Friday, September 13, 2019

fort development fund for fort development only


ज्यांना इतिहास नाही, फक्त चार भिंतीच आहेत असे अडगळीतले किल्ले शासन ताब्यात घेणार! या वार्तेने सर्वसामान्य मराठी मन कळवळले आहे. त्यावरून गदारोळ उठला आणि वक्तव्य आले, गडांना किंचित सुद्धा धक्का लागू दिला जाणार नाही. मग वक्तव्य आले शिवाजी महाराजांच्या गडांना हात सुद्धा लावणार नाही. पंचवीस का शंभर अशी काहीशी यादी आहे, ज्यावर महाराष्ट्र शासनाला हॉटेल्स थाटायची आहेत. काही ठिकाणी उंची निवासस्थाने तर काही ठिकाणी विवाह सोहळे आयोजित करण्यासाठी सुविधा तयार करायच्या आहेत. या सगळ्या गदारोळात दोन ठिकाणहून स्थानिक आमदारांच्या हवाल्याने बातम्या आल्यात गडविकासाच्या. एक म्हणजे पेठचा कोथळीगड आणि दुसरा म्हणजे नाशिकच्या सातमाळा रांगेतला विखार्‍या किंवा इखारा किल्ला.

कोथळीगड व इखारा या किल्ल्यांच्या विकासासाठी काही कोटींच्या घरात निधी मंजूर झाला आहे. बातमीत लिहीले आहे, गडविकास करणार. आजवर हे असेच घडत आले आहे. वर्तमानपत्रात बातमी दिली जाते, गडविकासाची. प्रत्यक्षात निधी खर्च केला जातो तो गडावर रस्ता तयार करण्यासाठी. त्याठिकाणी वीज आणण्यासाठी. गडावर मुळात अस्तित्वात असलेला रस्ता तयार व दुरूस्त न करता नविनच रस्ता तयार करणे, वीजेचे खांब वर पर्यंत नेणे एवढीच गड विकासाची व्याख्या असू शकते का? गडविकासाचा तो भाग असू शकतो का? या दोन गोष्टीचा गडाच्या विकासाशी काही संबंधच नाही. सरळ का नाही म्हणत, गडावर रस्ता नेणार, घाट बांधणार, डोंगर फोडणार. वर पर्यंत वीज नेणार. पर्यटनाचे नवे स्थळ बनवणार!
याकामात गडाच्या कुठल्याच जुन्या अवशेषाचे संवर्धन होणार नाही. गडावरच्या पुराण वास्तूची ना डागडूजी होणार ना पूनर्निर्माण. ना त्याठिकाणचे जुने दगड गोळा करून त्यांवर संशोधन होणार ना त्याठिकाणी उत्खनन कार्य केले जाणार. ना गडाचा इतिहास शोधण्यासाठी अभ्यासकांना, इतिहासतज्ज्ञांना पाचारण केले जाणार. त्याठिकाणी फक्त आणि फक्त रस्ता व वीजव्यवस्थेची कामे केले जाणार जे गडाला तारक ठरतील की मारक याचा कोणता अभ्यास न करता.



सह्याद्रीतले गड हे मुळातच आपल्या कठिणतेसाठी ओळखले जातात. जगातल्या कुठल्याच ताकदवान सत्तेला त्यांचा कायमस्वरूपी ताबा घेता आलेला नाही, इतके ते बेलाग आहेत. असे म्हटले जाते की हा गौरवशाली इतिहास फक्त आणि फक्त महाराष्ट्राला लाभला आहे.
अशा गडांचे मुळ स्वरूप बदलून टाकताना कुठले संकेत पाळले जातात? याकरिता पुरातत्व संवर्धनाचे एक उदाहरण बघूया, रायगडावर सद्या विकासकामाचा एक भाग रायगड विकास प्राधिकरण सांभाळत आहे. त्यांनाही काही कोटींचा निधी मिळाला आहे. दस्तूरखुद्द संभाजीराजे छत्रपती या प्राधिकरणाचे प्रमुख या नात्याने जबाबदारी सांभाळत आहे. राज्य शासनानेच त्यांना ही जबाबदारी दिली आहे. शिवकाळात जशी बांधकामे होती तशी ती उभे करण्यावर याचा भर आहे. त्यासाठी प्राधिकरणाने आपल्या कामाला संशोधनाची जोड दिली.
सर्वात प्रथम त्यांनी गडाचा मुळ परिसर किती याचा आराखडा तयार केला. या मुळ परिसराला जोडणारा परिसर, गडाच्या वहिवाटा, त्यात येणारा खासगी मालकीचा परिसर अशी पाहणी केली.

रायगडचे क्षेत्र हे १२५० एकर
आधूनिक कॅमेर्‍यांच्या मदतीने गडाची मोजमापे घेऊन सीमारेषा अगोदर निश्चीत केल्या ज्यात त्यांना बांधकामे वा दुरस्ती, संवर्धन, उत्खनन वगैरे करायचे आहे. आमचे तर हा आकडा एकून डोळे विस्फारले, 'रायगडचे क्षेत्र हे १२५० एकर इतके आहे' (यातही मला वाटतं माची रायगडाचा समावेश नसावा. कारण पाचाड, हिरकणीवाडी या सारख्या घेर्‍यातली आज आढळणारी गावे रायगडाचीचा भाग होता व त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर सैन्यदल सहज हालचाल करता येऊ शकेल अशा बेताने तळाला माचीवर ठेवले जायचे. तसे असेल तर रायगडाचा परिसर अपेक्षेपेक्षा कितीतरी मोठा राहील).
रायगड: पायवाट विकास
प्राधिकरणाने चुन्याचे उत्तम मिश्रण बनविण्यात यश मिळवले जे गडाच्या विपरीत हवामानात दीर्घकाळ टिकू शकेल. दगड अशा पद्धतीने घडवले जे रायगडच्या शिवकालीन कामाशी मेळ साधतील. त्याचा वापर करून काही ठिकाणच्या पायर्‍या, तट व दगडी पायवाटा बनविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हत्ती तलावाची गळती शोधण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी सुरू केले आहे.
गडाचा घेरा, तटबंदी, त्याची व्यप्ती, जमिनीत जुनी बांधकामे कुठे कुठे गाडली गेलीत, कुठे ढासळली नव्या आणि जुन्या पद्धतींचा वापर करून माहिती गोळा केली जात आहे. जी कामे सुरू आहेत ती मुळ कामापेक्षा वेगळी व ठिगळबाज घडण वाटणार नाही याची ते दक्षता घेत आहेत. तरूण संवर्धन वास्तूतज्ज्ञ वरूण भामरे यांच्या कामाची झलक दोन महिन्यांपूर्वी आम्ही प्रत्यक्ष जाऊन बघितली. रायगडाचा सांगोपांग अभ्सयास असलेले ज्येष्ठ इतिहास लेखक प्रा.प्र.के.घाणेकर, गिरीष टकले, सदानंद आपटे अशी मान्यवर मंडळी त्यावेळी उपस्थित होती.
बेलाच्या पाण्यात चुना मिश्रण
तिथे एक प्रश्न विचारला गेला, शिवकाळात गडावर तीनशेहून अधिक इमारती होत्या, तुम्हाला इतका निधी मिळालाय तर, त्यातल्या काही इमारती का बांधत नाहीत, त्यावर भामरेंनी स्पष्ट केले, मुळ वास्तूचा काही आराखडा, नकाशा एखादे जुने संकल्पचित्र जोवर मिळत नाही, तोवर अशा वस्तू उभ्या केल्या जाऊ शकत नाहीत. केवळ कल्पनेने तर नाहीच नाही. भारतीय पुरातत्व नियमात तसे स्पष्टच म्हटले आहे. जगभरात हेच सूत्र लागू होते.
तांत्रिकदृष्ट्या महाराष्ट्रात सगळेच गडकिल्ले हे पुरातत्व खात्याच्या ताब्यात नसले तरी गडावरचा एकही दगड कुणाला पुरातत्व खात्याच्या परवानगी शिवाय हलवता येत नाही. तिथल्या स्थितीत कोणता बदल करता येत नाही. जर कोणाला करायचा असेल तर प्राचीन पुरावे, दाखले शोधून आणून द्यावे लागतील मगच अशा कामांना पुरातत्व विभागाकडून सुरूवात केली जाऊ शकते.

तटबंदी...इखार्‍यावरचे दुर्मिळ बांधकाम अवशेष

महाराष्ट्रात असे आजवर गडांच्या बाबतीत घडले आहे का? ज्याला मन मानेल तशी कामे केली गेलीत. अगदी पुरात्तव विभाग सुद्धा यात मागे नाही. आणि ज्यांना आपण शिवाजी महाराजांची प्रमुख वास्तव्य स्थाने म्हणतो असे शिवनेरी, रायगड, राजगड, तोरणा, प्रतापगड हे प्रमूख गड सुद्धा त्याल अपवाद नाहीत. या शिवतीर्थांवर शेकडो लोकांना सहजपणे ये जा करण्यासाठी गडाच्या वर पर्यंत रस्ते बांधले. त्यामुळे गडाचे पार गडपण हरवून टाकले गेले. तिथली वाहनतळे, फाटकी दुकाने, खाद्यपदार्थांचे ठेले पाहून आपण एखाद्या बाजारजत्रेत आल्याचा आभास होतो.

महाराष्ट्र शासन बिन इतिहास असलेले, चार भिंतीच असलेल्या गडावर विकास करणार तर तो कुठल्या आधारावर. तिथला काही इतिहासच माहित नाही तर बांधकामे कोणत्या नियमाच्या अधारे करणार, त्याचा शोध घेण्याची तसदी न घेता. यासाठी कायद्यात बदल करून आणणार आहे का?
महाराष्ट्राला इतिहास हा काय फक्त शिवकाळाच्या आसपासचाच आहे का? त्या अगोदरचा काळ तितकाच महत्वाचा. त्याचे धागेदोरे काहीच हाती नसताना अशा गडांना पोरके मानून त्यावर कामे करणार तरी कशी. तिथल्या पर्यावरणाला बाधा येईल असे कुठलेच काम करता येणार नाही. संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेल्या यादीत जैवविविधता सर्वाधिक धोक्यात आलेले संवेदनस्थळ सह्याद्री त्यामुळे अधिकच बाधित होईल हा भाग सुद्धा त्यात आहेच.
अंजनेरीच्या बाबतीत काय झाले. पर्यावरण संवेदनशील म्हणून या संपूर्ण परिसराला ना बांधकाम श्रेत्राचा दर्जा देण्यात आला होता. न्यायालयाचे सक्त आदेश कित्येक वर्षे पाळली गेलीत. मग मंत्रालयातल्या एका उच्चपदस्थाने एक डोंगरच विकत घेतला. पोटखराबा जमिन म्हणून त्याला ती खाशी स्वस्तात लाभली. मग त्याने जादुची कांडी फिरवली आणि कायद्यात बदल घडवून आणला. हे सगळे राज्यपातळीर घडले की राष्ट्रीय पातळीवर हे बाहेर कधीच आले नाही...पण त्यानंतर धडाधड शिक्षण संस्था, करमणूक केंद्र, रिसोर्ट, हॉटेलांच्या मालिका अंजनेरीच्या चहुबाजूंना तयार झाल्या आणि पर्यावरण? त्याची तर पार वासलात लागली, इतकी की, लोकांचा या परिसरात प्रचंड हस्तक्षेप वाढून वन्यजीवे हे ठिकाण सोडून गेलीत...ती जगली की मेली की त्यांचे उच्चाटन झाले? एक खरपुडीचे तर नक्कीच ज्यालाच सेरेपेजिया अंजनेरीका असे शास्त्रीय नाव देण्यात आले आहे. जगाच्या पाठीवर असे म्हणतात की, हे कंदिल पुष्प फक्त आणि फक्त अंजनेरीवर असायचे. आज एखादेदुसरेच कधी तरी दृष्टीस पडते.


