Wednesday, January 31, 2018

Dhodap 1: डाईक अन प्लगचा धोडप मुक्कामाला म्हणतोय 'ना'


धोडप भाग १:
''तटबंद माच्या, विशाल बुरूज, देखणी बारव अशा विपुल प्रमाणात विखुरलेल्या ऐतिहासिक वारशा बरोबरच तिथली अनोखी भौगोलिक रचना जिज्ञासूंना खुणावतात ती सर्वोत मोठी डाईकची अश्मरचना, भला मोठा व्होल्कॅनिक प्लग आणि डोंगरातून आरपार गेलेली विशाल गुहा'', एकाच ठिकाणी तीन भौगोलिक आश्चर्ये असेला नाशिक जिल्ह्यातल्या अजिंठा सातमाळा रांगेतला धोडप सह्याद्रीतला दुसरा सर्वात उंच असा किल्ला...कळसुबाई आणि साल्हेर नंतरचे महाराष्ट्रातले तिसरे सर्वोच्च शिखर मिरविणारा धोडप म्हणजे भटकंतीची एक मस्त मेजवानीच...अशा या सर्वांगसुंदर किल्ल्यावर आज घडीला मुक्कामी भटकंतीचा बेत होऊ शकतो का? खरोखरच हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. त्याच बरोबर भटक्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची एसटी, अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवा यापूढे भटक्यांच्या सेवासाठी तत्पर राहील का? हाही प्रश्न सतावू लागला आहे. 
किल्ले धोडपचा अजस्त्र डाईक...सुमारे ७०० मिटर लांबीची ही प्रस्तरभिंत... प्रत्यक्षात ती तीस पस्तीत मिटरच रूंद आहे...फक्त पगडी सारखा भासणारा प्लगचा भागच जास्त रूंदीचा आहे.
ट्रेक म्हटला की माझा उत्साह कमी झालाय असे आजवर कधीच घडले नव्हते. स्वत: चांगली ट्रेकर असूनही, माझ्या बेशुमार भटकंतीला वैतागलेल्या सौभाग्यवती नम्रताने, 'चल ना! कुठे तरी ट्रेकला जाऊ? असा आग्रह धरला होता. गेल्या काही दिवसांपासून ती त्यासंबंधी विचारत होती, परंतू माझं मन, हा प्रश्न खरा आहे! हे मानायला तयार नव्हते. सुरूवातीला मी रतनगडचा विचार करत होतो, परंतू शनिवार व रविवार तिथे अक्षरश: जत्रा भरते, तेव्हा अहिवंत, मुल्हेर, पिसोळगड असे वेगवेगळे बेत मनामध्ये ठरत असताना शेवटी आम्ही वणीच्या सप्तश्रृंगी गडावर मुक्कामी जाण्याचे ठरवले. योगायोग म्हणजे माझ्या तिघा ट्रेकर मित्रांनी नुकताच रडतोंडूच्या मार्गाने सप्तश्रृंगीगडाचा ट्रेक केला होता. कोणी एखादा ट्रेक केला की, त्याच्या मागोमाग अनेकांचे ट्रेक तिथे होत असतात, हा योगायोग मी यापूर्वी अनेकदा बघितला आहे. 

सप्तश्रृंगीगडाच्या बाबतीतही मला तसेच वाटत होते. शनिवारी दुपारी उशिरा रडतोंडीच्या कातळकोरीव पायर्‍यांची दमदार चढाई करून जिथे देवीचे कारण केले जाते त्या वनात किंवा शितकड्या लगत मार्कंडेय पर्वताच्या समोर डरा टाकावा असा निर्णय ठरला. परंतू सप्तश्रृंगी गडावर गेल्यानंतर भटकंतीची काहीज मजा येत नाही. गडाला गडपण असे नाहीच, गडावर बकाल गावच वसले आहे. उलट तिथल्या कचर्‍याने आणि गडाच्या निसर्गाची वासलात लावणार्‍या बेफाम वाढलेल्या लोकवस्तीची दशा बघून त्रासच होतो, त्यापेक्षा धोडप करूया! एकतर धोडपला जाण्यासाठी वाहतूकीचे भरमसाठ पर्याय आहेत. शिवाय गडाचे असंख्य अवशेष, गुहेतला मुक्काम आणि देवी मंदिराच्या टाक्यातले चवदार, थंडगार पाणी चाखण्याची ओढ यामुळे आमचा शोध धोडपच्या भटकंतीवर येऊन थांबला.


