Wednesday, March 4, 2020

Trimbakeshwar unveiled through Inscriptions




शिलालेखात दडलेले त्र्यंबकेश्वर
दगडावर कोरलेले शिलालेख मोलाचा ऐतिहासिक वारसा. उन-वारा पावसाच्या माऱ्यात पुसट झालेले लेख वाचता नाही आले तर मोठी डोकेदुखी ठरते. त्र्यंबकेश्वर मंदिरातील दोन मोठे शिलालेख जीर्ण अवस्थेत असल्यामुळे त्यांचे वाचन हे एक कोडे बनले होते. त्र्यंबकेश्वरचे इतिहास अभ्यासक राजेश दीक्षित यांनी या लेखांचे वाचन शोधून काढले असून दोन्ही लेखांचे मराठीत भाषांतर करून दिल्याने एक महत्वाचा दस्तावेज अभ्यासकांसाठी उपलब्ध झाला आहे.
निमित्त घडले ते एका शिलालेखाचे. त्यातून त्र्यंबकेश्वर नगरीचा एक मोठा कालपट नजरेसमोर उभा राहिला. जणू काही हजार वर्षांचा वेगवान स्मृतिचित्रमय आढावा. त्र्यंबक...साडे तीन अक्षरांचे हे नाव आपल्या समोर किती वेगवेगळ्या रूपात समोर येते. मध्ययूगापासून ह्या प्रदेशाच्या राजसत्तेचे ते प्रमुख केंद्र होते. गंगावतरणाच्या निमीत्ताने पुराणकाळात येथे मोठी हलचल झाली. खुद्द शिवशंकराला येथे पर्वत रूपात यावे लागले व पर्वत बनून कायमचे रहावे लागले. स्वर्गीची गोदावरी येथे आणावी लागली. जोडीला ब्रम्हा आणि विष्णूंनी शिवाची साथ संगत केली. भारतीय तत्वज्ञानातील तीनही प्रमुख देवतांचे अस्तित्व. प्रत्येक काळात प्रमुख राजे, सरदार, विद्वान मंडळींनी येथे दिलेल्या भेटी. दक्षिण भारतातील एकमात्र सिंहस्थ कुंभमेळा अशा विविध कारणांमुळे या नगरीची ख्याती जगभर पसरली. आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचे हे मोठे जागृत स्थान असल्याची मान्यता. मोठी संकटे आली की, राजसत्तेची धाव त्र्यंबकेश्वरी. गणित, न्याय, सांख्य दर्शन, नाथ, महानूभाव, वारकरी अशा कित्येक परंपराचे उद्‌गार या भूमित सर्वप्रथम उठले. इतकेच काय मनोरंजन जग व्यापणाऱ्या भारतीय चित्रपट सृष्टीचा उगम येथेच झाला. ह्या पटाची आठवण झाली ती त्र्यंबकेश्वर मंदिरात अज्ञाताच्या गर्तेत दडलेल्या दोन शिलालेखांचे वाचन उपलब्ध झाल्याने.  ३/३/२०२० तो हा दिवस. हे शिलालेख कित्येक वर्ष दुर्बोध बनले होते ते त्यांची अक्षरे पुसट जीर्ण झाल्यामुळे. या अक्षरांच्या आड नेमके दडलेय तरी काय? असा प्रश्न या शिलालेखांकडे बघून भेडसावत होता. त्यात काही काळापासून हे शिलालेख असलेली मंदिरे पुरातत्व खात्याने कुलूपबंद करून ठेवल्याने त्यांचे दर्शनही दुर्मिळ झाले होते.