इखार्‍याच्या तटाच्या बाजूने कांचनबारीकडे ये जा करण्यासाठी चौकी असावी...
इखार्‍याची तटबंदी
बेलाग अशा धोडप किल्ल्याला खेटून उभा असलेल्या विखार्‍यावर आजवर गड म्हणून  कुठलेच अवशेष बघायला मिळत नव्हते ते आम्हाला यंदा सातमाळा डोंगरयात्रेच्या निमीत्ताने बघायल मिळाले. जिथून सह्याद्रीतल्या सातमाळा रांगेचा उगम होतो त्या सुरगाण्यातील केमच्या डोंगरापासून आमची आठदिवसांची डोंगरयात्रा २ ते ९ डिसेंबर २०१८ या काळात आम्ही काही सह्याभटक्यांना सोबत घेऊन केली. त्यावेळी विखार्‍यावरून कांचनबारीत उतरताना आम्हाला लेकुरवाळा डोंगराकडे उतरणार्‍या खिंडीत विखार्‍याच्या तटाचे अवशेष दिसले. तटबंदी अर्थातच खुप जुनी आहे. त्याचा उल्लेख आजवरच्या वाचनात बघायला मिळाला नव्हता.
या छोट्याशा तटावरून अंदाज लावला जाऊ शकतो विखार्‍यावर सुरक्षेची केवढी चोख व्यवस्था असेल.
महाराष्ट्रातला अत्यंत महत्वाचा व मजबूत अशा धोडप किल्ल्यावर इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्यात. युद्ध झालीत त्या सगळ्या घडामोडींचा परिणाम इखार्‍यावर नक्कीच झाला असणार. धोडपवर अनेक राजवटीत मोठा फौजफाटा बाळगला गेला, त्या अनुषंगाने इखार्‍यावर केवढी हालचाल होत असणार.


इखार्‍याची सुदूर पूर्व हद्द तटाने संरक्षीत केलेली होती

आज विखार्‍यावर जुन्या बांधकाम अवशेषांचे बघायला मिळणे दुर्मिळ झालेत. त्या अवशेषांचे दगड कुठे गेलेत. मातीत गाडले गेले की, इंग्रजांनी तोफा सुरूंगांनी उधवस्त केले. तिथे कोणत्या ठिकाणी निवासी वास्तू होत्या, कोणत्या ठिकाणी सैनिकी वास्तू होत्या, कोणत्या ठिकाणी व्यापार, व्यावसायिक वास्तू होत्या. तिथे थोडे अधिक नगर अथवा गाव नियोजन असेलच, त्यांची कुठली माहिती घेतली गेली का?
तिथल्या पाण्याच्या पुरातन टाक्यांची काय अवस्था आहे. इथून अगदी जवळच शिवाजी महाराजांच्या काळातली अत्यंत महत्वाची कांचनबारीची लढाई झाल्याची मान्यता आहे. ही लढाई खरोखरच काचंनखिंडीत झाली असेल तर त्याचा परिणाम कांचना बरोबरच इखारा व धोडपवरही नक्कीच झाला असणार.  फार मोठे मैदानी युद्ध म्हणून त्याची इतिहासातल्या काही अस्सल कागदपत्रात नोंद असल्याचे अनेक ठिकाणच्या संशोधन साहित्यात वाचायला मिळते. अशा इतिहास संशोधनाला वाट करून देणे हा गडविकासाचाच भाग. त्यासाठी हा निधी वापरायला हवा.


लेकुरवाळा डोंगराचा माळ: कांचनबारीतून इखार्‍यावर या वाटेने चांगली वर्दळ होत असावी प्रवेश या चौकीवर नियंत्रीत होत असावा

शहाजहानच्या काळात मोगलांनी अथक प्रयत्नाअंती दक्षिणेत सातमाळा रांगेत मोठे यश संपादन केले, त्याच्या खुणा आपल्याला धोडपवरच्या अलिवर्दी खानाच्या प्रसिद्ध शिलालेखातून मिळतात. असेच शिलालेख राजदेर, इंद्राई किल्ल्यावर सुद्धा आहेत. मध्ययुगातल्या महत्वाच्या राजकीय घडामोडींचा वेध घेऊन, योग्य त्याठिकाणी, तलाव, तळी, टाक्यातला गाळ, दगड, मुरूम काळजीपूर्वक उपसून या जुन्या कालखंडाबद्दलची माहिती प्राप्त केली जाऊ शकते. या ठिकाणी बोगस दुर्गसंवर्धक पोहोचले नसतीर तर तळ्या टाक्यातल्या गाळातूनही जुन्या काळातल्या महत्वाच्या दुव्यांपर्यंत पोहोचवायला मदत होऊ शकतो. कदाचित त्या काळातली नाणी, कौला बांगड्यांचे तुकडे, शस्त्रादी काही ना काही उत्खनन करून शोधता येईल.
गडविकास निधीतून गडावरच्या जुन्या आश्रमाचे काम केले जाणार असेल किंवा डागडूजी केली जाणार असेल तर त्याला काहीच हरकत नाही. पण त्या नावाखाली तिथे सिमेंट कॉंक्रिटचे खांब उभे करून त्यावर नळीचे पत्रा बसवणार असाल तर तो गडविकासाचा भाग असूच शकणार नाही. तो असेल पर्यटन विकासाचा भाग. गडाची जमिन ही पर्यटन विभागाच्या आख्यारीत येत नाही. डोंगरांवरची जमिन ही वनखात्याच्य आख्यातरीत येते. त्यावरच्या पुरणवास्तू व त्यांचा परिसर हा पुरातत्व विभागाच्या अधिकारात येतो. माणसाने घडवलेला कुठलाही जुना दगड, जुने काम हे त्यांच्या अधिकारात येते. जे गड पुरात्त्व अधिसूचित नाहीत त्यावरचे जुने अवशेष सुद्धा पुरातत्वला विचारल्याशिवाय कुणीही हलवू शकत नाही व व त्यावर काम करू शकत नाही.

कोथळीगडावर व विखार्‍यावर पुरातत्व व वन खात्याच्या कामांना बाजूला सारून पर्यटन विकासाचे काम केले जाऊ शकत नाही. धार्मिकस्थळ विकास करायचा असेल तर या दोन विभागांच्या परवानगीने काही माफक प्रमाणावर केला जाऊ शकतो, पण तो गडविकासाच्या मथळ्याखाली केला जाऊ शकत नाही. गडाच्या पुराणवास्तुंना व जंगलांना बाधा आणून तो मुळीच केला जाऊ शकत नाही. त्यासाठी स्पष्टपणे, 'धार्मिक पर्यटनस्थळ निधी', असायला हवा होता. हा मंजूर निधी तर गडविकासासाठी आहे ना!

वर्तमानपत्राच्या बातमीत म्हटलेय की, जनतेतून विखार्‍याच्या विकासाची मागणी करण्यात आली. आता स्थानिकांचे म्हणाल तर ती मंडळी पिढीजात विखार्‍यावर जात आहे. गडावरच्या आश्रमापर्यंत अगोदरच गाडीरस्ता बनवून टाकला आहे. स्थानिक मंडळींना अशा रस्त्यांची खरोखरच आवश्यकता नसते. ही मंडळी मुळातच काटक असतात आणि डोंगरावर अगदी कुटुंब कबिला, शिधापाणी घेऊन आपले धार्मिक पर्यटन पार पाडत असतात. मग गडांवर अशा चकाचक सुविधा हव्यात कोणाला, ज्या गडाचाच घास गिळण्याची शक्यता अधिक.
पेठच्या कोथळीगडाचा इतिहास फार जुना आहे. गडावर काय सुंदर कातळकोरीव लेणी आहे. त्याचे कातळ नक्षीकाम, डोंगराचे शिखर आतून कोरून केलेल्या पायर्‍या तर थक्क करणार्‍या. याभारतीय वास्तूकलेच्या काही सर्वोत्त अविष्कारात इथले कातळकोरीव बांधकाम मोडते. तिथे इतका मोठी निधी फक्त रस्ता डांबर टाकण्यासाठी व विजेचे खांब आणण्यासाठी करणार? मग खर्‍या गड विकासाचे काय?

शासनाला नियमांची भाषा समजते. त्यामुळे गडदुर्गइतिहास क्षेत्रात काम करणार्‍यांनी त्यांच्याशी त्याच भाषेत बोलले तरच त्यांना ती कळेल. मागे एकदा मुंबईच्या एका दुर्गप्रेमी ठेकेदाराने हरिहर किल्ल्यावर शिडी बसवण्यासाठी व गडविकासाठीचे काही कोटींचे प्राकलन तयार केले होते. त्यातून त्याने सर्किट ट्रेकिंग विकसीत करण्याची योजना तयार केली होती. यात साल्हेर, हरिहर व आणखी एक गड टाकला. ट्रेकर हा सर्किट ट्रेक करतील व त्यातून शासनाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होईल असा प्रस्ताव त्याने दिला. नवे काम किती काळ टिकेल, ते कशासाठी गरजेचे यावर काहीही शास्त्रीय पाहणी न करता, दुर्गइतिहास संशोधकांची कुठलीच मते विचारात न घाता त्याने देखभाल दूरूस्ती कोणत्या निधीतून करायची अशी रंजक आकडेवारी तयार करून प्रस्ताव दिला. कुठे दिशादर्शक बाण लावायचे, कुठे तंबु रोवण्याच्या जागा. कुठे रस्ते असे बरेच काही त्यात होते.
या कामाला नाशिकच्या काही दुर्ग संस्थांनी विरोध दर्शवला. सगळे लक्ष हरिहरवर असताना नाशिकच्या दुर्ग संस्थांना मागमुस लागू न देता अहिवंतगडावर ३५ लाखांचे रेलींगचे प्राकलन मंजूर झाले. भयावह गोष्ट म्हणजे ठेकेदाराने रेलींग वर नेण्यासाठी जेसीबी पोकलॅन यंत्र आणून डोंगरच फोडून काढला. आता विचार करा, अहिवंत किल्ल्यावर जुन्या बांधकामाचे इतके ढिगारे पडले आहेत की सह्याद्रीत कुठल्याही गडावर ते सापडणार नाहीत. उद्या या मार्गावरून तस्तरांनी हे जुने घडीव दगड चोरून नेले तर? अहिवंत हा ओळखला जायचा तो त्याच्या बेलाकपणामुळे. हा बेलागपणा केवळ रेलिंगचे सामान वर नेण्यापायी कायमस्वरूपी घालवून टाकण्यात आला. गडाचे ऐतिहासिक नुकसान त्याची जबाबदारी कोणता विभाग घेणार. शिवाय गडावरच्या प्राचीन चिरा चोरी होऊ नये यासाठी रस्त्यावर सुरक्षारक्षक नेमणार का? नेमले तर त्याचा पगार कुठून देणार.
हा विषय हनूमानाच्या शेपटी सारखा वाढतच राहील तेव्हा इथेच आटोपता घेतो. गडविकास या संकल्पनेत आणखी काही उदाहरणांवर पुन्हा केव्हा तरी भेटूच. तुर्तास कोथळीगड व विखार्‍याचा गडविकास निधी हा फक्त गडविकासासाठीच खर्च व्हावा, पर्यटन विकासासाठी किंवा धार्मिक पर्यटनविकासासाठी नव्हे यासाठी आग्रही राहूया. यासाठी महाराष्ट्र गिर्याराहण महासंघ, मॅक व तत्सम संघटनांची मदत घेऊया. त्यामुळे आपल्या मागणीला मोठे बळ मिळेल.

