Saturday, August 20, 2016

पावनखिंड: इथले रण अजून सरले नाही!

पावनखिंड: इथला चिखल...इथले दगड, 'त्यादिवशी काय घडले'? याची कहाणी भरभरून सांगण्यासाठी आतुर असतात!
     बुद्धिबळाचा खेळही किती अनोखा. पहिली चाल पांढर्‍या सोंगट्या खेळतात. युद्धाची दिशा तेच ठरवतात. काळ्या सोंगट्या ज्या चालीने प्रतिउत्तर देतात, त्यावरून युद्धाचा प्रकार ठरतो. पांढर्‍या सोंगट्यांना नेहमी प्रबळ व काळ्या सोंगट्यांना नेहमी दुय्यम मानले गेले आहे. विजयाची जास्त संधी ही नेहमी पांढर्‍यांनाच.
१६५९च्या पन्हाळगड-विशाळगड युद्धात पहिली चाल विजापूरच्या आदिलशाहने रूस्तम इ जमान व फाजल खान ही पांढरी मोहरी पुढे सरकवून खेळली व थेट सिद्धी जोहरच्या रूपाने वझिर मैदानात उतरवला. एका घनघोर संघर्षची ती नांदी होती.
अफजुल खानच्या वधानंतर शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा वारू आदिलशाहीत चौखुर उधळत होता. आदिलशाहीतल्या कोल्हापूर प्रांतात केवळ १४ दिवसात त्यांच्या फौजांनी २३ ठाणी काबिज केली. चिंचा पाडाव्यात तसे मराठे आदिलशाही ठाणी जिंकत होते. आदिलशाहीचा सीमेवरचा प्रबळ गड पन्हाळा केवळ तिन दिवसात जिंकुन घेणार्‍या शिवाजी महाराजांनी, 'डाव सुरू झाला आहे हे पटकन कसे ओळखले', हा विचार आपल्याला आज स्तिमित करतो.
सिद्धी जोहरला, 'राज्य जिंकण्यापेक्षा आपल्याला पकडण्यातच खरा रस आहे', ही पक्की खबर प्राप्त झालेल्या शिवाजींनी बुद्धिबळाच्या प्रचलित नियमांना फाटा दिला. 'युद्धाची दिशा पांढरी नव्हे तर काळी सोंगटी ठरवतील', असा हा प्रचंड उलटफेर. बरं, 'युद्धही तुमच्या रणक्षेत्रात होऊ द्या, तेही दोन तिन दिवसात जिंकता येणार्‍या लहानग्या उंचीच्या पन्हाळगडी', ही सिद्धीला खास सवलत.
दुसरीकडून मोगली शास्ताखानच्या रूपाने पटावरचे पांढरे हत्ती मैदानात उतरले, तेव्हा काळ्या सैन्याची दशा केवढी चिंतनीय झाली असेल? याचा विचारसुद्धा करवत नाही. स्वराज्यावरच्या संकटाला पारावार उरला नसताना शिवाजी राजांनी असा सोपा डाव का बरं मांडला असेल?
तुम्ही जर पन्हाळगड बघितला असेल तर, 'राजांनी खरोखरच इतकी मोठी जोखिम त्यावेळेला का पत्कारली', असा विचार नक्की तुमच्या मनात येऊ शकतो. सिद्धीला देखिल त्यावेळी तेच वाटले असणार. एकतर त्याच्या परिचयाचा प्रदेश, त्यात पन्हाळगडा सारखा छोटासा किल्ला किती काळ तग धरणार? असा विचार करून त्याने म्हणे ४० हजार सैनिकांचा वेढा देऊन स्वराज्या समोर सर्वात मोठे आव्हान उभे केले. सोबत म्हणे ३० हजार बाजार बुणगे होते, जे युद्धा पश्चात व्यापार आदी संधीच्या लालसेने सिद्धीच्या सोबत सामिल झालेले.
आता पांढर्‍यांच्या धडकांवर धडका सुरू झाल्या. स्वराज्याच्या नैऋत्य दिशेला वझिर सिद्धीच्या, तर पुण्यात ठाण मांडून बसलेल्या शास्ताखानच्या पूर्व दिशेकडून. राजा पडला की युद्ध संपले, तेव्हा काळ्या राजाने पन्हाळगडात स्वत:ला उत्तम प्रकारे कॅसलिंग करून घेतले.

११व्या शतकात शिलाहारांचा नावाजलेला राजा भोज याने बावडा, भूधणगड व विशाळगडासोबत पन्हाळदूर्ग बांधून काढला. सातार्‍यात सापडलेल्या ताम्रपत्रात भोज राजाचा दरबार पन्हाळगडावर भरायचा. बाराव्या शतकाच्या मध्याला देवगिरीच्या यादवांचा सर्वात ताकदवान राजा सिंघण याने शिलाहारांकडून पन्हाळा घेतला. त्यानंतर कोकणा सोबतच्या व्यापार मार्गावरचा हे सर्वात महत्वाचे ठाणे विजापूरच्या आदिलशाहने बिदरच्या बहामनी सुल्तानाकडून जिंकून घेतले. असा हा महत्वाचा गड तीन दिवसात घेणार्‍या शिवाजी महाराजांनी गड ताब्यात घेतल्या बरोबर त्याची उत्तम मजबूती करून घेतली, सिद्धीच्या कराल जबड्यात सापडण्याच्याही अगोदर. काय योजना असतील त्यांच्या. राजकारणात त्यांची नजर पुढचे किती पटकन वाचायची!
'समुद्र सपाटीपासून ८४५ मिटर उठावलेला पन्हाळगड जमिन सपाटीपासून केवळ ४०० मिटरवर उभा आहे. हा गड राजांनी कसा लढवला असेल', हा विचार आपली मती अक्षरश: गुंग करून टाकतो. पावनगड मिळून पन्हाळगडाचा घेर ९ मैल म्हणजे जवळ जवळ १४ किलो मिटर इतका आवाढव्य...पण त्याची खुजी उंची ही सगळ्यात चिंतेची बाब. त्यामुळेच शिवाजी महाराजांसारखी अत्यंत मोलाची शिकार पन्हाळगडात थांबल्याचे बघून सिद्धीच्या तोंडाला पाणी सुटले असावे...त्याने वेढा घातला तेव्हा पन्हाळगडावर २०००ची शिबंदी होती...इतक्या तुटपुंज्या सैन्यबळावर शिवाजी राजांना कोण भरवसा असेल! कल्पना करवत नाही. बरं अहोरात्र डोळ्यात तेल घालून पहारा तरी कुठं कुठ देणार. पन्हाळगडावर थोडी थिडकी नव्हे तर ११० ठिकाणे आहेत, जिथून शत्रुसैन्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवावी लागते...तुमचे पंचविसटक्के सैन्य टेहाळणीसाठी व पंचविसटक्के नित्य कामांकरिता जरी गृहीत धरले तरी हजारभर सैन्यावर इतका अफाट पसारा असलेला एक खुजा किल्ला लढवायचा, हा विचारही करवत नाही...युद्धाची महाराजांची गणित केवढी अजब असतील, नाही!

नाशिक परिसरातला उंचच उंच गड नी डोंगर बघणार्‍या माझ्या बुद्धिला या पन्हाळगडा विषयी नेहमीच मोठे कुतुहल राहिले आहे. पन्हाळगड हा उंचपूरा किल्ला असेल का? तो पुरेसा आक्राळविक्राळ असेल का? अन्यथा शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहरच्या रूपाने उदभवलेल्या एका भयंकर संकटसमयी याची निवड कशी केली असेल? एका घुमक्कड मित्राला मागे एकदा पन्हाळगडाबद्दल विचारले तेव्हा, हा फार सुरक्षित किल्ला नाही, हे त्याचे पहिले मत. अरे उंचीला अगदीच खुजा असा हा किल्ला...आकारविस्ताराने भलेही मोठा असेल, पण वर एक संपुर्ण नगर वसले आहे...मोटरगाड्यांची सारखी ये-जा असते...हे उत्तर मिळाले.
शिवाजी राजांनी अशा किल्ल्याची निवड केली? खरोखरच हा अजिंक्य किल्ला असू शकतो का? जो किल्ला स्वत: शिवाजींनी आदिलशाही अंमलातून तीन दिवसात जिंकून घेतला. (पुढे एका प्रसंगात तर कोंडोजी फर्जंदांनी केवळ ६० मावळ्यांनिशी पन्हाळगड घेतलेला.)

पांढर्‍या मोहर्‍यांच्या अफाट ताकदिसमोर हा गड सुरक्षित कसा काय राहिला? काळा राजा त्यावर सुरक्षित कसा राहू शकला? काळ्यांनी पांढर्‍यांचे मनसुबे कसे हाणून पाडले? या सार्‍या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी १७, १८, १९ व २० जुलै २०१६ अशा चार दिवसीय पन्हाळगड ते विशाळगड पद्‌भ्रमण मोहिमेत सहभागी झालो.
नाशिकहून माझ्या सोबत डॉ. हेमंत बोरसे व आर्किटेक्ट महाविद्यालयाचा व्याख्याता प्रशांत पवार असे आम्ही तिघे होतो. नाशिकच्या महामार्ग बस स्नथानकावर कसारा ते मुंबई या लोकल रेल्वेशी जोडलेली बस आम्ही १६ ऑगस्टला दुपारी १-३० वाजता पकडली. दिडतासात आम्ही कसारा गाठले. पावसाळ्यात घोटी-इगतपूरी-कसारा या परिसराच्या नुसत्या दर्शनाने माणसाचे मन प्रसन्न होते, इतका ढग, पाऊस व हिरवाईचा या परिसरावर अलोट स्नेह आहे. पावसाळ्यात या परिसराला एक वेगळीच प्रसन्नता येते. असंख्य झरे, व धबधबे कसार्‍याच्या डोंगरकड्यावरून झेपावताना सर्वत्र दिसत असताता.
कसारा स्नानकावर आमच्या लोकर रेल्वेचे आगमन होण्यापूर्वीच तोबा गर्दी लोटली होती. या स्थानकावरचे हे तसे दुर्मिळ दृष्य, परंतू शनिवार असल्याने मुंबई व आसपासची असंख्य मंडळी या परिसरातील सृष्टीसौंदर्य बघायला आवर्जुन येतात, त्यामुळेच ही गर्दी.
आम्हीही इरसाल भटके, नाशिकहून सायंकाळी सातची कोल्हापूर बस पकडली असती तर भल्या सकाळी आरामात कोल्हापूर गाठता आले असते. शिवाय, बसच्या स्लिपर कोचचा व आरामदायी व्होल्वो प्रवासी बसचा पर्याय असताना आम्ही आडमार्ग निवडला. नाशिक-कसारा-ठाणे, तिथून महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूर असा हा बेत. त्याचे कारणही तितकेच रोमांचक. आमचे काही भटके मित्र मुंबईकर, त्यांच्याशी फक्त एखाद्या भटकंती प्रसंगीच भेट होते. आता चार दिवस सोबतच राहणार असलो तरी जरा जास्त गप्पा-टप्पा रंगवता याव्यात म्हणून आम्ही मुद्दाम ठाणे गाठले. तिथे आमच्यात केदार देशपांडे उर्फ केडी व शैलेश राव हे दोघे सामिल झाले.
शिरसत्या प्रमाणे मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनन्सवरून निघालेली महालक्ष्मी एक्सप्रेस ठाण्यात येई पर्यंत अर्ध्या तास विलंबाने धावत होती. एकदाचे गाडीत स्थानापन्न झाले. शैलेशने सोबत बांधून आणलेल्या झगमगीत जेवणावर ताव हाणला व सुरू झाला आमच्या गप्पांचा फड...
दुसर्‍या दिवशी सकाळी ७-३०ला कोल्हापूरच्या छत्रपती शाहू टर्मिनसवर आमचा प्रवास थांबणार असल्याने व त्यापुढे चुकुनही जाण्याची इच्छा नसल्यामुळे आम्ही अंमळ लवकर झोपण्याचा निर्णय घेतला.
मध्यरात्री पुसटशी जाग आली तेव्हा जाणवले की, महालक्ष्मी एक्सप्रेस भयावह रित्या वेगात धावत होती.
भल्या पहाटे उठून मी गाडीतच सकाळची आन्हिकं उरकली, तर बाकीची मंडळी रेल्वेस्थानकावर ताजीतवानी झाली. स्थानकाबाहेर आमच्या हक्काच्या गोकुळ हॉटेलात नाष्त्यावर आम्ही मनमुरात ताव मारला व पुन्हा रेल्वेस्थानकाच्या परिसरात परतलो तसा आमचा नेबापूरला जाण्यासाठी कोण कोणते पर्याय उपलब्ध आहेत याचा शोध सुरू झाला.

