगलाई लागून चालली की जुलमी युरोपियन राजवट? ज्यांचा एकदिवसात अभ्यासपूर्ण पद्धतीने तोरणा बघून होत नाही. त्यांनी पुन्हा खाली उतरायचे? पुन्हा दुसर्‍यादिवशी गड चढून उरलेला भाग बघायचा? तथाकथित शिवप्रेमी राज्यकर्त्यांना तर गडांच्या आणि इतिहासप्रेमींच्या व्यथा जाणून त्यावर तोडगा काढायला तर वेळच नाही) एक विस्मृतीत गेलेली बांधकाम पद्धती. अशी आव्हाने झेलत आज दुर्ग संवर्धन नावाचा खेळ सह्याद्रीच्या गडकोटावर खेळला जाताना दिसतो. आपण पुरातन भारतीय स्थापत्याच्या जवळ पास का पोहोचू शकत नाही, ही खंत मनाला अस्वस्थ करते.

unfinished leni...a series of chambers at the base of the rockportion

लेणी समूह

या परिसरात कातळाच्या पोटात दोन मोठी टाकी पाण्याने भरलेली दिसली. एक छोटासा उभ्या चढणीचा टप्पा पार केल्यावर आपण त्याच्या जवळ पोहोचतो. यातले एक टाके फारच विशाल आकाराचे अतिशय सफाईदारपणे आयाताकृतीत खोदलेले. त्याची रूंदी पन्नास फुटांपेक्षा जास्त असावी तर उंची २० फुट. दगड माती पडून हे विशाल टाकं वर पर्यंत बुजले गेले आहे. आतले पाणी स्वच्छ आहे पिण्या योग्य. दुसरं एक टाकंही बर्‍यापैकी मोठं सुबक चौकोनी थोडं पुढच्या बाजूला आहे. त्यातही दगड माती भरलेली. याच्या मागे कातळात काही खोल्याच्या रचना आहेत. त्यावर आता दगड पडून त्या उध्वस्त स्वरूपात असल्या तरी एका देखण्या बांधकामाची त्या साक्ष देतात. याचा वापर निवासासाठी, साधनेसाठी की आणखी कशासाठी', हा विचार मनात आल्यावाचून राहत नाही. डाव्या बाजूला आणखी एक फार मोठी खोदलेली गुहा दिसली. या गुहेचा वापर अलिकडच्या काळात गुरे ठेवण्यासाठी केल्याचे संकेत दिसतात. याच्या तळाला भरपूर धुळमाती साठलेली दिसली. ही माता काळी नसून पांढरी आहे. त्याच्या पुढे आणखी एक चौकोनी खोदीव गुहांची रांग लागते. या गुहांचे मुख सुबक अशा मोठ्या चौकोनी आकारात खोदलेले. महाराष्ट्रातल्या लोकप्रिय लेणी समूहात जसा मुखाकडचा भाग हा विशाल चौकोनी रचनेतून कोरलेला असतो तशाच स्वरूपाचे हे देखणे कोरकाम. अर्थात आतमध्ये मुर्त्या किंवा कुठलेही चिन्ह खोदलेले नाही. हे कदाचित अपूर्ण राहिलेले काम असावे. तसे असेल तर गडाच्या आयुष्यातला तो धकाधकीचा काळ असू शकतो.

या भागातून साडे तीन रोडग्याचा डोंगर आणि त्याच्या मागचा चांदवडचा डोंगर. त्या पलिकडे मनमाड परिसरातले डोंगर न्याहाळता येतात. खाली विशाल खोरे हे दाट झाडीने नटलेले. त्याच्या मधल्या टप्प्यातून नदी किंवा झर्‍याच्या खुणा नाहीत, पण अलिकडच्या काळात बांधलेला एक बंधारा दृष्टीस पडतो. त्यात म्हशी मस्तपैकी डुंबत होत्या. तर गावातली मुलं चेंडू फळी खेळण्यात दंग. त्यांचा दंगामस्तीचा आवाज इथवर स्पष्टपणे ऐकू येत होता. म्हणजे खालच्या बाजूने हाकारे दिले तर गडावर व्यवस्थित ऐकू येत असणार. एखाद्या किलो मिटरवरून खालचे बोलणे वर पर्यंत ऐकू येत असणार!समोर दाट झाडीत एक पुरातन मंदिर. हे शेकडो हेक्टर पसरलेलं खोरं यातून थेट वडबारे गावाकडे जाणारी वाट. याच्या पुढच्या भागात नदी असू शकते किंवा आता ती राहिली नसावी. आमच्या सातमाळा डोंगरयात्रेच्या वेळी राजमार्ग उतरून हनूमानाच्या मुर्तीच्या बाजूने खाली उतरताना आम्हाला नदी सारखी आटललेल्या दगडगोट्यांची रचना दिसली होती. तेव्हाही त्यात वाहते किंवा साठलेले पाणी दिसले नव्हते. मग तिथे असे वाहून आल्या सारखे दगड कसे काय? हा प्रश्न तेव्हा उपस्थित झाला होता. आता आम्ही वरच्या बाजूला असल्याने तिथेही नदी किंवा वरून पडणारा धबधबा दृष्टीस पडला नाही. काय रहस्य असावे या आटलेल्या नदीचे. 

चोरवाट

चोरवाट

आता आम्ही राजमार्गाने वर न जाता चोरवाटेने वर जाण्याचा निर्णय घेतला. स्थानिक तरूणांचा एक गट वरून येत होता. त्यांना विचारलं की, वाट कशी आहे. यायला काही अडचण तर नाही ना. तर ते म्हणाले ही सुरक्षित नाही, तुम्ही राजमार्गाने वर या. आम्ही म्हणालो, आम्हाला याच वाटेने वर यायचे आहे, तेव्हा ते म्हणाला मग या! आमच्या पैकी दोघा दीपकांनी ही वाट बघितलेली होती. पण सुरूवातीला ती तीच असावी का? याचा त्यांना अंदाज आला नाही. दीपक घंगाळे हा मागिल भेटीत या वाटेच्या वरच्या मंदिरा पर्यंत आला होता. वर गेल्यावर त्यांना ती ओळखता आली. अतिशय सुंदररित्या कातळात घडवलेली चिर्‍यांच्या रचनेची ही वाट चोरवाट असू शकते याची मनोमन खात्री पटते. इंग्रजांनी राजदेरवर चढाई केल्यानंतर या परिसरातल्या किल्ल्यांचामोठ्या प्रमाणावर विध्वंस केला त्यात ही भली थोरली चोरवाट पुर्णपणे उधवस्त केली गेली असणार यात शंका नाही. आज भग्नदशेतही तिचे महत्व आणि सौंदर्यपूर्ण रचना खिळवून ठेवते.