गडविकासासंबंधी सप्टेंबर २०१९च्या काही महत्वपूर्ण चर्चा (साभार फेसबुकवरून)
दुर्गपुरुषाची आत्मगाथा - रवि राजेंद्र पवार
गडकिल्ल्यांचा विकास - भगवान चिले


Tuesday, August 20, 2019

भैरोबाचा माळ:


भैरोबाचा माळ:
सह्याद्रीच्या भटकंती विश्वात निव्वळ पठार किंवा डोंगरमाळा तितक्या लोकप्रिय नाहीत जितके डोंगर, डोंगरी किल्ले, सागरी किल्ले आणि घाटवाटांना महत्व आहे; अशा भटकंतीला जोडून पठार किंवा माळ प्रदेश अनेक सापडतील, पण फक्त माळ भटकंती म्हंटले तर त्या वाटा तशा कमीच! अशा दुर्मिळ माळ भटकंतीच्या दुनियेत भैरोबाचा माळ एक आगळे वेगळे महत्व सांभाळून आहे. निसर्गाचे अत्यंत रौद्र भिषण रूप आणि त्याच्या अगदी विपरीत कधीही विसरता येणार नाही अशी सौंदर्याची उधळण असे दोन टोकाचे वेगवेगळे अनूभव देणार्‍या भटकंतीचा वृत्तांत.
मुंबई, पुणे, ठाणे या महानगरांच्या स्थानिक रेल्वे प्रवासातले नाशिकला जोडणारे कसारा रेल्वे स्थानक प्रसिद्ध आहे. समुद्रापासून सुरू होणार्‍या कोकण प्रदेशाचा हा सीमावर्ती भाग. कसार्‍याचा डोंगर चढून गेल्यावर सुरू होतो तो देश. त्यामुळे देशावरून कोकणात जायचे असेल किंवा कोकणातून देशात जायचे असेल तर स्थानिक रेल्वेचे मार्गावरचे हे महत्वाचे स्थानक. इथला अवघड घाट स्थानिक रेल्वे चढून जाऊ शकत नाही. त्याकरिता जादा ताकदीचे इंजिन असलेल्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्याच घाट चढून जाऊ शकतात. 
स्थानिक रेल्वेचा प्रवास अंगवळणी पडलेले मुंबई, पुणे, ठाणेकरांचा प्रवास येथे खंडित होतो, इथून पर्यायी वाहन घेऊनच त्याच्या देशावरच्या भटकंतीचा पुढचा प्रवास सुरू होतो. देशावरच्या मंडळींचा कसार्‍याशी संबंध येतो तो मुंबई, ठाणे परिसरातल्या भटकंतीला जाताना. स्वस्त आणि वेगवान असा हा प्रवास भटक्यांच्या आयुष्यात कधी ना कधी घडलेला असतो. पहाटे पाच वाजे पासून ते रात्री अकरा वाजे पर्यंत येथे स्थानिक रेल्वे गाड्यांची दर तासाला या हिशेबाने या जा सुरू असते त्यामुळेही इथल्या प्रवासाला पसंती दिली जाते.
कसारा स्थानकावर प्रवाशांचे फार काळ थांबणे तसे होत नाही. याचे कारण म्हणजे लांब पल्ल्याच्या गाड्यां बरोबरच स्थानिक लोकल गाड्यांचे मुबलक पर्याय. दोन डोंगरांच्या बेचक्यात वसलेल्या या लहानशा गावाच्या जवळ कुठलाच किल्ला किंवा ज्ञात असे ऐतिहासिक ठिकाण नाही. इथून एखादी भटकंती होऊ शकते असे कोणाच्या स्वप्नातही येणार नाही. नाशिकच्या एका डोंगरभटक्याने १९८२च्या सुमारात कसार्‍यापासून जवळच देशावर असलेल्या इगतपूरीत नोकरीस असताना कसारा गावातूनच जाणारी भटकंतीची एक वाट शोधून काढली. आजची भटकंती त्या वाटेवरची. 
पठारावरचे पहिले दर्शन

२८ जैले २०१९ रविवारी पहाटे नाशिकच्या मुंबईनाका परिसरात सगळ्यांनी जमायचे. तिथून खासगी जीपगाड्यांनी कसारा गाठायचे. अगदी कसारा रेल्वे स्थानकावरूनच भटकंती सुरू होणार ही कल्पना रोमांचक होती. पहाटे ४-००चा गजर लाऊन ठेवला होता. तो वाजण्यापूर्वीच पहाटे ३-०० वाजता अचानक जाग आली ती पाठीत उठलेल्या एका तिव्र पण अनामिक कळीमुळे. कुस बदलणे सुद्धा अवघड अशी अवस्था होऊन गेली होती. 
काही जणांना अपघातात पायाच्या गुडघ्याचे लिगामेंट  स्नायू दुखापतग्रस्त होतात तेव्हा तो माणूस पयायावर उभा राहूच शकत नाही. अशी अवस्था माझ्या पाठीची झाली होती. थोडंसं जरी हललं तरी पाठीच्या खालच्या भागाचा स्नायू आत ओढला जात होता. अशा अवस्थेत नुसती कुस बदलायची म्हणजे श्वासच थांबून जात होता. माझ्या भटकंतीचे काही खरे नव्हते. 
सौभाग्यवतींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गरम पाण्याची पिशवी शेकायला दिली. थोडा बाम लावला. त्याने कोणताच फरक पडला नाही. साडेचार वाजे पर्यंत माझ्या पाठदुखीचा घराच गाजावाचा सुरू होता. इकडे आईने ट्रेकला जायचे म्हणू मसाला भेंडी आणि पोळ्या बनवून ठेवल्या होत्या. जागचे हालता येत नाही, हे बघून आईने परत गरम पाण्याची पिशवी आणून दिली आणि एक वेदनाशमक गोळी घे, असा सल्ला दिला. कमालीची टोकाची स्थिती येत नाही, तोवर औषध घ्यायचे नाही, हा माझा नियम आजही कायम ठेऊन तो पर्याय मी धुडकावला. तोवर डोळा लागला. अर्ध्या तासाने पुन्हा घडाळाच्या घंटीने जाग आणली. हलणे अजूनही शक्य नव्हते. महत्प्रयासाने आजच्या भटकंतीचे नेते डॉ. हेमंत बोरसेंना माझ्या गंभीर स्थितीची कल्पना देऊन, मी आज रद्द, असे सांगून टाकले. 

थांबेल तो हेमंत कसला, त्याने डॉक्टर ज्ञानेश्वर गुंजाळांना पाठवतो, ते उत्तम फिजियो थेरपीस्ट आहेत असे सांगून माझ्या भटकंतीची धुगधूगी जिवंत ठेवली. डॉ. गुंजाळांना मोबाईवरून घरचे ठिकाण कळविण्यासाठी गुगल मॅपचे लोकेशन पाठवले. ते पावणे सहा वाजता आमच्या दारात आले, पण मी त्याच्याकरिता दोन जिने उतरून दार उघडू शकत नव्हतो. आमची लहानगी जान्हवी जागीच होती, ती खाली किल्ली घेऊन गेली आणि तिने डॉक्टरांना कुलुप उघडण्यास सांगितले. डॉ. गुंजाळांनी तपासवले व तुमचा ट्रेक या अवस्थेत होणे शक्य नाही, असे स्पष्ट केले. डॉ. हेमंतला फोन लाऊन तशी कल्पना दिली. हेमंतने काही तरी कानमंत्र दिला. डॉ. गुंजाळांनी आपण जाऊन बघू, नाही बरे वाटले तर तुम्ही गाडीतच थांबा असा सल्ला दिली. 
मिलिंद नगरच्या सौंदर्यपूर्ण वाटा

माझी सॅक व डबा दोन्ही तयार होते. आता अडचण होती ती पायात बुट घालण्याची आणि गुंजाळांसोबत मुंबईनाक्यापर्यंतचा प्रवास करण्याची. वेदनांची तिव्रता इतकी अधिक होती. तोवर आई चहा घेऊन आली. दोन बिस्कीटे खाल्ली व तिने तिच्या कडची वेदनाशमक गोळी डॉक्टरांना दाखवली. डॉक्टर म्हणाले, ही गोळी चालेल, घेऊन बघ. अर्ध्या तासात तिचा असर झाला तर आराम मिळेल.
तितक्यात डॉ. हेमंतचा फोन आला, तुम्ही आता मुंबईनाक्यावर नका येऊ. थेट विल्होळीला या, तिथून काही जण सामिल होणार आहेत. माझी तर पाचावर धारणा बसली. डॉ. गुंजाळांच्या दुचाकीवर आणखी आठ नऊ किलो मिटरचा प्रवास करावा लागणार होता. 
६-०० ही प्रस्थानाची वेळ ठरली होती. घरातच सहा वाजून वीस मिनीटे झाली होती. पोहोचायला आणखी बारा पंधरा मिनीटे लागणार होते. मी हेमंतला विनंती केली की तुम्ही पुढे जाऊ नका. आम्ही पोहोचतोच. तोवर चमत्कार घडला होता. मी आता काही पावले टाकू शकत होतो. आता मला कसार्‍या पर्यंत जाऊन दुखणे थांबते की नाही याची वाट बघता येणार होती. 
आजच्या भटकंतीचे वैशिष्ट्य म्हणजे निम्मे अधिक डॉक्टर भटके यात सामिल होते. ऑर्थोपेडिक पासून सगळे. माझ्याकरिता ते जोखिम पत्कारू शकणारे असल्याने माझे घरातून पाउल हलले. मुंबई नाक्यावर दोन जिपमध्ये ट्रेकसोल्स खच्चून भरले होते. कसार्‍यात आज आमच्या परिचयाचा आणखी एक नाशिककरा भटक्यांचा गट सहभागी होणार होता, ट्रेंडी ट्रेकर्स. 
मुंबई नाक्यावरून जीप हालली आणि दहा मिनीटांनी लक्षात आले की, माझे हेल्मेट हॉटेलातच राहिले. मग काय जीप गाडी पुन्हा मागे वळवली. काही उशिरा आलेल्या मंडळींचा नाष्ता झालेला नव्हता. या माघारीत त्यांची ती इच्छा पूर्ण झाली. विल्होळी येथे येवल्याचे काही डॉक्टर भटके सामिल झाले. तिथून कसार्‍यात पोहोचलो. डोळखांब फाट्यावरच्या आमच्या नेहमीच्या हॉटेलवर ट्रेंडी ट्रेकर्सचा गट थांबला होता. येथे चहा नाष्त्याचे आणखी एक आवर्तन पार पडले. तिथून महामार्ग ओलांडून आमच्या गाड्या कसारा रेल्वेस्थानकालगतच्या मिलिंद नगराच्या कमानीपाशी येऊन थांबल्या. 


उत्तर आषाढात बरसलेल्या जोरदार सरींनी महाराष्ट्राच्या अनेक भागात पाण्याची पातळी वाढून जनजिवन विस्कळीत झाले तर अनेक मार्ग खचले, अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. परिणाम अनेक ठिकाणांकडे जाणारे रस्ते बंद झाले. त्यात कसार्‍याचाही समावेश होता. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणचे भटकंतीचे बेत रद्द होत असल्याचे संदेश सामाजिक माध्यमांवर धडाधड येऊन पडत होते. आमच्या भटकंतीचा मार्ग निर्धोक होता. कसारा घाटातला एक बाजुचा रस्ता खचला होत, पण आम्हाला तिथवर जायचे नव्हते. आमची वाट निर्धोक होती.

मिलिंद नगर येथून रस्त्यावरून पाण्याचा दोन अडीच इंचाचा प्रवाह वाहत होता. गाडीतून उतरल्याबरोबर पाय भिजले. असेही दिवसभर पाऊस लागणार होता. त्यामुळे त्या भिजल्या पावलांचे कोणतेही वैषम्य जाणवले नाही. शिरगणती घेऊन ८:४६ वाजता येथून प्रस्थान केले. मिलींद नगर ही एक आंबेडकरी वसाहत. डोंगर उतारावरची घरे. पुर्वी कौलारू असायची आता त्यातली बहुसंख्य पक्की सिमेंट कॉंक्रिटची झालेली. तुफान पावसाच्या या प्रदेशात मिलिंद नगर वसाहतीला हिरवाईचा साजच चढलेला. प्रत्येक घराचे अंगण, पत्रा आणि प्रत्येक वाटेला हिरव्या गवत, झुडपाची सजावट. अशा नितांत सुंदर वातावरणात भटकंती सुरू झाली, माझी पाठदुखी केव्हा पळाली हे लक्षात सुद्धा नाही आली. मिलिंद नगर वसाहतीची टप्पा ओलांडताच आपण पठारावर येऊन पोहोचतो. पूर्व, पश्चिम, दक्षिण असा चैहुकडे पसरलेला पठाराचा पसारा पाहून कसारा स्थानकावरूज प्रवास करताना आजवर लपून राहिलेला स्वर्गच जणू आज खुला झाला होता. 


भैरोबाचा माळ म्हणजे कसार्‍यातले पाच सहा डोंगरांना जोडणारा सपाटी असलेला पठारी समुह. आता डोंगरांवरचे पठार म्हटले की, मोठी चढण उतरण नसते, पण चालायचे म्हटले तर एकएक दान दोन मिटरच्या उंच सखल वाटा, ज्यात स्वैर पडलेल दगड, धोंडे. ते चालताना पाय आणि जीव शिणून जावा. या डोंगरांच्या परिसरात अतिशय तुरळक लोकवस्ती असून चहूबाजूस सरळ उंच कडे. लोकांच्या हस्तक्षेपापासून दूर असल्यामुळे बराचसा परिसर हा गच्च दाट झाडींनी नटलेले. 
खरे तर माळ हे तिथल्या एका पाड्याचे नाव. त्यालाच भैरोबाचा माळ म्हणतात. माळ नावाची ग्रामपंचायतच आहे जिच्या आख्यारीत पठारावरच्या अनेक वाड्या वस्त्या समाविष्ट होतात. अत्यंत दाट झाडींचे डोंगर कडे, चहुबाजुस धरण, बंधारे आणि वरच्या सपाटीवर गवतीमाळ, नाना विविध प्रजातीचे गवत, झुडपे आणि काही मोठे वृक्ष अशी संपन्न निसर्गसंपदा लाभलेला हा परिसर लोकांच्या लगबगीपासून नेहमी दूर राहिलेला. शिवाय माळ परिसरात अजूनही कच्चे रस्ते त्यामुळे वाहनांची वर्दळ अतीशय तोकडी. 