३६५ वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहरच्या कराल विळख्यातून पन्हाळगडावरून स्वत:ची सुटका करून घेतली व ते विशाळगडापर्यंत पळत गेले. एका दमात या मंडळींनी ६५ किलो मिटर्सचे अंतर पार केले...सर्व पलायन हे पायी...रिपरिप कोसळणार्‍या पावसात चिखलाने भरलेला हा खतरनाक प्रवास...जहुबाजुंनी आदिलशाही फौजा वेड्यागत यांना शोधताहेत आणि ही तुटपुंजी फौज आपल्या राजाला सुरक्षित करण्यासाठी, विशाळगडाचे ठाणे गाठण्यासाठी जिवाची बाजी लावताहेत, त्या मार्गावरून पदभ्रमण मोहिमेकरिता आम्ही मुंबईच्या शिवशौर्य संस्थेच्या मोहिमेत सहभागी झालो.
बसला वेळ असल्याने आमच्या समोर ऑटो रिक्षा पेक्षा आकारनाने मोठी असलेल्या टमटम रिक्षाचा सुंदर पर्याय समोर आला...परंतू का? कोण जाणे? नेबापूर काहींच्या चटकन लक्षात आले नाही. एक मुस्लीम युवक आपली टमटम दामटवत असताना त्याला थांबवले, तर त्याने नेबापूर नावाच्या गावाबद्दल अनभिज्ञता दर्शविली. डोक्यावर विणलेली गोल टोपी असली तरी गडी अस्सल कोल्हापूरी बाजातले मराठी बोलत होता, त्याचे आम्हाला कुतुहल वाटले.
'पन्हाळगडाचा घाट अवघड आहे, तुमचे नेबापूर का काय! ते ठिकाण मला माहित नाही, पण ४५०/- रूपये होतील', असे त्याने सांगिले. नेबापूरवरून आमच्या मोहिमेचा पहिला दिवस सकाळी ८-३० वाजता सुरू होणार असल्याने आम्ही केवळ २२ किलो मिटर्स अंतराकरिता ही रक्कम मोजण्यास तयार झालो. शिवाय आमच्या पाचही जणांकडे चार दिवसांच्या हिशेबाने प्रत्येकाजवळ पाचमोठाल्या ट्रेकिंगच्या सॅक व प्रत्येकाकडे एक वेगळी पिट्टू होती. टमटमात हे सगळे व्यवस्थित कोंबून आम्ही पटकन कोल्हापूर सोडले.
रस्त्याने दोनच दिवसांपूर्वी पंचगंगा नदीच्या पुराने मांडलेल्या पुराच्या खुणा आसपासच्या मळ्यात चिखलाने माखलेले उसाचे पिक बघून स्पष्टपणे दिसत होत्या. आमच्या मनात मात्र एकच विचार घोळत होता...शिवाजी राजांना सुरक्षित ठेण्यासाठी ज्याने आपल्या प्राणाची आहूती दिली त्या शिवा काशिदचे नेबापूर खरोखरच कोल्हापूरच्या टमटम चालकांना ठाऊक नसावे?
नेबापूर गाठले तेव्हा कळले की, आपण तर अगदी पन्हाळगडाच्या पायथ्याला येऊन पोहोचलो आहोत...तिथून पन्हाळगड अगदी हाकेच्या अंतरा इतका भासला.

आमच्या नाशिकचा सर्वात छोटा डोंगर म्हणजे पांडवलेणी, त्या पांडवलेणीचीच आठवण या पन्हाळगडाची उंची बघून होते. नेबापूरात देशपांडे कार्यालयात आमचा पहिला तळ थाटण्यात आला होता. एका मोठ्या खोलीत पुरूषांची व दुसर्‍या ठिकाणी महिलांची सोय करण्यात आली होती. याठिकाणी केवळ दोनच स्वच्छतागृह, त्यात पदभ्रमण मोहिमेत सामिल झालेले पाऊणशे जण व यजमान शिवशौर्यचा पंधरा एक जणांचा गोतावळा म्हणजे याठिकाणी प्रत्येक सुविधेकरिता इंच इंच लढवावा लागणार हे स्पष्ट झाले होते.
एकदाच्या खांद्यावरच्या सॅक उतरल्या, आयोजकांसोबतच नव्या सवंगड्यांच्या भेटीगाठी झाल्या व आम्ही पहिल्या दिवसाच्या भ्रमंतीकरिता सज्ज झालो. बाहेर डोकावले तेव्हा संपुर्ण गावचा माहोल हा मला कोकणातल्या पावसाळी गावासारखा भासला. म्हणजे सतत पाऊस झाल्यानंतर जशी हिरवाई अवतरले, तशी अवघ्या नेबापूरवर हिरवी शांल पांघरली होती. जमेल त्याठिकाणी हिरवाई उगवलेली. भिंती भिंतींवर हिरवं मखमली शेवाळ उगावल्याने घरांना, कौलांना व जिन्या कमानींना सुंदर हिरवी छटा आली होती. त्यात तो पन्हाळगड!

पन्हाळदुर्गावर ढगांचा सारखा लपंडाव सुरू होता. क्षणात गडाचे तट ढगाआड लपायचे, तर क्षणात अंधुकसे दर्शन देऊन पुन्हा गायब. अजुन बरेच सहभागी येणे बाकी होते, तेव्हा कार्यालयाबाहेरून 'ढगांचा हा खेळ मनोरंजक वाटेल', म्हणून बराच काळ थांबून राहिलो. ३६५ वर्षांपूर्वी इथे काय घडले असेल? हे गुढ हे ढग अधिकच गडद करत होते.

श्रीदत्त राऊत...
आम्हा भटक्यांसाठी, पहिले पावनगडावर जायचे, ही घोषणा अनमोल भेट ठरली, कारण मुळ कार्यक्रमात मोहिमेच्या पहिल्या दिवशी पन्हाळगड दर्शन, इतकाच उल्लेख होता. आयोजकांनी शिरगणती करून दिवसभराच्या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती दिली. अवघ्या २५ मिनीटात आम्ही पावनगडाच्या पोटात दाखल झालो होते. आजच्या पिढीचा उदयोन्मुख इतिहासाचे अभ्यासक वसईचे श्रीदत्त राऊत हे संपूर्ण मोहिमे दरम्यान आमच्या सोबत राहून आमच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देणार! हे समजल्यामुळे आमचा आनंद आणखी द्विगुणीत झाली. झालेही तसेच, प्रत्येक टप्प्यावर श्रीदत्त राऊत आम्हाला, इतिहासात काय काय महत्वाचे घडून गेले याची माहिती सांगत होते.
पावनगड हा पन्हाळदुर्गाचा जोडकिल्लाच, परंतू हा किल्ला म्हणजे एक भले पसरलेले पठारच. जसा पन्हाळगड शिलाहर राजांनी बांधला, तशीच पावनगडावर शिलाहारकालिन मंदिरे दिसतात.
पावनगडावरचे शिलाहार कालिन मंदिर...असे झाडीत लपलेलेत...
''पन्हाळगडा प्रमाणेच पावनगडावर सुद्धा लोकवस्ती दिसते. आपल्या गावखेड्यात जशी सिमेंट कॉंक्रिटची घरे दिसतात, तशी पानगडावरची घरे बघून डोकं भणभणायला होऊ शकतं! आपण त्याकडे दुर्लक्ष करून इथल्या निसर्गासोबत व इतिहासासोबत एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा. कारण यापुढे इतिहास व निसर्गाशी प्रतारणा करणारे अनेक कारनामे आपल्याला बघावे लागणार आहे, त्याने जर डोके भणभणू लागले तर एक यादगार मोहिमेचा खराखुरा आनंद आपल्याला मिळू शकणार नाही'', असा विचार करून मीही माझी बुद्धि निश्चल करण्याचा व फक्त उपयुक्त गोष्टींवरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला, जो पुढे जाऊन फार फायद्याचा ठरला. याचा मला तात्काळ झालेला फायदा म्हणजे पावनगडावरच्या इतिहासाच्या श्रीदत्त राऊतांनी कथन केलेल्या स्मृती मनात भरभरून साठवता आल्या.

काळ्या मेघातून अधून मधून सूर्य थोडा थोडा डोकावत होता, तसं या गडाचं लपलेलं सौंदर्य आपलं सौंदर्य बिघेरत होतं. शिलाहार काळातील मंदिरांची खुप पडझड झाली आहे. त्यातल्या मुर्ती शाबूत नाहीत, पण जे काही आज उभे दिसते, त्यावरून गतकाळच्या लौकिकाची आपल्याला पुरेशी कल्पना येते.
पावनगडावरून पायी लंबी रपेट मारत आम्ही पन्हाळगडावर दाखल झालो. पावनगडावर जशी झाडांची दाटी दिसत होती, त्या उलट पन्हाळगडावर मोटरगाड्या, दुकाने व घरांची दाटी दिसू लागली. आपण एका इतिहास व पुराण प्रसिद्ध गडावर आहोत की एखाद्या गजबजाटलेल्या बकाल खेड्यात हे कोडे मनात तयार होत होते, तेव्हा पुन्हा त्याला आवर घालत एका तटावर दाखल झालो. त्याठिकाणावरून सिद्धी जोहरच्या वेढ्याचे एक एक बारकावे राऊतसाहेबांकडून समजावून घेण्याचा प्रयत्न करू लागली.
पाऊस सारखा उघड-सुरू उघड-सुरू होत होता व माझा छायाचित्रणाचा कार्यक्रम अखंड सुरू होता, त्यामुळे राऊतांसोबत असलेल्या मुख्य टोळी पासून मी सारखा मागे पडत होतो, तोच कोणी तरी आम्हाला पन्हाळगडावरचा भालजी पेंढारकरांचा प्रसिद्ध बंगला दाखवला. पाराशर ऋषींच्या गुहे पासून अगदी हाकेच्या अंतरावरचा हा बंगला सद्या गानसाम्राज्ञी लता मंगेशकरांकडे आहे.
जस जसे आम्ही पुढे जात होतो, तस तशी गडावर दुचाकी व चारचाकी गाड्यांची वर्दळ वाढताना व त्याच सोबत घरे, दुकाने, हॉटेल्स व लॉजेसची वर्दळ वाढताना दिसत होती.
पन्हाळगड हा कोल्पहापूर जिल्ह्यातील एक तालूकाच. फरक इतकाच की या तालुक्याचे मुख्यालय एका निसर्गसुंदर डोंगरावर आहे. त्या सोबत अनेक रहिवाशी घरे, कचेर्‍या, दुकाने यांची गडावर प्रचंड रेलचेल आहे.
या डोंगरावर वरूणराजाची विशेष कृपादृष्टी असल्याने पावसाळी हंगामात तो इथून हटता हटत नाही. कधी पावसाच्या रूपाने तर कधी ढगांच्या रूपाने वरूण येथे ठाणच मांडून बसतो, त्याच्या सोबतीला असंख्य झाडे, वेली, द्रुम दाखल होतात व त्यांच्या जोडीला येतात मग नानाविविध किटक, पक्षी व प्राणी. हिवाळ्यातही म्हणे ढगांचा मुक्काम गावाच्या रस्त्यावर असतो.
- शिवाजी महाराज व त्यांच्या ६०० सैनिकांची पावले मसाई देवीच्या पठारावर कुठे...कुठे पडली असतील?
महाबळेश्वर, माथेरान, सापुतार्‍या सारखेच पन्हाळगडाचे सृष्टीसौंदर्य या वरूणाने खुलविलेले असते. असे स्वर्गीय वातावरण नरकीय कसे होईल याची मात्र कोणीतरी पुरेपूर काळजी घेतल्याचे आम्हाला पन्हाळदुर्गावर पावलोपावली जाणवत होते.
ज्या पन्हाळगडावर शिवाजी महाराज ५०० दिवस राहिले. ज्याठिकाणी थोरशिवपूत्र राजे संभाजींनी आपली राजधानी थाटली, तो पन्हाळगड आज दिसतो तितका बकाल पूर्वीच्या काळी नक्की नसावा.
गिरीस्थानावरच्या नगरांना व तिथल्या वसाहतींना सरकारने काही नियम घालून दिले आहेत की नाही, कोण जाणे? जे ठिकाण निसर्गत: सुंदर आहे, ज्या ठिकाणी महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास निर्माण झाला त्याच्याशी सुसंगत नसलेली रचना म्हणजे आजचा पन्हाळगड. याठिकाणी बर्‍याच रहिवाशांनी सिमेंटच्या भिंती व प्लास्टिकच्या टाक्या उभारून स्नान व स्वच्छतागृह अगदी दर्शनी भागातच तयार केले आहे. विजेच्या तारांचे जंजाळ, शिस्त नसलेली, सतत हॉर्न वाजवित जाणारी वाहतूक व खाद्य पदार्थांच्या लक्तरलेल्या दुकानांची मालिका म्हणजे आजचा पन्हाळदुर्ग.
या सुंदर किल्ल्यावर इंग्रजांच्या आमदनीत म्हणे गाडीरस्ता तयार करण्यात आला. आपल्या राजवटीत इथली लोकवस्ती अफाटप्रमाणावर फोफावली. या गडावर अंधाधुंद पद्धतीने उभी राहिलेली विश्रामगृहे बघुन आपले डोके बधिर होण्याची वेळ येते. त्याला वेळीच आवरणे कठिण होऊन जाते. नुकतीच एक बातमी वाचनात आली होती, 'पन्हाळगडावर वेश्या व्यवसायावर धाडी'. आता याला काय म्हणावे?

