Friday, June 8, 2018

आई ट्रेकमध्ये रंमतेय!

''यंदाचा रानमेवा ट्रेक धारेरावला!''
- धारेराव? नाव कसे माणसासारखे...
परंतू सह्याद्रीत अशी आडवळणाची नावे अनेक ठिकाणी आहेत, बघूया तर काय प्रकरण आहे हे धारेराव!
''हा नेहमीसारखा तंगडतोड ट्रेक नाही...घोडीशेप समोरच्या कोकणकड्यावर मुक्काम करायचा, धारेरावची देवराई डोळेभरून बघायची. - व्हॉटस्‌अॅपवर हेमोबाची माहिती झळकली तेव्हाच उत्सुकता ताणली गेली होती. फार चालायचे नाही, तेव्हा खुशाल कुटुंब कबिला घेऊन यायचा!

ही भटकंती कशी होणार? चांगलीच होणार! सह्याद्रीत निसरस असे काही असू शकते का? चांगली...पण किती चांगली? एक तर मे अखेरचे टळटळीत उन...शिवाय आसपासचे सर्वच डोंगर रूक्ष झालेले असतील! शहरात तर घराबाहेर जराही निघवत नाही, इतक्या उन्हाच्या झळा बसत असतात...खुल्या माळरानावर तर अक्षरश: होरपळ असणार? जीव सारखा पाणी पाणी करणार, तेव्हा पाण्याचा थंडावा मिळेल का?
सर्वसामान्यपणे मनात उपस्थित होणारे हे प्रश्न सह्याद्रीत शिल्लक राहतच नाही...तिथले वातावरण शहरापेक्षा पुर्णपणे वेगले असते. उन्हाचा त्रास होत नाही असे नाही, पण तिथे सोबत जबरी थंडावा मिळतोच मिळतो. झर्‍यातले नी टाक्याचे पाणी न केवळ अविट गोडीचे असते, ते चांगले थंडही असतेच असते.
तिथल्या निसर्गात हरवून जावं इतकं मन हलकं होतं, कारण सह्याद्रीत बहुतांशी ठिकाणी इतिहासाच्या खुणा सापडतात, त्या आपल्याला गौरवशाली अशा भुतकाळात घेऊन जातात. आमची धारेराव-घोडीशेपची भटकंती अशीच अविस्मरणीय घडणार होती. त्याला आजवर कधीही न मिळाली अशी आणि पुढे कायमच आठवणीत राहील अशी जोड मिळणार होती...

इतका विलंब? 
सह्याद्रीत भटकत असताना आपल्या सोबत किमान दोन जण अदृष्य स्वरूपात सोबत असतात...ते म्हणजे आई-बाबा...ठेच लागल्यावर आई आठवते आणि संकट उभे ठाकल्यावर बाप...सह्याद्रीचं विराट रूप बघताना बाप आठवतो, तशी खाण्या पिण्याच्या वेळांना आई हमखास आठवते...अशा प्रकारे सोबत नसातानाही ट्रेकवरचे हे पूर्वीपासूनचे हमखास असे सवंगडी...त्यांना प्रत्यक्षात सोबत नेता आले तर?

असं नाही की हा विचार माझ्या मनाला कधी शिवला नाही...यापूर्वी मी वडिलांना त्याबद्दल कधी विचारलं नाही...परंतू चाचपणी अनेकदा करून बघितली होती...डोंगरावर यायला आवडेल का? त्यांचं उत्तर असायचं...नाही! मला नाही जमणार...माझ्याच्याने तितकं नाही चालवलं जाणार! आज बरेच थकले असले तरी वडिल नित्यनियमाने घरापासून नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयापर्यंत चालत जातात...त्यांच्या आवडीचे पुस्तक निवडतात...ते महाविद्यालयात शिकत होते तेव्हापासूनच त्यांना वाचनालयात जाण्याची आवड होती...पूर्वी सगळी वर्तमानपत्रे व नियतकालिके ते वाचायचे...हल्ली घराखालच्या स्टॉलवर जाऊन रोज लोकसत्ता घेऊन येतात आणि वाचनालयात आठवड्यातून एकदा पुस्तक...दीपावलीच्या काळात सगळे दीवाळी अंक.

आईचं काहीसं वेगळं...वाचनाची अजिबात आवड नाही...आई आजही कामावर जाते...घरातून पायी जाते व पायी येते...तिचा दिवस सुरू होतो तो कामाने आणि संपतो तोही कामाने...कामावरही काम आणि घरातही काम...कामावरून येताना आईने फळे विकत आणली नाही असे दिवस फारच विरळ...
विशेष म्हणजे आईचे काही रूग्ण बाजारात उत्तम फळे घेऊन विकायला येतात...भद्रकाली, सरकारवाडी, सराफ बाजार पसिरातले कित्येक फळविक्रेते आई आल्यावर चांगल्यात चांगली फळे काढून देतात...त्यात पेरू, चिकु, मोसबात आंबा, केळी, बोरं, द्राक्षे...काही रान भाज्याही आई घेऊन येते...आमच्या आईने आणलेली फळे नेहमी अविट गोडीची असतात. काही पेरू विक्रेते तर पोपटांनी खाल्लेले पेरू देतात, पक्षाने खाल्लेला भाग कापुन टाकल्यानंतर जे फळ उरते ते अप्रतिम असे रसाळ नी चिवष्ट.