चौफेर पसरलेला गवतीमाळ

आडवाटेची, कमी वर्दळीची, पिकनिकबाजांच्या ससेमिर्‍यापासून दूर अशी ही भटकंती दर्दी घुमक्कडांसाठी जिथे खास ठरते, तिथे निव्वळ सहलबाजी करणार्‍यांसाठी अजिबात उत्साह वर्धक नाही. याचे कारण म्हणजे संपुर्ण मार्ग हा दगडगोट्यांचा. त्यातून दहा पंधरा किलो मिटर पायपीट करणारा हाडाचा डोंगरप्रेमी, निसर्गप्रेमी किंवा जंगलवाचक हवा, अन्यथा माणूस कद्रुन गेलाच म्हणून समजला. या माळावर ना खादाडीच्या कुठल्या सुविधा ना नशेबाजांकरिता बसण्यासाठी सोयीची कुठली जागा. त्यामुळेच आजवर भैरोबाचा माळ पिकनिक बाजांच्या गर्दीपासून दूर राहिला.  डोंगरांचा लळा, निसर्गाच्या एकांताची आवड आणि नव्या वाटांची हौस असणार्‍यांना इथला एकांत मनास भावणारा ठरतो. 
---
पावसाचे नंदनवन असले तरी पिण्याचे पाणी हा वेगळा विषय...

पंधरा मिनीटांच्या पायपीटीनंतर खालच्या टप्प्यात एक मध्यम बंधारा दिसत होता. आसपास दाट झाडींमुळे हा परिसर प्रेक्षणिय बनलाय. तिथे थोडे रेंगाळून पंधरा मिटरची डोंगर उतरण पार केल्यावर कच्चा रस्ता लागतो. तो ओलांडून पुन्हा एक छोटी चढण आणि तिथून झुडपी जंगलातुन पठारी मार्ग. येथे एक मोठी अनोखी गोष्ट बघायला मिळाली. वरच्या वसाहतीतल्या काही लहान मुली डोक्यावर हंडा घेऊन पाणी भरायला आल्या होत्या. धोधो पावसाच्या प्रदेशात सुद्धा पाण्याचे दुर्भिक्ष्य. एका कातळ खड्ड्यातून मूली पाणी भरत होत्या. पाणी अर्थातच स्वच्छ. कदाचित वर्षभर येथून पाणी मिळत असावे. पाण्यासाठी वरच्या वसत्यांचा हा महत्वाचा आधार. 
अत्यंत तुरळक वस्ती आणि लोकांची फारच कमी वर्दळ यामुळे या परिसराला एकांतपणाची झळाली लाभलेली. त्यामुळे बरीच झुडपे टिकून. मोठाली झाडी मात्र काहीच दिसत नव्हती. डावीकडे अर्धा किलो मिटर चढण पार केल्यानंतर बंधार्‍याचे दृष्य अधिकच खुललेले दिसले. बंधार्‍यात एक बेट असून त्यावर गच्च् झाडी दिसत होती. पुढच्या उतारावर झुडपांची दाटी वाढलेली बघायला मिळाली. 
आज हिरवे कंच दिसणारा हे पठार पावसाळ्या पश्चात इथल्या गवताची सगळीच तोड होत असावी. त्याच्या खुणा सर्वत्र दिसत होती. थोड्याच अंतरावर काही गाई चरताना दिसत होत्या. आम्ही भैरोबाच्या माळाच्या खालचा महत्वाचा राड्याच्या पाड्याजवळ पोहोचल्याची ती खुण होती. कमालीच्या मुरमाड आणि खडकाळ जमिनीत काही ठिकाणी शेतीकामाची लगबग सुरू होती. भाताची काही तुरळख खाचरे. नाचणी, वरईचची काही ठिकाणी लावणी सुरू होती. 
वाडीतली चंद्रमौळी घरे

प्रत्यक्षात राड्याच्या पाड्याला बगल देऊन आम्ही समोरच्या डोंगराची वाट धरली. त्याच्या पायथ्याला एका शेताची नांगरणी सुरू होती. पावसाने जोर धरला होता. त्यामुळे छत्री सावरत नांगरणी करणार्‍या बैलांचे छायाचित्र घेण्यासाठी थोडी वाट वाकडी केली तर तिथे जुन्या दफनभूमीचे अवशेष दिसले. काही लाकडी स्मृतीस्तंभासोबत एक भली मोठी दगडात सुंदर घडवलेली पण नक्षीकाम नसलेली स्मृतीशिळा आढळून आली. तिथून जवळच एक पुरातन शिवलिंग लक्ष्ववेधून घेत होते. आदिम जमातीत मृत्यू झालेल्यांच्या स्मृती जपण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडाचे स्मृतीस्तंभ आढळतात तसे इथे मोठ्या प्रमाणावर दिसून आले.
याच्या थोडे पुढे आणखी एक कृत्रीम साठवण तलाव लागतो. तो पार करताच माळाला जोडणारा डोंगर लागतो. त्याच्या डाव्या बाजूने चालताना झुडपांच्या वैविध्यपूर्ण प्रजाती लक्ष वेधून घेत होत्या. कृत्रिम तलावापासून वीस मिनीटांच्या चढणीनंतर एक सुंदरशा धबधब्याने लक्ष वेधून घेतली. ही पावसाळी भटकंती असल्याने सगळ्यांनी अर्धा पाऊण तास या धबधब्यात शीण घालवला. इथून आणखी वीस मिनीटांच्या चढणीनंतर माळाच्या माथ्याजवळ जाऊन पोहोचतो. तिथू भरपावसात दुपारचे जेवण. एकाच वेळेस दोन गट आल्यामुळे मोठ्या संख्येने नानाविविध पदार्थांची लयलूट. जेवण सुरू असताना पावसाची जोरदार सर कोसळली. त्याने जेवणात कोणताही खंड पडला नाही. उलट अशा ओल्याचिंब अवस्थेत पावसाने वार्‍यासह जारदार तडाखा दिला, त्यासरशी काही मंडळींनी अवडीच्या पदार्थावर अक्षरश: झपाटा मारला. पावसाच्या मार्‍यात असे मख्ख होऊन किती काळ जेवत बसणार? त्यात हिमांशू देशमूख सारखा मस्तीखोर सवंगडी असला म्हणजे हरेक क्षणाला अखंड मस्ती ही आलीच.
बंधार्‍यातले बेट...समृद्ध

अर्ध्या तासाच्या भोजन अवकाशाने अंगात तरतरी आणली. या टप्प्यावर आसपास कोणतीच वस्ती नाही की, माणसांची वर्दळ. अधून मधून काही गुरं चराई करताना दिसत होते. पावसाचा जोर आणखी वाढल्यामुळे खळाळत वाहणारा एक मोठा ओढा एकमेकांचे हात धरून सावधपणे पार करावा लागला. वरच्या टप्प्यात आणखी एक बंधारा आणि त्यातून वाहणारा ओढा. त्यातून सावरत पुढे गेल्याबरोबर एक छोटी चढण लागली. याभागात भातशेतीची कामे जोरात सुरू होती. पाऊस एव्हाना थांबला होता आणि संपुर्ण माळ ढगांनी भरून गेलेला होता. अक्षरश: स्वर्गीय वतावरण तयार झाले होते.
आता माळ गाव दृष्टीपथात दिसत होते. शेवटच्या जत्थ्यातील मंडळी यायला आणखी अर्धा तास तरी लागणार होता, त्यामुळे आम्ही माळाच्या दक्षिण टोकापर्यंत जाऊन मध्य वैतरणा किंवा मोडकसागर जलाशयाचा परिसर बघण्याचा निर्णय घेतला. या संपुर्ण परिसरातले डोंगर हे गच्च दाट झाडींनी डवरलेले. लोकवस्ती अशी नाहीच. शिवाय तिथे वृक्षतोड करण्यासाठी जाण्याच्या वाटा सोयीच्या नाहीत, त्यामुळे प्रचूरमात्रेत वनसंपदा टिकून. काही डोंगरातून धबधबे वाहत होते. अर्था तास उलटला तरी इथून हलण्याची इच्छा होत नव्हती. पावसाचा जोर आता खुपच जास्त वाढल्याने माघारी फिरण्याचा निर्णय घेण्यात आला. तोच आम्ही ज्या कड्यावर होतो तिथे एक अगदी बारीकसा धबधबा सुरू झाला. आता वार्‍याने वेग घेतल्यामुळे धबधब्याचे पाणी पुन्हा वर येत होते. उलट माघारी फिरणारा धबधबा इतक्या जवळून बघायल मिळाला की, त्याला हात लाऊन बघणे सुद्धा शक्य होते. चमत्काराची ही सुरूवात होती.
जोरदार पावसामुळे हा धबधबा काहीसा मोठा झाला. त्याचे पाणी दरीत पडल्यानंतर गोल टपोरे मोत्याचे रूप घेऊन वर उडत होते. पावसाबरोबरच हवेचा वेग वाढला तसे लाह्या फुटाव्या तसे शेकडो मेाती या धबधब्यातून फुटून वर येत होते. बंदूकीतून गोळ्या झाडाव्यात तशा गतीने हे मोती भराभर सुटताना पाहणे एक स्वप्नील अनूभव ठरला.
कमी वहिवाटीच्या वाटा...

श्वास रोखून बघावे असा हा चमत्कार आमच्यापासून काही फुटांवर सुरू होता. त्यामुळे तिथून हलण्याची अजिबात इच्छा नव्हती. पावसाचा व वार्‍याचा जोर इतका वाढला होता की या कड्यावर उभे राहणे अशक्य बनले, त्यामुळे माळ गावाच्या दिशेने आमची वाटचाल सुरू झाली. स्तब्ध करणारे सौंदर्य बघितल्यानंतर आता पाळी होती निसर्गाच्या रौद्रभिषण चमत्काराची. 
पावसाळ्याच्या सुरूवातीला आकाशात कडाडणार्‍या वीजा हे नेहमीचे चित्र. इथे ऐन पावसाच्या मध्यात वीजा कडाडत होत्या. एक वीज आमच्या खुप जवळ कोसळली. कानठळ्या बसवणारा आवाज सर्वांग शहारणारा होता. सृष्टरचे रौद्र रूप फार जवळून बघायला मिळाले. एव्हाना आमच्या जीपगाड्या येऊन लागल्या होत्या. कोणताच गजबजाट नसलेल्या माळाच्या भटकंतीचा समारोप अशा आक्राळ आवाजात होईल अशी कधीच कल्पना केली नव्हती. भटक्या मंडळींचा येथे वावर असा नाहीच, वेगळ्या पेहेरावात दिसणारी शहरी माणसं बघण्याचे कुतुहल गावातील लहान मुले मुलींच्या नजरेतून जाणवत होते. माळावरून कच्च्या रस्त्याने कसारा घाटाच्या वाडा-विहीगाव फाट्यावर अर्ध्या तासाचा प्रवास करून पोहोचलो. तिथून मुंबई व पुणेकर मंडळींना नमस्कार करून भैरोबाच्या माळाच्या भटकंतीचा समारोप झाला.  
माळावर गवत टिकत नाही...चराई किंवा कटाई...याने गवतीमाळाच्या आश्रयाने जगणारी जीवसृष्टी संपुष्टात येते...

छाप जोशीकाकांची

विश्वास बसत नाही, पण एका अवलिया भटक्याने आपल्या नोकरीच्या आरंभीच्या काळात, ज्यावेळेला डोंगर भटकंतीचा फारसा गाजावाजा नव्हता अशा मागिल शतकाच्या एैशीच्या दशकात कसारा घाट परिसरात एक दमदार माळेची भटकंती हूडकून काढली होती. सह्याद्रीचा हा ठेवा जास्तीत जास्त जणांना मिळावा याकरिता या माळावर सातत्याने दर्दी भटक्यांना घेऊन जाण्याचा ३९ वर्षांपूर्वी सुरू केलेला कित्ता आजही सुरूच असून आहे. यंदा ऑगस्टच्या पहिल्या दोन रविवारी दोन गट याकरिता सज्ज होती.

