Tuesday, March 31, 2009

... अखेरी कुशल माझे, मज पुसावे लागेल

भेदरलेले विद्यार्थी : ... अन्‌ स्थानिक यंत्रणेचा "क्विक रिस्पॉन्स'?

प्रशांत परदेशी ः
नाशिक, ता. 20 : मुंबईतील "26/11'सारखी एखादी दहशतीची घटना नाशिकमध्ये घडली, तर संरक्षण यंत्रणा कितव्या मिनिटाला प्रतिसाद देतील, हे माहीत नाही. परंतु, मधुमक्षिकासारखा एखादा जैविक हल्ला झाला तर? एक तास, दोन तास, तीन तास...? पंचवटीतल्या एका शाळेचा अनुभव विचाराल, तर याचे उत्तर आठ तास किंवा कदाचित प्रतिसादच नाही! असे देता येऊ शकेल.
आज सकाळी पंचवटीतील आर. पी. विद्यालयाच्या प्रांगणातील बाबूभाई कापडिया प्राथमिक शाळेत नेहमीप्रमाणे शाळेची लगबग सुरू होती. प्राथमिकचे वर्ग सकाळी आठला सुरू होतात, त्यामुळे विद्यार्थी व त्यांना सोडण्यासाठी येणारे पालक अशी वर्दळ साडेसातपासून सुरू होती. पावणेआठ- आठपर्यंत पाचशेच्या आसपास विद्यार्थी व सुमारे पंचवीस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच थांबून होते. शाळेत कुणालाही जाऊ दिले जात नव्हते. दाराजवळच विद्यार्थ्यांच्या दफ्तरांचे ढीग जमा झाले होते. मधमाश्‍यांचे मोहोळ उठल्याची चर्चा एव्हाना सर्वत्र पसरली होती. काही पालकांनी आणीबाणीच्या प्रसंगी आठवणारा 100 क्रमांक फिरवून पाहिला; परंतु अग्निशामक दलाकडून "मधमाश्‍यांचे नियंत्रण आमच्याकडे नाही,' असे सांगण्यात आले.
तोपर्यंत प्रवेशद्वारासमोरच्या झाडाखाली बसलेल्या मुलांवर मधमाश्‍या चाल करू लागल्या. चार- पाच मुलांना त्यांनी चावे घेतल्याने मुलांमध्ये एकच हल्लाकल्लोळ माजला. विद्यार्थ्यांची काळजी घेणाऱ्या शिक्षकांवर मधमाश्‍यांचा हल्ला बिनदिक्कत सुरू होता. एखाद- दुसरी माशी असती तर एका क्षणात तिच्यावर नियंत्रण मिळविता आले असते. परंतु, त्यांच्या समूहाची माहिती मिळाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. काही पालकांनी एखाद्या पत्रकाराच्या मदतीने सरकारी यंत्रणेची मदत मिळविता येते का, याचा तपास सुरू केला. दोन पत्रकारांना दूरध्वनी करून तातडीने सरकारी यंत्रणेकडून मदत मिळविण्याची याचना करण्यात आली. या पत्रकारांनी लागलीच माहिती घेऊन पेस्ट कंट्रोल विभागाशी संपर्क साधण्यास सांगितले. परंतु, एवढ्या सकाळी दूरध्वनी खणखणतच राहतील, प्रतिसाद मिळणार नाही, हे ठाऊक होते. कोणीतरी सर्प पकडणाऱ्या सर्पमित्र वा बिबट्यावर नियंत्रण मिळविणाऱ्या वनाधिकाऱ्यांचा क्रमांक फिरवून त्यांना घटनेची कल्पना दिली. परंतु, याठिकाणीही निराशाच! मधमाश्‍या वन्यजीव असल्या, तरी त्या आमच्या कार्यक्षेत्रात येत नाहीत व आमच्याकडे तशी यंत्रणा नाही, अशा उत्तरासह संभाषणही तिथेच संपले.
एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने पेस्ट कंट्रोल विभागाला माहिती कळविल्याचे सांगितले. त्यामुळे पालक व शिक्षकांच्या जीवात जीव आला. परंतु, एक तास उलटला, दोन तास उलटले, तीन तास उलटले, तरी पेस्ट कंट्रोलकडून कुणीही येईना. तोपर्यंत सर्वच्या सर्व पाचशे विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानातील एका झाडाखाली बसविण्यात आले. मुलांनी या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर यांच्या खुल्या वातावरणातील शिक्षणाचा वह्या-पुस्तकांविनाच आनंद लुटला.
मुलांना शाळेत सोडल्यानंतर पालक निर्धास्त मनाने घरी परततात, त्यामुळे वर्गाविना या मुलांना दिवसभर सांभाळण्याची जबाबदारी, नव्हे विवंचना शिक्षकवृंदास भेडसावू लागली. डोक्‍यावर तो भास्कर मिनिटागणिक आग ओकतच होता. तोपर्यंत पाच ते सात विद्यार्थ्यांना व तीन शिक्षकांना मधमाश्‍यांनी दंश केला होता.
""शाळेत मोकळी जागा भरपूर असल्याने विद्यार्थ्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. आता शनिवार व रविवारच्या सुटीच्या दिवशी या मधमाश्‍या नेमक्‍या कुठून उठल्या, याचा तपास करून पेठ नाक्‍यावरील कोकणी मजुरांच्या मदतीने पोळी काढली जातील'', अशी माहिती मुख्याद्यापिका नंदा गाला यांनी दिली.