 त्र्यंबकेश्वर नगरीचा जुना इतिहास उलगडतो तो वेगवेगळ्या कालखंडात लिहीलेल्या धार्मिक, तत्वज्ञान आदी ग्रंथातून, पोथ्या पुराणातून, ऐतिहासिक दस्तावेजातून, काही प्रमाणात जुन्या नाण्यांच्या माध्यमातून. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसलेंच्या पासूनची इतिहासाची असंख्य पाने, ‘त्र्यंबकेश्वरी काय घडले याची माहिती देतात’छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची त्र्यंबकेश्वरावर नितांत श्रद्धा होती. त्यांनी येथे महत्वाच्या प्रसंगी अनुष्ठाने केल्याचे, न्याय निवाडे केल्याचे दाखले जुन्या पत्रातून आणि त्यांनी जारी केलेल्या आदेशपत्रातून बघायला मिळतात. 
रघुनाथरावांनी बांधलेली शिवमंदिरे

जुनी नाणी आणि त्या जोडीला शिलालेखांचेही महत्व आहे. आज घडीला त्र्यंबकेश्वरात सात जुने शिलालेख उपलब्ध आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर संगमरवरी दगडात पेशव्यांनी बांधलेल्या मेरू प्रासादाचा लेख कोरला आहे. मंदिराच्या आतील बाजुस दक्षिण तटभिंतीलगतच्या ३० शिवालयांपैकी पहिल्या व शेवटच्या अशा दोन शिवालयात अदमासे २ फुट रूंद, ३ फुट उंचीचे दोन लेख कारले आहेत. ह्या लेखाची अक्षरे अजिबात वाचता येत नाहीत. थोडी थोडी अक्षरे वाचता येतात, पण सलग एक ओळ वाचणेही अशक्य. मध्यंतरी त्र्यंबकेश्वर संस्थानाने काही अभ्यासकांना पाचरण करून लेखांचे वाचन करून घेण्याचा प्रयत्न केला, परंतू अक्षरे कळत नसल्याने वाचन होत नव्हते. धार्मिक आणि ऐतिहासिक विषयांवर अलिकडे दोन उपयूक्त पुस्तके लिहीणारे त्र्यंबकेश्वरचे राजेश दीक्षित यांना आगामी लेखन कार्यासाठी माहिती जमवताना या शिलालेखांची माहिती असलेल्या शंभरवर्षापूर्वीच्या पुस्तकाचा सुगावा लागला. नोव्हेंबर २०१२मध्ये न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी स्मरणयात्रा ही जुन्या दुर्मिळ पुस्तकांची माहिती देणारी लेखमाला लिहीली होती. त्यात ‘तीर्थयात्रा प्रबंध’, ह्या गणेश लेले यांनी लिहीलेल्या ग्रंथावरील परिक्षणात त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिलालेखाची माहिती असल्याचे लिहीले होते. स्वत:चा उत्तम संग्रह असलेल्या राजेश दीक्षित यांनी आपल्या लेखनकार्यासाठी लागणारे दुर्मिळ ग्रंथ मिळविण्यासाठी विविध ग्रंथालये पालथी घातली. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात त्यांना तीर्थयात्रा प्रबंधाची प्रत बघायला मिळाली. त्याची नक्कल मागवून घेतली तरी ती वाचनाचा योग येत नव्हता.
पेशवाईतील शिल्पकलेचा सुंदर अविष्कार श्री त्र्यंबकेश्वर मंदिर...

मंदिरातील दोन्ही शिलालेख पुसट झाल्याने त्याचे वाचन अवघड झाले असून ते करणे गरजेचे आहे’,  अशी निकड संस्थानचे विश्वस्त तथा त्र्यंबकेश्वराचे माध्यान्य पुजक सत्यप्रिय शुक्ल यांनी व्यक्त केली होती. ‘मंदिरातील दोन्ही शिलालेख पुसट झाल्याने त्याचे वाचन अवघड झाले असून ते करणे गरजेचे आहे’,  अशी निकड संस्थानचे विश्वस्त तथा त्र्यंबकेश्वराचे माध्यान्य पुजक सत्यप्रिय शुक्ल यांनी व्यक्त केली होतीहे निमीत्त घडले आणि विशवस्त दिलीप तुंगार त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने या शिलालेखाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. दोन्ही शिलालेखांची छायाचित्र त्यांनी उपलब्ध करून दिली. सद्या दक्षिण कोटाच्या लगत असलेली ३० शिवमंदिरे दरवाजा लाऊन बंद करण्यात आली आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर दुध, जल, फळे हळदी कुंकी चढविण्यात येत असल्याने सर्व शिवालयातील शिवलिंगाची मोठी झीज झाली आहे. हल्ली हे पदार्थ भेसळयूक्त मिळत असल्याने दगडाची वाजवीपेक्षा अधिक वेगाने झिज होते. त्यातच आतील दोन्ही शिलालेख वाचण्याच्या पलिकडे इतके पुसट झाले आहेत.