महाराष्ट्र सेवा संघ, मुलूंड येथे मागच्या वर्षी पार पडलेल्या १६व्या गिरीमित्र संमेलनात, 'गिरीमित्र जीवनगौरव', ह्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित अविनाश जोशी, उर्फ नाशिकच्या भटकंती विश्वातले मानाचे पान जोशी काका यांनी १९८२ साली इगतपुरी येथे कृषी खात्यात नोकरीला असताना कसार्‍यात एक दुर्गम ठिकाणी असलेला माळ भटकण्याकरिता उत्तम ठिकाण असल्याची माहिती मिळाली. वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेने यापूर्वी आठ वेळा भैरोबाच्या माळाची भटकंती आयोजित केली. यंदा ऑगस्ट महिन्यात दोन सलग रविवारी दोन वेगवेगळे गट नेण्यात आले. एकाच वेळी जास्त गर्दी होऊ नये याकरिता ही विभागणी करण्यात आली. 
---
माळ भटकंतीचा हा दुसरा टप्पा...समोरच्या डोंगरावर आणखी एक  टप्पा

भटकंती स्नेही भटकंती
''इरसाल घुमक्कडांना भटकंतीचे एखादे ठिकाण समजावे. त्यावर त्यांनी लहान लहान गटात लोकांना नेऊन भटकंतीचा आनंद द्यावा. अशी अस्पर्षीत ठिकाणे लोकांच्या नजरेत यावीत. काही वर्षातच त्यांना गर्दीची बाधा पोहोचावी. मग उडते एक न घडणारा संघर्ष उडावा - डोंगर भटके विरुद्ध सहलबाज. सहलबाजांनी निसर्गाचा मुलाहिजा न बाळगता गडबड, गोंगाटाने अशी ठिकाणे गजबजून टाकावीत. तिथे मुक्तहस्ते केरकचरा टाकावा. निसर्गाचा एकांत भंग करावा. अशा गर्दी पासून मग दर्दी भटक्यांनी दूरावा राखावा''. महाराष्ट्रात हा प्रकार एक एक करून सगळ्याच प्रसिद्ध ठिकाणी घडत आला आहे. इतका की अगदी शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतल्या महत्वाच्या प्रसंगंचे साक्षिदार असलेल्या ठिकाणांना सहलबाजीने बरबटून टाकले असताना भैरोबाचा माळ सहलबाजांच्या नजरेतून वाचून राहीला ही एक दुर्मिळ, तशीच भाग्याची गोष्ट. त्या मागची कारणे शोधली तर, त्याच्या अडचणीच्या वाटा. पर्यटन सुविधांचा अभाव. थांबायला गैरसोयीचे ठिकाण आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सूई दोर्‍याची स्थिती, म्हणजे जिथून भटकायला सुरूवात केली त्याच्या पलिकडे नेऊन ठेवणारी वाट. या काही कारणांमुळे निव्वळ निसर्गाचा आनंद घेणारेच अशा वाटांचा आनंद घेऊ शकतात. तो घेऊ न शकणार्‍यांच्या पसंतीक्रमात भैरोबाचा माळ कधी सामिल होऊ शकत नाही.
--------
मोठाले वृक्ष नाही...झुडपेही चराईमुळे तोकडी होत चालली

नवे गिरीस्थान हवे
भैरोबाच्या माळेचे अर्थकारण अर्थातच शेती. पावसाळी शेती. पावसाळा सरल्यावर मात्र माळाचे अर्थकारण मंदावते व लोक मोल मजूरीकरिता शहरांकडे वळतात. या आर्थिक मंदिचे प्रतिबिंब वाड्या, वस्त्या नी तिथल्या राहणीमानात उमटते. हे चित्र बदलण्याचा आजवर विचार झाला नसावा, परंतू येथे माथेरान सारखे एखादे गिरीस्थान वसवण्यासाठी भरपूर असा वाव आहे. एकतर येथे माथेरान सारखा भरपूर पाऊ होतो.  डोंगरांचे उंच कडे, जंगल संपदा आणि मुबलक पाणीसाठी असल्यामुळे मोटरवाहन मुक्त असे हे गिरीस्थान निर्माण केले तर. दगड, विटा, मातीच्या देखण्या राहूट्या, घरे, विश्रामालये उभारली. चमचमीत ऐवजी इथल्या स्थानिक पदार्थांनाच ग्राहकाभिमूख सादर करण्याचे गुण स्थानिकांना शिकवले. माळावर दाट झाडीवाढू दिली तर महाराष्ट्राच्या पर्यटन जगतात ती भर टाकणारी गोष्ट ठरेल शिवाय माळावरच्या पर्यावरणाचे छान संवर्धन करता येऊ शकेल. 

माळाच्या पायथ्यालाच कसारा रेल्वे स्थानक आहे, तिथून एखादा मध्यम किंवा पुर्ण विस्तराचा रेल्वे मार्ग माळाच्या विविध टोकांना नेऊन पोहोचणे सहज शक्य होऊ शकते. फक्त बैलगाड्या, घोडागाड्या व घोडेस्वारी, सायकल व सायकल रिक्षा अशाच दळणवळणाच्या विना मोटरवाहन, विना आवाज, विना प्रदुषण सुविधा ठेवल्या तर लोकांना पर्यावरणाच्या अधिक जवळ नेणारा, पर्यावरणाचे संवर्धन करणारा स्वस्त आणि मस्त असा पर्यटन पर्याय उभा केला तर? महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांपैको कोणी तरी आणि प्रशासनातील बाबुंनी हे स्वप्न बघून प्रत्यक्षात साकारायला काय हरकत आहे. नाही तरी आपण आजही खंडाळा, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी, तोरळमाळ हे इंग्रजांनी विकसीत केलेली पर्यटनस्थळेच मिरवत आहोत. स्वतंत्र भारतातले आपण निर्माण केलेले एकही गिरीस्थान पर्यावरण, निसर्गस्नेही नाही, ती तुट भरून काढण्याची येथे मोठीच संधी असेल. 


माळाचे सोंदर्य पावसाळ्यातच...एकदा गवत कटाई किंवा चराई झाली की माळ उघडाबोडका...



उल्कापात होऊन माळावर असे दगड विखुरल्याची मान्यता आहे

रानकेळी अशा अवघड जागीच का? का तर सोप्या ठिकाणी तिची चराई होते...अशा अघड जागीच ती जगू शकते!

मध्यवैतरणा प्रकल्प...मानवी हस्तक्षेप नसल्याने वनराई टिकून...


पानाचे सौदर्य सतत कुस बदलेल...गुलाबी...हिरवे...घट्ट हिरवे...तपकीरी आणि नंतर शिरा शिल्लक राहतील तोवर आनंद उधळेल.

लहानसा सडा

भटकंतीतले अनमोल क्षण...स्वत:ला शोधण्याचे...की स्वत:ला हरवण्याचे

राड्याचा पाडा ओलांडल्यानंतरची डोंगरधार

भैरोबाच्या माळावरचे कठिण जीवन...

शेतीसाठी हिरवे पट्टे पिवळे झालेत...धन्यभाग्य मोठी झाडे टिकवलीत...


माळावरचे जुने शिवलिंग...

समोर दिसतो त्या डोंगराला मध्यावरून वळसा मारून भैरोबाच्या माळाचा शेवटचा टप्पा

आषाढस्य शेतीची मशागत

दिवंगतांच्या स्मृती काष्ठस्तंभ रूपात


जुनी स्मृतीस्तंभ

Saturday, July 27, 2019

hirva patta

नाशिक आणि नगर जिल्ह्यात वसलेला एक मध्यम उंचीचा किल्ला, पट्टागड. त्याला विश्रामगड असेही संबोधले जाऊ लागले. अष्टभूजा पट्टाई देवी गडाची अधिष्ठात्री, तिच्यावरून पट्ट्याचा डोंगर आणि पुढे जेव्हा केव्हा त्यावर किल्ला बांधला तेव्हा पट्टागड, त्याच्या बरोबरीने विश्रामगड हे नामाभिधान.
राजगड, रायगड आणि कदाचित पन्हाळगडानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वाधिक काळ वास्तव्य केलेला गड म्हणून त्याची इतिहासात नोंद झाली. महाराजांनी आजारपणात असताना येथे विश्राम केला म्हणून विश्रामगड? एवढे एकच कारण असावे, की हा गड खरोखरच आरामदायी आहे? येथे राहणार्‍याला तो चिंतामुक्त ठेवतो म्हणून येथे आराम वाटत असेल? इथल्या वातावरणात व्याधी बर्‍या होतात म्हणून बरे वाटत असेल? इथले हवामान अल्लाददायक म्हणून उत्तम हवापालट करण्यायोग्य हा असेल, की हा सगळ्या तापाव्यापा पासून दूर ठेवतो म्हणून, विश्राम?

'आपल्याला पट्टागडावर जायचे आहे, त्याचे त्या कोनामधूनचे छायाचित्र छान येईल. बघूया, पट्ट्याचे प्रतिबिंब मिळते का ते? 'चल, शनिवारची मस्त पावसाळी भटकंती होईल'! 
मला कामातून सुटी नसताना अजय हातेकरचा हा प्रस्ताव आला तेव्हा सौभाग्यवतींना त्याच्या मनाची तळमळ सांगितली, ती ही कळवळली, 'तो इतका आतून म्हणतोय तर जाऊनच ये'! होकार देऊन पाठीत धपाटा टाकण्याची जुन्या शिक्षकांची, पूर्वीच्या मंडळींची पद्धत होती, कोणी जर काही अवास्तव मागितले तर चांगला दणका बसायचा, असा काही हा प्रकार नाही ना? त्यामुळे जरा चाचरतच, हो! जाऊन येतो! असे तिला आश्वासन दिले. 
ऐन कामाच्या दिवशी आश्चर्य, अनपेक्षीत असा कौल गृहमंत्रालयाकडून मिळाला होता. आता सारे लक्ष भटकंतीवर केंद्रीत केले. मनात बर्‍याच वर्षांपासून  गडातला विश्राम शोधाण्याचे घाटत होते, ती वेळ आज येऊन ठेपली होती.

औन्ढा: भात खाचरातले प्रतिबिंब...
'येडे का खुळे! असा एका भेटीत गड भेटतो का? तुम्ही गेले आणि त्याने तुमच्यासाठी पायघड्या टाकल्या. भडाभडा सगळी गुपिते, तुमच्या पुढ्यात रिती केलीत', गड आपल्याला काही सांगेल का? त्याच्याकडून काही संकेत मिळतील का, ही चिंता होतीच. 'आपण काय भावनेने त्याला सामोरे जातो', हे महत्वाचे, मनाने ठरवले तर नक्कीच घडेल, हा आशेचा एक किरण सोबत होता.

दोन हजार साली बघितला, त्याच्या फारशा स्मृती मनात नव्हत्या. तेव्हा आम्हाला भटकंतीत नैतिकता असते हेच ठाऊक नव्हते. आम्ही मस्त मजा करायला चार मित्र दोन गाड्यांवरून गेलो होतो. भगूरच्या बाजारातून एक भलामोठा मासा विकत घेतला होता. गडावर रात्री पोहोचलो, माशाचे कालवण केले. सकाळी जाग आल्यावर वरची पडकी वास्तू बघितली. 'इथे शिवाजी महाराजांनी विश्राम केला', असे एकमेकांना सांगून गड नीटपणे न बघता उतरलो होतो. गडावरचा त्र्यंबक दरवाजा तर आठवत सुद्धा नव्हता. (अजय मागच्या भेटीत आला तेव्हा त्याला त्र्यंबक दरवाजाचे भग्न रूप दिसले होते. त्यावरच्या प्रकाशाच्या छटा त्याने टिपल्या होत्या. २०१६च्या गिरीमित्र संमेलनात त्याने या दरवाजाची संकल्पना घेऊन भित्तीचित्र बनवले होते, त्याबद्दल त्याचा विशेष सत्कार झाला.)


त्र्यंबक नावाचा दरवाजा आहे, तर तर काही वर्षांनी कळले होते. आता गडाकडे बघण्याची नजर लाभली आहे, तेव्हा विश्राम नावातले आश्चर्य हूडकून तर काढू! तपात थोडी शक्ती असली की हाती काही तरी लागते, काही नाहीच गवसले तर चांगली छायाचित्र तर नक्कीच मिळतील!

