Sunday, August 19, 2018

मंदीत संधी घाटवाटांची भटकंती




शिवथरघळ, गोप्या-मढे-उपांड्या घाटवाटांची भटकंती!

मामला मंदीचा असला की तिथे हमखास संधी असतेच!
सह्याद्रीतल्या डोंगरांचेही असेच आहे. ज्याठिकाणी लोकांची बेफाम गर्दी नसेल...गाड्यांचे नी ब्लूटूथ स्पीकर्सचे आवाज नसतील...लोखंडी नळकांड्यांचे संरक्षक कठडे नसतील...महाराष्ट्र शासनाचा ट्रेडमार्क बनलेल्या डोंगर पर्यटन विकासाची छाप नसेल अशी ठिकाणे भटकंतीचा खराखूरा आनंद मिळवून देतात, अशा वाटा शोधून त्यावर आपल्या पावलांची मोहोर उठवायची! अस्सल ट्रेकर मंडळींची पावले हल्ली जाणिवपूर्वकपणे प्रसिद्ध गडकिल्ले टाळून, इतिहासीतील अपरिचीत पाने उलगडण्याच्या दिशेने वळू लागली आहेत. इतिहास आणि सह्याद्री यात एकरूप होण्यास सहाय्य करणारी यंदाची भटकंती सह्याद्रीतल्या घाटवाटांची - शिवथर घळ अन त्या सोबत गोप्या-मढे-उपांड्या या प्राचीन घाटवाटा...

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत सह्याद्रीतल्या घाटवाटांचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. हे घाट डोंगरांच्या अलिकडचा व पलिकडचा प्रदेश एकमेकांना जोडणारे. प्रसंगी युद्धाच्या वेळी सैन्याची हलवाहलव करण्यासाठी सुद्धा वापरले जायचे.  पूर्वीच्या काळी आजसारखे रस्ते विकसीत नव्हते. प्रवास हा पायी किंवा बैलगाड्या, घोड्यांवरूनच व्हायचा. उंट, खेचरं आदी प्राण्यांच्या मदतीने मालाची वाहतूक केली जायची. दूरवरून येणारा माल समुद्र मार्गाने किंवा खुष्कीच्या मार्गाने ने आण करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणार्‍या प्रमुख घाटवाटांत पुण्या जवळचा नाणेघाट, नाशिक जवळचा थळ घाट हे प्रसिद्ध आहेत. कोकण आणि देश यांना जोडणार्‍या या घाटवाटांचा पसिर भरपूर पावसामुळे निसर्गत: रम्य. त्यात जुन्या खाणा खुणा, पायथ्याच्या व घाटावरच्या सुंदर अशा वसाहतींना भेटींचा आनंद आणि तिथल्या माणसांचा जिव्हाळा, त्यांचे निसर्गाशी जुळवून घेणारे राहणीमान बघायला मिळाले की, आपली भटकंती अधिकच समाधान देणारी ठरते. महाराष्ट्रात अशा सव्वा दोनशेच्या आसपास घाटवाटांची नोंद आहे. सह्याद्रीच्या या घाटवाटांचे तुम्ही वाटसरू व्हा. येथे तुम्हाला जसे निसर्गवैविध्य बघायला मिळेल तशीच कातळातले कुंड, तळी, टाकी नी जवळ पास प्रत्येक ठिकाणी आश्रय देणारा भैरव, मारूती किंवा शक्तीचे ठाणे तरी दिसेल. आजही इथले मुळ निवासी या प्राचीन मार्गांचा वापर करत आहेत. तुरळक प्रमाणावर का असेना, निर्जन जंगल, डोंगर, दर्‍यांतून बर्‍याचदा एकट्यानेच दहा वीस मैलाचा प्रवास करत जाणारे दुर्गम वसाहतींवरचे स्त्री अथवा पुरूष किंवा एखादे कुटुंब ट्रेकर्सना अशा घाटवाटांवर हमखास भेटतात तेव्हा त्याचे मोठे अप्रुप वाटते.

- ठाणे स्थानक: तुतारी एक्सप्रेसची वाट बघत असताना रात्री ११-४५च्या सुमारास उद्‌घोषणा सुरू, मुंबईला जाणारी शेवटची लोकल बारा वाजूत तीस मिनीटांना प्लॅटफॉर्म क्रमांक ४वर येत आहे...

३ ऑगस्ट २०१८:
सायंकाळी ६-१५च्या सुमारास मुंबई नाक्यावरून नाशिक-कसारा टॅक्सीने आमचा १७ जणांचा चमु कसारा रेल्वेस्थानकाकरिता रवाना झाला. ८-१५च्या मुलूंड लोकलने ठाणे रेल्वे स्थानक गाठले. तिथून रात्री १२-३०ची मुंबई-सावंतवाडी राज्य राणी एक्सप्रेस रेल्वे आम्हाला महाड जवळच्या वीर स्थानकावर घेऊन जाणार होती, त्याकरिता आम्ही महिन्याभरापूर्वीच साधारण स्लिपर वर्गाची तिकीटे आरक्षीत केली होती. राज्यराणीला ठाण्याला पोहोचायला वीस मिनीटे उशिर झाला, त्यामुळे वीर स्थानकावर पहाटे साडे तीन वाजता पोहोचणारी गाडी ३-५० वाजता पोहोचली. झोप अडीच तासांचीच मिळणार होती. सगळे जण माणगाव स्थानक येण्यापूर्वीच उठून सज्ज झाले होते.

 - वीर स्थानक (महाड): मध्यरात्री ३-५१ वाजता.

पावसाच्या ऐन तारूण्यातली ही भटकंती कोकणाला जोडणार्‍या घाटवाटांची असल्याने पाऊस एके पाऊस असेच चित्र डोळ्यासमोर होते. त्याची सुरूवात नाशिकहून झाली. पावसाचे माहेरघर इगतपूरीत टॅक्सी पोहोचली तेव्हा टपावर बांधलेल्या सॅक बॅंगांची पावसाची परिक्षा पास करण्याची कसोटी लागली होती, त्यात काही पाठपिशव्या पास झाल्या तर काही नाही होऊ शकल्या याची जाणिव राज्यराणीच्या स्लिपर बाकांवर झोपतानाच झाली. जोरदार पावसाने ठाणे आणि वीर या दोन्ही स्थानकांच्या पत्र्यावर आम्हाला टिपरीचा नाद ऐकविली.

वीर स्थानकावरून आम्ही १७ आसनी टेम्पो ट्रॅव्हलरने ४-४४ वाजता महाड गाठले. तिथे मुंबई-गोवा राज्य मार्गावर चहाचा छोटेखानी ब्रेक घेऊन ३० किलो मिटरवरच्या शिवथर घळीकडे आमचा प्रवास सुरू झाला. सावित्री नदीवर आता नविन पुल झाला आहे. आजच्याच दिवशी म्हणजे ३ ऑगस्ट २०१६ला मध्यरात्रीच्या सुमारास इथला ब्रिटिशकालिन पुल कोसळला होता. वळण घेऊन येणारा रस्ता व महामार्गावरील अंधार त्यामुळे पुढे कोण संकट वाढून ठेवलेय याची सूतराम कल्पना नसलेल्या दोन बस, दहा खासगी वाहने पुरामुळे ओसंडून वाहणार्‍या सावित्री नदीत कोसळली होती, त्यात २९ जण मृत्यूमूखी पडले होते. त्या दुर्दैवी घटनेच्या आठवणींनी अंगावर शहारे आणले.