मंदिराची ध्वजा, कळस आणि शिखराचे सुंदर कातळ कोरिव काम

तीर्थयात्रा प्रबंध
त्र्यंबकेश्वरमध्ये १८२५ मध्ये जन्मलेले गणेश सदाशिवशास्त्री लेले यांनी पेशवा काळातील प्रसिद्ध सरदार घराण्यातील रघुनाथराव विंचूरकर यांनी भारतभर केलेल्या तीर्थयात्रांवर हा ग्रंथ लिहीला आहे. त्यांनी कालिदासाच्या रघुवंशमचे भाषांतर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, गंगाचरित्र काव्यात लिहीले आहे. आपल्या मराठी भाषेत प्रवासवर्णनावरची पुस्तके कमी आहेत. त्यातही शंभर दिडशे वर्षांपूर्वीच्या कालखंडातली पुस्तके फारशी नाहीत. गोडसे भटाचा १८५७ चा प्रवासवर्णन ग्रंथ आहे, पण तो शुद्ध प्रवासवर्णन ग्रंथ नाही. इंग्रज अंमलच्या आरंभीच्या काळात होऊन गेलेले तंजावरचे राजे सर्फोजी यांनी भारतात बऱ्याच ठिकाणी प्रवास केला, त्याची वर्णने उपलब्ध आहे. 
वयाच्या अकराव्या वर्षी सरदार विंचूरकर घराण्यांचा कारभार सांभाळणारे रघुनाथराव उर्फ अण्णासाहेबांनी वयाच्या २४व्या वर्षी प्रापंचिक सुखाचा त्याग करून हिमालया पासून कन्याकुमारी अशा विविध भागात तिर्थयात्रा केल्या. एक मोठा लवाजमा सोबत घेऊन त्यांनी या यात्रा केल्या. अनेक ठिकाणी दानधर्म केले. शके १७८२ मध्ये रघुनाथराव सात महिने त्रिंबक मुक्कामी राहिले. त्रिंबकेश्वर महादेवावर त्यांनी संतत सात महिने जलधारा भिषेक अनुष्ठान चालविले. ब्रम्हगिरीच्या दोन प्रदक्षिणा केल्यानंतर शके १७८३ साली वद्य ९ रोजी त्र्यंबकेश्वराच्या देवालयावर कळस नसल्याने त्यांनी तांब्याचे सोन्याचा मुलामा असलेले कळस स्थापन केले.
देवळाच्या शिखरावर एक मोठा, सभामंडपावर मध्यम आकाराचा, बाजूस लहान तीन व नंदीच्या देवळावर एक असे एकुण सहा कळस बसविले. शके १७८७ साली कार्तिक शुद्ध पौर्णिमेस लाकडाचा रथ श्री त्र्यंबकेश्वरास अर्पण करून प्रतिवर्षी रथाचा उत्सव होण्याकरिता विंचूर येथील जमिन आकार रूपये ६१८ चे दानपत्र करून दिले. शके १७८८ साली त्यांनी कुशावर्ताच्या चार बाजूस चार, .... केदारेश्वर देवळावर दोन, त्रिभूवनेश्वर देवळावर दोन, ज्वरेश्वर देवळावर एक असे असे एकुण दहा सोन्याच्या मुलाम्याचे कळस बसविले. पावसाळ्यात त्र्यंबकेश्वर देवालय गळत असे त्यास चुन्याची टिपगारी करविली. शके १७९४ साली त्यांनी कार्तिक शुद्ध द्वितीयेला त्र्यंबकेश्वर देवळावर चांदी व सोन्याचा मुलामा असलेली ध्वजा बसविली. शके १७७५ साली देवालय ते कुशावर्त हा गोदावरी नदीच्या दुतर्फा रस्ता रूंद करवून चालण्यास व रथ नेण्यास प्रशस्त करून घेतला. शके १७९६ साली इंग्रजांनी गोदावरी नदीवर पुल बांधला त्याचा खर्च रघुनाथरावांनी केला. संत निवृत्तीनाथ समाधिस पुजा व नैवैध्य नित्य होत नसे, त्यासाठी त्यांनी नेमणूक करून दिली जी अद्याप पर्यंत चालू आहे. शके १८०० साली रघुनाथरावांनी त्र्यंबक देवालयात लहान लहान अशी ३० देवालये बांधून त्यात शिवलिंगांची स्थापना केली. यातील पहिल्या देवालयास त्यांनी जगदगुरू शंकराचार्यांचे नाव दिले तर दुसऱ्या देवालयास कुलयजमान बाजीराव पेशवा यांचे नाव दिले. अन्य देवालयांना आपल्या कुळातील व पितरातील व्यक्तींची नावे दिली. शेवटचे दोन देवालये पिशाच्चमोचनेश्वर व सर्व पापहरेश्वर अशी नावे दिली. राजेश दीक्षित यांनी या दोन्ही शिलालेखांचे वाचन तिर्थयात्रा प्रबंधावरून घेतले. हा एकच लेख दोन भागात कोरण्यात आला आहे. हे लेख संस्कृत भाषेत असून त्यांचे त्यांनी मराठीत स्वैर भाषांतर करून दिले. त्र्यंबकेश्वराचे केवढे मोठे महत्व होते हे इतिहासात झालेल्या संघर्षावरून आपल्याला कळते.
नंदीमंडपावरील कळस

