Sunday, December 30, 2018

chand bibi mahal and heritage amhednagar


लग्न आणि डोंबल्यांचं हेरिटेज टूर...

अंगात भिनलेली उनाडकी, ती जाता थोडीच जाईल! हा पूर्व इतिहास पक्का ठाऊक असल्याने, 'तुम्ही लग्नाला जात आहात, ट्रेकला नाही, तेव्हा कपडेलत्ते सॅकमध्ये घालून न्यायचे नाहीत!' 'नातलगांशी बोलत चला' आणि हो, तुमच्या ट्रेकच्या निरसगप्पात कुणाला इंटरेस्ट नसतो, तेव्हा नातेवाईकांच्या मुलाबाळांची विचारपूस करा...
एक मीच अशी...बाकी सगळ्या बहिणींचे मिस्टर नियमीतपणे सगळ्यांची आस्थेवाईकपणाने चौकशी करत असतात...आल्या गेलेल्यांची त्यांना सगळी माहिती असते...कोण आजारी पडलं...कुणाच्या मुलाला कुठे अॅडमिशन मिळाली या सगळ्या गोष्टी त्यांना ठाऊक असतात',  'तुम्हाला मात्र कुळांची नावे, नातेवाईकांच्या मुलामुलींची नावे, ते काय करतात काय नाही, यातले ओ म्हणता ठोकळत नाही...तेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासाचे ज्ञान पाजळत बसू नका, कुटुंबाच्या इतिहासात जरा रस घ्या'...

या नाताळच्या सुट्टीत अहमदनगरला सौभाग्यवतींच्या बहिणीच्या मिस्टरांच्या भावाच्या मोठ्या मुलीचे लग्नाकरिता तब्बल पाच दिवस अगोदर जाण्याचे तगडे नियोजन होते. मला गोड भाषेत मिळालेला दम प्रत्यक्षात गंभीर स्वरूपाचाच होता...तो असा हसत हसत जाऊ देण्यासारखा नव्हताच. माझ्या नाताळच्या सुट्टीतल्या हमखास ट्रेकला यंदा पूर्णविराम मिळणार होता. मिळणार होता काय, तो मिळालाच!

माझी खरोखरच पंचाईत होणार होती. पाच दिवसांचे लग्न झोडण्याइतकी माझी प्रकृती 'तंदूरूस्त' नव्हती. त्या ऐवजी पाच काय, दहा दिवसांचा एखादा रेंज ट्रेक असता तर? पण करणार काय, ते औरंगजेबाचे फर्मान होते!
माझ्या हेरिटेज टूरचे किमयागार महेंद्र व येागेश

अहमदनगरहून खुद्द वधुपिता वीरूभाऊ हे पत्रिका द्यायला घरी आले, तेव्हा आमचा घरात पत्ताच नव्हता. 'नेमकं कुणी पाहुणे घरी आले की, तुम्ही ट्रेकवर असतात', हा नेहमीचा प्रश्न यंदाही उपस्थित झाला होत, पण सौम्य स्वरूपात. नुकत्याच १ ते ९ डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या आमच्या तथाकथित ऐतिहासिक सातमाळा भटकंतीच्या नियोजनात, कधी नव्हे ते आमच्या सौभाग्यवतींचे भरभरून सहकार्य मिळाले होते. माझी सगळी तयारी करण्यापासून, सगळे सहभागी रद्द झाले, तेव्हा काळजी करू नको, कोणी नाही आले तर मी तुझ्या सोबत येईन, असे म्हणे पर्यंत हे सहकार्य होते, त्यामुळे अहमदनगरचे पाहूणे पत्रिका द्यायला आल्यावर माझ्या घरातल्या अनूपस्थितीचा विषय तितका गाजला नव्हता.

सातमाळा मोहिमेकरिता मला मनस्वी सहकार्य मिळाले होते, आता अहमदनगरच्या लग्नाच्या मोहिमेला मनस्वी सहकार्य देण्याची माझी पाळी होती...आमचा पूर्व इतिहास खासा कलंकित, त्यामुळे, 'नगरला फक्त लग्नच अटेन्ड करायचे, ट्रेकबिकच्या भानगहीत काही पडायचे नाही', ही सूचना मला अगोदरच निक्षून देण्यात आली होती.