मला तर आमच्या नाशिकमधल्या सप्तश्रृंगी गडावरच्या नगराची आठवण झाली. इथली व तिथली दुकाने सारखीच लक्तारलेली दिसत होती. ज्याचा आज भस्मासूर उभा राहिला आहे ते प्लास्टिक कचर्‍याच्या रूपाने येथे ठायी ठायी दृष्टीस पडत होते.
आपले चित्त विचलीत करणार्‍या या पन्हाळपसार्‍यातून सावरत आम्ही गडावर शेकड्यांनी विखुरलेली इतिहासाची महत्वाची पाने जमतिल तितकी उलगडण्याचा प्रयत्न करू लागलो. तिथला तिन दरवाजा काही सांगतो का? अंधार्‍या विहिरीतून कशाचा सुगावा लागतो, याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करू लागलो, कारण या गडावर इतका अफाट इतिहास निर्माण झाला, परंतू त्याची कोणतीही माहितीची साखळी सहजासहजी जुळताना दिसत नाही, म्हटलं, एखादा चिराच काही बोलून उठतो का? तिथले तट बुरूज शिवाजी-संभाजींच्या कहाण्या-किस्से सांगतात का? पण काही उपयोग नाही...कोणीही बोलायला तयार नव्हते. ठायी ठायी मनोरंजनाकरिता व खादाडी करण्यासाठी आलेले पर्यटकच दृष्टीस पडत होते. अनेक ठिकाणी या गडाचे गडपण नाहीसे झाल्याचे जाणवत होते.
पन्हाळगडावरचा अंबारखाना...
अंबारखाना, अर्थात धान्याचे कोठार पाहणे एक दिव्यच आहे...इतकी सुरेख व सुबक इमारत ही निव्वळ धान्य साठवून ठेवण्यासाठी बांधण्यात आली, यावर आपला क्षणभर विश्वास बसत नाही. गडावरील कलावंतिचा महाल, सज्जा कोठी, धरमकोठी, वाघ दरवाजा, पाणवठे, विहीरी, मशिदी सारखे बांधलेले दारू कोठार बघत बघत आम्ही शिवा काशिदच्या पुतळ्यापाशी येऊन थांबलो त्यावेळी ढगांनी पुतळ्यावर सुंदरसे तलम छत्र धरल्याचा आभास होत होता, त्यात शिवा काशिदची मुद्रा अधिकच समाधानी भासत होती. पन्हाळगडाची डावी/उजवी बाजू बघत आम्ही गड उतरण्यास सुरूवात केली. एका तटाजवळ धबधबा वाहत असल्याचा आवाज येत होता. विशेष म्हणजे आमच्या परतीच्या वाटेवरच हा छोटूसा धबधबा. त्याच्या जवळ पोहोचल्यावर समजले की, पन्हाळ्यावरच्या लोकवस्तीचे तमाम सांडपाणी तटाच्या एका भिंतीवरून सोडण्यात आले होते. इतका दैदिप्यमान इतिहास, इतका सुंदर किल्ला त्यांची ही अशी व्यवस्था?
गडावरच्या वस्तीची वाढ ही बेढब, बकाल असली तरी गडावरच्या लोकांत असलेले शिवप्रेम ठायी ठायी नजरेत भरत होते. इतके की, एका गावठी दारूच्या गुत्त्याच्या पहिल्या मजल्याचे कठडे लोखंडी शिवमुद्रेने सजविले होते. असे एक एक नमुने बघत आम्ही साडे चारच्या सुमाराला नेबापूरात परतलो.
सायंकाळी यजमान शिवशौर्यने मोहिमे संबंधी सूचना दिल्या व सर्वांच्या ओळखी करून घेतल्या. श्रीदत्त राऊत यांनी पावनखिंड युद्धा संबंधी नव्याने प्रकाशित येणारी काही तत्थ्ये कथन केली. त्यात एक मुद्दा फारच अनोखा वाटला की, ''बाजी प्रभुंचे नाव ऐतिहासिक कुठल्याही कागदपत्रात नाही आढळत. असला तरी बाज प्रभू अशा नामोल्लेखाने. या युद्धाचे ना ते प्रमुख नेते होते ना ते शिवाजींसोबत पन्हाळगडावरून विशाळगडाकडे पळण्याच्या मोहिमेचा भाग होते, ते तर विशाळगडावरून येऊन पळून जाणार्‍या शिवाजींच्या मदतीसाठी विशाळगडावरन दाखल झाले होते''.
देशपांडे सभागृहात पहुडलेली छावणी...

देशपांडे सभागृहात परतल्यावर, दिवसभराच्या पायपिटीमुळे आज बसल्या बसल्या झोप येत होती. तशातच कोणी तरी आपल्या मोबाईल फोनवर छान रामरक्षा लावली. झोपेच्या ग्लानित मला शाळेतला एक निबंध आठवला, मी मुख्यमंत्री असाते तर? मी आमदार, खासदार, महापौर, तहसिलदार, आमदार, खासदार वगैरे असतो तर?...

''पन्हाळगडी गावच्या वेशिपर्यंतच वाहनांना परवानगी. तिथून पुढे कोणाला जर गावात प्रवास करायचा असेल तर त्यांनी घोडा गाडी, बैल गाठी किंवा घोडे, उंटाची सवारी करावी.
लोकांना जर काही प्रशासकीय किंवा महत्वाचे काम असेल तर त्यांना वेळेचा जास्तीत जास्त उपयोग करता यावया याकरिता या सर्व इमारती गावच्या वेशीच्या बाहेर. गावचे सुसज्ज इस्पितळ सुद्धा वेषाच्या बाहेर. गडाची सगळी वाहतूक व्यवस्था ही मोटरवाहन विरीत.
गडावरची सर्व घरे व दुकाने इथल्या निसर्गाशी व इथे घडलेल्या इतिहासाशी मेळ खाणार्‍या असाव्यात. गावात पुर्ण प्लास्टिक बंदी. फ्लेक्स प्रिंटवर तयार केलेल्या फलकांनाही बंदी.
हवं तर गडाच्या दोन टोकांना जोडणारा, गडाच्या पायथ्या पासून सुरू होणारा छोटेखानी रेल्वे मार्ग असावा. गडावरची तमाम घरे ही इतिहासाशी व इथल्या निसर्गाशी मेळ खाणारी असावी, रस्तेही त्या धर्तीचे. ज्याठिकाणी मोटरवाहनांची आवश्यकता आहे अशा इमारती या वेशीच्या बाहेर, जेणे करून गावातल्या लोकांना त्याचा उपयोगही होऊ शकेल'', या स्वप्नात झोप केव्हा लागली हे कळलेच नाही.

दिवस दुसरा:
मोहिमेचा आजचा सगळ्यात महत्वाचा दिवस. ज्या मार्गाने शिवाजी महाराजांनी पन्हाळगडाचा वेढा तोडला त्या मार्गाने आमच्या मोहिमेचा प्रारंभ होणार! आजची पायपीट तशी पंधरा किलो मिटरचीच, परंतू मसाईच्या पठारावरून शिवाजीराजे निसटले तो ऐतिहासिक मार्ग ढुंढाळायला मिळणार!
पन्हाळगडाला आता वेढा दिसतो तो फक्त थोड्याबहुत झाडींचा व पावसाळ्यात त्यांच्याशी गट्टी करणार्‍या मेघांचा...
आजही सकाळ पासून पाऊस सुरू होता. बहुतांशी सहभागी रेनकोटघालून चालत होते. नेबापूरच्या हरेक घराच्या भिंतींवर व छपरावर सुद्धा जागा शिल्लक नसावी, इतकी दाट झाडी व हिरवाई सर्वत्र दाटलेली दिसत होती. एक तर रस्त्यावर उतरलेले ढग व चिंब भिजलेली सजिव सृष्टी असा निसर्गाचा सुंदर नजराणा गावचे सौंदर्य द्विगुणित करत होता.
पन्हाळगडाचे सौंदर्य  निसर्गाची नक्षी .
शिवा काशिदची समाधी
१२ मिनीटाच्या पायपीटीतच आम्ही पन्हाळगडाच्या तटाला लागलो. तिथे दाट झाडीत विसावलेल्या शिवा काशिदच्या समाधीचे सर्वांनी दर्शन घेतले. पन्हाळगड-विशाळगड युद्धात स्वराज्यासाठी प्राणीची आहूती देणार्‍या ज्ञात, अज्ञात विरांना वंदन करून आम्ही पन्हाळगड चढू लागलो. तटावरच्या लहान जंगलातही ढग संचारले होते. त्यातून वाट काढत चालणे म्हणजे, जणू स्वर्गातूनच चालल्याचा आभास होत होता. तटाच्या दगडी भेगात व पायरच्यांच्या मथल्या जागेत सुक्ष्म पावसाळी हिरवी वनस्पती उगवून आल्याने गडाचे वेगळेच सौंदर्य प्रतिबिंबीत होत होते.
या ठिकाणी तट बुरूजांना अलिंगन देणारे ढग आम्हालाही व्यापून टाकत होते. क्षणभर आपण एकटेच आहोत, असा आभास होई, तर पुढच्या क्षणाला , शिवाजी महाराज ज्या मार्गावरून गेले असतील त्यावर आपहीही पावले पडताहेत, ही भावना रोमांचित करून जाई. मधूनच तरणाबांड संभाजी एखाद्या तटाआडून घोड्यावर रपेट मारत पुढे निघून गेल्यासारखे वाटे.