बर्‍याच गडांच्या बाबतीत, चोरवाट हा शब्द ऐकिवात येतो यात 'चोरांसाठीची', असा अर्थ होत नाही तसा तो अभिप्रेतही नाही. गुप्त वाटांना चोरवाट म्हणण्याचा प्रघात होता. हे सामान्यांच्या नजरेपासून लपवून ठेवलेले गडावरचे निष्काशन मार्ग. आणिबाणीच्या प्रसंगी या वाटांचा उपयोग गडातून बाहेर पडण्यासाठी केला जात असे. हे मार्ग वापरले जात नसत, एखादा बोगदा, भूयारातून हे मार्ग काढलेले असत काही ठिकाणी निम्मी अधिक वाट दिसायची व नंतर ती गायब व्हायची. म्हणजे ती दिसणार नाही, कोणाच्या लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने ती लपवली जायची. दरवाजा असेल तर तो माती भरून बंद करून ठेवला जायचा. गरजेच्या प्रसंगी ही माती उकरून त्यातून गडावरचे महत्वाचे व्यक्ती किंवा सैन्या तुकड्या त्याचा वापर करत. 

रामसेजच्या चोरवाटेचा इंग्रजांनी तयार केलेल्या राजपत्रात उल्लेक आढळतो. रायगडावरचा वाघ दरवाजा याचे उत्तम उदाहरण, या वाटेने राजाराम महाराजांनी प्रमुख सरदार मंडळींसह गड सोडल्याची वदंता आहे. इंद्राईची चोरवाट दूरवरून राजरोसपणे दिसते, तर ती चोरवाट असू शकते का? अशी शंका अनेकजण विचारत आहेत. त्यात तथ्य असू शकेल. परंतू हे नाव प्रचलित आहे. ते चुकीने झाले असावे किंवा चोरवाटेचा वापर बंद केलेला असावा व आणिबाणीच्या प्रसंगी तिच्या वापराचे नियोजन असावे. साठपाटीची वाट बघितल्यावर तिथून वरच्या मागात जाण्यासाठी सोयीचा मागच नाही. अवघड अशी आडवी वाट पकडूनच गडावर जाता किंवा गडावरून उतरता येऊ शकते. कदाचित साठपाटीचा संबध आणिबाणीच्या प्रसंगातला निष्काशन मार्ग असू शकतो. 

चोर वाटेवर खालच्या बाजूला दोन ठिकाणी दरवाजाची रचना आहे. मातीने हे दरवाजे चिनून ती बंद करत असावेत. चोरवाटा अशाच बंद करून ठेवल्या जातात व आणिबाणीच्या प्रसंगी माती उकरून गडावरची मंडळी किंवा सैन्य तुकड्या यातून बाहेर पडतात. या वाटेची बरीच पडझड झाली आहे. ती कोणी बांधली? कधी बांधली? केवढ्या घडामोडी तिने पाहिल्या? या सगळ्या गोष्टी काळ नावाच्या ग्रंथात कुलुपबंद झाल्या आहेत. संवर्धन व संशोधना अभावी हा मौल्यवान ठेवा आता निसर्गात मिसळून चालला आहे.  

घड्याळात दुपारचे ३-११ वाजले होते. यावाटेने वर गेल्यानंतर पलिकडून खालच्या बाजूला उतरणारी एखादी वाट असू शकते का? हे जाणने महत्वाचे होते. कारण डुक्कर घळीतून उतरण्यासाठी ते गरजेचे होते. त्याचे उत्तर कोणाकडेच नसल्याने आलोच आहोत तर माथ्यावरचा देखणा लेणी समूह बघू, वरच्या पुरातन शिवमंदिराला भेट देऊन परतीचा मार्ग धरू, असा निर्णय आम्ही घेतला. आमच्या समोर आणखी एक अडचण होती, ती म्हणजे पायरी मार्ग उतरून गेल्यानंतर आव्हानात्मक आडवी वाट पार करायची. जोराचा पाऊस झाला तर साठपाटी उतरणे अवघड ठरले असते. तिथे पोहोचल्यावर पाऊस झाला तर ती उतरण्यावाचून गत्यंतर नव्हते. मग आम्ही राजमार्ग उतरून वडबारे गावात उतरण्याचा निर्णय घेतला. तिथून एखाद्या वाहनाने मतेवाडीत येणे म्हणजे फार मोठी कसरत ठरणार होती. शिवाय आजची भटकंती खाशी थकवणारी होती. 

वर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही आजूबाजूचा परिसर न्याहाळला. डोंगर ओळखून घेतले. आज कोळधेर, धोडप आदी थेट अचला किल्ल्या पर्यंतचा परिसर ओळखता येत होता. सातमाळा रांगेतले अनेक डोंगर एकामागे एक अशा स्वरूपात इथून दृष्टीस पडतात. कोणत्याही ऋतूत हे दृष्य पाहत रहावे असे. आज तर ते हिरवेगच्च, स्वच्छ ढगांच्या निळ्या आकाशाने मढलेले. मावळीमुळे पलिकडून येणार्‍या किरणात त्यांचे सौंदर्य वेगळे खुलत होते. वाटेत एक स्थानिक कुटुंब परतताना दिसले तर गुराख्यांचा लहान कबिला पाणी भरून मोठ्या वाहण्यासाठी आलेला. इथून पाचच मिनीटात माथ्यावरचे सर्वात मंतरलेले ठिकाण लागते ते म्हणजे विस्तीर्ण आकाराचा तलाव आणि त्याच्या मागे कातळात खोतलेलले चार खांबांचे शिवमंदिर. जुन्या काळातले ज्ञात असे हे बांधकाम. स्तंभ नक्षीत कोरलेले. तर बाजूच्या भिंतींतही अर्धस्तंभाकार कोरलेले. गाभार्‍यात शिवपिंड तर शेजारच्या लहान कोनाड्यात शीर नसलेली देवीची भग्न मुर्ती. यामुर्तीला भरपूर शेदूर लावल्याने कोणत्या देवीची असावी याचा बोध होणे कठिण. ही पार्वतीची असावी असे वाटले. आणखी काही मुर्त्यांचे अवशेष भग्न स्वरपात विखुरलेले. दीर्घकाळ मुसलमान आक्रमकांच्या ताब्यात हा किल्ला होता, तेव्हा देवी देवतांच्या मुर्त्यांचा विध्वंस करण्यात आलेला दिसतो. येथे फार वेळ रेंगाळता येणार नव्हते. मावळती आम्हाला परतण्याचा इशारा देत होती आणि दिवसभर बर्‍यापैकी दम धरलेला पाऊस.