बरोबर २० डिसेंबरला ट्रेकला...सॉरीऽऽ लग्नाला रवाना होण्याच्या दिवशीच आमची मुख्य तेल घाणी नादूरूस्त झाली. त्यामुळे लग्न नावाच्या मोहिमेवर दोन दिवसांनी उशिरा निघण्याचे नियोजन झाले. आता सारी भिस्त ही उर्वरीत दोन घाण्यांवर होती, त्यांचा रखरखाव करण्यात मी स्वत:ला झोकून दिले होते. या सार्‍या भानगडीत लग्नाला निघायला २४ तारखेची दुपार उजाडली. आता मला अहमदनगरला प्यूअरली लग्नच अटेंड करावे लागणार होते. निझामशाहीचा महत्वाचा इतिहास वागवणार्‍या नगरच्या जून्या वास्तूंच्या दर्शनाची शक्यता पार मावळली होती.

आमच्यात लग्नाच्या आदल्यादिवशी देवीचे रात्रीचे जागरण असते. गेल्या अनेक वर्षात हा रातजागा मी अनूभवला नव्हता. संध्याकाळचे जेवण उरकून तमाम महिला वर्ग सजण्याधजण्यात व्यस्त असताना माझ्या धातीत कालवाकालव सुरू झाली होती. रातजाग्यात आता नेमकी कोणती भूमिका वठवावी लागणार? हा चिंतेचा विषय होता. तो सोडवण्यासाठी एक डाव टाकला...

मी: अगं, हे रातजागरण म्हणजे बायकांचे काम असते, तिथे आम्हा पुरूषांचे काही काम नसते.

ती:  तुम्हा पुरूषांचे नव्हे, तुमचे काही काम नसते, असे म्हणायचे आहे का?

या प्रतिप्रश्नातल्या उत्तराची धार ओळखून मी दोन पावले मागे आलो.

पण मग तिथे आम्ही करायचे काय?
ट्रेकला कॅम्पफायर करतात ना, तसाच हा कॅम्पफायर समजा...नाही गाता आलं तर निदान मुलांच्या गुणांना दाद तर द्या! आणि जरा आलेल्या गेलेल्यांची चौकशी करा!

आणखी एक तार्किक प्रश्न टाकला,
'पण तिथे तर गाण्या, नाचण्याचे आवाज असतील ना'
त्याचे उत्तर फक्त कटाक्षाने मिळणार होते!!

ही बहिणीकडच्या लग्नाला आल्यामुळे लग्नानंतरही दोन तीन दिवस थांबणार होती. माझी सुटका लवकर होणार होती. २५ डिसेंबरचे गोरज मुहुर्ताचे लग्न लाऊन रात्रीत नाशिकला परतून 'एखादा बेत' अर्थात एखादा ट्रेक हाणण्याचा माझा बेत एव्हाना बाद झाला होता.

'तुम्ही मुलीकडून लग्नाला आलात, तेव्हा सगळ्या कामात मदतीची अपेक्षा राहील. काम कोणी देणार नाही, तेव्हा ते मागून घ्या'. आता आमच्या साडूकडचा तमाम महाराणा संघ लग्नाच्या कामात बुडालेला बघायला मिळाला. मी बापूडा त्या अनोळखी शहरात काय काम करणार. एक तर लग्नातले एकुणएक काम कुणाला ना कुणाला उक्ते दिलेले होते. काही काम मिळते का म्हणून मी टकमक बघत होतो, तोच लहानग्या समर्थला कोणी तरी दुध आणायला सांगितले, मी झपाटून पुढे सरसावलो आणि कामगिरी मागून घेतली, परंतू अन्य एका पोराने ती माझ्या हातून हिरावून घेतली आणि गाडी घेऊन तो रवाना देखिल झाला. त्याचे नाव अर्थातच मला ठाऊक नव्हते!