शिवथर घळ येथील सुंदरमठ अर्थात श्री समर्थ आश्रमाचा परिसर.



पाऊस आणि शिवथरघळ....एक समिकरणच!



                                                                           सुंदरमठ: इथली शांतता अनूभवण्याचा विषय.
सुंदरमठ...तीन तास:
६-०२ वाजता आम्ही शिवथरच्या सुंदर मठाजवळ पोहोचलो. गाडीतून उतरताच झर्‍याची खळखळ ऐकु येत होती. इथले सर्व डोंगर झुडपे, वेली अनं लहान झाडांनी डवरलेले. काही डोंगरावरून मोठमोठाले जल प्रपात कोसळताना दिसत होते. समोरच वरंध घाटाचा रखवालदार कावळ्या दुर्ग माथ्यावर ढगांचा मुकुट धारण करून आपल्या वांदरलिंगी सुळक्याने आपले वेगळे पण दाखवून देत होता. आम्हाला कळून चुकले होतो, आम्ही हिरवाईच्या सृष्टीत दाखल झाले होतो, जेथे पावसाचे अधिराज्य आहे, ढग, धुके, नाना विविध प्रकारांचे जल प्रपात, झरे, ओहळी आहेत. पुढचे छत्तीस तास हा स्वर्ग आणि आम्ही हा दोस्ताना पक्का जमणार होता.
शिवथर नदीवरचा लहान पुल ओलांडून दोनच मिनीटात आम्ही मठाच्या पायथ्याला पोहोचलो, तिथे दोन तीनच घरे आहेत, त्यांची तिथे शेतीवाडी आहे...या घरांनी दर्शनीभागात हॉटेल्स थाटलीत. त्यातल्या एका हॉटेलात आमची आजच्या चहा नाष्त्याची तसेच दुपारी सोबत बांधून नेण्याच्या जेवणाची सोय झाली. शिवथर घळीच्या जवळ श्रीसमर्थ उपासकांनी मोठा आश्रम बांधला आहे. त्याला सुंदरमठ असे का म्हणतात?
ज्ञानाचे भांडार आणि उपासनेच्या शिखरावर नेऊन ठेवणारा मराठी भाषेतला अप्रतिम छंदबद्द दासबोध ग्रंथ या घळीतल्या गुहेत त्याची रचना करण्यात आली; सौंदर्याची ती अतीउच्च पातळी. तसा या परिसरातला निसर्ग वर्षभर आपल्या सौंदर्याच्या वेगवेगळ्या छटा पसरवित असतो. आम्ही पोहोचलो तो पावसाळ्याचा मध्य तेव्हा इथल्या पावसाळी वातावरणाचे सौंदर्य शब्दात समावू शकत नाही. मागे एकदा दिवाळीच्या सुट्टीत शिवथरघळीत येणे झाले तेव्हा या परिसराचे मनात साठलेले निसर्गसौंदर्य अजुनही कायम आहे.


सुंदरमठातून वरच्या भागातील चेराववाडीकडे जाणारा मार्ग.

प्रसिद्ध शिवथर धबधबा....

सुखकर्ता - भिमरूपी - निश्चयाचा:
सुखकर्ता दुखहर्ता - गणपतीची आरती, भिमरूपी महारूद्रा - महाबली हनुमानाचे काव्य, निश्चयाचा महामेरू - छत्रती शिवाजी महाराजांची स्तूती अशा अनेक अजरामर रचना करणार्‍या समर्थांच्या शिवथरघळीतून आमचा दोन दिवसीय ट्रेकची सुरूवात होणार ही गोष्टच आंतर्बाह्य रोमांचित करणारी होती. शिवथरघळीच्या वातावरणात असीम शांतता आहे, त्यामुळेच डोक्यावर मोठ्या ट्रेकचे उद्दीष्ट असताना आमचे तीन तास तेथे कसे गेले कळलेच नाही. भिमरूपीचे पठण, थोडी ध्यानधारणा करून सुंदरमठातली शांतता अनूभवल्यानंतर आमची पावले मठावरच्या वस्तीकडे वळली. धबधब्याजवळूनच एक पायर्‍यांची वाट तिथल्या चेराववाडी कडे जाते. पावसाळ्यात या पायर्‍या निसरड्या बनतात, तेव्हा जरा जपूनच. खालच्या बाजूने चोरवाडी पर्यंत येण्यासाठी पक्का घाटरस्ता तयार झाला आहे. तिथली जिल्हा परिषदेची एक खोलीची शाळा तर अतिशय देखणी. शाळेच्या बरोबर मागे एक भलामोठा धबधबा वाहतो, निसर्गाने मुक्त हातांनी उधळण केलेला केवढा निसर्गरम्य परिसर.

- चेराववाडीतून दिसते ते चहूकडे डोंगर, ढग, पाऊस आणि त्यावर सतत बदलणारे वातावरण.

या वस्तीसाठी महाड पंचायत समितीने मोठे सभामंडप बांधून दिले अहे. तिथून जवळच जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष बघण्याची सार्‍यांना उत्सुकता होती, परंतू ते ठिकाण डोंगरावर दाट झाडीत असून त्यामुळे ट्रेकचे पुढचे गणित डामाडौल झाले असते. पुढे केव्हा तरी खुट्यादाराचा ट्रेक होइल तेव्हा त्या वाड्याचा परिसर बघू असा निर्धार करून आम्ही खाली उतरून शिवथर घळीचा धबाबा कोसळणारा धबधबा येतो कुठून? याची पाहणी केली, तेव्हा वरच्या बाजुला एक सुंदरचा भलामोठा धबधबा दिसला. हा एकुण परिसर कमालीचा निसरडा असल्याने या ठिकाणी जरा जपूनच वावरावे.