गडावरच्या संभाजी मंदिरात आमच्या नाष्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. तिथेच आम्ही दुपारचे जेवण सोबत आणलेल्या डब्यात भरून घेतले. झुणका व पोळी असा अस्सल मराठमोळा बेत बांधून मिळाला.
सर्व सहभागी रेनकोट घालून सज्ज होते. पावसाळ्यात कुठल्याही भटकंतीच्या वेळी मी स्वत: कधीच रेनकोट घालत नाही, परंतू माझा पुरातन सोबती कॅनन डी४०० छायाचित्रणाचा कॅमेरा सुरक्षित ठेणे गरजेचा वाटल्याने मी पूढे जाऊन गडावरच्या एका दुकानातून १८०/- रूपयात घडी होणारी छत्री खरेदी केली व बाजीप्रभू देशपांडेच्या पुतळ्यापाशी येऊन थांबलो.

मागोमाग सर्व सहभागींचे जत्थे येत होते. स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारा प्रत्येक जीव तितकाच तोलामोलाचा...त्यातले बाजीप्रभुं म्हणजे सामान्यातले सामान्य असे योद्धे...इतिहासकारांना अस्सल शिवकालिन कागदपत्रांत त्यांचा नामोल्लेख कुठेही आढळत नाही...आढळला तरी एकदोन ठिकाणी त्रोटकपणे...परंतू त्यांच्या सारख्या सामान्य योद्ध्याने असा काही इतिहास रचला की, महाराष्ट्रात आज साडे तिनशे वर्षे उलटूनही त्यांचे नाव कमालीच्या आदरभावनेने घेतले जाते. शिवाजींचे योद्धेच असामान्य होते. जो कुठल्या खिजगणतित नव्हता, त्याने सर्वोच्च पराक्रमाची अशी काही उंची गाठली...असे कित्येक लढवैय्ये निर्माण करणार्‍या शिवाजी राजांचे केवढे मोठेपण...
आज सरकारचा गलेलठ्ठ पगार घेणारे प्रामाणिकपणे काम करत नाहीत, तिथे महाराजांच्या एका शब्दाखातर आपला जीव पणाला लावणारे बाजींसारखे योद्ध ही खरी स्वराज्याची ताकद होती...त्यामुळेच अत्यंत तुटपुंजा ताकदीत आपले योद्ध जगातल्य अद्वितीय अशा मोगली व अन्य सुलतानी आक्रमकांना समर्थपणे तोंड देऊ शकलो...
स्वराज्यासाठी रक्ताचे अर्घ्य देणार्‍या बाजींचा पुतळाही, इतिहासात वर्णन केल्या प्रमाणे तसाच भलाधिप्पाड...दोन्ही हातामध्ये दांडपट्टे घेतलेले बाजी बघून आपल्या अंगात रोमांच उभे राहतात...खरे खुरे बाजी प्रभूही असेच दिसत असतील! नाही का? त्यामुळे या पुतळ्याच्या सौंदर्यात अजिबात भर न घालणार्‍या पाठच्या विजेत्या तारा व कोणा नेत्यांने उद्‌घाटन केलेल्या बाजी प्रभुंच्या पुतळ्यावरची दगडी पाटी बघून आपले लक्ष फारसे विचलीत होत नाही.
श्री. वैजनाथ देशपांडे
आज आमच्या सोबत बाजी प्रभुंचे ११वे वंशज वैजनाथ देशपांडे हजर असल्याची घोषणा आयोजकांकडून करण्यात आली. त्यांच्या कुटुंबातील इतर पुरूष मंडळी या ठिकाणी हजर होती, त्यांना बघून आठवले की, संभाजी मंदिराच्या बाहेर आमचे स्वागत करण्यासाठी हीच मंडळी उभी होती तर!
याठिकाणी श्रीसमर्थ रचित शिवस्तूतीचे पठण करून बाजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला...पुन्हा एकदा स्वराज्याच्या थोर लढवैय्यांचा जयघोष...जय भवानी...जयशिवाजीचा घोष आसमंतात घुमविण्यात आला...त्यानंतर सुरू झाला तो थरारक प्रवास!
पावनखिंडीच्या इतिहासाची ओढ तर सर्वांनाच...मिलिंद सोमणच्या मातोश्री व भगिनींसह पदभ्रमणात सहभागी झालेले महिलामंडळ
या प्रवासाला आता खरोखरच थरारक म्हणायला हवे...रूढ अर्थाने तो अजिबात थरारक नाही...पण १६५९च्या गुरूपौर्णिमेच्या रात्री शिवाजी महाराजांनी अत्यंत कडेकोट वेढा फोडून पन्हाळगडावरून पलायन केले...पावनखिंडीत घनघोर रण उडाले...अंगावर शेकडो वार झेलत तब्बल साडेचार तास घोडखिंड रोखून धरणारे बाजी प्रभू व त्यांच्या बांदल सैन्याचा अद्वितीय लढा...महाराजांनी अवघ्या ३०० मावळ्याच्या मदतिने विजापूरी सरदार सूर्यराव सूर्वे व जसवंतराव दळवींचे मोर्चे तोडून सुखरूप गाठलेला विशाळगड, या रोमांच नाट्याला थरार शिवाय दुसरे नावच नाही...त्या मार्गावरून नुसते जाण्याची कल्पना आपल्याला थरारक वाटते.
मला एक सवाल नेहमी पडायचा, सिद्धी जोहरने खरोखरच कडेकोट पणे विशाळगडाला वेढा दिला होता, तर महाराज त्यातून निसटले कसे? सोबत त्यांना ६००चे पायदळ कसे काय नेता आले? दुसर्‍या बाजुने शिवा काशिद पन्नास एक जणांची तुकडी घेऊन निसटला कसा? इतक्या मोठ्या संख्येने मराठी सैन्य वेढा फोडून पळून जाण्यात कसे काय यशस्वी ठरले?
तुम्ही राजदिंडीतून खाली उतरलात तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपाआप मिळेल...
महाराज ज्या राजदिंडी मार्गाने पन्हाळगडावरून पळाले, त्याठिकाणी सिमेंट व लाद्यांचे एखादे स्मारक उभारण्याची आयडियाची कल्पना कोण्या डोकेफिरू नेत्याच्या डोक्यात येण्याच्या आत हे वैभव बघून घ्यावे.
मराठे अहोरात्र गड लढवित होते...त्याच्या जवळ जाणे सुद्धा जिवाशी गाठ, कारण वरून तोफा, बाण व दगडांचा मारा व्हायचा...सिद्धी जोहरने इतका कडक वेढा घातला होता की, त्यातून स्वराज्यातला एकही हेर अथवा सैनिक वर जाऊ शकत नव्हता.
गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पूर्व दिशेला सिद्धी जोहरचा तळ होता...
त्याच्या बरोबर मागच्या बाजुस गडाचा आकार काहीसा इंग्रजीच्या यु अक्षरा प्रमाणे झाला आहे...या यु अक्षराची एक बाजू ही दुसर्‍या डोंगराच्या धारेला जाऊन मिळते...त्याठिकाणी जिथे वेढा काहीसा पातळ होता, असा तो मार्ग. सिद्धीच्या वेढ्यात दर बारा तासांनी बंदोबस्त फिरविला जायचा...साडे तीन महिने हेच सुरू होते...शिवाय शिवाजी शरण येणार अशा बातम्या सिद्धाच्या छावणीत सर्वत्र येत होत्या.
नेताजी पालकर व सिद्धी हिलाल यांचा सिद्धी जोहरचा वेढा फोडण्याचा प्रयत्न असफल ठरल्यानंतर जिजाऊ मॉसाहेबांचे काही हेर शिवाजींशी संपर्क करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते...त्यात महिन्याभरापासून महादेव हा पन्हाळगडावर घुसण्याचा प्रयत्न करत होता...सातार्‍याजवळ सुर्व्यांची तुकडी सिद्धी जोहरच्या वेढ्यात सामिल होण्यासाठी चाचली तेव्हा या महादेवाने पन्नास होन देऊन फितवत सुर्व्यांच्या तुकडीत स्थान मिळवले. सुर्व्यांच्या बंदोबस्त तुकडीत राहून त्याने पहार्‍याच्या वेळा व दिशा अचूक हेरत एके दिवशी भल्या रात्री एक अवघड कडा चढून जात विशाळगड गाठला...काम जोखमिचे होते, परंतू तो साधूच्या वेषात अंधार्‍या रात्री कडा चढून गेला...वर त्याला अटक करून शिवाजींसमोर उभे करण्यात आले...त्याने रायगडाचा वृत्तांत कथन केला व बंदोबस्ताचे बारकावे आदी माहिती सांगितली...त्यावरून शिवाजींना पन्हाळगडावरून पलायन करण्याच्या योजनेकरिता उपयूक्त माहिती मिळाली...
राजदिंडी म्हणजे दाट झाडी झाडोर्‍याचा परिसर...पंधरा मिनीटात तुम्हा विशाळगड उतरून काहीशा सपाटीवर येतात व तिथून काही मिनीटातच मसाईच्या पठाराची अतिशय सोपी चढण सुरू होते...याठिकाणी सिद्धीच्या सैन्याला पुसाटीच्या बुरूजावरच्या मार्‍यापासून वाचविताना मोठी कसरत करावी लागत होती.
या बंदोबस्त फिरण्याची माहिती प्राप्त करून सहाशेच्या घरात सैन्य उतरवून मसाई पठाराच्या मार्गाने महाराजांनी सिद्धीच्या कराल वेढ्याला चकमा देण्याची योजना प्रत्यक्षात घडवून आणली..पन्हाळगडावरून सुटकातर झाली, पण विशाळगड सुमारे पंधरा कोसावर. ते अंतर गाठायचे तर घोड्यांवाचून पर्याय नाही व त्याठिकाणी तर सिद्धीची भली थोरली सेना चाेविसतास सज्ज असायची...
महाराजांनी अशक्यप्राय वाटणारा, पायी पळून जाण्याचे बेत आखला...ते घोडे टाळून पायी पळून जातील याची सुतराम कल्पना सिद्धी व त्याच्या कडेकोट बंदोबस्तावरच्यांनी केली नसेल? काही इतिहासकारांच्या मते शिवाजी महाराज मसाई पठारावरून खाली उतरले व तिथून कुंभारवाडा, खोतवाडी (१५ किलो मिटर), मांडलावाडी -करपेवाडी -आंबेवाडी -रिंगेवाडी -माळेवाडी -पाटेवाडी -सुभामाचा -माळ -म्हळसवडे या गावांवरून पांढरेपाणी येथे पोहचले...

शिवाजी राजांनी पन्हाळगडावरून सुटका करून घेण्यापूर्वी आणखी एक चकवा निर्माण केला होता, तो म्हणजे शिवा काशिद...शिवा काशिद पूर्णपणे शिवाजी महाराजांचा पेहराव करून राजदिंडीवरून मलकापुरच्या दिशेने गेला...त्याठिकाणी तो पकडला गेला. रूस्तम इ जमानला अफजुल खान वधाचे इत्थंभूत वृत्त माहित होते...शिवाजी राजांच्या डोक्यावर तरवारीचा वार झाला होता...जिरे टोपातून डोक्याला खोक पडलेली...पण शिवा काशिदला पकडून आणल्यानंतर, हे कोण बुजगावणं आणलं आशी त्याची प्रतिक्रीया...आपण फसवले गेल्याचे सिद्धी जोहरला कळले, तो पर्यंत तास दिडतास लोटला होता.