बाळाजी बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत सुरू झालेले बांधकाम सतत ३१ वर्षे चालले व त्यावर त्या काळात दहा लक्ष रूपये असा अफाट खर्च करण्यात आला. विंचूरकरादी मोठे प्रस्थ मंदिराच्या बांधकामावर लक्ष ठेवून होते. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वराचे महत्व ओळखून येथे अनुष्ठाने केली, इथल्या लोकांना अभयपत्र दिले. स्वराज्याची राजधानी उभारताना रायगडावर शिवाजी महाराजांनी खास कुशावर्त तलावाची निर्मीती केली. राजधानीतही कुशावर्तासारखे पवित्र तिर्थ असावे अशी त्यामागची भावना तर नसेल? कदाचित महाराजांना गर्दीत येऊन त्र्यंबकेश्वरी कुंभ पर्वकाळात स्नान करणे शक्य नसेल तेव्हा त्यांनी रायगडाच्या कुशावर्ततच कुंभस्नान तर केले नसेल?
शिलालेख, ताम्रपट, जुने दस्तावेज, नाणी यातून सापडणारा हा अस्सल इतिहास आपला मोलाचा वारसा आहे. तो जोपासण्यासाठी पूर्वी राजाश्रय होता. आता इतिहसाची ही पाने जिर्ण होत आहेत. याकरिता शासनाच्या, विध्यापिठांच्या आश्रयाशिवाय तो जोपासणे शक्य होणार नाही. त्र्यंबकेश्वरचे पुरातन काळापासूनचे धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्व पाहता येथे अध्ययन व संशोधन केंद्र होणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे या परिसरातील दुर्मिळ ग्रंथसंपदा जतन करण्यासाठी मोठे सुसज्ज ग्रंथालय निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्रिंबकगडाचे अनेक अवशेष विखुरलेल्या स्थितीत आहेत. त्यावर उत्खनन, संशोधन करण्याची आवश्यकता आहे. ते करण्यात जितकी दिरंगाई होईल तितका त्यांचा नाश होण्याची शक्यता वाढेल. पूर्वी त्र्यंबकनगरीत जुने नक्षिकाम केलेले, घडवलेले दगड रस्त्याच्या कडेला विखुरलेले दिसायचे. मधल्या काळात बरीच बांधकामे झाली. रस्त्यांची कामे झाली त्यात हे दगड कुठे गेले याचा थांगपत्ता लावायला हवा. मुसलमानपूर्व काळात त्र्यंबकगडावर हिंदू राजवटीत फार मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली. त्याचा इतिहास गडाच्या ढिगाऱ्याखाली दबला आहे. 
महादरवाजा मोठ्या दरडीखाली चिनून गेला आहे. ते ढिगारे गेल्या पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळापासून थरावर थर साठत आहेत. महादरवाजाचे बांधकाम कोणत्या शैलीतले. कोणत्या कालखंडातले. त्यावर कोणती शिल्पे, हे ढिकारा उपसला जात नाही तोवर यावर काहीच प्रकाश टाकला जाऊ शकत नाही. दिवसेंदिवस कातळातला हा अनमोल इतिहास नष्ट होण्याच्या वाटेवर चाललेला आहे. दुर्गभांडारचा पायरी मार्ग, आज घडीला सर्वाधिक वापर असलेला गडाचा उत्तर बाजुचा पायरी मार्ग ही सगळी कामे हिंदू राजवटीतली, आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावणारी. इतिहासाचे अभ्यासक महेश तेंडुलकर यांनी ब्रम्हगिरी आणि देवगिरी या दोन्ही किल्ल्यांचे बांधकाम एकाच काळात म्हणजेच यादवांच्या काळात झाल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. ‘दरडीखाली दबलेल्या महादरवाजावरची काही शिल्पे सातवाहन काळाकडे निर्देश करतात’, अशी अभ्यासकांची निरीक्षणे आहेत.  जुन्या लेखातून या संबंधी शाश्वत माहितीचा उलगडा होऊ शकतो, परंतू आपल्याकडे जुन्या माहितीचा अभ्यास व त्यावरील संशोधन हे कुर्मगती असून काळाच्या ओघात तर बरीच साधने नष्ट होत आहेत. पुण्याच्या पेशवा दफ्तरात म्हणे मराठ्यांच्या विविध कालखंडातील अस्सल कागदपत्रांच्या जंत्र्या अभ्यासकांच्या अभावी म्हणे पडून आहेत. याकरिता मोडी जाणणाऱ्या व इतिहासाची आवड असणाऱ्या अभ्यासकांची आवश्यकता असल्याचे आवाहन मध्यंतरी समाजमाध्यमातून करण्यात आले होते.
त्र्यंबकेश्वर मंदिरावरचे शिलालेख हे पेशवा/इंग्रज कालखंडातील आहेत. निलपर्वतावरील निलांबिका मंदिरावर दोन जुने शिलालेख दष्टीस पडतात, परंतू जुन्या आखाड्याच्या आख्यारित असलेल्या या मंदिराला संपुर्ण ऑईलपेंटने रंगविल्याने हे लेख वाचता येत नाहीत. उदाशांच्या आखाड्यात एक लेख आहे. 
भातखळ्याच्या बारवेजवळ अनेक वर्षे पडून असलेल्या जुन्या शिलालेखाचा भाग. 
सद्या त्याचा मागमूस नसून त्याचे वाचनही उपलब्ध नाही.