परतताने वाटेत वाड्यांची सुबक जोती आणि उत्तमरित्या आयातात कोरलेले चिरे दृष्टीस पडत होते. वैभवाच्या काळात काय देखण्या वास्तू याकिल्ल्यावर असतील? अशा भूतकाळात आपण सहजच मागे निघून जातो. आम्ही यावेळही सर्वोच्च माथा गाठू शकणार नव्हतो. पूर्व कड्यात आठ इंच व्यासाची सरळ रांगेत खोदलेली खोबण्यांची भलीमोठी रांग दिसली. अशा प्रकारे या खोबण्या कशासाठी खोदल्या असतील. हा दगड काढण्याचा प्रकार तर नव्हे किंवा मग लाकडी ओंडके रोवण्यासाठी केलेली भिंतीची सोय. 

अंचला अहिवंत पर्यंत सातमाळेचे दर्शन...

गडांची जबाबदारी कोणाची?

आता आम्ही राजमार्गाला लागलो. वरच्या भागातून सटाणा, मालेगाव, चांदवड व येवला ही गावे ओळखता आली. अलिवर्दी खानाच्या शिलालेखाच्या खालच्या पार्‍यांवर फारसा दगड गोटा पडलेला जाणवला नाही. दीपकने माहिती दिली, काही वर्षांपूर्वी तो इथे आला तेव्हा या पायर्‍या सलग होत्या. नंतर गुरे वर नेण्यासाठी त्या मधोमध फोडल्या असाव्यात. आम्हाला माथ्यावर खरोखरच म्हशी व गाईंचा कळप दिसला. 

या किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणीच घेत नाही. हे किल्ले वनखात्याच्या हद्दीत आहेत. परंतू ते पुरातत्वीय अवशेषांची, पायर्‍या, बुरूजांची त्यातल्या मुर्त्यांची जबाबदारी घेत नाहीत. ते काम पुरातत्व विभागाचे असे म्हणतात. पुरातत्व विभागाची कोणतीही अशी योजना नाही, जी गडांवरच्या विखुरलेल्या अवशेषांची, तट, भिंतींची, पायर्‍यांची, मंदिरांची किंवा मुर्त्यांचे संरक्षण करू शकेल. इतकेच काय, त्यांच्याकडे या सर्व वास्तूंची सविस्तर नोंद नाही. रोजचे सोडू या, पण अधून मधून त्यांची पाहणी करूत राहण्याची योजना नाही. ज्याला वाटेल तो गडाच्या वास्तूंना हवं ते करू शकतं, अशी ही दुर्लक्षित व्यवस्था. पायथ्याच्या वाड्या वस्त्या, ग्रामपंचायतींवर सुद्धा जबाबदारी टाकली जात नाहीत, कारण त्यांच्या हद्दी डोंगरावर येत नाहीत. गावातून कोणी असा विध्वंस केला तर त्यांची नोंद ठेवण्याची व ती माहिती पुरातत्व विभागाला कळविण्याची काही तरी व्यवस्था असायला हवी. इथक्या देखण्या पायर्‍या मधल्या बाजूने फोडून काढल्या असतील तर हा अतिशय गंभीर प्रकार आहे. भारताच्या इतिहासाचे एक न भरून निघणारे नुकसान. 

राजमार्गाचे सौंदर्य डोळ्यात साठवत आम्ही ४-५७ वाजता शेवटच्या पायरीवर दाखल झालो. आता एकच आव्हान होते, ते म्हणजा पावसाचे. आम्ही वेळेत उतरू शकणार होतो, त्यामुळे वडबार्‍यात न जाता आम्हाला आमच्या गाडया उभ्या केल्या त्या मतेवाडीत उतरता येणार होते. उन लागल्याने जी आडवी वाट पार करायला आम्हाला दिड तास लागला होता ती आता आम्ही अवघ्या ४० मिनीटात पार केली. साठपाटीवर पुन्हा सुरक्षेसाठी दोर लावला आणि साठपाटी ६-०४ वाजता पार झाली. याच्या पुढचा टप्पा सकाळी कसा चढलो काहीच आठवत नव्हते उतरताना जाणवलं ती केवढी मोठी चाल होती ती. मळलेल्या पाउलवाटा तीन ठिकाणी हरवल्या. गायवाटा, घसारे, शेवळलेल्या ओहळी पार करता करता नाकी नऊ आले. थकवा मात्र पुर्णपणे गेला होता. चालण्याचा वेग जोराचा होता. सपाटीला आल्यानंतरही आम्हाला आमच्या गाड्यांपर्यंत दिड किलो मिटर अंतर चालावे लागले. तिथे मात्र अंधार पडला. ढगे आजोबांनी नाही म्हणत असतानाही फार आग्रह करून त्यांच्या शेतातल्या नारंगी लिंबाचा चहा पाजला. काळोखातही निळ्या रंगछटेत डुक्कर घळ खुणावत होती, ''ही वाट केव्हा''?

।।जय हो।।


ही दरड अलिकडे कोसळलेली...त्यामुळे दिसून येणारे इंद्राईवरचे बारिकसे नेढे 

खजिना झाकावा तसे डोंगर झाकण्यासाठी ढगांची दाटी...डेहेणेवाडीतून!

clear visibility with passing white clouds

साठपाटीच्या वाटेवर हरळीतच पक्षाने केलेले घरटे


शेवाळलेल्या पायर्‍यांवर सुरक्षेसाठी दोर

समोर दिसतोय तो चांदवडचा किल्ला आणि नितांत देखणा रासलिंग महादेवाचा डोंगर

हातावर गुपचूप येऊन बसलेले फुलपाखरू

the ridge that leads towards the sade teen rodge mountain

its sheer luck to get facing light to get the silhouette

वर च्या कातळात दोन पायरी मार्ग

राजमार्गा पर्यंत १.६७ किलो मिटरची आडवी वाट


ना समोरचे काही दिसते ना पायाखालचे...

ही आडवी वाट म्हणजे एक दिव्यच नितांत सुंदर तरी आव्हानात्मक



साठपाटीच्या वाटेने जोडणारी इंद्राइ डोंगरधार...


हिरवी निळी पांढरी रंगसंगती आणि प्रकाशाची प्रसन्न उधळण


मधूनच समोरचा प्रकाश येऊ तृणपाती उजळून देई


ढगांचे आवरण यांना झाकून देई मग थोड्या प्रकाशाने रान उजळून देई



साडेतीन रोडगे व इंद्राई मधल्या भागातले खुरटे वन मध्ये साठवण बंधारा


हे जाड पातेदार गवत अंगाला स्पर्ष करून पवित्र करत होते


पुरूषभर उंचीचा झाडोरा फोटो पूरता थोडा कमी झालेला...