कोणे एकेकाळी असंख्य मोठमोठ्या वृक्षांचा हा परिसर पूर्णपणे निष्पर्ण झालाय...इथली शेवटची वृक्ष प्रजाती म्हणजे बाभुळ...पंधरा वीस वर्षांपर्यंत तिचे अस्तित्व टिकून होते, ते ही जंगलमाफियांनी लूटून नेले...आता खुरटी झाडेही फार थोडी शिल्लाक राहिली आहेत...परंतू शहरी माणसाला त्या परिस्थितीतही कमालीचे समाधान देणारे इथले वातावरण आजही अस्तित्वात आहे...

शनिवारी दिनांक २७ जानेवारी २०१८
'ट्रेकवर जाताना आम्हाला सांगत जा ना राव', असे नेहमी म्हणार्‍यांपैकी निम्म्याधिक जणांशी फोनवरून संपर्क साधला, परंतू काहींचा संपर्क होऊ शकला नाही, तर बाकीच्यांनी या ना त्या कारणामुळे नकार दिला. आमची भटकंती ठरलेलीच होती. कलावंत मित्र अजयला या भटकंतीची कल्पना दिली आणि काही मिनीटात त्याने घरातून परवानगी घेऊन होकार कळवला. आता मी, आमची सौ. नम्रता, थोरली कन्या गार्गी आणि तिची एक मैत्रिण असे पाच जण झालो. धाकटी कन्या मैत्रेयी आमच्या मातोश्रींच्या सोबत बाहेरगावी गेल्यामुळे आमच्या सोबत येणार नव्हती.

ट्रेकला जाणार कसे? ''महाराष्ट्रात दुर्गम, अतीदुर्गम भागाला जोडणारा एसटीचा लाल डब्बा ट्रेकर्सच्या खासा जिवाभावाचा'', अशी स्तूती सादर केल्याने सर्वांनी त्याला तात्काळ होकार भरला. 'आम्ही पाच' वडाळीभोईला जाण्यासाठी शनिवारी (दिनांक २७ जानेवारी २०१८) दुपारी तीनच्या सुमारास नाशिकच्या ठक्कर बाजार बसस्थानकावर पोहोचलो. नम्रताचं म्हणणं होतं, द्वारका सर्कलवर जाऊ, तिथून सगळ्याच बसेस जातात; बस नाही मिळाली तर काळी पिवळीने जाता येईल. मी म्हटलं, एसटीचा प्रवास सर्वात सुखकर, एैसपैस जागा, सुरक्षेचा जरा जास्त भरवसा, शिवाय आपल्या बॅंगा ठेवण्याची अडचण येणार नाही. 

धोडप म्हणजे हट्टी गावापासून दोन तासांची चढाई. ५-०० वाजे पर्यंत हट्टीला पोहोचलो तर लागोलाग चढाईला सुरूवात करून सूर्य मावळण्याच्या आत गुहेत डेरा टाकता येईल व रात्रीच्या स्वयंपाकाची व लाकुडफाट्याची तयारी करता येईल, अशी आमची योजना होती. बसस्थानकावर गेल्या गेल्या बस मिळेल, असा विश्वास ठेऊन आम्ही ठक्कर बाजार बसस्थानकाकडे निघालो. आमच्या सोमवार पेठेतल्या रिक्षास्टॅन्डवर एका रिक्षाचे ५०/- रूपये दर सांगण्यात आले. पाऊण किलो मिटर अंतराकरिता हे दर खुपच होतात. मिटरचा एकही फ्लॅप पडत नाही, परंतू शासकीय पंधरा रूपये टप्प्याचा दर नाशिकमध्ये कुणीही आकारत नाही. मुंबईतली टॅक्सी त्यापेक्षा स्वस्त पडते. 'आम्ही गल्लीवाले' म्हणून मोठ्या उदार मनाने आम्हाला खास १०/-रूपये सूट मिळाली.