याच मार्गावरून...काहीशा याच मार्गावरून आमचे मार्गाक्रमण सुरू होते...मसाईच्या पठारावर पोहचल्यावर सह्याद्रीचे अचाट, अफाट रूप नजरेस पडले...१० बाय २५ किलो मिटरचा प्रचंड घेर असलेले मसाईचे पठार...त्यावर पावसाळ्यात इतके दाट धुके असते की, बर्‍याचदा पाच दहा फुटांवरचेही दिसत नाही...आदिलशाही फौजा मागावर आल्या असत्यातर शिवाजींच्या शुर वीरांनी धुक्याच्या चकव्यात त्यांना चकवले असते, परंतू ती वेळच आली नाही...शिवाय शिवाजी पन्हाळा उतरून मसाईच्या पठारावर येईस्तोवर पन्हाळगडावरून एक टेहाळणी पथक लक्ष ठेवून होते...गरज भासलीच तर मदतिला धावून जाण्यासाठी हे पथक सज्ज होते...
मसाईदेवीचे पठार...चला ढगात हरवू या!

मसाई पठाराचा ढगांमधला भुलभुलैय्या ओलांडून आम्ही पठाराच्या एका टोकाजवळच्या पुरातन मसाई देवीच्या मंदिराच्या प्रांगणात आलो...त्याठिकाणच्या मंदिराला कुलूप लाण्यात आले होते, तेव्हा आकाशाच्या खुल्या छताखाली पाऊस व चिखलात बसकण मारत आम्ही सगळ्यांनी सोबत आणलेले दुपारचे भोजन घेतले...या ऐसिहासिक पठारावरचा अर्ध्या तासाचा तो भोजनविश्राम कायमचा स्मरणात राहील.
मसाई पठार उतरून आम्ही आम्ही दिवसाचा शेवटचा मुक्काम असलेली खोतवाडी गाठली ती असंख्य भात शेतं तुडवित...अथात आम्ही कुठलेही शेत न तूडवता बांधाबंधाने रस्ता धरला...पावसाच्या अखंड धारा किंवा ढगांची दुलई असा सगळा माहोल...त्यातून शिवाजींच्या ऐसिहासीक मोहिमेच्या मार्गाचा परिसर म्हणजे आम्ही मोहिममय झालो होतो...
खोतवाडीच्या शाळेत रात्रीच्या अंधारात मसालेभाताचे जोवण पोटात ढकलून आम्ही दुसर्‍या दिवसाच्या लंब्या चौड्या पायपिटीसाठी लवकर झोपी गेलो

दिवस तिसरा:
दुसर्‍या दिवशी आमचा मोठा पल्ला होता, तो म्हणजे खोतवाडी ते मालाईवाडा...तब्बल ३५ किलो मिटरचे अंतर...तेही बहुतांशी शेतशिवारातून...आता एका भटक्या नाशिककरासाठी चिखल पाण्यातून ३५ किलो मिटर्सचे अंतर कापणे काही वेगळी गोष्ट वाटणार नाही, याचे मुख्य कारण म्हणजे बहुतांशी नाशिककर दरवषी ब्रम्हगिरीच्या डोंगराला असेच चिखलपाण्यातून लहान किंवा मोठी प्रदक्षिणा मारतात...लहान प्रदक्षिणा ३० किलो मिटर अंतराची तर मोठी प्रदक्षिणा साठ किलो मिटरची, ज्यात ब्रम्हगिरीसह, हरिहर व ब्रम्हा या प्रमुख डोंगरांना वळसा घातला जातो...हरिहरच्या डोंगरावर तर हरिहर किल्याच्या वेताळकड्यावरूनच फेरी जाते...परंतू ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा व विशाळगड-पन्हाळगड युद्धाचा मार्ग यात बरेच अंतर आहे...एकतर या मार्गावर चिखल खुपच निसरडा आहे...त्यातून कल्पनेचीही घोडस्वारी संभव नाही...कुठलेही पादत्राण धड टिकत नाही, ना नंग्या पायांनी धड चालता येते...शिवाजी व त्यांची फौज अशा मार्गावरून वेगाने कशी काय गेली असेल?

खोतवाडीतून आम्ही मांडलाईवाडी, करपेवाडी, आंबेवाडी, रिंगेवाडी, माळेवाडी, पाटेवाडी, सुकामाच्या माळावरून म्हळसवडयाला पोहचलो व तिथून पांढरेपाणी येथे...शिवाजींच्या पथकाने पांढर्‍यापाण्यापर्यंत विश्रांती घेतली नव्हती...याठिकाणी तीन प्रमुख मार्ग येऊन मिळतात, एक म्हणजे पन्हाळगडाचा, दुसरा अणूस्कुरा घाटाकडून येणार तर तिसरा आंबाघाटाकडून येणारा...असा हा महत्वाचा टप्पा...याठिकाणहून शिवाजी अंबा घाटाकडे गेले की अणूस्कुराघाटाकडे? आदिलशाही फौजांची पूर्ण गल्लत होत होती...शिवाजींनी मात्र घोडदळाचा मार्ग टाळत पायीच पुढे सरकण्याची अनोखी योजना आखली होती, तेव्हा ते घोडखिंडीत उतरले. आमचा आजचा मुक्काम मात्र पांढरयेपाणी व पावनखिंडीच्या मध्ये असलेल्या मालाईवाडा येथे...

घोड्यावरून पाठलाग करणार्‍या सिद्धीच्या फौजा पांढरंपाणी केव्हाही गाठतील या आशंकेने याठिकाणी उलटवार करण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतू तो अत्यंत घातक ठरला...अणूस्कुरा व आंबाघाटापर्यंत जाऊन रिकाम्या हाताने परतलेल्या सिद्धीच्या फौजांना पांढर्‍यापाण्याजवळ चिखलात अनेक पायलांचे ठसे दिसले व घात झाला...याठिकाणी पंचवीस जणांची एक तुकडी मसुदच्या ७०० जणांच्या तुकडीवर तुटून पडली...त्यात सगळेच्या सगळे पंचवीसजण कापले गेले...त्यांच्या समाध्या आजही पांढरेपाणी परिसरात आहेत...


वाटेत ज्या ज्या वाड्या वस्त्या लागल्या, त्यापैकी बहुतांशी ठिकाणी दिसणारे एक चित्र अगदी समान होते व ते मन कमालिचे विचलीत करत होते ते म्हणजे खाऊ मागणीरी लहान लहान मुले. या आदिवासी मुलांवर स्नेहापोटी अनेकांनी गोळ्या, बिस्कीटे आणली होती व ती त्या मुलांना वाटली जात होती. पावनखिंडीच्या मार्गावर आता बरीच मंडळी येऊ लागली आहे, आषाढात या पाहुण्यांची वर्दळ वाढते हे ठाऊक असल्याने मुले भल्या सकाळपासूनच खाऊ मागण्यासाठी घराबाहेर, जंगलात, शेतात भरपावसात थांबून रहात. काही ठिकाणी तर घरातल्या महिला सुद्धा गोळ्या व बिस्कीटे मागताना दिसत होती. पन्नास पैशांच्या गोळ्या व पाच रूपयांच्या बिस्कीट पुड्यांकरिता दिवस दिवस, भर पावसात सुरू असलेला आटापिटा बघून मनामध्ये कालवाकालव होत होती. दुर्गम भागात मनोरंजनाची साधने खुप सिमीत, त्यातही साखर हे तर सर्वात स्वस्तातले मनोरंजन हे एकवेळ मान्य केले जाऊ शकते, परंतू एकेकाळच्या या लढावू व स्वाभीमानी वर्गाला अशी सवय लावणे काही बरोबर नाही, तेव्हा ट्रेकर मंडळींनी कुणालाही अशा प्रकारे खाऊ मागण्याची सवय लावता कामा नये. आपल्या लढवैय्या पावनखिंडीत भिक मागण्याची परंपरा निर्माण होऊ देणे वाईटच. मदतच करायची असेल तर त्यांना स्वाभिमानाने उभे करण्यास मदत करा. काही द्यायचेच असेल तर शाळेत जाऊन मदतीचे वाटप करा. बरं त्या स्वस्तातल्या गोळ्या व स्वस्तातली बिस्कीटे कोणते आरोग्य निर्माण करणार आहे. त्यात तर शरीरासाठी उपयूक्त न ठरता त्रासदायक असलेल्या अॅसिडची व मैद्याची भरमार. जर कुणाला खाऊच वाटायचा तर त्या मुलांच्या शाळेत जाऊन गुळ, खोबर्‍या शेंगदाण्याच्या चिक्या, आलेपाक अशा घरगुती पदार्थांचे वाटप करू शकता व ही मदत फुकट नसून कशाच्या तरी बदल्यात करत आहोत, असे जाणवू द्या. या एकुण प्रकाराला भिकेचे स्वरूप येता कामा नये. जगात या मुळे आपली कोण शोभा होईल?
इथल्या भातशेतीतल्या हिरव्या छटा तरी किती?
दिवसभरात अनेक शेतं, असंख्य झरे व ओहळी तुडवत भर पावसातला हा प्रवास अजिबात थकवणारा नव्हता...त्याचे साधे कारण म्हणजे आपल्या फौजा जिवाच्या आकांताने धावत होत्या, आपल्या मागे असे कोणते संकट? तेव्हा आपण सोसतोय ते कष्ट कुठल्याही प्रकारे कष्ट असू शकत नाही, ही जाणिव आमच्या मनात सतत होती...आमच्यातली काही मंडळी अंधार पडून गेल्यानंतर मालाईवाडा येथे पोहचली...तिथल्या एका विशाल ओसरीत आमचा आजचा मुक्काम होता...याठिकाणी पावसाने जरा जास्त जोर धरला होता...शिवाय ओसरीत गायी गुरांसोबत अंधारात ओली वस्त्रे बदलून पोटपुजा केली...दिवसभराच्या थकव्याने आज लवकर झोप येणार होती...परंतू पुन्हा त्या युद्धाने अमच्या चर्चेला उधाण आणले...


सिद्धी जोहरने काहीही करून शिवाजींना पकडण्यासाठी चहुदिशांना सैन्य धाडले...शिवाजी विशाळगडावर जाणार हे निश्चीत होते...चहुदिशांना घोडदळ वेड्यागत शोधमोहिम राबवत होते, परंतू रात्रीच्या अंधारात सगळी पथके रिकाम्या हाताने परतत होती...या चर्चेत केव्हा झोप लागली ते उमजले नाही...मध्यरात्री मला अचानक जाग आली...पावसाचा घराच्या कौलांवरही आवाज जाणवत होता...सर्वत्र मिट्टकाळोखात जणू शिवाजींची पळून पळून दमलेली छावणी झोपल्याचा आभास झाला...

दिवस चौथा:
मोहिमेचा केंद्र बिंदू असलेल्या पावनखिंडीपासून आता आम्ही बरेच जवळ होतो...पहाटे लवकर उठून आम्ही तयारीला लोगलो...पाऊस फक्त काही मिनीटे विश्रांती घेत होता...पहाटे पाचच्या सुमारास जवळपास सर्वजण उठून तयारीला लागले होते...सुदैवाने लहानशा शाळेच्या स्वच्छतागृहात महिला मंडळाची सोय करता आली...तर पुरूष मंडळींना मोकळ्या रानात धाव घ्यावी लागली...एकदोघे जण सोडले तर बहुतांशीजण रेनकोट घालून आले होते...आता भर पावसात रेनकोट घालून प्रातर्विधी? पण ही कसरतही अनेकांनी केली...धुसर वातावरणातच चहा व न्याहारी आटोपून आम्ही लागोलाग पावनखिंडीच्या दिशेने प्रस्थान केले...या मार्गावर आता बर्‍यापैकी पक्का रस्ता झाला आहे, त्यावरून चालतच आम्ही घोडखिंडीत दाखल झालो...