चोरवाटेवर लांबूनच दिसणार्‍या दोन मध्यम द्वार चौकटी


चोरवाटेच्या खालच्याच भागातले भव्य सुबक टाके...


केवळ छन्नी हाथोड्याच्या सहाय्याने केलेले मोठे आणि अचूक तासकाम

ही बर्‍यापैकी मोठी खोदून काढलेली गुहा सद्या गुरांचा आश्रय बनलेली


चोरवाटे समोरच्या खडकावर दिसणार्‍या या खुणांचे प्रयोजन काय असावे?


प्रकाशाचा खेळ न्यारा...समोरून येतो बदले नजरा...


कोसळलेल्या पायरी मार्गातून दिसणारा वडबारे गावच्या मागील बाजुचा परिसर


महिष एवं गोधनाचा मुक्त संचार...मुक्त विहार



इंद्राईचे शिवमंदिर

इंद्राई शिवमंदिरा समोर कातळात खोदलेला भव्य तलाव


इंद्राईवर पुर्णत: कातळ खोदून तयार केलेले सुंदर नक्षीदार शिवमंदिर


शिवमंदिराचा परिसर स्वच्छ ठेवण्याची नितांत आवश्यकता


शिवमंदिरात साठणारे पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी केलेली निष्कासन व्यवस्था



गोल छिद्यांची रांग


अलिवर्दी खानाचा शिलालेख परिसराती जिंकलेल्या किल्ल्यांचा नोमोल्लेख


या पायर्‍या मधून फोडल्यात म्हणे...तसे असेल तर हे प्रकार थांबावे कसे?


इतकी मोठी विष्टा बिबट्याची तर नक्कीच नाही?


सातमाळेच्या डोंगरांना कधी मुकुट तर कधी पूर्णाच्छादन...






















Monday, July 12, 2021

बाफळ्या



 

मोगल मराठा संघर्षात महत्वाचं युद्ध लढल्या गेलेल्या कांचना किल्ल्याला लागूनच असलेल्या बाफळ्या डोंगराची ही एक छोटेखानी भटकंती तिच्यावरच्या विशाल गुहेमुळे उत्सुकता चाळविणारी ठरली. खरे तर बाफळ्यावर वाड्याच्या जोती, बाफळ्यावर वीरगळी, बाफळ्यावर लेणी अशा वार्ता कानावर येऊन धडकावच्या. त्याच्या प्रत्यक्ष भेटीतून बर्‍याच दिवसांची इच्छा पूर्ण झाली...पण तिने काही नवे प्रश्न उपस्थित केले!

डिसेंबर २०१८मध्ये संपुर्ण सातमाळा डोंगररांग आठ दिवसांच्या तंगडतोड भटकंतीत डोंगराच्या धारेने पार करण्याचे स्वप्न साकार झाले होते. त्यावेळेस कांचना किल्ल्यावरून पूर्व बाजूने उतरून बाफळ्यावर जाण्याचे नियोजन आडवी वाट न सापडल्याने कोलमडले होते. कांचनाचा या बाजूकडून तिव्र उतार व घसारा असल्याने बाफळ्याला जोडणारा मार्ग सापडू शकला नव्हता. त्या दिवसाचे नियोजन भले तगडे होते, ''सकाळी कांचना गाठून तिथून कोळधेर आणि तो करून राजधेरचा पायथा''. ''आम्ही सोबती दोघेच''. वाट सांगणारा कोणीही न भेटल्याने आम्हाला बाफळ्याला बगल द्यावी लागली होती. नंतर पुढचा काही काळ अनेक ठिकाणहून बाफळ्याचे नाव कानावर येत होते. अनेक प्रतिथयश डोंगर भटक मंडळी बाफळ्याचा डोंगराचा उल्लेख करत. त्यावर कोणी जाऊन जाऊन आल्याची माहिती मिळत नव्हती. वर काय असावे? की काही नसल्याने लोक वर जात नाही? असे प्रश्न पडत. 

एकदा बागलाण भागातल्या भटकंतीसाठी जाताना, शिरस्त्या प्रमाणे भावडबारीत दोन क्षण थांबलो तर तिथे खेलदरीचे बाळू बाबा भेटले. 'शहंशा ए भावडबारी' या नावाने परिचीत असलेल्या पिराची ते मनोभावे पुजा अर्चना करतात. या अवलियावर परिसरातल्या जनतेची मोठी श्रद्धा. 'त्याची सेवा केली तर बरकत मिळते', या भावनेतून ते बालपणापासून त्याची देखभाल करत आहेत. बाफळ्या विषयी चौकशी केली तर त्यांनी वर जाता येते असे सांगितले. अवघ्या तासाभरात वर पोहोचू, चलायचं असेल तर चला! अशी त्यांनी लगेच तयारी दर्शविली. अर्थात त्यावेळी वेगळे नियोजन होते त्यामुळे जाणे शक्य नव्हते झाले. बाबांना विचारलं वर पाणी आहे का? ते म्हणाले कायम असतं! गुहा, पायर्‍या, टाकी आहेत का? असं विचारलं तर ते म्हणाले पायर्‍या नाही पण गुहा व टाके आहे. 


११ जुलै २०२१

एकदाचा बाफळ्याचा योग जुळून आलाच. दीपक पवार, अजय हातेकर असा आमचा तिन जणांचा छोटेकानी ताफा. दीपकने खेलदरीतून बाबांना घेऊ किंवा भावडबारी घाटात ते भेटतील असे सांगत रविवारीय भटकंतीचे नियोजन केले. नासिक-सोग्रस फाटा-खेलदरी हा दुचाकीचा प्रवास पावसाळी वातावरणात सूसाट महामार्गाचा रस्ता असल्यने कधी पूर्ण होतो ते कळत सुद्धा नाही. खेलदरीत बाबा घरी नव्हती. ते कुठे गेले हे घरच्यांना माहित नव्हते. ते गावाच्या वेशीवर एका हॉटेलच्या बाहेर अचानक दिसले. त्यांनी आम्हाला बरोबर ओळखले. म्हटलं चलायचं का बाफळ्यावर. म्हणाले चला जाऊन येऊ.

