Tuesday, February 27, 2018

शिपनुर नोंदवही...


उन्हाची चाहुल लागली खरी...पण 'तो' अंग भाजून काढण्या इतका तिव्र झालेला नाही, तेव्हा एखादी भटकंती सहज होऊ शकते', हा विचार करून आम्ही २४ व २५ फेब्रुवारी (२०१८) असा दिड दिवसांचा शिपनूर-कुलंगवाडीचा महत्वाकांक्षी बेत आखला...तो सफळ-सुफळ ठरला की नाही...मित्राच्या भावाच्या लग्नाचा बेत कोणामुळे हुकला? एका वेगळ्या वाटेवरच्या रविवारीय भटकंतीचा हा वृत्तांत...

'जिवाभावाच्या मित्राच्या विवाहाला हजेरी लावायची...वधू वरांना शुभ आर्शिवाद द्यायचे...पंक्तीतलं छानसं जेवण करायचं आणि वाटेतल्या एक एक गड्याला घेत सरळ साम्रदचा रस्ता धरायचा', मागच्याच आठवड्यात हातात लग्नपत्रिका पडली आणि आमच्या शिपनूर-कुलंगवाडी ट्रेकच्या कार्यक्रमात थोडा बदल करण्यात आला तो असा.

तसं बघितलं तर ही कोणत्या किल्ल्यावरची भटकंती नव्हती...वाटेत ना कोणती ऐतिहासीक बांधकामे बघायला मिळणार होती...ना एखादे जंगल...नाही म्हणायला, छोट्या कुलंगच्या रूपाने कुलंग किल्ल्याला बगल देऊन होणारा हा एक आडवळणाचा भटकंतीचा बेत होता; तो तितकाच रोमहर्षक ठरेल? खरं तर सह्याद्रीतल्या भटकंतीबद्दल असा प्रश्न मनामध्ये उपस्थित व्हायला नको! पण यावेळेला का? कोण जाणे? हा प्रश्न उपस्थित झाला...पण त्याने मनातला बेत डळमळीत झाला नाही, 'ही सह्या भटकंती आहे राजा', या एक वाक्याने भटकंतीला जायचे या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

या भटकंतीच्या मार्गावर भलेही एकही ऐतिहासिक नोंद असलेले स्थळ नसेल, इतिहासातल्या कित्येक घडामोडींची साक्ष असलेल्या मनाच्या कप्प्यात अढळस्थानी बसलेल्या काही दुर्गांचे दूरून दर्शन अनोखे ठरणार होते. 'एका वेगळ्या वाटेने त्यांचे हे दर्शनच या भटकंतीचा आत्मा ठरणार', याची पक्की खात्री होती. यात होणार होती दमदार चाल आणि भंडारदरा धरणाच्या परिघातल्या डोंगरांगांचे मनोवेधक चित्र.
- रात्रीच्या वेळेला दुर्गम भागातला विजपूरवठा असा कमीदाबाने असतो... (स्थळ: साम्रद)
ऐन फाल्गुनात उन्हाळी भटकंतीचा हा बेत होता. आमच्या असंख्य ट्रेक्सचा साथीदार मित्रवर्य किशोर थेटेचा लहान भाऊ गणेशचा विवाह सोहळा नेमका प्रस्थानाच्या दिवशीच होता, तेव्हा वाट वाकडी करून आम्ही अगोदर पिंपळगाव बसवंत येते लग्न सोहळ्याला हजेरी लावायची आणि मग साम्रदच्या दिशेने प्रस्थान करायचे असा कार्यक्रम ठरवला. खरे तर साम्रद गावात मुक्काम करण्याचे कोणतेही औचित्य नव्हते...त्याऐवजी शिपनूर डोंगराच्या शिखरमाथ्या जवळ मुक्कामाचा बेत शिजत होता. मुळातच ही आडवळणाची भटकंती, त्यात शिपनूरवर मुक्कामी भटकंती म्हणजे एखाद्या एखाद्या मल्टी स्टारर चित्रपटासारखा प्रकार. बर्‍यापैकी असलेल्या चंद्रप्रकाशात अवघ्या भटक्यांच्या गळ्यातले ताईत असलेल्या अलंग-मदन-कुलंग-रतनगड-भैरवगड अशा दैदिप्यमान किल्ल्यांचे दर्शन.

जोडीला महाराष्ट्रातले सर्वोच्च शिखर असलेला कळसुबाईचा डोंगर...त्याचे पहारेकरी किर्डा, साकिर्डा, महाराष्ट्रातली उत्तुंग अशी घनचक्कर, गवळदेव, मुडा, आजोबा, कात्रा, करंडा अशा एकाचढीस एक डोंगरांचा अद्वितीय नजारा चांदण्या रात्रीला बघायचा; दुसर्‍या दिवशी उगवत्या सूर्याच्या साक्षीने नेहमीच भूरळ घालणारे हे डोंगर दुरून साजरे करायचे. परंतू आमचा हा बेत पहिल्या झटक्यात फसण्याची चिन्ह दिसू लागली. याचे खापर स्थानिक नेत्यांवर फुटणार नाही 'याची आम्ही काळजी घेत होतो'.

पिंपळगाव बसवंत नाशिकपासून अवघ्या तीस किलो मिटर अंतरावर. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग असलेले हे भारतातले कादा, द्राक्षे व डाळिंबाचे सर्वात मोठे आगार रस्ता मार्गाने उत्तमरित्या जोडले गेले आहे. नाशिकहून तेथे पोहोचण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. गोरज मुहूर्ताच्या लग्नासाठी आम्ही सायंकाळी ६-०० वाजता नाशिकहून निघणार होतो, परंतू डॉ. अभिजीत इंगळेंची गाडी नादूरूस्त झाल्याने आम्ही डॉ. देवीकुमार केळकरांना साद घातली. तेही आमच्या सोबतच्या शिपनुर भटकंतीत सामिल होणार होते. ६-३०च्या सुमारास आम्ही नाशिकहून पिंपळगाव बसवंतच्या दिशेने राष्ट्रीय महामार्गावरून प्रस्थान सुरू केले. मुंबई नाका ते आडगाव नाका हा प्रवास नाशिकचे भुषण असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरच्या उडाणपूलावरून झटक्या सरशी झाला. 'आता लवकरच लग्न सोहळा गाठायचा आणि शक्यतो लवकर तिथून परतायचे, कोणी कोण कोणत्या वस्तू घ्यायच्या', कोणाला कुठून घ्यायचे', अशा गप्पा  टप्पा सुरू असताना आडगाव नाक्याच्या पुढे आमची गाडी अचानकपणे थबकली. कारण काय तर म्हणे वाहतुकीची कोंडी.


करवंद फुलांचा गंध वेडावून टाकणारा...ही हिरवी कंच फळे मे अखेर पर्यंत पूर्ण पक्व होतील तेव्हा...

'मुंबई-पुण्या सारखी आमच्या नाशिकला वाहतूकीची तशी कोंडी होत नाही. तासन तास कधी रस्त्यात अडकून पडण्याची वेळ येत नाही', अशी आमची आम्हीच शेखी मिरवली व वाहतूकीच्या जंजाळातून पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागलो. पण हायरे देवा? इथली वाहतूक पुढे का सरकत नाही? आमचा आशिया खंडातल्या या सर्वाधिक लांबी असलेल्या उड्डाण पुलावर चक्क वाहतूकीच्या खोळंब्याने ट्रेकघात होतो की काय? अशी
स्थिती निर्माण झाली. क.का. वाघ महाविद्यालय चौकातच आम्ही अडकून पडलो. बराच वेळ वाहतूक पुढे हलेना, तेव्हा आम्ही डाव्या बगलेतून सेवा मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला, परंतू आमच्या दोन्ही बाजुंला वाहने अशी काही थबकली होती की, आम्हाला ना पुढे जाता येई ना उजवीकडे ना डावीकडे.

मिनाताई ठाकरे क्रीडांगणा लगत उड्डाणपूल खाली उतरतो तो क.का.वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारा समोर. तिथ पर्यंत सर्व काही ठिक होते, तिथून अवघ्या चार एकशे मिटरवरचे बळीचे मंदिर गाठायला थोडे थिडके नव्हे, तब्बल पावणे दोन तास लागले. वाहतूक सरण्याची कोणतीही चिन्ह दिसेना. लग्न आटोपून सगळ्या सवंगड्यांना गोळा करायचे, तिथून ३८ किलो मिटरचा राष्ट्रीय महामार्गावरचाच घोटी पर्यंतचा प्रवास करायचा, तिथे आणखी दोघा मुंबईकर भटक्यांना घ्यायचे आणि तिथून पुढचा ६० किलो मिटरचा घाटवळणांचा प्रवास, तोही रात्रीचा. अशा डळमळीत स्थितीत आम्हाला नाईलाजाने परतावे लागले.

सह्याद्रीत हा नजारा बघण्यासाठी पावले आपोहाप थबकतात...

परतणे सुद्धा सोपे नव्हते. कसे तरी करून आम्ही डाव्या बाजूच्या सेवा मार्गाला लागलो, तिथून वीस मिनीटात अर्था किलो मिटर माघारी फिरून आम्ही घुसखोरीची संधी साधत उजव्या सेवा मार्गावर शिरकाव केला. आता आम्ही मुंबई-आग्रा महामार्ग सोडून नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गाला लागलो, तिथून तपोवनातून नाशिक पुणे राज्य महामार्ग धरला व तिथून द्वारका चौकातून पुन्हा मुंबई महामार्ग असा सापशिडीचा खेळ खेळत अखेर मुंबई नाक्यावर येऊन पोहोचलो.

आमच्या चर्चेचा सूर इतर सर्व नाशिककरांप्रमाणे, नाशिकमधून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करणार्‍या राष्ट्रप्रेमी नेते मंडळींच्या दिशेने वळू लागताच आम्ही काळजी घेतली की, नेत्यांना कोणताही दोष दिला जाणार नाही...''यात नाशिकच्या नेते मंडळींची कोणतीही चुक नाही, चुक परिसरातल्या लोकांचीच...काही एक कारण नसताना दूर अंतरावरच्या नोकर्‍या पत्कारतात...दूर दूर अंतरावर आपले व्यवसाय थाटतात...सायकल, बैलगाडी, तांगा असे लोकप्रिय पर्याय उपलब्ध असताना उगीच दुचाकी,
चारचाकी वाहनांचा सोस धरतात; आणि हे काय? सगळेच जण एकाच वेळेला कामाकडे कसे जातात...काम आटोपून घरी परतात''...तेव्हा यात नेत्यांचा दोष कुठला...बिचार्‍यांना कुठे ठाऊक की, उडाण पुल काही ठिकाणी खाली उतरवून पुन्हा वर उचलल्याने शहराच्या वातूकीची बोजवारा उडतो...नाही तर त्यांनी अशा पद्धतीने थोडीच पुलाचे नियोजन केले असते.

अंजनीच्या जांभळ्या रंगाच्या फुलांचे घोसच्या घोस शिपनूरच्या डोंगरावर लगडलेत...

खरे तर ज्यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरच्या नाशिक-मुंबई टप्याचे चौपदरीकरण झाले आणि लागोलाग सहापदरीचे बांधकाम सुरू झाले, तेव्हाच नाशिक शहरातून जाणार्‍या महामार्गावर आशिया खंडातला सर्वात मोठ्या उडाण पुलाची घोषणा करण्यात आली होती. पांडवलेणी ते पिंपळगाव बसवंत असा हा पुल होणार, या वार्तेने नाशिककर हुरळून गेले होते. हळू हळू या पुलाला अनेक फाटे फुटले. 'कोणी आपल्या हॉटेल करिता पुलाला छेद देऊन उतरणीचे रस्ते बनवले तर कोणी चक्क आपल्या बंगल्यासाठी', असे उघड आरोप होऊ लागले परिणामी दिड-दोन वर्ष बांधकामाचा त्रास सोसल्यानंतर नाशिककरांकरिता हा पुल लोकार्पण झाला, तेव्हा समजले की, याला तर सेवा मार्गच नाही. सद्या ज्याला सेवा मार्ग म्हटले जाते त्या रस्त्याला सेवा मार्ग म्हणता येणार नाही.