एकदाचे लग्न यथासांग पार पडले. आमच्यात लग्न हे मध्यरात्रीच्या समयी लागते, फक्त मंगलअष्टके गोरज मुहुर्तावर होतात, पाहुणे मंडळे जेवण घेऊन रवाना होते आणि मग आमचा पारंपारिक लग्नविधी मध्यरात्री पर्यंत सुरू राहतो. (कोंबडं आरवण्याच्या आत वधू सासरी रवाना झालेली पाहिजे ही अट असते...आंबेजोगाईत एक लग्न सकाळ पर्यंत सुरू राहिल्याने सारी वरात दगड बनली. त्या दगडांकीत वरातीचे पुतणे आंबेजोगाईत असल्याची माहिती मला माझ्या मावशीकडून मिळाली होती. बालपणी ती पुरातन शिल्प मी बघितली, परंतू ती घटना नीट स्मरत नाही)














थंडीचा जोर असल्यामुळे मंगल कार्यालयाच्या लॉनवर अंगात थंडी भरून आली. ''ट्रेकवर आपल्याला कधी थंडी वाजते?'' या प्रतिप्रश्नाने मुक्कामाच्या ठिकाणी परत जाण्याचा विषय एका झटक्यात निकाली काढण्यात आला. महेंद्र आणि विरूभाऊ या दोघांनी अपार मेहनत घेऊन एक देखणा लग्न सोहळा पार पाडताना आम्हाला कामाची कुठलीच तोशिष पडू दिली नाही. दुसर्‍या दिवशी कडाक्याच्या थंडी मुळे मला दुपारचे जेवण होऊन रवाना होण्याचा आग्रह झाला. सगळ्या पाहूण्यांना रवाना करताना महेंद्र मला सारखे, थांबून जा! असे सांगत होता. 

अॅकॅडमीकली, लग्न पार पडल्याने आणि ट्रेक बिक हा विषय माझ्याकरिता अगोदरच बाद करण्यात आल्याने मी, परतण्याची तयारी केली होती. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत एक एक पाहूण्याला रवाना करून महेंद्रने हळूच विषय काढला, 'थांब तुला चांदबीबी महालावर घेऊन जातो'.  ही सूवार्ता मी मनातच ठेवली असती तर बरं झालं असतं!

लग्नाच्या दुसर्‍या दिवशी मी थांबल्यामुळे सौभग्यवतीं आदंनात होत्या. मी आनंद प्रकट केला, 'अगं महेंद्र मला चांदबीबीचा महाल बघायला घेऊन जातोय, माझं थोडं का होईना, हेरिटेज नगर बघून होणार? 

तो किती दमला आहे, कळत नाही, कसलं डोंबल्याचं हेरीटेज टूर करता? या प्रतिहल्ल्याने मी थोडा गांगरला...पण महेंद्रने, 'भक्ता, काळजी नसावी'च्या अविर्भावात इशारा केला. मी त्याला लगेच सांगितले, अरे तू खुप दमला आहेस. आठवड्याभरापासून जोरदार धावपळ सुरू आहे. पुढच्या वेळेला बघू.

निझामशाहीतला मातब्बर प्रधान सलाबत खानाचा मकबरा आणि भोवतालचा कोट
मागच्या वेळेस नगरचा भूईकोट किल्ला दाखवून आणणार्‍या महेंद्रने माझ्याकरिता खरोखरच लवकर जेवण उरकले. येणारे प्रत्येक काम मार्गी लावत, मोठी गाडी कामासाठी बाहेर गेली असताना त्याने, 'मी काही वर येणार नाही खाली बसून राहील, तु बघून ये सांगत त्याने दुचाकीला सेल मारला.

चांद बिबीचा महाल, नगर गावात असावा अशी माझी कल्पना होती. जिल्हा बॅंकेसमोर मित्राच्या दुकानाजवळ गाडी लाऊन महेंद्रने त्याचा मित्र योगेशला बोलावून चांदबीबी महालाला जायचेय असे सांगितले. अवघ्या पाच मिनीटात हजर होताना या पठ्ठ्याला आपल्या गृहमंत्रालयाला राजी करावे लागले हे त्याच्या मोबाईल फोनवरच्या संभाषणावरून स्पष्ट होत होते. 