चांदवड तालुक्याचा जास्त पाऊस असलेला हा परिसर गेल्या काही वर्षांपासून सतत घटनारे पर्जन्यमान. बेफाम वृक्षतोड, ग्रीष्मात लागणारे जंगल वणवे. हरितक्रांतीच्या फेर्‍यात अडकलेला लहान शेतकरी. वरून पिण्याच्या पाण्याचे तोकडे नियोजन या अडचणींना ग्रासलेला. रोजगारवाढीसाठी, राष्ट्रीय महामार्गालगत मुबलक खुल्या जागा असूनही परिसरात लहान मोठे उद्योग मोठ्या प्रमाणावर आणता आले नाहीत, त्यामुळे औद्योगिक विकासातही हा परिसर मागासलेला. पिढीजात श्रीमंत, राजकीय पाठबळ असलेली मंडळी, घरात सरकारी नोकरदार किंवा कोणी ठेकेदार असलेल्यांनी आपल्या जागेवर हॉटेलचे व्यवसाय नावाचे पिक उभे केले. कोणी स्वत: तर कोणी जागा भाड्याने देऊन. काहींनी शेत बागायती करून घेतलेले ही या भागातली श्रीमंतीची व्याख्या. 

छोटे शेतकरी शेतीचा हंगाम आटोपल्यावर शिरस्त्या प्रमाणे मोलमजूरी करून आयुष्य कंठणारे. बाळू पोपट पवार बाबांची स्वत:ची शेती नाही. आता वयोमानाने त्यांच्याकडून शेतीची कामे होत नाही. मुलं थोडी फार जमिन बटाईने कसतात. त्याने दोन वेळची भाकर जोडण्यापलिकडे हाती काही लागत नाही. मग बाबांचे मन अवलियाच्या सेवेत रमते. त्यांचे वडीलही मनोभावे सेवा करायचे. बाफळ्या, कोल्ह्या, कोळधेर परिसरात रानात भटकायचे. औषधी वनस्पतींची चांगली जाण होती. बाळू बाबांच्या लहानपणी ते निवर्तले. 

पावसाळ्याचे चार महिने आणि नंतर हिवाळ्याचे दोन महिने संपले की निष्पर्ण सातमाळेचे डोंगर रखरखीत भासू लागतात. वनसंपदा औषधापूरतीही शिल्लक राहिलेली नाही. कोळधेर, इंद्राईचा परिसर असे मोजकेच वनपट्टे उरलेत. मोठाल्या वृक्षांची बातच नको. बाकळ्या आणि कोळधेरच्या मध्ये अर्धा किलो मिटरचा अगदी बारीकसा जंगल पट्टा परिसरातल्या अनेक वसाहतींची लाकुड सर्पणाची गरज भागवतो. मोठी झाडे ना इथे शिल्लक राहिली ना त्यांचे रोपण करून ती जगविण्याचे प्रयत्न केल्या तीस चाळीस वर्षात कोणी केले. डोळ्यांत अल्पशी हिरवाई साठवत चिंचेच्या माळावर कधी पोहोचलो हे कळेच नाही. तसा हा ठिसूळ दगडाचा मुरमाड डोंगर. याचा सर्वोच्च माथा म्हणजे एक प्रकारची भली मोठी कातळ टोपी. या कातळाला चहूबाजूंनी तिव्र उतार. सगळी माती ही काळी सूपीक माती. ही सुपिकता तिथल्या गवत झुडपांमुळे आणि त्या आश्रयाने जगणार्‍या सृक्ष्म जीवांमुळे लाभलेली. पावसामुळे ओलसर बनलेल्या या वाटा कमालीच्या निसरड्या बनलेल्या. मुलत: मुरमाड जंगलहीन स्वरूपामुळे हा उन्हाळ्यात भटकण्याच्या दृष्टीने सोयीचा नाही. 


नासिकचा प्रांत बागलाणशी जोडणारी हा जुना व्यापारी मार्ग असू शकतो का? हे स्पष्ट होऊ शकले नाही. ही महत्वाची घाट वाट होती हे नक्की. त्यावरून घोडी जात असावीत. लमाण, बंजारे, चारणांचे तांडे आपल्याजवळच्या घोडी, बैलांवरून अल्याड पल्याड सामानाची ने आण करत असतील. काळ्या खडकाळ धोरेमुळे बैलगाडीची यातून वाट नसावी असे वाटते. ती वाट पलिकडे राहूड घाटातून नासिक-बागलाण जोडत असावी. या कारणामुळे जुन्या काळापासून बाफळ्याचा राजकीय वापर झाला नसावा. अन्यथा या डोंगराचा किल्ला, चौकी म्हणून वापर करण्यास प्रचंड वाव होता. वरचा कातळ चौबाजुंनी उभ्या कड्या मुळे संरक्षित. त्याला तिव्र मातीच्या घसार्‍याचे संरक्षण आणि बाकळ्याचे एकुण रूपच असे की, त्याचा माथा तळापासून वरवर निमुळता होत जाणारा. त्यामुळे किल्ला असता तर तो राखणे सोयीचे ठरू शकणारे! 


आम्ही उजव्या हाताच्या बाजूने वळसा मारून उत्तर-पूर्व टोक गाठले. या ठिकाणहून चौल्हेरचा किल्ला स्पष्टपणे दिसतो. सेलबारी डोलबारी डोंगररांग ढगाळ वातावरणामुळे दिसू शकली नाही. कांचना ते जावळ्या पर्यंतचे सातमाळेच्या डोंगरांचे एका वेगळ्या कोनातून दर्शन घडते. जो लेकुरवाळा डोंगर राष्ट्रीय महामार्गावरन एखाद्या सुळ्या सारखा दिसाते तो इथून भला पसरट दिसत होता. स्पष्टच आहे की तीही एक अग्नीजन्य भिंत. डाईकची अश्मरचना. कांचना किल्ला येथून भान हरपून बघावा. त्याची या बाजूने दिसणारी बाजू म्हणजे उभा उंच कातळ.


गुहा आणि गरूड टाकं

बरोबर उत्तर-पूर्व टोकावर गरूड टाकं. खडकातून पाण्याचा अगदीच बारीकसा झिरपा. तर पलिकडे दिड फुटाचा कातळात खोदलेला चौकोनी खड्डा. तेच गरूड टाके. हे मोठं टाकू असू शकेल का? बाजूचा खडक उध्वस्त करून टाके फोडण्यात आले असावे का? इंग्रजांनी सह्याद्रीतले पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणावर नष्ट केले त्या वरवंट्यात? असे काही घडले असू शकेल का? याभागात आदिवासी योद्द्यांनी इंग्रजांना डोंगराच्या आश्रयाने सळो की पळो करून सोडणारे लढे दिले आहेतच. इंग्रजांनी केलेल्या विद्वसांचा प्रश्नही अनुत्तरीत राहणारा. असे असंख्य प्रश्न उठवत आम्ही नवनाथाच्या गुहेकडे प्रस्तान केले.