का नव्हतं विचारलं?
आईला मी, ट्रेकवर चलतेस का? असं कधीच विचारलं नाही? का नाही विचारलं? हा विचार माझ्या डोक्यात कधी का आला नाही? ट्रेक पेक्षाही भन्नाट अशी भटकंती ही आमच्या नाशिकची खास ओळख...त्याकरिता मात्र मी आईला गेल्या कित्येक वर्षांपासून विचारतोय...प्रदक्षिणेला चलतेस का? आता ही प्रदक्षिणा म्हणजे त्र्यंबकेश्वराची गाव प्रदक्षिणा आणि त्र्यंबकची गाव प्रदक्षिणा साधी सुधी नाही...२० मैलाचे अंतर चालावे लागते...यात साधारणपणे ७० टक्के डोंगराचा भाग...ब्रम्हगिरीच्या डोंगराला श्रावण महिन्यात अनवाणी चालत वळसा घालायचा...फार सुंदर वातावरण असते त्यावेळेस...जोरदार पावसाचा हा परिसर डोंगरांनी नटलेला...कित्येक धबधबे आसपासच्या डोंगरांवरून कोसळत असतात...झरे...ओहळी कित्येक...
दोन फार मोठ्या नद्याही त्या निमीत्ताने पार करण्याचा भन्नाट अनूभव मिळतो...कलिमलहरिणी गोदावरी आणि वैतरणा...या दोघींही आपल्या ३ भगिनींसमवेत ब्रम्हगिरीवरच उगम पावतात परंतू थोड्याच अतरावर त्या तिघी आपली थोरली बहिण गंगा-गौतमी-गोदावरीत समावून जातात.
प्रदक्षिणा हा श्रावणातला अद्वितीय सोहळा नाशिककर मंडळी कित्येक पिढ्यांपासून अनूभवत आहेत...वारकरी मंडळी तर तळपत्या उन्हातही निवृत्तीनाथ यात्रेच्या निमीत्ताने त्र्यंबकची गाव प्रदक्षिणा करतात...निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज, सोपान महाराज आणि मुक्ताबाईसह ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घातल्याच्या कथा प्रसिद्द आहेत.

मी अकरावीत होतो तेव्हा पासून नियमीतपणे प्रदक्षिणेला जात होतो...२००५ पर्यंत...यात गाव प्रदक्षिणे पेक्षा 'ब्रम्हगिरी-हरीहर-ब्रम्हा' या ४० मैल अंतराच्या मोठ्या प्रदक्षिणेचे जास्त प्रमाण आहे. कुमशेतच्या धारेराव-घोडीशेपच्या ट्रेकला जाऊन आल्यापासून आईला आपण आणखी काही ट्रेकवर नेऊ शकतो हा विश्वास दुणावला आहे...यंदा ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेला न्यायचा बेत पक्का झाला आहे...सामान्यत: ८ तास लागतात...आईला घेऊन फार तर १२ तास लागतील इतकेच...परंतू माझी तयारी झाली आहे...आता आईला तयार करायचे...तीही तयार होईल असेच दिसते.

ट्रेक होणार कसा?
नाशिकमध्ये पुण्यातील बी.जे. मेडिकलच्या काही माजी विद्यार्थ्यांनी ट्रेकसोल्स हा भटकंती समुह तीन एक वर्षांपूर्वी तयार केला आहे. त्यांच्या समवेत मी नेहमीच सह्याद्रीत भटकंतीसाठी जात असतो. समु्हाचा प्रमुख डॉ. हेमंत बोरसेंनी यंदाचा रानमेवा ट्रेक धारेरावला होणार असल्याचे पंधरा दिवस अगोदरच जाहीर केले होते. या ट्रेकला सहकुटुंब येण्याचे नियोजन होते.

- नाशिक जवळच्या पुरातन सारूळच्या डोंगररांगात राष्ट्रीय दुचाकी रॅलीचे थरारक क्षण...

२६ मे शनिवारी सकाळी ११-०० वाजता नाशिकहून निघण्याचे नियोजन असल्याने माझा धारेरावचा ट्रेक होऊ शकणार नाही हे स्पष्ट झाले होते. याचे कारण म्हणजे  नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय अजिंक्यपदाची मोटरसायकल रॅली. राष्ट्रीय मोटरक्रीडा महासंघासवेत गेल्या अनेक वर्षांपासून देशाच्या विविध भागात अधिकारी पदावर काम करणार्‍या नाशिकच्या अमित वाघचौरेने त्याचा ए.डब्ल्यू. इव्हेन्टस्‌ नावाचा मोटरस्पोर्टस्‌ क्लब सुरू केला आहे. या वाघचौरे कुटुंबतले अनेक सदस्य राष्ट्रीयस्तरावरचे पट्टीचे मोटरसायकल स्पर्धक, अनेक स्पर्धा जिंकलेले. अमितकरिता मी गेल्या दोन मोसमांपासून स्पर्धेवर कर्टन रेझर व निकालांचे विश्लेषण करणारी प्रसिद्दीपत्रके बनवून देत आहे.
घरच्या मैदानावरची ही मोठी स्पर्धा असल्याने मला धारेराव ट्रेकला जाणे शक्य होणार नव्हते, परंतू हेमंतने छान तोडगा काढला. ट्रेकवरचा आणखी एक सदस्य धीरज दिवाण उर्फ भैय्या यालाही सुट्टी मिळणार नव्हती, त्यामुळे त्याने शनिवारी अर्धदिवसाची रजा घेतली व दुपारी ३-३० वाजता निघण्याचे नियोजन केले. तो आपल्या सोबत आईला व त्याचा आठवर्षांचा मुलगा ध्रुव यांना घेणार होता. त्यामुळे मीही माझ्या आईला
व माझ्या भावाची मुलगी ६.५ वर्षांची जान्हवी यांना घेण्याचा निश्चय केला. आता कसोटी होती ती आईला राजी करण्याची. विशेष म्हणजे शनिवार, रविवार सुट्टी असल्याने आई लगेच तयार झाली. मी पहाटेपासूनच रॅलीच्या कामात व्यस्त राहणार असल्यामुळे मी आईला संध्याकाळच्या जेवणाचा डबा, ताट, वाटी, पेला, चमचा, अंथरूण, पांघरूण काढून तयार होण्यास सांगितले.