- शिवथर धबधबा वरच्या टप्प्यात...तिथून पुढे येऊन तो पन्नास फुटांवरून जमिनीवर झेपावतो.
खाली उतरताना आता बर्‍यापैकी उजाडले होते. समोरच वरंध घाटाचा पहारेकरी कावळ्या किल्ल्याच्या गर्द वनराईत मधोमध एक पांढराशुभ्र जलप्रपात वर कावळ्याला ढगांचे मुकुट...त्याच्या डाव्या बाजुला तीन मोठ्ठे धबधबे, त्यांचा खट्याळ खेळ कितीही वेळ बघितला तरी मन भरत नाही. पोहे आणि चहा घेऊन सगळ्यांनी आपआपल्या पाठपिशव्यांना पावसापासून बचावाचे आवरण चढविले आणि शिवथरघळीला नमस्कार करून आम्ही ९-०९ वाजता गोप्याघाटाच्या दिशेने प्रस्थान केले. शिवथरघळीतून मात्र पावले सहजासहजी निघत नाही. मागे थोडे जरी वळून बघितले की, मोठमोठे जलप्रपात खुणावतात. रस्त्याच्या डावी-उजवीकडे आकंठ हिरवाई. शेत असो, बांध असो, घरांची कौलं असो की पुलांचे कठडे, मैलांचे दगड या प्रत्येकावर पावसाने आपली हिरवी मोहोर उमटविलेली. मधुनच सर सर करत शिडकावा पडे. काळ्या मेघांना सारून सूर्यांची किरणे मधूनच डोकावून जाई.
- वरंधा घाटाचा पहारेकरी कावळ्याची वृक्षवेलींची तटबंदी...


- वरंधा घाटात अशा अनेक ओहळीतून वाहणारे झरे शिवथर नदीला पाण्याचे भरभरून दान देतात...


- घर म्हणजे काय असते?

- शिवथरचा परिसर: तुरळक वस्ती...गर्द हिरवाई.

९-३७ वाजता आम्ही कुंभे शिवथर गावात पोहोचलो. गाव कसले, एक छोटीशी वस्तीच. तिथे अर्थातच थांबण्याचे प्रयोजन नव्हते, फक्त पुढची वाट विचारून आमची हिरव्या स्वर्गातून वाटचाल सुरू झाली. भात खळ्यांचे पाणी काढण्यासाठी रचलेल्या दगडांवरून खळखळत वाहणारे पाणी म्हणजे एक प्रकारचा झराच. प्रत्येक झर्‍याचे स्वत:चे वेगळे असे संगीत, त्यामुळे या अवघ्या परिसराला निसर्गसंगीताचा एक साजच चढवलाय. पुढचे दोन दिवस हे संगीत आमच्या सतत कानी पडणार होते.
- कसबे शिवथर: भातखाचरातुन उलगडलेल्या वाटा...


- शिवथरचा परिसर: हिरवाई शिवाय बातच नाही!



- जंगल आणि डोंगरातून उलगडलेल्या जुन्या घाटवाटांवरचे हे प्रवासी आमची चुकलेली वाट दर्शविताना...

९-४५ वाजता आमची कुमक कसबे शिवथर येथे पोहोचली. येथे दोन वाटा फुटतात, तेव्हा डोक्यावर कुठलेसे ओझे घेऊन आलेल्या एका आजीबाईंना गोप्याघाटची वाट विचारली तेव्हा पाठीवर ओझे हातात काठी अशा आमच्या ओल्याचिंब अवताराकडे पाहून त्या क्षणभर आवाक झाल्या. 'तितं जानार व्हय!' असा प्रश्नकरून त्यांनी दिशा दाखविली.  कुंभे शिवथर आणि कसबे शिवथर म्हणजे दोन पाच घरांच्या अनेक वाड्या, वसत्यांचा समुह असलेली गावे. भात पेरणी पूर्ण झाल्याने शेतातली लगबग संपलेली. काही मोजक्या ठिकाणी माणसे तण साफकरताना दिसली. कसबे शिवथरच्या पुला जवळ दोन मोठे प्रवाह येऊन मिळतात. या संगमावर भर पावसात स्थानिक महिला कपडे धुत होत्या.

- निसर्ग असा मेहेरबान की, रोजचे कपडे धुणेही किती रमणीय...


- कसबे शिवथर सोडून कुंभे शिवथरकडे या डोंगरांना उजवे ठेऊन गोप्याघाटाचा मार्ग.

- कुंभे शिवथरच्या निसर्गाच्या कुशीतल्या वाड्या...


चंद्रमौळी घरे प्रत्यक्षात कलेचा अविष्कार ठरतात, जेव्हा आसपास निसर्ग चौफेर खुललेला असतो...

- कुंभे शिवथर: प्रत्येक घर देखणे.

- वरंद्याच्या डोंगरांच्या या प्रपातांना वारा म्हणतो वरच थांबा...


- सकाळचे दहा वाजलेत...ढगांची दाटी अशी की पहाटेचा आभास व्हावा...
गोप्या घाटची चढण सुरू व्हायला अजून अवकाश होता. अधून मधून थांबत सभोताली नजर फेरायची तर प्रत्येक फ्रेम शेकडो शब्दांनी डोक्यात शिरायची. कावळ्या किल्ल्यालगतच्या डोंगरांवरचे दीन माठे जलप्रपात नजरेच्या एका टप्प्यातले. वरच्या भागात बरीच हवा असावी, करण या प्रपातांचा प्रवास अर्ध्यावर कसाबसा संपायचा आणि त्यातले पाणी वेगवान वार्‍या सोबत स्वैरपणे कुठच्या कुठे जाऊन पडायचे. त्यावर थोडी नजर फेरायची आणि पुन्हा खाली मान घालून चालायला लागायचे. पावसात अशा निसरड्या वाटाच आपल्याला जमिनीकडे अदबीने बघण्याचा पाठ घालून देतात. ती अदब मोडली तर पाय घसरण्याचीच शक्यता अधिक.
वाटेत एका टप्प्यावर डोंगरावरून दोन प्रचंड मोठ्या जलप्रपाताचे पाणी वाहून नेणारा भलामोठा प्रवाह लागला. त्याच्या बाजुला नदीच्या गोट्यांच्या रांगा लागलेल्या. त्यावरून कसरत करत आम्ही पंधरा मिनीटात एका ओढ्यावर पोहोचलो, हा ओढा ओलांडण्यासाठी विजेचे दोन निरूपयोगी खांब आडवे टाकून ठेवलेत. त्यावर एक एक पाऊल सांभाळत आम्ही ओढा ओलांडला.

- उन्मळून पडलला विजेचा खांब कुंभे शिवथरला सह्याद्रीवाडीशी जोडण्यासाठी असा उपयोगी ठरतोय.

 पुढे पंधरा मिनीटे चालल्यावर वाट सापडणे कठिण झाले. दोन वाटा, दोन्ही पुसट! त्यातली थोडा जास्त ठळक वाट घेऊन आम्ही चढणीला लागलो तोच दुरून एक आजी डोक्यावर नी हातात ओझे घेऊन येताना दिसल्या. त्यांना गोप्याची वाट विचारली, तेव्हा त्यांनी मागे फिरून मागच्या वाटेने जाण्यास सांगितले. तिथून तीनच मिनीटात आम्ही सह्याद्रीवाडीवर पोहोचलो. तिथे चार शाळकरी मुले आणि त्यांचे जणू नेतृत्व करणारी एक चुणचुणीत मुलगी दिसली. आज रविवारची सुटी असली तरी ही मुले शाळेच्याच गणवेशात होती.
'तुमची शाळा कोठे आहे'?
- वर डोंगर चढून जावे लागते.
'पाऊस जास्त असल्यावरही जातात'?
- हो, आम्ही रोजच शाळेत जातो...खुप चालत जावे लागते.