Add caption

नाशिक शहरवासियांचा रस्ता राष्ट्रीय महामार्गासाठी गिळंकृत करण्यात आला आणि केवळ नावापूरत्याच असलेल्या चिंतोळ्या मार्गावर जो वाहतूक खोळंब्याचा सिलसिला सुरू झाला तो उत्तरोत्तर वाढतच राहिला. अनेक अपघात होऊन बरेच लोक हा सेवा मार्ग ओलांडताना मृत्यूमूखी पडले तर अनेक जण जायबंदी झाले. अपघातांची ही मालिका इतकी मोठी, की अपघातात कोणी मृत्यूमूखी पडले नाही, असा एकही आठवडा जात नाही. महामार्गावरच चक्क गती रोधक. नाशिक शहरात झपाट्याने विकसीत झालेल्या नव्या वसाहतींना महामार्ग ओलांडण्याची कोणतीही व्यवस्था नाही, परिणामी महामार्ग हा महामार्ग न राहता एखाद्या गर्दीत कोंदटलेल्या शहराचा चौक बनला. एक दोन नव्हे तर तब्बल नऊ विविध ठिकाणी या विक्रमी उडाणपुलाने नवे वाहतुक खोंळंबे निर्माण केलेत. अशा प्रकारे आमच्या भटकंतीची दयनीय सुरूवात झाली. मित्राच्या भावाच्या विवाह सोहळ्याला मुकावे लागल्यानंतर आम्ही वेगाने सगळ्या सहभागींना एक एक करून आमच्या काळ्या पिवळ्या बोलेरो जीपमध्ये गोळा केले आणि ठरलेल्या वेळे पेक्षा अडीच तास उशराने प्रस्थान केले.


मुंबईहून शैलेश राव व भागवत उगले सामिल होणार होते. ते इगतपूरीला रेल्वेने दाखल झाले, परंतू तिथून त्यांना घोटी चौफुलीवर येण्यासाठी वाहन मिळेना. कसे बसे पथकर नाक्या पर्यंत त्यांना वाहन मिळाले. तिथे रात्रीचे जेवण आटोपून ते आमची बराच वेळ वाट बघत होते. आम्हीही वाटेत वाडीवर्‍हे येथे भटक्यांच्या ठेवणीतले खास हॉटेल असलेल्या प्रभूच्या ढाब्यावर छानसे जेवण घेतले होते. घोटीला येई पर्यंत आणखी एक वाईट बातमी समजली. आमच्या जीपचे गियर अडखळत होते. जीपवाल्याने तात्काळ दुसरी जीप आणण्याची तयारी केली. आम्हाला चौफुलीवर उभे करून तो घोटी गावात दुसरी जीप आणण्याकरिता रवाना झाला. तोवर आमच्या ट्रेक गप्पा महामार्गावरच रंगू लागल्या. मुस्लीम धर्मियांच्या औरंगाबाद इज्तेमा नावाच्या धार्मिक सोहळ्यासाठी काही कार्यकर्ते महामार्गावर उभे राहून भाविकांच्या गाड्यांना घोटीहून जाण्याचे सूचित करत होते. सुमारे अर्धा तास आम्ही त्या कार्यकर्त्यांची लगबग बघत होतो. आमच्याकरिता बदली जीपगाडी आली आणि आम्ही आमच्या पाठपिशव्या त्यात रचून भंडारदरा रस्त्याला लागलो.


डोळ्यावर एव्हाना झोप चढली होती. डोळे सारखे लागत होते. त्यात भंडारदरा केव्हा आले आम्ही धरणा लगतचा रस्ता केव्हा धरला हे कळले

नाही. साम्रदला पोहोचलो, तेव्हा अर्थातच संपूर्ण गावही झोपी गेलेले होते. यशवंत बांडेच्या घरा शेजारच्या एका सारवलल्या ओसरीत पथार्‍या पसरल्या व पहाटे ५-००चा गजर लाऊन आम्ही एकमेकांना शुभरात्री म्हटले तेव्ह घड्याळात २-०० वाजून गेले होते. पाचचा गजर झाला की नाही, ठाऊक नाही, पण मला पावणे सहाला जाग आली. तात्काळ सगळ्यांना आवाज देऊन आम्ही मिट्ट काळोखात आवर सावर सुरू केली. पाऊण तासात आम्ही आवरून सज्ज होतो. यशवंताच्या घरचा चहा घेतल्यानंतर त्याने आमच्या सोबत येण्यास अंमळ उशिरच केला. म्हणजे आमचे रविवार सकाळचे प्रस्थानही तास दिड तास उशिरानेच झाले.

भारतातल्या अनोख्या नैसर्गिक स्थळांच्या यादीत स्थान असलेल्या सांदण दरीकरिता काही तंबु आदल्या रात्रीच लागले होते...आम्हाला उजवीकडे खुट्याचा सुळका व त्याच्या पाठीमागे काळ्या अग्नीजन्य पाषाणाचा भलामोठा पडदा धरणारा अत्यंत आवडीचा रतनगड, कात्रा व आजा डोंगराची काळी प्रतिकृती दिसत होती. वाटेत काही ठिकाणी करवंदाला पांढरी फुले लागल्याचे दिसत होते. या फुलांचा वास अगदी जीव वेडावून टाकणारा इतका सुरेख.

शिपनूरच्या डोंगरावर बुंधा जाळून टाकलेला हा वृक्षच सांगतो, या परिसरात मोठमोठाले असंख्य वृक्ष होते...त्यांचा माणूस नावाच्या यंत्राने काळ केलायं!

खुट्याच्या सुळक्याच्या डाव्या बाजुला हलकी तांबूस छटा तयार झाली तेव्हा, 'तो आता थोड्याच वेळात येणार आणि अवघे आसमंत उजळून टाकणार', हे स्पष्ट झाले. भास्कराने डोंगरांच्या काळ्या कडांवरून डोके वर काढले व हळू हळू तो वर येऊ लागला...जस जसा वर येत, तसतसा त्याचा गडद लालपिवळा रंग फिकट होत होता...काही क्षण अशा विविध छटा बिखेरल्यानंतर एकदाचा तो वर आला...शिपनूरचा डोंगर त्या उजेडात प्रकाशमान झाला...त्याच्या डाव्या बाजुला निसणीची घाटवाट होती, परंतू आज आमचा तो मार्ग नव्हता.
थोड्याच वेळात चढण सुरू झाली. उगवतीच्या सूर्यकिरणांनी जंगलातल्या वृक्षांतून प्रवेश करत अनोखे नजारे तयार केले...

आणि हे काय...? जंगलाच्या मधल्या टप्प्यात अचानक जांभळट गुच्छे कोण्या झुडूपावर इतक्या अफाट प्रमाणावर कसे लगडलेत...हा तो आंजण...जांभळ्या छटेचा हा फार मोठा बहर...इवल्या इवल्या फुलांचे गोलाकार गुच्छे संपुर्ण झाड व्यापून होते. मला वाटलं, करवंदावरचे हे परजीवी झुडूप अथवा  वेल असावे, परंतू करवंदाची पाने गोलाकार असतात, याची पाने करवंदा सारखीच, परंतू टोकला निमुळती.

स्थानिक मंडळी किरकोळ जखमांवर याचा पाला किंवा साल रगडुन लावतात...पूर्वी या पासून पिवळा रंग तयार केला जायचा, अशी माहिती आमचा वृक्ष अभ्यासक प्रमोद धामणेंने पुरविली...भारतीय प्रजातीच्या या झुडपाचे अस्तित्व म्हणजे जमिनीची पाणी धारण क्षमता उत्तम असल्याचे लक्षण...साम्रदचा अवघा परिसरच हा भरपूर पावसाचा...त्याचे हे लक्षण...फुले इतकी सुंदर की, जणू खोट्या फुलांचे गुच्छेच्या गुच्छे झाडाला कोणी तरी चिकटवलेत...शिपनूरवर आम्हाला मधल्या पट्ट्यात अनेक आंजण दिसलेत...दगडावर व खालच्या मातीवर त्यांची इवलीशी कोवळी निळी, पांढरी फुलांची मोठ्या प्रमाणावर गळ झालेली दिसून आली...फार सुंदर नक्षीच त्यामुळे दगडांवर व जमिनीवर तयार झाली होती.

आज आम्हाला फार मोठा पल्ला गाठायचा होता, त्यामुळे सकाळच्या गारव्यात आम्ही झपझप चाल धरली. आमच्या सोबत साम्रदहून तीन कुत्री आली होती. त्यांना बघून जंगलातल्या हुप्प्यांनी कल्ला केला...कुत्रे त्यांना काही बधली नाहीत, उलट त्यांच्या मागे धावण्याचा प्रयत्न करू लागली, परंतू झाडांवरच्या राजांना त्यांच्या पासून कोणताही धोका नव्हता. लवकरच आम्ही एक डोंगरधार चढून वर आलो. चहुबाजुला आमच्या अनेक भटकंतीचे वेगवेगळे डोंगर नी गड किल्ले दिसत होते. अखेर उजव्या बाजुला अजस्त्र अलंगचे दर्शन घडलेच. त्याच्या लगतचा मदन व त्याचे नेढेही दिसत होते. कुलंगचा तर भला थोरला पसारा, छोटा कुलंगही त्याच्या डावीकडे.

शिपनूर हा काही नेहमीच्या भटकंतीचा डोंगर नाही त्यामुळे वाट मळलेली असली तर फार काही तुडवलेली नसल्याने आसपासचा परिसर मनाला अधिक भावत होता. पायाखाली मात्र सततच्या दगडधोंड्यांनी आमची चाल मंद केली होती. यापरिसरात मोठाले वृक्ष नाहीत, आहेत ते र पाच वर्षांचे बाल्यावस्थेतले. बडे वृक्ष अर्थातच येथे कैक पिढ्यांनी भूईसपाट केलेले.

आणखी वर चढून गेल्यावर उजव्या बाजुला महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसुबाई व त्याच्या आजु बाजुचे किरडा, साकिर्डा दृष्टीस पडले. आता समोरच्या बाजुला प्रसिद्ध 'अमकु'ची रांग स्पष्ट दिसू लागली. अर्थात आज वातावरण पूर्णपणे साफ नव्हते, परंतू धुसरपणातही भटक्यांच्या हृदयातले हे गड एका वेगळ्या कोनातून बघण्याची मजा काही औरच.

शिपनूरचा शिखर माथा म्हणजे काहीसा डाईक सारखा परंतू डाईक नसलेला एक पसरट काळा फत्तर...त्याच्या मध्ये एक भली मोठी खाच. आमचे लक्ष होते ते त्या खाचेत जाऊन सर्वोच्च ठिकाणहून आसपासचे डोंगर नी गडकिल्ले बघण्याचे. आम्ही अजिबात न रेंगाळता शेवटच्या चढाईला भिडलो. या ठिकाणची कारवी मनाला भूरळ घालणारी. इतका वेळ आम्ही मेलेल्या कारवीची वाट तुडवताना जेरीस आलो होतो, परंतू शिखरा जवळ करंगळीपेक्षा बारीक सरळसोट कारवी. घरे बांधण्यासाठी ही सर्वोत आदर्शवत. ती विणायला सोयीची. मधून ती तोडली तर आजच्या पिढीला खासा परिचीत असलेला थर्माकॉल सारखा त्याचा अंतर्भाक दिसतो, हाच पांढरा हलका पदार्थ कार्वीला उन्हात थंड व थंडीत उष्ण ठेवतो, अर्थातच आजच्या भाषेतली थर्मोस्टॅटिक वनस्पती.