तिथे घर बनवायचे?
आईने जान्हवीला डोंगरावरच्या भटकंतीची कल्पना दिली, तेव्हा तीने अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न उपस्थित केला, तिथे झोपायचे कुठे. आईने सांगितले तंबुत...तिला तंबु हा शब्द नीट उमगेना. माझ्या भावाने मागच्या वर्षी तिला खेळण्याचे घर आणून दिले आहे. वेगवेगळे पाईप जोडून एक छानशी झोपडी तयार होते व त्यात ती बसून भांडी खेळते. असे घर तिथे बनवायचे का? तिच्या प्रश्नाचे तिचे तिलाच उत्तर सापडले होते.

सौभाग्यवती नम्रताने ट्रेकला येणार असल्याची हमी भरली होती, त्यामुळे मागच्याच पंधरवड्यात रामसेज किल्ल्याची मुक्कामी भटकंती करून आलेल्या आमच्या गार्गी व मैत्रेयी यांचा उत्साह दुणावला होता. आमच्या बाळासाहेब सोनवणेंची नवी कोरी इग्नीसकारही नाशिकहून उशिराने निघणार होती, त्यामुळे आमच्या सर्व कुटुंब कबिल्याची एका शानदार भटकंतीला जाण्याच्या प्रवासाची व्यवस्थित तजविज झाली होती, परंतू
चुक माझीच होती, मी त्यांना ट्रेक आणि रॅली असा दुहेरी आनंद देण्याचा मनसुबा रचला. इथे माशी शिंकणार? हे कुठे मला ठाऊक होते.


मोटरसायकल रॅलीचा थरार...
भारतातला आज घडीचा सर्वोत्तम मोटरसायकलपटू आर.नटराज या रॅलीत आपल्या विदेशी बनावटीच्या टीव्हीएस आरटीआय ४५० मोटरसायकलवर सहभागी होणार होता. सारूळच्या डोंगर-घाटाच्या कच्च्या, खडकाळ रस्त्यावरून तो कशा प्रकारे गाडी चालवतो हे बघण्याची मोठी उत्सुकता होती. महाराष्ट्रात कार व मोटरसायकल रॅलीकरिता खडकाळ, डोंगराळ भागात कच्चे रस्ते असे नाहीच. त्यातही पंधरा ते वीस किलो मिटरचे तीन टप्पे आवश्यक असतात, सुदैवाने नाशिकमध्ये शहराच्या सीमेवरच असा एक रस्ता सापडल्यामुळे रॅलीची रंगत चांगलीच वाढणार होती.
विशेष म्हणजे मागच्याच पंधरवड्यात पुण्याच्या खडकवासला धरण परिसरात नटराजला आर.राजेंद्र याने भारतीय बनावटीच्या मोटरसायकलवर आश्चर्यकारकरित्या पराभूत केले होते, त्यामुळे नाशिकमध्ये नटराज विरुद्ध राजेंद्र ही लढत रंगणार होती. शिवाय स्कुटर गटात यंदाच्या हंगामात बडोदा, इंदूर, पुणे या तिनही फेर्‍यात जेतेपदाचा मोठे उलटफेर बघायला मिळाले होते. जेतेपदाचा प्रबळ दावेदार आसिफल अली इंदूर

व पुण्यात गाडीतल्या बिघाडामुळे पराभूत झाला होता तो आघाडीवीर पुण्याच्या पिंकेश ठक्करची लढत मोडणार का? भारतातीली सर्वोत्तम महिला रायडर ऐश्वर्या पी.एम., तीला आव्हान देणारी फजिला, गुरमेल कौर, कोल्हापूरची पल्लवी यादव या मुली कशा पद्दतीने आव्हानात्मक मार्गावरून मोटरसायकल चालवतात हे बघण्याची ही अपूर्व संधी होती.


आम्ही भल्या पहाटे ५-०० वाजता उठुन तयारीला लोगलो, तयारीला फार उशिर होऊ लागल्याने आम्हाला सोबत नाश्ता घेण्याची फुरसत मिळाली नाही. अखेर सकाळी ६-०० वाजता रॅलीचा थरार बघण्याकरिता माझी मोटरसायकल व नम्रताची अॅक्टीव्हा स्कुटर मुंबई आग्रा महामार्गावरून नाशिक शहरच्या सीमेवर असलेल्या सारूळच्या दिशेने दौडू लागल्या. माझ्या सोबत गार्गी होती, तर नम्रतासोबत मैत्रेयी व त्याच्या भावाची मुलगी रिमा. वाटेत गाडीमध्ये पेट्रोल कमी असल्याचे लक्षात आले, परंतू आम्हाला विल्होळी पर्यंत एकही पेट्रोलपंप सुरू नसल्याचे आढळे.

नाशिक जवळच्या सारूळचे डोंगर गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून बांधकामाच्या दगडासाठी मोठ्या प्रमाणावर पोखरण्याचे काम सुरू होते...खबर अशी आहे की, जिल्हा प्रशासनाने इथल्या खाणी बंद केल्या आहेत.