- सह्याद्रीवाडीच्या बालगोपाळांसोबत दिलखुलास गप्पा.
येथे छोटा ब्रेक घेऊन आम्ही मुलांना थोडा खाऊ दिली आणि त्यांनी दाखविलेल्या दिशेने आम्ही चढण पकडली. घड्याळात आता दुपारचे ११-०० वाजले होते. हे जावळीचे खोरे आहे. त्यात गोप्या घाट म्हणजे पर्यटकच काय, ट्रेकर्स मंडळीचीही अगदी तुरळक वहिवाट, त्यामुळे चांगल्या मळलेल्या वाटा सापडणे दुरापास्त. तोच आम्हाला घेण्यासाठी आलेले कुंबळ्याचे माऊली बलकवडे भेटले. कुंबळ्यात सह्याद्रीत भटकंतींची आवड असलेल्या

- घाटवाटेवर स्वत:ची शेती आणि ती स्वत: कसण्याचे स्वप्न साकार करणारे मेघा आणि अनिरूद्ध केळकर 
आमच्या अनिरूद्ध केळकरची शेती आहे. हे केळकर दांम्पत्य नियत्यनियमाने आपल्या शेतात राबतात. त्यानेच माउलींना निरोप दिला होता. माऊली सोबत एक जोडीदार घेऊन आले होते, आता वाट चुकण्याची भिती नव्हती. पण तरीही आमची वाट चुकलीच. दाट झाडीतून चालताना पायांना जमिन लागेना. वेली आणि काटेरी झुडपांच्या गुरफट्यात आमच्या पाठपिशव्या सांभाळत मार्गाक्रमण करणे अशक्य होऊ लागले. पुढे जाऊन वाट शोधाते, सांगून माऊली रानात गायब झाले. थोड्या वेळाने आम्ही मुख्यवाटेला येऊन मिळालो. तिथे एक निर्जन  वस्ती लागली. चिरेबंदी भिंतींची घरे आता ओस पडली होती.

साधारणपणे पाऊण एक तास दाट झाडीतून चालल्याने आसपासचे दृष्य झाकले जात होते, ११-३७ वाजता एक छोट्या पठारावर पोहोचल्याने सभोवतालचे डोंगर दिसू लागले. आमचे खुणेचे कावळ्या गडाच्या डावीकडच्या डोंगरांचे पुन्हा दर्शन घडले. त्यावर आणखी एक धबधबा आता दिसू लागला, जो पलिकडच्या बाजुने झाकला जात होता. आतापर्यंत तुरळक प्रमाणात लागणार्‍या पावसाने आता जोर धरला होता. चढण अधिक तिव्र झाला होती. पाऊस आणि वारा दोघांचा जोर वाढला होता. निम्मा अधिक गोप्या घाट चढल्यानंतर डाव्याबाजुला पांडवकालीन गुहा असल्याची माहिती माऊलींनी दिली. त्याची वाट भलतीच निसरडी असल्याने व पावसाचा जोर अधिक असल्याने आम्हाला तिथे जाता आले नाही. आता आमचा मार्ग डोंगरावरून वेगाने धावत येणार्‍या झर्‍याच्या वाटेतुन सुरू झाला. वाढत्या पावसासोबत झर्‍याचे पाणीही  वेगाने धावत होते. दृष्यमानता अगदीच कमी झालेली. अंग पूर्णता भिजलेले. एका झर्‍यालगत खड्या चढणीवरच पाणी पिण्याचा एक छोटा ब्रेक घेतला. वाहत्या पाण्यातुन पेला पेला भर पाणी पोटात गेले. थोडी खजूर, थोडे मनुके, थोडे खारे शेंगदाणे पोटात गेले आणि अंगात एकदम तरतरी आली. गोप्या घाटचा शेवटचा टप्पा आता दृष्टीपथात होता.

पाऊस थांबण्याचा प्रश्नच नव्हता. अखेर १-०० वाजता भैरोबाचे ठाणे आणि कातळात खोदलेले पाण्याचे कुंड लागले. एका ऐतिहासिक ठिकाणाला भेट दिल्याचे समाधान पावले. गतकाळात कित्येक पांथस्थांची तहान या कुंडाने भागविली असेल. कित्येक जिवांना या भैरोबाने आधार दिला असेल. आजही स्थानिक मंडळींना या वाटा सोयीच्या. आम्हाला पलिकडच्या गावात या वाटेने ये-जा करणारी एक महिला पायथ्याला तर एक पुरूष वरच्या भागात भेटला. आता आम्ही सपाटीला लागलो. असंख्य चढ-उतार असलेली ही सपाटी पार करताना पाटोतले कावळे, भोजनाची वेळ झाल्याची आठवण करून देत होते. अनिरुद्दने समोरच्या डोंगरालगतचे कुंबळे गाव आणि त्याचे शेतातले घर दाखवले. 'जेवणासाठी इतके दूर चालावे लागणार का'? भैरोबाच्या ठाण्यापासून पाऊण तास चालल्यानंतर एका छोट्या उतरणीवर सुंदर अशी ओहळ लागली. भुकेच्या सपाट्यातही ती पार करण्याची मजा काही औरच. एकावर एक रचलेल्या दहा दगडांच्या थरावरून पाण्याचा मोठा प्रवाह खळखळाटासह उडी घेत होता. त्यात थोडे थांबून सगळ्यांनी पावसाळी भटकंतीचा आनंद घेतला.

- गोप्याघाटची कठिण चढाई पुर्ण केल्यानंतर अशा ओहळींचा खळखळाट सारा शिण घालवतो.

- देखणा हा डायनिंग हॉल
-ओल्याचिंब कपड्यातच दुपारचे जेवण उरकताना बोप्याच्या निसर्गाने आमच्याकरिता ढगांच्या चादरीवर चादरी पांघरल्या...