एसटीचा नवा अवतार
बसस्थानकात धुळे बस लागली होती, बसायला एैसपैस जागाही मिळाली. वाहक आला, तेव्हा शंका नको म्हणून मी, वडाळीभोईला थांबणार ना? असा उत्तरवजा प्रश्न केला व बैठक मारणार, तोच ही बस वडाळीभोईला थांबत नाही, असे त्याने सांगितले. 'अहो, बस तर त्याच मार्गाने जाते, आम्हाला महामार्गावरच उतरायचे आहे', असे सांगितले, तेव्हा त्या स्थानकाचे या यंत्रात तिकीटच नाही', असे उत्तर मिळाले. त्यानंतर आम्ही नंदूरबार, नवापूर, मालेगाव अशा त्या मार्गावरून जाणार्‍या प्रत्येक बसची चौकशी केली, परंतू कोणीही वडाळीभोईला थांबत नाही, असे सांगितले. यातील काही बस या विनावाहक होत्या, म्हणजे एका स्थानकावरून दुसर्‍या स्थानकावर थेट धावणार्‍या. मध्ये त्यांना थांबा नव्हता, परंतू लांब पल्ल्याच्या बसनी, गाडीत पुरेशी जागा असताना चक्क प्रवाशी नाकारले'; माझ्यासाठी हा अनूभव जसा नवा होता, तसाच तो चक्रावून टाकणारा होता. 

अखेर वैतागून, 'चांदवड पर्यंतच तिकीट द्या, पण आम्हाला वडाळीभोई पर्यंत घेऊन जा', असे एका चालकाला सांगितले तेव्हा त्याने, अर्ध्या तासात मनमाड बस येईल, त्याने तुम्ही जाऊ शकता असा सल्ला दिला. आमची स्पर्धा त्या भास्करा सोबत होती. वडाळीभोईहून जाणार्‍या अनेक बस अर्ध्या रिकाम्या जात होत्या, पण त्या आम्हाला नेऊ शकत नव्हत्या? अखेरीस ३-३० वाजेची मनमाडला जाणारी एसटी आली आणि आम्हाला घेऊत ती लागोलाग रवाना झाली. नाशिक-वडाळीभोई ४८ किलो मिटर अंतराकरिता तिकीट लागले ६७/- रूपये.

हट्टी...हटाने हटो!
वडाळीभोईला पोहोचलो खरं, परंतू तिथून हट्टीला जायचे कसे? हा मोठा प्रश्न होता. आठ किलो मिटरवरच्या धोडंबे गावापर्यंत प्रवासी जीपची ये-जा सतत सुरू असते, तिथून ४ किलो मिटरवरच्या हट्टीला पोहोचणे हे खरे आव्हान होते. सायंकाळी ६-००ची नाशिक-हट्टी बस आमच्यासाठी तशी सोयीची होती, परंतू आमच्या वेळापत्रकात ती बसणार नव्हती. धोडंब्यापर्यंत दहा रूपयात जीपगाड्या प्रवासी घेऊन जातात. ‍एकाने, जीप फुल्लं भरल्यावर निघेल, पण तिथून हट्टीचे २००/- रूपये पडतील? असा प्रस्ताव ठेवला. आमची थोडी बाजार खरेदी बाकी होती, तोवर ती जीप रवानाही झाली. मागच्या जीपला विचारले, तर पहिल्याने ३००/- रूपयांचा आकडा सांगितला, तर त्याच्या मागच्याने ३५०/- रूपये. शेवटच्या ४ किलो मिटर टप्प्यासाठी १४०/- ते २९०/- रूपये जादा पडणार होते, तेही एकाच थांब्यावरून. या तफावतीत फार न गुंतता आम्ही ३००/- वाल्या जीपमध्ये स्थानापन्न झालो. अधिक प्रवाशांची वाट न बघता तो आम्हाला घेऊन हट्टीच्या दिशेने आपली जाप दौडू लागली. जीप कसली तो संपुर्णपणे खिळखीळा झालेला चालताफिरता सांगाडाच होता, तरीपण तो आमच्या मदतीसाठी वेळेवर धावून आला होता. 