सारूळच्या दगड खाणी
सारूळ गावाजवळून रॅली सुरू होणार होती. सारूळचा डोंगर म्हणजे मोठा पसारा. १२.५ किलो मिटरचा कच्चा रस्ता त्यामुळे उपलब्ध झाला होता. पूर्वी या डोंगरातून अमाप प्रमाणावर बांधकामाचे दगड काढण्यात आले. अनेक वर्षे पर्यावरणवादींनी या विरोधात आंदोलन केल्यानंतर शासनाने या दगडखाणीं बंद केल्या.
रॅली ७-३० वाजता सुरू होणार असली तरी अर्धा तास अगोदर रॅलीचा संपुर्ण मार्ग लोकांसाठी व सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद केला जातो. त्यासाठी ठिकठीकाणी स्वयंसेवक, पंच, अधिकारी, रुग्णवाहिकी, रेडियो पॉईन्टस रॅलीच्या मार्गावर नियुक्त असतात. शुन्य क्रमांक असलेली जीप रॅलीचा मार्ग निर्धोक असल्याची खात्री करते व त्यानंतर रॅली सुरू होते. आम्ही ३ किलो मिटर आत शिरून एका अवघड वळणावर जाऊन गाड्या सुरक्षित उभ्या करून रॅलीची प्रतिक्षा करू लागलो. सर्वत्र डोंगराचे कडे सुरूंग लाऊन फोडण्यात आल्याचे दिसत होती. सह्याद्रीत आम्ही डोंगरावर एकही खिळा जादा मारावा लागू नये यासाठी देवाचा धावा करत असोत. इते तर गेल्या वीस एक वर्षांपासून डोंगराचे दगड ओरबडून काढले जात होते, ते आता थांबल्याचे चित्र किती सुखावह: हे सांगु शकत नाही.
अपेक्षे प्रमाणे नटराजची पहिली गाडी घोंघावत जाणार्‍या वार्‍या सारखी आमच्या समोरून गेली. काय त्याचा वेग आणि काय ते नियंत्रण. पाठोपाठ राजेंद्र, सोहेल अहमद, सॅम्युल जेकब, पिंकेश ठक्कर, आसिफ सैय्यद, शमिम खान, पिंकेश ठक्कर, ऐश्वर्या, फजिला, गुरमेल अशा अव्वल स्पर्धकांबरोबर सर्वच्या सर्व ४८ स्पर्धकांच्या कसरती बघुन आम्ही दुसरी फेरी सुरू होण्याच्या आत स्टेजमधुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आमच्या गाड्यांमध्ये पुरेसे इंधन असते तर आम्ही तसेच पुढच्या टप्प्यावर जाणार होते.

रॅली रद्द होते तेव्हा
सारूळ गावच्या बाहेर आम्ही येऊन पोहोचलो तोवर स्पर्धकांनी साडे बारा किलो मिटरची फेरी पुर्ण केली होती व ते दुसर्‍या फेरीकरिता सज्ज झाले होते. याठिकाणी आम्ही दुसर्‍या फेरीची सुरूवात बघण्याकरिता थांबलो. उन्हं डोंक्यावर आली होती व उकाडा खुप वाढला होता. त्यात सारूळच्या पंचक्रोशीत अनेक जण दुचाकी गाड्या स्टेजमध्ये घुसडण्याचा प्रयत्न करत होते. बंदोबस्तावरचे पोलिस गायब झाल्यामुळे या लोकांना रोखण्याचे मोठे आव्हान आयोजकांच्या समोर होते. स्पर्धेची दुसरी फेरी सुरू व्हायला त्यामुळे पाऊण तासाचा विलंब झाला.
धुळ मातीचे रस्ते, इतकी प्रतिक्षा, पोटात अन्न नाही त्यामुळे व्हायचे तेच झाले. आमच्या सौंचा पारा चढला व त्यांनी ट्रेक कॅन्सलची उद्‌घोषणा केली. माझे तर धाबे दणाणून गेले. मी तीला, तु हो पुढे मी व गार्गी स्पर्धेची थोडी माहिती घेऊन घरी येतो असे सांगितले. मला हवी असलेली माहिती घेऊन मी दुसरी फेरी सुरू झाल्यानंतर घराच्या दिशेने निघालो तेव्हा मला महामार्गावर रॅलीच्या काही गाड्या ओलांडून जाताना दिसल्या. धोक्याची पाल तेव्हाच चुकचुकली.
घरी पोहचून अमितला दुरध्वनी केला, तर त्याने सारूळ परिसरात खासगी वाहने रॅलीच्या मार्गावर घुसत असल्याने स्पर्धेची तिसरी फेरी रद्द करण्यात आल्याचे सांगितले. ही फार दुर्दैवीची गोष्ट होती की, वर्षांतला अर्धा दिवस सुद्धा लोक एका राष्ट्रीय स्पर्धेकरिता आपली वाहने काही काळ बाजुला लाऊन रॅलीची मजा लूटू शकत नाही.  खेळात भारत अशाच कारणांमुळे मागे पडतो. ही घटना एक प्रकारे माझ्या पथ्यावर पडली. आता मला लवकर निकाल मिळणार होता व स्पर्धेची विश्लेषणात्मक माहिती लवकर तयार होणार होती. धारेरावला मी सुर्य अस्ताला जाण्याच्या आत पोहोचणार होतो. जो ट्रेकचा मुख्य उद्देश होता.

पॅन्ट धुतली
आपण मनात जे ठरवतो ते घडतेच असे नाही, निदान ट्रेकच्या बाबतीत तरी नाही. हा माझा अनेक वर्षांचा अनूभव आहे. राष्ट्रीय रॅलीच्या ४८ स्पर्धकांच्या दोन फेर्‍यांच्या वेळा घेऊन त्यावर ९ विविध गटांचे निकाल तयार करायचे हे काही सोपे काम नाही. माझ्यापर्यंत निकाल येण्यास खासा विलंब होत होता. इकडे मी माझी ट्रेकची सॅक बॅग भरायला सुरूवात केली, तेव्हा लक्षात आले की ट्रेकची पॅन्ट धुतलेली नाही. तात्काळ दोन तीन आडवे हात भारून पॅन्ट धुतली. मे महिन्याचे कडक उन्ह असल्याने वॉशिंग मशिनच्या ड्रायरमधुन काढलेली पॅन्ट लवकरच वाळणार होती.
ट्रेकसोल्स सकाळी ११-०० वाजताच रवाना होणार होते. आमचे साडे तीनच्या सुमारास निघण्याचे नियोजन होते. अडीच वाजेपासून भैय्याचे फोन सुरू होते. त्याला मी वेळोवेळी माझ्या तयारीची स्थिती सांगत होते. माझे एकच उद्दीष्ट होते रॅलीचे मराठी व इंग्रजी बातमीपत्र वेळेत तयार व्हावे. शेवटी जे व्हायचे तेच घडले, बातमीपत्र पुर्ण करून घर सोडायला ४-१५ वाजले. आई, जान्हवी व गार्गी असे आम्ही चौघे तसेच भैय्या, त्याची आई व ८ वर्षांचा ध्रुव असे आम्ही सगळे निघालो धारेरावच्या भटकंतीला.