मागावर येणार्‍या फौजांपासून शिवाजींचे दळ दिड तासांनी तरी पुढे असावे, परंतू विद्यूत वेगाचे पलायन करत आता पायी फार पळणे कठिण हे एक क्षण जाणवून त्यांनी पांढरेपाणी येथे आदिलशाही फौजांचा प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला...हा निर्णय फारसा उपयुक्त ठरणार नसल्याने पंचवीस जणांची तुकडी मागे ठेवून पावणे सहाशेची फौज घोडखिंडीत उतरली...

घोडखिंडीचा हा भाग कमालीचा निसरडा...याठिकाणी घोड्यांवरून जाणे तर दुरापास्त...परंतू तो वर पाऊस काहीसा उघडला होता....तेव्हा चिखलात उमटलेल्या पावलांच्या ठशानी आदिलशाही फौजेला आपसुकच रस्ता दाखवला...त्यानंतरचा इतिहास:
शिवाजींपेक्षा वयाने पंधरा वर्षांनी मोठे असेल्या बाजी प्रभुंनी महाराजांना पुढे जाऊन स्वत: खिंड लडविण्याची कल्पना सुचविली...शिवाजींनी, आता जेव्हायचे ते होऊन देऊ या! म्हणत प्रतिकाराची तयारी केली...परंतू आपल्या राजा वाचला तर स्वराज्य वाचेल हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट असल्याने बाजींनी अक्षरश: महाराजांना पुढे जाण्यासाठी पिटाळले...निम्मी फौज घोडखिंडीच्या दाट झाडीत दगड, गोटे गोळा करून दबा धरून बसली व बाजी व काही मोजले लढवैय्ये खिंडीत पहाडासारखे उभे राहिले...
घोडखिंडीतून वाहणार्‍या ओढ्याच्या मुखाजवळ शिवाजी उभे असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत होते...त्यामुळे सिद्धी मसुदच्या पथकाने निकराचा हल्ला चढवला, परंतू दाट झाडीतून सपा सप येणार्‍या दगडांच्या मार्‍यापुढे त्यांचे काही चालेना...हा मारा चुकवून जे पुढे यायचे त्यांना अंगात कालिचा संचार झालेले बाजी प्रभू कापून काढत होते...शिवाजी घोडखिंडीच्या ओढ्याच्या मुखावर दिसताहेत आणि मागाहून आपल्या मदतीला मोठी फौज येत आहे, या धारणेने सिद्धी मसुदने आक्रमणाचा सगळा रोख घोडखिंडीवर केंद्रीत केला...वरच्या घोडमाळावरून पाठलाग करण्याचा काही उपयोग दिसत नव्हता...कारण शिवाजी तर समोर दिसत होते...
परंतू लवकरच सिद्धीच्या लक्षात आले की, ओढ्याच्या मुखावर शिवाजी सारखाच कोणी तरी दुसराच उभा करण्यात आला आहे, तेव्हा त्याने हल्ल्याची धार आणखी तेज केली, परंतू बाजी काही हटता हटत नव्हते...अंगावर एकही भाग असा शिल्लक उरला नव्हता, त्यावर वार नव्हते, परंतू बाजींना आवरणे आज कुणालाही शक्य झाले नसते...ते आवेश थोडाथिडका नव्ह साडेचार तास, म्हणजे दुपारी बाराच्या सुमारा पासून साडे चार वाजे पर्यंत सुरू होता...अखेर बंगळूरूच्या बंदुकधारी पथकातील नेमबाजाने बाजींवर डाव सांधला...त्याचा निशाण त्यांच्या खांद्यावर बसला व ते कोसळले...त्यानंतरही मराठ्यांनी रोखून धरलेली घोडखिंडीची सीमा ओलांडता येईना...अखेर महाराज विशाळगडावर सुखरूप पोहचल्याची तीन तोफांची इशारत झाल्याचा निरोप घोडखिंडीत पोहचला व तेव्हाच बाजींने देह टाकला...श्रीदत्त राऊत एक एक प्रसंग बारकाईने सांगत होते...पाऊस धो धो कोसळत होता, परंतू त्याठिकाणी कोणीच जागचे हलले नव्हते...जिथे बाजीं सारखे अलौकिक शौर्य घडले त्या पावनखिंडीत उभे राहून आजच्या पिडीतल्या उमद्या इतिहास अभ्यासकाच्या मुखातून पावनखिंड युद्धाचा वृत्तांत अंगावर शहारे आणणारा होता...याठिकाणी माझी फोटोग्राफी बंद झाली होती व डोळ्यांना अश्रृंच्या धारा लागल्या होत्या...तोच कुठलासा तहसिलदार स्मृतीस्तंभाचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाला...त्याच्या अंगावर कोणी तरी सरकारी कारकून किंवा शिपायाने छत्री धरली होती...ते केविलवाणे चित्र बघून, तो काळ आणी आजची नोकरशाही...कुठे तरी मेळ जुळू शकतो का? हा सवाल मनामध्ये उपस्थित झाला, त्यातच आमची तंद्री भंगली...त्यानंतर पाऊस, चिखल व खळाळून वाहणारी ओहळ अशी जेवढी म्हणून बघता येइल तितकी पावनखिंड आम्ही नजरेत साठवण्याचा प्रयत्न करू लागलो...

पावनखिंडीचे आजचे नैसर्गिक चिखल मातीचे प्रवेशद्वार उध्वस्त झाले आहे...नव्हे करण्यात आले आहे...कुणी तरी पावखिंडीचे स्मारक पावनखिंडीतच बांधण्याची योजना आखली असावी व आमच्या बांधकाम बहादूर प्रशासनाने कोट्यावधींची निधी ओतून खरी खुरी पावनखिंड फोडून काढत त्याठिकाणी चक्क पायर्‍या बांधल्या...दगड व सिमेंटच्या बांधकामात पावनखिंड उध्वस्त झाली...आता शिल्लक आहे त्या फक्त आठवणी...तोच कोणी तरी माहिती दिली की, ही खरी पावनखिंड नव्हे...ती तर धरणाच्या पाण्यात केव्हाच बुडाली आहे...कासारी नदीवर धरण बांधण्यात आले, त्यावेळी सरकारी यंत्रणेला त्याची सुतराम कल्पना नव्हती, त्यामुळे त्यांनी ती खिंड धरणाच्या बुडीतात अजाणतेपणाने जाऊ दिली...अन्यथा विशाळगडावरच्या तोफांचे आवाज इतक्या दूरवर पोहचणे अशक्य!
काही क्षणांसाठी मला ते बोल आशादायक वाटले की, ही खरी पावनखिंड नाही, त्यामुळे या ठिकाणी सरकारी स्मारक बांधताना खरी खिंड तर वाचली...परंतू पुढच्या क्षणाला भ्रमनिरास झाला की, ती तर धरणात बुडाली!

हे आपल्याच इतिहासाच्या बाबतीत वारंवार का होतं? आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील ही अग्नींकुडे आमच्याच लोकांनी गिळंकृत केली...त्याची हेळसांड शत्रुने नव्हे तर आमच्याच लोकांनी केली...यावर विश्वास ठेवणे कठिण आहे...परंतू या मंडळींना लाज तरी कुठून येणार...ज्या शिवाजींनी स्वराज्याची उभारणी करताना पाचशेच्यावर किल्ल्यांवर भगवे निशाण फडकविले, त्यातील एका किल्यावर तरी त्यांचे नाव कुठे कोरले आहे का? आणि ही मंडळी बाजी प्रभू शिवा काशिदच्या पुतळ्यांवरच्या दगडावर आपली नावे कोरण्यातच धन्यता मानतात...
पावनखिंडीतून घोडमाळेवर आलो तर तिथे ढगांची दाट दुलई पसरलेली...त्यातून चालणे म्हणजे स्वर्गातून चालल्याची अनूभूती...
पावनखिंडीतून पाय निघता निघत नव्हता...अखेरीस आम्ही दिड एक तास खिंडीत राहून घोडमाळेकडे प्रस्थान केले...घोडमाळावरून आम्ही घाटाचा आडमार्ग धरत कासारी नदीत पोहोचलो...कासारीला आज चांगलेच उधाण आले होते...त्यात दोन्ही बाजूस दोर धरून एकएका सहभागीला नदीच्या पल्याड सुखरूपपणे नेण्यात आले...दोन ठिकाणी नदी ओलांडली...परंतू विशाळगडाची कोणतीही चिन्ह दिसत नव्हती...समोर दिसणार्‍या अनेक छोट्या टेकड्यां व डोंगरांपैकी कोणता विशाळगड असावा? काही अंदाज येत नव्हता...
विशाळगडाचे सौंदर्य कॅमेर्‍यात साठविण्याचा विषय नाही...
गजापूरच्या मंदिरात मसाले भाताचे भोजन आटोपून आम्ही एक लहान टेकडी चढल लागलो...टेकडीच्या वर पोहचलो आणि आमच्या नजरा एकदम स्तब्ध झाल्या...विशाळगड काय प्रकरण आहे याची प्रचिती तेव्हा आली...घोडमाळ ओलांडल्यापासून आमची नजर ज्याला सर्वदूर शोधत होती तो विशाळगड असा टेकड्यांच्या मागे लपलेला होता...सर्वांच्या नजरा चुकवत एखाद्या दाट वनराईत एखादे लोभसवाणे फुल दिसावे तसा हा लोभसवाणा विशाळगड...तेव्हा लक्षात आले की, विशाळगडाला तर घेराच घालता येणे शक्य नाही...एकवेळ बारा पंधरा किलो मिटरचा घेरा असलेल्या पन्हाळगडाला सैन्याचा घेरा घालता येऊ शकतो....पण विशाळगड तर एका लहानशा खिंडीने एका बाजूने जोडला आहे बस...बाकी संपुर्ण गडाची नैसर्गिक तटबंदी...मागच्या बाजुला तर कोकणाचे उंचच उंच डोंगरकडे...त्या भयाण दरीत सैन्याचा घेरा लावणे केवळ अशक्य...
हिरवीशार दुलई पांघरलेल्या विशाळगडावर चित्रकाराच्या अस्फुट फटकार्‍या सारखे ढगांचे मोहक आवरण चढले होते...त्यातून असंख्य जलधारा दुधाळ प्रवास करत वेगाने खाली कोसळताना दिसत होत्या...सह्याद्रीतल्या गडाचे इतके लोभसवाणे रूप मी प्रथमच बघत होतो...
विशाळगडाच्या सौंदर्याला गालबोट लावतात ती अशी लक्तरलेली दुकाने...
प्रत्यक्षात विशाळगडाच्या पायथ्याला पोहचलो, तेव्हा आमचे स्वागत लक्तरलेल्या दुकानांनी केले...काळवंडलेल्या फाटक्या छप्परांच्या अनेक हॉटेल्स व दुकानांची रेलचेल विशाळगडाच्या पायथ्याला दिसून आली...त्याठिकाणी कर्नाटक व कोल्हापूरवरून अनेक प्रवाशी बसेस येत जात होत्या...
विशाळगडाचा मुख्य मार्ग म्हणजे एक लहानशी खिंड उतरून पलीकडचा गड चढायचा...आज त्याठिकाणी सिमेंट कॉंक्रिटचा भला थोरला कमानी पुल बनविण्यात आला आहे...तो सहजपणे ओलांडताना दरीत प्रचंड प्रमाणावर फेकलेला कचरा दिसला...स्वराज्याचा भाग्यविधाता दस्तूरखुद्द शिवाजीराजांना अभयदान देणार्‍या विशाळगडाची विदारक अवस्थे इथवरच थांबली असती तरी ठिक होते...प्रत्यक्ष गडावर गेल्यानंतर आणखी गंभीर अवस्था बघायला मिळाली...गडावर जाण्यासाठी गाडी रस्ता नसताना मोठ्या प्रमाणावर बकाल व बेढब वस्ती फोफोवली होती...त्या गलिच्छ वस्तूतून वाट काढत आम्ही एक लहानसा कडा उतरू लागलो...याठिकाणी राहणार्‍या लोकांनी गड जितका विद्रुप केला, तितकाच हातभार गडावर येणार्‍या पर्यटकांनी केल्याचे जाणवले...कचर्‍याच्या डोंगरातून वाट काढत आम्ही बाजीप्रभू व फुलाजी प्रभू या शिवरायांसाठी प्राणेची बाजी लावणार्‍या शुर योध्द्यांच्या समाधिची अवस्था कमालीची बिकट झाल्याचे जाणवले...गुडगाभर पाण्यातून वाट काढत आम्ही बाजी व फुलाजी, तसेच पन्हाळगड-विशाळगड युद्धात हौतात्म्य पत्कारलेल्या तमाम विरांसमोर नसमस्तक होऊन परतीचा प्रवास धरला...