'धोडपच्या पायथ्याला वन खात्याने महाराष्ट्रातील पहिले साहस पर्यटन केंद्र तब्बल दिड कोटी रूपये खर्च करून उभारले आहे. त्याठिकाणी दिवसातून केवळ एकच बस जाते ती देखिल संध्याकाळी आणि मुक्काम करून ती सकाळी ७-०० वाजता परतते. स्वत:चे वाहन असेल तर श्रेयस्कर अन्यथा हट्टीला ये-जा करायची तर खिशाला मोठी चाट तयारी असायला हवी'.
धोडंब्याहून हट्टीचा रस्ता खुपच खराब असल्याने चालक आम्हाला वणी रस्त्यावरून हट्टी फाट्याकडून घेऊन गेला. वनखात्याच्या निसर्ग पर्यंटन केंद्राच्या जवळ त्याने आम्हाला सोडले. गावात एकाने, गाईड हवा का? विचारले, त्यास नकार देऊन आम्ही वेळ न दवडता किल्ले धोडपकडे रवाना झालो. 



सूर्य डोंगराआड कलायला अवघी काही मिनीटे शिल्लक होते. वाटेतल्या नैसर्गिक तलावात काही मोठे पक्षी आमची चाहुल लागल्याने पोहोत पलीकडे गेले, मावळतीच्या मंद प्रकाशात त्यांचे ते विहरणे मोठे रम्य भासत होते. खुरट्या परंतू एकही मोठे झाड नसलेल्या त्या प्रदेशाचा आब गावगर्दी नसल्याने मोठा विलोभनीय वाटत होता. हट्टी हे गाव दुर्गम भागात, त्यात डोंगराकडच्या बाजुला खुरटे जंगल असले तरी जंगलाचे अशा प्रकारचे मन प्रसन्न करणारे वातावरण भटक्यांच्या नेहमीच वाटेला येते. गार्गी आणि तिच्या मैत्रिणीकरिता हा अनूभव तसा नवा होता, तेव्हा त्यांच्यातली उत्सुकता व आनंद बघण्याजोगा होता. 

दहा पंधरा मिनीटेच चाललो असेल तोच पश्चिमकड्यावर सूर्यराज दिसले. आता काही क्षणात ते गुडूप होणार, हे स्पष्टच होते. त्याची एक छानशी छबी टीपून आम्ही कोरड्या पडलेल्या नेत्रावती नदीचे पात्र ओलांडले. पलिकडून एक आजी, हा रस्ता नाही, असे ओरडून सांगत होत्या. गार्गीनेही, आजी हा रस्ता योग्य नाही, असे सांगताहेत असे माझ्या नजरेत आणून दिले. लांबचा रस्ता घ्यायचा नाही, हे ठरवल्याने आपण हा लघु मार्ग पत्कारत असल्याचे तिला समजावून सांगितले. एके ठिकाणी गायीचा कळप व गुराखी भेटला, त्याने उजव्या मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. योगायोग म्हणजे तोही परदेशी नावाचा (तसे अवघे हट्टी गाव ही परदेशींची जुनी पुरानी वस्ती) त्यामुळे नाशिकची परदेशी मंडळी आपल्या गावात आल्याचे बघून त्याने हसून आमचे स्वागत केले. 


गोधन हे कुठल्याही गावचे वैभव...हट्टीत आजही बरेच गोधन टिकून आहे...परंतू खव्या करिता आता जगलतोडीस बंदी घालण्यात आल्याने या गोधनाचा या पामर वस्तीत निभाव कसा लागणार? गावानेच आता देवराई तयार करावी व गुरांकरिता वेगळे चराई क्षेत्र निर्माण करून आपल्या गावाचा लौकिक राखायला हवा!

आता आमचे पहिले उद्दीष्ट होते ते म्हणजे डोंगराच्या मध्यावर लागणारा कुठल्याशा साधूचा आश्रम. मागच्याच महिन्यात आम्ही मेट पिलावरेहून तोरण्यावर गेलो होतो. त्या मार्गाचा घसारा अजूनही मनातून गेलेला नाही. काहीशी तशीच अनूभूती या सूरूवातीच्या टप्प्यात येत होती. पाठीवरची सॅक बॅग तर शिगोशिग भरलेली होती. एक तंबु, तीन पातेले, ताटं, त्यात स्वयंपाकाच्या काही वस्तू आणि माझ्या काही वस्तू असे भरपूर ओझे असूनही चढताना ओझ्याचा फार काही त्रास जाणवत नव्हता, याचे एकमात्र कारण म्हणजे मागच्या भैरवगड ते कात्रा ट्रेकवर झालेली दमछाक ध्यानात घेऊन मी मला कमी पडणारे मिठाचे प्रमाण नियंत्रणात ठेवले होते. (सोबतच्या डॉक्टर मंडळींनीच तेव्हा तसे निदान केले होते)



'मुले कशी पटकन शिकतात'...तिव्र उतार नी घसारा कसा पार करायचा, याचे कोणतेही प्रशिक्षण नसताना भटकंतीच्या दुनियेतल्या नवख्या गार्गीने बरोबर सर्वात उत्तम आधार घेतला...

