Thursday, February 4, 2021

शेलारवाडीचा घोराडेश्वर

 ५ लेख ९ लेण्या १ वृक्षारोपण


सुटीच्या दिवशी फिरायला येणार्‍यांची येथे गर्दी

पापाची ही व्याख्या जरा वेगळी आहे. ते एक छानसे टूमदार 
ठिकाण. ते न बघता पुणं सोडलं असतं तर ते पाप ठरलं असतं. 
एक शक्ती आपल्या सोबत असते, जी आपल्या हातून असं पाप 
घडू देत नाही. मावळाचा आरंभी डोंगर तळेगाव दाभाड्याचा 
शेलारवाडी किंवा घोराडेश्वर नावाने ओळखला जाणारा. खरे तर 
तिथे गेल्या पाच एक वर्षांपासून सुरू असलेल्या वृक्षारोपणाचे काम 
बघण्यासाठी तो बघायचा होता. त्यावर काही लेणी आहेत, हे 
ठाऊक होतं, पण ती ईतकी जुनी असतील, इतकी छानशी 
असतील याची कल्पना केली नव्हती. हा समूह न बघता 
नासिकला गेलो असतो तर ते पाप ठरलं असतं!

अंधश्रद्धा पाळणे जेव्हा लाभदायक असते तेव्हा ती जरूर पाळावी. ज्या ठिकाणी एखाद्या समारंभाच्या निमीत्ताने जाण्याचा योग येतो त्यावेळेला तिथल्या प्रमुख देवालयाला भेट द्यावी हा शिरस्ता जसे काही जण पाळतात, त्याच पद्दतीने तिथले डोंगर आणि त्यावरची जैविक, पुरातत्वीय संपदा पहावी, गड असेल तर तो जरूर पहावा हा शिरस्ता माझ्यापूरता मी सांभाळला आहे. तो चुकला तर माझ्या कामात गती येत नाही, ही श्रद्धा पाळली आहे, अंध असली तरीही. ३१ जानेवारीला या अंधश्रद्धेचा लाभ म्हणजे वृक्षरोपण करून जीवापाड जपलेला १ डोंगर, ५ लेख, ९ लेण्या.

एका कौटुंबिक समारंभा निमीत्त पुणे भेटीचा योग आला. 
नात्यातील नावे कसोशिने लक्षात ठेवूत
समारंभाचे सोपस्कार सर्व पार पाडत
तीन दिवसांचा खासा पाहूणचार झोडत,
'आता गरिबावर द्या करा', 
हा अविर्भाव चेहेर्‍यावर दाखवला तेव्हा अर्धा अर्धा दिवस भटकंतीची परवानगी मिळाली. पहिला अर्धा दिवस पाय तुटेस्तोवर राजा दिनकर केळकर पुराणवस्तू संग्रहालय नजरेखालून घातले. दुसर्‍या अर्ध्या दिवसासाठी अनेक विविध पर्याय समोर येत असताना, ती शक्ती कामी आली जिने शैलारवडीच्या लेणी चुकविण्याचे पाप हातून घडू दिले नाही.


पुण्यातला ब्लॉगर मित्र विनित दाते हा नेहमी सुटीचा दिवस घोरेडेश्वराच्या डोंगरावर वृक्षारोपणासाठी जातो. त्याच्या संवर्धनकार्याची माहिती अधून मधून कानी पडते. त्याला अर्धा दिवसाच्या भटकंतीबद्दल विचारले तर त्याने धोराडेश्वराला जाऊ. तासाभरात पाहून होतो. नाशिकला परतताना तो पाहूनच परतावे, असा प्रेमळ सल्ला दिला. असा सल्ला थोडाच मोडवतो. मी रहायला कोंडव्यात, हा डोंगर निगड्यात मावळात. पुण्यातल्या एका भटक्या दोस्ताला साद घातली. रविवार कामाचा  व्याप असूनही तो सकाळी पटकन जाऊन येऊ म्हणत तयार झाला. 

पुण्यापासून ४० किलो मिटर अंतरावर पुणे मुंबई महामार्गावर तळेगाव-दाभाडे येथे पोहोचायला साडे सात वाजून गेले. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या. ही वाहने धावती नव्हती, तर तर डोंगरभेटीसाठी आलेल्या हौशी पर्यटकांनी रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवली होती. 'प्रशस्त महामार्ग असूनही भल्या सकाळी वाहन उभे करायला जागा मिळू नये', यावरून हा डोंगर सुद्दा नाशिकच्या पांडवेणीच्या डोंगरासारखा तर नसेल ना? असे उगिचच वाटून गेले. महाराष्ट्रात अलिकडच्या काळात साप्ताहिक पोय मोकळे करण्याच्या मोहिमेने जोर धरला आहे. कार्यालयात कामात गढून पिचून गेलेल्यांची रोजच्या वाहतूक वर्दळीत हवापालट करण्याची घरालगतची जागा ही शहराजवळच्या लहानशा डोंगरावर बघायला मिळते तसाच हा प्रकार.

।।रान राखावे रान जोखावे रान मेळवावे परोपरी।।  निसर्गमित्रचे स्वयंसेवक वृक्षसेवेचा जयजयकार करताना

।।रान राखावे रान जोखावे
रान मेळवावे परोपरी।।

निसर्गमित्रचे स्वयंसेवक वृक्षसेवेचा जयजयकार करताना

डोंगर पायथ्यापासून थोडे दूर गाडी उभी करून विनित आणि राहुल कोरे असे आम्ही तिघे डोंगर चढू लागलो तसा मीच विषय छेडला, डोंगरावर आज गर्दी लोटलेली दिसते, काही डोंगर हे गर्दीछाप लोकांसाठी मोकळे ठेवावे, त्यांना तरी निवांतपणे कुंठे अनूभवता येणार? अशी मंडळींपासून जर काही उपद्रव होणार असेल तर ज्या डोंगरावर जैवविविधता नाजूक अवस्थेत आहे, ज्याठिकाणी पुरातत्वीय अवशेषांची दूरावस्था आहे, असे डोंगर, लेण्या, किल्ले त्याने वाचविले जाऊ शकतील. काही ठिकाणे ही आम जनतेसाठी खुली असायलाच हवीत.विनितच्या नजरेत, हा गर्दीसाठी हवा की नको, असे कोणतेच भाव वाचायला मिळाले नाही. तो फक्त माहिती देत गेला, याठिकाणी अगोदर फक्त आणि फक्त गवतीमाळ होता. निगडीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागाने येथे वृक्षारोपणाची मोहिम हाती घेतली आणि याचे रूप पालटायला सुरूवात झाली. मागिल पाच वर्षांत झाडे लावण्याच्या मोहिमेने वेग धरला आहे. कार्यकर्ते सुट्टीच्या दिवशी येऊन झाडांची निगा राखतात. नऊ हजारच्या वर झाडे लाऊन झालीत. ती जगविण्याचे काम सुरू आहे. एक एका  टप्प्यावर निसर्गमित्रचे कार्यकर्ते भेटत होते. हे काम बघण्यासाठी नासिकवरून आलोय हे कळताच त्यांचाही आनंद दुणावत होता. याठिकाणी पाण्याची टाकी बसवली होती, तिला काणी तरी भोक पाडले. या ठिकाणी काडी टाकून गवत जाळले. या ठिकाणी हा कचरा, त्याठिकाणी तो युगुलांचा ससेमिरा, त्या पलिकडे मद्यप्रेमींनी सोडून गेलेल्या पाऊलखुणा. 
''लोकांसाठी...त्यांच्या गर्दीसाठी...आखडलेल्या पायांसाठी...मोकळे मन करण्यासाठी'', घोराडेश्वरचा डोंगर असावा? या माझ्या विचारांना, नको नको...'तो नसावा', अशी कलाटणी खायला सुरूवात केली.
गर्दी थांबविणे आपल्या हातात नाही. ती आपण नियंत्रीत करू शकत नाही. 
लोकांनी असे चालावे, तसे चालू नये
हे करावे, ते करू नये
या दिवशी यावे, त्यादिवशी येऊ नये
असं वागावं, तसं वागू नये...
हा आपला दृष्टीकोण कितीही भल्या विचारांवर आधारलेला असला तरी प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. जिथे कोणालाच थांबायचं नसतं तिथे 
अशी माणसे निसुन तरी काढावी कशी? 
बंदीचे अस्त्रही जिथे कुचकामी ठरते तिथे लोकांची गर्दी नियंत्रित करावी तर ती कशी? 
इथे येणारे मुळातच सगळेच वृक्षप्रेमी नव्हेत, इतिहास अभिमानी असतीलही पण इतिहासप्रेमी नव्हे. त्यांची छाटणी कशी करणार. वनविभागाने येथे प्रवेशावर बंदी टाकून बघितली. पण तो प्रयोग यशस्वी ठरला नाही. एकवर्ग संवर्धन, प्रबोधन वगैरे करतोय तर एक वर्ष याच्याशी काहीही देणे घेणे नसलेला. त्यांना एकतर त्यांचा त्यांचा आनंद साजरा करायचा. कोणाला तर सेल्फी सारखी छायाचित्रे काढून घ्यायची. कोणाला प्यायचं, कोणाला कोणाला आणून नुसतं हिंडवायचं.
या संघर्षात झाडांची ज्या वेगाने वाढ व्हायला हवी तितक्या वेगाने ती होत नाही. पण त्याने निसर्गमित्रच्या कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. त्यांच्या अथक श्रमामुळे घोराडेश्वराच्या डोंगराला वैभव प्राप्त होत आहे. लेण्याकडचा डोंगराचा भाग हा जसा लोकप्रिय तसाच वृक्षरोपणाकडचा भाग लोकांमध्ये आकर्षणाचा विषय ठरला आहे.