पन्हाळगड ते पांढरेपाणी, तिथून पावनखिंड व विशाळगड हा संपूर्ण परिसर बघितला तर एक गोष्ट प्रकर्शाने लक्षात येते की, त्याकाडी दाट झाडींचा फायदा घेत महाराजांनी आडवाटेचा मार्ग निवडला...
परंतू काही इतिहासकारांच्या मते महाराज गावांतून किंवा  वाड्या वसस्त्यातून पळण्याची शक्यता कमी...कारण रात्रीच्या वेळी कुत्री भुंकली...जनावरे पळणार्‍या सैन्याची चाहूल लागून जागी झाली तर तिथले लोकही सजग होऊन न जाणो कोणी शत्रुला खबर दिली असती तर...महाराज इतकी साधी चुक करण्याची शक्यता कमीच वाटते...
ऐवजी शिवाजी महाराज पांढर्‍यापाण्या पर्यंत डोंगराच्या रस्त्याने पळाले...जो रस्ता मसाईच्या पठारावरून सुरू होतो तो खरा पलायनाचा मार्ग...हा मुद्धा तर्कसंगत वाटतो...कारण गावात कुणालाही सहजासहजी खबर लागू शकत नाही व डोंगराच्या दाट झाडीतून विशाळगडा पर्यंतचे पाऊण टक्के अंतर पार केले जाऊ शकते...
पावसाळ्यात रौद्ररूपाने वाहणारी कासारी नदी महाराजांच्या सैन्याने कोणत्याही उपकरणांशिवाय कशी पार केली असेल? पोहून जाण्याशिवाय गत्यंतर नाही...तिथून पुढचा मार्ग उंच सखल घाट व डोंगराचा असला तरी त्याठिकाणी पकडले जाण्याची शक्यता जास्त होती...तिथे महाराजांनी कोणत्या प्रकारे छदमावरण केले असेल का? एक ना अनेक प्रश्नांचे मोहळ उठत होते...एकमात्र स्पष्ट होत होते...पावनखिंडीचा इतिहास ज्या सुस्पष्टपणे समोर यायला हवा, तसे तो अद्याप आलेला नाही...बाजी प्रभू व फलाजी प्रभुंच्या समाध्या विशाळगडी नसून पावनखिंडीच्याच परिसरात कुठेतरी आहेत...त्यांचा ठावठिकाणा लागत नाही तोवर पावनखिंडीचे रण सरणार नाही! हे मात्र निश्चीत...

Saturday, June 11, 2016

औरंगजेब आणि मालोजीराजे भोसले...


दगडात कारलेले इतके सुंदर नक्षीकाम कोणत्या देवालयाचे असेल? हा प्रश्न तुम्हाला
घृष्णेश्वराकडे जाताना सतावल्यावाचून राहणार नाही...



हे आपल्याकडेच असं का होतं?

एका इतिहास पुरूषाला देवालयात स्थान मिळतं, तिनशे वर्षांनंतरही त्याच्या

स्मृतीस्थळाची नित्य देखभाल केली जाते, त्यावर दिवाबत्ती लावली जाते,

अनं दुसर्‍याच्या वाट्याला येते प्रचंड हेटाळणी...

मालोजीराजे भोसले आणि औरंगजेब...भारताच्या इतिहासातली अत्यंत

महत्वाची पाने यांच्या पराक्रमाने भरली आहेत...दोघांच्या भूमिका

हिन्दूस्थानच्या दृष्टीने तशा परस्परविरोधी...
मालोजी राजांनी अचाट बाहुबलाच्या जोरावर मैदानात मराठी पराक्रमाचा

झेंडा रोवला...हिंदवी स्वराजाचे स्वप्न रंगविणार्‍या शहाजी या पराक्रमी पुत्राला जन्म दिला, तर औरंगजेबने आपल्या अत्यंत धुर्तपणाने राजकारण करून अवघ्या भारतवर्षावर निरंकुश सत्ता प्रस्थापित केली...

त्यावेळची जगातली ही एक बलशाली राजवट होती...
मालोजीराजांचा जन्म १५५२ सालचा...विजापूर सुल्तानाविरुद्धच्या युद्धात इंदापूर येथे ते कामी आले...साल अंदाजे १६२० असावे...औरंगजेबचा जन्म १६१८ दाहेड येथे...मृत्यू १७०७ अहमदनगर येथे...वेरूळ  व खुल्ताबाद अशा एका शेजारी एक असलेल्या ठिकाणी हे दोघे चिरविश्रांती घेत आहेत, परंतू या दोघांच्या स्मृतीस्थळांना परस्परविरोधी भाग्य लाभल्याचे दिसून येते!

या सुट्टीत देवगिरीच्या यादवांनी बांधलेला जगप्रसिद्ध देवगिरीचा किल्ला

सहकुटुंब बघण्याचा आमचा निर्धार होता...हो! नाही करता करता आम्हाला

मुहूर्त गवसला ता ७ जुनचा...सात जुन म्हणजे पावसाच्या आगमनाची

वैजापूरच्या शेतात बागडणारे काळविट...या परिसरात दहा 

हजारच्या आसपाद काळविट असून शेतकरी त्यांची उपस्थिती भाग्याची मानतात...
पारंपारिक तारीख...गेल्या अनेक वर्षांपासून ही तारीख चूकतेय खरी, पण

आज सकाळ पासूनच आभाळ दाटलेले होते...उकाडाही प्रचंड होता...
अगोदर वेरूळला घृष्णेश्वराचे दर्शन घ्यायचे व मग पुढे देवगिरीला कुच

करायची, असा आमचा बेत...
वाटेत वैजपुरला एका शेताच्या बांधावर आम्ही कडूनिंबाच्या झाडाखाली

न्याहारीचा बेत हाणला, त्यावेळी दोन काळविटांचे मनोहारी दर्शन

घडले...मोहिमेची सुरूवात तर छान झाली होती...
वेरूळ गावच्या वेशीवर  घृष्णेश्वर व भद्रा मारूतीकडे निर्देश करणारे फलक

दिसले. पुढे एका फलकाने लक्ष्य  वेधून घेतले, 'आलमगिर औरंगजेबकी

मजार'. तेव्हाच ठरवलं, भारताच्या एका बलशाली बादशाहच्या स्मृतीस्थळाला

भेट द्यायची...पण अगोदर घृष्णेश्वर..
हल्ली एखाद्या बड्या धार्मिक स्थळाला भेट द्यायची म्हटलं की अंगावर

काटा येतो...एक तर देवळात जाण्याकरिता भाविकांवर नाना बंधने...असंख्य

वळणा वळणाच्या लांबच लांब रांगा...त्यात पिशवी आत नेऊ नका...फोन

नेऊ नका...आवारात थांबू नका...त्याउपरही देवालयात प्रवेश मिळवलात तर

नीट दर्शन घेण्याची सुविधा नाही...ना दोन क्षण तल्लीन होऊन देवाची

आराधना करण्याची परवानगी...
आमच्याकडे सप्तश्रृंगीकड, शिर्डी, काळाराम मंदिर, ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर

मंदिरात जाऊन दर्शन घेणे केवढे अडचणीचे बनले आहे, याचा अनूभव

आम्ही घेतच असतो...तसाच अनूभव पंढरपूर, तुळजापूर, जेजूरी या

ठिकाणीही घेतला आहे, त्यामुळे  घृष्णेश्वरात आख्खा कुटुंबकबिला नेण्याच्या

विचार अंमळ अडचणीचा होता...
परंतू धार्मिक व ऐतिहासिक अंगाने अत्यंत महत्वाच्या घृष्णेश्वराचे दर्शन

घ्यायचे होतेच...आज घृष्णेश्वराला अजिबात गर्दी नव्हती...विशेष म्हणजे थेट

मंदिराच्या जवळ गाडी नेण्याची परवानगी, तेव्हा झटपट दर्शन घेऊन पुढच्या

प्रवासाला निघायला मिळणार! ही भावना सुखावणारी होती...
घृष्णेश्वर मंदिराच्या बाहेर एका पुरातन मंदिराने लक्ष्य वेधून

घेतले...संपुर्णपणे दगडात घडवलेल्या या देवालयाचे कोरिवकाम व एकुण

स्थिती पाहता, ते फार पुरातन मंदिर असावे असे वाटत होते, परंतू या

मंदिराला लक्तरे निघालेल्या दुकांनांचा वेढा पडल्याचेही दिसून आले...लांबून

दोन फोटो घेऊन आम्ही  घृष्णेश्वराकडे निघालो...

या कथित देवालयाच्या चहुबाजूंनी लक्तरलेली दुकाने, 

मातीचे ढिगारे व कचर्‍याचा ढिग दृष्टीस पडतो...
मोबाईल...कॅमेरे फेकून द्या...
पहिल्या चिंचोळ्या द्वारात पोलिस ओरडत होता, मोबाईल व कॅमेरे आत

नेऊ नका...आमच्यातील पाच जणांकडे मोबाईल होते...माझा कॅमेरा व गाडी

चालकाचे दोन मोबाईल, यांचे करायचे काय? हा प्रश्न येण्यापूर्वीच समोरचा

दुकानदार खुणेने बोलावत असल्याचे जाणवले...फार गर्दी नसल्याने आम्ही

सर्वजण त्या दुकानात गेलो...तिथे मोबाईल व कॅमेरे सांभाळण्याची व्यवस्था

होती...प्रती डाग ५/- रूपये या दराने ४०/- रूपये मोजले व आम्ही

घ्रुष्णेश्वराच्या देवालयात मार्गस्थ झालो...फार पायपीट न घडवता आम्हाला

पटकन गाभार्‍यात जाता आले...
पुरूषांना गर्भगृहात टॉपलेस जावे लागते, तर महिलांना मात्र थेट गाभार्‍यात

प्रवेश दिला जातो...
लाल फत्तरात कोरलेल्या दगडात मंदिराचे बांधकाम लक्ष्यवेधी

आहे...खासकरून मंदिराचा कळस व आतील स्तंभ...काही जणांच्या ब्लॉगवर

मी ही छायाचित्रे बघितली आहेत...त्या भाग्यशाली लोकांना देवळाची

छायाचित्रे घेता आली...मला मात्र कॅमेरा नेण्याची संधी मिळू शकली

नाही...अर्थात मी तसा प्रयत्नही केला नाही...हल्ली कॅमेरे नेऊ नका...फोटो

काढू नका! भाविकांवर व पर्यटकांवर असे निर्बंध लादण्याची प्रथा रूढ झाली

आहे...याचा मला प्रचंड तिटकारा आहे...

शिवस्पर्षाचा गंध...
याच मंदिराच्या प्रांगणात माझ्या राजाने खुल्या असमंताखाली राजपुत्र

संभाजींसह मुक्काम केला होता...'पिता पूत्र कोठे थांबले असतील'...'त्यांनी

काय काय बघितले असेल', कशा अशा ना ना विचारांनी अंगावर रोम उभे

राहिले...
पुरंदरच्या तहात सर्वस्व गमावल्यानंतर संभाजींना पंधरा हजाराची मनसब

मोगल दरबारी मिळाली...शिवाजी राजांसाठीं शाही फर्मान निघाले...
''इकडील लोभ तुम्हावर पूर्ण आहे. खातरजमेने यावे. म्हणजे भेटी अंती बहुत 

सत्कार पावुन माघारी जाण्याविषयी निरोप दिला जाईल''...