महेंद्रने ओळख करून दिली, हा प्रशांत माझा साडू, नाशिकला असतो...याला ऐतिहासिक स्थळे बघण्याची...गडकिल्ले फिरण्याची आवड आहे. योगेशने चांदबीबीचा महाल ज्या डोंगरावर आहे, तो शहा डोंगर आज नगरकरांचे आकर्षण बनल्याची माहिती दिली. अतिशय प्रमाणबद्द बांधकाम असलेला हा महाल उत्तम स्थितीत असून सुट्टीच्या दिवशी तिथे अलोट गर्दी होते. रोज सकाळी व्यायामासाठी या डोंगरावर जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. लोक नगरवरून आता सायकली घेऊन येतात, तर काही जण धावत डोंगरावर जातात. येथे मोर व हरणे बर्‍याचदा दृष्टीस पडतात. बिबट्याचे मात्र येथे कोणतेच अस्तित्व नाही. इतर सगळ्या ठिकाणांप्रमाणे तरूणाई इथल्या महालात सेल्फी फोटोबाजीसाठी येते तर काही जण भिंतींवर आपल्या कथित प्रेमाचा बाजार मांडतात, तो पूसण्यासाठी नगरमध्ये मॉर्निंग वॉक करणार्‍यांचा गट कार्यरत आहे. योगेश आणि महेंद्र यांच्याकडून अशी एक एक माहिती मिळत असताना आम्ही शहा डोंगराच्या पायथ्याजवळ आलो. योगेशने वर जाण्याच्या पायवाटा दाखविल्या. आमच्याकडे वेळ थोडा असल्याने आम्ही थेट गाडी वर नेली. येथे जाण्याचा घाटरस्ता उत्तम असल्याने घाटात गाड्यांची बर्‍याचदा रिघ लागते! सुट्टीच्या दिवशी अलोट गर्दी असते. 
चांदबिबीचा महाल...की सलाबतखानाचा मकबरा...वास्तू मात्र सुबक, टोलेजंग!

पायथ्याला शहापूर गाव, त्यामुळे याला शहा डोंगर हे नाव निझामशाहीत पडले असावे. डोंगराचा निष्पर्ण पसारा अगदी दुर अंतरावरून नजरेत खुपतो. वनखात्याने महाराष्ट्रातल्या अनेक डोंगरांप्रमाणे येथेही रेन ट्री, ग्लिरिसीडीयाचे मोनोकल्चर आणल्यामुळे संपूर्ण डोंगर भकास झाला आहे. डोंगरावर उगवणारे गवत टिकू देण्याचा तर प्रश्नच नाही. पूर्णपणे चराई करून साफ झालेल्या या डोंगरावर त्यामुळेच गवताच्या आश्रयाने वाढणारी जीवसृष्टी सुद्धा फारशी नसावी अशी स्थिती आहे.

चांदबीबीचा महाल ही मोठी गौरवशाली वास्तू आहे, हे दूर अंतरावरूनच जाणवायला लागते इतके ते विशाल बांधकाम आहे. चहूबाजुंनी दगडाच्या सुबक बांधणीचा कोट असून कोट आणि महाल ही दोन्ही बांधकामे एकाच वेळ करण्यात आल्याचे जाणवते. आवारात पूर्व बाजूने लोखंडी प्रवेश द्वार असून त्या जवळ पुरातत्व खात्याने दगडात कोरलेल्या माहितीवर, 'सलाबत खानाचा मकबरा', असे लिहीले आहे. हा चांदबीबीचा महाल नाही, पण नगर मध्ये त्याला त्याच नावाने संबोधले जाते. सरकारी दिशादर्शन पाट्यांवरही चांदबीबीचा महाल, असेच रंगवले आहे. 
वास्तूचे गुढ एकमात्र चिंचोळ प्रवेशद्वारा

लांबून पाहताक्षणी प्रेमात पडावे इतकी ही देखणी वास्तू आहे. २१.४ मिटर उंची आणि तीनच मजले यावरून बांधकामाची भव्यता लक्षात येईल. कोणतेही नक्षीकाम नसलेले हे बांधकाम जितके भव्य तितकेच ते सुबक आहे. अष्टकोनी चबुतर्‍यावर अष्टकोनातली स्तभाच्या आकाराची रचना अनोखी आहे. सगळेच दगड समप्रमाणात घडवून कमानी यच्चयावत एकजात सारख्या आहेत. 