जमिनीच्या पोटात खोदलेल्या सातवाहन कालीन टाक्याची खिडकी


महाराष्ट्रातल्या अनेक डोंगराप्रमाणे ही डोंगर देखिल चहुबाजूंनी गिरीपुष्पाने वेढलेली आहे. हे न केवळ विदेशी प्रजातीचे झाड त्याचे पर्यावरण साखळीवर प्रतिकुल परिणाम दिसून आले आहेत. ग्लिरिसिडीया झाडांच्या कचाट्यात इतर बहुतांशी झाडे जगू शकत नाहीत. या झाडांवर पक्षी येत नाहीत. त्यांची सावली धरत नाही, त्यामुळे त्यांच्या परिसरातली जमिन ही उन्हामुळे कडक होऊन जाते व त्यात जमिनीचे पर्यावरण कमी होऊ लागते. त्यात अर्थातच बरीच झाडे जगू शकत नाहीत. लोकांच्या गर्दीचा ताण आणि गिरीपुष्पाचा ससेमिरा यातून घोराडेश्वरच्या डोंगरावर वृक्षरोपणाने चांगले मुळ धरले आहे. पाच वर्षे वयाची झाडे बघून मोठा आनंद होतो. या भागात कातळात खोदलेली पाण्याची तीन पुरातन टाकी आहेत. काही भागात त्याचा वापर वृक्षारोपणासाठी होत आहे. 
आम्हाला प्रत्येक टप्प्यावर कार्यकर्ते वखर, खुरप चालवताना झाडांना पाणी देताना, त्यांच्या मुळाशी असलेले तणकट स्वच्छ करताना दृष्टीस पडत होते. एकएका जत्थ्याची भेट घेत आम्ही वरच्या भागात पोहोचलो. तिथून लेणींचा समुह असलेल्या उत्तरपूर्व भागात उतरलो. कातळात खोदलेल्या पुरातन पाणी टाकी पाहून जितका आनंद झाला तितकाच आनंद लेण्यांच्या दर्शनाने घडत होता. विनित दाते हा हाडाचा भटक्या आहे. अभ्यासूपणाने त्याने आपल्या भटकंतीचे वर्णन ब्लॉगच्या माध्यमातून करून ठेवले आहे. त्याच्या सोबत लेणी पाहण्याची मजा येत होती. साईप्रकाश बेलसरे, सागर बोरकर या प्रसिद्द ब्लॉगर्सचे घोराडेश्वर विषयी ब्लॉग वाचायला मिळाले. काही जणांनी व्ह्लॉग्ज म्हणजे ब्लॉग आणि व्हिडीयो यांचा मेळ साधून केलेले वार्तांकन यूट्यूब चॅनलवर टाकले आहेत. माहितीच्या महाजालावरचा हा आजघडीचा लोकप्रिय प्रकार.

सगळ्याच लेणी बघण्याचा आज योग होता. इथे पाच शिलालेख आहेत ही माहिती ऐकून आनंद द्विगुणीत झाला. लेण्या साधारणपणे डोंगराच्या मधल्या भागात आहेत. त्याच्या वरचा भाग हा वहिवाटीचा नाही. काही ठिकाणी तो खुप निसरडा. काही ठिकाणे तर इतकी जोखिमेची की, कोणी घसरलं तर त्याचं काही खरं नाही. तरीही डोंगराची शिस्त ठाऊक नसलल्या लोकांची गर्दी पाहून धातीत धडकी भरते. काही वर्षांपूर्वी एक पर्यटक येथून पाय घसरून मृत्यूमुखी पडला होता. या घटनेनंतरही लोक निर्धास्तपणे चालताना पाहून मनात भिती निर्माण होत होती. 
या लेणी खोदण्याची सुरूवात ईसवीसनाच्या पहिल्या शतकापासून झाल्याच्या नोंदी अभ्यासकांनी करून ठेवल्या आहेत. काही लेणी या अवघड ठिकाणी आहेत. तिथे उभ्या कड्याचा कातळटप्पा पार करून जावे लागते. सर्वसाधारण पर्यटक या ठिकाणी जात नाहीत. हा भाग लोकांच्या नजरेपासून दूर आहे हे बरेच आहे.
काहीशा अवघड कातळारोहणानंतर लागणारा दोन विहारांचा पायरी मार्ग

अबब...भलं मोठं पोळं...उठलं तर पळताभूई थोडी


विनीत आम्हाला एका ठिकाणी घेऊन गेला. डोंगरकड्यात वीस एक पायर्‍या आहेत. काही ठिकाणी तुटक्या आहेत. डोंगराला चिकटून सावकाशपणे वर जावे लागते. वर दोन विहार आहेत. यांची निर्मीती बौद्द साधकांसाठी केली गेली असावी. आम्ही वर गेलो तर एका विहारात दोन एक फुटाचे भले मोठे मधमाशांचे पोळे लोगलेले होते. त्यातून मधमाशांच्या पंखांचे आवाज भितीदायक वाटत होते. तिथे थांबण्याची जोखिम न पत्कारता आम्ही तात्काळ ते ठिकाण सोडले. 'याठिकाणी लेणीत मधमाळीचे पोळे लागले आहे, पर्यटकांनी तिथे जाऊ नये, अन्यथा त्याचे घातक परिणाम होऊ शकतात', हा इशारा लोकांनी ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे. अशा अवघड ठिकाणी मधमाशांचे पोळे लागले तर ते नेहमी तिथे लागत राहणार. असेही हे ठिकाण पर्यटकांच्या नजरेपासून दूर आहे. त्याचा कडा व पायर्‍या या जोखिमेच्या आहेत. मधुमक्षिकांचं जग तिथे फुलणार असे तर ते तसचं फुलू द्यावं. नाही तरी माणूस म्हणून आपण वन्यजीवांचा अधिवास व भोजन यावर प्रचंड अतिक्रमण केले आहे. 


श्री घोराडेश्वराचे मुळ स्थान - याच्या वरच्या भागात 
हर्मिकेचा भाग साबूत आहे...सुरूवातीच्या काळात येथे स्तूप असावा...