- बोपे म्हणजे पाऊस...ढग...हिरवाई याशिवाय दुसरे काही नाही...
दुपारच्या २-०० वाजेच्या सुमारास समोर दिसणार्‍या शाळेच्या प्रांगणात आमचा भोजन अवकाश होणार', ही खबर आली आणि सार्‍यांना हायसे वाटले. बोपे गावची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा जणू आमच्या स्वागताला सज्ज होती. दुर्गम भागात, असपास वस्ती नाही, अशा निर्जन ठिकाणची शाळेची सिमेंट कॉंक्रिटमध्ये बांधलेली इमारत त्यात आज रविवारची सुटी असल्याने निर्मनुष्य, एकाकी होती. भिंतीवर फळांची आणि पाठ्यपुस्तकातलीच माहिती सचित्र रंगविण्यात आली होती. बाहेरच्या चिंचोळ्या वर्‍हांड्यात ओल्याचिंब अवस्थेत पाठपिशवितले डबे भराभर निघाले. पाच-सहाचे लहान कोंडवळे करून भुकेले जीव एकसाथ जेवणावर तुटुन पडले. शिवथर घळीच्या पायथ्याला मिळालेली रशाची उसळ आणि तांदळाच्या भाकरी. जोडीला घरून प्रत्येकाने काही ना काही पदार्थ आणलेले. आताशा पाऊसही थांबला होता आणि गोप्याच्या पठारावर ढगांची चादर ओढली होती. आम्ही जणू स्वर्गात भोजन घेत होतो. तांदळाच्या भाकरी उडप्यांच्या हॉटेलात मिळतो तशा उत्तप्प्या सारख्या लागत होत्या. हा भोजन अवकाश चांगला पाऊण तास रंगला. भोजन आटोपत आले असताना जोरदार सरींनी सारा परिसर दणाणून सोडला, पण तोही पाच एक मिनीटांकरिताच. पागळीतुन ओघळणार्‍या पाण्यात डबे धुण्याची सोय झाली. पाऊस थांबला आणि लागोलाग ढगांनी अवघे जंगलपठार व्यापले जणू, 'या आमच्या राज्यात तुमचे स्वागत असो',च्या थाटात आमच्याशी हस्तांदोलन केले. आम्ही जसजसे पुढे जात होतो, तसतसे ढगांच्या प्रेमळ वेढ्यात गुरफटत होतो.

कुंबळे गाव अगदी हाकेच्या अंतरावर दिसत होते. हे गाव म्हणजे समोरच्या टेकडीच्या लगत तीस चाळीस घरांची छोटी वस्ती. सगळी घरे जुन्यापद्धतीची कौलारल. अनिरुद्ध आणि मेघा केळकर दाम्पत्यांच्या अतिशय देखण्या अशा शेतावर जाण्याचा आज योग नव्हता. नखशिखांत ओलेचिंब, बुटातही पाणी, डोक्यावरही पाणी, पाठपिठव्यांची स्थिती कशी असेल काहीच सांगता येत नाही, त्यात माउलीं बलकावडे त्यांच्या कुंबळे गावी परतल्याने आमचे पुढचे लक्ष साडे सात किलो मिटर अंतरावरचे केळद आमचे आम्हालाच गाठायचे होते. बोपे म्हणजे पक्क्या पण सद्या कच्चाच स्थितीत असलेल्या रस्त्याचे शेवटचे टोक. वेल्हे पासून सुरू झालेला रस्ता पुढे मोहरी, सिंगापूर पर्यंत त्याच्या मध्ये मढे घाटाकडे केळद फाट्यावरन एक रस्ता केळदला घेऊन येतो तोच पुढे बोप्या पर्यंत ओढत नेला आहे. मोहरीच्या अलिकडे आणि केळद पर्यंत चांगली पक्की सडक, चारचाकी वाहन सहज जाऊ शकते, पण मधूनच मोडकळलेले काही टप्पे लागतात. केळद पासून पुढे सगळी खडवण, त्यामुळे चारचाकी गाडीतून पर्यटन करण्यात धन्यता मानणार्‍यांसाठी हा रस्ता सोयीचा नाही. मोहरी पर्यंत केला तसा हा देखिल भविष्यात डांबराचे थर ओतून पक्का केला जाइल. त्यानंतर मात्र जशी आणि जेवढी त्याची देखभाल होईल त्यावरच तो चारचाकी वाहनांच्या प्रवासासाठी सोसवेल की नाही यावर सारे अवलंबून राहील.

बोपे सोडल्यानंतर वेळवंडी नदीवरच्या छोट्या पुलाच्या अलिकडे वरच्या धनगर वस्तीकडे जाणारी आणखी एक कच्ची सडक दृष्टीस पडते. अवघ्या पाच दहा घरांसाठी हा रस्ता तयार केलाय हे विशेष. वेळवंडी नदीचा प्रवाह येथे मोठा व वेगाचा. त्यावरच पुढे भाटघर जलाशय उभारलेय. बोपे सोडल्यापासून भिज भिज भिजविणार्‍या पावसात चालून एव्हाना दिड तास झाला होता. या विस्तीर्ण पठारावर केवळ तीन चारच ठिकाणी लहान वस्त्या...बाकी सगळे निर्जन, मोठाले वृक्ष त्यामानाने फारच थोडे, वेली, झुडपांचेच प्रमाण अधिक. आमची वाट खडवणीच्या खडबडीत रस्त्यांची. त्यावरून चालणे अंमळ कंटाळवाणे. संततधार पावसाने आसपासचा निसर्ग असा काही खुलवलाय की, आमच्या पावलांना पक्क्या-कच्च्या रस्त्यावरची दुखदायक चाल जाणवत नव्हती. केळदचा कुठेच ठावठिकाणा दिसत नव्हता. आसपास अगदीच तुरळक वस्ती असावी असा हा निर्जन परिसर. वाटेत निगडी गाव लागले. सुरूवातीला तेच केळद असेल या कल्पनेने काहींनी सुस्कारा सोडला, पण केळदकरिता आणखी तासभर पायपीट आहे, हे कळल्यावर हातपाय गळाल्या सारखे वाटले. पाणी आणि थोडे च्याऊ म्याऊ घेऊन खडवणीच्या रस्त्यावरून केळदच्या दिशेने प्रस्थान.

केळद तसे मोठे गाव. गावाच्या वेषीवरच एका पडवीवजा हॉटेलात चहा पानाने तरतरी आणली. पुणेरी पिकनिकबाजांच्या चारचाकी गाड्यांची येथे वर्दळ दिसू लागली. कारमधल्या म्यूझिक सिस्टीमवर नव्या गाण्यंचे स्वर कानी पडू लागले. वनखात्याच्या चौकीवर प्रति माणशी १०/- रूपये भरल्यानंतर लोकांना आत सोडले जात होते. आमचा रात्रीचा मुक्काम असलेले हॉटेल गिरीराज येथून किलोमिटरभर तरी आत असावे. आमची ओलिचिंब शरीरं दिवसभरच्या चालीने गिरीराज पर्यंतचे अंतर सुद्धा आता जास्त वाटत होते. हे गिरीराज म्हणजे खुपच सुंदर प्रकरण निघाले. हॉटेल म्हणजे सिमंटच्या कच्च्या भिंती, दोन टॉयलेट, एक बाथरूम. शिंदे दाम्पत्य तिथे विविध पदार्थ स्वत: बनवून देतात. त्यात भोजन, चहा, नाश्ता ते अगदी मांसाहारी जेवणही देतात. दर अगदीच माफक आहेत. या भागात पर्यटकांची वर्दळ तशी कमीच. त्यामुळे सायंकाळी हॉटेलातील टेबल हटवून आमची झोपण्याची सोय झाली. अंगावरचा अवघा ओला साज काढून, पायातले बुट काढून ओले कपडे दोरीवर टाकण्यात अवघी छावणी मशगुल झालेली. गिरीराजच्या बाहेर मात्र पाऊस आणि ढगांचे लोट यांच्यात स्पर्धा सुरू होती.