तोची अलंग ओळखावा...
कारवीच्या आधारामुळे कमालीच्या घसार्‍यात आम्हाला सुरक्षितपणे चढाई करता येत होती, परंतू तीन ठिकाणी इतका तिर्व उतार व घसारा की विचारू नका. आमच्यातले सर्वच गडी सह्याद्रीत नियमीतपणे भटकणारे असल्याने सुमारी २० मिनीटांच्या झडापटीनंतर आम्ही शिखराजवळ पोहोचलो. या खाचेतून वर जाण्याकरिता आणखी १५ मिटर कातळारोहणाची गरज होती, परंतू आमचा तसा कोणताच बेत नव्हता, सोबत आरोहण साहित्यही नव्हते आणि खाली सरळ आठ एकशे मिटरचा तिव्र उतार, तेव्हा या खाचेत अर्धा तास आपसासचे डोंगर न्याहाळत आणि जोरदार वार्‍याशी सामना करत आम्ही शिपनूरचे शिखर उतरू लागलो. आठ नऊ मिनीटात आम्ही हा उतर उतरून न्हाहारीला भिडलो. आमचा एक टप्पा सहजगत्या पूर्ण झाला होता.

आमच्यातला एक गट नाशिकला लवकर परतणार होता, त्यांचे मन वळवून त्यांना घाटनदेवीच्या मंदिरा पर्यंत येण्याची गळ घातली. शिपनूरच्या डोंगराचा भला मोठा वळसा करून आम्ही अल्पशा मळलेल्या वाटेने डांबरी रस्त्यावर आलो. तिथून आम्ही घाटनदेवीच्या देवळाकडे मार्गाक्रमण सुरू केले. आता मात्र उन्हाची तिव्रता जाणवू लागली. यानंतरचा टप्पा खरा आव्हानात्मक. एरवी उडदवण्यावरून अलंग किल्ल्याची चढाई अनेकदा झाली आहे. अलंगचा किल्ला तर अजस्त्र या संकल्पनेतला. शिवाय त्यावरचे ऐतिहासिक बांधकामांचे अवशेष कित्येक. आज आम्ही, त्यापेक्षा वेगळ्या वाटेने छोट्या कुलंगकडे जाणार होतो.

शिपनूरची शेवटच्या टप्प्यातली चढाई म्हणजे तिव्र घसारा आणि धरायला तकलादू आधार म्हणजे चांगली झटापटीची मानसिक तयारी हवी!
उंबरदरा येथून खालची दरी न्याहाळल्यानंतर थोडे पुढे चालल्यावर आम्हाला एक नैसर्गिक झरा लागला. त्यात तोंड हात स्वच्छ धुण्याचा व त्याचे नितळ, स्वच्छगार पाणी पिण्याचा मोह काही आवरता आला नाही. तिथून आम्ही उर्ध्व वैतरण्याच्या सूर्य मावळतीच्या दर्शनाच्या ठिकाणावर येऊन पोहोचलो. तिथून शिपनूरची अफाट उंची डोळ्यात साठविण्याचा प्रयत्न करून आम्ही पाचच मिनीटात काढता पाय घेतला, तोवर आमची काळी पिवळी येऊन पोहोचली होती, दोन किलो मिटरचे अंतर या जीपने पार करून आमच्या पुढच्या प्रवासाला आता धगधगत्या उन्हात सुरूवात होणार होती.

घाटनदेवीच्या मंदिरात मातेची मनोभावे पुजा केली, गुळपोळ्या व सोबतच्या अनेक पदार्थांवर ताव मारला तेव्हा गट नेत्याने स्पष्ट केले की, 'आपली पुढची भटकंती अडचणीत आहे, आपण नियोजित वेळेपेक्षा उशिरा या ठिकाणी पोहोचलो आहोत, छोट्या कुलंगला इथूनच रामराम करून परतीचा रस्ता धरू या'. अखेर नाईलाजाने या रोमहर्षक टप्प्याला आम्ही, 'पुन्हा तुझ्या भेटीला या मार्गाने येऊ', अशा निर्धारासह रामराम केला.


याभागात पाऊस कितीही होत असला तरी पावसाळा संपल्यावर इथल्या वाडी वस्त्यांची दररोजची एक कसरत ठरलेली...पाण्यासाठीची पायपीट...भटकंती आटोपून आम्ही दुपारच्या सुमारास साम्रदला पोहोचलो, तेव्हा तीन अगदीच लहान मुली डोक्यावर कळशी घेऊन हापशाचे पाणी भरताना दिसल्या...एक चिमूरडी तर इतकी लहान की, ती डोक्यावर लहानशी कळशीही घेऊ शकत नव्हती...पण आपल्या ताई सोबत तिलाही पाणी भरायचे होते, तेव्हा ती अडीचशे मिली लिटरची बाटी भरून पाणी वाहत होती...मोठे सुंदर, अचंबित करणारे, परंतू तितकीच विदारकता दर्शवणारे ते चित्र होते...

दृष्ट लागावे असा काटेसावराचा सडा

साम्रदच्या शाळेतल्या संडासाची ही दुरावस्था...

उंबरदर्‍यात उतरताना या ठिकाणी स्वच्छ सुंदरसा पाण्याचा नैसर्गिक झरा म्हणजे खरी खुरी क्षुधाशांती..









रंगपंचमीचा सण जवळ आल्याने आम्ही पळसाचे एकादे झाड दिसते का ते शोधू लागलो, परंतू आम्हला या परिसरात एकही पळस वृक्ष दिला नाही. काटे सावर मात्र अनेक ठिकाणी बहरला होता. त्याच्या भव्य, देखण्या लाल फुलांचे सौंदर्य न्याहाळत आम्ही रविवारी सायंकाळी ५-००च्या सुमारास नाशिक गाठले. घरच्यांना, अरे इतक्या लवकर कसे काय? असा पहिल्यांदा आश्चर्याचा धक्का मिळाला.


sahyadri trekkers bloggers

Friday, February 2, 2018

Dhodap 3: अनेक गुहांनी सजलेली धोडपची पगडी


किल्ले धोडपचे हे एक भौगालिक आश्चर्य...अजस्त्र आकाराची व्होल्कॅनिक प्लग...जणू धोडपची पगडीच...याच्या पश्चिम धारेवर वैनतेयचे गिर्यारोहक समीरन कोल्हे, सोमदत्त म्हस्कर, प्रतिक रनाळकर वगैरेंनी प्रथम आरोहण केले आहे.

 धोडप भाग ३: तिन भौगोलिक आश्चर्ये अनं अनेक गुहांनी सजलेली धोडपची पगडी

ऐतिहासीक काळातल्या विविध राजवटीतल्या बांधकामांचे अवशेष किती बघावेत आणि किती नाहीत. १४७२ मिटर असे महाराष्ट्रातले तिसरे सर्वोच्च शिखर असलेल्या धोडपच्या मुक्कामी भटकंतीने आम्हाला भरभरून दान दिले, त्याच बरोबर धोडपच्या तीन आश्चर्यांनी मन तृप्त केले. राहता राहिला प्रश्न तो ट्रेकर आणि एसटी बस यांच्यातल्या जुन्या नाते संबंधाचा, 'टेकर्सचे बस सोबतचे नाते हळू हळू कमी होतेय, त्या मागचे कारण म्हणजे ट्रेकच्या नियोजनात जिथे वेळेला अनन्यसाधार असे महत्व येते तिथे आज घडीला एसटीचा पर्याय शेवटच्या क्रमांकावर आहे, असे म्हणायला हरकत नाही. राज्य परिवहन मंडळाच्या बदललेल्या धोरणांचा सर्वात मोठा फटका अर्थातच ग्रामीण व दुर्गम महाराष्ट्राला बसतोय, हे मात्र नक्की. त्यावर वेळीच उपायोजना करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा महाराष्ट्राची सूनियोजीत वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

सह्याद्रीच्या सातमाळा रांगेत डाईकची अश्मरचना अनेक ठिकाणी दिसून येते. धोडपचा डाईक अखिल महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. डाईक म्हणजे डोंगरांची अगदी पातळ कातळ भिंत...समोरून अफाट मोठा दिसणारा कातळ बाजूने पातळ पडद्या प्रमाणे दिसतो. सुमारे ३ कोटी वर्षापूर्वी दोन महाखंडांच्या टकरीनंतर पृथ्वीवर जी उलथापालथ झाली त्याचा हा परिपाक. लोणावळ्या जवळच्या तैल बैलाचा डाईक प्रसिद्ध आहे. धोडपचा डाईक लांबलचक पसरलेला तर आहेच, शिवाय त्याला मध्ये बरोबर चौकोनी आकाराची खाच पडली आहे. या डाईकच्या खाचेचे सर्वात उत्तम दर्शन घ्यायचे झाल्यास धोडप सुळक्याच्या उत्तर टोकाला जायला हवे, तिथपर्यंत जाण्याची वाट फारशी बिकट नाही.
काय आश्चर्य...धोडपची ही नैसर्गिक गुहा पश्चिम मुखी असून दक्षिण ती अचानक दक्षिण बाजुला वळण घेऊन निमुळत्या तोंडाने तिथे उघडते...एक प्रकारचे धोडपचे हे वळणदार नेढेच!
 विशेष म्हणजे या डाईकला जिथे खाच पडली आहे. त्याला लागुनच एक बुरूज होता, त्याचे अवशेष आजही बघायला मिळतात. हल्ली या डाईकवर वनखात्याने चक्क लोखंडी खांबांचे सुरक्षा कठडे बसवले आहेत. येथे खंडाळा, लोणावळ्या सारखी मोठी गर्दी उसळेल तेव्हा लोक दरीत घसरून पडू नयेत अशी या मागची भावना ठेवून केलेले हे बांधकमा प्रत्यक्षात एका अजोड भौगोलिक आश्चर्याच्या सौंदर्याला बाधाच पोहोचवत आहे. एकट्या डाईकवर सुमारे सातशे फुटांचा भल्या मोठ्या आकाराच्या लोखंडी सुरक्षा कठड्यांचा खटाटोप करण्यात आलाय. यातले काही कठडे दोनच वर्षांच्या उन्मळून पडण्यास सुरूवातही झाली आहे. (स्थानिक मंडळी यासंबंधिची सप्तश्रृंगी देवीची दंतकथा सांगताना, देवी कोपली त्यावेळी तिने धोडपवर येऊन डोंगरावर आपला गुडघा मारला तेव्हा पासूनची ही खाच आहे, हीच देवी धोडपच्या गुहेत विराजमान असल्याची काही मंडळींची धारणा आहे).
धोडपचं दुसरे भौगोलिक आश्‌चर्य म्हणजे व्होल्कॅनिक प्लग, अर्थात ज्वालामुखीय उद्रेकातून शंखुसारखा उठावलेला डोंगरमाथा, जणू काही डोंगराला घातलेली पगडीच. हाच तो धोडपचा सुळका, अखिल सह्याद्रीत आपल्या वैशिष्टपूर्ण आकारासाठी ओळखला जातो. (याची पूर्व बाजू आरोहणाच्या दृष्टीने सोपी, तर पश्चिम बाजू मध्यम जोखिमेची आहे) त्यावेळी इथला जो भूमाख होता त्याचे बंध झुगारून तप्त लाव्हा रस पृथ्वीच्या उदरातून उफाळत वर आला आणि त्यातून या डाईक व प्लगची निर्मीती झाली. डाईकची भिंत आणि प्लग यामुळे धोडप किल्ला फार दूर अंतरावरून सहजपणे ओळखू येतो. या प्लगच्या अर्थात, सुळक्याच्या पोटात दक्षिण मुखी अनेक गुहा कोरण्यात आल्या आहेत. यातील बहुतांशी गुहा या पाणी साठविण्यासाठी खोदण्यात आल्या आहेत. काही गुहांचा आकार अजस्त्र आहे. यारून धोडपच्या किल्ल्यावर मोठा राबता असल्याचे अनूमान निघते.