मार्गदर्शक कचरा
चंद्राच्या प्रकाशात आमची सावली दिसत होती. बॅटरीच्या उजेडाची आवश्यकताच नव्हती. रस्ता बरोबर आहे का, ही चिंता मनात अधून मधून उत्पन्न होत होती, परंतू कोणत्या दिशेने जायचे आहे, हे ठाऊक असल्याने मी पुढे जाऊन वाट शोधत होतो. नम्रता मात्र, 'रस्ता बरोबर आहे ना?' असे अधुन मधून विचारत होती. वाट बर्‍यापैकी मळलेली होती, वाटेत अनेक ठिकाणी पाण्याच्या बाटल्या व कचर्‍याच्या पिशव्या दिसत होत्या. त्यामुळे आपला मार्ग चुकलेला नाही, याची जणू पावती मिळत होती. महाराष्ट्रात गुटखाबंदी नव्हती, तोवर गुटख्याच्या पुढ्यांची वेष्टने भटकंतीचा मार्ग दाखवायच्या. आता गुटखाबंदी असल्याने त्यावर बरेच नियंत्रण आले आहे, परंतू गडकिल्ल्यांवर जाणार्‍या सहलबाजांची संख्या वाढल्याने ठिकठिकाणी दिसणारा कचराच तुम्हाला आपसूकपणे मार्ग दाखवतो. 

एके ठिकाणी उजवीकडे जाणारी वाट आणि कातळात काहीसा आव्हानात्मक टप्पा लागला. सोबत दोन नवख्या ट्रेकरमुली असल्याने हा 
लहानसा कातळ टप्पा अवघड ठरणार होता, तेव्हा अजयला उजवी वाट बघायला सांगून मी कातळटप्प्याला भिडलो. उजवी वाट बरोबर
असल्याचे त्याने सांगितले. पुढे त्यांना पाण्याचे नैसर्गिक टाके दिसले. मी कातळ चढून वर येतो तो काय? साधूबाबाच्या आश्रमाचे ते अंगण होते. आश्रम कसला, त्याची शेणाने सारवलेली ती छोटी कुटीच. आमचा पहिला टप्पा आम्ही अंधारात गाठला होता. तिथे आम्ही पहिली विश्रांती घेण्यासाठी थांबलो. याठिकाणहून खरी चढाई सुरू होते. अंधारात दिड तास तरी लागणार? अस अंदाज होता. वनखात्याने याठिकाणी मजुरांकरिता तात्पूरता निवारा बनवलाय, शिवाय पश्चिम बाजुला काही ओटे बनवले आहेत, ज्यावर पर्यटकांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्याचा त्यांचा मनोदय असावा. परंतू तूर्तास काही ओटे मोडकळेले दिसले. 

आश्रमवजा झापापासून ओबडधोबड दगडांची पायवाट बनविण्यात आला आहे ती थेट कातळातल्या पायर्‍यांपर्यंत घेऊन जाते, तिथून वरच्या बाजुला कोठे तरी कातळात धोडपचा सर्वात आव्हानात्मक टप्पा लागेल अशी माझी कल्पना होती. त्यावर काही वर्षांपूर्वी वनखात्याने शिडी बसवल्याचे ऐकिवात होते. प्रत्यक्षात तो लोखंडाचा भला मोठा जीना आहे. दोन टप्प्यातला हा जीना तयार करण्यासाठी मोठाच खर्च आला असणार? मनात प्रश्न उभा राहिला, 'या जीन्याचे आयुर्मान किती असणार? उत्तर मिळाले, ज्या अधिकार्‍याने तो बांधला त्याच्या सेवा निवृत्ती पर्यंत टिकला तरी खुप काही मिळवलं!' ही उभी चढण पार करून आम्ही या जीन्यावर दुसरा विश्रांती अवकाश घेतला. हवेत भरपूर गारवा होता. चंद्रप्रकाश बर्‍यापैकी असल्याने रात्रीच्या भटकंतीचा भरपूर आनंद घेत आम्ही हळू हळू उंची गाठत होतो. धोडपच्या मुक्कामाच्या गुहेपर्यंत ही चढण अशीच कायम राहणार होती. 