ये दिल ना होता बेचारा
भैय्याला जाता जाता ऑफिसात पाच दहा मिनीटे थांबावे लागणार होते. सूर्यास्ताच्या आत धारेराव गाठलं नाही तर काय उपयोग? हेमोबाचं हे वाक्य डोक्यात फिरत होतं, तसा भैय्याने त्याच्या रिट्‌झ गाडीला वेग दिला. घोटीच्या जवळ गाडीत डिझेल टाकून घेतल्यानंतर आम्ही गाडीतूनच रायगड, बहुला, घरगड, कावनई किल्ले बघत घोटी-सिन्नर राज्य मार्गावर मोरधन किल्ल्यांच्या जवळून वळण घेतले.

अलंग-मदन-कुरंग हे प्रसिद्ध दुर्गत्रिकुट बघताना उगीचच देवानंदच्या गाण्याची आठवण आली. त्याचं ये दिल ना होता बेचारा याच मार्गावर चित्रीत झालेलं. भैय्याने सूर्य कलण्याच्या आत घोडीशेप लगतच्या कोकणकड्यावर पोहोचू अशी हमी दिल्याने माझी आशा कायम होती, परंतू नाशिकहून घोटी पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग वेगात पार केल्यानंतर घोटी-भंडारदरा-राजूर या घाट वळणाच्या  मार्गावर गाडीचा वेग मंदावणार होता. राजूरपासून
पुढे शिरपुंजे, कुमशेत ही गाडीची चाल त्याहून अधिक मंदावणार होती.


संध्याकाळचे ६:४०:
शिरपुंज्याचा भैरवगड दिसला, तेव्हा मी लांबुनच आईला वरती फार सुंदर असा किल्ला असून गुहेत भैरोबाची कोतळात कोरलेली देखणी मुर्ती असल्याचे व एखाद्या वळेस तिथे जाऊ असे सांगितले. एव्हाना झाडी दाट होऊ लागली होती. आजवर आम्ही कुमशेतच्या पुढे कधी गेलो नव्हतो. भैय्याने गुगल मॅपवर धारेरावचे लोकेशन घेतले होते, त्यामुळे वाटेत कुणाला विचारण्याची गरज भासत नव्हती. चिंता एकच होती. अंधार पडणार तर तो नेमका कुठे? कुमशेतच्या अलिकडे सुर्याने आम्हाला हात केला आणि तो लुप्त झाला समोरच्या डोंगराच्या आड. आम्ही मग त्याला असा निरोप देऊन चालणार नाही, म्हणून गाडी बाजुला लावली. त्याचे दिवसाचे शेवटचे दर्शन डोळे भरून बघितले व पुढच्या मार्गावर निघालो. आम्ही कुमशेतमध्ये पोहोचलो तेव्हा रस्त्यावरच्या दिव्याचा अंधुकसा उजेड पसरला होता, तिथेच धारेरावचा रस्ता विचारला तर रस्ता खुप खराब आहे, काळजीपूर्वक जा अशी प्रेमळ साद गावकर्‍यांनी दिली.

रात्रीच्या वेळी दिव्याच्या उजेडात उजळलेली धारेरावची मुर्ती...

अनं रस्ता संपला:
हा कच्चा रस्ता थेट धारेराव मंदिराच्या जवळ जातो, तिथून आम्हाला कोकणकडा शोधायचा होता. रस्ता असा नाहीच. त्यावर ना मैलाचे दगड ना कुठल्याखाणा खुणा. आसपास तर कोणचीच वस्ती दिसत नाही. सर्वत्र दाट जंगल, रस्ता म्हणजे माती नी दगडा कच्चा रस्ता, त्यावरून आमची चार चाकी गाडी चालेल तर कुठपर्यंत चालणार? आमचे ट्रेकसोल्सचे सवंगडी कसे शोधायचे?
रात्रेचे ८:४७ वाजले होते. असंख्य प्रश्नांचे काहूर माजले असताना मिट्ट काळोखात आम्हाला एकेठिकाणी दिव्याचा उजेड दिसला. भैय्याने गाडीतून उतरून आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण समोरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. माझ्या लक्षात आले होते, हेच ते धारेरावचे मंदिर. या मंदिरापाशी रस्ता संपला होता. आता पुढे काय? आमचे गडी सापडण्याची आशा मावळली होती. आल्या वाटेने परत जायचे आणि गावात पुन्हा रस्ता विचारायचा, पण इतक्या मागे जाण्याचे खुपच जिवावर आले होते. आमच्या सवंगड्यांचे कोणाचे फोन लागत नव्हते. आमच्याही मोबाईलला रेंज दिसत नव्हती. मी पुढे होऊन धारेरावांसमोर नतमस्तक झालो. आमचं काही चुकलं भाकलं असेल तर माफ कर अशी प्रार्थना करून आम्ही आल्या वाटेने परत कुमशेतला जाऊन मुक्काम करण्याचा निर्णय घेतला खरं, परती परतीचा रस्ताही आपण चुकलो आहोत हे समजायला फारसा वेळ लागला नाही. मिट्ट अंधारात कच्चा गाडीरस्ता दिसत होता, खडकांवरून हळूहळू गाडी पुढे सरकत होती. बाकी बाजुला सगळी किर्ररऽऽ झाडी. या चुकलेल्या वाटेवरूनच आम्हाला आमचा मार्ग सापडणार होता, हे
धारेरावचे दर्शन घेताना लक्षात आले नव्हते.