काहीशा पश्चिमी बाजूला घोराडेश्वराचे जुनेस्थान आहे. या ठिकाणी काही कोरीव स्तंभ हिनयान काळातील बांधकामाकडे निर्देश करतात. अर्थात हे देखिल मुळ शिवस्थान नाही हे हरमिकेचे अवशेष पाहून लक्षात येते. या लेणीच्या बाहेर नंदी ठेवला आहे तोही स्तूपाचा भाग असावा. मंदिराच्या भिंतीवरचा इ.स. १४३९ म्हणजे १५व्या शकतात या लेण्यांचे रूपांतर करण्यात आले त्या संबंधीचा आहे. त्यातले धनकाटक हे नाव सद्याचे डहाणू या शहराशी संबंधित असावे असा अभ्यासकांचा कयास आहे. या मंदिराला अलिकडच्या काळात लोखंडी दरवाजा बसविण्यात आला. त्यात एक शिलालेख क्षतिग्रस्त झाला आहे. या ठिकाणहून उतरून आल्यावर खालाच्या बाजुला नविन घोराडेश्वराचे लिंग स्थापित करण्यात आले आहे. ही सर्वात प्रशस्थ लेणी असून येथे शिवभक्तांची नेहमी वर्दळ असते. महाशिवरात्रीला येथे मोठे जत्रा भरते. तेव्हा गर्दी नियंत्रीत करण्यासाठी येथे लोखंडी नळकांड्यांचे दुभाजक बसविले आहे. बाहेरच्या बाजुला काही ठिकाणी अशा नळकांड्यांचे रेलिंग किंवा संरक्षक कडे तयार करण्यात आले आहे जे इथल्या गौरवशाली पुरातत्वीय बांधकामाशी अजिबात मेळ खात नाहीत. इतके अफाट बांधकाम आपण आजच्या काळात करू शकत नाही तर जे आहे त्यांचे जतन चांगल्या पद्धतीने करावे. एक पुरातत्व विभागाच्या नियमांचे कसोशिने पालन केले तरी अशा स्वरूपाचे ओंगळवाणे काम करण्याची कोणाची छाती होणार नाही. अशा कामांना परवानगी कशी काय दिली जाते हा एक प्रश्नच आहे. 

जाता जाता एक गोष्ट सांगाविशी वाटते. डोंगर कितीही लहान असला. वहिवाट गर्दीचा असला तरी तो सोपा असतो असे नाही. पुण्याला येताना माझ्याकडे भटकंतीसाठी नेहमी वापरतो तो गणवेश नव्हता व बुट नव्हते. बर्‍याच वर्षांपासून सह्याद्रीत भटकंतीचा अनूभव असल्याने जपूनच चालत होतो, तरी खाली उतरल्यानंतर एकेठिकाणी थोडी घसरगुंडी झालीच. पडतापडता हात पुढे करून सावरता आले, परंतू त्यात हात थोडा दुखावला. दुखापत मोठी नाही. अवघड ठिकाणी भरपूर काळजी घेतली होती. येथे येणार्‍यांनी ती जाणिव पूर्वक घ्यावी. 
।।जय हो।।

तुमची घोराडेश्वर शेलारवाडीची यात्री सुखकारक, निर्धोक, झाडांचे रक्षण करणारी, लेण्यांचे संवर्धन करणारी ठरो...या शुभेच्छा











रूजणे अमचा धर्म...तुमचा धर्म रखरखावाचा का नाही?

याला आता एकही पान नाही...उन्ह वाढतील तसा हा लाला लालभडक लूसलूशीत फुलांनी डवरून जाईल...


ही फुले कदाचित फक्त पक्षांसाठी राखलेली असावी...कोणी झाडावर चढून तोडू नये यासाठी कदाचित याला अशा दणकट काण्यांचे संरक्षण तर नसेल ना?

निळ्या आकाशी पडद्यावर चाफा...काटेसावराचा बहर


घोराडेश्वराची सद्याच सर्वाधिक वापरात असलेली लेणी -
अनूपम प्राचीन वारशाला यापेक्षा चांगले रूप देता येऊ शकत नाही का?



कमी वर्दळ असलेल्या वरच्या लेणीतील श्री घोराडेश्वराचे मुळ स्थान -
याच्या वरच्या भागात हर्मिकेचा भाग साबूत आहे...
सुरूवातीच्या काळात येथे स्तूप असावा...

अनूपम ऐतिहासिक वारसास्थळी अशा प्रकारचे पाईपकाम न केवळ कुचकामी...ते खुप ओंगळवाणेही दिसते...शिवाय तीन चार वर्षात त्याचा निकाल लागतो







Saturday, January 23, 2021

इंडिखिंडीच्या वाटेवर...

 

अचाट...अफाट...विनायक बुरूजाचा तासलेला कडा
पुराण प्रसिद्द ब्रम्हगिरीचा डोंगर उर्फ श्रीगड किल्ल्याचा हा पूर्व भाग. त्रिंबक, जव्हारचा परिसर पहिने, भिलमाळ, कोजुली आदी भागाशी जोडणार्‍या दोन लहान घाटवाटा या परिसरातून जातात. इंडिखिंडी हे स्थानिकांनी दिलेलं लाडाचं नाव, अर्थात ते काही नव्याने दिलेलं नाही. अगोदर पासूनच स्थानिक मंडळी ते वापरत आहेत. प्रचलित नाव म्हणजे विनायक खिंड. आदिवासींच्या भाषेचा जबर प्रभाव असल्याने विनायकचं इनायक आणि त्याची खिंडी त्यावरून उच्चारायला सोपे असे इंडिखिंडी हे नाव पडले असावे. याच विनायक खिंडीत पूर्वी पासूनची विनायक मेट आहे. अर्थात युद्दजन्य परिस्थितीत हल्ल्याचा वार सर्व प्रथम करणारे किंवा झेलणारे हे लष्करी ठाणे वजा वस्तीचे ठिकाण.

बुरूज भिंतीचे तासकाम

हत्तीमेटेकडे किंवा महादरवाजाने त्र्यंबक किल्ल्याकडे जाणारी ही महत्वाची वाट. समोरा समोरच्या युद्दात कधीच न पडलेल्या श्रीगडाचा लष्करी दृष्ट्या हा संवेदनशील भाग. चहुबाजूंनी सरळसोट उंच कड्यांचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या ब्रम्हगिरीची ही काहीशी तकलादू बाजू. कारण विनायक खिंडीतून ब्रम्हगिरी माचीवर जाण्याचे हे सर्वात कमी अंतर शत्रू सैन्याला सहजसाध्य होऊ नये या साठी विनायक खिंडीचा कडा छन्नी हाथोड्यानी तासून काढला आहे. तासकाम इतके सुरेख की, आज काळातली सर्व अद्ययावरत यंत्र समुग्री वापरली तरी अशा प्रकारे भला मोठा डोंगरकडा तासता येणार नाही. त्याकाळी अवघड अशाकड्यावर इतके कौशल्यपूर्ण तासकाम कसे केले असेल हा विचार करून आश्चर्य वाटते. दुर्ग भांडारात दोन अडीचशे फुटांचा सरळसोट कातळ फोडून केलेल्या पायर्‍यांच्या तोडीचे हे तासकाम.

विनायक बुरूजाचा तासलेला कडा


त्र्यंबक किल्ल्यावर ४० बुरूज होते. गडावर जाण्याची महादरवाजाची वाट हीच वापरात होती. आज प्रमुख वाट असलेली उत्तर बाजूची वाट अस्तित्वात असली तरी तिचा पूर्वीच्या काळी वापर कमी होता. तर या चाळीस बुरूजांपैकी दोनच बुरूज अस्तित्वात आहेत. बाकी बुरूजांचे नाव निशाण दिसत नाही.

विनायक खिंडीचा बूरूज आजही सुस्थितीत आहे. अर्थात त्यावर जायचे असेलतर गडावरूनच तिथे जाण्याचा मार्ग आहे. विनायक खिंडीतून फक्त विनायक बुरूजाचा कडा आणि बुरूजाची बाह्य तटभिंत दृष्टीस पडते.

येथे विनायक मेट ही जुनी वस्ती आजही टिकून आहे. काही वर्षांपूर्वी दरडी कोसळू लागल्याने ही वस्ती पलिकडे हलविण्यात आली. तरी काही घरे अजूनही तिथेच आहेत. 