देवी टाक्याची अविट गोडी...
धोडपची मुख्य गहा याच प्लगच्या पोटात मधोमध कोरली आहे. त्यात गडाच्या देवतेची जुनी कातळातली मुर्ती पूर्वीभिमूख आहे. या मंदिराच्या तळाशी पाण्याचे विशाल टाके आहे. यात वर्षभर पाणी उपलब्ध असते. संपूर्ण गडावर इतके स्वच्छ व गोड चविचे पाणी सापडणार नाही. सुरूवातीला बारा पंधरा फुटाचं हे टाकं पुढे अखिल खोल होत जातं. त्याच्या मधोमध एक दगडी खांब कोरण्यात आला आहे. भटकंती व सहलीसाठी येथे येणार्‍यांकरिता पिण्याच्या पाण्याचा हा सर्वात मोठा आसरा. त्यात अनेक दगडी शिळा पडलेल्या दिसतात. कचराही बराच दिसून येतो. प्लास्टिकच्या खाद्यपदार्थाच्या पिशव्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या टाकण्यात आल्या आहेत.

सुळक्याच्या दक्षिण बाजुला एक फार मोठी नैसर्गिक गुहा आहे, धेाडपचे हे दिसरे भौगोलिक आश्चर्यच म्हणायला हवे. सुमारे पन्नास फुट लांबीच्या या गुहेचे तोंड दक्षिण बाजूने उघडते गुहा पूर्वेकडे अरूंद होत जाते आणि अचानकपणे दक्षिण बाजुला वळसा घेत डोंगरातून आरपार जाते. म्हणजे दक्षिण बाजूने किंवा पश्चिम बाजूने या गुहेतून आरपार बघितले जाऊ शकते.


  सातमाळ डोंगरांच्या परिसरात अनेक डाईकच्या अश्मरचना व नेढी बघायला मिळतात. धोडपची ही गुहा म्हणजे आतून वळसा घेतलेलं एक प्रकारचं नेढच आहे. सर्वात मोठं नेढं अर्थातच धोडपच्या वायव्य दिशेला असलेल्या पिंपळागड उर्फ कंडाळ्यावर आहे. सप्तश्रृंगीगडा समोरच्या मोहनदरी किल्ल्यावरचे नेढे चौकोनी आकाराचे आहे. पिंपळागडचे नेढे मधल्या भागात उंचावलेले तर दोन्ही बाजुला अरुंद होत जाणारे आहे. त्याचा आकार पन्नास फुटाहून मोठा आहे. याच परिसरातल्या रामजी पांगेराच्या हौतात्मासाठी ओळखल्या जाणार्‍या कण्हेरगडावरही नेढं आहे. धोडप नंतरचा सर्वात मोठा डाईक म्हणजे कळवणची मोठी भिंत होय!

धोडपच्या डाईकवरून उत्तर दिशेला बंड्या, रवळ्या-जवळ्या, मार्कंडेय व सप्तश्रृंगीगड दिसत होते. कळवण शहर दूरवर दिसत होते, त्यापलिकडच्या डोंगर रांगा मात्र अस्पष्ट दृष्यमानतेमुळे निरखता आल्या नाहीत. पूर्वेकडे इखारा, लेकुरवाळा, कांचना, कोळदेर, इंद्राईच्या पलिकडचे डोंगर दिसत नव्हते.

जंगल भलेही खुरटे...रखरखीत झाले असेल...पण त्यातले सौंदर्य कितीतरी पट अधिक आहे...हे सागणारा हा पळस...त्याची कित्येक भावंडे सद्या धोडपच्या परिसरात बहरली आहेत...मावळतीला जंगलावर अचानक नजर फेरली तर याच्या ज्वाळांचा आभास होतो...म्हणूनच तर इंग्रजीत याला, जंगल फ्लेम म्हणतात...
 बहरले जंगल
भौगोलिक आश्चर्या सोबतच या हंगामात काही नैसर्गिक चमत्कार बघायला मिळाले. त्यातला पहिला चमत्कार म्हणजे पुर्ण जोमात बहरलेला पळस. धोडपची चढाई करताना अंधारत आम्हाला भर रस्त्यात पळस लागला, तेव्हाच स्पष्ट झाले की आम्ही वहिवाटीची वाट सोडून आडवाटेने चाललो आहोत. यंदा पळस थोडा लवकर बहरला आहे. धोडपच्या डाईकवरून उत्तर दिशेच्या जंगलात सर्वत्र अग्नीलोळ दिसत होते...तो पळस येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर बहरून आला आहे. आमच्या नाशिकला रंगाच्या पेशवेकालीन रहाडीत याच पळसाचा रंग करण्याची प्रथा अनेक वर्षांपर्यंत कायम होती.

करवंदाची फुले छान बहरली आहेत. 'त्या पांढर्‍या फुलांचा वास घेऊन बघ', असे गार्गीला सांगितले, तेव्हा 'त्याचा गंध म्हणजे परफ्यूम पेक्षाही सुंदर' असल्याची प्रतिक्रिया तिने व्यक्त केली. या जंगलातही वनखात्याने आवर्जुन गिरीपुष्पाचे मोठ्या प्रमाणावर रोपण केले आहे. त्याची निळसर पांढरी फुले बहरली आहेत. रूईची फुले फार टवटवीत पणे बहरल्याचे दिसून येत होते. बाकी झुडपांचेच या जंगलात अधिराज्य आहे. इथला बाभूळ मात्र पूर्वी फार दिसायचा, आता औषधापूरताही तो दिसून आला नाही.

या औदुंबर वृक्षातून सद्या पाणी झिरपतेय...इथल्या जीव सृष्टीच्या पोषणासाठीच परमेश्वराने तो पाझरवला असावा...

तलवारी गेल्या...हाती झारे कढाया
पायथ्याच्या हट्टी गावात जिर्णशीर्ण अवस्थेतले चिरेबंदी वाडे लक्ष वेधून घेतात. त्यांचा चौसोपी दगडी पाया, मोठमोठे लाकडाचे खांब, चुन्यातल्या विटांच्या भिंती, वैशिष्टपूर्ण खिडक्या नी दरवाजे गतकाळात येथे केवढे वैभव नांदत असेल याची साक्ष देतात. गावात बहुतांशी परदेशी मंडळी राहतात. हे प्रामुख्यान राजस्थानातून आलेले राजपूत आहेत. बरेच राजपूत सरदार मोगलांच्या चाकरीत असताना त्यांच्या सोबत राजस्थानातून आलेले राजपूत कालांतराने बांगलाणच्या विविध ठिकाणी स्थायीक झाले. हट्टीत मात्र त्यांची संख्या सर्वाधिक आहे. लढवैय्या राजपूतांनी कोणत्या कालखंडात आपल्या तलवांरी सोडून गुराख्याचे व खव्याचे काम हाती घेतले याचा निश्चीत काळ समजण्यास मार्ग नाही.

आज त्यांचा खव्याचा उद्योग मान टाकण्याच्या स्थितीत आहे. अशीच अवस्था इथल्या अहिरांच्या काचेच्या बांगड्यांच्या उत्पादनाची झाली व कोळशाच्या अभावामुळे व काचेच्या बांगळ्यांची बदलत्या काळात मागणी घटल्यामुळे हा व्यवसाय केव्हाच बंद झालाय. धोडंब्याचा कातडी कमावण्याचा व्यवसाय अखेरची घटका मोजतोय. या परिसरात गेल्या दशकात टोमॅटो सॉस व विदेशी दारू निर्माण करण्याचे कारखाने मात्र उभे राहिलेत.


हट्टीत आम्ही चारच्या सुमारास पोहोचलो. आम्हाला ज्याने सोडले होते ती जीप आम्हाला वेळेवर घ्यायला आली. सकाळी नऊ वाजेपासूनच त्याचा आम्हाला फोन येत होता, तसा आम्ही त्याला आमचे बेत व ठिकाण सांगत होते. आम्ही येई पर्यंत त्याच्या वडाळीभोई पर्यंतच्या फेर्‍या सुरू असल्याने त्याला आमच्यासाठी वाट बघत थांबावे लागले नाही. आमचा ट्रेक खरेतर हट्टीत संपला होता...परंतू?


'आधार', बसचा लहान गावांसाठी नाही?
वाटेत जीपवाल्या काकांनी त्यांच्या गावचा रानमेवा चाखायला दिला. एका बोरीवरची अनेक फळे पिकलेली होती. झाड गदागदा हलवून त्याने बारांचा सडा पाडला. त्यांची अविट गोडी चाखत आम्ही वडाळीभोईला अर्ध्या तासाच पोहोचलो. पुलावरच तुम्हाला बस मिळेल अशी माहिती मिळाल्याने आम्ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३च्या द्रुतगती मार्गिकेच्या बाहेर बसची वाट बघू लागलो. पोटातले कावळे  वडाळीभोईच्या लोकप्रिय पदार्थांकडे खुणावत होते. आम्ही एक एक प्लेटची पटकन ऑर्डर दिली, तोच एक खच्चून भरलेली बस येऊन थांबली. त्यात आमच्याकरिता जागा नसल्याने व या मार्गावरून भरपूर बस नाशिकला जात असल्याने आम्ही पोटपूजा आटोपून बसथांब्यावर येऊन पोहोचलो. गावातली मंडळी मात्र बसची वाट न बघता जीपमध्ये बसून प्रवासाला लागत होती. बसचा प्रवास सर्वात सुरक्षित व सुखकर, ही मंडळी का बरं अवैद्य, असुरक्षित प्रवास करतात? असे प्रश्न मनात उपस्थित व्हायला वेळ लागत नाही, त्याचे उत्तर मात्र थोळ्याच वेळात आम्हाला मिळाले.

नाशिकची पाटी लागलेली एक बस आमच्या समोरून निघून गेली, त्यात जागा असूनही बस का थांबली नाही. वडाळीभोई तर या मार्गावरचे महत्वाचे गाव आहे! या विचारात असताना दोन पाठोपाठ बस आमच्या समोरून गेल्या, त्याही थांबल्या नाहीत. जीपगाड्याही नसल्याने काही गावकरी आमच्या सोबत बसची वाट बघू लागले, तोच एका जीपने प्रवासी भरायला सुरूवात केली. आम्हाला तर त्याने ऑफरच दिली, तुम्हाला एकाच ठिकाणी बसवतो. मागे चार आसने होती, त्यात सात जण जमले की, लगेच नाशिकला स्वस्तात घेऊन जातो! त्याची जीपगाडी प्रवाशांनी भरत नव्हतीव आमची पावले तिथे वळत नव्हती, दरम्यान नाशिकला जाणारी एक एक बस आमच्या डोळ्यादेखत निघून जात होती.

हट्टी गावात असे काही वाडे अजून आपल्या गतवैभवाच्या खुणा टिकवून आहेत...काहींनी चांगली आर्थिक प्रगती साधली तेव्हा यांचे जतन न करता सिमेंट कॉंक्रिटची घरे मात्र उभारलीत...