राजे मग उरल्या सुरल्या स्वराजाची उत्तम घडी बसवून निघाले आग्र्याला

बादशाहच्या भेटीला...औरंगाबाद मार्गे...
औरंगजेबने राजांसाठी खास पोषाख पाठवला होता...
''खुद शहजादा प्रमाणे अदब चालवावी, म्हणजे शिवाजी राजांच्या काफिल्याची 

उत्तम बडदास्त ठेवणे'' असे कडक फर्मान औरंगजेबने आपल्या तमाम

कुलफौजदार व महाल मोकासे यांना ताकिदपत्र देऊन पाठविले होते...
औरंगाबादचा सुभेदार सफशिकनखान मोठा घमंडी होता, त्याने शिवाजी

राजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, परंतू राजांनी त्याची शेखी जिरवली

तेव्हा, बादशाहची गैरमर्जी होईल या भितीने खान सुतासारखा सरळ झाला...
औरंगाबादेत काही काळ मुक्काम केल्यानंतर राजे पुढच्या प्रवासाला देवगिरी,

वेरूळ मार्गे निघाले...
भोसले हे मुळचे वेरूळचे...घृष्णेश्वर त्यांचे कुलदैवत...तेव्हा राजांनी

घृष्णेश्वराचे दर्शन घेण्याची इच्छा बोलून दाखवली...बालसंभाजीसह राजांनी

घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. राजांनी नजिकच्या कैलास लेण्यांचे दर्शन

घेतले...''कोण कलाकार असतील ते'', कैलास मंदिराची रचना बघून,

''साधूतत्वाशिवाय अशी अजोड रचना शक्य नाही'' असे राजांचे उद्‌गार

होते...तिथले मुर्तीकाम व मंदिराची रचना बघून राजे स्तिमित झाले...
राजे परत घृष्णेश्वर मंदिरात परतले....मंदिराच्या प्रांगणात राजांनी दोनवेळा

भोजनप्रसाद घेतला...राजांनी मंदिराच्या बाहेर खुल्या आसमंतात रात्र

काढली...आग्य्राला बादशाच्या भेटीला निघताना केवढं बळ घेतलं असेल

राजांनी घृष्णेश्वराकडून...कोण कोणत्या विचारांची वादळं डोक्यात थैमान

घालत असतील...की राजे अधिक शांत झाले असतील इथल्या वातावरणात!

अशा या इतिहास प्रसिद्ध घृष्णेश्वराच्या दर्शनाने आम्ही सर्वजण हर्षोल्हासित

झालो...
शिवाजी राजांचे आजोबा मालोजीराजे यांनी घृष्णेश्वर देवालयाचा जिर्णोद्धार

केला...शिवांजी राजांचे पिताश्री शहाजींचा जन्म वेरूळ गावचा...
घृष्णेश्वराचे समाधानकारक दर्शन घेऊन आम्ही वाहनतळाकडे आमच्या

गाड्यांकडे निघालो, परंतू घृष्णेश्वराबाहेर ऐटीत उभ्या असलेल्या त्या प्राचीन

देवालयासमोर आमची पावले पुन्हा घुटमळली...
लक्तरलेली दुकाने ओलांडून आम्ही देवालयाकडे जाण्यास निघालो, तेव्हा

मंदिराच्या चहुबाजूला आम्हाला कचर्‍याचे साम्राज्य दिसले...मंदिराच्या

पहिल्या पायरीवरच कोणीतरी चक्क प्रातर्विधी उरकली होती...इतके सुंदर

देवालय इतक्या घाणीत कसे? याची कोणी देखभाल का करत नाही?
आम्ही आत प्रवेश केला, पण आत देवाच्या मुर्ती ऐवजी एक समाधी दृष्टीस

पडली...आत प्रचंड कुबट वास येत होता...वटवाघळांच्या वस्तीमुळे त्यांच्या

मलमुत्रांने उग्रदर्प सर्वत्र सुटला होता...फार थांबण्याची आवश्यकता उरली

नव्हती...आम्ही तडक समाधीस्थळ सोडले व वाहनतळ गाठले...तिथल्या

दुकानदाराला विचारले, ही वास्तू कसली? मालोजी राजे भोसल्यांची समाधी

आहे! विजेचा एकच झटका बसला...भोसले घराण्याचे पराक्रमी

वंशज...घृष्णेश्वराचे सुंदर देवालय बांधणार्‍या मालोजी राजांच्या समाधीची

अवकळा बघवत नाही...
आज उभा महाराष्ट्र शिवाजी व शहाजींचे गोडवे गातो, पण शहाजींच्या

पराक्रमी पित्यांच्या स्मृतीस्थळाची ही अशी दुर्गती व्हावी? बोचणारे अनेक

प्रश्न घेऊन आम्ही भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी प्रयाण केले...

भद्रा मारूती म्हणजे जमिनीवर झोपलेली हनूमानाची मुर्ती, अन्यथा हनुमान

हे उभ्या स्थितीतच दिसतात...निद्रास्थितीतले हनूमान तिन ठिकाणी बघायला

मिळतात, एक म्हणजे अलाहबादेत यमुना नदीच्या तिरावर व दुसरे जाम

सावली, मध्यप्रदेशात...
खुल्ताबादचे नाव पूर्वी भद्रावती होते...तिथला पराक्रमी राजा भद्रसेनवरून हे

नाव पडले असावे...हे रामाचे निस्सीम भक्त होते, त्यामुळे तिथे नित्य

नियमाने रामस्तूती गायली जायची...एकदा खुद्द हनूमान ही रामस्तूती

ऐकण्यासाठी भद्रावतीला आले...राम भजनात तल्लीन होऊन हनूमानाला झोप

लागली व ते तिथेच भाव समाधीत ते आडवे पडले...भद्रासेनाची रामस्तूती

संपल्यानंतर खुद्द हनूमानाला बघून ते चकित झाले व त्यांनी हनूमालाला

तिथे निवास करण्याची विनंती केली...तेव्हा पासून हनूमानाची भाव

समाधीतली मुर्ती विराजमान आहे...
औरंगजेबच्या समाधीस्थळाचे प्रवेशद्वार स्वच्छ रखरखाव असलेले...
याठिकाणी प्रचंड असा सिमेंट कॉंक्रिटचा सभामंडप तयार करण्यात आला

आहे...आतमध्ये सुद्धा फोन नेऊ नका...पिशवी नेऊ नका...कॅमेरा नेऊ

नका...पुन्हा या गोष्टी बाहेरच्या दुकानात जमा करण्याची कसरत...

पर्यटन मंत्र्यांनीच आता या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे...लोकांनी धार्मिक

पर्यटनाला जाताना सोबत मोबाईल फोन व कॅमेरे न्यायचे की नाही...जो तो

उठतो आणि या गोष्टींवर बंधने आणतो...बाहेर गावी या गोष्टी  एकतर

गाडीत ठेवणे सुरक्षित नाही...व एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे सोपविणे मोठे

जोखमीचे...दहशतवादाचा धोका जगात सर्वत्र असला तरी जगातील प्रमूख

पर्यटन स्थळी फोटो काढू दिले जातात ते कसे? ताजमहाल सारखी संरक्षित

वास्तू नाही...खजूराहो सारखे संरक्षित ठिकाण नाही...त्याठिकाणी सुद्धा फोटो

काढण्याची...फोन आत नेण्याची परवानगी आहेच ना...असो...
भद्रा मारूतीचे झटपट दर्शन आटोपले व आम्ही
खुलताबादेच्या वेशीच्या बाहेर पोहोचलो...एका भव्य मशिदीवर, मजार मोगल

सम्राट शहंशाह हजरत औरंगजेब (रह) हा फलक दिसला...हा रह म्हणजे

रेहमतुल्लाह या अर्थाने लिहीला असावा...याचा अर्थ ईश्वराची करूणा...
भारतावर निरंकुश सत्ता स्थापन करणार्‍या औरंगजेबचे स्मृतीस्थळ आहे तरी

कसे? आमची पावले या जुन्या वास्तूत वळली...पुर्णपणे काळ्या पाषाणात

हिन्दूस्तानच्या महापराक्रमी बादशाहची साधीशी कबर...
असंख्य कमानी व स्तंभात ही मशिद घडविली आहे...त्याला चुन्याची

रंगसभेदी व कडा हिरव्या व सोनेरी रंगात रंगविल्या आहेत...
आत गेल्यावर आम्हाला प्रथम हजरत ख्वाजा झैनुद्दीन शिराजी (रह) यांच्या

समाधीकडे नेण्यात आले...हे मुस्लीम धर्मातले २२वे व शेवटचे

खलिफा...औरंगजेब यांना आपला गुरू मानित...
हजरत ख्वाजा झैनुद्दीन शिराजी यांना दस्तूरखुद्द महंमद पैगंबर यांनी आपला

पोषाख दिला होता...हा पोषाख त्यांना अल्ला कडून मिळाला, तोच याठिकाणी

सुरक्षित ठेला आहे...रमजानच्या महिन्यात आठ दहा लाख भाविक या

पोषाखाचे दर्शन घ्यायला येतात, अशी माहिती आम्हीला मिळाली...
ख्वाजा झैनुद्दीन शिराजी यांच्या कबरीच्या बाहेर उजव्या बाजुला औरंगजेबचा

पुत्र आझमशाह व त्याच्या पत्नीच्या कबरी आहेत...कोणतेही छत नसलेल्या

या कबरी खुल्या आसमंताखाली आहे व त्यांना फक्त संगमरमरी दगडात

कोरलेल्या जाळ्या आहेत...
डाव्या बाजुला औरंगजेबची तशाच स्वरूपात समाधी आहे...परंतू तिचे

प्रवेशद्वार बाहेरून आहे...संभाजी राजांची हत्या केल्यानंतर पंचवीस वर्ष

औरंगजेब दख्खनमध्ये राहिला, परंतू दख्खन काही त्याला हाती लागला

नाही, अखेर नगरमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला...आपला देहांत

झाल्यावर आपले दफन गुरूचरणी व्हावे, वर कोणतेही छप्पर नसावे...टोप्या

शिवून कमावलेल्या रकमेतील फक्त १४ किंवा १२ आणे आपल्या कबरीवर

खर्च करावे अशी औरंगजेबची इच्छा होती...त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीची

ही कबर बांधली आहे...दहा बाय दहाची जागा असावी...तथापी चहुबाजूंना

संगमरमरी जाळीदार खिडक्या व प्रवेश द्वार संगमरमरात घडविले आहे...
कबरीचा जमिनीशी थेट संबंध असावा...असे औरंगजेबचे इच्छापत्र

होते...त्यावर सुगंध दरवळत रहावा याकरिता सब्जाचे एक रोप लावल्याचे

दिसून येते...संपूर्ण कबर ही संगमरममरात घडविली असून त्यावर पांढरी

चादर टाकण्यात येते व त्यावर गुलाबाची फुले टाकली जातात...औरंगजेबने

इच्छी व्यक्ती केली होती, त्याचे पालन आजही केल्याचे दिसून येते...
औरंगजेबच्या कबरीची आजही देखभाल ठेवली जाते...त्यावर सफेद चादर
टाकून रोज गुलाबाची फुले चढविली जातात...
ज्या भूमीवर त्याने अनन्वीत अत्याचार केले त्या औरंगजेबच्या वाट्याला

त्याच दख्खनेत तीनशे वर्षांनंतरही त्याच्या इच्छेनुसार सन्मान मिळाला...
वेरूळ व खुलल्ताबादेत दोन इतिहासपुरूषांच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही

देवगिरीच्या किल्ल्याकडे कुच केली...देवगिरीचा वृत्तांत पुढील लेखात...