सुबक दगडात अष्टकोनाची बाहेर जशी बाजू तसाच आतमध्ये खालपासून वर पर्यंत अष्टकोनात हा मकबरा उठावला आहे. प्रत्येक मजल्यावर प्रत्येक कमानीच्या आतील छत अर्ध गोलाकार असून ही गोलाई वर निमुळती होत जाते. बांधकामाच्या दृष्टीने अतिशय अवघड असलेले असे २४ लहान घुमट आहेत. मुख्य मकबर्‍याचा घुमट मोठा असून तोही पूर्णपणे अर्ध्यवर्तुळाकार आहे. हे सगळेच्या सगळे घुमट लहान दगडाच्या चिर्‍यात बांधले आहेत.  गणित, भुमीती, मापे, चुन्यात दगड सांधण्याचे शाश्वत तंत्र,दगडांचे एकमेकांना केलेले लॉकिंग, चौकोनी, गोलाकार व अन्य आकारातली दगड कटाई इतकी अचूक की घुमटाचा गोलही अगदी परिपूर्ण असे सगळे काही येथे बघायला मिळते. संपुर्ण मकबरा हा आतील बाजूने व्हरांडा आणि मधोमध खालपासून छतापर्यंत पर्यंत एकजात मोकळा आहे. ओबडधोबडपणा कुठेच नाही. या वास्तूत महाल असण्याचे कोणतेच लक्षण नाही. वर जाण्यासाठी एक चिंचोळे प्रवेशद्वार. खोल्या किंवा स्वच्छतागृह अशी कुठलीच रचना आत संभवत नाही, त्यामुळे याचे बांधकाम हे महाल म्हणून केलेले नाही हे स्पष्टच होते. मग इतके विशाल आणि सुबक बांधकाम करण्याचे प्रयोजन तरी काय असावे?


आपल्या हयातीत सलाबत खानाने खरोखरच कबर बांधण्यासाठी इतकी मोठी वास्तू उभारली असेल?

छताला काही ठिकाणी दगडाचे सांधण थोडे हलल्याचे जाणवते व त्यातून पावसाचे पाणी रिसत असावे. मुख्यघुमटातूनही पावसाचे पाणी रिसत असावे, अशा चून्याच्या धारा दिसून येतात. ज्या ठिकाणहून मकबर्‍याच प्रवेश होतो, त्याच्याच उजव्या बाजूने एक तळघर असून या अष्टकोनी तळघराचे बांधकामही तितकेच सुबक आहे. त्यात दोन कबरी आहेत.  नगरच्या निझाम पहिल मुर्तझा याचा वझिर सलाबतखान दुसरा याने १५६५ ते १५८८ या काळात त्याच्या जितेपणीच आपल्या व आपल्या पत्नीच्या कबरीकरिता हा मकबरा बांधला, असे सांगितले जाते. एक वेडगळ राजा म्हणून या मुर्तझाची कारकिर्द ओळखली जाते. 

सलाबत खानाने विषाचे तीन पेले केले...त्याच्या ज्या पत्नीने विष नाही घेतली तिची व तिच्या कुत्र्याची कबर बाहेरच्या बाजुला...तर सलाबत खानासोबत मृत्यू कवटाळणार्‍या पत्नीला मुख्य मकबर्‍यात स्थान मिळाल्याची आख्यायिका. एैकायला मिळते.
हा चांदबीबीचा महाल असण्याची कोणतीच शक्यता वाटत नाही. नगरच्या प्रसिद्द भूईकोट किल्ल्यात विजापूरच्या खालोखाल देखणे महाल होते, अशा ऐतिहासिक नोंदी असल्याचे कळते. सुरक्षित आणि सुसज्ज असा किल्ल्यातला निवास सोडून चांद बीबी सारखी लढवैय्यी, जिने बलाढ्या मुघल फौजेला ताकास तुर लागू दिली नाही, ती अशा निर्जन ठिकाणी निवास करत असेल यावर विश्वास बसत नाही. खुद्द सलाबत खान सुद्धा त्यात निवासासाठी थांबला नसेल. अन्यथा तळघरात कबरीच्यावर निवासस्थान ही मुसलमानी राजवटीची पद्दत कुठेच आढळत नाही. 

तळघरातली कबरही नक्कल असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येते. मुसलमानी राजवटीत प्रसिद्दी व्यक्तींना दफन केल्यानंतर त्याच्या वर कबरीची नकल करण्याचा प्रघात आढळतो. ताजमहालातही तसेच आहे. 
इंग्रज आमदनीत अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांसाठी या मकबर्‍यात निवासीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाला होता, त्यासाठीच वर पर्यंत घाटरस्ता तयार करण्यात आला. परंतू शहा डोंगरावर पाणी कुठेच नाही. पावसाचे पाणी तिथल्या तीन्ही तलावात पुरेसे साठत नाही. शिवाय येथे हवेचे प्रमाणही खुप आहे.