 तब्बल दिड तास आम्ही वडाळीभोईच्या बस थांब्यावर होतो, पण एकही बस आमच्या समोर थांबली नाही. काही बसमधून वडाळीभोईला उतरणारे प्रवासी असायचे त्या बसही बस थांब्या पासून दोनशे मिटर दूरवर थांबायच्या व प्रवाशांना उतरवून निघून जायच्या. बस तर कधीही प्रवाशी नाकारत नाही, हा काय प्रकार आहे? या समजण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा एकाने सांगितले की या विनावाहक बसेस आहेत. एका स्थानपावरून सुटल्या की थेट दुसर्‍या स्थानकाला जातात, मध्ये थांबत नाही. पण येथे तर वडाळीभोईचे प्रवासी उतरत होते, मग रिकामी बस नेण्या ऐवजी ते प्रवासी का नेत नाहीत? या प्रश्नावर त्या ग्रहस्थाकडे कोणतेच उत्तर नव्हते.

शेवटी सूर्य क्षितीजापलिकडे निघाला तसा आमचा संयम सुटला. आता आम्ही महामार्गाच्या वर येऊन नाशिककडे जाणार्‍या बसेसना हात देत होतो व हाका मारून थांबण्याचे विनवत होते. गावतली काही मंडळी रस्त्यावर आली होती. महामार्गावर असे उभे राहणे खरे तर असूरक्षित, पण बस गाड्या प्रवाशांना नेणार नसतील तर त्यांनी प्रवास तरी कसा करायचा? आता आम्हाला कोडे उलगडले होते की, राज्य परिवहन खात्यातल्या कोणा सुपिक डोक्याने बसतो तोटा भरून काढण्यासाठी विनावाहक बसेसचा जसा घाट घातला, त्याच प्रमाणे महत्वाच्या गावांमध्ये वेगवान वाहतूक करून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मधली गावेच्या गावे वगळण्याचा अजब नियम केला, त्यामुळे ग्रामीण मंडळी बसची वाट बघण्याच्या भानगडीत न पडता थेट जीपच्या प्रवासाला पसंती देत होती. अशाने एसटी बसचा तोटा तरी कसा भरून काढणार.

भटकंतीत अशी बक्षिसं मिळण्याचा हा हंगाम आहे...हट्टी बाहेर बहरलेल्या एका बोरीवर ते आम्हाला प्राप्त झाले...
बस थांब्यावर आमच्या मागे उभ्या असलेल्या एका महिलेने गमतीशीर किस्सा सांगितला की, ती नाशिक ते लासलगाव बसमध्ये बसली. ती थेट बस होती. वाटेतले किमान दहा थांबे वगळून थेट नाशिकते लासलगाव धावणारी, त्यात आम्ही फक्त तीन प्रवाशी होतो. वाटेत जर ती थांबली असती तर भरून गेली असती. तीन प्रवाशांवर बसला कसे काय परवडते? हा तिने उपस्थित केलेला प्रश्न बस खात्यातल्या अधिकार्‍यांसमोर उपस्थित झाला नसेल.

अखेरीस वडाळीभोईवरून बारा किलो मिटर अंतरावरच्या पिंपळगाव डेपोला जाणारी एक बस आली आणि आम्ही मागचा पुढचा विचार न करता त्यात स्थानापान्न झालो. आमच्या सोबत नाशिकला जाण्याकरिता तेथे आलेल्या ग्रामस्थांनी हीच बस पकडली. पिंपळगावला पोहोचलो, तेव्हा चित्र फारसे बदलले नव्हते. तिथेही बसचे काही खरे नाही, असे चौकशी अंती समजले व नाईलाजाने आम्हाला एका मारूती व्हॅनमध्ये बसावे लागले. ड्राईव्हरसह ११ जण त्यात विरजमान झाले. आमच्या बॅंगा टपावर ठेवण्यात आल्या व आम्ही नाशिकला सुखरूप पोहोचलो. बसने आम्हाला जो हात दाखवा, तो अगदी अनपेक्षीत होता. बिकट अवस्था बघायला मिळाली ती लहान खेड्यातल्या प्रवाशांची. त्यांच्यासाठी तर वडाळीभोई-पिंपळगाव बस सुद्धा थांबली नाही. आमचा प्रवास तर एक दिवसाचाच, त्या ग्रामीण जनतेची बसच्या बदललेल्या धोरणामुळे कोण ससेहोलपट होत असणार?

दिड तासात सोळा एसटी बसेसनी आम्हाला दुरूनच रामराम ठोकला...त्यातल्या कित्येक तर अर्ध्या रिकाम्या...पण बिचार्‍या करणार काय? नियम सांगाते...मधल्या गावात थांबण्यात वेळ दवडू नका!
ज्या पद्धतीने ग्रामीण जनतेची बस खाते फरपट करत आहे ती, पाहता भटक्यांनी आपल्या जीवाभावाच्या एसटीबसवर भविष्यात भरवसा ठेऊन भटकंतीची आखणी करणे योग्य ठरणार नाही. आमचा एक प्रयोग फसला, परंतू एखाद्याला बसच्या भरवशावर भटकंती करायची असेल तर प्रवासातील सर्व टप्प्यावरच्या बसच्या वेळांबद्दल अगोदरच बस स्थानकातून खात्री करून घ्यावी लागेल आणि विशेष म्हणजे त्या वेळांना तिथे हजर रहावे लागेल, अन्यथा स्वत:चे वाहन घेऊन येणे किंवा खासगी वाहनांचा आधार घेणे इष्ट ठरेल.

तसेही महाराष्ट्रात शेकडोंच्या संख्येने असलेले दर्दी भटके स्वत:च्या खासगी वाहनांनी ट्रेकचा प्रवास करण्यास पसंती देऊ लागले आहेत. त्याचा खर्च हा जवळ पास बसच्या तिकीटा इतकाच येतो. बसची सेवा ही स्वस्त राहिलेली नाही, आता हेच बघा, नाशिकहून वडाळीभोई ६७ रूपये. तिथून समजा हट्टी पर्यंतच्या १२ किलो मिटर करिता १५ रूपये पडतील म्हणजे एका माणसाला दोन्ही बाजुचे बस भाडे १५८ रूपये. पाच जणांच्या गटाला एका वेळी ७९०/- रूपये. यात बस थांब्या पर्यंत ऑटो रिक्षा किंवा टॅक्सीचा दोन्ही बाजींचा खर्च किमान २००/- रूपये.

औदुंबर वृक्षाचा पाझर रखरखत्या उन्हातही गायीगुरांची क्षुधा शांत करतो...गायीची पाणी पिण्याची पद्धत फारच चमत्कारीक...एका वेळी ती अर्धाधिक लिटर तरी पाणी शोषून घेते...
बसने ६० ते ६५ किलो मिटर अंतराचा ट्रेक करायचा झाल्यास हजारच्या आसपास खर्च येतो. त्या ऐवजी सहभागींपैकी कोणा एकाची एक कार नेल्यास १८ किलो मिटर प्रति लिटर पेट्रोल धरल्यास १४० किलो मिटरकरिता लागेल सुमारे ८ लिटर पेट्रोल म्हणजे आजच्या ८० रूपये लिटर प्रमाणे ६२२/- रूपये त्यात टोलचे (पथकर) सरासरी अडीचशे रूपये पकडल्यास ९००/- रूपये होतात. याचाच अर्थ बसने ट्रेक करण्यापेक्षा स्वत:च्या वाहनाने ट्रेक केला तर वेळे बरोबरच पैशांची बचत होते. असंही एसटीने आपल्या धोरणात अनेक बदल केले आहेत. त्यामुळे कायमच सजग राहणारी ट्रेकर मंडळी खर्चिक आणि वेळकाढू बसच्या नादाला लागण्याची शक्यता तशी कमीच.

काळ्या पिवळीला प्रोत्साहन...लहान पिढीवर संस्कार घडवणार?
एक वेळ ट्रेकर मंडळी वेळ व पैशाची बचत करणारा प्रवासाचा सर्वोत्तम पर्याय निवडतीलही, परंतू महाराष्ट्रात खेडोपाडी दररोज शेकडो प्रवाशांचे काय? त्यांना तर काळ्या पिवळ्यांवरच विसंबून राहवे लागणार. अधिकाधीक पावले ही खासगी सार्वजनिक वाहतूकीकडेच वळणार. आता खासगी प्रवाशी काळ्या पिवळ्या गाड्या या ग्रामीण बरोबरच शहरी प्रवासाकरिता उत्तम पर्याय म्हणून समोर आल्या असल्या तरी शासनच खासगी प्रवास करू नका! बसनेच प्रवास करा! अशी जाहिरात करत असतं. त्या जाहिरातीला अर्थ तरी काय उरतो.


याचा सर्वात वाईट परिणाम हा लहान मुलांच्या मनावर होणार, हे निश्चीत. वडिलधारी मंडळी काळ्या पिवळ्या गाड्यातून प्रवास करतात. जमेल तितके प्रवासी त्यातून वाहून नेले जातात, म्हणजे 'असे करणे बेकायदा नाही, त्यात काही वावगे नाही', असेच त्यांच्या मनावर बिंबणार? पुढे जाऊन ते त्यांच्या अंगवळणी पडणार! आणि ज्या भारतात युद्धा पेक्षा जास्त मृत्यू रस्ते अपघातात होतात, तिथे प्रवासाचा स्तर अधिकाधीक खालावणार...अशी ही व्यवस्था निर्माण करण्याची अवदशा तरी कोणाला आठवली? देव त्या अधिकारी व मंत्र्यांना सुबुद्धी देवो. ट्रेकरची लाल डब्ब्या सोबत तुटलेली नाळ पुन्हा जुळो', सह्याद्रीची पुढची भेट लवकरच घडो या सदिच्छेसह आमच्या भटकंतीला सहाय्य करणार्‍या सर्वांना धन्यवाद!


https://www.facebook.com/abpmajha/videos/10160027177210271/

(ट्रेक संपल्यानंतर हा वृत्तवाहिनीवरचा वृत्तांत हाती आला...आता त्यातली भाषा मोठी चमत्कारीक वाटते. 'वृक्षरोपणामुळे गाव आले संकटात', असा संदेश त्यातून प्रसारीत होतोय...प्रत्यक्षात तसे नाही. वनखात्याने महाराष्ट्रात बेफामपद्दतीने एक प्रजातीचे रोपण अक्षरश: उरकले...त्यात गिरीपुष्पाचा समावेश होतो...प्रत्यक्षात वृक्षारोपण करणे केव्हाही चांगलेच, पण ते एक प्रजातीचे कधीच नसावे, नाही तर अशी नैसर्गिक आपत्ती ही ओढवू शकते.)

(धोडप ट्रेक वृत्तांत समाप्त)

https://www.facebook.com/SahyadriTrekkersBloggers/
https://www.facebook.com/SahyadriTrekkersBloggers/

Thursday, February 1, 2018

Dhodap 2: इथली अन्न साखळी खंडित होतेय?