असे म्हणतात की या खिंडीत पूर्वीच्या काळी गणपतीची दगडात घडवलेली मूर्ती होती. या मूर्तीचे पुजक असलेल्या कुटुंबियांनी रोजची पुजा करणे शक्य व्हावे यासाठी नंतरच्या काळात मुर्ती त्र्यंबकमध्ये अणली. रोज पुजेसाठी अर्धातास पायपीट, तसेच तुफानी पावसात तर बर्‍याचदा वर जाणे दुरापास्त अशा स्थितीत विनायकाची मुर्ती गावात हलविण्यात आल्याचे सांगतात. विनायक मेट व विनायक खिंड हे नाव मात्र टिकून राहिले. गडावर रेणूकेचे मंदिर आहे. ही रेणूका स्वयंभू, मोठ्या दगडी शिळेतली. रेणूकेचे मुळ स्थान हे पंचलिंगाच्या खालच्या बाजूला विनायक बुरूजाच्या वाटेवर कड्यात होते. ती रेणूका नंतरच्या काळात खाली हलविण्यात आल्याची वदंता आहे. तिच्या बाजुला रेड्याचेही शिल्प आहे. हे दोन्हीही शेंदूरचर्चित.

रेणूकेचा रमणीय परिसर


दुधना नदी

पंचलिंगावर पाच नद्या या त्याच्या तत्पूरूष, अघोर, ईशान, वामदेव, सद्योजात या शिखरावर उगम पावतात अशी मान्यता आहे. विनायक मेटेला वळसा घालून जाणारी आणखी एक लहान नदी आहे. स्थानिक मंडळी तिला दुधना नदी असे म्हणतात. या नदीच्या तिरावरच रेणूकेचे मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला नाग गारूडी, वेताळ, देवीचे भक्त अशा कातळकोरीव शिळा वीरगळी सारख्या बसविल्या आहेत. त्याही फार पूर्वी पासून तिथे आहेत. येथे एक घाटरस्ता बांधण्यात आला. ब्रम्हगिरी गडावरची अवघी पाच दहा टक्के असलेली वनसंपदा या रस्त्यामुळे धोक्यात येऊ नये या साठी ब्रम्हगिरीच्या निसर्ग प्रेमीं मंडळींनी, 'आक्रोश ब्रम्हगिरीचा', हे अभियान राबवून रस्त्याचे काम बंद पडले होते. लोकांचा रोष लक्षात घेऊन हेच काम बेमालूमपणे टप्प्या टप्प्यात पुर्ण करण्यात आले. आता हा घाटरस्ता थेट ब्रम्हगिरीच्या गावातून जाणार्‍या पायरी मार्गापर्यंत भिडला आहे. पन्नास शंभर मिटरची जोड दिली तर जनक्षोभास कवडीची किंमत न देता पूर्ण केला जाणारा हा घाटरस्ता भविष्यात नक्की सुरू करण्यात येईल. त्यानंतर थेट वरच्या भागा पर्यंत प्लॉट पडतील. जी स्थिती दुर्ग भांडारच्या उत्तरी पायथ्याला तसेच येथे प्लॉटिंग पडल्याचे दिसू लागेल. अंजनेरीला दसरा घाट मार्ग बांधण्याचे काम निसर्गप्रेमी मंडळींमुळे रद्द करण्यात आले तसे भाग्य ब्रम्हगिरीच्या वाट्याला आले नाही.

हे झाड नक्की मारणार

झाडाची साले काढण्याचे काम सुरू

हे झाड वाचवा...पाया पडतो हे झाड वाचवा


एक झाड कटण्याची प्रतिक्षा...

भटकी मंडळी इंडिखिंडीत बडा उदासीन आखाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारा लगतच्या चिंचोळ्या वाटेने वर जातात. अवघ्या वीस बावीस मिनीटात माणूस वर पोहोचू शकतो. वाटेवर आंब्याचे एक मोठे झाड आहे. या झाडाला काहीही झालेले नाही. ना रोग ना किडीचा प्रादूर्भाव ना त्याचे वय होऊन बुंधा निसर्गत: पोखरला गेलाय. तरीही पैंजेवर सांगतो, येत्या काही दिवसात हे झाड तोडले जाईल. भलामोठा विस्तार असलेल्या या देखण्या झाडाची सालं काढण्याचे काम सुरू आहे. वनविभागाला ते दिसणार नाही. कारण त्याच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, जे मोठ्या झाडांचे योग्यपद्धतीने रक्षण करू शकेल. किंवा दोषी लोकांवर कडक कारवाई करू शकेल. 

खंदक भला लांब


खंदक तुकडी ठेवण्यासाठी

विनायक खिंडीच्या कड्याच्या खाली कातळामध्ये भलामोठा खंदक खोदलेला दिसतो. रात्रीच्या अंधारात शत्रुला माळा लाऊन चढणे शक्य होऊ नये यासाठी हा खंदक लाकूड फाट्याने भरून टाकला जायचा. शत्रुने हल्ला केलाच तर वरून आग टाकून तो जाळून टाकला जायचा. त्यामुळे अकस्मात हल्ल्याचे प्रयत्न विफल होत. या खंदाकाचा सैनिक छावणी म्हणून सुद्धा वापर होत असावा असे बारकाईने निरीक्षण केल्यावर जाणवते. खंदकाला आच्छादनाने झाकण्यासाठी ठिकठिकणी कातळ खोबण्या आहेत. ज्यामध्ये बल्ल्या रोवून छत शाकारणे शक्य होते. पावसाळा सोडल्यास इतर ऋतूमध्ये सैनिकांच्या तुकड्या खंदकात ठेवल्या जात असतील. खंदकात कातळावरच देवाची चिन्ह कोरली आहेत. एका बाजूल दगडाला शेंदूर लावला आहे. त्यामुळे सैनिकांना भिती वाटू नये. देवाचा आसरा वाटावर या साठी ही दैवते त्याकाळी पुजली जात असावी. शे दिडशेची तुकडी पाहर्‍यासाठी बसविली जाऊ शकते इतका हा मोठा खंदक आहे. खंदकाच्या जवळ पाण्याची कुठलीही सोय नाही. परंतू तिथून विनायक मेट ही देान मिनीटांच्या अंतरावर असल्याने तिथल्या विहिरीतून पाण्याची पूतर्तता केली जात असावी. 

विनायक खिंडीला लागून ब्रम्हगिरी डोंगराच्या पूर्व टोकाचे पाच लहान डोंगर आहेत. त्यातला कार्वीचा डोंगर खिंडीला अगदी लागून आहे. त्यावर जाण्याची जुनी वाट आहे. त्या वाटेसाठी कातळात खोबणी वजा पायर्‍या खोदल्या आहेत. या पन्नास पायर्‍या असाव्यात. चढाईसाठी हा मार्ग अतिशय आव्हानात्मक आहे. त्याला लागून असलेल्या तळईच्या डोंगरावर सुद्धा अवघड वाटेने वर जाता येते. तिथे मात्र पायर्‍या किंवा टाके अशी कोणत्याच खुणा नाहीत. पूर्वी कल्याणच्या बंदरात येणारा माल थळ घाट मार्गे देशावर आणल्यानंतर गुजरात, त्र्यंबक, जव्हार या भागात तो या घाटांनी पलिकडच्या बाजुला नेण्यासाठी याचा वापर केला जात असावा. 

कार्वीचा डोंगर


थोडीफार वनसंपदा याच भागात टिकून आहे. जेव्हा कच्चा रस्ता पक्का होईल तेव्हा या वनसंपदेला अखेरची घरघर लागलेली असेल हे मात्र नक्की. आज घडीला नाशिक-त्र्यंबक मार्गावरून एक नवा घाटरस्ता कोधळा, मोधळा, सीतागुंफा, तळई, कारवी या डोंगरांना वळसा घालून उत्तर बाजुच्या पायरी मार्गाच्या जवळ पर्यंत येऊन पोहाचतो. सद्या दुचीकी वाहने थेट वर पर्यंत येतात. आता हा रस्ता कोणत्याही क्षणी पक्का केला जाऊ शकतो. कारण त्यावर खडीकरण व बर्‍यापैकी सपाटीकरण करण्यात आलेले आहे. रिंगरोडवरून आणखी एक घाट रस्ता या मार्गाला जोडतो. तोही अपूर्ण आहे. पर्यावरणवाद्यांचा आक्रोश कमी होईल तेव्हा मार्ग पक्का करण्याच्या हालचाली पुन्हा सुरू होतील असे दिसते. 