जंगलात दुरवर काही दिवे चमकदाना दिसले. ही एखादी गाव वस्ती असावी असे वाटले, थोडं पुढे गेल्यावर ही आमचीच मंडळी बॅटर्‍या चमकवून आम्हाला ईशारा देत होती. हेमंत, हिमांशु, सुशिल, प्रशात असे एक एक गडी समोर आले, त्यांना मिठ्या मारून आम्ही तात्काळ आमचे तंबु जोडायला घेतले.  जान्हवी लवकर जेवते व लवकर झोपते, त्यामुळे हेमंतने तंबुची जागा दाखविली, दहा मिनीटात जुन्हवीचे घर उभे राहिले होते.
वृक्षांवर जीवापाड प्रेम करणारा सयाजी अस्वले त्याच्या घरी तयार केलेले जेवण आमच्यासाठी घेऊन येणार होता. हा अवलिया म्हणजे खास देवराई पर्यटन करणारा. लोक जसे सहलीला जाता, तशा याने अनेक ठिकाणच्या देवरायांच्या सहली याने केल्या आहेत. सयाजीच्या घरचे जेवण येईपर्यंत जान्हवीला व दोघा मातोश्रींना आम्ही सोबत आणलेल्या डब्यातले जेवण दिले. मी पहाटे पासून रॅलीच्या धावपळीमुळे दमले
होतो, दुपारी जेवण झाले नव्हते, तेव्हा मी देखिल थोडे खाऊन घेतले. चांदणं छान पडलं होतं. आम्ही आमचा मुक्काम असलेला घोडीशेपचा डोंगर, कुमशेतचा कोंबडा डोंगर कोकणकडा मनसोक्त न्याहाळत दिड एक तास सर्वांशी गप्पा मारल्या आणि माझी पेंग सुरू झाली.
ट्रेकसोल्सचा एक गट कुमशेतला जाऊन बराच वेळ उलटला होता, मंडळी परतली नव्हती, कोणाचे फोनही लागत नव्हते, तेव्हा हेमंतने त्यांचा हालहवाल घेण्यासाठी दुसरी चमु पाठविण्याचा निर्णय घेतला. डोळ्यावरची झोप अधिकच गडद होऊ लागल्याने मी, 'लवकर झोपून लवकर उठू व सूर्योदय बघण्यासाठी कोंबड्याचा शिखरमाथा गाठू' असे ठरवून मी निद्राधीन झालो. घरात असताना मला रोज ५-०० ते ५-३०च्या दरम्यान
जाग येते. घोडीशेपवरही तसेच घडले, पहाटेच ५:३२ वाजता जाग आली, तंबुतून बाहेर डोकावले तेव्हा छावणी पहुडलेली होती. डोक्याशी असलेल्या पाण्याच्या धातुच्या बाटलीतून अर्धेअधिक पाणी रोजच्या शिरस्त्या प्रमाणे पोटात ढकलले आणि पावले आपसुकपणे कोकणकड्याच्या दिशेने निघाली.


ढगांची पातळ-गडद चादर
रात्रीच्या अंधारात दिसणारा तो आता अंधुक उजेडात थोडा स्पष्ट दिसत होता. 'तास दिड तासात तो कोवळ्या किरणांनी न्हाऊन निघेल तेव्हा सह्याद्रीचा ज्वालाजन् खडक आणि त्यावर पिवळ्या धम्मक गवताच्या छटांमध्ये एक वेगळेच सौदर्य दृष्टीस पडेल, असे विचार डोक्यात रंगू लागले असताना दक्षिण बाजुला नाफ्त्याच्या डोंगराच्या दिशेने मऊशार, पांढरे ढग मंदगतीने दरीतून वर येताना दिसले. मे महिन्याच्या
अखेरीस मॉन्सूनपूर्वी ढगांचे असे जत्थे सह्याद्रीतल्या आपल्या लाडक्या डोंगरांना भेटी द्यायला येतात त्यावेळी उन आणि ढगांचे पातळ-गडद थरांनी सह्याद्रीच्या रूपास वेगळीच सौंदर्य छटा प्राप्त होते.

डोंगरांचे काळे अग्नीजन्य खडक...झाडांची हिरवाई आणि सुकलेले पिवळे गवत यावर जेव्हा ढगांचे थर चढतात, तो नजरा देहभान हरपून बघण्याचा असतो. आज हे भाग्य आम्हाला मिळणार होते. कडकडीत उन्हं आणि जिवाची तगमग करणार्‍या शहरी गावगाड्यात निसर्गाचे हे रूप दिसत नाही, त्यासाठी एखादी सह्याधारच गाठावी लागते, आम्ही सह्याद्रीतल्या काही सर्वोच्च डोंगरांच्या परिसरात आज हा नजारा बघणार
होतो. आम्ही अपेक्षा केली, त्यापेक्षा कितीतरी अधिक आनंद आमच्या वाट्याला येणार होता.