कुठे गेला भातखळ्याचा लेख? 
ब्रम्हगिरीवर भातखळे म्हणून प्रसिद्ध असलेल्या व मुलतानच्या सिंध व्यापाऱ्याने बांधलेल्या धर्मशाळेच्या मागिल बाजूस एक जूनी बारव आहे. त्या परिसरास मेटघर किल्ला असे वनखात्याचे फलक लागलेले दिसतात. वस्तविक किल्ला हा ब्रम्हगिरीच आहे. आणि त्याच्या परिसरात गंगाद्वाराची मेट, विनायक मेट, हत्तीदरवाजाची किंवा महादरवाजाची मेट, सुपल्याची मेट अशा मेटा म्हणजेच गडाच्या परिघातल्या वस्त्या व युद्ध प्रसंगीच्या लढाऊ फळ्या आहेत. ही बारव पुर्णपणे ढासळलेली होती. तिच्या बाजूला एक जुन्या शिलालेखाचा तुकडा बरीच वर्षे पडलेला होता. त्याचा दुसरा भाग सापडलेला नाही. यंदाच्या सिंहस्थ पर्वाच्या दरम्यान या बारवेचे ढासळलेले चिरे गोळा करून तिची पुनर्बांधणी करण्यात आली. त्यावर किंवा तिच्या आसपास हा उरला सुरला तुकडाही आता दिसत नाही. सुदैवाने त्याचे छायाचित्र उपलब्ध आहे.
त्र्यंबकेश्वर इतिहास मंडळात त्र्यंबकेश्वर येथे सापडलेल्या नाण्यांच्या माहितीचे सादरीकरण