ब्रम्हगिरीच्या विशाल सरळसोट कड्याचे या भागातून मनोहारी दर्शन घडते. या कड्याला तसेच हत्ती मेटेकडे जाणार्‍या अशाच विशाल मोठ्या कड्याला नेहमी मधमाशांची पोळी लागलेली असतात. या मोठ्या आकाराच्या चावणार्‍या, घातक मधमाशा आहेत. त्यामुळे या भागात वावरताना धुर होणार नाही. अत्तराचे  वास दरवळणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. हत्तीमेटेच्या वाटेवर कड्याला चाळीस पन्नास पोळी सहज लागलेली असतात.

या परिसरात गिधाडांची घरटी आहे. डोंगराच्या नैसर्गिक गुहा येथे अनेक आहेत. त्यात त्यांची ऊंचीवर घरे आहेत. आम्हाल एक लहान कळप तळई व कारवीच्यावर घिरट्या घालताना दिसला.

हा परिसर वाघाचा आहे. मागच्याच आठवड्यात येथून एक कुत्री वाघाने पळवून नेली. या कुत्रीची सात पिले ग्रामस्थ सांभाळत आहेत. विनायक खिंडीची जवळपास सर्व वस्ती ही ब्रम्हगिरवरच उत्तर बाजुच्या कड्यात हलविण्यात आली आहे. त्यामुळे विनायक मेट आता ओस पडल्या सारखी आहे. या खिंडीचा अकार गलोली सारखा आहे. तळाच्या दगडाच्या घड्या स्पष्टपणे दिसू शकतात. इतिहासाच्या अंगाने ही एक छोटेखानी भटकंती होऊ शकते. 

।।जय हो।।

प्रशांत परदेशी, २२/१/२०२१


इंडिखिंडीची रेणूका

दुप्पट खा...रमून जा...ताजे तवाने होऊन जा

दुचाकी येथे सहज येते

मावळतीच्या सूर्याने धरलेला कवडसा

मुद्दाम सुट्टी टाळून फिरण्यात खरी मजा आहे

खंदकाची चढाई...घसार्‍यावरून...जा जरा जपून

समोर दिसतो तो अंजनेरी त्याचा कोथळा आणि उजवीकडे नवरानवरीचा किल्ला



खंदकातली दैवते

दगड फोडल्याची चिन्हे



 गड्यावरचे पाणी रोखण्यासाठी येथे छत शाकारात असावे

उतराई जरा जपून

मोकळेपणाचा आनंद जरावेळ घ्यावा

जुन्या खुणा

हीच ती पोरकी झालेली पिलं


साहिल आणि त्याची ताई पिलांना सांभाळताना 

पेट्या फुटल्या...

अमुर्त निर्मीती...चित्तथरारक.


Sunday, September 27, 2020

पर्यटन विभाग बनवणार 'साहसी खेळ नियम'!




गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात पर्यटना दरम्यान अगणीत अपघात झाले त्यात शेकडो लोक दगावले. यातील बहुतांशी अपघात हे पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे तर काही अज्ञानामुळे झालेत. फार मोजके अपघात हे अनवधानाने किंवा निसर्ग प्रकापाने झालेत. न्यायालयाने यासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश दिले. त्याला मोठा काळ लोटला, परंतू ठोस असे धोरण अजून आकाराला येऊ शकले नाही. (विशेष म्हणजे या अपघातात ज्यांनी जिवाची बाजी लाऊन नव्वाण्णव टक्के बचाव माहिमा पार पाडल्या त्या अशासकीय संस्थांना फक्त शाबसकी देण्यापलिकडे काहीही मिळाले नाही. त्यांना ना विम्याचे संरक्षण मिळाले नाही महागड्या उपकरणांसाठी कुठली मदत.)

महाराष्ट्र शासनाचा नवे पर्यटन धोरण बनविण्याचा मानस आहे. याला पर्यटनाकडे कल असलेले किंवा शासन पुढाकार घेत आहे तर त्यातून काही तरी चांगले निष्पन्न होईल अशी अपेक्षा बाळगणार्‍यांचा पाठींबा आहे. दुसरीकडे, राज्य शासनाने अगोदरच साहसी खेळ धोरण बनविले आहे. त्याचे अंमलबजावणी कशी करायचे याला दिड दोन वर्षात मुहुर्त लागला नाही, आता गिर्यारोहण व डोंगरावरच्या साहसी खेळांचा समवेश पर्यटनात करणार काय? या चिंतेने एक वर्गाला ग्रासले आहे. 

हा सह्याद्री कोणाच्या कपाचा चहा आहे? पर्यटन विभाग? वन विभाग? पुरातत्व विभाग? ग्रामीण विकास? आदिवासी विकास? सार्वजनिक बांधकाम विभाग? यांच्यात या प्रश्नावरून सुरूवाती पासून अहमहमिका लागली आहे. यातील प्रत्येकाने परिसर विकासाच्या नावाने सह्याद्रीत भरपूर प्रमाणावर विकासकामे केली आहेत. त्यासाठी निधी कोटींच्या पटात अगोदरच खर्च करून झाले आहेत. त्यातून सह्याद्रीचा विकास कोणत्या दिशेने झाला? रस्ते झालेत, पण जंगल राहिले? महाराष्ट्राची निसर्गसंपदा पुनरूज्जीवित झाली? पुराण वास्तुंचे संवर्धन/संरक्षण झाले? गडांचे गडपण राहिले? ज्या सह्याद्रीत नुसता कल्पनेचा घोडा नाचविणे मुश्कील...जिथे आपल्या पूर्वजांनी रणमैदान गाजविले. रक्ताचे अर्घ्य देऊन या भारत भूमिचे सत्व राखले, त्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर इतिहास अभिमानी साहसी भेटींना प्रोत्साहन मिळाले? गिर्यारोहण आदी क्रीडा उपक्रमांना सहकार्य लाभले? दुर्दैवाने या प्रश्नांची उत्तरे बहूतांशी नकारात्मक आहेत. 

या महाराष्ट्रात असे का घडावे? जो महाराष्ट्राची भाग्य रेखा आहे...सौंदर्याचे अमिट लेणे आहे...ज्यावर शेकडो वर्षांपासून पुरातन राजवटी नांदल्या...ज्यावर गतवैभवाच्या खुणा खोर्‍यांनी...शब्दश: खोर्‍यांनी विखुरल्या आहेत त्या सह्याद्रीच्या वाटेला परचक्रात वाईट दिवस आले होते...ते एकवेळ समजण्यासारखे आहे, कारण 'सोन्याचा धूर निघे', तो हा प्रदेश लुटण्यासांठीच परकीय आक्रमक येथे आले आणि शेकडो वर्षांपर्यंत त्यांनी ही भूमी अक्षरश: नागवली. शहाजी महाराजांच्या मनूत कुठूनशी स्वराज्याची ज्योत पेटली. त्यांनी आपले घरदार यासाठी पणाला लावगले आणि सह्याद्रीने कात टाकली. पेशवाई पर्यंत मराठेशाहीने उचल खालली. तितकीच सह्याद्रीला उसंत मिळाली. उणेपूरे दोन अडीचशे वर्ष रसातळाला गेलेले मराठी राज्य उभीरणीत गेले आणि पुन्हा नवे दृष्टचक्र, व्यापारी बनून पाय पसरणार्‍या यूरोपिय सत्ताच्या रूपाने लागले. हे ग्रहण अडीचशे वर्ष टिकले. 

त्यानंतर अवघा देश पेटून उठला. अनेकांच्या रक्तावर स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाले!! मग अडचण ती कसली? आता सह्याद्रीत सूगी यायला हवी ना? सहा सातशे वर्षे गुलामगिरीत काढल्याने नाही उमजले? असे स्वतंत्र भारतील राजकारणी व नोकरशाही म्हणू शकेल? तेही मान्य करू! आता नवा डाव मांडायचा आहे ना? मग स्वच्छ मनाने होऊ द्या. केवळ पोट भरण्याच्या उद्देशाने कुठलेही काम करू नका! ज्याने महाराष्ट्राचा इतिहास डागाळेल. इथल्या भुगोलाची कायमस्वरूपी हानी होईल असे कुठलेही धोरण अंमलात येऊ देऊ नका.