धोडप भाग २:
(उत्तरार्ध) 
''आपण महाराष्ट्रातील दुसर्‍या सर्वात उंच किल्ल्याच्या शिखराच्या पोटात एका प्रशस्त गुहेत आज मुक्काम करत आहोत'', ही भावनाच अधिक सुखावणारी होती. नाशिकहून धोडपच्या गुहेपर्यंतचा प्रवास प्रत्येक क्षणाला आनंद देणारा. जिवाभावाच्या एसटीने ऐनवेळी धोका दिल्याने, माझ्याकडे 'काय म्हणते तुमची एसटी? अशा अविर्भावात कटाक्ष टाकण्यात आला, असे केव्हा केव्हा घडते...घडू शकते असे इशार्‍यातले उत्तर दिल्यानंतर सर्वांना धोडपची गुहा कशासाठी प्रसिद्ध आहे तर ती तिथल्या उंदरांमुळे...रात्र उंदरांची जागा रहा या उक्ती नुसार सर्वांना सहजग होऊन आजची रात्र काढावी लागणार याची कल्पना दिली. गुहेतले उंदीर लोकप्रिय आहेत, तेव्हा भोजन केल्यानंतर उरलेला भात आणि गुळाच्या शिर्‍याच्या पातेल्यावर मोंठे दगड ठेवून आम्ही शुभरात्री केली. उद्या याचाच नाष्त्यासाठी उपयोग होणार होता. धुळीचा त्रास जाणवू नये व उंदरांची भिती नको, म्हणून आम्ही गुहेच्या आत दोन तंबु लावले. 
हे मूषकराज मोठे धीट...खिशातून मोबाईल फोन काढून बॅटरीच्या उजेडात त्यांना कॅमेराबंद करे पर्यंत पठ्ठ्या जागचा हलला नाही...'इथे आमचेच अधिराज्य', असेच जणू तो सूचवत असावा!

रात्र उंदरांची जागा रहा
सोबतचा शिधा आम्ही तंबुत घेतला. मध्यरात्र उलटी तोच, उंदीर पातेले उचकटण्याचा प्रयत्न करण्याचे आवाज येऊ लागले. थकव्यामुळे कुणीच उठण्याच्या मन:स्थितीत नव्हते. गुहेतल्या मिट्ट काळोखात उंदराचे चिरकणे व इकडून तिकडे पळणे जाणवत होते. त्यामुळे नम्रताची झोप उडाली होती. गार्गी व तिची मैत्रिण गाढ झोपेतुन जाग्या झाल्या त्या उंदरांच्या पळापळीमुळे. अजय बाहेर झोपला होता, त्यांच्या पांघरूणावरून उंदीर पळत होते. तंबुवरून ते इकडून तिकडे जाताना जाणवत होते. आमच्या बाहेरच्या बॅंगांकडे त्यांनी केव्हाच मोर्चा वळवला होता. दोन एकदा उठून उंदरांना हटकले, पण ते बरेच धीट भासले...हटकण्याचा त्यांच्यावर फार काही उपयोग झाला नाही.

'उंदीर काही तरी कुरतडतोय!' असे सांगुन नम्रताने मला उठवले. हो...नाही करता मी परत एकदा उठलो, बॅगा उलथून बघितल्या तर त्या खालून उंदीर पळाले. आम्ही बॅगांमध्ये काहीच खाण्याचे पदार्थ ठेवले नव्हते हे बरे केले. थोड्या वेळाने नम्रताने पुन्हा उठवून उंदीर काही तरी कुरतडत असल्याचे सांगितले. आम्ही बाहेर जाऊन तपासले, तेव्हा गार्गीच्या तंबूला एक बारीक छिद्र दिसून आले. उंदरांच्या प्रतापामुळे आपसूकपणे मध्यरात्री उठण्याची संधी मिळाली, परंतू ज्या पद्धतीने दिसायला हवी ती मंदाकिनी आकाशगंगा तितकी काही स्पष्ट दिसला नाही? काही वर्षांपूवी रतनगडवर मात्र असा अवर्णनीय नजारा बघितल्याचे स्मरत होते. काळ्या ढगांच्या पार्श्वभूमीवर लखळकणार्‍या अब्दावधी चांदण्या, ग्रह...जणू प्रकाशमान हिरे लखलखताहेत, असा तो अवर्णनीय नजारा होता. पुन्हा गुहेत शिरून आम्ही सोबतच्या सामानाची सुरक्षा ठेवण्याच्या कामाला जुंपलो. थोडी झोप लागली असेल, तोच तंबूत उंदिर शिरल्याचे गार्गी आपल्या मैत्रिणीला मोठ्यांदा सांगु लागली. बॅगेतही उंदिर शिरल्याचे ती म्हणाली, पुन्हा झोपमोड...पुन्हा सामानाची राखण... 

आमच्या अगोदर गुहेत डेरा टाकणारा मुंबईच्या भटक्यांवर मात्र उंदरां काहीच प्रभाव नसावा, मंडळी निपचीत घोरत पहुडली होती. त्यांची भटकंती सप्तश्रृंगीकडापासून सुरू झाली होती. तिथून रवळ्या, जवळ्या, बंड्या करून तो धोडपवर आले होते, त्या थकव्याचा हा परिणाम असावा...पहाटे केव्हा तरी झोप लागली, परंतू तोवर अजयने सूर्योदय बघण्यासाठी उठवले. गुहेच्या बाहेर तांबड फाटलं होतं, तेव्हा भराभर सगळ्यांना उठवून आम्ही गुहेच्या बाहेर आलो. तोवर मुंबईकर ट्रेकर्सच्या बोलण्यातून, कुणाचा पेला गायब तर कुणाचे काय पळविण्यात आलेले. त्यांच्या राशनपाण्यावर मुषकराजांनी चांगला डल्ला मारला होता. माझ्या नव्या कोर्‍या सॅकचा एक पट्टा कुरतडण्यात आला, तर गार्गीच्या सॅकचा पट्टा व तिची टोपी कुरतडण्यात आली होती. या धोडपच्या गुहेत एकदा अंधार दाटला की काहीच सुरक्षित राहू शकत नाही, तिथे फक्त मुषकराजांचे अधिराज्य. त्यावर आजघडीला तरी काही पर्याय नाही. 

महाराष्ट्रातल्या गडकिल्यांवर, गुहांमध्ये मुषकराजांचे अस्तित्व अनेक ठिकाणी आहे, परंतू धोडपवर ते जास्त मोठ्या प्रमाणावर आहे. ज्येष्ठ लेखक आनंद पाळंदेंच्या एका वर्णनात धोडपच्या गुहेतल्या उंदरांबद्दल वाचण्यात आले होते. ते प्रमाण आता अफाट वाढले आहे. त्याच्या सपाट्यात काय सापडेल अनं काय नाही'. मागच्या वेळी धोडप सुळक्याच्या उत्तर धारेच्या प्रथम आरोहण मोहिमेच्या वेळी आमच्या चमुने आरोहणाचे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी गुहेच्या छताला बोल्ट मारून आपल्या सॅक त्यांस अडकविल्या होत्या, त्यावेळी त्यांच्या दोरावरून कुशल आरोहणाचे किस्से या निमीत्ताने ताजे झाले...येथे मुक्काम करायचा तर उंदरांची जोखिम पत्कारूनच.
रात्रीच्या अंधारात धोडपच्या एका नैसर्गिक गुहेत हा पक्षी रात्रीच्या निवार्‍याला थांबला होता...त्यांचे घर म्हणजे संपुर्ण दरीचा परिसर सहजपणे दिसू शकणारे एक prime location...

अन्न साखळी खंडलीय...
असे का घडतेय की, सह्याद्रीतल्या डोंगरांवर उंदरांचे प्रमाण वाढतेय? जिवो जीवस्य जीवनम्‌...येथे निसर्गातली अन्न साखळी कशी काय खंडित झालीयं? मला वाटतं, याचं मुळ सह्याद्रीत अफाट प्रमाणावर कत्तल केलेल्या झाडांच्या मुळाशी असावं. शिवकाळात झाडे सहजासहज तोडण्याची परवानगी नव्हती. मोठमोठाले वृक्ष होते, तेव्हा त्यावर वाढणारी नानाविविध प्राणी, पक्षी, किटकांची दुनिया आबाद होती. प्रत्येकला त्याचे अन्न व निवारा मिळत होता. आता वृक्षच राहिले नाही तर त्यावर उदरनिर्वाह करणारे जीव तरी कुठून येणार उंदरांसारखे फार थोडे जीव आहेत जी, कमालीच्या विपरीत स्थितीतही आपले अस्तित्व टिकवून आहेत. तीच गोष्ट बिबट्यांची व काही प्रमाणात माकडांची. 

वाघ, चित्ते, अस्वल, तणमोर, माळढोक आपल्या महाराष्ट्रातल्या सह्यासृष्टीत कोणे एकेकाळी अस्तित्वात होते. इंग्रजांच्या काळात वृक्षतोड आणि प्राण्यांची शिकार केवळ छंद म्हणूनही वाढीस लागली. इंग्रज गेल्यावर आपल्या लोकांनी, 'आपलीच मालमत्ता', या अविर्भावात या अनमोल जीवसृष्टीवर असा काही डल्ला मारला की आता त्यांतले फार थोडे जीव शिल्लक आहेत. त्यांना वाचविण्यासाठी कायदे, नियम बनवावे लागत आहेत, तरीही माणसाला अजून भानच नाही, तो आपल्या क्षणिक, क्षुल्लक गरजांकरिता उरले सुरले जीवही कवडीमोल लेखून वागत आहेत. त्यामुषकांना दोष देण्याचा येथे हेतू नाही, फक्त काय स्थिती आहे सह्याद्रीतल्या डोंगरांची व कशा प्रकारे सह्याभ्रमंती प्रभावित झाली आहे. मुक्कामाच्या निमीत्ताने काय काळजी घेतली जावी, याकरिताच हा प्रपंच! आमची तारांबळ कशी उडाली हेच यातून सूचित करायचेय!
दमदार चढाईनंतर ताजे गरम जेवण म्हणजे ट्रेकवरचे सर्वात मोठे आमिषच...इथे तर गुळ नी साजूक तुपाच्या शिर्‍यांचा बेत...जोडीला रशाची भाजी नी मसाले भात...

तो येतोय!

'तसा तो राजच येत असतो', आपले कधी लक्ष जाते किंत्येकदा आपल्या गावीही नसते, पण डोंगरावर त्याचे येणे आणि जाणे या दोन्ही कमालीच्या सुखावणार्‍या गोष्टी. अगदी रोज जरी हा योग आला तरी त्याचं नित्य नूतन दर्शन हे घडणारच! आजही तंबुच्या बाहेरची लगबग ऐकुन, 'तो येणार', याची गंधवार्त पसरली. रात्रभर मुषकराजांच्या सानिध्यामुळे पहाटे उशिरा झोप लागली होती, परंतू ती तोडण्यातच शहाणपणा होता. तो काही क्षणच थांबतो ना! नंतर मात्र त्याचे संसारी माणसाला फार अप्रुप नसते. सर्व वृक्षवल्लींना तो आपल्या हलक्या स्पर्षाने अन्न पुरवतो...
निसर्ग मोठा कलाकार...धोडपवरच्या जीर्णशिर्ण अवशेषातूनही इखारा सुळक्याचे लोभस दर्शन घडत होते...

पूर्वेला काळ्याशार पार्श्वभूमीवर हलकेच एक भलामोंठा लालेलाल गोळा वर आला. तो जस जसा वर येत होता, तस तसे त्यात कधी तांबूस तर कधी पिवळा रंग मिसळत क्षणाक्षणाला आपले रूप पालटत होता. मंद छटांकडून लखलखीत होतानाचा सूर्य पाहणे केवळ विलोभनिय. हे दृष्य आयुष्यात कितीदा बघितले असेल! पण त्याची रंगत जराही कमी नसल्याचे जाणवत होते. इखार्‍याच्या आडून हळूहळू वर येणार्‍या भास्कराच्या विविध रंगी छटांमध्ये आसपासची अनेक खेडी आता ऊठून दिसत होती. सातमाळाच्या डोंगररांगेतली ही गावे एकमेकांपासून तशी बरीच दूरवर वसली आहेत, परंतू त्यांनी गुंफुन ठेवणारा एक समान धागा दिसत होता, तो म्हणजे शेतीचे असंख्य चौकोनी आयाताकृती आकार. पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असलेल्या नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या या भागात कैक संख्येने शेततळी बांधण्यात आली आहेत, उगवत्या सूर्या बरोबर त्यातले पाणी चमकत असल्याने एक वेगळेच दृष्य दिसत होते. 