अंग वाळविण्याचा खटाटोप फार काही उपयोगी पडला नाही. हॉटेलातला फर्शीचा कोबा आमच्या पावलांनी ओलाचिंब झालेला. तास दिडतासात सगळी आवरासावर करून भटकंतीच्या गप्पांचा फड रंगला. अलिकडेच झालेल्या गिरीमित्र संमेलनापासून वेगवेगळे विषय समोर येत होते. चहा, भजी संपवून स्वयंपाक गृहात रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली, तरी गप्पाष्टके थांबेना. तेव्हा कोणी तरी दिवसभरातल्या गमतींचा विषय काढला. एक एक प्रसंग आणि त्यावर हास्यांची कारंजी अशा सर्व चिंता विसरायला लावणार्‍या वातावरणात आमच्यातला एक बहाद्दर, स्वयंपाक निट नेटका होतोय! यावर देखरेख ठेवण्यासाठी शिंदे दाम्पत्याला मदत करत होता. त्याचे प्रत्यंतर आम्हाला अधून मधून येणार्‍या निरनिराळ्या पदार्थांच्या डिशेशवरून येत होते. रात्रीच्या भोजनासाठी बैठकीची अंडगोलाकृती रचना करण्यात आली. प्रत्येकाचे चेहेरे एकमेकांना दिसत होते, गप्पांचा धबधबा काही थांबायला तयार नव्हता. विषयांनी मागिल काही ट्रेकच्या गमतीदार प्रसंगांची उजळणी सुरू केली, त्यामुळे ताटातले जेवण केव्हा संपले हे समजले नाही. गरमागरम जेवणाने मात्र भारी मजा आणली. ती मजा मात्र फार काळ टिकली नाही. झोपण्याची तयारी करत असताना, बर्‍याच जणांच्या स्लिपिंग बॅग, कॅरी मॅट, अर्थात झोपण्यासाठी वापरल्या जाणार्‍या योगासनाच्या पथार्‍या किंवा हिटलॉनचे तुकडे पाण्याने भिजून गेले होते. त्यावर झोपण्यावाचून काहीच गत्यंतर नव्हते. तास दिड तासात छावणी डाराडूर होऊन घोरू लागली.

- बोपेंहुन साडे सात किलो मिटरची खडवळणातली चाल कधी संपणार? केळदच्या अलिकडच्या निगडेत थोडा विश्राम.

- 'मला माफ करा', मी या हिरवाईचा भाग बनू शकत नाही...माझ्या राखेतूनच कदाचित येथे काही फुले बहरतील.

- आमचा गोप्या घाटाचा रस्ता भरकटला तेव्हा रिपरिप पावसात दाट झाडीतून बाहेर पडता पडता पूरेवाट झाली.

- सहा तासांचा ओलाचिंब प्रवास करून केळदच्या गिरीराज हॉटेलात कोरडे ठणठणीत होऊन गप्पांच्या फटात बुडालेली छावणी.

- केळदचे पठार म्हणजे दर क्षणाला ढगांच्या लोटच्या लोट स्पर्श करून पुढे सरकतात पाऊस होण्यासाठी...

मढे घाटावरचे गिरीराज हॉटेल



५/८/२०१८
मोबाईल फोनमध्ये पहाटे साडे पाचच्या गजरने जाग आणली. पाऊण एक तासाच सगळे जण आवरून तयार झाले. पोह्यांची एक एक डिश रिचवल्यानंतर आमलेट व पाव आणि सोबत उकडलेली अंडी असा भरपेट नाश्ता करण्यात आला. पहिला आणि शेवटचा असे दोन चहा झाले. सगळ्यांच्या बॅगा हॉटेलच्या स्टोअर रूममध्ये टाकून आम्ही सोबत आणलेल्या गुळपोळ्या, थोडे अन्य पदार्थ आणि पाण्याच्या बाटल्या असे मोजके ओझे घेऊन मढे घाट उतरण्यास सुरूवात केली, घड्याळात ८-३५ वाजले होते. चांगले उजाडल्याने आज पाऊस फार नसेल अशी अटकळ बांधण्यात आली, परंतू थोड्याच वेळात ती फोल ठरली. मढे घाटातून ढगांचे लोळच्यालोळ उठत होते. त्यातून रस्ता शोधत आम्ही पठारी भाग सोडून बारा मिनीटातच उतरणीला लागलो. आसपासचे सगळे पाणी गोळा होऊन वेगाने दगडांचा मार्ग कापत घाटातून उतरत होते, गोप्या घाट चढताना जसा प्रकार तसाच हा उतरतानाचा प्रकार. 

९-०० वाजता आम्ही घाट उतरत असताना मढे घाटाच्या धबधब्याचे स्वर कानावर पडले. त्या रोखाने जाऊन बघितले तर सुरूवातीला लहानसा वाटणारा धबधबा प्रत्यक्षात बर्‍याच उंचीवरून कोसळताना दिसत होता. खाली पडल्यावर त्या धबधब्यच्या दोन शाखा तयार झाल्या. त्या जवळच्या खडकावर थोडे फोटोसेशन पार पडल्यानंतर सुरक्षित जागा बघून व धबधब्याच्या परिसराचा सर्व अंदाज घेऊन आमच्यातील काहींनी धबाबा कोसळणार्‍या जलधारा अंगावर घेण्यास सुरूवात केली. दाट झाडींनी वेढलेला धबधब्याचा परिसर कमालीचा मोहक. तब्बल अर्धा तास या धबधब्याच्या सौंदर्यात सगळेजण न्हाऊन निघाले. थोडी विश्रांती, थोड्या सरी असा पावसाचा अव्ह्यात खेळ सुरू होता. सगळेच जण भिजलेल्या अंगाने मढे घाट उतरत होते. वाटेत अगणीत प्रकारच्या पावसाळी वनस्पती, झाडे, फुलांचे दर्शन घडत होते. जरा कुठे झाडी विरळ झाली की, निकटच्या डोंगरांवरचे जलप्रपात दृष्टीस पडे. मढे घाट उतरून सपाटीला पोहोचल्यानंतर आमचे दोन सवंगडी वाट चुकल्याचे लक्षात आले. त्यांना घेऊन आमचा शेवटचा गडी पोहोचल्यानंतर आमची तळाच्या सपाटीची पायपीट सुरू झाली. 

अंतिम यात्रेचा आभास:
१०-०० वाजता मढेच्या धबधब्यावर पोचलेल्या भल्या मोठ्या ओहळीवर पहिला विश्रांतीचा ब्रेक झाला. याच मार्गावरून इतिहासात प्रसिद्द अशा सिंहगडाचा संग्रामाचे नेतृत्व करताना कामी आलेल्या नरवीर तानाजी मालूसरेंच्या उंब्रठ गावी यांचे पार्थिव नेण्यात आले असावे. 'कशी असेल ती शेवटची यात्रा', या विचारांनी मन काहीसे हेलावले. अशा प्रकारे साडे आठला सुरू झालेली पायपीट सव्वा अकराच्या सुमारात थांबली. 