नाशिकरोड-देवळाली-छावणी-पांढूली-ठाणगाव हा मार्ग पुसटसा आठवत होता. अजय जाऊन आला होता, पण त्यालाही रस्ता ठाऊक नव्हता. आम्ही भगूरवरून पाच किलो मिटर पूढे जाऊन घोटी-सिन्नर मार्गावरचे पांढूर्ली गाठले. २००० साली हा मार्ग अस्तित्वात नसावा किंवा घोटीवरून शिर्डीला जाण्यासाठी त्यावर सोयीचा रस्ता नसल्याने तो लहान, अविकसीत आणि त्यामुळे कमी वहिवाटीचा असावा. साईभक्तीच वाढ होत गेली तसा हा मार्ग अधिकाधीक उन्नत होत गेला, अजूनही होत आहे. आता तर समृद्ध हा मुंबई-नागपूर महामार्ग या परिसरातून जात असल्याने त्याचे नव्याने महत्व वाढले आहे. 
ठाणगाववरून मोठे अंतर कापावे लागते हा आमचा कयास होता, तो बरोबर निघाला. 'तुम्हाला  टाकेद मार्ग सोपा पडेल, शिवड्यावरून जवळचा मार्ग आहे, पण तुम्हाला उमजणार नाही', काही पांढूर्लीकरांनी वाट सांगितली, आम्ही शिवड्याचेच आव्हान स्विकारले. 
बेलूहून सुसाट पाटाची वाट
बोरखिंड...
पांढूर्ली गावातून पुढे ४ किलो मिटरच्या निसर्गरम्य रस्त्याने जाताना आजवर न बघितलेले डोंगर न्याहाळत बरोखिंडीत पोहोचलो. नाव ऐकुनच आनंद द्विगुणीत झाला. विश्रामगड दोन घाटवाटांनी जोडला आहे हे ठाऊक होते, त्याला खिंडीची वाट आहे, ही आमच्याज्ञानात भर घालणारी गोष्ट होती.
'इथून पुढे रस्ताच संपतोय, गाडीवाटच नाही. तुम्ही इथे आलात कसे? इथून विश्रामगडावर जाता येणार नाही, पुन्हा पांढूर्लीला जाऊन तिथून टाकेद मार्गे जा, सरळ टाकेदला न जाते बेलू फाट्याने गेलात तर म्हसवळन घाटात पोहोचण्यासाठी दिड एक किलो मिटरचे अंतर वाचू शकते', गावच्या वेषीवर बसची वाट बघत उभे असलेल्यांनी सांगितले. 'बोरखिंडीतून मागच्याच आठवड्यात गावची मंडळी विश्रामगडावर जाऊन आली होती, पण आत्ता निघालात तर संध्याकाळ होईल तिथवर पोहोचायला. शिवाय तो रस्ता तुमच्या सारखी मंडळी चालून जाऊ शकणार नाही'.

बरोखिंडीतून वाट आहे आणि ती मोठी पायपीटीची आहे. कदाचित बिकट असू शकते ही माहिती पदरात पडली. त्यावरून पुन्हा केव्हा तरी या खिंडीच्या वाटेचा वाध घेऊ, आजची भटकंती अर्ध्या दिवसात उरकायची, तेव्हा बरोखिंडीच्या परिसरात जुनी मंदिरे, पुरातन अवशेष याची माहिती घेतली आणि आम्हा आल्या वाटे पांढूर्लीला परत फिरलो. काही वेळेस चुकीच्या वाटा चांगले काही तरी पदरात टाकतात, भविष्यातील भटकंतीसाठी ही चुकामुक लाभदायक ठरणार!

म्हैसवळण घाटाचा पाठीराखा...
बेलू फाटा व तिथून लहानसे बेलू गाव सोडल्यावर एका पाटाच्या किनार्‍याच्या पक्क्या बांधीव रस्त्या आडवा आला, इथून उजवे वळण घ्यायचे की, डावे? की समोर डोंगरातून वाट निघते? या निर्जन ठिकाणी कोणाला विचारावे असे वाटत असताना समोरून एक स्थानिक मोटरसायकलवरून येताना दिसला, त्याला वाट विचारत असताना आणखी दोन मोटरसायकल स्वार आले, आमचा मनसुबा सांगितला तेव्हा त्यांच्या बोलण्यातून आश्चर्य जाणवले. यावाटेने भटकी मंडळी फारशी जात नसावी.
पाटालगतच्या निर्जन निसर्गरम्य रस्त्यावरून अजय गाडी दामटत होता. घोटी-सिन्नरला जोडणारी ही भली मोठी डोंगररांग इथून सलग भासत होती. आवंढा, पट्टा, रतनगड, बितनगड, आड, डुबेरा यांच्या जोडीला काही अज्ञाताच्या गर्तेत हरवलेले इतिहास काळातले काही डोंगर यात असतील या विचारांनी मनात उत्साह वाढवला. विचारांची तंद्री तेव्हा भंगली जेव्हा एका भातखाचरात आवंड्याचे प्रतिबिंब उमटलेले दिसले. अजयने गाडी मागे वळवली. योग्य जागा शोधून पाण्यात उठलेले प्रतिबिंब त्याने त्याच्या कॅमेर्‍यात आणि मी माझ्या मोबाईल फोनच्या कॅमेर्‍यात टिपून घेतले.

एकच प्रजातीचे रोपण जैवविविधतेला घातक तेव्हा ही रोपे वेगवेगळ्या ठिकाणी लावावीत.
तिथून पाच दहा मिनीटातच म्हसवळण घाटाला लागलो. अजयच्या दुचाकीला, 'अल्टीट्यूड सिकनेस'चा त्रास जाणवू लागला. गाडी घाट चढते की नाही, अशी स्थिती निर्माण झाली. घाटाच्या माथ्यावर उजवीकडे बितंग नावाच्या डोंगराची पाटी दिली. बितंग्याचे काही महत्व असावे, काही देऊळ वगैरे, माहिती सांगणारे कोणी नसल्याने आम्ही डाव्या बाजुला कोकणगावची वाट पकडली. समोर आडवा पसरलेला विश्रामगड दिसत होता. डुबेरे किंवा ठाणगावरूनच तो जवळ पडला असता असे वाटू लागले. डावीकडे पवनचक्क्या आणि त्याच्या खालूनच घाटमाथ्याचा रस्ता, आसपास ना गावे ना वाहनांची वर्दळ त्यामुळे गर्दीपासून दूर आल्याच्या जाणिवेने मन हलके झाले. एक मोठा वळसा घालून थेट विश्रामगडाच्या पायथ्याला गाडी पोहोचली.

२००० साली येथे एकच झोपडी दिसली होती. त्याच्या पुढे आम्ही उघड्यावरच गाड्या लाऊन गडावर मुक्काम केला होता. आज या परिसराचे चित्र केवढे बदलले आहे. पक्का डांबरी रस्ता आणि त्याच्या लगत तीन चार घरे येथे दिसत होती. एक तर पक्के सिमेंट कॉंक्रिटचे. पहिलेच घर भरत निसरड यांचे. शासकीय घरकुल योजनेतून बांधून मिळाले असावे.
चहा, नाष्ता मिळेल का? असे विचारताच त्यांचा बाहेर खेळणारा मुलगा आत पळाला, भरत यांनी बाहेर येऊन स्वागत केले. गेल्या काही वर्षांपासून ते गडावर येणार्‍यांसाठी जेवण पाण्याची व्यवस्था करत आहेत, त्यामुळे आम्ही योग्य ठिकाणी आलो होतो. 'तुम्ही अगदी बरोबर आणि जवळच्या मार्गाने आलात. ठाणगावरून लांब पडते', निसरडांनी आमच्या मनातली शंका दूर केली होती. चहा पोहे होई पर्यंत पिकपाण्याच्या गप्पा झाल्या. या ऋतूत आहारात काय घेतात वगैरे विचारले आणि आम्ही त्याच्याच दारात गाडी उभी करून पट्ट्याकडे निघालो.

पक्क्या रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावली आहेत. त्यांना प्लास्टिकच्या जाळीचे कुंपण केले आहे. काही रोपे कुंपणासकट उन्मळून पडली होती. 'गडाच्या पायथ्याला एक तोफ होती', असे अजयला आठवले. तोफ तर दिसली नाही, पण झाडाखाली एका जुन्या मंदिराचे काही अवशेष आणि शेंदूर लावलेल्या मुर्त्या दिसल्या.

मुसलमानपूर्व काळात वैभवशाली हिंन्दू संस्कृती नांदत असल्याच्या त्या खुणा, फार सुंदर कातळा नक्षीकाम केलेले मंदिर असावे याची साक्ष देत होते. मुर्ती आणि नक्षी घडविलेले चार दोनच दगड शिल्लक राहिलेत, बाकी भग्नावशेष बघायला सुद्धा शिल्लक नाहीत. मनाला असे काही बघितले की मोठ्या वेदना होतात. आम्ही दोघे त्या भग्न अवशेषात हरवून त्याची प्रकाशचित्रे घेत असताना पलिकडून एक आजी धावत आल्या आणि फार जुनी ओळख असावी अशा अविर्भावात बोलू लागल्या.

सुमन महादू जाधव...जगण्याची उर्जा पट्टागड देतो...
आजींच्या डोळ्यातली चमक पाहून मी छायाचित्रण बंद केले आणि मोबाईलने त्यांचे चलतचित्रण सुरू केले. त्यांना मनभरून बोलायचे होते. तब्बल आठ मिनीटे त्या न थकता बोलत राहिल्या. पाऊस कमी झाल्या पासून त्याचे मालक कसे दगावले...पिकपाणी कसे रोडावले...पावसाचे तंत्र बदलल्याचे आश्चर्य...मुलं सोडून गेलीत...सांभाळणारे कोणीच नाही.
त्या आपली दुख:द कहाणी सांगत होत्या की एखादी यशोगाथा, काहीच उमजेना, इतका उत्साह त्यांच्या बोलण्यातून धबधब्या सारखा ओसंडत होता. शिवाजी महाराज वर राहून गेल्याचे सांगताना डोळ्यात उठणारे ते भाव...आज साडे तीनशे वर्षांनंतर कुठल्या डोंगरकपारीत एक फाटके जीवन जगणारी आजी, इतक्या आदर, उत्साहाने बोलताना बघून मन गहिवरून येत होते.
तुम्ही वर जा...येथे कशाचीच भिती नाही, असे सांगून आजींनी त्यांच्या भग्न घराचे चिरे दाखवले व त्या निघून गेले....जाता जाता नाव विचारले तर परत जवळ आल्या, सुमन महादू जाधव. आम्ही जाधव, जिजाऊ सुद्धा जाधव, आमचेच कोणी किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळात कामाला असतील, हे सांगताना त्यांच्या मनातला अभिमान बघण्याजोगा होता.
इथे आता घर नाही, शेतात काही पिकत नाही, मग या ठिकाणी काय करतात, या प्रश्नावर म्हणाल्या, तुमच्या सारखे कोणी आले तर गाड्या सांभाळते, कोणी दहा वीस रूपये देतं...कोणी नाही देत...पन लोकं तर भेटतात...त्यांच्याशी थोडं बोलता येतं...नाही तरी घरात जाऊन कोणासाठी काय करणार...घरात तर कोणीच नाही, माझ्या एकटीचे मीच करणार...त्यानंतर शेतात येणार...तिते पिकत काही नाही...पिकतात फक्त गाड्या...त्या सांभाळायच्या हेच माझं पिक!
डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. आजींच्या घरात कोणीच नाही, उत्पन्नाचे कोणते साधन नाही. पर्यटक आले तर थोडे फार पैसे मिळतील, नाही आलेत तर? कशी गुजरण होत असेल? वृद्धांसाठीचा शासनाचा निर्वाह भत्ता तरी मिळत असेल का? मिळाला तरी तो पुरत असेल? रोज किती लोकांशी बोलत असतील या...किती दिवसांपासून...प्रत्येकाशी बोलून सुद्धा पट्टागडाबद्दल, जणू पहिल्यांदाच सांगत आहेत, असा अविर्भाव!