तिकडे हिमाचल, जम्मू, काश्मीर, लडाख, केरळ, आसाम, अरूणाचल, उत्तराखंड, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यात पर्यटन विभागच धोरण बनविते, मग आपल्याकडे का नको? हा प्रश्न चाचपताना एकदा मध्ययूगीन इतिहसावर नजर टाकावी. मराठेशाहीचा काळ आठवावा आणि मग ठरवा, पर्यटन एका खोक्यात बसवायचे की, महाराष्ट्रासाठी काही वेगळा विचार करायचा. 

पर्यटनाच्या जागी पर्यटन आहेच. पण एक गोष्ट ध्यानात घ्यावी, पर्यटन म्हणजे उत्तम रस्ते, उत्तम निवास, भोजन सुविधा, अपरिमीत स्वच्छता, चकचकीत पर्यटन स्थळे. पर्यटकांना शक्य त्या सर्वोत्तम सुविधा देण्यात याव्या. सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा तोही एक महत्वाचा मार्ग. असे करताना हा सह्याद्री कोणत्या साच्यात बसविणार? याचा विचार करावाच लागेल. पर्यटनाच्या नावाखाली लढावू गडकिल्ल्यांवर बागबगिचे, हॉटेल, निवारास्थाने थाटता येणारच नाही.

सह्याद्रीत मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना अपघात होतात. तिथे सरकारी यंत्रणा तशी दुय्यम भूमिका बजावते. सगळे मदत कार्य गिर्यारोहण संस्था करतात आणि त्या बदल्यात त्यांना काय मिळते - शाब्बासकी! या साठी सगळा सह्याद्री सुरक्षित करण्याचा कोणी जर विचार करणार असेल तर तो वेडेपणा ठरेल. सह्याद्री हे मुळातच पर्यटनाचे ठिकाण नाही, तद्वदाच तो इतका अफाट आणि इतका गुंतागुंतीचा आहे की, समुची निसर्गरम्य ठिकाणे सुरक्षित करण्याची आपल्यात पात्रता नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच ते शक्य होते. सोळाव्या वर्षी हाताशी फक्त काही शे मावळ्याच्या टोळ्या असताना त्यांनी ज्या पद्दतीने राजगड, तोरणा किल्ले बांधून काढले - ते एकदा सरकारी अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष बघून यावे. बाकी साडेतीनशे किल्ले अभ्यासण्याची आवश्यकता राहणार नाही.

महाराष्ट्राचे पर्यटन धोरण येणार असेल आणि त्यासाठी सह्याद्रीचा प्राधान्याने विचार होणार असेल तर त्याचे स्वागतच आहे. इतिहास व भुगोलाच्या अंगाने, पुराणवास्तू अभ्यासण्यासाठी सह्याद्रीत जाणार्‍यांची संख्या तशी कमी आहे. मौजमजेसाठी जाणारेच अधिक आहे. या व्यवसायावर पोटं अवलंबून असणारेही आहेत. या निमित्ताने राज्याने मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, केरळ, गोवा आदी राज्यांचा आदर्श डोळ्या समोर ठेवावा. जगातील सर्वोत्तम दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात. यासाठी त्यांना कोणीही रोखणार नाही. पण सह्याद्रीत उपदव्याप होइल असे कोणताही काम करू नये. भारतात अन्यत्र जसा पर्यटन विकास झाला आहे, तसे मॉडेल सह्याद्री काही उपयोगाचे नाही हे ध्यानात असू द्यावे, त्यासाठी महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्यावा. इथल्या भुगोलाचा त्यासाठी अभ्यास करावा. 

एकदा सह्याद्री सुरू झाला की, ते पर्ययन इतिहास, निसर्ग व साहसी पर्यटनात मोडते. त्यासाठी जगभरात जे मापदंड आहेत ते लागू केले तर या महाराष्ट्र भूमीचे ते भाग्य ठरेल. प्रत्येक माणसामध्ये डोंगरावर जाण्याची क्षमता नसते. असली तरी त्याचा आब हा राखावाच लागतो नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. डोंगरावर जाणारा प्रत्येक माणूस हा सरकारची जबाबदारी नाही, जोवर तो निती नियम पाळणारा असेल तो वर ठिक, परंतू निष्काळजी पणाने किंवा अज्ञानेने तो अपघातग्रस्त झाला तर तो सरकारचा दोष नाही हे सरकारातील अधिकार्‍यांनी ध्यानात घ्यावे. उगाचच आपल्यावर येतयं, म्हणून काहीबाही कामे करू नयेत. पर्यटन विषयी धोरण बनवताना, डोंगर परिसरात कुठलेही विकासकार्य हे जागतिक मापदंडास, पुरातत्व नियमांस व सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास व निसर्गाचा मान राखूनच करावेत. 

गिर्यारोहण नियमावली किंवा साहसी खेळांकरिताची नियमावली याचा या लेखात आढावा घेण्यात आलेला नाही. महाराष्ट्रातल्या दोन्ही शिखर संस्थांनी या दिशेने भरीव असे काम केले आहे. मॅकच्या तज्ज्ञ समितीने जगभरातील महत्वाच्या बाबींचा सह्याद्री केंद्रस्थानी ठेऊन अत्यंत उपयूक्त असा गोषवारा तयार केला आहे. जो शासनाला नियमावली तयार करताना उपयूक्त ठरेल. त्यावर कोणाला काही सूचना मांडायच्या असतील तर त्यांनी त्या जरूर मांडाव्यात असे आवाहन महाराष्ट्र अॅडव्हेंचर काऊन्सीलने तज्ज्ञांच्या २७/०/२०२०च्या ऑनलाईन चर्चासत्रात केले आहे. 

माझा भर हा डोंगरावर पर्यटन किंवा गिरीदुर्गभ्रमंती यावर अधिक आहे जो साहसी खेळ या अंगाने महत्वाचा ठरणार आहे. ट्रेक, भटकंती, डोंगरयात्रा हा म्हणाल तर साहसी खेळ आहे आणि म्हणाल तर नाही. तरी पण त्यात धोके भरपूर आहेत. त्याकरिता नियमावली ही असायलाच हवी. काही संस्था किंवा काही खासगी टूर ऑपरेटर्स त्याचे कसोशिने पालन करतीलच असे नाही. अशा स्थितीत अपघातांना खुले आमंत्रण असेल या दृष्टीने महाराष्ट्र ट्रेकिंग नियमावली अत्यंत महत्वाची ठरणार आहे. बर्‍याचदा ट्रेकवर सुरक्षा उपकरणांची आवश्यकता नसेत, परंतू तरीही जिविताचा धोका हा असतोच. काही वेळा माफक स्वरूपात किंवा गरज पडल्यास वापले जाऊ शकतात अशी काही उपकरणे सोबत बाळगावी लागतात. ज्यात प्रामुख्याने दोर, हार्नेस, कॅरॅबिनर्स अशी काही प्राथमिक उपकरणे. ही उपकरणे हाताळणारी तज्ज्ञ मंडळी सोबत नसल्याने सह्याद्रीत अपघात घडले आहेत. त्यामुळे ट्रेककरिता परवानगी देताना गिर्यारोहणाच्या धर्तीवर ट्रेकिंग गाईडलान्स (भटकंती नियमावली) ही गरजेची ठरणार आहे. साहसी खेळाचाच हा भाग असेल. ती उल्लंघली जाऊ नये याकरिता गिरीभ्रमंती मोहिमांकरिता, 'आदर्श अंमलबजावणी पद्धतीं'चा अवलंब करावा लागेल, ज्यात नियमांना बगल देण्यास वाव नसावा.  

ही सगळी नियमावली पर्यटन विभागाच्या मार्फत तयार केली जाणार आहे. पर्यटन विभागात साहसी खेळ विषयीचे तज्ज्ञ नाहीत. तद्वताच त्यांच्या खात्यांकडे स्वत:ची मोठी आर्थिक तरतूद नाही. त्यांच्याकडून नियमावली तयार होईल इथवर ठिक, पण पर्यटन विकासाचा आकृतीबंध कसा असेल. गडाचे गडपण टिकावणारा, निसर्गाचे संवर्धन करणारा की त्यालाच सुरूंग लावणारा. पर्यटन, इतिहास आणि पर्यावरण याची गल्लत होता कामा नये.