उपांड्याचे कुंड:
आता पुढचे लक्ष होते उपांड्या घाट, त्याकरिता आम्हाला कुरवंड्याला जावे लागणार होते. आसपास कोणतीच वस्ती नाही आणि माणसांची वर्दळही नाही अशा निरजन वाटेवरून कुरवंडे गावात ४५ मिनीटात दाखल झालो. गावच्या बाहेरच उपांड्याची चढण सुरू होण्याच्या अगोदर जुने कातळ चिरांत घडवलेले कुंड लागले. त्यातून सोबत आणलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या भरून घेण्याची कल्पना पुढे आली, परंतू लवकरच ती बाजुला ठेवावी लागली. गावच्या तीन महिला या कुंडावर कपडे धुण्यासाठी आल्या होत्या. त्यातल्या एकीने आमच्या समोरच चिखलात माखलेली छत्री धुतली. अशा जुन्या कुंडात कपडे धुण्या ऐवजीत्याचे जतन व संवर्धन होण्यची गरज आहे. त्याऐवजी गावच्या महिलांकरिता कपडे धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाऊ शकते. काही गिर्यारोहण संस्थांनी या कामी पुढाकार घ्यावा व कमी खर्चात दीर्घकाळ टिकू शकेल अशी कपडे धुण्याची जागा तयार करून द्यावी.

गोप्या, मढे घाटाच्या तुलनेत उपांड्या घाटाचा बाज काही वेगळाच आहे. या घाटाच्या मद्यापासूनच कसवल गवताचे पुंजकेच्या पुंजके घाटांचे कडे सजवताना दिसत होते. आता हे कसवल गवत सह्याद्रीत सगळीकडेच दृष्टीस पडते. त्याला गोंडे येऊन त्यावर बिया येतात, त्यामुळे काहीठिकणी त्यास गोंडे गवतही म्हणतात. दुर्वाच्या गवताचीच मोठी आवृत्ती. घाटाची अवघी पायवाट आणि कित्येक कडे यांनी अलंकृत केलेत. वार्‍याबरेबर त्यांचा डौल बघण्याजोगा. दिवसभराच्या पावसाने त्यावर साठणारे थेंबही मनोहरी भासतात. एक सव्वा इंच रूंदीची व अडीच तीन फुट लांबीची पाती असलेले गवत वरच्या टप्प्यात काही ठिकाणी गोंडे गवताची साखळी तोडून आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करताना दिसते. 

काही वाटा या अगदी चिंचाळ्या व कड्याला चिकटूनच असल्याने गवताच्या साम्राज्यात त्यांच्या धोकादायक स्थितीचा लवकर अंदाज येत नाही. मधल्या टप्प्यापासून शिवथरघळीचा परिसर, कावळ्या किल्ला, त्यापाठीमागे कमळगड आदी परिसर तर समोरच्या बाजुला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आकाराने लक्ष वेधून घेणारे गाढवटोक दृष्टीस पडते. ढगांनी आज अनेक डोंगरांचे दृष्य झाकोळले होते. उपांड्या घाटाच्या माध्यावर पोहोचल्यानंतर एक स्थानिक आदिवासी आजोबा आम्हाला जाताना दिसले.  पंधरा वीस किलोमिटर्सवर शिवथर परिसरातल्या वस्तीकडे एकट्यानेच ते चालले होते. या घाटवाटा आजही वापरात आहेत. १०-५८ वाजता केळदहून उपांड्या चढायला सुरूवात केल्यानंतर अगदी रमतगमत, मनसोक्त परिसर न्याहाळत, फोटोग्राफी करत आम्ही १२-१२ वाजता माथ्याजवळ पोहोचलो. याठिकाणहून आम्ही १-००वाजता निघालो आणि केळदच्या गिरीराज हॉटेलात अवघ्या पंधरा मिनीटात पोहोचलो. येथे आमच्या भटकंतीचा समोरोप झाला. आम्हाला घेण्यासाठी खासगी आरामबस अगोदरच येऊन पोहोचली होती. तिने तोरणा किल्ल्याचे विविध कोनातले रूप न्याहाळत नाशिकला रात्री १-००च्या सुमारास पोहोचलो. 




- दिड दिवस भिजवणार्‍या पावसाने समाधान थोडेच होणार...मढेच्या लक्ष्मी धबधब्याच्य धबाबा धरा

- कर्नावडीकडे जाताना...

मढे घाट...

- कर्नावडी...उपांड्याच्या पायथ्याची वाडी.
- सह्याद्रीच्या कोणत्या वीराने येथे विश्रांती घेतली असेल की, या शिळेला निसर्गानेच पानाफुलांचा हा हार घातलाय!



- उपांड्या घाटाच्या मध्यावर.


- उपांड्याच्या वाटा सजविणारे गोंडेगवत.






- उपांड्याचा वाटसरू: आजोबा एकट्याने अशा घाटातून वीस एक किलो मिटर्सची पायपीट करून आपल्या घराला पोहोचणार.

असावे गिरीपर्यटनस्थान:
माणसाला जगण्यासाठी काय हवे? हे आपल्या पूर्वजांनी बरोबर ओळखले होते, म्हणूनच अनेक देवालये आणि देवांची ठाणी ही जंगल व डोंगरपरिसरात वसविली. हेतू हा की, लोकांना रोजच्या कामाकाजून थोडाविरंगुळा मिळावा. ताजी हवा, शुद्ध पाणी मिळावे, शरीराला थोडा व्यायाम मिळावा आणि मोकळ्या वातावरणात सैरसपाटा करायला मिळावा. साहेबांनी महाबळेश्वर, माथेरान, तोरणमाळ आदी भागात गिरीस्थाने खास सुट्टीचा आनंद घेण्यासाठी वसविली. युरोपियन सवत्ताधिशांकडून मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात असे एकही गिरीस्थान निर्माण केले गेले नाही. केळद ते बोपे या साडे सात किलो मिटर्सच्या पट्ट्यात भविष्यात सुंदर असे गिरीस्थान विकसीत होऊ शकते. 

याभागात गिरीस्थान विकसीत करायचे असेलच तर अगोदर तिथे मोठ्या झाडांचे रोपण करावे लागेल. वरच्या वाडीवस्त्यांचा ताण पडून येथे अनेक पिढ्यांकडून जंगलतोड सतत झाली, त्यामुळे हे पठार आता बरोच उघडेबोडके दिसू लागले आहे. आजवर वहिवाट नसल्याने इथला निवांत निसर्ग टिकून होता. पण आता येथे गाडी रस्ताच तयार झाला आहे. भविष्यात तो पक्का केला जाईलच तेव्हा येथल्या वनसंपदेवर आणि वाडीवस्त्यांच्या शांततेवर मोठा आघात होण्याच्या वाटा आपोआप खुल्या होतील. ते होऊ नये याकरिता एक परिपूर्ण असे निसर्गपर्यटन स्थान विकसीत करण्यास मोठा वाव आहे. येथे औषधी व फुलांच्या उद्यानाचे नियोजन करावे लागेल. सिमेंट व कॉक्रिटच्या इमल्यांऐवजी तिथे निसर्ग पर्यटन विकसीत करण्यासाठी पारंपारिक वस्तुंचा वापर करूनच हॉटेल, निवास आदी व्यवस्था उभारली जावी. 