पूर्व सपाटीपर्यंत जाऊन आम्ही सूर्योदयाचा मनमुराद आनंद घेतला. गुहेत माघारी परतून अगोदर चहा आणि नंतर नाष्त्याची तयारी असा क्रम सुरू असताना मुंबईकर भटक्यांच्या आवराआवरीने चांगलाच वेग घेतल्याचे दिसत होते. त्यांच्या दीर्घ भटकंतीचा आज समारोप होणार होता, त्यांची ती लगबग. आमची छावणी मात्र, 'कोणतीही घाई नाही', अशा अविर्भावात यथावकाश तयारी करत होती. 'गड चढताना होते तशी दमछाक उतरताना होत नाही, तेव्हा दिड दोन तासात खाली पोहोचू', अशी अटकळ बांधली जात होती. आम्ही सोबतच्या सर्व बाटल्या देवी टाक्याच्या कमालीच्या चविष्ट पाण्याने भरून घेतल्या. दिवसा उजेडी देवीच्या टाक्यातले दृष्य मात्र मन खट्टू करणारे होते. धोडपवर वर्षभर पुरेल इतके अतिशय चवदार व स्वच्छ पाणी या टाक्यात साठते. गडावरचे बाकी सर्व टाके शेवाळेलेले, हिरवट तेव्हा किमान देवी टाक्याची स्वच्छता राखण्याची जबाबदारी येथे भेट देणार्‍या प्रत्येकाचीच...प्रत्यक्षात तसे काही घडत नव्हते. या टाक्यात प्लास्टिकची खाद्यपदार्थांची वेष्टने, पाण्याच्या बाटल्या व अन्य घाण टाकून ठेवल्याने पाणी काळजीपूर्वक उपसावे लागत होते. बरं, टाके कमालीचे खोल असल्याने व पुढच्या भागात पाण्याची खोली जास्त असल्याने त्यातून पाणी उपसणेही सोपे नाही.
हीच का सौंदर्यदृष्टी...भुगोलातला चमत्कार प्रत्यक्षात दर्शविणार्‍या धोडपच्या डाईकच्या अश्मभिंतीला अशा प्रकारे कठडे बसविण्याची खरच आवश्यकता नाही...

तुमच्या डाईकला आमचे संरक्षण?
सर्व सामानाची आवराआवर करून आम्ही गडाचे पश्चिम टोक गाठले. या ठिकाणी दोन्ही बाजुंला वनखात्याने लोखंडी पाईपची कैक मिटर लांब अशी अखंड रेलंगची, अर्थात सुरक्षा कड्याची रांग खडकात सिमेंट कॉंक्रिटच्या सहाय्याने बसवली आहे. अशा प्रकारचे सुरक्षा कडे नितांत सुंदर सह्याद्रीला अभिषाप ठरावेत इतक्या बेढब पद्धतीने जिथे अजिबात गरज नाही, तिथे उभारण्यात आले आहेत, त्याला धोडपही अपवाद नव्हता. जिथे हजारोंच्या संख्येने लोक येत नाहीत, जिथे अतिशय धोकादायक असे कडे नाहीत, अशा ठिकाणीही लोखंडी पाईपचे सुरक्षाकडे उभारून ठेवलेत. गडाचे संवर्धन कशा पद्धतीने करावेत, या संदर्भात महाराष्ट्रातील अनूभवी दुर्गसंवर्धक, गिर्यारोहण संस्थांची मते विचारात घेतली जातात की नाही, की त्यांना केराची टोपली दाखविली जाते. दुर्ग संवर्धन समित्या महाराष्ट्रात अलिकडच्या काळात सरकारमार्फत स्थापिल्या जात आहेत, परंतू तरही गडांना अशी अवकळा आणण्याचे काम अव्ह्यातपणे सुरू आहे. त्यावर जो मोठा खर्च होतोय तो अनाठी ठरत आहे. अशी बांधकामे, असे सुरक्षा कडे डोंगरांवरच्या कमालीच्या विपरीत हवामानात टिकू शकत नाहीत, हे वारंवार सिद्ध झाले आहे, तरीही हा अट्टाहास सुरूच राहणार असेल आणि महाराष्ट्रातीली जनता त्याकडे असहाय्य पणे बघणार असेल तर त्या सह्याद्रीतल्या गडकोटांच्या दोन पाच टक्का उरलेल्या अवशेषांच देवच रक्षण करो!
गडांवरच्या प्रतिकुल हवामानात आजच्या युगातले बांधकामतंत्र किती कुचकामी ठरते...संरक्षक कठडे दोनेक वर्षातच मान टाकू लागलेत...त्याची दूरूस्तीही आता परवडणारी नाही...

सुळक्याच्या मध्यावर गुहा
विशाला अशी धोडपवरची डाईकची अश्मरचना बघून आम्ही परतीचा रस्ता धरला. तिथून दिसणारी गावे, शहरे, डोंगर, किल्ले याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला, परंतू हवामानात धुसरता खूप होती, त्यामुळे दृष्यमानता स्पष्ट नव्हती. गुहेतल्या देवीची यथासांग पुजा करण्यात आली व आम्ही मुक्कामाची जागा सोडली. सुळक्याच्या पूर्व कड्याला मध्यावर एक चौकोनी गुहा आहे. तिथपर्यंतचा मार्ग मोठा बिकट, तो आम्ही काळजीपूर्वक पार केला, परंतू शेवटच्या कातळटप्पा कठिण असल्याने नव्या गड्यांना खालीच थांबण्यास सांगून आम्ही दोन खांबांची गहा बघितली. त्यात माणूस कसा बसा बसू शकतो, उभे राहण्याचा प्रश्नच नाही. त्यातही भिंतीवर काहींनी आपली नावे लिहून ठेवली आहेत.  या गुहेचा उपयोग कशाकरिता करत असावेत? टेहाळणी, संपत्ती ठेवण्यासाठी की दारूगोळा की आणखी काही? इथून पूर्व कड्याचा व इखारा सुळक्याचा नजारा फार सुंदर दिसतो.
पूर्व कड्या लगत वाड्याचे भग्नावशेष विखुरले आहेत. तिथे शेवाळेली पाण्याची दोन टाकी आहेत. वाड्यांच्या चिरेबंदी भिंती ढासळल्या आहेत. तर एकेठिकाणी चिरेबंदी छत अजूनही टिकून आहे. त्याचे स्थापत्य, त्याची सांधणी थक्क करून सोडते. इथल्या बांधकामाला चौकोनी आकाराचे दगड छताला अजूनही सुस्थितीतपणे टिकून आहेत, त्यांची बांधणी तरी कशी करत असावेत? मनात उठणारा हा सवाल चक्रावून टाकतो. 

त्यावेळचे बांधकामशास्त्र काय अजोड होते! काही ठिकाणी हिन्दू पद्धतीची मंदिरे पाडून वाड्याचे बांधकाम करण्यात आले असावे, असे काही चिरे बघून जाणवते. धोडप अधिक काळ मोगलाइत होत्या, त्यावेळी गडावरची मंदिरे पाडण्यात आल्याचे जाणकार मंडळी सांगतात. एके ठिकाणी आम्हाला कळसाच्या आतील बाजूची मोरपट्टी दिसली, त्यावरून येथे कोणे एकेकाळी फार मोठे मंदिर हिन्दू राजांनी बांधले असावे, याचा बोध होतेा. 
या ठिकाणी प्रामुख्याने गडाच्या प्रमुख अधिकार्‍यांची निवास्थाने असावित. एकाच परिसरात मोठ्या प्रमाणावर वाड्याची जोती आढळतात. काहीं जोती तर असंख्य उन, वारे नी आक्रमकांच्या धडका सोसूनही आजही सुबकपणा टिकवून; त्यांच्या आकारमानावरून तिथे कचेर्‍या असाव्यात असे वाटते. या पडक्या अवशेषांच्या मागे पाण्याचे मोठा बांधिव तलाव असून त्याला मोठी तटबंदी आहे. त्यातून खालच्या गावात गुरूत्वाकर्षण पद्धतीने लोखंडी पाईपच्या सहाय्याने पाणी उपसा केले जातो.
असे बांधकाम आजच्या पिढीच्या हातून घडणे नाही...धोडपच्या पूर्व टोकावरच्या या पडक्या वाड्याचे छप्पर दगडी चिर्‍यांचे बनले आहे...चारेकशे वर्षातही ते टिकून आहे...छताला असे चिरे बसवतात तरी कसे? हा प्रश्न आजच्या अभियंत्यांना पडायलो हवा...असे चिरकाळ टिकणारे बांधकाम नव्याने साकारण्याचा प्रयत्न करून बघायला हवाच हवा!

प्रमुख दरवाजा उतरताना, इतक्या उंचीवर, ओबड धोबड मार्गाने रात्री आपण या ठिकाणहून वर आलो? असे आश्चर्यमिश्रीत उद्‌गार कानी पडत होते.  मान उंचावून मागे नजर फेरली, तेव्हा तट व बुरूजाचे बेजोड बांधकाम आज शेकडो वर्षे उन वारा पाऊस सहन करत कसे काय टिकून आहे, हा विचार आपल्याला आपल्या गत वैभवाच्या आठवणीत घेऊन जातो. आपल्या पूर्वजांचे त्याकाळचे स्थापत्य, बांधकामातील अचूकता, विज व उपकरणांच्या शिवाय अफाट मोंठी बांधकामे करण्याची हातोटी पाहून आश्चर्य झाल्याशिवाय राहत नाही. दुसरा बुरूज ओलांडत असताना आमची भेट ओतुरहून आलेल्या युवकांशी घडली, त्यांच्यापैकी एकाने लोखंडी सुरक्षा कड्याचा एक खांबच खेचून आणला होता. गावाकडची ही मंडळी अक्षरशा माकडागत कड्याच्या पोटातल्या टाक्यापर्यंत पोहोचली, आता यांच्या संरक्षणासाठी या लोखंडी कठड्यांचे काय काम...आणि सह्याभटक्यांकरिताही हे संरक्षक कठडे गरजेचे नाहीत. येथे मोठी जत्राही भरत नाहीत, ज्यामुळे गडावर एकच गर्दी उसळते, मग हा खर्च अनाठायीच नाही का ठरत?
छाती दडपणारा अफाट कातळकडा
थोडी खाली उतरल्यावर मुख्य वाट सोडून उजवीकडे लोखंडी सुरक्षाकड्यांची रांग पश्चिम दिशेला जात असल्याचे दिसत होते. हा काय प्रकार म्हणून आम्ही ती वाट धरली, पण रस्ता संपता संपेना. कड्यालगत वळणावळणांची चारशे मिटर पेक्षा अधिक अंतराचा हा टप्पा प्रत्यक्षात धोडपच्या अजस्त्र अशा घळीत घेऊन जातो. वर शेकडो फुट उंची व विस्ताराचा कडा, त्यावर नजर ठहरत नाही. यापूर्वीच्या भटकंतीत हा भाग बघण्याचे राहून गेले होते. धोडपवरचे गायीचे नैसर्गिक शिल्प येथे असावे या अपेक्षेने आम्ही ही वाट धरली, ती आम्हाला पाण्याच्या धारेच्या मार्गावर घेऊन गेली, तिथे सुट्ट्या दगडांची वाट खाली उतरते व तिथून डावीकडे पुन्हा लोखंडी सुरक्षाकडे थेट धोडपच्या कातळ टप्प्याच्या पायर्‍यांखाली घेऊन येतात. 
पुर्वी धोडपच्या बिकट कातळ  टप्प्याला हा मार्ग पर्यायी असावा! आता मात्र दोन मोठ्ठे लोखंडी जिने बांधल्याने या पर्यायी मार्गावर इतके अफाट रेलिंग कशासाठी? हा सवाल आपल्या डोक्यात उपस्थित झाल्यावाचून राहत नाही. सिमेंट व लोखंडात इतके लांबलचक सुरक्षाकडे उभारण्यामागचे कारण तरी काय?