मुक्कामाची गुहा किती दूर...

अनेक राजवटींचा साक्षीदार असलेला धोडपचा किल्ला आपल्या भग्नावशेषातही आपली ऐट दाखवित होता. अंधुक प्रकाशात एक एक तट, बुरूज पाहून, वाहऽऽ काय छान आहे, असे उद्‌गार निघत होते. 'मुक्कामाची गुहा आहे तरी किती दूर? असा प्रश्न सतत येत होता आणि त्यावर आमचे उत्तरही ठरलेले होते, आता फक्त पंधरा मिनीटे! 'यांचे पंधरा मिनीट केव्हा सरतील?' अशा सस्पेन्स सह नवखे गडी थकवा आणि अंधारात चालण्याचा आनंद घेत होते. थोड्याच वेळात कातळात घडविलेल्या जीन्याचा मार्ग दिसला...'आता बस थोडेसेच बाकी'. उर्दू भाषेतला शिलेलेख बॅटरीच्या प्रकाशात बघितल्यानंतर गडाचा मुख्य दरवाजा लागला. इथून आता कोठे? असा प्रश्‌न गार्गीने विचारला,  तेव्हा या दारातूनच, असे सांगितले. एवढ्या भितीदायक, अंधारातुन पुढे जायचे? या प्रश्नावर मग तिला बॅटरीच्या उजेडात रस्ता दाखवला. 

त्याठिकाणी चौकिदाराची उठबैस करण्याची जागा, पहारेकर्‍यांची शस्त्र आदी ठेवण्याची जागा बघून आम्ही त्या गुडूप अंधारी मार्गातून बाहेर पडलो. शेवटचा टप्पा हा नेहमीच कसोटी पाहणारा असतो. इथेही मुख्य दरवाजा ओलांडूनही अजून कशी मुक्कामाची गुहा येत नाही, अशा प्रश्नांनी महिला मंडळ चिंतीत झाले होते. एकदाचा धोडपचा सुळगा दृष्टीपथात आला आणि आता पाचच मिनीटात देवीच्या गुहेत पोहचणार, असे त्यांना सांगितले. गेल्या तास दिडतासापासून पंधरा मिनीटे, पंधरा मिनीटे ऐकून झाल्याने त्यांना मात्र इतक्या लवकर ही चाल संपेल असे अजिबात वाटत नव्हते. 


वरच्या टप्प्यावर बर्‍यापैकी सपाटी लागल्याने आम्ही झपाझप पावले उचलली. उजव्या हाताला बॅटरीच्या उजेडात एक एक गुहा बघत आम्ही पुढे सरकत होतो. 'यातली मुक्कामाची गुहा कोणती', हे गुपित मात्र अजूनही कायम होते. अंधारात दुरूनच गुहेतला उजेड आणि काही सावल्या बघून, आणखी कोणी तरी मुक्कामाला असल्याचे लक्षात आले. एकदाचे आम्ही देवीच्या गुहेपाशी येऊन थांबलो. धोडपला मुक्कामासाठी एैसपैस जागा असल्याने तशी चिंता नव्हती. परंतू एक चूक लक्षात आली. आम्ही छोटी गॅसची टाकी भरून घेऊ शकलो नव्हतो, त्यामुळा वाटेत लाकूडफाटा गोळा करायला हवा होता, परंतू दमछाक करणार्‍या चढाईमुळे त्याचे स्मरण कोणालाच राहिले नव्हते. 


लाकुडफाटा अत्यल्प...