भले शाब्बास!
मनात जे घेऊन आलो होतो, त्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला गडाच्या पायथ्यालाच मिळाले होते. आमच्या नशिबावर आम्हीच आमची पाठ थोपटून घेतली. एक फाटके जीवन जगणार्‍या निराधार आजींना गडाने एकटेपडू दिले नव्हते. त्यांना तो सावरत होता. त्यांच्या मनाला आराम मिळत होता, त्यामुळे त्या अंधरूणाला खिळण्याऐवजी रानातून तरातरा चालत, हासत, 'हारायचे नाही, जगायचे, आनंदात रहायचे, काही कमी पडले तर तो देईलच', या आशेवरचे त्यांचे जगणे. माणसाच्या जगण्यातला विश्राम यापेक्षा वेगळा असू शकतो का? शिवाजी राजांनाही आजारपणात येथे अशीच तरतरी आली असेल. त्यांचेही पाय निघता निघत नसतील, असा हा आरामासाठी जखडून ठेवणारा गड!
आठ दहा मिनीटे आजींशी गप्पा मारल्यानंतर आता गडावर नसतो गेलो तरी चालू शकले असते, इतकी आमच्यात तरतरी आली होती. समोर एक चौकोनी प्रवेशद्वार नव्याने बांधलेले. अर्थात दगडात नसून सिमेंट कॉंक्रिटमथ्ये. त्याला रंगरंगोटी करून जन्या बांधकामा सारखे भासविण्याचा प्रयत्न. आतल्या बाजुला चौकी. तिथे वनखात्याचा मजूर पर्यटकांकडून प्रत्येकी ५/- रूपये गोळा करतो. यातून रक्कम तर गोळा होतेच, शिवाय गडावरच्या वास्तूंचा, विशेष करून झाडांचा रखरखाव सुद्धा ठेवला जातोय हे परिसराकडे बघितले तरी चटकन नजरेत भरते.

पट्टागडाकडे जाणारा पक्का रस्ता व दुतर्फा वृक्षारोपण
समोर पाण्याचे पाईप अर्धगोल वाकवून त्याला पत्रा ठोकून आणखी एक प्रवेश कमान, त्यावर गटाचे नाव रंगवलेले. पुढे एक मोठा हत्ती बनवलेला, अगदी खर्‍या हत्ती इतका मोठा आकार. पर्यटन विकास निधीतून हा खर्च करण्यात आल्याचे प्रतित होत होते. त्याच्या वरच्या बाजूला एक तोफ भगव्या रंगात रंगवलेली दिसली. अजयने ओळखले, ही तीच तोफ जी पूर्व पायथ्याला पडून होती. तिचे पुढचे टोक सापडल्याने ते आतून जोडून तोफ पत्र्याच्या चाकांवर उभी केलेली. रंग न देता, मुळ स्वरूपातच जतन केली असतील तर तिचे ते रूप जास्त भावले असते.
इथून उजवीकडे वळणार्‍या मार्गावर प्लास्टिकच्या कापडावर गडाची व पर्यटन विकासूतून केलेल्या कामांची संक्षिप्त सचित्र माहिती देणारे फलक, गडाचा नकाशा. याच्या समोरच्या बाजूला मजबुत बांधणीचे स्वच्छतागृह बघून आश्चर्य वाटले. आत जाऊन बघितल्यावर सारा उत्साहच मावळला. हात धुण्याचा नळ तुटका होता व हात धुण्याच्या भांड्यात घाण होती. शौचालयाची अवस्था कमालीची बिकट. आपली माणसं हिणकस वृत्ती स्वच्छतागृहात हमखास दाखवतात. गडावर उघड्यावर बसण्यापेक्षा स्वच्छतागृह केवढी उपयोगाची वास्तू. महिलांचा तर कोणी विचारच करत नाही.
वनविभागाने पर्यटन विकासाच्या नावाखाली खाल पासून पाणी पूरवठ्याचे लोखंडी पत्र्याचे नळकांडे वापरून सिमेंटच्या पार्‍यांना संरक्षक कठडे बसविले आहेत. पायर्‍या प्रशस्त असल्याने त्या हलत्या कठड्यांचा आधार घेण्याची वेळ येत नाही. वर दोन ठिकाणी पत्र्याचे आडोसे तयार केले आहेत. लोकांना उन, पावसात त्याखाली थोडा विश्राम घेता येऊ शकतो, ही त्यामागची भावना उदात्त असली तरी असे आडोसे गडावरच्या कमालीच्या विपरीत हवामानात टिकत नाहीत. केलेला सगळा खर्च हा हमखास वाया जातो. माकडांच्या टोळ्या पत्र्ये व लोखंडी पट्ट्या खेचून काढत त्या खिळखीळ्या करताना दिसत होते.

चित्रवत दृष्य...ठिकाण पट्टा किल्ल्याचा पायथा.
आज आम्हा दोघांचीच चौकी नाक्यावर नोंदणी झाली होती. गड रिकामा होता. निर्जन गडावर भटकंतीचा आनंद वाढवला तो मार्गाच्या तुतर्फा उगवलेल्या गवताच्या ताटव्यांनी. जसजसे वर जात होतो, तसतसे गडभर पसरलेले हिरवे पुंजके नजर वेधून घेत होते. अशा गणीत गवती, झुडपी पुंजक्यांनी गडाच्या सौंदर्याला हिरवी झळाली दिल्याचे दृष्य हिरवाईत हरवून टाकणारे.
वरच्या टप्प्यावर तीन मुखाच्या देवीची मुर्ती बसविण्यात आली आहे. येथे घोडे बांधण्यासाठी दगडात पाचठिकाणी खाचा खोदल्यात त्यावरून ही घोड्यांची पाग असावी असे वाटते.

पट्टेवाडी..दगडीभिंतीच्या घरांचे वैभवशाली अवशेष
पहिल्या सपाटीवर उत्तर बाजुला त्र्यंबक दरवाजा. याचे ढासळलेले दगड सिमेंटमध्ये सांधून हा दरवाजा पुन्हा उभा करण्यात आला आहे. याच्या खालच्या पार्‍यांना रेलिंग बसविण्यात आले आहेत. खरे तर त्र्यंबकदरवाजातून खाली उतरणारी वाट पुढे बंद झाली आहे. कदाचित इंग्रजांचा हा प्रताप असावा. आज या वाटेने गडावर वहिवाट नाही. संरक्षक नळकांड्यांचा हा खर्च अनाठायी.
त्याहून मोठे आश्चर्य दिसले ते दक्षिण बाजुला. पूर्वी तिथे पट्टाईचे जुने चिरेबंदी मंदिर होते. ते पुर्णपणे पाडून त्याजागी सिमेंट कॉंक्रिटचे भले मोठेमंदिर उभारण्यात आले आहे. त्याला लहानसा गाभाराही बनविण्यात आला आहे. जुन्या वास्तुंचे पुननिर्माण करण्याचा विषयच ठेवलेला नाही. सरसकट बांधकाम जमिनदोस्त करून त्या जागी नवे मंदिर! इतिहासाची अक्षम्य हानी आपल्याच हातून घडतेय. गडांवरच्या पुननिर्माणावर शासानाचे कुठलेच धोरण नसावे? कुठलाच अंकुश नसावा?

किल्ल्याच्या पायथ्याला सुमन जाधव यांच्या घराचे अवशेष
पर्यटकांची फार मोठी ये जा येथे अलिकडे सुरू झाल्यामुळे माकडे फार बोकाळलीत. पिशवित खाण्याचे पदार्थ आहेत, असाच त्यांचा ग्रह असतो. त्यामुळे ते अंगावर अक्षरश: धावून येतात. त्यांचा ससेमिरा चुकवत मंदिरापासून तसेच पुढे दुसर्‍या टप्प्यावर पोहोचता येते. हा भाग म्हणचे खच्चून भरलेला तेरडा. आता तेरडा म्हणजे येत्या काही दिवसात का चमत्कार घडवितो, हे जाणकाराला समजलेच असेल!
हलणार्‍या संरक्षक नळकांडी खांबांचा आधार न घेता वरच्या सपाटीवर गडाची सगळ्यात महत्वाची ऐतिहासिक वास्तू. असे म्हणतात की, शिवाजी महाराजांनी या गडावर सतरा दिवस वास्तव्य केले. काही लेखक हा काळ सव्वा तीन महिना तर काही जण तीन महिने असल्याचे नमुद करतात, परंतू सतरा दिवसांचा मुक्काम ही शास्वत माहिती मानली जाते.
आज गडावर जी भव्य वास्तू दिसते त्यात महाराजांनी मुक्काम केल्याचे काही जण मानतात, परंतू ते बरोबर वाटत नाही. एक तर हे निवासस्थान नाही. या वास्तूला दारे खिडक्या नाहीत तीन बाजुंना अगदी लहान दरवाजे, ज्यातून एका वेळेला एकच माणूस जाऊ शकतो. हे धान्याचे कोठार असावे किंवा कचेरी असावी. किल्लेदाराचा वाडा असता तर त्याला जोतं, दारे, खिडक्या तरी असत्या.

पट्टागडाचा मुसलमानपूर्व काळ वैभवशाली असल्याची साक्ष.

या वास्तूचे बांधकाम निझामशाही शैलीसोबत मेळ खाते. तसे बघितले तर हा गड बहामनींकडे होता. त्यांच्या अस्तानंतर तो निझामशाहीत दाखल झाला, त्यामुळे गडावर बहमनी काळातलील बांधकामांच्या अवशेषांचा शोध घेतला जाऊ शकाते.
चौकोनी चिर्‍यांतून तयार केलेला मोठा अर्धवतुळाकार घुमटाचे छत. बाजुला अशाच अर्ध, पाव वर्तुळातल्या घुमावदार कमानी. नगरच्या चांदबीबी महाल म्हणून ओळखल्या जाणार्‍या वास्तूलाही अशा स्वरूपाच्या अर्धवर्तुळाकार घुमावदार कमानी व वर भव्य गोल घुमटाकार छत बघायला मिळते.
एकुण काय तर, महाराजांनी वास्तव्य केले ती हीच इमारत असण्याची शक्यता कमीच. हा अंबारखानाच, किल्लेदाराचा वाडा अन्यत्र असावा. तिथे स्वयंपाक गृह, न्हाणीघर, स्वच्छतागृह अशी दालने असू शकतील. गडाच्या कचेरीचीही इमारत त्या काळी असू शकते. या एकुणक्ष एक इमारतींचे नामोनिशाण शिल्लक नाही. उत्खननातून दबलेल्या इमारातींचे अवशेष शोधले जाऊ शकतील.

पूर्वी अंबारखान्याची वास्तू भग्न स्थितीत होती. आता बाजुच्या घडीव दगडातून पडक्या भिंती सिमेंट कॉंक्रिटने सांधण्यात आल्या आहेत. तळाला शहाबादी फरशी बसविण्यात आली आहे. आश्चर्य म्हणजे या वास्तूच्या बाहेर रायगडासारखी मेघडंबरी आणि त्यात महाराजांचा अर्धाकृती पुतळाबसविण्यात आला आहे. त्याला मुगल शैलीतल्या बागेने व लोखंडी नक्षीच्या काठांनी सजविण्यात आले आहे.

या हिरवाईला तोड नाही...पट्टा किल्ल्याचा पायथा...

इतिहासात या गडाचे महत्व काय होते आणि आज आपण कोणत्या वास्तू त्यावर निर्माण करतोय? कशाचा कशाशीच मेळ नाही. विश्राम गडावर मेघडंबरी? दुसरा रायगड दाखविण्याचा  हा खटाटोप कशासाठी? त्यापेक्षा वास्तू आहे तशीच जतन केली असती, किंवा त्याच्या संबंधीचे संशोधन करता येऊ शकले असते.
याहून मोठे आश्चर्य तर वास्तूच्या आत बघायला मिळाले. शिवकाळातील सर्वज्ञात घटनांचे प्रसंगी भित्तीशिल्पांच्या मदतीने तयार करण्यात आले आहेत. त्यात लाल महालात जाऊन शाहिस्तेखानाची बोटे छाटताना सारखे प्रसंग. बाहेर जशी मेघडंबरी, तशी आणखदी दुसरी मेघडंबरी आतमध्ये सुद्धा. ही पुनरावृत्ती कशासाठी. येथे शिवराज्याभिषेकाचा प्रसंग मोठमोठ्या पुतळ्यांच्या मदतीने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यात गागा भट्ट, हेन्री ऑक्झेन्डन पासूनचे विविध पुतळे. पुतळे अर्थात फायबरमध्येच तयार करण्यात आले आहेत. शिवाय या दालनाला लोखंडी दरवाजा बसविण्यात आल्यामुळे लोकांची वहिवाट बंद करण्यात आली आहे, परिणामी उंदीर, वटवाघळांच्या वास्तव्यामुळे त्याचा उग्र दर्पही जाणवतो.
शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा मेघडंबरीत बसविण्यात आला आहे. अभ्यासकांच्या मते हे व्हिक्टोरियन पद्धतीचे आसन आहे. रायगडावरचे मयूर सिंहासन हे बैठे होते व त्यावर लोडतक्के होते. शिवाय कोणताही हिंदू राजा सिंहासनावर पादत्राणे घालून बसत नाही, महाराजांच्या पायातही पादत्राणे न दाखवता ती बाजूला असावीत.