काही सूचना:

१. महाराष्ट्रात प्रत्येक पर्यटकाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात यावी. यासाठी प्रत्येकी दहा रूपये इतके नाममात्र शुल्क असावे. 

२. जे नोंदणीकृत पर्यटक आहेत त्यांना विम्याचे संरक्षण द्यावे. यासाठी अतिशय स्वस्त असे विम्याचे पर्याय उपलब्ध आहेत.

३. एखाद्या पर्यटनस्थळाची पर्यटक क्षमता कमी असेल तर अशा ठिकाणी प्रथम येईल त्याची नोंदणी, या तत्वावर करावी. एखाद्याची नोंदणी रद्द झाल्यास त्या पाठी नोंदणी करणार्‍यास परवानगी देण्याची तरतूद असणारे सॉफ्टवेअर विकसीत करावे. सर्व परवाने हे केवळ ऑनलाईन पद्धतीनेच द्यावेत. पावती फाडू नये. त्यात वेळेचा अपव्यय टाळावा व अधिकार्‍यांना वा कर्मचार्‍यांना, कोणाला रोखायचे, कोणायला सोडायचे हे अधिकार देऊ नयेत. नोंदणी ही तात्काळच दिवसाचे चोवीस तास देण्याची सुविधा असावी. प्रतिक्षा यादीवर असेल तर पुढचे पर्याय देऊन तेव्हाच परवानगी अंतिम करण्यात यावी.

४. पर्यटनस्थळ परिसरात वास्तव्यास असलेल्यांना नोंदणीचे बंधन नसावे. विशेष करून गिरीपरिसरातली मुळ निवासी मंडळी.

५. डोंगरावरचे पूर्वपार यात्रा उत्सव असेल त्यावेळी नोंदणी रहित करून मुक्त प्रवेश द्यावेत.

६. ज्यांना अभ्यास दैारा करायचा आहे, साहसी खेळ हे कौशल्य विकसीत करण्यासाठी करायचे आहे. त्यातून आर्थिक नफा कमवायचा नाही, अशांसाठी अभ्सास दौरा, निसर्ग संवर्धन, इतिहास अवलोकन अशा आशयाची विशेष परवानगी देण्यात यावी. याकरिता संबंधित संस्थांचे पत्र असावे.

७. प्रत्येक डोंगरावर किंवा समुद्रस्थळावर, वन हद्दीत एका दिवशी किती पर्यटक, अभ्यासक, साहसी क्रीडापटूंना प्रवेश दिला जाऊ शकतो याची संख्या तज्ज्ञांच्या मदतीने निर्धारीत करावी.

८. कमी पर्यटक क्षमता असेल्या स्थळांवरची नोंदणी पंधरा दिवसांपेक्षा अगोदर करू नये.

९. प्रत्येक पर्यटन स्थळी गाईड/मार्गदर्शक/वाटाडे यांची नियूक्ती करावी. त्यांना ओळखपत्र द्यावे. त्यांचे दर हे जाणकारांच्या मदतीने निर्धारीत करावे. 

१०. पर्यटकाच्या माध्यमातून मिळणार्‍या उतपन्नातून स्थानिक पातळीवर विकास कामे करण्यासाठी काही टक्के वाटा निधारीत करावा.

११. अ, ब, क, ड, इ या क्रमाने पर्यटनस्थळांची वर्गवारी करून त्या प्रमाणे विकासनिधी खर्च करावा.

१२. पर्यटकांना सर्वोत्तम सुविधा देण्याचे धोरण असावे. त्याकरिता रस्ते, दवाखाने, हॉटेल्स, निवारागृह यांचे वेगवेगळ्या दर्जाच्या सुविधा निर्माण कराव्यात. यासाठी काही ठिकाणी शासन व खासगी गुंतवणूक अशी भागिदारी असावी.

१३. ग्रामीण भाग असेल अशा ठिकाणी ग्रामीणांना उत्तम दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वोतपरी सहाय्य करावे. त्यांना उत्तम दर्जाचे खानपान, व स्वच्छतेचे सर्वोच्च मापदंड राखण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात यावे. अशा काणी बड्या प्रस्थांना परवाने देण्याचे धोरण नसावे, सर्वसामान्यांना त्यात समावून घ्यावे.

१४. वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी काही ठिकाणी पर्यटकांना विशिष्ट ठिकाणी वाहनतळ सुविधा उपलब्ध करून द्यावी व पर्यटनस्थळी नेण्यासाठी त्यांची सरकारी प्रवासी वाहनांतून अतिशय माफक शुल्कात ने आण करावी. (उदा. अजिंठा)

१५. ज्या ठिकाणी चांगले रस्ते नाहीत. भोजन व निवास सुविधा चांगल्या नाहीत, अशा स्थळांची नोंदणी स्पष्ट शब्दात, 'अविकसीत', अशी करण्यात यावी.

१६. डोंगरांवर पर्यटन सुविधा विकसीत करताना जागतिक मापदंडांचे कसोशिने पालन करावे. 

१७. निसर्गाची यत्किंचिंतही हानी होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी स्विकारूनच पर्यटन विकास करण्यात यावा.

१८. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाला नखभर धक्का लागणार नाही यासाठी कायदा करावा व त्यास अनूसरूनच पर्यटन विकास, ग्राम विकास, शहर विकास, दुर्गम परिसर विकास करावा.

१७. पुराण वास्तुंचे संवर्धन - संशोधन - अध्ययन - संरक्षण हा मुद्दा डोळ्या समोर ठेऊनच महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचा पर्यटन विकास करावा.

१८. प्रत्येक रस्ता, प्रत्येक हॉटेल, निवारागृह व गाईड यांना रेटिंग देण्याची सुविधा असावी. वजा रेटींग अथवा कमी रेटींग असणार्‍यां व्यक्ती किंवा संस्थांचे परवानापत्र दर वर्षी आढावा घेऊन रद्द करण्याची तरतूद करण्यात यावी. प्रवास मार्गावरील हॉटेल, पेट्रोलपंप यांनाही रेटीं ठेवण्यात यावे.

१९. ग्राहक तक्रार हा अतिशय महत्वाचा विषय मानून त्यासाठी सर्व स्तरावर तक्रार नोंदणी, निवारण, सुनावणी याचा पर्यटन आकृतीबंधात समावेश करण्यात यावा.

२०. ऐतिहासिक वास्तुंभोवती गराडा घालणारी दुकाने, गलिच्छ बांधकामे, तात्पूरत्या शेड हटविण्याचे राज्यव्यापी धोरण असावे. 

२१. पूर्ण प्लास्टिक बंदी असावी. कुठलेही पदार्थ प्लास्टिक वेष्टनात किंवा वर्तमानपत्राच्या कागदात देण्यावर बंदी घालावी. यासाठी ताजे पदार्थ बनवून विक्री राबवावी.

२२. स्वच्छ पाणी पर्यटकांना मोफत पुरविण्यात यावे.

२३. पर्यावरण पुरक स्वच्छता गृह हा पर्यटकांचा प्राथमिक अधिकार असून त्याशिवाय कोणतेही पर्यटनस्थळ विकसीत होऊ शकत नाही ही बाब ध्यानात ठेवावी. 

२५. प्रत्यक्ष पर्यटनस्थळी विकली जाणारे खाद्यपदार्थ, चहापान आदींचे शासकीय व अशासकीय समितीमार्फत काही पर्यटकांचा समावेश करून दरवर्षी ऑडिट करावे व दुय्यम पदार्थ विक्रीस मज्जाव करावा. शक्यतो महिला गट अथवा बचत गटांना या सुविधा पुरविण्याचे कंत्राट द्यावे व त्यासाठी त्यांना जागतिक दर्जाचे अन्न व सेवा पुरविण्याचे प्रशिक्षण द्यावे. उदा. मुंबईत, 'मराठमोळं', या संस्थेने गरिब वस्तीतल्या महिलांना दर्जेदार चॉकलेट, बेकरी उत्पादने, फरसाण उत्पादने बनविण्यासाठी सप्ततारांकीत दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांना सर्वोत्तम दर्जाचे पॅकेजिंग व वितरण सुविधा देण्यासाठी निर्माण केलेले क्लस्टर. या धर्तीवर भाजी पोळी, नाष्ता, पेयपान, विविध चवदार पदार्थांचे क्लस्टर तयार करावे.