टोलेजंग मकबर्‍याचा मुख्य घुमट म्हणजे भव्य, सुबक, अप्रतिम बांधकामशास्त्राचा नमुना
जिल्हाधिकार्‍याचे निवासस्थान होऊ शकले नाही, तेव्हा इंग्रजांनी या मकबर्‍याच्या कमानींना काचेची मोठाली तावदाने लाऊन अधिकार्‍यांचे विश्रामगृह बनविण्याचा प्रयत्न केला, परंतू तिथले वातावरण विश्रामाकरिता योग्य नसल्याने इंग्रजांना तेथे वास्तव्य करता आले नाही, अशा नोंदी इंग्रजांनी गॅझेटियरमध्ये लिहून ठेवल्या आहेत. 

दिवस लहान असल्याने सूर्य कलू लागला तसे आम्हाला परतीचे वेध लागले. नगरच्या वारसौ दौर्‍याचा हा लहानसा अंश होता. दगडातील अप्रतिम कॅलिग्राफी आणि नक्षीकामाचा उत्कृष्ट नमूना असलेली दमडी मशिद, आलमगिर, जिथे मुघल बादशाह औरंगजेबचा मृत्यू झाला, बागरोजा आणि त्याच्याच जवळ असलेली १९६५च्या तालिकोट युद्धात शौर्य गाजवणारा गुलामअली हत्तीची कबर, फराहबक्ष महाल आणि आसपासच्या असंख्य निझामशाही वास्तुंचा मनमुराद वेध घेण्यासाठी वेळही तितकाच जास्त लागणार होता. 


परतीच्या वाटेवर, निझामशाही पूर्वीच्या ऐतिहासिक खाणाखूणांबद्दल मी योगेश व महेंद्र यांना मुद्दाम विचारले तर त्यांनी दोन तीन ठिकाणी काही जुनी हिंदू पद्दतीची बांधकामे असल्याची माहिती दिली. एक तर शहा डोंगराच्या अगदी मागेच असल्याचे समजले व मी तिथे जाण्याचा आग्रह धरला. महेंद्रलाही त्याच्या गृहमंत्रालयातून एव्हाना फोन सुरू झाले होते, तशातच आम्ही वीरभद्र मंदिराकडे कुच केली. जंगम समाजाकडे ताबेदारी असलेल्या या मंदिराच्या बांधकामा संबंधी माहिती देणारे तिथे कोणीच नव्हते. बांधकाम यादव कालीन असावे असे वाटत होते. मी योगेशला मुद्दाम या परिसरात काही शिलेलेख वगैरे आहेत का असे विचारले, तर त्याने यामंदिरात असंख्य वेळा येऊन गेल्याचे व दगडावरचे कोणतेच लेख नसल्याचे सांगितले. मंदिराच्या बाहेर पडत असताना एका पडक्या बारवाचे काम दृष्टीस पडले. मी कमीनी दरवाजातून आत गेलो तर रस्ता विटांच्या भिंतीने बंद करण्यात आला होता. पलिकडच्या बाजूने विहीरीत डोकावून परतत असताना अचानक वरच्या बाजूला एक ठसशशीत शिलेलेख दिसला. परतण्याची खुपच घाई असल्याने त्याचे दुरून छायचित्र घेता आले. 

परवानगी नसताना माझ्या नगरच्या हेरीटेज टूरची शानदार सुरूवात झाली होती. महेंद्रने आणखी एकदा खडा टाकला, आज रात्री मुक्काम करून जा, उद्या तुला काही तरी द्यायचे आहे. लग्नात आलेल्या पाहुणे मंडळींना टॉवेल, टोपी दिल्याशिवाय रवाना करत नाही. मला फक्त टॉवेल, टोपी साठी महेंद्र थांब म्हणणार नव्हता.
सहाशे वर्षात धक्का पोहोचला नाही असे बेजोड बांधकाम