वनविभागाची चौकी...गड प्रवेश सशुल्क

इतिहासातील व्यक्तीरेखा व प्रसंग हे अभ्यासपूर्वकच असायला हवेत, अन्यथा पुढच्या पिढीकडे चुकिचा इतिहास पोहोचतो. पिढीदरपिढी ती चुक मग वाढतच राहते.
विश्रामगडचा संबंध जालनापूरच्या लढाईशी आणि तिथून संगमनेरच्या लढाईशी जोडला आहे. महाराज सव्वा महिना वास्तव्यास आहेत. त्यावरच्या अस्सल माहितीवर आधारीत काही प्रसंग साकारले असते तर ते नाविन्यपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि त्यामुळेच गडविकासाचा लौकिक वाढविणारे ठरले असते.
यावास्तूच्या उजव्या हाताला पाण्याचे कातळात खोदलेले भव्य असे टाके. त्याच्या वरच्या डाव्या बाजुला कातळात खोदलेली शिवपिंड जीर्ण दशेत आहे. इथून थोड्याच अंतरावर गडाची शेवटची तिसरी सपाटी. या सपाटीवर हिरवे गवत, तेरडा व टोपली सदृष्य कारवी व इतर झुडपांचे पुंजके म्हणजे डोळ्यांना मेजवानीच. इथल्या देशकड्याला लोखंडी पत्र्याच्या नळ्यांचे संरक्षक काठ बसविले आहेत. तसे हा परिसर धोकादायक आहे. परंतू काठ बसविण्याऐवजी दगडी चिरांची अडीच तीन फुटांची तटासारखी भिंत गडाच्या वतावरणासाठी संयुक्तिक ठरली असती. शिवाय तिचे आयूर्मानही जास्त राहिले असते. या सपाटीच्या वरच्या टेकडीवर वनखात्याची खास ओळख असलेला लहान सिमेंटमध्ये घडविलेले घुमट. त्याच्या पुढे पाण्याची कातळात खोदलेली दोन जुनी टाकी सद्या भर पावसात कोरडी पडली आहेत. इथून वर बालेकिल्ला. त्यालाही लोखंडी पत्र्याच्या नळ्यांचे संरक्षक काठ बसविलेत.




या पठारावर कातळातले एक लहान कुंड व त्याच्या बाजुला दगडात वैशिष्टपूर्व चीरा देण्यात आल्यात. त्याच्या थोडे पुढे कातळात शिवपूर्व काळातली खांब गुहा खोदलेली. या ऐसपैस गुहेत धुळमातीचे साम्राज्य. विश्रामगडाचे वैभव अर्ध्या दिवसाच्या भटकंतीत जमेल तितके साठवताना. परतीचे वेध लागले होते. बाले किल्ल्याला कड्याच्या बाजूने येणो ढग आणि उजवी हिरवीकंच बाजू उन्हाने उजळविणारे दृष्य अचंबित करणारे. समोर कळसुबाई, अलंक-मदन,कुलंग पुर्णपणे ढगात झाकोळलेले. एव्हाना काही पर्यटक गडावर आल्याचे दिसत होते. हिरव्या गवती, तेरड्याच्या ताटव्यातून कोणी घुसण्याचा प्रयत्न केला तर. चार महिने गडाची शोभा वाढविणारे हे सृष्टीचे अनोखे सौंदर्य, त्याला नजर लागेल तर ती माणसाचीच. पर्यटकांनी त्याची काळजी घेतली तरी पावसाळ्यानंतर चराईत वरचा गवती माळ व झुडपे सारीच भक्ष्यस्थानी पडणार. सह्याद्रीचे हे भयाण वास्तव सद्या बर्‍याच डोंगरांवर बघायला मिळते. आम्हाला मात्र पट्ट्याच्या अनोख्या रूपाचे दर्शन घडले होते. तो आरामदायी आहे. अंगात तारूण्य, तेज उत्साह भरणारा. म्हणूनच शिवाजी राजांनी याची निवड केली असावी.
महाराजांनी येथे महिना भर काय केले असेल. कुठेकुठे वावरले असतील. इतिहासात रममाण होत, हिरव्या कंच ताटव्यांना डोळेभर साठवत गड केव्हा पाय उतार झाला कळलेच नाही.

काही पर्यटकांनी सांगितले की, या हत्ती सोबत सुरूवातीला दोन पिल्लेही होती...फायबरचे काम किती काळ टिकणार?

पायथ्याला पुन्हा आजी भेटल्या. त्यांनी आग्रह करून म्हळूंगी नदीच्या उगमा जवळचे जुने शिवमंदिर बघण्याचा आग्रह धरला. मनाला कमालीचा थंडावा देणारा मंदिराचा परिसरा. तिथले चिर्‍यातले बांधकाम. पाउल हलूच देत नव्हते. तिथून परतल्यावर पुन्हा आजींशी दहा वीस मिनीटे गप्पा. कुठून येते ही उर्जा...घरदार सगळं संपलेलं असताना निखळ हसत राहण्याची शक्ती कोण देतं? पट्टाच ना? त्याच्या कुशीत महाराजांप्रमाणेच आजीबाईंना आराम मिळतो!
आजींचा निरोप घेऊन निसरड यांच्या घरी दुपारचे ताजे गरमागरम, चुलीवरचे जेवण. भटकंतीचे पुरेपूर पेटारा उलगडून झाला होता. आमची दुचाकी कोकणगावच्या दरीत उतरत असताना, 'थांबा अजुन संपलेले नाही, पेटारा शिल्लक आहेच्या अविर्भावात,  सूर्य ढगाआड नाहिसा झाला. आता सगळ्या दरीत ढग बसवले होते. धुसर वातावरण...पाण्याचा लवलेश नाही...हे खरेखुरे पावसाचे ढग. हिवाळ्यात धुके पडते तसे. आमचा प्रवास आता स्वर्गातून सुरू होता. त्या धुसर वातावरणाची धुंती काही औरच. त्या धुंदीत गाडी दौडत होती. ओथंबून भरलेल्या भात खाचरात काही शेतकरी पेरणीच्या लगबगीत तर कोणी बैलजोड्या घेऊन रस्त्याने परतताना. आसपास डोंगर, दरी, शेत आणि झरे याचेच सानिध्य!

पायथ्याची तोफ गडावर आणली पण रंगवून.
खालच्या टप्प्यात पोहोचताच विश्रामगडावरचे काळे ढग बाजुला होत असल्याचे दिसले, आता एका बाजुने पांढर्‍या ढगांनी गडाला गुरफटायला सुरूवात केली. आम्हाला दहा एक मिनीटे हा नजारा दाखविण्यासाठी गडाचा पडदा थोडा बाजूला झाला, त्यानंतर पुन्हा सगळे काही झाकोळणारे दाट ढग. त्या ढगातून आमचा प्रवास म्हैसवळण घाटातून टाकेदकडे. घाटाच्या तळाला समोरचे डोंगर बघितले तर त्यातुन धबधबे कोसळेवेत असे पांढरे ढग आस्तेकदम खाली सरकताना दिसत होते. पलिकडचा डोंगर अर्धाधिक ढगांनी गुरफटलेला, त्याच्या डाव्या खाचेने डोळे खाडकन उघडले, अरे हा तर कळसुबाईचा डोंगर...महाराष्ट्राचा सागरमाथा. निसर्गाच्या यारूपासमोर हरवून जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. दहा मिनीटे पुन्हा हा नजारा मनभरून बघितल्यावर पुढचा उतार आणखी एक चमत्कार दाखविण्यासाठी सज्ज होता. समोरच्या दरित एक छोटा डोंगर तेवढा प्रकाशमान, त्याच्या डोक्यावर काळ्याकुट्ट ढगांची छत्री...बाजुली दरीचे हिरवेंकच कडे...आज दोहो करांनी ते इतके काही देत होता आणि त्याला मान देण्यासाठी आमचे डोळे प्रत्येक ठिकाणी दहा वीस मिनीटे थांबत होते. अखेर टाकेद गाव आले आणि जाणवले आपण स्वप्नात तर नव्हते. इथले वातावण आणि वरचे वातावरण यात केवढा फरक. आता पुढची धडक तेरड्याचे सौंदर्य टिपण्यासाठी भाद्रपदात! तोवर विश्रामगड नावाचे गारूड मनात हिरवे ताजे राहील!
-समाप्त-

एकनाथ महाराजकृत भावार्थ रामायणातील छंद

विश्रामगडाच्या दुर्गवैभवाची फलकाद्वारे माहिती

गडाच्या नकाशाचा फलक



स्वच्छा गृह वापरण्यास आपण लायक आहोत?

अजूनही सुरूच आहे गडांचा विध्वंसाचा कालखंड 

महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दवाखाना अजूनही भरतो

गडमाहितीचा फलक

शिवाजी महाराजांच्या वास्तव्याची माहिती कथन करणारा फलक

गड संरक्षणसिद्ध करणारे तटाचे जुने भव्य बांधकाम

लोखंडी पत्र्या पासून तयार केलेल्या नळ्यांचे संरक्षक कठडे

तुमचे स्वागत असो...गवताचा रांगोळी...

पहिल्या सपाटीच्या खालचा परिसर...

याचा उल्लेख गप्त वाट म्हणून करतात...तिथे पाणी भरलेले दिसले

देवीच्या गुहेत घोडे बांधण्याच्या कातळात कोरलेल्या खाचा

तेरड्याने सजवलेली पायर्‍यांची सुंदर वाट

आजच्या पद्धतीने जिर्णोद्धार केलेला त्र्यंबक दरवाजा


फरक जुन्या व नव्या बांधकामातला

म्हळूंगी नदी, त्र्यंबक दरवाजाचा प्रवेशमार्ग, पुरातन शिवमंदिराकडे जाणारा रस्ता

त्र्यंबक दरवाजातून दिसणारी पट्टागडाची उत्तरबाजू

लोखंडाची जाळी गडाच्या वातावरणात जिर्ण

जुने मंदिर पाडून बांधलेले पट्टाईदेवीचे मंदिर

कड्याला चढला हिरवा साज

हे गवत गौराईदेवीला वाहण्याची प्रथा


मन:प्रसन्न करणारे हिरवेकंच ताटवे

अंबारखान्याच्या खालचे पठार

हिरवाईच्या नाना छटा
तकलादू बांधकामात कसे टिकतील संरक्षक कठडे



हिरवाईशी विरोधी संगत साधणारी रंगसंगती

नव्याने तयार करणार्‍यात आलेली रायगडावरच्या मेघडंबरीची प्रतिकृती

पडका अंबारखाना, जिर्णोद्धार आजच्या बांधकाम पद्धतीने

सह्याद्रीत अशा भव्य वास्तू अपवादानेच आढळतात

पुर्व काळातले असाधारण बांधकामशास्त्र

कार्वी टोपलीचा भाऊ की बहिण

सर्वोच्च पठारावर वनखात्याने घेतलेल्या चरीत भरलेले पावसाचे पाणी

देशकड्याला लागलेल्या रेलिंगच्या माळा

पुरातन गुहेला चहूकडून हिरवाईचा घेरा


हिरव्या वाटा अनेक

हिरवाई थेट गुहेत शिरताना

भरगच्च तेरड्याने लगडलेला कडा

किती टिपशील दोहो डोळ्यांनी



तेरड्याच्या ताटव्याचे जवळून घेतलेले छायाचित्र

जंगल संपदा डोंगराच्या पायथ्या पर्यंत नष्ट झालेली

इवलेशे फुल हिरव्या कंच पठारावर रंग पंचमिची सुरूवात करणारे 


वैशिष्ट्यपूर्ण शिवपिंड



झोपडीतले जेवण...क्षुधा शांती...

काळ्या ढगांचा पडदा सारून पांढर्‍या ढगांची चादर विश्रामगडाला लपेटताना

महाराष्ट्राचा सागरमाथा डोंगरात हरवलाय!