२६. साहसी खेळ हे पर्यटकांसाठी वेगळे आणि महाराष्ट्रातील लोकांमध्ये कौशल्य विकसीत करण्यासाठी वेगळे त्यामुळे दोन्हींकरिता स्वतंत्र नियमावली असावी. 

२७. संरक्षित वन हद्दीत साहसी खेळांना परवानगी देता येते. जगात अनेक ठिकाणी याचा अवलंब करून तिथल्या लोकांनी साहसात सर्वोच्च पातळी गाठली आहे. मराठी माणसाने डोंगरांवर अतूलनीय साहस गाजविले आहे, याचे स्मरण ठेऊन त्यांच्या वारसांना साहसी क्रीडा कौशल्य विकसीत करणयापासून वंचित ठेवणारे लिखीत व अलिखीत धोरण रद्द करून त्यांना नियमात कसे बसविता येईल या साठी नियम करावे.

२८. साहसी खेळ, निसर्गस्थळे, ऐतिहासिक स्थळे यावर दरवर्षी साहित्य संमेलन, छायाचित्र व लघुपट स्पर्धांचे व चित्रपट महोत्सवांचे आयोजन करावे. त्यासाठी आपल्याकडच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील माहिती व तंत्रज्ञानाचे सहाय्य घ्यावे. तिकडे हॉलिवूडचे तंत्रज्ञ बांफ आदी चित्रपट महोत्सवात आपला वाटा उचतात. आपल्या कडे असे फार तोकड्या प्रमाणावर होते, त्यामुळे भारतात साहसस्थळे नाहीत किंवा साहसवीर नाहीत, असा गैरसमज पसरू शकतो. 

२९. इको टूरीझम, सेफ टूरीझमच्या नावाखाली डोंगरफोडणे, घाटरस्ते बांधणे, डोंगरकड्यांना नळकांड्यांचे संरक्षक कठडे बनवणे या प्रकारांवर तातडीने बंदी आणावी. 

२९. डोंगरप परिसरात सिमेंट कॉंक्रिटचे जिने व पायर्‍यां बांधण्यावर कायमस्वरूपी बंदी आणावी. 

३०. जिवितास धोका आहे, तो कशा स्वरूपाचा आहे, बचाव दल पोहोचण्यास किती वळ लागू शकतो, दवाखान्याची सुविधा कोणत्या ठिकाणी आहे याची सर्व माहिती प्रत्येक पर्यटनस्थळावर तसेच पर्यटक नोंदणी करताना देण्यात यावी. 

३१. दुर्दैवाने काही अपघात झाल्यास, ज्यांची नोंदणी झाली आहे, अशांना मोफत बचाव व शोध पथक उपलब्ध करून द्यावे. बाकीच्यांकडून त्या पोटी रितसर रक्कम भरपाई घ्यावी.

३२. बचाव दलांना राज्य सरकारची अधिकृत मान्यता मिळावी. त्यांना वाहन भत्ता देण्यात यावा. अती जोखिमेसाठीचा विमा द्यावा. वैद्यकीय विमा देण्यात यावा. ओळखपत्र व गणवेश देण्यात यावा.

३३. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात लोकांचा दैनंदिन कामाचा व्याप वाढल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर सुटीच्या दिवशी घराबाहेर पडतात. त्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी सु्टीच्या दिवसांचे विशेष नियोजन करावे.

३४. लोकांना पाण्याचे आकर्षण असते, यासाठी काही ठिकाणी पावसाळी पाणी कृत्रिमरित्या वळवून लहान धबधबे, कमी उंचीचे तलाव ज्यात लहान मुले सुद्धा सहजपणे खेळू शकतील असे कमी खर्चाचे, नैसर्गिक साधनांचाच वापर करून केलेले हंगामी लघू वॉटर पार्क तयार करावेत. 

३५. वाहनतळ, पर्यटक प्रवेशकर हा शासकीय स्तरावरच गोळा व्हावा व त्याचा सर्व वापर हा ज्या निसर्गस्थळांची थोडी फार हानी होणार आहे तिथल्या विकासासाठी करण्यात यावा. खासगी ठेकेदारी अशा ठिकाणी बाद ठरवावी.

३६. निसर्गाची हानी मोठ्या प्रमाणावर होईल, असे कोणतेही पर्यटनस्थळ विकसीत करू नये.

३७. वनखात्याला कोणत्याही स्वरूपात पर्यटनावर खर्च करण्याची परवानगी देऊ नये. त्यांना फक्त वने व वन्यजीव संवर्धनावरच खर्च करण्याचे व वनक्षेत्र किंवा काही प्रजाती नष्ट झाल्यास जबाबदार धरण्याचे धोरण असावे. 

३८. तळी, टाकी स्वच्छतेचे कोणतही काम खासगी संस्थांना देऊ नये. ते सरकारी पातळीवरच करण्यात यावे व तळी टाक्यातील गाळाचा अभ्यास करून त्यातून काळजीपूर्वक पुरातत्वीय अवशेषांचे संकलन करावे. एकदा स्वच्छ झालेला, तलाव, तळी, टाकी दर दोन वर्षांनी साफ करण्याची तरतूद असावी. 

३९. महाबळेश्वर, माथेरानच्या धर्तीवर आणखी काही ठिकाणी गिरीस्थाने विकसीत करावी. अशा गिरीस्थानात खासगी वाहनांना पूर्ण बंदी करून तिथे घोडागाडी, सायकल, सायकल रिक्षा, लहान रेल्वे अशा पर्यावरणस्नेही साधनांनाच परवानगी देण्यात यावी. 

४०. बांधकामे ही वेडीवाकडी नसावी. त्यात सौंदर्य दृष्टी असावी व ती इथल्या इतिहासाठी व निसर्गाशी मेळ साधणारी असावी.

४१. पर्यटनस्थळी मराठमोळ्या पदार्थांच्या खानावळी सर्वत्र असाव्यात. उडपी, गुजराती, पंजाबी खानावळी या अशाही सर्वत्र मुबलक आहेच. मराठी पदार्थांना व स्थानिक पाककलेला नावलौकिक मिळवून देण्यासाठी त्यांचेही उत्तम ब्रॅन्डींग करावे. ते सर्वात स्वच्छ भांड्यातून उत्तमरित्या सादर करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करावे.

४२. सार्वजनिक वाहतूक पर्यटनाशी जोडताना पर्यटकांना स्वत: बस, रेल्वे, रिक्षा, टॅक्सीचे आरक्षण करण्यासाठी राज्यव्यापी सुविधांचे जाळे निर्माण करावे. 

४३. पर्यटनस्थळी व त्या मार्गावरच्या सर्व हॉटेल्सना पर्यटन विभगाची मान्यता घेण्याची सुविधा असावी. त्यांची यादी दूरध्वनी क्रमांक व लोकेशनसह अध्ययावत करावी. मान्यता देताना पर्यटन विभाग व स्थानिकांची समिती असावी. त्यातून दर्जेदार सुविधा व स्वच्छता ठेवणार्‍यांना मान्यता द्यावी. ज्यांच्याकडे काही कमी असेल ती त्यांना दुरूस्त करायला लावावी. जे दर्जा व सेवा टिकवतील तेच या स्पर्धेत टिकतील असा आकृतीबंध तयार करावा.

४४. पर्यटन विभागाने सर्व माहिती ऑनलाईन किंवा फोनवरून देण्यासाठी स्थानिक ते राज्यव्यापी कॉलसेंटर्स उभारावीत.

महाराष्ट्राच्या पर्यटनाला खर्‍या अर्थाने 

चालना व झळाळी लाभो ही सह्याद्री चरणी प्रार्थना!

।।जय हो।।