हा तिव्र उताराचा परिसर. आता येथून लूटून नेण्यासारखे असे काहीच उरले नाही. इथली झाडांची ताड पूर्ण झालेली आहे. अठरा विश्वे दारिद्र्यात खितपत राहणारी आसपासच्या वाडी वस्त्यांमधली जनता येथे शेळ्या चराईला येते. पूर्वी भरपूर वन होते. लोक गोई घेऊन चरायला यायचे. आता गाई नाही आणि मोठाली झाडेही नाहीत. बाफळ्याच्या ढोरवाटाही पुसल्याची खंत बाळूबाबा व्यक्त करतात. आम्ही डोंगरभटके म्हणजे डोंगराचे पाहूणे. वनांचे प्राणपणाने रक्षण करणारे. वन असो की, कातळखडक की तिथली हरेक वस्तू, ना खडकाला कुठले नुकसान पोचावे ना सोबत काही घेऊन जावे', अशा भावनेतून अभ्यास आवलोकन करण्यासाठी, इतिहास व संस्कृती जाणर्‍यासाठी डांगरास भेट देणारे. सह्याद्री आपल्यावर रूष्ट होणार नाही याची सदोदित काळजी घेणारे. पण तिथल्या सुक्ष्म जीवांना आमचा स्वभाव कुठे ठाऊक? त्यांनी हाता पायांना काही डंख दिले. मधमाशा नव्हत्या. मच्छरही नव्हते. काही तरी वेगळेच किट. तिथे त्यांची सत्ता. त्यातून वाट काढत नवनाथांचे ठाणे गाठले. वर पोहोचताच आनंद गगनात मावेनासा झाला. आम्ही एक भल्या मोठ्या गुहेसमोर उभे होतो. पुरातन काळात माणसाने सह्याद्रीच्या कातळात काहीही खोदलेले पाहणे नेहमीच एक रम्य अनूभूती ठरते. इथे तर भली मोठी गुहा कोरलेली. 


विजेर्‍या विझतात का...


ही गुहा म्हणजे सातवाहनांच्या शैलीची आठवण करून देणारा कातळाचा एक मोठा स्तंभ मध्ये ठेऊन केलेल्या कोरकामाची आठवण करून देणारी. आतमधली बारीक वाळू सदृष्य माती हे पाण्याचे विशाल टाके असावे याची जाणिव करून देत होते. पण भर पावसात त्यात पाणी नाही म्हटल्यावर ते कशामुळे आटले असावे हे कळण्यास मार्ग नाही. ही गुहा तीन भागात विभागलेली. उजवीकडे सात व सहा फुट रूंदीचे व अडीच फुट उंची तर डावीकडे १२ फुट लांबीचे परंतू थोडे अधिक उंचीचे गुहेचे मुख. उजव्या बाजुला ती चांगली वीस फुट खोल आहे. आत आणखी चार मोठ्या खोबण्या काही माणसं आत बसू शकतील इतक्या मोठ्या पण जेमतेम आकाराच्या. ध्यान धारणे साठी आदर्शवत ठिकाण.डाव्या बाजूचे दोन मुख पुढे आत अणखी एका गुहेच्या मुखापाशी नेतात. तिथून ती आत चिंचोळी होत जाते. तिचे टोक दिसत नाही. आत सरपटत गेलो तर तिची खोली कळू शकली असती. आमच्याकडे वेळेचे नियोजन नसल्याने तो विषय घेतला नाही. शिवाय सोबत प्रशिक्षित चमु नसल्याने तिचे अंतरंग शोधण्याचा विचार बुजाला ठेवावा लागला. 

आम्ही उगाचच बॅटरीचा उजेड टाकून, मार्कंडेय किल्ल्याची अलिकडे प्रसिद्ध झालेल्या दंत कथे सारखे या गुहेतही विजेरी बॅटर्‍या विझतात का? या प्रयोगाची गंमत केली. विजेरी विझली नाही. आत जाऊन सहा महिन्यांचा एक दिवस करणारा मार्कंडेयकथे सारखा प्रयोग करायचा नसल्याने गुहेतून बाहेर पडून शेवटच्या कातळ टप्प्याला भिडायचे ठरवले.


पाच सहा वर्षांपूर्वी बाळू बाबा शिखर माथ्यावर ज्या वाटेने गेले ती वाट सापडली. पावसाळ्यात सुद्धा त्यावर काटेरी झुडपांचे अधिराज्य. गरजेपूरते काही साफ करत आम्ही चढाईच्या टप्प्याच्या पायथ्याल पोहोचलो. उभे राहण्यासाठी इथे जेमतेम जागा. झाडीतून कुठे सरकायचे तर अंगावरचे कपडे ओढून घेणारी काटेरी झुडपे. त्यांच्याशी झुंजत पुढच्या बाजूने दिसणारा एक सोपा कातळ टप्पा निवडला. गिर्यारोहणाची उपकरणे सोबत नसल्याने चढाई मुक्तपणे करायची होती. पावसाचे सावट होते. कातळ ओला झाला तर ना चढाई होऊ शकते ना उतराई. वरचा टप्पा गाठला तरी त्याच्यावरचा कातळ कसा असू शकतो याचा काहीच अंदाज येत नव्हता. 


'आदेश' आणखी एका शिखराचा


बाळू बाबा ज्या वाटेने चढले होते त्या वाटेने वर जाण्याची त्यांची इच्छा नव्हती. सुमारे पाऊण तास कुठल्या बाजुने चढाई करायची यातच गेला. आम्ही येण्यापूर्वी एक मध्यमवयीन गुराखी समोर शेळ्या चरताना दिसत होता. त्याला मोठी विनवणी करून चढाई मार्ग सांगता का, अशी विचारणा केली. ते पलिकडच्या कड्याजवळ शेळ्या राखत होते. त्यांच्यात व आमच्यात भरपूर अंतर असल्याने संवात होत नव्हता. शेवटी त्यांना जवळ येण्याची विनंती केली. शेलू गावातले दोन तरूण वर जाण्यासाठी आले होते, परंतू त्यांना चढाईचा मार्ग ठाऊक नसल्याने ते गुहेकडे निघून गेले. पंधरा मिनीटे वाट पाहिल्यानंतर गुराखी काका आले आणि त्यांनी उभ्या धारेतून वर जाण्याची वाट दाखवली. 