नाण्यांचे घबाड
त्र्यंबकेश्वर हे मोठे राजकीय केंद्र होते हे इथे सापडणाऱ्या नाण्यांवरूनही स्पष्ट होते. १९४० साली नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाढोली येथे एका शेतात दिल्लीच्या तिन विविध सुल्तानांची ३८७७  इतकी आवाढव्य संख्येने नाणी सापडली. हे घबाड सापडले त्याची माहिती सी. आर. सिंघल यांनी जेएनएसआय १९४२ च्या चौथ्या खंडात प्रकाशित केली आहे. अर्थात हे घबाड इंग्रज आमदनीत सापडल्याने ते इंग्रजांनी त्यांच्या तिजारीत किंवा संग्रहालयात जमा केले असावे. त्याच ठिकाणी
नाण्यांवर संशोधन करणारे हे महत्वपूर्ण संशोधन केंद्र वाढोली येथे असून विविध ठिकाणच्या नाण्यांचा संग्रह येथे करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे केंद्र त्याच ठिकाणी उभारले आहे जिथे ही नाणी सापडली. 
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची भरपाई करताना सुरतेची लुट करण्यापूर्वी त्र्यंबकेश्वरी अनुष्ठान केल्याची वदंता आहे. शिवापूर दप्तराचा उल्लेख करून महेश तेंडुलकर यांनी सुरतेच्या स्वारीवरून परतल्यानंतर महाराजांनी त्र्यंबकेश्वरी वास्तव्य करून अनुष्ठान केल्यांची नोंद, त्र्यंबकगड-अंजनेरी-रामसेज यापुस्तिकेत केली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या दोन शिलालेखांवर नव्याने प्रकाश पडल्याने या परिसराच्या इतिहास संशोधनाला चालना मिळण्याची आवश्यकता आहे.
संस्कृत शिलालेखाचा अनुवाद करणारे इतिहासाचे अभ्यासक राजेश दीक्षित





त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिलालेखांचा राजेश दीक्षित यांनी केलेला स्वैर अनुवाद:

मौन ऋषींनावाचे उत्तम गोत्र असलेले रघूनाथ नावाचे कुलीन राजे।। दानी उप नावाने ओळखले जाणारे दैवतरूपी गंगा आणि विठ्ठल (माता व पिता) यांच्या पासून उत्पन्न झालेले ।। १।।
त्र्यंबक क्षेत्रातील त्र्यंबकेश्वर देवालयावर सुवर्णमय।। कुशावर्ताच्या द्वार व कळसावर निर्माण केले ।। २ ।।
कळस व छत्र स्थापन केले वृषसांड (वृषोत्सर्ग विधी) समर्पित केले ।। शंकराच्या मंदिरावर चांदीची ध्वजा समर्पित केली ।। ३ ।।
वार्षिकोत्सव (त्रिपूरारी उत्सव) यात्रेसाठी घंटाध्वजांनी यूक्त असा ।। लाकडी रथ विधिवत दान केल्याची घोषणा केली ।। ४।।  
स्वत:ची पत्नी, मुलगा, आई अशा परिवार समवेत ।। वर्तमान समयी (या घडीस) स्वत:च्या पितरांच्या मुक्तीसाठी ।। ५।।
श्रीगुरू शंकराचार्य यांच्यासाठी पहिले लिंग (मंदिर) असून दुसरे।। स्वत:च्या वंशाचे स्वामी (यजमान) असलेल्या श्री बाजीराव (पेशवे) यांच्या नावे ।। ६।।
स्वत:च्या सर्व पुर्वजांचे पाप हरण करण्यासाठी ।। क्रमाने त्यांची नावे वृषभध्वजावर ।। ७ ।।
त्या शिवलिंग मंदिरांसोबत त्यांची नावे तो राजा लिहीता झाला ।। सर्वांना आकलन होण्याकरिता क्रमाने ।।
जगतगुरू शंकराचार्य, पालनकर्ता बाजीराव ।। विठ्ठल नावाने विख्यात असे पणजोबा ।।
आजोबा खंडेराय आणि गंगा नावे आजी ।। राजाचे पिता विठ्ठल व गंगा नाव असलेली जन्मदात्री आई ।। आई समान इतर माता रूक्मिणी, रूक्मिणी ।। लक्ष्मी व सत्यभामा क्रमाने ।। मातामह (आजोबा) गोविंद उडपीत प्रमातामह (आईचा आजा) ।। नरसिंह नावाचे प्रमातामह (आईचा पणजा) आदित्यरूप ही मातामह त्रयी ।। श्रीनिवास, गणपती, कृष्ण हे मामा ।। क्रमाने मामा व पुढील सासरे व केशव हा मंत्रगुरू ।। गोपाल नावाचा आप्त व रघूनाथ या स्वनावे ।। काशी, रमा, जानकी या क्रमाने राण्या ।। सावत्रभाऊ कृष्ण व माधव नावाने प्रसिद्ध ।। पिशाच्यांना मुक्ती देणारा शंभू आणि सर्व पाप हरणारा शिव ।। या मंदिरांच्या नावांचा संबंध या क्रमाने आहे ।। शके १८०० बहूधान्य संवत्सरात ।।
वसंत ऋतू चैत्र (मधु) शुद्ध प्रतिपदा तिथीला बुधवारी ।। या सुश्र्लोक निर्मितीसाठी सुश्र्लोकांचे सूचक ।। रघुनाथ राजाचे आश्रित यांनी शिलालेख कोरण्याचे काम ।। गौरीशंकर याने आनंदाने केले ।। 

दक्षिण तटालगतच्या ३० शिवमंदिराची नावे:
(सौजन्य: तिर्थयात्रा प्रबंध)
१) जगदगुरू शंकराचार्य
२) बाजीराय: कुलयजमान:
३) विठ्ठलोवृद्धप्रपितामह:
४) खंडेराय: प्रपिताह:
५) गंगेतिप्रपितामही
६) नृसिंहेतिपितमह:
७) रमेतिपितामही
८) विठ्ठल:स्वपिता
९) गंगेतिस्वमाता
१०) रुक्मिणीतिमातृसपत्नी
११) रुक्मिणीतिमातृसपत्नी
१२) लक्ष्मीतिमातृसपत्नी
१३) सत्यभामेतिमातृसपत्नी
१४) गोविंदेतीमातामह:
१५) उडपितीमातु:पितामह:
१६) नृसिंहइतिमातु:प्रपितामह:
१७) श्रीनिवासामातुल:
१८) गणपति:श्वशुर:
१९) कृष्ण:श्वशुर:
२०) गोविंद:श्वशुर:
२१) केशवोगुरू:
२२) गोपालआप्त:
२३) रघुनाथ:स्वयंराजा
२४) काशीतिराराजमहिषी
२५) रमेतिराजश्री
२६) जानकीतिराजश्री
२७) कृष्णाख्य:सापत्नोबंधु:
२८) माधवाख्या:सापत्नोबंधु:
२९) पिशाचमोचनेश्वर:शिव:
३०) सर्वपापहरेश्वर:शिव:
विशेष आभार: श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, श्री दिलीप तुंगार, श्री सत्यप्रिय शुक्ल, मनोन खैरनार, सुयोग देवकुटे, अजय हातेकर, समिर वैद्य.
संदर्भ: तिर्थयात्रा प्रबंध, गणेश लेले
पेशवे कालिन त्र्यंबकेश्वर, दिलीप बलसेकर
गौतमी, भारत इतिहास संकलन समिती, नाशिक जिल्हा
त्र्यंबकगड- अंजनेरी-रामसेज, महेश तेंडुलकर
मराठा सरदार विठ्ठल शिवदेव विंचुरकर, डॉ. डी.एस. कुलकर्णी/प्रा. डॉ. एस.डी.खैरनार