महाराष्ट्रीतली काही अत्यूच्च शिखरे घनचक्कर, गवळदेव

थोड्याच वेळात कुमशेतचा कोंबडा ढगांनी पुर्ण झाकोळून टाकला. धारेरावची देवराई तर केव्हाच गुरफटली होती. तंबुच्या बाहेर आमची अवस्था मोठी बिकट होऊ लागली, कोकणकडा बघायचा, कुमशेतचा डोंगर बघायचा, की सुदूरचा नाफ्ता ढगांच्या गर्दीतून शोधायचा. पूर्व दिशेला पसरलेली कळसुबाईच्या तोडीची उंचच उंच रांग, २०१७चा शेवटचा दिवस आम्ही ज्या अद्वितीय रांगेत राहून काढला ते घनचक्कर, गवळदेव,
मुडा, कात्रा, करंडा ही सह्याद्रीतली अव्वल दहातली शिखरे डोळ्याच्या पॅनोरोमाने एव्हाना टिपायला सुरूवात केली होती.
आजोबाला वेढणारी ढगांची मफलर

आजोबाचे चित्र
उत्तर बाजुला आजोबा डोंगर तर डोंके वर काढून जणू आमच्या छावणीकडेच बघतोय असे भासत होते. त्याच्या उजव्या बाजुला गुयरीचे दार खुणावत होते...त्याच्या खाली दाट झाडींची आडवी पट्टी त्यावर धुक्याची एक ऐसपैस पसरलेली चादर, कोणत्या चित्रकाराने त्याविशाल कॅन्हासवर भल्या सकाळी आजोबाचे छानसे चित्रच रेखाटले होते. एव्हाना छावणी जागी झाली होती, कोणी मुखमार्जन करतयं तर कोणी डब्याला जातयं. प्रशांत पवार, पारस पणेर तर नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे सूर्योदयाचे फोटो टिपण्यासाठी छावणीपासून बरेच दूरवर योग्य अँगलच्या शोधात गेले होते. हेमंतने पाथर्‍याचा घाट बघून येऊ, अशी घोषणा केली व त्याच्या सोबत एक जत्था पुढे निघाला. लहान मुले आणि ज्येष्ठाना त्यावाटेवर नेणे सोयीचे ठरणार नाही, तेव्हा त्यांनी
छावणी जवळच थांबावे असे ठरले.
मी आईल कल्पना दिली, पुढचा मार्ग जंगलातून आणि डोंगरकड्याने आहे, बघून यायचे का? आईने तात्काळ हो म्हटलं आणि दिवाण मातुश्रींनाही तयार केलं. दोन माता, जान्ही, ध्रुव ही दोन लहान बालके आणि गार्गी असे आम्ही पुढच्या चमुच्या मागोमाग निघालो खरे, परंतू थोड्याच वेळात ही मंडळी दिसेनासी झाली. सयाजीशी बोलून मी वाटेची थोडी माहिती घेतली होती.


६:५८ मिनीटे सूर्य आता घनचक्कर डोंगराच्यावर आला होता, इकडे पाथर्‍याच्या मार्गावर आम्हाला कड्यावरून आवाज ऐकु येऊ लागले, आमची मंडळी जवळ असल्याचे संकेत मिळाले होते आम्ही डोंगराचा उतार पार करून चढण धरली आणि एका कड्यावर बघतो तर काय पलिकडचे काहीच दिसेना...दाट ढगांनी अवघा कोकणकडा व्यापला होता. सूर्यही झाकोळला होता. डोंगर, वनराई आणि सह्याद्रीच्या पहिल्या भेटीला येणार्‍या ढगांचे खेळ आमच्या समोर सुरू झाले होते. धोडीशेप-धारेराव भटकंतीची आम्ही कल्पना केली होती त्याहून अधिक देऊन जाणार हे स्पष्ट झाले होते. आपली तहान असते पेला भर आणि आपल्याला मिळत असतं हंडाभर...


थोडेसे गिर्यारोहण...आईला अशा पद्धतीने डोंगर चढण्याची सवय नाही...तरीही तिने असे चढ उतार पार करण्याचा भरपूर आनंद घेतला.


कुठाय कुमशेतचा कोंबडा...कुठाय नाफ्ता?




नेहमीच ट्रेकवर उत्तम स्वयंपाक करणारे डॉ. बापू घोडके यंदा सौभाग्यवतींना घेऊन आले होते...

ढग दरीत तयार होता...

पाथरा घाटावरची चौकी

हा असला की प्रत्येक ट्रेक आणि त्या ट्रेकचा प्रत्येक क्षण जिवंत असतो...अखंड रिझवणारा हिमांशू देशमूख पाथर्‍याचे रूप बघताना मात्र शांत झाला होता...

राजूचा ट्रेडमार्क चहा
८:३९ वाजता पाथर्‍याचा घाट आणि आसपासचा परिसर बघून आम्ही कोकणकड्यावर आमच्या छावणीत परतलो तेव्हा राजू लाखवाणीने चहाची एक फेरी पुर्ण केली होती. राजुच्या हातचा चहा आणि जेवण हे आमच्या असंख्य भटकंतीचे आवश्यक रसायनच बनले आहे. सह्याद्रीच्या अनेक थरारक चढाया केलेल्या या अवलियाचे ज्येष्ठ गिर्यारोहक आनंद पाळेंदेंनी त्याच्या 'चढाई उतराई सह्याद्रीतल्या घाटांची' या पुस्तकात पाथरा घाटाच्या चढाईच्या प्रसंगाचे वर्णन केले आहे, तेव्हा चहाच्या घुटक्यांसोबत आम्ही राजूला त्याच्या पाथर्‍याच्या काही आठवणींना उजाळा द्यायला सांगितले. चहाचे एक भांडे संपल्याने राजू दुसरे आधण ठेवण्याच्या गडबडीत होता. त्याच्या एक किलो वजनाच्या गॅस शेगडीवर चहाची उकळी फुटे पर्यंत त्याने एक आठवण सांगितली, पुण्यातले एक सदग्रहस्थ पाथर्‍याच्या चढाईने चांगलेच त्रस्त झाले होतो, पुढचा चोंढ्या मोंठ्या घाट करण्याची त्यांची मानसिक तयारी नव्हती...चोंढ्या - मोंठ्या घाटात माझा आता 'चेंदा मेंदा होईल', हे त्यांचे विधानाने हास्कयाची काही कारंजी उठली.