आता आमचा उत्साह दुणावला. मागच्या महिन्यात इखार्‍याच्या सुळक्यावर मुक्त आरोहण केल्याने तो अगोदरच उंचावलेला होता.

त्यावेळ प्रमाणेच यावेळी देखिल नाथांची आमच्यावर पुन्हा एकदा कृपाच म्हणावी. हाता पायांची पकड घेत पंधरा फुटाची चढाई केली तोच वरून एक प्लास्टिकची दोरी लटकताना दिसली. झेंडा लावण्यासाठी वर जाणार्‍या भक्त मंडळींनी ही दोरी लावल्याचे स्पष्ट झाले. चाळीस एक किलो वजनाचा माणूस ही धोरी धरून वर जाऊ व उतरू शकतो. अशी ती जेमतेम मजबूतीची. शेतीच्या कामासाठी तिचा वापर होतो. परंतू ही दोरी काही कारखान्यात तयार केली जात नाही. रस्त्यावर सापडणार्‍या प्लास्टिकच्या पिशव्यांपासून, पोत्याच्या धाग्यापासून काही मंडळी केसांची वेणी विणावी तशा  पद्धतीने तिचा दोर वळतात. बर्‍याचदा रस्त्याच्या कडेला झाडाला बांधून दोर विणणारे दृष्टीस पडतात. ही स्वस्तातली दोरी लहान मोठ्या कामांसाठी वापरली जाते. डोंगराच्या अवघड टप्प्यावर हिचा वापर करणे धोकादायक ठरू शकतो. आणखी महिन्या दिड महिन्यात ती उन पावसात जीर्ण होऊन जाणार हे निश्चीत. 


चाळीस फुटांचा हा चढाईचा टप्पा. ठिसूळ दगड व मुरमाड मातीच्या घसार्‍यामुळे चांगलाच आव्हानात्मक. चढताना मातीसह खाली कोसळण्याचा सदोदित धोका. चढाईची श्रेणी सोपी असली तरी त्याचे अस्थिर रूप आणि बर्‍यापैकी असलेली उंची यामुळे अनूभवी, प्रशिक्षित गिर्यारोहकांनाच साध्य होणारा. वरच्या बाजुला एका झाडाचा बारीक बुंधा दिसला. त्याला गिर्यारोहणाचा दोर बांधून आम्ही आमचा चढाई मार्ग सुरक्षित केला. दीपक वर आल्यानंतर हा दोर काढून शेवटच्या कातळ टप्प्याकडे प्रस्थान केले. वरच्या भागात अतिशय दाट पसरलेली झुडपी वनस्पती. याभागात स्थानिक मंडळींचाही अतिशय नगण्य असा वावर असल्याने वरची झुडपे जनावरे व अतिक्रमणापासून बचावलेली. त्यामुळे नाना विविध प्रकारची झुडपे अगदी प्रसन्नपणे फुललेली दिसत होती. वरच्या बाजुला सर्वोच्च माथा गाठण्यासाठी आणखी एक छोटा कातळ टप्पा लागला. दाट झाडीतून वाट शोधत कातळाचा अंदाज घेतला तर त्याचे ठिसूळपण दिसून आले. भेग असलेल्या खडकावर उभे राहणे धोकादायक. त्यामुळे वरच्या कड्यात उगवलेल्या खडक पायराला दोर ओवून वर चढण्याचा निर्णय घेतला.. हा खडकात उगण्यात धन्यता मानणारा पिंपळ प्रजातीतला लहानसा पण अतिशय मजबूत असा वृक्ष. त्याला दोर लाऊन त्यातून चढाई मोठी कसरत झाली. वर शिरताना गालाला थोडा प्रसाद मिळाला. पण आमची मुक्त आरोहण मोहिम यशस्वी ठरली. शिखरमाथ्यावर पाऊल ठेऊन त्याला वंदन केले. एका अपरिचीत डोंगरावरची ही छोटेखानी चढाई आत्मिक आनंद देणारी ठरली. या चढाईचा आनंद आम्ही दुपारचे जेवण करून साजरा करण्याचे ठरवले. भल्या सकाळी तयार झालेली भेंडीची भाजी, पाच पोळ्या. घरचे लोणचे आणि पाण्याच्या दोन बाटल्या असा अगदीच छोटेखानी बंदोबस्त पोटाबा करण्यासाठी पुरेसा होता. जेवणासाठी असा दुर्मिळ दुर्गम सह्यकडा लाभला हे आमचे भाग्य होते. पंधरा मिनीटात अगदी निवांतपणे जेवण उरकले. सातमाळेच्या देदिप्यमान डोंगर रांगेचे रांगडे रूप डोळ्यात साठू लागले तशी कांचनबारीच्या लढाईची आठवण झाली. 


अजी 'कांचनबारी'चे युद्द कल्पिले


इसवी सन १६७०मध्ये दुसर्‍यांदा सुरतेची लूट करून परतताना शिवाजी महाराजांनी मुल्हेरची मोगलांची संपन्न बाजारपेठ लुटली. सुरत दुसर्‍यांना लुटल्याची माहिती औरंगाबादेत पोहोचल्याची वार्ता कळताच महाराजांनी लुटीचे सामान पुढे पाठवून मोगलांचा समोरासमोर प्रतिकार केला. ही लढाई वणी-दिंडोरीची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. अस्सल साधनात या लढाईचे उल्लेख आढळतात. काही अभ्यासक कांचनबारीत लढाई झाल्याचे मानतात. फारसी साधनात कांचनबारीच्या युद्धाचा उल्लेख आढळतो. प्रत्यक्ष कोणत्या ठिकाणी लढाई झाली यावर इतिहासकारत एकमत नाही. परंतू कांचनबारीच्या लढाईचे रसभरीत वर्णन वाचायला मिळते. जर खरोखरच कांचनबारीत लढाई झाली असेल तर हा बाफळ्याचा त्याचा साक्षीदार असावा हे निश्चीत. कांचन खिंडीत महाराज स्वत: हजर होते तर त्यांच्या काही तुकड्या कांचनाच्या दोन्ही बाजूंनी सज्ज. कांचना आणि बाकळ्याच्या मधला परिसर हा मराठी फौजांसाठी दडून बसण्यासाठी अगदी आदर्शवत असा. येथून भावडबारीवरही लक्ष ठेवता आले असेल. आणि इशारा मिळताच बाफळ्याची धारखिंड ओलांडून दाऊद खानाच्या सैन्याला मागच्या बाजूने घेरणे सोपे गेले असेल. थोड्या वेळा पूरते का होईना...आम्हाला बाफळ्या कांचनबारीच्या लढाईत घेऊन गेला. 