केळदच्या पुढे मोटरवाहनांना पूर्णपणे बंदी करून घोडागाड्या, बैलगाड्या, तांगे अशा साधनांचाच वापर करावा. पर्यावरणाचा समतोल कुठेही सुटणार नाही, अशी खबरदारी घेऊन येथे एक आदर्शवत प्रकल्प उभा केला जाऊ शकतो. अगदी एखादी मिनीट्रेनही तयार केली जाऊ शकते. महाराष्ट्राला अशा प्रकारच्या पर्यटनाची खुप गरज आहे. अन्यथा लोक निसर्गात स्वच्छंदपणे वावरताना त्याच्या संवर्धनाची, तिथल्या शांततेची काळजी करत नाही व पर्यटन बदनाम होते. कचर्‍यांची तर आपले लोक जराही तमा न बाळगता तो बेतालपणाने इस्तत: फेकतात. भारतात बाजारू पर्यटनाची कोणतीच कमी नाही, हे ध्यानात घेऊन करायचेच असेल तर येथे निसर्गपर्यटनाशिवाय दुसरा विचार केला जाऊ नये, अन्यथा चहुबाजुंनी आकसलेल्या जावळीच्या खोर्‍यातील अलौकिक वनसंपदेला आणि पर्यावरणाला गालबोट लागेल. 

या परिसरात इतिहासाच्या अनमोल अशा पाऊलखुणा आहेत. तोरणा किल्ल्याची ही मागची बाजू, तसेच सभोवतालचे रायगड, लिंगाणा, कमळगड आदी प्रसिद्द किल्ले आणि त्यावरच्या अनेक ऐतिहासिक घडामोडींची किनार या परिसराला आहे. सिंहगड काबिज करताना कामी आलेल्या नरवीर तानाजी मालूसरेंच्या असीम शौर्याची झालर या परिसराला आहे. त्यांचे पार्थीव इथल्या मढेघाटातून त्यांच्या उंब्रठ या मुळगावी नेण्यात आल्याचे कथे या परिसरातली मंडळी आजही कथन करतात, तेव्हा या इतिहासाची ओळख करून देणारे, पुतळे व म्युल्सच्या माध्यमातून इतिहासातले प्रसंग उभे करणारे शौर्य केंद्र येथे तयार केले तर गिरीस्थान हे केवळ मौजमजेचे स्थान न राहता येणार्‍या पिढीला त्याग, स्वातंत्र्य, स्वाभिमान या गोष्टींची जाणीव करून देता येऊ शकेल. जगाला हेवा वाटावा असा इतिहास इथे घडला आहे, त्याची नव्याने ओळख करून देण्याची आवश्यकता वाटते. 

आज या परिसरातले पर्यटन बघितले तर त्यात दोनच प्रकार दिसून  येतात - एक म्हणजे सधन वर्ग कुटुंबासह किंवा मित्रमंडळीसह गाड्या घेऊन येथे येतो. चार दोन फोटो खेचतो आणि निघून जातो. काही जण पार्टीबाजीच्या मुडने येतात आणि मटणाच्या डेगी शिजवून खुल्या आकाशाखाली झिंग अनूभवताना दिसतात. दुसरा प्रकार म्हणजे या गराड्यापासून वेगळी वाट जोखणारे इरसाल भटके...जे लंबी पायपीट करून येतात आणि गडबड, गोधळाला बगल देऊन इथल्या घाटांचे सौंदर्य अनूभवण्यासाठी पाठीवर आझे नी पायात ताकद घेऊन घाटांची भ्रमंती करतात. यातला दुसरा वर्ग हा चिंतेचा विषय नसावा. पहिल्या वर्गाला थोपविणारी  यंत्रणा आज तरी अस्तित्वात नाही, त्यामुळे वेल्हे सोडून भट्टी व पुढे सिंगापूर पर्यंतच्या घाटात गाड्यांतल्या म्यूझिकस्टिम्सवर ठेका धरणारे, डोक्यावर बाटली अथवा ग्लास घेऊन फेर धरणारे सहजगत्या दृष्टीस पडतात. आपल्याला अशा प्रकारच्या पर्यटनाची मुळीच आवश्यकता नाही. पक्की सडक आणि गाडी हे त्यादिशेने डेडली असे कॉम्बीनेशन ठरत आहे. त्यावर उपाय म्हणजे घाटात नाचगाण्यांना बंदी घालून लोकांची पावले निसर्ग व इतिहास पर्यटनाकडे वळविणे. 'खाणार्‍या, पिणार्‍यांची तोंडे आपण थोपवू शकत नाही, किमान त्याचे जाहीर प्रदर्शन तरी होऊ नये याची खबरदारी म्हणजेच पर्यटन विकास', हे ब्रिद सरकारला ध्यानात घ्यावे लागेल. हे वेळीच केले नाही तर आज बिकट वाटणारी बरबटलेली पर्यटनाची स्थिती येत्या काही वर्षात हाताबाहेर गेलीच म्हणून समजा. 

- मॉडर्न वाटणार्‍या अशा आर्ट सह्याद्रीत कित्येक.

- केळदच्या पठारापर्यंत रस्ता आणला खरा, पण तिथे येणारा पर्यटक तिथल्या निर्साचा आब राखेलच असे नाही...





केळद-बोपेंच नव्हे तर अगदी मोहरी, सिंगापूर येथेही मोटरवाहनांना बंदी व रस्त्यावरच्या धिंगाण्यास मज्जाव करून निसर्ग व इतिहास पर्यटनाच्या नव्या वाटा तयार केल्या जाऊ शकतात. लोकांच्या पायात ताकद नाही, हा सरकारचा भ्रम आहे. तुम्ही फक्त सक्षम आणि असक्षम अशी वर्गवारी करून सक्षम लोकांसाठी पायी अथवा पारंपारिक दळणवळणाच्या साधनसामुग्रीवर आधारीत पर्यटन निर्माण करा. दिसू द्या जगाला येथून लिंगाणा, रायगड, तोरणा आदी किल्ल्यांचा परिसर कसा दिसतो. कशा मराठ्यांनी जगातल्या सर्वात मोठ्या आणि क्रुर सैन्याच्या विरोधात धीरोदात्त लढे उभे केले.
---समाप्त---

दिड दिवस चिंब भिजवणर्‍या पावसाळी भटकंतीतही माझ्या मोबाईलने फुरसतीत निसर्गाच्या काही छटा अशा जवळून टिपल्या स्वत: न भिजता...













- उन...वारा...पावसातही आमची घरे शाबूत.

- रासायनिक रंगरंगोटीची गरजच काय, जेव्हा नैसर्गिक तलम हिरवा मखमली पेंट उपलब्ध असेल!




--- समाप्त ---