वीस फुटांचा सरळ सोपा उतरण्याचा मार्ग असताना हा लक्षावधींच्या खर्चाचा लांबलचक वळसा कशासाठी तयार केलायं? तो करण्यामागे कोणती सुपिक कल्पना असावी? या बेबंद खर्चाचा ताळेबंद कोणी तपासत नसेल? अशा अनेक प्रश्नासह आपला पूढचा मार्ग सुरू होतो, तो आश्रमाच्या दिशेने. वीस मिनीटात खडतर उतार पार करून आश्रमाच्या टप्प्यावर दाखल झाल्यानंतर आम्ही सुंदर स्थापत्याचे नमुना असलेली बारव डोळे भरून बघितली.

 ही बारव खालच्या भागात दगडात व वरच्या भागात विटात घडवली आहे. अनेक प्रकारचे कमानी बांधकाम लक्ष वेधून घेते. बारवचे पाणी कमालीचे थंड आहे, परंतू त्यात फार मोठ्या प्रमाणावर घाण साठली आहे, ते न केवळ पिण्यासाठी उपयोगाचे, हातपाय धुण्यासही सुरक्षित नाही. इथून उजवीकडे दहा मिनीटांच्या अंतरावर दोन पुरातन मंदिरे आहेत, तर डावीकडे गडाचे पूर्व टोक. तिथे गडाच्या वस्तीची वेस व त्यावरचा देवनागरी शिलेलेख असलेला दगडी दरवाजा बर्‍याच प्रमाणावर सुस्थितीत उभा आहे. 

या प्रवेश दरवाजाच्या आतील बाजुला ठिकठिकाणी जुन्या बांधकामांचे अवशेष आहेत. काही ठिकाणी तर जमिनीच्या पोटात पायर्‍यांची पाण्याची टाकी, तर काही ठिकाणी झाडीच्या आत लपलेले खाली उतरण्याचे मार्ग, जणू चारवाट असावी. मारूतीचे एक पडझड झाल्यामुळे काहीसे कललेले मंदिर आहे, त्याचा अर्धवर्तूळाकार घुमट इतका गोल कसा? असे गोल घुमट मुसलमानी बांधकामात अधिकतर बघायला मिळतात. 

या दरवाजाला बाहेरच्या बाजूने दोन मोठे बुरूज आहेत. तिथून पाचच मिनीटात नैसर्गिक तलाव आणि त्या वाटेवर राखण करण्यासाठी उभा असलेला धोडप किल्ल्याचा सर्वात देखणा व सुथितितला बुरूज उभा आहे. त्याच्या वरच्या मार्गावर मात्र मोठा कडा कोसळा आहे. 

इथुन घळीच्या वाटेने हट्टीकडे उतरता येते. हा मार्ग प्रचलित व जास्त सोपा, आम्ही मात्र आश्रमात परतलो, कारण आमचे दोन गडी तिथल्या औदुंबर वृक्षाखाली विश्रांती घेत होते. वाटेत लहान बाळाला कडेवरून घेऊन जाणारे एक जोडपे भेटले. वळाळीभोई इथल्या एका खेड्यातून ते जुन्या घाटवाटेने कळवळला जात होते. लक्षात घ्या धोडप ते कळवण हे अंतर रस्ता मार्गा दहा किलो मिटर आहे. हे जोडपे घाटा, जंगल, डोंगर असे अंतर पायी कापणार होता. गाव तेथे एसटी बस सेवेचा लाभ त्यांच्या गावाला होत नसावा, किंवा एसटीचे भाडे आवाक्या बाहेर जात असावे किंवा दोन्ही कारणे असावीत!

या तलावाच्या काठावर लष्करी छावणी असावी. बुरूजाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर घरांची जोती व दगडी बांधकामांचे असंख्य अवशेष येथे विखुरलेले आहेत. येथे मोठी सपाटी असल्याने लष्करी तळासाठी ही जागा योग्य वाटते. दुसर्‍या सूरत मोहिमेवरून परतताना छत्रपती शिवाजी महाराजांनी धोडपला भेट दिल्याचे ऐतिहासिक उल्लेख आहेत. परंतू धोडप हा सर्वाधिक ओळखला जातो तो राघोबादादा आणि माधवराव या पेशवाईतल्या युद्धामुळे ज्यात पुतण्याने काकांचा जुन १७६८मध्ये पराभव केला. भारतात इंग्रज सत्तेची पाळेमुळे घट्ट रोवण्यात या लढाईचे महत्व मानले जाते. धोडपचे पेशवाईतले प्रसिद्ध युद्ध कोठे झाले असावे? याचा काही बोध होत नाही.


अनं खवा आटला...
या आश्रमा समोर असलेल्या औदूंबर वृक्षाखाली पाण्याचा जिवंत झरा वाहतोय. येथे लोखंडाची दोन अजस्त्र घमेली आहेत. बर्‍याच वर्षांपासून या किल्ल्यावर गाईचे दूध आटवून खवा तयार केला जायचा. सातमाळा रांगेतले हे नेहमीचेच चित्र. गडांचे राजनैतिक महत्व इंग्रजांनी देशावर कब्जा केल्या पासून संपले. १८१८च्या सुमारास इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतांशी गडांचे मार्ग तोफा, सुरूंग लाऊन उध्वस्त केले आणि कोणे एकेकाळी तलवारींचा खणखणाट करणार्‍या योध्यांनी नंतर हातात चक्क डाव घेऊन कुटुंबाचा गाडा चालविला, त्याचे उत्तम उदाहरण हट्टीत बघायला मिळते. आता तेही मिळायचे असे म्हणावे लागेल, कारण वनकात्याने गडावरचा लाकुडफाटा तोडून खवा आटविण्यास बंदी घातली आहे. हे एक प्रकारे चांगलेच झाले असे म्हणावे लागेल. 

इंग्रजांनी तयार केलेल्या दार्शनिकेत धोडपवर मोठ्या प्रमाणावर जंगल असल्याचे व त्यात अर्जुन, सादडा, जांभूळ, आंब्याचे असंख्य वृक्ष असल्याचा उल्लेख आहे. आज घडीला त्यातले पाच टक्के सुद्धा मोठे वृक्ष शिल्लक नाहीत. गडावर अफाट मोठे सुरक्षाकठडे आणि लोखंडी जीने बसविण्यापेक्षा हा खर्च जर ढासळलेल्या तट, बुरूजांच्या डागडुजीवर किंवा मोठाले वृक्ष वाढवून पुन्हा नव्याने सजिवसृष्टी साकारण्यावर खर्च करण्यात आला असता तर? आम्ही ट्रेकर अशा स्वप्नरंजनात पटकन शिरतो!

हट्टीची खवा एक्सप्रेस
इंग्रजांकरवी १८१८मध्ये गडांचे प्रमुख मार्ग उध्वस्त करण्यात आले असले तरी सातमाळा रांगेत गडांवर वहिवाटीची उत्तम व्यवस्था असल्याने पायथ्याच्या लोकांनी गडांवर गायी, म्हशी शेळ्यांची चराई सुरू केली. मुबलक चारा, ठिकठीकाणच्या इतिहासा काळातील व नैसर्गिक तलावातील पाणी गुरांना उपलब्ध होऊ लागले, त्यामुळे सहाजिकच भरपूर प्रमाणात दूध तयार होऊ लागले. परंतू आसपास मोठी वस्ती नसल्याने हेच दुध आटवून त्यापासून खवा तयार करण्याचा उध्योग उभा राहिला. या खव्याला चांदवड, कळवण, वडाळीभोई अशा बाजारपेठे मिळू लागल्या. या बाजार पेठांमध्ये पूर्णत: नैसर्गिक चार्‍यावर वाढलेल्या गाईंच्या दुधा पासून बनविलेला उत्तम दर्जाचा खवा व त्या पासून पेढे तयार करण्याचा उध्योग सुरू झाला. अगदी तीनेक वर्षांपर्यंत हा व्यवसाय बहरत होता. धोडपवर तर इतका खवा तयार व्हायचा की, त्याला नाशिकमध्ये बाजारपेठ मिळावी याकरिता परिवहन महामंडळाने खास हट्टीसाठी खवा एक्सप्रेस बस सुरू केली. ही बस आजतागायत सुरू आहे. संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर खवा एक्सप्रेस हट्टी गावात दाखल होते व रात्रभर मुक्काम करून सकाळी ७-०० रवाना होते. ट्रेकर्स करिता अजिबात सोयीचे नसली तरी काही रात्रीच्या चढाईकरिता अगदी सोयीची आहे. 


साहस पर्यटन केंद्र
वनखात्याकडे भरघोस निधी आला आणि तत्कालिन वनखात्याचे प्रधान सचिव प्रविणसिंग परदेशी यांनी स्थानिकांना रोजगार मिळावा व वनांचे संरक्षण व्हावे या उदात्त हेतूने सुमारे दिड कोटी रूपये खर्च करून धोडपच्या पायथ्याला हट्टीच्या वेशिवर साहस पर्यटन केंद्र सुरू केले. येथे निवास व भोजनाची व्यवस्था होऊ शकते. बाकी साहसी खेळांचा दर्जा उद्‌घाटनाच्या दिवशीच स्पष्ट झाला होता. आज हे साहसी पर्यटन केंद्र कसेबसे तग धरून उभे आहे. एखादा मोठा अधिकारी मोठे स्वप्न रंगवून चांगल्या योजना राबवितो, परंतू हाताखालची नोकरशाही जर कुचकामी असेल तर काय घडू शकते याचे धोडप हे उत्तम उदाहरण. हे साहसी केंद्र चालविण्याचा हट्टीच्या रहिवाशांना कोणताही अनूभव नाही. त्यांना त्याचे पुरेसे प्रशिक्षण नाही. साहसी खेळाची उपकरणे सुमार दर्जाची, त्यामुळे या चांगल्या उपक्रमाला आता घरघर लागली आहे. गडावरही विकासीची जी कथित कामे केलीत, ती गडाचे गडपण राखण्याच्या योग्यतेची नाही. 

इंग्रज गेल्यानंतरही धोडपवर वेगवेगळ्या राजवटीतल्या तोफा होत्या, त्या अक्षरशा ओरबडून न्याव्यात अशा पद्धतीने उतरवून नाशिकच्या तोफखाना केंद्रात ठेवण्याचा घाट घातला गेला. त्या नादात तोफांचे अतोनात नुकसान झाले. गडावरच त्यांचे जतन झाले असेत तर आज धोडपचे रूप अधिक बहरले असते. अनेक तट, बुरूज, दरवाजे ढासळलेतर; वन, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, पुरातत्व या खात्यानी त्यावर बेफाम वाढलेली झाडे काढण्यावर, त्याचे निखळलेले दगड सांधण्यावर खर्च केला असता तर धोडपच्या सौंदर्याला केवढी उंची प्राप्त झाली असती. 
(पुढील भाग...)
-------------
https://www.facebook.com/SahyadriTrekkersBloggers/