पाऊस सुरू होण्याच्या आत दोन कातळटप्पे उतरण्याचे आव्हान होते. त्यामुळे परतीची लगबग सुरू केली. पूर्व बाजूचे टोक गाठले. या भागात बाफळ्याचा माथा अगदी चिंचोळी. खालच्या बाजूने त्याची जरासुद्धा कल्पना येत नाही. इथून कोळधेर किल्ल्याचे विशाल रूप दृष्टीस पडते. भावडबारीचा हिरवाईने नटलेला घाट. पलिकडे राजधेर किल्ल्यावर पडलेला हलकाचा उजेड, साडेतीन रोडगे, इंद्राई, चांदड किल्ले डोळ्यात साठवत आम्ही परतीची वाट धरली. 


नाम उत्पत्ती


बाफळ्या हे नाव कशावरून पडले असेल. बाफळ्या नावावरून काही पदार्थ आपल्याकडे प्रचलित आहेत तर आयुर्वेदात कोथिंबीर, जीरे, ओवा कुळातल्या वनस्पतीला बाफळी म्हणतात. या डोंगरावर बाफळीची प्रचूर मात्र असल्याने हे नाव पडले असेल का याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. हिच्या प्युसिडॅनम या वंशातील एकूण सु. १२॰ जातींतील दहा जाती भारतात आढळतात त्यांपैकी ही एक असून तिचा प्रसार महाराष्ट्रात (कोकण, दख्खन) सह्याद्रीत बराच आहे ही समूहाने वाढते. हिची उंची सु. १ मी. असून ती गुळगुळीत, मांसल व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ओषधी आहे. आणखी एक बाफळी हे बी असुन कुळीथासारखे चपटे असते. ही भाजी चिरून उकडून, त्यात हरभऱ्याची डाळ घालून बनवली जाते. या भाजीच्या फळांचे तेलही काढतात. पोटदुखी, जंत होणे यासारख्या त्रासांमध्ये या भाजीचे सेवन करतात. या टापूतल्या वनस्पती सह्याद्रीचा अमुल्य असा ठेवा. केवळ वहिवाट नसल्याने तो टिकून आहे. झाडाझुडपांचा अभ्यास करणार्‍यांनी अशा दुर्गम डोंगरमाथ्यावरच्या वनस्पतीं, गवत वेलींचा अभ्यास करण्याचे आव्हान स्विकारायला हवे. त्यामुळे काही दुर्मिळ प्रजातींची माहिती मिळू शकेल. 


दोन दोस्तांना जोडणारा शहंशाह


शिखर माथ्यावरून एक वाट खाती उतरताना दिसली. शेवटचा कातळटप्पा टाळता येऊ शकतो. पाचच मिनीटात झपझप पावले टाकत आम्ही मुख्य कातळटप्पा गाठला. तिथे एका लहान झाडाला दोर ओवून एकमेकांना सुरक्षादोर देत उतराई सुरू केली. हा भाग दगड मातीयू्क्त असून मातीच्या सोबत दगड घरंगळून येतात. त्यामुळे उतराईचा मार्ग काळजीपूर्वक निवडणे आवश्यक होते. इखार्‍या प्रमाणेच आम्ही येथे एकमेकांस सुरक्षादोर पूरवत उतराई केली. शेवटच्या पंधरा फुटांवर जोरदार पावसाने गाठले. दोर सोडून घेतल्याने सावकाशपणे तो पार करणे आवश्यक होते. भिजलेल्या खडकावर पाय पकड घेत नव्हते. सुदैवाने थाड्याशा प्रयत्नातून पायाचे आधार मिळत गेले आणि उतराई सुरक्षितपणे पूर्ण झाली.


आता बरीच दमछाक झाली होती, तेव्हा पुन्हा गुहेत जाऊन थोडे जलप्राशन केले. कांचना पासून धोडप पर्यंतचे डोंगर किल्ले जणू आपले दिव्य रूप दाखवित पावसात भिजत उभे होते. इथून चाळीस फुटांचा तिव्र उताराचा घसारा दमछाक करणारा ठरला. पावसामुळे इथली सुपिक माती निसरडी बनली होती. सोबत आधाराला काठी नसती तर उतरणे फार जड गेले असते. कसा बसा हा उतार पार केला तर पवार बाबा खाली दगड ओडोशात आमची वाट बघत उभे होते. आता अम्ही डाव्या बाजूने बाफळ्याला वळसा मारून चिचाच्या माळावर आलो. अगदी खाली मान करून भावडबारीचा घाट पाहताना त्यावर धरलेला ढगांचा पुंजका मनोहरी भासत होता. भर पावसात फोन, कॅमेरे काढेस्तोवर तो बाजुच्या डोंगराकडे सरकला. 


आम्ही उतरून आलो आणि बाफळ्याचा माथा ढगांनी घेरला. थोड्या वेळात तो पुर्ण झाकोळला. नंतर ढग बाजूला झाले आणि त्यांनी निळे गुलाबी रंगाचे अभ्र त्यावर धरले. मावळतीत एखाद्या डोंगराचा माथा बघणे भान हरवून टाकणारा अनूभव ठरतो. त्यात आकाशात निळ्या, गुलाबी रंग छटा म्हणजे द्विगुणीत करणारा आनंद. त्या आनंदात हरखून गेलो ते भावडबारी घाटातल्या वाहनांच्या आवाजांनी जाग आणली. पवार बाबा आणि त्यांचे सवंगडी जमिलबाबा यांच्याशी थोड्या गप्पाटप्पा झाल्या. जमिल बाबांची चिंचोळी खोली बघता आली. त्यात ते अंघोळपाणी, स्वयंपाक आणि विश्राम कसे करत असतील? एकच माणूस त्यात राहू शकतो इतकी ती चिंचोळी. डोंगरात रमलेले हे दोन डोंगरयात्री आयुष्याच्या संध्याकाळी रोज भावडबारीच्या घाटात भेटतात आणि सूर्य मावळल्यानंतर एकमेकांचा निरोप घेतात. कधी तिथेच मुक्काम तर कधी खेलदरीत आपल्या कुटुंब कबिल्यात जाऊन रमतात. बाफळ्याचा डोंगरमात्र त्यांचा पिच्छा सोडत नाही. तेही त्याचा पिच्छा सोडत नाहीत. ते दोघेही एकमेकांच्या बद्दल बोलत असतात. शहंशा ए भावडबारीचा अवलिया या दोन फाटक्या दोस्तांना बाफळ्याशी बांधून ठेवतो. पैशा पलिकडच्या श्रीमंतीत न्हाऊन देण्यासाठी.

- डोंगरयात्री, ११/७/२०२१