'तुम्ही स्वयंपाकाची तयारी करा, आम्ही लाकूडफाटा घेऊन येतो', असे सांगून अजय व मी शोधमोहिमेवर निघालो. वाटेत दोन ठिकाणी उंदीर आडवे आले, त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही सुळक्याच्या मागच्या बाजुला येऊन पोहोचलो. या सपाटीवर सगळकडेच वाळलेले गवत असल्याने आम्ही वाड्याच्या अवशेषाच्या मागे पसरलेल्या जंगलात शिरलो. अंधारात पायाला सारखे काटे टोचत होतो, हा आखरा असल्याचे लक्षात येत होते, यातून वाट काढणे नव्हे तर अशक्यच, तेव्हा आखर्‍याची झुडपे टाळून आम्ही वाळलेल्या काटक्या शोधण्याचा प्रयत्न केला, परंतू तरीही आखर्‍याचे काटे पायांना टोचत होता. आम्हाला एकाही झाडाला वाळेली काटकी मिळाली नाही. सरपण गोळा करणारी मंडळी फांद्या तोडून ठेवतात व त्या वाळल्या की घेऊन जातात, त्यावर डल्ला मारण्याचा आमचा प्रयत्न सुरू होता. अखेरीस महत्प्रयासाने तो सफल ठरला. 

थोडाफार लाकुट फाटा मिळाला, परंतू अंधारात अंजयच्या पायाला काही तरी चावल्याची जाणिव झाली. त्याला सापाची शंका वाटत होती, परंतू पायाचे आवाज व गप्पा मारण्याच्या आवाजामुळे मला तशी शक्यता वाटत नव्हती. मी बॅटरीच्या उजेडात बघितले, तर वेदना होत असलेल्या ठिकाणी रक्ताचे थेंब नव्हे, मी त्याल हा आखर्‍याचाच प्रताप असल्याची हमी दिली. 


गार्गी आणि तिच्या मैत्रिणीचा हा पहिलाच मुक्कामी ट्रेक. चुलीवर स्वयंपाक करायचा, गुहेत मुक्काम करण्याच्या कल्पनेने त्या हरखून गेल्या होत्या. घरात कधीही कोरा चहा न घेणार्‍या 'त्यांनी' गुळ टाकलेला ग्रीन टी काय छान लागतोय! अशी पसंतीची मोहोर उमटवली. चहाचे घोट घेऊन महिला मंडळाने भाज्या चिरून मसाला खिचडीची व गुळाच्या शिर्‍याची तयारी केली. धोडपची गुहा मोठी प्रशस्त, गुहेच्या बाहेरच देवी मंदिराच्या तळाला पाण्याचे टाके आहे. याचे पाणी मोठे चविष्ट, परंतू गुहेतला अंतर्भाग कमालीची धुळीचा, त्यामुळे आम्ही गुहेबाहेर चांदण्या प्रकाशात भोजनाचा बेत हाणला. या ताज्या जेवणा सोबत अजयने छान मेथीचे धपाटे तर गार्गीने आजीकडून खास बनवू घेतलेले लोणचे आणले होते. जेवणाचा बेत फक्कड रंगला. 


सभोवतालची सर्व गावे विजेच्या लखलखाटात न्हाऊन निघाल्यासारखी भासत होती. रस्त्यांवरच्या दिव्यांच्या उभ्या आडव्या रेषा एक वेगळ्या प्रकारची नक्षी तयार करत होत्या. नजर जाईल तिथपर्यंत हे दिव्यांचे पुंजके दिसत होते. पश्चिमेला वणीच्या सप्तश्रृंगीगडाचा लखलखाट मोठा भारी दिसत होता, तर उत्तर दिशेला दिव्यांचा मोठा पुंजका म्हणजे कळवण. नैऋत्य दिशेला सुदूर पिंपळगाव बसवंत, ओझर, अडगाव ही मोठ्लया लोकवस्तीची गावे. 


एव्हाना थंडीने चांगला जोर धरला होता. भोजन पश्चात अर्धाधिक तास वेगवेगळे किस्से, हास्यविनोदात जात होते. उद्याचा दिवस डाईक व व्होल्कॅनिक प्लग म्हणजे नेमकं काय? ते बघण्यात त्याच प्रमाणे विविध राजवटीत तयार झालेले तट, माच्या, बुरूज, गुहा, पाण्याची टाकी, कातळातल्या पायर्‍या असे कितीतरी अवशेष बघण्याकरिता अनेक तास जाणार होते, त्यामुळे आम्ही लवकर झोपण्याच्या तयारीला लागलो. शिवाय अनेक छायाचित्रकारांनी टिपली ती आपली मंदाकिनी आकाशगंगा बघण्याकरिता मध्यरात्री उठायचे होते व सकाळचा सूर्योदय तर चुकवायचा नव्हता! 

(पूर्वार्ध)

--------------


https://www.facebook.com/SahyadriTrekkersBloggers/