Wednesday, September 17, 2008

बहर वेडावणारा; ऱ्हास दुखावणारा


त्र्यंबकेश्‍वरजवळील उतवड किल्ल्यालगतच्या डोंगरावरील कार्वीची दिव्य फुले. (छायाचित्र : प्रशांत परदेशी)
कार्वीची फुले

डोंगरदऱ्यांचे रहिवासी असो, की कडेकपारीत भटकणारे निसर्गवेडे. कार्वीचे त्यांच्याशी अतूट नाते आहे. सह्याद्री तर कार्वीचा शृंगार अभिमानाने अंगाखांद्यावर मिरवतो. दिसायला एक साधारणसे झुडूप; पण तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. काही फुटांपर्यंत सरळसोट वाढणाऱ्या काड्या आतून पोकळ. त्यामुळे ती वाहून न्यायला हलकी; पण कार्वीची गुणवैशिष्ट्ये इथेच संपत नाहीत. शेणामातीत सारवलेल्या कार्वीच्या झोपड्या, लहान हॉटेल, ढाबे मनाला भुरळ घालतात. दुर्गम, अतिदुर्गम भागात तर जिथे जिथे कार्वी उपलब्ध असेल तिथे घरांना ती पहिली पसंती असते. बाहेर उष्णता असेल तेव्हा कार्वीची घरे आतून थंड असतात आणि हिवाळ्यात उबदार.
या कार्वीची गंमत म्हणजे तिचा बहर आठ वर्षांतून एकदाच येतो. तो बघायला मिळणे एक अवर्णनीय आनंद. जांभळ्या रंगाची फुले जास्त पावसात कोमेजतात; पण ताजीतवानी असतात तेव्हा सूर्याचा प्रकाश साठविल्याचा आभास होतो. 2005 मध्ये सह्याद्रीत अनेक डोंगरांत कार्वीचा महाबहर आला होता. काही ठिकाणचा बहर मात्र उशिरा असल्याने अधूनमधून भटकंती करताना कार्वीच्या फुलांचे दर्शन घडत असते. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात त्र्यंबकेश्‍वरच्या डोंगररांगांत भटकण्याचा योग आला तेव्हा उतवड किल्ल्याचे काही कडे जांभळ्या दिव्य फुलांनी लगडल्याचे दिसून आले. हा दुर्मिळ बहर अगदी अल्प प्रमाणावर असला, तरी वेडावून टाकणारा आहे.
माणसाला मायेची ऊब व थंडावा देणारी कार्वी डोंगरांचीही तारणहार आहे. वेगवान वाऱ्यात, ऊन-पावसाचे थपेडे झेलत ती उभी राहते. तिची मुळे डोंगराची माती घट्ट पकडून ठेवतात. त्यामुळे अनेक डोंगरांचे माथे कार्वीचा आधार घेऊन उभे आहेत. काही वर्षांपूर्वी पुण्याच्या संशोधकांनी माथेरान व त्र्यंबकेश्‍वरला ब्रह्मगिरी पर्वतावरून कार्वीचे नमुने गोळा केले. आदिवासी कार्वीच्या मुळांचा वापर औषधासाठी करतात. त्यावर प्रयोगशाळेत यशस्वी प्रयोग केल्याचे निष्कर्ष संशोधकांनी मांडले.
घरांसाठी व सरपण म्हणून कार्वीची बेसुमार कत्तल झाल्याने आता कार्वीच्या संरक्षणाची वेळ येऊन ठेपली आहे. तळावरच्या जंगलांचा सफाया झाल्याने डोंगरमाथ्यावरची कार्वी दुष्टचक्रात सापडली आहे. त्यामुळे एकेकाळी सर्वत्र आढळणाऱ्या या बहुगुणी झुडपाचे अस्तित्व संकटात सापडले आहे. सह्याद्रीत काही मोजक्‍या ठिकाणी कार्वी दाटीवाटीने उभी आहे. काही ठिकाणी तर दोन्ही हातांमध्ये मावणार नाहीत, इतके जाड बुंधे दिसून येतात.
ग्रामीण भागातल्या समस्यांकडे सरकार गांभीर्याने बघत नाही. पीकपाण्याची अनिश्‍चितता, शिक्षणाचा अभाव, नोकरीची संधी नाही, घरासाठी बांधकाम साहित्य नाही, जाळायला इंधन नाही, अशा स्थितीत निसर्गसाखळीतले कार्वीसारखे साधारण झुडूप उच्चाटनाच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहे. कार्वीचा ऱ्हास ही दुर्गम भागातील सामाजिक, आर्थिक स्थितीची भीषणता दर्शविणारी अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे. विकासाची गंगा "त्यांच्यापर्यंत' पोचत नाही म्हटल्यावर कुठले पर्यावरण, कुठले संवर्धन? आलिशान जीवन जगणाऱ्या शहरी अधिकाऱ्यांनी, नेत्यांनी व संस्थांनी पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमा जरूर काढाव्यात; पण ज्या जनतेचे जीवन कस्पटासमान झाले आहे त्यांना जगण्यासाठी लागणाऱ्या किमान सुविधा तरी उपलब्ध करून द्यायला हव्यात.
मुंबईत एखादा पूल झाला नाही तरी चालेल; पण खेड्यापाड्यांत विकासाची एक योजना जरी नीट कार्यान्वित झाली नाही, तरी त्याचा पहिला परिणाम कशावर होईल? निसर्गावर... हा निसर्ग राखला नाही, तर माणसांना पाणी कोठून मिळेल? शेतीला पाणी कोठून मिळेल? लहान-मोठे जीवजंतू तहान कोठून भागवतील? कार्वीवर कोसळलेले आरिष्ट पर्यावरण संतुलन बिघडल्याचे एक जळजळीत उदाहरण ठरावे.