सह्याद्री ट्रेकर ब्लॉगर


सरदार विंचूरकरांचा वंशवेल

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या महादरवाजावरचा शिलालेख:


या शिलालेखाचा भावार्थ: श्रीमंत बाजीरावसाहेब (पहिले) पंतप्रधान ह्यांचे पुत्र नानासाहेब यांनी या शिवमंदिरास शके १६७७ संयुवानामवत्सर मार्गशिर्ष अष्टमी भृगूवासर (शुक्रवार) या दिवशी आरंभ केला. पुढे त्यांचे नातू श्रीमंत माधवराव नारायण (सवाई माधवराव) यांच्या अंमलात शके १६०८ पराभव नामसंवत्सर माग वद्य चतुर्दशी रोजी हे कार्य समाप्त झाले. या कामावर नारायण भगवंत म्हणून कारकुन योजिला होता. त्याचे हातून आरंभ होऊन त्याचा पुत्र नागेश नारायण याच्या हातून कार्य समाप्ती झाली. (हे काम एकंर ३ वर्ष चालले होते असे दिसते).


Add caption

पेशवाईतील सर्वोच्च शिल्पकलेचा अविष्कार त्र्यंबकेश्वर मंदिराचे बारीक नक्षीकाम








निलांबीका मंदिरावरचे शिलालेख

निलांबीका मंदिरावरचे शिलालेख

कुशावर्त तीर्थावरील नंदी...


कुशावर्ताच्या बाहेरच्या भिंतीवरील गणपती आणि महिषासुर मर्दिनीस शेंदूर लावण्याचे प्रकार सुरू झालेत...

कुशावर्ताचे नक्षीकलांनीयुक्त प्रवेशद्वार


मुर्त्यांना शेंदूर लावण्याची प्रक्रिया: खरेतर मंदिरावरच्या कातळातल्या मुर्तींना शेंदूर लावण्याचीजुनी प्रथा, परंपरा नाही...तरही काही लोक गणपती, हनूमानाच्या मुर्तींना शेंदूर लावतात.
मग ते लोण इतर मुर्त्यांकडे जाऊन पसरते. एखाद्या मुर्तीला शेंदूर लावल्यानंतर शेंदराचे हात कशाला पुसायचे तर बाजुच्या दगडाला किंवा मुर्तीला. असे करत करत
नंतर तो दगड किंवा ती मुर्ती शेंदूरमय केली जाते. अरे या मुर्तीला कमी शेंदूर लावलेला दुसतो, असे वाटून पुढच्या वेळेस त्यामुर्तीला शेंदूर लावला जाते. कालांतराने हा समज रूढ होऊन
ही जुनीच परंपरा वाटू लागते...





2 comments:

  1. सुंदर माहितीचा धबधबा आहे हा लेख म्हणजे! मस्तच प्रशांतराव. धन्यवाद हे सगळं आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल.. _/\_

    ReplyDelete