राजू लखवाणी स्पेशल

धारेरावांबद्दल स्थानिकांमध्ये कमालीचा आदर असल्याने त्यांनी धारेरावांचे मंदिर उभारले. आज पंचक्रोशीतुन अनेक मुळ निवासी नित्यनियमाने धारेरावाच्या दर्शनाला येतात. रोज येथे दिवाबत्ती केली जाते. त्यासाठी आजही स्थानिक पुजारी कैक किलो मिटरची दाट जंगलातुन पायपीट करतात. मंदिराच्या बाहेर अनेक मुर्त्या असून काही समाध्या आहेत. एक पुर्ण गोलाकार दगड लक्ष वेधून घेतो. पूर्वी डोंगरी किल्ल्यांचा बचाव करताना वरून असे गोल दगड शत्रुवर सोडले जायचे.
असे दगड अलिकडे रतनगड-कात्राबाईच्या खिंडीत सापडलेत. आम्हाला तोरण्यावर जाताना मेट पिलावर्‍यातही असे अनेक दगड दिसले होते. काही गावांचे मानाचे वाघेही मुर्तीच्या स्वरूपात या मंदिरात आढळून येतात, त्यांनाही शेंदूर लावून नित्य नियमाने स्थानिक मंडळी त्यांची पुजा करतात. आज रविवार असल्याने पंचक्रोशीतून अनेक भाविक धारेरावच्या दर्शनाला आले होते. आम्हाला एक भाविक कोंबडीचा बळी देताना आढळून आला. बाहेर दोन दुकाने थाटली होती, तेथे प्रसाद, हळद, कुंकु, अगरबत्ती अशा वस्तूंची विक्री केली जात होती.

देवराईतल्या धारेराव मंदिरात पंचक्रोशितल्या भाविकांची लगबग

'धारेराव सारख्या विरांचे उपकार नधीही न फिटणारे, तेव्हा त्यांना प्रसाद तर नित्यनियमाने अर्पण करायलाच हवा', त्यासाठी देवराईतच थाटलेले दुकान

मानाचे वाघे...

सार्‍यांच्या मनात अढळ स्थान मिळवणारा लढवैय्या मुळनिवासी स्वातंत्र्यवीर धारेराव अस्वलेंची मुर्ती





ट्रेकसोल्सची स्त्रीशक्ती...

हवी पक्की सडक
याठिकाणी एक आजोबा दुसर्‍या ग्रहस्थास सांगत होते, हा रस्ता आता पक्का करायला हवा, म्हणजे भरपूर लोक येथे येतील. त्यांना समजत नव्हते की, या ठिकाणांचे खर आकर्षण त्यांच्या दुर्गमतेत, निसर्गाच्या शांत लहरीत आहे. एकदा का येथे पक्की सडक तयार झाली, तर लोकांची ये जा अधिक सुलभ होईल, परंतू त्याबरोबर दृष्टी प्रवृत्तींची बाधा व्हायला वेळ लागणार नाही.
सह्याद्रीला झाडे तोडणार्‍यांची मोठी बाधा झाली आहे, त्याचे धोके कितीतरी अधिक वाढतील. देवराईबद्दल स्थानिकांना मोठी आस्था असते, ते तिथल्या झाडांची ना तोड करतात ना कुणाला करू देतात. लाकुड चोरणार्‍यांना याचे कुठले सोयर सूतक असेल? पक्कया रस्त्यांवरून गाड्या धडाडतीलही पण तुमची सूखाची झोप थोड्याच काळत नाहीशी होईल, हे सत्य उमगले तर अशा मागणी या मंडळींकडून येणार नाही.
इथल्या जंगलाल्या झाडांना पाण्याची अजिबात कमी नाही. म्हणजे आसपास कुठेच झरा नाही की पाण्याचा स्त्रोत दृष्टीस पडत नाही, परंतू सर्व झाडे हिरवी टवटवीत. झाडे त्यांच्या पाण्याचा बंदोबस्त हवेतून करतात, हे येथे स्पष्ट होत होते. परंतू वणवे? त्यांवर कोणताही उपाय आजतरी नाही. नियंत्रण हाच उपाय. घोडीशेपचा कोकणकडा ओलांडून यंदा वणव्याच्या झळा धारेरावच्या देवराईपर्यंत पोहोचल्यात. त्यात काही मोठी
झाडांचा कोळसा झाल्याचे मन हेलावणारे दृष्ट आम्हाला दृष्टीस पडली. या देवराईत मोठाले वृक्ष नाहीत, आहेत ती वीस एक  वर्षांची झाडे त्यानाही चहुबाजूंनी वणव्यांचा धोका आहेच. येणार्‍या काळात यावर व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.

घोडीशेपवर वणव्याने गिळंकृत केली मोठाली झाडी







सयाजी कुमशेतला त्याच्या घरी घेऊन गेला...यथेच्छ चहा-नाष्ता देऊनच त्याने आम्हारा रवाना केले. आईच्या चेहर्‍यावरचे समाधान मला पावलो पावली जाणवत होते. मोठ्या ट्रेकला शक्य नसले तरी आईचे लहान मोठे ट्रेक आता नेहमी घडणार...पुढची मोहिम अर्थातच ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा. ज्या गौतम ऋषींमुळे गोदावरी नदी ब्रम्हगिरीवर अवतिर्ण झाली, तो गौतमाचा धस बघण्याची आईची इच्छा यंदा पुर्ण करायचीय!

sahyadri trekkers bloggers
---