थंठीचा कडाका दुसर्‍यादिवशी सकाळी वाढला होता. माझे सकाळचे साडे सहाचे प्रस्थान आता दहा वाजेला नियोजीत करण्यात आले होते. परतीची बॅग तयार होती. दहा वाजता जेवण घेतले आणि महेंद्रने जर माळीवाड्यात जाऊन येऊ अशी साद घेतली. तिथल्या ओळखीच्या दुकानातून त्याने सरदार ना.य. मिरीकरांचे नगरच्या इतिहासावर १९१६मध्ये लिहीलेल्या पुस्तकाची तिसरी नवी कोरी आवृत्ती घेऊन दिली. त्यानंतर तो अहमदनगर ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयाच्या आवारात घेऊन गेला. या  वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीचे दुरूस्तीचे काम सुरू असल्याने ते सद्या बंद आहे, पुढल्या वेळेस येथे तुला भरपूर खाद्य मिळेल असे सांगून आम्ही बाहेर जाऊ लागलो. तोच महेंद्रने आत जाऊन बघूया असे सांगितले. आतील कर्मचार्‍यांनी वस्तूसंग्रहालय सद्या बंद असल्याचे सांगितले. 
हरिश्चंद्रगडावरील नरसिंहाची मुर्ती १२वे शतक

आल्यासरशी मग त्यांची काही प्रकाशने मिळतील का याची चौकशी केली. त्यांनी काही पुस्तके आणून दिली. ती सगळी घेतल्यानंतर माझी कोपर्‍यातल्या मुर्तीवर नजर गेली. त्यावर लिहीले होते किल्ले हरिश्चंद्रगड...पाय त्या क्षणी स्तब्ध झाले. हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर एका भव्य तलावाच्या अवशेषांचा आम्हाला नुकताच शोध लागल्याचे सांगून या वस्तू संग्रहालयाकडून आवश्यक माहिती मिळू शकेल का याची चौकशी केली. आणखी एका मुर्तीने लक्ष वेधून घेतले, ती होती रतनगडच्या अमृतेश्वर मंदिरातली गणपतीची मुर्ती. 

आज नशिब चांगले महेरबान होते. स्वराज्यासाठी हौतात्मय पत्कारणारे कोल्हापूर संस्थानचे चौथे शिवाजी यांची समाधी बघता आली नाही. संभाजी महारजांचा मुघलांनी वध केला, त्या प्रसंगीचे दुर्मिळ असे चित्र बघण्याची संधी मिळाली नाही, परंतू ध्यानी मनी नसताना अहमदनगरचे जे काही वारसा दर्शन घडले मन समाधान पावले.

नगर शहराच्या आसपास पुरातन वारसा खजिना स्वरूपात विखूरला आहे. इथले सव्वा मैल लांबीचा भूईकोट किल्ला पुन्हा बघायचा आहे. मुघल आणि आदिलशहा यांच्या संयुक्त फौजांनी शहाजी राजांच्या नेतृत्वाखाली जिथे पराभवाची धुळ चाखावी लागली, ते भातवडी, पारनेरचा परिसर, यादव, सातवाहन, राष्ट्रकुट आदी काळातल्या इतिहासाच्या असंख्य खाणाखुणांनी नगर समृद्ध आहे. 
मावळतीच्या सूर्याची तिरीप मकबर्‍याची शोभा वाढविताना

मकबर्‍याच्या आवारातला विशाल वृक्ष आणि तितकाच विशाल पार

बुलढाण्याच्या या सदगृहस्थाने या पुराणवास्तूची भिंत अशा ठिकाणी विद्रुप केली की, ती स्वच्छ करणेही मुश्कील

सूर्य अस्ताला जाताना त्याची थोडी लाली अशा देखण्याठिकाणी रोजच सोडत असेल

मकबर्‍याच्या बाहेरचा विशाल तलाव व त्याची भली चौडी भिंतं.


---








3 comments:

  1. Pp जबरदस्त माहिती,
    आणि लेखाच्या सुरवातिची श्री व सौ परदेशी (तुमची) जुगलबंदी तर अप्रतिम,

    माहिती पूर्ण लेख आणि छायाचित्रे

    ReplyDelete
  2. भारी झालाय ब्लाॅग... ऐतिहासिक माहिती, स्थलदर्शन आणि कौटुंबिक कार्याची गुंफण चांगली जमलीय...

    ReplyDelete